Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday, 7 June 2011

हा जनतेचा सरकारविरोधी खदखदणारा असंतोष : पर्रीकर

पणजी, दि. ६ (प्रतिनिधी): गोमंतकीय जनतेने स्वसंयस्फूर्तीने ‘गोवा बंद’ला दिलेला अभूतपूर्व प्रतिसाद पाहता सरकारने शिक्षण माध्यमासंबंधी घेतलेल्या आत्मघातकी निर्णयाने आपले तोंड पोळून घेतल्याचेच स्पष्ट झाले आहे. माध्यमप्रश्‍नी कामत सरकारने घेतलेल्या निर्णयाला जनतेत खदखदणारा असंतोषच दिसून आला. यानंतरही जनतेच्या भावनांची कदर करण्याची सुबुद्धी सरकारला सुचणार नसेल तर मात्र येत्या काळात त्याचे गंभीर परिणाम कॉंग्रेसला भोगावे लागतील, असा इशारा विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी दिला.
प्रदेश भाजपतर्फे आज माध्यम विषय व स्वामी रामदेवबाबा यांना मिळालेली हीन वागणूक या दोन्ही विषयांवरून पणजीत निषेध यात्रा आयोजित केली होती. कॉंग्रेसच्या राष्ट्रीय नेत्यांसह गोव्याचे मुख्यमंत्री दिगंबर कामत यांचे पोस्टर लावलेल्या पुतळ्याची अत्यंयात्रा काढण्यात आली. १८ जून रस्त्यावरून निघालेल्या या अंत्ययात्रेची सांगता भाजप मुख्यालयासमोर करण्यात आली व तिथे या पुतळ्याचे दहन करण्यात आले. या पुतळ्यावर श्रीमती सोनिया गांधी, डॉ. मनमोहनसिंग, वित्तमंत्री प्रणव मुखर्जी, मनुष्यवळ विकास मंत्री कपिल सिब्बल यांच्यासह गोव्याचे मुख्यमंत्री दिगंबर कामत यांचे मुखवटे लावण्यात आले होते. माध्यमप्रश्‍नी गोवा सरकारची भूमिका व दिल्लीत स्वामी रामदेवबाबांशी गैरवर्तन या दोन्ही गोष्टींचा यावेळी निषेध करण्यात आला.
याप्रसंगी आयोजित पत्रकार परिषदेत विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी गोवा बंद यशस्वी करण्यास हातभार लावलेल्या सर्वांचे अभिनंदन केले. ही एकजूट अशीच कायम राहिल्यास देश व पर्यायाने गोवाही सुरक्षित राहू शकेल, असेही ते म्हणाले. यावेळी प्रदेश भाजप अध्यक्ष प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर व सरचिटणीस गोविंद पर्वतकर हजर होते. इंग्रजी माध्यमाला मंजुरी देण्याच्या निर्णयाविरोधात जनतेत खदखदणारा असंतोष या बंदमधून पाहावयास मिळाला. मडगाव, वाळपई, कळंगुट, ताळगाव आदी ठिकाणी मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद सरकारला चांगलीच चपराक देणारा ठरल्याचेही पर्रीकर म्हणाले. पोलिस यंत्रणेचा वापर करून लोकांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न जनतेनेच पुढाकार घेऊन फोल ठरवला व त्यामुळे या बंदद्वारे सरकारची चांगलीच फजिती झाल्याचा टोला श्री. पर्रीकर यांनी हाणला. इंग्रजी माध्यमाच्या या निर्णयामुळे पुढील १५ वर्षांत गोंयकारपणच नष्ट होणार आहे. महाराष्ट्रामुळे मराठी टिकेल परंतु गोमंतकीयांची कोकणी भाषा मात्र नामशेष होईल, असा धोकाही पर्रीकर यांनी वर्तवला. भारतीय भाषा सुरक्षा मंच यापुढे याप्रश्‍नी घेणार्‍या भूमिकेला भाजपचा पूर्ण पाठिंबा राहणार असून या प्रश्‍नाचा निकाल लागेपर्यंत पाठपुरावा केला जाईल, असेही ते म्हणाले.
रामदेवबाबांप्रति कॉंग्रेसची दहशत
शांतता व लोकशाही पद्धतीने भ्रष्टाचार व काळा पैशांविरोधात आंदोलन छेडलेल्या स्वामी रामदेवबाबांप्रति कॉंग्रेसने दहशतवादी भूमिका घेतल्याचा आरोप श्री. पर्रीकर यांनी केली. एकीकडे राष्ट्रविरोधी कारवायां करणार्‍यांना मोकळीक द्यायची व दुसरीकडे राष्ट्रभिमान्यांचा आवाज दडपून टाकायचा, अशीच नीती कॉंग्रेसची राहिली आहे. इजिप्तमध्ये सरकाराविरोधात झालेल्या उठावाचा धसका घेऊनच केंद्रातील कॉंग्रेसने बाबा रामदेव यांचे आंदोलन चिरडून टाकले, असा घणाघातही पर्रीकर यांनी केला.
------------------------------------------------------------
८ जून ‘धिक्कार’ दिवस
मुख्यमंत्री दिगंबर कामत हे ८ जून रोजी आपल्या सरकारची चार वर्षे पूर्ण करीत आहेत. कॉंग्रेस आघाडी सरकारने गेल्या चार वर्षांत सर्वच क्षेत्रात गोव्याची पार दैना करून टाकल्याने यंदा हा दिवस ‘धिक्कार दिवस’ म्हणून पाळण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. या चार वर्षांत सरकारने केलेल्या दुष्कृत्यांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रदेश भाजपतर्फे चार दिवस विविध ठिकाणी ५० सभांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी दिली. दि. ८, ९, १० व ११ जून असे चार दिवस विविध मतदारसंघात या सभा होणार आहेत.

No comments: