Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday, 9 June 2011

स्वातंत्र्याचा दुसरा लढा १६ ऑगस्टपासून : अण्णा

नवी दिल्ली, दि. ८ : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आज दिल्लीतील राजघाटवर आपले एक दिवसाचे उपोषण केले. दुसर्‍या स्वातंत्र्य लढ्याचा हा प्रारंभच आहे, असे जाहीर करताना, ‘आता आम्ही सरकारच्या दडपशाहीचे बळी ठरणार नाही. देशाला भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी प्रसंगी प्राणाहुती देण्याचीही आमची तयारी राहील,’ अशी गर्जना अण्णांनी यावेळी केली.
भ्रष्टाचार संपुष्टात आणणारे जनलोकपाल विधेयक सरकारने १५ ऑगस्टपर्यंत पारित केले नाही तर; १६ ऑगस्टपासून आपण जंतरमंतर येथे पुन्हा एकदा बेमुदत उपोषणावर बसू, असा इशाराही त्यांनी दिला.
भ्रष्टाचारविरोधात लढ्यापासून परावृत्त करण्यासाठी महाराष्ट्रातील एका मंत्र्याने मला ठार करण्याची सुपारी दिली होती. पण, मी कधीच कुणाचे वाईट केले नसल्याने माझी पुण्याई मला वाचविण्यासाठी उपयुक्त ठरली, असा गौप्यस्ङ्गोटही अण्णांनी केला. या मंत्र्याचे नाव मी जाहीर करणार नाही. त्याला त्याची शिक्षा मिळेलच, असेही ते म्हणाले.
लोकपाल विधेयक तयार करण्याच्या प्रक्रियेत सरकार अडथळे आणत आहे आणि सिव्हील सोसायटीचे सदस्य शांती भूषण, प्रशांत भूषण, संतोष हेगडे व अरविंद केजडीवाल या सदस्यांची बदनामी करीत असल्याचा आरोप अण्णांनी केला.
बाबा रामदेव यांचे उपोषण दडपण्यासाठी ४ जूनच्या रात्री पोलिसांनी केलेल्या अमानूष कारवाईच्या निषेधार्थ हजारे यांनी आपल्या असंख्य समर्थकांसह राजघाट येथे आज एक दिवसाचे उपोषण सुरू केले. ४ जूनच्या रात्रीची घटना मानवतेवर काळा डाग आणि लोकशाहीची हत्या करणारा प्रकार आहे, असे हजारे यांनी सांगितले. जंतरमंतर येथे परवानगी नाकारल्यानंतर हजारे यांनी उपोषणासाठी राजघाटची निवड केली. महात्मा गांधी यांच्या समाधीला अभिवादन केल्यानंतर ते उपोषणाच्या मंडपात आले असता त्यांच्या समर्थकांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. यावेळी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

No comments: