Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 24 April, 2010

आयपीएलचे संसदेत तीव्र पडसाद

सभागृहाचे कामकाज तहकूब "जेपीसी'मार्फत चौकशीची विरोधकांची मागणी
- आयपीएल चोरांचा अड्डा : यादव
- आयपीएलमध्ये भ्रष्टाचार
- सदानंद सुळेंचा सहभाग
- आरोप निराधार, चिंता नाही : पवार
- आयपीएल प्रकरण गृहमंत्र्यांकडे नाही
- नियमांनाच मुथय्यांचे आव्हान

नवी दिल्ली, दि. २३: सध्या सुरू असलेल्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) टी-२० क्रिकेट स्पर्धेतील तथाकथित घोटाळ्यांचे व गैरव्यवहारांचे पडसाद आज संसदेच्या दोन्ही सभागृहात तीव्रपणे उमटले. या सर्व प्रकरणाची संयुक्त संसदीय समितीमार्फत (जेपीसी) चौकशी करावी, अशी मागणी करीत आज विरोधकांनी लोकसभा व राज्यसभा या दोन्ही सभागृहांत गोंधळ घालून कामकाज बंद पाडल्यामुळे अखेर दोन्ही सभागृहांचे कामकाजच दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.
या सर्व प्रकरणाची चौकशी करण्यात येईल. मात्र, त्यापूर्वी कोणतीही व्यक्ती किंवा संस्थेवर त्याचा विपरीत परिणाम होणार नाही, याची खात्री करून घेण्यात येईल, असे केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी आज लोकसभेत सांगितले. अर्थमंत्र्यांच्या उत्तराने समाधान न झाल्याने विरोधी पक्षांच्या सदस्यांनी सभागृहात गोंधळ घालण्यास सुरुवात केला. जेपीसीमार्फत चौकशी करा, अशा घोषणा विरोधी बाकांवरून देण्यात आल्या. पीठासीन अध्यक्षांनी वारंवार इशारा देऊनही शांतता प्रस्थापित न झाल्याने आधी सभागृहाचे कामकाज १२ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले होते. त्यानंतर दोन्ही सभागृहाचे कामकाज सुरू झाले. मात्र, विरोधी बाकांवरील गोंधळ कमी न झाल्यामुळे लोकसभेचे दुपारी २ वाजेपर्यंत, तर राज्यसभेचे कामकाज दुपारी २.३० पर्यंत स्थगित करण्यात आले होते. पुन्हा कामकाज सुरू झाल्यानंतर गोंधळ थांबण्याची चिन्हे दिसून न आल्यामुळे कामकाज अखेर दिवसभरासाठीच तहकूब करण्यात आले.
शुक्रवारी सकाळी लोकसभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर प्रश्नोत्तराचा तास स्थगित करण्याची मागणी विरोधकांनी केली. प्रश्नोत्तराच्या तासाऐवजी आयपीएलमधील कथित भ्रष्टाचारावर चर्चा करण्यात यावी, अशी मागणी विरोधकांतर्फे करण्यात आली. या प्रकरणाची चौकशी "जेपीसी'मार्फत करण्यात यावी आणि ही चौकशी तात्काळ सुरू करावी, अशी आग्रही मागणी भाजपच्या नेत्या सुषमा स्वराज यांनी केली. डावे पक्ष व इतर विरोधी पक्षांच्या सदस्यांनी ही मागणी उचलून धरली.
त्यावर बोलताना अर्थमंत्री मुखर्जी म्हणाले की, अशा समितीची स्थापना कशा पद्धतीने केली जाते, हे विरोधकांना माहिती आहे. तरीही विरोधी पक्षनेते अशी मागणी करीत असल्याबद्दल मुखर्जी यांनी नाराजी व्यक्त केली. विरोधकांनी मागणी केली म्हणून लगेच जेपीसीची स्थापना करणे शक्य नाही. या संबंधातील कोणताही निर्णय घाईने घेतला जाणार नाही, असेही मुखर्जी म्हणाले. कायदेशीर मार्गाने, नियमानुसार, विचार करूनच निर्णय घेतला जाईल. या संदर्भातील विरोधकांचे म्हणणे पंतप्रधान मनमोहनसिंग यांना सांगितले जाईल. त्यानंतर पंतप्रधान जो निर्णय घेतील तो विरोधकांना कळविला जाईल, असेही मुखर्जी यांनी सांगितले.
आयपीएलमधील या कथित भ्रष्टाचाराच्या चौकशीचे आदेश संबंधित विभागांना देण्यात आले असून त्यांनी आपले तपास कार्यही सुरू केले आहे. या चौकशीसाठी वेळ लागणार असल्याने विरोधकांनी संयम बाळगून सहकार्य करावे, असे आवाहनही मुखर्जी यांनी केले.
आयपीएल प्रकरण दिवसेंदिवस अधिक गंभीर होत चालले असून या प्रकरणी आता दोन केंद्रीय मंत्र्यांचीही नावे घेतली जात असल्याचे सांगत विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज म्हणाल्या की, या प्रकरणी आधीच एका मंत्र्याला राजीनामाही द्यावा लागला आहे. ज्या व्यक्तीने मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे, त्याची कसून चौकशी केली जावी, अशी मागणीही स्वराज यांनी शशी थरुर यांचे नाव न घेता केली. या प्रकरणाची चौकशी गांभीर्याने करण्याची सरकारची अजिबात इच्छा दिसत नसल्याचा आरोपही स्वराज यांनी केला.
या सर्व प्रकरणी आणखी दोन मंत्र्यांची नावे समोर आली आहेत. त्यांचीही चौकशी करून त्यांनाही मंत्रिमंडळातून काढून टाकावे, अशी मागणी जनता दल नेते शरद यादव यांनी केली. आयपीएल म्हणजे चोरांचा अड्डा असल्याचा आरोपही शरद यादव यांनी केला आहे.
आयपीएलमध्ये भ्रष्टाचार
मुंबई : आयपीएलच्या टीव्ही प्रक्षेपणाचे हक्क मिळालेल्या एमएसएम (मल्टी स्क्रीन मीडिया) कंपनीने वर्ल्ड स्पोटर्‌स ग्रुपला १२५ कोटी रुपये दिले, अशी कबुली ग्रुपचे वेणू नायर यांनी दिली असल्याची माहिती आयकर अधिकाऱ्यांनी दिली आहे. या व्यवहाराचा फायदा अनेक राजकारण्यांना होत असल्याचेही चौकशीत आढळून आले आहे.
ही रक्कम देण्याचे मुख्य कारण म्हणजे ग्रुपने एमएसएमला मिळालेल्या हक्कात कोणताही अडथळा आणू नये, हे असावे, असा संशय या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. याच एमएसएम कंपनीत शरद पवार यांचे जावई सदानंद सुळे यांचे आर्थिक हितसंबंध असल्याचे पवार यांची कन्या सुप्रिया सुळे यांनी सांगितले आहे, हे येथे उल्लेखनीय.
ही सर्व रक्कम ग्रुपच्या खात्यात जमा न होता ती ग्रुपचे संस्थापक ओब्रायन यांच्या वैयक्तिक खात्यात जमा झाली आहे. हे एक आश्चर्य असल्याचेही संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले. या रकमेचे मूळ एखाद्या परदेशी खात्यात असावे, असा संशयही या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
एमएसएमची मूळ कंपनी असलेल्या सोनीची नोंदणी अमेरिकेत झाली आहे. अमेरिकी कायद्यानुसार लाच देणे हा गंभीर गुन्हा आहे. त्यामुळे कंपनीला तेथील चौकशीलाही तोंड द्यावे लागू शकते, अशी माहिती आहे.
आरोप निराधार, चिंता नाही : पवार
राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील ज्येष्ठ नेते व केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल आणि स्वत:ची मुलगी खासदार सुप्रिया सुळे यांचीही नावे आता आयपीएल घोटाळ्यात आली असली तरी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा असलेले शरद पवार निश्र्चिंत दिसत आहेत. मला या सर्व प्रकरणाचे काहीही घेणे-देणे नाही. आमच्यावर करण्यात आलेले सर्व आरोप निराधार असल्यामुळे चिंता करण्याची अजिबात गरज नाही, असे पवार म्हणाले. सभागृहात विरोधकांनी या साऱ्या प्रकरणी "जेपीसी'द्वारे चौकशीची मागणी केल्यानंतर पत्रकारांनी केंद्रीय कृषी मंत्री पवार यांना गाठून आपण चिंताग्रस्त दिसता, असे विचारले असता ते बोलत होते. विरोधकांना जे करायचे आहे ते त्यांना करू द्या, असेही पवार म्हणाले.
आयपीएल प्रकरण गृहमंत्र्यांकडे नाही
नवी दिल्ली : पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांना आयपीएल प्रकरण हाताळण्याची विचारणा केली असल्याचे जे वृत्त प्रसारित झाले आहे, त्यात तथ्य नसल्याचे पंतप्रधान कार्यालयातर्फे (पीएमओ) स्पष्ट करण्यात आले आहे. हे प्रकरण पंतप्रधानांनी गृहमंत्र्यांकडे सोपविले आहे, असे वृत्त काल राजधानीत पसरले होते. या पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान कार्यालयातून हा खुलासा करण्यात आला आहे. चिदंबरम यांच्याकडे आयपीएल प्रकरणाची चौकशी सोपविण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही, असेही पीएमओने म्हटले आहे.
मुथय्यांचे नियमांनाच आव्हान
नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांनी इंडियन प्रीमियर लीगच्या फ्रॅंचाईझी संघांना मालकी हक्क देण्याच्या नियमांनाच आव्हान देत मंडळाचे माजी अध्यक्ष ए. सी. मुथय्या यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या साऱ्या प्रकरणी मुथय्या यांनी याआधीच आपला विरोध दर्शविला होता. बीसीसीआयचे विद्यमान सचिव एन. श्रीनिवासन यांना मंडळाने चेन्नई सुपर किंग्स संघाच्या फ्रॅंचाईझी खरेदीसाठी सवलत दिल्यामुळे मुथय्या त्यांच्यावर नाराज आहेत. श्रीनिवास हे सिमेंट तयार करणाऱ्या इंडिया सिमेंट कंपनीचे मालक आहेत. त्यामुळे या प्रकरणी स्वत: एक उद्योजक असलेल्या मुथय्या यांनी मद्रास उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. मात्र, एक सदस्यीय खंडपीठाने ती फेटाळून लावली होती.
दरम्यान, आयपीएल कमिशनर ललित मोदी यांच्याप्रमाणेच मुथय्या यांनी २६ एप्रिल रोजी बोलाविण्यात आलेल्या आयपीएलच्या गव्हर्निंग काऊन्सिलच्या बैठकीच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. या बैठकीचे समन्वयक श्रीनिवासन आहे आणि त्यामुळे या बैठकीत अस्तित्वाची लढाई होण्याची शक्यता आहे, असेही मुथय्या यांचे म्हणणे आहे.
शुक्लांनी दिली अर्थमंत्र्यांना माहिती
दरम्यान, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांची भेट घेऊन आयपीएल वादासंदर्भातील विद्यमान माहिती अवगत करून दिली. कॉंग्रेस खासदार असलेले शुक्ला यांनी आज संसदीय कार्यालयात मुखर्जी यांची भेट घेतली. पंतप्रधान मनमोहनसिंग यांनीही गेल्या काही दिवसांमध्ये अनेकदा शुक्ला यांना बोलावून या प्रकरणाची माहिती जाणून घेतली आहे.
पंतप्रधानांना अधिकार
आयपीएल घोटाळा चौकशीसाठी संयुक्त संसदीय समिती स्थापन करण्याच्या विरोधकांच्या मागणीवर विचार करण्यासाठी आलेल्या कॉंग्रेस पक्षाच्या कोर ग्रुपच्या बैठकीत याबाबतचा संपूर्ण अधिकार पंतप्रधान मनमोहनसिंग यांना देण्यात आला आहे.
सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत इतरही अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली. स्वत: पंतप्रधान मनमोहनसिंग, गृहमंत्री पी. चिदंबरम, अर्थमंत्री प्रणव मुखर्जी, संरक्षण मंत्री ए. के. ऍन्टोनी, सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल आदी कॉंग्रेसची दिग्गज नेते मंडळी या बैठकीला उपस्थित होती.

पाणीपुरवठ्याबाबत हयगय नको: मुख्यमंत्री

पणजी, दि. २३ (प्रतिनिधी): राज्यात पाणी टंचाईची भीषण समस्या उद्भवण्याची शक्यता निर्माण झाली असून विविध ठिकाणी पाणी टंचाईच्या तक्रारी वाढत चालल्याने मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना त्याची दखल घेणे भाग पडले आहे. पावसाळ्यापूर्वी राज्यातील जनतेला पाण्याचा मुबलक पुरवठा करण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना करता येतील, याबाबत खास उच्चस्तरीय बैठकीत विचारविनिमय करण्यात आला असून त्याची तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश मुख्यमंत्री कामत यांनी दिले आहेत.
मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी बोलावलेल्या या बैठकीला सार्वजनिक बांधकाम खात्याचे प्रधान मुख्य अभियंते, सा. बां. खात्याचे सचिव, सा.बां. खात्याचे मुख्य अभियंता व खात्याचे वरिष्ठ अधिकारी हजर होते. राज्यात कोणकोणत्या भागात पाणी टंचाई भासते याचा दैनंदिन आढावा घेऊन तिथे पाणी पुरवठा सुरळीत करण्यासंबंधी प्राधान्य दिले पाहिजे. कमी दाबाच्या पाण्यामुळे अनेक ठिकाणी लोकांना पाणी मिळत नाही. अशावेळी पाण्याची गती सांभाळण्याची व पाण्याचा पुरवठा शेवटच्या टोकापर्यंत पोचल्याची हमी करून घेण्याचे आदेशही मुख्यमंत्री कामत यांनी अधिकाऱ्यांना दिले. राज्य प्रशासनाने पाणीपुरवठ्याच्या संदर्भात कोणतीही हयगय करू नये, असे सक्त निर्देश देत दैनंदिन परिस्थितीची आपल्याला माहिती देण्याचे आदेशही त्यांनी यावेळी दिले. पुढील दोन ते तीन महिने पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत व त्यासाठी पाणी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी लोकांच्या सेवेसाठी तत्पर राहावे, असे आवाहनही मुख्यमंत्री कामत यांनी केले.

मिलाग्रीस फेस्तात खुलेआम जुगार सुरू

पणजी, दि. २३ (प्रतिनिधी): म्हापसा येथील मिलाग्रीस चर्चकडील परिसर जुगाराच्या विळख्यात अडकला असून मिलाग्रीस फेस्त चालू झाल्यापासून या ठिकाणी लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. पोलिसांकडूनच या जुगारवाल्यांना शह मिळत असून दर दिवशी हजारो रुपयांचा हप्ता दिला जात असल्याची माहिती एका जुगारवाल्यांकडून प्राप्त झाली आहे.
मिलाग्रीस चर्च फेस्ताची सुरुवात झाल्यापासून फेरी भरत असलेल्या जागेत खुलेआम कुणाचीही पर्वा न करता जुगार सुरू आहे. सिने अलंकारजवळून चर्चकडे जाणाऱ्या रस्त्यावर फेरी सुरू होण्यापूर्वी जुगाराची टेबले पाहायला मिळत आहेत. गडगडा हा जुगाराचा प्रकार येथे सर्रासपणे सुरू असून प्रत्येक टेबलावर किमान १२ ते १५ लोक पैसे लावत असल्याचे दिसून येते. या पुढे पत्त्यांचा खेळ (पट) खेळण्यासाठी हमखास जागा राखून ठेवण्यात आली आहे. या ठिकाणी २० पेक्षा जास्त पटवाले आपले बस्तान ठोकून आहेत. याशिवाय "काला-नीला-पीला' या प्रकाराचा समावेश आहे. सबंध रात्रभर तसेच पहाटेपर्यंत जुगार सुरू असतो. यामुळे फेस्ताला येणाऱ्या जनतेची हमखास नजर या खेळगड्यांवर आणि जुगाऱ्यांवर पडते. साहजिकच कोणाच्या परवानगीने एवढा मोठा जुगार भरवला जात आहे, याची शंका जनतेच्या मनात उत्पन्न होत आहे. शिवाय पोलिसांच्या भूमिकेबाबत लोक संशय व्यक्त करताना दिसून येत आहेत.
गस्तीवर असलेले पोलिस जुगार खेळण्यात येत असलेल्या जागेवरून फेरफटका मारतात, परंतु या प्रकाराकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे जुगार सुरळीत सुरू आहे ना? हे पाहण्यासाठीच हा खटाटोप की काय असा प्रश्न जनता विचारताना दिसत आहे.
या परिसरातील स्त्रियांनी मात्र या प्रकाराबद्दल तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करताना असले प्रकार थोपवण्याची कुवत पोलिसांमध्ये नसल्याचे म्हटले आहे.

सत्तरीला पडलाय खाणींचा विळखा!

- गाव आणि गावराईवर येणार महासंकट
- संवेदनशील क्षेत्र नष्ट होण्याच्या मार्गावर
- येणाऱ्या काळात पाण्याची समस्या बिकट
- भूमिपुत्रांवर आभाळ कोसळण्याची शक्यता
- कृषिप्रधान सत्तरी धूळमातीत गाडली जाणार

वाळपई, दि. २२ (प्रतिनिधी): हिरवे डोंगर, वनराई, शेती, बागायती, कुळागरे यांनी कधी काळी सत्तरी तालुका नटला होता, असे म्हणण्याची पाळी आता सत्तरीवासीयांवर येऊ घातली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे या तालुक्यात सध्या खाणींनी मांडलेला उच्छाद. सत्तरीतील पिसुर्ले, पर्ये, वेळगे, खडकी , गुडुमळ, आंबेली , खोतोडे, गवाणे, सोनाळ, सावर्डे, धावे, मासोर्डे, गुळेली अशा अनेक गावांत खाणींसाठी हालचाली सुरू आहेत. धावे हे एकमेव गाव वगळल्यास अन्य गावांत खनिजाचे उत्खनन सुरू आहे. धावे गावावर २००९ साली ऑगस्ट महिन्यात खाणीची जाहीर सुनावणी ठेवण्यात आली होती. मात्र तेथील लोकांचा रुद्रावतार पाहून ही सुनावणी रद्द झाली होती. दुर्दैवाची बाब म्हणजे सध्या धावे गावावरही खाणीचे संकट गडद होत चालले आहे.
वाळपईजवळच मासोर्डे गावात खाण उत्खननासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे वाळपई या मुख्य शहराचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. सोनाळ, सावर्डे गावांतून तर गेल्या काही महिन्यांपासून चोरट्या मार्गाने बेकायदा माल नेण्यास सुरुवात झाली आहे. खुद्द वाळपई बाजारातून अत्यंत हुशारीने ट्रकांतून त्यांच्या क्षमतेपेक्षा कमी माल नेला जात आहे. याची कल्पना वाळपईवासीयांना असूनही ते आरामात आहेत. गवाणे आंबेली येथील एका खाणीला सील ठोकण्यात आले होते. सील ठोकल्यानंतरही तेथील मशिनरी चोरीला जाते हा प्रकार संशयास्पद वाटतो. आंबेली गावाबरोबरच पिसुर्लेतही मोठ्या प्रमाणात खाण व्यवसाय सुरू आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात या गावांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे. सत्तरीतील सर्वच गावे रानावनांनी बहरलेली. अशा खाणींमुळे ती नष्ट होत चालली आहेत. पूर्वी ही गावे हिरवीगार होती, आता त्यांचे रूपांतर लाल मातीत झाले आहे. लोकांच्या उपजीविकेचे साधन नष्ट करण्यात येत आहे. पैशांच्या लोभापायी काहींनी खाणींना पाठिंबा दिला; पण गरीब शेतकरी हवालदिल झाले आहेत. हिरवाईचा शालू नष्ट करून या तालुक्याला लाल मातीचा शालू नेसवण्याचा भयंकर कट रचला जात आहे. आपल्या फायद्यासाठी गरीब जनतेच्या जमिनी बळजबरीने घेऊन, अनेक सरकारी कायदे लादून अमानुषपणे खाणी सुरू केल्या जात आहेत. यात गरीब होरपळले जात आहेत. प्रभू रामचंद्रांच्या युगात रावणासारखे दुष्ट तयार झाले होते. या रावणाचा अखेर रामचंद्रांनी वध केला होता. द्वापर युगात यादवांनी जनतेचा छळ केला. या यादवांना श्रीकृष्णाने ठार मारले. आता कलियुगात मात्र खाणींच्या माध्यमातून अनेक "यादव' तयार होत आहेत. त्यांना थोपवणार कोण? भूमातेला या कलियुगातील यादवांनी पोखरून लक्ष्मीच्या हव्यासापोटी उत्खनन चालवले आहे. अशा खाणरुपी यादवांचा संहार करण्यासाठी ईश्वर अवतार घेईल का, असा प्रश्न सत्तरीवासीय विचारत आहेत. एरवी अनेक कार्यक्रमांत राजकीय नेते शेती टिकवणे गरजेचे आहे, युवकांनी शेतीकडे वळले पाहिजे अशी साखरपेरणी करतात. मात्र हेच लोक मागील दरवाजाने खाणींसारखे प्रकल्प सुरू करून शेती नष्ट करू पाहत आहेत.
गोव्यात म्हणे ३० ते ३५ टक्के खाणी बेकायदा आहेत. कायदेशीर किंवा बेकायदा खाणी सुरू असल्या तरीही परिणाम बदलणार नाही. जमीन पोखरली जाणार आहे. सत्तरीतील गावेच येणाऱ्या काळात धुळीत गाडली जातील अशी भीती लोकांकडून व्यक्त होत आहे. पर्यावरणाचा विद्ध्वंस, सर्वसामान्यांना देशोधडीला लावणे व नैसर्गिक संपत्तीची निव्वळ लूट असेच त्याचे स्वरूप बनले आहे. एखाद्या गावात खाण सुरू होणार याची चाहूल लागताच अनेक विरोधक तयार होतात. शेवटी हेच विरोधक नोटा बघून फितूर होत खाणीला प्रोत्साहन देतात. अर्थात, एखाद्या गावात खाण सुरू होण्यास जनता तेवढीच जबाबदार आहे. खाणी सुरू झाल्या की, अपघाताचे प्रमाण वाढू लागते. धूळ प्रदूषण, रोगराई असे प्रकार वाढतात. याचे खाण मालकांना सोयरसुतक नसते. सर्वप्रथम समस्या भेडसावते ती पाण्याची. या खाणीमुळे नैसर्गिक पाणवठ्यांची पातळी खोल होत जाते. सत्तरीतील अनेक गावे उंचवट्यांवर आहेत. अशा खाणींमुळे हे उंचवटे एकदा सपाट झाले की मोठ्या प्रमाणात पुरासारखी स्थिती निर्माण होईल. सत्तरीत म्हादई नदी कर्नाटकातून येते. नंतर ती उर्वरित गोव्यात जाते. म्हणूनच या खाणींमुळे म्हादई नदी प्रदूषित होणार आहे. शिवाय सामान्य शेतकऱ्यांच्या जीवनावर संक्रांत येणार आहे. मुख्य म्हणजे वाळपई शहराला होणाऱ्या दाबोस प्रकल्पाच्या पाणीपुरवठ्यावर याचा वाईट परिणाम होणार आहे. पिढ्यान्पिढ्या कसलेली कुळागरे नष्ट होणार असून जलस्रोतांचे अस्तित्वही धोक्यात येणार आहे. काही शेतकरी भूमिहीन आहेत. अनेकांकडे सरकारी जमिनी आहेत. काही जमिनी म्हादई अभयारण्य क्षेत्रात येतात. या क्षेत्रात येणाऱ्या लोकांना जमिनी सरकार देत नाही. मात्र याच क्षेत्रात खनिज उत्खननासाठी परवानगी दिली जाते. हा उघड उघड पक्षपातच म्हटला पाहिजे. सध्या कमी दर्जाच्या खनिजावर चीनने बंदी आणली असे सांगितले जात असले तरी तो लोकांना फसवण्यासाठीचा राजकीय डाव नसेल कशावरून? या बंदीमुळे म्हणे खनिज व्यावसायिकांवर आभाळ कोसळले आहे. मग शेतकऱ्यांच्या शेतमालास योग्य भाव मिळत नाही तेव्हा शेतकऱ्यांनी काय करायचे? सरकारला त्यांच्याबद्दल दया येत नाही. चीनने घातलेल्या बंदीमुळे गोव्यातून कमी प्रतीचा माल निर्यात केला जायचा हेही सत्य उजेडात आले आहे. यंदा काजू पीक गोव्यात कमी झाले आहे. यावर्षी काजू बियांना ७० ते ८० रुपयापर्यंत भाव मिळेल अशी अपेक्षा होती. हा भाव आता ५५ रुपयांच्या आसपास घुटमळत आहे. अशा वेळी शेतकऱ्यांनी काय करावे? खाणींमुळे सत्तरीतील गावात कमी पीक येऊ लागले आहे. हे खाण मालक गरीब जनतेचे संहारक बनले आहेत. त्यामागे त्यांचा स्वार्थच लपला आहे. हा प्रकार म्हणजे केसाने गळा कापण्याचाच प्रकार आहे. त्यामुळेच निसर्गसंपन्न सत्तरी तालुक्याला कोण वाचवणार, असा यक्षप्रश्न यानिमित्ताने निर्माण झाला आहे. त्याचे उत्तर सत्तरीवासीयांनाच एकजूट होऊन शोधावे लागेल.

...क्रिकेटच तारून नेईल: सचिन

मुंबई, दि. २३ : जीवन सहजासहजी जगायचे म्हटल्यास ते दरवेळी शक्य होणार नाही. जीवनात चढउतार येतच असतात. सध्या आयपीएलमध्येही अशाच प्रकारचे चढउतार सुरू आहेत, ते पार केले की केवळ क्रिकेटच शिल्लक राहणार आहे, आणि क्रिकेटचा सर्व तारून नेईल, अशी आशा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने व्यक्त केली. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या खास मुलाखतीत सचिनने खेळ बदनाम होण्याच्या या घटना म्हणजे "वाईट काळ' असल्याचे म्हटले आहे.
आयपीएलचे कमिशनर ललित मोदी यांच्यासह आता अनेक राजकीय नेते यात गुंतल्याचे प्रथमदर्शनी सिद्ध होत आहे. यामुळे या स्पर्धेला गालबोट लागले आहे. मोदी यांनी राजीनामा द्यावा, यासाठी त्यांच्यावर दबाव आणला जात आहे.
एखादी स्पर्धात्मक घटना लाखो लोक पाहतात तेव्हा अशा गोष्टी मागे उरतात, असेही सचिनने स्पष्ट केले. सचिनचा संघ मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या अंतिम फेरीत प्रवेश केला असून रविवारी त्यांची लढत चेन्नई सुपर किंग्सशी होणार आहे. १४ सामन्यात ५७० धावा करणाऱ्या सचिनच्या उजव्या हाताला दुखापत झाल्याने त्याचे अंतिम सामन्यात खेळण्याबाबत अद्याप प्रश्नचिन्ह आहे. असे झाले तर चेन्नईविरुद्धच्या सामन्यात केवळ प्रेक्षक म्हणून त्याला मैदानावर उपस्थित राहावे लागणार आहे. परंतु, सचिनने अद्याप आशा सोडलेली नाही. सध्या माझ्या हाताला सूज आली आहे. पण हातात बॅट धरणे शक्य झाले तर इतर गोष्टी महत्त्वाच्या नाहीत, असे सचिन म्हणाला.
आयपीएलच्या अंतिम सामन्याच्या पूर्वसंध्येला सचिन उद्या २४ रोजी आपला ३७ वा वाढदिवस साजरा करत आहे. अंतिम सामन्यापर्यंत मजल मारण्यात केवळ मैदानावरील खेळाडूंचेच परिश्रम नाहीत तर अतिरिक्त खेळाडू, प्रशिक्षक, संघ व्यवस्थापक व सर्व संबंधितांचा त्यात सहभाग आहे, असे सचिन शेवटी म्हणाला.

'सीआरझेड' बांधकामांना दिलासा

दुरुस्ती कायद्यात गोव्याला विशेष दर्जा
पणजी, दि. २३ (प्रतिनिधी): किनारी नियमन विभाग १९९१ कायद्यात (सीआरझेड) दुरुस्ती सुचवणारा आराखडा केंद्रीय पर्यावरण व वनमंत्रालयातर्फे जाहीर करण्यात आला असून त्यात गोव्याला विशेष दर्जा देण्यात आल्याची घोषणा पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी केली. सध्याच्या "सीआरझेड' कायद्यामुळे किनारी भागातील पारंपरिक मच्छीमार व इतर व्यावसायिकांना अनेक कायदेशीर अडथळे व समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या लोकांना दिलासा देण्याबरोबरच किनारी भागातील नैसर्गिक संपत्ती तथा संवेदनशील विभागाचे योग्य पद्धतीने जतन व्हावे या दृष्टीने या कायद्यात दुरुस्ती सुचवण्यात आली असून गोव्याच्या संदर्भात इथल्या परिस्थितीनुरूप कायद्यात तरतूद करण्याची सूचना करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
आज इथे बोलावण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत श्री. सिक्वेरा यांनी ही माहिती दिली. विद्यमान "सीआरझेड' कायदा हा सर्वसामान्य लोकांना सहजपणे समजत नाही. प्रत्येक सरकारी अधिकारी आपल्या सोयीनुसार व्याख्या लावत असल्याने गोंधळ निर्माण होतो. या कायद्याला दुरुस्ती सुचवणाऱ्या आराखड्यात कायद्याची व्याख्या अधिक स्पष्ट करण्यात आली आहे व त्यामुळे तो समजून घेण्यात मदत होईल, असेही श्री. सिक्वेरा म्हणाले. या दुरुस्ती आराखड्याचे कायद्यात रूपांतर झाल्यानंतर "सीआरझेड' कायद्याच्या कात्रीत सापडलेल्या किनारी भागातील लोकांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या आराखड्यात राज्य सरकारला सर्व किनारी भागांचे सर्वेक्षण करून त्यात मच्छीमारांची घरे व व्यावसायिकांशी संबंधित सर्व बांधकामांचा तपशील यांची दखल घेण्याची शिफारस करण्यात आली आहे. "सीआरझेड' कक्षेतील मच्छीमार व इतर पारंपरिक व्यावसायिकांना त्यांच्या घरांची पुनर्बांधणी, दुरुस्ती करण्याची परवानगी देण्याची तरतूद या कायद्यात करण्यात आली आहे. किनाऱ्यांच्या भरती-ओहोटीशी संबंधित पर्यावरणीय दृष्ट्या संवेदनशील भागांचे सर्वेक्षण करून त्यात खास खाजन जमिनींची नोंदणी करण्याची सूचना केली आहे. खाजन शेतीच्या भोवती खारफुटीचे रक्षण व खाजन जमिनीच्या वापराबाबतचा आराखडा तयार करून खाजन शेतीत कोणत्याही विकासकामांना परवानगी न देण्याची शिफारसही करण्यात आली आहे. किनारी भागांतील रेतीचे ढीग, नाले व खाडींचेही सर्वेक्षण करून त्याच्या सभोवताली विकासकामांना परवाना न देण्याचे निर्देश या आराखड्यात देण्यात आले आहेत. मोरजी, गालजीबाग व आगोंद किनारे हे कासव संवर्धन भाग म्हणून घोषित करून वन्यप्राणी संवर्धन कायद्याअंतर्गत या भागांची घोषणा करावी, या भागांच्या व्यवस्थापनासंबंधी निश्चित आराखडा तयार करून तिथे कोणतेही विकासकाम करू नये व ही जागा कासवांसाठी अंडी घालण्यास सुरक्षित ठेवण्याचेही या आराखड्यात सुचवण्यात आले आहे.
दरम्यान, हा आराखडा जनतेच्या सूचना व हरकतींसाठी खुला असून येत्या ३० मेपर्यंत या सूचना केंद्रीय पर्यावरण व वनमंत्रालयाकडे पोहोचणे गरजेचे आहे. गोव्यातील लोकांनी १५ मेपर्यंत आपल्या हरकती व सूचना राज्य पर्यावरण खात्याकडे पाठवल्यास त्या केंद्रीय मंत्रालयापर्यंत पोचवण्यात येतील, असेही यावेळी श्री. सिक्वेरा म्हणाले.

Friday 23 April, 2010

मोदींचा दावा फेटाळला, बैठक ठरल्यावेळीच

मुंबई, दि. २२ : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने २६ एप्रिलला बोलावलेली आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलची बैठक बेकायदेशीर असल्याचा आयपीएलचे कमिशनर ललित मोदी यांनी केलेला दावा मंडळाने स्पष्टपणे फेटाळून लावला असून, बैठक ठरल्याप्रमाणेच होईल, अशी घोषणा केली आहे.
"मंडळाने बोलावलेली बैठक बेकायदेशीर आहे असे मोदी यांचे मत आहे. या बाबतीत प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे', असे नियामक मंडळाचे अध्यक्ष शशांक मनोहर यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले. मंडळाचे सचिव एन. श्रीनिवासन हे आयपीएलचाच एक भाग असल्यामुळे त्यांना अशी बैठक बोलावण्याचा अधिकारच नाही, हा ललित मोदी यांचा दावाही मनोहर यांनी फेटाळून लावला आहे.
श्रीनिवासन आयपीएलचा भाग आहेत किंवा नाही याचा येथे काहीही संबंध नाही. हा मुद्दा जेव्हा चर्चेत आला त्यावेळी श्रीनिवासन यांनी मंडळाचे तत्कालीन अध्यक्ष शरद पवार यांची परवानगी घेतली होती. लिलावात सहभागी होण्यासाठी शरद पवार यांनी परवानगी दिल्यानंतरच श्रीनिवासन हे त्यात सहभागी झाले होते. चेन्नई सुपर किंग्ज संघासाठी श्रीनिवासन यांनी नव्हे तर इंडिया सिमेंटने बोली लावली होती. लिलाव झाल्यानंतर या सगळ्या प्रक्रियेला सर्वसाधारण सभेत मान्यता देण्यात आली होती, असे शशांक मनोहर यांनी पुढे सांगितले.
आयपीएलच्या संघात श्रीनिवासन एक भागीदार असल्याची मंडळाला माहिती होती. मात्र, ललित मोदी आणि त्यांच्या बऱ्याच नातेवाइकांनी आयपीएलच्या संघात गुंतवणूक केल्याबाबत मंडळाला काहीही माहीत नाही. श्रीनिवासन यांचा आयपीएलमधील सहभाग उघड आहे. परंतु मोदी यांनी आपल्या नातेवाइकांविषयीची माहिती गव्हर्निंग काऊन्सिलपुढे जाहीर करायला हवी होती. ही सर्व प्रक्रिया पार पडली त्यावेळी मी काऊन्सिलचा सदस्य नव्हतो, असेही मनोहर यांनी सांगितले.
२६ तारखेला होणाऱ्या बैठकीत आपली हकालपट्टी होण्याची दाट शक्यता असल्याचे मोदी यांच्या लक्षात आल्यामुळे ते काही ना काही कारणामुळे ही बैठक पुढे ढकलण्यात यावी यासाठी प्रयत्नशील असल्याचे दिसत आहे.
----------------------------------------------------------------
आयपीएलमध्ये रुतलेय पवार, पटेल यांचे पाय
पंतप्रधानांनी मागितली माहिती

नवी दिल्ली, दि. २२ : माजी परराष्ट्रमंत्री शशी थरुर यांच्यानंतर केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार आणि केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री प्रफुल्ल पटेल आयपीएलचे बळी ठरणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी आयपीएलमध्ये या दोन्ही नेत्यांच्या सहभागाबाबत माहिती मागितली आहे.
अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी पंतप्रधानांना प्रफुल्ल पटेल आणि त्यांची मुलगी पूर्णा यांच्या आयपीएलमधील कथित सहभागाबाबत माहिती दिली. तसेच शरद पवार यांच्याबाबतही माहिती दिली. त्यावर पंतप्रधान काय निर्णय घेतील? याकडे आत सर्वांचे लक्ष लागले आहे.
प्रफुल्ल पटेल यांच्याबाबत एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, आयपीएलच्या लिलावात बोली काय असू शकेल याविषयीचा अंदाज व्यक्त करणारी एक फाईल आयपीएलचे सीईओ सुंदर रमण यांनी प्रफुल्ल पटेल यांची कन्या व आयपीएलची हॉस्पिटॅलिटी मॅनेजर पूर्णा हिच्याकडे ईमेलद्वारे पाठवली. पूर्णाने ईमेल पटेल यांची सचिव चंपा भारद्वाजकडे तो फॉरवर्ड केला. नंतर चंपाने तो पटेल यांच्या आदेशानुसार परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री शशी थरुर यांना पाठवून दिला. त्याचा अभ्यास करून थरुर यांनी कोचीसाठी आयपीएलची बोली जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याचे बोलले जाते.
दरम्यान, प्रफुल्ल पटेल यांनी आयपीएलमध्ये आपला सहभाग असल्याचे वृत्त फेटाळले आहे. आयपीएलच्या पहिल्या दोन लिलावात आपला काहीही संबंध नव्हता. आपल्या सहभागाविषयी येणारे वृत्त बिनबुडाचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. शशी थरुर आपले चांगले मित्र असून त्यांना आयपीएलसंदर्भात काही माहिती हवी होती म्हणून ललित मोदींशी बोलून ती मागवली होती. तीच थरुर यांना पाठवली. त्यात काहीही आक्षेपार्ह नव्हते, असे पटेल यांनी म्हटले आहे.
प्रणव मुखर्जी यांनी आयपीएलमध्ये शरद पवार यांचे जावई सदानंद सुळे यांच्याबाबत वृत्तपत्रांमध्ये आलेल्या बातम्यांचीही माहिती पंतप्रधानांना दिली. सुळे यांचे दहा टक्के शेअर्स मल्टी स्क्रीन मीडिया या आयपीएलच्याच प्रसारण कंपनीमध्ये आहेत. ते वडिलांकडून त्यांच्याकडे आले आहेत. परंतु, सदानंद यांची पत्नी खासदार सुप्रिया सुळे यांनी मात्र, आयपीएलशी आपल्या कुटुंबाचा संबंध केवळ क्रिकेटप्रेमी म्हणून असल्याचे या आधीच स्पष्ट केले आहे. त्याचवेळी पटेल यांच्या कुटुंबाशी आपला काहीही आर्थिक संबंध नसल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

मंदिरात चोरीप्रकरणी चौघांना अटक

दीड लाखांचा ऐवज हस्तगत
फोंडा, दि.२२ (प्रतिनिधी): माशेल येथील श्री गजांतलक्ष्मी देवालयात झालेल्या चोरी प्रकरणाचा छडा लावण्यात फोंडा पोलिसांना अखेर यश प्राप्त झाले असून या संदर्भात चार जणांना अटक करण्यात आली आहे. संशयितांकडून सुमारे दीड लाख रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.
यासंबंधी मिळालेल्या माहितीनुसार, सुरेश भंडारी (गांधीनगर दावणगिरी), प्रकाश गोसावी (धारवाड), रामू बद्रा गोसावी (धारवाड) आणि सुनील महाबळेश्र्वर रायकर (गांधीचौक धारवाड) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांना सहा दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश येथील प्रथम श्रेणी न्यायालयाने दिले आहेत.
माशेल येथील श्री गजांतलक्ष्मी देवालयात डिसेंबर २००९ मध्ये चोरी झाली होती. चोरट्यांनी देवालयाच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून देवालयात प्रवेश करून सुमारे २ लाख ४७ हजार रुपयांचा ऐवज पळविला होता. या संबंधी देवस्थानतर्फे गजानन साळकर यांनी तक्रार दाखल केलेली आहे. फोंडा पोलिस स्टेशन हद्दीत अनेक देवालयात चोरीच्या घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे पोलिस यंत्रणा चोरट्यांचा छडा लावण्यासाठी प्रयत्न करीत असताना पोलिस हवालदार सावळो नाईक ऊर्फ एम.आर.एफ. याला देवस्थान चोरी प्रकरणातील एक संशयित आरोपी सुरेश भंडारी हा पंडितवाडा अंत्रूजनगर फोंडा येथील झोपडपट्टीत राहत असल्याची माहिती मिळाली. हवालदार सावळो नाईक यांनी सुरेश भंडारी याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. सुरेश याची चौकशी करीत असताना या प्रकरणात अंत्रूजनगर फोंडा येथे राहणारा प्रकाश गोसावी गुंतलेला असल्याचे आढळून आले. पोलिसांनी ताबडतोब प्रकाश गोसावी याला अटक केली. तसेच या प्रकरणात धारवाड येथील रामू गोसावी सहभागी असल्याचे आढळून आल्याने त्यालाही ताब्यात घेण्यात आले. संशयितांनी या देवालयातून चोरण्यात आलेले सामान धारवाड येथील मेसर्स रायकर ज्वेलर्स धारवाड याला विकल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी २१ एप्रिल रोजी सकाळी धारवाड येथील स्थानिक पोलिसांच्या साहाय्याने मेसर्स रायकर ज्वेलर्सच्या दुकानावर छापा घालून चोरीचा ऐवज जप्त केला आणि दुकान मालक सुनील महाबळेश्र्वर रायकर याला या प्रकरणी अटक केली. देवालयातून चोरीस गेलेले दोन चांदीचे हत्ती, दोन चांदीच्या मूर्ती, चांदीच्या दोन छत्र्या, प्रभावळ, चांदीचा कलश, चांदीची थाळी, पेला आदी वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. हस्तगत करण्यात आलेला सर्व ऐवज गजांतलक्ष्मी देवस्थानातून चोरण्यात आला होता, असे पोलिस निरीक्षक मनोज म्हार्दोळकर यांनी सांगितले. या चोरी प्रकरणाचा तपास प्राथमिक पातळीवर असून संशयितांची या भागातील अन्य चोरीच्या प्रकरणात सुद्धा चौकशी केली जात आहे, असेही त्यांनी सांगितले. या चोरीचा छडा लावण्यास हवालदार सावळो नाईक याच्या बरोबरच उपनिरीक्षक लक्षी आमोणकर, कॉन्स्टेबल राजेश नाईक, सतीश पिल्ले, सत्यम मिलापुरे, उदय बोरकर यांनी परिश्रम घेतले. निरीक्षक म्हार्दोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक आमोणकर तपास करीत आहेत.

'हिंदू जनजागृती'ची पणजी भव्य सभा

सभेत घेण्यात आलेले काही ठळक ठराव

शाळा व महाविद्यालय तसेच राष्ट्रीय
कार्यक्रमात "वंदे मातरम्' सक्तीचे करावे.
सर्वोच्च न्यायालयाने फाशी ठोठावलेल्या
महंमद अफझल याला त्वरित फाशी द्यावी.
गोहत्या त्वरित बंद करावी.

'तोवर देवस्थान, घुमट्या अनधिकृत ठरवू नयेत'

पणजी, दि. २२ (प्रतिनिधी): शासनाने देवस्थान व घुमट्या अनधिकृत ठरवताना भाविकांच्या भावनांच्या ठिकऱ्या उडवू नयेत. लोकांना विश्वासात घेतल्याशिवाय एकही देवस्थान किंवा घुमटी अनधिकृत ठरवू नये. जनतेच्या धार्मिक भावना जाणून घेण्यासाठी सरकारने राज्य, जिल्हा व तालुका स्तरांवर तीनही धर्माच्या त्रिसदस्यीय समित्या स्थापन कराव्यात, असा ठराव आज हिंदू जनजागृती समितीतर्फे देवस्थानांच्या संरक्षणासाठी घेण्यात आलेल्या सभेत मांडण्यात आला. यावेळी सभेत उपस्थित असलेल्या धर्मभिमानी हिंदूंनी या ठरावाला पाठिंबा दिला. यावेळी व्यासपीठावर "पतंजली योग'चे गोवा प्रभारी डॉ. सुरज काणेकर, धर्मशक्ती सेनेचे महेश मुळीक, रणरागिणीच्या सौ. शुभा सावंत, शिवसेनेचे माजी राज्य प्रमुख रमेश नाईक व हिंदू जनजागृती समितीचे गोवा राज्य प्रवक्ते जयेश थळी उपस्थित होते. या सभेचे आयोजन शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आले होते.
सरकार कायद्याचा बडगा उभारून मंदिरे मोडायला पाहत आहे. गोव्यात आता सात्त्विकता टिकली आहे ती केवळ या मंदिर आणि घुमट्यांमुळे, असे मत यावेळी धर्मशक्ती सेनेचे महेश मुळीक यांनी व्यक्त केले. हिंदूची मंदिरे मोडणारा अफझल खान सरकारच्या रूपाने पुन्हा अवतरला आहे. त्याने ७० टक्के मंदिरे पाडण्याचे काम पूर्ण केले आहे. तर, २० टक्के काम बाकी आहे. ते २० टक्के पूर्ण होण्यापूर्वी प्रत्येक हिंदूच्या घरातून अफझल खानचा वध करणारे छत्रपती शिवाजी महाराज उभे राहिले पाहिजेत, असे आवेशपूर्ण उद्गार त्यांनी यावेळी काढले. हिंदू भडकला तेव्हा तेव्हा भगवा भडकला आहे असून म्हणून प्रत्येक मंदिरातून धर्म शिक्षण द्यायला पाहिजे, असे श्री. मुळीक म्हणाले.
मुले बिघडलीत म्हणून मुलांना दोष घेऊ नका. त्यांना घडवायला आम्हाला अपयश आले आहे, याचा विचार कारा, असा सल्ला यावेळी "पतंजली योग'चे डॉ. सुरज काणेकर यांनी सभेत बोलताना दिला. २०२० साली भारत जगद्गुरू बनणार आहे. त्यासाठी भारत स्वाभिमान ट्रस्टचे सदस्यत्व प्राप्त करा. यानंतर अशा प्रकारची सभा घ्यावी लागणार नसल्याचे डॉ. काणेकर पुढे म्हणाले.
या देशातील हिंदू हा उपरा झालेला आहे. भक्तीचे सर्व मार्ग हे देवाकडे जातात हे सत्य नसल्याचा दावा यावेळी रमेश नाईक यांनी बोलताना केला. केंद्रातील सरकारने या देशातील लष्कर निष्क्रिय करून टाकले आहे, असा आरोपही त्यांनी यावेळी केला. यावेळी "रणरागिणी'च्या शुभा सावंत यांनी आपले मत व्यक्त केले.
यावेळी जुगाराच्या विरुद्ध लढा देणाऱ्या "मांद्रे सिटीझन फोरम'चे अध्यक्ष सुधीर सावंत, दैनिक सनातन प्रभातचे प्रतिनिधी विवेक पेंडसे, मंदिर संरक्षण समितीचे पदाधिकारी आनंद प्रभुदेसाई, पतंजली योग शिक्षक विश्वास कोरगावकर यांचा यावेळी जाहीर सत्कार करण्यात आला. सभेला मोठ्या संख्येने धर्माभिमानी उपस्थित होते. "वंदे मातरम्'ने सभेची सांगता झाली.

गोव्यात प्रथमच बुबूळ पुनर्रोपण

पणजी, दि. २२ (विशेष प्रतिनिधी): दान असे द्यावे की दिल्यानंतर देणारा गरीब होऊ नये आणि घेणारा श्रीमंत व्हावा. असे एक अनोखे दान प्राप्त झाले ते गोव्यातील ५६ वर्षीय शेतकरी दुळो बेतकीकर यांना. फेब्रुवारी महिन्यात डोळ्यातील विकारामुळे दृष्टिहीन झालेल्या बेतकीकरांना दृष्टीची श्रीमंती विनामूल्य लाभली ती रोटरी क्लब पणजीची नेत्रपेढी आणि वृंदावन इस्पितळ म्हापसा यांच्या सौजन्याने.
गोव्यातील पहिली बुबूळ (कॉर्निया) पुनर्रोपण शस्त्रक्रिया करण्याचा मान या नेत्रपेढीला तसाच इस्पितळाला लाभला हेच विशेष. अशा प्रकारच्या आणखी १० शस्त्रक्रियांचा आर्थिक भार पेलला आहे विजय प्रियोळकर यांनी. या बुबुळाचे दान मदुराईतल्या व्यक्तीकडून रोटरी क्लब पणजीच्या नेत्रपेढीद्वारे आयोजित करण्यात आले जेणेकरून बेतकीकरांच्या निकामी डोळ्याला पुन्हा एकदा प्रकाशाची किरणे दिसू लागली.
आज झालेल्या पत्रकार परिषदेत खुद्द बेतकीकर उपस्थित होते. सद्गतीत आवाजात ते म्हणाले, फेब्रुवारी महिन्यात डोळ्याच्या विकाराने मी त्रस्त झालो. दिसायचे बंद झाले म्हणून गोवा वैद्यकीय महाविद्यालयात गेलो. महिनाभर उपचार झाला पण गुण नाही. मग तेथील एका डॉक्टराने मला मुंबईत पुढील उपचारासाठी जाण्यास सांगितले. मी पडलो गरीब, कसा जाणार? पण आखणी एका डॉक्टराच्या रूपात देव पावला व मला पणजी रोटरी क्लबच्या नेत्रपेढीबद्दल सांगण्यात आले. वृंदावन इस्पितळात एका आठवड्यापूर्वी शस्त्रक्रिया झाली व आता मला दिसू लागले आहे.
या विषयी बोलताना नेत्रपेढीचे अध्यक्ष अविनाश भोसले म्हणाले की, हा एक ऐतिहासिक क्षण आहे. या मरणोत्तर दानामुळे अनेकांच्या जीवनात प्रकाश येऊ शकतो. या विषयी समाजात योग्य ती जागृती झाली पाहिजे. नेत्रपेढीशी संलग्न दोन स्वयंसेवक गोमेकॉत कार्यरत असून ते मृतांच्या नातेवाइकांकडे संपर्क ठेवतील.
गोमेकॉने आम्हाला वेळोवेळी माहिती पुरवली तर अनेकांचे खराब झालेले डोळे पुन्हा सजीव होतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
डॉ. दिगंबर नाईक म्हणाले की, आम्हा सर्वांसाठी हा अतिशय आनंदाचा क्षण आहे. गोव्यात अनेक लोक असे आहेत की ज्यांचे बुबूळ निकामी झाले आहेत. अशा मरणोत्तर दानाने असे लोक पुन्हा एकदा दृष्टीचा आनंद घेऊ शकतील. एखादी व्यक्ती, तरुण किंवा वयोवृद्ध मरण पावल्यावर सहा तासांच्या आत त्याचे बुबूळ काढावे लागते व पुढील चार दिवसात त्याचे पुनर्रोपण करावे लागते. देशातील कुठल्याही राज्यात या दान केलेल्या बुबुळाचा उपयोग केला जाऊ शकतो, हे विशेष.
बौद्ध धर्मातील समर्पण आणि त्यागाच्या शिकवणीमुळे श्रीलंकेतील लोक आपले बुबूळ मरणोत्तर दान करतात, याचे उदाहरण गोवेकरांनी घेतले पाहिजे, असे डॉक्टर म्हणाले. आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी दिलेल्या सहकार्याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला.
हल्लीच प्राध्यापक केळेकर व रोटरीयन महेश राव यांनी केलेल्या मरणोत्तर बुबूळ दानामुळे पुणे येथील चार जणांना पुनश्च दृष्टीचा लाभ झाला. रोटरी क्लब पणजीचे अध्यक्ष सनत पिळगावकर म्हणाले की, गेली दोन वर्षे रोटरी क्लबने या क्षणाची वाट पाहिली आणि अथक परिश्रमाने ही नेत्रपेढी कार्यरत झाली. ७ मार्च २००९ रोजी ही नेत्रपेढी सुरू झाली. समाजातील सर्व थरातील लोकांनी नेत्रपेढीशी संपर्क साधून सोपस्कार पूर्ण करावे, असे आवाहन त्यांनी केले.
नेत्रपेढीबद्दल असलेल्या गैरसमजुती शिक्षित लोकांनी दूर करणे आवश्यक असल्याचे सांगून नेत्रपेढीचे विश्वस्त गौरीश धोंड यांनी सामाजिक संस्थांचे तसेच इतरांचे सहकार्य यासाठी मागितले. नेत्रपेढीचे सचिव अनिल सरदेसाई, विजय प्रियोळकर व इतर मान्यवर यावेळी हजर होते.
------------------------------------------------------------------------------
रोटरी नेत्रपेढीची २४ तास सेवा ९२२५९८९२७२, ०८३२-२२५००२२, २२५००३३, २२५६३९७ या क्रमांकावर उपलब्ध आहे.

राखीव पंचायतीमध्येच महिला सरपंचपदापासून दूर

पणजी, दि. २२ (प्रतिनिधी): तिसवाडी तालुक्यातील सांव - माथाइश (दिवाडी) पंचायतीचे सरपंचपद महिलांसाठी राखीव असतानाही गेली दोन वर्षे या पदावर महिला पंच सदस्यांची निवड रोखून धरली जात असल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. विद्यमान उपसरपंच तुळशीदास कुंडईकर हे सध्या प्रभारी सरपंच म्हणून कायमस्वरूपी काम पाहत आहेत. पंचायत संचालकांकडून आत्तापर्यंत हे रिक्त पद भरण्यासाठी झालेले सर्व प्रयत्न पंचायतीच्या पुरुष पंचसदस्यांकडून हाणून पाडले जातात, अशीही माहिती प्राप्त झाली आहे.
देशात सर्वत्र महिला आरक्षण विधेयकाचा बोलबाला सुरू असताना गोव्यासारख्या सुशिक्षित व प्रगत राज्यात एका पंचायतीत महिला सदस्यांना सरपंचपद भूषविण्यास अशा पद्धतीने आडकाठी आणली जात असल्याचा हा प्रकार राज्यासाठी शरमेचीच गोष्ट ठरली आहे. गेली दोन वर्षे हे पद अशा पद्धतीने रिक्त ठेवून पंचायतीचा कारभार प्रभारी सरपंचाकडून हाकला जात असताना आपल्या प्रशासकीय यंत्रणेकडे मात्र या प्रकारावर काहीही उपाय नसल्याचेच स्पष्ट झाले आहे. पंचायत संचालकांकडून हे रिक्त पद भरण्यासाठी बोलावण्यात येत असलेल्या बैठकीला पंचायतीचे पुरुष पंचसदस्य गैरहजर राहतात व त्यामुळे हे पद भरले जात नाही. या बैठकीला गैरहजर राहणाऱ्या या पंचसदस्यांवर कारवाई करण्याबाबत मात्र पंचायत संचालकांकडून अद्याप कोणत्याच हालचाली होत नसल्याने हा प्रकार पंचायत राज्य कायद्यालाच आव्हान देणारा ठरला आहे.
सात सदस्यीय पंचायतीत दोन महिला पंच सदस्य आहेत. त्यातील एक सदस्य आशा पै यांनी सुरुवातीला सरपंचपद भूषविले. आशा पै यांच्यावर अविश्वास ठराव संमत करून त्यांना हटविण्यात आले. दुसऱ्या महिला पंचसदस्य लुडा एथेड या देखील विरोधी गटातच असल्याने या पदावर त्यांनाही बसण्यास कुंडईकर गटातील इतर पंचसदस्य मज्जाव करीत असल्याची माहिती देण्यात आली. दरम्यान, सरपंच निवडीसाठी बोलावण्यात येणाऱ्या बैठकीला उपसरपंच स्वतः उपस्थित राहतात पण त्यांच्या गटातील इतर चार पुरुष सदस्य मात्र हजर राहत नाहीत. यामुळे महिला सरपंचांची काही केल्या निवड होत नाही. मुळात या गैरहजर राहणाऱ्या पंचसदस्यांवर अशा वागणुकीमुळे काही कारवाई होऊ शकत नाही काय, असा सवाल येथील नागरिक उपस्थित करीत असले तरी पंचायत संचालकही या बाबतीत मौन धारण करून आहेत, अशी तक्रार त्यांनी केली आहे. आता दोन वर्षे झाली तरी या पंचायतीचा कारभार प्रभारी सरपंच चालवत आहेत.
महिलांचे अधिकार व हक्क याबाबत भाषणबाजी करणाऱ्या बिगर सरकारी संस्था, महिला आयोग यांनी आता पुढाकार घेऊन या बाबतीत तोडगा काढण्याची गरज असल्याचे दिवाडी गावातील नागरिकांचे मत आहे. महिलांसाठी सरपंचपद रिक्त असताना केवळ पुरुषांचे बहुमत असल्याने त्यांच्याकडून महिला पंच सदस्यांचा हा अधिकार हिरावून घेतला जाणे ही शरमेची गोष्ट असून अशा पंच सदस्यांना तात्काळ अपात्र ठरवण्यात यावे, अशीही मागणी होत आहे.

Thursday 22 April, 2010

महागाईवर केंद्र सरकार विश्वासघातकी!

दिल्लीतील महारॅलीत भाजपाध्यक्ष गडकरींची धडाडली तोफ
नवी दिल्ली, दि. २१ : "केंद्रातील कॉंग्रेसच्या नेतृत्वातील संपुआच्या सरकारने महागाईच्या मुद्यावर लोकांच्या विश्वासाचा घात केलेला आहे. जेव्हा-जेव्हा कॉंग्रेस केंद्रातील सत्तेत येते, तेव्हा-तेव्हा जीवनावश्यक वस्तूंच्या दरांमध्ये बेसुमार वाढ होते. "आम्ही सत्तेत आलो तर शंभर दिवसांच्या आत महागाईला लगाम घालून दाखवू,'असे आश्वासन पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग आणि कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी दिले होते. कुठे केले ते आश्वासन? महागाईच्या दुष्टचक्रात गरीब आणि सर्वसामान्य माणूस भरडला जात आहे. निद्रेचे सोंग करणाऱ्या या सरकारला जागे करण्यासाठीच आम्ही येथे आलो आहोत,''अशा शब्दांत भाजपाध्यक्ष नितीन गडकरी यांनी आज केंद्र सरकारवर तोफ डागली. महागाईप्रश्नी रामलीला मैदानावर आयोजित केलेल्या "महारॅली'मध्ये उसळलेल्या जनसागराला संबोधित करताना ते बोलत होते. महारॅलीला संबोधित केल्यानंतर गडकरी यांना उन्हामुळे भोवळ आली.
""केंद्रातील संपुआ सरकार सलग दुसऱ्यांदा सत्तेत बसलेले आहे. दुसऱ्या टर्ममध्येही सरकारने वर्षभराचा कालावधी पूर्ण केलेला आहे. मात्र, महागाई कमी करणे तर दूरच; उलट ती वाढतच आहे. यामुळे गरिबांच्या आत्महत्या होत आहेत,''असेही गडकरी यावेळी म्हणाले.
केंद्र सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणांवर प्रहार करताना गडकरी म्हणाले, ""महागाईच्या प्रश्नावर पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्याकडे मी १४ प्रश्न उपस्थित केले होते. परंतु या १४ पैकी एकाही प्रश्नाचे उत्तर देण्यास संपुआ सरकारने तोंड उघडले नाही. का? या ज्वलंत मुद्यावर उत्तर देण्याच्या लायकीचा कॉंग्रेसमध्ये कुणीही उरलेला नाही का? चुकीची आर्थिक धोरणे व खराब प्रशासन यामुळेच महागाईचा मुक्त संचार सुरू आहे,''असे गडकरी यांनी सुनावले. यावेळी भाजपचे असंख्य कार्यकर्ते हातात भाजपचे झेंडे घेऊन उपस्थित होते.
खाद्यान्नाचा साठा वखारींमध्ये भरला जात असल्याचा आरोप करताना गडकरी यांनी, "सरकार साठेबाजीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. हे धान्य नंतर मद्यनिर्मात्यांना स्वत दरात विकले जाऊ शकता येईल, असा या मागचा सरकारचा उद्देश आहे,'असा आरोप केला. गडकरी यांच्यासोबतच या महारॅलीला लोकसभेतील विरोधी पक्ष नेत्या सुषमा स्वराज, राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते अरुण जेटली, पक्षाचे ज्येष्ठ नेते राजनाथसिंग, मुरली मनोहर जोशी आणि लालकृष्ण अडवाणी आदी नेत्यांनीही संबोधित केले.
""सहा वर्षांपूर्वी संपुआ सरकारने पहिल्यांदा सूत्रे हाती घेतल्यापासून अत्यावश्यक वस्तूंच्या दरांमध्ये १०० ते २०० टक्क्यांनी वाढ झालेली आहे. सरकारचे चुकीचे व्यवस्थापन आणि भ्रष्टाचार यामुळे हे घडलेले आहे, ''अशी टीका लालकृष्ण अडवाणी यांनी केली.
""भाजपची ही रॅली खरोखर महारॅली आहे. या रॅलीने भाजपच्या यापूर्वीच्या सर्व रॅलींचे विक्रम मोडीत काढलेले आहेत,''असेही अडवाणी यावेळी म्हणाले.
यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी आग ओकणाऱ्या उन्हात जिवाची तमा न बाळगता संसदेकडे कूच केले. या महारॅलीमुळे मध्य दिल्लीतील वाहतूक व्यवस्था कोलमडली. रिंग रोड, मथुरा रोड, इंडिया गेट, टिळक मार्ग, आसफ अली रोड, नेताजी सुभाष मार्ग, रणजितसिंग मार्ग, टॉलस्टॉय मार्ग, सिकंदर रोड, बाराखंबा रोड, संसद मार्ग आणि अशोक मार्गावरील वाहतूक कोलमडली. महारॅलीमुळे वाहतूक कोलमडण्याची दाट शक्यता लक्षात घेऊन भाजपने, "१० ते ६ या वेळेत वाहतूक जाम झाली तर कृपया थोडी कळ सोसण्याची तयारी असू द्या,' असे आवाहन यापूर्वीच केले होते.

भाजपच्या महारॅलीत अवतरला "लघू भारत'
महागाईविरुद्धच्या भाजपच्या महारॅलीमध्ये देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेले कार्यकर्ते पारंपरिक वेशभूषेमध्ये सहभागी झालेत. विविध रंगांच्या वेशभूषेमुळे रॅलीस्थळाला "लघू भारत'चे स्वरूप आले.
आंध्रातून आलेल्या झांशी राणे हिने मंचाच्या अगदी समोर भाजीचे आणि खान-पानाचे दुकान व्यंगात्मक पद्धतीने थाटले होते. या दुकानामध्ये त्यांनी भाजी आणि खाद्याचे खूपच कमी पदार्थ ठेवले होते. याविषयी राणे यांना छेडले असता, त्या म्हणाल्या,""केंद्र सरकारच्या धोरणांमुळे दुकानांवर खाण्या-पिण्याच्या सामानांची स्थिती अशीच कमी दिसेल. आंध्रातून आलेल्या तेलंगणासमर्थक कार्यकर्त्यांनीही फलक घेऊन रॅलीमध्ये जोरदार नारेबाजी केली. बिहार आणि उत्तरप्रदेशातून आलेल्या कार्यकर्त्यांनीही उत्साहपूर्ण वातावरणात नारेबाजी केली.
------------------------------------------------------------
भाजपचा लोकसभेतून सभात्याग
"महागाईचे संकट हे नैसर्गिक नव्हे; तर संपुआ सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळेच उद्भवलेले आहे. महागाईला लगाम घालण्यात, जीवनावश्यक वस्तूंच्या बेसुमार दरवाढीला आळा घालण्यात सरकार पूर्णत: अपयशी ठरले आहे,' अशा शब्दांमध्ये प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपने लोकसभेत सरकारला खडे बोल सुनावत आज सभात्याग केला.
लोकसभेत विरोधी पक्ष नेत्या सुषमा स्वराज यांनी घणाघाती शब्दांमध्ये सरकारला महागाईच्या मुद्यावर धारेवर धरले. ""महागाईचे संकट सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे ओढवलेले आहे. महागाई हे काही नैसर्गिक संकट नव्हे. सरकारला या संकटाचे निवारण करण्यात अनेकदा प्रयत्न करूनही अपयशच आलेले आहे. महागाईच्या या संकटात मारला जात आहे तो गरीब आणि सामान्य माणूस! संपुआ सरकारच्या या अपयशामुळेच आज राजधानी दिल्लीच्या रस्त्यांवर देशाच्या कानाकोपऱ्यांतून लाखोंच्या संख्येत लोक महागाईच्या मुद्यावरून सरकारचा निद्रानाश करण्यासाठी महारॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत. आता आम्हीही त्यात सहभागी होण्यासाठी बाहेर पडत आहोत,'' असे सुषमा स्वराज यांनी सांगताच लालकृष्ण अडवाणी, गोपीनाथ मुंडे यांच्यासह भाजपच्या सर्व सदस्यांनी सभात्याग केला. सभात्याग करताना भाजप सदस्यांनी महागाईवरून सरकारविरोधी नारेबाजी केली.

मद्यघोटाळ्याची कागदपत्रे द्या

मनोहर पर्रीकर यांना उदीप्त रे यांचे पुन्हा पत्र
पणजी, दि. २१ (प्रतिनिधी): अबकारी खात्यातील कथीत कोट्यवधी रुपयांच्या बेकायदा मद्यार्क आयात घोटाळ्याची चौकशी करणारे वित्त सचिव उदीप्त रे यांनी या घोटाळ्याचा पर्दाफाश करणारे विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांना नव्याने पत्र पाठवून त्यांच्याकडील यासंबंधी दस्तावेज देण्याची मागणी केली आहे. ही चौकशी आपण करावी किंवा "सीबीआय'ने हा निर्णय सरकारने घ्यावयायचा आहे. सभागृहासमोर ही चौकशी आपल्याकडे सोपवण्यात आल्याने ती पूर्ण करणे हे आपले कर्तव्य ठरते. श्री. पर्रीकर यांनी या घोटाळ्याशी संबंधित महत्त्वाची कागदपत्रे सुपूर्द केल्यास चौकशीला मदत होईल, असेही उदीप्त रे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.
आज पर्वरी येथील सचिवालयात उदीप्त रे यांची भेट घेतली असता त्यांनी ही माहिती दिली. या घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर विविध राज्यांतील अबकारी आयुक्तांना सावधगिरीच्या सूचना देण्यात आली आहे. यापुढे गोव्यातील अबकारी आयुक्तालयाशी फॅक्सद्वारे व्यवहार करण्यावर बंदी घालण्यात आल्याचे त्यांनी या राज्यांना कळवले आहे. गोवा अबकारी आयुक्तालयाकडून देण्यात आलेल्या परवान्यांची प्रत्यक्ष पडताळणी केल्यानंतरच मद्यार्काची निर्यात करण्याचीही सूचना या राज्यांना देण्यात आल्याचे ते म्हणाले. मुळात अबकारी खात्यातील सर्व व्यवहार हे अजूनही हस्तलिखित स्वरूपात होतात व त्यामुळे संपूर्ण कार्यालयाचे संगणकीकरण करण्याबाबतही महत्त्वाची बैठक घेण्यात आली आहे. "पीपीपी' पद्धतीवर हा प्रकल्प राबवून या व्यवहारांची हाताळणी एका स्वतंत्र कंपनीतर्फे होईल व व्यवहारांच्या अनुषंगाने त्यांना शुल्क दिले जाईल, अशी माहितीही यावेळी उदीप्त रे यांनी दिली.
अबकारी आयुक्त संदीप जॅकीस यांनी या घोटाळ्याबाबत झालेल्या आरोपांच्या बचावार्थ आपला खुलासा सादर केला आहे व तो तपासण्याचे काम सुरू झाल्याचे ते म्हणाले. संपूर्ण वर्षाचे व्यवहार तपासावे लागणार असल्याने त्याला काही अवधी लागणार आहे. अबकारी कार्यालयातील फॅक्स मशीनचा गैरवापर झाल्याप्रकरणी फौजदारी तक्रार पणजी पोलिस स्थानकात नोंद करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.
दरम्यान, यापूर्वी उदीप्त रे यांनी ९ मार्च २०१० रोजी विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांना पत्र पाठवून त्यांनी विधानसभेत या घोटाळ्यासंबंधी बोलताना नमूद केलेली कागदपत्रे सादर करण्याची विनंती केली होती. या पत्राला श्री. पर्रीकर यांनी २५ मार्च २०१० रोजी उत्तर दिले होते. आपल्याकडील या घोटाळ्यासंदर्भातील कागदपत्रे ही अत्यंत महत्त्वाची आहेत व या चौकशीत ती महत्त्वाची भूमिका बजावतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता. या घोटाळ्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून बड्या राजकीय नेत्यांचाही हात आहे व या घोटाळ्याची व्याप्ती आंतरराज्य असल्याने याची प्रशासकीय पातळीवर चौकशी करून काहीही उपयोग होणार नाही. हे प्रकरण "सीबीआय'कडे सोपवावे लागेल, अशी मागणी त्यांनी या पत्रात केली होती. वित्त सचिव या नात्याने उदीप्त रे यांनी राज्याचे हित लक्षात घेऊन हे प्रकरण "सीबीआय'कडे सुपूर्द करावे, अशी विनंती करून श्री. पर्रीकर यांनी ही कागदपत्रे सुपूर्द करण्यास असहमती दर्शवली होती.
विरोधी पक्षनेत्यांच्या या पत्राला उद्देशून उदीप्त रे यांनी आता नव्याने पत्र पाठवले आहे व त्यांच्याकडील या प्रकरणातील महत्त्वाच्या कागदपत्रांची मागणी केली आहे. जोपर्यंत त्यांच्याकडील कागदपत्रे मिळत नाहीत तोपर्यंत ही चौकशी योग्य पद्धतीने होण्यास मदत होणार नाही, अशी माहितीही त्यांनी दिली.

१.७ लाखांचा चरस हरमल येथून जप्त

पणजी, दि. २१ (प्रतिनिधी): हरमल पेडणे येथील बॉम्बे बार ऍंड फॅमिली रेस्टॉरंटजवळ छापा टाकून दोघा व्यक्तींकडून सुमारे १ लाख ७० हजार रुपयांचा चरस जप्त करण्यात आल्याची माहिती अमलीपदार्थ विरोधी पथकाने दिली. काल रात्री ११.१५ वाजता हा छापा टाकण्यात आला. यात आंतोमारीयन फेलिक्स डिसोझा (२४, गिरकरवाडो हरमल) व बिपलब सरकार (३४, कोलकाता) या दोघांनाही अटक करण्यात आली आहे. अमलीपदार्थ विरोधी कायदा कलम २०(ब)(ii) नुसार अटक केली असून उद्या सकाळी त्यांना पोलिस कोठडी मिळवण्यासाठी न्यायालयात हजर केले जाणार आहे.
दोन तरुण हरमल येथील बॉम्बे बार ऍंड फॅमिली रेस्टॉरंटच्या समोर अमलीपदार्थ विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती या पथकाला मिळाली होती. दोघे तरुण त्याठिकाणी आले असता त्यांची झडती घेण्यात आली. यात आंतोमारीयन याच्याकडे ५२० ग्रॅम चरस, तर बिपलब याच्याकडे ५५० ग्रॅम चरस आढळून आला. हा चरस जप्त करून दोघांनाही ताब्यात घेण्यात आले.
अमलीपदार्थ विरोधी पथकाचे अधीक्षक वेनू बंसल व उपअधीक्षक नरेश म्हामल यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सीताकांत नायक व सुनील गुडलर यांनी कारवाई केली. या छाप्यात पोलिस शिपाई महाबळेश्वर सावंत, इर्षाद वाटांगी, देवानंद परब यांची समावेश होता. अधिक तपास उपनिरीक्षक नायक करीत आहेत.

ती बैठक बेकायदा, ललित मोदींचा दावा

मुंबई, दि. २१ : मी चूक केलेली नाही, राजीनामा देणार नाही, अशी आक्रमक भूमिका घेणारे आयपीएल अध्यक्ष ललित मोदी यांनी बीसीसीआयने २६ रोजी बोलावलेली आयपीएलच्या गव्हर्निंग काऊन्सिलची बैठक बेकायदा असल्याचा दावा केला आहे. बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांना आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलची बैठक बोलावण्याचा अधिकार नाही, असे सांगून मोदी यांनी या बैठकीला उपस्थित राहण्यास नकार दिला आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सरचिटणीस एस.श्रीनिवास यांनी २६ एप्रिल रोजी आयपीएलच्या गव्हर्निग काऊन्सिलची बैठक बोलविली आहे. परंतु श्रीनिवास यांना ही बैठक बोलविण्याचे अधिकार नसल्याची भूमिका ललित मोदी यांनी घेतली आहे. या बाबत ई-मेल त्यांनी गव्हर्निंग काऊन्सिलच्या सदस्यांना केला आहे.
बीसीसीआयच्या सूत्रांनी मोदी येवो अथवा न येवो बैठक निर्धारित तारखेला पार पडणार असल्याचे सांगितले आहे तर आयपीएल अध्यक्ष या नात्याने मला माझी बाजू मांडण्याची संधी बीसीसीआयने द्यायला हवी. त्यासाठी मला पुरेसा वेळ द्यायला हवा, असेही मोदी यांनी म्हटले आहे. २६ तारखेच्या बैठकीत बाजू मांडण्यासाठी आपण तयार नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

'हा तर सर्वोच्च न्यायालय आदेशाचा अवमान'

० नेत्रावळी खनिज उत्खनन प्रकरणी शेतकरी संघटनेचा दावा ०
मडगाव, दि. २१ (प्रतिनिधी): नेत्रावळी अभयारण्य क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात खनिज उत्खनन होत असून तेथील खनिज भाटी गावात आणले जात असल्याच्या आपल्या आरोपाचा पुनरुच्चार करताना "गोंयच्या शेतकाऱ्यांचो एकवट' या संघटनेने या प्रकरणात वनखात्याने केलेला खुलासा संपूर्णतः खोटा व दिशाभूल करणारा असल्याचा दावा केला आहे. वनखाते म्हणते त्या प्रमाणे जरी ती खासगी मालमत्ता असली तरी तेथे बेकायदा खनिज वाहतूक होते हे त्या खात्याने मान्य केल्यासारखे झाले आहे. तसे झाले तर सर्वोच्च न्यायालयाचा तो अवमान ठरणार आहे, असे संघटनेने स्पष्ट केले आहे.
खनिज वाहतूक होत असलेला भाग अभयारण्य क्षेत्रांत येत नाही तर ती खासगी मालमत्ता असल्याचा जो खुलासा वनखात्याने केला आहे त्याबाबत एकवटने आश्चर्य व्यक्त केले आहे. या भागातील खाणी बेकायदा असल्याचा दावा करताना खाण खात्याच्या अधिकाऱ्यांनी तेथील यंत्रसामग्री या पूर्वीच "सील' केल्याचे त्यांनी सांगितले.
या प्रकरणात खाणखाते सोडून वनखाते खुलाशासाठी पुढे आल्याने सर्वांच्या भुवया उंचावलेल्या असून कोणाच्या सांगण्यावरून वनखात्याने हा उत्साह दाखवला आहे असा सवाल केला जात आहे. या प्रकरणात उघडकीस आलेली दुसरी बाब म्हणजे खाणीसाठी झालेल्या प्रचंड वृक्षतोडीबाबत आजवर अनेकदा लोकांनी आवाज उठवूनही त्याची विशेष दखल न घेतलेले वनखाते नेत्रावळीतील खनिज व्यवहार प्रकरणात पोटतिडकीने पुढे येण्याचे कारण कोणते आहे, याचा शोध सध्या घेतला जात आहे.
वनखात्याच्या खुलाशानुसार जरी ती खासगी मालमत्ता असली तरी तेथून २०० ते ३०० मीटरवर अभयारण्य क्षेत्र सुरू होते. शिवाय या मालमत्तेच्या दोन्ही बाजूंना वनखात्याची मालमत्ता असून मध्ये चिंचोळी खासगी पट्टी आहे. असे असताना त्याच खात्याने यावर पांघरूण घालण्याचा प्रक ार करावा, यातच सर्व काही येते असेही एकवटने म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाने अभयारण्य क्षेत्रातील सर्व खाणींवर बंदी घातलेली असताना नेत्रावळी अभयारण्य परिसरात हा प्रकार चालावा, अभयारण्याला ज्याने संरक्षण द्यावयाचे व हितरक्षण करावयाचे त्याच वनखात्याकडून खाणींच्या उपक्रमांना संरक्षण देण्याचा प्रकार घडावा याबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला. अभयारण्य क्षेत्रापासून १०० मीटरवर खनिज व्यवहार चालले तर त्याचा वन्य जीवनांवर थेट परिणाम होणार व त्यातून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे सरळ उल्लंघन होणार असल्याने ही बाब सर्वोच्च न्यायालयाच्या लक्षांत आणून देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

गोमेकॉमधील मुली 'पुरवणारे' सक्रिय

पणजी, दि. २१ (प्रतिनिधी): गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील (गोमेकॉ) मुली "पुरवण्या'चे आमिष दाखवून पर्यटकांना हजारो रुपयांना लुटणारी टोळी पुन्हा एकदा सक्रिय झाली असून गुंटूर हैदराबाद येथील तरुणांच्या एका गटाला साडेआठ हजार रुपयात लुबाडण्यात आल्याची घटना घडली आहे.
आज दुपारी सुमारे १२ वाजता या तरुणांना मुली "पुरवण्या'चे आश्वासन देऊन थेट गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळातील "एक्स रे' विभाग तसेच कॅन्टिमध्ये नेण्यात आले. तेथून जाणाऱ्या दोघा तरुणींच्या दिशेने बोट दाखवत त्यांना तुमच्याबरोबर पाठवले जाणार असल्याचे सांगण्यात आले. परंतु, त्यापूर्वी साठे आठ हजार रुपये द्यावे लागतील, असे सांगण्यात आले. गोमेकॉत असलेल्या "एटीएम'मधून काढलेले पैसे घेतल्यावर ते घेऊन संशयित मुलींना घेऊन येत असल्याचे सांगत इस्पितळात घुसले ते परतलेच नाही. तासनतास वाट पाहूनही कोणीच न आल्याने फसवणूक झाल्याची जाणीव त्या तरुणांना झाली. यावेळी दिलेल्या पैशांवर पाणी सोडून पोलिसांत तक्रार न करताच परतणे त्यांनी पसंत केले.
अधिक माहितीनुसार दोन दिवसांपूर्वी एका गट गोव्यात फिरण्यासाठी आला होता. काल दुपारी हा गट जुने गोवे येथे गेला असता गाइड असलेल्या एका तरुणाने त्यांना वैद्यकीय महाविद्यालयातील तरुणी पुरवल्या जातील, असे सांगून आपला मोबाईल क्रमांकही दिला. तसेच, उद्या संपर्क साधा असेही त्यांना सांगण्यात आले. त्यानुसार आज सकाळी त्या तथाकथित गाइडला दूरध्वनीवरून संपर्क साधण्यात आला. त्याने त्यांना बांबोळी येथील इस्पितळात भेटण्यासाठी बोलावले आणि मुली पुरवण्याच्या बतावणीने हजारो रुपयांना लुबाडले. काही महिन्यापूर्वी अशाच प्रकारे पर्यटकांना लुटणाऱ्या टोळीला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. परंतु काही मोठ्या धेंडांच्या आशीर्वादाने ही टोळी पुन्हा एकदा सक्रिय झाली आहे. याच व्यवसायातून लाखो रुपये कमावले जात असून तुरुंगात असलेला अश्पाक बेंग्रे याचाही या व्यवसायात सहभाग असल्याचे पोलिस तपासात उघड झाले होते.

मुलीला अश्लील सीडी दिल्याने लाखाचा दंड

पणजी, दि. २१ (प्रतिनिधी): अल्पवयीन मुलीला अश्लील सीडी पाहण्यासाठी दिल्याचा आरोप सिद्ध झाल्याने मनोहर गंवडळकर (४५) याला बाल न्यायालयाने दोषी ठरवून एक लाख रुपयाचा दंड ठोठावला. दंडाची रक्कम भरण्यास आरोपीला अपयश आल्यास एका महिना कारावासाची शिक्षा, रक्कम जमा केल्यास ती पिडीत मुलीला देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
सदर तक्रारदाराने उसने घेतलेले पैसे द्यावे लागत असल्यानेच खोटी तक्रार करून फसवण्याचा प्रयत्न केला असल्याचा युक्तिवाद यावेळी आरोपीच्या वकिलाने न्यायालयात केला. कोणतीही आई आपल्या मुलीचे नाव उघड करून खोटी तक्रार देणार नसल्याचा सरकारी वकील पूनम भरणे यांचा मुद्दा यावेळी उचलून धरण्यात आला. तसेच, आरोपीने अल्पवयीन मुलीला अश्लील सीडी पाहण्यासाठी दिल्याचे न्यायालयात स्पष्ट झाल्याने त्याला दोषी धरून शिक्षा ठोठावण्यात आली.
आरोपी मनोहर हा तक्रारदाराच्या ओळखीचा असल्याने त्यांच्या घरी त्याची ये-जा असायची. दि. १८ जुलै ०६ रोजी तक्रारदाराच्या घरी कोणी नसल्याचे पाहून आरोपी त्यांच्या घरी आला. यावेळी त्याने घरातील अल्पवयीन मुलीला संगणकावर पाहण्यासाठी सीडी दिली. त्यामुळे मोठी बहीण आल्यानंतर त्या दोघींनी ती संगणकावर पाहण्यासाठी लावली. त्यात अश्लील दृश्ये असल्याचे आढळून आल्याने त्यांनी आपल्या आईला सीडी दिली व आरोपीने ती आम्हाला पाहण्यासाठी दिल्याचे सांगितले. त्यामुळे दुसऱ्या दिवशी आरोपीच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली. यानंतर आरोपीला पुन्हा त्यांच्या घरी येण्याबाबत खडसावण्यात आले. तरीही त्याने दूरध्वनी करून धमकी देण्यास सुरुवात केल्याने महिला पोलिस स्थानकात तक्रार करण्यात आली व ती अश्लील सीडी देण्यात आली. न्यायालयात आरोपीच्या विरोधात भक्कम पुरावे सादर केल्याने त्याला दोषी ठरवून दंड ठोठावण्यात आला. या प्रकरणाचा तपास तत्कालीन डिचोली पोलिस स्थानकाचे पोलिस निरीक्षक नीलेश राणे व महिला पोलिस स्थानकाच्या निरीक्षक नूतन वेर्णेकर यांनी केला होता.

पुंडलिक नायक यांना 'गोमंत शारदा' जाहीर

पणजी, दि. २१ : कला अकादमीचा अत्यंत प्रतिष्ठेचा असा "गोमंत शारदा' पुरस्कार प्रख्यात गोमंतकीय साहित्यिक पुंडलिक नायक यांना जाहीर करण्यात आला आहे. कला अकादमीचे अध्यक्ष प्रतापसिंह राणे यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या बैठकीत सदर निर्णय घेण्यात आला. एक लाख रुपये रोख, मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप असून तो लवकरच एका खास समारंभात प्रदान करण्यात येणार आहे.
शिक्षणतज्ज्ञ व ज्येष्ठ साहित्यिक माधव कामत, डॉ. सोमनाथ कोमरपंत आणि कला अकादमीचे सदस्य सचिव डॉ. पांडुरंग फळदेसाई हे अंतिम निवड समितीचे अन्य सदस्य आहेत. तत्पूर्वी, अग्रणी साहित्यिक संस्था, समीक्षक, साहित्यिक आणि विवेकी वाचक यांनी केलेल्या शिफारशीमधून पुंडलिक नायक यांची एकमताने निवड करण्यात आली.
पुंडलिक नायक यांनी १९७२ पासून अविरतपणे साहित्य निर्मितीचे काम केले आहे. नाटक, कथा, कविता, कादंबरी, एकांकिका, नभोनाट्य आणि बालसाहित्य हे सर्व प्रकार त्यांनी समर्थपणे हाताळले आहेत. कला अकादमी, कोकणी अकादमी तसेच कोकणी भाषा मंडळाचे पुरस्कार त्यांच्या साहित्यकृतींना प्राप्त झालेले आहेत. गा आमी राखणे, पिशांतर, मुठ्य, अर्धूक हे कवितासंग्रह, बांबर, वसंतोत्सव, दायज, नवलकाणी व अच्छैव या कादंबरी, खण खण माती, रक्तखेव, राखण, सुरींग, सुर्यवाट, देमांद, मुक्तताय, शबय शबय भौजनसमाज, पिंपळ पेटला, श्रीविचित्राची जत्रा, दायज, चैतन्याक मठ ना ही नाटके, गावधनी गावकार, चौरंग, दिगंत हे एकांकिका संग्रह अशी विपुल साहित्यसंपदा त्यांच्या नावावर आहे.
कला अकादमीचे उपाध्यक्ष परेश जोशी आणि सदस्य सचिव डॉ. पांडुरंग फळदेसाई यांनी पुंडलिक नायक यांची भेट घेऊन त्यांना गोमंत शारदा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

Wednesday 21 April, 2010

ललित मोदींच्या पाठीशी फारूख, शिल्पा, मल्ल्या

नवी दिल्ली, दि. २० : आयपीएलचे आयुक्त ललित मोदी यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांना उत्तर देण्यासाठी त्यांना संधी देण्यात यावी, असे मत मोदी यांची पाठराखण करताना केंद्रीय मंत्री फारूख अब्दुल्ला यांनी आज व्यक्त केले. ललित मोदींची बाजू ऐकल्याशिवाय त्यांना शिक्षा करण्याचा आपल्याला हक्क नाही. त्यांच्यावर जर आरोप केले जात आहेत तर त्या आरोपांना उत्तर देण्याची संधी त्यांना निश्चित दिली जावी, असे अब्दुल्ला संसदेबाहेर पत्रकारांशी बोलताना म्हणाले. आयपीएलचे सर्वेसर्वा असलेल्या मोदींना राजस्थान रॉयलची मालक शिल्पा शेट्टी तसेच बेंगलोर रॉयल चॅलेंजर्सचे डॉ. विजय मल्ल्या यांनी यापूर्वीच पाठिंबा जाहीर केला आहे. दरम्यान, आयपीएलच्या गव्हर्निंग काऊन्सिलची बैठक २६ एप्रिल रोजी होणार असून त्यात ललित मोदी यांच्यासंदर्भात सर्वसंमतीने अंतिम निर्णय घेतला जाईल, अशी घोषणा बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे.
ललित मोदींवर आयपीएल वादासंदर्भात जे आरोप केले जात आहेत, त्याकडे बघता मोदींनी राजीनामा द्यावा का, असे विचारले असता आयपीएलच्या गव्हर्निंग काऊन्सिलचे सदस्य असलेल्या फारूख अब्दुल्ला यांनी त्यांना एक संधी देण्यात यावी, अशी मागणी केली. आयपीएलमधील चुका लपविण्याचा बीसीसीआय प्रयत्न करीत आहे का, असे विचारता फारूख म्हणाले, कोणीही काहीही लपवीत नाही. येत्या २६ एप्रिल रोजी आयपीएलच्या गव्हर्निंग काऊन्सिलची बैठक होत असून त्यात सर्व बाबी स्पष्ट होतील. जर कुणाला जावयाचे असेल तर २६ च्या बैठकीत आम्हाला ते समजेल.
डॉ. विजय मल्ल्या यांनीही मोदी यांची बाजू घेताना त्यांनी आयपीएलमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याचे सांगितले. जर त्यांनी आयपीएलमध्ये कोणतेच चुकीचे काम केले नाही तर त्यांनी राजीनामा देण्याचा प्रश्नच येत नसल्याचे ते म्हणाले.
आयपीएल भारतातच नव्हे तर विदेशातही यशस्वी झाले आहे. याचे श्रेय केवळ मोदी यांनाच जात असल्याचे राजस्थान रॉयल्सच्या शिल्पा शेट्टीने म्हटले आहे. आयपीएलच्या यशामागे मोदी असून आपण त्यांच्या पाठीशी असल्याचे संकेत तिने दिले. संभाव्य पुणे संघाचे मालक आणि सहाराचे सुब्रतो रॉय यांनीही मोदी यांनी प्रशंसनीय कामगिरी केल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, आयपीएलचा वाद व त्यासंदर्भात आयकर खात्याकडून सुरू असलेली छापा मोहीम या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी, गृहमंत्री पी. चिदंबरम व कृषी मंत्री शरद पवार यांच्यात आज येथे एक महत्त्वपूर्ण बैठक झाली. आयपीएल कोची संघाच्या बोलीवरून निर्माण झालेल्या वादानंतर केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री शशी थरूर यांनी राजीनामा दिला असून आज त्यांनी लोकसभेत निवेदन करून आपली बाजू मांडली. थरूर यांच्या या निवेदनानंतर लगेचच संसद सभागृहात असलेल्या अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांच्या चेंबरमध्ये उपरोक्त नेत्यांत जवळपास २० मिनिटे बैठक चालली. या बैठकीत कोणत्या मुद्यांवर चर्चा झाली हे लगेचच कळू शकलेले नसले तरी आयपीएलशी संबंधित जो वाद निर्माण झाला आहे, त्यावरच चर्चा झाली असावी.
पवारांच्या घरी महत्त्वपूर्ण बैठक
तांत्रिकदृष्ट्या आपला आयपीएलशी काही संबंध नाही तसेच आयपीएल समितीचा मी सदस्यही नाही, असा दावा करणाऱ्या शरद पवार यांच्या दिल्लीतील बंगल्यावर आज सकाळी महत्त्वपूर्ण बैठक होऊन त्यात खलबते झाली. त्याच सुमारास खा. सुप्रिया सुळे, पवारांचे जावई सदानंद सुळे, नागरी विमान वाहतूक मंत्री प्रफुल्ल पटेल व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनीही प्रसिद्धी माध्यमांना आमचा आयपीएलशी काही एक संबंध नाही, असे सांगावयास सुरुवात केली.
दरम्यान, बीसीसीआयचे अध्यक्ष शशांक मनोहर आज नागपूरहून येथे आले व त्यांनी शरद पवार यांच्याशी एकू णच आयपीएल प्रकरणावर सविस्तर चर्चा केली. या बैठकीनंतर पवार पत्रकारांशी बोलत होते. ललित मोदींना राजीनामा द्यावा लागेल का, असे विचारले असता पवार म्हणाले, यासंदर्भात आयपीएलची गव्हर्निंग काऊन्सिलच काय तो निर्णय घेईल. सदस्यांच्या मूलभूत अधिकारांत ढवळाढवळ करण्यात शरद पवार वा शशांक मनोहर यांना रस नाही. मंडळाने नेहमीच सामूहिक व सर्वसंमतीने निर्णय घेतलेले आहेत. मग ललित मोदी आयपीएलच्या गव्हर्निंग काऊन्सिलचा निर्णय मान्य करतील का, असे विचारले असता पवार म्हणाले, ललित मोदी हे बीसीसीआयचे उपाध्यक्ष आहेत हे विसरू नका. ललित मोदींसह आम्ही सर्वांनी नेहमीच सामूहिक व सर्वसंमतीने निर्णय घेतलेले आहेत.
मुंबईत होणाऱ्या गव्हर्निंग काऊन्सिलच्या बैठकीत मोदींनाही आमंत्रित करण्यात यावे, असे शशांक मनोहर यांनी सुचविले आहे, असे पवार यांनी सांगितले.

महागाईविरोधात दिल्लीत आज भाजपचा मेळावा

१० लाख कार्यकर्ते अपेक्षित
नवी दिल्ली, २० : भारतीय जनता पक्षाने उद्या राजधानीत आयोजिलेल्या महागाईविरोधी मेळाव्यासाठी काही लाख लोक रात्रीपर्यंत येथे दाखल झाले आहेत.
येथील रामलीला मैदानावर आयोजिलेल्या या मेळाव्यास किमान १० लाख लोक येतील, असा दावा पक्षाकडून केला जात आहे. देशभरातून ८ हजार बसेस व राज्याराज्यातून विशेष रेल्वेगाड्यांमधून भाजप कार्यकर्ते व समर्थकांचे दिल्लीत पोहोचणे सुरू झाले आहे.
रामलीला मैदानावर सकाळी १० वा सुरू होणारा हा मेळावा दुपारी २ पर्यंत चालेल असे समजते. या मेळाव्यास पक्षनेते सर्वश्री लालकृष्ण अडवाणी, पक्षाध्यक्ष नितीन गडकरी, लोकसभेतील नेत्या श्रीमती सुषमा स्वराज, राज्यसभेतील नेते अरुण जेटली, माजी अध्यक्ष राजनाथसिंग, व्यंकय्या नायडू, डॉ. मुरलीमनोहर जोशी हे नेते संबोधित करतील.
भारतीय जनता पक्षातर्फे या मेळाव्याची व्यापक व्यवस्था केली जात असून, यासाठी पक्षाने एक नियंत्रणकक्ष स्थापन केला आहे. मेळाव्याला येणाऱ्यांसाठी पिण्याचे पाणी, वैद्यकीय सोयी याकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे. पुरानी दिल्ली रेल्वेस्थानक, नवी दिल्ली रेल्वेस्थानक व निझामुद्दीन या तिन्ही प्रमुख रेल्वेस्थानकांपासून रामलीला मैदानाकडे जाण्याचा मार्ग ठरविण्यात आला आहे. मेळाव्यासाठी देशभरातून येणाऱ्या बसेस दिल्लीच्या सीमेवरच अडविल्या जातील, अशी भीती भाजपानेत्यांना वाटत आहे. त्याचप्रमाणे विशेष रेल्वे गाड्याही १२-१२ तासांच्या विलंबाने सोडण्याच्या तक्रारी आल्या असल्याचे पक्षाचे सरचिटणीस अनंतकुमार यांनी सांगितले.
भाजपच्या प्रत्येक खासदारालाही मेळाव्यासाठी येणाऱ्यांची व्यवस्था करण्याचे एक विशिष्ट लक्ष्य देण्यात आले आहे. बहुतेक खासदार आज मेळाव्याच्या तयारीत व्यस्त दिसून येत होते.
रामलीला मैदानावरून संसदेकडे कूच करण्याचा कार्यक्रम पक्षाने ठरविला आहे. मात्र, त्यापूर्वीच रामलीला मैदानावर वा संसदभवन मार्गावर पक्षाच्या नेत्यांना अडविले जाईल, असे समजते.
दिल्ली पोलिसांनीही या मेळाव्यासाठी व्यापक सुरक्षा बंदोबस्त केला आहे. वाहतूक पोलिसांनी काही भागातील वाहतूक नियंत्रित करण्याचा निर्णय घेतला आहे. या मेळाव्यामुळे उद्या राजधानीतील जनजीवन विस्कळीत होईल, असे मानले जाते.

सरकारी परिचारिका, डॉक्टरांची 'एक्स्ट्रा ऑर्डिनरी' विदेशवारी

पणजी, दि. २० (प्रीतेश देसाई): युरोप, अमेरिका व आखाती देशात नोकरी करून गब्बर होण्याचे स्वप्न आता "सामान्य' गोमंतकीयांपुरते मर्यादित राहिलेले नाही. हॉटेल व्यवस्थापन किंवा तत्सम शिक्षण घेऊन विदेशाची वाट धरणाऱ्यांच्या यादीत आता सरकारी परिचारिका आणि डॉक्टरांची भर पडल्याचे दिसून येत आहे. सरकारी सेवेत अनुक्रमे वार्षिक ४ ते ५ लाख कमाई करणारे डॉक्टर व २ लाखांच्या आसपास कमाई करणाऱ्या परिचारिका त्यांना मिळणाऱ्या "एक्स्ट्रा ऑर्डिनरी' सुटीचा फायदा घेत खासगी इस्पितळ किंवा विदेशात काम करून प्रतिमहिना दीड ते दोन लाख रुपयांची कमाई करण्यास प्राधान्य देत असल्याची माहिती मिळाली आहे.
शासकीय इस्पितळात परिचारिकांना जे मानधन मिळते, त्याच्या तुलनेत अधिक मानधन त्यांना विदेशात प्राप्त होत असल्याने या "एक्स्ट्रा ऑर्डिनरी' युक्तीचा आधार घेतला जात आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना ६ वर्षे सुटी घेण्याची सुविधा असल्याने या माध्यमातून स्थानिक दुधासोबत विदेशातील मलई खाण्याची संधी घेतली जात असल्याची माहिती मिळाली आहे. आपल्या "एक्स्ट्रा ऑर्डिनरी' सुविधेचा फायदा घेत, ६ वर्षांच्या सुट्टीचा लाभ परिचारिकांद्वारे उचलला जातो. प्रत्येकी दोन वर्षांची रजा घेतल्यामुळे आपली शासकीय व विदेशातील बिगर सरकारी नोकरीही टिकवून ठेवली जाते. त्यांच्या नावांची नोंद शासकीय इस्पितळांमध्ये पूर्वीच करण्यात आलेली असल्याने ती जागा अन्य कुणालाही दिली जात नाही. त्यामुळे खऱ्या गरजू व प्रामाणिक परिचारिकांना केवळ "कंत्राटी पद्धती'वर काम करावे लागते.
भारताची लोकसंख्या जगाच्या १७ टक्के असली तरी राष्ट्रीय स्तरावर सहा लाख डॉक्टर्स, दोन लाख दंतचिकित्सक आणि १२ लाख परिचारिकांची कमतरता आहे. गोव्याबाबत बोलायचे झाले तर ग्रामीण भागातील शासकीय इस्पितळांमध्ये २०० परिचारिका व ८५ डॉक्टर्सची आवश्यकता आहे, अशी माहिती प्राप्त झाली आहे. परंतु, विविध वैद्यकीय महाविद्यालयांमधून पदवी-पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्यांचे प्रमाण वाढले असले तरी त्यातील ९० टक्के डॉक्टर शहरी भागातच काम करणे पसंत करतात. मुळात सरकारी इस्पितळांमध्ये डॉक्टरांना मिळणारा पगार ३० ते ३५ हजारांच्या घरात असतो. जर खासगी क्लिनिक असेल, तर त्यांच्या कमाईचा केवळ विचारच केलेला बरा! कारण प्रत्येक डॉक्टरची फी ही कमीत कमी १०० रु. पासून सुरू होते. त्यात डॉक्टरचा "हातगुण' जितका चांगला तितकी त्याच्या रुग्णांची संख्या अधिक! या स्पर्धेमुळे कोणी सरकारी इस्पितळात नोकरी करण्यासच तयार होत नाही. यातच "एक्स्ट्रा ऑर्डिनरी' सुविधेचा लाभ घेऊन ६ वर्षे खासगी इस्पितळ, खासगी क्लिनिक किंवा विदेशवारी केल्यास डॉक्टरांची कमाई काय असेल याचा विचार न केलेला बरा.
शहरी भागात वैद्यकीय सुविधा उपलब्ध असल्याने उच्च राहणीमान असलेल्या गोमंतकीयांना याचा विशेष परिणाम जाणवत नाही. परंतु, याचा सर्वाधिक फटका बसतो तो ग्रामीण भागातील जनतेला. मुळातच अपुऱ्या साधन सुविधांचा शाप भोगत असलेल्या ग्रामीण जनतेला, आरोग्यासाठीही डॉक्टर्स व परिचारिकांच्या "पदस्पर्श'वर अवलंबून राहवे लागते, याहून वेगळी वैद्यकीय क्षेत्राची शोकांतिका ती काय?

जुगार पेडण्याची नव्हे, गांधी मार्केटची परंपरा!

क्रीडामंत्र्यांच्या जुगारप्रेमाचा पेडणेवासीयांकडून समाचार
पणजी, दि. २० (प्रतिनिधी): पंचायत तथा क्रीडामंत्री बाबू आजगावकर हे मडगावच्या गांधी मार्केटचे नव्हे तर पेडणे तालुक्यातील धारगळ मतदारसंघाचे नेतृत्व करीत आहेत याचे भान त्यांना कदाचित नसावे. जुगार ही पेडण्यातील जत्रोत्सवांची परंपरा कदापि नव्हती व नाही. जुगार ही कदाचित गांधी मार्केटची परंपरा असू शकते, पेडणेवासीयांच्या परंपरेबाबत बोलताना बाबू आजगावकर यांनी अशा पद्धतीने आपल्या अज्ञानाचे जाहीर प्रदर्शन मांडू नये, असा सल्ला देत बाबूंच्या आक्षेपार्ह वक्तव्याचा आज पेडणेवासीयांनी तीव्र शब्दांत समाचार घेतला.
बाबू आजगावकर यांच्या या वक्तव्यामुळे आज संपूर्ण तालुक्यातीलच जनता ढवळून निघाली. जुगार समर्थकांकडून मात्र त्यांच्या या वक्तव्याचे जोरदार स्वागत करण्यात आले. बाबू आजगावकर यांनी आपणच खरे जुगारवाल्यांचे आश्रयदाते आहोत व पेडण्यातील जुगार हा त्यांच्याच मदतीने फोफावला आहे हे देखील या निमित्ताने उघड झाल्याचाही आरोप आता होतो आहे. "मांद्रे सिटीझन फोरम'ने या प्रकरणी राज्यपाल डॉ. एस. एस. सिद्धू यांची भेट घेऊन त्यांना या प्रकरणी निवेदन सादर करण्याची तयारी केली आहे. मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी क्रीडामंत्र्यांच्या या वक्तव्याची गंभीर दखल घेऊन त्यांना योग्य समज देण्याचीही गरज असल्याचे फोरमने म्हटले आहे. फोरमच्या कार्याचे कौतुक करण्याचे सोडून जुगाराचे समर्थन करून बाबू आजगावकर यांनी जुगारविरोधी चळवळीची फजिती केली आहे. पेडण्यातील बेकार युवकांच्या प्रश्नावरून विधानसभेत आदळआपट करणारे पंचायतमंत्री तालुक्यातील युवकांना हीच शिकवण देणार आहेत काय, असा संतप्त सवाल तोरसे येथील माजी पंच विलास शेट्ये यांनी उपस्थित केला आहे.
मांद्रे सिटीझन फोरमने सुरू केलेल्या या लढ्याला आता तालुक्यातील सर्व समविचारी लोकांनी पाठिंबा देण्याची गरज आहे, असे सांगून हा लढा केवळ फोमपुरती मर्यादित न राहता पेडण्यातील तमाम युवकांनी व बुद्धिवादी लोकांनी मौन सोडून उघडपणे जुगार हद्दपार करण्यासाठी पुढे येण्याची गरज असल्याचेही श्री. शेट्ये म्हणाले. बाबू आजगावकर यांना पेडणेवासीयांनी जवळ केले याची परतफेड त्यांनी जुगार ही पेडण्याची परंपरा आहे, असे वक्तव्य करून करावी यासारखी दुर्दैवी गोष्ट नाही. धारगळ मतदारसंघात राष्ट्रीय क्रीडास्पर्धा होणार आहेत. तिथेही जुगाराचे पट भरवून ही पेडण्याची परंपरा आहे, असे सांगण्यासही ते कमी राहणार नाहीत, अशी खिल्लीही यावेळी अनेकांनी उडवली. फोरमचे अध्यक्ष सुदेश सावंत यांनी पेडणे पोलिसांकडून सुरू असलेल्या जुगार विरोधी मोहिमेचे जोरदार स्वागत केले. पेडणे पोलिस जुगार बंद करीत आहेत ही चांगली गोष्ट आहे; पण हा जुगार फोरमच्या तक्रारीवरून बंद करीत असल्याचे ते सांगत असल्याने फोरमच्या कार्यकर्त्यांना लक्ष्य बनवण्याचे प्रकार सुरू झाल्याचेही श्री. सावंत म्हणाले. गैरकृत्यांबाबत माहिती देणाऱ्यांचे रक्षण करणे ही पोलिसांची जबाबदारी असते पण इथे पोलिस जागरूक नागरिकांनाच जुगारवाल्यांच्या हवाली करून नेमके काय साध्य करू पाहत आहेत, हेच कळत नसल्याचेही ते म्हणाले.
एका जबाबदार मंत्र्याकडून अशा पद्धतीने जाहीरपणे जुगाराचे समर्थन केले जाणे ही गोवा सरकारच्या दृष्टीने अत्यंत शरमेची व लाजिरवाणी गोष्ट आहे, अशी प्रतिक्रिया फोरमचे प्रवक्ते ऍड. प्रसाद शहापूरकर यांनी व्यक्त केली. जुगार ही बेकायदा गोष्ट आहे व त्याला संपूर्ण गोव्यात कुठेच थारा मिळता कामा नये. बाबू आजगावकर हे सरकारात मंत्री आहेत व त्यामुळे जुगार बंद करणे ही त्यांचीही जबाबदारी ठरते. सत्तरी, डिचोली, बार्देश आदी ठिकाणी उघडपणे जुगार चालतो असे वक्तव्य करून बाबू आजगावकर यांनी त्या ठिकाणच्या पोलिस खात्याचे वाभाडेच काढले आहेत. जर ही गोष्ट खरी आहे तर गृहमंत्री रवी नाईक यांनी त्या ठिकाणच्या पोलिस निरीक्षकांवर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणीही ऍड.शहापूरकर यांनी केली.

तोतया डॉक्टरने केली हॉस्पिसियोत 'हातसफाई'

मडगाव, दि. २०(प्रतिनिधी): डॉक्टर असल्याची बतावणी करून महिला वॉर्डात जाऊन महिला रुग्णांच्या अंगावरील दागिने लंपास करणारा भामटा मडगावात पोचला असून आज त्याने येथील हॉस्पिसियो इस्पितळातील एका बाळंतिणीच्या गळ्यातून साधारण साठ हजाराचे मंगळसूत्र घेऊन पलायन केले. यामुळे तेथे घबराट माजली आहे. यापूर्वी असाच प्रकार बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात घडला होता.
आज सायंकाळी ६.३० च्या सुमारास डॉक्टरचा वेष परिधान केलेली सदर व्यक्ती अन्य दोघांसमवेत हॉस्पिसियोतील महिला चिकित्सा वॉर्डात शिरली. या वॉर्डाला भिडून प्रसूती विभाग आहे. सदर व्यक्तीने महिला वॉर्डातील रुग्णांवर नजर फिरविली व मग ती प्रसूती विभागात गेली व तेथील रुग्णांची पाहणी केली. नंतर तेथील सविता वेळीप या बाळंतिणीची तपासणी केल्याचे नाटक करून तिला इंजेक्शन देण्याच्या बहाण्याने तिच्या गळ्यातील मंगळसूत्र काढले. एवढ्यात तेथे परिचारिका आल्याचे पाहून त्या व्यक्तीने मागच्या दारातून पळ काढला. तोपर्यंत सविता हिला वास्तवाची जाणीव झाली व तिने घडला प्रकार सांगतात परिचारिकेने वरिष्ठांना माहिती दिली व पोलिसांना कळविले गेले. पोलिस दाखल होईपर्यंत सदर भामटे गायब झाले होते. पोलिस पुढील तपास करत आहेत.

आता अमिताभही खोर्जुवेवासी!

पणजी, दि. २० : चित्रसृष्टीत "सणकू' म्हणून "प्रसिद्ध' असलेल्या नाना पाटेकर याच्यापाठोपाठ आता सुपरस्टार अमिताभ बच्चन आणि त्याचा सुपुत्र अभिषेक व सून ऐश्वर्या बच्चन यांनाही "गोवेकर' होण्याचे वेध लागले आहेत. त्यादृष्टीने गेल्या आठवड्यात किमान दोन ते तीन वेळा बच्चन कुटुंबीयांनी खोर्जुवे बेटाला भेट देऊन तेथील एका आलिशान घरकुलाची पाहणी केली. पोर्तुगीज स्थापत्य शैलीचा अप्रतिम नमुना असलेले हे आलिशान निवासस्थान बच्चन कुटुंबीयांच्या मनात चांगलेच भरल्याचे सांगण्यात येते. खोर्जुव्यातील निसर्गरम्य डोंगरावर बांधण्यात आलेल्या या बंगल्यात सर्व अत्याधुनिक सुविधा हात जोडून उभ्या आहेतच; शिवाय निळ्याशार पाण्याचा स्विमिंग पूलही उपलब्ध आहे. हे आलिशान घर पर्यटकांचे आकर्षण ठरलेल्या केबल स्टे हळदोणे-खोर्जुवे पुलापासून जवळच आहे.
मुळातच गोवा आणि अमिताभ हे समीकरण १९८० च्या दशकातच रुढ झाले आहे. तेव्हा "पुकार' या चित्रपटाच्या निमित्ताने "बिग बी'चा मुक्काम अनेक महिने गोव्यातच होता. त्यापूर्वी मेहमूदच्या "बॉंबे टू गोवा' या चित्रपटाने तिकीटबारीवर उत्तम यश संपादले व केवळ एका बसमध्ये चित्रीकरण करण्यात आलेल्या या चित्रपटाने अमिताभला झकास ब्रेक दिला होता. त्यात अरुणा इराणी त्याची नायिका होती. अमिताभ तेव्हाच गोवेकरांच्या आणि गोमंतभूमीच्या प्रेमात पडला. परशुरामाच्या या भूमीत आपली स्वतःची वास्तू असावी, असे स्वप्न "बिग बी'ने तेव्हापासून पाहिले होते. तथापि, नंतरच्या काळात त्याला याची फारशी आठवण उरली नाही. सध्या अमिताभ व अभिषेक "दम मारो दम' या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी काणकोणात तळ ठोकून आहेत. येथील निसर्गसंपदा व सौंदर्यावर अभिषेक भलताच लुब्ध झाला आहे. त्यामुळे तोही गोव्यात आपले "हॉलिडे होम' असावे या कल्पनेने थरारला आहे. जेव्हा बच्चन पितापुत्रांनी खोर्जुव्यातील त्या आलिशान बंगल्याची पाहणी केली तेव्हा तेथे उपस्थित असलेल्यांचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासच बसला नाही. सध्या एक काश्मीरी व्यक्ती खोर्जुव्यातील त्या बंगल्याची मालक आहे. कोणी सांगावे, भविष्यात कदाचित तेथे बच्चन कुटुंबीय वावरताना दिसून येईल. तसे झाले तर खोर्जुवेवासीयांची कॉलर ताठ होईल यात शंका नाही!

... तर मोपाला तीव्र विरोध

नुकसानभरपाईच्या विषयावरून शेतकरी आक्रमक
पेडणे, दि. २० (प्रतिनिधी): मोपा येथील नियोजित विमानतळ आज होणार, उद्या होणार असे सांगून आमच्या जमिनी १० वर्षांपूर्वी सरकारने ताब्यात घेतल्या, यामुळे माळरानावर शेतीव्यवसाय करता आला नाही. शेतीव्यवसायापासून परावृत्त केल्याने सरकारने आता १० वर्षांसाठीची नुकसानभरपाई द्यावी, अशी जोरदार मागणी मोपा येथील शेतकऱ्यांनी केली.
नियोजित मोप विमानतळासाठी ज्या जमीन मालकांच्या जमिनी सरकार घेणार आहे त्यांना अगोदर निश्चित दर द्यावा तसेच १० वर्षांची नुकसानी द्यावी, अन्यथा जमिनी देण्यास तीव्र विरोध केला जाईल, असा इशारा मोपाचे सरपंच प्रमोद परब यांच्यासह जमीन मालकांनी दिला. यात जयप्रकाश परब, विष्णू नाईक गावकर, नारायण दत्ताराम परब, हरी राऊळ, गणपत मोपकर, गजानन नाईक, नंदकिशोर नाईक, उत्तम राऊत, दयानंद परब, वसंत मोपकर, आनंद मोपकर, सीताबाई रामा मोपकर, विलास पालव, अनिता नागेश राऊळ, भाग्यश्री राऊळ, सखाराम गावकर, रामा राऊळ, गंगाराम राऊळ, महादेव परब, राजन पेडणेकर, महादेव राऊळ व नकुल राऊळ या जमीनमालकांचा समावेश होता.
मोप विमानतळ विशेष भूसंपादन अधिकारी एम. के. वस्त यांनी आज (२० रोजी) मोप येथील श्री वेताळ मंदिरात शेतकऱ्यांची व इतर संबंधित जमीनमालकांची बैठक आयोजित केली होती. यावेळी श्री. वस्त यांनी विमानतळासाठी ज्यांच्या जमिनी संपादित केल्या जाणार आहेत त्यातील काही सर्व्हेमध्ये १० पेक्षा जास्त भाटकार व कूळ आहेत, असे सांगितले. यातील प्रत्येकाचा हिस्सा किती आहे याची माहिती देण्याची मागणी त्यांनी केली असता शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला.
शेतकरी, जमीनमालकांच्या मागण्या पूर्ण केल्याशिवाय आणि जमिनीला योग्य दर मिळाल्याशिवाय जमिनी देणार नाही, अशा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी श्री. वस्त यांनी सदर मागण्या विमानतळ प्राधिकरणाच्या बैठकीवेळी मांडण्याचे आश्वासन दिले.
मोप विमानतळाला स्थानिकांचा वाढता विरोध लक्षात घेऊन सरकारने जमीनमालकांच्या मागण्या पूर्ण कराव्या व त्यांना योग्य किंमत द्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. तसेच पालकमंत्री बाबू आजगावकर यांच्यासोबत एक बैठक आयोजित करून त्यांच्यापुढे मागण्या मांडण्याचे निश्चित करण्यात आले. पालकमंत्र्यांनी मागण्या मान्य न केल्यास विमानतळाला विरोध करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
वारंवार नोटिसा पाठवून शेतकऱ्यांना त्रास देण्यापलीकडे सरकारने काहीही केलेले नाही. सरकार विमानतळ उभारणार की निव्वळ थापा मारणार? मागण्या मान्य होत नाही तर विमानतळ नकोच असा इशारा सरपंच प्रमोद नाईक यांनी दिला.
मोप विमानतळासाठी एकूण ८९ लाख चौ.मी. जागा संपादित केली जाणार आहे. या विमानतळासाठी सर्वप्रथम मोपावासीयांनीच हिरवा कंदील दाखवला होता, पण शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर याबाबत फेरविचार करावा लागेल, असा इशारा यावेळी देण्यात आला.

Tuesday 20 April, 2010

मनु शर्माच्या जन्मठेपेवर सुप्रीम कोर्टाचे शिक्कामोर्तब

जेसिका लाल हत्या प्रकरण
नवी दिल्ली, दि. १९ - १९९९ मध्ये एका रेस्टॉरन्टमध्ये मॉडेल जेसिका लालची हत्या केल्याप्रकरणी कॉंग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री विनोद शर्मा यांचा मुलगा मनु शर्मा याला दोषी ठरवून ठोठावण्यात आलेल्या जन्मठेपेच्या शिक्षेवर आज सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आहे.
मनु शर्मा हा हत्येच्यावेळी त्याठिकाणी उपस्थित होता, हे सरकारी वकिलांनी स्पष्टपणे सिद्ध केले आहे आणि त्यामुळे याबाबत शंका घेण्यास आता कुठलाही वाव नसल्याने मनु शर्माची जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवण्यात येत आहे, असे न्या. पी. सथसिवम आणि न्या.स्वतंत्रकुमार यांच्या खंडपीठाने आपल्या निर्णयात म्हटले आहे.
या हत्याप्रकरणातील पुरावे नष्ट केल्याच्या आरोपाखाली उत्तरप्रदेशातील एक वादग्रस्त राजकीय नेते डी. पी. यादव यांचा मुलगा विकास यादव आणि अमरजितसिंग गिल यांना ठोठावण्यात आलेली चार वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षाही न्यायालयाने कायम ठेवली आहे. या सगळ्यांना पुराव्याअभावी निर्दोष ठरविण्याचा सत्र न्यायालयाचा निर्णय रद्दबादल ठरविताना दिल्ली उच्च न्यायालयाने खात्रीलायक आणि पुरेशी कारणं दिली आहेत, असेही खंडपीठाने आपल्या निर्णयात स्पष्ट केले आहे.

"जत्रोत्सवातील जुगार ही जुनी परंपरा'

जुगाराला पंचायत मंत्र्यांचे जाहीर समर्थन

पणजी, दि. १९ (प्रतिनिधी)- पेडणे तालुक्यात जत्रोत्सवातील जुगार ही पूर्वापार चालत आलेली परंपरा आहे. जुगाराशिवाय जत्रोत्सवाला कुणीही लोक येत नाहीत व देवस्थान समित्यांनाही काही प्राप्ती होत नाही, त्यामुळे जत्रोत्सवातील जुगार बंद करू देणार नाही, असे खळबळजनक वक्तव्य पंचायत तथा क्रीडामंत्री मनोहर ऊर्फ बाबू आजगांवकर यांनी करून एका नव्या वादाला तोंड फोडले आहे. सार्वजनिक ठिकाणी चालणाऱ्या जुगाराचे जाहीरपणे समर्थन करताना डिचोली, सत्तरी, बार्देश आदी ठिकाणी सर्रासपणे जुगार चालतो, मग पेडणे तालुक्यातच तो का नसावा, असे विधान करून जुगार बंदीच्या पोलिसांच्या दाव्यालाच त्यांनी आव्हान दिले आहे.
हरमल येथे क्रिकेट स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाला बोलताना बाबू आजगांवकर यांनी जुगाराबाबतची ही मुक्ताफळे उधळली. विशेष म्हणजे या कार्यक्रमाच्या निमित्ताने पेडणेचे पोलिस निरीक्षक उत्तम राऊत देसाई यांनी केलेल्या कामगिरीबाबत त्यांचा जाहीर सत्कारही करण्यात आला. चोरी, खून प्रकरणांचा छडा लावण्याबरोबर जुगार बंदीचे काम केल्याबद्दल त्यांचा सत्कार होत असल्याचे गौरवोद्गारही बाबू यांनीच यावेळी काढले.
"मांद्रे सिटीझन फोरम' तर्फे पेडणे तालुक्यातील सार्वजनिक व विशेष करून धार्मिक उत्सवांना सुरू असलेल्या जुगाराविरोधात सध्या जोरदार जागृती मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेला सर्वत्र उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असतानाच बाबू आजगांवकर यांच्या वादग्रस्त भाषणामुळे या मोहिमेला एकप्रकारची खीळच बसली आहे. हरमल येथील या कार्यक्रमाला स्थानिक आमदार तथा भाजप प्रदेशाध्यक्ष प्रा.लक्ष्मीकांत पार्सेकर देखील हजर होते. तालुक्याचे पालकमंत्री, स्थानिक आमदार तथा विरोधी भाजपचे आमदार व पोलिस निरीक्षक यांना एकत्रित आणून जुगार बंदीवर तोडगा काढण्याचा प्रयत्न या कार्यक्रमाच्या निमित्ताने जुगार समर्थकांनी केला व बाबू आजगांवकर यांनी जाहीरपणे जुगाराचे समर्थन करून त्यांचा हेतू साध्य करून दिला,असेही स्थानिक ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
गोवा राज्य जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार जुगारावर बंदी आहे पण सरकारचा एक जबाबदार मंत्रीच अशा पद्धतीने जुगाराचे जाहीरपणे समर्थन करीत असल्याने आपल्याच राज्यातील कायद्यांचे उल्लंघन सदर मंत्री करीत असल्याची टीका फोरमने केली आहे. बाबू आजगांवकर यांच्या या वक्तव्यामुळे संपूर्ण तालुक्यातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. मडगावच्या गांधी मार्केटचे नेतृत्व करणाऱ्या बाबू आजगांवकर यांना पेडणेतही गांधी मार्केट सुरू करण्याचा विचार आहे की काय, असा संतप्त सवालही उपस्थित करण्यात आला आहे. बेकायदा व अवैध्य प्रकारांचे समर्थन करणारे बाबू आजगांवकर हे लोकांचे प्रतिनिधित्व करण्यास अपात्र आहेत. मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी त्यांना तात्काळ पदच्युत करावे, अशीही मागणी होत आहे. जुगाराला राजाश्रय मिळवून देण्याची बाबू आजगांवकर यांची कृती समाजासाठी घातकच आहे. बाबू आजगांवकर यांच्या या वक्तव्यामुळे जुगारसमर्थकांना एकप्रकारे चेव चढणार आहे व त्यामुळे त्यांच्याकडून जुगाराला विरोध करणाऱ्यांना काही बाधा पोहचल्यास त्याला पूर्णतः बाबू आजगांवकर जबाबदार असतील, अशी घोषणाही फोरमने केली आहे.
पेडणेचे निरीक्षक उत्तम राऊत देसाई यांच्या कामगिरीबाबत कुणालाही दुमत नाही पण त्यांनी पेडण्यातील जुगाराला दिलेली मोकळी वाट यामुळेच ते टीकेचे लक्ष्य बनले आहेत. जुगारविरोधी मोहिमेमुळे त्यांना जुगारावर कारवाई करणे भाग पडले. पण खुद्द पोलिसांच्या हजेरीत जुगाराला सरकारचा पाठिंबा आहे, असे वक्तव्य सरकारतीलच एका मंत्र्यांकडून केले जाणे ही लोकशाहीचीच थट्टा आहे व अशा लोकांना निवडून दिलेल्या लोकांचाही अपमान आहे, अशी प्रतिक्रियाही उमटली आहे.

३५० धार्मिक स्थळे पाडण्याचे कटकारस्थान

"हिंदू जनजागृती'ने फुंकलेरणशिंग..

पणजीत २२ रोजी खास सभा

पणजी, दि. १९ (प्रतिनिधी) - महामार्ग उभारण्याच्या नावाखाली सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा फायदा उठवत कॉंग्रेस सरकारने राज्यातील मंदिरे आणि घुमट्या अशी सुमारे ३५० धार्मिक स्थळे पाडण्याचे कटकारस्थान आखले असून त्याविरोधात येत्या २२ एप्रिल रोजी पणजीच्या आझाद मैदानावर हिंदू जनजागृती समितीनेखास सभेचे आयोजन केले आहे.
सायंकाळी ५.१५ वाजता ही सभा होणार असून राज्यातील देवस्थान समित्यांच्या पदाधिकाऱ्यांनी आणि भक्तगणांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन समितीचे प्रवक्ते जयेश थळी यांनी आज येथे केले. ते पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलते होते. यावेळी त्यांच्याबरोबर पर्वरी व तिसवाडी देवस्थान सुरक्षा समितीचे अध्यक्ष राजकुमार देसाई, चंद्रकांत गावस व आनंद प्रभुदेसाई उपस्थित होते.
राज्य सरकारने १५ मे पर्यंत या धार्मिक स्थळांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे २२ रोजी होणाऱ्या या सभेत पुढील दिशा ठरवली जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
गोवा ही मंदिरांची भूमी म्हणून ओळखली जाते. त्याची या सरकारने "मदिराभूमी' केली आहे. सार्कोडा येथील महादेव मंदिर आणि फार्तोडा येथील दामोदर मंदिरही या सरकारने अनधिकृत ठरवले आहे. या ३५० पैकी ७० पेक्षा जास्त मंदिरे पुरातन आहेत. पोर्तुगीजांच्या अत्याचारापासून आमच्या पूर्वजांनी ही मंदिरे वाचवून त्यांचा वारसा आमच्यापर्यंत पोहोचवला आहे. शेकडो वर्षांचा संपन्न इतिहास सांगणारी ही मंदिरे पाडण्यासाठी हे सरकार पुढे सरसावले आहे,' असा आरोप जयेश थळी यांनी केला.
सरकारने सरसकट मंदिरे किंवा घुमट्या न मोडता प्रत्येक देवस्थान समितीला विश्वासात घेऊन निर्णय घ्यावा, अशी सूचना यावेळी करण्यात आली. आतापर्यंत सरकारने कोणत्याही देवस्थान समितीला विश्वासात घेतलेले नाही, अशी माहिती थळी यांनी दिली. मंदिरे ही लोकांची श्रद्धास्थाने आहेत. लोकांनी घुमट्या उगाच बांधलेल्या नाहीत. त्यामागे अनेकांचा श्रद्धाभाव आहे. त्यामुळे सरकारने देवस्थान समित्यांना विश्वासात न घेतल्यास प्रकरण चिघळू शकते, असे मत राजकुमार देसाई यांनी व्यक्त केले. यावेळी चंद्रकांत गावस व आनंद प्रभुदेसाई यांनीही आपले मत व्यक्त केले.

महागाईविरोधी भाजप मोर्चासाठी ६०० कार्यकर्ते दिल्लीला रवाना

वास्को, दि. १९ (प्रतिनिधी)- गेल्या दोन महिन्यांपासून महागाई विरुद्ध आयोजित आंदोलनानंतर आज गोव्यातून ६०० भाजप कार्यकर्ते दिल्ली येथे २१ एप्रिल रोजी संसदेवरील मोर्चात भाग घेण्यासाठी रवाना झाले. संपूर्ण भारताबरोबरच गोव्यातही जीवनावश्यक वस्तूंच्या दरात आभाळाला टेकणारी अशी वाढ झाल्यामुळे येथील सुमारे २ लाख जनतेने भाजपच्या आंदोलनाला पाठिंबा देत निवेदनावर सह्या केल्या असून मोर्च्यानंतर इतर राज्यांबरोबरच गोव्याचेही निवेदन राष्ट्रपतींना देण्यात येणार आहे.
कॉंग्रेस सरकार अस्तित्वात आल्यानंतर देशभरात जीवनावश्यक वस्तूंच्या दरात आभाळाला टेकणारी अशी वाढ झाल्याने राष्ट्रीय भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी याच्या विरुद्ध आवाज उठवण्यासाठी गेल्या दोन महिन्यापासून आंदोलन सुरू केले आहे. याचाच भाग म्हणून २१ एप्रिल रोजी दिल्ली येथे संसदेवर देशभरातून सर्वच राज्यांतून भाजप कार्यकर्ते मोर्चा नेणार आहेत. इतर राज्यांबरोबरच गोव्यातील कार्यकर्त्यांनीही या आंदोलनात मोठ्या प्रमाणात भाग घेतलेला असून दिल्ली येथे होणाऱ्या मोर्चात सहभागी होण्यासाठी आज गोव्यातून ६०० भाजप कार्यकर्ते (गोव्याच्या वेगवेगळ्या भागांतून) रेलमार्गे दिल्ली जाण्यास रवाना झाले. सदर कार्यकर्त्यांबरोबर प्रदेशाध्यक्ष व आमदार लक्ष्मीकांत पार्सेकर, भाजप सरचिटणीस ऍंड. नरेंद्र सावईकर हे नेते आज निघाले असून उद्या गोव्यातील इतर नेते दिल्लीला जाणार असल्याची माहिती ऍंड. सावईकर यांनी यावेळी दिली. आज पहाटे मडगावहून निघालेल्या मंगला एक्सप्रेस व दुपारी वास्कोहून निघालेल्या गोवा एक्सप्रेस अशा दोन रेल्वेतून सदर भाजप कार्यकर्ते दिल्ली जाण्यास रवाना झाले असून भाववाढीविरुद्धच्या या आंदोलनाला पूर्ण यश मिळेल, अशी खात्री वास्कोहून निघालेल्या कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केली. पक्षप्रवक्ते राजेंद्र आर्लेकर यांनी आज कार्यकर्त्यांना वास्को रेल्वे स्थानकावर निरोप दिला. गोव्याहून निघालेल्या ६०० भाजप कार्यकर्त्यांपैकी २०० महिला असल्याची माहिती राजेंद्र आर्लेकर यांनी पत्रकारांना दिली. दिल्ली येथे होणाऱ्या मोर्च्यात देशभरातून पाच लाखांहून भाजप कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. आज दुपारी वास्को रेल्वे स्थानकावरून निघालेल्या रेल्वेतून दक्षिण गोवा भाजप उपाध्यक्ष दिगंबर आमोणकर, मुरगावचे माजी नगराध्यक्ष व वास्को भाजप मंडळ अध्यक्ष दीपक नाईक, प्रशांत नार्वेकर, स्वप्निल बांदोडकर, लवू नार्वेकर, शोभा नाईक आदी भाजप कार्यकर्त्यांचा समावेश होता.

Monday 19 April, 2010

अखेर शशी थरूर यांचा राजीनामा

कोची टीम लिलांव महागात पडला!

नवी दिल्ली, दि. १८ - आयपीएलमध्ये कोची संघाच्या समावेशाबद्दल अधिक रस घेतल्याने वादग्रस्त ठरलेले परराष्ट्र राज्यमंत्री शशी थरूर यांच्यासंदर्भात आज झालेल्या कॉंग्रेस कोअर समितीच्या बैठकीत थरूर यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्याचा निर्णय घेण्यात आला, त्यानुसार रात्री पंतप्रधानांनी त्यांना राजीनामा देण्याचा सल्ला दिला.उशिरा मिळालेल्या वृत्तानुसार थरूर यांनी दिलेला राजीनामा मंजुरीसाठी राष्ट्रपतींना सुपूर्द करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार आजच्या बैठकीत केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आणि कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी आपण केलेल्या चौकशीचा अहवाल दिला. त्यात कोची संघाच्या लिलावांबाबत थरूर यांनी जादा रस घेतल्याचे व त्यासंबंधातील आर्थिक व्यवहाराशी आपला संबंध नसल्याचे पटवून देण्यात ते अयशस्वी ठरल्याचे म्हटले आहे.
शशी थरूर यांनी आज सकाळी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची भेट घेऊन आपली बाजू स्पष्ट केली होती. थरूर प्रकरण सध्या कॉंग्रेसच्या अंगलट आले आहे. थरूर यांच्या राजीनाम्यासाठी राजकीय पक्षांचा दबाव सतत वाढत होता. कॉंग्रेस पक्षातूनही या विषयावर मतभेद असल्याचे लक्षात आले.काही कॉंग्रेस नेत्यांनाही सतत नवा वाद निर्माण करणारे थरूर मंत्रिमंडळात नको होते. या प्रकरणी गांभीर्याने विचार करण्यासाठी कॉंग्रेसच्या बैठकी सातत्याने सुरू होत्या.
कॉंग्रेस कोर ग्रुपच्या होणाऱ्या बैठकीपूर्वीच आज थरूर यांनी पंतप्रधानांना भेटून आपली बाजू मांडली. पंतप्रधान नुकतेच दोन देशांच्या दौऱ्याहून परतले आहेत. परतल्यानंतर आपण याविषयी निर्णय घेऊ, असे त्यांनी अमेरिकेत असतानाच जाहीर केले होते.
या पार्श्वभूमीवर आज सकाळी थरूर यांनी तातडीने पंतप्रधानांची घेतलेली भेट अतिशय महत्त्वपूर्ण मानली जात होती. तब्बल ४५ मिनिटे चाललेल्या या बैठकीनंतर थरूर पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरे न देताच निघून गेले. मात्र, काही प्रसार माध्यम प्रतिनिधींनी जास्तच आग्रह केल्याने थरूर यांनी, पंतप्रधानांनी मागितला तर राजीनामा देणार, असे स्पष्ट केले. याहून अधिक मात्र ते काहीही बोलले नाहीत.
आता प्रवर्तन निदेशनालयाचा ससेमिरा
कोची संघाच्या मालकीच्या वादानंतर आयकर खात्याच्या जाळ्यात अडकलेल्या आयपीएलची आता प्रवर्तन निदेशालय सखोल चौकशी करणार आहे. आयपीएलने संघांचा केलेला लिलाव आणि त्यानंतर करण्यात आलेल्या करारांसंबंधी आयपीएलचे सर्वेसर्वा ललित मोदी यांच्या कार्यालयातून आयकर खात्यातर्फे जप्त करण्यात आलेल्या कागदपत्रांची प्रवर्तन निदेशालय तपासणी करणार आहे. संघांच्या मालकांमध्ये असणाऱ्या विदेशी गुंतवणूकदारांना या चौकशीत विशेष लक्ष्य करण्यात येणार आहे, असे निदेशालयाच्या सूत्रांनी सांगितले आहे.
प्रवर्तन निदेशालय हे अर्थमंत्रालयाचाच एक भाग असून परदेशी चलनासंबंधीच्या कायद्याचे उल्लंघन आणि बेकायदेशीर आर्थिक व्यवहारांवर या विभागाचे लक्ष असते. आयपीएलच्या कागदपत्रांमध्ये यासंबंधीच्या कायद्याचे उल्लंघन झाले असल्याचे निदर्शनास आल्यास त्याची सखोल चौकशी करण्यात येईल, असे निदेशालयाच्या सूत्रांनी सांगितले आहे.
आयकर विभागाने केलेल्या चौकशीतून जी काही माहिती समोर आली आहे ती प्रवर्तन निदेशालयाला कळविण्यात यावी असे खात्याने आयकर विभागाला सांगितले आहे. आयकर विभागाच्या मुंबईतील विशेष तपास पथकाने केलेल्या कारवाईचा अहवाल याआधीच अर्थमंत्रालयाकडे पाठविला आहे.

"इफ्फी २००४' चे सर्व निर्णय एकमताने व पारदर्शी - मुख्यमंत्री

पर्रीकरांच्या विरोधात सीबीआय तक्रारीतील फोलपणा स्पष्ट

पणजी, दि. १८ (प्रतिनिधी) - पहिल्या "इफ्फी'वेळी २००४ साली कुठल्याही गोष्टीवर अंतिम निर्णय घेण्यापूर्वी विशेष समिती त्यावर पूरक चर्चा करत असे व अंतिम निर्णय होण्यापूर्वी त्यावर यथायोग्य ऊहापोह होऊन मगच तो निर्णय योग्य असल्याचे आढळून आल्यास सर्वानुमते त्याला संमती दिली जात असे, असे मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. मुख्यमंत्र्यांच्या या महत्त्वपूर्ण निवेदनामुळे विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांच्याविरोधातील सीबीआयच्या तक्रारीतील फोलपणाच आज उघड झाला. "पहिल्या इफ्फीच्या आयोजनात मी दोषी असल्याचे सिद्ध करा, मी तुरुंगात बसण्यास तयार आहे,' असे थेट आव्हान विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी कॉंग्रेस सरकार आणि केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभागाला दिले होते. "आपल्या वक्तव्याद्वारे आपण अप्रत्यक्षरीत्या पर्रीकर यांना दोषमुक्त तर ठरवत नाहीत ना' या प्रश्नाच्या उत्तरादाखल, आपण कुणाचीही बाजू घेत नसून, जे सत्य आहे तेच मांडण्याचा आपला प्रयत्न असल्याचे श्री. कामत यांनी स्पष्ट केले.
"मी स्वतः त्या समितीचा सदस्य होतो... मला नाही वाटत की साधन सुविधांच्या निर्मितीसाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीद्वारे कुठल्याही प्रकारचे चुकीचे निर्णय घेण्यात आले', असे प्रतिपादन दिगंबर कामत यांनी केले. ज्याद्वारे त्यांनी विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांचे अप्रत्यक्षरीत्या खंडनच केले आहे.
पत्रकारांशी बोलताना भाजप सरकारातील तत्कालीन शहर विकास मंत्री व राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री दिगंबर कामत म्हणाले की, २००४ साली ज्यावेळी इफ्फीचे राज्यात आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी या आयोजनासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीचे ते स्वतःही सदस्य होते. त्यामुळे राज्यात इफ्फीच्या आयोजनासाठी आवश्यक साधन सुविधांची निर्मिती व खर्चाबाबत जे अंतिम निर्णय घेण्यात आले त्यात त्यांचाही सहभाग असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
श्री. पर्रीकर यांनी भाजप सरकारच्या मंत्रिमंडळात असलेल्या आणि इफ्फीसंबंधातील सर्व निर्णय घेताना त्यावेळी सोबत असलेले आणि आता कॉंग्रेस सरकारात मुख्यमंत्री असलेले दिगंबर कामत यांचीही चौकशी झाली पाहिजे, असे मत व्यक्त केले होते. तसेच, हा "सीबीआय' चौकशीचा ससेमिरा राजकीय हेतूने प्रेरित असल्याचाही दावा श्री. पर्रीकर यांनी केला होता.
कॉंग्रेस सरकारने २००७ साली दाखल केलेल्या "इफ्फी २००४' च्या विविध विकासकामांत भ्रष्टाचार झाल्याप्रकरणी तक्रारीसंदर्भात "सीबीआय'कडून पर्रीकरांना नुकतेच चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. कॉंग्रेसचे मावीन गुदिन्हो यांनी राज्य व केंद्र सरकारमधून भाजपची सत्ता गेल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या विरोधात खटला नोंदवला होता. २००४ मध्ये झालेल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी साधनसुविधा उपलब्ध करण्यात तत्कालीन भाजप सरकारने आपल्या अधिकारांचा गैरवापर केला असल्याचे त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटले होते. या पार्श्वभूमीवर कामत यांचे आजचे निवेदन त्या तक्रारींतील फोलपणा सिद्ध करणारे आहे,असे दिसून येते.

वास्को येथे कार उलटून ७ जखमी

वास्को, दि. १९ (प्रतिनिधी)- रुमडावाडा येथील वळणावर कामगारांना काम करत असल्याचे दिसताच प्रेमानंद परब (वय ५०) यांनी आपल्या गाडीचा ब्रेक लावल्याने ती रस्त्यावर उलटून येथील कामगारांना धडक दिल्याने प्रेमानंद यांच्यासह सात जण जखमी झाले. सर्व जखमींना उपचारासाठी कुटिर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता तीन महिला कामगारांची अवस्था गंभीर असल्याने त्यांना "गोमेकॉ' इस्पितळात हलवण्यात आले; तर इतरांना उपचारानंतर घरी पाठवण्यात आले.
आज दुपारी ३.१५ च्या सुमारास मुरगावच्या उपनगराध्यक्ष सौ रोहिणी परब यांचे पती प्रेमानंद परब आपल्या "झेन' मोटारीतून (क्रः जीए ०६ ए ६०१५) वास्कोहून सडा येथे घरी परतत असताना तेथील वळणावर त्यांना राष्ट्रीय महामार्गाच्या संरक्षण कुंपणाचे काम करणारे कामगार नजरेस आले. त्यानंतर त्यांनी ब्रेक लावल्याने गाडी वळणावर उलटली. मग या गाडीने तेथे असलेल्या सहा कामगारांना जाऊन जबर धडक दिली. सदर अपघात घडल्याचे यावेळी येथे उपस्थित असलेल्यांच्या नजरेस येताच त्यांनी प्रथम गाडी चालवत असलेल्या प्रेमानंद नाईक यांना गाडीतून बाहेर काढले. यानंतर गाडीखाली सापडलेल्या जखमींना बाहेर काढून नंतर सर्वांना चिखलीच्या कुटिर रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. नीलंमा, कमला व मलकण्णा (रा. बिर्ला) अशी जखमी झालेल्या तिघी महिला कामगारांची नावे आहेत. त्यांची प्रकृती गंभीर बनल्याने त्यांना गोमेकॉ इस्पितळात नेण्यात आले. प्रेमानंद परब, मलकप्पा, हनुमंता व मलव्वा (वय सुमारे ३० ते ३५, राः बिर्ला) यांना उपचारानंतर घरी पाठवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
सदर रस्त्यावर गेल्या दोन ते तीन दिवसांत झालेला हा सातवा अपघात झाल्याची माहीती उपनगराध्यक्ष सौ. रोहिणी परब यांनी दिली. वळणावर रेती व इतर सामान टाकल्याने हे अपघात होत आहेत. आणखी असे अपघात होण्यापूर्वीच यासंदर्भात पावले उचलण्याची गरज असल्याचे त्या म्हणाल्या.
मुरगाव पोलिसांनी पंचनामा केला. दरम्यान, उशिरा मिळालेल्या माहितीनुसार गंभीर अवस्थेत असलेल्या सदर महिला कामगारांची प्रकृती सुधारत आहे. उपनिरीक्षक प्रशल देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार रवींद्र वेळीप तपास करीत आहेत.

आणखी काही काळ उन्हाचा तडाखा

नवी दिल्ली, दि. १८ ः उत्तर पश्चिमेसह देशातील अनेक भागांत सुरू असलेला उष्णतेचा तडाखा आणखी काही काळ सहन करावा लागणार असल्याचे भाकित हवामान खात्याने वर्तविले आहे.
भारतीय हवामान खात्याचे संचालक अजित त्यागी यांनी सांगितले की, सध्या देशात बऱ्याच ठिकाणी उन्हाचा विक्रमी तडाखा सुरू आहे. आगामी काही दिवसांत ही परिस्थिती बदलण्याची चिन्हे सध्या तरी दिसत नाहीत. वातावरणातील हा उष्मा आणखी काही महिने कायम राहण्याची शक्यता आहे. दिवस आणि रात्रीचे तापमान सातत्याने वाढत आहे. मध्य भारतात सध्या वाहत असलेले गरम वारे यंदा मान्सून चांगला राहण्याचे संकेत देत आहेत.
मार्च आणि एप्रिल महिन्यात गारा किंवा पाऊस पडलेला नाही. याचाच अर्थ, गव्हाच्या पिकाला कोणतेही नुकसान झालेले नाही. बरेचदा मार्चमध्ये होणाऱ्या गारपिटीने गव्हाचे नुकसान होते. सध्याचा वाढता उष्मा पाणी आणि वीज या व्यवस्थांवर भार टाकणारा असला तरी तो मान्सूनच्या दृष्टीने फायद्याचा आहे. एप्रिलमध्ये इतकी गरमी असणे याचाच अर्थ यापुढील दीड ते दोन महिनेही उन्हाचे चटके कायम राहणार आहेत. मे महिन्यात तापमानात आणखी वाढ संभवते, असेही त्यागी यांनी सांगितले.
जर मान्सूनवर याचा चांगला परिणाम होणार असेल तर शेतकऱ्यांसाठी ते शुभवर्तनामच म्हटले पाहिजे. कारण, जर पाऊस चांगला झाला तर मुबलक अन्नधान्याचे उत्पादन होऊन सध्याची महागाई कमी होऊ शकेल, अशी आशा बाळगता येईल. मात्र, एकीकडे अन्नधान्याची कोठारे भरून चालली असली तरी या देशातील ४० कोटींहून अधिक लोक आजही अर्धपोटी राहात असल्याचे वास्तव कायम उरतेच. असे असले तरी चांगला पाऊस होणार ही गोष्ट या उष्मादायी वातावरणातही सुखदच म्हटली पाहिजे!

कसाबच्या भवितव्याचा निर्णय ३ मे रोजी

मुंबई, दि. १८ ः मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा निकाल विशेष न्यायालय येत्या ३ मे रोजी देणार असल्याने सर्वांच्या नजरा या आता मुंबईतील ऑर्थर रोडवरील केंद्रीय कारागृहाकडे लागल्या आहेत. या हल्ल्यात सामील असलेेेेेला आरोपी पाकिस्तानचा अजमल कसाब व दोन भारतीय आरोपींना न्यायालय तीन मे रोजी शिक्षा सुनावणार आहे.
२६/११च्या मुंबईवरील हल्ल्याच्या वेळी कसाबला जिवंत पकडण्यात मुंबई पोलिसांना यश मिळाले होते. कसाबवर ऑर्थर रोडवरील केंद्रीय कारागृहातील विशेष न्यायालयात खटला चालू आहे. येथेच अधिकाधिक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.
गेल्या वर्षापासून या खटल्याची सुनावणी सुरू होती. कसाबवर कोणत्याही प्रकारे हल्ला होऊ नये यासाठी त्याला विशिष्ट पद्धतीने बांधलेल्या बुलेटप्रूफ तसेच बॉम्बप्रूफ कोठडीत ठेवण्यात आलेले आहे. कसाबची कोठडी व न्यायालयाची खोली यादरम्यान एक बोगदा बांधण्यात आला असून तोही बुलेटप्रूफ व बॉम्बप्रूफ आहे. कसाबची कोठडी तसेच न्यायालयाच्या सुरक्षेवर आतापर्यंत पाच कोटी रुपये खर्च करण्यात आलेला आहे.

Sunday 18 April, 2010

बंगलोरमध्ये चिन्नास्वामी स्टेडियमच्या प्रवेशद्वाराजवळच स्फोट

पाच सुरक्षा कर्मचाऱ्यांसह
एकूण पंधरा जण जखमी
आयपीएल सामन्यात व्यत्यय
परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात

बंगलोर,दि. १७ : आयपीएल स्पर्धेतील मुंबई आणि बंगलोर संघादरम्यानचा सामना सुरू होण्याआधी येथील चिन्नास्वामी स्टेडियमच्या प्रवेशद्वाराजवळ ठरावीक अंतराने देशी बॉंबचे दोन स्फोट झाल्याने एकच खळबळ उडाली, असे विविध वृत्तवाहिन्यांनी दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. हे विस्फोटक प्लॅस्टिकच्या पिशवीत बंद करून १२ क्रमांकाच्या प्रवेशद्वाराजवळील भिंतीच्या मागे लपवून ठेवण्यात आले होते, असे बंगलोरचे पोलिस आयुक्त शंकर बिदारी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. हे सौम्य स्वरूपाचा स्फोट होता. यामध्ये चार खाजगी सुरक्षारक्षक व एक पोलिस कर्मचारी आणि अन्य दहा जण जखमी झाले आहेत. सामना बंद पाडणे आणि प्रेक्षकांच्या मनात भीती उत्पन्न करणे या दुष्ट हेतूनेच हे स्फोट घडवून आणण्यात आल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि मुंबई इंडियन्स या अव्वल संघांत खेळला जाणारा सामना बघण्यासाठी ४० हजार प्रेक्षकांनी मैदानात गर्दी केली असतानाच सामना सुरू होण्याआधी ४५ मिनिटे म्हणजे दुपारी ३.१५ च्या सुमारास स्टेडियमच्या १२ क्रमांकाच्या प्रवेशद्वाराजवळ पहिला स्फोट झाला. यात त्याठिकाणी तैनात असलेले पाच सुरक्षा रक्षक जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. त्यानंतर लगेचच दुसरा स्फोट झाला, असे सांगण्यात आले.
घटनास्थळी सापडलेल्या स्फोटकांची न्यायवैद्यक प्रयोगशाळेत तपासणी केल्यानंतरच काही निष्कर्ष काढता येईल, असे बिदारी यांनी सांगितले.स्फोटाचे कारण शोधण्यासाठी राज्य सरकारचेही एक पथक घटनास्थळावर पोहोचले असून परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे, असे कर्नाटकचे गृहमंत्री व्ही. एस. आचार्य यांनी सांगितले.
दरम्यान, केंद्र सरकारनेही या स्फोटांची गंभीर दखल घेतली असून कर्नाटक सरकारकडून या संपूर्ण प्रकरणाचा अहवाल मागवला आहे. या स्फोटांमागे कोणत्या शक्ती कार्यरत आहेत याचा उलगडा तपासानंतरच होईल, असे पोलिस सूत्रांकडून सांगण्यात आले. या स्फोटांची जबाबदारी अजून कोणीही घेतलेली नाही आणि त्यासंदर्भात कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. तथापि, या स्फोटांच्या घटनेनंतर स्टेडियमच्या परिसरातील पोलिस बंदोबस्त आणखी कडक करण्यात आला. आम्ही कोणताही धोका पत्करण्यास तयार नाही, असे पोलिस सूत्रांनी सांगितले.
-------------------------------------------------------------
सामना तासभर विलंबाने सुरू
स्फोट झाल्याची बातमी प्रेक्षकांना कळल्यावर मैदानात एकच खळबळ उडाली आणि काहीसे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. प्रेक्षकांची समजूत काढून त्यांना शांत करण्यात बराच वेळ गेल्याने दुपारी चार वाजता सुरू होणारा हा सामना सुमारे एक तास विलंबाने म्हणजेच संध्याकाळी ५ वाजून ५ मिनिटांनी सुरू झाला. बॉम्बशोधक आणि निकामी करणारे पथक घटनास्थळावर दाखल झाले व त्यांनी स्टेडियमची कसून तपासणी केली. श्वानांच्या मदतीने घटनास्थळाची तपासणी करण्यात आली. तसेच मैदानावर प्रवेश करणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकांचीही कसून तपासणी करण्यात आली. सर्व सुरक्षित असल्याची खात्री पटल्यानंतरच या सामन्याला सुरुवात झाली.

मार्केटिंग फेडरेशन की 'पुनर्वसन केंद्र'

सहकार मंत्र्यांच्या हस्तक्षेपाची मागणी
पणजी, दि. १७ (प्रतिनिधी): सहकारमंत्री रवी नाईक यांच्या प्रयत्नांमुळे आर्थिक डबघाईतून सावरत असलेले गोवा मार्केटिंग फेडरेशन व्यवस्थापनाच्या चुकीच्या निर्णयांमुळे पुन्हा अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. संस्थेकडे पात्रता व कुवत असलेले कर्मचारी असताना व्यवस्थापनाकडून विविध सरकारी खात्यांतील निवृत्त कर्मचाऱ्यांना कंत्राटी पद्धतीवर फेडरेशनवर नेमण्याचा धडाकाच लावण्यात आला आहे. त्यामुळे हे फेडरेशन म्हणजे सध्या "पुनर्वसन केंद्र' बनल्याचा थेट आरोप कर्मचाऱ्यांकडून केला जात आहे.
प्राप्त माहितीनुसार मंत्री रवी नाईक यांनी गोवा मार्केटिंग फेडरेशनला सध्या मदतीचा हात दिला आहे. सुमारे दोन कोटी रुपयांचे आर्थिक साहाय्य देण्याबरोबर महिला व बाल विकास खात्याअंतर्गत विविध योजनासाठी लागणारे कडधान्य फेडरेशनतर्फे पुरवण्याची तजवीज करण्यात आली आहे. या स्थितीत फेडरेशन कात टाकण्याच्या तयारीत असतानाच तेथील व्यवस्थापनाकडून अनेक चुकीचे निर्णय घेतले जात असल्याची तक्रार कर्मचारी करीत आहेत. यापूर्वी फेडरेशनच्या व्यवस्थापकीय संचालकपदाचा अतिरिक्त ताबा सहकार खात्यातील एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे सोपवला जायचा. सरकारी अधिकारी व्यवस्थापकीय संचालकपदावर असल्याने सरकारचेही नियंत्रण फेडरेशनच्या कारभारावर असायचे. माजी उपनिबंधक सी. डी. गावडे यांच्याकडे यापूर्वी फेडरेशनच्या व्यवस्थापकीय संचालकपदाचा अतिरिक्त ताबा होता. त्यांनी सरकारी नोकरीतून स्वेच्छा निवृत्ती स्वीकारल्यानंतर त्यांना कंत्राटी पद्धतीवर पूर्णवेळ व्यवस्थापकीय संचालकपदी नेमण्यात आले. गोवा राज्य सहकारी बॅंकेच्या वसुली अधिकारीपदाचाही त्यांच्याकडे ताबा आहे.अलीकडेच गावडे यांनी फेडरेशनच्या व्यवस्थापकीय संचालकपदाचा राजीनामा सादर केल्याचे वृत्त असून हा राजीनामा व्यवस्थापनाकडून फेटाळण्यात आल्याची माहिती मिळते. गावडे यांनाच या पदावर नेमण्याचा हट्ट सत्ताधारी संचालक मंडळाने धरल्याचेही वृत्त आहे.
दरम्यान, सहकार खात्यातील अन्य एका निवृत्त अधिकाऱ्याची लेखा अधिकारी म्हणून कंत्राटी पद्धतीवर नियुक्ती करण्यात आली असून त्याला सुमारे १५ ते २० हजार रुपये वेतन दिले जात आहे. एवढेच नव्हे तर आता अन्य एका निवृत्त अधिकाऱ्याची प्रशासकीय अधिकारी म्हणून नेमणूक करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. तशी जाहिरातही वृत्तपत्रांत प्रसिद्ध करण्यात आली असून फेडरेशनचे नाव मात्र "गुप्त' ठेवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. या सर्व जबाबदाऱ्या सांभाळण्यासाठी फेडरेशनकडे पुरेसे कर्मचारी असताना त्यांना डावलून नव्या मंडळींच्या भरतीची लाट तेथे आली आहे. फेडरेशनवर अतिरिक्त आर्थिक भार टाकण्याचा हा प्रयत्न सदर संस्थेच्या अंगलट येण्याचा धोका संभवतो. व्यवस्थापनाकडून सुरू असलेल्या या प्रकारांबाबत सहकारमंत्री अवगत आहेत की नाही, हे माहीत नाही; पण त्यांनी तात्काळ या कारभारात हस्तक्षेप करून व्यवस्थापनाच्या मनमानी कारभाराला आळा घालावा, अशी मागणी केली जात आहे.

पेडणेतील जुगाराविरोधी कारवाईचा तपशील द्या

जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्राने प्रचंड खळबळ
पणजी, दि. १७ (प्रतिनिधी): उत्तर गोवा जिल्हाधिकारी मिहीर वर्धन यांनी पेडणे तालुक्यातील खुलेआम जुगाराबाबत पोलिस खात्याने काय कारवाई केली याबाबतचा सखोल अहवाल उत्तर गोवा पोलिस अधीक्षकांकडे मागितल्याने जुगारवाल्यांत प्रचंड खळबळ उडाली आहे. "मांद्रे सिटीझन फोरम' तर्फे सादर करण्यात आलेल्या निवेदनास अनुसरून जिल्हाधिकाऱ्यांनी हा अहवाल मागवल्याची माहिती मिळाली आहे. या आदेशामुळे पेडणे पोलिसांचे धाबे दणाणले असून त्यांनी पेडण्यातील जुगाराविरोधात जोरदार मोहीम उघडल्याचे वृत्त आहे.
"मांद्रे सिटीझन फोरम'ने पेडणे तालुक्यात सार्वजनिक ठिकाणी, धार्मिक उत्सव, क्रिकेट स्पर्धा आदींना खुलेआम जुगार चालतो, अशी तक्रार राज्यपाल, मुख्यमंत्री, गृहमंत्री, विरोधी पक्षनेते तसेच वरिष्ठ प्रशासकीय व पोलिस अधिकाऱ्यांकडे केली होती. जुगार समाजाला कसा घातक आहे, त्याला आळा का बसायला हवा याबाबतही फोरमने जागृती सुरू केली. त्याला तालुक्यातून मोठा प्रतिसाद मिळाला. मांद्रेतील काही समाजिक कार्यकर्ते व समविचारी मंडळींनी फोरमच्या या कार्याचे कौतुक केले. त्यांना पाठिंबा दिला.
"गोवादूत'नेदेखील सातत्याने या मोहिमेचा पाठपुरावा करून फोरमच्या या कार्याला हातभार लावला. तक्रारी करूनही कारवाईच होत नसल्याने फोरमच्या काही कार्यकर्त्यांनी जुगाराचे पुरावेही एकत्र केले. काही सतर्क नागरिकांनी जुगाराचे फोटो व सीडी फोरमकडे सुपूर्द करून त्यांच्या या मोहिमेला पाठिंबा दिला. आता माहिती अधिकाराखाली जुगाराबाबत नेमकी काय कारवाई झाली याचा तपशील मिळवण्यासाठी
अर्ज सादर करण्याची मोहीम सुरू झाल्याने या अधिकाऱ्यांची धावपळ उडाली आहे.
पेडण्यातील जुगार व्यावसायिक त्यामुळे "दुखावले' गेल्याने त्यांनी सध्या फोरमच्या सदस्यांवर दबाव आणण्याचे किंवा त्यांच्या घरी अकस्मात भेट देऊन त्यांना सतावण्याचे सत्र आरंभले आहे. पेडणे पोलिसांनी फोरममुळे जुगार बंद झाला,असे सांगितल्याचेही हे लोक सांगत सुटले आहेत.
जुगार खेळणे हा कायद्याने गुन्हा आहे. तो बंद करणे पोलिसांची जबाबदारी आहे. पोलिस आपली कातडी बचावण्यासाठी आता फोरमचे नाव पुढे करून जुगारवाल्यांना फोरमविरोधात लोकांना भडकावत आहेत. त्यामुळे फोरम सदस्यांच्या जीविताला धोका निर्माण झाल्याची तक्रार उपस्थित झाली आहे. पेडणेतून जुगाराचा नायनाट करण्यासाठी सर्व समविचारी, बुद्धिवादी तथा पेडण्यातील स्वाभिमानी लोकांनी फोरमच्या या मोहिमेत सहभागी व्हावे व फोरमला साहाय्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या जुगारामुळे अनेकांचे संसार धुळीला मिळाले आहेत. बेरोजगार युवक जुगाराच्या आहारी गेल्यामुळे
त्यांच्यात व्यसनांचे प्रमाण वाढत आहे. जुगारामुळे पोलिसांना मोठ्या प्रमाणात हप्ते मिळतात. त्यामुळे पोलिस जुगारवाल्यांना भडकावून फोरमच्या कार्यकर्त्यांत दहशत निर्माण करण्याचे प्रयत्न करीत असून हे प्रयत्न हाणून पाडणे गरजेचे आहे, असेही आवाहन करण्यात आले आहे. पेडणे तालुक्यातील असंख्य युवा संघटनांनी याविषयावर एकत्र यावे व ही मोहीम यशस्वी करण्यासाठी मदत करावी, अशी विनंती फोरमने केली आहे.

पवित्र मंत्रोच्चाराच्या जयघोषात गायत्री पुरश्चरण सोहळा सुरू...

फोंडा, दि.१७ (प्रतिनिधी): पवित्र मंत्रोच्चाराचा जयघोष, हजारो भाविकांचा सहभाग आणि प्रार्थनेचे मंजूळ स्वर अशा भारलेल्या वातावरणात तपोभूमी कुंडई येथे गायत्री पुरश्चरण सांगता सोहळ्याला प. पू. ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी महाराज यांच्या दिव्य उपस्थितीत आज (दि.१७ ) पहाटे ५ वाजता प्रारंभ झाला. या सोहळ्याची समाप्ती रविवार १८ रोजी होणार आहे. संप्रदायाच्या संत समाज संघटन समितीने १ कोटी २४ लाख गायत्री मंत्राचा संकल्प पूर्णत्वास नेला असून यासाठी तीन हजार जपकर्ते लाभले आहेत.
तपोभूमी कुंडई येथे गायत्री पुरश्चरण सांगता सोहळ्यानिमित्त १२ यज्ञकुंड तयार करण्यात आले असून १२ प्रमुख यजमानांच्या नेतृत्वाखाली विविध धार्मिक विधी सुरू आहेत. मठाचे प.पू. ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी महाराज यांच्या आधिपत्याखाली मठाचे बटू पौरोहित्य करीत आहेत. १७ रोजी पहाटे ५ वाजता कार्यक्रमाला सुरुवात झाली. या कार्यक्रमात भाविकांनी मोठ्या संख्येने भाग घेतला. तपोभूमीचा परिसर भाविकांच्या गर्दीने फुलून गेला होता.
१८ रोजी पहाटे ५ वाजल्यापासून कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. यानिमित्त पहाटेपासून सांप्रदायिक प्रार्थना, सद्गुरू महापूजा, तीन हजार जपकर्त्यांकडून हवन, जपकर्त्यांकडून मार्जन, जपकर्त्यांकडून तर्पण, ब्राह्मण भोजन, प्रमुख द्वादश यजमानांस अभिषेक असा कार्यक्रम होणार आहे. दुपारी २ वाजता मुख्य पूर्णाहुती, श्रेयोग्रहण, ब्राह्मण संभावना, महाआरती व महाप्रसाद होणार आहे. मुख्यमंत्री, मंत्री, आमदार यांच्याकडूनही जप करून घेण्यात येणार आहे.
या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री दिगंबर कामत, सभापती प्रतापसिंह राणे, गृहमंत्री रवी नाईक, वाहतूक मंत्री सुदिन ढवळीकर, विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर, पंचायत मंत्री बाबू आजगांवकर, आरोग्य मंत्री विश्वजित राणे, आमदार नीळकंठ हळर्णकर, दयानंद नार्वेकर, पांडुरंग मडकईकर, श्याम सातर्डेकर, चंद्रकांत कवळेकर, अनिल साळगांवकर, दयानंद मांद्रेकर, दीपक ढवळीकर, लक्ष्मीकांत पार्सेकर, दामोदर नाईक, वासुदेव गांवकर, राजेश पाटणेकर, दिलीप परूळेकर, मिलिंद नाईक, महादेव नाईक, अनंत शेट, विजय पै खोत, रमेश तवडकर, प्रताप गावंस, दयानंद सोपटे यांचा समावेश आहे. तसेच मुख्य सचिव संजय श्रीवास्तव, उद्योजक समीर साळगांवकर, उद्योगपती हरीश मेलवानी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाचा लाभ सर्वांनी घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

फोंड्यात युवतीवर प्राणघातक हल्ला हल्लेखोर पळाला, खडपाबांध भागात खळबळ

फोंडा, दि.१७ (प्रतिनिधी): खडपाबांध फोंडा येथे एका घरकाम करणाऱ्या एका युवतीवर आज (दि.१७) सकाळी ९ च्या सुमारास एक व्यक्तीने प्राणघातक हल्ला केला असून सदर युवतीवर बांबोळी येथील गोमेकॉ इस्पितळात उपचार सुरू आहेत. अमृता गावडे असे हल्ला झालेल्या युवतीचे नाव आहे.
यासंबंधी तिची बहीण विमल धानू गावडे (गावणे) हिने फोंडा पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
फोंड्यात आठ दिवसांपूर्वी कुंडई येथील एका युवतीवर सुरी हल्ल्याची घटना घडली होती. ती घटना ताजी असतानाच शनिवारी सकाळी आणखी एका युवतीवर हल्ला झाल्यामुळे फोंड्यात खळबळ माजली आहे.
या युवतीवरील प्राणघातक हल्ल्याबाबत सविस्तर माहिती मिळविण्यासाठी पोलिसांनी तपासकाम सुरू केले आहे. हल्ला करण्यात आलेली अमृता ही युवती गंभीर जखमी असल्याने तिच्याकडून सविस्तर माहिती अद्याप प्राप्त झालेली नाही, असे सूत्रांनी सांगितले.
अमृता गावडे ही युवती मूळची गावणे येथील असून खडपाबांध येथे घरकामाला होती. आज (दि.१७) सकाळी ९ च्या सुमारास एका व्यक्तीबरोबर दुचाकी वाहनावरून जात असताना "त्या' व्यक्तीने येथील आरटीओ कार्यालयाजवळ तिच्यावर दंडुक्याने हल्ला करून तिला गंभीर जखमी केले, अशी प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे. हल्ला केल्यानंतर हल्लेखोर पळून गेला. जखमी अमृताला प्रथम येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. नंतर तिला बांबोळी येथील गोमेकॉ हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तिच्याकडून याप्रकरणी सविस्तर माहिती मिळविण्याचे काम पोलिसांनी सुरू केले आहे. याप्रकरणी उपनिरीक्षक संजय दळवी तपास करीत आहेत.

प्लॅस्टिक सर्जरीने सौंदर्य खुलवणारा वैद्यक जगतातील 'किमयागार'

पणजी, दि. १७ (ज्योती धोंड): शापीत सौंदर्याला उःशाप देणारे एक ऋषिमुनी नुकतेच गोव्यात येऊन गेले. हे कोणी पुराणातले ऋषी नव्हेत बरं.
हे आहेत आधुनिक वैद्यकीय जगतातील एक साधक अन् सौंदर्याचे सौदागर! शस्त्रक्रियेचे पुढारलेले तंत्रज्ञान वापरून ते आपल्या कुशल हातांनी चेहऱ्यावरचे व्यंग दूर करतात व शेकडो कोमेजलेल्या डोळ्यांत आत्मविश्वास भरतात.बेढब फाटलेले ओठ, वाकडेतिकडे किंवा फेंदरे नाक, सुरकुतलेली त्वचा, आगीत होरपळलेली कातडी या सर्वांवर शस्त्रक्रियेद्वारा सौंदर्याचा आगळा साज चढवणारे हे शल्यविशारद म्हणजे बॉम्बे हॉस्पिटलमधील डॉ. मुकुंद थत्ते. डॉ. थत्ते हे अखिल भारतीय प्लॅस्टिक सर्जन संघटनेचे अध्यक्ष असून, या संघटनेचे ७५० प्लॅस्टिक सर्जन सदस्य आहेत.
डॉ. थत्ते गोवा वैद्यकीय महाविद्यालयात ""रिन्होप्लास्टी'' या विषयावर "प्रा. सी. आर. एस. सुंदरराजन राष्ट्रीय प्लॅस्टिक सर्जरी व्याख्यानमालेतील समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. "गोवादूत'च्या प्रस्तुत प्रतिनिधीशी त्यांनी दिलखुलास गप्पा मारल्या आणि त्यातून उलगडत गेला "प्लॅस्टिक सर्जरी' या विषयावरील माहितीचा अनोखा खजिना..
प्लॅस्टिक सर्जरीविषयी बोलताना ते म्हणाले की, आपल्या देशात जरी गेल्या २० - २५ वर्षांत प्लॅस्टिक सर्जरीची प्रगती झाली असली तरी अशा प्रकारची शस्त्रक्रिया ६०० ख्रिस्तपूर्व (६०० बीसी) काळात वैद्य सुश्रुत यांनी सुरू केली होती. त्यानंतर पहिल्या महायुद्धात अनेक जखमी लोकांवर आणि सैनिकांवर ज्यांचे चेहरे, हात, पाय लढाईत छिन्नविछीन्न झाले होते त्यांच्यावर अशा शस्त्रक्रिया युरोप, आशिया खंडात यशस्वीरित्या केल्या गेल्या.
सध्या भारतात वर्षाकाठी सुमारे २ - ३ लाख छोट्या-मोठ्या प्लॅस्टिक सर्जरी केल्या जातात.
प्लॅस्टिक सर्जरीविषयी अनेक लोकांच्या मनामध्ये असलेल्या गैरसमजुतीबद्दल बोलताना डॉ. थत्ते म्हणाले, " प्रत्येक व्यक्तीला सुंदर दिसण्याचा अधिकार आहे. सौंदर्याचा थेट संबंध जर एखाद्या व्यक्तीच्या व्यवसायाशी असेल तर त्या व्यक्तीने सुंदर दिसण्यासाठी किंवा ते टिकविण्यासाठी प्लॅस्टिक सर्जरीचा आधार घेण्यात काहीच वावगे नाही. त्याचबरोबर प्लॅस्टिक सर्जरी ही फक्त सुंदर दिसण्यासाठी केली जाते हा एक फार मोठा गैरसमज समाजात बळावला आहे. काही वेळा प्लॅस्टिक सर्जरी करणे अनिवार्य असते. उदाहरणार्थ कॅन्सर, वाहन अपघात, आगीत होरपळणे, एखादे जन्मजात व्यंग, कुरूप चेहरा इत्यादी. आता तर विज्ञान एवढे पुढे गेले आहे की, तीन महिन्यांच्या बालकावर सुद्धा आम्ही प्लॅस्टिक सर्जरी करतो. तसेच ज्यांचे नाक वाकडे आहे किंवा बेढब आहे त्यांना अशी सर्जरी म्हणजे सौंदर्याचे वरदानच ठरते. एखादे व्यंग घेऊन आयुष्यभर कुडत राहण्यापेक्षा, प्लॅस्टिक सर्जरी करून ते व्यंग नाहीसे करण्यात मोठा आनंद असतो. कारण अशी सर्जरी रुग्णाचा आत्मविश्वास वाढवते.
प्लॅस्टिक सर्जन होण्याची त्यांची आवड वैद्यकीय जीवनातच रुजली. गंमत म्हणजे डॉ. थत्ते जेव्हा बसमधून नेहमी प्रवास करायचे तेव्हा आपल्या सहप्रवाशांची नाके कशी असावीत यावर ते बराच विचार करीत असत. चित्रकलेत एकही बक्षीस कधी मिळवू न शकलेले हे डॉक्टर महोदय आज एक निष्णात शल्यविशारद आहेत हे विशेष. ते आपल्या जादुई हातांनी लोकांची नाके सरळ, सुंदर करतात, चेहऱ्यावरील दोष दूर करतात, त्वचेवरील सुरकुत्या घालवतात. देशविदेशांत होणाऱ्या सौंदर्य शस्त्रक्रियांविषयी बोलताना डॉक्टर म्हणतात, " शस्त्रक्रिया करणे हा रुग्णांचा हक्क असतो. मात्र ती करावी किंवा नाही हा फक्त डॉक्टरांचा हक्क असू शकतो. अशा स्वरूपाच्या शस्त्रक्रिया करण्यापूर्वी रुग्णाच्या गरजा, शस्त्रक्रियेची आवश्यकता, या तज्ञांनी जरूर तपासल्या पाहिजे असे त्यांनी ठासून सांगितले'.
रुग्णाच्या मागणीचे अवाजवी लाड करू नका. भारतातील तज्ज्ञ डॉक्टरांविषयी बोलताना ते म्हणाले, "आपले डॉक्टर निपुण आहेत पण कमी पडते ती त्यांना जरुरी असलेल्या साधन सामग्रीची, तंत्रज्ञानाची, शासकीय काम करणाऱ्या मनुष्यबळाची. तज्ज्ञ डॉक्टरच जर आपआपल्या विभागात प्रशासकीय काम करू लागले तर त्यांच्या निपुणतेचा फायदा आम जनतेला कसा होणार, याची दखल योग्य त्या अधिकाऱ्यांनी घेतली पाहिजे.
गोवा वैद्यकीय महाविद्यालयाने गेल्या ५ वर्षात केलेल्या प्रगतीचे डॉ. थत्तेंनी खूप कौतुक केले. विशेषतः डॉ. सी. पी. दास आणि युरी डायस यांचे कार्य उल्लेखनीय असल्याचे त्यांनी सांगितले.
"गोमेकॉ'त गेल्या ५ वर्षात अशा ५६ शस्त्रक्रीया झाल्या. नाकाचे दोष दूर करणे, वाकडे नाक सरळ करणे, पोपटाच्या चोचीसारखे असणारे नाक सरळ करणे, अति लांब नाक छोटे करणे, अति फुगीर नाक सडपातळ करणे, ओठ सुंदर बनविणे, अपघातात चेंगरलेले नाक पुन्हा उभे करणे, अशा अनेक शस्त्रक्रिया डॉ. दास व युरी व त्यांच्या सहकारी डॉक्टरांनी यशस्वीपणे केल्या आहेत.