रामदेव बाबाप्रकरणी आरती मेहरांची मागणी
पणजी, दि. ९ (प्रतिनिधी): नवी दिल्ली येथे रामलीला मैदानावर बाबा रामदेव यांच्यासहित सत्याग्रहाला बसलेल्या हजारो आंदोलकांवर मध्यरात्रीच्या वेळी लाठीहल्ला व अश्रुधूराच्या कांड्या सोडण्याची कृती ‘युपीए’च्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या सांगण्यावरून करण्यात आली. घटनेत बहाल केलेल्या मूलभूत अधिकारांची गळचेपी करण्याचे दुष्कृत्य केलेल्या सोनिया गांधी यांनी देशाची माफी मागावी, अशी मागणी प्रदेश भाजपच्या राष्ट्रीय प्रभारी आरती मेहरा यांनी केली.
आज (दि.९) भाजप मुख्यालयात बोलावण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. याप्रसंगी पक्षाचे प्रवक्ते राजेंद्र आर्लेकर हजर होते. बाबा रामदेव यांच्या सत्याग्रहापूर्वी विमानतळावर त्यांची भेट घेण्यासाठी कॉंग्रेसच्या चार वरिष्ठ मंत्र्यांची लगबग संपूर्ण देशाने पाहिली आहे. बाबा रामदेव यांचे तळवे चाटून झाल्यानंतर अचानक रात्री कोणतीही पूर्वसूचना किंवा जाहीर सूचना न देताच बंद शामियानात भजन व देशभक्तीची गीते गाणार्या सत्याग्रहींवर लाठीहल्ला करण्यामागचे कारण काय, असा सवालही श्रीमती मेहरा यांनी केला. या घटनेचे कपिल सिब्बल व पी. चिंदबरम यांनी समर्थन करून आपल्या नेतृत्वाच्या हुजरेगिरीचे दर्शन घडवले. दिग्विजय सिंग यांनी चालवलेल्या बेताल वक्तव्यबाजीवरही कॉंग्रेस श्रेष्ठींचे काहीही नियंत्रण राहिलेले नाही, अशी टीकाही श्रीमती मेहरा यांनी केली. या घटनेचे उत्तरदायित्व एकातरी मंत्र्याला घ्यावेच लागेल. तसेच लाठीहल्ल्याचा आदेश देणार्या पोलिस अधिकार्यालाही बडतर्फ करण्यात यावे, अशी मागणी भाजपने केली आहे.
बाबा रामदेव यांचे सत्याग्रह आंदोलन विनाअडथळा सुरू झाले असते तर उत्तरोत्तर कोट्यवधी लोकांचा समुदाय दिल्लीत जमा होऊन सरकारविरोधात विराट उठाव झाला असता, या भीतीनेच केंद्र सरकारने भ्रष्टाचार विरोधातील हा आवाज बंद पाडला. भ्रष्टाचार व काळ्या पैशांविरोधात कडक कायद्याची मागणी करण्यासाठी महात्मा गांधी यांच्या प्रेरणेने सुरू झालेल्या या आंदोलनाकडे उदासीन व असंवेदनशील भावनेतूनच पाहणारे पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग हे सोनिया गांधी यांच्या हातातील केवळ बाहुले बनले आहे. कॉंग्रेसच्या भरकटलेल्या जहाजाचे कॅप्टन असूनही पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या हातात सुकाणू नाही, हीच त्यांची परिस्थिती बनल्याचा टोलाही श्रीमती मेहरा यांनी हाणला.
दिल्लीत राष्ट्रविरोधी शक्तींनी बोलावलेल्या बैठकीवर कारवाई होत नाही परंतु लोकशाही पद्धतीने शांततेत आंदोलन करणार्या बाबा रामदेव यांचा सत्याग्रह मात्र उधळून टाकला जातो, हा कुठचा न्याय, असा प्रश्न श्रीमती मेहरा यांनी केला. उत्तर प्रदेशात गरीब शेतकर्यांवर पोलिसी अत्याचार होत असल्याचा बाऊ करून मायावती यांच्यावर तोंडसुख घेणार्या राहुल गांधी यांची रामलीला घटनेवर मात्र बोलतीच बंद कशी काय, असा सवालही त्यांनी केला आहे. सोनिया गांधी व राहुल गांधी यांनी बाबा रामदेव यांच्याशी झालेल्या गैरवर्तनाबाबत अद्याप चकार शब्दही उच्चारलेला नाही. २०१० हे घोटाळ्यांचे वर्ष म्हणून पाळले गेले. आत्तापर्यंत विविध सामाजिक संघटना तथा विरोधी पक्ष असलेल्या भाजपने संसदेत व बाहेरही भ्रष्टाचाराविरोधात आक्रमक भूमिका घेतल्याने व न्यायदानाची सर्वोच्च संस्था असलेल्या सर्वोच्च न्यायालयाने पुढाकार घेतल्यानेच भ्रष्ट नेते तुरुंगात पोहोचले आहेत. भ्रष्टाचार विरोधातील सरकारी यंत्रणा पूर्णपणे निकामी झाल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.
-------------------------------------------------------------
सरकारविरोधात भाजपचा उठाव
गोव्यातील दिगंबर कामत सरकारच्या चार वर्षांच्या भ्रष्ट राजवटीविरोधात या महिन्याअखेरीस भाजपतर्फे मोठा उठाव करण्याची तयारी भाजपने आखली आहे. सरकारच्या चार वर्षांच्या पूर्तीनिमित्ताने राज्यात सर्वत्र धिक्कार दिन पाळला जात आहे. विविध ठिकाणी सभा, बैठका घेऊन सरकारच्या भ्रष्टाचाराचे पाढे जनतेसमोर वाचले जात आहेत. चर्चिल आलेमाव यांच्याकडून सार्वजनिक बांधकाम खात्याच्या विविध विकासकामांवर कमिशन उकळण्याची पद्धत हैराण करणारीच आहे, असा टोला हाणून या सर्व भ्रष्ट नेत्यांचे पितळ उघडे करणार असल्याचेही श्रीमती आरती मेहरा म्हणाल्या.
Friday, 10 June 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment