Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday, 27 December, 2008

रफिक याची सध्या तरी ब्रेनमॅपिंग चाचणी नाही गोवा पोलिस आसामला रवाना

पणजी, दि. २६ (प्रतिनिधी): नौदलाच्या मुख्यालयात संशयास्पद पकडलेला रफिक ऊल नूर इस्लाम (१८) हा पोलिस तपासाला सहकार्य करू लागल्याने त्याची ब्रेंन मॅपिंग किंवा अन्य कोणताही चाचणी होण्याची शक्यता नसल्याची माहिती "एटीएस'चे प्रमुख आत्माराम देशपांडे यांनी दिली. मात्र भविष्यात गरज भासल्यास तो पर्याय राखून ठेवल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान इस्लाम याने पुरवलेल्या माहितीची पडताळणी करण्यासाठी गोवा पोलिसांचे एक पथक आज आसामला रवाना झाले आहे.
संशयित इस्लाम याने गेल्या तीन दिवसांपासून तपास यंत्रणेला चक्रावणारी माहिती देत असल्याने यामागे मोठे षड्यंत्र असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याने सुरुवातीला आपले नाव बनावट नाव पोलिसांना सांगितले. त्याचे मूळ नाव रफिकूल नूर इस्लाम असे असून तो आसामातील धुब्री जिल्ह्यातील रुपसीगावचा रहिवासी आहे.
२००७ मध्ये तो घरातून पळालेला असून तेथील स्थानिक पोलिस स्थानकावर "बेपत्ता' अशी तक्रारही त्याच्याबद्दल नोंद करण्यात आल्याचे देशपांडे यांनी सांगितले.
या एका वर्षात इस्लाम हा कोठे होता, याचा सुगावा त्याने अद्याप पोलिसांना लागू दिलेला नाही. तसेच कडक पहारा असतानाही नौदलाच्या मुख्यालयापर्यंत तो कसा पोचला याचीही माहिती पोलिसांनी उघड केलेली नाही. या घटनेची पोलिस तक्रार नौदलाचे पोलिस अधिकारी आर एस. राठोड यांनी केली आहे. पोलिसांनी इस्लामविरोधात भा.द.सं.च्या ४४७ व ४५२ कलमानुसार गुन्हा नोंद केला आहे.
-----------------------------------------------------
इस्लामबाबत गूढ कायम
संशयित इस्लामचे दहावीपर्यंत शिक्षण झाले आहे. दहावीत तो नापास झाल्यानंतर घरातून बेपत्ता झाला. ज्यावेळी वास्को येथे हात पाय बांधलेल्या अवस्थेत तो सापडला तेव्हा त्याच्या अगंवार एक टी शर्ट, त्यावर जीन जॅकेट व कार्गो पॅंट परिधान केली होती. तसेच त्याच्याकडे कोणतेही हत्यार सापडलेले नाही, अशी माहिती यावेळी श्री. देशपांडे यांनी दिली. त्याच्याकडे केवळ एक बॅग होती आणि त्यात काही कागदपत्रे होती. त्यावर हिंदी भाषेतून लिहिण्यात आलेले असून त्याची तपासणी केली जात असल्याचे ते म्हणाले.
इस्लामला कोणी बांधले, तो एक वर्ष कुठे होता आणि त्याने हे नाट्य यामागील गूढ अजून कायम आहे. त्याचा छडा लावणे हेच सध्या पोलिसांसमोरील मोठे आव्हान ठरले आहे.

धारगळला साकारणार 'हस्तकला ग्राम'

पणजी, दि.२६ (प्रतिनिधी) : गोवा हस्तकला व ग्रामिण लघु उद्योग विकास महामंडळातर्फे पेडणे तालुक्यातील धारगळ येथे "हस्तकला ग्राम' उभारण्याचा निर्णय घेतला आहे.महामंडळाच्या संचालक मंडळाची आज बैठक झाली असता "साऊथ एशियन फाऊंडेशन'कडून सादर करण्यात आलेल्या या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. हा प्रस्ताव सरकारला सादर करण्यात येईल,अशी माहिती महामंडळाचे अध्यक्ष समीर साळगावकर यांनी दिली.
आज पणजी मळा येथील महामंडळाच्या मुख्यालयात बोलावलेल्या पत्रकार परिषदेत अध्यक्ष समीर साळगावकर यांनी ही माहिती दिली. यावेळी व्यवस्थापकीय संचालक एस. व्ही. नाईक हजर होते. "हस्तकला ग्राम' ही एक अनोखी योजना आहे. राज्यातील स्थानिक हस्तकारागिर व कलाकारांना एका ठिकाणी जागा उपलब्ध केली जाईल. तिथे आपल्या वस्तू तयार करण्यासंबंधी सर्व सोयीसुविधा, राहण्याची सोय व बाजारपेठ मिळवून देण्यात येणार आहे.
या ग्रामाची रचनाच ग्रामीण पातळीवर होणार असल्याने ते पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाचे केंद्र ठरणार आहे. या ठिकाणी देशातील इतरत्र कारागिरांना आमंत्रित करून कलेची देवाणघेवाण करण्याबरोबर लघू उद्योगामार्फत स्वयंरोजगारालाही प्रोत्साहन देण्याची योजना असल्याचेही साळगावकर म्हणाले.
या प्रकल्पासंबंधी अलिकडेच नवी दिल्ली येथे उत्तमनगर व उत्तरप्रदेशातील वाराणासी आदी ठिकाणच्या हस्तकला ग्रामांची पाहणी केल्याचे यावेळी श्री. नाईक म्हणाले. यावेळी केंद्रीयमंत्री तथा फाऊंडेशनचे विश्वस्त कपिल सिब्बल व राहुल बारुआ यांच्याशी चर्चा करण्यात आली आहे. हा प्रकल्प गोव्यात उभारण्यास ही संस्था इच्छुक असल्याचे यावेळी सांगण्यात आले. पेडणे तालुक्यातील धारगळ या गावात त्यासाठी सुमारे १५ ते २० एकर जागेची पाहणी करण्यात आली आहे. हा प्रकल्प पूर्णपणे प्रदुषणमुक्त तर असणार आहेच; परंतु तो या परिसराचे खास आकर्षण ठरणार आहे.या ठिकाणी स्थानिक २०० ते २५० कारागिरांना निवासाची सुविधा उपलब्ध करून कामासाठी शेड्स देण्यात येणार आहेत. पेडणे भागात मुबलक हस्तकारागिर असल्याने या जागेची निवड करण्यात आल्याचेही यावेळी सांगण्यात आले. विविध स्वयंसेवा गट व प्रशिक्षित हस्तकारागिरांसाठी रोजगार उपलब्ध करून देण्यासाठीही या प्रकल्पाचा उपयोग होईल,असेही यावेळी सांगण्यात आले.
------------------------------------------------------------
गणेश मूर्तिकारांना जानेवारीअखेरी पैसे
गोवा हस्तकला महामंडळातर्फे राज्यातील चिकण मातीच्या गणेश मूर्तिकारांना प्रत्येक विक्रीस गेलेल्या मूर्तीवर शंभर रुपये अनुदान देण्याची योजना आर्थिक अडचणीमुळे अडकली होती. आता सरकारने त्यासाठी ३२ लाख रूपयांचे सहाय्य मंजूर केले असून येत्या जानेवारी अखेरीस ही रक्कम मूर्तिकारांना वितरीत केली जाईल.महामंडळाकडे सुमारे ३६७ मूर्तिकारांची नोंदणी असल्याचे साळगावकर यांनी सांगितले.

'सनबर्न' नृत्यरजनीस अखेर हिरवा कंदील, राजकीय दबावापुढे गृहखात्याची शरणागती!

पणजी, दि. २६ (प्रतिनिधी) : राज्य सरकारने परवानगी नाकारली तरी "सनबर्न' संगीत महोत्सव होणारच हा दावा आयोजकांनी अखेर खरा करून दाखवलाच. सुरक्षेच्या कारणावरून राज्यातील किनाऱ्यांवरील खुल्या पार्ट्यांवर बंदी घालण्याचा आदेश जारी केलेल्या राज्य सरकारकडूनच आज नाताळ व नववर्षांच्या निमित्ताने आशियातील सर्वांत मोठा "नाईट म्युझिक' महोत्सव समजल्या जाणाऱ्या "सनबर्न' उत्सवाला परवानगी देण्याचा प्रकार घडला. कांदोळी येथे आयोजित होणाऱ्या या महोत्सवाच्या आयोजकांनी आपली राजकीय ताकद वापरून खुद्द गृह खात्यालाच आपला आदेश बासनात गुंडाळण्यास भाग पाडले.
या आयोजनास नकार दिलेला आदेश बदलून परवानगी देण्याचा नवा आदेश जारी करण्यात आल्याने हा सध्या बराच चर्चेचा विषय बनला आहेच परंतु पोलिसांवर दबाव आणून त्यांना तीन वेळा अहवाल सादर करण्यास भाग पाडल्याने पोलिस खाते व वरिष्ठ अधिकारीही बरेच नाराज बनले आहेत. प्राप्त माहितीनुसार म्हापशाचे उपविभागीय पोलिस अधिकारी गुंडू नाईक यांनी २० डिसेंबर रोजी म्हापशाचे उपविभागीय न्यायदंडाधिकारी महेश खोर्जुवेकर यांच्याकडे या पार्टीस परवानगी नाकारण्याची शिफारस केली होती. ही पार्टी खुल्या ठिकाणी होणार असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने ती धोकादायक ठरण्याची शक्यता अहवालात वर्तवण्यात आली होती. पोलिसांनी सादर केलेल्या या अहवालानुसार श्री.खोर्जुवेकर यांनी सदर आयोजकांकडून केलेला अर्ज फेटाळला व या कार्यक्रमाला परवानगी नाकारल्याचे २४ रोजी आयोजकांना सांगण्यात आले. त्यानंतर २५ रोजी पुन्हा एकदा नव्याने पोलिस अहवाल सादर करण्यात आला. या अहवालात आयोजकांकडून सुरक्षेची हमी देण्यात येत असल्याने त्यांना परवानगी देण्यास हरकत नसावी,असे कळवण्यात आले होते. यावेळी सदर कार्यक्रमाची जागा कुंपणाने वेढून, प्रवेशव्दारावर "मेटल डिटेक्टर', खाजगी सुरक्षा रक्षक तशा सुरक्षेचे सर्व उपाय घेण्याचे आश्वासन दिल्याचेही सांगण्यात आले. दरम्यान, यावेळी श्री.खोर्जुवेकर हे मात्र आपल्या निर्णयाशी ठाम राहीले.
एवढे करूनही पोलिसांकडून आज नव्याने अहवाल सादर केला. हा कार्यक्रम किनाऱ्यावर होणार नाही व यावेळी सुरक्षेचे सर्व उपाय घेण्यात आले असून त्यांना परवानगी देण्यात यावी,अशी शिफारस करण्यात आली. यावेळी आयोजकांकडून अग्निशमन दल, वीज खाते व जमीन मालकाकडून ना हरकत दाखला आणण्याची सक्ती करण्यात आली. बार्देश तालुक्यातील कांदोळी येथे "सनबर्न' या कंपनीतर्फे महा संगीत महोत्सवाचे आयोजन केले जाते. यंदा हा महोत्सव २७ ते २९ डिसेंबर या काळात होणार आहे. या संगीत रजनीसाठी देशविदेशातील बड्या कलाकारांना आमंत्रित केले जाते. या महोत्सवाची जाहिरात आंतरराष्ट्रीय पातळीवर करून खास या पार्टीत सहभागी होण्यासाठी गोव्यात पर्यटक येत असतात. गेल्या काही वर्षांत उत्तर गोव्यातील नाताळ व नववर्षाच्या काळातील सर्वांत मोठे आकर्षण बनलेल्या या पार्ट्या यंदा सुरक्षेच्या कारणांमुळे बंद होणार असल्याने आयोजकांचे धाबे दणाणले आहेत.
आयोजकांनी आपले नियोजित कार्यक्रम होण्यासाठी सरकार दरबारी जोरदार प्रयत्न चालवले होते. कळंगुटचे आमदार आग्नेल फार्नंडिस यांनी यासंबंधी मुख्यमंत्री तथा गृहमंत्र्यांशीही वारंवार चर्चा केल्याचीही खात्रीलायक माहिती मिळाली आहे. मुळातच या पार्ट्यांत मोठ्या प्रमाणात अमलीपदार्थाचे व्यवहार होत असल्याचीही चर्चा सुरू होती. यावेळी मात्र आयोजकांनी "अमलीपदार्थ मुक्त' पार्टी होणार असल्याचे घोषित करून यंदाच्या या महोत्सवात शांतता व विश्वबंधुत्वाचा पुरस्कार करण्याचे जाहीर केले होते. या महोत्सवात "फुड स्टॉल्स', मनोरंजनात्मक कार्यक्रम,फ्ली मार्केट अशा अनेक गोष्टींचा सहभाग असतो. यासंबंधी उत्तर गोव्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी स्वप्नील नाईक यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या पार्ट्यांना म्हापशाचे उपविभागीय अधिकाऱ्यांनी कळंगुट पोलिसांच्या शिफारशीवरून परवानगी नाकारल्याची माहिती आपल्याकडे आहे. या कार्यक्रमांना परवानगी दिल्याचे आपल्याला काहीही माहिती नाही,असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.
गृहमंत्री काय करताहेतः उपेंद्र गावकर
खुल्या पार्ट्यांवर बंदी घालूनही "सनबर्न' कार्यक्रमाला परवानगी देण्याची कृती धोकादायक आहेच; परंतु गृहखात्याची विश्वासाहर्ता घालवणारी ठरली आहे. कधीकाळी गृहमंत्री म्हणून गाजलेले रवी नाईक आता एवढे नरम व शांत कसे काय,असा सवाल शिवसेना राज्य प्रमुख उपेंद्र गावकर यांनी केला. आपल्या निर्णयाशी ठाम राहणे या सरकारला जमतच नसून वारंवार निर्णयात फेरफार करून हसे करून घेण्याची सवयच या सरकारला जडली आहे,अशी टीकाही त्यांनी केली. गृहमंत्र्यांनी राज्याच्या सुरक्षेशी तडजोड करू नये व राजकीय दडपणाला अजिबात बळी पडता कामा नये. या पार्ट्या बंद झाल्याच पाहीजेत,अशी मागणी गावकर यांनी केली.

आयटी क्षेत्रात ५० हजार नोकऱ्या जाण्याची शक्यता

बंगलोर, दि. २६ : आगामी सहा महिन्यात आयटी क्षेत्रातील ५० हजार जणांना घरी बसावे लागणार आहे. आर्थिक मंदीमुळे जगभरातच आयटी आणि बीपीओ क्षेत्रावर परिणाम झाला असून आयटीसंदर्भातील निर्यातही मंदावली आहे. त्यामुळे सहा महिन्यात या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात नोकर कपात होण्याची शक्यता आहे.
सप्टेंबर ते डिसेंबरदरम्यान आयटी आणि बीपीओ क्षेत्रातील मध्यम स्वरूपाच्या कंपन्यांनी दहा हजार जणांना घरी बसविण्याचा निर्णय घेतला होता. आता आर्थिक मंदीची झळ मोठ्या व लहान आयटी कंपन्यांनाही बसू लागेल व किमान ५० हजार जणांना नोकरी गमवावी लागेल, अशी शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे. मंदीची झळ पोहोचली असल्यामुळे आगामी काळात आयटी कंपन्या कर्मचाऱ्यांपुढे वेतन, भत्ते कपातीचा प्रस्ताव ठेवतील. मात्र, तेजीचे वातावरण निर्माण होईपर्यंत म्हणजेच किमान १२ ते १६ महिन्यांपर्यंत घरी बसण्याचा पर्याय आयटी प्रोफेशनल्स स्वीकारतील अशी शक्यताही व्यक्त केली जात आहे.

पाकिस्तानी लष्कर सीमेवर तैनात जवानांच्या सुट्या रद्द

इस्लामाबाद, दि. २६ : भारतासोबतच्या संबंधांमधील तणाव लक्षात घेऊन पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय सीमेसह आपल्या अखत्यारीतील पाकव्याप्त परिसरातही लष्कर तैनात केले आहे.
"टाईम्स' या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, पाकमधील संरक्षण मंत्रालय सध्या सीमेवरील सैनिकांच्या हालचालींविषयी काहीही माहिती देण्यास टाळाटाळ करीत आहेत. पण, प्राप्त माहितीनुसार लाहोर सेक्टरमध्ये सीमेवर नव्याने सैैनिकांची तैनाती केली जात आहे. महत्त्वपूर्ण ठिकाणांच्या सुरक्षेसाठी जागोजागी सुरक्षा कडे उभारले जात आहेत. आंतरराष्ट्रीय नियंत्रण रेषा आणि सीमेवर अतिरिक्त लष्कर तैनात करण्यात आले आहे. दरम्यान पाकी लष्करातील जवानांच्या सुट्याही रद्द करण्यात आल्या आहेत.
पाकी लष्कराच्या १० व्या ब्रिगेडला लाहोरला पाठविण्यात आले असून तिसऱ्या आर्म ब्रिगेडला झेलम येथे पाठविण्यात आले आहे. लष्कराच्या दहाव्या आणि अकराव्या डिव्हिजनला अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.
पाकिस्तानी वायूसेनेलाही हाय अलर्टचा आदेश देण्यात आल्याचे काही पाकी वृत्तपत्रांचे म्हणणे आहे. दोन्ही देशांचे नेते युद्धाची शक्यता नाकारीत असले तरी पाकने संरक्षण मंत्रालयाला पूर्ण तयारीत ठेवले आहे.

अभियंता हत्या प्रकरण: आमदार शेखरी तिवारीवर रासुका

औरय्याच्या पोलिस अधीक्षकांना हटविले
सीबीआय चौकशी व्हावी : सपा

लखनौ, दि. २६ : उत्तरप्रदेशातील अभियंता मनोज गुप्ता हत्या प्रकरणी औरय्या येथील पोलिस अधीक्षक अकरामुल हक यांना तात्काळ हटविण्यात आले आहे. त्यांच्या जागी गोरखपूर जीआरपीमधील एसपी नचिकेत झा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणातील आरोपी आमदार शेखर तिवारी याच्यासह तीन जणांवर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यान्वये कारवाई केली जाणार असल्याचेही वृत्त आहे.
औरय्या येथील आयजी भानुप्रताप सिंग यांनी सांगितले की, पीडब्ल्यूडीतील अभियंता मनोज कुमार गुप्ता यांच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी अटकेत असणाऱ्या आमदार शेखर तिवारी यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यान्वये कारवाई केली जाणार आहे. या आमदाराला साथ देणाऱ्या दिबियापूर येथील कोतवाल होशियार सिंग यांच्यावरही वरिष्ठ अधिकारी नाराज आहेत. मरणासन्न स्थितीतील गुप्ता यांना जेव्हा तिवारी आणि त्यांचे साथीदार दिबियापूर येथील ठाण्यात घेऊन गेले तेव्हा ताबडतोब त्यांना दवाखान्यात न नेता होशियार सिंग यांनीही गुप्ता यांना मारहाण केली. घटनास्थळी गुप्ता यांच्या केसाचा पुंजका सापडला असून तो पुरावा म्हणून ठेवण्यात आला आहे.
दरम्यान, अभियंता गुप्ता यांच्या हत्येप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी आज समाजवादी पार्टीने केली आहे. गुप्ता यांच्या हत्येने बसपाची अराजकता समोर आली असून त्यांनी केवळ आपल्या गुंडगिरी प्रवृत्तीच्या आमदारांचा बचाव करण्यासाठी सीबीआय चौकशीविषयी टाळाटाळ केल्याचे सपाचे म्हणणे आहे.

तेल कंपन्यांना पेट्रोल मिळतय् पाण्यापेक्षाही स्वस्त!

मुंबई, दि. २६ : जागतिक बाजारपेठेत कच्चा तेलाचे भाव दिवसेंदिवस कमी होत आहेत. जागतिक मंदीचा परिणाम म्हणून की काय १५० डॉलर्स प्रतिपिंप एवढी विक्रमी वाढ, आता अचानक कमी होऊन आज ती ३६ डॉलर्स प्रतिपिंपपर्यंत कमी झालेली आहे. या कमी झालेल्या किमतीमुळेच भारतातील तेल कंपन्यांना पेट्रोल आणि डिझेल बिसलरीपेक्षाही म्हणजेच पाण्यापेक्षाही स्वस्त मिळत आहे.
सरकारी तेल कंपन्यांना सध्या पेट्रोल फक्त ११ रुपये लीटर व डिझेल १३ रुपये लीटर इतक्या कमी किमतीत मिळत आहे. यात वाहतूक आणि इतर खर्चांचा समावेश करण्यात आलेला नाही. या किमतींची बिसलरी बॉटल्समध्ये मिळणाऱ्या मिनरल वॉटरसोबत तुलना केली तर भारतीय कंपन्यांना पेट्रोल व डिझेल या वॉटर बॉटलपेक्षाही कमी दरात मिळत आहे. आज भारतीय बाजारपेठांमध्ये एक लीटरच्या मिनरल वॉटर बॉटलची किमत १२ ते १५ रुपये दराने उपलब्ध आहे.
एका पिंपात (बॅरलमध्ये) १९० लीटर कच्चे तेल असते. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत एका पिंपाचा भाव ३८ डॉलर आहे. म्हणजेच कच्च्या तेलाची किमत प्रती लीटर अवघी दहा रुपये होते. (ही किमत प्रती डॉलर ५० रुपये या विनिमय दरावर आधारित आहे.) प्रत्येक बॅरलमधील कच्च्या तेलाच्या शुद्धीकरणानंतर सरासरी २८-२९ लीटर पेट्रोल व ८५ लीटर डिझेल तयार होते. अर्थात तेल शुद्धीकरण प्रकल्पातले तंत्रज्ञान आणि कच्च्या तेलाच्या दर्जावर आधारित उत्पादनाची सरासरी अवलंबून असते. जर इतर कोणतेही कर आणि शुल्क नसतील तर इंधनाची किमत प्रती लीटर किती पडेल, ही आकडेवारी काढणे तसे गुंतागुंतीचे आहे. त्याचे कारण केंद्र व राज्य सरकारचे कर आणि लेव्ही तसेच विक्रेत्यांचे कमिशन, वाहतूक खर्चाची लेव्ही या सर्वांची बेरीज करून किमत निर्धारित करण्यात येते. हे सर्व कर आणि लेव्ही पेट्रोल आणि डिझेलच्या विक्री किमतीच्या जवळपास ४५-५५ टक्के व्यापतात. म्हणूनच दिल्लीत पेट्रोल ४५ रुपये लीटर भावात उपलब्ध होते. त्यात कर आणि लेव्ही २२ रुपये आणि सरकारी तेल कंपन्यांचा १२ रुपये नफा समाविष्ट असतो. हीच बाब डिझेलचीही आहे. दिल्लीत डिझेल ३२ रुपये लीटरप्रमाणे विकत मिळते. यात कच्च्या तेलाची किमत असते फक्त १३ रुपये लीटर. एक लीटर डिझेलमागे तेल कंपन्यांना तीन रुपयांचा फायदा होतो.
कच्च्या तेलापासून पेट्रोल आणि डिझेलप्रमाणेच केरोसिन, विमानाचे इंधन, गॅस आणि नाफ्थ्याचेही उत्पादन करण्यात येते आणि त्याचा परिणाम अंतिम किमत निश्चितीवर होतो.
ही सारी पार्श्वभूमीवर बघता पेट्रोल आणि डिझेलचे भाव कमी का होत नाही, असा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे. मधल्या काळात कच्च्या तेलाचे भाव वाढले असताना आणि गॅसवर दिली जाणारी सबसिडी लक्षात घेता तेल कंपन्यांना मोठ्याप्रमाणावर नुकसान सहन करावे लागले होते. हे नुकसान भरून काढण्याची संधी या निमित्ताने उपलब्ध झाली असल्यामुळेच सध्या पेट्रोल आणि डिझेलचे भाव कमी करण्यात आलेले नाहीत. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ते निश्चितच कमी होतील, असा जाणकारांचा अंदाज आहे. तोपर्यंत तेल कंपन्यांनाही आपले नुकसान भरून काढण्याची संधी आणि अवधी उपलब्ध आहे, हे येथे उल्लेखनीय.

Friday, 26 December, 2008

पाकिस्तानने अणुबॉम्ब फेकल्यास बंकरचा आधार

भारत- पाक संबंधातील सध्याच्या तणावाचे पर्यवसान युद्धात झाले तर आणि आण्विक युद्ध छेडले गेले तर परिस्थितीला तोंड देण्यासाठी भारतीय संरक्षण यंत्रणा सज्ज आहे. "नो फर्स्ट यूज'चे आश्वासन दिले असतानाही पाकिस्तानने आण्विक हल्ला केलाच तर महासंहारक किरणांपासून लोकांचे संरक्षण करण्यासाठी डीआरडीओने खास बंकर तयार केले आहे , अशी माहिती "डीआरडीओ'चे (संरक्षण संशोधन व विकास संस्थेचे) मुख्य नियंत्रक डब्ल्यू सेल्वमुर्ती यांनी दिली.
आण्विक , जैविक किंवा रासायनिक , कोणत्याही प्रकारचा हल्ला परतावून लावण्यास भारताची संरक्षण यंत्रणा सज्ज असल्याचं सेल्वमुर्ती यांनी सांगितलं. आण्विक हल्ल्याच्या काळात जनतेसाठी छोटे छोटे निवारे , रेडिएशनपासून बचाव करण्याचे यंत्र आणि हवेतून पूर्वसूचना देणारी यंत्रणा विकसित करण्यात आली असल्याचं त्यांनी सांगितलं.
आपल्या दिशेनं येणारे मिसाइल ५० किलोमिटर लांब अंतरावर हवेतच नष्ट करण्याची क्षमता असलेले इंटरसेप्टिव मिसाईल सिस्टीम विकसित करण्यात आली आहेत. या यंत्रणेची पूर्वीच चाचणीसुद्धा झाली असल्याचं ते म्हणाले.
अत्याधुनिक अशा लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्टची दोन दिवसांपूर्वी लेहमध्ये शून्य तापमानात यशस्वी चाचणी झाल्याचेही त्यांनी सांगितले. २०१० पर्यंत एअर फोर्समध्ये २० लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट दाखल होतील अशी माहिती सेल्वमूर्ती यांनी दिली.

पाकिस्तानी फौजा सीमेवर

नवी दिल्ली व इस्लामाबाद, दि. २५: मुंबईवरील भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर बिघडत चाललेल्या भारत व पाकिस्तान यांच्यातील संबंधांची गाडी धोक्याच्या वळणावर पोहोचली आहे. आतापर्यंत भारताला केवळ शाब्दिक धमक्या देणाऱ्या पाकिस्तानने राजस्थानलगतच्या सीमेनजीक सैनिकांच्या अनेक तुकड्या दाखल केल्या असून आघाडीच्या हवाई तळांवर लढाऊ विमानेही सज्ज ठेवली आहेत. त्यापाठोपाठ केंद्रातील डॉ. मनमोहनसिंग सरकारने राजस्थानच्या सीमाभागातील गावांना कधीही स्थलांतरास सज्ज राहण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे उभय देशांच्या फौजा आमने-सामने डोळ्याला डोळा भिडवण्याच्या स्थितीत येतील, अशी चिन्हे आहेत.
मुंबईवरील हल्ल्यामागे आपल्याच देशातील दहशतवादी असल्याचे सत्य कबूल करण्यास पाक अद्याप तयार नाही. त्यातूनच उभय देशांतील संघर्ष चिघळत चालला आहे. मंगळवारी दोन्ही देशांच्या नेत्यांची वक्तव्ये 'युद्ध होणार नाही' असा सूर लावणारी होती. मात्र बुधवार उजाडला आणि तो सूर बदलत गेला. लाहोर, कराची व इस्लामाबाद या प्रमुख शहरांवर पाकच्या लढाऊ विमानांनी मंगळवारीही टेहळणी घिरट्या घातल्याचे स्पष्ट झाले. त्यापाठोपाठ महत्त्वाची खबर आली ती पाक सैनिकांच्या तुकड्या बाडमेरजवळच्या सीमेवर दाखल होत असल्याची. आतापर्यंत या प्रदेशात पाकचे केवळ रेंजर्सच तैनात होते. मात्र, बुधवारी त्यात सैनिक तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही भर पडली. सीमा सुरक्षा दलाचे अतिरिक्त महासंचालक बंसल यांनी स्वत: त्यास दुजोरा दिल्याने परिस्थितीचे गांभीर्य वाढले.
या प्रकाराची तातडीची दखल केंद सरकारने घेतली आणि राजस्थान सरकारला पत्र धाडले. 'पाक सैन्याचा हालचाली पाहता सीमेलगतची गावे इतरत्र स्थलांतरीत करण्याची वेळ कधीही येऊ शकते. त्यासाठी तयार रहा' असे त्या पत्रात म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कराने केलेल्या हालचालींची माहिती रात्री उशिरापर्यंत हाती आली नव्हती.

... तर पाक बेचिराख

नवी दिल्ली, दि. २५: वेळोवेळी दम देऊनही पाकिस्तान अतिरेक्यांचे तळ संपवणार नसेल, तर भारताला कठोर पावले उचलावीच लागतील. भारताशी युद्धाला सज्ज असण्याची भाषा पाकने करू नये. पाकने युद्ध पेटवलेच तर त्यात तो देशच बेचिराख होईल , असा सज्जड दम पश्चिम विभागाचे एअर कमांडिग ऑफिसर इन चीफ, एअर मार्शल पी. के. बोरबोरा यांनी भरला आहे.
कोणताही हल्ला परतवून लावण्याची क्षमता भारतापाशी आहे. दहशतवादी तळ नष्ट करायचे सोडून पाक युद्धासाठी चिथावणी देत आहे. तथापि, त्यांच्या युद्ध सरावाला पाहून आम्ही डरणार नाही , असेही बोरबोरा यांनी स्पष्ट केले.
उपग्रहांनी पाठवलेल्या माहितीच्या आधारे नकाशे तयार करण्यात आले आहेत. त्यानुसार हल्ल्यासाठी सज्ज राहण्याचे संदेश हवाई दलाला पोहचले आहेत. अत्याधुनिक रॉकेट आणि आधीच निश्चित केलेल्या लक्ष्यावर थेट मारा करणारे बॉम्ब सज्ज आहेत. तसेच वेळ पडली तर कारवाई आम्हाला सहज शक्य आहे. फक्त कारवाईच नाही तर पाकिस्तानी हवाई हल्ल्यापासून देशाला संरक्षण पुरवण्याचीही आमची क्षमता आहे , असा विश्वास बोरबोरा यांनी व्यक्त केला.
जगातील सर्वात मोठ्या चार हवाई दलांमध्ये भारतीय हवाई दलाचा समावेश होतो. दोन तासात देशातील सगळ्या प्रमुख शहरांना आणि संवेदनशील ठिकाणांना संरक्षण देण्याची ताकद आमच्यात आहे. भारताची पश्चिम एअर कमांड ही जगातल्या सर्वात मोठ्या आठ एअर कमांडपैकी एक आहे , असेही त्यांनी सांगितले.
सरकारने आदेश दिला तर पाकिस्तानात असलेले अतिरेकी तळ उद्ध्वस्त करण्यासाठीही तयारी केल्याचे त्यांनी सांगितले. त्यासाठी पाच हजार जागा आधीच निश्चित करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.

बनावट कागदपत्रांद्वारे प्रचंड जमिनीची विक्री

- पर्वरी पोलिसांत तक्रार दाखल
- टोळी सक्रिय असण्याची शक्यता
- बोगस सही-शिक्क्यांचा वापर

पणजी, दि. २५ (प्रतिनिधी): बनावट कागदपत्रांद्वारे पर्वरी साल्वादोर द मुंद येथील सुमारे १४१०० चौरसमीटर जागा दिल्लीतील "समिहा इंटरनॅशनल बिल्डर्स'ला विकल्याप्रकरणी दिएगो फर्नांडिस यांच्याविरोधात पर्वरी पोलिस स्थानकात बनवेगिरीची तक्रार दाखल करण्यात आली आहे. ही बनावट कागदपत्रे बनवण्यासाठी सरकारी शिक्के तसेच मामलेदार व उपनिबंधक कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या सह्यांचाही वापर करण्यात आल्याने या संपूर्ण प्रकरणात एखादी टोळी सक्रिय असावी, अशी शक्यताही या तक्रारीत व्यक्त करण्यात आली आहे. त्यासाठी या खात्यातील अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
प्राप्त माहितीनुसार पर्वरी साल्वादोर द मुंद येथील सर्व्हे क्रमांक १६२/१ या "गोळाचे वेरीक' जागेचे सहहक्कदार डॉ.मीनाक्षी मार्टिन्स व बिस्मार्क फाचो यांनी वेगवेगळ्या तक्रारी दाखल केल्या आहेत. याच जागेची एक सहहक्कदार ऍना सेवरीना परेरा यांच्याकडून आपल्या नावे खोटी "पॉवर ऑफ ऍटर्नी' तयार करून दिल्लीस्थित "समिहा इंटरनॅशनल बिल्डर्स' या कंपनीबरोबर बनावट विक्री करार करण्यात आल्याचा ठपका या तक्रारीत ठेवला आहे. दरम्यान,बिस्मार्क फाचो यांनी दिलेली माहिती त्याहूनही धक्कादायक असून एकूण सहा सर्व्हे क्रमांकांची बनावट विक्रीखते तयार करून विविध ठिकाणी या जागा बॅंकेत गहाण ठेवून लाखो रुपये उकळल्याचीही माहिती प्राप्त झाली आहे. ही खोटी कागदपत्रे तयार करताना सरकारी शिक्के व अधिकाऱ्यांच्या सह्यांचा ज्या पद्धतीत वापर करण्यात आला आहे,त्यानुसार यामागे एखादे टोळकेच असावे हे स्पष्ट होत चालले असून पोलिसांनी तात्काळ या टोळीचा पर्दाफाश करावा,अशी मागणी तक्रारदारांनी केली आहे.
दरम्यान,या कागदपत्रांसंबंधी तिसवाडी उपनिबंधकांकडे चौकशी केली असता सदर विक्रीखते या कार्यालयात नोेंद झाली नसल्याचे सांगून ती बनावट असल्याचे स्पष्टपणे सांगितले आहे. जागेच्या मालकांना काहीही सुगावा लागणार नाही याची दक्षता घेऊनच परस्पर जागा हडप करण्याचे असे प्रकार सर्रास सुरू आहेत. त्यासाठी सरकारी शिक्के व कागदपत्रांचाही वापर होत असल्याने हा प्रकार उघडकीस आल्यास या टोळीचा पर्दाफाश होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

त्या संशयिताला ७ दिवस कोठडी

- कसून चौकशी सुरू
- पोलिसांची दिशाभूल
- अद्याप धागेदोरे नाहीत

पणजी, दि. २५ (प्रतिनिधी): वास्को येथे नौदल मुख्यालयात संशयास्पद सापडलेल्या शराफ नूर इस्लामिक (रा. आसाम) नावाच्यासंशयिताकडून अद्याप कोणतेही महत्त्वाचे धागेदोरे तपास यंत्रणेला मिळालेले नसून आज सकाळी त्याला वास्को प्रथमवर्ग न्यायदंडाधिऱ्यांसमोर उभे करून सात दिवसांची पोलिस कोठडी मिळवण्यात आली. काल सकाळपासून राज्य व केंद्रीय गुप्तचर यंत्रणा त्याची कसून चौकशी करीत आहेत. तथापि, तो परस्परविरोधी माहिती देत असल्याने तपास अधिकारीही चक्रावले आहेत.
या तरुणाने आपण आसाममधे राहत असल्याची माहिती दिली आहे. तो आसामातील धुब्री जिल्ह्यात राहणारा असून त्याचे वडील व्यवसायाने शिंपी असल्याची माहिती मिळाली आहे. दोन वर्षांपासून तो घरून पळाल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे तपास यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत.या कालवधीत शराफ कुठे होता, याचा तपास सध्या सुरू आहे.
कालपासून शराफने तपास यंत्रणेला दिशाभूल करणारी माहिती देण्याची सत्र आरंभले आहे. अटक केल्यानंतर त्याने सर्वांत आधी पोलिसांना सांगितले की, आपल्याबरोबर अन्य दोघे साथीदार होते. त्यांनी आपल्याला नौदल मुख्यालयात हातापाय बांधून सोडले अशी माहिती दिली. त्यानंतर आपण पाकिस्तानातून आलो असून माझ्यावर दहशतवादी होण्यासाठी दबाव टाकला जात होता, असे त्याचे म्हणणे आहे. ही माहिती पोलिसांच्या गळी उतरत नसल्याने त्याने नवीन कहाणी पोलिसांना सांगितली. "मी दोन दिवसापूर्वीच नोकरीच्या शोधात गोव्यात आलो. तथापि, कोठेही नोकरी न मिळाल्याने शेवटी ही शक्कल लढवली. नौदलाच्या कुंपणावरून उडी घेऊन मीच स्वतःला बांधून घेतले. तसेच माझ्या बॅगेत आहेत ती कागदपत्रे मिळाली ती मीच माझ्या हाताने लिहलेली आहेत'. अर्थात, पोलिस त्या लिखाणाची आता चाचणी घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

'सनबर्न' संगीत रजनीच्या आयोजनावरून गोंधळ, परवानगी नाकारली तरीही आयोजक कार्यक्रम करणारच

पणजी, दि. २५ (प्रतिनिधी): गोव्यातील नाताळ व नववर्षांच्या निमित्ताने आशियातील सर्वांत मोठा नाइट "म्युझिक' महोत्सव असलेल्या "सनबर्न' उत्सवाला सुरक्षेच्या कारणांत्सव परवानगी नाकारण्याचा निर्णय म्हापशाचे उपविभागीय अधिकारी महेश खोर्जुवेकर यांनी घेतला खरा; परंतु आयोजकांनी मात्र सरकारकडून या कार्यक्रमाला परवानगी दिल्याचा दावा केल्याने कमालीचा संभ्रम निर्माण झाला आहे. याप्रकरणी कळंगुट पोलिसांनी पाठवलेल्या अहवालानुसार या पार्ट्यां सुरक्षेच्यादृष्टीने धोकादायक ठरण्याची शक्यता वर्तविल्याने ही परवानगी नाकारण्यात आली आहे. तथापि, या महोत्सवाचे संचालक व्ही.जे.निखिल चिन्नपा यांनी हा महोत्सव शंभर टक्के होणार असल्याचे एका वृत्तसंस्थेशी बोलताना स्पष्ट केले आहे.
बार्देश तालुक्यातील कांदोळी येथे "सनबर्न' या कंपनीतर्फे महा संगीत महोत्सवाचे आयोजन केले जाते. यंदा हा महोत्सव २७ ते २९ डिसेंबर या काळात होणार होता. या संगीत रजनीसाठी देशविदेशातील बड्या कलाकारांना आमंत्रित केले जाते. या महोत्सवाची जाहिरात आंतरराष्ट्रीय पातळीवर करून खास या पार्टीत सहभागी होण्यासाठी गोव्यात पर्यटक येत असतात. गेल्या काही वर्षांत उत्तर गोव्यातील नाताळ व नववर्षाच्या काळातील सर्वांत मोठे आकर्षण बनलेल्या या पार्ट्या यंदा सुरक्षेच्या कारणांमुळे बंद होणार असल्याने आयोजकांचे धाबे दणाणले आहेत.
राज्य सरकारने खुल्या किनारी पार्ट्यांवर बंदी घालण्याचा आदेश काढण्यापूर्वी या आयोजकांनी आपले नियोजित कार्यक्रम होण्यासाठी सरकार दरबारी जोरदार प्रयत्न चालवले होते. कळंगुटचे आमदार आग्नेल फार्नंडिस यांनी यासंबंधी आयोजकांना घेऊन मुख्यमंत्री तथा गृहमंत्र्यांशीही वारंवार चर्चा केल्याचीही खात्रीलायक माहिती मिळाली आहे. मुळातच या पार्ट्यांत मोठ्या प्रमाणात अमलीपदार्थाचे व्यवहार होत असल्याचीही चर्चा सुरू होती. यावेळी मात्र आयोजकांनी "अमलीपदार्थ मुक्त' पार्टी होणार असल्याचे घोषित करून यंदाच्या या महोत्सवात शांतता व विश्वबंधुत्वाचा पुरस्कार करण्याचे जाहीर केले होते. या महोत्सवात "फुड स्टॉल्स', मनोरंजनात्मक कार्यक्रम,फ्ली मार्केट अशा अनेक गोष्टींचा सहभाग असतो. दरम्यान,या कंपनीचे मुख्य अधिकारी मनुज आगरवाल यांनी यापूर्वी सांगितल्याप्रमाणे हा महोत्सव खुल्या किनाऱ्यांवर न करता खाजगी जागेत होतो; तसेच या ठिकाणी प्रवेशव्दारावर कडक बंदोबस्त तसेच सभोवताली कठडा उभारण्याची तयारी परवानगी पत्रात दर्शवली होती. यासंबंधी उत्तर गोव्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी स्वप्नील नाईक यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या पार्ट्यांना म्हापशाचे उपविभागीय अधिकाऱ्यांनी कळंगुट पोलिसांच्या शिफारशीवरून परवानगी नाकारल्याची माहिती आपल्याकडे असल्याचे सांगितले. त्यानंतर गृहखात्याकडून त्यांना वेगळी परवानगी मिळवल्याची आपल्याला कोणतीही माहिती नाही,असा खुलासा त्यांनी केला.

कारवारामध्ये प्रचार संपला

कारवार, दि. २५ (प्रतिनिधी): येथील विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी गेल्या काहीदिवसांपासून सुरू असलेला प्रचाराचा धडाका अखेर आज सायंकाळी संपला. भारतीय जनता पक्षातर्फे आनंद असनोटीकर तर कॉंग्रेसतर्फे सतीश सैल या निवडणुकीत परस्परांसमोर उभे ठाकले असून मतदान शनिवार दि. २७ रोजी होणार आहे.
काही महिन्यांपूर्वी झालेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या वेळी आनंद असनोटीकर हे कॉंग्रेसच्या तिकीटावर निवडून आले होते; तथापि, नंतर आपल्या आमदारकीचा राजीनामा देऊन ते भाजपमध्ये दाखल झाले. असनोटीकर हे माजी आमदार वसंत असनोटीकर यांचे सुपुत्र होत.

हिंदूंचा दबावगट हवाच नरेंद्राचार्य स्वामीजींहस्ते दक्षिण उपपीठाची स्थापना


ओल्ड गोवा येथे जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराजांच्या दक्षिण पीठ मठात श्री शिवमूर्तीची प्रतिष्ठापना करताना रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज. (छाया: प्रमोद ठाकूर)

ओल्ड गोवा, दि.२५ (प्रतिनिधी): हिंदू धर्मावरील अत्याचार, अन्याय निवारण्यासाठी सर्व हिंदूंनी एकजूट होऊन दबावगट निर्माण करण्याची नितांत गरज आहे, असे प्रतिपादन जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांनी आज येथे केले. यावेळी प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता.
जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज यांच्या दक्षिण उपपीठाची स्थापना ओल्ड गोवा येथे करण्यात आली असून या पीठाच्या पीठारोहण सोहळ्यासाठी नरेंद्राचार्य महाराज येथे आले आहेत. यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज म्हणाले की, हिंदू समाज एकसंध नसल्याने धर्मांतरे, मूर्ती तोडफोड, गोहत्या आदी प्रकारांत वाढ होत असून हिंदू समाज गलितगात्र बनला आहे. हिंदू समाजाला राजाश्रय नसल्याने ही अवस्था निर्माण झाली आहे. मुस्लिम, ख्रिस्ती समाजाने आपला दबावगट निर्माण केला आहे. तसाच दबावगट हिंदूंनी एकत्र येऊन करण्याची नितांत गरज आहे.
मालेगाव येथील बॉम्ब स्फोट प्रकरणाशी स्वाध्वी प्रज्ञा याचा संबंध आल्यानंतर देशभरात हिंदू दहशतवाद म्हणून काही राजकारणी आणि मीडियाकडून ओरड केली जाऊ लागली. मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानातील मुस्लीम समाजातील युवक गुंतल्याचे उघडकीस आले आहे. मात्र, या हल्ल्याला इस्लामिक दहशतवाद म्हणायला राजकारणी किंवा मीडियासुध्दा पुढे आला नाही, अशी खंत नरेंद्राचार्य स्वामींनी व्यक्त केली.
हिंदू धर्माला बदनाम करण्याचे षड्यंत्र रचण्यात आले आहे. मुस्लिम व ख्रिस्ती समाजाच्या एक गठ्ठा मतावर डोळा ठेवून त्यांच्या विरोधात चुकूनही "ब्र' काढला जात नाही. हिंदूंनी दबाव गट निर्माण केल्याशिवाय राजाश्रय मिळणे कठीण आहे. मुस्लिम व ख्रिस्ती लोक आपल्या धर्मगुरूंच्या आज्ञेनुसार वागतात. मुस्लिमांच्या देवाचे हास्यचित्र काढण्यात आले तेव्हा सर्व मुस्लिम रस्त्यावर आले होते.संबंधितांना नंतर ते हास्यचित्र (कार्टून) मागे घेऊन माफी मागावी लागली. हिंदूंच्या बाबतीत अशा प्रकारे कुठल्याही अन्यायाविरोधात लोक एकत्र झालेले दिसत नाहीत. हिंदूंनीही आपल्या धर्मगुरूंच्या आज्ञेनुसार वागण्यास सुरुवात केली तरच त्यांना भविष्यात न्याय मिळू शकतो. हिंदूंवर अनेक बंधने घालण्यात आली आहे. हिंदूंनी कुटुंब नियोजन करायचे. मुस्लिमांना कुंटुब नियोजन नाही. त्यामुळे भविष्यकाळात हिंदू अल्पसंख्याक होणार आहे. हिंदू विचारसरणीचे उमेदवार जेव्हा सत्तेवर येतील तेव्हाच हिंदूंना न्याय मिळू शकतो, असेही स्वामींनी सांगितले.
जुने गोवा येथे पूर्वी शंकराचे मंदिर होते. त्यामुळे या पीठात शंकराच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. ह्या पीठावर नियमित कार्यक्रम होणार आहेत. ह्या पीठावरून हिंदू समाज संघटित करण्याचे काम केले जाणार आहे. धर्मांतर झालेल्या देशातील विविध भागांतील सुमारे ६७ हजार हिंदूंना पुन्हा धर्मात प्रवेश देण्यात आला आहे.
स्वाभिमानी हिंदुत्ववादी संघटनांना एकत्रित करण्यासाठी तसेच गोव्यात समस्त हिंदू बांधवांना एकत्र येण्यासाठी या उपपीठाच्या रूपाने सुवर्णसंधी मिळाली आहे. हिंदू धर्मावरील अत्याचार आणि होणारी धर्मांतरे रोखण्यासाठी या धर्मपीठाच्या माध्यमातून अधिक कार्य साकार होऊ शकते. शैव, वैष्णव असा भेदाभेद विसरून हिंदू धर्मीयांनी संघटित राहण्याची आजच्या काळाची सर्वांत मोठी गरज आहे. यासाठी प्रत्येकाने जाती पातीमधील भेदाभेद विसरून आपण हिंदू आहोत याचा अभिमान बाळगावा, असे स्वामींनी सांगितले.
जुना गोवा येथील नियोजित कचरा प्रकल्पाच्या प्रश्नावर बोलताना स्वामी म्हणाले की, यासंबंधी कायदेशीर लढाई सुरू करण्यात आली आहे. याप्रकरणी आम्ही प्रत्यक्ष कृतीच करून दाखविणार आहोत. हिंदू समाजाला राजाश्रय नसल्याने धर्माची चेष्टा केली जात आहे. भारतातील हिंदू धर्म संकटात सापडलेला आहे. त्यामुळे सर्व हिंदूंनी एकत्र येण्याची नितांत गरज आहे, असेही स्वामी म्हणाले.
पीठारोहण सोहळा
वेदमंत्रांच्या घोषात शेकडो भाविकांच्या उपस्थितीत ओल्ड गोवा येथे जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या दक्षिण उपपीठाचा पीठारोहण सोहळा आज (दि.२५) भक्तिमय वातावरणात थाटात पार पडला. या पीठात शिवमूर्तीची प्रतिष्ठापना आणि जगद्गुरूंच्या पादुकांची स्थापना जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज यांच्या हस्ते करण्यात आली. या पीठारोगण सोहळ्याअंतर्गत दिवसभर प्रासाद उत्सर्ग संस्कार, महाआरती, मंत्रपुष्पांजली, क्षमापण आदी धामिक विधी वेदमंत्रघोषात ब्रह्मवृंदांच्या मार्गदर्शनाखाली पार पडल्या. या धर्मपीठामध्ये भगवान शंकराच्या पाच फूट उंच व अत्यंत रेखीव मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. त्यापूर्वी श्री शिवमूर्तीची भव्य शोभायात्रा काढण्यात आली. ओल्डगोवा येथील ग्रामदेवतांना भेटी देण्यात आल्या.

Thursday, 25 December, 2008

वाहतूक उपसंचालक भोसलेंविरोधात तक्रार वाहन नोंदणीत निष्काळजीपणाचा आरोप

पणजी, दि. २४ (प्रतिनिधी): रस्ता वाहतूक खात्याचे उपसंचालक अशोक भोसले यांच्याविरोधात "जय दामोदर संघटने' चे अध्यक्ष महेश नायक यांनी दाखल केलेली गैरकारभाराची तक्रार फोंडा पोलिसांनी नोंद करून घेतली आहे. याप्रकरणी प्रथम चौकशी अहवालाअंतर्गत भोसले यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या ४७१ व ४२० कलमांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
रस्ता वाहतूक खात्यातील वाढत्या भ्रष्टाचाराविरोधात सातत्याने लढा उभा करणाऱ्या महेश नायक यांनी यापूर्वी या खात्यातील अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणे दक्षता खात्याकडे सुपूर्द केली आहेत. सचिवालयात गेल्यावेळी आयोजित केलेल्या संसदीय समितीसमोर महेश नायक यांनी सादर केलेली गैरप्रकाराची प्रकरणे गाजली होती व त्यावेळी त्यांना यासंबंधी दक्षता खात्याकडे ती सुपूर्द करण्याची सूचना करण्यात आली होती. ही प्रकरणे दक्षता खात्याकडे सध्या धूळ खात पडली असताना आता नायक यांनी थेट पोलिस तक्रार करून पुन्हा खळबळ माजवली आहे.
उपसंचालक भोसले यांनी फोंडा कार्यालयात असताना अनेक बनावट पत्यांवर लोकांची वाहने नोंद केल्याचा आरोप त्यांच्याविरोधातील तक्रारीत करण्यात आला आहे. नायक यांनी दिलेल्या माहितीनुसार भोसले हे ०९-०५-१९९३ ते ३१-०१-१९९५, ०३-०८-१९९८ ते १८-०९-१९९८ व २७-०६-२००५ ते ०८-०३-२००७ या काळात फोंडा रस्ता वाहतूक कार्यालयात सेवेत होते.या काळात त्यांनी मोटर वाहतूक कायद्याचे उल्लंघन करून तसेच विक्री फॉर्म २१ वर वाहन खरेदीदाराचा पूर्ण पत्ता न घेताच वाहने नोंद केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. राज्यात गुन्हेगारी प्रकरणांसाठी अशा प्रकारच्या वाहनांचा वापर केला जात असल्याने वाहन मालकाची संपूर्ण माहिती खात्याकडे उपलब्ध असणे गरजेचे असल्याचे नायक म्हणाले. या तक्रारीसोबत नायक यांनी विविध वाहनांचे क्रमांक दिले पोलिसांना सुपूर्द केले असून या वाहनांची नोंदणी करताना निष्काळजीपणा केल्याचा ठपकाही या तक्रारीत ठेवण्यात आला आहे. या तक्रारीची चौकशी तात्काळ करण्यात यावी ,अशी मागणीही त्यांनी केली.

गोवा भयमुक्त: नाताळ, नववर्ष दणक्यात साजरे करा: जैस्वाल

पणजी, दि.२४ (प्रतिनिधी): येत्या नाताळ व नववर्षांच्या पार्श्वभूमीवर गोव्याला दहशतवादी हल्ल्याचा कोणताही धोका नसून केवळ सावधानगिरीचा भाग म्हणून सुरक्षेच्या उपाययोजना आखण्यात आल्याचे स्पष्टीकरण केंद्रीय गृहराज्यमंत्री श्रीप्रकाश जैसवाल यांनी आज पत्रकारांसमोर केले.
आज त्यांनी येथील पोलिस मुख्यालयात भेट दिली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. पोलिस मुख्यालयात मानवंदना स्वीकारल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री दिगंबर कामत, गृहमंत्री रवी नाईक,पोलिस महासंचालक बी. एस. ब्रार, पोलिस महानिरीक्षक किशनकुमार व इतर वरिष्ठ अधिकारी यांच्यासोबत मुख्यालयातील परिषदगृहात सुरक्षेबाबत चर्चा केली. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी काही गोष्टींचा खुलासा केला. गोव्यावर दहशतवादी हल्ला किंवा घातपाताच्या शक्यतेबाबत कोणतेही संकेत किंवा गुप्तचर अहवाल केंद्राला किंवा राज्य सरकारला मिळाला नसल्याचेही त्यांनी नमूद केले.
नाताळ व नववर्षांचा उत्साह साजरा करण्यास गोवा पूर्णपणे भयमुक्त असून तशी परिस्थिती ओढवलीच तर सुरक्षेचे सर्व ते उपाय आखण्यात आले आहेत. मुंबई हल्ला व देशात इतरत्र ठिकाणी घडलेल्या प्रकारांच्या पार्श्वभूमीवर गोव्यात सावधगिरी बाळगण्यासाठीच सध्याची सुरक्षेची तयारी करण्यात आली आहे. या परिस्थितीमुळे नागरिकांनी अजिबात अस्वस्थ होण्याची गरज नाही. ही तयारी केवळ गोव्यापुरतीच नसून सर्व राज्यांत केल्याचे ते म्हणाले.
गोवा हे पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचे ठिकाण असल्याने येथे काही प्रमाणात जास्त सावधगिरी बाळगण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. गोवा हे देशी व कायदेशीररीत्या विदेशातून आलेल्या पर्यटकांसाठी पूर्णपणे भयमुक्त ठिकाण असून या लोकांनी निर्धास्तपणे नाताळ व नववर्ष साजरा करावा,असे लोकांना आश्वस्त करणारे आवाहन त्यांनी केले.

नौदल मुख्यालयात संशयित आढळल्याने प्रचंड खळबळ

पणजी व वास्को, दि. २४ (प्रतिनिधी): चिरेबंदी सुरक्षाव्यवस्था असलेल्या वास्को येथील नौदल मुख्यालयात आज पहाटे ४.३० वाजता एक संशयास्पद व्यक्ती हातपाय बांधलेल्या अवस्थेत सापडल्याने संपूर्ण राज्यात जबरदस्त खळबळ माजली आहे. नौदल पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन मुरगाव पोलिसांच्या स्वाधीन केल्यावर त्याला फौजदारी गुन्हा कलम ४१ नुसार अटक करण्यात आली आहे. राज्यातील खास तपास अधिकाऱ्यांनी त्याला अज्ञातस्थळी नेऊन आज दिवसभर त्याची कसून चौकशी सुरू केली. मात्र अद्याप त्याच्याकडून ठोस माहिती मिळाली नसल्याने त्याला "संशयित दहशतवादी' ही म्हणता येणार नसल्याचे गोवा पोलिसांचे "एटीएस'प्रमुख आत्माराम देशपांडे यांनी सांगितले. दरम्यान, त्या व्यक्तीला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास ते करीत असल्याचे गोवा नौदल विभागाचे ध्वजाधिकारी संजय वडगावकर यांनी सांगितले.
हा संशयित २० ते २५ वयोगटातील असून शराफ नूर इस्लामिक असे नाव असल्याचे सूत्रांनी सांगितले. तसेच त्याला ताब्यात घेताच वास्को येथील इंडियन ऑईल, हिंदुस्थान पेट्रोलियम, अमोनिया टॅंक याठिकाणी सुरक्षा कडक करण्यात आली आहे. हातपाय बांधलेला अवस्थेत तो ज्याठिकाणी सापडला तेथून जवळच अमोनिया टॅंक, श्री गणेश मंदिर असून त्या परिसरात लोकवस्ती आहे. त्यामुळे पोलिसांनी योग्य ती खबरदारी घेतली आहे.
त्या व्यक्तीकडे काही कागदपत्रे सापडल्याचेही सूत्रांनी सांगितले. त्याच्याबरोबर अन्य दोन साथीदार असल्याची माहिती खास सूत्रांकडून मिळाली आहे. त्यांचा शोध पोलिस घेत आहेत. कडक सुरक्षा असलेल्या नौदलाच्या मुख्यालयात हा संशयित पोचलाच कसा, असा प्रश्न सध्या उपस्थित झाला आहे. तसेच त्याला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी त्याच्या अन्य साथीदारांचा शोध घेण्यासाठी श्वानपथकाचा वापर केला नसल्याने नौदल अधिकारी नाराज झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
प्राप्त माहितीनुसार बोगदा सडा येथे असलेल्या नौदलाच्या मुख्यालयात ज्या ठिकाणी कोणत्याही सामान्य व्यक्तीला जाता येते नाही अशा ठिकाणी एक व्यक्ती हाता पायाला लोखंडी साखळी बांधून टाकलेल्या अवस्थेत आढळून आली. रात्री १२.३० वाजता एक नौदल अधिकारी आपले काम आटोपून आराम करण्यासाठी बरॅकमधे परतत असताना हा प्रकार उघडकीस आला. त्याने याची त्वरित आपल्या वरिष्ठांना माहिती दिली. त्याबरोबर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पहाटेपर्यंत पोलिस त्याठिकाणी व्यक्तीची चौकशी करीत होती. त्यानंतर त्याला पणजीत एका अज्ञातस्थळी हलवण्यात आले.
ताब्यात घेण्यात आलेला व्यक्ती आसामातील असली तरी ती बांगलादेशची रहिवासी असू शकते. अन्य दोघा साथीदारांनीच त्याला बांधून नौदलाच्या मुख्यालयात आणून टाकल्याची माहिती या संशयिताने पोलिसांना दिल्याचे सूत्रांनी सांगितले. ही सहसा विश्वास न ठेवता येण्याजोगी माहिती तो देत असल्याने हे दहशतवादी संघटनेचे षड्यंत्र तर नाही ना, याचीही खातरजमा केली जात आहे. जेथे या संशयिताला ताब्यात घेण्यात आले तेथे एक बॅगही सापडली असून त्यात काही कागदपत्रे मिळाली आहेत. त्या कागदपत्रांवरून या संशयिताबद्दल आणखी तपशील मिळू शकतो, असे तपास अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
-------------------------------------------------------------------
काल सकाळपासून काही वृत्त वाहिन्यांनी गोव्यात दहशतवादी शिरल्याचे भडक वृत्त प्रसारित केल्याने वास्को येथील अनेक हॉटेलनी आपल्या हॉटेलमधील केबल कनेक्शन तोडल्याची माहिती मिळाली आहे. या वृत्तामुळे ग्राहकांत भीती निर्माण होण्याची शक्यता असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे काही हॉटेलमालकांनी सांगितले. दरम्यान, काल दिवसभरात वास्को पोलिसांनी शहरातील हॉटेलमधे छापे टाकून संशयास्पद रीतीने राहणाऱ्या चार तरुणांना ताब्यात घेतले.

मुख्यमंत्री येडियुराप्पा व पर्रीकरांचा कारवारात संयुक्त निवडणूक प्रचार

कारवार दि. २४ (प्रतिनिधी): येथील विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारात जोरदार मुसंडी मारताना भाजपने आज खुद्द मुख्यमंत्री बी. एस. येडीयुराप्पा तसेच गोव्याचे ज्येष्ठ भाजप नेते तथा तेथील विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांना आनंद असनोटीकर यांच्या प्रचारासाठी उतरवले आहे. मुख्यमंत्री येडीयुराप्पा व पर्रीकर यांच्या संयुक्त प्रचार मोहीमेमुळे कारवार तसेच अंकोल भागात भाजप कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा उत्साह पसरला आहे.
श्री. येडीयुराप्पा व पर्रीकर यांनी कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या वेळी असाच बेळगावात संयुक्त प्रचार केला होता व त्यात पक्षाला बेळगाव परिसरात कमालीचे यश लाभले होते. कारवार मतदारसंघ हा गोव्याच्या अगदी जवळ व येथल्या नात्यांगोत्यांशी व माणसांशी संबंधित असल्याने या परिसरात पर्रीकर चांगलेच लोकप्रिय आहेत. कारवार मतदारसंाची ही पोटनिवडणुक मुख्यमंत्री येडियुराप्पा व पक्षासाठी खूपच महत्त्वाची असल्याने येडियुराप्पा यांनी पुन्हा एकदा पर्रीकर व येथील आघाडीच्या कार्यकर्त्यांना मदतीची हाक घातली. प्रतिसाद म्हणून स्वतः पर्रीकर, काणकोणचे आमदार विजय पै खोत, फातोर्डेचे आमदार तथा कर्नाटक भाजयुमोचे प्रभारी दामू नाईक, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष केशव प्रभू, काणकोणचे प्रमुख भाजप कार्यकर्ते पंढरी प्रभुदेसाई आदींनी संपूर्ण दिवसभर कारवार व अंकोला परिसरात ठिकठिकाणी प्रचाराचा धडाका लावला. येडियुराप्पा व पर्रीकर यांच्या कोडीबाग कारवार येथे झालेल्या रोड शो ला किमान ८ ते १० हजारांची गर्दी होती तर अंकोला येथील रोड शो लाही १० ते १२ हजार लोकांनी उपस्थिती लावून प्रचंड प्रतिसाद दिला.
मुख्यमंत्री येडियुराप्पा व पर्रीकर यांच्या प्रत्येकी कारवारात दोन व अंकोल्यात झालेल्या एका जाहीरसभेला प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता. तर पै खोत, दामू नाईक, प्रभुदेसाई आदींनी या मतदारसंघातील विविध गावांमध्ये कोपरा सभा तसेच कार्यकर्त्यांच्या बैठकी घेतल्या. काही महिन्यांपूर्वी कर्नाटक विधानसभा निवडणुकीत माजी आमदार वसंत असनोटीकर यांचे सुपूत्र असलेले आनंद असनोटीकर हे कॉंग्रेसच्या तिकीटावर विजयी झाले होते परंतु निवडणुकीनंतर आमदारकीचा राजिनामा देऊन ते भाजपात दाखल झाले होते. आपल्या रिकामी झालेल्या जागेवर असनोटीकर यावेळी भाजपतर्फे ही पोट निवडणूक लढवत आहेत व त्यांना निवडणुकीत भरघोस पाठिंबाही मिळत आहे. कॉंग्रेसचे सतीश सैल या निवडणुकीत असनोटीकर यांच्या विरोधात उभे आहेत.

Wednesday, 24 December, 2008

'कडक' सुरक्षेचा असाही फटका

पणजी, दि. २३ (प्रतिनिधी): गोव्यावर दहशतवादी हल्ला होण्याची गुप्त माहिती असल्याने कडक सुरक्षा करण्याच्या प्रकरणामुळे, नुकतेच लग्न होऊन मालदीव येथे मधुचंद्रासाठी निघालेल्या गोमंतकीय जोडप्याला वास्को विमानतळावर लाखो रुपयांचा फटका बसल्याची घटना घडली आहे. याची लेखी तक्रार पोलिस महासंचालक बी. एस. ब्रार यांच्याकडे करण्यात आली असून विमानतळावरील तपासणी करणाऱ्या सुरक्षा रक्षकावरच तक्रारदाराने संशय व्यक्त केला आहे.
सदर तक्रार नवविवाहितेची आई सौ. आशा पै यांनी केली आहे. हिऱ्याचे दोन रिंग, एक मंगळसूत्र, आजोबा व आजीचे नाव असलेले खानदानी दागिन्यातील एक सोन्याचे नाणे, एक डिजिटल कॅमेरा व ३ हजार रुपये चोरीला गेल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
प्राप्त माहितीनुसार तक्रारदार सौ. पै यांच्या मुलीचा विवाह गेल्या आठवड्यात मंगेशी येथे झाला. त्यानंतर काल सकाळी नवदांपत्य श्रीलंकन एअरलाईन्सद्वारे मालदीवला जाण्यासाठी वास्को विमानतळावर दाखल झाले. तेव्हा सुरक्षेच्या नावाखाली तिच्या हातात असलेली पर्स तपासणीसाठी सुरक्षा रक्षकाने मागितली. यावेळी त्या पर्सला श्री. लोबो नामक एका अधिकाऱ्याने त्यांच्यासमोरच त्याला कुलूप लावले आणि ती तपासणीसाठी ताब्यात घेतली. तपासणी झाल्यानंतर पर्स ज्यावेळी हातात आली, त्यावेळी त्यातील दागिने गायब झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. यावेळी त्यांनी ही घटना त्वरित श्रीलंकन एअरलाईन्सच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणली. मात्र त्याचा उपयोग झाला नाही. याबाबत पोलिस तक्रार दाखल करण्यात आली आहे.
या घटनेची त्वरित चौकशी करून विमानतळावर चोरीला गेलेले दागिन्याचा शोध लावण्याची मागणी सौ. पै यांनी पोलिस महासंचालकांकडे केली आहे. विमानतळाच्या सुरक्षेची जबाबदारी 'सीआयएफएस'कडे असून याची चौकशी करण्यासाठी त्या सुरक्षा यंत्रणेकडे संपर्क साधला जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.

राज्यात कडेकोट बंदोबस्त खास बैठकीत सुरक्षेचा सर्वंकष आढावा

पणजी, दि. २३ (प्रतिनिधी): नाताळ व नववर्षाच्या काळात गोव्यात "फिदायीन'(आत्मघाती) हल्ल्याची भीती असल्याने कोणताही धोका न पत्करण्याचे धोरण राज्य पोलिसांनी अवलंबले आहे. त्यामुळे सावधगिरीसाठी गोव्याच्या इतिहासात पहिल्यांदाच लष्कर, नौदल, हवाई दल, किनारा रक्षक दल व मुरगाव पोर्ट ट्रस्टची मदत घेण्यात आली आहे. आज सकाळी सुमारे दोन तास या संघटनांच्या प्रमुखांशी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी चर्चा करून सुरक्षेचा आढावा घेतला. नंतर या चर्चेचा अहवाल राज्यपाल एस.एस. सिद्धू यांना सुपूर्त करण्यात आला.
या बैठकीत गृहमंत्री रवी नाईक, मुख्य सचिव जे.पी. सिंग, दोन्ही जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, तसेच पोलिस खात्याचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मात्र या बैठकीत कोणत्या मुद्यांवर चर्चा झाली तसेच कोणते निर्णय झाले याबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली आहे.
"फिदायीन हल्ला होण्याची ठोस माहिती नसली तरी तशी शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे आम्ही कोणतीही "रिस्क' घेणार नाही. कोणत्याही हल्ल्याला प्रतिउत्तर देण्यासाठी सुरक्षा दल सज्ज आहे' असे आज सायंकाळी गोव्याचे स्पेशल सेल प्रमुख आत्माराम देशपांडे यांनी सांगितले. राज्यातील सहा सीमा "सील' केल्या असून त्यावर कडक नजर ठेवण्यात आली आहे. समुद्र किनाऱ्यांवर पोलिसांची गस्त वाढवण्यात आली आहे. तसेच गरजेच्या ठिकाणी पुरेशी "बंकर'ही उभारण्यात आले असल्याचे श्री. देशपांडे यांनी सांगितले.
ख्रिसमस व नव्या वर्षाच्या संगीत रजनीबाबत ते म्हणाले, अद्याप समुद्र किनाऱ्यांवर पार्टी करण्यासाठी परवानगी देण्यात आलेली नाही. कोणाचाही परवानगी मिळवण्यासाठी अर्ज आल्यास पोलिस त्याठिकाणीच पाहणी करून सुरक्षेचा आढावा घेतील व नंतरच त्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना दिला जाणार आहे. त्यानंतर कोणाला परवानगी द्यायची वा नाकारायची याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार जिल्ह्याधिकाऱ्यांना दिले आहेत, असे ते म्हणाले. रात्री दहानंतर कर्णकर्कश आवाजात संगीत लावण्यास बंदी घालण्यात आली आहे.
गोव्यात दाखल झालेल्या सुरक्षा रक्षकांच्या सहा कंपन्यातील तीन कंपन्या उत्तर गोव्यात, तर तीन दक्षिण गोव्यात तैनात करण्यात आल्याचेही श्री. देशपांडे यांनी सांगितले.

'सीबीआय उपनिरीक्षक' पोलिसांच्या ताब्यात

पणजी, दि. २३ (प्रतिनिधी): बांदा पोलिसांना तिहेरी खून प्रकरणात हव्या असलेल्या संशयिताला जुने गोवे पोलिसांनी आज सकाळी अटक केली. गेल्या तीन महिन्यांपासून रोहित ऊर्फ सिद्धेश शिवाजी रेडकर (३२) हा "सीबीआय'चा तोतया उपनिरीक्षक म्हणून गोव्यात वास्तव्य करून होता. त्याच्याकडून पोलिस उपनिरीक्षक असल्याचे एक बनावट ओळखपत्रही जप्त करण्यात आले आहे, अशी माहिती विभागीय उपअधीक्षक सॅमी तावारीस यांनी दिली.
सिद्धेश रेडकर हा कुंडई येथे एका कारखान्यात नोकरीला लागला होता. येथे त्याने चोडण येथील सचिन मांद्रेकरशी मैत्री केली. त्यानंतर गेल्या आठ दिवसापासून तो त्याच्याच घरी थांबत होता. मात्र, या आठ दिवसांत त्याच्या कुटुंबीयांना सिद्धेशबद्दल संशय निर्माण झाल्याने त्यांनी त्याची माहिती जुने गोवे पोलिसांनी दिली. पोलिसांनी त्याला चौकशीला ताब्यात घेतले. यावेळी त्याच्याकडे बांदा इन्सुली येथे पोलिस उपनिरीक्षक असल्याचे एक ओळखपत्र सापडल्याने पोलिस त्वरित बांधा पोलिसांना संपर्क साधला. यावेळी त्याच्याकडून हा तरुण खून प्रकरणात हवा असल्याची माहिती मिळताच त्याला अटक करून आज बांदा पोलिसांच्या हवाली करण्यात आले.
गेल्या सहा वर्षापासून सिद्धेश हा बांधा पोलिसांना "चकवा' देत होता. २००२ साली बांदा इन्सुली येथील तिहेरी खून प्रकरणात तो खबऱ्या म्हणून पोलिसांना मदत करीत होता. यावेळी त्याने खुनाच्या तक्रारदाराकडे जवळीक साधून या प्रकरणात मदत करण्यासाठी एक लाख रुपये घेतले. त्यानंतर तो फरार झाला होता. सिद्धेश सुरवातीला पेडणे येथील चेक नाक्याच्या ठिकाणी एका भाड्याच्या खोलीत राहत होता. तेथून तो चोडण येथे राहण्यासाठी आला आणि पोलिसांच्या जाळ्यात अडकला.

सार्वजनिक बॅंकांचा गोव्यावर अन्याय, देना बॅंकेच्या पदांसाठी 'बंगळुरू' परीक्षाकेंद्र

पणजी, दि. २३ (प्रतिनिधी): सार्वजनिक क्षेत्रातील विविध बॅंकांतून सध्या मोठ्याप्रमाणात नोकरभरती सुरू आहे. या पदांसाठी अर्ज केलेल्या गोव्यातील उमेदवारांना परीक्षा देण्यासाठी इतर राज्यांत जावे लागत असल्याने त्यामुळे या परीक्षा देण्यासाठी जाणाऱ्या स्थानिक उमेदवारांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याच्या वाढत्या तक्रार समोर आल्या आहेत.
देना बॅंकेने देशभर १२८९ जागांसाठी अर्ज मागवले असून गोव्यासाठी १४ जागा निश्चित केल्या आहेत.याबाबत संतापजनक बाब जर कुठली असेल तर या पदांसाठी अर्ज केलेल्या येथील स्थानिक उमदेवारांना परीक्षा देण्यासाठी "बंगळुरू' केंद्रावर जावे लागणार आहे. हा प्रकार केवळ सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांचाच नव्हे तर उर्वरित केंद्र सरकारच्या अखत्यारीतील विविध संस्थांच्या भरतीसाठी गोव्यातील उमेदवारांना इतरत्र ठिकाणी जावे लागत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. केवळ स्थानिक सरकारी नोकर भरतीत व्यस्त असलेल्या राज्य सरकारला त्याचे सोयरसुतक नाहीच परंतु राज्यातील खासदारांनीही याकडे दुर्लक्ष केल्याच्या तक्रारही आहेत. परीक्षेसाठी इतर ठिकाणी जाण्यासाठी प्रवास व राहण्याचा खर्च करणे अनेकांना परवडत नाही. त्यामुळे अशी पदे जाहीर होऊनही त्याकडे केवळ खर्चाखातर दुर्लक्ष होत असल्याने या पदांपासून स्थानिक बेरोजगार वंचित राहतात,अशी माहिती एक अर्जदार वीराज बाक्रे यांनी दिली आहे.
गोवा हे स्वतंत्र राज्य आहे, त्यामुळे इथल्या नोकऱ्यांसाठी परीक्षा केंद्र गोव्यात असणे गरजेचे आहे. वरवर सोपी वाटणारी ही गोष्ट प्रत्यक्षात गोव्यासाठी असलेल्या या जागा परप्रांतीयांना मिळवून देण्यासाठीचाच कट असून त्यासाठी सर्व थरावर एकजुटीने राजकीय भेदभाव बाजूला ठेवून हाणून पाडायला हवा,असा आरोपवजा मागणीही बाक्रे यांनी केली.
देना बॅंकेची अर्ज करण्याची अंतिम तारीख २ जानेवारी २००९ व परीक्षा ८ मार्च २००९ रोजी ठेवण्यात आली आहे. सरकारला जर खरोखरच स्थानिकांची चिंता असेल व गोव्यावर होत असलेल्या या अन्यायाची चाड असेल तर त्यांनी तात्काळ देना बॅंकेच्या प्रमुखांच्या निदर्शनास आणून परीक्षा केंद्रात बदल करून घ्यावा व गोव्यातील उमेदवारांना न्याय मिळवून दिलासा द्यावा,अशी मागणीही बाक्रे यांनी केली आहे.

कारवाईबाबत कायदाच संदिग्ध, 'होली फॅमिली' कॉन्व्हेंट प्रकरण

पणजी, दि. २३ (प्रतिनिधी): राष्ट्रीय महत्त्वाच्या दिवशी विविध शैक्षणिक संस्थांत राष्ट्रध्वज फडकवण्याचा कार्यक्रम आयोजित करण्याचा आदेश शिक्षण खात्याने जारी केला असला तरी या कार्यक्रमाला फाटा देणाऱ्या संस्थांवर कोणती कारवाई करावी, याबाबत कायद्यात कोणतीच तरतूद नसल्याने पर्वरी येथील होली फॅमिली कॉन्व्हेंटवर कारवाईची शक्यता धूसर बनली आहे.
पर्वरी येथील होली फॅमिली कॉन्व्हेंटकडून गेल्या १९ डिसेंबर रोजी गोवा मुक्तिदिन साजरा न करता त्यादिवशी सुट्टी जाहीर करण्याचा प्रकार घडल्याने राज्यभर त्याचे तीव्र पडसाद उमटले आहेत. या विद्यालयावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी स्वतंत्र सैनिकांसह विविध संघटनांनी केल्याने त्याबाबत शिक्षण खात्याकडून चाचपणी सुरू झाल्याची माहिती खात्याचे उपसंचालक अनिल पवार यांनी दिली. दरम्यान, खात्याकडून येथील भागशिक्षणाधिकाऱ्यांना या विद्यालयात पाठवण्यात आले असून या घटनेबाबतचा खुलासा मागवण्यात येणार आहे. मुक्तिदिनाच्या कार्यक्रमाला फाटा दिल्याप्रकरणी काय कारवाई होऊ शकते,असे श्री. पवार यांना विचारले असता शिक्षण कायद्यात कारवाईबाबत कोणताही स्पष्ट उल्लेख नसल्याची माहिती त्यांनी दिली. प्रत्येक शैक्षणिक संस्थेने राष्ट्रीय महत्त्वाचे दिवस साजरे करण्याच्या सूचना खात्याकडून देण्यात आल्या आहेत. राष्ट्रध्वज कसा उभारावा किंवा राष्ट्रध्वज उभारताना कोणती काळजी घेण्यात यावी याबाबतची माहितीही देण्यात आली आहे. मात्र हा कार्यक्रमच आयोजित केला नाही तर कोणती कारवाई करावी याबाबत मात्र कायद्यात कोणतेच स्पष्टीकरण नसल्याचेही ते म्हणाले.
दरम्यान,हा प्रकार गंभीर असल्याने त्याबाबत स्वस्थ बसणे शक्य नाही. या प्रकाराबाबत अद्याप संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडून खात्याकडे कोणताही संपर्क साधण्यात आला नाही,असेही यावेळी श्री. पवार यांनी स्पष्ट केले. या घटनेबाबत केवळ संस्थेकडून माफीपत्र किंवा क्षमायाचना केल्यास खाते गप्प बसणार काय,असे विचारताच यापुढे अशा प्रकारांची पुनरावृत्ती होणार नाही, याची दक्षता खात्याकडून घेतली जाईल,असेही श्री.पवार या ंनी स्पष्ट केले.
केंद्रीय विद्यालयांकडूनही फाटा
राज्यात कार्यरत असलेल्या केंद्रीय विद्यालयांकडूनही गोवा मुक्तिदिनाच्या कार्यक्रमांना फाटा देण्यात येतो. किंबहुना हा दिवस ते साजरा करीत नसल्याची माहिती उघड झाली आहे. राज्यात एकूण पाच ते सात केंद्रीय विद्यालये आहेत. या सर्व विद्यालयात केंद्रीय अभ्यासक्रम शिकवला जातो खरा; परंतु या विद्यालयांना राज्य सरकारची मान्यता लागते. अशा विद्यालयांमध्ये अनेक स्थानिक विद्यार्थी शिक्षण घेत असल्याने गोवा मुक्तिदिनी राष्ट्रध्वज फडकवण्याचा कार्यक्रम आयोजित करणे त्यांना क्रमप्राप्त ठरते,परंतु त्यांच्याकडून ते केले जात नाही,असेही यावेळी काही पालकांनी सांगितले. याबाबत खात्याकडे विचारपूस केली असता पालकांनी त्याबाबत व्यवस्थापनाशी चर्चा केल्यास किंवा हा प्रकार खात्याच्या निदर्शनास आणून दिल्यास तसे आदेश देता येणे शक्य असल्याचे श्री.पवार म्हणाले.

पार्ट्यांवरील बंदी आदेश पोलिसांसाठी डोकेदुखी

पणजी, दि. २३ (प्रतिनिधी): सुरक्षेच्या कारणांवरून नाताळ व नववर्षाच्या निमित्ताने आयोजित केल्या जाणाऱ्या खुल्या पार्ट्यांवरील बंदीचा आदेश आज गृह खात्याने अखेर जारी केला. तथापि, या आदेशामुळे घोळ निर्माण होण्याचीच जास्त शक्यता आहे. वरिष्ठ अधिकारी व पोलिसांसाठी तो डोकेदुखी ठरण्याची शक्यता असल्याने किनारी भागांत गोंधळ निर्माण होण्याचा संभव व्यक्त केला जात आहे.
२३ डिसेंबर ते ५ जानेवारीपर्यंत समुद्र किनाऱ्यांवरील खुल्या जागेत पार्ट्यां आयोजित करण्यास या आदेशाव्दारे पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान,किनाऱ्यांवरील शॅक्समध्ये पर्यटकांना रात्रीचे जेवण (डिनर) करण्याची मुभा देण्यात आली असून त्यामुळे काहीप्रमाणात शॅक्समालकांना दिलासा मिळाला आहे. नाताळ किंवा नववर्षाच्या या वातावरणात संगीत व नृत्याशिवाय किनाऱ्यांवरील शॅक्सवर "डिनर' घेण्यास किती पर्यटक पुढे येतील याबाबत मात्र शॅक्समालक संभ्रमावस्थेतच आहेत.
दरम्यान, या आदेशात चर्च आवारात पारंपरिक पार्टी आयोजित करण्यास परवानगी देण्यात आली आहे. अशा पार्ट्या आयोजित करणाऱ्या आयोजकांना खास नियम घालून देण्यात आली असून त्यांनी या नियमांचे पालन करणे बंधनकारक असल्याचेही या आदेशात म्हटले आहे. हॉटेलांतील पार्टीची जागा सर्व बाजूनी बंद असावी आणि बाहेरून त्याबाबतचे कसलेही दर्शन होता कामा नये, असे आदेशात म्हटले म्हटले आहे. प्रवेशव्दारावर "मेटल डिटेक्टर' तथा दक्ष पहारेकरी हवा व पर्यटकांना प्रवेश देण्यापूर्वी त्यांना स्वतः ओळख पटवण्याची सक्ती करावी, असेही आदेशात म्हटले आहे.शहरात किंवा गावात रेव्ह पार्टीला परवानगी नाकारण्यात आली आहे. रस्त्यावर आयोजित केल्या जाणाऱ्या पारंपरिक नृत्यांना परवानगी असेल असे सांगून या दिवसांत अशा पार्ट्यांत सहभागी होणाऱ्या लोकांनी दक्ष राहावे,असे आवाहनही सरकारने आदेशाव्दारे केले आहे.
-------------------------------------------------------
आग्नेल फर्नांडिस यांचे प्रयत्न सुरूच
कळंगुट येथे खुल्या किनाऱ्यावर "सन बर्न' यांच्याकडून आयोजित केल्या जाणाऱ्या पार्ट्या सरकारच्या या आदेशामुळे अडचणीत आल्या आहेत. नववर्षाच्या निमित्ताने आयोजित होणाऱ्या या पार्ट्यांचे खास आकर्षण असल्याने आयोजकांनी त्याकामी जोरदार प्रयत्न चालवले आहेत.कळंगुटचे आमदार आग्नेल फर्नांडिस यांनी त्यात पुढाकार घेतला असून आजही त्यांनी या आयोजकांसह मुख्यमंत्री दिगंबर कामत व गृहमंत्री रवी नाईक यांची भेट घेतली. दरम्यान, त्यांचे याप्रकरणी काय बोलणे झाले हे जरी समजले नसले तरी सरकारने अशा खुल्या पार्ट्यांवर बंदी घालण्याच्या निर्णयाबर शिक्कामोर्तब केल्याने त्यांचा प्रस्ताव फेटाळण्यात आला असावा अशी शक्यता व्यक्त होत आहे.

कोलवा भागात ६ लाखांची चोरी

मडगाव, दि. २३ (प्रतिनिधी) : दहशतवादी हल्ल्याच्या धोक्याच्या अनुषंगाने सर्वत्र कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात असतानाच दक्षिण गोव्यात व त्यातही किनारपट्टीत पुन्हा चोऱ्यांचे सत्र सुरू झाले आहे. काल कोलवा येथे असाच एक जबरी चोरीचा प्रकार उघडकीस आला आहे. चोरट्यांनी तेथील कंवलजीत लांबा यांचे निवासस्थान फोडून चोरट्यांनी हिऱ्याच्या तीेन अंगठ्या, अन्य सोन्याचे दागिने व रोख दीड लाख असा अंदाजे सहा लाखांचा ऐवज पळविला.
काल हा प्रकार उघडकीस आला, पण पोलिसांनी तो दडवून ठेवला. तथापि, आज तपासासाठी पोलिस श्र्वानपथक नेले गेले व ठसे तज्ज्ञांना पाचारण केले गेल्याने चोरीचे बिंग फुटले. लांबा हे तारांकित हॉटेलात कामाला असतात. त्यांचे घरी मध्यंतरी केाणी नव्हते. काल चोरीचा प्रकार उघडकीस आला. त्यांच्या मते २१-२२ तारखेदरम्यान चोरी झालेली असावी.
निवासस्थानाचा मागील दरवाजा फोडून चोरटे आत घुसले असे दिसून आले . पोलिसांनी श्र्वान पथकांची मदत घेतलेली असली तरी त्यांचा विशेष असा काहीच उपयोग झाला नाही. अधिक तपास चालू आहे.
गेल्याच आठवड्यात बेताळभाटी येथे एका घरातून अशाच प्रकारे तीन लाखांचा ऐवज चोरीस गेला होता तर त्या अगोदर कोलवा भागातच अशी चोरी झाली होती. पण आश्र्चर्याची बाब म्हणजे यापैकी एकाही प्रकरणाचा धागा दोरा हाती लागू शकलेला नाही. त्यातही आणखी गंमतीची बाब म्हणजे नाताळ-नववर्षाचा मोका साधून संपूर्ण गोव्यात हाय ऍलर्ट लागू असताना या चोऱ्या होत आहेत.

Tuesday, 23 December, 2008

भारत कठोर पाऊल उचलणार : मुखर्जी
.. पाकिस्तानातील अतिरेकी
घातक
..पाकने जबाबदारी ओळखावी

नवी दिल्ली, दि. २२ - पाकिस्तानातील अतिरेकी केवळ भारतच नव्हे, तर संपूर्ण जगासाठी घातक आहेत. दहशतवादाच्या निपटाऱ्यासाठी जागतिक समुदायाने केलेले प्रयत्न पुरेसे नसून यापुढे आता भारतच याबाबत ठोस पाऊल उचलणार असल्याचे परराष्ट्र व्यवहार मंत्री प्रणव मुखर्जी यांनी म्हटले आहे.
भारतीय राजदूत आणि उच्चायुक्तांच्या संमेलनात मुखर्जी बोलत होते. ते म्हणाले की, काबूलमधील दूतावास आणि मुंबईवरील हल्ल्यानंतर हे पुरते सिद्ध झाले आहे की, पाकमधील दहशतवादाने आपले हात-पाय पसरले आहेत. त्यांचा हा विस्तार केवळ आशिया क्षेत्रासाठीच नव्हे तर संपूर्ण जगासाठी घातक आहे. आज सुदैवाने भारताला आंतरराष्ट्रीय समुदायाकडून चांगली साथ मिळते आहे. दहशतवादाबाबत पाकने कठोर कारवाई करावी याविषयीचा दबाव सातत्याने आंतरराष्ट्रीय समुदाय आणत आहे. एका तऱ्हेने ते भारताला मदतच करीत आहेत.
आता स्थिती बदलली आहे
पाकिस्तानने आपल्या भूमीत फोफावणाऱ्या दहशतवादाचा धोका ओळखला पाहिजे. आज आम्ही त्या दहशतवादाचे बळी ठरलोय म्हणून हे सांगत नाही, तर हा दहशतवाद उद्या संपूर्ण जग आपल्या विळख्यात घेईल. त्यातून पाकिस्तान आणि तेथील लोकही सुटणार नाहीत.
भारताने आजवर पाकच्या शब्दावर विश्वास ठेवला आणि प्रत्येकवेळी दहशतवादाचा मुद्दा शांततेच्या मार्गाने सोडविण्याचाच पर्याय समोर आणला. पण, हे सर्व २००१ पर्यंत ठीक होते. आता ती स्थिती राहिलेली नाही. पाणी डोक्याच्या वर गेले आहे. आता भारत खूप विचार करणार नाही. पाकिस्तानी प्रशासनाने आपल्या भूमीतील दहशतवाद निपटण्यासाठी दिलेला शब्द पाळला पाहिजे.
वारंवार पुरावे मागणारे राष्ट्राध्यक्ष आसिफ अली झरदारी यांनी स्वतःची जबाबदारी ओळखली पाहिजे. जेव्हा एखाद्या खंडाचा एक भाग म्हणून आपण तेथे शांततेसाठी आश्वासन देतो तेव्हा त्याची अंमलबजावणी करणे, हीदेखील आपली नैतिक जबाबदारी ठरते. झरदारी या जबाबदारीला नाकारू शकत नाहीत, असेही मुखर्जी म्हणाले.

पश्चिम सीमा भागात
भारतीय लष्कर सतर्क
जैसलमेर, दि. २२ ः पाकिस्तानवर लष्करी कारवाई केली जाणार नाही, हे भारताने स्पष्ट केले असले तरी पाकव्याप्त काश्मीरपाठोपाठ भारताच्या पश्चिम सीमेवरही भारतीय लष्कर आणि हवाईदल सतर्क झाले आहे.
पाकिस्तानने सीमा भागात लष्कराची जमवाजमव केली असल्याचे वृत्त मिळाल्यानंतर भारतानेही सावध पवित्रा घेत लष्कराची हालचाल सुरू केली आहे. याविषयी भारतीय हवाई दलाच्या सूत्रांनी लष्करीदृष्ट्या महत्त्वाच्या ठिकाणांवर सुरक्षा वाढविण्यात आल्याचे सांगितले आहे. प्रामुख्याने जैसलमेर, भुज आणि उत्तरलाई भागात अधिक कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे. येथील हवाई हद्दीची सुरक्षाही वाढवण्यात आली आहे.

पाकची लढाऊ विमाने सज्ज

इस्लामाबाद, दि. २२ - मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान यांच्यात निर्माण झालेल्या तणावाच्या वातावरणाकडे बघता इस्लामाबाद, रावळपिंडीसह अनेक प्रमुख शहरांवर पाकिस्तानच्या लढाऊ विमानांनी आज युध्दाभ्यास केला.
यासंदर्भात पाकिस्तानी हवाई दलाचे प्रवक्ते एअर कमांडर हुमायून वकार झेपर यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, इस्लामाबाद, रावळपिंडीप्रमाणेच पाकिस्तानमधील इतर प्रमुख शहरांवर आज दुपारी हवाई दलाच्या अनेक लढाऊ विमानांनी युध्दाभ्यास केला. हा युध्दाभ्यास जवळपास २० मिनिटे सुरू होता. जारी करण्यात आलेल्या या निवेदनात अधिक तपशील देण्यात आलेला नाही.
मुंबईवरील हल्ल्यासाठी भारताने पाकिस्तानमधील लष्कर-ए-तोयबासह अनेक दहशतवादी संघटनांना जबाबदार धरले असून या दहशतवादी संघटनांसह पाकमधील त्यांची प्रशिक्षण केंद्रे पाकिस्तानने नष्ट करावीत, अशी मागणी भारताने वारंवार केलेली आहे. मुंबईवरील हल्ल्याला जी तत्त्वे जबाबदार आहेत त्यांना भारत जोरदार प्रत्युत्तर देईल, असे कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी कालच काश्मीर दौऱ्यावर असताना म्हटले आहे.
भारतीय हवाई दलाच्या विमानांनी आमच्या हवाईहद्दीचा भंग केला आहे, असा कांगावा पाकिस्तानने सुरू केला असून तसा औपचारिक निषेध भारताकडे नोंदविला आहे. भारताचे पाकिस्तानमधील उच्चायुक्त सत्यब्रत पाल सध्या नवी दिल्ली येथे आमंत्रित करण्यात आलेल्या भारतीय राजदूतांच्या बैठकीला हजर राहण्यासाठी नवी दिल्ली येथे गेलेले आहेत तर पाकिस्तानचे भारतातील उच्चायुक्त शाहीद मलिक हे विचारविनिमयासाठी इस्लामाबाद येथे आलेले आहेत.
... आणि लोकांत घबराट
इस्लामाबाद, रावळपिंडीसह पाकमधील अनेक शहरांवर लढाऊ विमाने रोराऊ लागली त्यावेळी लोकांमध्ये एकच घबराट पसरली. लोकांनी वृत्तपत्र कार्यालये तसेच वृत्तवाहिनी कार्यालयांना फोन करून यासंदर्भात विचारणा केली. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर स्थिती हाताळण्यासाठी भारतासमोरील सर्व पर्याय खुले आहेत, असे वक्तव्य भारताचे परराष्ट्रमंत्री प्रणव मुखर्जी यांनी कालच केले आहे, हे येथे उल्लेखनीय.

मी पाकिस्तानीच - कसाब

मुंबई, दि. २२ - २६ नोव्हेंबर रोजी मुंबईवर करण्यात आलेल्या हल्ल्यातील एकमेव जिवंत अतिरेकी मोहम्मद अजमल अमीर इमान कसाबने आपण पाकिस्तानी असून, ठार झालेले अन्य सर्वजण पाकिस्तानी असल्याचे म्हटले आहे. कसाव याने पाकिस्तानी दुतावासाला यासंबंधात पत्र लिहिले आहे.हे पत्र भारतीय परराष्ट्र खात्याच्या अधिकाऱ्यांनी आज नवी दिल्ली येथे पाक उच्च्यायुक्तांना पाचारण करून त्यांना दिले.कसाबने कायद्याच्या मदतीसाठी आपण उच्चायुक्तांना भेटू इच्छितो असे पत्रात म्हटले असून, आपल्या सोबतच्या नऊ पाक साथीदारांना मरण आल्याचे पत्रात नमूद केले आहे.

गुन्हेगारी ठेचा

केंद्रीय गृह खात्याचा राज्याला आदेश

- बेकायदा सावकार, रिअल इस्टेट माफिया,
गुन्हेगारांच्या टोळ्या नष्ट करून त्यांना
तडीपार करण्याचा आदेश
- आदेशाचे पत्र धूळ खात पडून
- ६ जानेवारीपर्यंत केंद्राला कारवाईचा
अहवाल पाठवण्याची सूचना
- सरकारकडे इच्छाशक्तीचा अभाव


पणजी, दि. २२ (प्रतिनिधी) - बेकायदा सावकार, रिअल इस्टेट माफिया आणि गुन्हेगारांच्या छोट्या-मोठ्या टोळ्या यांचा नायनाट करून त्यांना तडीपार करण्याचा आदेश केंद्रीय गृह खात्याने राज्य सरकारला दिला आहे. तसेच या आदेशावर राज्य गृह खात्याने कोणती कारवाई केली, याचा अहवाल सहा जानेवारी ०९ पर्यंत केंद्राला पाठवावा, असेही आदेशात म्हटले आहे. या विषयाचे पत्र केंद्रीय गृह खात्याने राज्याच्या गृह खात्याला पाठवले असून राजकीय इच्छाशक्ती नसल्याने हे पत्र फायलीतच धूळ खात पडून आहे.
या आदेशाची कार्यवाही केल्यास काही राजकीय व्यक्ती आणि खुद्द मंत्रीच अडचणीत येणार असल्याने या पत्राकडे डोळेझाक करण्याचा गृहखात्याचा कारभार गोव्याला अडचणीत आणण्याची शक्यता आहे. राज्याचे गृह खाते हाती घेताच गुंडांची टोळकी व ड्रग माफियांवर कडक कारवाई करण्याची वल्गना करणारे गृहमंत्री या आदेशाचे पालन करण्याचे आदेश पोलिसांना का देत नाहीत, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
माफियांचे पैसे दहशतवादी कारवायांसाठी?
गेल्या काही वर्षात आणि नुकत्याच मुंबईत ताज हॉटेल आणि हॉटेल ओबेरॉयमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यासाठी अशा छोट्या मोठ्या टोळ्यांची तसेच भूमाफिया व बेकायदा सावकारी करणाऱ्यांची मदत मिळाल्याचे धागेदोरे हाती लागल्याने केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. मुंबईवर हल्ला झाल्यानंतर सरकारने हा हल्ला संपूर्ण देशावर हल्ला झाल्याचे जाहीर करून तो गांर्भींयाने घेतला आहे. तथापि, त्याचे गांर्भीय अद्याप राज्य सरकारला जाणवल्याचे दिसत नाही. गुन्हेगारांच्या काही टोळ्या कळतनकळत दहशतवादी कारवायांसाठी पैसा पुरवत असल्याची माहिती गुप्तहेर संघटनांना मिळाली आहे. त्यामुळे हे पत्र सर्व राज्यांना पाठवण्यात आले आहे.
दहशतवाद्यांना मदत
गुंडाच्या टोळ्या आणि माफिया पाकिस्तानातून येणाऱ्या दहशतवाद्यांना राहण्यासाठी जागा मिळवून देणे, हवालाद्वारे पैसा पुरवणे तसेच स्थानिक माहिती आणि पोलिसांच्या गुप्त योजनांची माहिती देण्याचे काम करतात. या टोळ्यांचे जाळे नष्टे केल्यास बऱ्याच प्रमाणात दहशतवाद आटोक्यात येण्याची शक्यता केंद्रीय गुप्तहेर संघटनेने व्यक्त केली आहे. तसेच नुकत्याच दिल्लीत झालेल्या एका उच्चस्तरीय बैठकीत या सर्व गोष्टींवर चर्चा करून केंद्रीय गृह खात्याने हे पत्र सर्व राज्यांना पाठवले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. मात्र, गोव्यात माफियाच नाहीत, अशी भूमिका पोलिसांनी घेतल्याने सहा जानेवारीला राज्य सरकार केंद्राला सादर करणाऱ्या अहवालात कोणती माहिती पुरवणार हा कळीचा मुद्दा बनला आहे.

केंद्रीय गृहराज्यमंत्री जैस्वाल उद्या गोव्यात

सुरक्षेच्या आढाव्यासह नाताळही साजरा करणार
पणजी, दि. २२ (प्रतिनिधी) - केंद्रीय गृहराज्यमंत्री श्रीकुमार जैसवाल हे बुधवारी २४ रोजी गोव्यात येत असून गोव्याचे खास आकर्षण असलेला नाताळ सण साजरा करण्याबरोबर येथील सुरक्षेचा आढावाही ते घेणार आहेत. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी व केंद्रीय गृहखात्यातील दोन वरिष्ठ अधिकारी येणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे.
बुधवारी सकाळी त्यांचे आगमन होईल. त्यादिवशी मुख्यमंत्री दिगंबर कामत व गृहमंत्री रवी नाईक यांच्याशी सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत ते चर्चा करणार आहेत. नंतर ते राजभवनवर जाणार असून तेथे एक दिवस त्यांचे वास्तव्य असेल, अशी माहितीही सूत्रांनी दिली.
मुंबई हल्ल्यानंतर दहशतवाद्यांचे पुढील लक्ष्य गोवा असल्याचे स्पष्ट संकेत केंद्रीय गुप्तहेर यंत्रणेकडून राज्य सरकारला मिळाले आहेत. नाताळ व नववर्षानिमित्त राज्याला मोठ्या प्रमाणावर देशीविदेशी पर्यटकांची भेट अपेक्षित असल्याने याच काळात गोव्यात घातपात घडवण्याचा कट दहशतवाद्यांनी रचल्याचा सुगावाही गुप्तहेर यंत्रणेला लागला आहे. त्यामुळे सुरक्षेबाबत तडजोड न करण्याचा ठाम निर्णय राज्याच्या गृह खात्याने घेतला आहे.
पार्ट्यांवर बंदीची आज अधिसूचना
दरम्यान, राज्यात २३ डिसेंबर ते ५ जानेवारीपर्यंत किनारी भागात खुल्या पार्ट्यांवर बंदी घालण्यासंबंधीची अधिसूचना उद्या २३ रोजी जारी करणार असल्याची माहिती मुख्य सचिव जे.पी.सिंग यांनी दिली.
विविध ठिकाणी आयोजित केलेले पारंपरिक कार्यक्रम तथा हॉटेलांतील बंदिस्त पार्ट्यांवर बंदी ही बंदी लागू नाही. तेथे त्यांना सुरक्षेबाबत सूचना देण्यात आल्या असून त्याबाबत पाहणीही करण्यात आल्याचेही सांगण्यात आले. केवळ किनारी भागांतील खुल्या पार्ट्यांवरच बंदी घालण्यात आली आहे. सध्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या दोन तुकड्या राज्यातील महत्त्वाच्या ठिकाणी तैनात करण्यात आल्या आहेत. तसेच दोन अतिरिक्त तुकड्यांची मागणी मुख्यमंत्री कामत यांनी केंद्र सरकारला केल्याचेही सांगण्यात आले.

निष्क्रिय केंद्र सरकारमुळे पाक शेफारले - ठाकरे

मुंबई, दि. २१ - जोपर्यंत कॉंग्रेसचे सरकार या देशात राहील तोपर्यंत असेच चालणार, भारतात निष्क्रिय सरकार असल्यामुळेच पाकिस्तान शेफारले. आता केवळ आव्हाने देऊन चालत नाही, नुसते इशारे देऊन चालत नाही. हल्ला करुन बघा, हिंमत दाखवा, असे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केंद्र सरकारला बजावले आहे. हे सर्व थांबवायचे असेल तर पहिली आणीबाणी पुकारा. कुणालाही सोडू नका. देशहितासाठी सांगतोय, असा उपाय त्यांनी सुचवला आहे.
मुंबईतील दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर बाळासाहेबांच्या मुलाखतीचा पहिला भाग आज "सामना'मध्ये प्रसिद्ध झाला आहे.
८२ वर्षांच्या शिवसेनाप्रमुखांनी या मुलाखतीत अत्यंत कडक भाषेचा वापर केला आहे. केंद्र सरकार व राज्यकर्त्यांवर त्यांनी कठोर टीका केली आहे.
सभांना गर्दी होते आमच्या, पण ती गर्दी होऊनसुद्धा परत कॉंग्रेसचेच सरकार येते. एवढ्या शेतक-यांच्या आत्महत्या झाल्या. भारनियमन आहेच. लोक काळोखात बसतील, चिडतील पण नंतर काही नाही. पुन्हा कॉंग्रेस... अशी खंत त्यांनी मुलाखतीत बोलून दाखवली आहे.
अमेरिकेत फक्त एकदा आणि लंडनमध्येही एकदा रेल्वे स्टेशनांवर बॉम्ब फुटले. एकदा आणि शेवटचेच... नंतर कुणाचीच तिकडे असे हल्ले करण्याची हिंमत झाली नाही. पहिल्यांदा तुम्ही हा देश सार्वभौम आहे ही भावना लक्षात घेतली पाहिजे. आमच्यात ती भावना मुळात आहे काय? कारण सार्वभौम देशाच्या संसदेवर हल्ला करणा-या अफझल गुरुला आपण अद्याप फाशी देऊ शकलो नाही. सर्वोच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावूनही ताबडतोब जर त्या अफझलला फाशी दिली असती तर तुमची हिंमत कळली असती. कसली अडचण आहे अफझल गुरुला फाशी देण्याची ? कसला दबाव आहे तुमच्यावर ? मुसलमानांच्या मतांच्या लाचारीसाठी ते हे करीत आहेत, याची मला चीड आहे, असे त्यांनी सांगितले आहे. या मुलाखतीबद्दल साऱ्या महाराष्ट्राला उत्सुकता होती. पहिल्या भागात ठाकरे यांनी कॉंग्रेसवर जहरी टीका केली असून आपली निवृत्ती म्हणजे जे होईल ते सहन करणे नव्हे, अशी तंबी दिली आहे.

Monday, 22 December, 2008

पाकला जबरदस्त झटका देण्यासाठी भारत सज्ज

नवी दिल्ली, दि. २१ - जगभरात गाजत असलेल्या दहशतवादाच्या मुद्यावरुन दुटप्पी भूमिका घेणाऱ्या पाकिस्तानला तडाखेबाज प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने कंबर कसली आहे. पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांच्या उपस्थितीत शनिवारी रात्री नवी दिल्लीत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीमध्ये देशाच्या सुरक्षा तयारीचा आढावा घेण्यात आला. यानिमित्ताने प्रत्युत्तराची तयारी भारताने सुरु केल्याचे मानले जात आहे.
मुंबईवर नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन देशात युध्दाची ठिणगी कोणत्याही क्षणी पडण्याची शक्यता आहे. मात्र पाकिस्तानशी युध्द करण्याची घाई भारताने करु नये, असा दबाव भारतावर आहे. मात्र दहशतवाद्यांवर पाकिस्तान कठोर कारवाई करणार नसेल आणि या कारवायांसाठी पाकिस्तानी भूमीचा वापर करु देत असेल तर पाक ला धडा शिकवण्यासाठी भारताने व्यूहरचना तयार केल्याचे समजते. पाकिस्तानच्या विरोधात कारवाई करण्यासाठी भारतासमोर सर्व पर्याय खुले आहेत, असे विधान केंद्रीय परराष्ट्रमंत्री प्रणव मुखर्जी यांनी नुकतेच केले होते. त्यानंतर काल संध्याकाळी बैठक झाल्याने प्रत्युत्तराच्या तयारीची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.या बैठकीत नेमके काय ठरले याबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही.

पाकला जबरदस्त झटका देण्यासाठी भारत सज्ज

नवी दिल्ली, दि. २१ - जगभरात गाजत असलेल्या दहशतवादाच्या मुद्यावरुन दुटप्पी भूमिका घेणाऱ्या पाकिस्तानला तडाखेबाज प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने कंबर कसली आहे. पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांच्या उपस्थितीत शनिवारी रात्री नवी दिल्लीत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीमध्ये देशाच्या सुरक्षा तयारीचा आढावा घेण्यात आला. यानिमित्ताने प्रत्युत्तराची तयारी भारताने सुरु केल्याचे मानले जात आहे.
मुंबईवर नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन देशात युध्दाची ठिणगी कोणत्याही क्षणी पडण्याची शक्यता आहे. मात्र पाकिस्तानशी युध्द करण्याची घाई भारताने करु नये, असा दबाव भारतावर आहे. मात्र दहशतवाद्यांवर पाकिस्तान कठोर कारवाई करणार नसेल आणि या कारवायांसाठी पाकिस्तानी भूमीचा वापर करु देत असेल तर पाक ला धडा शिकवण्यासाठी भारताने व्यूहरचना तयार केल्याचे समजते. पाकिस्तानच्या विरोधात कारवाई करण्यासाठी भारतासमोर सर्व पर्याय खुले आहेत, असे विधान केंद्रीय परराष्ट्रमंत्री प्रणव मुखर्जी यांनी नुकतेच केले होते. त्यानंतर काल संध्याकाळी बैठक झाल्याने प्रत्युत्तराच्या तयारीची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.या बैठकीत नेमके काय ठरले याबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही.

पार्ट्यांवरील बंदीचा "शॅक्स'चालकांना फटका

हॉटेलमालकांना मात्र मुभा कायम

पणजी, दि. २१ (प्रतिनिधी) - सुरक्षेच्या कारणांसाठी राज्य सरकारने नाताळ व नवीन वर्षाच्या निमित्ताने आयोजित केल्या जाणाऱ्या सर्व "नाइट पार्ट्या' वर बंदी घालण्याचा निर्णय घेतला खरा परंतु सरकारच्या या निर्णयाबाबत मात्र पर्यटन व्यवसायातील लोकांत संभ्रम निर्माण झाला आहे. सुरक्षेच्याबाबत कोणतीही तडजोड करणे राज्य सरकारला परवडणारे नाही ही गोष्ट जरी खरी असली तरी सरकारच्या या निर्णयामुळे बड्या हॉटेलवाल्यांची चांदी होणार असून या सरकारचा केंद्रबिंदू असलेला "आम आदमी' अर्थात "शॅक्स' व्यावसायिक मात्र पूर्णपणे भिकेला लागणार असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
गोव्याच्या पर्यटन उद्योगाचा महत्त्वाचा भाग असलेल्या "शॅक्स' व्यावसायिकांसाठी राज्य सरकारचा निर्णय हा पोटावर नांगर फिरवणाराच ठरला आहे. फक्त पर्यटन हंगामावर आधारित असलेल्या शॅक्स व्यावसायिकांसाठी नाताळ व नवीन वर्षाचा काळ हीच एकमेव या व्यवसायात केलेली गुंतवणूक परत मिळवण्याची संधी असते. अशावेळी सरकारने ही संधीच हातातून काढून घेतल्याने या व्यावसायिकांसमोर पेचप्रसंग निर्माण झाला आहे.शॅक्स व्यावसायिकांचा प्रभाव असलेल्या कळंगुट तथा बाणावली भागातील या व्यावसायिकांनी आपला दबाव स्थानिक लोकप्रतिनिधींवर वाढवला आहे. सुरक्षेकडे कोणतीही तडजोड करणे शक्य नाही हे सर्वांना पटते परंतु याचा अर्थ हॉटेलवाल्यांना सुरक्षेबाबत काही बंधने घालून पार्ट्या आयोजित करण्याची मोकळीक द्यायची आणि शॅक्स व्यावसायिकांवर पूर्णपणे बंदी लादायची हा कुठला न्याय,असा सवाल शॅक्समालक संघटनेचे अध्यक्ष क्रुझ कार्दोझो यांनी केला. आर्थिक मंदीमुळे एरवीच पर्यटनाला आलेली मरगळ व त्यात आता दहशतवादाचे सावट यामुळे ७० टक्के शॅक्स व्यवसाय संपला आहे, त्यात आता ही नवीन भर पडल्याने हे व्यावसायिक पूर्णपणे भिकेला लागण्याचीच जास्त शक्यता असल्याचे ते म्हणाले. शॅक्स हा गोव्याच्या पर्यटनाचा अविभाज्य घटक असल्याने व हा सरकारमान्य व्यवसाय असल्याने या व्यावसायिकांचे हित जपणे सरकारचे कर्तव्य ठरते,असेही श्री.कार्दोझो यांनी स्पष्ट केले. शॅक्स व्यावसायिक दर महिन्याला सरकारने निश्चित केलेली "फी' भरणा करतात. आता सरकारकडून जर अशी बंदी लादण्यात येत असेल तर ही "फी' कशी काय भरायची,असाही प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. दरम्यान,नवीन वर्षांनिमित्त विविध पंचतारांकित हॉटेलांत बड्या पार्ट्यांचे आयोजन केले जाते. यावेळी पर्यटकांना खास समुद्र किनाऱ्यावर राहणे आवडते. आता सरकारने समुद्र किनाऱ्यांवर पार्ट्या आयोजित करण्यास बंदी घातली खरी परंतु काही हॉटेलांनी किनाऱ्यांवर अतिक्रमण करून त्याचा वापर आपल्या व्यवसायासाठी करण्याचा सपाटा चालवला आहे. या हॉटेलवाल्यांकडून जर किनाऱ्यांवर पार्ट्या आयोजित केल्या गेल्या तर अजिबात स्वस्थ बसणार नाही, असा इशाराच यावेळी क्रुझ कार्दोझो यांनी दिला.
"पोटावर नांगर'अजिबात नाही
शॅक्स व्यावसायिक हे गोव्याच्या पर्यटनाचा महत्त्वाचा भाग आहे व हा व्यवसाय सरकारमान्य आहे हे जरी खरे असले तरी येत्या २३ डिसेंबर ते ५ जानेवारीपर्यंत खुल्या किनारी नाइट पार्ट्यांवर बंदी घालण्याचा निर्णय गृहखात्याने गुप्तहेर विभागाने दिलेल्या माहितीच्या आधारावर घेतल्याचे पर्यटन खात्यातील सूत्रांनी सांगितले. सरकारने केवळ खुल्या नाइट पार्ट्यांवर बंदी घातली आहे,त्यामुळे शॅक्सबाहेरील पार्ट्यांवरील बंदीचा फटका या व्यावसायिकांना कसा काय बसू शकतो, असे या सूत्रांनी म्हटले आहे.
"शॅक्स'वर परिणाम नाहीच!
शॅक्स व्यावसायिकांना जागा निश्चित केलेली असते अशावेळी कायद्याने त्यांना किनाऱ्यांवर खुल्या पार्ट्या आयोजित करता येत नाहीत, परंतु इतकी वर्षे काही नेते व वरिष्ठ अधिकाऱ्यांना हाताशी धरून अशा पार्ट्या आयोजित केल्या जायच्या. या बंदीचा त्यांच्या कायदेशीर व्यवसायावर अजिबात परिणाम होण्याची शक्यता नसल्याने त्यांच्या पोटावर सरकारने नांगर फिरवल्याचा आरोपात अजिबात तथ्य नसल्याचे पर्यटन खात्यांच्या सूत्रांचे म्हणणे आहे.

विष्णू वाघ यांना "गोवारत्न'

श्री पारवडेश्ववर महाराज दांपत्य आशीर्वाद सोहळा
पणजी,दि.२१(प्रतिनिधी) - श्री पारवडेश्वर महाराज सांस्कृतिक महासमितीतर्फे यंदाचा पहिला "गोवारत्न' पुरस्कार साहित्यिक तथा नाटककार विष्णू वाघ यांना प्रदान करण्यात आला. तसेच "क्रीडाप्रेमी' पुरस्कार गोवा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष तथा थिवीचे आमदार दयानंद नार्वेकर व "जनसेवा' पुरस्कार उपजिल्हाधिकारी आग्नेल फर्नांडिस यांना बहाल करण्यात आला.
श्री श्री श्री पारवडेश्वर महाराज सांस्कृतिक महासमिती यांच्यातर्फे विश्वशांती संमेलनानिमित्त आज पणजी येथील बांदोडकर मैदानावर दांपत्य आशीर्वाद सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी व्यासपीठावर श्री पारवडेश्वर महाराज व श्री भाऊ महाराज हे सिंहासनारूढ होते. याप्रसंगी इतर मान्यवरांत हिंदू, ख्रिस्ती,शीख व मुस्लीम समाजाचे धर्मगुरू हजर होते. त्याचबरोबर मुख्यमंत्री दिगंबर कामत, दक्षिण गोव्याचे खासदार फ्रान्सिस सार्दीन, म्हापशाचे आमदार फ्रान्सिस डिसोझा, प्रदेश युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष संकल्प आमोणकर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सरचिटणीस सुरेंद्र फुर्तादो, गिरीश चोडणकर, बाबी बागकर व ज्येष्ठ साहित्यिक माधवी देसाई आदी अनेक मंडळी उपस्थित होती.
विश्वशांतीची सुरुवात ही प्रत्येक कुटुंबातून व्हायला हवी. सध्याच्या परिस्थितीत संपूर्ण जगावर दहशतवादाने आपली क्रुरता पसरवली असून सर्वांनी एकत्रितरीत्या या संकटाचा सामना करावा लागेल,असे प्रतिपादन मुख्यमंत्र्यांनी याप्रसंगी केले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित दांपत्यांना महाराजांनी शुभाशीर्वाद दिले.

तब्येत सुधारल्याने अटलजी रिंगणात?


लखनौ, दि. २१ - सक्रिय राजकारणापासून दूर राहण्याची घोषणा केलेले माजी पंतप्रधान आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते अटल बिहारी वाजपेयी यांची प्रकृती चांगली राहिली तर ते लखनौतून लोकसभा निवडणूक लढवू शकतात, असे त्यांच्या शुभचिंतकांचे म्हणणे आहे.
पाच राज्यांतील निवडणुकांनंतर आता सर्व स्तरावर लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. आजवर अटलजींनी लखनौ येथून लोकसभा निवडणूक लढविली. यापुढील निवडणुकीतही त्यांनीच या जागेवरून निवडणूक लढवावी, अशी विनंती या क्षेत्रातील अनेक मतदारांनी केली आहे. या आशयाची विनंती करण्यासाठी मतदारांचे एक प्रतिनिधीमंडळ दिल्लीला नुकतेच जाऊन आले.
या प्रतिनिधीमंडळाने म्हटले आहे की, अटलजींनी केवळ उमेदवारी अर्ज दाखल करावा, त्यांना विजय आम्ही मिळवून देऊ. याबाबत वक्तव्य देताना लालजी टंडन म्हणाले की, अटलजींच्या प्रकृतीत बरीच सुधारणा झाली आहे. तब्येतीने साथ दिली तर लखनौतून अटलजी निवडणूक लढविण्यास तयार होऊ शकतात. केवळ प्रकृतीच्याच कारणावरून अटलजींनी सक्रिय राजकारणातून संन्यास घेतला आहे. त्यांनी निवडणूक लढविणार नाही, असे कधीही म्हटले नाही. लखनौतील मतदारांसोबतच पक्षाचे कार्यकर्तेही अटलजींनीच निवडणूक लढवावी, या मताचे आहेत. लोकसभा निवडणूक एप्रिल-मेपर्यंत होईल. तोवर कदाचित वाजपेयींच्या प्रकृतीत अधिक सुधारणा होऊ शकते, अशी आशाही लालजी टंडन यांनी व्यक्त केली.

झेड प्लस सुरक्षेस चिदम्बरम यांचा नकार

नवी दिल्ली, दि.२१ - गृहमंत्री पी. चिदम्बरम यांनी आपली सुरक्षा वाढवून झेड प्लस करण्याचा प्रस्ताव नाकारला आहे.
आतापर्यंत अर्थमंत्री असणाऱ्या चिदम्बरम यांच्याकडे गृहमंत्रालयाचा कारभार येताच त्यांना झेड प्लस सुरक्षा देण्याचा प्रस्ताव समोर आला. देशाचे गृहमंत्री म्हणून त्यांची सुरक्षा वाढविणे गरजेचे असल्याचे सूत्रांचे म्हणणे होते. पण, चिदम्बरम यांच्यासमोर या आशयाच्या प्रस्तावाची फाईल आली तेव्हा त्यांनी त्यावर "गरज नाही' असा शेरा मारला. अतिशय विनम्रतेने त्यांनी सुरक्षा वाढविण्यास नकार दिला. ते म्हणाले की, मला या स्तराच्या सुरक्षेची गरज वाटत नाही.
सध्या त्यांना "वाय' दर्जाची सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. त्याअंतर्गत त्यांना दोन सुरक्षा रक्षक आणि एक खाजगी सुरक्षा अधिकारी पुरविण्यात येतो. चिदम्बरम यांनी झेड प्लस सुरक्षा नाकारल्याचा मुद्दा गेल्या आठवड्यात संसदेतही चर्चेला आला. कॉंग्रेसने गृहमंत्र्यांच्या या निर्णयाचे कौतुक केले. पण, सपाचे अमरसिंग यांनी मात्र टीका केली होती. ते म्हणाले की, अशा पद्धतीने वागून चिदम्बरम हल्लेखोरांना जाहीर निमंत्रण देत आहेत.
या टीकेनंतरही चिदम्बरम आपल्या निर्णयावर ठाम होते. त्यामुळे सुरक्षा एजन्सी आणि गृहमंत्रालयाने याविषयी एक फाईल तयार करून चिदम्बरम यांच्यापुढे ठेवली होती. पण, त्यावरही त्यांनी या सुरक्षेची गरज नसल्याचा शेरा मारला आहे.

उदय भेंब्रे यांच्या कारस्थानामुळे रोमी लिपीची उपेक्षा - चर्चिल

रोमी कोकणीला समान दर्जाची मागणी
पहिले रोमी कोकणी साहित्य संमेलन

मडगाव, दि. २१ (प्रतिनिधी) : दाल्गादो कोकणी अकादमीने आयोजित केलेल्या पहिल्या रोमी कोकणी साहित्य व सांस्कृतिक संमेलनात अखेर अपेक्षेप्रमाणे रोमी लिपीतील कोकणीला देवनागरीप्रमाणे राजभाषेचा समान दर्जा द्यावा अशी मागणी करणारा ठराव संमत केला तर समारोपाच्या सत्रात बोलताना सार्वजनिक बांधकाम मंत्री चर्चिल आलेमांव यांनी राजभाषा विधेयकाच्या मसुद्यात लिपीचा उल्लेख नसताना तेथे "देवनागरी' असा उल्लेख करण्याची चाल माजी आमदार उदय भेंब्रे खेळले, असा सनसनाटी आरोप करून कोकणीमधील एका नव्या वादाला तोंड फोडले आहे.
काल येथील रवींद्र भवनात सुरु झालेल्या या पहिल्याच संमेलनाचा आज दुसरा व अंतिम दिवस होता. दिवसभर विविध साहित्यिक कार्यक्रम झाले व प्रत्येक वेळी यापुढे दरवर्षी असे संमेलन भरविण्याचा मानस उघड करण्यात आला.
समारोप समारंभात बोलताना बांंधकाम मंत्री चर्चिल आलेमांव यांनी देवनागरी लिपीतील कोकणीला राजभाषेचा दर्जा हे मोठे षडयंत्र असल्याचे व एक प्रकारे गोवेकरांवर आलेले ते संकट असल्याचे सांगितले. ते म्हणाले, रोमीतील कोकणीला तिचा हक्काचा दर्जा द्यावाच लागणार आहे. त्यासाठी आता तियात्रीस्तांनी पुढाकार घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले. रोमीचा सांभाळ करून तिला तिचे हक्काचे स्थान दिले नाही तर गोवा रसातळाला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
एकूण ६ ठराव खुल्या अधिवेशनातील चर्चेनंतर टाळ्याच्या गजरांत संमत करण्यात आले. रोमी कोकणीच्या अंतर्भावासाठी राजभाषा कायद्यात सुधारणा करावी हा मुख्य ठराव होता. दुसऱ्या ठरावाव्दारे साहित्य अकादमीने विविध लिपीतील कोकणीपुस्तकांचा विचार करताना रोमी लिपींतील कोकणी पुस्तकांचाही विचार करावा अशी मागणी करण्यात आली.कला अकादमीने आपल्या वार्षिक पुस्तक पुरस्कारांसाठी पूर्वी प्रमाणे कोकणी रोमी लिपीतील पुस्तके विचारात घ्यावीत, अशी मागणीही तिसऱ्या ठरावाद्वारे करण्यात आली. गोवा सरकारने आपली प्रकाशने व मजकूर रोमी कोकणीतूनही प्रसिध्द करावा, आकाशवाणीने रोमीतील जुन्या कॅसेटी व रेकॉर्डी चे रुपांतर करून ती सांभाळून ठेवण्यासाठी पावले उचलावीत, चर्चेसमधील रोमी धार्मिक लिखाणे सांभाळून ठेवण्यासाठी गोव्याच्या आर्चबिशपांनी उपाय योजावेत आदी मागण्या या ठरावांतून करण्यात आल्या.
आज सकाळी सांस्कृतिक कार्यक्रम व नंतर रोमी लिपींतील कोकणी साहित्याची वाटचाल चर्चासत्र झाले त्याचे नेतृत्व तोमाझिन कार्दोज यांनी केले. दुपारी कोकणी समाज कोकणी भाषेला किती जवळ किती दूर या विषयावर डॉ. नंदकुमार कामत यांच्या अध्यक्षतेखाली चर्चा झाली.
समारोप समारंभात तिओतिन परेरा यांनी स्वागत केले. व्हिन्सी क्वाद्रूश यांनी ठरावाचे वाचन केले.सन्मानलीय पाहुणे म्हणून डॉ. ऑल्विन गोमीश हजर होते.अकादमीचे अध्यक्ष प्रेमानंद लोटलीकर यांचेही यावेळी भाषण झाले . शेवटी जुजे साल्वादोर फर्नांडीस यांनी आभार मानले.
नंतर पाय तियात्रीस्ट जुआंव आगुस्तीन फर्नांडिस यांनी लिहिलेला "तांदळाचे केस्ताव' हे तियात्र दाखविण्यात आले.

Sunday, 21 December, 2008

किनाऱ्यांवरील खुल्या पार्ट्यांवर २३ डिसें. ते ५ जाने.पर्यंत बंदी

राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय
पणजी, दि. २० (प्रतिनिधी) - गुप्तहेर यंत्रणांकडून मिळालेल्या संकेतानुसार येत्या नाताळ व नववर्षाच्या मुहूर्तावर राज्यातील किनारे दहशतवाद्यांचे लक्ष्य बनण्याची दाट शक्यता असल्याने आज अखेर उच्चस्तरीय सुरक्षा बैठकीत २३ डिसेंबर ते ५ जानेवारीपर्यंत किनाऱ्यांवरील खुल्या नाइट पार्ट्यांवर बंदी घालण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सरकारने घेतला.
मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या येथील सरकारी निवासस्थानी झालेल्या या बैठकीला मुख्यमंत्री यांच्यासह गृहमंत्री रवी नाईक, पोलिस महानिरीक्षक किशनकुमार, मुख्य सचिव जे. पी. सिंग, उत्तर व दक्षिण जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक,उपविभागीय अधिकारी आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या निर्णयाबाबत सरकारांतर्गत मतभेद निर्माण झाल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे. अशा पार्ट्यांवर बंदी घालण्याबाबत पक्षांतच मतभेद आहेत, परंतु वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी केंद्रीय गुप्तचर यंत्रणेकडून मिळालेल्या अहवालाबाबत विस्तृत माहिती देऊन सुरक्षेच्याबाबतीत तडजोड करणे कठीण असल्याचे ठणकावून सांगितल्यानंतरच या बंदीच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आला.
आजच्या या बैठकीच्या निर्णयाबाबत कुणीच स्पष्टपणे बोलण्यास राजी नाही,अशी परिस्थिती निर्माण झाली. सुरक्षेच्या बाबतीत घेण्यात येणाऱ्या निर्णयांबाबत आपण वेळोवळी प्रसारमाध्यमांना माहिती देऊ, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी जरी दिले असले तरी या महत्त्वाच्या निर्णयाबाबत त्यांनी काहीच कळवले नसल्यानेही संभ्रम निर्माण झाला आहे.
प्राप्त माहितीनुसार राज्यातील विविध हॉटेल तथा पर्यटन उद्योगाशी संबंधित विविध उद्योजकांनी मोठ्या प्रमाणात दबाव सरकारवर आणला होता. याप्रकरणी कळंगुटचे आमदार आग्नेल फर्नांडिस यांनीही किनारी भागातील अशा पार्ट्यांवर बंदी घातल्यास त्याचा फटका अनेक उद्योजकांना बसणार असल्याची गोष्ट सरकारच्या नजरेस आणून दिल्याचीही माहिती मिळाली आहे. दोन दिवसांपूर्वी दक्षिण गोवा उपजिल्हाधिकाऱ्यांनी काढलेला आदेश मागे घ्यायला लावण्यामागे हॉटेल लॉबीचा दबाव कारणीभूत असल्याची माहिती खास सूत्रांनी दिली. नाताळ व नववर्षाचा काळ हा पर्यटन उद्योगास महत्त्वाचा असल्याने या आठ दिवसांत होणारा व्यवसाय संपूर्ण वर्षभराची मिळकत असल्याचे या उद्योगातील व्यावसायिकांनी सांगितले. गोव्यातील किनारी भाग प्रामुख्याने दक्षिण गोव्यातील किनाऱ्यांवर देशीविदेशी पर्यटकांची झुंबड उडते.अशावेळी केवळ निर्बंध घालून या पार्ट्या सुरू ठेवल्यास अधिक गोंधळ निर्माण होण्याचा धोका असल्याचेही पोलिसांनी यावेळी स्पष्ट केले. पोलिस संरक्षणात या पार्ट्यांना अनुमती देणे म्हणजे नवी डोकेदुखी ठरणार असल्याने या काळात खुल्या किनाऱ्यांवर होणाऱ्या पार्ट्यांवरच बंदी घालण्याची शिफारस यावेळी करण्यात आली. विविध हॉटेलांत आयोजित करण्यात येणाऱ्या पार्ट्यांना सुरक्षेबाबतच्या सूचना व नियम लादण्यात आल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
गृहमंत्री रवी नाईक यांनी या बंदीचा पारंपरिक पद्धतीने होणाऱ्या कार्यक्रमांवर काहीही परिणाम होणार नसल्याचे सांगितले. हॉल किंवा हॉटेलांत होणाऱ्या पार्ट्यांना मार्गदर्शक तत्त्वे घालून देण्यात आली असून त्याचबरोबर अत्यावश्यक उपाययोजनाही आखण्यात आल्याचे ते म्हणाले.
आणखी दोन तुकड्यांची मागणी
गोव्यात सध्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या दोन तुकड्या तैनात आहेत. अशावेळी खास नाताळ व नववर्षाच्या निमित्ताने दोन अतिरिक्त तुकड्या मागवण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री कामत यांनी दिली. यासंबंधी केंद्राला पत्र पाठवण्यात आले असून त्यांनी सकारात्मक संकेत दिल्याचे ते म्हणाले.

अल्पवयीन मुलीच्या अपहरणाची तक्रार

पणजी, दि. २० (प्रतिनिधी) - दोना पावला येथील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याची तक्रार तिच्या वडिलांनी पणजी पोलिस स्थानकावर नोंद केली आहे.
सदर मुलीच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीमध्ये, १६ डिसेंबर २००८ रोजी १८ जून रोडवर असलेल्या "सनराइज' या इमारतीत राहणारा रजनू राजू खान या युवकाने आपल्या १७ वर्षीय मुलीचे अपहरण केल्याचे म्हटले आहे. दरम्यान,हे अपहरण १६ रोजी झाले असले तरी त्याबाबतची तक्रार १९ रोजी दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी याप्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम ३६३ व गोवा बालहक्क कायद्याच्या कलम ८ नुसार गुन्हा नोंद करून घेतला असून पुढील तपास सुरू आहे.

"संभवामि..'महानाट्याचा आज समारोपाचा प्रयोग

फोंडा, दि. २० (प्रतिनिधी) - श्री विजयादुर्गा सांस्कृतिक मंडळनिर्मित संभवामि युगेयुगे या श्रीकृष्ण जीवनावरील महानाट्याचा दुसऱ्या मालिकेचा समारोप रविवार २१ डिसें रोजी होणार आहे. या दुसऱ्या मालिकेचा १८ डिसें रोजी प्रारंभ करण्यात आला होता. ही मालिका चार प्रयोगांची आहे. पहिल्या मालिकेत ११ प्रयोग सादर करण्यात आले होते.

लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागा - पर्रीकर

पणजी, दि. २० (प्रतिनिधी) - देशातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता लोकसभेच्या निवडणुका केव्हाही होऊ शकतात. त्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी आपापल्या मतदारसंघात जाऊन या निवडणुकीच्या तयारीला लागावे, असे आवाहन विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी म्हापसा येथे नुकतेच केले.
उत्तर गोवा भाजपच्या जिल्हा समितीची बैठक रायकर सभागृहात पार पडली. त्याप्रसंगी ते बोलत होते. कार्यपद्धतीचा आधार, संपर्क, नियमित बैठका, आपसातील विश्वास या मुद्यांवर पर्रीकर यांनी आपल्या भाषणात भर दिला. भाजपचे प्रदेश संघटनमंत्री अविनाश कोळी यांनी पक्षाच्या बुथ चलो अभियानाची माहिती देऊन नव्या मतदारांशी कार्यकर्त्यांनी संपर्क साधावा, असे आवाहन केले.
भाजपच्या सर्व मंडळांमध्ये येत्या ३० तारखेपर्यंत बैठका होणार असून १ ते १५ जानेवारीपर्यंत बुथ प्रमुख, सहप्रमुख व पालक ही रचना पूर्ण होणार असून येत्या फेब्रुवारीत दोन्ही जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघांत बुथ कार्यकर्त्यांचे मेळावे घेण्यात येणार आहेत. भाजपचे खजिनदार संजीव देसाई यांनी आजीवन सहयोग निधीचे महत्त्व पटवून दिले व कार्यकर्त्यांनी येत्या ३० तारखेपर्यंत अर्ज भरावेत, असे आवाहन केले.
याप्रसंगी आमदार दयानंद मांद्रेकर, दिलीप परुळेकर, लक्ष्मीकांत पार्सेकर, राजेश पाटणेकर, अनंत शेट उपस्थित होते. आमदार दयानंद सोपटे यांनी प्रास्ताविकात मंडळ पातळीवरील पक्षकार्याचा आढावा घेतला. गोरख मांद्रेकर यांनी आभार मानले.

अंतुलेंचे मदतीला धावले दिग्विजयसिंग

नवी दिल्ली, दि,२० - मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात बळी पडलेले एटीएस अधिकारी हेमंत करकरे यांच्यासंदर्भात केंद्रीय मंत्री ए. आर. अंतुले यांनी केलेल्या वक्तव्याच्या समर्थनार्थ आता कॉंगेे्रसचे सरचिटणीस दिग्विजयसिंग पुढे आले आहेत. अंतुले यांच्या वक्तव्यात काय चूक आहे, त्यांच्या वक्तव्यात आपत्तीजनक गोष्ट आढळून येत नाही, त्यांनी जर करकरे यांच्या मृत्यूसंदर्भात चौकशीची मागणी केली असेल त्यात चूक काय आहे, अशी मागणी करून त्यांनी कोणते मोठे पाप केले असा प्रश्न दिग्विजयसिंग यांनी केला आहे.
हेमंत करकरे यांच्यासंदर्भात वादग्रस्त विधान करणाऱ्या अंतुले यांनी आपल्या पदाचा राजीनामा पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्याकडे पाठविला आहे. दरम्यान, कॉंगे्रसने या मुद्यापासून स्वत:ला वेगळे ठेवलेले असले तरी, कॉंगेे्रसचे सरचिटणीस दिग्विजयसिंग आज अंतुले यांच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत यावरून कॉंगे्रसला हा मुद्दा जिवंत ठेवावासा वाटत आहे हे स्पष्ट होते. करकरे यांना पाकिस्तानमधून आलेल्या अतिरेक्यांनीच गोळ्या घालून मारले असे रेल्वेमंत्री लालूप्रसाद यांनी म्हटलेले आहे. असे असले तरी अंतुलेंनी केलेल्या चौकशीच्या मागणीचे त्यांनीही समर्थनच केलेे आहे. दरम्यान, अंतुले यांना मंत्रिपदावरून हटवा तसेच याप्रकरणी कॉंगे्रसने माफी मागावी अशी मागणी भाजपाने केली आहे.
अंतुले यांनी आपला राजीनामा बुधवारी रात्रीच पंतप्रधानांकडे पाठविला असे उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले. आपल्या राजीनाम्यासंदर्भात कोणत्याही प्रकारचे वक्तव्य करण्यास नकार देत अंतुले यांनी म्हटले आहे की, माझ्या राजीनाम्याची पुष्टी करीत नाही तसेच नकारही देत नाही.