इंडिया अगेंस्ट करप्शनतर्फे पणजीत अण्णांच्या पाठिंब्यासाठी उपोषण
पणजी, दि. ८ (प्रतिनिधी): कामत सरकारने गेल्या काही वर्षात विविध खात्यात चालवलेला भ्रष्टाचार हा सहन करण्यापलीकडे गेला असून खुद्द स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलाकडे नोकरी देण्यासाठी पैसे मागणार्या कॉंग्रेसवाल्यांनी गोव्याला भ्रष्टाचाराचे तळे केले आहे आणि त्यात कॉंग्रेसवाले लोळत आहेत, असे प्रतिपादन स्वातंत्र्यसैनिक नागेश करमली यांनी आज येथे बोलताना केले.
दि. ४ रोजी नवी दिल्ली येथील रामलीला मैदानावर मध्यरात्री पोलिसांनी योगगुरु रामदेव बाबा यांच्यावर जो अमानुष हल्ला केला होता त्याचा निषेध करण्यासाठी समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिल्ली येथील राजघाटावर आज एक दिवसाचे उपोषण केले. त्याला पाठिंबा देण्यासाठी ‘इंडिया अगेंस्ट करप्शन’च्या गोवा शाखेतर्फे आज पणजी येथे एकदिवसाचे उपोषण आयोजित केले होते. उपोषणानंतर झालेल्या सभेत श्री. करमली बोलत होते. यावेळी प्रसिद्ध गायक रेमो फर्नांडिस, डॉ. मीनाक्षी मार्टीन, ऍड. सतीश सोनक व इतर मान्यवर उपस्थित होते. या उपोषणात माजी मंत्री माथानी सालढाणा, रुद्रेश्वर संस्थेचे अध्यक्ष देवीदास आमोणकर, समाजसेवक रुई द गामा, दिनेश वाघेला, आदींनी भाग घेतला. रेमो फर्नांडिस यांनी उपोषणकर्त्यांना लिंबू पाणी देऊन त्यांचे उपोषण समाप्त केले.
या प्रसंगी बोलताना श्री. करमली यांनी केंद्र व गोवा सरकारवर जोरदार टीका केली.
रेमो फर्नांडिस यांनी राजकारण्यांना भ्रष्टाचारविरोधी औषध सत्याच्या सुईने टोचायला हवे असे सांगून जगातील इतर देशांप्रमाणे भ्रष्टाचार्यांना कडक शासन करायला हवे तरच भ्रष्टाचार कमी होईल असे प्रतिपादन केले. यावेळी रेमो यांनी भाषा माध्यम प्रकरणावर बोलून इंग्रजीचे समर्थन करण्याचा प्रयत्न केला असता श्री. करमली यांनी त्यांना रोखले.
ऍड. सोनक, डॉ. घाणेकर आदींनी या प्रसंगी विचार व्यक्त केले. सागर जावडेकर यांनी प्रास्ताविक केले. या वेळी स्वातंत्र्यसैनिकांच्या मुुलाकडे नोकरीसाठी पैसे मागण्याच्या प्रकरणी इंडिया अगेंस्ट करप्शनची गोवा शाखा गंभीरपणे विचार करणार असल्याचे ऍड. सोनक यांनी सांगितले.
Thursday, 9 June 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment