पणजी, दि. ८ : शैक्षणिक माध्यमप्रश्नी सरकारने धोरण बदलल्यास एक लाख पालकांना घेऊन रस्त्यावर उतरण्याची धमकी देणारे सार्वजनिक बांधकाममंत्री चर्चिल आलेमाव यांना सत्तेची व पैशांची मस्ती चढली आहे. या मस्तीच्या बळावर त्यांनी मुख्यमंत्री दिगंबर कामत व कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष सुभाष शिरोडकर यांना ‘ब्लॅकमेल’ करून आपला हेतू साध्य करून घेतला. तथापि, गोव्यातील स्वाभिमानी जनता चर्चिलची मस्ती उतरवल्याशिवाय राहणार नाही, असा जळजळीत इशारा विष्णू सूर्या वाघ यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारेन दिला आहे. तसेच १८ जून रोजी संपूर्ण गोव्यात क्रांतिदिन साजरा केला जातो. त्या दिवशीच गोवा सरकारला युवा क्रांतीचा दणका सहन करावा लागेल, असेही श्री. वाघ यांनी म्हटले आहे.
दिगंबर कामत सरकार माध्यमप्रश्नाबाबतचा निर्णय जोपर्यंत फिरवत नाही तोपर्यंत स्वभाषेची चळवळ सुरूच राहील. संधी मिळेल तिथे मुख्यमंत्री व इतर मंत्र्यांना जनतेचा हिसका दाखविण्यात येईल. त्याचा पहिला प्रयोग येत्या काही दिवसांत चर्चिल आलेमाव यांच्यावरच करण्यात येईल असेही श्री. वाघ यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना सुबुद्धी देण्यासाठी म्हापशातील श्री देव बोडगेश्वराला साकडे घालण्याचा कार्यक्रम आपण जाहीर केला होता, परंतु आज अण्णा हजारे यांच्या समर्थनार्थ उपोषणाचा कार्यक्रम असल्यामुळे तसेच आजचा दिवस भाजपकडून ‘धिक्कार दिवस’ पाळला जात असल्याने हा कार्यक्रम आता १५ जून रोजी होणार आहे. तसेच १७ जून रोजी संपूर्ण गोव्यातील लेखक, कलाकार, रंगकर्मी, चित्रकार व लोककलाकारांचा मेळावा पणजीत घेतला जाईल. जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष कवी रामदास फुटाणे या मेळाव्यात मार्गदर्शन करतील.
विद्यार्थ्यांमध्येही जागृती करणार
जूनच्या शेवटच्या आठवड्यात भाषा प्रश्नासंबंधी राज्यातील ओबीसींच्या भावना सरकारपर्यंत पोचविण्यासाठी ओबीसी महामेळावा आयोजित करण्यात येईल. शिवाय गनिमीकाव्याचा वापर करून काही कार्यक्रम केले जातील. ‘फेसबुक’वरील ‘दिगंबर कामत गेट वेल सून’ मोहीम आणखी तीव्र केली जाईल. राज्यातील सर्व महाविद्यालयांत आपण लिहिलेल्या व राजदीप नाईक यांनी निर्मित केलेल्या पथनाट्यांचे प्रयोग करून विद्यार्थ्यांमध्ये जागृती करण्यात येईल. स्वदेशी भाषा संरक्षण मंचतर्फे जाहीर होणार्या कार्यक्रमांतही आपला सक्रिय सहभाग असेल, असे विष्णू वाघ यांनी जाहीर केले आहे.
‘बहुजन समाजाने एकत्र यावे’
६ जूनचा बंद पूर्णपणे यशस्वी होऊनसुद्धा सरकार त्याकडे डोळेझाक करण्याचा प्रयत्न करीत आहे. मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या उर्मट देहबोलीत कोणताही फरक पडलेला नाही. ‘सेझ’ तसेच प्रादेशिक आराखड्याविरुद्धच्या आंदोलनांत सरकारने नमते घेतले. कारण या आंदोलनांना चर्चचा पाठिंबा होता. भाषा माध्यमाची चळवळही गोमंतकीय बहुजनसमाजाची आहे आणि त्यांना कस्पटासमान लेखण्याची सरकारची प्रवृत्ती आहे. दुर्दैवाने रवी नाईक, सुभाष शिरोडकर, पांडुरंग मडकईकर, बाबू आजगावकर यांच्यासारख्या हिंदू समाजातील नेत्यांनीसुद्धा दिगंबर कामत यांच्यापुढे नांगी टाकली आहे. त्यामुळेच सरकारचे फावले आहे. या पार्श्वभूमीवर गोव्यातील बहुजन समाजाने एकत्र येणे आवश्यक आहे असे श्री. वाघ यांनी म्हटले आहे.
Thursday, 9 June 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment