Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 16 January, 2010

मुख्यमंत्री व बंडोबांनाही कॉंग्रेसश्रेष्ठीनी फटकारले

राजकीय धुसफुस मात्र कायम
मडगाव, दि. १५ (प्रतिनिधी): गोव्यात सत्ताधारी कॉंग्रेसमध्ये वरचेवर होणाऱ्या बंडाळीमुळे संतप्त झालेल्या कॉंग्रेस श्रेष्ठींनी मुख्यमंत्री दिगंबर कामत तसेच बंडखोर नेत्यांना बरेच चापल्याची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे.
गेले चार दिवस राज्यात राजकीय खलबतांनी जी काही अचानक उचल खाल्ली व कॉंग्रेसेतर "ग्रुप ऑफ सेव्हन व कॉंगे्रस पक्षातील काही आमदारांनी उघडपणे नेतृत्व बदलाची मागणी केली त्यावरून श्रेष्ठी बरेच संतापल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे. विरोधक शांत असताना सरकाराअंतर्गतच वाद निर्माण करून सरकारची बदनामी सुरू आहे व त्यामुळे आपल्या सहकाऱ्यांना ताब्यात ठेवण्यास अपयशी ठरलेल्या मुख्यमंत्री कामत यांना श्रेष्ठींनी बरेच सुनावल्याचीही खबर आहे. केंद्रात तेलंगणाच्या स्वतंत्र राज्याचा विषय पेटला आहे. अशावेळी विनाकारण आपापसातील वादाला जाहीर स्वरूप देऊन क्लेश निर्माण करण्याचा हा प्रकार श्रेष्ठींसाठी डोकेदुखीच ठरत असल्याचेही यावरून स्पष्ट झाले आहे. दिल्ली येथे अर्थमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीसाठी उपस्थित राहिलेल्या मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्याशी राज्यातील राजकीय परिस्थितीचा आलेख श्रेष्ठींनी घेतल्याची खबर आहे.
कामत यांनी मुख्यमंत्र्यांची धुरा सांभाळल्यानंतर " गोव्यातच वरचेवर ही मागणी उसळी कां घेते , तुम्ही राज्याला सक्षम नेतृत्व देऊ शकत नाही का असा सरळ सवाल केला व यापुढे असे प्रकार चालणार नाहीत , कारण प्रश्र्न फक्त गोव्याचा नाही अन्य राज्यांचाही आहे ' असे बजावले असे कळते.
श्रेष्ठींकडून अशा प्रतिक्रियेची कामत यांना अपेक्षा नव्हती व त्यामुळेच दाबोळी विमानतळावर ते पडलेल्या चेहऱ्यानेच उतरले व पत्रकारांकडे जास्त वेळ न थांबता सरळ निघून गेले. रात्री त्यांनी पणजीत न राहता सरळ मडगावचा रस्ता पकडला.
दुसरीकडे प्रत्येक वेळी सरकारविरुद्ध होणाऱ्या हालचालीत आरोग्यमंत्र्यांचाही पुढाकार असतो याची दखलही दिल्लीने घेतली आहे . ते अपक्ष असतानाही मंत्रिमंडळात त्यांना दिलेले स्थान व त्यांंच्या प्रत्येक प्रस्तावाची पूर्ती होत असूनही बंडखोरांच्या गोटात त्यांचा असलेला वावर, असंतुष्टांना मिळालेले बळ या सर्व घटना गांभीर्याने घेऊन आठवडाभरात गोव्यातील राजकीय स्थितीबाबत काही महत्त्वाचे निर्णय श्रेष्ठी घेतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दरम्यान, सध्या दिल्लीत असलेले सार्वजनिक बांधकाम मंत्री चर्चिल आलेमांव यांनाही आज हरिप्रसाद यांनी पाचारण करून शिस्तीचे धडे दिले व भविष्यात सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला असल्याचे कळते.
"साम, दाम आणि दंड'चा प्रत्यय
"साम, दाम व दंड'नीतीचा वापर करीत कॉंग्रेस पक्षाने आपल्या नेहमीच्या पद्धतीने काही बंडखोरांची समजूत काढीत चुचकारण्याचा आज प्रयत्न केला, तर काहींना कारवाईची भीती दाखवत आवरण्याची क्लृप्ती वापरली. त्यामुळे आघाडी सरकाराअंतर्गत निर्माण झालेली बंडाळी थंडावल्यात जमा झाल्याची चर्चा आज राजधानीत सुरू होती. "ग्रुप ऑफ सेव्हन' मधील महत्त्वाचे घटक समजले जाणारे शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात यांच्यावर "सीबीआय' आरोपपत्राचा ससेमिरा लावून त्यांना वेसण घालण्यात आली. या घटनेची या गटातील उर्वरित सदस्यांनीही धडकी घेतल्याचे समजते. कॉंग्रेस पक्षातील बंडखोर गटात उफाळलेला असंतोषही काही प्रमाणात दूर करण्यात आला. पांडुरंग मडकईकर यांची भेट प्रदेशाध्यक्ष सुभाष शिरोडकर यांनी घेतली व त्यांचे दुखणे कमी करण्याचे ठोस आश्वासन त्यांना दिले आहे, असेही कळते. बाकी दयानंद नार्वेकर व आमदार फ्रान्सिस सिल्वेरा यांनीही दिगंबर कामत यांची भेट घेतली. कला अकादमीच्या दर्या संगमवर अखिल भारतीय साहित्य व संस्कृती संमेलनात नार्वेकर व कामत यांची भेट झाली व तिथेच त्यांच्यातील मतभेदांचा अस्त झाल्याचीही चर्चा सुरू होती. बाकी दिगंबर कामत यांनी धोका टळला असे सांगितले असले तरी त्यांच्या चेहऱ्यावरील चिंता मात्र स्पष्टपणे जाणवत होती. उद्या १६ रोजी कॉंग्रेस पक्षातील बंडखोरांची बैठक होणार आहे व त्यात ते आपली भूमिका ठरवतील, अशी माहिती आमदार मडकईकर यांनी पत्रकारांना दिली.

जुगाराचे निर्दालन करणारच पोलिस महासंचालकांचे ठोस आश्वासन

पणजी, दि. १५ (प्रतिनिधी): सार्वजनिक ठिकाणी जुगार खेळणे हा गुन्हा आहे व तो प्रकार अजिबात खपवून घेणार नाही. धार्मिक कार्यक्रम किंवा जत्रोत्सवातील जुगारावर स्थानिक पोलिसांना कारवाई करावीच लागेल. जुगाराबाबत जनतेने पोलिसांना माहिती दिल्यास तात्काळ कारवाई करू, असे आश्वासन पोलिस महासंचालक भीमसेन बस्सी यांनी दिले. गतवर्षी केवळ ३५ जुगार प्रकरणांची नोंद कशी, असा सवाल केला असता जुगार बंद करण्यासाठी जनतेचे सहकार्य गरजेचे असल्याचा खुलासा त्यांनी केले.
राज्यातील ढासळती कायदा आणि सुव्यवस्था व गुन्हेगारी प्रकरणांत वाढ झाल्यावरून गोवा पोलिस खात्यावर कुणी कितीही आरोप केले तरी गतवर्षी गोवा पोलिसांनी केलेली कामगिरी व अनेक कठीण गुन्हेगारी प्रकरणांचा लावलेला छडा ही कौतुकास्पद गोष्ट असल्याचा दावा बस्सी यांनी केला. वर्षभरातील गुन्हेगारी प्रकरणांचा आढावा घेताना हिंदू धार्मिक स्थळांची मोडतोड व मोतीडोंगर येथील तलवार प्रकरणाबाबत चकार शब्दही अहवालात आढळला नाही. महानंद नाईक व मडगाव स्फोट प्रकरणी पोलिसांनी बजावलेल्या कामगिरीची मात्र आज भरभरून स्तुती करण्यात आली.
आज पोलिस मुख्यालयात बोलावण्यात आलेल्या भरगच्च पत्रकार परिषदेत बस्सी यांनी वर्षभरातील कामगिरीचा आढावा पत्रकारांसमोर सादर केला. याप्रसंगी पोलिस महानिरीक्षक के. डी. सिंग, पोलिस उपमहानिरीक्षक रवींद्र यादव, खास अधीक्षक व्ही. व्ही. चौधरी, तसेच विविध विभागाचे अधीक्षक, उपअधीक्षक व इतर वरिष्ठ अधिकारी हजर होते.
सुरुवातीस उपमहानिरीक्षक रवींद्र यादव यांनी गतसालच्या पोलिस कामगिरीबाबत खास सादरीकरण करून राज्यातील पोलिस कामगिरीचा विस्तृत आढावा पत्रकारांसमोर ठेवला. त्यानुसार गेल्या वर्षभरात भारतीय दंड संहितेखाली (आयपीसी) एकूण ३००१ प्रकरणांची नोंद झाली. त्यातील १८६१ प्रकरणांचा तपास लावण्यात पोलिसांना यश मिळाले. यंदा गंभीर स्वरूपाच्या एकूण १५८ गुन्ह्यांची नोंद झाली. त्यातील १३७ प्रकरणांचा तपास लावण्यात आला. गतसालापेक्षा ही प्रकरणे जादा असली तरी तपासाची टक्केवारीही वाढली आहे, असे स्पष्टीकरण देण्यात आले.
या प्रकरणांत खून (५८), खुनाचा प्रयत्न (२४), दरोडा (४), चोरी (३०), बलात्कार (४७), लूटमार (२९४), दंगे (५०) आदी प्रकरणांचा प्रामुख्याने उल्लेख करता येईल. या व्यतिरिक्त वाहन चोऱ्या (३३६), इतर चोऱ्या (५२२), फसवणूक (१३२), दंगे (५०), मारामारी (१९१), अपघाती मृत्यू (२१०), इतर अपघात(५२६), जुगार(३५) आदींचीही दखल घ्यावी लागेल. दरम्यान, पोलिस स्थानकांत आलेल्या प्रत्येक प्रकरणांची त्वरित नोंद घेण्याची पद्धत अवलंबिल्याने आकड्यांत वाढ झालेली असली तरी विविध प्रकरणांचा तपास लावताना पोलिसांनी उत्कृष्ट कामगिरी केल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.
बस्सी म्हणाले, महानंद नाईक प्रकरणी पहिल्या आरोपपत्रांत तो निर्दोष सुटणे हा पोलिसांसाठी धक्का आहे; पण पुढील प्रकरणांत त्याच्याविरोधात पोलिसांकडे भक्कम पुरावे आहेत. त्याला या कर्माची सजा मिळणारच, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. वास्को येथील एका व्यापाऱ्याला ओलीस ठेवण्याची घटना, सांताक्रुझ येथील दरोड्याचा छडा, महिलांच्या संशयास्पद मृत्यू सत्राचा तपास, पाटो येथील चारजणांच्या गूढ मृत्यूची चौकशी आदी प्रकरणांचाही त्यांनी यावेळी विशेष उल्लेख केला. मडगाव स्फोटप्रकरणी विशेष चौकशी पथकाच्या कामाची तोंडभरून स्तुती करताना या प्रकरणी चार जणांना ताब्यात घेतल्याचे ते म्हणाले व आता राष्ट्रीय तपास यंत्रणेला हे पथक साहाय्य करीत असल्याचे ते म्हणाले.
अमलीपदार्थ विरोधी पथक, वाहतूक विभाग, आर्थिक गुन्हा विभाग, बेपत्ता शोध विभाग, कोकण रेल्वे विभाग, किनारी सुरक्षा विभाग, पोलिस नियंत्रण कक्ष आदी विभागांनी वठवलेल्या कामगिरीचीही दखल यावेळी श्री. बस्सी यांनी घेतली. पोलिस खात्यात मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाचा अभाव व साधनसुविधांची कमतरता असूनही या त्यावर मात करून पोलिस आपले कर्तव्य बजावत असल्याचे त्यांनी नमूद केले.
त्यांच्यावर कडक कारवाई
पोलिस खात्याबाबत अभिमान बाळगताना त्याला काही अपवाद असणे हे स्वाभाविक आहे. पोलिस खात्यातील काही लोक गुन्हेगारी प्रकरणांत गुंतले आहेत, त्यांची चौकशी सुरू आहे व त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही बस्सी यांनी दिली.
..तर महानिरीक्षकांच्या मुलालाही अटक
पोलिस महानिरीक्षक के. डी. सिंग यांच्या मुलाकडून सरकारी वाहनाचा गैरवापर झाला व अपघातही करण्यात आल्याप्रकरणी चौकशी सुरू आहे व या वाहनाच्या दुरुस्तीचा खर्च उचलण्याबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल. गरज पडलीच तर महानिरीक्षकांच्या मुलाला अटक करण्यासही पोलिस कसूर ठेवणार नाहीत,असे स्पष्टीकरणही त्यांनी दिले.
आग्नेल यांच्या आरोपांची गंभीर दखल
कळंगुटचे आमदार आग्नेल फर्नांडिस यांनी एका स्थानिक वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अमलीपदार्थ व्यवहारांबाबत केलेल्या वक्तव्यांची व पोलिस खात्यावर केलेल्या आरोपांची गंभीर दखल खात्याने घेतली आहे. या सर्व प्रकरणांची सखोल चौकशी सुरू आहे व गुन्हेगारांना अजिबात सोडणार नाही,असे श्री.बस्सी म्हणाले.अमलीपदार्थ व्यवहारांचे जाळे उखडण्यासाठी पोलिस कार्यरत आहेत. या व्यवहारांत गुंतलेल्यांना गोव्याबाहेर हाकलून लावले जाईल, असे त्यांनी सांगितले.

रक्षक बनले भक्षक आर्लेम येथे २.८१ लाख लंपास

मडगाव, दि. १५ (प्रतिनिधी): आर्लेम येथील गोवा बॉटलिंग कंपनीची तिजोरी फोडून तेथील सुरक्षा रक्षकांनीच आतील २.८१ लाखांची रोकड सुरक्षा रक्षकांनीच लांबवल्याचा प्रकार आज उघडकीस आला. मुख्य आरोपी फरारी झाला असून त्याच्या दोघा साथीदारांना अटक करण्यात आली आहे. सुरक्षा रक्षकांनीच केलेल्या या कृत्यामुळे आर्लेम भागात खळबळ माजली आहे.
गोवा बॉटलींगचाच अंगिकृत व्यवसाय असलेल्या सेलवेल फूडस अँड ब्रेवरेजीसच्या आर्लेम येथील कार्यालयात हा प्रकार काल रात्री घडला. आज सकाळी तो उघडकीस आल्यावर व्यवस्थापक राजेश राजेंद्रकर यांनी तक्रार नोंदवली. तिजोरी पूर्णतः फोडून ही रक्कम लाबवण्यात आली.
प्रथमदर्शनी तेथील सुरक्षा रक्षकांवर संशय बळावल्याने काल रात्रपाळीला असलेल्या मणिराज व रूपेनदास या दोघांना ताब्यात घेण्यात आले; जी. नरेंद्रकुमार हा फरारी आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्यांना तो बेपत्ता झाल्याही माहीत नव्हते.
तपास अगदी प्राथमिक टप्प्यात असल्याचे सांगून पोलिसांनी अधिक तपशील देण्याचे टाळले. तथापि नंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली; तसेच सर्व रक्कम नरेंद्रकुमारकडेच असल्याचे सांगितले आहे. नरेंद्रकुमार हा हैदराबादचा असून अन्य दोघे आसामी आहेत त्यामुळे त्याची जास्त माहिती त्यांनाही नाही. याप्रकरणी मायणा कुडतरीचे पोलिस उपनिरिक्षक कपिल नायक तपास करत आहेत.

खेळणी घेताय, सावधान!

नवी दिल्ली, दि. १५ : कोणत्याही घरात लहानग्याचा वाढदिवस म्हटले की, त्याला पाहुण्यांकडून भेटीदाखल खेळणी दिली जाणे हे ओघाने आलेच. शिवाय आपणही पर्यटनाच्या निमित्ताने किंवा सहलीसाठी कोठे गेलो तर नकळत खेळण्यांची खरेदी करतो. मात्र यापुढे ही खेळणी (प्रामुख्याने चीन आणि तैवानमध्ये तयार होणारी) विकत घेताना सावधगिरी बाळगणे अत्यावश्यक बनले आहे. प्रामुख्याने तीन वर्षांखालील मुलांना त्याद्वारे अपाय होऊ शकतो. कारण, या खेळण्यांमध्ये विषारी रसायने लपलेली असतात, असे ताज्या संशोधनाअंती सिद्ध झाले आहे. दिल्लीतील बाजारपेठेत उपलब्ध असलेल्या विविध खेळण्यांची चाचणी खास प्रयोगशाळेत केली असता त्यातून पुढे आलेले निष्कर्ष धक्कादायक आणि तेवढेच धोकादायक असल्याचे दिसून आले आहे. याचे मुख्य कारण म्हणजे तीन वर्षांखालील मुले बहुतांश खेळणी तोंडात घालतात. त्यामुळे ऍलर्जी, आस्थमा, त्वचेचे रोग, फुफ्फुसांने विकार या मुलांना होऊ शकतात. येथील "सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायरन्मेंट'च्या (सीएसई) संचालिका सुनिता नारायण यांनी आज पत्रपरिषदेत ही माहिती उघड केली. सुरक्षित खेळण्यांसाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर काही निकष निश्चित करण्यात आले आहेत. सीएसईने केलेल्या संशोधनात सुमारे ४५ टक्के खेळणी मुलांच्या आरोग्याला घातक असल्याचे दिसून आले आहे. यातील सनसनाटी गोष्ट अशी की, ज्या खेळण्यांवर ठळक अक्षरांत "बिनविषारी आणि वापरण्यास पूर्ण सुरक्षित' असे नोंदले होते. नेमकी तीच खेळणी लहान मुलांसाठी भयावह असल्याचे स्पष्ट झाले. जर चुकून लहानग्यांनी ती तोंडात घातली तर त्याद्वारे त्यांना भयंकर विकार होऊ शकतात. योगायोगाची गोष्ट अशी की, आंतरराष्ट्रीय निकषांची पूर्तता न करणाऱ्या खेळण्यांच्या आयातीवर भारतीय मानक संस्थेने घातलेल्या बंदीची मुदत येत्या २३ जानेवारी रोजी समाप्त होत आहे. आपल्या देशाला अशा गोष्टींची जाग फार उशिराने येते. तथापि, अमेरिका व युरोपीय समुदायाने यापूर्वीच चीन व तैवानमध्ये तयार होणाऱ्या खेळण्यांच्या आयातीवर बंदी घातली आहे. कारण, चीनमधील सुमारे ५७ टक्के तर तैवानमधील जवळपास सर्वच खेळणी लहान मुलांच्या आरोग्यासाठी धोकादायक असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे हा स्वस्त आणि मस्त चीनी किंवा तैवानी खेळण्यांचा प्रयोग तुमच्या अंगलट येऊ शकतो. आता २३ जानेवारीनंतर भारताकडून यासंदर्भात कोणती भूमिका घेतली जाते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Friday 15 January, 2010

कामत हटाव मोहीम आणखी तीव्र, बंडखोरांना कॉंग्रेस आमदारांचीही साथ

पणजी, दि. १४ (प्रतिनिधी): कॉंग्रेस आघाडी सरकारातील कॉंग्रेसेतर मंत्री व आमदारांनी "ग्रुप ऑफ सेव्हन' च्या नावाखाली मुख्यमंत्री कामत यांच्याविरोधात जोरदार आघाडी उघडली असतानाच आता खुद्द कॉंग्रेसमधील एका प्रबळ गटानेही कामत हटाव मोहिमेसाठी कंबर कसली आहे. मुख्यमंत्री दिगंबर कामत यांचे नेतृत्व झुगारून टाकण्यासाठी खुद्द सरकारातील मंत्री आमदारांनीच इतक्या मोठ्या प्रमाणात बंड करण्याची ही पहिलीच वेळ असून कामत यांना बाजूला केल्याशिवाय शांत न बसण्याचा विडाच त्यांनी उचलला आहे. आजच दिल्लीहून परतलेल्या मुख्यमंत्र्यांना दिल्लीश्वरांच्या आशीर्वादाने आपण सध्याच्या राजकीय अस्थिरतेतून नेहमीप्रमाणे सुरक्षितपणे बाहेर पडू असे वाटत असताना ग्रुप ऑफ सेव्हन बरोबरच पक्षातील बंडखोरांकडूनही कडवा विरोध सुरू झाल्यामुळे अचंबित होण्याची पाळी आली आहे. तथापि, या ही परिस्थितीत मुख्यमंत्रिपदाची खुर्ची टिकवण्याची त्यांनी आपल्यापरीने मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
कामत यांच्यासाठी खरी डोकेदुखी ठरलेले चर्चिल आलेमाव यांना आज श्रेष्ठींनी तातडीने दिल्लीला पाचारण केले व कामत विरोधक काही प्रमाणात नरम पडले असे वाटत होते. मात्र प्रत्यक्षात कोणत्याही परिस्थितीत कामत यांना हटवणारच असा निग्रह केलेल्या कॉंग्रेसच्या काही आमदारांनी मात्र नेतृत्व बदलाचा विडाच उचलला असून त्यासाठी पुढील परिणामांनाही सामोरे जाण्याची तयारी ठेवली असल्याचे समजते.
आज दिवसभरात राज्यातील राजकीय स्थिती काहीशी शांत वाटत होती परंतु प्रत्यक्षात मुख्यमंत्री कामत यांच्या विरोधातील असंतोष मात्र कायम होता हे नंतर स्पष्ट झाले. मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या निष्क्रिय कारभारामुळे सतत नाराज असलेल्या ग्रुप ऑफ सेव्हनच्या आमदारांनी कॉंग्रेस पक्षातही त्यांच्याबद्दल असलेला नाराजीचा या बंडासाठी चांगलाच उपयोग केल्याचे सध्या दिसत आहे. ग्रुप ऑफ सेव्हन' च्या नेत्यांनी काही कॉंग्रेस आमदारांशी संधान बाधून कामत यांच्या विरोधकांचा आकडा सध्या चांगलाच वाढविला आहे. म. गो. चे नेते तथा वाहतूकमंत्री सुदिन ढवळीकर यांनी ऐन वेळी ग्रुप ऑफ सेव्हनला आज दगा देण्याचा प्रयत्न केला असला तरी ढवळीकरांच्या पाठिंब्यावर ग्रुप ऑफ सेव्हन आधीपासूनच फारसा अवलंबून नव्हता असे, त्यामुळे त्यांच्या आजच्या पवित्र्यामुळे राजकीय बंडाळीवर फारसा परिणाम होणार नसल्याचे ग्रुप ऑफ सेव्हनच्या एका नेत्याने सांगितले. म. गो. पक्षाने दिगंबर कामत यांच्या नेतृत्वाखालील कॉंग्रेस आघाडी सरकारला पाठिंबा दिला आहे व तो कायम राहणार असे विधान करून त्यांनी गोंधळात भर घालण्याचा ढवळीकर यांनी प्रयत्न केला होता. त्यांच्या या वक्तव्यानंतर संध्याकाळी दोनापावला येथील आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्या बंगल्यावर या गटाची बैठक झाली पण त्यात नेमके काय ठरवण्यात आले ते मात्र कळू शकले नाही. मात्र विरोधक आपल्या मताशी ठाम असल्याचेच एकंदरीत घटनांवरून दिसून आले.
कॉंग्रेस पक्षातील आमदारांनी आज माजी वित्तमंत्री तथा हळदोण्याचे आमदार दयानंद नार्वेकर यांची भेट घेतल्याचीही माहिती मिळाली आहे. ऍड.नार्वेकर यांनी या गटाला आपला पूर्ण पाठिंबा जाहीर केल्याचे समजते. पांडुरंग मडकईकर, आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स, प्रताप गावस, आग्नेल फर्नांडिस आदी आमदार ग्रुप ऑप सेव्हनबरोबर असल्याचे समजते. नेतृत्व बदलाची ही मागणी श्रेष्ठीपर्यंत पोहचवण्यात आल्याचे आमदार मडकईकर यांनी काही पत्रकारांना सांगितले. या मागणीपासून अजिबात माघार घेणार नाही व त्याचे परिणाम काहीही झाले तरी बेहत्तर असा ठाम निर्धार मडकईकर यांनी व्यक्त केल्याचे समजते.
मुख्यमंत्री बंडखोरांना भेटणार
दरम्यान दिल्लीहून परतलेल्या मुख्यमंत्री कामत यांची पत्रकारांनी विमानतळावर भेट घेतली असता, आपण निर्धास्त असल्याचे नेहमीप्रमाणे त्यांनी म्हटले खरे परंतु त्यांच्या आवाजात पूर्वीप्रमाणे आत्मविश्वास मात्र नव्हता. कॉंग्रेसच्या बंडखोर आमदारांकडे आपण चर्चा करणार असून त्यांची समजूत काढण्यात आपण यशस्वी होऊ असेही ते म्हणाले. कदाचित उद्याच ते बंडखोरांची भेट घेण्याची शक्यता आहे, त्यानंतर शनिवारी पक्षाच्या बंडखोर आमदारांची पुन्हा बैठक होणार आहे. या बैठकीत अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. शनिवारपर्यंत कॉंग्रेसचे केंद्रीय निरीक्षक गोव्यात दाखल होण्याची शक्यता आहे.
--------------------------------------------------------------
नातेवाईकांवर रोष
अकार्यक्षमता, निष्क्रियता, निर्णयशक्तीचा अभाव अशा अनेक कारणांमुळे ग्रुप ऑफ सेव्हन तसेच पक्षातील आमदार मुख्यमंत्री कामत यांच्यावर चांगलेच नाराज आहेत, परंतु अलीकडे सरकारी निर्णयप्रक्रियेत मुख्यमंत्र्यांच्या काही कुटुंबीयांकडून होणाऱ्या कथित हस्तक्षेपाबद्दलही त्यांना कमालीचा राग असल्याचे समजते. या हस्तक्षेपाच्या अनेक चित्तरकथा सध्या बंडखोर आमदारांमध्ये चर्चिल्या जात असून ही कौटुंबिक मक्तेदारी सहन केली जाणार नसल्याचे वक्तव्य बंडखोर वारंवार करताना दिसत आहेत.

'संपुआ' सरकार थैलीशहांचे एजंट

महागाईच्या विषयावरून मायावती कडाडल्या
लखनौ, दि. १४ : भाववाढीबद्दल राज्य सरकारांवर खेकसणाऱ्या केंद्र सरकारला उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री मायावती यांनी कडक शब्दांत खडसावले आहे. केंद्रातील सरकार भांडवलशहांच्या हातचे बुजगावणेबनले असून जर महागाई रोखण्यात त्याला यश आले नाही तर केंद्राविरुद्ध आपल्याला देशव्यापी मोहीम हाती घ्यावी लागेल, असा सणसणीत इशारा मायावती यांनी दिला आहे. आज येथे त्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या. थैलीशहा आणि बडे व्यावसायिक यांचे उखळ पांढरे करणे हाच केंद्रातील संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारचा अजेंडा आहे. आकाशाला भिडलेली महागाई म्हणजे या सरकारच्या सपशेल चुकीच्या आर्थिक धोरणाचा परिपाक आहे. सतत दिशाभूल व गोंधळमय विधाने करून केंद्रातील मंत्री साठेबाज, नफेखोर, काळाबाजारवाले आणि दलालांना प्रोत्साहन देत आहेत. या मंडळींविरुद्ध त्यांना वेळीच कारवाई करण्यात साफ अपयश आले आहे, असे त्यांनी सांगितले.
केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचा मायावती यांनी विशेष समाचार घेतला. त्या म्हणाल्या, पवार हे गेल्या काही महिन्यांपासून अशी विधाने करत आहेत की, केवळ त्यामुळेच साठेबाज आणि काळाबाजर करणाऱ्यांची चंगळ सुरू आहे. एवढेच नव्हे तर लोकसभा निवडणुकीच्या दोन महिने आधी संपुआ सरकारने इंधनाच्या दरात केलेली कपात म्हणजे निव्वळ धूळफेक होती. सत्ता ताब्यात घेताच या सरकारने भांडवलशहांच्या दडपणाखाली नमून लगेच या किंमती मूळ स्तरावर आणून ठेवल्या. तसेच देशातील अन्नधान्याची गरज लक्षात घेऊन गहू आणि तांदुळ यांच्या निर्यातीवर केंद्राने त्वरित बंदी घालायला हवी होती. तसे न झाल्याने देशात चलनफुगवटा वाढला आणि त्याची परिणती महागाई वाढण्यात झाली.
धान्य आणि साखरेची आयात करताना आयातकरातून सवलत देण्याच्या निर्णयाला विलंब करण्यात आल्यामुळे त्यातून महागाईला खुले निमंत्रणच मिळाले. "आम आदमी साथ पुंजिपतियोंके साथ' हेच या सरकारचे धोरण बनले आहे. याच्या उलट उत्तर प्रदेश सरकारने राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना साठेबाज आणि दलालांवर अत्यंत कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. आम आदमीला सर्वतोपरी दिलासा देण्यासाठी माझे सरकार युद्धपातळीवर प्रयत्नरत असल्याचा निर्वाळा त्यांनी दिला.

आगोंद भागात मठाच्या बांधकामावरून तणाव

काणकोण, दि. १४ (प्रतिनिधी): पारवे आगोंद येथील सर्व्हे. क्र. ६ या जमिनीत असलेला मठ बेकायदा बांधकाम ठरवून पाडल्यास तेथे तणाव वाढून बाका प्रसंग निर्माण होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
येथील मठ परिसराच्या बांधकाम समर्थकांनी आज (दि.१४) संध्याकाळी बोलावलेल्या पत्रकार परिषद बोलावली होती. यावेळी या मठाचे शाखा प्रमुख सप्लेश गणेश देसाई, नगराध्यक्ष श्यामसुंदर देसाई, कोमुनिदादचे नवनिर्वाचित अध्यक्ष दर्शन नाईक गावकर, खजिनदार रमाकांत नाईक गावकर व अन्य उपस्थित होते.
काणकोण कोमुनिदादचे मावळते अध्यक्ष शाबा नाईक गावकर यांनी सर्व्हे क्र. ६ मध्ये कोमुनिदादच्या जागेत बेकायदा बांधकाम केल्याची तक्रार महसूल मंत्री, जिल्हाधिकारी आदींना दिली होती. या पार्श्वभूमीवर मंत्री व अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सदर बांधकामाची पाहणी करून सोमवार ११ जाने. रोजी बांधकाम त्वरित पाडण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यंाना दिला होता. उद्या शुक्रवार १५ रोजी दुपारी २.३० वा. बांधकाम पाडण्यात येणार असल्याची नोटीस उपजिल्हाधिकाऱ्यांतर्फे मुख्यत्यार धीरज गावकर यांना दिल्याचे यावेळी सांगण्यात आले.
मठप्रमुख सप्लेश देसाई यांनी यावेळी सांगितले की, तेथे आपली झोपडी होती. त्यात वीस वर्षांपासून वडाचे झाड व जवळच एक क्रॉस होता. हल्लीच झोपडीचे बांधकाम केले असून वडाच्या झाडाचा पेडही बांधण्यात आला आहे. वीज, नळ, फोन कनेक्शनही देण्यात आले. ही जागा दोन हजार चौरस फूट नसून फक्त पाचशे चौरस मीटर असल्याचा दावा त्यांनी केला. मठाच्या बाजूला शौचालय व न्हाणीघर यासाठी बांधकाम झाले आहे.
कोमुनिदादचे नवीन अध्यक्ष दर्शन गावकर यांनी सांगितले, मी ताबा घेतल्यानंतर पूर्व अध्यक्षांनी बळकावलेल्या जमिनीची कायदेशीर चौकशी करणार आहे. तसेच या जागेत पंधरा वर्षांपासून वटपौर्णिमेचे व्रतही गावच्या स्त्रिया साजरे करत आहेत. त्यामुळे या झाडाचे रक्षण करण्यात यावे व बेकायदा बांधकाम असल्यास त्यासंबंधीचा दंड द्यावा आणि सदर बांधकाम कायदेशीर करून घ्यावे.
दरम्यान, उद्या १५ रोजी सकाळी आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहोत. बांधकाम पाडण्यासाठी येणाऱ्या पथकाला सर्वशक्तिनिशी विरोध केला जाईल, असे दर्शन गावकर म्हणाले. दरम्यान, या मठाला संरक्षण दिले जावे, अशी आग्रही भूमिका माजी मंत्री संजय बांदेकर यांनी मांडली आहे.काही स्वार्थी लोकांनी हा डाव रचला असून तो यशस्वी ठरू देणार नसल्याचे पत्रकारांना त्यांनी सांगितले.

मराठी साहित्य व संस्कृती संमेलनाचे आज उद्घाटन

पणजी, दि. १४ (सांस्कृतिक प्रतिनिधी): कोकण मराठी परिषद, गोवा आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य आणि संस्कृती संमेलनाला आजपासून निर्सगाच्या सानिध्यात कला अकादमीच्या दर्या संगमवर प्रारंभ होणार आहे. साहित्य आणि संस्कृतीचे मिश्रण असलेले संमेलन गोव्याची स्थानिक संस्था प्रथमच आयोजित करत आहे. आजपर्यंत गोव्यातील विविध संस्थांनी अनेक साहित्य संमेलन आयोजित केली आहेत, परंतु ती गोव्यापुरती मर्यादित होती. तर हे संमेलन अखिल भारतीय असून संमेलनस्थळी डॉ. गं. ब. ग्रामोपाध्ये यांना समर्पित पुस्तक जत्रा १४ जानेवारीपासून सुरू झाली आहे. सदर पुस्तक जत्रेत सुमारे १०० स्टॅाल असू एकाच ठिकाणी विविध विषयांवरील दुर्मीळ पुस्तके असणे ही गोवेकरांना पर्वणी ठरली आहे. याच वर्षात महान देशभक्त तथा साहित्यिक क्षेत्रातील अनेक दिग्गज व्यक्तींची जन्मशताब्दी असल्याने
संमेलनातील काही कार्यक्रम तथा संमेलनातील काही स्थळे त्यांच्या नावाने समर्पित करण्यात करण्यात आली आहेत.
या संमेलनात पुढीलप्रमाणे विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत.
शुक्रवार १५ रोजी दुपारी ३ वा. ग्रंथदिंडीचे श्रीराम कामत यांच्या हस्ते उद्घाटन, ५ वा. संमेलनाचे मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या हस्ते उद्घाटन होईल. यावेळी माधवी देसाई अध्यक्षा असून डॉ. यशवंत पाठक हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत. रात्री ९.३० ते ११.३० वा. कविसंमेलन होणार आहे. यावेळी प्रा. लक्ष्मीकांत तांबोळी हे अध्यक्षस्थानी असून समन्वयक म्हणून किशोर पाठक असतील.

पोलिसांचे हप्ते दुप्पट!

पार्से जत्रेतील जुगाराबाबत आयोजक दचकून
पणजी, दि. १४ (प्रतिनिधी): जत्रोत्सवातील जुगाराबाबत "गोवादूत' मध्ये प्रसिद्ध होणाऱ्या वृत्तांची सबब पुढे करून जुगार चालवण्यासाठी पोलिसांनी आपल्या हफ्त्याच्या रकमेत दुप्पट वाढ केल्याची एकच चर्चा सध्या पेडण्यात सुरू आहे. जत्रोत्सवांसाठी जुगारांची हमी देण्याची जबाबदारी आता पोलिसांनी सोडली आहे पण या प्रकाराला आळा न घालता यासंबंधीची संपूर्ण जबाबदारी संबंधित देवस्थान समिती, पंचायत मंडळ व जुगार आयोजित करणाऱ्यांवर लादून आपले हात धुऊन घेण्याची नामी शक्कल लढवल्याचीही खात्रीलायक माहिती मिळाली आहे.
सध्या जत्रोत्सवातील जुगाराबाबत "गोवादूत' मधून सुरू झालेल्या चळवळीचा मोठा धसका पोलिस व जुगार आयोजित करणाऱ्यांनी घेतला आहे. या जुगाराला स्थानिक पंचायत व देवस्थान समिती व राजकीय नेत्यांचाही पाठिंबा मिळत असल्याने हे लोक काही प्रमाणात बेफिकीर असले तरी लोकांत मात्र जुगाराविरोधातील जनमत बनत चालल्याने रात्रीच्या वेळी काही अनुचित प्रकार घडण्याचा धसकाच या लोकांनी घेतला आहे. पोलिसांकडून जुगाराला छुपा पाठिंबा मिळतोच पण जेव्हा जुगाराबाबत वृत्तपत्रांत बातम्या येतात तेव्हा जुगार बंद होण्याऐवजी पोलिसांचे हप्ते मात्र वाढतात, अशी प्रतिक्रिया पेडणेतील एका स्थानिकाने दिली. पेडणे पोलिस स्थानकात आत्तापर्यंत रुजू होणारा प्रत्येक निरीक्षक जुगारातून इथे किती मिळकत करीत आहे याचा हिशेब करूनच ही जबाबदारी स्वीकारीत असल्याची खबरही काही लोकांनी दिली. पत्रादेवी चेकनाका, जुगार व पेडणे किनारी भागातील अमलीपदार्थ व्यवहार हीच येथील काही पोलिसांची वेगळी कमाईची साधने आहेत,अशी विस्तृत माहितीही यावेळी देण्यात आली.
उद्या १६ रोजी पार्से येथे जत्रा
उद्या १६ रोजी पार्से येथील श्री देव म्हारिंगण राष्ट्रोळी देवाचा वार्षिक जत्रोत्सव साजरा होत आहे. सध्या जुगाराविरोधातील वातावरण तापले असताना या जत्रोत्सवासाठी जुगार आयोजित करण्यासाठी काही लोकांनी धडपड सुरू केली आहे. पोलिसांनी मात्र याप्रकरणी हात वर केल्याची खबर आहे. याठिकाणी जुगार चालवण्यास पोलिसांनी आपल्या हप्त्याची रक्कम ठरवली आहेच पण इथे काही गोंधळ झाल्यास त्याची जबाबदारी मात्र स्वीकारण्यास नकार दिल्याची खबर आहे. जत्रोत्सवातील जुगारावर अनेक वेळा पणजी येथील गुन्हा विभागाकडूनही छापे टाकले जातात व त्यामुळे या जुगाराच्या हफ्त्याचा काही भाग पणजी येथेही पोहचत असल्याची माहिती एका आयोजकानेच दिली. सध्या अमलीपदार्थ व्यवहारांचा मोठा गाजावाजा सुरू असल्याने सर्वत्र छापासत्र सुरू आहे, त्यात जुगारावरूनही पोलिसांवर टीकेची झोड उडाल्याने कधी कुणा वरिष्ठ अधिकाऱ्याचे डोके फिरेल व जुगारावर छापा पडेल हे सांगता येत नाही, त्यामुळे सगळेच काही प्रमाणात दचकून आहेत.

Thursday 14 January, 2010

सत्तरीमध्येही जत्रोत्सवात जुगार पोलिसांसमोर आव्हान!

वाळपई, दि. १३ : पेडणे पाठोपाठ सत्तरी तालुक्यातील देवस्थानांच्या अनेक जत्रोत्सवामध्ये डोळ्यांदेखत गेल्या अनेक वर्षापासून जुगार चालत असून या जुगाराने वाळपई पोलिसांसमोर आव्हान उभे ठाकले आहे. सत्तरी तालुक्यात अपवादात्मक गोष्टी सोडल्यास अनेक देवस्थानांच्या जत्रोत्सवावेळी जुगार चालतो. यंदाच्या जत्रोत्सवात मोठ्या प्रमाणात जुगार दिसून आला असून काही जत्रोत्सव तर जुगारासाठीच चालतात असे सध्याचे चित्र दिसत आहे.
जुगार चालविणाऱ्यांचे हात मोठ्या धेंडापर्यंत असल्याने या तालुक्यात जत्रोत्सवात चालणाऱ्या जुगारावर अजूनपर्यंत गेल्या अनेक वर्षांपासून कोणतीच कारवाई झाल्याचे दिसून येत नाही. बऱ्याच प्रमाणात या जुगाराकडे तरुण पिढी व शालेय विद्यार्थी वळत असून तरुण पिढीला मार्गदर्शन करण्याचा ठेका घेतलेले लोकप्रतिनिधी मात्र याकडे मुद्दामहून कानाडोळा करत असल्याचे दिसून आले आहे. हल्लीच एका जत्रोत्सवाच्या वेळी पोलिसांच्या समक्ष जुगार सुरू असून सुध्दा कोणतीच कारवाई झाली नसल्याचे वृत्त हाती आले आहे. जुगाराची तयारी जुगारवाले जत्रोत्सवाच्या दिवशी संध्याकाळी पाचपासून करायला सुरुवात करतात. ज्या ठिकाणी जत्रा असते त्याठिकाणी जुगारासाठी जागा अडविण्यासाठी जुगारवाले आच्छादने मांडून आदल्या दिवशीच जागा अडवितात. वाळपईत एक प्रसिद्ध कालोत्सव जुगारासाठीच म्हणून दोन दिवस चालतो. या कालोत्सवात जुगारासाठीच खास जागा आहे. दुर्दैवाने पोलिस स्थानक या कालोत्सवाच्या जागेच्या जवळपास ३०० मीटर अंतरावर आहे परंतु आजपर्यंत कोणतीच कारवाई दिसून येत नाही. अनेक कालोत्सवात भांडणे जुगार खेळताना होत असतात. त्याचबरोबर अनेक जण दारू पिऊन दंगामस्ती करतात. कमला नावाच्या महिलेने "गोवादूत'शी बोलताना सांगितले की या वृत्तपत्राने जुगाराविरोधात अभियान उघडून चांगले काम केले आहे. आज अनेक महिला मंडळे सत्तरी तालुक्यात आहेत. या महिला मंडळांनी खरे म्हणजे राजकारण्यांच्या मागे न धावता जुगारासारख्या घाणेरड्या प्रवृत्ती विरोधात अभियान छेडले पाहिजे. आज राजकारण्यांचे सुध्दा हेच कर्तव्य आहे. सत्तरी तालुका जुगारमुक्त करण्याचे धाडस एकाही राजकारणात नसल्याबद्दल सौ. कमला यांनी खेद व्यक्त केला. दरम्यान ब्रह्माकरमळी सत्तरी येथील श्री ब्रह्मदेव देवस्थानाने याबाबत एक आदर्श निर्माण केला असून या देवस्थानच्या ब्रह्मोत्सवात आजपर्यंत कधीही जुगार चाललेला नाही. त्याचबरोबर याच्यापुढे सुध्दा कोणत्याही परिस्थितीत तेथे जुगाराला थारा दिला जाणार नाही असे देवस्थान सेवा समितीचे अध्यक्ष संदीप केळकर यांनी "गोवादूत'शी बोलताना सांगितले. जुगाराविरोधात उघडलेल्या अभियानने खऱ्या अर्थाने जुगारविरोधात आवाज बुलंद केल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या शेकडो वर्षांपासून सुरू असलेल्या ब्रह्मकरमळीच्या ब्रह्मोत्सवात कधीही जुगार चालला नाही याचा आदर्श इतर देवस्थानांनी बाळगावा. देवस्थानांसारख्या पवित्र ठिकाणी जुगार चालू नये, असे "गोवादूत'शी बोलताना ऍड. शिवाजी देसाई यांनी सांगितले. देवस्थानला लागणारा पैसा हा पवित्र माध्यमातून जमविलेला असला पाहिजे. कारण देवस्थान म्हणजे पुण्याचे धाम आहे व म्हणूनच या जुगाराला विरोध आहे असे ज्येष्ठ नागरिक लक्ष्मण केळकर यांनी सांगितले. सत्तरी तालुक्यातील अनेक पंचायत क्षेत्रात हा जुगार जत्रोत्सवावेळी चालत असल्याची माहिती मिळाली आहे. प्रत्येक पंचायतीने आता जुगाराविरोधात तालुक्यातून ठराव घ्यावा व या अभियानाला साथ देण्याची गरज आहे. दरम्यान "गोवादूत'च्या वृत्ताने सत्तरी तालुक्यातही खळबळ माजली असून सध्या पोलिस कोणती कारवाई करतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. पणजीत तरंगत्या बोटीत रोज लाखो रुपयांचा कॅसिनो खेळला जातो. या कॅसिनोला सरकारकडून मान्यता दिली जाते. काही दिवसांपूर्वी एक मंत्रीच कॅसिनो खेळताना प्रत्यक्षरीत्या प्रसार माध्यमांनी दाखविला होता. त्यामुळे गुंड प्रवृत्तीचे नेते पण कॅसिनोसारख्या वाईट प्रवृत्तींना पाठिंबा देतात, हे आता उघडकीस आले आहे. सरकारने याआधी मटका बंदी केली पण मटका पण सर्रासपणे चालूच आहेतच. म्हणून अशा वाईट प्रवृत्तींवर बंदी घालताना ती बंदी फक्त कागदावरच न राहता प्रत्यक्ष कृती केली पाहिजे. जुगार हा खेळ परमेश्वराच्या जत्रेच्या वेळीच का खेळला जातो असाही प्रश्न पडत आहे. पूर्वीच्या जमान्यात जी दशावतारी नाटके गावागावांत व्हायची त्या नाटकांना लोकांची गर्दी होत असे. त्यावेळी लोक देवदर्शन व आवड म्हणून नाटके बघितली जात. आज हे उलट झाले आहे. जत्रेच्या निमित्ताने जुगारासारख्या अनिष्ट प्रथांना प्रथम प्राधान्य दिले जाते. परमेश्वर भक्तीही केवळ दिखाऊपणा झाला आहे. नाटक बघण्यासाठी क्वचित रसिक असतात. खरी गर्दी तर मंदिराच्या मागील बाजूस चालणाऱ्या काळ्या धंद्याकडे असते. यात युवकांपासून ते वृद्धांपर्यंत लोकांची प्रचंड गर्दी असते. यामुळे युवा वर्ग चुकीच्या मार्गाने जाऊ लागला आहे. याचा परिणाम संसारावर होत आहे. या युवकांची कृती बघून बाल युवक पण अशा नादाला लागतात व शिक्षण घेण्याच्या वयात त्यांना जुगारी प्रवृत्तींकडे ओढत चालला आहे. हे सर्व थांबावे असे वाटत असेल तर प्रत्येक देवस्थान कमिटीने याला विरोध करून अभियान सुरू केले पाहिजे,असे मत व्यक्त होत आहे.
महाराष्ट्रात जुगाराला पूर्ण बंदी आहे. त्याप्रमाणे गोवा राज्यातही जुगारावर बंदी आणून ती प्रत्यक्षात कृतीत आणली पाहिजे. खरेच देवस्थान कमिटींना या मटका जुगाराद्वारे पैसा मिळवण्याची गरज आहे का? आजकाल देवस्थानाला दान करणारे लोक मोठ्या प्रमाणात तयार झाले आहे. अशा दात्यांकडून पैसे घ्यावे जेणे करून पुण्य पदरात पडेल. सत्तरीत दरवर्षी मंदिरांची प्रतिष्ठापना वाढत असून तेवढीच जत्रा भरण्याची संख्याही वाढत आहे. पोलिसांनी खऱ्या अर्थाने अशा जुगार खेळण्यावर कारवाई केली पाहिजे. पोलिसांसमोर हे एक मोठे आव्हानच आहे. हे आव्हान स्वीकारतील का, असा प्रश्न सत्तरीतील जनता विचारत आहे.

स्वाईन फ्लूमधील 'अंदर की बात'

औषध कंपन्यांनी केली कोट्यवधींची कमाई
नवी दिल्ली, दि. १३ : गेल्या वर्षभरात जगभर हलकल्लोळ उडवून दिलेल्या स्वाईनफ्लूबाबत आता वेगळीच सनसनाटी माहिती उजेडात आली असून या आजाराचा जेवढा बभ्रा करण्यात आला तेवढा तो प्रत्यक्षात गंभीर नसल्याचे स्पष्ट झाले आहे!
केवळ काही औषध कंपन्यांचे उखळ पांढरे करण्यासाठीच प्रसारमाध्यमांना हाताशी धरून स्वाईनफ्लूचे भयंकर चित्र निर्माण केले गेले. जागतिक आरोग्य संघटनेच्या मंडळावरील अनेक सदस्यांचे सदर औषध कंपन्यांशी साटेलोटे असल्याचे उघडकीस आले आहे. या मंडळींनी स्वाईनग्रस्त देशांना एच१एन१ हे औषध खरेदी करण्यास प्रवृत्त केले. डेन्मार्कमधील माहिती स्वातंत्र्य कायद्याखाली याबाबतची कागदपत्रे उपलब्ध झाली असून त्यान्वये प्रा. जुहानी एस्कोला यांनी एका औषध कंपनीसाठी स्वाईनफ्लूवरील औषधासाठी खास संशोधन केले. नंतर त्यांनी जागतिक आरोग्य संघटनेच्या खास मंडळावरील सदस्यांची बैठक बोलावली. ते स्वतःदेखील या मंडळाचे सभासद आहेत. त्यांना संबंधित औषध कंपनीकडून तब्बल ६३ लाख युरोची घसघशीत रक्कम गेल्या वर्षी मिळाली. एवढेच नव्हे तर या खास मंडळातील अनेक सदस्यांची एकूण सहा आंतरराष्ट्रीय औषधनिर्मिती कंपन्यांशी "गहिरी दोस्ती' असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे या सदस्यांना हाताशी धरून सदर कंपन्यांनी स्वाईनफ्लूचे भयाण चित्र उभे केले व त्यातून आपल्या तुंबड्या भरल्या. औषधनिर्मिती व आरोग्यक्षेत्रातील जाणकारांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यांनी आपला कार्यभाग उरकल्यामुळे आता स्वाईनफ्लूवरून दिली जाणारी खास बातमीपत्रे प्रामुख्याने इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमांनी देणे जवळपास बंदच केले आहे. साहजिकच या समजाला आणखी पुष्टी मिळाली आहे. अमेरिका किंवा युरोपातील अनेक देश आपली शस्त्रास्त्रे खपवण्यासाठी दोन देशांमध्ये तणाव निर्माण होईल, यादृष्टीने आजही प्रसारमाध्यमांना हाताशी धरून बातम्यांची पद्धतशीर पेरणी करतात व त्यातून आपला खजिना भरतात. आता औषधनिर्मिती कंपन्याही याच मार्गाचा अवलंब वेगळ्या प्रकारे करत असल्याचे दिसून येते.

हॉस्पिसियोचे शवागर निकामी

सर्व १८ मृतदेह कुजले; विल्हेवाट लावण्याची पाळी
मडगाव, दि. १३ (प्रतिनिधी): येथील हॉस्पिसियो इस्पितळातील शवागर अखेर जादा ताण सहन होऊन निकामी ठरले आहे. त्यामुळे त्यातील मृतदेहांची अन्यत्र सोय करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांची धावपळ उडाली असून सायंकाळपर्यंत कोणतीच पर्यायी व्यवस्था झाली नव्हती.
काकोडा कुडचड्याचे माजी नगरसेवक ज्योविनो यांचे रविवारी रात्री निधन झाल्यावर त्यांचे मुलगे विदेशात असल्याने ते आल्यावर अंत्यसंस्कार करण्याच्या इराद्याने तोपर्यंत जतन करण्यासाठी म्हणून त्यांचा मृतदेह हॉस्पियोच्या शवागरात आणून ठेवण्यात आला होता. मुलगे विदेशातून आल्यावर ते मृतदेह नेण्यासाठी आले असता तो फुगलेला, काळा पडलेला तसेच त्याला दुर्गंधी येत असलेली आढळून आले. त्यामुळे शवागर निकामी ठरल्याचे उघडकीस आले.
लगेच या प्रकाराचा गवगवा झाला आणि एकच गोंधळ उडाला. नंतर केलेल्या तपासणीत आतील सर्व १८ मृतदेह कुजल्याचे आढळून आले. पोलिस उपअधीक्षक उमेश गावकर यांनी नंतर त्यांची विल्हेवाट लावण्याच्या सूचना संबंधित पोलिस स्थानकांना दिल्या. तथापि, सायंकाळपर्यंत कोणतीच हालचाल झाली नव्हती.
हॉस्पिसियोतील शवागराच्या दोनपैकी एक युनिट निकामी ठरले त्याला अडीच वर्षें उलटली आहेत. त्यानंतर सरकार व मंत्री पातळीवर नवीन शवागरासंबंधी अनेक घोषणा झाल्या प्रत्यक्षात काहीच झाले नाही. साहजिकच या एकमेव शवागरावर सारा ताण पडत होता. त्याची क्षमता १८ मृतदेहांची असली तरी तेथे एकावर एक असे २२ ते २४ मृतदेह ठेवले जात होते. काही वेळा तर ३० पर्यंत ती संख्या गेलेली आहे.
मोती डोंगरावर क्षयरोग इस्पितळात एक शवागर असले तरी तेथे अन्य कोणत्याच सुविधा नसल्याने तेथे मृतदेह नेऊन ठेवण्याची कोणतीच तयारी नसते. सरकार व विशेषतः आरोग्यखात्याकडून विकासाच्या भराऱ्या मारल्याच्या घोषणा केल्या जात आहेत त्या किती पोकळ आहेत हेच यावरून स्पष्ट झाले आहे. मृत्यनंतर मृतदेहाची होणारी अशी फरफट पाहता सरकारने आपल्या भोंगळ कारभारात झटपट सुधारणा घडवून आणणे गरजेचे असल्याच्या प्रतिक्रिया आज हॉस्पिसियो परिसरात व्यक्त केल्या जात होत्या.

निष्क्रिय सरकार बरखास्त करा भाजप नेत्यांची मागणी

पणजी, मडगाव, दि. १३ (प्रतिनिधी): राज्यातील कॉंग्रेस आघाडी सरकारकडून राज्याचे वाटोळे सुरू आहे. सरकारातील भ्रष्ट कारभाराचा वारंवार पुनरुच्चार करून अनेक गैरप्रकारही उघडकीस आणले व हे सरकार निष्क्रिय आहे हे देखील उघड करून दिले. आता खुद्द सरकारातीलच नेते स्वतःच्याच सरकारवर निष्क्रियतेचा ठपका ठेवत असल्याने राज्याला वाचवायचे असेल तर हे सरकार तात्काळ बरखास्त करून नव्याने निवडणुकांना सामोरे जाणेच योग्य ठरेल, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी आज व्यक्त केली. मडगाव येथे बोलताना प्रदेश भाजपाध्यक्ष श्रीपाद नाईक यांनाही असेच मत व्यक्त केले आहे.
राज्यात सध्या राजकीय हालचालींना वेग प्राप्त झाला आहे. आघाडी सरकाराअंतर्गत वाद विकोपाला पोहचला असून नेतृत्व बदलाचेही वारे वाहत आहे. या एकूण राजकारणात भाजपला अजिबात रस नाही व भाजपचा या घटनांशी अजिबात संबंध नाही, असे स्पष्टीकरण पर्रीकर यांनी केले. सध्याच्या परिस्थितीत राज्याचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली तर स्वीकारणार काय,असा सवाल केला असता पर्रीकर यांनी लगेच नकार दिला. गोमंतकीय जनता भाजपला पूर्ण बहुमताने सरकार स्थापन करण्याची संधी देईल तेव्हाच नेतृत्व स्वीकारू,असेही यावेळी पर्रीकर यांनी सांगितले.सध्याच्या परिस्थितीत विधानसभा विसर्जित करणेच राज्याच्या हिताच्या दृष्टीने योग्य ठरेल,असे मतही पर्रीकर यांनी व्यक्त केले.
बारांचा गट बारा वाजविणार!
भाजप प्रदेशाध्यक्ष तथा खासदार श्रीपाद नाईक यांनीही पर्रीकरांप्रमाणेच आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. सध्या "ग्रुप ऑफ सेव्हन' चा जो काही खेळ सुरू आहे तो आता "ग्रुप ऑफ ट्वेल्व '(बारा) वर पोहचलेला आहे. हा गट सध्या आपल्याच सरकारचे "बारा' वाजवण्यास पुढे सरसावलेला आहे. या राजकारणात भाजपला स्वारस्य नाही, असे स्पष्टीकरण श्री. नाईक यांनी दिले. अशा परिस्थितीत सरकार स्थापण्यापेक्षा भाजप विधानसभा विसर्जनाची मागणी करेल व नव्याने निवडणुकांना सामोरे जाणे पत्करेल असेही श्री.नाईक म्हणाले.
सध्या केवळ स्वार्थाचे राजकारण सुरू झाले आहे. राज्याच्या विकासाचे कुणालाही पडून गेलेले नाही व प्रत्येक नेता आपले ईप्सित साध्य करण्यासाठीच धडपडत आहे. अशा परिस्थितीत या नेत्यांना पाठबळ देण्यात भाजपचा विश्र्वास नाही. सध्या जे काही घडते आहे ते जनता आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहत आहे. कॉंग्रेसच्या हातात सत्ता देऊन जनतेने काय चूक केली याचे प्रदर्शनच सध्या सुरू आहे. कुठल्याही एका पक्षाला बहुमत मिळत नाही तोपर्यंत राज्याचा विकास शक्य नाही हे देखील यानिमित्ताने स्पष्ट झाल्याने सुज्ञ गोमंतकीय जनता या गोष्टीची खूणगाठ करून भविष्यात सत्तेची सूत्रे भाजपकडेच देतील, असा आत्मविश्वासही खासदार नाईक यांनी व्यक्त केला.

पर्रीकर करणार नंबरप्लेट घोटाळ्याचा पर्दाफाश

समितीची आज पर्वरीत महत्त्वपूर्ण बैठक
पणजी, दि. १३ (प्रतिनिधी): वाहतूक खात्यातर्फे सक्ती करण्यात आलेल्या वादग्रस्त "हायसिक्युरिटी नंबरप्लेट' संबंधी राज्य सरकारने नेमलेल्या समितीची उद्या १४ रोजी संध्याकाळी ४.३० वाजता पर्वरी सचिवालयात महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीला विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांना निमंत्रित करण्यात आल्याने "हायसिक्युरिटी नंबरप्लेट' घोटाळ्याचा पर्दाफाशच पर्रीकर यांच्याकडून समितीसमोर होण्याची शक्यता आहे.
मुख्य सचिव संजय श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक त्यांच्याच दालनात होणार आहे. या बैठकीत "हायसिक्युरिटी नंबरप्लेट' बाबत विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी वेळोवेळी उपस्थित केलेल्या मुद्यांवर सखोल चर्चा होण्याची शक्यता आहे. हायसिक्युरिटी नंबरप्लेटच्या सक्तीविरोधात भाजपने आंदोलनाला सुरुवात केल्यानंतर या आंदोलनाचे लोण राज्यभर पसरले व नंतर खाजगी बसमालक संघटना व प्रदेश युवा कॉंग्रेसनेही या आंदोलनात सक्रिय भाग घेतल्याने सरकारला हा निर्णय स्थगित ठेवणे भाग पडले. राज्य सरकारने या निर्णयासंबंधी अभ्यास करण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना केली. ही समिती या निर्णयाचा फेरविचार करीत असतानाच गेल्या आठवड्यात हा मुद्दा मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात उपस्थित झाला असता राज्याचे ऍडव्होकेट जनरल सुबोध कंटक यांनी एका आठवडयात निर्णय घेऊ असे सांगून टाकले व त्यामुळे आता सगळ्यांचीच धांदल उडाली आहे. या समितीचा अहवाल या महिन्याच्या अखेरीस सरकारला सादर होण्याची संकेत यापूर्वीच मुख्य सचिवांनी दिले आहेत.
मनोहर पर्रीकर यांनी "हायसिक्युरिटी नंबरप्लेट' हा महाघोटाळा असल्याचा आरोप केला होता व या कंत्राटात अनेक गैरप्रकार झाल्याचे कागदोपत्री पुरावे सादर करून उघड केले होते. जोपर्यंत हे कंत्राट रद्द होत नाही तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही,अशी भूमिकाही त्यांनी जाहीर केली होती. पर्रीकर यांनी सदर समितीला दोन वेळा पत्र पाठवून या कंत्राटातील गैरप्रकारांची माहिती दिल्याने त्याची दखल घेणे आता समितीलाही भाग पडल्याने उद्या त्यांना या बैठकीसाठी बोलावण्यात आले आहे.

हणजुणला चार लाखांचे अमली पदार्थ जप्त

१८ लाखांचे विदेशी चलनही जप्त
पणजी, दि. १३ (प्रतिनिधी): अमलीपदार्थ विरोधी पथकाने आज पुन्हा एकदा केलेल्या धडक कारवाईत हणजूण येथील सोनिक रॅस्टारंट ऍन्ड शॅकचा मालक सदानंद चिमुलकर (३७) याला सुमारे ४ लाखांच्या अमलीपदार्थासह रंगेहाथ पकडले. या छाप्यात चिमुलकर याच्याकडे विविध विदेशी चलनाच्या सुमारे १८ लाख रुपये किमतीच्या नोटा सापडल्याचीही माहिती मिळाली आहे.
अमलीपदार्थ विरोधी पथकाचे अधीक्षक विणू बन्सल यांनी या कारवाईबाबतची सविस्तर माहिती पत्रकारांना दिली. सदानंद चिमुलकर याच्या हालचालींवर विभागाची नजर होती व प्रत्यक्षात त्याला मुद्देमालासह पकडण्यात विभागाने यश मिळवले, असे ते म्हणाले. सदानंद याच्याकडे ९० हजार रुपये किमतीच्या ३४ ग्रामच्या ९० एक्टसी गोळ्या, १.३५ लाख रुपयांची २६ ग्राम "एमडीएमए' पावडर, ८५ हजार रुपयांची १७ ग्राम कोकेन,१.२० लाख रुपयांची ६ एमएल एलएसडी अशा सुमारे ४.३० लाख रुपयांचा माल सापडला. या व्यतिरिक्त रोख रुपये ३,०४,९२०, विदेशी चलन याचाही समावेश होता.जीए-०३-सी-२४७३ या अलिशान वेर्णा कारमधून हा माल क्लब पॅरासिडो येथे पोहचवण्यास आला असता तिथेच त्याला पोलिसांनी ताब्यात घेतला. सदानंद याला ताब्यात घेतेवेळी त्याच्या अंगावरच सुमारे ४०२ ग्रामचे सुमारे ६.९० लाख रुपयांच्या सोन्याचे दागिने होते. सदानंद याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या घराची झडती घेण्यात आली.

Wednesday 13 January, 2010

आता पेट्रोल दरवाढीचा आगडोंब

आज नवी दिल्लीत महत्त्वपूर्ण बैठक

नवी दिल्ली, दि. १२ - कडाडलेल्या महागाईने सामान्य जनतेचे कंबरडे मोडलेले असतानाच आता संयुक्त पुरोगामी आघाडीच्या नेतृत्त्वाखालील केंद्र सरकारकडून पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर तीन रुपये वाढ होण्याचे संकेत मिळाले आहेत. तसे झाले तर जगायचे कसे, असा भयंकर प्रश्न लोकांपुढे निर्माण होणार आहे. आम आदमीच्या कल्याणाचा गजर करत "संपुआ'चे हे सरकार गेल्या मे महिन्यात सत्तेवर आले होते हे येथे उल्लेखनीय.
आज नवी दिल्ली येथे यासंदर्भात पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी एका खास बैठकीत जर इंधन दरांवरील सरकारी नियंत्रणे हटवण्याच्या पेट्रोलियम मंत्रालयाने सादर केलेल्या प्रस्तावाला मंजुरी दिली तर संभाव्य दरवाढ तातडीने अमलात येण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. या बैठकीला केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी आणि पेट्रोलियममंत्री मुरली देवरा तसेच सरकारी तेल कंपन्यांचे बडे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. तूर्त पेट्रोलच्या दरात वाढ करायची आणि डिझेलचे दर नंतर टप्प्याटप्प्याने वाढवत न्यायचे, अशी नीती सरकारकडून अवलंबली जाऊ शकते. सध्या या इंधनांच्या सरकारचे नियंत्रण असल्याने ते काही प्रमाणात स्थिर राहिले आहेत. तथापि, सरकारी पेट्रोलियम कंपन्यांनी केलेल्या शिफारशींना जर सरकार बळी पडले तर मात्र तातडीने इंधन दरवाढ अटळ असल्याचे दिसून येते. काहीही झाले तर सरकारने इंधनाच्या दरांवर लादलेली नियंत्रणे हटवून ते अधिकार आपल्या हाती यावीत, या दिशेने सरकारी क्षेत्रातील पेट्रोल व डिझेल कंपन्यांचे प्रयत्न सुरू आहेत. सध्या जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर प्रतिपिंप ८२ डॉलर्स असे आहेत. तथापि, इंडियन ऑईल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम व हिंदुस्थान पेट्रोलियम या कंपन्यांना दरवाढीची अनुमती केंद्र सरकारने दिलेली नाही. त्यामुळे या कंपन्यांना ४४ हजार, ३०० कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागणार आहे. सध्या या तिन्ही कंपन्यांना पेट्रोल व डिझेलच्या विक्रीमागे प्रतिलिटर अनुक्रमे ३.०६ रु आणि १.५६ रु. नुकसान सोसावे लागत आहे. तसेच केरोसिनमागे प्रतिलिटर १७.२३ रु. आणि गॅस सिलिंडरमागे २९९ रुपये नुकसान सासावे लागत आहे. खास तेलरोखे उभारून पेट्रोल कंपन्यांचा हा तोटा भरून काढला जाईल, असा शब्द अर्थ मंत्रालयाने दिला होता. मात्र, प्रत्यक्षात त्या दिशेने कोणत्याही हालचाली झालेल्या नाहीत. आता सरकारला केंद्रीय अर्थसंकल्पात त्यासाठी खास तरतूद करावी लागेल. हे सततचे झंझटच नको यास्तव इंधनाचे दर ठरवण्याचा लगाम आपल्या हाती असावा याकरता संबंधित तिन्ही कंपन्या इरेला पेटल्या आहेत. दरम्यान, उद्याच्या (बुधवारच्या) बैठकीला नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष मॉंटेकसिंग अहलुवालिया आणि नियोजन मंडळाचे माजी सदस्य तथा इंधनविषयक खास समितीचे प्रमुख कीर्ती एस. पारिख हेही उपस्थित राहणार आहेत. अधिकृतपणे ही बैठक सरकारी तेल कंपन्यांच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेण्यासाठी बोलावण्यात आल्याचे जाहीर झाले आहे. तथापि, त्यात जर सरकारी तेल कंपन्यांना अपेक्षित निर्णय झाला तर जनतेचे कंबरडे मोडून जाणार असून महागाईचा आगडोंब टिपेला पोहोचण्यात त्याची परिणती होईल. रिलायन्स इंडस्ट्रिज, एस्सार ऑईल व शेल या खाजगी तेल कंपन्यांनीदेखील सरकारी तेल कंपन्यांच्या सुरात सूर मिसळून इंधन दरांवरील सरकारी निर्बंध हटवण्याची जोरदार मागणी केली आहे.
संपुआ सरकारचा इरसाल कारभार!
गेल्या मे महिन्यात लोकसभेच्या निवडणुका जाहीर होण्यापूर्वी दोन महिने आधी "संपुआ' सरकारने इंधनाच्या किंमती कमी करून लोकांना खूष केले होते. मात्र, सत्ता हाती येताच पहिल्या शंभर दिवसांतच या सरकारने इंधनाचे दर पुन्हा पहिल्याएवढेच करून टाकले हे मतदारांना आठवत असेलच..

खोर्जुवे पुलाजवळ जुगारी अड्डा

पणजी, दि. १२ (प्रतिनिधी) - केवळ जत्रेनिमित्तच जुगार खेळला जातो असे नाही, तर राज्यातील काही ठिकाणी पोलिसांच्या आशीर्वादाने राजरोस जुगारी अड्डे चालू असल्याचे दिसून येत आहे. बार्देश तालुक्यातील खोर्जुवे येथील केबलस्टेड पूल हा खरे तर पर्यटकांचे आकर्षण ठरायला हवा होता पण अलीकडे मात्र हा पूल जवळच सुरू असलेल्या जुगाराच्या अड्ड्यामुळे बराच चर्चेत आहे. खोर्जुवे पुलाखाली एका लहानशा घरात मोठ्या प्रमाणात जुगार चालतो व हा प्रकार दिवसेंदिवस वाढत चालला आहे. रात्रीच्या वेळी पुलावर पार्किंग करून ठेवलेली वाहने व दुचाकी पाहिल्यास इथे लाखो रुपयांची उलाढाल होत असल्याची माहिती याठिकाणी राहणाऱ्या नागरिकांनी दिली.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे हळदोणा येथील आऊट पोस्टवरील पोलिस रोज हप्ता नेत असल्याचा संशयही व्यक्त होत आहे. याठिकाणी पोलिस भेट देऊनही या जुगारावर कारवाई केली जात नाही यावरून पोलिसांनाही हा अड्डा चालवणाऱ्याने विकत घेतल्याचे बोलले जात आहे. सुरुवातीचे काही दिवस केवळ रात्री उशिरा हा प्रकार सुरू होता पण आता मात्र दिवसालाही अनेक दुचाक्या इथे पार्क करून ठेवल्या जातात असेही या वाटेने नेहमी प्रवास करणाऱ्या वाहतूकदारांनी सांगितले. हळदोणा आऊटपोस्टवरील पोलिस उपनिरीक्षक श्री.जाधव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या प्रकाराबाबत माहिती नसल्याचे सांगितले. दरम्यान, रात्रीच्या वेळी काही लोक पुलावर बसण्यासाठी येतात पण याठिकाणी जुगार सुरू असल्याची मात्र वार्ता नाही,असेही ते म्हणाले.आपण प्रत्यक्ष भेट देऊन या प्रकाराची शहानिशा करतो,असेही त्यांनी सांगितले.
पेडण्यात जुगाराविरोधात वातावरण
पेडणे तालुक्यातील जुगाराविरोधात आता जनमत हळूहळू तयार होऊ लागले आहे. "मांद्रे सिटिझन फोरम' च्या युवकांनी निदान या जुगाराविरोधात जाहीरपणे बोलण्याचे तरी धाडस केले हेच अभिमानास्पद असून त्यांना सर्वांनी पाठिंबा देण्याची गरज आहे, असे आवाहन पेडणेचे एक प्रतिष्ठित तथा ज्येष्ठ नागरिक व पेडणे मराठा संघाचे नेते उत्तम कोटकर यांनी व्यक्त केले. धार्मिक उत्सवांना जुगार आयोजित करून त्याचे पूर्ण पावित्र्य नष्ट करणे हे पूर्णपणे चुकीचे आहे. जुगारातून मिळणाऱ्या पैशाने मंदिरांचा व्यवहार चालवणे ही गोष्टच मुळी शरमेने मान खाली घालण्यास भाग पाडणारी आहे व किमान पेडणेतील देवस्थान समित्यांनी तेवढा तरी स्वाभिमान बाळगावा, असा सल्लाही श्री.कोटकर यांनी दिला.
"मांद्रे सिटिझन फोरम' तर्फे सध्या तालुक्यात जुगाराविरोधात जोरदार सह्यांची मोहीम सुरू आहे. तालुक्यातील विशेष करून महिला वर्गांकडून या सह्यांच्या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याची माहिती फोरमच्या प्रवक्त्याने दिली. पोलिसांनी या चळवळीची त्वरित दखल घ्यावी व जत्रोत्सव व इतर धार्मिक उत्सवांना आयोजित होणारा जुगार ताबडतोब रोखावा,असे आवाहनही फोरमने केले आहे. कोरगाव गावातील विविध देवस्थान समित्यांनी आपल्या धार्मिक उत्सवांना जुगार आयोजित करण्यास मज्जाव करून एक चांगला आदर्श घालून दिला आहे व तालुक्यातील इतर सर्व देवस्थान समित्यांनी त्याचे अनुकरण करावे,असेही फोरमने सुचवले आहे.

मडगावात दोन ठिकाणी आग

पंचवीस लाखांचा माल भस्मसात

मडगाव, दि. १२ (प्रतिनिधी) : काल उत्तर रात्री व आज सकाळी मडगावात दोन ठिकाणी लागलेल्या आगीत एकूण २५ लाखांची हानी झाली. त्यापैकी एक कपड्याचे दुकान असून दुसरी आके येथील प्रशांत लॉंड्री आहे. अग्निशामकदलाच्या तत्परतेमुळे दोन्ही ठिकाणा सुमारे दहा लाखांचा माल वाचवण्यात आला.
वर्दे वालावलकर रस्त्यावरील अपना बाजार इमारत संकुलाजवळील कात्यायणी चेंबरमधील "कलेक्शन स्टोअर्स'मध्ये रात्री दोनच्या सुमारास आग लागली. तेथे सुमारे १८ लाखांचे कपडे खाक झाले. तसेच ५ लाखांचा माल वाचवण्यात आला. हे दुकान ईश्वरराज चव्हाण यांच्या मालकीचे आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशामक दल तेथे दाखल झाले. तथापि, इमारतीपर्यंत जाण्यासाठी असलेला चिंचोळा रस्ता व त्यावर पार्क केलेली वाहने यामुळे बंब आतपर्यंत नेण्यात खूप अडचण आली. नंतर दुकानाचे कुलूप तोडण्यात बराच वेळ गेला. ते तोडून आत जाईपर्यंत दुकानमालक तेथे हजर झाला. त्याने दिलेल्या माहितीप्रमाणे १८ लाखांचा माल आगीच्या भक्ष्यस्थानी पडला.
दुसरी आग सकाळी पावणेसातच्या सुमारास आके वीज खात्याजवळील प्रीती हॉटेलजवळील प्रभाकर रेडकर यांच्या मालकीच्या प्रशांत लॉंड्रीला लागली. त्यात सुमारे सव्वाचार लाखांचे नुकसान झाले. तेथेही दलाने पाच लाखांचा माल वाचविला. दोन्ही ठिकाणी आग विझविण्यासाठी प्रत्येकी दोन बंब न्यावे लागल्याचे सूत्रांनी सांगितले.
आगीचे नेमके कारण स्पष्ट झालेले नसले तरी शॉट सर्किटमुळेच ती लागली असावी, असा कयास आहे.

निरोगी महिला हीच देशाची संपत्ती - शबाना आझमी

पणजी, दि. १२ (विशेष प्रतिनिधी) ः महिलांना चांगले आरोग्य प्राप्त करून देणे म्हणजेच खऱ्या अर्थाने महिलांचे सशक्तीकरण करणे होय, केवळ त्यांना सुशिक्षित करणे व आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविणे म्हणजे सशक्तीकरण नव्हे. यासाठी महिलांच्या सशक्तीकरणाचा केंद्रबिंदू हा तिचे आरोग्य असले पाहिजे. कोणत्याही प्रकारचा रोग व आजारांपासून मुक्त असलेली निरोगी महिला ही केवळ कुटुंबासाठीच नव्हे तर राष्ट्रासाठी सुध्दा एक बहुमूल्य संपत्ती असल्याचे सुप्रसिद्ध अभिनेत्री, सामाजिक कार्यकर्त्या व राज्यसभा खासदार शबाना आझमी यांनी आज सांगितले.
आरोग्य खात्यातर्फे, देशातील पहिल्याच दोन आधुनिक मोबाईल "मेमोग्राफी' वाहनांच्या उद्घाटनानिमित्त येथील कला अकादमीत आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रामुख्याने मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या महिलांसमोर त्या बोलत होत्या. दारिद्र्‌य रेषेखालील कुटुंबांच्या केलेल्या सर्वेक्षणानुसार देशातील गरिबांनी कष्टांनी जमविलेले बहुतेक पैसे हे त्यांच्या कुटुंबातील विविध रोगांचे निदान व उपचारासाठीच खर्च केले जात असल्याचे निदर्शनास आल्याचे आझमी यांनी सांगितले. महिलांचे राहणीमान सुधारायचे असल्यास वैद्यकीय विमा नसलेल्यांनाही चांगल्या वैद्यकीय सुविधा मिळाल्या पाहिजेत, असे त्या म्हणाल्या.
मोबाईल मेमोग्राफी हे ग्रामीण महिलांसाठी एक वरदानच आहे कारण कॅन्सरसारख्या महाभयंकर रोगाच्या निदानासाठी इस्पितळच त्यांच्या दरवाजात येणार आहे असे त्या म्हणाल्या. कॅन्सरचे लगेच निदान झाल्यास तो बरा होऊ शकतो व जीव वाचू शकतो यावर त्यांनी भर दिला. मोबाईल मेमोग्राफी वाहन प्रकल्प सुरु करण्यासाठी गोवा सरकारबरोबर भागीदारी केल्याबद्दल त्यांनी मुस्कान या बिगरसरकारी संस्थेचे कौतुक केले. या प्रकल्पाचे यश हे महिलांच्या सहभागावर असल्याचे त्या म्हणाल्या. गोव्यातील महिलांच्या हितासाठी हा प्रकल्प हाती घेतल्याबद्दल त्यांनी आरोग्य मंत्र्यांचे अभिनंदन केले.
स्वतःच्या स्तनातील गाठी, सूज किंवा स्तनात झालेल्या आकारातील बदल याची चाचणी करण्यासाठी महिलांनी लाजता कामा नये. २० वर्षांवरील प्रत्येक स्त्रीने आपल्या स्तनांची तपासणी करणे आवश्यक असल्याचे त्या म्हणाल्या.
यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री दिगंबर कामत, सभापती प्रतापसिंग राणे, आरोग्यमंत्री विश्वजित राणे, मुख्य सचिव संजय श्रीवास्तव, आरोग्य सचिव राजीव वर्मा, आरोग्य संचालक राजनंदा
देसाई, डॉ. शेखर साळकर, डॉ. विरेंद्र गांवकर व डॉ. शर्मिला सरदेसाई, डॉ. लक्ष्मी गावणेकर उपस्थित होत्या.
यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी, आपले सरकार श्रीमंतांना मिळणाऱ्या सर्व सुविधा गोव्यातील गरिबांनाही उपलब्ध करून देण्यासाठी बांधील असल्याचे सांगितले. आरोग्य ठीक नसेल तर संपत्ती कामाची नाही, असे सांगताना लोकांच्या घरापर्यंत आरोग्यसेवा पोहोचविल्याबद्दल त्यांनी आरोग्यमंत्र्यांचे अभिनंदन केले.
आरोग्य सचिव वर्मा यांनी भारतातील प्रत्येकी २२ महिलांपैकी एक महिला ही स्तन कॅन्सरची रुग्ण असते व या रोगाविरुद्ध लढाई वैद्यांनी नव्हे तर लोकांनी लढायची असल्याचे ते म्हणाले.
सभापती राणे यांनी या मोबाईल सेवेचा जास्तीत जास्त उपयोग महिलांनी करण्याच्या आवश्यकतेवर भर दिला. रस्त्याच्या बाजूला औषधांच्या नावाखाली मुळे व औषधी वनस्पतींची विक्री करणाऱ्या ढोंगी वैद्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी नवीन कायद्याची आवश्यकता असल्याचे ते यावेळी म्हणाले.
गोव्यात स्तन कॅन्सरची संख्या मोठ्या प्रमाणात असून, अशा प्रकारची मोबाईल वाहने राज्यातील कानाकोपऱ्यातील रुग्णांमध्ये जनजागृती करण्याचे महत्त्वाचे कार्य करील,असे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी यावेळी सांगितले.

Tuesday 12 January, 2010

पेडण्यात जुगारविरोधी मोहिमेला वाढता प्रतिसाद

..मांद्रे सिटिझन फोरमचा पुढाकार
..कोरगावची देवस्थाने आघाडीवर

पणजी, दि. ११ (प्रतिनिधी): पेडणे तालुक्यात जुगाराचे प्रस्थ वाढत असून या जुगारामुळे युवा पिढी मोठ्या प्रमाणात या व्यवहारात फरफटत चालली आहे. पेडण्यातील हा जुगार बंद झालाच पाहिजे व त्यासाठी जनजागृती व वैचारिक चळवळ उभारण्याचे आव्हान "मांद्रे सिटिझन फोरम' स्वीकारीत आहे, अशी घोषणा आज करण्यात आली. पेडण्यातील विविध देवस्थान समिती व नागरिकांनी आता उघडपणे या जुगाराविरोधात दंड थोपटण्यास सज्ज व्हावे,असे जाहीर आवाहनही "फोरम' ने केले आहे.
पेडणे तालुक्यातील कोरगांव गावात एकूण तीन जत्रोत्सव साजरे होतात पण त्यातील एकाही जत्रोत्सवात जुगाराला अजिबात स्थान नाही, अशी माहिती श्री कमळेश्वर देवस्थानचे सचिव परशुराम गावडे यांनी दिली. जुगाराचे समर्थन करणाऱ्या काही लोकांनी देवस्थानचे उत्पन्न कमी झाल्याचा आरोप समितीवर केला. पण जुगाराच्या पैशाने देवस्थानची तिजोरी भरण्याइतपत खालची पातळी समिती गाठणार नाही अशी ठाम भूमिका श्री.गावडे यांनी घेतली. या जुगाराविरोधी भूमिकेमुळे काही लोक या समितीलाच हटवण्याची भाषा करीत असले तरी त्याची अजिबात तमा बाळगत नसल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, मांद्रे आस्कावाडा येथील श्री भूमिका रवळनाथ देवस्थानचे खजिनदार अवधूत भोसले यांनीही या जुगाराला आपल्या देवस्थान समितीने विरोध केल्याचे सांगितले. हा जुगार मंदिराच्या आवारात चालत नाही व जुगारापासून एकही पैसा समिती घेत नाही, असे ते म्हणाले. श्री सप्तेश्वर भगवती देवस्थानचे अध्यक्ष दादा प्रभू यांनीही जुगाराला विरोध दर्शवून भगवती सप्ताहाला जुगार आयोजित करण्यास विरोध केल्याची माहिती दिली. केवळ देवस्थान समितीच जुगार बंद करू शकत नाही तर त्यांना गावातील इतर लोकांनीही पाठिंबा देण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.या जुगारामुळेच जत्रोत्सवांची संख्या वाढत आहे. जत्रेसाठी जुगार नव्हे तर जुगारासाठी जत्रा अशीच परिस्थिती निर्माण झाल्याने धार्मिक वातावरण कलुषित बनल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
पेडणे तालुक्यात विविध जत्रोत्सव व इतर धार्मिक उत्सवांना जुगाराचे आयोजन करण्याची प्रथाच बनली आहे. या उघडपणे सुरू असलेल्या जुगाराला एकार्थाने जाहीर मान्यताच मिळाल्याची लोकभावना बनली आहे. या जुगाराचे खापर देवस्थान समिती व पंचायत मंडळांवर फोडून पोलिस खाते आपली कात वाचवण्याचा खाणेरडा प्रयत्न करीत आहे,अशी टीकाही यावेळी करण्यात आली. या व्यवहारातून आपले हात ओले करून घेण्याची सवय पोलिसांना जडली आहे व त्यामुळेच जुगार आयोजित करणाऱ्यांना ते सहकार्य करीत असल्याने सामान्य जनता दचकून आहे. "गोवादूत' ने या अनिष्ट प्रथेविरोधात आवाज उठवल्याने आता जनतेलाही नवा हुरूप मिळाला आहे व राज्यभरात या उघडपणे चाललेल्या जुगाराविरोधात वातावरण हळूहळू तापू लागले आहे.
पोलिस अधीक्षक बॉस्को जॉर्ज यांनी जुगार हा सामाजिक प्रश्न असल्याचा दावा करून लोकांनी विरोध केल्यास त्यांना पूर्ण संरक्षण देण्याचा दावा केला आहे. बॉस्को जॉर्ज यांचे हे आव्हान मांद्रे सिटीझन फोरम स्वीकारले आहे. हा जुगार आयोजित करणारे लोक धनाढ्य तर आहेतच परंतु त्यांना गावातीलही काही लोकांचा, राजकीय नेत्यांचा व पोलिसांचा पाठिंबा आहे व सर्वसामान्य जनतेत या लोकांची दहशत आहे. या जुगाराला प्रत्यक्ष जत्रोत्सवात जाऊन विरोध करणे व हा जुगार उधळून लावणे हा प्रकार जनतेच्या पाठिंब्याशिवाय शक्य नाही त्यामुळे या प्रकाराविरोधात जनमत तयार करण्याचे काम फोरमने सुरू केल्याची माहिती फोरमच्या प्रवक्त्याने दिली. याबाबतीत एक निवेदन तयार करून त्यावर जनतेच्या सह्यांची मोहीमच उघडण्यात आली आहे. या सह्यांच्या मोहिमेला सर्वत्र उदंड प्रतिसाद मिळत आहे. येत्या जानेवारी अखेरपर्यंत सुमारे दोन हजार सह्यांचे हे निवेदन राज्यपाल डॉ. एस. एस. सिद्धू, मुख्यमंत्री दिगंबर कामत, गृहमंत्री रवी नाईक, विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर तसेच प्रत्येक आमदार व मंत्र्यांना पाठवण्यात येईल. पोलिस खात्यातील वरिष्ठ अधिकारी, माजी वरिष्ठ अधिकारी, सनदी अधिकारी व इतर खात्यातील अधिकाऱ्यांनाही हे निवेदन पाठवून या जुगाराविरोधात व्यापक जनमत तयार करण्यात येईल. स्वामी नरेंद्र महाराज व श्री ब्रह्मेशानंद स्वामींचीही भेट घेऊन या चळवळीला त्यांचाही आशीर्वाद मिळवण्यात येईल, अशी माहितीही यावेळी देण्यात आली.
पेडणे तालुक्यातील मांद्रेसह हरमल, मोरजी, कोरगाव आदी भागांतूनही फोरमला प्रतिसाद मिळत असल्याचेही सांगण्यात आले.जुगाराबाबत सार्वजनिक चर्चा घडवून आणून जनतेच्या मनातील दहशत संपवणे व या अनिष्ट प्रथेविरोधात उघडपणे आपले मत व्यक्त करून त्याला विरोध करण्याचे धाडस तयार करणे आदी उद्दिष्ट फोरमने नजरेसमोर ठेवले आहे.

'सायबरएज' प्रकरणी मुख्यमंत्री नमले बाबूशच्या दबावतंत्राने योजना मार्गी

पणजी, दि. ११ (प्रतिनिधी): शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी " ग्रुप ऑफ सेव्हन ' चे शस्त्र उगारताच आता त्यांची सरकाराअंतर्गत रखडलेली कामे भराभर पुढे सरकण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या दोन वर्षांपासून निधीअभावी लाल फितीत अडकलेली " सायबरएज ' योजनेची फाईल मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी आज हातावेगळी केली. येत्या दोन दिवसांत इयत्ता बारावीतील विद्यार्थ्यांसाठी संगणक पुरवण्यासंबंधीची निविदा जारी केली जाईल. या निविदेत दलालांना अजिबात स्थान नसेल व थेट संगणक उत्पादकांकडूनच निविदा मागवल्या जातील, अशी घोषणा शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी केली.
विद्यमान आघाडी सरकारातील कॉंग्रेसेतर नेत्यांनी पुन्हा एकदा सरकारावरील आपली पकड पक्की केली आहे. " ग्रुप ऑफ सेव्हन' म्हणून कार्यरत झालेल्या या गटाने आपल्या रखडलेल्या कामांना चालना मिळवून देण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. गेल्याच आठवड्यात "सायबरएज' योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना संगणक पुरवण्यास सरकारला अपयश आल्याने शिक्षणमंत्री या नात्याने आपल्याला शरम वाटते, अशी जाहीर नाराजी बाबूश यांनी व्यक्त केली होती. सरकारच्या कार्यपद्धतीबाबतही असमाधान व्यक्त करून दोनापावला ते वास्को सागरी सेतू प्रकल्पाबाबत आपल्याला विश्वासात घेतले नाही, असा सूर आळवून या प्रकल्पाला विरोध करू, असा इशारेवजा दणकाही त्यांनी दिला होता. मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी मात्र या गटाचा दबाव गांभीर्याने घेतल्याचे दिसते. "सायबरएज' योजनेसाठी सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात १८ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. हा निधी पुरवण्यास आज मुख्यमंत्री कामत यांनी मंजुरी दिली. "सायबरएज' योजनेखाली गेल्या दोन वर्षांपासून अकरावी व बारावीच्या सुमारे २२ हजार विद्यार्थ्यांना संगणक देणे बाकी आहे. सध्या १८ कोटी रुपयांतून इयत्ता बारावीच्या सुमारे ११ हजार विद्यार्थ्यांना संगणक पुरवले जातील. हे संगणक प्रत्यक्षात वितरित करण्यास सुरुवात झाल्यानंतर अतिरिक्त निधीची सोय करून अकरावीच्याही विद्यार्थ्यांसाठी संगणक देण्याची निविदा जारी केली जाईल, असे बाबूश म्हणाले. विद्यार्थ्यांच्या अंतिम परीक्षा संपण्यापूर्वी त्यांना संगणक मिळेल, यादृष्टीने आपण प्रयत्न चालवले आहेत, असेही ते म्हणाले. सर्वांना संगणक देण्यासाठी सुमारे ५८ कोटी रुपयांची गरज भासणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
------------------------------------------------------------------------------
दलालांना दणका!
मुख्यमंत्र्यांच्या खास मर्जीतील काही लोकांनी 'सायबरएज' योजनेअंतर्गत ५८ कोटी रुपयांची निविदा मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले होते. यासाठी हे खाते मुख्यमंत्र्यांनी आपल्याकडे घ्यावे असाही घाट सुरू होता अशी खात्रीलायक माहिती काही सूत्रांनी दिली. बाबूश यांना नगरविकास खात्याचे आमिष दाखवून शिक्षण खात्याला त्यांनी सोडचिठ्ठी द्यावी असा गळ त्यांना टाकण्यात आला होता. बाबूश यांनी मात्र या प्रस्तावास साफ नकार दिला. शिक्षण खात्याशी संबंधित विविध विषय त्यांनी सोडवले व आता संगणकांच्या वितरणाचाही विषय निकालात काढणार असा हेका लावत संगणकांचे वितरण करूनच स्वस्थ बसणार असा चंगच त्यांनी बांधला आहे. संगणक निविदेत दलालांना अजिबात स्थान नसेल तर थेट संगणक उत्पादकांकडूनच निविदा मागवण्यात येतील, अशी घोषणा करून त्यांनी अप्रत्यक्षरीत्या मुख्यमंत्र्यांच्या मर्जीतील त्या लोकांना चांगलेच थप्पड लगावले आहे अशी चर्चा सुरू आहे.

कचरा प्रकल्पासाठी साफसफाई धारबांदोडा ग्रामस्थांमध्ये खळबळ

फोंडा, दि.११ (प्रतिनिधी) : धारबांदोडा येथे औद्योगिक टाकाऊ कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी ताब्यात घेण्यात आलेल्या जागेत पोलिस बंदोबस्तात सोमवार ११ जानेवारीपासून साफसफाईच्या कामाला प्रारंभ करण्यात आल्याने लोकांत खळबळ माजली आहे. सदर प्रकल्पाच्या जागेत साफसफाईच्या कामामुळे वातावरण पुन्हा एकदा तापदायक बनले असून मंगळवार १२ जानेवारी रोजी सदर ठिकाणी गडबड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सदर ठिकाणी औद्योगिक कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यास स्थानिकांचा विरोध असून कचरा प्रकल्प उभारण्याचे काम यापूर्वी एकदा लोकांनी विरोध करून बंद करण्यास भाग पाडलेले आहे. सदर ठिकाणी पुन्हा साफसफाईच्या कामाला सुरुवात करण्यात आल्याचे वृत्त धारबांदोडा व आसपासच्या भागात पसरल्याने लोकांत संतापाची लाट पसरली असून ह्या प्रकरणी पुन्हा एकदा आवाज उठविण्यासाठी लोकांना एकजूट केले जात आहे, अशी माहिती मिळाली आहे.
धारबांदोडा पंचायत क्षेत्रातील सर्वे क्र.१९३ मध्ये घातक औद्योगिक कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी हालचाली सुरू आहेत. सदर ठिकाणी प्रकल्प उभारण्यासाठी एकदा सुरू केलेले काम एकदा लोकांनी विरोध करून बंद पाडलेले आहे. आता पुन्हा पोलीस बंदोबस्तात जागेच्या साफसफाईच्या कामाला सोमवार ११ जानेवारीपासून सुरुवात करण्यात आली आहे. सदर ठिकाणी घातक कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी लोकांचा विरोध आहे.
घातक कचरा प्रक्रिया प्रकल्पाच्या जागेत साफसफाईचे काम हाती घेतल्याची माहिती मिळताच स्थानिक सामाजिक कार्यकर्ते, स्थानिक राजकारण्यांनी लोकांना ही माहिती देण्यास सुरुवात केली आहे. यापूर्वी आपण ह्या प्रकल्पाला विरोध केलेला आहे. तरी पुन्हा एकदा प्रकल्पाच्या जागेत साफसफाईचे काम सुरू करण्यात आले आहे. सदर प्रकल्पाला पूर्वी सारखा विरोध न केल्यास सदर ठिकाणी प्रकल्प उभारला जाणार आहे, अशी माहिती लोकांना देण्यात येत आहे. त्यामुळे मंगळवार १२ रोजी सकाळी सदर ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोक जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कचरा प्रकल्प आवाराच्या जागेची साफसफाई करून तिथे कुंपण घालण्यात येणार आहे. त्यानंतर सदर ठिकाणी प्रकल्पाच्या बांधकामाला सुरुवात होणार आहे. यापूर्वी लोकांनी केलेल्या विरोधामुळे ठेकेदाराला काम बंद ठेवावे लागले होते.

राममंदिरासाठी रावच आग्रही होते!

निवृत्त अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा
नवी दिल्ली, दि. ११ : रामायलयम या बिगर-राजकीय ट्रस्टच्या माध्यमातून अयोध्येत राममंदिर उभारणीसाठी तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव हे कमालीचे आग्रही होते; मात्र निवडणुकीत हार स्वीकारावी लागल्यानंतर त्यांना हा प्रयत्न सोडून द्यावा लागला, असा दावा त्यांच्या काळातील एका सहसचिवाने आपल्या पुस्तकात केला आहे.
पी. व्ही. आर. के. प्रसाद असे या आयएएस अधिकाऱ्याचे नाव आहे. प्रसाद हे तेव्हा पंतप्रधानांच्या कार्यालयात कार्यरत होते. "प्रत्यक्षात काय घडले', असे त्यांच्या मूळ तेलगू पुस्तकाचे नाव असून त्याची इंग्रजी आवृत्ती येऊ घातली आहे. ६ डिसेंबर १९९२ रोजी अयोध्येतील वादग्रस्त बाबरी मशीद संघ परिवाराकडून पाडण्यात आली. तथापि, काहीही झाले तरी याचे श्रेय संघ परिवाराला मिळू नये, असे राव यांना मनोमन वाटत होते. त्यामुळेच त्यांनी मशीद पाडली गेल्यानंतर दोन वर्षांनी तेथे मंदिर उभारणीसाठी जोरदार प्रयत्न आरंभले होते. प्रत्यक्षात, त्यानंतरच्या निवडणुकीत कॉंग्रेसचा जनाधार घटला आणि राव यांचे स्वप्न हवेतच विरले. अर्थात, हे करताना याकामी कॉंग्रेस व स्वतः त्यापासून कसे दूर राखले जातील याचीही पुरेपूर दक्षता राव यांनी घेतली होती, असा दावा प्रसाद यांनी आपल्या पुस्तकात केला आहे.
राममंदिर ही फक्त भाजपचीच मक्तेदारी नाही. आम्ही कॉंग्रेसजनसुद्धा रामभक्त आहोत. मात्र आम्ही टोकाचे दुराग्रही वा नास्तिक नाही. आम्हीच अयोध्येत मंदिर उभारायला हवे. तथापि, भाजप व संघ परिवाराकडून असा प्रचार केला जात आहे की, कॉंग्रेसकडूनच याकामी अडथळे आणले जात आहेत, अशी व्यथा राव यांनी बोलून दाखवल्याचा दावादेखील या पुस्तकात करण्यात आला आहे. शक्यतो बिगर राजकीय ट्रस्टकडूनच मंदिराची उभारणी करण्याबाबत राव प्रयत्नशील होते. त्यामुळे कोणताच राजकीय पक्ष यात गुंतलेला नसेल असे संकेत जनतेपर्यंत जातील, अशी राव यांची व्यूहरचना होती. त्यांनी सदर ट्रस्टची नोंदणी करण्याचेही प्रयत्न सुरू केले होते. या ट्रस्टमध्ये राव यांनी संघ परिवाराशी जवळीक साधून असलेले उडपी पेजावर मठाचे स्वामी रामानंद तीर्थ यांनाही सामील करून घेण्याची धडपड आरंभली होती. एवढेच नव्हे तर बिहारमधील एक आयपीएस पोलिस अधिकारी किशोर कुणाल यांना राव यांनी पाचारण केले होते. धार्मिक नेत्यांना एकत्र करण्याची जबाबदारी पार पाडण्याचे काम प्रसाद यांच्यावर सोपवण्यात आले होते आणि त्यांना याकामी सहकार्य करण्याची सूचना राव यांनी केली होती. तसेच गरज पडल्यास यासंदर्भात कुप्रसिद्ध तांत्रिक चंद्रास्वामी याचीही मदत घेण्याची सूचना राव यांनी तेव्हा केली होती, असा दावा प्रसाद यांनी आपल्या पुस्तकात केला आहे. त्यामुळे जेव्हा या पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद बाजारात उपलब्ध होईल तेव्हा त्यावरून छोटे-मोठे राजकीय स्फोट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पाक सीमेवर सतर्कतेचा इशारा

नवी दिल्ली, दि.११ : पाकिस्तानातून घुसखोरीचे वाढते प्रमाण आणि आगामी गणराज्य दिन या दोन्हींच्या पार्श्वभूमीवर भारताने सीमा सुरक्षा दलाला पश्चिम क्षेत्रात सतर्कतेचे आदेश दिले आहेत.
नुकत्याच शनिवारी आणि रविवारी अटारी सीमेजवळ गोळीबाराच्या तसेच रॉकेट हल्ल्याच्या घटना घडल्या. तसेच घूसखोरीचा प्रयत्नही सातत्याने सुरूच आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानलगतच्या सीमेेवर अलर्ट जारी करण्यात आला आहे. सीमा सुरक्षा दल सतर्क असून प्रत्येक हालचालीकडे लक्ष दिले जात आहे.
अर्थात, गृह मंत्रालयाने सीमेवरील कारवायांमध्ये राज्यातील उपद्रवी तत्वांचा हात असावा, अशी शक्यता व्यक्त केली आहे. कारण, पाकिस्तानी रेंजर्सनी या प्रकारांमध्ये आपला हात नसल्याचे म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध उपद्रवी संघटनांच्या हालचालींकडेही लक्ष दिले जाणार असल्याचे गृह मंत्रालयाच्या सूत्रांचे म्हणणे आहे.

ऋचिका प्रकरण सीबीआयकडे

नवी दिल्ली, दि. ११ : ऋचिका गिरहोत्रा प्रकरण अधिकाधिक गांभीर्याने हाताळले जात असून या प्रकरणी दोषी असणाऱ्या एस.पी.एस.राठोड यांच्याविरोधातील नव्या एफआयआरची चौकशी सीबीआयकडे सोपविण्यात आली आहे.
केंद्र सरकारने आज याविषयीच्या सूचना जारी केल्या. राठोड यांच्यावर काही दिवसांपूर्वीच नव्याने तीन एफआयआर दाखल झाले. या तिन्ही नव्या प्रकरणात सीबीआय चौकशी होणार आहे. दोन तक्रारीत ऋचिकाचे पिता आणि भाऊ आशू याने राठोडवर खूनाचा प्रयत्न करणे, चुकीच्या पद्धतीने कैदेत टाकणे आणि तिच्या उत्तरीय तपासणी अहवालात ढवळाढवळ करीत फेरबदल करणे या आरोपांचा समावेश आहे. अन्य एका एफआयआरमध्ये ऋचिकाला आत्महत्येसाठी प्रवृत्त करणे, असा आरोप ठेवण्यात आला आहे.

मद्य घोटाळा चौकशी सुरू

पणजी, दि. ११ (प्रतिनिधी): अबकारी खात्यातील मद्य घोटाळ्याची चौकशी वित्त सचिव उदीप्त रे यांनी सुरू केली आहे. सध्या तरी याप्रकरणी प्राथमिक अंदाज व्यक्त करणे घिसाडघाईचे ठरेल, अशी सावध भूमिका त्यांनी "गोवादूत' शी बोलताना व्यक्त केली.
दरम्यान, याप्रकरणी विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी अबकारी आयुक्त संदीप जॅकीस यांच्यावर ठपका ठेवला होता. त्यांना यापदावरून हटवूनच चौकशी करावी, अशी मागणीही पर्रीकरांनी केली होती. अबकारी आयुक्तांना हटविण्याबाबतचा निर्णय हा सरकारने घ्यावयाचा आहे, असे उदीप्त रे म्हणाले. एखाद्या व्यक्तीविरोधात जोपर्यंत आरोप सिद्ध होत नाहीत तोपर्यंत तो दोषी ठरत नाही, अशी आपली न्यायव्यवस्था सांगते त्यामुळे विद्यमान अबकारी आयुक्त याठिकाणी असतानाही या प्रकरणाची चौकशी होऊ शकते, असे वक्तव्य करून श्री. रे यांनीही संदीप जॅकीस यांची पाठराखण केली आहे.
विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी विधानसभेत सर्व कागदोपत्री पुराव्यांसहित हा घोटाळा उघड केला होता. सुमारे शंभर कोटी रुपयांची व्याप्ती असलेल्या या घोटाळ्यात आंतरराज्य संबंध असल्याने त्याची चौकशी "सीबीआय' मार्फत करावी, अशी मागणीही पर्रीकरांनी केली होती, परंतु मुख्यमंत्री कामत यांनी ही मागणी फेटाळली व वित्त सचिवांमार्फतच चौकशीचे आदेश दिले आहेत. राज्यात मोठ्या प्रमाणात बनावट दाखल्यांवर मद्याची निर्यात झाल्याचे पर्रीकर यांनी सभागृहाच्या नजरेस आणून दिले होते. अबकारी आयुक्त संदीप जॅकीस यांच्यावर या घोटाळ्याच्या संशयाची सुई असतानाही त्यांना या पदावर ठेवून चौकशी करण्याची सरकारची पद्धत चुकीची आहे व यावरूनच सरकारला या घोटाळ्याचे गांभीर्य नाही, हे स्पष्ट होते अशी नाराजीही पर्रीकर यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, या घोटाळ्याबाबत मात्र सरकारी पातळीवर बरीच चर्चा रंगली आहे. या घोटाळ्यात राजकीय हितसंबंध असलेले अनेक लोक सामील आहेत व त्याची "सीबीआय' चौकशी झाल्यास हे संबंध उघड होतील, अशीही भीती व्यक्त केली जात आहे. काही राजकीय नेत्यांचे नातेवाईकही या घोटाळ्यात गुंतल्याची चर्चा असून त्यामुळेच चौकशीच्या नावाने हे प्रकरण मिटवण्यासाठीच धडपड सुरू आहे की काय, असाही संशय व्यक्त होत आहे.

Monday 11 January, 2010

पोलिसांनीच केली रवींची गोची

विविध छाप्यांत अमलीपदार्थ जप्त

पणजी, दि. १० (प्रतिनिधी) - राज्यात अमलीपदार्थांचा अजिबात वापर होत नाही व इथे अमलीपदार्थांचे सेवनही केले जात नाही, असा तर्कट दावा करणाऱ्या गृहमंत्री रवी नाईक यांना त्यांच्या पोलिस खात्यानेच तोंडघशी पाडले आहे. उत्तर गोवा पोलिस अधीक्षक बॉस्को जॉर्ज यांच्या नेतृत्वाखालील एका विशेष पोलिस पथकाने विविध किनारी भागांत छापे टाकून अनेक प्रकारचे अमलीपदार्थ जप्त केले आहेत. याप्रकरणी सहाजणांना ताब्यातही घेण्यात आले असून या कारवाईमुळे रवी नाईक यांनी केलेल्या वक्तव्याची मात्र चांगलीच फजिती उडाली आहे.
आज पर्वरी येथे खास बोलावण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत उत्तर गोव्याचे पोलिस अधीक्षक बॉस्को जॉर्ज यांनी या गुप्त कारवाईबाबत माहिती दिली. अत्यंत नियोजित व छुप्या पद्धतीने हे छापे टाकण्यात आले व एकूण १४९.३६ ग्राम विविध अंमलीपदार्थ जप्त करून सहाजणांना ताब्यात घेण्यात आले. यात चार विदेशी नागरिकांचा समावेश असल्याचीही माहिती देण्यात आली. या अमलीपदार्थांची एकूण किंमत १ लाख ८३ हजार ९२० रुपये होते. विशेष म्हणजे बॉस्को जॉर्ज यांनी केलेल्या या कारवाईबाबत अंमलीपदार्थ विरोधी पथकाला मात्र पूर्णपणे अंधारात ठेवण्यात आले. गृहमंत्री रवी नाईक यांनी अमलीपदार्थ विरोधी पथकाचे कौतुक करूनच कथित दावा केला होता पण या कारवाईमुळे हा दावा फोल ठरलाच व अमलीपदार्थ विरोधी पथकाच्या विश्वासार्हतेबाबतही संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या कारवाईसाठी दोन उपअधीक्षक, पाच निरीक्षक, उपनिरीक्षक व विविध पोलिस स्थानकातील शिपायांचे एक पथक तयार करून त्यानंतर ही कारवाई हाती घेण्यात आल्याचे श्री.जॉर्ज म्हणाले. पेडणे, हणजूण व म्हापसा या पोलिस स्थानकांवर एकूण चार गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. "हिल टॉप','शिवा व्हॅली','साईप्रसाद', 'नाईन बार' आदी शॅक्सवर हे छापे टाकण्यात आले. या छाप्यात विविध पद्धतीचे अमलीपदार्थ जप्त करण्यात आले. त्यात चरस, गांजा,"एमडीएमए' कॅप्सुल्स, "एलएसडी' आदींचा समावेश आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या नागरिकांत मोरजी गावडेवाडा येथे माथन हॉवार्ड जुलेर (निदरलेंड), हणजूण येथील कर्लीस शॅक्सवर सुखराम (नेपाळ), शिवा व्हॅली शॅक्स येथे विरकुन्नीन ओल्ली पेट्टेरी (स्वीडन) व पर्रा चर्च मैदानावर एज्रा नातेली, हजाज माओर व कोरेन इलाद (इस्राइली) आदी नागरिकांना ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई यापुढेही चालूच राहणार आहे, अशी माहिती श्री. जॉर्ज यांनी दिली. यापुढे अंमलीपदार्थ सापडलेल्या शॅक्सवर कारवाई करण्यात येणार आहे व त्यांनाही जबाबदार धरण्यात येईल.आपल्या शॅक्स किंवा हॉटेलवर अंमलीपदार्थांचे सेवन किंवा व्यवहार होणार नाही याची काळजी यापुढे त्यांना घ्यावी लागणार आहे,अशी माहितीही श्री.जॉर्ज यांनी दिली.
गृहमंत्र्यांनी केलेल्या दाव्यावर आपण प्रतिक्रिया देणे उचित ठरणार नाही. एक पोलिस अधिकारी या नात्याने बेकायदा गोष्टींवर कारवाई करणे हे आपले कर्तव्य ठरते,असे म्हणून त्यांनी या विषयाला बगल दिली. अंमलीपदार्थ जप्त केल्यानंतर ते कोणत्या प्रकारचे आहेत याची माहिती मिळवण्यासाठी अंमलीपदार्थ विरोधी पथकाची मदत घेतल्याचे त्यांनी सांगितले.
डिसेंबरमध्ये कारवाईस वेळ नव्हता
डिसेंबर अखेर व जानेवारीच्या प्रारंभी अमलीपदार्थांचा मोठा व्यवहार चालतो, पण आता जानेवारीच्या मध्यंतरी ही कारवाई करण्याचे कारण काय,असे विचारले असता डिसेंबर महिन्यात "इफ्फी',नाताळ, नववर्ष आदी कार्यक्रमांमुळे पोलिस खात्यावर अतिरिक्त कामाचा ताण होता. या काळात सुरक्षेची काळजी घेण्याची जबाबदारी असल्याने अंमलीपदार्थांवर छापे टाकण्यासाठी वेळच मिळाला नाही,असे स्पष्टीकरण श्री. जॉर्ज यांनी दिले.

"ग्रुप ऑफ सेव्हन'मुळे मुख्यमंत्र्यांची झोप उडाली

मडगाव, दि.१० (प्रतिनिधी) : सत्ताधारी आघाडीतील "ग्रुप ऑफ सेव्हन' पुनरुज्जीवीत करण्याच्या निर्णयाचे स्वागत करताना पर्यटनमंत्री मिकी पाशेको यांनी या गटाला संपूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे या गटाला अधिक बळकटी मिळाली असल्याने मुख्यमंत्र्यांची झोपच उडाली आहे. शिवाय सरकारमधील काही निर्णय न रुचलेल्या असंतुष्टांच्या ब्रिगेडला यानिमित्ताने एकत्र येण्याची वाट मोकळी झाली आहे. कॉंग्रस हायकमांडचे निरीक्षक डी. एन. शर्मा गोवाभेटीवर आले असताना ही घडामोड घडल्याने राजकीय निरीक्षक तिला महत्त्व देताना दिसत आहेत.
शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी आपल्या खात्याला मिळालेला अपुरा निधी व सीलिंकबाबत आपणास विश्र्वासात घेतले गेले नसल्याची तक्रार केली आहे. त्या निर्णयाला विरोध करण्याची घोषणाही त्यांनी केली आहे. सत्ताधारी आमदारांच्या अशा वेगवेगळ्या तक्रारी आहेत. विशेषतः सीआरझेड कारवाईमुळे अनेक कॉंग्रेस आमदारांना आपल्या मतदारांना तोंड दाखवणे कठीण होऊन बसले आहे. ते या गटामुळे एकत्र येण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचे दिसत आहे.
दुसरीकडे वेगवेगळ्या घटनांमुळे चर्चेचा विषय बनलेल्या पर्यटनमंत्र्यांसाठी "ग्रुप ऑफ सेव्हन'ची स्थापना ही पर्वणीच मानली जाते. मिकीही खासगीत बोलताना ते मान्य करतात. त्यांच्या मते सात आमदारांचा गट राज्याच्या भल्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. लोकहितासाठी या गटाने ठाम भूमिका घेणे आवश्यक आहे. जनहिताआड असणाऱ्या निर्णयांना हा गट विरोध करू शकतो, असे सांगत त्यांनी सरकारचे काही निर्णय जनहितविरोधी असल्याचे अप्रत्यक्षपणे मान्य केले आहे. त्याचप्रमाणे कोणताही जनविरोधी निर्णय हा गट लादू देणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अधिवेशन जवळ येऊन ठेपले असून तोपर्यंत काय होते त्याची प्रतिक्षा करा, असे ते उत्तरले. ग्रुप ऑफ सेव्हनचे पुनरुज्जीवन हे नेमके कोणाच्या हिताचे ठरते हे जरी लवकरच स्पष्ट होणार असले तरी या त्यामुळे सध्या मुख्यमंत्र्यांची झोप उडाली आहे हे निश्र्चित. गोवा क्रीडा प्राधिकरणातील १४ कंत्राटी कामगारांना कामावरून कमी करण्याबाबत क्रीडामंत्र्यांनी घेतलेला निर्णय फिरविण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी तडकाफडकी केलेली कृती हे त्याचेच निदर्शक मानले जाते. गेल्या अडीच वर्षांत इतक्या झटपट त्यांनी घेतलेला हा पहिलाच निर्णय असल्याचे सत्ताधारी गटातील मंडळीच बोलू लागली आहेत. पांडुरंग मडकईकर या गटात जाऊ नयेत या हेतूने त्यांनी हा निर्णय फिरवला असल्याचा कयासही व्यक्त होत आहे.
जाणकारांच्या मते रवी नाईक यांना लक्ष्य करण्यासाठी या गटाचा वापर केला जात आहे. त्या आधारे त्यांचे गृहखाते काढून घेण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता आहे. सध्या रवी नाईक हे सर्वांच्याच टीकेचे लक्ष्य ठरले आहेत. त्यांचे खाते काढले तर मंत्रिमंडळाचा खातेपालट अनिवार्य ठरेल. सद्यस्थितीत मुख्यमंत्री ती जोखीम पत्करतील असे दिसत नाही. कारण त्यामुळे मंत्रिमंडळ व सत्ताधारी पक्षांतील अस्वस्थता आणखी वाढण्याचीे शक्यता आहे. विधानसभेच्या अर्थसंकल्पी अधिवेशनापर्यंत या घडामोडी आणखी वेग घेण्याची चिन्हे दिसत आहेत.

जत्रोत्सवातील जुगाराला विरोध करा

पोलिस अधीक्षक बॉस्को जॉर्ज यांचे आवाहन

पणजी, दि. १० (प्रतिनिधी) - राज्यातील जत्रोत्सव किंवा इतर धार्मिक उत्सवांनिमित्त आयोजित केला जाणारा जुगार हा प्रत्यक्षात सामाजिक प्रश्न आहे. त्याबाबत मोठ्या प्रमाणात चळवळ व जागृतीची गरज आहे, अशी प्रतिक्रिया उत्तर गोवा पोलिस अधीक्षक बॉस्को जॉर्ज यांनी व्यक्त केली. या जुगारावर कारवाई करताना पोलिसांवर अनेक बंधने येतात व काही प्रमाणात कारवाई केलीच तर त्याला धार्मिकतेचा रंग दिला जातो,असेही स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले.
राज्यात विविध ठिकाणी धार्मिक उत्सव व खास करून जत्रोत्सव, कालोत्सव, वर्धापनदिन साजरे करताना जुगार आयोजिणे ही प्रथाच बनली आहे. खुद्द देवस्थान समित्यांचीच या जुगाराला मान्यता असते. स्थानिक पंचायत व नागरिकांचाही या प्रकाराला उघड पाठिंबा असतो. बॉस्को जॉर्ज यांनी अलीकडेच माहिती हक्क कायद्याअंतर्गत एका व्यक्तीला दिलेल्या माहितीत पोलिसस्थानक क्षेत्रात जुगारावर पूर्ण बंदी असल्याचे म्हटले आहे. जत्रोत्सवांत जुगार चालत नाही व जिथे जुगार चालतो तिथे पोलिस तात्काळ कारवाई करतात,असेही त्यांनी या माहितीत सांगितले आहे. प्रत्यक्षात नेमकी उलटी स्थिती आहे. या उजळमाथ्याने हा जुगार खेळला जात आहे. जुगाराबरोबर व्यसन व गुन्हेगारी प्रवृत्तीही बळावत चालल्याने हा गंभीर विषय बनत आहे. या जुगाराबाबत त्यांना विचारले असता याप्रकरणी कारवाई करण्यावर पोलिसांवर प्रचंड दडपण येत असल्याची माहिती त्यांनी दिली. प्रामुख्याने पेडणेतील जुगाराबाबत बोलताना तिथे कारवाई करणेही कठीण बनले आहे. आपण किंवा म्हापशाचे उपअधीक्षक कारवाई करण्यास गेलो तर त्याला धार्मिकतेचा रंग चढवला जाईल व नंतर हे प्रकरण पोलिसांवरच उलटेल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. आता खरोखरच समाजाचाच या प्रकाराला विरोध असेल व त्यांनी पुढाकार घेतला तर पोलिस त्यांना पूर्णपणे सहकार्य करतील व त्यांच्या सुरक्षेची हमी घेतील,असेही त्यांनी नमूद केले.
मंदिरांचे पवित्र्य राखा ः राजेंद्र वेलिंगकर
धार्मिक उत्सवांच्या निमित्ताने जुगार आयोजित करण्याची प्रथा तशी जुनीच आहे; पण अलीकडच्या काळात राज्यात अनेक देवस्थाने आहेत की त्यांनी ही प्रथा बंद पाडली आहे. त्यासाठी ती कौतुकास पात्र असल्याची प्रतिक्रिया मंदिर सुरक्षा समितीचे निमंत्रित राजेंद्र वेलिंगकर यांनी दिली. मंदिरांच्या सुरक्षेसाठी कार्यरत असलेल्या कार्यकर्त्यांनी मंदिरांचे पावित्र्य व सुरक्षा यांची काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी मंदिर सुरक्षा समिती कार्यरत आहेच, असेही त्यांनी सांगितले.
जशी राजकीय नेत्यांची निवड होते त्या धर्तीवरच देवस्थान समित्याही नेमल्या जातात.राजकीय नेते जसे निवडून आल्यानंतर आपला स्वार्थ पाहतात त्याच पद्धतीने काही ठरावीक देवस्थान समित्यांचाही व्यवहार चालतो; पण त्यासाठी केवळ देवस्थान समित्यांवर दोषारोप करून चालणार नाही तर प्रत्येक महाजन,भक्त यांनी ती जबाबदारी आपल्या खांद्यावर घेणे गरजेचे आहे. आपली कुलदैवत किंवा ग्रामदैवत याची पवित्रता जपणे ही प्रत्येक महाजन व भक्तगणाची जबाबदारी आहे.जुगारामुळे कुणाचे भले झाल्याचे एकही उदाहरण नाही, त्यामुळे या प्रकाराला कितपत थारा द्यावा हे प्रत्येकाने ठरवावे. राज्यातील अनेक देवस्थान समित्या अनेक लोकोपयोगी व सामाजिक कामांत सक्रिय आहेत. देवस्थानेच जर जुगारांना प्रोत्साहन देऊ लागली तर समाजाची कशी अवनती होईल याचा विचार प्रत्येकानेच केला पाहिजे, असेही त्यांनी बोलून दाखवले.

शिका, संघटित व्हा व संघर्ष करा

करिया मुंडा यांचा अनुसूचित जमातीस सल्ला

काणकोण, दि. १० (प्रतिनिधी) - देशातील अनुसूचित जमातीचे प्रश्न व गोव्यातील या बांधवांचे प्रश्न यामध्ये थोडाफार फरक असून गोव्यात संघटितपणे कार्य केले तर सरकार आपले प्रश्न सोडवू शकते. त्यासाठी प्रत्येकाने आज शिकले पाहिजे शिका, संघटित व्हा अन् संघर्ष करा. आपली पारंपरिक कला, संस्कृती, खाद्य संस्कृती, क्रीडासंस्कृतीचा अभिमान बाळगा, तीच तर आपली खरी ओळख आहे, असे प्रतिपादन लोकसभा उपसभापती करिया मुंडा यांनी केले.कर्वे गावडोंगरी येथे आदर्श युवा संघाच्या १५० या "लोकोत्सव २०१०' च्या समारोप कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून आज बोलत होते.
आपले सरकार हे आज आम आदमीचे सरकार असून कुणांवरही अन्याय होणार नाही. अनुसूचित जमातीसाठी सर्वतोपरी सहाय केले जाईल. या समाजाचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य दिले जाईल.आदर्श युवक संघ गेल्या कित्येक वर्षांपासून चांगले कार्य करीत आहे. शिक्षित समाजाची उन्नती होते त्यासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नसल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी अध्यक्षस्थानावरून केले.
यावेळी व्यासपीठावर करिया मुंडा, भाजपाध्यक्ष श्रीपाद नाईक, आयोजन समिती प्रमुख आमदार रमेश तवडकर, आमदार वासुदेव मेंग गांवकर, माजी मंत्री प्रकाश वेळीप, भाजप संघटनमंत्री अविनाश कोळी, सौ. आशा कामत संघाचे अध्यक्ष मंगेश गावकर, स्वागताध्यक्ष विशांत गांवकर, सचिव जानू गांवकर आदी उपस्थित होते.
स्वागत गीताने समारोप कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. आमदार तवडकर याने प्रास्ताविक केले तर स्वागताध्यक्ष विशांत गांवकर यांनी मान्यवरांचे व उपस्थितांचे स्वागत केले. माजी मंत्री वेळीप यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. पारंपरिक वेशात मान्यवरांना समाजभगिनींनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
प्रमुख पाहुणे करिया मुंडा हस्ते तालुक्यातील प्रतिष्ठित व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या निवृत्त मुख्याध्यापक शांताजी नाईक गावकर, प्रसिद्ध कलाकार व निवेदक अनंत अग्नी, निवृत्त मुख्य भूमापक वासू पागी, लोककलाकार माणकू गावकर, शिक्षिका अश्मा पागी व महेश नाईक यांचा स्मृतिचिन्ह, शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच होतकरू अन्य पाच नागरिकांचा गौरव करण्यात आला. सत्कारमूर्ती शांताजी नाईक गावकर, अनंत अग्नी व अश्मा पागी आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.
एकूण दोन दिवस चालणाऱ्या या लोकोत्सव २०१० चा काल संध्याकाळी पेडणेच्या आमदार लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी उद्घाटन केले होते. या लोकोत्सवात संस्कृती व परंपरा या गोष्टीवर आधारीत ७० च्या आसपास स्टॉल्स १२५ खेळाडूंनी क्रीडाप्रकारात भाग घेतल्याचे सांगितले.
अर्जून गावकर व स्वाती केरकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

Sunday 10 January, 2010

जुगाराच्या वृत्ताने पेडण्यात खळबळ

जनतेची साथ मिळाल्यास जुगार बंद पाडू - पोलिस

पणजी, दि. ९ (प्रतिनिधी)- राज्यात मोठ्या प्रमाणात जत्रोत्सव व इतर धार्मिक उत्सवांत उघडपणे जुगार चालतो हे स्पष्ट असताना पोलिस खात्याकडून मात्र त्याचा साफ इन्कार केला जाणे याचा अर्थ या खात्याने आपली सगळी विश्वासार्हता खुंटीला टांगून खोटारडेपणाचाच कळस गाठला आहे, अशी सार्वत्रिक प्रतिक्रिया आज उमटली. "गोवादूत' मध्ये प्रसिद्ध झालेल्या जुगारासंबंधीच्या वृत्तामुळे सगळीकडे व खास करून पेडणे तालुक्यात एकच खळबळ उडाली. या भागातील विविध क्षेत्रांतील अनेकांनी "गोवादूत' कार्यालयात फोन करून या धाडसाचे कौतुक केले. आतापर्यंत जुगार चालवणाऱ्या लोकांच्या दहशतीमुळे दबून राहिलेल्या जनतेच्या आवाजाला या वृत्तामुळे खऱ्या अर्थाने वाट मोकळी झाली, अशा शब्दांत अनेकांनी समाधान व्यक्त केले.
दरम्यान, पोलिसांनी मात्र आता आपली कातडी वाचवण्यासाठी भलतीच शक्कल लढवली आहे. विविध जत्रौत्सव व इतर उत्सवांनिमित्त होणारा जुगार हा संबंधित देवस्थान समिती व पंचायत मंडळाच्या सहमतीनेच चालवला जातो आणि त्यामुळे केवळ पोलिसांना दोष देऊन काहीही उपयोग नाही अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. यासंबंधी पोलिस खात्यातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याशी अनौपचारिक चर्चा केली असता त्यांनी या प्रकरणी काही महत्त्वाच्या गोष्टी नजरेस आणून दिल्या. एखाद्या गावात जुगार सुरू करण्यासाठी वरिष्ठांकडूनच दबाव टाकला जातो तिथे पोलिस स्थानकातील अधिकाऱ्यांनी काय करावे, असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. पोलिस खात्यातील वरिष्ठ अधिकारी व राजकीय नेत्यांचा दबाव झुगारून आपली सेवा प्रामाणिकपणाने बजावणे व समोरील आव्हानांना ताठपणाने सामोरे जाणे आदी गोष्टी केवळ हिंदी चित्रपटांतच पाहायला चांगल्या वाटतात. प्रत्यक्षात अशावेळी कशी स्थिती बनते हे सेवा बजावणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांनाच ठाऊक असते,असेही ते म्हणाले.
सगळेच पोलिस अधिकारी भ्रष्टाचारी असतात अशातला भाग नाही पण काही अधिकारी खरोखरच प्रामाणिक आहेत पण त्यांच्या प्रामाणिकपणाला जनतेकडून मात्र योग्य ती साथ मिळत नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
राज्यात व खास करून पेडणे तालुक्यात कुठलाही उत्सव अथवा धार्मिक कार्यक्रम असल्यास त्याठिकाणी जुगार चालवणे ही प्रथा देवस्थान समित्यांनीच सुरू केली आहे. या प्रकारामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात निधी मिळतो व त्याचा वापर देवस्थानाच्या विविध उपक्रमांसाठी वापरला जातो, असेही ते म्हणाले. काही बड्या देवस्थान समित्यांना जत्रोत्सवातील जुगारातून किमान एक लाख रुपये देणगी स्वरूपात मिळते व हे पैसेच त्यांच्या एकूण देवस्थान उत्पन्नाचे महत्त्वाचे साधन बनले आहे. आता पोलिसांनी हा जुगार थांबवण्याचे कितीही ठरवले तरी या देवस्थान समित्यांकडून पोलिसांना साथ मिळणार आहे काय, असा खोचक सवाल या अधिकाऱ्याने केला. या जुगाराचे खापर केवळ पोलिसांवर न फोडता त्याबाबत समाजातच जागृती होणे गरजेचे आहे. जुगाराचा पैसा देवस्थानांनी वापरावा का, असाही प्रश्न आता प्रामुख्याने उपस्थित झाला आहे. आता देवस्थान समित्यांनीच किंवा राज्य सरकारने धार्मिक उत्सवांना जुगारावर बंदी घालण्याबाबत निश्चित धोरण तयार करावे तेव्हाच हे प्रकार बंद होतील,असेही ते म्हणाले. वृत्तपत्रांनी किंवा बुद्धिवाद्यांनी कितीही घसा फोडला तरी ही प्रथा सहज बंद होणे शक्य नाही, असेही सदर अधिकाऱ्याने ठामपणे सांगितले.
काही काळापूर्वी विविध मंदिरांची नासधूस व चोरीचे प्रकार वाढले, त्यावेळी राज्यव्यापी मंदिर सुरक्षा समिती स्थापन करण्यात आली. या मंदिर सुरक्षा समितीने जुगाराचा विषय हाताळून त्याबाबत जागृती करण्याचे आव्हान स्वीकारावे व देवस्थानच्या कार्यक्रमांत जुगाराला अजिबात थारा देणार नाही, अशी भूमिका देवस्थान समित्यांना घेण्यास भाग पाडावे. कुठलीही बेकायदा गोष्ट पोलिसांनी रोखावी ही सर्वसामान्य जनतेची समजूत योग्य आहे; पण त्यासाठी जनतेकडूनही पोलिसांना सहकार्याची गरज आहे.जनताच जर बेकायदा गोष्टींना पाठीशी घालीत असेल तर पोलिसांना जनतेच्या विरोधात जाऊन कायद्याची अंमलबजावणी करणे नेहमीच कठीण जाते. जुगार हा त्यातलाच एक भाग आहे असेही ते म्हणाले.
"गोवादूत' मध्ये प्रसिद्ध झालेले वृत्त खरे आहे; मात्र या वृत्ताला किंवा या भूमिकेला राज्यातील किती देवस्थान समित्या व समाजातील लोक पाठिंबा देतील यावरूनच सार्वजनिक जुगाराचे खरे स्वरूप सिद्ध होईल. समाजातील गैरप्रकार उघडकीस आणून लोकांना जागृत करणे व त्यांना आपली जबाबदारी पार पाडण्यास प्रवृत्त करणे हे वृत्तपत्रांचे कामच आहे. तथापि, केवळ वृत्तपत्रांतून एखादी चळवळ चालवली जाणे व समाजातून या चळवळीला किंचितही पाठिंबा न मिळणे या प्रकाराला काय म्हणणार? आज समाजाला खरोखरच जुगाराबाबत चीड असेल व हा जुगार बंद व्हावा असे वाटत असेल तर पोलिसांना सर्वतोपरी सहकार्य करावे,असा सल्लाही त्यांनी दिली.

पार्श्वभूमी तपासूनच यापुढे कॉंग्रेसप्रवेश

कॉंग्रेस अंतर्गत संघर्ष चिघळण्याची शक्यता

पणजी, दि. ९ (प्रतिनिधी) - कॉंग्रेसमध्ये प्रवेश करण्यास अनेकजण इच्छुक असले तरी यापुढे प्रत्येक सदस्याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची छाननी समितीकडून पडताळणी झाल्यानंतरच त्याला प्रवेश दिला जाईल, असा टोला लगावून गोवा प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष सुभाष शिरोडकर यांनी शिक्षणमंत्री तथा ताळगावचे आमदार बाबूश मोन्सेरात यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. कॉंग्रेस आघाडी सरकार पूर्णपणे स्थिर आहे व पुढील अडीच वर्षे सरकारला अजिबात धोका नाही, असा दावा करून त्यांनी "ग्रुप ऑफ सेव्हन'च्या दबावतंत्रालाही धुडकावून लावले आहे. त्यामुळे नजीकच्या काळात हा राजकीय संघर्ष आणखी टोकदार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
राष्ट्रीय कॉंग्रेसचे निरीक्षक विजेंद्रनाथ शर्मा हे सध्या गोवा भेटीवर आहेत. त्यांनी आज प्रदेश कॉंग्रेस समितीच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. कॉंग्रेस पक्षाची सध्या सदस्यता मोहीम सुरू आहे. त्याचा आढावा घेण्यासाठीच आपण येथे आल्याचे शर्मा हे पत्रकारांशी बोलताना म्हणाले. येत्या १५ जानेवारीपर्यंत ही मोहीम पूर्ण करून सदस्यांची अंतिम यादी जाहीर केली जाईल, असेही ते म्हणाले.
दरम्यान, यावेळी पत्रकारांशी बोलताना सुभाष शिरोडकर यांनी सरकाराअंतर्गत भांडणाची पक्षाने गंभीर दखल घेतल्याचे सांगितले. पक्षशिस्तीचे पालन प्रत्येक आमदार व मंत्र्याने करावे, असे ठणकावून सांगण्यात आल्याचे ते म्हणाले. क्रीडामंत्री बाबू आजगावकर व कुंभारजुवेचे आमदार पांडुरंग मडकईकर यांनी अलीकडेच एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केल्याने त्यांना सक्त ताकीद देण्यात आल्याचे शिरोडकर म्हणाले.

संस्कारक्षम घर हेच आद्यविद्यापीठ - विवेक घळसासी

पर्वरी, दि. ९ (प्रतिनिधी)- बदलत्या काळाचा परिणाम म्हणून आता एकत्रित कुटुंब व्यवस्था राहिलेली नाही, याची खंत न बाळगता अथवा निराश न होता छोट्या कुटुंबात असलेल्यांची मने किती एकत्रित आहेत आणि ती तशी कशी राहतील, याचाच अधिक विचार करा, असे आवाहन आज नामवंत वक्ते विवेक घळसासी यांनी केले. आपले घर हे आद्यविद्यापीठ आहे, मुलांना शाळेत शिकवले जाते पण त्यांना शहाणपण मात्र घरातच मिळते, याचे सदैव स्मरण ठेवून त्यानुसार वर्तन ठेवा, असे ते म्हणाले. पर्वरी येथे विद्याप्रबोधिनी संकुलात आयोजित शारदा व्याख्यानमालेत अखेरचे पुष्प गुंफताना ते "मुके होत चालली घरे' या विषयावर बोलत होते.
विद्यमान स्थितीवर भाष्य करताना श्री. घळसासी म्हणाले, इंटरनेटद्वारा सर्व प्रकारच्या सुविधा प्राप्त होत आहेत आणि बहुतेक व्यवहार आता घरबसल्या होऊ लागले आहेत, सध्या हे सुखदायक वाटले तरी माणूस माणसापासून दुरावत चालला आहे आणि काही वर्षांनी त्याला हे एकाकीपण असह्य होईल. जग ज्यावेळी संभ्रमावस्थेत असेल त्यावेळी मार्ग दाखविण्याची जबाबदारी आपल्या देशावर असेल, यासाठी मुकी होत जाणारी घरे संस्कारांनी कशी पुन्हा एकदा बोलकी होतील याचा आत्तापासूनच विचार व्हायला हवा. सध्या बडबड चालते पण बोलणे होत नाही, काही वेळा बोलणे चालू असते पण सुसंवाद होत नाही. अशा स्थितीत संस्कारांना अतिशय महत्त्व आहे, पण संस्कार म्हणजे केवळ धार्मिक विधी नव्हेत. कृतज्ञता, सहजीवन, परिश्रमाची तयारी आणि संयम हे आवश्यक गुण बिंबवणारे घरातील वर्तन म्हणजेच संस्कार हे आपल्या पूर्वजांनी आपल्या आचरणातूनच दाखवून दिले आहे. खरे तर लोकसंस्कृतीमधील रीत हाच संस्काराचा पाया आहे.
भौतिक सुखाची माणसाची ओढ समजण्यासारखी आहे, भौतिक, मानवी व तांत्रिक विकास ही काळाची गरज आहे, त्यात मागे राहून चालणार नाही पण त्याचबरोबर माणसाला माणूस ठेवण्याची भारतीय कुटुंबाची क्षमता लयाला जाणार नाही, याचीही दक्षता घ्यायला हवी,असे घळसासी म्हणाले.
प्रमुख पाहुणे दै. गोमन्तकचे कार्यकारी संपादक सुरेश नाईक यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. व्यासपीठावर बिपीन नाटेकर व प्रा. भिवा मळीक उपस्थित होते.प्रा. महेश नागवेकर यांनी सूत्रसंचालन केले. गुरुप्रसाद पावस्कर यांनी आभार मानले. भारत विकास परिषद व जनहित मंडळ, पर्वरी यांनी आयोजित केलेल्या या व्याख्यानमालेला तीनही दिवस मोठ्या संख्येने श्रोते उपस्थित होते.

भारतीय तरुणाला ऑस्ट्रेलियात पेटवले

मेलबर्न, दि. ९ - नितीन गर्ग या भारतीय विद्यार्थ्याचा खून झाल्याचे प्रकरण ताजे असतानाच आज (शनिवारी) २९ वर्षीय एका भारतीय तरुणाला ऑस्ट्रेलियात जाळण्याचा प्रयत्न झाला. चौघांकडून हल्ला झालेल्या सदर युवक पंधरा टक्के होरपळला असून त्याला येथील आल्फ्रेड इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. त्याच्या हाताला, छातीला व चेहऱ्याला गंभीर जखमा झाल्या आहेत. इसेंडन या मेलबर्नमधील उपनगरात या तरुणावर हल्ला झाला. त्याची ओळख अजून पटलेली नाही. रात्रीच्या भोजनासाठी तो आपल्या पत्नीसोबत या भागात आला होता. त्याने भोजनानंतर त्याने पत्नीला घरी सोडले व आपली कार पार्क करण्यासाठी तो गेला असता तेथेच त्याच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. स्थानिक वेळेनुसार रात्री १.३० ते २ च्या दरम्यान हा हल्ला झाल्याचे वृत्त येथील माध्यमांनी दिले आहे. त्याच्या अंगावर ज्वालाग्रही पदार्थ या चौघा हल्लेखोरांनी टाकला व लायटरच्या साहाय्याने आग लावून हल्लेखोर त्याला धक्का देत पळून गेले. त्याने आपल्या अंगावरील कपड्यांद्वारे कशीबशी ही आग विझवण्याचा प्रयत्न केला. सदर तरुणाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती इस्पितळाच्या सूत्रांनी दिली. या घटनेमुळे पुन्हा खळबळ माजली आहे. गेल्या काही महिन्यांपासून भारतीयांवर प्रामुख्याने ऑस्ट्रेलियात हल्ले होण्याचे प्रमाण वाढत चालले असून त्यामुळे भारतात त्याबद्दल तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. दरम्यान, या हल्लेखोरांचा कसून शोध घेण्यात येत आहे.