Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 5 June, 2011

भाजप कार्यकर्त्यांना पोलिसांकडून समन्स

पणजी, दि. ४ (प्रतिनिधी): राज्य सरकारने इंग्रजी माध्यमाला मान्यता देण्याच्या निर्णयाविरोधात ६ रोजी पुकारण्यात आलेल्या ‘गोवा बंद’च्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांकडून काही भाजप कार्यकर्त्यांना समन्स पाठवण्याच्या कृतीचा प्रदेश भाजपतर्फे निषेध करण्यात आला आहे. हे आंदोलन शांततापूर्ण वातावरणात व लोकशाही मार्गाने होईल, असे बजावूनही पोलिसाकडून सुरू असलेली दडपशाही आंदोलन चिघळण्यास कारणीभूत ठरेल, असा इशारा पक्षाचे सरचिटणीस गोविंद पर्वतकर यांनी दिला आहे.
भारतीय भाषा सुरक्षा मंचातर्फे पुकारण्यात आलेल्या ६ जून रोजीच्या गोवा बंदला भाजपतर्फे पूर्ण पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे. भाषा माध्यमप्रश्‍नी सरकारने घेतलेल्या चुकीच्या निर्णयाविरोधात राज्यात प्रचंड जनक्षोभ उठला आहे. हा निर्णय चुकीचा असल्याची प्रचितीही सरकारला झाली आहे व त्यामुळेच आपली कात वाचवण्यासाठी सरकार हे आंदोलन मोडून काढण्यासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवत आहे. या आंदोलनात राज्यातील जनता स्वयंस्फूर्तीने सहभागी होणार आहे. हा बंद शांततापूर्ण वातावरणात व्हावा यासाठी आयोजकांकडून प्रयत्न केले जात असतानाच पोलिसांनी सुरू केलेल्या दडपशाहीमुळे वातावरण चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दरम्यान, विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखालील भाजप शिष्टमंडळ उद्या ५ रोजी मुख्य सचिव संजय श्रीवास्तव यांची भेट घेणार आहे. ६ रोजीच्या गोवा बंद घोषणेच्या पार्श्‍वभूमीवर पोलिस यंत्रणेकडून सुरू असलेल्या दडपशाहीची माहिती ते मुख्य सचिवांना देणार असल्याची माहिती मिळाली आहे.

No comments: