Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 18 October, 2008

ऍड. आयरिश हल्ला प्रकरण आता डॉक्टरांना हाताशी धरून हस्तक्षेपाचा प्रयत्न

पणजी, दि. १७ (प्रतिनिधी): ऍड. आयरिश रॉड्रीगीस आणि प्रा. प्रजल साखरदांडे यांच्यावर प्राणघातक हल्ला आणि जर्मन अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणात पोलिस कोणत्याही राजकीय दबावाला दाद देत नसल्याने आता डॉक्टरांमार्फत त्यात हस्तक्षेप करण्याचे जोरदार प्रयत्न काही नेत्यांनी सुरू केले आहेत. तथापि, त्यामुळे राज्यभरात त्यावरून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
एका तरुण मंत्र्याच्या आदेशावरूनच ऍड. रॉड्रिगीस व साखरदांडे यांच्या हल्ला प्रकरणात अटक करण्यात आलेल्या संशयितांना काल नियमित वैद्यकीय चाचणीसाठी घेऊन गेले असता, तिघांनाही "गोमेकॉ'त दाखल करून घेण्यात आले. या तिघांच्या छातीत एकाच वेळी कसे दुखायला लागले, असा प्रश्न सध्या समस्त गोवेकराना पडलेला असतानाच या संशयितांना कोणतेही कारण न देता इस्पितळात दाखल करून घेण्यात आल्याने त्याची गंभीर दखल पोलिस खात्याने घेतली आहे. आज सायंकाळी या तिघांना एका राजकारण्याच्या हस्तक्षेपाने इस्पितळात दाखल करण्यात आल्याचा सुगावा लागल्याने पोलिसांनी "गोमेकॉ'तील डॉक्टरांकडून संपूर्ण वैद्यकीय चाचणीचा अहवाल मागितला आहे. त्याचप्रमाणे हा अहवाल डॉक्टरांच्या समितीने सादर करवा, अशीही पोलिसांची मागणी आहे.
आरोपींना अभय देण्यासाठी तपास यंत्रणेविरोधात जाऊन गोव्यात गुंडगिरी माजवणाऱ्यांना संरक्षण देण्याचे काम राजकारणी करत असल्याने आज अनेक सामाजिक संघटनांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

पाच हल्लेखोरांना महाबळेश्वरात अटक, गोवा पोलिसांच्या विशेष पथकाची कारवाई, दोघे बिगर गोमंतकीय

पणजी, दि. १७ (प्रतिनिधी): ऍड. आयरिश रॉड्रिगीस व प्रा. प्रजल साखरदांडे यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ला प्रकरणी गोवा पोलिसांच्या एका विशेष पथकाने महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथे ६.३० वाजता "हॉटेल नेल्स'वर छापा टाकून पाच हल्लेखोरांना अटक केली. जेनिटो व्हिन्सेन कुतिन्हो (१८), संदेश चक्रवर्ती शिंदे (१८), मायकेल जॉन्सन चकल (२३), संदीप कृष्णा पुजारी (१८) एनिसन व्हिक्टर नुनीस (२३) अशी अटक कलेल्यांची नावे आहे. म्हाबळेश्वर येथील पोलिस स्थानकाचे निरीक्षक सचिन सावंत यांच्या मदतीने पणजी पोलिसांन ही कारवाई करून या टोळीला अटक केली. या टोळीला सुपारी देण्यात आली होती, अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे. परंतु, ती कोणी दिली होती, त्याचे नाव अद्याप पोलिसांनी उघड केलेले नाही. अटक करण्यात आलेल्यांपैकी दोघे बिगर गोमंतकीय असल्याचे समजते.
हल्ल्यात वापरण्यात आलेल्या हत्यारांसह एक वाहनही पोलिसांनी जप्त केल्याने आता या प्रकरणाला वेगळे वळण प्राप्त झाले आहे. दरम्यान, अटक केलेल्या संशयितांबद्दल पोलिसांनी अत्यंत गुप्तता बाळगली असून हे संशयित कुठले आहेत व त्यांना कुठे ठेवण्यात आले आहे, याबाबत माहिती देण्यास पोलिसांनी स्पष्ट नकार दिला. आज पहाटे महाबळेश्वर येथे हा छापा टाकण्यात आला.
या टोळीला पकडल्यानंतर पोलिसांनी कमालीची गुप्तता पाळली होती. कोणताही सुगावा पत्रकारांना लागू न देता, गोव्यात घेऊन आल्यावर या पाचही संशयितांना एका अज्ञात स्थळी चौकशीला घेऊन जाण्यात आले. यावेळी या टोळीला अटक करण्यासाठी गेलेल्या प्रत्येक पोलिस अधिकाऱ्यांचे तसेच पोलिस शिपायांचे मोबाईल बंद ठेवण्यात आले होते.
१३ ऑक्टोबर रोजी रात्री सुमारे १०.३० वाजता अशोक बार अँड रेस्टॉरंटमधे बुरखाधारी सहा व्यक्तींनी धारदार शस्त्रांनी ऍड. रॉड्रिगीस व श्री. साखरदांडे यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. त्यानंतर एका वाहनातून हे हल्लेखोर गोव्याबाहेर पळून जाण्यात यशस्वी ठरले होते. त्यानंतर पोलिसांनी पहाटे छापे टाकून तिघा संशयितांना अटक केली होती. या तिघांनी या टोळीला मदत केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
दरम्यान,आयरिशवरील हल्ला कोणाच्या सांगण्यावरून करण्यात आला होता याची पोलिस कसून चौकशी करीत असून, या प्रकरणी अन्य काहींनाही अटक होण्याची शक्यता आहे. दरम्यान हल्लेखोरांना सुपारी नेमकी कोणी दिली यावरून आज राजधानी पणजीत उलटसुलट चर्चा सुरू होती.
-------------------------------------------------
संशयिक हल्लेखोर वऱ्हाडात सामील
महाबळेश्वर येथे छापा टाकण्यात आलेले हॉटेल म्हापसा येथील मारीया डिसोझा यांच्या मालकीचे आहे असे समजते. १५ ऑक्टोबर रोजी ही पाच जणांची टोळी या हॉटेलात आली होती. त्यातील एकाचा मोबाईल क्रमांक पणजी पोलिसांच्या हाती लागला होता. त्यानंतर सदर मोबाईलधारक या हॉटेलात उतरल्याची खात्री झाल्यानंतर महाबळेश्वर पोलिसांच्या मदतीने पणजी पोलिस स्थानकाचे निरीक्षक फ्रान्सिस कॉर्त व त्यांच्या पथकाने हा छापा टाकला. या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, ताब्यात घेण्यात आलेले पाचही तरुण हल्ला केल्यानंतर लग्नाच्या एका वऱ्हाडाबरोबर महाबळेश्वरला गेले होते. वऱ्हाडी मंडळी तीन वाहनांतून म्हणजेच एक स्विफ्ट, एक आयनोव्हा व टाटा इंडिगो या गाड्यांतून महाबळेश्वरला गेले होते. १४ पुरूष, तीन महिला व एक लहान मूल अशी त्यांची संख्या होती. लग्न समारंभ १६ रोजी महाबळेश्वर येथील होली क्रॉस चर्चमध्ये सकाळी १० वाजता होता. ही मंडळी १५ रोजी तेथे पोचली. पणजी पोलिसांना त्यांच्या महाबळेश्वरच्या वास्तव्याची माहिती मिळताच निरीक्षक कॉर्त व दोन अन्य अधिकारी आपल्या पथकासह तेथे दाखल झाले आणि पहाटेच त्यांनी छापा टाकून ही कारवाई केली. लग्न झालेल्या जोडपे सांताक्रूझ व मेरशी येथील राहणारे असून हॉटेल बुकिंग केलेली व्यक्ती सांताक्रूझची आहे.

श्रेष्ठी रवींच्या पाठीशी बाबूश समर्थकांना हादरा

पणजी, दि.१७ (प्रतिनिधी): शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात यांचा मुलगा रोहित याच्यावर जर्मन अल्पवयीन मुलीच्या बलात्कारप्रकरणी कोणतीही कारवाई करू नये यासाठी सरकारमधील एका गटाने सुरू केल्या दबावतंत्रास बळी न पडण्याची भूमिका शासकीय पातळीवर घेण्यात आल्याने या गटाची सध्या जोरदार पीछेहाट झाली असल्याचे कळते. मोन्सेरात यांना लक्ष्य केल्यास सरकारला धडा शिकवण्याची धमकी देऊन गेल्या दोन दिवसांपासून गटबाजी केलेल्या काहींना आज खुद्द कॉंग्रेसचे केंद्रीय निरीक्षक बी. के. हरिप्रसाद यांनी फटकारले असून पोलिसांच्या कामात कोणताही हस्तक्षेप केल्यास ते सहन केले जाणार नाही, असे त्यांनी या गटाला बजावल्याचे समजते. दरम्यान, आज दुपारी पत्रकारांशी बोलताना, मोन्सेरात प्रकरणी सर्वकाही कायद्यानुसारच होईल आणि त्यात कोणाचाही हस्तक्षेप सहन केला जाणार नाही असे श्री. हरिप्रसाद यांनी सांगितले. त्यांची ही निग्रही भूमिका म्हणजे मोन्सेरात गटाला जोरदार चपराक असून पोलिस कारवाईला हिरवा कंदील असल्याचे समजले जाते. दरम्यान, मोन्सेरात समर्थक दबाव गटाच्या कोणत्याही दडपणाला बळी न पडण्याचा निर्णय पक्षपातळीवर झाला असून मोन्सेरात व रवी नाईक यांच्यातील संघर्षात पक्ष व मुख्यमंत्री यांनी रवींना झुकते माप दिल्याचे चित्र सध्या दिसते.
विद्यमान कॉंग्रेस आघाडी सरकारात निर्माण झालेल्या नव्या राजकीय वादावर तोडगा काढण्यासाठी गोव्यात दाखल झालेल्या बी.के.हरिप्रसाद यांनी आज मुख्यमंत्री कामत यांच्या आल्तिनो येथील सरकारी निवासस्थानी बाबूश व गृहमंत्री रवी नाईक यांची भेट घेतली. विद्यमान सरकारातील शिक्षणमंत्र्यांच्या मुलाविरोधात अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचे प्रकरण सध्या सर्वत्र बरेच गाजत असल्याने त्यामुळे कॉंग्रेसच्या प्रतिमेला जबर हादरा बसला आहे. या प्रकरणामुळे गोव्याचीही बदनामी सुरू झाल्याने दिल्लीत श्रेष्ठींनी याची गंभीर दखल घेतल्याचे ते म्हणाले. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी,या मताशी पक्ष ठाम असल्याचे हरिप्रसाद यांनी पत्रकारांना सांगितले. या प्रकरणी जर कोणी निर्दोष असेल तर त्याने घाबरण्याचे कारणच नाही; परंतु गुन्हेगार निर्दोष सुटता कामा नये,असेही ते म्हणाले. या संपूर्ण प्रकरणात कॉंग्रेसचा अजिबात सहभाग नाही,असे स्पष्ट करत आघाडीतील एका नेत्याबाबत हा विषय असून त्याबाबत कायद्यानुसार सर्वकाही होईल,असा निःसंदिग्ध निर्वाळा त्यांनी दिला. बाबूश यांच्याबरोबर असलेल्या सत्ताधारी आघाडीतील काही नेत्यांनी रवींकडून गृहखाते काढून घ्या किंवा नेतृत्वबदलाची मागणी केलेली नाही,असा गौप्यस्फोटही हरिप्रसाद यांनी केला. या नेत्यांनी विविध वृत्तपत्र किंवा वृत्तवाहिन्यांकडे अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या असतील तर त्याचा येथे काहीही संबंध नसून निदान आपल्याकडे तरी असा कोणताही प्रस्ताव आला नाही,असे म्हणून त्यांनी बाबूश समर्थक आमदारांची दांडीच गूल केली. चर्चिल आलेमाव यांनी काल रात्री झालेल्या बैठकीवेळी बाबूशचा मुद्दा उपस्थित करून श्रेष्ठींवर काही दबाव आणण्याचा प्रयत्न चालवला असता त्यांनी निर्वाणीची तंबी दिल्याची खात्रीलायक माहिती कॉंग्रेसमधील सूत्रांकडून मिळाली आहे. चर्चिल यांनी पुन्हा एकदा पक्षाला "ब्लॅकमेल'करण्याचा प्रयत्न करू नये. त्यांच्याविरोधात सध्या सभापतीसमोर अपात्रता याचिका दाखल झाली आहेच; शिवाय त्यांचीही अनेक प्रकरण गृहखात्याकडे प्रलंबित असल्याने त्यांनी या प्रकरणावरून सरकारला कोंडीत पकडण्याच्या फंदात न पडण्याचा सल्लाच त्यांना देण्यात आल्याचेही सूत्रांनी सांगितले. मुख्यमंत्री कामत हे सक्षम असून काही अपवाद वगळता सरकार योग्य पद्धतीने चालवत असल्याचे प्रशस्तीपत्रही त्यांनी दिले.
बाबूश खवळले
मुख्यमंत्री कामत यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत सुरुवातीस गृहमंत्री रवी नाईक व नंतर बाबूश मोन्सेरात यांना बोलावण्यात आले होते. यावेळी रवी नाईक बाहेर पडल्यानंतर काही काळाने बाबूश बाहेर आले व त्यांनी आपण शिक्षण खात्याशी संबंधित चर्चा करण्यासाठी आत गेलो होतो,असे सांगून पत्रकारांना बगल देण्याचा प्रयत्न केला. पत्रकारांनी खोचक प्रश्न केले असता त्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करून आपल्याला काहीही बोलायचे नसून कृपया आपल्या तोंडून काहीही वदवून घेऊ नका,असे आर्जव त्यांनी पत्रकारांना केले. गृहमंत्र्यांबद्दल आपल्याला काहीही बोलायचे नाही,असेही ते म्हणाले.
सारेकाही कायद्यानुसारच: रवी नाईक
पोलिस खाते या संपूर्ण प्रकरणाची चौकशी कायद्याच्या चौकटीत राहून करीत आहे. त्यामुळे त्यात हस्तक्षेप करण्याची कोणतीच गरज नाही,असे स्पष्टीकरण गृहमंत्री रवी नाईक यांनी केले.आपल्या मुलाविरोधात दाखल झालेल्या तक्रारीबाबत सदर संबंधित बिगर सरकारी संस्थेवर बदनामीचा खटला दाखल करणार असल्याचे ते म्हणाले. दरम्यान,रवी नाईक अजिबात चिंतामग्न दिसत नव्हते. सुरुवातीस हरिप्रसाद यांच्याशी झालेल्या चर्चेबाबत त्यांना विचारले असता या प्रकरणी कोणतेही राजकारण किंवा हेवेदावे नसून पोलिस कायद्यानुसार चौकशी करीत असल्याचे ते म्हणाले. जर कोणी निर्दोष असेल तर त्यांनी घाबरण्याचे कारणच नाही,असा टोलाही त्यांनी हाणला.
--------------------------------------------------------------
भाजपचा कानाला खडा!
विद्यमान कॉंग्रेस आघाडी सरकारातील काही नेत्यांच्या वर्तनाचा कटू अनुभव प्राप्त झालेल्या भाजपने विद्यमान परिस्थितीत शांत राहण्याची ठाम भूमिका घेतली आहे. हा आघाडी सरकारचा अंतर्गत मामला असल्याने त्यात हस्तक्षेप करण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे भाजपने म्हटले आहे. दरम्यान,आघाडीतील बंडखोर नेत्यांशी पुन्हा एकदा संधान बांधण्याच्या मनस्थीतीत भाजप नाही. गेल्या दोन वेळच्या राजकीय नाट्यांत या नेत्यांचा चांगलाच अनुभव भाजपला आल्याने यावेळी कानाला खडा,अशीच भूमिका भाजपने घेतली आहे. भाजपच्या या भूनिकेमुळे बाबूश समर्थक गटाचे अवसान गळाले आहे. केवळ बाबूश यांना सहानुभूती दाखवण्यासाठी कालपर्यंत त्यांची तळी उचलून धरणारे नेते आता आपली कातडी वाचवण्याच्या प्रयत्नात असल्याचीही कुरबूर सत्ताधारी पक्षात सुरू आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांना वाढीव बोनस जाहीर

पणजी, दि. १७ (प्रतिनिधी): सहाव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीची बक्षिसी जाहीर झाल्यानंतर आता दिवाळीच्या बोनसची घोषणा करून सरकारने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा दिवाळीचा आनंद व्दिगुणीत केला आहे.
राज्य सरकारच्या वित्त खात्याने परवा जारी केलेल्या परिपत्रकानुसार यंदाच्या वर्षी प्रत्येक राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना वाढीव बोनस देण्याचा निर्णय घेतला आहे. यंदा राजपत्रित अधिकारी वगळता सर्व कर्मचाऱ्यांना ४४४१ रुपये बोनस मिळणार आहे. ही माहिती वित्त खात्याच्या सूत्रांनी दिली.
या प्रकरणी प्राप्त माहितीनुसार केंद्र सरकारने बोनसच्या रकमेत वाढ केल्याने प्रत्येकाच्या बोनसात सुमारे एक हजार रुपयाची वृद्धी होणार आहे. यापूर्वी कर्मचाऱ्यांना अडीच हजाराच्या आसपास ही रक्कम मिळत होती परंतु या वर्षी त्यात २००६-०७ ची थकबाकी मिळून व वाढीव बोनसचा लाभ मिळून ही रक्कम ४४४१ एवढी होणार आहे. दरम्यान,बोनसप्रकरणी केंद्र सरकारच्या नियमानुसारच राज्य सरकार निर्णय घेत असल्याने केंद्राने ही रक्कम वाढवल्याने त्यात वाढ करणे राज्य सरकारला क्रमप्राप्त ठरले आहे. या संदर्भात सर्व खाते प्रमुखांना आदेश देण्यात आले असून या बोनसमुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर सुमारे ६ कोटी रुपयांचा भार पडणार असल्याची माहिती मिळाली आहे. एरवी दिवाळीला सरकारी कर्मचाऱ्यांना केवळ बोनस देण्यात येत होता; परंतु यावेळी दिवाळी २८ ऑक्टोबर रोजी आल्याने बोनससोबत पगारही देण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

ज्येष्ठ साहित्यिक रवींद्र पिंगे यांचे निधन

मुंबई, दि. १७ : ज्येष्ठ साहित्यिक रवींद्र पिंगे यांचे आज रात्री ९ वाजता वृद्धापकाळाने येथे निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. प्रसन्न लिखाण हीच त्यांच्या लिखाणाची ओळख होती. त्यांनी ५० हून अधिक विविध विषयांवरील पुस्तके लिहिली.
त्यांनी २००७ सालच्या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या रत्नागिरी जिल्हा विभागीय संमेलनाचे अध्यक्षपद भूषवले होते. निवृत्तीअगोदर ते आकाशवाणीवर अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यापूर्वी ते मंत्रालयात सांस्कृतिक विभागात कक्षप्रमुख म्हणून काम करीत होते.
परशुरामाची सावली, प्राजक्ताची फांदी, सुखाचं फूल, आनंदाची दिशा, आनंदव्रत, दुसरी पोर्णिमा ही त्यांची काही प्रवासवर्णने. पश्चिमेचे पुत्र, पिपंळपान, हिरवीगार पानं ही पाश्चिमात्य साहित्यावरची त्यांची पुस्तके विशेष गाजले. अलिकडेच त्यांचे' सर्वोत्तम रवींद्र पिंगे ' हा लेखसंग्रह 'राजहंस' ने प्रकाशित केला.
स्व.पिंगे यांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते. कोकण साहित्यभूषण, दमाणी साहित्य पुरस्कार, मुंबई मराठी साहित्य संघ सेवा पुरस्कार, अनंत काणेकर ललित लेखन पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचे तीन ललित पुरस्कार आदी पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आले होते. गेल्याच वर्षी त्यांना चतुरंग संस्थेतर्फे त्यांची ग्रंथतुला करण्यात आली होती. एकाद्या साहित्यिकाची अशी तुला होण्याचा मान त्यांना प्रथमच लाभला होता.
पिंगे यांच्या निधनाने साहित्यवर्तुळात शोक व्यक्त होत आहे.

घुमटी तोडफोड अखेर उलगडा झाल्याचा दावा

मडगाव, दि.१७ (प्रतिनिधी): उसकीणीबांध-कुंकळ्ळी येथील श्रीदेव आजोबा घुमटीच्या तोडफोड प्रकरणाचा उलगडा झाल्याचा दावा यासंदर्भातील तपासासाठी नियुक्त केलेले गुन्हा अन्वेषण विभागाच्या खास पथकाचे उपअधीक्षक चंद्रकांत साळगावकर यांनी केला आहे. काही दिवसांपूर्वी पोलिसांनी संशयावरून अटक केलेल्या बागलकोटच्या इसमानेच मानसिक संतुलन ढळलेल्या अवस्थेत हा प्रकार केल्याच्या निष्कर्षाप्रत पोलिस आले आहेत.
गेल्या ९ रोजी हा प्रकार घडला होता व लोकांनी त्या घटनेच्या निषेधार्थ स्वयंस्फूर्तीने लोकांनी बाजार बंद ठेवल्यानंतर हे प्रकरण तपासासाठी सरकारने गुन्हा अन्वेषण विभागाकडे सोपविले होते.
या प्रकरणी दुसऱ्याच दिवशी या पथकाने कर्नाटकमधील बागलकोट येथील लिंगराज सिध्द लिंगायत याला ताब्यात घेतले होते तोडफोडीसाठी वापरलेल्या वस्तूही जप्त केल्या होत्या. तथापि, जनक्षोभ शांत करण्यासाठी पोलिस कोणाला तरी बळीचा बकरा बनवीत आहेत असा समज बळावत चालला होता.
साळगावकर म्हणाले, सिद्धव्वा हा काही दिवसांपूर्वी बाळ्ळी येथे कामाला असलेल्या नातेवाइकांकडे आला होता. तेथून तो दसऱ्याची पार्टी करण्यासाठी म्हणून कृष्णमंदिराजवळ राहणाऱ्या एका मित्राकडे गेला. तो मित्र तेथील एका ठेकेदाराकडे कामाला होता. रात्री त्यांनी पार्टी केली व भल्या सकाळी सिध्दराज तेथून निघाला. येताना त्याने लोखंडी सळी कुंकळ्ळी बाजारातून विकत घेतली. रात्रीच्या दारूचा अंमल असतानाच त्याने सकाळी पुन्हा दारू घेतली होती. त्याच नशेत येताना त्याने राखणदेव घुमटीची मोडतोड केली. तो मानसिकदृष्ट्या ठीक नसल्याचे तपासणीत आढळून आले असून बागलकोट येथील त्याच्या घरच्या मंडळीनीही त्याला दुजोरा दिला आहे.
त्याने पोलिसांकडे दिलेल्या कबुलीनुसार तोडफोड केल्यावर तो बाजारापर्यंत गेला व परत घटनास्थळी आला. त्यानेच लोकांना कोणी ते काम केले ते आपण पाहिल्याचे सांगितले होते. एक परप्रांतिय इसम इतक्या सकाळी तेथे कशासाठी गेला होता या संशयावरून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले व त्यातूनच या प्रकरणाचा उलगडा झाला आहे.

Friday 17 October, 2008

धीरयो समर्थकांकडून पोलिसांवर दगडफेक

मडगाव, दि १६ (प्रतिनिधी) - नुवे डोरोथी येथे आज दुपारी दीडच्या सुमारास आयोजित केलेली रेड्यांची "धीरयो' (झुंज) उधळून लावण्यासाठी गेलेल्या पोलिस पथकावरच लोकांकडून दगडफेक करण्यात आली व त्यात उपनिरीक्षक कपिल नायक जखमी झाले.त्यांच्या पायाला मार बसला आहे.
धीरयो आयोजित केल्या जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळताच ते तेथे कुमक घेऊन गेले होते. त्यावेळी तेथे धीरयोची जय्यत तयारी झाली होती. पोलिसांना पाहताच आयोजकांनी पळ काढला. त्यामुळे लोक संतापले व त्यांनी पोलिसांवरच दगडफेक सुरू केली. पोलिसांनी या प्रकरणी लुईस व मिलाग्रीस अशा दोघांना अटक केली असून धीरयोचे आयोजन आणि सरकारी कामात व्यत्यय आणला, असे आरोप त्यांच्यावर ठेवले आहेत. दरम्यान, उपनिरीक्षक नायक यांच्यावर उपचार करून त्यांना इस्पितळातून नंतर घरी जाऊ देण्यात आले.

गृहमंत्र्यांच्या पुत्राविरोधातही बलात्कार, खूनप्रकरणी तक्रार

शह-काटशहाच्या राजकारणाला ऊत
पणजी, दि. १६ (प्रतिनिधी) - शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात यांच्या मुलापाठोपाठ आता गृहमंत्री रवी नाईक यांच्या मुलाच्या विरोधात बलात्कार आणि खून प्रकरणी पणजी पोलिस स्थानकात तक्रार दाखल झाली आहे. मात्र अद्याप या तक्रारीची नोंद झालेली नाही. "गोवा ग्रीन फाऊंडेशन' या स्वयंसेवी संघटनेचे उपाध्यक्ष अन्वर शेख यांनी ही तक्रार आज सायंकाळी दाखल केली.
"मी गृहमंत्र्याच्या तसेच त्यांच्या सुपुत्राच्या विरोधात नसून आंतरराष्ट्रीय स्तरावर गोव्याचे आणि गृहमंत्र्याचे नाव बदनाम केले जात असून त्याचा पोलिसांनी काय तो सोक्षमोक्ष लावावा,' यासाठी ही तक्रार दाखल केली असल्याचे अन्वर शेख यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. पोलिसांनी या तक्रारीची दखल घेऊन त्वरित तपास सुरू करावा, अशी मागणी शेख यांनी केली आहे.
बाबूश मोन्सेरात यांच्या मुलाच्या विरोधात अल्पवयीन जर्मन मुलीवर बलात्कार आणि अश्लील "एसएमएस' पाठवण्याची तक्रार दाखल झाल्यानंतर राजकारणाला जोर चढला असून मंत्र्यांच्या मुलांवर तक्रारी दाखल करण्याचे सत्रच सुरू झाले आहे. त्यामुळे राजकारणी आणि पोलिस असे दोन गट आमने-सामने येण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. पोलिसांनी सध्या कडक भूमिका घेतली असून आपल्या कामात कोणत्याही राजकारण्याचा हस्तक्षेप खपवून न घेण्याचे ठरवले आहे.
एका अहवालाचा आणि लंडन येथील "डेली मेल' या वृत्तपत्रातील बातमीचा दाखला देत ब्रिटिश शाळकरी मुलीवर बलात्कार आणि त्यानंतर खून व स्टिफन बॅनीटी या पर्यटकाच्या खुनात गृहमंत्र्यांचे सुपुत्र रॉय नाईक यांचा सहभाग असल्याचा दावाही तक्रारीत केला आहे. तसेच रॉय नाईक यांना गृहमंत्री संरक्षण देत असल्याचेही म्हटले आहे. एका खाजगी गुप्तहेर यंत्रणेने रॉय याचे अशा गुन्ह्यात सहभाग असल्याचे पुरावे गोळा गेले असून त्याचे वडील गृहमंत्री असल्याने पोलिस रॉय याच्या "गॅंग'ला संरक्षण देत असल्याचाही दावा केला आहे. या खाजगी गुप्तचर यंत्रणेकडे विदेशी बॅंकेतून भारतातील एका बॅंकेत जमा झालेल्या पैशांचे पूर्ण तपशील असून या गुप्तचर यंत्रणेला धमकावण्याचे सत्र सुरू असल्याचे या तक्रारीत म्हटले आहे.
गोवा हे जगप्रसिद्ध पर्यटन स्थळ असून याठिकाणी विदेशी पर्यटक सुरक्षित नसल्याचे संकेत जागतिक पातळीवर जात आहे. त्यामुळे पोलिसांनी त्वरित या तक्रारीची दखल घेऊन तपास लावावा असे म्हटले आहे.

रोहित मोन्सेरातविरुद्ध "लूक आऊट' नोटीस

पणजी, दि. १६ (प्रतिनिधी) - जर्मन अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि अश्लील "एसएमएस' पाठवल्याच्या गुन्ह्यात संशयित आरोपी असलेला शिक्षणमंत्र्याचा पुत्र रोहित मोन्सेरात याचा शोध घेण्यासाठी आज पोलिसांनी "लुक आउट नोटीस' जारी केली. त्याचप्रमाणे पोलिसांनी सर्व विमानतळ, बंदर व देशाच्या सीमा सुरक्षा यंत्रणेला बिनतारी संदेश पाठवून कोणत्याही स्थितीत रोहितला देश सोडण्यास परवानगी देऊ नये, तसेच तो कोठेही आढळून आल्यास त्याला गोवा पोलिसांच्या स्वाधीन करावे, अशी सूचना केली आहे. ही माहिती आज उत्तर गोवा पोलिस अधीक्षक बॉस्को जॉर्ज यांनी दिली.
पोलिसांनी कोणत्याही प्रकारे मागे न हटण्याचा निर्धार केला असून या प्रकरणात पोलिस प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाकत असल्याचे स्पष्ट झाले आहे. तक्रारीची नोंद झाल्यानंतर पोलिसांनी रोहित याला अटक करण्यासाठी बाबूश मोन्सेरात यांच्या पणजीतील दोन्ही बंगल्यावर छापे टाकले. परंतु, पोलिसांच्या तो दोन्ही ठिकाणी हाती लागला नसल्याने फौजदारी गुन्हा १६० नुसार नोटीस बजावण्यात आली. पोलिस चौकशीसाठी त्वरित कळंगुट पोलिस स्थानकात हजर राहण्याचे आदेश त्याला या नोटिशीत देण्यात आले होते. तथापि, या नोटिशीला रोहितने दाद दिली नसल्याने आता पोलिसांनी त्याच्या विरोधात "लूक आउट नोटीस' जारी केली आहे. संशयित पोलिसांना शरण येत नसल्यास त्याला "फरारी' घोषित केले जाईल, असे संकेत एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिले आहेत.
बलात्कार झाल्याचे वैद्यकीय चाचणीत सिद्ध न होताच रोहित याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केल्याच्या प्रश्नावर बोलताना बॉस्को जॉर्ज म्हणाले की, "रोहितविरुद्ध पोलिसांकडे ठोस पुरावे असून त्याच्यावर गुन्हा नोंदवण्यासाठी ते पुरेसे आहेत'. त्या १४ वर्षीय मुलीला अश्लील एसएमएस येणारा मोबाईल व त्या मोबाईलमधील सीमकार्ड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच त्याची चाचणी करण्यासाठी तो मोबाईल व सीमकार्ड खास प्रयोगशाळेत पाठवण्यात आल्याची माहिती यावेळी श्री. जॉर्ज यांनी दिली. आज दुपारी पोलिसांनी पर्वरी येथे मुलीच्या आईची जबानी नोंद करून घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ती म्हणाली की, आज सकाळी "मी व माझ्या मुलीने "बेबीलोन एडी' हा चित्रपट एकत्रच पाहिला. त्यामुळे पोलिसांना जबानी देण्यासाठी पुढे येण्यासाठी ती काही प्रमाणात तयार होईल'.

अडवणींची १ रोजी पणजीत जाहीर सभा

पणजी, दि. १६ (प्रतिनिधी) -संसदेतील विरोधी पक्षनेते तथा भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदासाठीचे उमेदवार लालकृष्ण अडवाणी यांची जाहीर सभा विजय संकल्प यात्रेअंतर्गत येत्या १ नोव्हेंबर रोजी पणजीतील आझाद मैदानावर होणार आहे.
महाराष्ट्रातील वाशीम येथून श्री. अडवाणी यांनी आरंभ केलेल्या या विजय यात्रेला देशभरात जोमदार प्रतिसाद लाभत आहे. कारण सध्याच्या कॉंग्रेस सरकारकडून मोठ्या प्रमाणावर लोकांचा भ्रमनिरास झाल्याने श्री. अडवाणी काय बोलणार याकडे गोवेकरांचे लक्ष लागले आहे. ही सभा यशस्वी करण्याचा ठाम निर्धार भाजप कार्यकर्त्यांनी केला असून त्यादृष्टीने पूर्वआखणी सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज येथील भाजप कार्यालयात पक्षाचे ज्येष्ठ उपाध्यक्ष नरहर हळदणकर यांच्या अध्यक्षतेखाली खास बैठक पार पडली. बैठकीला विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर, संघटनमंत्री अविनाश कोळी, प्रदेश सरचिटणीस प्रा. सुभाष साळकर, प्रा. गोविंद पर्वतकर यांनी मार्गदर्शन केले. मंडल स्तरावर बैठका आयोजित करून मोठ्या संख्येने कार्यकर्ते व हितचिंतक श्री. अडवणी यांच्या सभेला येतील, अशी व्यवस्था करण्याचे यावेळी निश्चित झाले.

बाबूशना लक्ष्य केल्यास गंभीर परिणाम - चर्चिल

रवींकडून गृहमंत्रिपद काढा; किंवा नेतृत्वबदल करा
पणजी, दि.१७ (प्रतिनिधी) -शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात यांचा पुत्र रोहित मोन्सेरात याच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या बलात्कारप्रकरणी कारवाई करण्यावरून सध्या सरकार डळमळीत बनले आहे. राज्यातील कायदा सुव्यवस्था रवी नाईक यांच्या नियंत्रणाबाहेर गेल्याने एकतर त्यांचे गृहमंत्रिपद काढा; अन्यथा नेतृत्व बदला, असे स्पष्ट संकेत बाबूश यांच्या पाठीशी उभ्या ठाकलेल्या असलेल्या गटाने श्रेष्ठींना दिल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे. तसेच बाबूश यांची सतावणूक अशीच सुरू राहिली तर त्याचे गंभीर परिणाम सध्याचे सरकार व पोलिसांना भोगावे लागतील, असा निर्वाणीचा इशारा सार्वजनिक बांधकाम मंत्री चर्चिल आलेमाव यांनी दिला आहे.
दरम्यान,याप्रकरणी बाबुश मोन्सेरात यांनी गृहमंत्री रवी नाईक यांच्यावर ठपका ठेवला असता आज संध्याकाळी पणजी पोलिस स्थानकावर रवी नाईक यांचे पुत्र रॉय नाईक याच्याविरोधात एका विदेशी अल्पवयीन मुलीवर बलात्कार व खून केल्याप्रकरणी पणजी पोलिस स्थानकांत एका संघटनेतर्फे तक्रार दाखल करण्यात आल्याने या प्रकरणाला वेगळेच स्वरूप प्राप्त झाले आहे. या विषयावरून सध्या आघाडीअंतर्गतच परस्परांवर शिंतोडे उडवण्याचे प्रकार सुरू झाल्याने या वादावर तोडगा निघणे कठीण बनण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
एका जर्मन अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप ठेवून पोलिसांनी रोहित मोन्सेरात याच्याविरोधात नोंद केलेली तक्रार ही पूर्णपणे चुकीच्या पद्धतीने हाताळली जात असल्याचा आरोप सार्वजनिक बांधकाममंत्री चर्चिल आलेमाव यांनी केला. सदर मुलीची आरोग्य तपासणी न करताच रोहित याच्यावर बलात्काराचा आरोप दाखल करून पोलिस बाबूश यांना राजकीय लक्ष्य बनवण्याचे प्रयत्न करीत असून हा प्रकार अजिबात सहन केला जाणार नाही,असा इशाराही त्यांनी दिला. गेले तीन दिवस बाबूश मोन्सेरात यांच्या ताळगाव येथील निवासस्थानी ठाण मांडून बसलेल्या चर्चिल यांनी आज पत्रकारांशी बोलताना हे विधान केले. केवळ राजकीय बळी म्हणून बाबूश यांची सतावणूक होत आहे व त्याचे गंभीर परिणाम सरकार व पोलिस खात्याला भोगावे लागणार असा इशाराही यावेळी देण्यात आला. दरम्यान,याप्रकरणी गृहमंत्री रवी नाईक यांचा हात असून मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना माहीत असूनही ते केवळ मौन बाळगून असल्याची टीका होत आहे. दरम्यान, काल रात्री उशिरा झालेल्या या गटाच्या बैठकीत श्रेष्ठींकडे नेतृत्व बदलाची मागणी करण्याचे ठरवण्यात आल्याची माहिती हाती आली आहे. या बैठकीला चर्चिल आलेमाव,आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स, महसूलमंत्री जुझे फिलिप डिसोझा, आमदार चंद्रकांत कवळेकर,आमदार आग्नेल फर्नांडिस व बाबू आजगावकर आदी उपस्थित होते,अशी माहिती मिळाली आहे. गेले तीन दिवस चर्चिल,जुझे फिलिप,रेजिनाल्ड आदी बाबूश यांच्याबरोबरच आहेत. त्यात ऍड.राधाराव ग्रासियसही त्यांच्या निवासस्थानी असल्याचेही कळते. पक्षाचे केंद्रीय निरीक्षक बी. के. हरिप्रसाद यांना तात्काळ गोव्यात पाठवण्यात आले असून त्यांनी या नेत्यांशी चर्चा करून या विषयावर तोडगा काढण्यासाठी निकराचे प्रयत्न सुरू केले आहेत. रवी नाईक यांच्याकडून गृहखाते काढून घेण्याच्या मागणीला प्राधान्य देण्यात आले असून अन्यथा नेतृत्व बदल करा,अशी मागणी करण्यात आल्याचेही सूत्रांनी सांगितले. तसेच सभापती प्रतापसिंग राणे यांनी नेतृत्व स्वीकारण्यास नकार दिल्याने दिगंबराकडील नेतृत्व देण्यासारखी एकही व्यक्ती दृष्टिपथात नसल्याने श्रेष्ठींसमोरही पेच निर्माण झाला आहे.
चर्चिल यांना यासंबंधी विचारले असता त्यांनी दिगंबर कामत यांना पाठिंबा देणारा सुमारे १३ आमदारांचा गट बाबूश यांच्या पाठींशी असल्याचेही ते म्हणाले. एकीकडे सदर मुलगी वैद्यकीय चाचणीस राजी नसताना पोलिसांकडून तिची समजूत काढण्याचा होत असलेल्या प्रयत्नाचा अर्थ काय,असे चर्चिल म्हणाले. रोहित खरोखरच दोषी असल्यास त्याच्यावर कारवाई जरूर करावी; परंतु बनावट पद्धतीने तक्रार नोंद करून त्याला फसवण्याचा जो प्रयत्न सुरू आहे त्यावरून बाबूश यांना राजकीय लक्ष्य बनवले जात असल्याचे स्पष्ट होते,असेही चर्चिल यांनी सांगितले.
कायद्यापुढे सगळे समानः रवी नाईक
कायद्यापेक्षा कोणीही श्रेष्ठ नसून सगळ्यांना समान न्याय मिळेल,असे सांगून पोलिस करीत असलेली कारवाई कायद्यानुरुपच असल्याची ठाम भूमिका गृहमंत्री रवी नाईक यांनी व्यक्त केली. आपण पोलिसांना कोणतेही आदेश दिले नसून ते आपल्या कायद्याप्रमाणे काम करीत असल्याचे ते म्हणाले. बाबुश यांच्यावर आपण वैयक्तिक सूड घेत असल्याचा आरोप निराधार असल्याचेही ते म्हणाले. जर खरोखरच एखाद्याने गुन्हा केला असेल तर त्याला सजा होणे गरजेचे आहे; परंतु त्याचबरोबर निर्दोष व्यक्तीवर अन्याय होणार नाही याचीही काळजी घ्यावी लागेल,असे सांगून या प्रकरणाच्या चौकशीसाठी पोलिसांना पूर्णपणे मोकळीक दिल्याचेही ते म्हणाले.
...आणि चर्चिल यांना पोलिसांनीच खडसावले!
रोहित मोन्सेरात प्रकरणी जेव्हा तक्रार नोंद झाली तेव्हा गृहमंत्री रवी नाईक यांना विचारले असता त्यांनी आपल्या नेहमीच्या सवयीप्रमाणे आपल्याला या प्रकरणी काहीही माहित नसल्याची भूमिका घेतल्याचे चर्चिल म्हणाले. यावेळी त्यांनी उत्तर गोव्याचे अधीक्षक बॉस्को जॉर्ज यांना पाचारण केले. रोहितविरोधात तक्रार नोंद कशी काय केली, असे विचारले असता त्यांनीही कानावर हात ठेवले. नंतर पोलिस महानिरीक्षक व महासंचालक यांच्याकडे विचारले असता व त्यांना कोणत्या कायद्याने तक्रार नोंद केल्याचे विचारताच त्यांनी चक्क आपल्याला खडसावले,असे चर्चिल म्हणाले.पोलिसांना आदेश देणारे तुम्ही मुख्यमंत्री की गृहमंत्री आहात असाही जाब विचारल्याचे ते म्हणाले. या प्रकारानंतर आपण मुख्यमंत्री व गृहमंत्री यांच्याकडे त्यांचे पोलिसांवर कोणतेही नियंत्रण नसल्याची तक्रार केल्याचे ते म्हणाले.

बस्स झाले, आता राष्ट्रपती राजवट लावा

पणजीतील निषेध सभेत विविध संघटनांची जोरदार मागणी
बाबूशना मंत्रिमंडळातून
ताबडतोब डच्चू द्या
कारवाई न झाल्यास आंदोलन
गावागावांत नेण्याचा इशारा

पणजी, दि. १७ (प्रतिनिधी) - विद्यमान कॉंग्रेस आघाडी सरकारचा प्रशासनावरील ताबा पूर्णपणे सुटला आहे. हा कारभार असाच चालणार असेल तर हे सरकार ताबडतोब बरखास्त करा व राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा,असा गर्भित इशारा आज आझाद मैदानावरील जाहीर सभेत अनेक वक्त्यांनी दिला. समाज कार्यकर्ते ऍड. आयरिश रॉड्रिगीस व प्रजल साखरदांडे यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचा निषेध शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात यांना तात्काळ मंत्रिमंडळातून डच्चू द्या व या याप्रकरणाची न्यायालयीन चौकशी करून गुन्हेगारांना ताब्यात घ्या, अन्यथा हे आंदोलन गोव्यातील प्रत्येक गावागावात पेटवले जाईल,अशी तंबीही यावेळी सरकारला देण्यात आली.
आज संध्याकाळी ५ वाजता पणजी येथील आझाद मैदानावर ऍड.रॉड्रिगीस व प्रजल साखरदांडे यांच्यावरील हल्ल्याचा निषेध करण्यासाठी एका जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते.ही सभा नागरिकांतर्फे आयोजित करून यावेळी व्यासपीठावरून कोणालाही बोलण्याची संधी देण्यात आली होती. विद्यमान कॉंग्रेस आघाडी सरकारचा बेजबाबदारपणा,कायदा सुव्यवस्थेची दयनीय अवस्था,वाढता भ्रष्टाचार,लोकांचा विरोध डावलून बिल्डरांचे लांगूलचालन, आंदोलकांचा आवाज बंद करण्यासाठी गुंडगिरीचा वापर व मुख्यमंत्री दिगंबर कामत यांचे मंत्रिमंडळ तथा सरकारवरील कसलेच नियंत्रण नसल्याचा सूर अनेक वक्त्यांनी लावला.
गोवा बचाव अभियानाचे निमंत्रक डॉ.ऑस्कर रिबेलो,गोवा पीपल्स फोरमचे ऍड.सतीश सोनक व पर्यावरणवादी पॅट्रिशिया पिंटो आदी व्यासपीठावर उपस्थित होते."हम होंगे कामयाब' व "सत्यमेव जयते'या घोषवाक्यांनी या सभेची सुरुवात झाली. अन्यायाविरोधात व सरकारच्या एखाद्या चुकीबाबत उघडपणे बोलण्याचा अधिकार प्रत्येक नागरिकाला आहे, तो दडपून टाकण्याचे प्रयत्न झाल्यास या राज्यात कायद्याला काहीही महत्त्व नसल्याचेच स्पष्ट होते.यावेळी ऍड.रॉड्रिगीस यांच्यावर उपचार करताना रक्ताच्या थारोळ्यात सापडलेल्या आयरिश यांनी "नुसती बोटेच नव्हे तर जीभ व शरीराचा प्रत्येक भाग जरी छाटलात तरी अन्यायाविरोधात लढण्याचा जोश मात्र मोडून काढणे शक्य होणार नाही',अशा शब्दात एका व्यक्तीबरोबर बोलताना फोनवर या हल्ल्याचे प्रत्युत्तर दिल्याचे डॉ. रिबेलो म्हणाले. जोपर्यंत या हल्ल्यामागील सूत्रधारांना पकडले जात नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवण्याचा ठाम निर्धार करण्यात आला.
राज्यात निवडून आलेल्या प्रतिनिधींवरून गोव्यातील जनतेची मनोवृत्ती प्रदर्शित होते. भ्रष्टाचारी व स्वार्थी नेत्यांना निवडून देणारी जनता किती प्रामाणिक आहे,याचाही विचार होण्याची गरज असल्याचे मत प्रसिद्ध चित्रकार सुबोध केरकर यांनी व्यक्त केले.महात्मा गांधींनी स्थापन केलेली कॉंगेस एवढ्या खालच्या थराला पोहचल्याने यापुढे डोळे बंद केलेल्या गांधीजींचा फोटो सर्वत्र लावा,असे उपहासात्मक आवाहनही त्यांनी केले.
माजी मंत्री माथानी साल्ढाणा यांनीही सत्यासाठी प्रसंगी मरणाची तयारी ठेवण्याचे आवाहन केले. प्रत्येक राजकीय नेत्याला "चोर' संबोधणे योग्य नाही असे सांगून मुळात पैशांसाठी व स्वार्थासाठी आपले मत विकून निवडून दिलेल्या नेत्यांकडून कसली अपेक्षा ठेवायची,असेही त्यांनी यावेळी सांगितले. माजी मुख्यमंत्री शशिकलाताई काकोडकर यांनीही सरकारच्या पद्धतीबाबत तीव्र नापसंती व्यक्त केली.सध्या राजकारणात जे सुरू आहे ते पाहता आपण चार हात दूरच राहिल्याचे त्या म्हणाल्या. अन्यायाविरोधात व अत्याचाराविरोधात जनता निडरपणे उभी राहत असल्याचे कौतुक करून आपला या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा असेल,असेही त्या म्हणाल्या. गोवा मुक्तीनंतर आता अशा स्वार्थी,भ्रष्ट व गुन्हेगारी कृत्यात गुंतलेल्या नेत्यांपासून राज्य मुक्त करण्यासाठी दुसरा लढा उभारण्याची वेळ आल्याचे ज्येष्ठ स्वातंत्रसैनिक नागेश करमली यांनी सांगितले.सत्यासाठी लढणारा वकील व केवळ अध्यापन न करता चांगल्याची शिकवण देणारा शिक्षक यांच्यावर होणारा हल्ला ही खरोखरच निंदनीय अशीच गोष्ट असून अखिल भारतीय विद्यार्थी संघटनेचे युवक या आंदोलनात सक्रिय भाग घेतील,असे प्रा.दत्ता नाईक म्हणाले.यापूर्वी इंदिरा गांधी यांनी देशावर आणीबाणी लादून लोकशाहीचा गळा घोटला आता त्याच कॉंग्रेसकडून लोकशाहीनुसार बहाल करण्यात आलेला लोकांचा आवाज मिटवण्याचे प्रयत्न सुरू असल्याची टीका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गोवा प्रभारी प्रा.सुभाष वेलिंगकर यांनी केली. यावेळी अनेक वक्त्यांनी व्यासपीठावर उभे राहून सरकाराविरोधातील आपल्या मनातील असंतोषाला वाचा फोडली. यावेळी बोलणाऱ्यांत "ऊठ गोंयकारा'चे निमंत्रक अमोल नावेलकर,जीवन मयेकर,अरविंद भाटीकर,सोयरू वर्दे,शांती आल्मेदा,पत्रकार संदेश प्रभुदेसाई,एकनाथ केरकर,कामगार नेते ख्रिस्तोफर फोन्सेका,आवडा व्हिएगश,सेझ विरोधी मंचचे चार्ल्स फर्नांडिस,डॉ. ब्रॅडा मिनेझिस,मेलिसा सिमोएश,अभिजीत नाईक,सॅबी रॉड्रिगीस,सागर नाईक,भाजप विद्यार्थी मंचचे अध्यक्ष आत्माराम बर्वे,ऍड.प्रसाद शहापूरकर,प्रशांत नाईक,मोहनदास लोलयेकर,श्रीधर कामत,प्रा.रघुविर वेर्णेकर,डॉ.प्रमोद साळगावकर,अनंत अग्नी आदींची भाषणे झाली. यावेळी आझाद मैदानावर मेणबत्त्या पेटवून अन्यायाविरोधाची ही ज्योत आता प्रत्येकाने आपल्या मनात लावावी आणि तिचे वणव्यात रूपांतर करून अशा दृष्ट प्रवृत्तींचा नाश करण्याची ताकद नागरिकांत निर्माण होण्यासाठी प्रार्थना केली.
अंतर्गत मतभेद विसरा - पर्रीकर
गोव्याच्या हितासाठी जर खरोखरच आंदोलन उभे राहायला हवे तर प्रत्यक्षात प्रत्येकाने आपले वैयक्तिक मतभेद दूर ठेवण्याची गरज असल्याचे विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी सांगितले. या व्यासपीठावरून अनेक वक्त्यांनी वेगवेगळे सूर व्यक्त केला. हे सूर जेव्हा एकत्र होतील तेव्हाच खऱ्या अर्थाने आंदोलन उभे राहील,असेही त्यांनी स्पष्ट केले. अराजकीय आंदोलन म्हणून पळवाट शोधून काढण्यापेक्षा चांगल्या लोकांना निवडून देण्यासाठी जनतेने प्रयत्न करावे. विद्यमान कॉंग्रेस सरकारच्या ढिसाळ कारभाराविरोधात भाजप वारंवार आवाज उठवत असल्याचे ते म्हणाले. केवळ काही लोकांना भाजपची कावीळ असल्याने अशा लोकांकडून बुद्धिभेद निर्माण केला जातो. भाजप सध्याच्या सरकाराविरोधात आंदोलन छेडणार आहेच; परंतु एक निश्चित समिती नेमून जर नागरिकांना व्यापक आंदोलन छेडायचे असेल तर त्यास भाजपचा पूर्ण पाठिंबा असेल,असेही त्यांनी जाहीर केले.
दरम्यान, या सभेवेळी मोहनदास लोलयेकर यांनी सभेसाठी एकही आमदार हजर नसल्याचा निषेध करून हल्ला पणजीत झाल्याने पणजीचे आमदार या नात्याने पर्रीकर उपस्थित हवे होते,असे वक्तव्य केले होते. यावेळी लगेच पर्रीकर प्रकटले.आपण सभेच्या मागे उभे राहून पणजीचा आमदार या नात्याने सर्वांची भाषणे ऐकत होतो,असे ते म्हणाले. दरम्यान,पर्रीकर याठिकाणी उपस्थित राहताच काही भाजपविरोधी आयोजकांनी आक्षेप घेतला व एक नागरिक म्हणून त्यांना बोलण्याची परवानगी द्यावी,अशी अट घालण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आपण एक नागरिक म्हणूनच बोलत आहोत. भाजपचा नेता आणि विरोधी पक्षनेता ही आपली ओळख असून ती अजिबात लपवता येणार नाही,असेही त्यांनी निक्षून सांगितले.

Thursday 16 October, 2008

कर नाही तर डर कशाला? लपून फिरू नकोस, चौकशीस सामोरा जा रोहित मोन्सेरात याला पोलिसांचा इशारा

पणजी, दि. १५ (प्रतिनिधी): अल्पवयीन मुलीवरील बलात्कार व अश्लील एसएमएस प्रकरणी शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात यांचा पुत्र रोहित जर खरोखरच निरपराध असेल तर त्याने लपून न फिरता थेट पोलिस चौकशीला सामोरे जावे, असा इशारा आज उत्तर गोवा पोलिस अधीक्षक बॉस्को जॉर्ज यांनी दिला. सदर पीडित मुलीचे मन वैद्यकीय चाचणीसाठी वळवण्याकरता स्वयंसेवी संघटना, मनोविकारतज्ज्ञ व महिला पोलिस अधिकारी प्रयत्नशील असल्याचे पोलिस महासंचालक किशन कुमार यांनी सांगितले. त्या मुलीची आई पोलिस तपासाला पूर्ण सहकार्य करत असल्याचेही ते म्हणाले.
आपला पुत्र निर्दोष आहे असे बाबूश यांना वाटत असेल तर त्यांनी त्याला पोलिस चौकशीसाठी घेऊन यावे, असे आवाहन बॉस्को यांनी केले. ते आज पोलिस मुख्यालयात पत्रकारांशी बोलत होते. आजही या प्रकरणातील संशयित आरोपी रोहित मोन्सेरात याचा शोध घेण्यात आला. काल दुपारी मंत्री मोन्सेरात यांच्या दोन्ही बंगल्यावर छापे टाकल्यानंतरही रोहित पोलिसांच्या हाती लागला नव्हता. "तो राज्याच्या बाहेर गेल्यास कोणतीही हरकत नाही', मात्र त्याने देश सोडण्याचा प्रयत्न केल्यास त्याला कडक कारवाईस सामेरे जावे लागेल', असे ते यावेळी म्हणाले.
काल रात्री श्री. मोन्सेरात यांनी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांची भेट घेऊन आपला मुलगा निर्दोष असल्याचे सांगितले होते. तसेच पोलिस आपल्याविरोधात गुन्हे दाखल करून वचपा काढण्याचा प्रयत्न करत असल्याचाही आरोप केला होता. आज दिवसभर रोहितबाबत पणजी व पोलिस मुख्यालयात अफवांना ऊत आला होता. दुपारी रोहित आपल्या वकिलासह कळंगुट पोलिस स्थानकात शरण येणार असल्याची वावटळ उठवण्यात आली. मात्र उशिरापर्यंत तो पोलिसांना शरण आला नव्हता.
"आम्ही त्याला पुरेसा वेळ दिलेला आहे. कायद्यानुसार फौजदारी कलम १६० नुसार नोटीसही बजावली आहे. त्याला अजूनही संधी देण्यात आली आहे. मात्र
त्यानंतर संशयितांना कसे ताब्यात घेतले जाते हे आम्हाला माहीत आहे,' असे आज एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचे सांगितले. त्यामुळे रोहित याला कोणत्याही क्षणी तो असेल तेथून ताब्यात घेतले जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
काल बाबूश मोन्सेरात यांनी मुख्यमंत्री कामत यांची भेट घेतल्यानंतर श्री. कामत यांनी याविषयाची स्वतंत्र चौकशी होण्याची शक्यता व्यक्त केली होती. तथापि, तसे झाल्यास हा चुकीचा पायंडा ठरणार असून तसे करता येणार नसल्याचे वरिष्ठ पोलिस सूत्रांनी त्यांच्या निदर्शनाला आणून दिले.

राजकीय दबाव झुगारण्यासाठी आता पोलिसांनी कसली कंबर

पणजी, दि. १५ (प्रतिनिधी) : राज्याचे शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात यांचे पुत्र रोहित याच्याविरूध्द एका जर्मन अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ तसेच बलाकार केल्याचा गुन्हा दाखल झाल्यानंतर प्रत्यक्ष कारवाईप्रसंगी येणारा राजकीय दबाव झुगारून कायद्याचा बडगा उचलण्याचा निर्णय पोलिसांनी घेतल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
एखाद्या सामान्याविरूध्द असा गुन्हा दाखल होतो तेव्हा त्याच्यावर तात्काळ कायद्याचा आसूड उचलतो परंतु, बड्या धेडांच्या बाबतीत मात्र वेगळा न्याय लावला जातो हे योग्य नसून पोलिस खाते मात्र यात नाहक बदनाम होते, असा सूर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांमध्ये सध्या व्यक्त होत आहे. यातून पोलिस खात्यामध्ये चांगलीच अस्वस्थता निर्माण झाली असून कोणाच्याही दडपणाखाली कारवाई थांबवायची नाही असा निर्णय वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतला असल्याचे समजते.
गोव्यात बाल लैंगिक अत्याचार कायदा अत्यंत कडक आहे. या कायद्यांतर्गत एखाद्या व्यक्तिविरूध्द गुन्हा नोंदविला गेला की सर्वप्रथम त्याला तात्काळ अटक करण्याची तरतूद आहे. मात्र रोहित मोन्सेरातच्या बाबतीत सध्या पोलिस प्रचंड दबावाखाली वावरत असल्याचे दिसतात. मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी सोमवारी रात्री पत्रकारांशी बोलताना, आधी चौकशी करून नंतरच कारवाई केली जाईल असे म्हटले होते. तथापि मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यातून ते पोलिसांवर अविश्वास तर दाखवत नाहीत ना, अशी शंका सध्या व्यक्त केली जात आहे. या उलट वरिष्ठ पोलिस अधिकारी या प्रकरणामुळे सध्या चांगलेच अस्वस्थ बनले असून कोणाचाही मुलाहिजा न ठेवता थेट कारवाई करण्याचे संकेत त्यांनी आपल्या खालच्या अधिकाऱ्यांना दिले आहे. शिवाय बाबूश यांनी आपल्या मुलाच्या या प्रकरणाचा आधीच्या मारझोड प्रकरणाशी संबंध लावून उलट पोलिसांवरच दोषारोप करण्याचे व त्याची ढाल बनविण्याचे जे प्रयत्न चालविले आहेत त्यासंदर्भातही पोलिस अत्यंत नाराज आहेत.
फेब्रुवारी २००८ मधील पोलिसस्थानकावरील हल्ला आणि त्यानंतर मोन्सेरात कुटुंबीयांना झालेली मारझोड हा विषय पूर्णपणे वेगळा आहे. मोन्सेरात यांच्या समर्कांनी युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना केलेलेल्या मारझोडीचाही प्रकार वेगळा आहे आणि बाबूश समर्थकांनी आयटी हॅबिटॅटवर केलेल्या हल्ला आणि जाळपोळ हे प्रकरणही वेगळे आहे. पोलिसांनी या प्रकरणी कधीच हेतुपूर्वकगल्लत केली नाही. मोन्सेरात कुटुंबीयांना झालेल्या मारझोडीचा प्रकार पणजी पोलिस स्थानकावर झालेल्या हल्ल्यानंतरच्या प्रतिक्रियेचा होता, असे काही अधिकाऱ्यांचे म्हमणे आहे. मात्र अशा प्रकरणांचा संबंध या प्रकरणाशी जोडून मुलाला वाचविण्यासाठी त्याची ढाल बनवली जाणे पोलिसांना चांगलेच बोचले आहे. त्यामुळे रोहित मोन्सेरात प्रकरणी निःपक्षपात कारवाई करण्यासाठी वरिष्ठ अधिकारी पातळीवर एकमत झाल्याचे खात्रीलायकरीत्या समजते. गरज पडली तर यात राजकीय दबाव झुगारून प्रसंगी राजकर्त्यांना त्यांची जागा दाखवून देण्याची तयारीही या "केडरबेस' अधिकाऱ्यांनी ठेवली असल्याचे समजते.
जर्मन बालिकेवरील कथित लैंगिक अत्याचार व बलात्काराचे प्रकरण जर्मन दुतावासाच्या हस्तक्षेपामुळे आता वाढण्याची शक्यता असल्याने यात केंद्रीय गृमंत्रालयाची सक्रियताही वाढण्याची शक्यता आहे. केडरबेस अधिकारी कायद्याच्या चौकटीत राहूनच कृती करण्यासाठी सज्ज झाल्याचे समजते. यातून येणाऱ्या एक दोन दिवसात राज्य सरकारवरही कठोर कारवाईसाठी सगळीकडून दबाव येण्याची शक्यता आहे. पोलिस खात्याने स्कार्लेट प्रकरणात चांगलेच पोळून घेतले असल्यामुळे सध्याच्या या प्रकरणात कसलाही धोका न पत्करण्याचे त्यांनी ठामपणे ठरवले असल्याचे सांगण्यात येते.

पंढरपुरात हाय अलर्ट, विठ्ठल मंदिरातून दोन संशयितांना अटक

पंढरपूर, दि. १५ : श्रीविठ्ठल मंदिरात नामदेव पायरीवरून आत प्रवेश करीत असताना दोन संशयित मुस्लिम तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या घटनेनंतर पंढरपुरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
"हमें भगवान के दर्शन करने के लिये अंदर जाना है' असे या तरुणांनी पोलिसांना सांगितले असले तरी त्यांच्या संशयास्पद हालचालींची कसून चौकशी सुरू आहे. त्यांची नावे सादिक अहमद बाबासाहेब मुजावर आणि मुन्ना रजाक तकमारे असे आहे. हे दोघेही अनुक्रमे ३८ आणि ३२ इतक्या वयाचे आहेत. मुख्य दर्शनबारीत जाण्याच्या प्रयत्नात असतानाच मेटल डिटेक्टरजवळ पोलिसांनी त्यांना हटकले. त्यांच्या संशयित हालचालींवरून ताबडतोब त्यांना ताब्यात घेऊन शहर पोलिस ठाण्यात रवाना करण्यात आले. त्यांच्याकडे सामानाची ४-५ पोती आणि एक सुटकेस आढळली. या संशयितांकडे कुर्डुवाडी ते मिरज असे तिकीट सापडले. मिरजपर्यंतचे तिकीट असताना ते मध्येच पंढरपुरात का उतरले, याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. यापैेकी सादिक हा करमाळा येथील मदरशामध्ये धार्मिक शिक्षण देण्यासाठी येत असतो, अशी माहितीही पोलिसांना मिळाली आहे. दरम्यान, नागपुरात संघ मुख्यालयावर झालेल्या हल्ल्यात अतिरेक्यांकडे तेव्हा विठ्ठल मंदिराचा नकाशा मिळाला होता.

कॉंग्रेसला विकासाशी काही देणे-घेणे नाही मायावती यांचे टीकास्त्र

लखनौ, दि. १५ : रायबरेलीच्या लालगंज क्षेत्रात उभारण्यात येणाऱ्या रेल कोच फॅक्टरीच्या मुद्यावरून कॉंग्रेस पार्टी लोकसभा निवडणुकीच्या आधीच राजकीय फायदा लाटण्याचा प्रयत्न करीत आहे. या पार्टीला विकासात्मक कामाबाबत काही देणे-घेणे नाही, अशा कठोर शब्दात उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री मायावती यांनी कॉंग्रेसवर टीका केली आहे.
कॉंग्रेसचा खरा चेहरा जनतेसमोर आणण्यासाठी बसपातर्फे रायबरेली येथे लवकरच महारॅलीचे आयोजन केले जाईल, अशी घोषणाही मायावती यांनी केली. आज येथे पत्रकारांसोबत बोलताना उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री म्हणाल्या की, या महारॅलीमध्ये कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी उत्तर प्रदेश सरकारवर केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर दिले जाईल. याशिवाय केंद्रातील संपुआ सरकार उत्तर प्रदेश सरकारसोबत करीत असलेल्या भेदभावपूर्ण व्यवहाराची माहितीही सादर केली जाईल. याशिवाय कॉंग्रेसने आपल्या गेल्या ४८ वर्षांच्या कार्यकाळात रायबरेलीसह उत्तर प्रदेशात कोणकोणती विकासात्मक कामे केली, याचा लेखाजोखा सादर केला जाईल.
लालगंज येथील रेल कोच फॅक्टरीसंदर्भातील तेथील शेतकऱ्यांच्या आक्षेपांची तपासणी करण्यासाठी प्रमुख सचिव नेतराम यांच्या नेतृत्वात एक समिती स्थापन करण्यात येईल, अशी घोषणाही मायावती यांनी केली. ही समिती तीन दिवसांमध्ये आपला अहवाल राज्य सरकारकडे सादर करेल, असेही त्यांनी सांगितले. हा अहवाल आणि शेतकऱ्यांचे आक्षेप यावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा केली जाईल, असेही मायावती यांनी सांगितले.

पीडित मुलगी व तिची आई यांच्या सुरक्षेत ढिलाई नको जर्मन दुतावासाचे गोवा सरकारला पत्र

पणजी, दि. १५ (प्रतिनिधी): जर्मन मुलीवर झालेल्या बलात्कार व अश्लील एसएमएस प्रकरणाची पुराव्यासह शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात यांचा मुलगा रोहितविरुद्ध पोलिस तक्रार करण्याच्या आदल्या रात्री तिचे वकील ऍड. आयरीश रॉड्रिगीस यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याने "पीडित मुलगी व तिची आई यांच्या सुरक्षेत अजिबात हयगय करू नका'', असे पत्र काल दुपारी जर्मन दुतावासाने राज्याचे मुख्य सचिव जे. पी. सिंग यांना पाठवले आहे. या संपूर्ण प्रकरणाची निःपक्षपाती चौकशी करण्याची मागणीही दूतावासचे अधिकारी वॉल्टर स्टिचल यांनी या पत्रात केली आहे.
काल दुपारी रोहितविरुद्ध पोलिसांची शोध मोहीम सुरू असताना हे पत्र पोलिसांच्या हाती पडले. या प्रकरणाचा पाठपुरावा केला जाणार असून त्यावर आमचे लक्ष असल्याचेही या पत्रात म्हटले आहे. त्या मुलीच्या आईने २ ऑक्टोबर रोजी कळंगुट पोलिस स्थानकात, आपली १४ वर्षीय मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. त्यानंतर तिला अश्लील "एसएमएस' येत असल्याचे तिच्या आईचे म्हणणे आहे. १४ ऑक्टोबर रोजी सकाळी पुराव्यासह रोहितविरोधात तक्रार दाखल होण्याआधी काही तासापूर्वी ऍड. आयरिश यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला. मात्र कोणतीही भीती न बाळगता आयरिश व जर्मन महिलेने शिक्षणमंत्री व त्यांचा मुलगा रोहित मोन्सेरात याच्या विरोधात इस्पितळातच तक्रार दाखल केली होती.
या प्रकरणात रोहित मोन्सेरात याला मुख्य संशयित व बाबूश मोन्सेरात यांच्या नावावर असलेला मोबाईल "एसएमएस' पाठवण्यास वापरल्याने त्यांना सहसंशयित म्हणून पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे.

Wednesday 15 October, 2008

खुनी हल्ल्यामागे गुंड, राज्यकर्ते व पोलिस: पर्रीकर

- सरकार बरखास्तीची भाजपची मागणी
- आंदोलनाद्वारे रस्त्यावर उतरण्याचा इशारा

पणजी, दि. १४ (प्रतिनिधी): समाजकार्यकर्ते तथा पर्यावरण चळवळीतील आघाडीचे कार्यकर्ते ऍड. आयरिश रॉड्रिगीस, प्रा. प्रजल साखरदांडे आणि ऍड. जतीन नाईक यांच्यावर काल रात्री भरवस्तीतील एका ठिकाणी झालेला भीषण तलवार हल्ला हा अत्यंत थंड डोक्याने केलेला खुनाचाच प्रयत्न असून राजकारणी, गुंड आणि पोलिस यांच्यातल्या अत्यंत धोकादायक अशा संगनमताचा तो परिणाम आहे, असा संतप्त आरोप विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी आज येथे एका पत्रकार परिषदेत केला. गोव्याच्या संपूर्ण मंत्रिमंडळाचे हात रक्ताने माखले असून गुंड- पुंडांच्या सहकार्याने चाललेल्या या सरकारच्या हाती गोवा अजिबात सुरक्षित नसल्याने ते बरखास्त करणेच योग्य असल्याचे जळजळीत निरीक्षणही पर्रीकर यावेळी नोंदवले.
विद्यमान स्थितीत गोव्यावर दहशतवाद अक्षरशः घिरट्या घालत आहे. या परिस्थितीतही गृहमंत्री, मुख्यमंत्री आणि गुन्हेगार यांच्यातील घनिष्ट संबंधांमुळे राज्यात घडणाऱ्या गुन्हेगारी घटनांकडे पोलिस गांभीर्याने पाहूच शकत नाहीत. त्यामुळे या धोकादायक परिस्थितीत या भूमीच्या रक्षणासाठी सामान्य माणसाला रस्त्यावर उतरण्यावाचून पर्यायच उरलेला नाही. वाढती गुन्हेगारी आणि दहशतवादाविरूध्द दाद मागण्यासाठी रस्त्यावर उतरणाऱ्या प्रत्येक नागरिकाला आणि स्वयंसेवी संघटनांना भाजपचा पूर्ण पाठिंबा असेल. त्यासाठी आमचा पक्षदेखील आंदोलनात उतरेल अशी ग्वाहीदेखील पर्रीकर यांनी दिली.
भाजपच्या येथील मध्यवर्ती कार्यालयात पत्रकारांशी बोलताना, पर्रीकर यांनी कामत सरकारच्या एकंदर धोरणावर जबरदस्त कोरडे ओढले.हे सरकार सत्तेवर राहण्यास लायक नसून ते त्वरित बरखास्त करावे ही मागणी घेऊन भारतीय जनता पक्षाचे एक शिष्टमंडळ येत्या शुक्रवार दि. १७ रोजी राज्यपाल एस. एस. सिद्धू यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. राज्याच्या गृहमंत्र्यांची स्थिती तर इतकी डबघाईस आली आहे की, त्यांनी आता काशीला जाऊन सन्यासच घेणेच योग्य असल्याचा खोचक सल्लाही त्यांनी यावेळी दिला. ज्या गृहमंत्र्यांना स्वतःच्या शाळेतल्या देवी सरस्वतीच्या मूर्तीचे रक्षण करता आले नाही ते गोव्याचे दहशतवादापासून रक्षण काय कपाळ करणार, असा सवालही त्यांनी यावेळी केला.
गृहमंत्री रवी नाईक यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवताना ते म्हणाले, या गृहमंत्र्यांची लीला अगाधच आहे. पोलिस अधिकाऱ्यांना हाताशी धरून हे गृहस्थ आपले हितसंबंध जपत आहेत. गुंड - पुंडांना संरक्षण देण्यात खुद्द मुख्यमंत्री आणि गृहमंत्री जबाबदार आहेत. माशेल येथील "कालिका ज्वेलर्स' या दुकानातील जबरी चोरीप्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या मेन्सियो नामक एका संशयिताच्या डायरीत अनेक पोलिस अधिकाऱ्यांची नावे, हुद्दे आणि त्यांना दरमहा दिले जाणारे हप्ते यांची रीतसर नोंद होती. त्यामध्ये प्रामुख्याने देऊ बाणावलीकर, प्रवीणकुमार वस्त, फ्रान्सिस कॉर्त आणि हप्ता बहाद्दर म्हणवून नाव कमावलेले हवालदार विनय श्रीवास्तव तसेच नितीन गावकर यांच्या नावांचा समावेश होता. त्यांना दिल्या जाणाऱ्या पैशांचाही त्यात उल्लेख होता. दरमहा किमान पाच हजार ते एक लाखापर्यंतच्या हप्त्यांच्या नोंदी प्रत्येकाच्या नावावर आहे. "कालिका ज्वेलर्स'मधील जबरी चोरीनंतर गुंडांनी पोलिसांना दिल्या जाणाऱ्या हप्त्यांमध्ये भरमसाट वाढ केल्याचेही स्पष्ट झाले आहे. ही सर्व माहिती गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्याकडे असूनदेखील संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई का केली जात नाही, या प्रश्नाचे उत्तर लोकांनीच मुख्यमंत्री व गृहमंत्री यांच्याकडून घेण्याची वेळ आली आहे. प्रामुख्याने मडगावातील शस्त्रास्त्र प्रकरणातील आरोपींवर ९० दिवस उलटले तरीही आरोपपत्र दाखल का केले गेले नाही, याचेही उत्तर आता जनतेने मुख्यमंत्र्यांकडे मागावेच अशी आग्रही मागणी पर्रीकरांनी केली.
----------------------------------------------------------------------
मुक्काम पोस्ट विशाळगड
गुंड, समाजकंटक व राजकारणी यांच्यातले संबंध किती घनिष्ठ आहे हे सांगण्यासाठी पर्रीकरांनी यावेळी पत्रकारांना एक सीडी दाखवली. त्यामध्ये मुख्यमंत्री दिगंबर कामत, त्यांच्या पत्नी आशा कामत यांनी मोती डोंगर - मडगाव येथील शस्त्रास्त्र प्रकरणातील प्रमुख संशयित सूत्रधार जलील शेख व त्याचा सहकारी मकबल शेख, जलीलचा भाऊ बशीर, मकबूल शेख, अलिफ बंडुकुडे, अल्ताफ सय्यद यांच्याबरोबर केलेल्या विशाळगड दौऱ्याचे चित्रण आहे. अलीफ बंडुकुडे हा बोगस मते आणण्यात पटाईत असून तो मुख्यमंत्र्यांच्या निकटच्या वर्तुळातला म्हणून ओळखला जातो. अल्ताफ सय्यद हा बालिकेवरील बलात्काराच्या प्रकरणातला मुख्य संशयित आहे. जलीलचा भाऊ बशीर हा मुख्यमंत्र्यांचा मोती डोंगरवरील अगदी नजीकचा कार्यकर्ता म्हणून ओळखला जातो. या सीडीमधील एकंदर चित्रण पाहता, ही सर्व मंडळी मुख्यमंत्र्यांच्या अगदी जवळचे आहेत हे स्पष्ट होते. यातील एक नामचीन गुंड मुख्यमंत्र्यांसाठी सरबत ओत असताना दिसतो तर त्यांच्या पत्नी अन्य गुंडासमवेत हसत खेळत गप्पा मारताना दिसतात. राज्याचा मुख्यमंत्रीच जर सहकुटुंब अशा गुंडांबरोबर सहली करत असतील तर गुंडांना भीती ती कसली, असा सवालही पर्रीकरांनी यावेळी केला. मुख्यमंत्री कामत हे निवडून आल्यास विशाळगडाच्या दर्ग्यावर चादर चढवण्याचा नवस याच टोळक्याने केला होता व नंतर तो फेडण्यासाठीच मुख्यमंत्री कुटुंबासह विशाळगडवर गेले होते, असे पर्रीकर यांनी नमूद केले. दरम्यान, गुन्हेगारांसोबत वावरणाऱ्या दुतोंडी लोकांच्या हाती गोवा सुरक्षित आहे का, विचार करा, अन्यथा गोव्याचा सर्वनाश अटळ आहे, असा त्याचा संदेशही सीडीच्या शेवटी देण्यात आला आहे.
------------------------------------------------------
वाऽऽरे मंत्रिमंडळ
विद्यमान मंत्रिमंडळात इतका गोंधळ आहे की, कोणाचाच पायपोस कोणाच्या पायात नाही. मंत्र्यांमध्ये कमालीचा गोंधळ आहे. मिकी पाशेको उठतात आणि दुसरे मंत्री चर्चिल तसेच आमदार रेजिनाल्ड यांच्याविरूध्द अपात्रतेची याचिका दाखल करतात. विद्यमान वाहतूकमंत्री हे गृहमंत्र्यावर गुन्हेगारांना पाठीशी घालण्यावरून तोफ डागतात. राज्यात गुन्हेगारी, साठमारी, लुटपात, भ्रष्टाचार, हितसंबंध यांनी कळसच गाठला असून इतकी बिकट परिस्थिती गोव्यावर कधीही उदभवली नव्हती, असेही पर्रीकर म्हणाले. राज्यात गेल्या दीड वर्षात अनेक गंभीर गुन्हेगारी घटना घडल्या. अठरा ठिकाणी मूर्तिभंजन झाले. खुद्द मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात बेकायदा शस्त्रसाठा सापडला. या सर्वावर कळस म्हणजे आयरिश, प्रजल व जतीन यांच्यावर झालेला प्राणघातक हल्ला असल्याचेही ते म्हणाले.

तिघा बाबूश समर्थकांना अटक

आयरिश हल्ला प्रकरण; संशयितांनी सात दिवसांची पोलिस कोठडी
बाबूशच्या सांगण्यावरूनच हल्ला: आयरिश यांचा आरोप

पणजी, दि. १४ (प्रतिनिधी): 'ऊठ गोयकारा' संघटनेचे प्रवक्ते तथा समाजकार्यकर्ते ऍड. आयरिश रॉड्रिगीस व निसर्ग बचाव चळवळीतील कार्यकर्ते प्रजल साखरदांडे, ऍड. जतीन नाईक यांच्यावर काल रात्री झालेल्या प्राणघातक हल्लाप्रकरणी आज पहाटे पणजी पोलिसांनी शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात यांचे कट्टर समर्थक अँथनी बार्रेटो (सांव पावलू - ताळगाव), नॉर्मन जॉन ऊर्फ बॉचो (व्हडलेभाट- ताळगाव ) व संदीप तुकाराम वायंगणकर (टोंक - करंजाळे) या संशयितांना अटक केली. तसेच या हल्ल्यात वापरण्यात आलेली मारुती कार जप्त करण्यात आल्याचीही माहिती आज सायंकाळी उत्तर गोवा पोलिस अधीक्षक बॉस्को जॉर्ज यांनी दिली. पोलिसांनी ३०७ सह अन्य विविध कलमांखाली ही कारवाई केली. सायंकाळी संशयितांना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर उभे केले असता त्यांना सात दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली. या हल्ल्यानंतर ऍड. आयरिश यांच्या घराभोवती आणि इस्पितळाच्या ठिकाणीही पोलिस तैनात करण्यात आले आहेत.
आयरिश यांच्यावरील हल्ल्याची माहिती मिळताच समाजाच्या विविध क्षेत्रांतील मानवरांनी आज सकाळपासून इस्पितळात जाऊन त्यांची चौकशी केली. सकाळी विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर, कॉंग्रेसचे आमदार तथा माजी वित्तमंत्री ऍड. दयानंद नार्वेकर, सांताक्रुजच्या आमदार व्हिक्टोरिया फर्नांडिस, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गोवा व कोकण प्रांत संघचालक प्राचार्य सुभाष वेलिंगकर, गोवा विभाग कार्यवाह प्रा.रत्नाकर लेले, धेंपे महाविद्यालयाचे विद्यार्थी, ऊठ गोयकारा संघटनेने पदाधिकारी व अन्य अनेक प्रतिष्ठित व्यक्तींनी ऍड. आयरिश व प्रा. साखरदांडे यांनी भेट घेऊन विचारपूस केली.
काल रात्री १०.३० वाजता पणजीत टपाल खात्याच्या मागे असलेल्या अशोक बार अँड रेस्टॉरंटमधे जेवायला बसलेल्या ऍड. आयरिश, प्रा.साखरदांडे, ऍड.जतीन नाईक यांच्यावर सशस्त्र हल्लेखोरांनी तलवारी, चाकू, बाटल्या व धारदार शस्त्रांनी हल्ला चढवला होता. काळे टीशर्ट, जीन पॅंट व तोंडावर बुरखा अशा वेशात हल्लेखोर आले होते.
हल्ल्यानंतर गंभीर जखमी अवस्थेत ऍड. आयरिश व साखरदांडे यांना कांपाल क्लिनिकमधे दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीचा धोका टळला आहे. ऍड. आयरिश व साखरदांडे यांच्या बोटांवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.
"माझ्यावर व प्रजल यांच्यावर झालेल्या या प्राणघातक हल्ल्यामागे बाबूश मोन्सेरात यांचाच हात आहे,' असा थेट आरोप आज ऍड. आयरिश यांनी इस्पितळात पत्रकारांशी बोलताना केला. पोलिसांना दिलेल्या जबानीतही त्यांनी हेच म्हटले आहे. रोहित मोन्सेरात यांच्याविरुद्ध जर्मन मुलीला अश्लील "एसएमएस' पाठवल्याप्रकरणी तक्रार दाखल करू नये यासाठी आपल्यावर अनेकांनी दबाव आणला. तसेच तिच्या आईवर दबाव आणला जात असल्याचे ते म्हणाले. २ ऑक्टोबर रोजी रोहित याच्याविरुद्ध तक्रार दाखल केल्यानंतर बाबूश मोन्सेरात यांची पत्नी जेनिफर मोन्सेरात यांनी त्या जर्मन महिलेच्या घरी जाऊन तक्रार मागे घेण्यासाठी तिला धमक्या दिल्या जात असल्याचे ऍड. आयरिश यांनी सांगितले.
आपल्यावर हल्ला होण्यापूर्वी बाबूश यांच्या समर्थकांचे मोबाईलवर अनेक फोन आले होते. बाबूश यांच्या मुलाविरूध्द तक्रार दाखल करू नये यासाठी धमक्यांचे ते फोन होते असे सांगून बाबूश यांनी निराशेपोटीच हा हल्ला घडवून आणल्याचा आरोप ऍड. आयरिश यांनी केला. हल्लेखोरांनी माझा गाळा कापण्याचा प्रयत्न केला. तथापि, त्याचवेळी मी टेबलाखाली वाकल्याने बचावलो, असे ते म्हणाले. "गोव्यासाठी ऊठ गोयकाराचे सर्व कार्यकर्ते वचनबद्ध असून आमचा प्राण गेला तरी, त्याची फिकीर नाही,' असे ते म्हणाले.
----------------------------------------------------------------
...अन आयरिशना रडू कोसळले
सकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गोवा व कोकण प्रांतचे संघचालक प्राचार्य सुभाष वेलिंगकर यांनी ऍड. आयरिश रॉड्रिगीस यांची इस्पितळात भेट असता आयरिश भावनाविवश झाले आणि त्यांचे डोळे पाणावले. यावेळी प्रा. वेलिंगकर यांनी "आम्ही सर्व तुमच्या पाठीशी आहोत', असे आश्वासन दिले. त्याबरोबर प्रा. वेलिंगकर यांच्या गौरव सोहळ्याला उपस्थित राहता आले नाही याची खंत आयरिश यांनी व्यक्त केली.

रोहित मोन्सेरातविरुद्ध बलात्कारप्रकरणी गुन्हा

- शिक्षणमंत्री बाबूशही सहआरोपी
- दोघांना कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता
अल्पवयीन मुलीवर बलात्कार व अश्लील 'एसएमएस' प्रकरण

पणजी, दि. १४ (प्रतिनिधी): अल्पवयीन मुलीवर बलात्कार व तिला अश्लील 'एसएमएस' पाठवल्याप्रकरणी शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात यांचा मुलगा रोहित (२१) याच्याविरोधात कळंगुट पोलिस स्थानकात आज गुन्हा नोंदवण्यात आला. तसेच या प्रकरणात बाबूश मोन्सेरात यांच्यावरही संशयित सहआरोपी म्हणून गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे या पितापुत्रांना कधीही अटक होण्याची शक्यता असल्याचे आज उत्तर गोवा पोलिस अधीक्षक बॉस्को जॉर्ज यांनी सांगितले. रोहितला अटक करण्यासाठी आज पोलिस अधिकाऱ्यांचा एका पथकाने दुपारी ४.१० च्या सुमारास मोन्सेरात यांच्या ताळगाव व मिरामार येथील बंगल्यावर छापे घातले. मात्र रोहित त्यांच्या हाती लागला नाही. त्यामुळे फौजदारी गुन्हा कलम १६० नुसार त्याला चौकशीसाठी कळंगुट पोलिस स्थानकावर त्वरित हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आला, अशी माहितीही बॉस्को यांनी दिली.
या प्रकरणातील दोन्ही संशयितांनाविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या ३५४, ३७६(बलात्कार), २९३,१०९ व फौजदारी गुन्हे संहितेच्या कलम १४५ नुसार आणि बाल कायदा कलम ८ नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणात पीडित १४ वर्षीय मुलीची वैद्यकीय चाचणी केली जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. सदर प्रकरण दाबण्यासाठी सासष्टीतील काही राजकारण्यांनी जोरदार दबाव आणण्याचा प्रयत्न केल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली.
हाडाचा समाज कार्यकर्ता असल्याचे सिद्ध करताना ऍड. आररिश यांनी जखमी अवस्थेतही जर्मन महिलेसोबतच इस्पितळामध्ये आज दुपारी १२.१० च्या सुमारास तक्रार दाखल केली. तक्रार नोंद करून घेण्यासाठी बॉस्को जॉर्ज, पणजीचे विभागीय पोलिस उपअधीक्षक सेमी तावारीस व म्हापसा उपविभागीय उपअधीक्षक गुंडू नाईक इस्पितळात दाखल झाले होते.
तक्रारीची नोंद केल्यानंतर दुपारी ३.५० वाजता सेमी तावारीस यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडू नाईक, पणजी पोलिस स्थानकाचे निरीक्षक फ्रान्सिस्को कॉर्त, म्हापसा पोलिस स्थानकाचे निरीक्षक सी. एल. पाटील, कळंगुट पोलिस स्थानकाचे निरीक्षक तुषार वेर्णेकर, आगशी पोलिस स्थानकाचे निरीक्षक विश्वेश कर्पे व उपनिरीक्षक तुषार लोटलीकर तसेच राखीव पोलिस दलाची एक प्लाटून रोहित यांच्या शोधासाठी निघाली होती. सर्वप्रथम ताळगाव येथील बंगल्यावर ते दाखल झाले. यावेळी बाबूश यांचा एकही समर्थक त्यांच्या बंगल्यासमोर किंवा आसपासही फिरकताना दिसत नव्हते. त्याबरोबर पोलिसांनी बंगल्याच्या दरवाजावरील बेल वाजवल्यावर १० मिनिटांनी दरवाजा खोलण्यात आला. मग अवघ्या पाच मिनिटांत पोलिस बाहेर आले व मिरामार येथील बंगल्याकडे निघाले. तेथे पोलिसांना एक मुलगी असल्याचे आढळले. पोलिसांनी रोहित याला त्वरित कळंगुट पोलिस स्थानकावर उपस्थित राहण्याची नोटीस तिच्याकरवी बजावली.
१२.३० वाजता तक्रारीची नोंद केल्यानंतर तब्बल तीन तासाने पोलिस ठरवून चार वाजता रोहित याला अटक करण्यासाठी का निघाले, असा प्रश्न सध्या उपस्थित झाला आहे. मात्र जुने अनुभव पदराशी असल्याने यावेळी पोलिस मोन्सेरात याच्या बंगल्यावर पूर्ण तयारीनिशी गेले होते.
---------------------------------------------------------------
ऍड. आयरिश हल्ला प्रकरण घडताच आज सकाळी तडकाफडकी उपअधीक्षक सेमी तावारीस यांच्याकडे पणजी उपविभागीयपदाचा ताबा सोपवण्यात आला. या पदाचा तात्पुरता ताबा सांभाळणारे उपअधीक्षक देऊ बाणावलीकर यांच्याकडे वास्को उपविभागीय पदाचा पूर्णपणे ताबा सोपवण्यात आला. याविषयीचा आदेश सकाळीच जारी करण्यात आला.

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा

संपूर्ण प्रक्रिया १४ नोव्हेंबर ते ४ डिसेंबरपर्यंत
जम्मू-काश्मीरबाबत निर्णय लांबणीवर

नवी दिल्ली, दि. १४ : निवडणूक आयोगाने पाच राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा केली असून त्यात दिल्ली, राजस्थान, छत्तीसगड, मध्यप्रदेश आणि मिझोरम यांचा समावेश आहे. जम्मू-काश्मीरबाबत अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही.
मुख्य निवडणूक आयुक्त एन.गोपालस्वामी यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, दिल्लीत २९ नोव्हेंबर, राजस्थानात ४ डिसेंबर, मध्यप्रदेशात २५ नोव्हेंबर, छत्तीसगडमध्ये दोन टप्प्यात १४ आणि २० नोव्हेंबरला आणि मिझोरम येथे २९ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. सर्व राज्यांमधील मतांची मोजणी ८ डिसेंबर रोजी होणार आहे. नक्षलप्रभावित राज्य असल्याने छत्तीसगडमध्ये दोन टप्प्यात मतदान घेतले जाणार आहे. याठिकाणी सुरक्षा व्यवस्था अतिशय कडक राहणार आहे.
आचारसंहिता लागू
गोपालस्वामी म्हणाले की, जम्मू-काश्मीरमधील विधानसभा निवडणुकांबाबतही आम्ही विचार केला. पण, अद्याप तारखांविषयी काही निर्णय झालेला नाही. तेथील एकूणच परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर तारखेची घोषणा होईल. आज पाच राज्यांतील मतदानाच्या तारखा घोषित झाल्याने या पाचही ठिकाणी निवडणूक आचार संहिता लागू झाली आहे.
पाचही राज्यातील विधानसभा मतदारसंघ आणि मतदानाच्या तारखांवर हा दृष्टीक्षेप....

-मध्यप्रदेश
एकूण जागा : २३०
मतदानाची तारीख : २५ नोव्हेंबर
मतमोजणी : ८ डिसेंबर

-दिल्ली
एकूण जागा : ७०
मतदानाची तारीख : २९ नोव्हेंबर
मतमोजणी : ८ डिसेंबर

राजस्थान
एकूण जागा : २००
मतदानाची तारीख : २९ नोव्हेंबर
मतमोजणी : ८ डिसेंबर

छत्तीसगड
एकूण जागा : ९०
मतदानाची तारीख : १४ आणि २० नोव्हेंबर
मतमोजणी : ८ डिसेंबर

मिझोरम
एकूण जागा : ४०
मतदानाची तारीख : २९ नोव्हेंबर
मतमोजणी : ८ डिसेंबर

कानपूरमध्ये स्फोटात सात जण जखमी

कानपूर, दि. १४ : आज संध्याकाळी येथील कर्नलगंज भागात झालेल्या गावठी बॉम्बच्या स्फोटात तीन मुलांसह सात जण जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. पॉलिथिन पिशवीत गुंडाळलेला हा बॉम्ब सायकलवर ठेवण्यात आला होता, त्याचा स्फोट संध्याकाळी ६.३० वाजता झाला. या मद्यविक्री दुकानाजवळ हा स्फोट झाला. हा स्फोट दहशतवाद्यांनी केल्याची शक्यता पोलिसांनी फेटाळली.

कुंकळ्ळीत कडकडीत 'बंद', अनुचित प्रकार नाही : चारकलमी कार्यक्रम जाहीर

मडगाव, दि. १४ (प्रतिनिधी): देवआजोबा राखणदेवाच्या घुमटीच्या गेल्या गुरुवारी झालेल्या तोडफोडप्रकरणी गुन्हेगारांना अटक करण्यात पोलिसांना आलेल्या अपयशाच्या निषेधार्थ कुंकळ्ळीवासीयांनी पुकारलेल्या आजच्या १२ तासांच्या "कुंकळ्ळी बंद'ला १०० टक्के प्रतिसाद मिळाला. कर्नाटक परिवहनच्या एका बसवर झालेली किरकोळ दगडफेक वगळता बंद शांततेत पार पडला.
लोकांनी 'कुंकळ्ळी बंद' ची हाक दिली होती तरी प्रत्यक्षात बाळ्ळी, काणकोण व केपे भागातूनही बंद पाळण्याचे संकेत मिळाल्याने प्रशासनाने कोणतीही जोखीम न बाळगता संपूर्ण कुंकळ्ळी परिसरात काल मध्यरात्रीपासून कडक बंदोबस्त ठेवला होता. त्यामुळे संपूर्ण कुंकळ्ळी परिसराला पोलिस छावणीचे स्वरूप आले होते. कुंकळ्ळीबरोबरच दक्षिण गोव्यातील पोलिस यंत्रणेला अतिसावध राहाण्याचा इशारा देण्यात आला होता. संवेदनक्षम भागांत काल रात्रीच केंद्रीय राखीव दलाचे जवान तैनात केले होते. ते रात्री उशिरापर्यंत तेथेच होते.
आज सकाळी ६ वाजता "बंद'ला प्रारंभ झाला. कुंकळ्ळीबरोबर बाळ्ळीतील दुकानदारांनीही बंद पाळल्याने सर्वत्र शुकशुकाट होता. कुंकळ्ळीबरोबरच मडगाव -कारवार मार्गावरील खाजगी बसेस तसेच रेती वाहतूक करणारे ट्रक रस्त्यावर आलेच नाहीत. त्यांनी "बंद'ला पाठिंबा दिला. बाळ्ळी येथे अडविलेला रस्ता पोलिसांनी अडथळे बाजूला करून तो वाहतुकीस मोकळा केला; पण कदंब व कर्नाटक परिवहनाच्या बसेस सोडल्यास अन्य वाहने तेथून गेली नाहीत.कर्नाटक परिवहनाच्या अशाच एका बसवर जुन्या पोलिस स्टेशनपाशी दगडफेक झाली. बऱ्याच ठिकाणी रस्त्यांवर टायर पेटवून टाकण्याचे प्रकारही घडले.
पोलिस उपअधीक्षक उमेश गावकर,उपजिल्हाधिकारी दीपक देसाई , मामलेदार परेश फळ देसाई, पोलिस निरिक्षक सिध्दांत शिरोडकर दिवसभर तेथे ठाण मांडून होते. केपे व काणकोणचे पोलिस निरीक्षकही दुपारपर्यंत तेथे होते. ते नंतर परत फिरले.
सर्वत्र खाकी गणवेशधारी होते व ते बंद समर्थकांपाठोपाठ फिरताना दिसत होते. बाजार उत्स्फूर्तपणे बंद होता. त्यामुळे कोणावर बंदची सक्तीच करण्याचा प्रश्र्न उद्भवला नाही असे बंद समर्थकांकडून सांगण्यात आले. सकाळी ११ च्या सुमारास त्यांनी कुंकळ्ळी ते बाळ्ळी अशी पदयात्रा काढली व ती परत फिरली.
कुंकळ्ळीतील सर्व शैक्षणिक व वित्तीय संस्थाही आज बंद राहिल्या.तेथे परीक्षा सुरू होती त्या संस्थांनी "बंद'च्या अनुषंगाने मुलांची वेगळी सोय केली होती.
स्थानिक आमदार तथा नगरविकास मंत्री ज्योकिम आलेमाव दुपारी १२ च्या सुमारास फेरफटका मारून गेले. त्यांनी गुन्हेगारांस पकडले गेले नाही तर आपण जनतेबरोबर असेन अशी घोषणा केली होती, प्रत्यक्षात ते या आंदोलनात दूरच राहिले.
सायंकाळी ६ वाजता "बंद' मागे घेतल्याची घोषणा एका जाहीर सभेत करण्यात आली. तेथे विशाल शाबू देसाई, ताराचंद देसाई, मारुती देसाई, प्रसाद देसाई, विष्णु देसाई, संतोष देसाई व कमलाक्ष प्रभुगावकर यांनी मार्गदर्शन केले. "बंद'साठी सहकार्य देणारे दुकानदार, बाजारवाले, काणकोण , केपे व बाळ्ळीचे दुकानदार, खासगी बसवाले व रेती ट्रकवाले यांचे आभार मानण्यात आले.तसेच पोलिसांनी दिलेल्या सहकार्याचा आवर्जून उल्लेख करण्यात आला.पोलिस उपअधीक्षक उमेश गावकर यांनीही बंद शांततेत पार पडल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
चारकलमी कार्यक्रम
आंदोलनाचा यापुढचा चारकलमी कार्यक्रमही यावेळी जाहीर करण्यात आला. कुंकळ्ळी पोलिस स्टेशनवर मोर्चा, टॅक्सी स्टॅंडवर धरणे, साखळी उपोषण व बेमुदत उपोषण असे त्याचे स्वरूप असेल.

Tuesday 14 October, 2008

आता केंद्राला साकडे, वेतन आयोगाच्या कार्यवाहीसाठी निधीची मागणी

पणजी,दि.१३(प्रतिनिधी) : सहाव्या केंद्रीय वेतन आयोगाची राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना लागू करण्यासाठी आर्थिक मदत करावी, असे साकडे मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी आता केंद्र सरकारला घातल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
या आयोगाच्या अंमलबजावणीची अधिसूचना विद्यमान कॉंग्रेस आघाडी सरकारने जारी केली आहे. मात्र त्यामुळे
सरकारी तिजोरीवर पडणारा ताण लक्षात घेता राज्यात विकासाच्या योजना राबवणे कठीण होणार आहे.
म्हणूनच कामत यांनी दिल्ली येथे आज झालेल्या राष्ट्रीय एकात्मता मंडळाच्या बैठकीत याविषयी आपले विचार मांडताना सहाव्या वेतन आयोगामुळे राज्यावर आर्थिक संकट ओढवण्याची भीती व्यक्त केली. केंद्र सरकारने सढळ हस्ते मदतीचा हात पुढे करण्याची याचना मुख्यमंत्र्यांनी केल्याची माहिती सरकारी सूत्रांनी दिली.
या बैठकीनिमित्ताने कामत यांनी केंद्र सरकारकडून होत असलेल्या अन्यायाबाबत स्पष्ट विचार मांडले.गोवा राज्याने सर्व क्षेत्रात केलेल्या प्रगतीचा गौरव करण्याचे सोडून राज्याची केंद्राकडून उपेक्षा सुरू असल्याचे ते म्हणाले. पर्यटन व खाण हा राज्याचा आर्थिक कणा असला व या उद्योगामार्फत राज्याकडून विदेशी चलन व केंद्रीय कराच्या रूपाने कोट्यवधींचा महसूल केंद्राला मिळवून देण्यात येतो. मात्र या उद्योगामुळे राज्यासमोर निर्माण झालेल्या नव्या समस्यांना तोंड देण्यासाठी गोव्याला केंद्राकडून जादा निधीची गरज आहे,असेही कामत म्हणाले.राज्यात दरवर्षी येथील लोकसंख्येच्या दुप्पट पर्यटन भेट देत असतात त्यामुळे येथील साधनसुविधा व इतर गोष्टींवर पडणारा ताण सहन करण्यासाठी त्यात आमूलाग्र बदल करण्याची गरज आहे व त्यासाठी अतिरिक्त निधी राज्याला हवा आहे. खाण उद्योगामुळे पर्यटनाची होणारी हानी तसेच या उद्योगामुळे निर्माण होणारे धूळ व वायू प्रदूषण याचे परिणाम या राज्यावर होत आहेत. खनिज वाहतुकीमुळे रस्त्यांची पूर्ण वाताहत होत असल्याने त्यासाठीही राज्याला मोठ्या आर्थिक सहाय्यतेची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले.
राज्याने गेल्या अर्थसंकल्पात महसूल तूट शून्यावर नेण्याचे लक्ष्य गाठले होते. मात्र सहाव्या वेतन आयोगामुळे किमान आठशे कोटी रुपयांची गरज भासणार आहे. दरवर्षी सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी आता जादा साडेतीनशे कोटी रुपयांची गरज भासणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आर्थिक तूट निर्माण होण्याची शक्यता आहे. त्याचे परिणाम राज्याची आर्थिक प्रगती रोखली जाण्यात होण्याची शक्यता त्यांनी वर्तविली.

आज 'कुंकळ्ळी बंद' संपूर्ण दक्षिण गोव्यात 'हाय ऍलर्ट'

मडगाव, दि. १३ (प्रतिनिधी) : देवआजोबा राखणदेवाच्या घुमटीच्या गेल्या दसऱ्या दिवशी झालेल्या तोडफोडीच्या प्रकरणाने गंभीर वळण घेतले आहे व तेथील नागरिकांनी यासंदर्भात उद्या (मंगळवारी) "कुंकळ्ळी बंद' ची हाक दिली आहे.
याच मुद्यावरून बाळ्ळी, काणकोण व केपे भागातूनही उद्या बंद पाळला जाईल असे चित्र आज रात्री स्पष्ट झाले. त्यानंतर संपूर्ण दक्षिण गोव्यातील पोलिस यंत्रणेला "हाय ऍलर्ट'चा आदेश दिला गेला. संवेदनक्षम भागात आज (सोमवारी) रात्रीच केंद्रीय राखीव दलाचे जवान तैनात केले गेले. तसेच केपे, कणकोण, रुमडामळसारख्या भागात अधिक सावधगिरी बाळगण्यास सुरक्षा दलांना सांगण्यात आले.
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, या "बंद'च्या अनुषंगाने कोणताच धोका पत्करला जाणार नाही. कुठेही काही घडले तरी त्याचे पडसाद उमटणे शक्य असलेल्या भागात खास काळजी घेण्यात आलेली आहे. वरिष्ठ मुलकी व पोलिस अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
दरम्यान, वाटाघाटीद्वारे मार्ग काढण्यासाठी दिलेले आवाहन फेटाळून नागरिक समिती आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने शासकीय यंत्रणेने उद्याच्या बंदचा मुकाबला करण्यासाठी सारी तयारी केल्याचे सांगण्यात आले. त्यासाठी कुंकळ्ळी परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिस कुमक आणण्यात आली असून त्यांच्या जोडीला केंद्रीय राखीव दलाची तुकडी व गोवा सशस्त्र पोलिस दल तैनात केले गेल्याचे सूत्रांनी सांगितले.
आज दिवसभर नगरविकासमंत्री तथा स्थानिक आमदार ज्योकिम आलेमाव दक्षिण गोव्याचे जिल्हाधिकारी गोकुळदास नाईक, उपजिल्हाधिकारी दीपक देसाई , मामलेदार परेश फळ देसाई, गुन्हा अन्वेषण विभागाचे उपअधीक्षक चंद्रकांत साळगावकर कुंकळ्ळीत ठाण मांडून होते. नागरिकांशी वाटाघाटी करून चिघळलेल्या प्रश्र्नावर तोडगा काढण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. मंत्री ज्योकिम यांनी त्यासाठी स्वतः प्रयत्न केले, पण लोकांनी त्यांना प्रतिसाद न दिल्याने तोडगा निघाला नाही, असे सरकारूी सूत्रांनी सांगितले.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार पोलिसांना दिलेली मुदत सकाळी १० वाजता संपली व त्यामुळे वाटाघाटींचा प्रश्र्नच शिल्लक रहात नाही. सकाळी पोलिसांनी काहीच प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर दोन तास प्रतीक्षा केली गेली. तथापि, तरीही काहीच उत्तर न मिळाल्याने नागरिकांनी उद्याच्या बंदची तयारी सुरू केल्यावर सायंकाळी ५-३० वा. मंत्री आलेमाव यांनी काहींशी व्यक्तिशः संपर्क साधून चर्चेसाठी पोलिस स्टेशनवर येण्यास सांगितले. मात्र त्यांना कोणीच प्रतिसाद दिला नाही. उलट आपण उद्याच्या तयारीत व्यस्त असल्याने तुम्हीच येथे या, असा उलट निरोप दिला. मात्र ते काही आले नाहीत.
उद्याच्या बंदला काणकोण, बाळ्ळी व केपे येथून मोठा पाठिंबा मिळाला आहे.तेथील बाजार उद्या बंद राहतील. राष्ट्रीय महामार्ग काणकोण तसेच बाळ्ळी येथे अडविला जाणार असल्याने वाहतूक ठप्प होणार आहे. कार्यकर्त्यांनी आज सकाळी कुंकळ्ळीतील शाळांमध्ये जाऊन बंदची कल्पना दिली असता व्यवस्थापनांनी शाळा बंद ठेवण्याचे आश्र्वासन त्यांना दिले. कुंकळ्ळी व बाळ्ळी येथील व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने बंदमध्ये सहभागी होण्याची घोषणा केली आहे.शिवसेना, पद्मनाभ संप्रदाय या बंदमध्ये सहभागी होणार आहेत.
पोलिस यंत्रणा या बंद हाकेमुळे कमालीच्या तणावाखाली आली असून त्यातून परवा ताब्यात घेतलेल्या संशयिताला पुन्हा आरोपी म्हणून पुढे आणून लोकांना शांत केले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, कुंकळ्ळी बंद राहिली तरी हरकत नाही, पण राष्ट्रीय महामार्ग क्र. १७ वाहतुकीस खुला ठेवण्याची जय्यत तयारी सरकारने चालविल्याचे रात्री दिसून आले.

सुदिन ढवळीकर समर्थक खवळले गोविंद गावडे यांच्यावर कारवाईची मागणी

पणजी,दि. १३ (प्रतिनिधी) : गेल्या विधानसभा निवडणुकीत वाहतूकमंत्री सुदिन ढवळीकर यांचे प्रतिस्पर्धी असलेले कॉंग्रेसचे उमेदवार गोविंद गावडे यांनी बांदोडा येथे भर बैठकीत ढवळीकर यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनाही अपशब्द वापरून अपमानीत केल्याप्रकरणी चोवीस तास होऊनही कारवाई होत नसल्यामुळे ढवळीकर समर्थकांत तीव्र असंतोष पसरला आहे.
गोविंद गावडे हे कॉंग्रेसचे गेल्यावेळचे मडकई मतदारसंघातील उमेदवार होते. गृहमंत्री रवी नाईक यांचे ते कट्टर समर्थक आहेत,असे सांगून अशा लोकांकडून जर एखाद्या मंत्र्याला भर जाहीर कार्यक्रमांत धमकी देण्यात येते व पोलिस कारवाई करीत नाहीत, तर सामान्य लोकांची काय परिस्थिती असेल असा सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला. याप्रकरणी ढवळीकर यांच्या काही समर्थकांनी आज ढवळीकर यांची पर्वरी येथे भेट घेतली असता कार्यकर्त्यांना संयम राखण्याचे आवाहन त्यांनी केले. गेल्या आठवड्यात बांदोडा येथे सुदिन ढवळीकर यांच्या कार्यालयात विविध योजनेअंतर्गत धनादेश वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला कवळेच्या जिल्हा पंचायत सदस्य मनुजा नाईक,बांदिवडेचे जिल्हा पंचायत सदस्य नरेश नाईक,कवळे,बांदोडा,कुंडई आदी ग्रामपंचायतींचे सरपंच,उपसरपंच, पंच व सरकारी अधिकारी हजर होते.
हा कार्यक्रम सुरू असताना अचानक मुख्य खोलीत प्रवेश करून सगळ्या लोकांना बाहेर काढा,आपल्याला काही बोलायचे आहे,अशी मागणी गावडे यांनी केल्याचे ढवळीकर समर्थकांनी सांगितले. ढवळीकर यांनी नंतर बोलू असे सांगताच गावडे यांनी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनाही त्यांनी अपशब्द वापरले. मात्र, ढवळीकरांनी सर्व कार्यकर्त्यांना संयम राखण्याचे आपल्या कार्यकर्त्यांनाही बजावले व स्वतःही त्याचे पालन केले.
ढवळीकर यांच्या सुरक्षा पोलिसांनी त्यांना बाहेर काढल्यानंतर पोलिस आपले काहीही करू शकत नाही हे ध्यानात ठेवा,असा इशाराही त्यांनी दिल्याचे यावेळी सांगण्यात आले. दरम्यान, हा प्रकार घडल्यानंतर सुमारे पंधरा ते वीस मिनिटांनी पोलिस तेथे पोहचले. यावेळी गावडे यांना अटक करण्याचे सोडून जबानी घेण्यातच पोलिसांनी वेळ काढला. आता चोवीस तास संपले तरी गावडे यांना अटक किंवा त्याची चौकशी करण्यासही त्यांना पाचारण करण्यात आले नसल्याने ढवळीकर समर्थकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
याप्रकरणी ढवळीकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.गोविंद गावडे यांनी भर कार्यक्रमात जो धिंगाणा घातला त्याचे सुमारे तीनशे ते चारशे लोक प्रत्यक्षदर्शी आहेत. आता पोलिस तक्रार करूनही जर त्यांना अटक होत नाही तर जनतेने काय समजावे,असे ते उद्वेगाने म्हणाले,
आपण संयम राखून आपल्या कार्यकर्त्यांनाही शांत ठेवले. अन्यथा अनर्थ घडला असता. अशा लोकांना जर पोलिसांचे संरक्षण मिळू लागले तर उद्या परिस्थिती आटोक्याबाहेर जाण्याची शक्यताही त्यांनी वर्तविली.गोविंद गावडे यांच्या घरी पोलिसांनी चौकशी केली असता ते सापडू शकले नाहीत,असे सांगून पोलिस अजूनही त्यांचा शोध घेत असल्याची माहिती मिळाली आहे.

बॉंब पेरल्याच्या वृत्ताने मडगाव पुन्हा हादरले

मडगाव, दि. १३ (प्रतिनिधी) : केवळ महिनाभरातच आज पुन्हा एकदा मडगाव शहर बॉंब पेरण्यात आल्याच्या वार्तेने हादरले. चोवीस तास गजबजलेल्या आके भागातील सिने विशांत थिएटरजवळ पार्क केलेल्या एका रुपेरी गाडीत बॉंब पेरण्यात आल्याची माहिती कोणीतरी मोबाईलवरून पोलिस नियंत्रण कक्षाला दिली. लगोलग ती मडगाव पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला देण्यात आली. मात्र त्यामुळे या एकंदर प्रकरणी पोलिसांची प्रचंड तारांबळ उडाली.
मडगावी तैनात केलेले बॉंबविल्हेवाट पथक तसेच उपनिरीक्षक रवी देसाई, रुपा खर्डे आदी मंडळी पोलिस कुमक घेऊन सिनेविशांत जवळ दाखल झाली. त्यांनी तिथे असलेल्या तीन रुपेरी गाड्या तपासल्या; पण त्यात काहीच आक्षेपार्ह आढळून आले नाही अखेर ती अफवाच असावी असा निष्कर्ष काढून हे पथक रात्री पावणे आठच्या सुमारास माघारी परतले.
जीए०८ ई४१४४, जीए०२ ए६२४९ व जीए०२ जे ५०४५ या तेथे असलेल्या रुपेरी रंगाच्या गाड्या या पथकाने तपासल्या . त्या जवळच्या दुकानदारांच्या असल्याचे आढळून आले. सायंकाळी ६-३० वाजल्यापासून ही शोध मोहीम सुरू होती. ती वेळ गर्दीची असल्याने तेथे बघ्यांचीही प्रचंड गर्दी लोटली होती. यापूर्वी अशाच प्रकारे दोनदा पोलिस व बॉंब विल्हेवाट पथकाला येथे धावपळ करावी लागली होती. नंतर पोलिसांनी केलेल्या तपासात ९९२२४४४३७५ या मोबाईलवरून नियंत्रण कक्षाला आज संदेश दिला गेला होता व कुडतरी येथील सॅबस्त्याव फर्नांडिस याचा तो मोबाईल असल्याचे आढळून आले आहे. पोलिस त्याच्या शोधात आहेत.

अमिताभ यांची प्रकृती स्थिर

मुंबई, दि. १३ : महानायक अमिताभ बच्चन यांची तब्येत सुधारत असून ते औषधोपचाराला चांगला प्रतिसाद देत आहेत, अशी माहिती लीलावती इस्पितळाचे प्रमुख डॉक्टर नरेंद्र त्रिवेदी यांनी आज सांगितले. अमिताभ यांना शनिवारी पोटात दुखायला लागल्याने इस्पितळात दाखल करण्यात आले होते.
अमिताभ बच्चन यांच्या काही चाचण्या आज घेण्यात आल्या. ते आज उत्साही आणि प्रफुल्लित दिसले, असे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले. त्यांना घरी पाठविण्याबाबत अद्याप डॉक्टरांनी काहीही निर्णय घेतलेला नाही, असे त्यांनी सांगितले.

निर्देशांक पुन्हा ११ हजारांवर

मुंबई, दि. १३ : मागील आठवड्याच्या तुलनेत गुंतवणूकदार आज बऱ्यापैकी आश्वस्त झाल्याने मुंबई शेअर बाजारातील निर्देशांकाने जवळपास ८०० हून अधिक अंकांची वाढ दर्शवित ११ हजारांचा टप्पा गाठला.
आशिया तसेच युरोपीय बाजारांमध्ये आज बरेच सकारात्मक वातावरण होते. भारताबाबत विचार करायचा झाला तर आज बाजार सुरू होण्यापूर्वी अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनी जारी केलेले वक्तव्य बाजार सावरण्यास बऱ्याच अंशी कारणीभूत ठरले. त्यांनी गुंतवणूकदार आणि ठेवीदारांना आश्वस्त करीत त्यांचा पैसा भारतीय बॅंकांमध्ये सुरक्षित असल्याचे वक्तव्य दिले. या वक्तव्याने शेअर बाजाराची रयाच पालटली.
३० शेअर्सवर आधारित निर्देशांक आज दिवसअखेर ८०४.३८ अंकांनी वाढून ११,३३२.२० वर बंद झाला. आज निर्देशांकात जवळपास ७.७६ टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली. नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या निफ्टीतही आज २१०.७५ अंकांची वाढ झाली. आज निफ्टी ६.४३ टक्क्यांनी वाढून ३४९०.७० वर बंद झाला.
आज आयसीआयसीआय बॅंकेच्या उच्चाधिकाऱ्यांनीही वक्तव्य जारी करीत बॅंकेविषयी चुकीच्या अफवा पसरविल्या जात असल्याचे म्हटले. त्यामुळे बॅंकेचे शेअर्सही आज २५ टक्क्यांनी वधारले. बॅंकेविषयी चुकीच्या माहितीचा प्रसार करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे संकेतही आज देण्यात आले.

Monday 13 October, 2008

उद्या"कुंकळ्ळी बंद '

गुन्हा अन्वेषण तपासाची मुदत आज समाप्त
बाबूंच्या प्रतिमेचे दहन व अटकेची मागणी

मडगाव, दि.१२ (प्रतिनिधी) - उस्किणीबांद-कुंकळ्ळी येथील श्रीदेवआजोबा घुमटीच्या विध्वंसानंतर कुंकळ्ळी नागरिकांनी त्या घटनेच्या तपासासाठी सरकारने स्थापन केलेल्या गुन्हा अन्वेषणाच्या खास विभागाला गुन्हेगारांना अटक करण्यासाठी दिलेली मुदत उद्या सोमवारी सकाळी ११ वा.संपत असून त्यामुळे तमाम दक्षिण गोव्याचे लक्ष कुंकळ्ळीकडे लागून आहे. दुसरीकडे हा गंभीर प्रकार सरकारने ज्या पध्दतीने हाताळला त्याविरूध्द मंगळवारी "कुंकळ्ळी बंद'ची हाक देण्यात आली आहे. येथील परिस्थिती वरकरणी शांत असली तरी येथील लोकांच्या मनात सरकारच्या निष्क्रियतेबाबत खदखदत असलेला असंतोष प्रत्येक ठिकाणी दिसून येत आहे.
आज दुपारी झालेल्या नागरिकांच्या बैठकीत " बंद 'चा निर्णय घेण्यात आला. सकाळी ६ ते सायंकाळी ६ दरम्यान हा बंद असेल. लोकांनी त्यासाठी सहकार्य करावे असे आवाहनही करण्यात आले.
दुसरीकडे पंचायत मंत्री बाबू आजगावकर यांनी कुंकळ्ळी घटनेप्रकरणी केलेल्या विधानाचा कडाडून निषेध करण्यात आला व त्यांनी कुंकळ्ळीकरांची जाहीर माफी मागेपर्यंत त्यांना कुंकळ्ळी प्रवेश बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. तेवढ्यानेही समाधान न झाल्याने त्यांच्या प्रतिमेचे दहन करण्यात आले. तसेच त्यांना अटक करावी अशी मागणीही करण्यात आली .विशाल देसाई, विष्णू देसाई, पीटर फर्नांडिस, ऑस्कर मार्तीन्स , कमलाक्ष प्रभुगावकर , प्रज्योत देसाई व मारुती देसाई यांची यावेळी भाषणे झाली. सर्वांनी बाबू आजगावकर यांच्या विधानाचा निषेध केला, तसेच पुढील कृतीबाबत चर्चा करण्यात आली.
देवआजोबा प्रकरणी कोणा संशयिताला अटक केल्याचे जे सांगितले जात आहे त्यावरही यावेळी विचारविनिमय केला गेला व गेल्या वर्षी बांबोळी येथे गणपती मूर्ती तोडफोड प्रकरणी अशाच प्रकारे कोणा वेडसर इसमाने ते कृत्य केल्याचा खुलासा पोलिसांनी केला होता याची आठवण क रून दिली गेली पण त्याची पुनरावृत्ती या प्रकरणात होऊ दिली जाणार नाही, असा इशारा बैठकीत दिला गेला. शेवटी प्रज्योत देसाई यांनी आभार मानले.
बैठकीपूर्वी देव आजोबापाशी जाऊन सांगणे करण्यात आले. प्रेमानंद देसाई यांनी ते सांगणे केले. जो आघात केला गेला आहे तो करणाऱ्याला तूच शोधून काढ व लोकांसमोर उभा कर अशी सांगणी केली गेली.
दरम्यान, हा प्रकार घडल्यापासून सदर घुमटीकडे पोलिस पहारा ठेवण्यात आलेला आहे.

सहा राज्यांच्या तारखा आज जाहीर होणार

विधानसभा निवडणूक
नवी दिल्ली, दि.१२ - राजस्थान, मध्यप्रदेश, दिल्ली, छत्तीसगड आणि दिल्लीसह सहा राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा उद्या १३ रोजी जाहीर केल्या जाणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.
शनिवारी मुख्य निवडणूक आयुक्त एन. गोपालस्वामी यांच्या उपस्थितीत आयोगाची एक बैठक झाली. त्यात या राज्यांमधील निवडणुकांच्या अनुषंगाने सर्व मुद्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. जवळपास अडीच तासपर्यंत चाललेल्या या बैठकीत सुरक्षेसह सर्व मुद्यांवर सांगोपांग चर्चा झाली असली तरी, किती टप्प्यांत मतदान घ्यायचे या मुद्यावर सर्वाधिक खल झाल्याचे समजते. कमीत-कमी कालावधीत मतदान घ्यायचे तर सुरक्षेचा मोठा प्रश्न आहे. अर्थात, राजस्थान, मध्यप्रदेश आणि दिल्ली येथील निवडणुकांमध्ये गडबडीची शक्यता सर्वात कमी असल्याचे आयोगाचे म्हणणे पडले. नक्षल प्रभावित छत्तीसगडबाबत आयोगाला सर्वाधिक चिंता आहे. त्यामुळे शनिवारच्या बैठकीत आयोगाने सर्व राज्यांच्या निवडणूक अधिकाऱ्यांनी पाठविलेल्या अहवालाची समीक्षा केली. राज्यांमधील मतदार यादींची स्थिती, मतदान केंद्रांची संख्या, संवेदनशील केंद्रांची ओळख आदींचाही विचार झाला.

हा संघ विचाराचा गौरव

प्राचार्य वेलिंगकर यांचा षष्ट्यब्दिपूर्ती सोहळा
पणजी, दि. १२ (प्रतिनिधी) - गोव्याचे स्वत्व जपण्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने दिलेले योगदान अभूतपूर्व असून भविष्यातदेखील संघाचा हा विचारच देशाला व गोव्याला तारक ठरणार आहे, असे प्रतिपादन प्राचार्य सुभाष वेलिंगकर यांनी आज येथे केले.
गोव्याच्या सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक व धार्मिक क्षेत्रांतील एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व म्हणून सर्वपरिचित असलेले प्राचार्य वेलिंगकर यांच्या षष्ट्यब्दिपूर्तीनिमित्त त्यांचा आगळावेगळा गौरव येथील कला अकादमीच्या मा. दीनानाथ कला मंदिरात त्यांचे शेकडो चाहते व हितचिंतकांच्या उपस्थितीत 'संपन्न' झाला. त्याप्रसंगी आपल्या गौरव सोहळ्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
प्राचार्य वेलिंगकर म्हणाले, समर्पित भावनेने काम केलेल्या संघ स्वयंसेवकांनी गोव्याचे सांस्कृतिक व सामाजिक संचित टिकवून ठेवले. या स्वयंसेवकांनी स्वतःच्या घरावर तुळशीपत्र ठेवून संघाच्या कामाला वाहून घेतले. त्या कामाला आलेली फळे सध्या आपण चाखत आहोत. फक्त संघातच सर्वसमावेशकता आहे. म्हणून कोणाच्या टीकेमुळे संघ ही संस्था कधी हळवी होत नाही. संघात स्वयंसेवकांची तळहातावरील फोडासारखी काळजी घेतली जाते. मात्र व्यक्तिस्तोम अजिबात माजवले जात नाही. हेच या संस्थेचे वेगळेपण आहे." मी'पणा संपून "आम्ही' हा शब्द सहजच ओठावर येतो हा बदल केवळ संघाच्या संस्कारामुळेच शक्य झाला. आजचा हा गौरव म्हणजे आपला वैयक्तिक नसून आपल्याबरोबर कार्य केलेल्या संघ सहकाऱ्यांना मिळालेला मानाचा मुजराच होय अशी आपली धारणा आहे.
कोकण प्रदेश संघचालक उपेंद्र तथा बापूसाहेब मोकाशी (डोंबिवलीतील उद्योजक) यांनी प्राचार्य वेलिंगकर म्हणजे चालते-बोलते विद्यापीठ असल्याचे सांगून त्यांच्या कार्याचा यथार्थ गौरव केला. भटके विमुक्त परिषदेचे अध्यक्ष भिकूजी इदाते यांनी संघशक्ती म्हणजे काय आणि केवळ राष्ट्रीयच नव्हे तर जागतिक समाजकारणातही ही संस्था कशी मार्गदर्शकाची भूमिका बजावत आहे याविषयी विवेचन केले. प्राचार्य वेलिंगकर यांनी गोव्यात संघाचे काम कसे रुजवले व आज त्याचे वटवृक्षात कसे रूपांतर झाले आहे हा इतिहासाच त्यांनी ओघवत्या शैलीत मांडला.
गौरव सोहळा समितीचे कार्यवाह सुभाष देसाई यांनी प्राचार्य वेलिंगकर यांच्या कार्याचा गौरव करतानाच सौ. सुषमा वेलिंगकर यांनी कौटुंबीक आघाडी कशी सांभाळली याची उदाहरणे दिली.
दत्ता नाईक यांनी "गोव्यातील संघकामाचे शिल्पकार' अशी उपाधी प्राचार्य वेलिंगकर यांना बहाल केली. घटावर घट ठेवत जावे, तसे वेलिंगकर सरांचे जीवन असून १९६२ पासून त्यांचा हा संघसेवेचा महायज्ञ सुरू असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. सामाजिक समरसतेचे ज्वलंत उदाहरण म्हणजे संघ असे सांगताना त्यांनी प्राचार्य वेलिंगकर यांच्या जीवनशैलीस उद्देशून "नाही पुण्याची बोचणी, नाही पापाची बोचणी..' या कवितेचा दाखला दिला.
त्यापूर्वी वेलिंगकर सरांची मुलाखत वल्लभ केळकर व गजानान नांद्रेकर यांनी घेतली. या मुलाखतीच्या प्रारंभीच सरांनी मला स्वतःबद्दल बोलताना खूपच संकोचल्यासारखे वाटत आहे, असे सुरुवातीसच सांगितले तेव्हा हास्याची लकेर उमटली. सरांनी आपला जीवनपटच मोजक्या शब्दांत आपल्या चाहत्यांसमोर मांडला व यात साऱ्या कुटुंबाचे योगदान अनन्यसाधारण असल्याचे सांगितले. सर्वांना बरोबर घेऊन जा हा विचार संघाने आपल्याला दिला. त्यातून आपली जडणघडण होत गेली. सज्जनांची निष्क्रियता ही दुर्जनांच्या आक्रमकतेपेक्षा जास्त धोकादायी असल्याचे प्रतिपादन त्यांनी याप्रसंगी केले.
प्रा. अनिल सामंत यांनी रसाळ शैलीत सूत्रसंचालन केले. शालेय महापरिवार ही योजना देशभरात फसली, पण वेलिंगकर सरांनी अफाट परिश्रम घेऊन ती गोव्यात यशस्वी करून दाखवल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले. याप्रसंगी मंत्रोच्चारांच्या गजरात वेलिंगकर सरांना बापूसाहेब मोकाशी यांच्या हस्ते पारंपरिक समई, शाल श्रीफळ व मानपत्र देऊन गौरवले तेव्हा त्यांच्या अनेक चाहत्यांचे आणि हितचिंतकांचे डोळे आनंदाश्रूंनी वाहू लागले.मानपत्राचे वाचन प्रा. सामंत यांनी केले. भालचंद्र सातार्डेकर व दुर्गानंद नाडकर्णी या ऋषितुल्यांनी प्राचार्य वेलिंगकर यांना आशीर्वाद दिले. तसेच सौ. सुषमा वेलिंगकर यांना सौभाग्यलेणे प्रदान करण्यात आले. बाळकृष्ण केळकर यांनी याकार्यक्रमास अनुषंगाने खास गीत सादर केले.
गोव्याच्या सांस्कृतिक श्रीमंतीत न्हालेल्या संध्याकाळी झालेल्या या ऐतिहासिक गौरव सोहळ्याला विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर, भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार श्रीपाद नाईक, माजी मुख्यमंत्री शशिकला काकोडकर, संजय वालावलकर, असंख्य संघ स्वयंसेवक, वेलिंगकर सरांचे चाहते, हितचिंतक आवर्जून उपस्थित होते.

...तर ओसामा बिन लादेनने आश्रम सुरु केले असते - तोगाडिया

पणजी, दि. १२ (प्रतिनिधी) - हिंदू धर्म हा मानव जीवनात येणाऱ्या दुःखाचे सुखात परिवर्तन करण्याचे साधन आहे. ओसामा बिन लादेन याला हिंदू धर्माचे संस्कार मिळाले असते तर, त्यांनी दऱ्याखोऱ्यांत मानवतेचे शिक्षण देणारे आश्रम सुरू केले असते, असे मत विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय सरचिटणीस डॉ. प्रवीण तोगाडिया यांनी आज कांपाल येथे भरलेल्या मातृमेळाव्यात व्यक्त केले. प्राथमिक वर्गात शिक्षण न घेतलेलीही आई छत्रपती शिवाजी महाराज घडवू शकते, त्यामुळे आपल्या कुटुंबातील मुलामुलींना हिंदू संस्कारांचे शिक्षण द्या, असे आवाहन डॉ. तोगाडिया यांनी केले.
यावेळी व्यासपीठावर परिषदेचे केंद्रीय उपाध्यक्ष अशोकराव चौगुले, केंद्रीय सहमंत्री मधुकर दीक्षित, क्षेत्रसंघटक प्रशांत हरताळकर, दक्षिण गोवा प्रमुख सरिता बखले, उत्तर गोवा प्रमुख निता कळंगुटकर व उत्तर गोवा जिल्हा मंत्री मुकुंद कवठणकर उपस्थित होते. हिंदू धर्म मृत्युंजय आहे. तो लुटण्याचा कोणी प्रयत्न केल्यास गप्प बसणार नसून त्याला तेवढ्याच ताकदीने उत्तर दिले जाईल, असे ते म्हणाले. यावेळी समाजासाठी मौलिक योगदान दिल्यामुळे तीन महिलांचा यावेळी डॉ. तोगाडिया यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. सौ. रूपाली सुहास बखले(शिक्षण एम.ए.) या वास्को येथे महिलांचे ५० बचत गट चालवत असल्याने त्यांना यावेळी गौरविण्यात आले. सौ. मिना प्रभाकर आमशेकर (शिक्षण एम.एसस्सी.) या साकोर्डा येथे दूध सोसायटी चालवत असून पन्नास कुटुंबे त्यावर अवलंबून आहेत, तर श्रीमती साकरी हिने आपल्या गाई एका खाटिकाने चोरून कत्तलखान्यात नेल्याने त्याच्या विरोधात जोरदार आंदोलन केल्याने त्यांनाही यावेळी डॉ. तोगाडिया यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
भारतात ८५ कोटी तर विदेशात ४ कोटी हिंदू आहेत. जगात असलेल्या सर्व धर्मांमध्ये हिंदू धर्म हा विचाराने, आदर्शाने, संस्काराने तसेच समाज व्यवस्थेने भिन्न आहे. हिंदू धर्मात शरीरापेक्षा आत्म्याला अधिक महत्त्व आहे, तर अन्य धर्मात शरीराला महत्त्व आहे. या धर्मात स्त्री आणि पुरुषाला तेवढेच महत्त्व दिले जाते. त्यामुळे भारतात नारीमुक्तीची आंदोलने सुरू झाली नाहीत. देवीची पुजा ही अन्य कोणत्याच धर्मात नाही. अमेरिकेत आई, वडिलापासून वंचित राहणारी अनेक मुले आहेत. कारण तो मुलगा मोठा होईपर्यंत आई १५ व्या पतीबरोबर तर वडील २० व्या पत्नी बरोबर असतात. परंतु भारतातील ८० वर्षाची वृद्ध बाई आपल्या एकाच पतीबरोबर राहते,असे ते म्हणाले.
गोव्यात वास्को द गामा आले त्यावेळी त्यांच्याबरोबर काही पाद्रीही धर्मांतर करण्यासाठी आले. त्यावेळी याठिकाणी धर्मांतरण करण्यासाठी अनेक हिंदूंवर अत्याचार केले, तरीही ते पूर्ण गोव्याला ख्रिस्ती करून शकले नाहीत. भारतात औरंगजेबाने तलवारीच्या ताकदीवर तर, खिश्चनिटीने "डॉलर'च्या बळावर हिंदूचे धर्मांतरण करण्याचे प्रयत्न केले. मात्र ते यशस्वी ठरले नाहीत, कारण आमची संस्कार देण्याची परंपरा आहे. भारतातील प्रत्येक कुटुंब हे कॅम्ब्रिज विद्यापीठ आहे आणि घरातील आई ही त्याची कुलगुरू असल्याचे डॉ. तोगाडिया म्हणाले.
मुलामुलींना संस्कार दिले नाहीत, तर गंभीर परिस्थिती निर्माण होणार आहे. कारण विद्यालयात तसेच शिक्षणात हे संस्कार मुलांना मिळत नाही. त्यामुळे प्रत्येक पालकाने आपल्या पाल्यांना संस्कार दिलेच पाहिजे. त्यासाठी गावागावांत महिलांनी संस्कार केंद्र सुरू करावे. गावातील मंदिरात मुलामुलींनी तसेच महिलांनी ठरवून एक दिवस एकत्र येऊन आरत्या कराव्या. धर्मावर येणाऱ्या संकटावर चर्चा करावी, असे आवाहन डॉ. तोगाडिया यांनी यावेळी केले.
या मेळाव्याला संपूर्ण गोव्यातील मातृशक्तीने मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली होती. मेळ्याचे सूत्रसंचालन डॉ. अनिता तिळवे व सौ. प्रभात वेर्णेकर यांनी केले.

दक्षिण गोव्यात तीव्र पाणीटंचाई


तीन दिवस पाणी पुरवठा बंद!
मडगाव, दि.१२ (प्रतिनिधी) - साळावली ते मडगाव असा पाणीपुरवठा करणाऱ्या १६००एमएम व्यासाच्या जलवाहिनीला आज पहाटे कुशावती पुलालगत इग्रामळ येथे भले मोठे भगदाड पडल्यामुळे संपूर्ण दक्षिण गोव्यावर तीव्र पाणीटंचाईचे संकट उद्भवले आहे. पाणीपुरवठा विभागाने या संकटामुळे १२, १३ व १४ असे सलग तीन दिवस या वाहिनीतून होणारा पाणी पुरवठा बंद राहणार असल्याचे लोकांना कळविल्यामुळे नळाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पहाटे ५ वा. च्या सुमारास ही जलवाहिनी फुटली, गेले काही दिवस येथे पाणी गळती सुरू होती. काल रात्रीपासून पाणी गळती वाढली व आज पहाटे वाहिनी फुटली असावी असा कयास आहे. ते वृत्त येताच कार्यकारी अभियंता परांजपे ,अन्य अधिकारी व तांत्रिक पथक घटनास्थळी धावून गेले. त्यापूर्वीच जलवाहिनीतून होणारा पाणीपुरवठा बंद केला गेला होता. खात्याने फुटलेल्या जागी बसवण्यासाठी नवा लोखंडी पाईप उपलब्ध करून ठेवला होता. तो लगेच घटनास्थळी आणण्यात आला व पोकलीनच्या साह्याने फुटलेला पाईप काढताना त्याचा चक्काचूर होऊन गेल्याचे आढळून आले.त्यानंतर तेथील सर्व पाणी उसपण्यास प्रारंभ करण्यात आला ते काम सायंकाळी ५ वा. संपल्यावर त्याजागी नवा पोलादी पाईप बसवून त्याचे वेल्डिंग सायंकाळी ५-३० वा. हाती घेण्यात आले होते.
श्री. परांजपे यांच्याशी संपर्क साधला असता वेल्डिंगचे काम अंदाजे रात्रौ दीड ते २ वा. संपेल व त्यानंतर साळावलीहून वाहिनीत पाणी सोडले जाईल व ते मडगावात उद्या दुपारी २ ते अडीच पर्यंत पोचेल. खंडीत पुरवठा पूर्ववत सुरू केल्यावर रिकामी झालेली जलवाहिनी पूर्ववत भरण्यास किमान १२ तास लागतात, असे ते म्हणाले.
त्यांनी दिलेल्या माहितीनुसार आजची घटना घडली ती जागा अत्यंत अडचणीची होती परंतु सर्व साधनसामग्री वेळेवर उपलब्ध झाली व त्यामुळे कोणत्याच अडथळ्याविना व अपेक्षेपेक्षा कमी वेळात जलवाहिनी दुरुस्त झाली. वेल्डिंगचे काम रात्री करण्यासाठी तेथे दोन जनरेटर तैनात केले गेल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, वारंवार उद्भवणाऱ्या समस्येवर मात करण्यासाठी हाती घेतलेल्या साळावली- मडगाव समांतर जलवाहिनीचे काम अंतिम टप्प्यात असून डिसेंबरमध्ये ती वाहिनी कार्यरत केली जाईल अशी घोषणा सार्वजनिक बांधकाममंत्री चर्चिल आलेमांव यांनी केलेली असली तरी कामाची एकंदर व्याप्ती व गती पाहता ते शक्य होईल असे दिसत नाही. मडगाव - केपे दरम्यानचे समांतर जलवाहिनीचे २ कि. मी.काम बाकी आहे व त्यातील १.२ कि. मी. चा भाग घोगळ येथील आहे.

Sunday 12 October, 2008

प्राचार्य सुभाष वेलिंगकर यांचा आज गौरव सोहळा

पणजी, दि. ११ (प्रतिनिधी) - गोव्याच्या सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक अशा सगळ्याच क्षेत्रांत गेली अनेक वर्षे आघाडीवर राहून कार्य करणारे आणि त्या त्या क्षेत्राला नेतृत्व आणि दिशा देण्याचे काम करणारे गोव्यातील एक मान्यवर समाजधुरीण तथा देशभक्त प्राचार्य सुभाष भास्कर वेलिंगकर यांच्या षष्ट्यब्दिपूर्ती निमित्त उद्या (रविवारी) पणजीत भव्य गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी ३.३० वाजता कला अकादमीच्या दिनानाथ मंगेशकर कला मंदिरात होणाऱ्या या सोहळ्यात कोकण प्रदेश संघचालक उपेंद्र तथा बापूसाहेब मोकाशी हे प्रमुख अतिथी तर भटके विमुक्त विकास परिषदेचे अध्यक्ष भिकूजी तथा दादा इदाते प्रमुख वक्ते असतील.
एक हाडाचा शिक्षक, प्रेमळ गुरू, कर्तव्यनिष्ठ नागरिक, जाज्ज्वल्य देशभक्त, संवेदनशील संस्कृतीप्रेमी अशा अनेक रूपांत प्राचार्य वेलिंगकर गेली अनेक वर्षे अविश्र्रांत वावरत आहेत. अनेक संस्था, माणसे, कार्यकर्ते, नेते घडविण्यात त्यांनी मोठेच योगदान दिले आहे. प्रा. वेलिंगकर यांना मानणारी, त्यांचे कार्य, विचार आणि शिकवणीने प्रेरीत झालेली शेकडो माणसे आज केवळ गोव्यातच नव्हे तर कोकण आणि महाराष्ट्राच्या विविध भागांमध्येही सापडतात. निर्भयता, स्पष्टवक्तेपणा, वक्तशीरपणा, नियोजनबध्दता या गुणांमुळे आज अनेकांचे ते आदर्श आहेत. प्राचार्य वेलिंगकर यांच्या गौरव समारंभासाठी त्यांचे मित्र, चाहते, शिष्य, विद्यार्थी, सहकारी आणि गोव्याच्या विविध भागातील नागरिक यांनी गेल्या काही दिवसापासून कंबर कसली आहे.

आधी "बेपत्ता' व मग "खून' झालेली मेघना सुभेदार घरी परतली...

पणजी, दि.११ (प्रतिनिधी) -गेल्या एप्रिलमध्ये मुंबई येथील छत्रपती शिवाजी रेल्वेस्थानकावरून (सीएसटी) बेपत्ता झालेली व पोलिस चौकशीअंती ती गोव्यात पोहोचल्याचा पुरावा मिळाल्यानंतर कांदोळी येथे अत्यंत कुजलेल्या अवस्थेत सापडलेला युवतीचा मृतदेह तिचाच असावा, इथपर्यंत चौकशीचे धागेदोरे पोहोचलेल्या प्रकरणातील बंगळूरस्थित सॉफ्टवेअर अभियंता मेघना सुभेदार(२९) ही पुणे येथे आपल्या आजोबांच्या घरी परतल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
याप्रकरणी "सीएसटी' पोलिस अधिकारी अनिल माने यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार मेघना पुणे येथे आपल्या आजोबांच्या घरी पोहचल्याचा संदेश त्यांना मिळाला. त्यांनी लगेच तिथे धाव घेतली व चौकशी केली असता तिची मानसिक अवस्था बिघडल्याचे त्यांच्या लक्षात आले. पोलिसांनी विचारलेल्या प्रश्नांना नीट उत्तरे देणेही तिला जमत नव्हते व ती असंबंद्ध बडबडत असल्याचे पोलिसांनी सांगितले. साहाय्यक पोलिस आयुक्त बापू ठोंबरे यांनी मेघनाची विचारपूस असता एका जमावाने आपल्यावर दगडफेक केल्यामुळे डोक्याला जखम झाल्याचे तिने सांगितले. पोलिसांनी डॉक्टरांचे मत जाणून घेतले असता तिच्या डोक्याला लागलेल्या मारामुळेच कदाचित तिला पुणे येथे आपले नातेवाइक असल्याची आठवण झाली असावी, अशी शक्यता डॉक्टरांनी बोलून दाखवली.
दरम्यान,याप्रकरणी पोलिसांनी मिळवलेल्या माहितीनुसार मेघनाने कोथरूड येथील आपल्या काकांना शुक्रवारी संध्याकाळी ५.३० वाजता "पीसीओ'वरून फोन केला. मी फार घाबरले असून काही गुंड माझा पाठलाग करीत असल्याची तक्रार केली होती. यावेळी तिच्या काकांनी लगेच सदर "पीसीओ'तून तिला घरी आणल्याचीही माहिती देण्यात आली आहे. त्यावेळी तिच्याकडे अवघे तीन रुपये होते. शिवाय तिच्या शरीरावर अनेक जखमा झाल्याची माहिती तिच्या काकांनी पोलिसांना दिली आहे. तपासअधिकारी माने यांनी तिची चौकशी केली असता तिने आपण कोल्हापूर व दक्षिण भारतातील विविध शहरांत फिरल्याची माहिती दिली. ती हैदराबादहून पुण्याला आल्याचेही तिने सांगितल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
११ एप्रिल ०८ पासून मेघना ही मुंबई येथील सीएसटी रेल्वेस्थानकावरून बेपत्ता झाली होती. त्यानंतर ती गोव्यात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. १५ एप्रिल रोजी सायंकाळी ५ च्या दरम्यान तिने मडगावातील "एटीएम' मधून पैसे काढल्याचे "सीसी टीव्हीव्दारे सिद्ध झाले होते. त्यानंतर कळंगुट येथील दोघा युवकांकडे तिचा नोकिया कंपनीचा "एन७४' मोबाईल सापडला होता. याप्रकरणी कळंगुट पोलिसांनी मौला अल्लाबक्श व मेहबूब मौलासाब याची चौकशी करून त्यांना सोडून दिले होते. या दोघांकडे हा मोबाईल कोठून आला, याचा शोधही पोलिसांनी घेतला नाही. तसेच आपल्या मुलीचे अपहरण झाल्याचा संशय व्यक्त करून गोवा पोलिस व्यवस्थित तपास करीत नाहीत, अशी तक्रार तिचे वडील डॉ. सुभेदार यांनी पोलिस महासंचालक बी. एस. ब्रार व पोलिस महानिरीक्षक किशनकुमार यांच्याकडे केली होती.
याप्रकरणाची चौकशी सुरू असताना एक कुजलेला मृतदेह कांदोळीत पोलिसांच्या हाती लागला असता तिचे वडील डॉ. मोहन सुभेदार यांनी तिची ओळख पटवली होती. या घटनेनंतर त्यांनी आपल्या मुलीच्या खुनाचा संशय व्यक्त करून त्याविषयी तक्रार दाखल केली. नंतर पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला. तो मृतदेह मेघनाचाच असल्याचे स्पष्ट करण्यासाठी मृतदेहाची "डीएनए' चाचणी करण्याची मागणी तिच्या वडिलांनी केली होती. मेघनाची पार्श्वभूमी जाणून घेण्यासाठी बंगळूर, मुंबई व पुणे येथे गोवा पोलिसांचे एक खास पथकही रवाना करण्यात आले होते.
मेघनाचा काही वर्षांपूर्वी घटस्फोट झाला होता. ती बंगळूरला एका सॉफ्टवेअर कंपनीत कामाला होती. १० एप्रिल २००८ रोजी छत्तीसगड येथे आपल्या घरी येण्यासाठी निघाली असता ती बेपत्ता झाली होती. १० एप्रिल रोजी ती मुंबई येथील सीएसटी रेल्वे स्थानकावरून घरी निघण्यासाठी बाहेर पडलेल्या मेघना हिने आपल्या नोकरीचा राजीनामा दिल्याचीही माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, "सीएसटी' रेल्वेस्थानकावरून तिने घरी दूरध्वनी करून आपण रेल्वेतून घरी येत असल्याचे सांगितले होते व ती घरी पोहोचली नसल्याने वडिलांनी तिचा सर्वत्र शोधाशोध सुरू केली. शेवटी दि. १४ एप्रिल रोजी "सीएसटी' रेल्वे पोलिस स्थानकात ती बेपत्ता झाल्याची तक्रार नोंद करण्यात आली.
बंगळूर येथून घरी जाण्यासाठी आलेली मेघना मुंबईत पोहोचल्यावर गोव्यात कशी पोहोचली, हा प्रश्न तिच्या कुटुंबीयांना सतावत होता. पेशाने डॉक्टर असलेले सुभेदार यांचे छत्तीसगड येथे स्वतःचे इस्पितळ आहे. तथापि ते मुलीला न्याय देण्यासाठी आपली पत्नी व एका मुलीसह गोव्यात तळ ठोकून होते. मेघना सुभेदार हिची माहिती पुरवणाऱ्याला पन्नास हजार रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणाही तिच्या वडिलांनी केली होती. याच दरम्यान कळंगुट पोलिसांना एक निनावी पत्र मिळाले होते. मेघनाच्या खुनामागे रायपूर येथील एक तरुण असल्याचे या पत्रात म्हटले होते. मात्र, पोलिसांनी या तरुणाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता असा कोणताही तरुण दिलेल्या ठिकाणी आढळला नाही.

सरकारने राजीनामा द्यावा

भाजप राज्य कार्यकारिणीत राजकीय ठराव संमत
मडगाव, दि.११ (प्रतिनिधी) - कॉंग्रेसच्या राजवटीत गोव्याची सर्व क्षेत्रांत पीछेहाट सुरू असून मंत्रिमंडळात समन्वय नाही. मुख्यमंत्र्यांचे सहकाऱ्यांवर नियंत्रण व वचक नाही. त्यामुळे राज्यात बजबजपुरी माजली आहे. त्याची परिणती कायदा व सुव्यवस्था स्थिती ढासळण्यात झाल्याने सरकारला सत्तेवर रहाण्याचा अधिकार उरलेला नाही. म्हणून विद्यमान सरकारने त्वरित राजीनामा द्यावा, अशा मागणीचा राजकीय ठराव राज्य भाजप कार्यकारिणीच्या आज येथे झालेल्या बैठकीत संमत करण्यात आला.
राजधानी बाहेर राज्य कार्यकारीणीच्या बैठका घेण्याच्या निर्णयानुसार दर तीन महिन्यांनी होणारी अशा प्रकारची पहिली बैठक आज पार पडली. बैठकीनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार श्रीपाद नाईक यांनी ही माहिती पत्रकारांना दिली. त्यांच्यासमवेत खासदार तथा भाजपाचे गोवा प्रभारी राजीव प्रताप रूडी व भाजपचे विधिमंडळ पक्षनेते मनोहर पर्रीकर आणि प्रवक्ते प्रा. गोविंद पर्वतकर उपस्थित होते.
प्रदेशाध्यक्ष नाईक म्हणाले, की सरकार स्वार्थात बुडून गेले आहे. लोकभावनेची त्याला कल्पना नाही. राज्यात घरफोडी, चोरी घडली नाही, असा दिवसच जात नाही.
खुद्द मुख्यमंत्र्यांच्या निवासाशेजारी चोऱ्या होतात याचा अर्थ गुन्हेगारांना सरकारी यंत्रणेचा धाक उरलेला नाही.
गेल्या काही दिवसांत मूर्तिभंजनाचे जे १८ प्रकार घडले त्याबाबत सरकार अजूनही गंभीर नाही यावरून सत्ताधाऱ्यांचे त्यात हितसंबंध असावेत अशी शंका येते किवा सरकार त्याकडे हेतूपूर्वक दुर्लक्ष करीत असावे, असा दावा त्यांनी केला.
यासंदर्भात पंचायतमंत्री बाबू आजगावकर यांनी केलेल्या निवेदनावर टीका करताना ते म्हणाले, राजकीय चष्म्यातून अशा प्रकारांकडे पाहून चालत नाही. सरकारला ज्याअर्थी इतक्या घटना घडूनही गुन्हेगार सापडत नाही त्याअर्थी सरकार जनतेपासून काहीतरी लपवत आहे, किंवा ते लोकांची फसवणूक करत आहे. आजगावकरांना गुन्हेगार कोण ते ठाऊक असेल तर त्यांनी ती गोष्ट पोलिसांच्या लक्षात का आणून दिली नाही?
देशात पहिल्या क्रमांकावर असलेले राज्य सातव्या क्रमांकावर घसरावे ही शोकांतिका आहे. हे सरकार सत्तेवर उरले तर गोव्याच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होणार आहे.
आजच्या बैठकीत गेल्या तीन महिन्यांतील कामाचा आढावा घेण्यात आला. आगामी तीन महिन्यांसाठीच्या कार्यक्रमांवरही चर्चा झाल्याची माहिती नाईक यांनी दिली. भाजपचे सहसंघटनमंत्री व्ही. सतीश यांनीही बैठकीत मार्गदर्शन केले.

आरोप सिद्ध करा अन्यथा माफी मागा

मंदिर सुरक्षा समितीचे बाबूंना आव्हान
फोंडा, दि.११ (प्रतिनिधी) - राज्यात हिंदू देवतांची विटंबना व मंदिर नासधूस प्रकरणांची संख्या वाढत असून दोषींना हुडकून काढण्यात पोलिसांना पूर्णपणे अपयश आले आहे. सरकारच्या अपयशावर पांघरूण घालून या प्रकरणांत हिंदू संघटनाच सामील असल्याचा जो जावईशोध पंचायतमंत्री बाबू आजगावकर यांनी लावला आहे, त्याचा जाहीर निषेध करून बाबू यांनी या विधानाबाबत माफी मागावी अन्यथा त्यांनी आपले वक्तव्य सिद्ध करून दाखवावे,असे जाहीर आव्हान आज मंदिर सुरक्षा समितीच्या बैठकीत देण्यात आले.
विद्यमान सरकारकडून राज्यातील हिंदूंच्या सहनशीलतेचा दुरुपयोग होत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. एवढी प्रकरणे घडूनही राज्यातील हिंदू लोक अजूनही शांत आहेत; परंतु आता दोषींना पकडण्याचे सोडून या प्रकारांत हिंदू संघटनाच सामील असल्याची टूम सरकार पक्षातील काही नेत्यांनी सुरू केली आहे. हिंदूंना भडकवून त्यावर आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचा तसेच हिंदू संघटनांवर दोषारोप करण्याची ही कृती अत्यंत निंदनीय असल्याची टीकाही यावेळी करण्यात आली.
तापलेल्या वातावरणात तेल ओतण्याचे जे प्रकार सरकारातील काही नेत्यांनी सुरू केले आहेत,ते ताबडतोब बंद करावेत व गुन्हेगारांना शोधून काढण्यासाठी सरकारवर दबाव टाकावा,असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
गृहमंत्र्यांनीही या प्रकरणांत कोण गुंतले आहेत हे पोलिसांना माहीत असल्याचे विधान केले आहे तर मग दोषींना पकडण्यात दिरंगाई का होत आहे,असा खडा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला.
बाबू आजगावकर यांनी अशी बेजबाबदार विधाने करू नयेत. खरोखरच हिंदू लोकांकडूनच आपल्या देवतांची विटंबना व मंदिरांची नासधूस सुरू आहे असे बाबू यांना वाटत असेल तर त्यांनी या लोकांची नावे जाहीर करावीत,असे आवाहनही यावेळी करण्यात आले. विनाकारण हवेत वक्तव्ये करून बाबू आजगावकर यांनी आपल्या अकलेचे तारे तोडू नयेत,असे समितीने म्हटले आहे.
कुंकळ्ळी येथील मंदिर नासधूस प्रकरणाचा निषेध करून कुंकळ्ळीवासियांनी चालवलेल्या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. यापुढे मंदिर सुरक्षा समित्यांच्या तालुकास्तरीय समित्यांतर्फे जनजागृती करण्यात येणार असून मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या सर्व कार्यक्रमांवर बहिष्कार घालण्याचे आवाहन लोकांना केले जाईल,असा निर्णयही यावेळी घेण्यात आला. राज्यात मंदिर तोडफोड प्रकरणांची संख्या वाढत असताना एकही गुन्हेगार हाती लागत नाही,याचा जाब त्यांना अशा कार्यक्रमांत जाहीरपणे विचारला जाईल,असेही यावेळी ठरवण्यात आले.
या बैठकीला राज्यभरातील विविध देवस्थान समित्यांचे पदाधिकारी शेकडो संख्येने उपस्थित होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी समितीचे निमंत्रक राजू वेलिंगकर,बजरंग दलाचे गोवा राज्य प्रमुख विनायक च्यारी व हिंदू जनजागृती समितीचे जयेश थळी आदी अनेकजण उपस्थित होते.

लोकसभा निवडणूक प्रचाराचा गोव्यात १ नोव्हेंबर रोजी शुभारंभ

अडवाणी येणार; दहशतवाद, घुसखोरी, महागाई मुख्य मुद्दे
मडगाव, दि. ११ (प्रतिनिधी) - आगामी लोकसभा निवडणूक प्रचाराचा गोव्यातील नारळ भाजप येत्या १ नोव्हेंबर रोजी फोडणार असून त्यासाठी राष्ट्रीय पक्षाध्यक्ष लालकृष्ण अडवाणी गोव्यात आवर्जून येणार आहेत. तसेच आगामी निवडणुकीसाठी दहशतवाद, घुसखोरी व महागाई हे भाजपचे मुख्य मुद्दे असतील, अशी माहिती भाजपचे गोवा प्रभारी खासदार राजीव प्रताप रुडी व प्रदेशाध्यक्ष खासदार श्रीपाद नाईक यांनी आज येथे पत्रपरिषदेत दिली. विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर व राज्य प्रवक्ते प्रा. गोविंद पर्वतकर याप्रसंगी उपस्थित होते.
येत्या १ नोव्हेंबर रोजी गोव्यात विजय संकल्प मेळावा घेतला जाईल व तो भाजपच्या आजवरच्या मेळाव्यातील सर्वांत मोठा असेल. सदर मेळावा ही निवडणुकीची नांदी असेल. मेळाव्याची जागा अजून ठरलेली नसली तरी तो पणजीत वा म्हापसा येथे घेतला जाईल, असे नाईक यांनी सांगितले.
श्री. रूडी म्हणाले, भारताने अमेरिकेशी केलेल्या अणुकराबाबत भाजपने उपस्थित केलेल्या प्रश्रांचा खुलासा अजूनही अमेरिकेने केलेला नाही, त्या अर्थी या करारातून भारतावर अनेक बंधने आली आहेत. त्याला इतिहासच साक्षीदार असेल. लोकसभा निवडणुकांपूर्वी ५ राज्यांत होणाऱ्या विधानसभा निवडणुका भाजपसाठी महत्त्वाच्या आहेत. त्यापैकी मध्यप्रदेश,छत्तीसगड व राजस्थान येथे सध्या भाजपची सरकारे असून तेथे भाजप सत्ता राखेलच. शिवाय दिल्लीवरही कब्जा करेल व जम्मू काश्मीरमधील आपले स्थान अधिक बळकट करेल असा विश्वास आपणास वाटतो.
ते म्हणाले की, अमेरिकी सिनेट व बाहेर जे स्पष्टीकरण केले गेले आहे त्यावरून भारत या करारामुळे भविष्यात अणुचाचणी, अणुपुरवठा वा अणुसाठा करू शकणार नाही. म्हणजेच देशाच्या सार्वभौमत्वावरच या करारामुळे गदा आली आहे.यासंदर्भात पंतप्रधानांनी संसदेस दिलेल्या आश्र्वासनाचा भंग केला आहे. देशहिताकडे दुर्लक्ष केले आहे.देशाची खालावलेली आर्थिक स्थिती व त्यामुळे ढासळलेला शेअर बाजार याचे उदाहरण देऊन सरकारने अर्थव्यवस्थेचे चित्र स्पष्ट करावे अशी मागणी त्यांनी केली. महागाईबाबत सरकार संदिग्ध आहे. दहशतवाद दिवसेंदिवस उग्र होत चालला आहे. सर्व थरांतून दहशतवादविरोधी कारवाईची होत असताना केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री वेगळीच भाषा करतात. केंद्रीय मंत्री रामविलास पास्वान हे तर बांगलादेशी नागरिकांना नागरिकत्व देण्याची मागणी करत आहेत. मात्र भाजपचा या मागणीस तीव्र विरोध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.