Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 9 April, 2011

जनतेला जाब द्यावाच लागेल - पर्रीकर

निगरगट्ट सरकारचा भाजपतर्फे अभिनव पद्धतीने निषेध
अधिवेशनाचे सूप वाजले


पणजी, दि. ८ (प्रतिनिधी)
बहुमताच्या जोरावर विरोधी पक्षाचे तोंड बंद करून सरकारने विधिमंडळाच्या पावित्र्याचा भंग केला आहे. आपल्या मंत्रिमंडळातील मंत्र्याच्या गैरकृत्यांवर पांघरूण घालून मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी बेशरमपणाचा कळस गाठला आहे. निगरगट्टपणे ते सभागृहात विरोधकांचा आवाज दडपून टाकण्यात यशस्वी झालेले असले तरी त्यांना या कृतीचा जाब जनतेला मात्र द्यावाच लागेल, असा इशारा विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी दिला.
विधानसभा अधिवेशनाच्या आजच्या चौथ्या दिवशीही विरोधी भाजपने शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात यांच्या आचरणाबाबत चर्चा करण्यासाठी सादर केलेला स्थगन प्रस्ताव सभापती प्रतापसिंग राणे यांनी विचाराधीन घेतला नसल्याने विरोधी भाजपने तोंडाला काळे पट्टे बांधून सरकारचा अभिनव पद्धतीने निषेध केला. सकाळी प्रश्‍नोत्तराचा तास तहकूब केल्यानंतर दुपारी खाजगी कामकाजावर भाजप आमदारांनी बहिष्कार टाकला. शेवटी राष्ट्रगीतासाठी मात्र सर्व विरोधी आमदारांनी हजेरी लावून आपला निषेध न्याय्य असल्याचेही दाखवून दिले. सभापती राणे यांनी शेवटी बेमुदत काळासाठी विधानसभा तहकूब करीत असल्याचे जाहीर केले.
आज विधानसभा अधिवेशनाचा शेवटचा दिवस होता. सकाळी प्रश्‍नोत्तराचा तास सुरू होताच भाजप आमदार तोंडाला काळे पट्टे बांधून सभागृहात हजर राहिले. विरोधकांनी मागितलेल्या चर्चेला नकार दर्शवून सरकार विरोधकांचा आवाज बंद करू पाहत आहे, असाच संदेश या कृतीव्दारे भाजपने पोचवला. सभापती प्रतापसिंग राणे यांनी आजही हा स्थगन प्रस्ताव नाकारल्याने व भाजपने आपला हट्ट कायम ठेवल्याने प्रश्‍नोत्तराचे कामकाज तहकूब करण्यात आले. दुपारी १२.३० वाजता पुन्हा कामकाजाला सुरुवात झाली असता सर्व भाजप आमदारांनी या कामकाजावर बहिष्कार टाकला. शेवटी सभापती राणे यांनी समारोप संदेश दिल्यानंतर राष्ट्रगीतावेळी मात्र भाजप आमदार हजर राहिले.
सरकारचा पळपुटेपणा उघड
विविध गुन्हेगारी प्रकरणांची पार्श्‍वभूमी असलेल्या व विधानसभा अधिवेशन काळात विदेशी चलन तस्करी प्रकरणी मुंबई कस्टम्स अधिकार्‍यांच्या तावडीत सापडलेल्या शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात यांच्या आचरणाबाबत चर्चा करण्याचा स्थगन प्रस्ताव चर्चेला घेण्यास नाकारून सरकारने आपला पळपुटेपणा दाखवून दिला, असा आरोप विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी केला. पहिला स्थगन प्रस्ताव फेटाळल्यानंतर भाजपने नवीन स्थगन प्रस्ताव सादर केला होता, पण सभापती राणे यांनी हा प्रस्ताव विधानसभा कामकाज नियमात येत नसल्याचे सांगून तो नाकारला. याबाबत आपला निवाडाही त्यांनी दिला नाही. यापूर्वी सरकार अल्पमतात आले असताना पेडण्यातील अपघाताचे निमित्त पुढे करून कामकाज तहकूब करण्यात आले होते; त्यावेळी कोणते नियम लागू करण्यात आले होते, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
घोटाळ्यांचा पाठपुरावा करणार
विधानसभा अधिवेशनात भाजपने सरकारच्या अनेक घोटाळ्यांचा पर्दाफाश केला. विद्यमान कॉंग्रेस आघाडी सरकार हे नखशिखांत भ्रष्टाचारात बुडालेले आहे व अशावेळी या सर्व भ्रष्टाचारी प्रकरणांचा योग्य पद्धतीने पाठपुरावा करण्यासाठी भाजप पक्षातर्फे राज्यव्यापी आंदोलन छेडले जाणार आहे. अनेक प्रकरणांचे पुरावेच या अधिवेशन काळात हातात सापडल्याने प्रसंगी पोलिस तक्रार व न्यायालयाचेही दरवाजे ठोठावण्याची तयारी भाजपने चालवली आहे. येत्या दहा ते पंधरा दिवसांत या बाबतीत भाजप आपली भूमिका स्पष्ट करणार आहे, असेही यावेळी पर्रीकर यांनी स्पष्ट केले.
सरकार लोकायुक्तांना घाबरते
लोकायुक्त विधेयक विधानसभेत मांडून त्यावर चर्चा घडवून आणण्यासाठी सरकारने कोणताही पुढाकार घेतला नाही. मुळातच भ्रष्टाचारात गुरफटलेल्या सरकारला लोकायुक्तांची नियुक्ती झालेलीच नको आहे, हे यातून स्पष्ट झाले आहे. दिल्लीत अण्णा हजारे यांच्याकडून सुरू असलेले आंदोलन हे जनतेचे आंदोलन आहे. भ्रष्टाचाराविरोधातील लढा हा जनतेच्या साहाय्यानेच उभारावा लागेल व त्यावेळीच त्याला महत्त्व प्राप्त होईल. गोव्यातही आता लोकायुक्त विधेयकासाठी जनतेने पुढाकार घेण्याची गरज आहे. या लढ्याला भाजप पूर्ण पाठिंबा देईल, असेही ते म्हणाले.

अण्णा हजारेंपुढे केंद्र सरकार नमले!


- सर्व मागण्या मान्य!
- उद्या उपोषण सोडणार


नवी दिल्ली, दि. ८
भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन व्हावे म्हणून समाजसेवक अण्णा हजारे यांनी पुकारलेल्या आंदोलनापुढे अखेर केंद्र सरकारने नमते घेतले असून आज शुक्रवारी त्यांच्या सर्व मान्य केल्या आहेत. त्यानुसार, अण्णा हजारे यांनी उद्या शनिवारी सकाळी १० वाजता आपण आरंभलेले आमरण उपोषण सोडणार असल्याची घोषणा केली आहे. दरम्यान, प्राप्त वृत्तानुसार जन लोकपाल विधेयकाचा मसुदा तयार करणार्‍या प्रस्तावित संयुक्त समितीच्या अध्यक्षपदी अर्थमंत्री प्रणव मुखर्जी आणि सह अध्यक्षपदी माजी केंद्रीय कायदा मंत्री शांती भूषण असतील. या समितीत स्वतः अण्णा हजारे, अरविंद केजरीवाल, संतोष हेगडे आणि प्रशांत भूषण यांचाही समावेश असणार आहे. लवकरच हा मसुदा अधिसूचित केला जाणार आहे.
अण्णा हजारे यांनी आज केलेल्या या घोषणेमुळे भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून गेले चार दिवस निर्माण झालेली कोंडी फुटली आहे. हजारे यांचे प्रतिनिधी अरविंद केजरीवाल आणि स्वामी अग्निवेश यांची केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री कपिल सिब्बल, कायदामंत्री विरप्पा मोईली आणि अल्पसंख्याक व्यवहार मंत्री सलमान खुर्शीद यांच्याशी झालेली चर्चा सफल झाल्यावर हजारेंनी गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेले आमरण उपोषण मागे घेणार असल्याची घोषणा केली.

लोकपाल विधेयकाबाबत अण्णांनी सरकारपुढे पाच मागण्या ठेवल्या होत्या. विधेयकाचा मसुदा तयार करणार्‍या समितीवर सरकारचे पाच आणि आमचे पाच प्रतिनिधी असावेत. सरकारी प्रतिनिधी समितीच्या अध्यक्षपदी असल्यास आपला प्रतिनिधी उपाध्यक्ष असावा आणि दोघांकडे समान अधिकार असावेत, अशी मागणी देखील अण्णांनी केली होती. समितीवर असणारे सर्व सरकारी प्रतिनिधी स्वच्छ चारित्र्याचे असावेत, त्यांच्यावर गैरव्यवहार केल्याचा आरोप असू नये, तसेच समितीच्या स्थापनेबाबत केंद्र सरकारने अध्यादेश काढावा, असेही अण्णांनी सांगितले होते. अण्णांच्या या सर्व मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत.

न्यायालयीन अवमानाची ‘हॅट्ट्रिक!’

म्हापसा जिल्हा इस्पितळाचा शुभारंभ कधी?
पणजी, दि. ८ (प्रतिनिधी)
म्हापसा जिल्हा इस्पितळ ३१ मार्च २०११ पर्यंत सुरू करण्याचे लेखी आश्‍वासन देऊनही त्याचे पालन करण्यास राज्य सरकारला पुन्हा एकदा अपयश आल्याने न्यायालयीन अवमानाची नामुष्कीजनक ‘हॅट्ट्रिक’ साधण्याची पाळी सरकारवर ओढवली आहे. १८ जानेवारी २०११ रोजी राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात ३१ मार्च २०११ पर्यंत सदर जिल्हा इस्पितळ सुरू करण्याचे आश्‍वासन दिले होते. यापूर्वी अशाच पद्धतीने राज्य सरकारने खंडपीठाला दोन वेळा हमी देऊनही त्याची पूर्तता करण्याचे औचित्य दाखवले नव्हते.
आझिलो इस्पितळाची अवस्था दयनीय झाल्याने उत्तर गोव्यातील जनतेच्या आरोग्याची काळजी वाहण्यासाठी भाजप सरकारच्या कार्यकाळात उभारण्यात आलेल्या म्हापसा जिल्हा इस्पितळाचे घोंगडे अजूनही भिजतच पडले आहे. हे इस्पितळ ‘पीपीपी’ पद्धतीवर सुरू करण्यास भाजप तथा सरकार पक्षातील हळदोण्याचे आमदार ऍड. दयानंद नार्वेकर यांनी तीव्र विरोध केला होता. ‘पीपीपी’ पद्धतीवर हे इस्पितळ सुरू करणे म्हणजे या इस्पितळाचे खाजगीकरण करणे होय व त्याचा फटका सर्वसामान्य जनतेला बसेल, अशी भीती यावेळी व्यक्त करण्यात आली होती. या ठिकाणी काही अतिमहत्त्वाच्या सुविधा उभारण्यासाठी ‘पीपीपी’ पद्धत अवलंबिण्यास हरकत नसल्याचे स्पष्ट करून भाजपने हे इस्पितळ तात्काळ सुरू करावे, अशी भूमिका घेतली आहे. दरम्यान, या विधानसभेत आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी विरोधकांना विश्‍वासात घेऊनच हे इस्पितळ सुरू करणार असल्याचे स्पष्टीकरण देऊन एक सादरीकरणही केले आहे; पण त्याचे नेमके काय झाले हे मात्र कळू शकले नाही.
सुमारे ४८ कोटी २४ लाख ४० हजार ५६२ रुपये खर्चून उभारण्यात आलेले हे इस्पितळ गेली तीन वर्षे उद्घाटनाची वाट पाहत पडून आहे. ३० नोव्हेंबर २००८ साली या इस्पितळाचे बांधकाम पूर्ण झाले होते. या इस्पितळात ६८ लाख २० हजार रुपये खर्च करून अद्ययावत यंत्रणाही विकत घेण्यात आली होती. परंतु, यांपैकी बहुतांश यंत्रणांची मुदत संपल्याचेही उघड झाले आहे.
सध्याचे आझिलो इस्पितळ अत्यंत दयनीय अवस्थेत आहे. या ठिकाणी सुरळीतपणे सुरू असलेल्या विभागांचे निदान पहिल्या टप्प्यात स्थलांतर व्हावे, अशी मागणी भाजपने केली आहे. राज्यातील सरकारी इस्पितळांच्या दयनीय परिस्थितीवरून प्रकाश सरदेसाई यांनी मुंबई उच्च न्यायालयात एक जनहित याचिका सादर केली होती. या याचिकेची दखल घेऊन खंडपीठाने सर्व सरकारी इस्पितळांचे सर्वेक्षण करून अहवाल मागविला होता. म्हापसा जिल्हा इस्पितळाचे बांधकाम पूर्ण होऊनही ते सुरू झाले नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आल्यानंतर ते त्वरित सुरू करण्याचे आदेश खंडपीठाने दिले होते. तेव्हा सुरुवातीला २००९ मध्ये सरकारने एका वर्षाची मुदत मागून घेतली. या मुदतीत इस्पितळ सुरू करण्यात अपयश आल्यानंतर पुन्हा एका वर्षाची मुदत घेण्यात आली. हा शब्द पाळण्यातही सरकार अपयशी ठरल्याने अखेर १८ जानेवारी २०११ रोजी सरकारने ३१ मार्च २०११ पर्यंत हे इस्पितळ सुरू करू, असे न्यायालयाला कळवले. आता ३१ मार्च २०११ ची मुदत संपून गेल्याने सतत तीन वेळा न्यायालयाचा अवमान झाला आहे. या अवमान प्रकरणी आता न्यायालय नेमकी काय भूमिका घेते याकडे अनेकांचे लक्ष लागून राहिले आहे.

गाडीच्या टाकीचा स्फोट होऊन वेल्डर मृत्युमुखी

मयेकर कुटुंबीयांवर आकाश कोसळलेडिचोली, दि. ८ (प्रतिनिधी)
मये येथे एका गाडीचे वेल्डिंग काम सुरू असताना गाडीच्या केरोसीन टाकीचा व गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने वेल्डिंग करणारा कुंदन मोहन मयेकर (४०) हा केळबायवाडा - मये येथील इसम ठार झाला. या अपघातात गाडीचे चालक दादासाहेब राणे जखमी झाले आहेत.
उपलब्ध माहितीनुसार, केळबायवाडा - मये येथे सकाळी ही घटना घडली. दादासाहेब राणे जीए ०१ झेड १२७८ या क्रमांकाच्या गाडीची दुरुस्ती करण्यासाठी कुंदन याच्या वेल्डिंग गॅरेजमध्ये आले होते. यावेळी गाडीतील केरोसीनच्या पत्र्याच्या टाकीला वरच्या बाजूने वेल्डिंग करण्याचे काम सुरू असताना या टाकीचा भीषण स्फोट झाला. हा स्फोट एवढा जबरदस्त होता की त्यात वेल्डिंग करणारा कुंदन गाडीतून बाहेर फेकला गेला. तो गंभीर जखमी झाल्याने त्याला तातडीने डिचोली इस्पितळात नेण्यात आले. मात्र तिथे त्याला मृत घोषित करण्यात आले. या स्फोेटात जवळच उभे असलेले दादासाहेब राणे जखमी झाले. त्यांना उपचारार्थ आझिलो इस्पितळात हालवण्यात आले आहे.
दरम्यान, सदर स्फोटाची तीव्रता इतकी होती की, त्यामुळे आजूबाजूच्या घरांतील खिडक्यांची तावदाने हादरल्याची हादरल्याची खबर आहे. बाजूच्या दुचाकीही या स्फोटामुळे खाली कोसळल्या. स्फोट झालेल्या टाटा मोबाईल गाडीची काच सुमारे १०० मीटर दूरवर जाऊन पडली होती तर टाकीचा चेंदामेंदा झाला होता.
पोलिस उपनिरीक्षक तुकाराम वाळके यांनी साथीदारांसह या घटनेचा पंचनामा केला आहे. कुंदनचा मृतदेह बांबोळी येथे शवविच्छेदनासाठी पाठवून संध्याकाळी नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. सदर स्फोट नेमका कसा झाला याचा तपास विज्ञान साहाय्यक सुशांत नाईक करत असून केरोसीन आणि गॅस यांच्यातील रासायनिक प्रक्रियेतून हा स्फोट झाल्याची चर्चा आहे. डिचोली अग्निशामक दलाने घटनास्थळी येऊन पाहणी केली.
दरम्यान, मयत कुंदन विवाहित असून त्याला एक मुलगा व दोन लहान मुली आहेत. घरातच वेल्डिंगचे काम करताना हा दुर्दैवी अपघात घडल्याने या कुटुंबावर आकाशच कोसळले आहे.

आयपीएल ‘सर्कस’चे दिमाखदार उद्घाटन!

चेन्नई, दि. ८
‘क्रिकेटचे कॉकटेल’ अशी ओळख बनलेल्या इंडियन प्रिमियर लीग अर्थात ‘आयपीएल’ टी-२० क्रिकेट स्पर्धेला शुक्रवारी धमाकेदार, बॉलिवूड स्टाइल उद्घाटन सोहळ्याद्वारे सुरुवात झाली. चेन्नईतील एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर झालेल्या एका रंगतदार सोहळ्यात, बीसीसीआय अध्यक्ष शशांक मनोहर यांनी आयपीएलच्या चौथ्या हंगामाला सुरुवात झाल्याचे जाहीर केले. जगातील आघाडीच्या क्रिकेटपटूंचा सहभाग असलेली ही स्पर्धा प्रथमच आयपीएलच्या संकल्पनेचे जनक ललित मोदी यांच्याशिवाय आयोजित होत आहे.
आयोजनातील भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे मोदी यांची कमिशनरपदावरून उचलबांगडी करून, बीसीसीआयने ही जबाबदारी चिरायू अमीन यांच्यावर सोपवली आहे. आयपीएलमध्ये सहभागी झालेल्या कोलकाता नाइट रायडर्स संघाचा एक मालक आणि चित्रपट अभिनेता शाहरुख खान याचा ‘परङ्गॉर्मन्स’ सोहळ्याचे प्रमुख आकर्षण ठरले.
स्पर्धेत सहभागी झालेल्या दहाही संघांच्या कर्णधारांनी या सोहळ्यात क्रिकेट बॅनरवर स्वाक्षर्‍या केल्या. चेन्नई सुपरकिंग्ज संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी, मुंबई इंडियन्सचा कर्णधार सचिन तेंडुलकर आणि पुणे वॉरियर्सचा कर्णधार युवराज सिंग व्यासपीठावर आल्यावर प्रेक्षकांनी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट केला.आयपीएलच्या गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष अमीन यांच्या छोटेखानी प्रास्ताविकानंतर मनोहर यांचे भाषण झाले. मनोहर यांनी प्रथम भारतीय क्रिकेट संघाचे वर्ल्डकप विजयाबद्दल अभिनंदन केले. चौथ्या हंगामात नव्याने सामील झालेल्या कोची टस्कर्स, केरळ आणि पुणे वॉरियर्स या दोन संघांचे त्यांनी स्वागत केले. स्पर्धेतील पहिली लढत महेंद्रसिंग धोनीचे चेन्नई सुपरकिंग्ज आणि गौतम गंभीरचे कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात झाली.

ट्रकचालक नव्हे, हे यमदूतच!

परवान्याअभावी वर्षभरात ३७७० ट्रकचालकांना दंड
पणजी, दि. ८ (प्रतिनिधी)
राज्यातील विविध रस्त्यांवर ट्रक नव्हे तर साक्षात यमदूतच धावत असतात, अशी परिस्थिती विधानसभेत मिळालेल्या एका माहितीवरून स्पष्ट झाली आहे. गेल्या एका वर्षांतच एकूण ३७७० ट्रकचालकांना परवाना (ड्रायव्हिंग लायसेन्स) नसताना ट्रक चालवल्याबद्दल राज्य वाहतूक खात्यातर्फे दंड ठोठावण्यात आल्याची खळबळजनक माहिती उघड झाली आहे.
राज्यातील विविध खाण प्रभावित क्षेत्रांत परवान्याशिवाय खनिजवाहू ट्रक हाकण्याचे काम परप्रांतीय चालक मोठ्या प्रमाणात करीत असल्याचा आरोप भाजपतर्फे करण्यात आला आहे. या ट्रक चालकांचे परवाने तपासण्याची कोणतीच यंत्रणा राज्य परिवहन खात्याकडे नाही; मात्र, त्याबाबत व्यापक सर्वेक्षण करण्याची तयारी खात्याने दर्शवली आहे.
राज्यात एकीकडे खनिज ट्रकांमुळे रस्ता अपघातांची संख्या वाढत असतानाच सरकार मात्र त्याबाबत बेफिकीर असल्याचेच चित्र अतिशय धोकादायक आहे. सांगेचे आमदार वासुदेव मेंग गावकर यांनी एका तारांकित प्रश्‍नाव्दारे ही माहिती मिळवली आहे. वाहतूकमंत्री सुदिन ढवळीकर यांनी दिलेल्या लेखी उत्तरात गेल्या वर्षभरात एकूण ३७७० ट्रक चालकांना वाहन चालक परवाना नसल्याने खात्याने दंड ठोठावला आहे. केंद्रीय मोटर वाहन कायदा, १९८८ नुसार देशात कुठेही काढलेला परवाना ग्राह्य ठरतो व त्यामुळे या चालकांना इथे वाहन चालक परवाना नव्याने काढायला लावणे शक्य होत नसल्याचेही या उत्तरातून स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, या प्रकरणी प्राप्त झालेल्या अधिक माहितीनुसार, गेल्या तीन वर्षांत मिळून ८७८४ विविध प्रकारच्या वाहन चालकांना परवान्याअभावी दंड ठोठावण्यात आला आहे. त्यात २०१० साली सर्वाधिक १६,५०,१०० रुपये दंड वसूल करण्यात आला.

Friday 8 April, 2011

बाबूशना त्वरित वगळा

भाजपची दिल्लीत मागणी
नियमापेक्षा जादा भारतीय आणि परकीय चलन दुबईला घेऊन जाण्याच्या प्रयत्नात असताना कस्टम्सने मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळावर ताब्यात घेतलेले गोव्याचे शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात यांना ताबडतोब दिगंबर कामत मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात यावा, अशी जोरदार मागणी आज दिल्लीत भाजपतर्फे करण्यात आली.
परकीय चलन व्यवस्थापन कायद्याखाली (‘फेमा’) बाबूश यांना ताबडतोब अटक करा आणि त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करा, अशी मागणी भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रकाश जावडेकर यांनी येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना केली. एका केंद्रीय मंत्र्याने फोन केल्यानंतर बाबूश यांची सुटका झाली असे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. तो केंद्रीय मंत्री कोण याचीही चौकशी झाली पाहिजे, असेही जावडेकर म्हणाले.

आमच्या हक्कांवर गदा का?

दयानंद नार्वेकरांची सभापतींकडे पृच्छा

पणजी, दि. ७ (विशेष प्रतिनिधी)
‘सभापती महोदय, गेले दोन दिवस सभागृहात गोंधळ सुरू आहे. गदारोळात दिवसाचे कामकाज जरी आटोपण्यात आले तरी आम्हाला सभागृहात आमचे म्हणणे मांडायचा अवसरच मिळाला नाही. लोकशाही तत्त्वानुसार विरोधकांनी एखाद्या गंभीर प्रकरणात सभागृहात चर्चेची मागणी करणे हे वावगे नाही. तो त्यांचा घटनादत्त अधिकारच आहे. तथापि, गोंधळामुळे आमचा बोलण्याचा हक्कच हिरावला गेला आहे. सरकारही विरोधकांच्या मागणीबाबत ढिम्मच राहिल्याने आमचा हिरावलेला हक्क मिळवून देण्यासाठी सभापतींनी यात हस्तक्षेप करण्याची हीच योग्य वेळ आहे’, असे आवाहन सत्ताधारी पक्षाचे आमदार दयानंद नार्वेकर यांनी आज विधानसभेत आपल्या एका हरकतीच्या मुद्यावर बोलताना मांडले.
गेले दोन दिवस आम्ही विधानसभेत येत आहोत. सरकारचे कितीतरी अधिकारी येतात. मात्र एका मंत्र्यामुळे विरोधकांनी सभागृहात गोंधळ सुरू केला आहे. विरोधी पक्षाची भूमिका अयोग्य आहे असे मी म्हणणार नाही. घटनेने तो अधिकारच त्यांना दिला आहे. मात्र विधानसभा कुठल्या तरी चुकीच्या मार्गाने जाऊ नये यासाठी सभापतींनी त्यांना लाभलेल्या विशेषाधिकारांचा वापर करून या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची गरज असल्याचे नार्वेकर यांनी सांगितले.
एक मंत्री म्हणजे सारा गोवा नव्हे. आमच्या अन्य मंत्री व सरकारविरुद्धही अनेक तक्रारी आहेत. त्यामुळे त्या मांडणे व मतदारसंघातील ज्या जनतेने आम्हाला निवडून दिले त्यांच्या समस्यांना वाचा फोडणे हे आमचे कर्तव्य आहे. तथापि, ते पार पाडायचे तर विधानसभेचे कामकाज सुरळीत चालले पाहिजे. सभागृहाचे कामकाज सुरळीत कसे होईल हे पाहण्याची जबाबदारी सभापती व सरकारची आहे, असे त्यांनी नमूद केले.
याआधी जेव्हा मुख्यमंत्र्यांना नको असेल तेव्हा त्यांनी कित्येक मंत्र्यांना अलगद बाजूला केले आहे, असेही नार्वेकर म्हणाले. अर्थात, यावेळी त्यांचा रोख स्वतःला गमवाव्या लागलेल्या मंत्रिपदावर होता. त्यांच्यावर मुख्यमंत्र्यांनी ती कारवाई केली होती. त्यामुळे, यावेळी मात्र मुख्यमंत्री गप्प का, अशी विचारणा नार्वेकरांनी केली.
सभागृहाचे कामकाज सुरळीत चालवणे तुम्हाला शक्य आहे. मुख्यमंत्रीही यात लक्ष घालू शकतात. मात्र तसे न होऊ देता सगळ्यांनीच बघ्याची भूमिका घेणे योग्य नव्हे. त्यामुळे माझ्या हक्कांवर आलेली गदा दूर करण्याची मी तुम्हाला विनंती करत आहे, असे कळकळीचे आवाहन नार्वेकरांनी सभापतींना केले. विधानसभा सुरळीत चालत नाही याचा आपल्याला खेद होतो, असेही नार्वेकर म्हणाले.
सभागृहात दिलेल्या आश्‍वासनांची पूर्तता होत नाही हे सांगताना नार्वेकरांनी ‘रिव्हर प्रिन्सेस’ जहाजाचे भंगार मांडवी नदीत बिठ्ठोणच्या बाजूने कापण्याच्या सुरू असलेल्या कामाकडे सरकारचे लक्ष वेधले. दोन दिवसांआधीच सरकारने तिथे भंगार कापले जाणार नसल्याचे सांगितले होते याकडेही नार्वेकर यांनी अंगुलिनिर्देश केला.

युवक कॉंग्रेसवरील हल्ल्याची गृह खात्याकडे नोंदच नाही?

पणजी, दि. ७ (प्रतिनिधी)
ताळगावात युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांवर हल्ला झाल्याची कोणतीच नोंद गृह खात्याकडे नाही, अशी खळबळजनक माहिती गृहमंत्री रवी नाईक यांनी एका तारांकित प्रश्‍नावर दिली आहे. हळदोण्याचे आमदार ऍड. दयानंद नार्वेकर यांनी विचारलेल्या एका प्रश्‍नाला दिलेल्या लेखी उत्तरात गृह खात्याने ही भूमिका घेतल्याने बरेच वादळ उठले आहे. बाबूश मोन्सेरात यांची पाठराखण करण्यासाठीच कॉंग्रेस पक्षाकडून युवक कॉंग्रेसला वार्‍यावर सोडून दिल्याचेच यावरून उघड झाले आहे.
दोनापावला येथील नियोजित ‘आयटी हॅबिटॅट’ प्रकल्पाला पाठिंबा दर्शवण्यासाठी युवक कॉंग्रेसने १८ डिसेंबर २००७ रोजी ताळगावात रॅलीचे आयोजन केले होते. ताळगावचे तत्कालीन आमदार तथा विद्यमान शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी या प्रकल्पाला विरोध दर्शवला होता. या रॅलीप्रसंगी पोलिसांच्या उपस्थितीतच बाबूश समर्थकांनी युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांवर जीवघेणा हल्ला करून त्यांना रक्तबंबाळ केले होते. या हल्ल्यात खुद्द युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष संकल्प आमोणकर व इतरांच्या वाहनांचीही अपरिमित नासधूस करण्यात आली होती. या हल्ल्याचे वृत्तांकन स्थानिक प्रसारमाध्यमांत तर झाले होतेच; परंतु आजही या हल्ल्याची क्षणचित्रे ‘यूट्यूब’वर उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे या हल्ल्यात माजी केंद्रीय कायदामंत्री तथा विद्यमान कायदा आयोगाचे अध्यक्ष ऍड. रमाकांत खलप यांचे पुत्र आश्‍विन खलप तसेच दक्षिण गोव्याचे युवक कॉंग्रेस नेते चिदंबर चणेकर यांना बेदम मारहाण करून गंभीर जखमी करण्यात आले होते. या घटनेची रीतसर तक्रार संकल्प आमोणकर यांनी पणजी पोलिस स्थानकात करूनही हल्लेखोरांवर कोणतीही कारवाई झाली नाही. खुद्द या घटनेनंतर वृत्तवाहिन्यांशी बोलताना बाबूश मोन्सेरात यांनी आपल्या समर्थकांनी केलेल्या कृतीचे जाहीर समर्थन केले होते.
दरम्यान, गृह खात्याने या प्रकरणी हात झटकून युवक कॉंग्रेसला पूर्णपणे वार्‍यावर सोडल्याचेच सिद्ध झाले आहे. युवक कॉंग्रेसतर्फे सध्या राज्यभरात सदस्य नोंदणी मोहीम सुरू आहे. या मोहिमेच्या पार्श्‍वभूमीवरच गृह खात्याकडून हा पवित्रा घेण्यात आल्याने त्याचे तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान, ताळगाव येथे युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांवर झालेल्या हल्ल्याची छायाचित्रे व व्हिडिओ फुटेज उपलब्ध असतानाही दोषींवर कारवाई करण्यात आली नाही. या हल्ल्यात सामील असलेले काहीजण सध्या पणजी महानगरपालिकेवर नगरसेवक म्हणून निवडूनही आले आहेत.
जाळपोळीची पूर्वकल्पना होती
दोनापावला येथील आयटी हॅबिटॅट जाळपोळ प्रकरणी सरकारला पूर्वकल्पना देण्यात आली होती व याबाबत खुद्द अन्य एका प्रश्‍नावर दिलेल्या उत्तरात सरकारनेही होकार दिला आहे, अशी माहिती ऍड. नार्वेकर यांनी दिली आहे. आपण स्वतः याबाबत मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना फोन करून माहिती दिल्याचे त्यांनी सांगितले. एवढे करूनही या जाळपोळ प्रकरणी कोणतेही पुरावे सापडत नाहीत, असे कारण पुढे करून या प्रकरणाची फाईलच बंद करण्याची कृती कितपत योग्य आहे, याचा निर्णय सरकारनेच घ्यायला हवा, असेही ते म्हणाले.

वाटमारी करणारे तिघे गजाआड

पणजी, दि. ७ (प्रतिनिधी)
जुने गोवे बगल रस्त्यावर वाटमारी करणार्‍या तिघा तरुणांना आज पहाटे जुने गोवे पोलिसांनी रंगेहाथ अटक केली. पहाटे ३च्या दरम्यान राज्याबाहेरील मालवाहू ट्रकांना अडवून त्यांच्याकडून पैसे उकळण्याचे काम या तरुणांनी सुरू केले होते. या प्रकरणी पोलिसांनी सचिन बाबू भगवान (२४. रा. खोर्ली जुने गोवे), सर्वेश जगन्नाथ नाईक (२५, रा. परकेभाट करमळी व दिनेश अनंत माशेलकर (२५, रा. सकयलेभाट करमळी) यांना भा. दं. सं. ३९२ कलमानुसार अटक केली आहे.
त्याचप्रमाणे या तिघांकडून जीए ०७ डी ४५५० व जीए ०७ एच ६८८३ क्रमांकाच्या दोन दुचाक्या जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणाची तक्रार इम्तियाज अनामुल्ला साहेब यांनी केली आहे. अधिक माहितीनुसार, तक्रारदार इम्तियाज हा केए २० बी ८६६९ क्रमांकाचा ट्रक घेऊन पणजीला येत होता. पहाटे ३च्या दरम्यान जुने गोवे बगल रस्त्यावर तो पोहोचला असता या तिघांच्या टोळीने ट्रकच्या मधोमध दुचाकी घालून त्याला अडवले. एकाने ट्रकाच्या केबीनमध्ये जाऊन चालकाच्या खिशातील ४०० रुपये घेऊन पळ काढण्याचा प्रयत्न केला असता गस्तीला असलेले पोलिस तिथे पोहोचले व त्यांनी तिघांनाही ताब्यात घेतले. दरम्यान, इम्तियाज याने त्यांच्याविरुद्ध तक्रार नोंद केली आहे. अधिक तपास जुने पोलिस स्थानकाचे निरीक्षक फ्रान्सिस कॉर्त यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

फलोल्पादन ‘एमडीं’ची अखेरीस उचलबांगडी

पणजी, दि. ७ (प्रतिनिधी)
गोवा फलोत्पादन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक ऑर्लांड डिसोझा यांची अखेर या पदावरून उचलबांगडी केली गेली आहे. आज त्या संबंधीचा आदेश जारी करून कृषी खात्याच्या उपसंचालकपदावर त्यांना रुजू करण्यात आले आहे. फलोत्पादन महामंडळ व्यवस्थापकीय संचालकपदाचा अतिरिक्त ताबा कृषी खात्याचे संचालक सतीश तेंडुलकर यांच्याकडे देण्यात आला आहे.
गोवा फलोत्पादन महामंडळाच्या कारभाराचे वाभाडेच विरोधी भाजपने विधानसभेत काढले होते. महामंडळातर्फे भाजी खरेदीत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचे विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर तसेच अन्य आमदारांनी सभागृहात उघड केले होते. या गैरव्यवहारांवर नजर ठेवण्याची जबाबदारी व्यवस्थापकीय संचालकांची होती; पण त्यांनी याकडे कानाडोळा केल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही विधानसभेत करण्यात आली होती. कृषिमंत्री विश्‍वजित राणे यांनी त्या संबंधी विधानसभेत स्पष्ट आश्‍वासनही दिले होते. फलोत्पादन महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदाचा ताबा कृषी खात्याचे उपसंचालक ऑर्लांड डिसोझा यांच्याकडे देण्यात आला होता. ते हंगामी तत्त्वावर या पदावर होते. आज त्यांना कृषी खात्यातील पूर्वपदावर रुजू करून हा ताबा कृषी संचालकांकडे देण्याचे आदेश सरकारने जारी केले.

टीम इंडियात भाऊबंदकी माजणार..!

‘आयपीएल’चा थरार आजपासून
‘आयपीएल’ अर्थात, इंडियन प्रीमियर लीगचे चौथे पर्व आजपासून सुरू होत आहे. या आयपीएलमध्ये विश्‍वचषक विजेते भारतीय खेळाडू एकमेकांविरुद्ध त्वेषाने खेळत असल्याचे थरारक चित्र दिसणार आहे. यावेळी मात्र ते प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंच्या खांद्याला खांदा लावत जल्लोषात खेळतील. देशासाठी संघभावना ठेवून प्रत्येकाला सांभाळून खेळणारे भारतीय खेळाडू आता त्यांच्याचविरुद्ध अत्युच्च क्रिकेट खेळण्यासाठी लढणार आहेत. त्याचप्रमाणे विश्‍वचषकात संधी न मिळालेले खेळाडू आम्हीही या संघासाठी लायक होतो, हे सिद्ध करण्यासाठी मैदानात उतरणार आहेत.
चेन्नई सुपरकिंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी, सुरेश रैना, रविचंद्रन आश्‍विन या आपल्या संघसाथींबरोबर मायकेल हसी, ड्वेन ब्राव्हो, नुवान कुलशेखरा, सूरज रणदीव, टीम साऊथी या विदेशी खेळाडूंना साथीला घेऊन सचिन तेंडुलकर, युवराज सिंग यांच्या संघांना हरवण्यासाठी खेळणार आहे. विश्‍वचषक जिंकल्यानंतर वानखेडेवर सचिन तेंडुलकरला खांद्यावरून मिरवणारा युसुफ पठाण यावेळी त्याच सचिनला परास्त करावे यासाठी जोरदार प्रयत्न करणार आहे. त्याचप्रमाणे सचिन, वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर आदी भारतीय फलंदाज गोलंदाजीत उपयुक्त योगदान दिलेल्या मालिकावीर युवराजची गोलंदाजी फोडून काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहेत.
झहीर खानचे चेंडू स्टेडियमबाहेर टोलवण्यासाठी पठाण, रैना, धोनी आदी फलंदाज जोरदार प्रयत्न करणार आहेत. विश्‍वचषकात विदेशी खेळाडूंना टिपणारा झहीर यावेळी आपल्याच संघसहकार्‍यांना तंबूत पाठवण्यासाठी कमालीचा उतावीळ झालेला असेल.
आशिष नेहराही काही सामन्यांनंतर आपल्या संघसाथींच्या विरोधात उभा ठाकणार आहे. मुनाफ पटेल, पीयूष चावला, पठाण, श्रीशांत आदी गोलंदाज आपल्या संघसाथींना भेदक मारा करून ‘हम भी कुछ कम नही’ हेच दाखवायचा प्रयत्न करतील.
दरम्यान, समस्त भारतीय व विदेशी क्रिकेटरसिक आपलेच खेळाडू एकमेकांविरोधात कसे खेळतात हे अनुभवण्यासाठी सज्ज झाले आहेत. कुमार संगकारा विश्‍वचषकातील तो पराभव विसरून भारतीय खेळाडूंच्या जोरावर ‘आयपीएल’चे विजेतेपद मिळावे यासाठी प्रयत्न करणार आहे. कालपर्यंत संगकाराचा संघ हरू दे अशी करुणा भाकणारेे कर्नाटकी प्रेक्षक त्याच्याच विजयासाठी प्रार्थना करणार आहेत. मुंबईखेरीज अन्य भागांतील प्रेक्षक
तेंडुलकरचा संघ पराभूत व्हावा यासाठी प्रार्थना करतील. उत्कृष्ट कर्णधार धोनीच्या मर्यादा स्पष्ट करण्यासाठी त्याचेच संघसाथी त्याच्यावर बाजी उलटवण्यासाठी सज्ज झाले आहेत. गंभीरच्या फलंदाजीतील दोष दाखवण्यासाठी झहीर, भज्जी जोरदार प्रयत्न करणार आहेत. युवीचे साम्राज्य संपवण्यासाठी खुद्द धोनी, सचिन ही दिग्गज मंडळी खास योजना आखतील. झहीरची गोलंदाजी कशी फोडता येते हे दाखविण्यासाठी धोनी - रैना आपल्या बॅटला धार लावण्यात मग्न आहेत. कोहलीला कसे लवकर बाद करता येते हे दाखविण्याचा प्रयत्न भारतीय गोलंदाज करतील. श्रीसंत आपली गोलंदाजी भले महागडी असली तरी तेंडुलकर, सेहवाग, धोनी, गंभीर यांना धडा शिकवण्यासाठी सज्ज झाला आहे.
थोडक्यात सांगायचे तर कालपर्यंत परस्परांना मैदानात मिठ्या मारणारे खेळाडू आजपासून एकमेकांना त्याच मिठीत चिरडून टाकण्याच्या योजना आखू लागले आहेत. म्हणूनच हे सगळे सामने रोमांचकारी ठरणार आहेत. या स्पर्धेतील सर्वांत रोचक भाग आहे तो हाच!

दुसरा स्थगन प्रस्तावही फेटाळल्याने तिसर्‍या दिवशीही जबरदस्त हंगामा

पणजी, दि. ७ (प्रतिनिधी)
गोव्याच्या विद्यमान मंत्रिमंडळातील शिक्षणमंत्र्यांच्या आचरणावरून अनेक प्रश्‍न उपस्थित झाले आहेत. तरीही या व्यक्तीला मंत्रिमंडळात कायम ठेवणे कितपत योग्य आहे, असा सवाल करीत विरोधी भाजपने आज सलग तिसर्‍या दिवशीही सभागृहात हंगामा केला. बाबूश मोन्सेरात प्रकरणी नव्याने सादर केलेला स्थगन प्रस्ताव चर्चेस घेण्यास सभापती प्रतापसिंग राणे यांनी स्पष्ट नकार दर्शवल्याने आजचे कामकाजही चर्चेविनाच उरकण्याची नामुष्की ओढवली.
सकाळी प्रश्‍नोत्तराचा तास तहकूब केल्यानंतर दुसर्‍या सत्रात आवाजी मतदानाव्दारे विनियोग विधेयकाला मंजुरी मिळवण्यात आली. गोव्याच्या राजकीय इतिहासात कोणतीही चर्चा न घडता विनियोग विधेयकाला मंजुरी मिळवण्याचा बट्टा अखेर कॉंग्रेस आघाडी सरकारने आपल्या माथी मारून घेतला आहे.
विदेशी चलन तस्करी प्रकरणात अडकलेल्या शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात यांच्या आचरणासंबंधी सभागृहात चर्चा घडून यावी, या मागणीसाठी गेल्या दोन दिवसांपासून विरोधी भाजपने जबरदस्त रेटा लावला आहे. काल स्थगन प्रस्ताव फेटाळल्यानंतर आज नव्याने स्थगन प्रस्ताव सादर करून विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी हा विषय चर्चेला घेण्याची विनंती सभापती प्रतापसिंग राणे यांच्याकडे केली. विदेशी चलन तस्करी प्रकरणाबरोबरच पणजी पोलिस स्थानक जाळपोळ प्रकरणाच्या चौकशीतही सदर मंत्री हस्तक्षेप करीत असल्याचे कारण पुढे करून हे प्रकरण मुंबई ‘सीबीआय’कडे सोपविण्यात यावे, असे प्रतिज्ञापत्रच सादर करण्यात आले आहे. या व्यतिरिक्त युवक कॉंग्रेस कार्यकर्त्यांवरील जीवघेणा हल्ला, दोनापावला आयटी हॅबिटॅट जाळपोळ प्रकरणातील सहभाग आदी अनेक ठपके असलेल्या बाबूश मोन्सेरात यांना मंत्रिमंडळात कायम ठेवून मुख्यमंत्री दिगंबर कामत मंत्रिमंडळाची संयुक्त जबाबदारी विसरत असल्याचा आरोपही पर्रीकर यांनी केला. विधानसभेत विरोधक हा देखील महत्त्वाचा घटक आहे व अशावेळी विरोधकांच्या आवाज थोपवून धरणे सुदृढ लोकशाहीच्या हिताचे नव्हे, असेही त्यांनी सुचवले. मात्र, पर्रीकरांचा युक्तिवाद ऐकून घेण्यास सभापतींनी नकार दर्शवत प्रश्‍नोत्तराचा तास तहकूब करण्याची घोषणा केली.
दुपारी १२.३० वाजता पुन्हा कामकाजाला सुरुवात होताच, पर्रीकर यांनी पुन्हा एकदा स्थगन प्रस्तावाचा विषय उपस्थित केला. सभापती राणे यांनी मात्र नकाराची भूमिकाच कायम ठेवत चर्चेला संमती दिली नाही. दरम्यान, हळदोण्याचे आमदार ऍड. दयानंद नार्वेकर यांनी यावेळी हरकतीचा मुद्दा उपस्थित केला. गेले दोन दिवस विधानसभेत आर्थिक मागण्यांवरील चर्चा होऊ शकली नाही. एक विधानसभा सदस्य या नात्याने आपला न्याय्य हक्क हिरावून घेण्याचाच हा प्रकार आहे व त्यामुळे सभापती प्रतापसिंग राणे यांनी आपल्याला न्याय द्यावा, असे आवाहन त्यांनी केले. सभापती राणे यांनी मात्र ऍड. नार्वेकर यांच्या या आवाहनाकडे दुर्लक्ष करून भाजप आमदारांच्या घोषणाबाजीतच सरकारला विनियोग विधेयक सादर करण्याचे आदेश देत आवाजी मतदानाने त्यांना मंजुरी दिली व दुसर्‍यांदा कामकाज तहकूब केले.
उद्या ८ रोजी शुक्रवार असल्याने या दिवशी केवळ खाजगी कामकाज असेल. सभागृहाच्या पटलावर सरकारला या दिवशी कोणताही धोका संभवत नाही व त्यामुळे बाबूश प्रकरणाचा विधानसभा पटलावरील धोका तरी तूर्तास दूर सारण्यास सरकारला यश मिळाले आहे.

मंत्रिपद तर जाणारच पण सत्ताधार्‍यांकडूनच बाबूशची अशीही ‘गेम’

पणजी, दि. ७ (प्रतिनिधी)
शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात यांचे मंत्रिपद काढून घेण्याचे स्पष्ट आदेश कॉंग्रेस श्रेष्ठींनी दिल्याची खात्रीलायक माहिती कॉंग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने दिली आहे. या संदर्भातच राज्यपाल एस. एस. सिद्धू यांनी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना काल काबो राजभवनावर बोलावून घेतले होते. मात्र, विधानसभा अधिवेशन काळात विरोधक व सरकारातीलच नार्वेकरांनी सरकारचे जे वस्त्रहरण चालवले होते त्यामुळे पुरती अब्रू जाण्याचा धोका लक्षात घेऊन बाबूश यांना काही काळ अभय देण्याची चाल सत्ताधारी खेळले व बाबूशचीच वेगळ्या अर्थाने ‘गेम’ केली अशी माहितीही समोर आली आहे.
विदेशी चलन तस्करी प्रकरणी बाबूश यांना मुंबई कस्टम अधिकार्‍यांनी ताब्यात घेतल्यानंतर विरोधी भाजपने आक्रमक पवित्रा घेतल्याने त्याचे तीव्र पडसाद दिल्लीतही उमटले आहेत. या विषयावरून केंद्रातही भाजपने जोरदार आवाज उठवण्याची तयारी सुरू केल्याने त्यापूर्वीच बाबूश यांना राजीनामा देण्यास भाग पाडण्याची तयारी कॉंग्रेस श्रेष्ठींनी चालवली आहे. विधानसभेत विनियोग विधेयकावरील चर्चेत सरकारचे पूर्ण वस्त्रहरण होणार या भीतीने मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी बाबूश यांना अभय दिल्याचीही जोरदार चर्चा सुरू आहे. भाजप आपला पवित्रा बदलणार नाही, याची माहिती मिळाल्यानेच त्याचा लाभ उठवून गोंधळातच चर्चेविना विनियोग विधेयक संमत करून घेण्यात मुख्यमंत्री कामत यांनी यश मिळवले. येत्या सोमवारपर्यंत बाबूश यांना मंत्रिपदावरून खाली खेचण्यात येईल, अशी भविष्यवाणीही सदर नेत्याने केली आहे.
बाबूश आज मुंबई कस्टमसमोर
दरम्यान, बाबूश मोन्सेरात हे उद्या ८ रोजी मुंबई कस्टम अधिकार्‍यांसमोर हजर राहणार असल्याची माहिती मिळाली आहे. विदेशी चलन तस्करी प्रकरणी त्यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडील बेहिशेबी मालमत्ता जप्त करण्यात आली होती. या मालमत्तेबाबत स्पष्टीकरण देण्यासाठीच त्यांना उद्या मुंबईत पाचारण करण्यात आल्याचे समजते. केंद्र सरकारकडून मुंबई कस्टम अधिकार्‍यांवर दबाव टाकून हे प्रकरण मिटवण्याचे जोरदार प्रयत्न सुरू असले तरी त्यांच्याकडून ‘फेमा’ व कस्टम कायद्याचेही उल्लंघन झाल्याने त्यांना मंत्रिपदावर कायम ठेवणे जिकिरीचेच ठरेल, असा निष्कर्ष कॉंग्रेस श्रेष्ठींनी काढल्याची खबर आहे.

Thursday 7 April, 2011

‘निर्णायक लढाईसाठी सिद्ध व्हा’

मातृभाषाप्रेमींच्या महामेळाव्यात आवाहन

- इंग्रजी माध्यमाच्या पूर्व प्राथमिक शाळांवर बंदी घाला
- इंग्रजी विद्यालयांनाही मातृभाषा बंधनकारक करा
- शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात यांचा राजीनामा हवाच

पणजी, दि. ६ (प्रतिनिधी)
अराष्ट्रीयीकरण करणार्‍या इंग्रजी माध्यमाच्या प्ले-स्कूल व पूर्व प्राथमिक शाळांच्या नोंदणीवर बंदी घालावी. तसेच, सुरू असलेल्या इंग्रजी माध्यमाच्या विद्यालयांनाही भारतीय भाषेतूनच शिक्षण देणे बंधनकारक करावे, असा एकमुखी ठराव आज घेण्यात आला.भारतीय भाषा आणि संस्कृतीच्या संरक्षणासाठी आज आझाद मैदानावर संपूर्ण गोव्यातून जनसागर लोटला होता. यावेळी हजारोंच्या संख्येने जमलेल्या राष्ट्रीय विचारसरणीच्या लोकांनी शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात यांच्या राजीनाम्याची मागणी करून तसा ठरावही घेतला.
भारतीय भाषा सुरक्षा मंचातर्फे मातृभाषा आणि संस्कृती यांच्या रक्षणास्तव आयोजित या महामेळाव्यात व्यासपीठावर मराठी व कोकणी भाषेचे नेते आणि शिक्षण तज्ज्ञ उपस्थित होते. प्रेक्षकांत भारतीय जनता पक्ष व महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे सर्व आमदार उपस्थित होते. व्यासपीठावरील मान्यवरांत भारतीय भाषा सुरक्षा मंचाच्या निमंत्रक तथा माजी मुख्यमंत्री शशिकला काकोडकर, प्राचार्य सुभाष वेलिंगकर, नागेश करमली, भिकू पै आंगले, फा. माऊझिन्य आताईद, ऍड. स्वाती केरकर, पुंडलीक नायक, प्रा. अनिल सामंत, अरविंद भाटीकर, प्रा. पांडुरंग नाडकर्णी, नरेंद्र आजगावकर, प्रशांत नाईक, एन. शिवदास, गो. रा. ढवळीकर, ऍड. उदय भेंब्रे, प्रा. दत्ता भि. नाईक, गोविंद देव व प्रा. वल्लभ केळकर उपस्थित होते.
लढाईसाठी सिद्ध व्हा ः काकोडकर
यावेळी श्रीमती काकोडकर म्हणाल्या की, ही केवळ सुरुवात आहे. खरी लढाई पुढे लढायची आहे. त्यासाठी सर्वांनी सिद्ध राहिले पाहिजे. उद्दिष्ट साध्य होईपर्यंत स्वस्थ बसता येणार नाही, असा कानमंत्र यावेळी संपूर्ण गोव्यातून जमलेल्या लोकांना त्यांनी दिला. दोन समाजांत फूट पाडणारा हा विचार नाही. उलट चर्च संस्थेद्वारेच इंग्रजीचा वाद उरकून काढून दोन समाजांत दुफळी माजवण्याचे कार्य सुरू असल्याचा आरोप करतानाच त्याचे कागदोपत्री पुरावेही आपल्याकडे असल्याचा दावा त्यांनी केला.
देशी नाते तोडण्याचे षड्यंत्र ः भेंब्रे
विचारवंत ऍड. उदय भेंब्रे यांनी चर्च आणि त्यांच्या धर्मगुरूंना फैलावर घेत शेजारी राहणार्‍या विशाल अशा हिंदू धर्माकडे डोळे उघडून पहा, असा सल्ला त्यांना दिला. या हिंदू धर्माच्या शिकवणीने या देशाला थोर विचारवंत धर्मानंद कोसंबी, दादा वैद्य, रघुनाथ माशेलकर, डॉ. अनिल काकोडकर असे दिग्गज बहाल केले आहेत. वरवर ही इंग्रजी माध्यमाची मागणी असल्यासारखी दिसत असली तरी त्यामागे कोकणी आणि मराठी या देशी भाषा संपवून या भूमीपासून देशी नाते तोडण्याचे षड्यंत्र आहे, असा दावा त्यांनी यावेळी केला. सांगे आणि केपे तालुक्यांत पाद्रींनी दबाव आणून ख्रिश्‍चन गावडा समाजाचा ‘धालो’ बंद पाडला. ख्रिस्तीकरणाच्या नावाखाली पाश्‍चात्त्यीकरण करण्याचे काम त्यांनी केले. पोर्तुगीज राजसत्तेला ४५० वर्षे जे गोव्यात करायला जमले नाही ते करण्याची जबाबदारी आता या उपटसुंभ मंत्र्यांना आणि चर्चला देण्यात आली आहे का, असा परखड सवाल त्यांनी उपस्थित केला. ‘तुम्हांला पोर्तुगालच्या मंचावर झोपायचे असेल तर झोपा किंवा इंग्लंडच्या फुटपाथवर बसून भीक मागा. आम्हांला त्याचे काहीही देणेघेणे नाही. मात्र येथून तोंड घेऊन चालते व्हा’, असा इशाराच त्यांनी इंग्रजीवाल्यांना दिला.
गोव्याची मातृभाषा इंग्रजी झाल्यास लोकांना मंदिरात इंग्रजीतून भजने म्हणावी लागणार, असा टोला नरेंद्र आजगावकर यांनी लगावला. गेल्या अनेक वर्षांत मराठी आणि कोकणी भाषेबद्दल वाद निर्माण करून आम्ही आमचेच नुकसान करून घेतले आहे, असे मत एन. शिवदास यांनी यावेळी व्यक्त केले. तसेच, पालकांना खोटी माहिती देऊन त्यांच्याद्वारे इंग्रजीसाठी अनुदान मागण्याचा घाट डायसोसन सोसायटीने घातला असल्याचा आरोपही त्यांनी केला.
स्कॉटलंडमध्ये राणीची सत्ता असूनही त्या ठिकाणी इंग्रजी भाषा बोलली जात नाही. इंग्रजी भाषेतून शिक्षण झालेल्या मुलावर कोणते परिणाम होतात, हे पालकांना पटवून दिले पाहिजे. तसेच, कोणीही भारतीय भाषा सुरक्षा मंचाकडे खेळण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना विधानसभेतून थेट बाहेर फेकून दिले जाईल, असा सज्जड दम प्रशांत नाईक यांनी भरला.
हे निर्णायक युद्ध ः वेलिंगकर
आझाद मैदानावर मराठी - कोकणीचा परिवार एकत्र आलेला असून तो निर्णायक युद्धासाठी सज्ज झाला आहे. या युद्धात भारताविषयी प्रेम बाळगणार्‍यांचाच विजय होणार यात कोणतेही दुमत नाही. या चळवळीला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करणार्‍यांचा डाव हाणून पाडला पाहिजे. शूर गोमंतकीय प्रत्येकवेळी गटबाजीमुळे गुलाम झाले. या इतिहासाची पुनरावृत्ती पुन्हा व्हायला देऊ नका, असे आवाहन यावेळी प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी केले.
भाषा हे पोट भरण्याचे
साधन नव्हे ः पुंडलीक नायक
भाषा ही पोट भरण्याचे साधन नसून ज्ञान संपादन करून मेंदू भरण्याचे ते साधन आहे, असे मत यावेळी ज्येष्ठ साहित्यिक पुंडलीक नायक यांनी व्यक्त केले. मुलगा जन्माला येताना केवळ पोट घेऊन येत नाही तर त्याला दोन हात आणि पायही असतात हे चर्च आणि डायसोसन सोसायटीने ध्यानात घ्यावे, असा सल्लाही त्यांनी दिला. दिगंबर कामत यांनी आपल्या पालखीत माकडे बसवली असून ती आता उड्या मारायला लागली आहेत. बाबूश मोन्सेरात यांच्या राजीनाम्याची मागणी आम्ही का केली होती, ते आता गोमंतकीयांना पटायला लागले आहे, असेही ते म्हणाले.
ज्या मुलांवर इंग्रजी माध्यम थोपवले जाते, त्या मुलांचे आई बाप त्यांना कत्तलखान्यातच पाठवत असतात, असे मत यावेळी प्रा. अनिल सामंत यांनी व्यक्त केले. संपूर्ण भारतात केवळ दोन लाख लोक आपल्या घरांत इंग्रजी भाषा बोलतात. गोव्यात इंग्रजी भाषेच्या मागणीमागे मोठे राजकारण असल्याचे अरविंद भाटीकर म्हणाले. परकीय भाषेतून शिक्षण घेणारा विद्यार्थी पोपटपंची करून शिक्षण घेतो तर मातृभाषेतून शिक्षण घेणार्‍याला ज्ञानप्राप्ती होते. त्यामुळे पालकांनी योग्य निर्णय घ्यावयाचा आहे, असे पांडुरंग नाडकर्णी म्हणाले.
त्यांना भाड्याची आई हवी ः करमली
काही विशिष्ट लोकांना समाजाचे तुकडे करायचे आहेत, असा दावा श्री. करमली यांनी केला. यांना स्वतःची आई नको तर भाड्याची आई हवी आहे. इंग्रजी माध्यम झाल्यास येत्या ५० वर्षांत आम्ही भारतीय नसून आम्हांला वेगळे राष्ट्र जाहीर करा, अशीही त्यांच्याकडून मागणी होऊ शकते. या लोकांना युरोपियन लोकांची भांडी धुण्यासाठीच इंग्रजी पाहिजे, असेही श्री. करमली म्हणाले.
इंग्रजी माध्यम झाल्यास कोकणी सुधारणार असेल तर तोमाझीन कार्दोज यांनी आपली सर्व तियात्रे इंग्रजीतून लिहावी, असे आव्हान भिकू पै आंगले यांनी दिले. तसेच, सर्व पालकांनी आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमातून काढून भारतीय भाषेतूनच प्राथमिक शिक्षण द्यावे, अशी विनंतीही त्यांनी केली. आमच्या भाषेची ओळख आम्हीच संपवल्यास आमच्याच भूमीवर आम्ही परके होणार, अशी भीती फा. माऊझिन्य आताईद यांनी व्यक्त केली.
या जाहीर सभेचे सूत्रसंचालन सुभाष देसाई यांनी केले तर कोकणी व मराठी ठरावाचे वाचन वल्लभ केळकर यांनी केले. शेवटी राष्ट्रगीत म्हणून सभेचा समारोप करण्यात आला.


‘‘सध्या कॉंग्रेस मंत्रिमंडळात असलेले शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात, सार्वजनिक बांधकाममंत्री चर्चिल आलेमाव, नगर विकासमंत्री ज्योकीम आलेमाव, महसूलमंत्री जुझे फिलिप डिसोझा, माजी मंत्री मिकी पाशेको यांनी अर्ध्यावरच शाळा सोडली आहे. आणि हे सर्वजण इंग्रजी माध्यमातूनच शिक्षण घेत होते’’ - ऍड. उदय भेंब्रे

विधानसभेत पुन्हा गदारोळ!

सलग दुसर्‍या दिवशीही कामकाज तहकूब
पणजी, दि. ६ (प्रतिनिधी)
शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात यांच्या विदेशी चलन तस्करीप्रकरणी विधानसभेत चर्चा व्हायलाच हवी या मागणीशी विरोधी भाजप सदस्य आजही ठाम राहिल्याने विधानसभेचे कामकाज सलग दुसर्‍या दिवशी तहकूब करावे लागले.
स्थगन प्रस्तावाचा अट्टहास कायम ठेवत भाजप आमदारांनी सभागृहाचे कामकाज चालवण्यास अटकाव केल्याने सकाळचा प्रश्‍नोत्तराचा तास तहकूब करण्यात आला. दुपारी सुरू झालेल्या कामकाजावेळीही भाजपने आपला आक्रमकपणा कायम ठेवला. सभापती प्रतापसिंग राणे यांनी स्थगन प्रस्तावावर निवाडा देताना हा विषय विधिमंडळाच्या अखत्यारीत येत नाही व त्यावरील चर्चा फक्त संसदेत होऊ शकते, असे सांगून हा प्रस्ताव फेटाळून लावला. सभापती राणेंचा हा निवाडा पचनी पडला नसलेल्या भाजप सदस्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू करताच सभापतींनी गृह खात्याच्या मागण्या सभागृहासमोर ठेवून त्यांना घाईगडबडीत आवाजी मतदानाने मंजुरी दिली आणी लगेच संपूर्ण दिवसाचे कामकाज तहकूब केले.
आज सकाळी कामकाजाला सुरुवात होताच विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी स्थगन प्रस्तावाचे काय झाले, असे विचारून पुन्हा या विषयाला तोंड ङ्गोडले. राज्य मंत्रिमंडळातील एका जबाबदार मंत्र्याला १७ तास कस्टम विभागाचे अधिकारी ताब्यात ठेवतात, मंत्र्यांकडील बेहिशेबी मालमत्ता जप्त केली जाते, याविषयी सर्व प्रतिष्ठित राष्ट्रीय वृत्तपत्रांतून माहिती प्रसिद्ध होते, मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून केंद्रीय वित्तमंत्र्यांच्या विशेष अधिकार्‍यांना ङ्गोन जातो, कुणाच्या तरी दबावाखाली मूळ पंचनाम्यात ङ्गेरङ्गार केला जातो हे संशयास्पद असून या सर्व गोष्टी समोर यायलाच हव्यात, अशी मागणी पर्रीकर यांनी केली. या मंत्र्याला सरकारचे घटक असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस व मगो पक्षाचा पाठिंबा आहे काय, असा प्रश्‍न उपस्थित करतानाच अशा विवादास्पद व्यक्तीला शिक्षणमंत्री पदावर ठेवून सरकार भावी पिढीसमोर कोणता आदर्श ठेवला जात आहे, अशी पृच्छा त्यांनी केली.
दरम्यान, मुख्यमंत्री दिगंबर कामत हे अशा व्यक्तीला आपल्या मंत्रिमंडळात ठेवू इच्छितात काय? त्यांना खरोखरच बाबूश मोन्सेरात हे निर्दोष आहेत किंवा त्यांच्याकडून घडलेला गुन्हा गंभीर वाटत नाही तर त्यांनी तसे स्पष्ट करावे, असा टोलाही यावेळी पर्रीकरांनी हाणला. मंत्रिपदाची शपथ घेताना घटनेचा व कायद्याचा सन्मान व आदर करण्याची शपथ घेतली जाते. इथे मात्र बाबूश मोन्सेरात यांनी स्वतः कायद्याचा भंग केलाच वरून त्यांनी घटनेचाही अनादर केल्याने त्यांना मंत्रिपदावर राहण्याचा कोणताच अधिकार नाही, असे भाजप प्रदेशाध्यक्ष प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर म्हणाले.
{ejU‘§Í¶m§Zm खुलाशाचा ईमेल!
शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी मुंबई विमानतळावर घडलेल्या एकूण प्रकरणाबाबत सभागृहात सादर करावयाच्या खुलाशाची प्रत त्यांना कॉंग्रेसच्याच एका पदाधिकार्‍याने ईमेलवरून पाठवल्याचा गौप्यस्फोट करून त्याची प्रतच आज भाजपचे आमदार दामोदर नाईक यांनी सभागृहासमोर ठेवली. मुख्य म्हणजे ही प्रत तशास तशी वाचून दाखवण्याची तयारीही शिक्षणमंत्र्यांनी ठेवली होती, असाही संशयही व्यक्त करण्यात येतो. त्यामुळे मुख्यमंत्री कामत यांनी या विषयी सभागृहात स्पष्टीकरण देण्याची जी तयारी ठेवली होती तीही पूर्वनियोजितच असण्याची शक्यता आहे व त्यामुळे हे स्पष्टीकरण ऐकण्यात भाजपला अजिबात रस नाही, अशी भूमिका भाजप आमदारांनी घेतली.
--------
‘स्मगलरांनी स्मगलरांसाठी
चालविलेले स्मगलरांचे सरकार’
‘स्मगलरांनी स्मगलरांसाठी चालविलेले स्मगलरांचे सरकार’ अशी संतप्त प्रतिक्रिया आज पत्रकारांशी बोलताना पर्रीकरांनी व्यक्त केली. विदेशी चलनाच्या या काळ्या बाजारात बाबूश मोन्सेरातसोबतच आणखीन काही मंत्री गुंतलेले असल्याची दाट शक्यता आहे. अशा गंभीर परिस्थितीत मुख्यमंत्र्यांनी मूग गिळून गप्प बसणे, याचाच अर्थ त्यांच्यावर मोन्सेरात यांनी प्रचंड दबाव आणला आहे. बाबूश इतर मंत्र्यांनाही गप्प करण्यासाठी ‘ब्लॅकमेल’ करणे शक्य आहे. त्यामुळेच सीबीआयने पणजी पोलिस स्थानक तोडफोड प्रकरण मुंबई सीबीआयकडे सोपवावे, अशी मागणी मुंबई उच्च न्यायालयाकडे केली आहे. आरोपी बाबूश हे साक्षीदारांना धमकावू शकतात, त्यांच्यावर दबाव आणू शकतात, असे गोवा सीबीआयचे म्हणणे आहे, असे पर्रीकर म्हणाले.
मुंबई कस्टमच्या ज्या अधिकार्‍यांनी बाबूशना प्रथम ताब्यात घेतले व १५ तास चौकशी केली त्यांच्या जबान्याही अत्यंत महत्त्वाच्या आहेत; कारण केंद्रीय मंत्र्यांना खुद्द दिगंबर कामत यांनी ‘मोन्सेरातना वाचवा’ असे फोन केल्याचे समजते असा गौप्यस्फोट करून गोव्याच्या शिक्षणमंत्र्यांवर विदेशी चलन स्मगलिंग प्रकरणी कस्टमकडून तक्रार दाखल होते आणि तरीही ते मंत्रिमंडळात कसे राहू शकतात, या प्रश्‍नाचे उत्तरही मुख्यमंत्री कामत यांना जनतेला द्यावेच लागेल, असे पर्रीकरांनी नमूद केले.
सरकार औचित्यभंग करते आहे, असा आरोप करीत पर्रीकर पुढे म्हणाले की, प्रकरणाचे गांभीर्य ओळखून सरकारने या प्रश्‍नाची चर्चा विधानसभेत होऊ द्यायला पाहिजे होती. पण इथे तर सरकारच बाबूशना घाबरून आहे! यापूर्वी दयानंद नार्वेकर, मिकी पाशेको यांना त्यांच्यावर आरोप, तक्रारी आहेत म्हणून डच्चू देण्यात आला; तर मग आता मोन्सेरात यांना कामत का पाठीशी घालत आहेत? अशा गुडघे टेकणार्‍या मुख्यमंत्र्यांकडून जनतेने काय अपेक्षा करावी, असे प्रश्‍नही पर्रीकरांनी उपस्थित केले.

विद्यार्थ्यांना परीक्षेस प्रवेश नाकारला

नावेली केंद्रांत तणाव
मडगाव, दि. ६ (प्रतिनिधी)
नावेली येथील रोझरी महाविद्यालयात तृतीय वर्षात शिकणार्‍या सुमारे वीस विद्यार्थ्यांना आज त्यांची वार्षिक उपस्थिती नियमानुसार नसल्याचे कारण देऊन परीक्षेस बसू दिले गेले नाही. त्यामुळे सकाळी तेथे गडबड उडाली व पोलिसांना धाव घ्यावी लागली.
मिळालेल्या माहितीनुसार, आजपासून या परीक्षा सुरू झाल्या असता या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला गेला असता त्यांनी कारणे विचारली, तेव्हा कॉलेज व्यवस्थापनाने विद्यापीठाच्या नियमावलीवर बोट ठेवून कोणतीही तडजोड करण्यास नकार दिला. त्यावर विद्यार्थ्यांनी कमी उपस्थिती असेल तर आपला परीक्षा प्रवेश अर्ज कसा स्वीकारला व परीक्षा प्रवेशपत्रिका कशी दिली अशी विचारणा केली. त्यातून काही वेळ तणावाची स्थिती निर्माण झाली असता पोलिसांनी ती नियंत्रणाखाली आणली. नंतर सदर विद्यार्थी या प्रकाराचा जाब विद्यापीठाकडे मागण्यासाठी बांबोळी येथे निघून गेले. व्यवस्थापनाने मात्र या एकंदर प्रकारावर भाष्य करण्यास नकार दिला.

रवी खरोखरचे ‘गृह’मंत्री

रितेश खाजगी सचिव तर रॉय वैयक्तिक साहाय्यक

पणजी, दि. ६ (प्रतिनिधी)
गृह खात्याच्या कारभारावरून रवी नाईक यांच्यावर कितीही टीका होत असली तरी ते खरेखुरे ‘गृहमंत्री’ आहेत याबाबत कुणाचेच दुमत असण्याचे कारण नाही. राज्याचे गृह खाते ते कसे सांभाळतात हा वादाचा विषय असू शकेल, पण स्वतःचा ‘गृह’ कारभार मात्र ते अतिशय जबाबदारीने आणि चोखपणे सांभाळतात याचा धडधडीत पुरावाच आज एका अतारांकित प्रश्‍नाद्वारे समोर आला आहे. रवी नाईक यांचे ज्येष्ठ पुत्र रितेश नाईक हे त्यांचे खाजगी सचिव आहेत तर कनिष्ठ पुत्र रॉय नाईक यांची रवींनी आपला वैयक्तिक साहाय्यक म्हणून नियुक्ती केल्याची माहिती उघड झाली आहे.
म्हापशाचे आमदार फ्रान्सिस डिसोझा यांनी विचारलेल्या एका अतारांकित प्रश्‍नाच्या उत्तरात रवी नाईक यांचा ‘गृह’ कारभार कसा ‘योग्य’ दिशेने सुरू आहे ते समोर आले आहे. राज्य मंत्रिमंडळातील सदस्यांनी नियुक्त केलेल्या कर्मचार्‍यांची यादी आमदार डिसोझा यांनी या प्रश्‍नाद्वारे मागितली होती. राज्य प्रशासकीय खात्याने गृहमंत्री रवी नाईक यांच्या दोन्ही पुत्रांची अस्थायी नियुक्ती केल्याचे म्हटले आहे. रितेश नाईक हे खाजगी सचिव व रॉय नाईक हे वैयक्तिक साहाय्यक म्हणून काम पाहत आहेत. या दोघांनाही सरकारी पगार मिळतो. रितेश नाईक यांना २९,४४१ तर रॉय नाईक यांना १९,९०४ रुपये पगार मिळतो, असेही या उत्तरात म्हटले आहे.
सहकार खात्याचा ताबाही रवी नाईक यांच्याकडेच आहे. सहकार खात्याअंतर्गत फोंडा येथील आपली खाजगी जागा त्यांनी गोवा मार्केटिंग फेडरेशनला भाडेपट्टीवर दिल्याचे प्रकरण यापूर्वी अशाच पद्धतीने सभागृहात उघडकीस आले होते. आता तर त्यांनी चक्क आपल्या दोन्ही पुत्रांची सरकारी पगारावर खाजगी कर्मचारी म्हणून नियुक्ती करून मंत्री या नात्याने आपला ‘गृह कारभार’ अत्यंत चोख पद्धतीने चालला असल्याचे सिद्ध केले आहे. एखाद्या मंत्र्याने आपल्याच पुत्रांची खाजगी कर्मचारी म्हणून नियुक्ती करण्याचा हा प्रकार कदाचित गोव्याच्या राजकारणात पहिलीच घटना ठरली आहे.

‘वाघा’ची झेप आता रुपेरी पडद्यावर!

पणजी, दि. ६ (सांस्कृतिक प्रतिनिधी)
गोमंतकातील ज्येष्ठ कवी, नाटककार आणि लेखक विष्णू सूर्या वाघ आता लवकरच रुपेरी पडद्यावर झेप घेणार आहेत. धर्मानंद वेर्णेकर यांच्या ‘गड्या आपुला गाव बरा’ या आगामी चित्रपटात विष्णू वाघ महत्त्वाची भूमिका साकारत असून सध्या ते चित्रीकरणात व्यस्त आहेत.
गोव्यातील एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जाणारे विष्णू वाघ यांनी आत्तापर्यंत नाट्यलेखनातून तसेच कविता लेखन आणि सादरीकरणातून गोवा तसेच महाराष्ट्रात अमाप प्रसिद्धी मिळवली आहे. यापूर्वी आपल्या तसेच इतरांच्या अनेक नाटकांतून त्यांनी भूमिकाही साकारलेल्या आहेत. ‘तुका अभंग अभंग’, ‘आदित्य चक्षू’, ‘करीन ती पूर्व’, ‘साम्राज्य’ अशा नाटकांतील त्यांच्या भूमिका गाजल्या आहेत. त्यांच्या लेखणीतून साकारलेली ‘समुद्रपक्षी’, ‘काळ्या ढगांची सावली’, ‘तुका अभंग अभंग’, ‘सं. युद्ध नको मज बुद्ध हवा’, ‘आदित्य चक्षू’ अशा अनेक नाटकांना पुरस्कार लाभले आहेत. यावर्षी त्यांच्या ‘बाई मी दगुड फोडिते’ या नाटकाला महाराष्ट्र राज्य पुरस्कारही प्राप्त झालेला आहे. आता मात्र गोमंतकातील हे हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व थेट रुपेरी पडद्यावरच झेप घेणार आहे.
इथे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव सुरू झाल्यापासून गोव्यातील निर्मात्यांनी चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात जोर धरला असून गोव्यातही दर्जेदार चित्रपटांची निर्मिती होताना दिसते आहे. गोमंतक हा कला आणि संस्कृतीचा खजिना असून ही संस्कृती खर्‍या अर्थाने गावागावांतूनच जपली जाते. म्हणूनच गाव आणि ‘गावपण’ टिकणे नितांत गरजेचे आहे. याच आशयावरचा चित्रपट धर्मानंद वेर्णेकर निर्माण करत असून चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन त्यांचेच आहे. गोव्यातच चित्रित होणार्‍या या चित्रपटात मराठी चित्रपटसृष्टीतील नामवंत कलाकार मकरंद अनासपुरे, सयाजी शिंदे, मोहन आगाशे, दिलीप घारे, सुधीर निकम, सविता मालपेकर, शिल्पा अनासपुरे तसेच गोमंतकातील कलाकारही काम करत असून त्यात राजीव हेदे, प्रिन्स जेकब, मधुकर जोशी, सुनील देव, सतीश गावस, प्रशांती तळपणकर, धनू डिचोलकर, प्रदीप तळावलीकर, बबीता आंगले यांचा समावेश आहे. या चित्रपटासाठी मुकेश घाटवळ यांचे संगीत देणार असून सुरेश सुवर्णा हे सिनोमाटोग्राफर म्हणून काम पाहणार आहेत.

Wednesday 6 April, 2011

बाबूशप्रकरणी आक्रमक भाजपकडून विधानसभा ठप्प!

पणजी, दि. ५ (प्रतिनिधी)
शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात यांना मुंबई विमानतळावर विदेशी चलन तस्करीप्रकरणी कस्टम अधिकार्‍यांनी ताब्यात घेतल्याप्रकरणी सभागृहात चर्चा घडवून आणावी यासाठी विरोधी भाजपने मांडलेल्या स्थगन प्रस्तावाला मान्यता देण्यास सभापती प्रतापसिंह राणे यांनी स्पष्ट नकार दर्शवल्याने आक्रमक बनलेल्या भाजप आमदारांनी आज संपूर्ण दिवसाचे कामकाज रोखून धरले. सकाळच्या सत्रातील कामकाज दुपारपर्यंत तहकूब केल्यानंतर दुपारी घाईगडबडीतच कार्यक्रम पत्रिकेवरील मागण्यांना आवाजी मतदानाने मंजुरी देण्यात आली. या मागण्यांना मंजुरी मिळताच सभापती राणे यांनी उर्वरित कामकाजही तहकूब केले.
आज सकाळी प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात होताच विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी स्थगन प्रस्तावाचा मुद्दा उपस्थित केला. राज्य मंत्रिमंडळातील एका मंत्र्यांना विदेशी चलन तस्करी प्रकरणात कस्टम अधिकार्‍यांकडून ताब्यात घेतले जाते व त्यांच्याकडे कोट्यवधी रुपयांचे विदेशी चलन सापडल्याचे वृत्त देश व विदेशातील प्रमुख वृत्तपत्रांत प्रसिद्ध होत; अशावेळी या घटनेची दखल न घेता सभागृहाचे कामकाज चालवणे ही लोकशाहीची थट्टाच ठरणार आहे. त्यामुळे सभागृहाचे कामकाज स्थगित ठेवून या विषयावरील स्थगन प्रस्तावावर पहिल्यांदा चर्चा व्हावी व सरकारने या प्रकरणी स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. खुद्द मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी स्पष्टीकरण देण्याची आपली तयारी आहे, असे सांगितले असले तरी चर्चा टाळून स्पष्टीकरण देण्यास भाजप आमदारांनी तीव्र हरकत घेतली. सगळे कामकाज तूर्त बाजूला ठेवून या महत्त्वाच्या विषयावर चर्चा झाली नाही तर कामकाज पुढे नेण्यात काहीच अर्थ नाही, अशी ताठर भूमिका घेतली असतानाही सभापती राणे यांनी हा प्रस्ताव चर्चेस घेण्यास नकार दर्शवल्याने विरोधी भाजप आमदारांनी सभापतीसमोरील हौदात जोरदार घोषणाबाजी देत प्रवेश केला. यावेळी सभापती राणे यांनी तात्काळ कामकाज दुपारपर्यंत तहकूब केले.
दुपारी अडीच वाजता पुन्हा कामकाज सुरू झाल्यानंतर विरोधी नेते पर्रीकर यांनी हा मुद्दा नव्याने उपस्थित केला. स्थगन प्रस्ताव चर्चेस घेण्याप्रकरणी आपण नंतर निर्णय घेऊ, असे सांगताच भाजपने त्यांची ही मागणी अमान्य केली व पुन्हा एकदा जोरदार घोषणा देत सभापतींच्या आसनासमोर धाव घेतली. यावेळी भाजपची सरकारविरोधातील जोरदार घोषणाबाजी सुरू असतानाच सभापती राणे यांनी आजच्या मागण्या सभागृहासमोर मतदानाला ठेवून आवाजी मतदानाव्दारे त्यांना मान्यता मिळाल्याचे जाहीर केले व आजचे कामकाज तहकूब केल्याचे जाहीर केले.

हे स्मगलरांचे सरकार!

पणजीतील जाहीर सभेत भाजपचा आरोप
पणजी, दि. ५ (प्रतिनिधी)
बाबूश मोन्सेरात प्रकरणावरून पडलेल्या या ठिणगीमुळे लवकरच वणवा पेटणार असून येत्या गुढीपाडव्यापर्यंत या कॉंग्रेस सरकारचा सत्यानाश होणार असल्याची खात्री आज विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी व्यक्त केली. तसेच, दिगंबर कामत यांचे कॉंग्रेस सरकार हे ‘स्मगलरां’चे सरकार असल्याची घणाघाती टीकाही त्यांनी केली.
मंगळवारी शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात यांच्या राजीनाम्याची मागणी घेऊन भारतीय जनता पक्षाने पणजीत मोर्चा काढला. या मोर्चाचे आझाद मैदानावर जाहीर सभेत रूपांतर झाल्यानंतर उपस्थितांना संबोधित करताना पर्रीकर बोलत होते. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात यांच्या पुतळ्याचे दहन केले. मोर्चात संपूर्ण गोव्यातील पक्षाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.
मुख्यमंत्री दिगंबर कामत हेच या सर्व तस्करांचे म्होरके आहेत. मात्र, तस्करीमागे त्यांचा उद्देश मात्र नेहमीच चांगला असतोे, अशी खिल्लीही पर्रीकर यांनी उडवली. बाबूशवर आत्तापर्यंत १४ गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंद झालेले आहेत. जुने गोवे येथे पैशांसाठी जंगलातील सागवानाचे वृक्ष कापले होते, हा त्यांचा पहिला गुन्हा होता. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात, तर बाबूशचे पाय सागवानाच्या जंगलात दिसले होते, अशी बोचरी टीका त्यांनी यावेळी केली. बाबूशने पोलिस स्थानकावर हल्ला केला, पोलिसांची डोकी फोडली, ताळगाव येथे आयटी हॅबिटॅट प्रकल्पाला आग लावून ४५ लाख रुपयांचे नुकसान केले, आपल्या विरोधात आवाज उठवणार्‍या ऍड. आयरिश रॉड्रिगीस यांच्यावर हल्ला करून त्यांची बोटे छाटली, युथ कॉंग्रेसच्या अध्यक्षांसह त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांना झोडून काढले; गुंडगिरी आणि विदेशी चलनाची तस्करी करण्यात बाबूशशी कोणीही स्पर्धा करू शकणार नाही, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
कॉंग्रेस सरकार चोर, दरोडेखोर आणि तस्करांचे सरकार आहे, अशी टीका यावेळी प्रदेशाध्यक्ष तथा आमदार लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी केली. बाबूशला विदेशी चलनाची तस्करी करताना मुंबई विमानतळावर रंगेहाथ पकडून त्यांची १८ तास चौकशी केली. आता कॉंग्रेसचे सर्व मंत्रिमंडळ त्यांना पाठिंबा देत असल्याने या सर्वांचेच पैसे त्यात गुंतले असल्याची शक्यता असून या भ्रष्ट मंत्रिमंडळाच्या भानगडी त्यांना माहीत असल्यानेच सर्वांकडून त्यांची पाठराखण केली जात असल्याचा आरोप श्री. पार्सेकर यांनी केला.
कॉंग्रेसचा भ्रष्टाचार आणि जनतेच्या पैशांची लूट थांबवण्यासाठी गोव्यातील जनतेने आता आक्रमक व्हावे; हे सगळे औरंगजेबाचेही बाप झाले असून त्यांना आत्ताच लगाम घातला पाहिजे, असे आवाहन उत्तर गोवा खासदार श्रीपाद नाईक यांनी केले. बाबूशकडे एवढे पैसे आले कुठून, असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला. बाबूशची खाण नाही किंवा कारखानाही नाही. यापूर्वी त्यांनी असा किती पैसा विदेशी बँकांत जमा केला आहे, याचीही चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी श्री. नाईक यांनी केली.
निवडणुकीचा काळ जवळ आला आहे. त्यामुळे जनतेने केवळ एका मंत्र्यालाच नव्हे तर भ्रष्टाचारात लडबडलेल्या संपूर्ण कॉंग्रेस मंत्रिमंडळालाच घरी पाठवण्यासाठी सज्ज झाले पाहिजे, असे विधिमंडळ उपनेते फ्रान्सिस डिसोझा म्हणाले. आम्हांला वाटले होते, केंद्रातीलच कॉंग्रेस नेत्यांचे पैसे स्विस बँकेत आहेत. परंतु, बाबूश याला विमानतळावर ताब्यात घेतले आणि गोव्यातील कॉंग्रेस मंत्र्यांचेही विदेशी बँकांत काळे धन असल्याचे उघड झाल्याचे श्री. डिसोझा म्हणाले. खारीवाड्यावरील लोकांसाठी हे सरकार काहीही करीत नाही; पण आपल्या एका मंत्र्याची सुटका करण्यासाठी विधानसभाच तहकूब करतात. घाईगडबडीत चर्चेविना मागण्या मान्य करून घेतात, हा कॉंग्रेसचा खरा चेहरा असल्याचे ते म्हणाले. यावेळी महिला मोर्चाच्या अध्यक्षा कुंदा चोडणकर, माजी आमदार राजेंद्र आर्लेकर यांनी आपली मते व्यक्त केली. पक्षाचे सरचिटणीस ऍड. नरेंद्र सावईकर यांनी सूत्रसंचालन केले.

..हा ‘बाबूश अली’च - पर्रीकर

‘फेमा’ व कस्टम कायद्याचे बाबूश मोन्सेरात यांनी मोठ्या प्रमाणात उल्लंघन केल्याचे कस्टम खाते सांगते. हा साधासुधा गुन्हा नसून ते ‘हवाला’कांडच आहे. हल्लीच हसन अली याला अशाच एका चलन तस्करी प्रकरणात पकडण्यात आले होते. आता ‘बाबूश अली’ला पकडण्यात आले आहे, असा हल्ला पर्रीकर यांनी पत्रकार परिषदेत चढवला.
मोन्सेरात यांना मुंबई कस्टमने ताब्यात घेतल्यापासून ते सोडेपर्यंत त्यांनी कुणाकुणाला फोन केले, त्यांना कुणाचे फोन आले व कस्टम अधिकार्‍यांना केंद्रातील कोणत्या महनीय व्यक्तीने फोनवरून आदेश दिले या सगळ्या प्रकाराची कसून चौकशी झाली पाहिजे, असेही ते म्हणाले. या प्रकरणी सुरू असलेला सारवासारवीचा प्रयत्न पाहता या प्रकरणात सरकारातील अन्य काही मंत्रीही गुंतले असल्याचा दाट संशय येतो आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात बाबूश मोन्सेरात शॉपींगसाठी दुबईला पैसे घेऊन जात होते ते काय फ्रीज आणि टीव्ही घ्यायला, असा टोलाही त्यांनी लगावला.

मातृभाषा, संस्कृती रक्षणास्तव आज पणजीत शक्तिप्रदर्शन


दुपारी जाहीर सभेचे आयोजन

पणजी, दि. ५ (प्रतिनिधी)
शिक्षणमंत्र्यांसह कॉंग्रेस मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांनी आणि डायसोसन सोसायटीने पूर्वप्राथमिक आणि प्राथमिक स्तरावर इंग्रजी माध्यम करून गोव्याची संस्कृती आणि मातृभाषा संपवण्याचा जो घाट घातला आहे त्याच्या विरोधात उद्या गोव्यातील स्वाभिमानी जनता मैदानात उतरणार असून उद्या दि. ६ रोजी पणजीतील आझाद मैदानावर होणार्‍या जाहीर सभेत शक्तिप्रदर्शन करण्याचा निर्धार मराठी व कोकणी भाषाप्रेमींनी केला आहे.
उद्या दुपारी ३ वाजता ही सभा सुरू होणार आहे. मराठी आणि कोकणी भाषाप्रेमींनी एकत्रित येऊन स्थापन केलेल्या भारतीय भाषा सुरक्षा मंचाच्या अध्यक्षा तथा माजी मुख्यमंत्री शशिकला काकोडकर यांनी उद्याच्या या शक्तिप्रदर्शनात स्वाभिमानी पालकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याची हाक दिली आहे.
ही सभा यशस्वी करण्यासाठी गेल्या आठवड्यापासून जोरदार तयारी सुरू आहे. त्या संदर्भात ८० ठिकाणी बैठका घेण्यात आलेल्या आहेत. तसेच, प्रत्यक्ष साडेतीन हजार लोकांशी संपर्क साधण्यात आला आहे. या साडेतीन हजार लोकांच्या माध्यमातून उद्या होणार्‍या सभेत किमान २५ हजार पालक सहभागी होतील, अशी अपेक्षा असल्याचे श्रीमती काकोडकर यांनी बोलून दाखवले.
------
आता इंग्रजीवाल्यांचेही आंदोलन
कॉंग्रेस आघाडीतील ख्रिस्ती मंत्री व आमदारांनी प्राथमिक माध्यम इंग्रजी करण्यासाठी सरकारवर दबाव टाकण्याचा केलेला प्रयत्न व्यर्थ गेल्याने आता त्यांनी भारतीय भाषा सुरक्षा मंचाच्या आंदोलनाला सडेतोड उत्तर देण्यासाठी समांतर आंदोलन छेडण्याचा विचार चालवला आहे. आज विधानसभा संकुलात सार्वजनिक बांधकाममंत्री चर्चिल आलेमाव यांच्या दालनात झालेल्या बैठकीत याप्रकरणी खलबते झाल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे. उद्या ६ रोजी भारतीय भाषा सुरक्षा मंचाने बोलावलेल्या जाहीर सभेचा बराच धसका या नेत्यांनी घेतला आहे. भारतीय भाषा सुरक्षा मंचाप्रमाणेच इंग्रजीच्या सक्तीसाठी गावागावांत सभा व बैठका घेण्याची व्यूहरचना त्यांनी आखली असल्याचे समजते. या आंदोलनात सर्व ख्रिस्ती मंत्री व आमदारांना एकत्र करून आपला स्वतंत्र दबाव गट तयार करण्याचा त्यांचा विचार सुरू असून मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्यासाठी ही नवी डोकेदुखी ठरण्याचीच अधिक शक्यता आहे.

ओशेलबाग-धारगळ अपघातात दोघे ठार

पेडणे, दि. ५ (प्रतिनिधी)
ओशेलबाग - धारगळ येथे काल दि. ४ रोजी रात्री दुचाकीला झालेल्या अपघातात दुचाकीचालक जागीच ठार झाला तर पादचार्‍याचे आज दि. ५ रोजी गोमेकॉत निधन झाले.
पेडणे पोलिसांनी या संदर्भात दिलेल्या माहितीनुसार, दि. ४ रोजी रात्री ८च्या सुमारास जीए ०३ एफ ००१७ या क्रमांकाच्या मोटरसायकलने जात असताना शाणू राधाकृष्ण परब (२७, रा. मधलावाडा - विर्नोडा) याने ओशेलबाग - धारगळ येथे मुख्य रस्त्यावर संतोष नवलू झोरे (मुळगाव - डिचोली) या इसमाला रस्ता ओलांडताना जोरदार धडक दिली. या अपघातात मोटरसायकल रस्त्याच्या कडेला २० फूट खाली कोसळली व त्यात शाणू परब जागीच ठार झाला.
जखमी संतोष झोरे याला गोवा मेडिकल कॉलेज इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना आज मंगळवारी त्याचे निधन झाले. पेडणे पोलिसांनी अपघाताचा पंचनामा केला असून पुढील तपास सुरू असल्याचे सांगितले.

पोलिस-ड्रग माफिया साटेलोटे चौकशीस अखेर सीबीआय राजी!

पणजी, दि. ५ (प्रतिनिधी)
पोलिस ड्रग माफिया साटेलोटे प्रकरणाचा छडा लावण्याची आपली तयारी नसल्याचे सांगून सुरुवातीला आढेवेढे घेणार्‍या केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभागाने आज अखेर मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाला हे प्रकरण स्वीकारण्याची तयारी दर्शवली. त्यामुळे या प्रकरणाच्या फायली चौकशीसाठी ताबडतोब ताब्यात घ्याव्यात आणि विनाविलंब चौकशी सुरू करावी, असा आदेश न्यायालयाने दिला.
दरम्यान, ‘दुदू’ प्रकरणाचीही चौकशी सीबीआयद्वारेच करावी, अशी जोरदार मागणी याचिकादाराने केली. सरकारने ‘अटाला’ आणि पोलिस उपनिरीक्षक सुनील गुडलर प्रकरण सीबीआयकडे सोपवले आहे. त्यामुळे ‘दुदू’ प्रकरणही सीबीआयकडेच सोपवले जावे, अशी विनंती याचिकादाराने खंडपीठाकडे केली.
‘दुदू’ प्रकरणात गोवा पोलिसांनी त्याच्यावर आरोपपत्र सादर केले असल्याने ते प्रकरण आम्ही घेऊ शकत नाही. तसेच, त्या प्रकरणाची चौकशी करण्याचा आदेशही राज्य सरकारने आम्हांला दिलेला नाही, अशी माहिती यावेळी ऍटर्नी जनरल कार्लुस फरेरा यांनी न्यायालयाला दिली. दरम्यान, ‘दुदू’ हेच मुख्य प्रकरण असून या तिन्ही प्रकरणांचा एकमेकाशी घनिष्ठ संबंध आहे, असा युक्तिवाद ऍड. सुरेंद्र देसाई यांनी केला. राज्य सरकार सीबीआयद्वारे चौकशी करण्यास तयार असल्याने त्यांनी तिन्ही प्रकरणे सीबीआयकडे द्यावीत, असेही ते यावेळी म्हणाले. परंतु, यापूर्वी केलेल्या याचिकेत तशी मागणी केली नसल्याने येत्या दोन आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करण्याची मुदत श्री. देसाई यांनी मागून घेतली.
दरम्यान, सीबीआयच्या अधिकार्‍यांना या प्रकरणांची चौकशी करण्यासाठी लागणारी सर्व मदत तसेच साधने उपलब्ध करून देण्याची सूचना यावेळी राज्य सरकारला न्यायालयाने केली आहे. ‘दुदू’ प्रकरणात राज्याचे गृहमंत्री रवी नाईक यांच्या मुलाचे नावही पुढे आले आहे. मात्र, त्यात उल्लेख झालेला ‘रॉय’ हा आपला मुलगा नसून तो रॉय फर्नांडिस असल्याचा दावा गृहमंत्री रवी नाईक यांनी केला आहे.
अटाला प्रकरणात एका निरीक्षकासह सहा पोलिस शिपाई निलंबित झाले आहेत. तर, ‘दुदू’ याच्या बहिणीला अमली पदार्थ विक्री करताना स्टिंग ऑपरेशनद्वारे सापडलेल्या उपनिरीक्षक सुनील गुडलर यालाही निलंबित करण्यात आले आहे. या सर्व प्रकरणाची आता सीबीआय चौकशी करणार आहे.

केंद्रात लोकपाल आणि गोव्यात लोकायुक्त हवेच

भ्रष्टाचाराविरोधात पणजीत लाक्षणिक उपोषणपणजी, दि. ५ (प्रतिनिधी)
भारत देश ही सुवर्णभूमी आहे. मात्र भ्रष्टाचारामुळे देशाची प्रतिमा खालावली असून तो देशाच्या प्रगतीआड येत आहे. यासाठीच केंद्रात लोकपाल व राज्यात लोकायुक्त यांची नियुक्ती होऊन भ्रष्टाचारावर पूर्णपणे नियंत्रण यायला हवे. समाजसेवक अण्णा हजारे यांनी लोकपाल विधेयक संमत व्हावे व भ्रष्टाचाराचे निर्मूलन व्हावे म्हणून जे उपोषण आरंभले आहे त्याला पाठिंबा देण्यासाठी गोव्यातही एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येत आहे, अशी माहिती समाजसेवक ऍड. सतीश सोनक यांनी आज येथे बोलताना दिली.
अण्णा हजारेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी देशभरातून अशी लाक्षणिक उपोषणे केली जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आज दि. ५ रोजी पणजीतील आझाद मैदानावर विविध स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींनी ऍड. सोनक यांच्या नेतृत्वाखाली एकदिवसीय लाक्षणिक उपोषण केले. या प्रसंगी कवी रमेश वेळूस्कर, स्वातंत्र्यसैनिक प्रभाकर येंडे, नाट्यकर्मी देवीदास आमोणकर, लेखक दिलीप बोरकर, एम. नाईक, माहिती हक्क फोरम गोवाचे अध्यक्ष शशी कामत, माजी प्राचार्य दत्ता भी. नाईक, महेश नाईक, पत्रकार गुरुदास सावळ, माजी कायदेमंत्री डॉ. काशीनाथ जल्मी आदी मान्यवर उपस्थित होते.

पंतप्रधानांची विनंती धुडकावून अण्णा हजारे उपोषणावर

जन लोकपाल विधेयक अमलात आणण्याची मागणी
देश-विदेशातून भक्कम पाठिंबा
राळेगण सिद्धीतही शेकडो समर्थकांचे उपोषण

नवी दिल्ली, दि. ५
पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांचे आवाहन झुगारून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आजपासून भ्रष्टाचाराविरोधात लढा देण्यासाठी लोकपाल विधेयकाऐवजी जन लोकपाल विधेयक आणण्याच्या मागणीसाठी आमरण उपोषणाला प्रारंभ केला. देशभरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी हजारेंच्या आमरण उपोषणाला ‘स्वातंत्र्याचा दुसरा लढा’ अशी उपाधी दिली आहे. दरम्यान, अण्णा हजारे यांच्या उपोषणाला देश-विदेशातून भक्कम पाठिंबा मिळाला असून, देशाच्या विविध भागांत शेकडो सामाजिक कार्यकर्तेही आज हजारेंच्या समर्थनार्थ एक दिवसाच्या उपोषणावर बसले आहेत.
७२ वर्षीय अण्णा हजारे यांनी आधी येथील राजघाटवर जाऊन महात्मा गांधींना आदरांजली अर्पण केली आणि त्यानंतर जंतरमंतर येथे उपोषणास प्रारंभ केला. देशातील भ्रष्टाचार समूळ नष्ट करण्यासाठी अत्यावश्यक असलेले जन लोकपाल विधेयक सरकार मंजूर करीत नाही तोपर्यंत आपण उपोषण मागे घेणार नाही, असे हजारे यांनी उपस्थित पत्रकारांना सांगितले. या आंदोलनात माझा जीव गेला तरी चालेल मात्र, मी आपले आंदोलन मागे घेणार नाही, असा ठाम निर्धारही अण्णांनी जाहीर केला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते स्वामी अग्निवेश, किरण बेदी आणि मॅगसेसे पुरस्कार विजेते संदीप पांडे, मेधा पाटकर, योगगुरू बाबा रामदेव, श्री श्री रविशंकरजी, अरविंद केजरीवाल, ऍड. प्रशांत भूषण, संतोष हेगडे आदी उपस्थित होते.
जन लोकपाल विधेयकाचा मसुदा तयार करण्यासाठी सरकारने समिती स्थापन करावी आणि या समितीत ५० टक्के शासकीय अधिकारी व उर्वरित सदस्यांमध्ये नागरिक आणि बुद्धिजीवींचा सहभाग असावा, अशी मागणी करतानाच, भ्रष्टाचाराच्या मुद्यावर सरकार आपल्याला इतके का घाबरत आहे, असा सवाल हजारे यांनी केला.
राजघाटवरून हजारे खुल्या जीपमधून इंडिया गेटकडे निघाले. यावेळी असंख्य समर्थक आणि विद्यार्थी हातात तिरंगा ध्वज घेऊन त्यांच्या मागे-पुढे होते. तत्पूर्वी, सोमवारी रात्री पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी हजारे यांना उपोषणावर न बसण्याचे आवाहन करताना, आपल्या मागणीवर सरकार विचार करेल, असे आश्‍वासन दिले. अण्णांच्या उपोषणाच्या निर्णयावर पंतप्रधानांनी नाराजीही व्यक्त केली. पण, हजारे यांनी आमरण उपोषणाचा आपला निर्धार कायम ठेवला.
पंतप्रधान म्हणतात की, आमचा तुमच्यावर विश्‍वास आहे, आम्ही तुमचा आदर करतो. मग, पंतप्रधान आमने-सामने बसून आमच्याशी चर्चा का करीत नाहीत, असा सवालही अण्णांनी उपस्थित केला. गेल्या महिन्यातील बैठकीत भ्रष्टाचार हाताळण्यासाठी अधिकारी आणि नागरिकांचा समावेश असलेली संयुक्त समिती स्थापन करण्यास पंतप्रधानांनी नकार दिल्याने आपली निराशा झाली. सरकारने जर स्वत:च हे विधेयक तयार केले तर त्या विधेयकात लोकशाहीचे प्रतिबिंब राहणार नाही, असेही अण्णांनी स्पष्ट केले.
उपोषणाच्या ठिकाणाला भेट देणारे संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष शरद यादव यांनीही हजारेंच्या उपोषणाला पाठिंबा दिला आणि देशातून भ्रष्टाचार हद्दपार करण्यासाठी जन लोकपाल विधेयकाची नितांत गरज असल्याचे सांगितले. या विधेयकाचा जो मसुदा हजारे आणि इतरांनी तयार केलेला आहे, तो आपल्याला मान्य आहे. हा मसुदा संसदेत सादर करण्याची आपली इच्छा आहे, असे ते म्हणाले.
यावेळी बोलताना किरण बेदी आणि संदीप पांडे म्हणाले की, येथे उपस्थित सर्वच कार्यकर्ते आज दिवसभर उपोषण करतील. पण, हजारेजींचे उपोषण सरकारकडून त्यांची मागणी मान्य होईपर्यंत सुरूच राहील. देशाच्या सर्वच स्तरावरील नागरिकांनी हजारेंना पाठिंबा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
भ्रष्टाचार्‍यांसाठी कर्दनकाळ ठरलेले आणि आपल्या शांततापूर्ण आंदोलनाने सरकारला घाम ङ्गोडणारे अण्णा हजारे यांनी आत्तापर्यंत आपल्या भ्रष्टाचारविरोधी मोहिमेत सहा मंत्री आणि ४०० अधिकार्‍यांना घरी बसविले आहे.
राळेगण सिद्धीत अण्णांचे समर्थक उपोषणावर
हजारे यांनी दिल्लीत आमरण उपोषण सुरू केल्यानंतर त्यांच्या समर्थनार्थ राळेगण सिद्धीतही त्यांच्या शेकडो समर्थकांनी उपोषण सुरू केले आहे. काल गुढी पाडव्याच्या दिवशी अण्णांच्या या स्वगृही प्रत्येकानेच आपल्या घरी गुढी उभारताना, सरकारचा निषेध नोंदविण्यासाठी गुढीवर काळे ङ्गडकेही बांधले.
अनेकांनी टेक्स्ट मॅसेज आणि ई-मेलच्या माध्यमातून अण्णांच्या उपोषणाला आपला पाठिंबा दर्शविला आहे. अनेक जण आपल्या घरी किंवा कार्यालयात उपोषणावर बसले आहेत.
दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि प्रदेश कॉंगे्रसचे अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनीही अण्णांना उपोषण पुढे ढकलण्याचे आवाहन केले. पण, अण्णांनी त्यांचेही न ऐकता उपोषण सुरू केले.

Tuesday 5 April, 2011

बाबूशना त्वरित हटवण्यासाठी राज्यपालांनी हस्तक्षेप करावा

भाजप शिष्टमंडळाची ‘काबो’वर धडक

पणजी, दि. ४ (प्रतिनिधी)
विधानसभेत विविध प्रकरणांवरून विरोधी भाजपकडून सरकारचे ‘वस्त्रहरण’ सुरू असतानाच आता शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात यांना मुंबई विमानतळावर विदेशी चलन तस्करीप्रकरणी कस्टम अधिकार्‍यांकडून ताब्यात घेण्याचा प्रकार म्हणजे विरोधकांच्या हाती आयतेच कोलित ठरला आहे. या प्रकरणांवरून उद्या ५ रोजी विधानसभेत भाजप आक्रमक भूमिका घेऊन स्थगन प्रस्ताव मांडण्याची शक्यता असल्याने सरकारची कोंडी ठरलेली आहे. भाजप शिष्टमंडळाने घेतलेल्या राज्यपालांच्या भेटीनंतर मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी या प्रकरणी बाबूश मोन्सेरात यांच्याकडे खुलासा मागितला आहे. उद्या सभागृहात मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना अधिकृत स्पष्टीकरण देणे भाग पडणार असल्याने ते नेमकी काय भूमिका घेतात याकडे लोकांचे लक्ष लागले आहे.
गुन्हेगारी प्रकरणांची पार्श्‍वभूमी असलेल्या बाबूश मोन्सेरात यांच्या ‘रेकॉर्ड’मध्ये अधिकाधिक गुन्ह्यांची भर पडत आहे. अशा व्यक्तीकडे शिक्षण खाते देऊन सरकार विद्यार्थ्यांसमोर कसला आदर्श ठेवू पाहत आहे? बेहिशेबी विदेशी चलन तस्करीप्रकरणी मुंबई कस्टमच्या कचाट्यात सापडलेल्या बाबूश मोन्सेरात यांच्यामुळे गोव्याची जगभरात बदनामी झाली आहे. त्यामुळे राज्यपाल डॉ. एस. एस. सिद्धू यांनी तात्काळ हस्तक्षेप करून बाबूश यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्यास मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना भाग पाडावे, अशी जोरदार मागणी आज भाजप शिष्टमंडळाने केली.
भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या नेतृत्वाखाली आज दुपारी १७ सदस्यीय शिष्टमंडळाने राजभवनवर जाऊन राज्यपालांची भेट घेतली. शिष्टमंडळात खासदार श्रीपाद नाईक,विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर,आमदार फ्रान्सिस डिसोझा, दामोदर नाईक, दिलीप परूळेकर,अनंत शेेट, दयानंद मांद्रेकर तसेच प्रदेश भाजपचे पदाधिकारी राजेंद्र आर्लेकर, सदानंद तानावडे,सौ. कुंदा चोडणकर, वैदही नाईक आदींचा समावेश होता.. या भेटीनंतर राजभवनसमोर पत्रकारांशी बोलताना प्रा. पार्सेकर म्हणाले, विद्यमान कॉंग्रेस आघाडी सरकारची भ्रष्ट प्रकरणे विधानसभेत रोज उजेडात येत आहेत. राज्यातील कॉंग्रेस आघाडीचे कलंकित सरकार उलथवून या वर्षभरात गोव्याचे हित राखणारे सरकार सत्तेवर आणण्यासाठी भाजप रान उठवणार आहे.
विद्यमान कॉंग्रेस सरकारची कार्यपद्धती व बाबूश यांच्या गुन्हेगारी प्रकरणांची जंत्रीच या शिष्टमंडळाने राज्यपालांसमोर ठेवली. राज्याच्या एका जबाबदार मंत्र्यांना कस्टम अधिकार्‍यांनी ताब्यात घेऊन तीन दिवस उलटले तरी अद्याप सरकारकडून अधिकृत वक्तव्य केले जात नाही, याला काय म्हणावे, असा सवाल शिष्टमंडळाने केला. आपल्याकडून हे कृत्य अजाणतेपणाने झाल्याचे बाबूश म्हणतात. याचा अर्थ यापूर्वी त्यांनी अशाच पद्धतीने अजाणतेपणाने आणखी किती विदेशी चलनाची तस्करी केली काय याची चौकशी व्हायला हवी, असेही प्रा. पार्सेकर म्हणाले.
विधानसभा अधिवेशन सुरू असताना राज्याबाहेर जाण्यापूर्वी सभापती व मुख्यमंत्र्यांची पूर्वपरवानगी घ्यावी लागते. आता या प्रकरणावर पडदा टाकण्यासाठी सदर परवानगी घेतल्याचे भासवले जात आहे. तथापि, बाबूश यांनी विदेशात जाण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाची परवानगी घेतली होती काय, असाही प्रश्‍न उपस्थित होतो. मुख्यमंत्री दिगंबर कामत यांचे मौनव्रत संशयाला आणखी बळकटी देत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना तात्काळ कारवाई करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी या शिष्टमंडळाने त्यांना केल्याचेही यावेळी सांगण्यात आले. बाबूश यांच्याकडे नेमके किती विदेशी
चलन सापडले याची कस्टमकडूनही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. केंद्रात व महाराष्ट्रातही कॉंग्रेस आघाडीचेच सरकार सत्तेवर आहे व या प्रकरणावर पडदा टाकला जाण्याचीच जास्त शक्यता आहे. हा विषय भाजप सहजासहजी सोडणार नाही. याप्रकरणावर संसदेतही जोरदार आवाज उठवला जाईल, असे खासदार श्रीपाद नाईक म्हणाले.
आज ठरणार व्यूहरचना
बाबूश यांना तात्काळ मंत्रिमंडळातून डच्चू द्यावा या मागणीची पूर्तता झाली नाही तर उद्या ५ रोजी विधानसभेत भाजप विधिमंडळ पक्षाची व्यूहरचना कशी असेल, याचा निर्णय उद्या सकाळी घेण्यात येईल. याप्रकरणी सभागृह व सभागृहाबाहेरही भाजप जोरदार मोर्चेबांधणी करणार असल्याचे संकेत प्रा.पार्सेकर यांनी दिले. राज्यपालांनी शिष्टमंडळाचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले. या प्रकरणाचे गांभीर्य त्यांनाही उमगले आहे. त्यामुळे ते नेमकी काय भूमिका घेतात त्यानुसार पुढील कृतीची आखणी करू, असे प्रा. पार्सेकर म्हणाले.
भाजपतर्फे आज मोर्चा
शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात यांना ताबडतोब मंत्रिमंडळातून डच्चू देण्याच्या मागणीसाठी भाजपने उद्या मंगळवार ५ एप्रिल रोजी पणजीत दुपारी तीन वाजता मोर्चाचे आयोजन केले आहे. हा मोर्चा पणजी शहरांत फिरून त्याचे आझाद मैदानावर विराट जाहीर सभेत रूपांतर होईल. याप्रसंगी विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर, खासदार श्रीपाद नाईक, प्रदेशाध्यक्ष लक्ष्मीकांत पार्सेकर व इतर नेते हजर राहणार आहेत. वारंवार विदेश दौरा करीत असलेल्या आमदार व मंत्र्यांची तात्काळ चौकशी व्हावी, अशी मागणी यावेळी केली जाईल. राज्यातील भाजपचे तमाम कार्यकर्ते व स्वाभिमानी नागरिकांनी या मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन भाजपने केले आहे.

मडगावी भरदिवसा फ्लॅट फोडून ३.३० लाखांचा ऐवज पळवला

मडगाव, दि.४ (प्रतिनिधी)
आके येथील भर वस्तीतील फ्लॅट फोडून तब्बल चार लाखांचे दागिने पळविण्याचा प्रकार ताजा असतानाच आज सकाळी पोलिस स्टेशनपासून हाकेवर असलेल्या एका बहुमजली इमारतीतील असाच आणखी एक फ्लॅट फोडून चोरट्यांनी सुमारे ३.३० लाखांचा ऐवज पळविला व त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघातील या वाढत्या चोर्‍या पोलिस यंत्रणेसाठी आव्हान ठरूं लागल्याचे दिसून आले.
कालच आके येथे पांडव कपेलाजवळील एका इमारतीतील पराग रायकर यांचा फ्लॅट फोडून सुमारे चार लाखांचे दागिने पळवल्याची तक्रार नोंदवली गेली होती. रायकर हे तीन दिवस बेळगावात होते व त्यामुळे त्यांचा फ्लॅट बंद होता. ते काल गोव्यात परतल्यावर चोरीचा हा प्रकार उघडकीस आला होता.
हे प्रकरण ताजे असतानाच आज शिवराम विश्वनाथ नार्वेकर यांचा पोलिस स्टेशनच्या मागच्या बाजूकडील इमारतीत चौथ्या मजल्यावर असलेला फ्लॅट सकाळी फोडला गेला व चोरट्यांनी सुमारे ३ लाखांचे दागिने व रोख ३० हजार रुपये पळवले. नार्वेकर हे सकाळी नेहमीप्रमाणे बाहेर पडल्यावर सुमारे सव्वा अकरा वाजता त्यांची पत्नी आनंदी ही बोंबी निवासातील आपल्या मूळ निवासस्थानी पाडवा असल्याने दिवा लावण्यासाठी म्हणून गेली. तिने दाराला कुलूप लावून किल्ली शेजारणीकडे ठेवली व कामवाली आल्यास तिला किल्ली दे असे सांगून ती बाहेर पडली. सव्वाबाराच्या सुमारास सौ. आनंदी परतली असता तिला फ्लॅटचा मुख्य दरवाजा व आत कपाट फोडून सर्व सामान अस्ताव्यस्त टाकलेले आढळले. लगेच त्यांनी पोलिसात तक्रार नोंदवली.
चोरट्यांनी मुख्य दरवाजा व नंतर आतील कपाट, त्यातील सेफ लोखंडी सळ्यानी फोडून रोख ३० हजार, हार, मंगळसूत्र, हिर्‍याची अंगठी, अन्य १७ अंगठ्या, कर्णफुलांचे १५ जोड मिळून ११७ गॅम सोने पळवल्याचे तिच्या दृष्टीस पडले.
नंतर उपनिरिक्षक परेश नाईक यांनी पंचनामा केला व तपासासाठी श्वानपथक आणले; पण ते रेल्वे फाटकापर्यंत जाऊन थांबले. शहरात व विशेषतः भर वस्तीत हे रोजचे प्रकार होऊ लागले आहेत. यामागे सराईत टोळी की आणखी कोण ते कळू शकलेले नाही.

भाषा सुरक्षा मंच बैठकीची गावोगावी जय्यत तयारी

पणजी, दि. ४ (प्रतिनिधी)
भारतीय भाषा सुरक्षा मंच गोवातर्फे ६ एप्रिल रोजी पणजीच्या आझाद मैदानावर होणारी विराट जाहीर सभा यशस्वी करण्यासाठी देशी भाषाप्रेमींनी जय्यत तयारी आरंभली आहे. या सभेव्दारे इंग्रजी प्राथमिक माध्यमाची मागणी करणार्‍यांना धडकी भरवण्याचाच संकल्प आयोजकांनी सोडला आहे. राज्याचे शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात हे विदेशी चलन तस्करी प्रकरणी अडकल्याने त्याचेही तीव्र पडसाद या सभेत उमटण्याची शक्यता आहे.
भारतीय भाषा सुरक्षा मंचाच्या निमित्ताने राज्यातील मराठी तथा कोकणीप्रेमी पहिल्यांदाच एकत्र येणार आहेत. यासाठी गावागावांत जय्यत तयारी सुरू आहे. आत्तापर्यंत या सभेसाठी गावागावांत शेकडो बैठकांचे आयोजन करून जास्तीत जास्त लोकांना या सभेसाठी आमंत्रित करण्यात आले आहे. अनेक मान्यवर लेखक तथा विविध स्तरावरील प्रज्ञावंत यांची हजेरी लाभणार आहे. एकार्थाने राज्यातील मराठी व कोकणीप्रेमींतर्फे शक्तिप्रदर्शनच होणार असून यापुढे कुणीही इंग्रजी माध्यमाचा विचारही मनात आणता कामा नये, असा संदेश या सभेतून सर्वत्र पोहोचवला जाणार आहे.
विधानसभा अधिवेशनाची संधी साधून काही दिवसांपूर्वी इंग्रजी माध्यम समर्थकांनी डायोसेशन सोसायटीच्या मदतीने आझाद मैदानावर जाहीर सभेचे आयोजन केले होते. या सभेला कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदार व मंत्र्यांनी ठळक उपस्थिती लावून या मागणीला जाहीर समर्थन दिले होते. सरकारातील केवळ ख्रिस्ती आमदार व मंत्र्यांचीच उपस्थिती या सभेला लाभल्याने धर्माच्या आधारावर सरकारवर दबाव टाकून ही मागणी पदरात पाडून घेण्याची व्यूहरचनेचे बिंग आता फुटले आहे. याप्रकरणी विरोधी भाजप, तथा सत्ताधारी आघाडीतील घटक असलेल्या म.गो पक्षाने उघडपणे विरोधी भूमिका जाहीर केली. सरकार पक्षातीलही काही मंत्री व आमदारांनी या प्रस्तावाला विरोध केल्याने अखेर प्राथमिक माध्यम धोरणात कोणताही बदल केला जाणार नाही, अशी घोषणा करून सरकारने आपली लाज राखली. याविषयी सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली असली तरी याविषयावरून मतांचे ध्रुवीकरण करण्याचा घाट काही नेत्यांनी घातल्याची खात्रीलायक माहिती प्राप्त झाली आहे. राज्यातील अल्पसंख्याकांचा कॉंग्रेस आघाडी सरकारविरोधात रोष दिवसेंदिवस वाढत चालल्याने आता भाषेच्या नावावर या लोकांची मोट बांधण्याची व्यूहरचना आखण्यात आली आहे. त्यात चर्चसंस्थेचाही सहभाग असल्याचा आरोप देशी भाषाप्रेमींनी केला आहे.
{ejU‘§Ìr बाबूश ‘लक्ष्य’
मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी शिक्षण खाते बाबूश मोन्सेरात यांच्याहाती सोपवून यापूर्वीच कहर केला आहे. आता बाबूश यांची विविधप्रकरणे त्यांच्या अंगलट येत आहेत.
बाबूश यांच्याकडून शिक्षण खाते काढून घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांवर या सभेद्वारे दबाव टाकला जाणार आहे. मोन्सेरात यांची गुन्हेगारी पार्श्‍वभूमी, त्यात पणजी मनपा निवडणूक विजय मिरवणुकीत शँपेनची बाटली तोंडाला लावण्याचा प्रकार व आता विदेशी चलन तस्करी प्रकरणामुळे बाबूश यांना या सभेत प्रमुख वक्त्यांकडून लक्ष्य केले जाण्याची शक्यता आहे.

बेकायदा खाणी बंद व्हायलाच हव्यात

खास उपसमितीची कडक भूमिका
पणजी, दि. ४ (प्रतिनिधी)
गोव्यातील बेकायदा खाण उद्योगाला सरकारचे अभय मिळत असले तरी राज्याच्या भवितव्याचा वेध घेणार्‍या २०२५ च्या ‘व्हिजन डॉक्युमेंट’ तयार करणार्‍या पर्यावरणीय उपसमितीने मात्र बेकायदा खाणी बंद व्हायलाच हव्यात अशी ताठर भूमिका घेतली आहे. राज्यातील बेकायदा खाण उद्योगाबाबत सविस्तर माहिती गोळा करून या उद्योगाच्या परिणामांची मीमांसा ‘व्हिजन डॉक्युमेंट’ मध्ये केली जाईल, अशी माहिती या समितीचे प्रमुख तथा ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ डॉ.माधव गाडगीळ यांनी दिली.
आज कला अकादमीत पत्रकारांशी त्यांनी वार्तालाप केला. गोवा मुक्ती सुवर्णमहोत्सवी मंडळाच्या ‘ पर्यावरण व शाश्‍वत विकास’ या विषयाचा अभ्यास करणार्‍या त्रिसदस्यीय उपसमितीचे प्रमुख म्हणून डॉ.गाडगीळ काम पाहत आहेत. या मंडळातर्फे तयार करण्यात येणारा ‘व्हिजन डॉक्टुमेंट’ दोन वर्षांत तयार होईल. या उपसमितीचे राष्ट्रीय समुद्रविज्ञान संस्थेचे संचालक डॉ. सतीश शेट्ये व ऊर्जा संसाधन संस्थेच्या लीजिया नोरोन्हा या सदस्य आहेत. ‘व्हिजन डॉक्टुमेंट’च्या या कामात जनतेने आपले सहकार्य देण्याचे आवाहन डॉ. गाडगीळ यांनी केले.
कोकणी, मराठी किंवा इंग्रजीतून आपल्या भागातील बेकायदा खाणींची माहिती जनतेने या उपसमितीकडे पाठवावी. विविध ठिकाणी पर्यावरणीय समस्यांबाबत ग्रामसभांनी संमत केलेले ठराव किंवा विविध सरकारी खाती अथवा केंद्रीय पर्यावरण व वनमंत्रालयाकडे केलेला पाठपुरावा याचा तपशीलही सादर करावा, असेही त्यांनी म्हटले आहे. या अहवालात पर्यावरणाची सद्यःस्थिती व त्यावरील उपायांची शिफारस सरकारला करणार असल्याचे ते म्हणाले.
प्राप्त माहितीनुसार राज्यात एकूण १०५ सक्रिय खाणी सुरू आहेत व यावर्षी सुमारे ४५ दशलक्ष टन खनिज निर्यात करण्यात आले आहे. बेकायदा खाणींवरून स्थानिक जनता व सरकार यांच्यात सुरू असलेल्या लढ्याची दखलही सदर उपसमिती घेणार आहे. गोव्यातील पर्यावरणीय अभ्यास केंद्राच्या संकेतस्थळावर राज्यातील विविध खाणींची माहिती, पर्यावरणीय परवाने तसेच पर्यावरणीय परिणाम अहवालाची माहिती जनतेसाठी उपलब्ध करून दिली जाईल. याप्रसंगी केंद्राचे गोवा प्रमुख सुजीत डोंगरे व समाज कार्यकर्ते ऍड.सतीश सोनक हजर होते.
सरकारची बेकायदा खाणींबाबतची सध्याची मवाळ भूमिका पाहता या अहवालातील शिफारशींची अंमलबजावणी केली जाईल का,असा सवाल काही पत्रकारांनी केला असता डॉ. गाडगीळ म्हणाले, ‘व्हिजन डॉक्टुमेंट’मुळे गोव्याच्या भवितव्यासाठी काय करावे याची योग्य दिशाच जनतेला प्राप्त होणार आहे. त्यामुळे या डॉक्युमेंटची कार्यवाही होण्यासाठी जनतेनेच सरकारला भाग पाडावे, असेही ते म्हणाले.

वर्ल्डकपवर सट्टा लावण्यासाठी बाबूशची ‘ती’ दुबईवारी?

पणजी, दि. ४ (प्रतिनिधी)
शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात हे विश्‍वचषक क्रिकेटच्या अंतिम सामन्यावर सट्टा लावण्यासाठी लाखो रुपये घेऊन दुबईला रवाना झाले होते, अशी जोरदार चर्चा सध्या ताळगावात सुरू झाली आहे.
त्यासाठी त्यांनी पणजीतील एका व्यावसायिकाकडून करोडो रुपयांचे विदेशी चलनही उपलब्ध करून घेतले होते, अशी माहिती उपलब्ध झाली आहे. मात्र, या व्यावसायिकाकडे एवढे विदेशी चलन उपलब्ध करून देण्याचा परवाना आहे का, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. प्रत्येक वेळी त्याच व्यक्तीकडून बाबूश हे विदेशी चलन उपलब्ध करून घेत असल्याचे सांगितले जाते.
शनिवारी दि. २ एप्रिल रोजी विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धेचा सामना असल्याने शुक्रवारी रात्री बाबूश मोन्सेरात गोव्यातील दाबोळी विमानतळावरून दुबईला रवाना होणार होते. यावेळी त्यांच्याबरोबर त्यांचा मोठा मुलगा, पणजी व मडगाव येथील एक मित्रही जाणार होते. मात्र, शुक्रवारी रात्री गोव्यातून दुबईला जाणारे विमान चुकल्याने मुंबईहून शनिवारी पहाटे जाणार्‍या विमानाचे तिकीट त्यांनी काढले. तथापि, विश्‍वचषक क्रिकेट सामना असल्याने आणि दुबई हे सट्टा लावण्याचे प्रमुख केंद्र असल्याने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर कडक पहारा ठेवण्यात आला होता. सट्टा लावण्यासाठी मोठी रक्कम भारतातून दुबईला नेली जाण्याची शक्यता लक्षात घेऊन कस्टम अधिकार्‍यांनी दुबईत जाणार्‍या प्रत्येक प्रवाशावर नजर ठेवली होती. त्यात बाबूश हे अलगद त्यांच्या हाती लागले. दाबोळी विमानतळावर त्यांची आणि त्यांच्या सहकार्‍यांच्या बॅगेची कोणतीही तपासणी होणार नाही, याची पूर्ण काळजी त्यांनी घेतली होती. मात्र, मुंबईतून जावे लागल्याने त्यांचा हा बेत फसला.
ज्यावेळी कस्टम अधिकार्‍यांनी त्यांना चौकशीसाठी अडवले तेव्हा त्यांच्याबरोबर गोव्यातील राजकीय नेत्यांच्या वर्तुळातील अजून एक बडी व्यक्ती त्यांच्याबरोबर होती. जेव्हा बाबूश यांच्याकडे कस्टम अधिकारी चौकशी करीत असल्याचे लक्षात येताच त्या व्यक्तीने तेथून धूम ठोकल्याचेही सांगण्यात येते.

‘गोवादूत क्रिकेट धमाका’ स्पर्धेचा निकाल जाहीर

स्वेता खांडेपारकर, गुरुदास सावंत, प्रज्योत नाईक विजेते

पणजी, दि.४ (प्रतिनिधी)
क्रिकेटमध्ये यश मिळवण्यासाठी जबर आत्मविश्वास व कठोर मानसिकता यांची गरज असते. भारतीय संघाने याच सूत्रांआधारे विश्वचषक पटकावला व तमाम देशवासीयांना अनमोल अशी सोनेरी भेट दिली, असे प्रतिपादन गोव्याचे अष्टपैलू क्रिकेटपटू शेरबहादूर यादव (शेरु) यांनी आज येथे केले.
‘गोवादूत’तर्फे विश्वचषक क्रिकेट स्पर्धेनिमित्त ‘गोवादूत’च्या वाचकांसाठी ‘विश्वचषक क्रिकेट धमाका २०११ स्पर्धा’आयोजिली होती. शेरबहादूर यादव यांच्या हस्ते आज ४ एप्रिल रोजी या स्पर्धेचा निकाल ‘गोवादूत’च्या मुख्यालयात काढण्यात आला. यात धमाका ३ -( विश्वविजेता) मध्ये स्वेता खांडेपारकर - ड्रायव्हर हिल, वास्को (बक्षीस १० हजार रुपये ), धमाका २ (अंतिम फेरीतील दोन संघ ) मध्ये गुरुदास कृष्णा सावंत, पेडे म्हापसा (बक्षीस ५ हजार रुपये) व धमाका क्र. १ (उपांत्य फेरीतील चार संघ ) मध्ये प्रज्योत नाईक, नावत बांदोडा (बक्षीस ३ हजार रुपये) यांना बक्षिसे प्राप्त झाली.
‘जीपीएल’मध्ये सर्वांत महागडा खेळाडू ठरलेल्या शेरबहादूर यादव यांनी वरील भाग्यवान विजेत्यांच्या नावांची कुपन्स काढली. या वेळी अभिनव पब्लिकेशन्सच्या संचालक ज्योती धोंड व सागर अग्नी, ‘गोवादूत’चे संपादक गंगाराम म्हांबरे, कार्यकारी संपादक सुनील डोळे, पुरवणी संपादक अशोक नाईक (‘पुष्पाग्रज’), डीटीपी व्यवस्थापक राजू पवार, प्रमुख प्रतिनिधी किशोर नाईक गावकर व ‘गोवादूत’चे कर्मचारी उपस्थित होते. ज्योती धोंड यांनी शेरबहादूर यादव ऊर्फ शेरु यांचे स्वागत केले. सुनील डोळे यांनी पुष्पगुच्छ प्रदान केला. मुख्य उपसंपादक सचिन वेटे यांनी सूत्रनिवेदन केले. उपसंपादक धीरज म्हांबरे यांनी स्पर्धेबद्दल माहिती दिली.
उपांत्य फेरीतील चार संघ कोणते, या धमाका १ च्या प्रश्‍नाला (रुपये ३ हजार ) प्रचंड प्रतिसाद मिळूनही फक्त दोघा जणांनी चौथा संघ म्हणून न्यूझीलंडचे नाव लिहिले होते. त्यातील एक कुपन काढल्यानंतर प्रज्योत सावंत याला विजयी म्हणून घोषित करण्यात आले. धमाका २ मध्ये अंतिम फेरीतील दोन संघ कोण (रुपये ५ हजार) या प्रश्‍नाला ३६१ उत्तरे बरोबर होती. यामधे गुरुदास सावंत हे भाग्यवान ठरले तर धमाका ३ (रुपये १० हजार )विश्वचषक विजेता कोण, या प्रश्‍नाचे ४७५ जणांनी भारत विश्वचषक जिंकणार असे अचूक उत्तर दिले. मात्र या सर्वांत स्वेता खांडेपारकर भाग्यवान ठरली.
या प्रसंगी शेरबहादूर यादव यांनी भारतीय संघाच्या विश्वविजयावर रंगतदार चर्चा केली. गौतम गंभीर आणि विराट कोहली यांची भागीदारी हा विजयाचा ‘टर्निंग पॉइंट’ ठरल्याचे सांगितले. गोवा क्रिकेट असोसिएशनने क्रिकेट खेळाडूंना चांगल्या सुविधा पुरवण्यास सुरुवात केल्यामुळे गोवा संघ चांगले प्रदर्शन करत असल्याचे ‘शेरु’ यांनी एका प्रश्‍नाला उत्तर देताना सांगितले. संपादक गंगाराम म्हांबरे यांनी आभार व्यक्त केले. लवकरच एका कार्यक्रमात वरील तिन्ही विजेत्यांना बक्षिसे प्रदान करण्यात येणार आहेत, अशी माहिती संचालक सागर अग्नी यांनी यावेळी दिली.

Monday 4 April, 2011

बाबूशना डच्चू देईपर्यंत भाजपचा लढा : पार्सेकर

• गावागावांत विषय नेणार
• उद्यापासून भाजपची मोहीम

पणजी, दि. ३ (प्रतिनिधी): करोडो रुपयांचे बेहिशेबी विदेशी चलन दुबईला घेऊन जाताना मुंबई विमानतळावर जकात विभागाच्या हाती आलेले गोव्याचे शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात यांना मुख्यमंत्री दिगंबर कामत मंत्रिमंडळातून जोवर डच्चू देत नाही तोवर आमचा लढा सुरूच राहणार आहे, असे आज भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी स्पष्ट केले. भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते मंगळवार ५ एप्रिलपासून हा विषय घेऊन गावागावांत उतरणार आहेत. तसेच उद्या (सोमवारी) गोव्याचे राज्यपाल डॉ. एस. एस. सिद्धू यांची भेट घेतली जाणार असल्याचे श्री. पार्सेकर यांनी सांगितले.
त्याप्रमाणे, तीन दिवसांच्या सुट्टीनंतर मंगळवारपासून पुन्हा सुरू होणार्‍या विधानसभा अधिवेशनात स्थगन प्रस्ताव आणण्याचाही विचार असल्याचे प्रा. पार्सेकर यांनी यावेळी सांगितले. सदर घटना घडून ३६ तास उलटून गेले तरीदेखील मुख्यमंत्री दिगंबर कामत हे एक चकार शब्दही काढत नसल्याने बाबूश यांच्या त्या बॅगेत मुख्यमंत्र्यांचेही पैसे असावेत, असा आरोप श्री. पार्सेकर यांनी यावेळी केला.
प्रा. पार्सेकर आज पक्ष कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी उत्तर गोवा खासदार श्रीपाद नाईक व सरचिटणीस गोविंद पर्वतकर उपस्थित होते. कॉंग्रेस सरकारच्या या मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी गेल्या चार वर्षात किती वेळा, कोणत्या कारणासाठी विदेश दौरे केले, याची संपूर्ण माहिती जनतेसमोर उघड करण्याची मागणी करीत या विदेश दौर्‍यांना केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयातून परवानगी मिळाली होती का, याचीही माहिती दिली जावी, अशी मागणी पार्सेकर यांनी केली.
हे प्रकरण काळ्या धनाशी जोडलेले आहे. त्यामुळे लोकसभेतही त्यावर आवाज उठवला जाणार आहे, असे यावेळी खासदार श्रीपाद नाईक यांनी सांगितले.
कोणत्याही मंत्र्याला विदेशात जायचे असल्यास त्यासाठी केंद्रीय परराष्ट्र मंत्रालय तसेच, मुख्यमंत्र्यांची परवानगी घेणे बंधनकारक आहे. त्यात विधानसभा सुरू असल्यास सभापतींचीही संमती घेणे गरजेचे असते. त्यामुळे शिक्षणमंत्री मोन्सेरात यांनी या सर्वांची परवानगी घेतली होती का, याचीही माहिती मुख्यमंत्र्यांनी द्यावी, असे खासदार नाईक यावेळी म्हणाले. गेल्या चार वर्षापासून हे मंत्री उठसूट विदेशवार्‍या करीत आहेत. त्यांचे अनेक व्यवसायही त्याठिकाणी सुरू असल्याची शक्यता नाकारता येत नाही. कोणाचे हॉटेलचे बांधकाम सुरू आहे तर, काहींनी समुद्र किनार्‍यावर फ्लॅट घेतले आहेत, अशी माहिती हाती आली असल्याचेही श्री. पार्सेकर यांनी यावेळी सांगितले.
या घटनेमुळे देशस्तरावर तसेच जागतिक स्तरावरही गोव्याची बदनामी झालेली आहे. त्यामुळे राज्य सरकारने यावर स्पष्टीकरण देणे गरजेचे आहे. हा पैसा बाबूश यांच्याकडे कसा आला? बाबूश हे सदर पैसा दुबई येथे कशासाठी घेऊन जात होते, याचीही माहिती लागली पाहिजे, अशी मागणी प्रा. पार्सेकर यांनी केली.
बाबूश यांचा दावा
तब्बल ४८ तासांनंतर शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी आपल्याकडे मुंबई विमानतळावर सापडलेले विदेशी चलन हे हिशेबी असून ते केवळ २१ लाख रुपये असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे केंद्रातील, महाराष्ट्रातील आणि गोव्यातील कॉंग्रेस सरकार या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न करीत असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. तसेच, मुंबई जकात खात्याचे आयुक्त तथा या प्रकरणाचे तपास अधिकारी आर. एस. सिद्धू आणि गोव्याचे राज्यपाल डॉ. एस. एस. सिद्ध हे जवळचे नातेवाईक असल्याचेही बोलले जात आहे.
बाबूश यांनी आपल्याकडे २१ लाख रुपये असल्याचा दावा केला असला तरी कालपर्यंत या पैशांबद्दल जकात खात्याला समाधानकारक उत्तरे मिळालेली नव्हता. त्यामुळे बाबूशना सर्व कागदपत्रांसह येत्या ८ एप्रिल रोजी मुंबईत पुन्हा हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, त्यांच्या मित्राचाही पासपोर्ट जप्त केला आहे. तसेच, बाबूश यांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडे करोडो रुपयांचे विदेशी चलन सापडलेे असल्याची माहिती कस्टम अधिकार्‍यांनी राष्ट्रीय वृत्तसंस्थांच्या पत्रकारांना दिली होती. त्यामुळे त्या कस्टम अधिकार्‍यांनी सांगितलेली रक्कम आणि बाबूश यांनी केलेला दावा यात फरक आढळून येत आहे.
‘मी विविध चलनातील केवळ २१ लाख रुपये घेऊन दुबईला निघालो होतो. यावेळी माझ्याबरोबर माझा मुलगा आणि मित्रही होता’ असे श्री. बाबूश यांनी एका वृत्तसंस्थेला सांगितले. तसेच, गेल्यावर्षी लंडन येथे हॉटेल विकत घेण्याचा विचार होता तेव्हा तेथे जाताना आपण २५ हजार डॉलरचा ‘ट्रॅव्हल चेक’ बनवला होता. तो धनादेश माझ्याकडे अजूनही असल्याचे त्यांनी सांगितले. याव्यतिरिक्त ७५ हजार दिनार आणि भारतीय ६३ हजार रुपये दुबईला जाताना आपल्याबरोबर होते. असे श्री. मोन्सेरात यांनी सांगितले.
पर्यटन व्हिसावर एवढी मोठी रक्कम घेऊन जाता येत नाही, याची आपल्याला कोणी कल्पना दिली नव्हती, असाही युक्तिवाद त्यांनी केला आहे. रशिया आणि जपान या राष्ट्रात जातानाही हा धनादेश बरोबर घेऊन गेलो होतो. परंतु, तो खर्च करण्यात आला नव्हता, अशीही माहिती त्यांनी पुढे दिली.
जर बाबूश यांच्याकडे केवळ २१ लाख रुपयेच होते तर जकात अधिकार्‍यांनी त्यांची सुमारे ६ तास चौकशी का केली. तसेच, त्यांच्या मित्राचा पासपोर्ट जप्त करून दि. ८ एप्रिल रोजी पुन्हा चौकशीसाठी का बोलावले, असे प्रश्‍न निर्माण झाले आहेत. दरम्यान, कॉंग्रेस पक्षातील असंतुष्ट आमदार या संधीचा लाभ घेण्यासाठी सक्रिय झाले आहे.

दंडुक्याच्या प्रहाराने कळंगुट येथे खून

म्हापसा, दि. ३ (प्रतिनिधी): गौरावाडा कळंगुट येथील व्हर्जिन नाईक क्लबसमोर झारखंड येथील सुनील डुंगेडुंगे (३०) या टँकर चालकाचा डोक्यावर दंडुक्याने प्रहार करत खून करण्यात आल्याची घटना काल (दि.२) रात्री घडली. सुनीलच्या मदतीला धावून जाणार्‍या टँकर मालकावर हल्ला करत त्याला जखमी करण्यात आले.
कळंगुट पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुनील हा सीमडेगा झारखंड येथील तरुण आराडी कांदोळी येथे राहत होता. काल रात्री तो गौरावाडा कळंगुट येथील व्हर्जिन नाइट क्लबमध्ये आला होता. तो रात्री ३.३० च्या दरम्यान क्लबमधून बाहेर येताच बाहेर असलेल्या कारमधून (जीए ०३ टी ९२२०) चौघेजण खाली बाहेर आले. त्यांनी सुनीलसोबत भांडण उकरून काढले. यावेळी हातघाईवर हे प्रकरण गेले. त्यावेळी त्या चौघांतील एकाने आपल्या वाहनातील दंडुका घेऊन त्याने सुनीलच्या डोक्यावर प्रहार केला. यावेळी सुनील जमिनीवर कोसळला. या घटनेची माहिती रवीरंजन व्ही या मूळ आंध्रप्रदेशातील व सध्या आराडी कांदोळी येथे राहणार्‍या टँकर मालकाला फोनवरून देण्यात आली. रवीरंजन याने घटनास्थळी येऊन सुनीलला मारहाण करण्याचे कारण विचारले असता रवीरंजन यालाही मारहाण करण्यात आली.
तेथील लोकांनी सुनील व रवीरंजन या दोघांनाही जखमी अवस्थेत कांदोळीच्या आरोग्यकेंद्रात दाखल केले असता सुनील याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. रवीरंजन याच्यावर उपचार चालू आहेत.
सदर चौघेही हल्लेखोर कारमधून पसार झाले असून रवीरंजन याने दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चौघाजणांवर गुन्हा नोंद केला असून सदर कारही जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिस तपास सुरू आहे.

धारबांदोडा अपघातात एक ठार, एक जखमी

फोंडा, दि. ३ (प्रतिनिधी): प्रतापनगर धारबांदोडा येथे आज संध्याकाळी ६.३० च्या दरम्यान कार (केए २९ एम ३२७३) आणि डिओ (जीए ०९ सी ६२४६) यांच्यात झालेल्या अपघातात एक ठार व एक जखमी झाला. अंकुश रामचंद्र गावडे (३२) गुरखे धारबांदोडा याचा मृत्यू झाला तर गौरीश रोहिदास परुळेकर (धारबांदोडा) हा जखमी झाला. त्याला बांबोळी येथे गोमेकॉॅत दाखल केले आहे.
भरधाव कारगाडीने चुकीच्या दिशेने येत दुचाकीला धडक दिली असे ग्रामस्थांनी सांगितले. या घटनेमुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले. लोकांनी दोन तास रस्ता बंद केल्याने वाहतूक व्यसथा कोलमडली. प्रतापनगर येथे रस्ता खराब झालेला असल्याने अपघातांचे प्रमाण वाढत आहे. यात चार जणांचे बळी गेले आहेत असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. उपनिरीक्षक सचिन पन्हाळकर यांनी पंचनामा केला.

पणजीतील भाषा मेळाव्यास प्रचंड संख्येने उपस्थित रहा

शशिकला काकोडकर यांचे आवाहन
पणजी, दि. ३ (प्रतिनिधी): पालकांनी आपल्या हातातील सर्व कामे बाजूला ठेवून येत्या दि. ६ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता मोठ्या संख्येने भारतीय भाषांच्या रक्षणासाठी पणजीच्या आझाद मैदानावर एकत्रित व्हावे, असे आवाहन आज भारतीय सुरक्षा मंचाच्या अध्यक्षा तथा माजी मुख्यमंत्री शशिकला काकोडकर यांनी आज (दि.३) केले. आज सकाळी त्या राज्यातील मराठी तसेच कोकणी साहित्यिकांच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलत होत्या. तसेच या मेळाव्यास २५ हजार लोक उपस्थित राहतील असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.
सिद्धार्थ भवनमध्ये घेतलेल्या या बैठकीत मराठी व कोकणी साहित्यातील दुवा कायम राहावा यासाठी किमान वर्षातून एकदा दोन्ही भाषांचे साहित्य संमेलन घडवून आणण्याचा विचार व्यक्त यावेळी करण्यात आला. काही हेवेदावे असले तरी एकमेकांच्या भाषेबद्दल कोणालाही द्वेष नाही, असाही सूर यावेळी व्यक्त करण्यात आला. यावेळी झालेल्या चर्चेत, एन. शिवदास, प्रा. अनिल सामंत, प्रा. प्रकाश पर्येकर, बाळ सप्रे, परेश प्रभू यांनी सहभाग घेतला. तर, अन्य साहित्यिकांनी आपल्या सूचनाही यावेळी केल्या.
पूर्व प्राथमिक स्तरावर इंग्रजी विषय सक्तीचा केल्यास शेकडो पूर्व प्राथमिक तसेच प्राथमिक शिक्षकांचे भवितव्य धोक्यात येणार असल्याची भीती व्यक्त करण्यात आली. त्यामुळे या शिक्षकांनीही या महामेळाव्यात सहभाग घ्यावा, असे आवाहन यावेळी मंचातर्फे करण्यात आले.
दरम्यान, आज सायंकाळी मंचाच्या अध्यक्षा श्रीमती काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. राहिलेल्या दोन दिवसांत विविध ठिकाणी प्रवास करण्याचेही यावेळी ठरवण्यात आले आहे. तसेच, ग्रामस्तरावर ८० बैठका घेण्यात आल्या असून आत्तापर्यंत या बैठकांतून सुमारे साडेआठ हजार लोकांपर्यंत हा विषय नेण्यात यश आले आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली. या बैठकांत सहभागी झालेले साडेआठ हजार लोक भारतीय भाषेच्या सुरक्षेसाठी आयोजित केलेल्या महामेळाव्यात २५ हजार लोकांना घेऊन येतील, असेही यावेळी सांगण्यात आले.

मडगाव शिमगोत्सवास अल्प प्रतिसाद

मडगाव, दि. ३ (प्रतिनिधी): मोठा गाजावाजा केलेल्या मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या अध्यक्षतेखालील मडगाव शिमगोेत्सव समितीतर्फे आज (दि.३) मडगावात आयोजित केलेल्या शिमगोत्सवातील चित्ररथ मिरवणुकीला लोकांकडून मात्र अपेक्षित प्रतिसाद लाभला नाही. त्यामुळे आयोजकांचा अपेक्षा भंगच झाला. त्यानंतर लोक जमविण्याच्या प्रयत्नात कोणातरी चित्रपट कलाकाराला बोलाविण्याच्या हालचाली सुरू होत्या.
हॉस्पिसियू इस्पितळ ते नगरपालिका चौकापर्यंतच्या रस्त्याच्या दुतर्फा लोकांची एरवी प्रचंड गर्दी उसळायची. परंतु यंदा ती तशी आढळून आली नाही व त्यामुळे पोलिस यंत्रणेवर तसेच वाहतूक व्यवस्थेवर जास्त ताण पडला नाही. खबरदारीपोटी जरी मिरवणुकीच्या मार्गावर मोक्याच्या जागी टेहळणी मनोरे उभारून तेथे सशस्त्र पोलिस तैनात केलेले असले तरी मिरवणूक संपूर्णपणे शांततेत पार पडली.
मुख्यमंत्री कामत यांनी नगराध्यक्षा सुशिला नायक यांच्या उपस्थितीत दुपारी हॉस्पिसियू इस्पितळाजवळ मिरवणुकीस प्रारंभ केला. मिरवणुकीत सर्वांत पुढे लोककला पथके, रोमटामेळ व त्यानंतर चित्ररथ होते. यंदाच्या मिरवणुकीत एकूण ४८ चित्ररथ, ८ रोमटामेळ व २१ लोकनृत्य पथके सहभागी झाली होती. त्यात कलाश्री महिला मंडळ मडगाव व ब्रह्मानंद महिला मंडळ वास्को यांचा समावेश होता. मिरवणूक इतकी संथपणे चालली की रात्री ८वा. पर्यंत एकही चित्ररथ पालिका चौकात पोहोचला नव्हता. त्यामुळे दुपारी ४ वा. विविध जागी बसलेले प्रेक्षक कंटाळले. दुसरीकडे सायंकाळी ६.३० पर्यंत मिरवणुकीत सहभागासाठी प्रवेश देणे चालूच ठेवल्याने मिरवणूकही लांबत गेली.
प्रेक्षकांचा प्रतिसाद कमी असल्याचे प्रत्यंतर पालिका चौकात येत होते. त्याठिकाणी कार्निव्हल मिरवणुकीच्यावेळी पाय ठेवायलाही जागा नव्हती. मात्र आज तशी स्थिती कुठेच दिसत नव्हती. दहावी तसेच अन्य इयत्तांच्या चालू असलेल्या परीक्षा व अशा मिरवणुकांतील तोचतोचपणा, तसेच चित्ररथांना होणारा विलंब हे त्यामागील कारण असल्याचे सांगितले गेले.
संपूर्ण मार्ग व मुख्य व्यासपीठ शृंगारण्यात आले होते. शिमगो समितीचे सदस्य व स्वयंसेवक निळा सदरा आणि भगव्या फेट्यात वावरत होते. दुपारपासून टेहळणी मनोर्‍यावर उभे असलेले पोलिस मात्र आपले कर्तव्यबजावत होते. शिमगो मिरवणूक व स्पर्धांच्या बंदोबस्तासाठी जादा पोलिस दल मागविण्यात आले होते. शिमगोत्सव समितीचे स्वयंसेवक त्यांना मदत करताना दिसत होते.

आकेत फ्लॅट फोडून एक लाखाची चोरी

मडगाव, दि. ३ (प्रतिनिधी): आके-मडगाव येथे पांडवा कपेलाजवळील एका इमारतीतील एक फ्लॅट फोडून चोरट्यांनी साधारण लाखभराचे दागिने पळविण्याचा प्रकार आज उघडकीस आला. त्यामुळे शिमगोत्सवात व्यस्त असलेल्या पोलिसांना धावपळ करावी लागली. या संदर्भात पराग गजानन रायकर यांनी तक्रार नोंदविली आहे.
श्री. रायकर हे सर्व मंडळींसह तीन दिवसांपूर्वी बेळगाव येथे गेले होते. तेथून ते आज (दि.३) पुन्हा आले असता त्यांना फ्लॅटचे पुढील दरवाजा फोडून आतील कपाट फोडून आतील सर्व दागिने पळविल्याचे दिसून आले. त्यांनी लगेच पोलिसांना कळविले व पोलिसांनी तेथे जाऊन पंचनामा केला. दागिन्यांचा अधिक तपशील मिळू शकला नाही.

दुर्लक्षित अष्टपैलू नेपथ्यकार : गणपत चणेकर

कायम पडद्यामागे राहून कला जतन करण्याचे निःस्वार्थीपणाने अनमोल कार्य करणारे गोमंतकातील एक कलाकार म्हणजे डिचोली येथील गणपत वसंत चणेकर. केवळ गोव्यातच नव्हे तर महाराष्ट्राच्या काहीभागात व कर्नाटकात ‘चणेकर नाट्यालंकार’ या नावाने त्यांचा व्यवसाय सुपरिचित आहेत. चणेकर नाट्यालंकारमध्ये केवळ नाटकाचे पोषाखच मिळतात असे नाही तर ध्वनी, प्रकाश, नेपथ्य व पार्श्‍वसंगीत तसेच रंगभूषाही केली जाते. नाट्यकला आणि चित्रकलेची आवड असलेल्या गणपत चणेकर यांनी आपल्या कलेतूनच जीवनात उपजीविकेचा मार्ग शोधून काढला. गेली ३५ वर्षे ते रंगकला व नाट्यकलेत आर्थिक समाधान आणि मानसिक शांती असा द्विधा आनंद लुटत आहेत. गेल्या कित्येक वषार्ंपासून कलेची जोपासना करणार्‍या या कलाकाराने कधीही शासनातर्फे वा कुठल्याही संस्थेतर्फे देण्यात येणार्‍या पुरस्कारासाठी अर्ज केला नाही किंवा आपण जोपासत असलेल्या कलेचा ढिंडोरा पिटला नाही. स्पर्धात्मक, व्यावसायिक, हौशी तसेच ऐतिहासिक, पौराणिक वा काल्पनिक कोणतेही नाटक असो. चणेकर नाट्यालंकार नेपथ्य, ध्वनीसंकलन, पार्श्‍वसंगीत आणि प्रकाशयोजनेचे काम करण्यास तत्पर असते. किंबहुना त्यांनी तो आपला व्यवसायच म्हणून स्वीकारलेला आहे. नाटकांच्या दिवसात नाट्यालंकार हा व्यवसाय तर गणेश चतुर्थीच्या काळात ते गणपतीच्या मूर्ती करतात. दर वर्षी सुमारे ४०० पेक्षा जास्त मूर्ती ते बनवतात.
शासनातर्फे कला क्षेत्रात योगदान दिलेल्या कलाकारांची दरवर्षी निवड करून त्यांना कला सन्मान पुरस्कार दिले जातात. परंतु गोव्यात असे अनेक कलाकार आहेत, जे कधीही कोणत्याही पुरस्कारासाठी अर्ज करत नाही किंवा आमदार वा मंत्र्यांचे तळवे चाटत नाही. आपला स्वाभिमान आबादीत ठेवून कला क्षेत्रात हे लोक काम करत असतात गोवा सरकार यांच्यापर्यंत पोहोचेल का? जेणेकरून कला संस्कृती संचालनालय दरवर्षी देत असलेले कला सन्मान पुरस्कार योग्य माणसांना मिळू शकतील? की एका विशिष्ट घोळक्यात असलेल्या लोकांसाठीच हे पुरस्कार मिळतील असे गोमंतकातील सुज्ञ नागरिकांत बोलले जात आहे.
या त्यांच्या कलाप्रवासाविषयी श्री. चणेकर यांना विचारले असता त्यांनी अगदी मनमोकळेपणाने आणि सविस्तरपणे माहिती द्यायला सुरुवात केली.
श्री. चणेकर म्हणाले की, ‘माझ्यातील कला ही माझ्या कुटुंबाचा वारसा आहे. माझे वडील वसंत हे अगोदर बाजारात चणे आणि मिठाई विकत होते. त्या काळात हौशी नाटके पुष्कळ व्हायची. त्यांनाही नाटकाची प्रचंड आवड होती. त्यांनी केलेल्या घटोत्कचाच्या अभिनयाची आठवण लोक आजही काढतात, असे चणेकर यांनी मोठ्या अभिमानाने सांगितले. नंतर त्यांनी आपली कला ही आपला व्यवसाय करावा म्हणून नाटकासाठी लागणारे नेपथ्य, भाडेपट्टीवर देण्याचे ठरविले आणि १९५२ सालापासून त्यांनी हा व्यवसाय सुरू केला. तोच कित्ता पुढे आपण गिरवल्याचे श्री. चणेकर म्हणाले. विद्यालयीन स्तरापासूनच विविध नाटकांतून काम करायला सुरुवात केली हाती. त्यामुळे बालपणापासूनच डोक्यात नाटकाचे भूत संचारले होते. शिवाय घरचा व्यवसाय हा नाटकाच्या नात्यातलाच असल्याने वयाच्या १७ व्या वर्षापासून आपण या व्यवसायात उतरलो आणि व्यवसायाचा आवाका वाढवला. बदलत्या काळाप्रमाणे नाटकातही विविध बदल होत गेले. त्यामुळे काळाची पावले ओळखून प्रकाश योजनेत आधुनिक तंत्रज्ञान तसेच फिरता रंगमंच असा अनेक सुधारणा केल्या. एकूण चार माणसांना कायमस्वरूपी नोकरीला ठेवून घेतले. तसेच नेपथ्याचे सामान व्यवस्थित आणि नाटकाप्रमाणे लावून ठेवण्यासाठी स्वतंत्र वास्तूची उभारणी केली. एकाच दिवसाला चारचार नाटकांचे नेपथ्य करतात येईल अशी व्यवस्था केली. पावसाळ्यात नाटकाचा हंगाम कमी असतो. शिवाय पावसाळा संपतो न संपतो तोच गणेश चतुर्थी येते. म्हणून गणेश मूर्ती तयार करण्यास सुरुवात केली आणि माझ्यातील चित्रकाराचा वेग वाढवला. नाटकाच्या हंगामात नेपथ्यासाठी लागणारे सामान रंगवणे आणि चतुर्थीच्या काळात मातीच्या गणेश मूर्ती करून रंगवणे असा व्यवसाय सुरू केला. आमच्या तरुणपणात आमचा हा व्यवसाय जोमाने चालत होता. परंतु हल्लीच्या काळात मनोरंजनाची माध्यमे वाढल्याने गावागावांत होणार्‍या हौशी नाटकांचे प्रमाण कमी होत गेले आहे. तसेच आता भरमसाठ पैसे देऊन एखाद्या नाटकासाठी नेपथ्य लावायला एखाद्या व्यक्तीला बोलावल्यासही ती व्यक्ती तयार होत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. नाटक ही गोमंतकातील कला असून ती आबादीत राखणे किंवा तिचे जतन करण्यासाठी तरुणांनी पुढे यावे असे आवाहन त्यांनी केले असून आमचा हा व्यवसाय माझ्या मुलाने पुढे चालवावा अशी इच्छा त्यांनी प्रकट केली.
गणपत चणेकर हे खरोखरच नजरेआड असलेले गुणी कलाकार असून कलेची साधना करणार्‍या त्यांच्या या व्यवसायाची अधिकाधिक भरभराट होवो हीच ईश्‍वरचरणी प्रार्थना.