पणजी, दि. ५ (प्रतिनिधी)
भ्रष्टाचारातून मिळवलेल्या पैशांच्या जोरावर सत्ता बळकावण्याची सवय कॉंग्रेसला जडली आहे. देशभरात भ्रष्टाचारविरोधातील चळवळीमुळे आपले उखळ उघड होणार या भीतीनेच केंद्र सरकारने स्वामी रामदेवबाबांचे शांततापूर्ण व लोकशाही पद्धतीने सुरू असलेले आंदोलन उधळून लावले. रामदेवबाबांचे आंदोलन चिरडून टाकण्याची कृती आणीबाणीपेक्षा वेगळी नाही.लोकांचा आवाज दडपून टाकण्याच्या या कृतीचा प्रदेश भाजप निषेध करीत आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी केली. रामदेवबाबांनी सरकारसमोर ठेवलेल्या सर्व मागण्या वैध होत्या. देशात भ्रष्टाचाराविरोधातील आग झपाट्याने फोफावत आहे व त्यामुळेच भ्रष्टाचारात आकंठ बुडालेल्या कॉंग्रेसचा थरकाप उडाला आहे. महात्मा गांधी यांनी सत्याग्रह व अहिंसेच्या दिलेल्या शिकवणीचाच कॉंग्रेसला विसर पडला आहे, असा टोलाही पर्रीकर यांनी हाणला आहे.
भारतीयांनो जागे व्हाः डॉ. काणेकर
भ्रष्टाचाराविरूद्ध आवाज उठविण्यासाठी योगगुरू रामदेवबाबांनी सुरू केलेले आंदोलन शांततापूर्ण वातावरणात सुरू असताना आकस्मिकपणे पोलिसांनी केलेली कारवाई ही लोकशाहीचा गळा घोटणारी होती. रामलीला मैदानावर पोलिसांनी आंदोलकांवर केलेला लाठीहल्ला व फोडलेल्या अश्रुधुराचा नळकांड्या हे भ्रष्टाचाराविरूध्दचा आवाज दंडेलशाहीने बंद करण्याचे कारस्थान होते असा आरोप पंतजली गोवा शाखेचे अध्यक्ष डॉ. सूरज काणेकर यांनी केला. नवी दिल्ली येथील रामलीला मैदानावरून ‘गोवादूत’शी बोलताना त्यांनी सांगितले की, बाबांचे आंदोलन हे देशाच्या हितासाठी होते. पोलिसांची कारवाई ही जालियनवाला बाग हत्याकांडाची आठवण करून देणारी होती. फरक एवढाच होता की, ‘ते’ परके होते तर ‘हे’ आपलेच कायद्याचे रक्षक होते. बाबांनी काहीही केले नव्हते. आंदोलकांनी बाबांच्या भोवती संरक्षक फळी निर्माण केली होती. त्यामुळे त्यांच्यापर्यंत जाणे पोलिसांना कठीण बनल्याने त्यांनी अश्रुधूर व लाठीहल्ला केला. सर्व स्वाभिमानी भारतीयांनी आता जागे होण्याची वेळ आली आहे. लोकशाही व भारतीयत्व टिकवून ठेवण्यासाठी आता तरी जागे व्हा, असे आवाहन डॉ. काणेकर यांनी तमाम भारतीयांना केले.
श्री श्री रविशंकर यांचे आवाहन
आर्ट ऑफ लिव्हिंगचे श्री श्री रविशंकर यांनी रामदेवबाबांच्या बाबतीत काल घडलेल्या घटनेचा निषेध केला असून, जनतेने संयम राखावा असे आवाहन केले आहे. काळ्या पैशांबाबतचा लढा एकत्रितपणे आणि धैर्याने लढण्याची गरज त्यांनी प्रतिपादन केली आहे. विदेश दौर्यावर असलेले श्री श्री रविशंकर तातडीने मायदेशी परतत आहेत.
ही तर हिटलरशाहीच ः माथानी
रामदेवबाबांवरील हल्ल्याचा निषेध करताना, माजी मंत्री माथानी साल्ढाना यांनी शनिवारी रात्रीचा प्रकार हिटलरशाहीची आठवण करून देणारा असल्याचे म्हटले आहे. रामदेवबाबा आमरण उपोषण करण्यासाठी दिल्लीत आले त्यावेळी विमानतळावर धाव घेणारे मंत्रिगण अचानक त्यांच्या शांततापूर्ण व लोकशाहीने चाललेले आंदोलन मोडून काढण्यासाठी पोलिसी बळाचा वापर करतात, ही घटना लोकशाहीविरोधी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. रामदेवबाबांनी केवळ योगासने शिकवावीत असा सल्ला देणार्या नेत्यांना बाबा हे भारतीय नागरिक असून ते प्रत्येक बाबतीत आपले मत व्यक्त करू शकतात, हे ठाऊक नाही का, असा प्रश्न साल्ढाना यांनी विचारला आहे.
‘संपुआ सरकारच जबाबदार’
रामलीला मैदानावर जे तांडवनृत्य घडले, त्याला सर्वस्वी संपुआ सरकार जबाबदार असल्याची प्रतिक्रिया माजी आमदार सदानंद तानावडे यांनी व्यक्त केली आहे. भ्रष्टाचाराविरुद्ध लढा देणार्या रामदेवबाबांना देण्यात आलेली वागणूक निषेधार्ह आहे. लोकशाही मार्गाने चाललेले हे आंदोलन दडपण्याचा हा प्रयत्न जनता खपवून घेणार नाही, असे त्यांनी सांगितले.
Monday, 6 June 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment