Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday, 4 June 2011

ढवळीकर बंधूंसमोर धर्मसंकट?

बंद मोडून काढण्यासाठी कॉंग्रेसने मगोला केले ‘लक्ष्य’
पणजी, दि. ३ (प्रतिनिधी): भारतीय भाषा सुरक्षा मंचाने सोमवार ६ जून रोजी घोषित केलेल्या गोवा बंदला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी हा प्रश्‍न प्रतिष्ठेचाच बनवून कोणत्याही पद्धतीने हा बंद मोडून काढण्यासाठी जबरदस्त शक्कल लढवली आहे. सरकारतर्फे हा बंद मोडून काढण्याची मुख्य जबाबदारी ढवळीकरबंधूंच्या खांद्यावर सोपवत या निर्णयाबाबत ढवळीकर बंधूंनी घेतलेल्या विरोधी भूमिकेलाच आव्हान देण्याचा डाव सरकारने आखल्याची खात्रीलायक माहिती प्राप्त झाली आहे.
भारतीय भाषा सुरक्षा मंचतर्फे पुकारलेल्या ६ रोजीच्या गोवा बंदच्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी आज पर्वरी मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक बोलावली होती. या बैठकीला गृहमंत्री रवी नाईक, मुख्य सचिव संजय श्रीवास्तव, पोलिस अधीक्षक, सार्वजनिक बांधकाम खात्याचे प्रधान मुख्य अभियंते, जिल्हाधिकारी तसेच अन्य वरिष्ठ अधिकारी हजर होते. यावेळी बंदमुळे उद्भवणार्‍या विविध समस्यांबाबत चर्चा करण्यात आली. अखिल गोवा खाजगी बस मालकांनी या बंदला आपला पाठिंबा जाहीर केल्याने प्रवाशांची चोख व्यवस्था करण्याची जबाबदारी कदंब महामंडळावर ओढवली आहे. कदंब महामंडळाचे अध्यक्ष तथा म.गो.चे आमदार दीपक ढवळीकर यांनी जाहीरपणे या बंदला आपला पाठिंबा दिला आहे. भारतीय भाषा सुरक्षा मंचालाही पाठिंबा दिलेल्या दीपक ढवळीकर यांच्यावरच प्रवाशांची सोय करण्याची जबाबदारी सोपवून मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी त्यांची जबरदस्त कोंडी करण्याचे ठरवले आहे. वाहतूकमंत्री सुदिन ढवळीकर यांनी या बंदात सहभागी होणार्‍या खाजगी बस मालकांवर कारवाई करावी, असा आदेश त्यांना देण्यात आला आहे. दरम्यान, इंग्रजी माध्यमाला मान्यता देण्याच्या निर्णयाला सरकारातील घटक पक्ष असूनही म. गो.च्या आमदारांनी विरोध दर्शवल्याने त्याचा वचपा काढण्यासाठीच कामत यांनी नवी रणनीती आखल्याचे बोलले जात आहे. याप्रकरणी दीपक ढवळीकर यांच्याशी संपर्क साधला असता सरकारच्या निर्णयाची माहिती मिळताच ते गोंधळले. आपण गोव्याबाहेर आहे व गोव्यात परतल्यानंतरच त्याबाबत बोलू, असे म्हणून त्यांनी फोन ठेवला. वाहतूकमंत्री ढवळीकर यांच्याशी मात्र संपर्क होऊ शकला नाही.
श्रेष्ठींकडून कानउघडणी
इंग्रजी माध्यमाला बहुसंख्य लोकांचा पाठिंबा असल्याचा दावा करून स्थानिक नेत्यांनी दिल्लीतील श्रेष्ठींकडून ही मागणी पदरात पाडून घेतली. आता या निर्णयाविरोधात गोवा बंद यशस्वी झाला तर श्रेष्ठींची नाचक्की होईल, यामुळे हा बंद यशस्वी होता कामा नये, असे स्पष्ट निर्देश कॉंग्रेस श्रेष्ठींनी स्थानिक नेत्यांना देत त्यांची चांगलीच कानउघाडणी केल्याची खबर आहे. हा बंद मोडून काढून भारतीय भाषा सुरक्षा मंचाने केलेला जनाधाराचा दावा फोल ठरवून दाखवा, असेही सरकारला बजावण्यात आले आहे. हा बंद अपयशी ठरल्यास या आंदोलनातील हवाच निघून जाईल व आपोआपच सरकारचा निर्णय वरचढ ठरेल, असेही सरकारला कळवण्यात आले आहे.
कडक बंदोबस्त
‘उटा’ आंदोलनाच्या निमित्ताने पाचारण केलेल्या ‘सीआयएसएफ’च्या तीन तुकड्यांचा या बंदावेळी बंदोबस्तासाठी वापर करण्याचे ठरले आहे. राज्यात सर्वत्र कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार असून कायदा हातात घेऊ पाहणार्‍यांना तात्काळ अटक करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासंबंधी गृहमंत्री रवी नाईक यांनी दोन्ही पोलिस अधीक्षकांना परिस्थिती हाताळण्याबाबत सूचना केल्या.
विद्यालये ६ रोजीच सुरू
यंदाचे शैक्षणिक वर्ष ६ जून रोजीच सुरू होणार असा निर्धार करून गोवा बंदच्या निर्णयाला आव्हान देण्याचे शिक्षण खात्याने ठरवले आहे. शिक्षण खात्याच्या संचालिका डॉ. सेल्सा पिंटो यांनी ही माहिती दिली. गोवा बंदच्या पार्श्‍वभूमीवर शाळा पुढे ढकलण्याचा प्रश्‍नच उद्भवत नाही, असे सांगून त्यांनी सरकार आपल्या निर्णयावर ठाम असल्याचे सांगितले.
------------------------------------------------------------------
१) दूध व आरोग्यसेवा बंदमधून वगळणार
भारतीय भाषा सुरक्षा मंचाच्या कृति-योजना सुकाणू समितीच्या आज (दि.३) पणजी येथे झालेल्या बैठकीत सोमवार ६ जून रोजी पुकारण्यात आलेल्या गोवा बंद आंदोलनातून दूधपुरवठा, औषधालये व आरोग्यसेवा वगळण्यात येणार असल्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. तसेच हा बंद सकाळी ७ ते संध्याकाळी ५ या वेळेपर्यंत असेल.असे निर्णय बैठकीत घेण्यात आले.

२) ढवळीकर बंधू बेंगलोरला?
वाहतूक मंत्री सुदिन ढवळीकर व कदंब महामंडळाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर हे दोघेही ढवळीकर बंधू आपल्या कुटुंबीयांसह १३ वाहने घेऊन बेंगलोरला रवाना झाल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. विशेष म्हणजे या तेराही वाहनांचे क्रमांक ६४६४ असे आहेत.

No comments: