Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 7 June, 2011

१८ जूनपर्यंत निर्णय मागे घ्या : काकोडकर

पणजी, दि. ६ (प्रतिनिधी): माध्यम प्रश्‍नावर मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी घेतलेला निर्णय मागे घेण्यास येत्या क्रांतिदिनापर्यंत म्हणजेच १८ जूनपर्यंत शेवटची मुदत देण्यात आली आहे. तसेच, मातृभाषेतून प्राथमिक शिक्षण व्हावे, या मागणीला पाठिंबा असल्याचे सांगणारे पंचायत मंत्री बाबू आजगावकर, पर्यटन मंत्री नीळकंठ हळर्णकर व वाहतूक मंत्री सुदिन ढवळीकर यांनी त्वरित राजीनामा द्यावा. तर, गृहमंत्री रवी नाईक, सभापती प्रतापसिंह राणे आणि त्यांचे पुत्र आरोग्य मंत्री विश्‍वजित राणे या तिघांनी माध्यम प्रश्‍नावर आपली भूमिका स्पष्ट करावी, असे आवाहन भारतीय भाषा सुरक्षा मंचाने केले आहे. अन्यथा त्याचे परिणाम भोगायला तयार राहावे, असा इशारा मंचाच्या अध्यक्ष शशिकला काकोडकर यांनी दिला.
त्या आज गोवा बंद यशस्वी झाल्यानंतर पणजीत सिद्धार्थ प्रतिष्ठानच्या सभागृहात बोलत होत्या. यावेळी त्यांच्याबरोबर आंदोलनाचे कृती प्रमुख प्रा. सुभाष वेलिंगकर, साहित्यिक पुंडलीक नायक, शिक्षणतज्ज्ञ भिकू पै आंगले, स्वातंत्र्यसैनिक नागेश करमली, मराठी अकादमीचे अध्यक्ष नरेंद्र आजगावकर, अरविंद भाटीकर व प्रशांत नाईक उपस्थित होते.
भारतीय भाषा सुरक्षा मंचाने पुकारलेला राज्यव्यापी बंद शंभर टक्के यशस्वी झाला म्हणून शांत बसणार नाही. माध्यम प्रश्‍नावर मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी घेतलेला निर्णय स्थगित ठेवला जात नाही तोवर हा लढा सुरूच राहणार आहे. १८ जून क्रांतिदिनापर्यंत हा निर्णय स्थगित करण्यास सरकारला अंतिम मुदत देत आहोत. ज्या ज्या मंत्र्यांनी आणि आमदारांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही त्या त्या मंत्री वा आमदारांनी त्वरित भाषेबद्दलची आपली बाजू जाहीर करावी अन्यथा त्यांना प्रचंड जनक्षोभाला सामोरे जावे लागेल असा इशारा त्यांनी दिला.
या बंदसाठी भारतीय जनता पक्ष, युवा शक्ती, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष, शिवसेना, सामाजिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक, क्रीडा या संस्थांचा तसेच विविध बाजारपेठांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले. मडगाव शहर हे मुख्यमंत्री दिगंबर कामत यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या बाले किल्ल्यातील तीन महत्त्वाच्या बाजारपेठा पूर्णतः बंद होत्या. एकही दुकान उघडे नव्हते. तर, आरोग्य मंत्री विश्‍वजित राणे हे वाळपई आपलीच असल्याचे भासवतात. मुख्यमंत्री होण्याचीही स्वप्ने पाहतात. त्या संपूर्ण सत्तरी तालुक्यातही शुकशुकाट पसरलेला होता. त्यामुळे या नेत्यांना निवडणूकपूर्व बसलेली चपराक असल्याचे श्रीमती काकोडकर यावेळी बोलताना म्हणाल्या. त्याचप्रमाणे, दिल्ली येथे भ्रष्टाचाराच्या विरोधात उपोषणाला बसलेले स्वामी रामदेव यांना दिलेल्या वागणुकीचा तीव्र शब्दात मंचाने निषेध व्यक्त केला.
ख्रिश्‍चन बांधव असलेल्या बाणावली आणि वार्का भागातही बंद पाळण्यात आला. या भागातील मंत्री भाषेच्या मुद्यावरून या ख्रिश्‍चन बांधवांची फसवणूक करतात. सासष्टी भागातील जनता या मंत्र्याच्या मागे नाही हेच यातून स्पष्ट होते, असे प्रा. वेलिंगकर म्हणाले. येणार्‍या दिवसात या भागातील ख्रिश्‍चन बांधवांमध्ये भाषेच्या मुद्यावरून जागृती केली जाणार आहे. तसेच, लेखकांचे एकत्रीकरण केले जाणार आहे. विद्यार्थी तसेच पालकांमधेही जागृती केली जाणार असल्याची माहिती श्री. वेलिंगकर यांनी यावेळी दिली. ‘सेझ’ आणि प्रादेशिक आराखड्याबाबत घेतलेला निर्णय जसे मुख्यमंत्र्यांना मागे घ्यावे लागले तसाच माध्यम प्रश्‍नाचाही निर्णय त्यांना स्थगित ठेवावा लागणार असल्याचे प्रशांत नाईक म्हणाले.
-------------------------------------------------------
ऐतिहासिक बंद : वेलिंगकर
माझ्या आयुष्यातला हा ८वा बंद असून असा अभूतपूर्व बंद असून असा ऐतिहासिक कधीच पाहिला नव्हता, अशी प्रतिक्रिया प्रा. वेलिंगकर यांनी व्यक्त केली. मी गेल्या चाळीस वर्षापासून सामाजिक क्षेत्रात सक्रिय आहे. राज्यपातळीवर अनेक आंदोलने केली आहेत. या ४० वर्षात प्रमुख संयोजनपदी राहून सात राज्यव्यापी बंद केले आहेत. मात्र, हा आठवा बंद कायम आठवणीत राहणारा असल्याचे ते म्हणाले.

No comments: