Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday, 5 June 2011

भव्य संस्कृती दर्शवण्याचा प्रयत्न : नितीन देसाई

पणजी, दि. ४ (प्रतिनिधी): मराठी, हिंदी किंवा इंग्रजी भाषेतील चित्रपट, मालिका आणि विविध कार्यक्रमांत कला दिग्दर्शक म्हणून काम करताना सुवर्णमयी व भव्य अशा भारतीय संस्कृतीचा मोठेपणा जगाला दाखवण्याचाच आपला प्रयत्न असतो, असे प्रतिपादन जागतिक कीर्तीचे कला दिग्दर्शक म्हणून नावाजलेल्या नितीन चंद्रकांत देसाई यांनी आज येथे केले.
गोवा मराठी चित्रपट महोत्सवाचे औचित्य साधून कला अकादमीच्या कृष्णकक्षात आयोजित ‘कला दिग्दर्शकाशी वार्तालाप’ या कार्यक्रमात नितीन देसाई बोलत होते. लगान, हम दिल दे चुके सनम, देवदास, जोधा अकबर, (हिंदी) भारत एक खोज, कौन बनेगा करोडपती, मराठी पाऊल पडते पुढे, राजा शिवछत्रपती (दूरदर्शन मालिका) आदींचे नेत्रदीपक व भव्य कला दिग्दर्शन करून अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवणारे, ‘एनडी स्टुडिओ’ या अत्याधुनिक स्टुडिओचे मालक असलेले व ‘बालगंधर्व’ या चित्रपटाचे निर्माते असलेले नितीन देसाई पुढे बोलताना म्हणाले की, दोन डोळे हेच कॅमेरा असतात. त्यामुळे एखादे दृश्य साकार करण्याआधी त्या दृश्याचा सखोल अभ्यास करणे, सदर दृश्य डोळ्यात साठवून तसा सेट उभा करणे व आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने कला दिग्दर्शन करणे याला आपण प्राधान्य देतो. चांगला कला दिग्दर्शक हा चांगला छायाचित्रकार असावाच लागतो, असेही त्यांनी आवर्जून नमूद केले.

No comments: