Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday, 2 August, 2008

दहशतवाद रोखा, पंतप्रधानांनी पाकला सुनावले

कोलंबो, दि.२ : दहशतवादी कारवाया ताबडतोब रोखण्यास भारताने पाकिस्तानला सांगितले आहे. कोलंबोमध्ये आजपासून १५ व्या सार्क शिखर परिषदेला सुरुवात झाली. या दोन दिवसीय परिषदेत पहिल्याच दिवशी भारताने दहशतवादाचा मुद्दा उपस्थित करून संपूर्ण जगाला या मुद्दावर एकजूट होण्याचे आवाहन केल्यानंतर गेल्या अनेक वर्षांपासून दहशतवादी कारवायांना खतपाणी घालत असलेल्या पाकिस्तानला खडे बोल सुनावून दहशतवादी कारवाया रोखण्यास सांगितले आहे.
""पाकच्या भूमीवरून दहशतवादी कारवाया करण्याची परवानगी कदापिही दिली जाणार नाही, भारतासोबतचे द्विपक्षीय संबंध यापुढेही कायम राहावेत, यासाठी दहशतवादमुक्त वातावरणाची निर्मिती केली जाईल, असा शब्द आपण पत्राद्वारे लेखी दिला होता. या शब्दाशी कटिबद्ध असल्याचेही आपण म्हटले होते. मात्र, त्याची अंमलबजावणी अद्यापही झालेली नाही. आपल्या भूमीवरून भारताविरुद्ध दहशतवादी कारवाया सातत्याने सुरूच आहेत. दहशतवाद रोखण्याविषयी आपण जी इच्छा दाखविली होती, जो लेखी शब्द दिला होता, त्याची अंमलबजावणी करावी,''असे भारताचे पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी पाकिस्तानला म्हटले आहे.
""पाकिस्तानच्या भूमीवरून दहशतवादी कारवाया करू दिल्या जाणार नाहीत, असा लेखी शब्द पाकने दिला होता. या शब्दाची प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली असल्याचे पाहायला आम्हाला आवडेल. दहशतवादी कारवायांना पायबंद घालण्यासाठी पाकिस्तानने दिलेला शब्द पूर्ण केला पाहिजे,''असे पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी श्रीलंकेतील एका वर्तमान पत्राला मुलाखत देताना म्हटले. त्यांची ही मुलाखत आज प्रकाशित झालेली आहे.
""पाकिस्तानसमवेत शांततापूर्ण, मैत्रीपूर्ण आणि सहकार्याचे संबंध प्रस्थापित करण्यास भारत इच्छूक आहे. काश्मीरप्रश्नासह उभय देशांमधील प्रलंबित मुद्दे सामोपचाराने, सामंजस्याने, द्विपक्षीय चर्चेच्या मार्गाने सोडविण्याविषयी आम्ही कटिबद्ध आहोत. पाकसोबतच्या संबंधांत सुधारणा होण्यासाठी दहशतवादमुक्त वातावरण निर्माण होण्याची आवश्यकता आहे. सुरक्षात्मक वातावरणात आपापल्या देशांमधील नागरिकांची प्रगती होण्यासाठी दहशतवादमुक्त वातावरण प्रस्थापित करणे, ही आपली जबाबदारी आहे,''असेही पंतप्रधानांनी या मुलाखतीत म्हटले आहे.
दहशतवाद हा सर्वात मोठा धोका
"संपूर्ण जगातील स्थैर्यासाठी सद्यस्थितीत दहशतवाद हा सर्वात मोठा धोका बनलेला आहे. दहशतवादाची पाळेमुळे सर्वत्र खोलवर रूजलेली आहेत. या भीषण समस्येविरुद्ध लढा देण्यासाठी जगभरातील देशांना एकजूट व्हावेच लागणार आहे,''असे आवाहन पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी आज केले. श्रीलंकेची राजधानी कोलंबो येथे आजपासून सुरू झालेल्या १५ व्या "सार्क' (साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल को-ऑपरेशन )शिखर परिषदेला संबोधित करताना ते बोलत होते. "सार्क'च्या व्यासपीठावरून दहशतवादाचा मुद्दा उपस्थित करताना पंतप्रधानांनी काबूलमधील गेल्या महिन्यात भारतीय दूतावासावर झालेल्या हल्ल्याचा तसेच बंगलोर आणि अहमदाबाद शहरांमध्ये लागोपाठ झालेल्या बॉम्बस्फोट मालिकांचा उल्लेख केला.
कोलंबो येथील १५ व्या "सार्क' शिखर संमेलनात पंतप्रधानांनी दहशतवादाचा मुद्दा जोरकसपणे उचलून धरल्याने दहशतवादाला रोखण्याविषयीचा मुद्दा या शिखर परिषदेत महत्त्वाचा मुद्दा बनलेला आहे. यजमान श्रीलंका, भारत, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये नुकत्याच काही मोठ्या दहशतवादी घटना घडलेल्या आहेत. या दहशतवादी घटनांमुळे "सार्क' परिषदेत यावेळी एक मोठा बदल झाला असल्याचे दिसून येत आहे, असेच मानले जात आहे.
""दक्षिण आशियामध्ये दहशतवादाच्या समस्येने डोके किती वर काढलेले आहे, हे आपण काबूलमधील भारतीय दूतावासावर झालेला हल्ला, बंगलोर, अहमदाबादमधील बॉम्बस्फोट मालिकांच्या रूपाने पाहिलेले आहे. दहशतवादाविरुद्ध सुरू केलेली लढाई हरणे आपण सहन करू शकणार नाही. या समस्येविरुद्ध एकत्रितपणेच लढा द्यावा लागेल. आपल्या सामाजिक सलोख्याला बाधा पोहोचवू पाहणाऱ्यांना एकजुटीने ठोस प्रत्युत्तर देणे आवश्यक आहे,''असे पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी दोन दिवसांच्या सार्क परिषदेला संबोधित करताना म्हटले. या परिषदेला पाकिस्तानचे पंतप्रधान युसुफ रझा गिलानी यांच्यासह श्रीलंका, बांगलादेश, नेपाळ, भूतान, मालदिव आणि अफगाणिस्तानचे प्रतिनिधी उपस्थित होते.
गिलानींना भेटले
काबूलमधील भारतीय दूतावासावर झालेल्या आत्मघाती बॉम्बहल्ल्यात पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयचा हात असल्याचे उघडकीस आले होते. जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा येथे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी लष्कराने घुसखोरीचा प्रयत्न करताना भारतीय टेहळणी चौकींवर गोळीबार करून शस्त्रसंधीचा भंग केला होता. कारगिलनंतर झालेली ही सर्वात मोठी घुसखोरी होती. या घटनेनंतर पाकने पुन्हा गोळीबार केला होता. या घटनाक्रमांविषयी भारताची चिंता व्यक्त करण्यासाठी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग हे पाकिस्तानचे पंतप्रधान युसुफ रझा गिलानी यांची भेट घेतली.

रोजगारपूर्व प्रशिक्षणार्थींचा विषय ४ रोजी मंत्रिमंडळासमोर येणार

पणजी, दि. २ (प्रतिनिधी): रोजगारपूर्व प्रशिक्षणार्थींना सरकारी सेवेत नियमित करण्यासंबंधीचा प्रस्ताव येत्या सोमवारी म्हणजेच ४ ऑगस्ट रोजी होणाऱ्या मंत्रिमंडळासमोर ठेवण्याची ग्वाही मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी रोजगारपूर्व प्रशिक्षणार्थी संघटनेला दिली आहे.
रोजगारपूर्व प्रशिक्षणार्थी संघटनेचे सरचिटणीस शाणू नाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या आठवड्यात संघटनेच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री कामत यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी संघटनेचे अध्यक्ष दया पागी हजर होते. सध्या विविध सरकारी खात्यात नोकर भरती जोरात चालू आहे. अशावेळी प्रशिक्षणार्थींना पहिली संधी देण्याचे सोडून त्यांना वाऱ्यावर सोडण्यात आल्याची तक्रार या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांकडे केली. विशेष म्हणजे भाजप सरकारच्या कार्यकाळातच या रोजगारपूर्व प्रशिक्षणार्थींची नेमणूक झाल्याने तेव्हाचे वीजमंत्री या नात्याने दिगंबर कामत यांना हा विषय पूर्णपणे अवगत असल्याचेही त्यांच्या लक्षात आणून देण्यात आले.
रोजगारपूर्व प्रशिक्षणार्थींना तडकाफडकी बदली करणे,वेळेवर पगार न देणे व रिक्त पदांवर त्यांना नियमित करण्याचे सोडून नवीन उमेदवारांची निवड करणे हे प्रकार सर्रासपणे सुरू आहेत. रोजगारपूर्व प्रशिक्षणार्थी पूर्णपणे सरकारी कामात पारंगत बनले आहेत असे असताना नव्या अप्रशिक्षित कर्मचाऱ्यांना भरती करून त्यांना मात्र थेट सरकारी वेतनश्रेणी लागू केली जाते,ही गोष्टही मुख्यमंत्र्यांच्या नजरेस आणून दिली जाते. रोजगारपूर्व प्रशिक्षणार्थींच्या हाती मात्र गेली कित्येक वर्ष नाममात्र मानधन ठेवले जाते व त्यांना पूर्णवेळ कामात राबवले जाते,अशी खंतही या शिष्टमंडळाने व्यक्त केली. केवळ राजकीय दुस्वासापोटी या प्रशिक्षणार्थींचे आयुष्य बरबाद करण्याची ही कृती अमानवीच असल्याने मुख्यमंत्री कामत यांनीच यावर तोडगा काढावा अशी याचनाही यावेळी करण्यात आली.
दरम्यान, सध्या सरकारकडून करण्यात येणाऱ्या नोकरभरती निवडलेल्या उमेदवारांना नेमणूकपत्र देताना त्यावर रोजगारपूर्व प्रशिक्षणार्थींनी दाखल केलेल्या याचिकेवरील निर्णयावर त्यांची नेमणूक निर्भर असल्याची नोंद केली जाते. हा प्रकार अधिक भयावह आहे. जर उच्च न्यायालयातील निकाल रोजगारपूर्व प्रशिक्षणार्थींच्या वाटेने लागला तर नवीन नियुक्त केलेल्या लोकांना घरी पाठवावे लागेल. एकदा केलेली चूक सुधारायची सोडून त्यात भर घालण्याचाच हा प्रकार असून अशाने सरकार सुशिक्षित बेरोजगारांची थट्टा करीत असल्याचे सांगण्यात येते.
दरम्यान,रोजगारपूर्व प्रशिक्षणार्थींच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी पूर्ण सहानुभूती दर्शवून हा विषय मंत्रिमंडळासमोर मांडण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. मंत्रिमंडळातील अनेक नेते प्रशिक्षणार्थींना सेवेत नियमित करण्याच्या बाजूने आहेत, उर्वरित नेत्यांची समजूत घालून टप्प्याटप्याने त्यांना सेवेत सामील करून घेतले जाईल,असाही शब्द मुख्यमंत्री कामत यांनी त्यांना दिल्याचे संघटनेने सांगितले असल्याने ४ ऑगस्टची मंत्रिमंडळ बैठक संघटनेच्या सदस्यांसाठी महत्त्वाची ठरली आहे.

खनिज वाहतूक व्यवसाय संकटात मांडवी व जुवारी पुलांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर

पणजी, दि. २ (प्रतिनिधी): राज्याला भरपूर महसूल प्राप्त करून देणारा बार्जव्दारे खनिज वाहतुकीचा व्यवसाय मांडवी व जुवारी अशा दोन्ही महत्त्वाच्या पुलांच्या सुरक्षेवरून संकटात सापडण्याची भीती निर्माण झाली आहे. बंदर कप्तान खाते व सार्वजनिक बांधकाम खाते यांच्यात सध्या याच विषयावरून सुंदोपसुंदी सुरू झाली आहे.
बांधकाम खात्याने अलीकडेच कप्तान खात्याला पाठवलेल्या एका पत्रात १० हजार टनाच्या बार्जेसवर मांडवी व जुवारीखालून जाण्यास बंदी घालण्याची शिफारस केली आहे व अनेक बार्जमालक प्रशिक्षित मास्तर ठेवत नसल्यानेच पुलांना धोका उद्भवल्याचा इशाराही देण्यात आला आहे.
याप्रकरणी खास सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मांडवी पुलाच्या खांबाला बार्जकडून दिलेल्या धडकांमुळे या पुलाच्या सुरक्षेवरून बांधकाम खात्यातील अधिकाऱ्याची झोप उडाली आहे. यापुढे पुलाखालून जाणाऱ्या बार्जेसच्या वाहतुकीवर नियंत्रण आणणे गरजेचे असल्याने त्यासंबंधी बंदर कप्तान खात्याला कडक पत्र पाठवण्यात आले आहे. १ हजार टनाच्या बार्जेसचा धक्का पुलाच्या खांबाला बसल्यास पुलाची सुरक्षाच धोक्यात येऊ शकते. यासाठी या बार्जेसना अन्य मार्ग शोधून देण्याचा सल्ला खात्याने दिला आहे. बार्जमालकांकडून अप्रशिक्षित कामगारांची भरती केली जाते व त्यामुळेच बार्ज चालवणारे मास्तर बेजबाबदारपणे पुलाखालून बार्जेस नेत असल्यानेच हे अपघात घडत असल्याचेही बंदर कप्तानांच्या लक्षात आणून देण्यात आले आहे.
२००७ साली "सी हॉर्स'नामक बार्जेसचा धक्का बसल्याने नव्या मांडवी पुलाच्या खांब क्रमांक १३ ला सुमारे ६.५ मीटरचा तडा गेल्याचे राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेने ("एनआयओ') केलेल्या पाहणीत आढळून आले आहे. मांडवी पुलाखालून सुमारे तीनशे बार्जेस प्रवास करतात असे सांगून पुलाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना आखणे गरजेचे बनल्याची माहिती बांधकाम खात्याच्या वरिष्ठ सूत्रांनी दिली.
दरम्यान,बंदर कप्तान अधिकाऱ्यांनी या बार्जेसवर अचानक भेट देऊन तपासणी करण्याची गरज असल्याचेही खात्याने म्हटले आहे. सार्वजनिक बांधकाम खात्यातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बंदर कप्तानाकडे २६५ बार्जेसची नोंदणी आहे व केवळ ११५ प्रशिक्षित मास्तर असल्याचेही खात्यामार्फत उघड झाले आहे.
याप्रकरणी बंदर उपकप्तान जे. ब्रागांझा यांच्याशी संपर्क साधला तेव्हा त्यांनी या मुद्यांचे खंडन न करता खात्यावर काही निर्बंध असल्याची माहिती दिली. याप्रकरणाची चौकशी करण्याचे मान्य करून बार्जेसची तपासणी करण्यासाठी खात्याला वेगळ्या बोटींची आवश्यकता आहे तसेच राज्याच्या संपूर्ण समुद्रीपट्ट्यावर नजर ठेवण्याइतकी यंत्रणा खात्याकडे नसल्याचे मान्य केले. कर्मचारी व इतर आवश्यक यंत्रणांचा अभाव यामुळे काही गोष्टी खात्याच्या आटोक्यात नसल्याचेही ते म्हणाले.
यापुढे अशा तपासण्या करण्याची तयारी दर्शवून कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या बार्जेस ताब्यात घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली. जुवारी व मांडवी नदीवरील कोकण रेल्वे पुलाच्या खांबाना ज्याप्रमाणे संरक्षक कुंपण तयार केले आहे त्याच पद्धतीचे लोखंडी कुंपण मांडवी व जुवारी पुलांना असायला हवे होते, त्यामुळे निदान धोक्याचे प्रमाण तरी कमी झाले असते असेही ब्रागांझा म्हणाले. हे सुरक्षा कुंपण आता बांधणे कठीण असून ते सुरुवातीलाच शक्य होते. स्टीलचे कुंपण घालायचे झाल्यास ते खर्चिक काम होणार असल्याचे बांधकाम खात्याकडून सांगण्यात आले.

संशयावरून हटकलेल्या दोघांकडे सापडल्या दुर्मीळ प्राचीन मूर्ती

मडगाव, दि. ३ (प्रतिनिधी): मडगाव पोलिसांनी आज भल्या सकाळी येथील जुन्या रेल्वे स्टेशनजवळ संशयास्पद स्थितीत फिरणाऱ्या दोघांना ताब्यात घेऊन त्यांची झडती घेतली असता त्यांच्यापाशी अत्यंत दुर्मीळ अशा २२ प्राचीन मूर्ती सापडल्या. त्या जप्त करण्यात आल्या आहेत.
पोलिस निरीक्षक राजेंद्र प्रभुदेसाई यांनी सांगितले की, त्यांची नावे भोलानाथ यादव व विजयकुमार अशी असून ते उत्तर प्रदेशमधील आहेत. त्यांची कसून चैाकशी केली असता त्यांचे आणखी तिघे साथीदार असल्याचे आढळून आले आहे. पोलिस त्यांच्या मागावर आहेत. या संशयितांकडून आणखीही अशाच स्वरूपाची चोरीची प्रकरणे उजेडात येण्याची शक्यता आहे. त्या दिशेने पोलिस तपास सुरू आहे.
या मौल्यवान मूर्ती आपण कोलवा येथील काश्मीरींच्या दुकानांतून चोरल्याचे या दोघांकडून सांगण्यात आले. तथापि, पोलिस त्यावर विश्वास ठेवण्यात तयार नाहीत. अधिक तपास सुरू आहे.

Friday, 1 August, 2008

राज्यपालांचे पदही कायद्यापेक्षा श्रेष्ठ नसल्याचे सिद्ध : पर्रीकर

पणजी, दि. १ (प्रतिनिधी): राज्यपाल एस. सी. जमीर यांनी विद्यमान कॉंग्रेस आघाडी सरकार अल्पमतात असताना घेतलेल्या काही वादग्रस्त निर्णयांची माहिती दहा दिवसांच्या आत देण्याचे आदेश राज्य माहिती आयुक्तांनी दिल्याने राज्यपालांचे पदही कायद्यापेक्षा श्रेष्ठ नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झाल्याचे विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर म्हणाले.
आज पणजी येथील मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजप विधिमंडळ प्रवक्ते दामोदर नाईक व उपाध्यक्ष सुभाष साळकर हजर होते. प्रशासकीय कारभाराची पारदर्शकता तपासण्याची जबाबदारी महालेखापालांची असते; परंतु राज्यात पहिल्या "इफ्फी'वेळी झालेल्या खर्चाचा मुद्दा उपस्थित करून राजकीय आकसापोटी आर्थिक गैरव्यवहारांचा ठपका अहवालात ठेवण्यात आला व याच अहवालाच्या आधारावर आपल्याविरोधात उपसभापती माविन गुदीन्हो यांनी पोलिस तक्रार दाखल केली असा आरोप पर्रीकर यांनी केला. ती तक्रार "सीबीआय'ने फेटाळली; परंतु हा अहवाल कोणत्या माहितीच्या आधारे तयार केला याचा तपशील माहिती माहिती हक्क कायद्याव्दारे त्यांनी मागितला आहे. ही माहिती देता येत नाही व त्यामुळे हक्कभंग होईल असे निमित्त पुढे करून ती देण्याचे टाळले जात असले तरी आता हा विषय केंद्रीय माहिती आयोगापुढे आला आहे. हे प्रकरण आता घटनात्मक बनल्याने आयोगाच्या तिन्ही आयुक्तांनी याविषयावर निर्णय घेण्याचे ठरवले असून त्याबाबत पुढील सप्टेंबरमध्ये पुढील सुनावणी होईल,असे पर्रीकर म्हणाले.
राज्यपाल एस. सी. जमीर हे उघडपणे कॉंग्रेसचे एजंट म्हणूनच वावरत होते. सरकारी तिजोरीची त्यांनी चालवलेली लूट हा तर स्वतंत्र लेखाचा विषय ठरेल. पंचतारांकित हॉटेलात केस कापणे, सोन्याचे दात बसवून घेणे व जाता-जाता श्रवणयंत्रही सरकारी खर्चातून खरेदी करण्याचा पराक्रम तेच करू शकतात असा टोमणाही पर्रीकर यांनी हाणला. आता प्रत्यक्ष राज्यपालांनी घेतलेल्या निर्णयाबाबतची माहिती उपलब्ध झाल्यानंतर पुढील कृतीची दिशा ठरवली जाईल,असेही पर्रीकर यांनी म्हणाले.
सरकारचा आपत्कालीन निधी राज्यासाठी आणीबाणीच्या वेळी खर्चासाठी ठेवला जातो; परंतु जमीर यांनी मात्र या निधीचा वापर स्वतःच्या चैनीसाठी केला असा ठपकाही पर्रीकर यांनी ठेवला. अखेर राज्यपालांनी चालवलेल्या या कारभाराबाबत राज्यव्यापी आंदोलन छेडून त्यांचे हे प्रकार जनतेसमोर आणले म्हणूनच त्यांना गोव्यातून हटवले गेले हे कुणीही नाकारणार नाही. त्यामुळेच जमीर यांना गोव्यातून हटवण्यात भाजपचाही महत्त्वाचा वाटा असल्याचा दावा पर्रीकर यांनी केला.

राज्यात बेकायदा खाण उद्योगाचा सुळकर्ण प्रकरणाशी संबंध शक्य खास चौकशीची पर्रीकरांकडून मागणी

पणजी, दि. १ (प्रतिनिधी): गोव्यात बेकायदा खाण उद्योग झपाट्याने पसरत असून ही स्थिती कायम राहिल्यास यापुढे स्थानिक लोक हिंसेचा मार्ग पत्करतील, अशी भीती विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी व्यक्त केली.
केपे तालुक्यातील सुळकर्णे येथे काही लोकांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणात बेकायदा खाण उद्योगाचा संबंध असावा, अशी शक्यता आहे. त्यामुळे या मृत्युप्रकरणाची खास न्यायाधीश किंवा केंद्रीय अधिकाऱ्यामार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्याकडे केल्याचे पर्रीकर म्हणाले. आज पणजीत पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, सुळकर्णे येथे एका इसमाचा मृत्यू झाला असता त्याला हृदयविकाराचा झटका आला. लगेच त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मुळात हा इसम बेकायदा खाणीत अपघात झाल्याने मृत्यू पावल्याची तेथील लोकांची शंका आहे. त्याला लगेच बाहेर काढून साफ करून त्याचे अंत्यसंस्कार करण्याचा प्रकार हा स्वतःची कातडी वाचवण्याचा प्रयत्न आहे. त्याची कसून चौकशी व्हावी, असेही ते म्हणाले.
या घटनेनंतर लगेच रिवण येथे एका बारमध्ये दोघा कामगारांचा झालेला गूढ मृत्यू व काकोडा येथे मिळालेले बेवारस मृतदेह आदी घटनांची गंभीर दखल घेण्याची गरज आहे. या बेकायदा खाण उद्योगाबाबत माहिती असलेल्या व त्यांच्याकडून गौप्यस्फोट केला जाणार या भीतीने घातपात घडवला जाण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे पर्रीकर म्हणाले.
राज्यात एकीकडे कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडालेला असताना आपण जर काही घटनांबाबत बोललो तर पर्रीकरांनी पोलिसांना त्याबाबतची माहिती द्यावी असे गृहमंत्री रवी नाईक म्हणतात. गृहमंत्र्यांची ही भाषा आपल्या पोलिस खात्याची अकार्यक्षमताच चव्हाट्यावर मांडते. पोलिसांनी सर्व गोष्टींचा विचार करूनच चौकशी केली तर दोषींना पकडणे कठीण नाही, असेही ते म्हणाले. पोलिस प्रामाणिकपणे चौकशी करतील व त्यांनी या व्यतिरिक्त काही माहितीसाठी आपला सल्ला मागितला तर आपण त्यांना अवश्य मदत करू, असे पर्रीकर म्हणाले.

'धीरयो' प्रकरणी सरकारला नोटीस खंडपीठाकडून गंभीर दखल

पणजी, दि. १ (प्रतिनिधी): "बैलांच्या झुंजी' (धीरयो) आयोजिण्याला राज्यात बंदी आहे. तरीही सासष्टीमध्ये प्रामुख्याने करून बाणावली भागात सर्रास धीरयो होतात या वृत्तपत्रांत प्रसिद्ध झालेल्या बातमीची दखल घेऊन मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने आज राज्य सरकार, मडगावचे पोलिस उपअधीक्षक, पंचायत उपसंचालक, बाणावली सरपंच आणि उपसरपंच यांना नोटिसा बजावल्या.
या विषयी जनहित याचिका सादर करण्याचा आदेश न्यायालयाच्या प्रबंधकांना देण्यात आला आहे. या विषयीची पुढील सुनावणी २८ ऑगस्ट ०८ रोजी ठेवण्यात आली आहे.
राज्यात आणि खास करून सासष्टी तालुक्यात धीरयो रोखण्यासाठी पोलिसांनी कोणत्या उपाययोजना आखल्या आहेत, याचे स्पष्टीकरण न्यायालयात देण्याचा आदेश देण्यात आला आहे. राज्यात धीरयो सुरूच राहिल्यास, तो न्यायालयाचा अवमान मानला जाणार असून संबंधित प्रशासनिक यंत्रणेवर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचेही खंडपीठाने नमूद केले आहे. त्याचप्रमाणे बाणावली येथे "बैलांच्या झुंजी'चे आयोजन केल्याने अटक करण्यात आलेल्या बाणावलीचे उपसरपंच स्टॅन्ली फर्नांडिस यांच्यावर पंचायत संचालनालयाने कोणती कारवाई केली , याचीही माहिती देण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.
दोन दिवसापूर्वी बाणावली येथे "धीरयो'चे आयोजन केल्याप्रकरणी उपसरपंच स्टॅन्ली फर्नांडिस आणि लॉरेन्स फर्नांडिस यांना अटक करून प्रत्येकी १५ हजार रुपयांच्या हमीवर सुटका केली होती. त्याच्या दुसऱ्याच दिवशी पुन्हा तेथे धीरयोचे आयोजन केल्याने पोलिसांनी आगशी येथील मिनीनो फर्नांडिस आणि बाणावली येथील आन्तोनियो कायादो यांना अटक केली होती.
उपसरपंच फर्नंडिस सातत्याने धीरयोचे आयोजन करत असल्याचे उघड झाले आहे. त्याप्रमाणे गेल्या वर्षी त्यांच्याविरुद्ध न्यायालयात आरोपपत्रही दाखल करण्यात आले होते. याची सर्व माहिती पंचायत संचालनाला देण्यात आली असून संचालनालयाने अद्याप त्यांच्यावर कोणतीही कारवाई केलेली नाही. धीरयो आयोजिणे हा न्यायालयाचा अवमान होत असल्याने त्यासंदर्भात योग्य कारवाई करण्यासाठी पंचायत संचालनालयाकडे कोलवा पोलिसांनी मागणी केली आहे.

बलात्कारप्रकरणी तरुणास जन्मठेप व दोन लाख दंड

पणजी, दि. १ (प्रतिनिधी): सावर्डे येथे चार वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी नागराज बजानाथ या तरुणाला बाल न्यायालयाने गोवा बाल कायदा २००३ कलम ८(२) व भा.द.स ३७६ नुसार दोषी ठरवून जन्मठेप व दोन लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. दंडाची रक्कम भरली नाही तर अजून दोन वर्षे तुरुंगवास भोगावा. तसेच दंडाची रक्कम आरोपीने भरल्यास ती पिडीत मुलीला दिली जावी, असेही न्यायालयाने आदेशात स्पष्ट केले आहे. पिडीत मुलीने उलट तपासणीवेळी आपली जबानी बदलली नाही. तिने आरोपीला आणि जेथे बलात्कार झाला ती जागाही ओळखली. वैद्यकीय चाचणीत बलात्काराचा प्रकार सिद्ध झाल्याने न्यायालयाने वजानाथ याला २२ जुलै ०८ रोजी दोषी ठरवले होते. ५ जानेवारी २००५ रोजी दुपारी ४ वाजता पिडीत मुलगी आपल्या घराबाहेर खेळत होती. त्यावेळी खाऊ देतो असे सांगून शेजारीच राहात असलेल्या नागराजने तिला सांगून आपल्या घरात घेऊन गेला आणि घरात कोणीही नसल्याचा फायदा घेऊन तिच्यावर बलात्कार केला. अत्याचाराची घटना तिने रात्री आपल्या आईला सांगितली. त्यानंतर ८ जानेवारी २००५ साली नागराजविरुद्ध कुडचडे पोलिस स्थानकावर तक्रार नोंदवण्यात आली. पिडीत मुलीची आई मूळ बेळगावची असून ती आपल्या मुलीसह सावर्डे येथे राहात आहे. गुन्हा घडला त्यावेळी नागराज हा सावर्डे येथील उच्च माध्यमिक विद्यालयात जात होता. भक्कम पुरावे आणि साक्षीदार सादर झाल्याने आरोपीला शिक्षा या प्रकरणात शिक्षा झाली. सरकारतर्फे ऍड. पौर्णिमा भरणे यांनी युक्तिवाद केला.

Thursday, 31 July, 2008

अहमदाबाद स्फोट प्रकरण बडोदा स्टॉक एक्सचेंज उडवून देण्याची धमकी

अहमदाबाद, दि. ३१ : स्फोट मालिकेच्या पार्श्वभूमीवर, आज नव्या घडामोडीअंतर्गत बडोदा स्टॉक एक्स्चेंज उडविण्याची धमकी देणारे पत्र पोलिसांना प्राप्त झाले. हे पत्र कुठून आले याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे स्टॉक एक्स्चेंजला पुरेशी सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. तेथे घातपाताची शक्यता लक्षात घेऊन अतिरिक्त पोलिस दल तैनात करण्यात आले आहे. आसपासच्या परिसरातून येथे येणाऱ्यांवर बारीक नजर ठेवली जात असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. दरम्यान, २६ जुलैच्या अहमदाबाद स्फोट मालिका प्रकरणी आज पोलिसांच्या गुन्हा शाखेने शहर आणि आसपासच्या भागात धाडसत्र सुरू करीत अनेकांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
अहमदाबादचे सहआयुक्त एच. पी. सिंग यांनी सांगितले की, शहरात तसे काल रात्रीपासूनच आम्ही धाडसत्र सुरू केले आहे. आज सकाळीही ही कारवाई सुरूच होती. आत्तापर्यंत शहर आणि आसपासच्या भागातून अनेकांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. या संपूर्ण कारवाईचा अहवाल अद्याप तयार व्हायचा आहे. तो तयार झाल्यानंतर त्याचा अभ्यास करून पुढील कारवाईची दिशा ठरविली जाईल.
अहमदाबाद स्फोट प्रकरणी अटक करण्यात आलेल्या हलीम या सिमीच्या अतिरेक्याला १० ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्यात आले असून तेथे गुन्हा शाखेतर्फे त्याची कसून चौकशी केली जात आहे. सोबतच शहरातील सायकल विक्रेत्यांचीही विचारपूस सुरू आहे. त्या माध्यमातून सायकल खरेदी करणाऱ्या संदिग्ध अतिरेक्यांपर्यंत पोहोचण्याचा पोलिसांचा प्रयत्न राहणार आहे. या संपूर्ण चौकशी प्रक्रियेत गुजरात पोलिसांना सीबीआय, मुंबई पोलिस, हैदराबाद, राजस्थान, उत्तरप्रदेश आणि दिल्लीचेही पोलिस मदत करीत आहेत.
अंकलेश्वरला बॉम्बची अफवा
भडोच जिल्ह्यात पोलिसांना अंकलेश्वर येथे बॉम्ब असल्याचा निनावी फोन आला होता. त्या आधारे त्यांनी संपूर्ण परिसरात बॉम्बचा शोध घेतला. त्यासाठी बॉम्बशोधक पथकही कामाला लागले. पण, संपूर्ण परिसरात कुठेही बॉम्ब सापडला नाही.

डॉ. प्रकाश व डॉ. मंदा आमटे यांना 'मॅगसेसे' पुरस्कार

गडचिरोली, दि.३१ : मागील ३५ वर्षापासून भामरागडच्या जंगलातील हेमलकसा येथे आदिवासींची सेवा
करणाऱ्या डॉ. प्रकाश व डॉ. मंदाताई आमटे यांना "मॅगसेसे' पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. कर्मयोगी दिवंगत बाबा आमटे यांना देखील मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. एकाच घरातील तिघांना "मॅगसेसे' पुरस्कार मिळण्याची ही अभूतपूर्व घटना समजली जात आहे. आज दिवसभर डॉ. प्रकाश व डॉ. मंदा आमटे या दाम्पत्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला.
गेली ३५ वर्षे शांतपणे काम करीत कुठलीही अपेक्षा न ठेवता आदिवासींची सेवा केली, त्या कार्याचेच हे फळ आहे. आपण केवळ निमित्तमात्र असून हा सन्मान आमच्या कार्यकर्त्यांचा आहे. त्यांच्याच बळावर इथपर्यंतचा पल्ला आम्हाला गाठता आला आहे, अशी प्रतिक्रिया मॅगसेसे पुरस्कार घोषित झाल्यानंतर डॉ. प्रकाश आमटे यांनी व्यक्त केली आहे.
प्रकाश आमटे यांचे कार्य
पद्मश्री, नागभूषण, आदिवासी सेवक, महावीर पुरस्कार, हेगडे पुरस्कार अशा पुरस्कारांनी डॉ. प्रकाश आमटे सन्मानित झाले आहेत. डॉ. प्रकाश आमटे याचं बालपण आनंदवनात गेलं. बाबांनी महारोग्यांची केलेली सेवा, त्यांनी अगदी जवळून बघितली. समाजाने झिडकारलेल्यांना जवळ करताना येणाऱ्या दाहक ज्वालांचा अनुभव बाबांच्या वाट्यालाही आला. मात्र बाबा डगमगले नाहीत. बाबांची सेवा चिमुकल्या प्रकाशच्या अंतर्मनात थेट पोहचत होती. प्रकाशचं मन वेदना समजून घेऊ लागलं होतं. बाबांच्या समाजसेवेच्या सावलीत प्रकाश वाढत गेला, तो साऱ्यांना लख्ख करण्यासाठी!
डॉ. प्रकाश आमटे म्हणतात, "बाबा स्वत: डॉक्टर नसल्याने त्यांना त्याकाळी बऱ्याच अडचणी येत होत्या. तेव्हाच मी डॉक्टर व्हायचं ठरवलं. १९७० मध्ये अभ्यासक्रमांची परीक्षा दिल्यानंतर मी बाबांसह भामरागडच्या जंगलात गेलो. जंगलात जाण्यासाठी कुठलेही कारण नव्हते, मात्र त्या जंगलातून परत आनंदवनात आल्यानंतर पुन्हा त्याच जंगलात जाण्यासाठी अनेक कारणे होती. बाबांच्या पावलावर पाऊल ठेवत हेमलकसा गाठले ते मागे वळण्यासाठी नाहीच!
हेमलकसा येथे प्रकल्प उभारण्याच्या कामी जागा मिळविण्याकरिता तीन वर्षे लागली. २३ डिसेंबर १९७३ रोजी बाबांनी हेमलकसा येथे लोकबिरादरी प्रकल्प उभारला. हा प्रकल्प सांभाळण्यासाठी ३५ वर्षापूर्वी डॉ. प्रकाश जेव्हा हेमलकसा येथे आले, तेव्हापासून त्यांच्या जगण्याच्या लढाईचा प्रवास सुरू झाला. या लढाईत त्यांच्या पत्नी मंदाताईंची मोठी साथ लाभली. लग्नानंतरच्या अगदी काही दिवसांतच ते मंदाताईंना घेऊन दु:खाच्या जंगलात सुख शोधायला आले.
कुठून सुरुवात करावी, कशी करावी, कसं राहावं अशा विचारात एक गवताची झोपडी उभी राहिली. गळ्यात स्टेथॅस्कोप अडकवून डॉ. प्रकाश झोपडीतून बाहेर पडू लागले. आदिवासी माडियांच्या आजारासह कितीतरी समस्या उभ्या होत्या. मंदाताईंनी डॉ. प्रकाश यांना कुठल्याही परिस्थितीत एकटे पडू द्यायचे नाही, असा मनाशी निश्चय केला होता. त्यासाठी नागपुरातील वैद्यकीय महाविद्यालयातील आपल्या नोकरीचा राजीनामा दिला होता.
भामरागड परिसरात आदिवासींच्या जन्म-मृत्यूची नोंद नव्हती. किती मेले आणि किती जिवंत आहेत, याची सरकारच्या लेखी कुठलीच दखल नव्हती. असण्याचे कारणही नव्हते. तेव्हा जन्म-मृत्यूच्या नोंदी, आरोग्यासंबंधी आदिवासींमध्ये जागृती, त्यांचं शिक्षण, शेतीचं तंत्रज्ञान, त्यांचे हक्क आदी सारेच प्रश्न सोडविणं गरजेचं होतं. माणसाला बघताक्षणी जंगलात पळणाऱ्या आदिवासींमध्ये जागृतीची ज्योत पेटविणे वाटते तितके सोपे नव्हते. त्यासाठी डॉ. प्रकाश यांनी आधी आजारावर उपचार सुरू केले. साप चावल्यानंतर त्यांनी केलेल्या उपचाराने मुलं वाचू लागली. तसा त्या आदिवासींचा प्रकाशभाऊंवर विश्वास बसू लागला. हाच विश्वास आजही कायम आहे. म्हणूनच त्यांच्या रुग्णालयात वर्षाकाठी ४० ते ५० हजार आदिवासी उपचारासाठी येतात. आरोग्याची समस्या सोडविता-सोडविता त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी डॉ. प्रकाश यांनी शाळा उघडली. आदिवासींच्या मुलांचे पाय शाळेकडे वळू लागली. आज त्यांच्या शाळेतून शिकून गेलेली पाच मुले डॉक्टर झाली आहेत, जवळपास ५० ते ६० मुले शिक्षकी पेशात आहेत आणि ९५ टक्के आदिवासी मुले शिकून आपल्या भागात जागृतीचे कार्य करीत आहेत.
डॉ. प्रकाश आमटे केवळ आदिवासींच्या आजारावर उपचार, शिक्षण करून थांबले नाहीत तर त्यांच्या हक्कासाठी भांडले आणि भांडत आहेत. मजुराला मजुरी मिळवून देण्यासाठी त्यांनी अधिकाऱ्यांपुढे वाद घातला आहे. ते बोलताना नेहमी म्हणतात, आम्ही कुठलाच संकल्प करून हेमलकसा येथे आलेलो नाही. परिस्थितीनुरूप बदलत जाऊन, समस्यांची तीव्रता लक्षात घेऊन, जागीच त्या समस्या सोडविण्यासाठी प्ररुत्न केले. घरातली भांडणे न्यायालयात पोहचू दिली नाहीत, यातच त्यांच्या कार्याचं यश आहे.
आदिवासींच्या सुखदु:खात सहभागी होऊन जीवन जगत असताना, त्यांना मुक्या प्राण्यांच्या सहजीवनाची साथ लाभली. एक-एक प्राणी त्यांच्या परिवाराचा सदस्य बनला आणि कुत्र्या-माकडांच्या मैत्रीची घट्ट वीण-तिथे विणली गेली. सुरुवातीच्या काळात आदिवासी माकडाची शिकार करून त्यांचे मांस खात होते. डॉ. प्रकाश आमटेंनी त्या आदिवासींना माकडाच्या बदल्यात अन्न दिले आणि मुक्या प्राण्यांना मारू न देण्याचा नकळत सल्ला दिला. माकड, कुत्रा, हरिण, वाघ, अस्वल असे कितीतरी प्राणी त्यांच्या प्राणी संग्रहालयात येऊ लागली. माणसासह त्यांनी प्राण्यांचेही सहजीवन सुरू केलं. पस्तीस वर्षापूर्वी हेमलकसा परिसरात वीज नव्हती, संपर्काचे साधन नव्हते. अशा अंधाऱ्या परिस्थितीत प्रकाशाचा किरण तिथे आला आणि सारा परिसरच उजाळला.
-----------------------------------------------------------------------------------
कुठलीही अपेक्षा न ठेवता केलेल्या कार्याचे फळ : डॉ. प्रकाश आमटे
दै. 'गोवादूत'ने डॉ. आमटे यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता ते म्हणाले, ""आज बाबा पाहिजे होते, त्यांच्या मुलाला व सुनेला मॅगसेसे पुरस्कार घोषित झाल्याचे बघून त्यांना खूप आनंद झाला असता, आम्हाला देखील त्यांच्या आशीर्वादाची गरज आहे, असे म्हणत असतांना त्यांचे डोळे पाणावले. या पुरस्कारामुळे आमच्या कामाला निश्चितच गती येईल, त्यापेक्षाही ज्यांच्यासाठी आम्ही काम केले त्या आदिवासींचे प्रश्न या पुरस्काराने जगासमोर येतील. त्यांच्या समस्या, त्यांच्या हालअपेष्टा लोकांपर्यंत पोहचतील. हा सन्मान आमचा नसून खऱ्याअर्थाने आमच्या कार्यकर्त्यांचा आणि त्या आदिवासींचाच आहे, भावपूर्ण उद्गार डॉ. आमटे यांनी काढले.

बनावट मुखत्यारपत्र प्रकरण ऍड. सतीश सौदागर याचा अटकपूर्व जामीन नामंजूर

पणजी, दि. ३१ (प्रतिनिधी): बनावट मुखत्यारपत्र व खरेदीखत बनवल्याप्रकरणी ऍड. सतीश श्रीपाद सौदागर याचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळून लावला आहे. बनावट मुख्यत्यारपत्र बनवल्याची मूळ प्रत अद्याप पोलिसांच्या हाती आली नसल्याने आणि संशयित स्वतःच वकील असल्याने त्याला जामीन मिळाल्यास पुरावे नष्ट होण्याची शक्यता असल्याने त्याचा अर्ज निकालात काढला. त्यामुळे ऍड. सौदागर याला म्हापसा पोलिसांकडून कधीही अटक होऊ शकते, असे म्हापशाचे पोलिस निरीक्षक सी. एल. पाटील यांनी सांगितले.
ऍड. सौदागर याचा साहाय्यक वकील ऍड. सायमन फर्नांडिस याच्या अटकपूर्व जामीन अर्जावर उद्या १ ऑगस्ट रोजी सत्र न्यायालयात निर्णय होण्याची शक्यता आहे. मरण पावलेल्या व्यक्तीच्या नावाने मुख्यत्यारपत्र बनवून मुंबईतील जे.डी. सिकेरा यांना सांगोल्डा येथील एक भूखंड विकण्यात आला होता. सदर मुख्यत्यारपत्र ऍड. सौदागर व त्याचा साहाय्यक ऍड. फर्नांडिस यांनी तयार केले होते.
मृताच्या नावे बनावट मुख्यत्यारपत्र करून गोव्यातील भूखंड विकण्याचे मोठे जाळे कार्यरत असावे, असा दावा सरकारी वकील पौर्णिमा वेर्णेकर यांनी युक्तिवाद करताना केला. वकिलच अशा प्रकारे कायद्यातील पळवाटांचा फायदा घेऊन बनावट मुख्यत्यापत्रे बनवत असल्याने हा प्रश्न गंर्भीर असल्याचे ऍड. वेर्णेकर यांनी निदर्शनास आणून दिले.
सांगोल्डा येथील १९८५ साली मृत झालेली ऍना पावला डिसोझा ई डिसा या महिलेच्या नावाने श्रीमती तेरेझा डिसोझा या महिलेने "बांदाची भुईंम' हा ८७५ चौरसमीटरचा भूखंड विकण्यासाठी बनावट मुखत्यारपत्र करून घेतले होते. त्यानंतर ती जागा मुंबई येथील जे. डी. सिकेरा यांना विकली होती. एडविन ब्राझीन्हो डिसोझा यांनी याविषयाची पोलिस तक्रार म्हापसा स्थानकात दाखल केली आहे. निरीक्षक सी. एल. पाटील तपास करीत आहेत.

लाल फितीच्या कारभारात चांगल्या योजनेचे तीनतेरा, खुद्द वीजमंत्र्यांनीच घेतला विदारक अनुभव

पणजी, दि.३१ (प्रतिनिधी): सरकारी प्रशासकीय कारभारात कसा गलथानपणा होऊ शकतो याची प्रचीती अलीकडेच वीजमंत्री आलेक्स सिकेरा यांना आली. प्रशासकीय कारभारातील जबाबदारीच्या अभावामुळे झालेल्या चुका किती त्रासदायक ठरतात याचा विदारक अनुभव त्यांनी आपल्याच सरकारच्या घेतला.
माजी वीजमंत्री तथा विद्यमान मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या कारकिर्दीत २००६ साली वीज खात्यातील लाईनमनसाठी एक विमा योजना सरकारने समंत केली होती. लाईनमन म्हणून सेवा बजावताना एखादा अपघात घडून त्यात मृत्युमुखी पडल्यास संबंधित कर्मचाऱ्याला विमा कंपनीकडून एक लाख रूपयांची आर्थिक मदत देण्याची तरतूद या योजनेत आहे. "न्यू इंडिया अश्युरन्स कंपनीकडे "जनता ग्रामिण वैयक्तीक अपघात विमा योजना' आखून सरकारने लाईनमनसाठी एक चांगला निर्णय घेतला होता. दरम्यान, ही योजना तयार करूनही सेवेवेळी मृत्युमुखी पडलेल्या एकूण ५ लाईनमनचे कुटुंबीय या मदतीपासून वंचित राहिल्याची माहिती मिळाली आहे. हे लोक या मदतीपासून वंचित राहण्याचे कारण मात्र वीज खात्यातील भोंगळ व बेजबाबदार कारभाराचे निदर्शक ठरले आहे. ही विमा योजना असल्याने त्याचे प्रत्येक वर्षी तिचे नूतनीकरण करून लाईनमनच्या संख्येनुसार कंपनीकडे आगावू रक्कम भरावी लागते. गेल्या २३ ऑगस्ट २००७ रोजी पूर्वीच्या योजनेची नूतनीकरणाची अंतिम मुदत होती. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या योजनेचे नूतनीकरण प्रशासकीय पातळीवर होण्याची गरज होती. प्रत्यक्षात त्याबाबतची फाईल तब्बल दोन महिन्यांनी आपल्यासमोर आल्याची खळबळजनक माहिती वीजमंत्र्यांनी उघड केली. प्रशासकीय पातळीवरील गलथानपणावर तीव्र आक्षेप घेऊन त्यांनी हे काम पाहणाऱ्या संबंधिक कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश खाते प्रमुखांना दिले. कहर म्हणजे या फाईलला समंती दिल्यानंतर पुढे वित्त खात्याकडून समंती मिळण्यास आणखी दोन महिने लागल्याने पूर्वीची विमा योजना रद्दबातल झाली. या भोंगळ कारभाराबाबत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

११५ नव्या प्राथमिक शिक्षकांची भरती!

पणजी, दि. ३१ (प्रतिनिधी): मुख्यमंत्री कामत यांच्याकडेच असलेल्या शिक्षण खात्याकडून १२४ अतिरिक्त प्राथमिक शिक्षक असल्याचे जाहीर झाले असताना आता ११५ नव्या प्राथमिक शिक्षकांची भरती सुरू असल्याची खात्रीलायक माहिती प्राप्त झाली आहे. त्यामुळे हे खाते वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे.
शिक्षण खात्यातर्फे सध्या नवीन प्राथमिक शिक्षकांची भरती सुरू असून खात्यात या उमेदवारांच्या मुलाखती सुरू आहेत. या शिक्षकांना महिन्याकाठी १० ते ११ हजार रुपये वेतन दिले जाणार असल्याने त्यामुळे सरकारी तिजोरीवर वर्षाकाठी सुमारे २ कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडणार आहे. सरकारी नोकऱ्यांच्या बाबतीत सरकारकडे कोणतेही धोरण नसून प्रत्येक मंत्री आपल्या मर्जीप्रमाणे नोकर भरती करीत असल्याचे चित्र दिसत आहे.सध्या विविध खात्यात अतिरिक्त,कंत्राटी,रोजदांरी अशा पद्धतीवर कित्येक कर्मचारी गेली अनेक वर्षे काम करीत असल्याने त्यांना सेवेत नियमित करण्याचे सोडून नवीन भरती करून ही समस्या अधिक जटिल बनवली जात आहे.
दरम्यान, गेल्यावेळी शिक्षकांचे निवृत्तीवय कमी करून ते ५८ वर्षे करण्याचा प्रस्ताव होता; जेणेकरून शेकडो शिक्षक निवृत्त होणार असून त्यांच्या जागी नव्या शिक्षकांची भरती करणे शक्य होणार होते. सरकारवर सध्या सहाव्या वेतन आयोगाची टांगती तलवार असूनही ही नवी भरती होत असून वित्त खात्याने या भरतीला कशी काय परवानगी दिली हा चर्चेचा विषय बनला आहे.
राज्यातील विविध भागांत अनेक सरकारी प्राथमिक शाळा बंद पडल्याने हा अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न निर्माण झाला आहे. विविध रिक्त पदे ग्रामीण भागात असून तिथे हे शिक्षक जायला तयार नाहीत याचमुळे या नव्या शिक्षकांना त्याठिकाणी पाठवण्याची शक्कल लढवली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. सध्याच्या परिस्थितीत विविध ९२० सरकारी प्राथमिक शाळेत सुमारे २ हजार शिक्षक विद्यादान करीत आहेत. सरकारी धोरणानुसार एका शाळेत जर १३ विद्यार्थी असतील व तिथे दोन शिक्षक असतील तर एक शिक्षक अतिरिक्त असल्याचे घोषित करण्यात येते. बहुतेक खेडेगावात सरकारी शाळेतील विद्यार्थीसंख्या कमी असल्याने हा अतिरिक्त शिक्षकांचा घोळ झाल्याचेही सांगण्यात आले. दरम्यान, सध्या खेडेगावातून शहरी भागात बदली करण्यासाठी विविध अशी सुमारे १७० अर्ज खात्याकडे पडून असून विविध राजकीय नेत्यांकडून त्यासाठी पाठपुरावा केला जात असल्याची माहिती मिळाली आहे.
दरम्यान,सध्याच्या भरतीत शिक्षकांना नेमणूक पत्रके देताना त्यात राज्यातील कुठल्याही भागात नोकरी करण्यास तयार असल्याची मान्यता घेण्यात येते. ही मान्यता घेतली तरी निवड झाल्यानंतर आपल्या नेत्यांकरवी आपल्या इच्छेच्या जागी नेमणूक करण्यासाठी नंतर अधिकाऱ्यांची सतावणूक केली जाते ही पद्धतच बनल्याची माहितीही देण्यात आली.

लॅपटॉप चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

पणजी, दि. ३१ (प्रतिनिधी): पणजीतील १८ जून रस्त्यावर तिघांचे भांडण झाले आणि शहरात लॅपटॉप चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला. प्रवीण सुरेश भातखंडे (२२) रा. शिवोली, नुझार नाझव्हील नोरोन्हा (१९) व पांडुरंग गणेश नाईक (३७) या तिघांना या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून चोरीचा एक लॅपटॉप, तीन मोबाईल व एक स्पॅनर हस्तगत करण्यात आला आहे. या प्रकरणात अन्य संशयितांना अटक होण्याची शक्यता आहे. आज सायंकाळी या तिघांना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी पाच दिवसांची पोलिस कोठडी दिली.
काल रात्री १.१५ च्या दरम्यान पणजी शहरातील १८ जून रस्त्यावर तिघांचे भांडण सुरू असल्याचा दूरध्वनी पोलिस नियंत्रण कक्षाला आला. याची त्वरित माहिती पणजी पोलिसांना देण्यात आली. पोलिस तेथे गेल्यावर त्यातील एकाच्या बॅगेत लॅपटॉप असल्याचे आढळले. या लॅपटॉपबद्दल संशयित भातखंडे याला पोलिसांनी विचारले असता तो, अधिक काहीच सांगू शकला नसल्याने त्याला व त्याच्या अन्य दोघा साथीदारांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून आणखी लॅपटॉप मिळण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. याप्रकरणी अधिक तपास उपनिरीक्षक तुषार लोटलीकर करत आहेत.

Wednesday, 30 July, 2008

सुरतमध्ये आणखी दोन बॉम्ब सापडले, दहशत कायम

अतिरेकी कारवायांची माहिती देणाऱ्यास ५१ लाखांचे बक्षीस
बॉम्बची माहिती देणाऱ्या नागरिकांना २१ हजारांचे बक्षीस
गुजरातचा आर्थिक कणा तोडणे
हेच अतिरेक्यांचे लक्ष्य : मोदी

सूरत, दि.३० : सुरत हे गुजरातमधील हिऱ्यांच्या व्यापाराचे मुख्य शहर आहे. सोबतच अन्य काही महत्त्वपूर्ण उद्योगही येथे चालतात. गुजरातमधील आर्थिक उलाढालीचे केंद्र म्हणजे हे शहर आहे. त्यात मोठ्या प्रमाणावर बॉम्ब पेरणे म्हणजे गुजरातचा आर्थिक कणा मोडण्याचा प्रयत्न होय आणि अतिरेक्यांचे लक्ष्य कदाचित हेच असावे, असे प्रतिपादन करीत गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी अतिरेकी कारवायांविषयी महत्त्वपूर्ण माहिती देणाऱ्यास ५१ लाख रुपयांचे बक्षीस देण्याचे जाहीर केले आहे.
ुसुरतमध्ये मंगळवारी १८ जिवत बॉम्ब सापडल्यानंतर ते सर्व निकामी करण्यात आले असतले, तरी बुधवारी मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हे सुरतच्या दौऱ्यावर असतानाच आणखी एक जिवंत बॉम्ब सापडल्याने प्रचंड खळबळ माजली आहे. हा बॉम्ब आधीच ठेवण्यात आला होता की नरेंद्र मोदी येणार म्हणून आज मुद्दाम पेरण्यात आला याबाबत काहीही समजू शकले नाही.
सुरत शहरात सतत बॉम्ब सापडत असल्याने शहरात प्रचंड दहशत निर्माण झाली असून, बॉम्ब निकामी करणाऱ्या पथकाला त्यांचे कार्य सुरळीत करता यावे आणि पोलिसांना योग्यरित्या तपासणी करण्यात यावी यासाठी सुरतमधील सर्व शैक्षणिक संस्था, मॉल्स आणि इतर प्रतिष्ठाने बंद ठेवण्यात आली होती.
मुख्यमंत्री मोदी यांनी आज शहरात जाऊन ज्या-ज्या ठिकाणी बॉम्ब सापडले तेथील पाहणी केली. वरछा या ठिकाणी काल सर्वाधिक बॉम्ब सापडले. परिसरातील लोकांशीही त्यांनी चर्चा केली. प्रत्येक ठिकाणी घटनेची माहिती त्यांनी जाणून घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना मोदी म्हणाले की, लोकांची जागरूकता आणि पोलिसांची तत्परता यामुळेच शहरातील मोठा अनर्थ टाळता आला. जिथे-जिथे बॉम्ब सापडले त्या प्रत्येक ठिकाणच्या लोकांनी याविषयीची सूचना पोलिसांना दिली. सर्वप्रथम माहिती देणाऱ्या नागरिकांना प्रत्येकी २१ हजार रुपयांचे बक्षीस राज्य शासनातर्फे दिले जाणार आहे.
सुरत हे शहर मुख्यत्वेकरून हिऱ्याच्या कारभारासाठी देशातच नव्हे, तर विदेशातही प्रसिद्ध आहे. गुजरातमधील बऱ्याच उद्योगांचे सुरत आणि अहमदाबाद हे माहेरघर आहे. येथे घातपात घडवून राज्याचा आर्थिक विकास थोपवून धरण्याचा अतिरेक्यांचा कट होता. केवळ गुजरातच नव्हे तर बंगलोर, मुंबई, जयपूर, हैद्राबाद ही ठिकाणेही देशाच्या आर्थिक तसेच औद्योगिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाची आहेत. येथे घातपात घडवून आणण्याच्या प्रयत्नातून अतिरेक्यांचे मनसुबे स्पष्ट होतात. गेल्या दोन वर्षात जवळपास १२ मुख्य ठिकाणी अतिरेकी हल्ले झाले. बॉम्ब पेरणे आणि त्या माध्यमातून निरपराधांचे प्राण घेणे हे अतिरेक्यांचे छुपे युद्ध आहे, असे मोदी म्हणाले.
नागरिकांनी या काळात संयमाने राहून "छुप्या' शत्रूचा हेतू उधळून लावायचा आहे. गुजरातमधील हल्ले कोणी करविले, याविषयीची चौकशी सुरूच आहे. तपास पूर्ण झाल्यावर सत्य बाहेर येईलच. पण, लोकांनी या काळात पोलिस आणि प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्य करावे, असेही आवाहन मोदी यांनी केले. यापुढे अशा कोणत्याही मोठ्या घातपाताशी संबंधित महत्त्वपूर्ण माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाईल आणि त्या व्यक्तीला ५१ लाखांचे बक्षीस देण्यात येईल, अशी घोषणाही मोदी यांनी यावेळी केली.

दाबोळी विमानतळाच्या कक्षाची भिंत कोसळली केबिनचा चक्काचूर, दोघे पोलिस बचावले

वास्को, दि. ३० (प्रतिनिधी): येथील दाबोळी विमानतळाच्या इंटरनॅशनल टर्मिनलमध्ये उभारण्यात येत असलेल्या कक्षाची भिंत आज संध्याकाळी साडेचारच्या सुमारास अचानकपणे तेथील वाहतूक पोलिसांच्या केबिनवर कोसळली. सुदैवाने तेथील दोघा पोलिसांनी वेळीच बाहेर धाव घेतल्याने ते सुखरुप बचावले. त्यांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. साहाय्यक उपनिरीक्षक फ्रान्सिस्को फर्नांडिस व शिपाई तुकाराम नाईक अशी त्यांची नावे आहेत.
भिंत कोसळल्याचा आवाज होताच तेथे गडबड उडाली. कारण त्याच ठिकाणी प्रवासी व त्यांचे नातेवाइक उभे राहतात. जेव्हा ही दुर्घटना घडली तेव्हा तेथे कोणीही नव्हता. अन्यथा दुर्घटना घडली असती. या घटनेची माहिती मिळताच विमानतळाचे संचालक डी. पॉल मणिक्कम यांनी व अन्य अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. नंतर त्यांनी जेसीबी मशिनद्वारे भिंतीचा कोसळलेला भाग तेथून हटवण्याचे आदेश दिले. त्यानुसार पुढील कार्यवाही करण्यात आली. सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे भिंत कोसळली असावी, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
गोव्यात सध्या अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला असल्यामुळे कड-कड आवाज कशाचा झाला हे पाहण्याकरता आम्ही दोघे जीवाच्या आकांताने बाहेर धावलो व त्यामुळेच बचावलो, अशी माहिती फर्नांडिस व नार्वेकर यांनी दिली. समोरच कोसळलेल्या केबिनचा चक्काचूर पाहून त्यांचाही यावर विश्वास बसला नाही. दरम्यान, दिवसेंदिवस दाबोळी विमानतळाच्या कामाचा व्याप वाढत चालला असून जागा कमी पडू लागली आहे.

कोलवा परिसरात मलेरियाचा फैलाव

मडगाव, दि. ३० (प्रतिनिधी): कोलवा भागात तेथील बांधकाम कामगारांच्या वाढत्या झोपड्यांमुळे तेथे मलेरियाची प्रकरणे वाढल्याच्या तक्रारी आल्या नंतर त्यांची गंभीर दखल सासष्टीचे मामलेदार परेश फळ देसाई यांनी घेतली व तेथील सरपंच तसेच नगरनियोजन, आरोग्य व सार्वजनिक बांधकाम या सरकारी खात्यांच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावून चर्चा केली.
त्यांनी संबंधितांना हे प्रकरण सहजावारी नेऊ नका असे बजावतानाच तेथील जागांना प्रत्यक्ष भेट देऊन पहाणी करण्याची सूचना केली. तक्रारीत तथ्य असेल व परिस्थिती गंभीर असेल तर बांधकामे बंद ठेवण्याचा आदेश जारी करा व झोपडया काढून टाका असेही मामलेदारांनी बजावले. आरोग्य खात्याने यासंदर्भात सतर्क रहाण्याची गरज प्रतिपादताना बांधकामांवरील कामगारांकडे आरोग्य कार्डे आहेत काय ते तपासा व नसल्यास संबंधित ठेकेदाराविरुध्द गुन्हा नोंदवा अशी सूचना त्यांनी केली.

चौपदरीकरणाच्या मार्गात अजूनही अनेक अडथळे

पणजी, दि. ३० (प्रतिनिधी): गोव्यात पत्रादेवी ते पोळे या दरम्यान राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण करण्याचा बेत सरकारने आखला असला तरी "नकटीच्या लग्नात सतराशे विघ्ने' याप्रमाणे या प्रकल्पाच्या अंमलबजावणीत अनेक अडथळे व अडचणी निर्माण होण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. गोव्यातील वाढती रहदारी व रस्ता अपघातांची धोकादायक संख्या पाहिल्यास राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणाची नितांत गरज असताना अंतर्गत रस्त्यांचे रूंदीकरणही गरजेचे आहे. या महाप्रकल्पाबाबत भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून नेमण्यात आलेल्या "मेसर्स विल्बर स्मिथ कंपनी'कडून सादर करण्यात आलेल्या अहवालात या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसंबंधी जी माहिती देण्यात आली आहे ती पाहता हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी राज्य सरकारला पर्यावरण व लोकांच्या पुनर्वसनाचे मुद्दे पार करावे लागणार आहेत. प्राप्तमाहितीनुसार या प्रकल्पामुळे सुमारे ३ हजार कुटुंबांचे पुनर्वसन करावे लागणार असून अंदाजे १८० बांधकामे हटवावी लागणार आहेत. त्याही पलीकडे राज्यात पर्यावरणाच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात जागृती झाली आहे. परिणामी या प्रकल्पामुळे करावी लागणारी वृक्षतोड व "सीआरझेड' विभागातून जाणारे बांधकाम हे पाहता सरकारला हा प्रकल्प राबवताना कसरत करावी लागेल. सदर कंपनीने केलेल्या पाहणीनुसार या प्रकल्पासाठी सुमारे ५०९६ वृक्षांवर कुऱ्हाड चालवावी लागेल. काही ठिकाणी तर "मॅनग्रोव्ह' हटवावे लागणार असून अंतर कमी करण्यासाठी डोंगर कापणीही करावी लागणार असल्याची माहिती या अहवालात आहे. या प्रकल्पाच्या पूर्णत्वास "सीआरझेड'चा मुद्दा आडवा येणार असला तरी त्याबाबत परवानगी मिळवण्याचे आव्हान सरकारसमोर आहे.
दरम्यान, सल्लागार कंपनीकडून या गोष्टी नमूद करण्यात आल्या असल्या तरी त्यासाठीची उपाययोजनाही त्यांनी सुचवल्याची माहिती खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. कोणताही मोठा प्रकल्प उभारायचा झाल्यास काही प्रमाणात नुकसान होणारच परंतु त्या प्रकल्पाच्या पूर्णत्वानंतर होणारा मोठा फायदा लक्षात घेवूनच असे प्रकल्प राबवले जातात,असे मतही सदर अधिकाऱ्याकडून व्यक्त करण्यात आले. या प्रकल्पासाठी ५०९६ झाडांची कत्तल करावी लागली असली तरी त्या बदल्यात सुमारे २० हजार झाडांचे नव्याने वृक्षारोपण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याची माहिती देण्यात आली. वृक्षसंहाराचा विपरीत परिणाम होऊ नये यासाठी ही वृक्षतोड टप्प्याटप्प्याने हाती घेतली जाणार आहे. काही प्रमाणात "मॅनग्रोव्ह' झाडांवर गदा येणार असली तरी आवश्यक ठिकाणी दुपट्ट प्रमाणात या झाडांचे रोपण करण्याचाही विचार पुढे करण्यात आल्याचे कळते. या प्रकल्पामुळे पर्यावरण व्यवस्थापन खर्चाचा आकडा १०.१२ कोटी रुपये होणार असल्याचेही सांगण्यात आले. दरम्यान, हा अहवाल अद्याप मंजूर करण्यात आला नाही. सरकार या अहवालात काही सुधारणा सुचवणार असून पर्यावरण व लोकवस्तीला कमीत कमी नुकसान होणार याची दक्षता सरकारकडून घेतली जाईल,अशी माहिती सार्वजनिक बांधकाम खात्याच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. खात्यातर्फे यापूर्वी या महामार्गाचे सर्वेक्षण करण्यात आले होते व त्यानुसार हे काम हाती घेतल्यास नुकसानी कमी करता येणे शक्य आहे. विद्यमान राष्ट्रीय महामार्गाचे विस्तारीकरण करूनच हा प्रकल्प राबवावा असे मत खात्याकडून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला कळवण्यात आल्याचे सांगून या अहवालाबाबत चर्चा सुरू असल्याची माहिती देण्यात आली.

Tuesday, 29 July, 2008

पोलिस स्थानकावर मडगावामध्ये मोचार्र्

मोतीडोंगर शस्त्रसाठा तपासकामाबद्दल तीव्र नाराजी
मडगाव, दि. २९ (प्रतिनिधी): गेल्या महिन्यात मोतीडोंगरावर सापडलेल्या शस्त्रसाठा प्रकरणातील थंडावलेल्या पोलिस तपासाच्या पार्श्र्वभूमीवर मडगाववासीयांनी आज येथील पोलिस अधीक्षकांच्या कार्यालयावर मोर्चा नेऊन पोलिसांच्या भूमिकेबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली व एक निवेदन पोलिस अधीक्षक शेखर प्रभुदेसाई यांना सादर केले. यावेळी पोलिस उपअधीक्षक उमेश गावकर हेही हजर होते.
पोलिस यंत्रणेचा नसलेला वचक, मोतीडोंगर शस्त्रप्रकरणी पुढे न गेलेला तपास व प्रमुख संशयिताची जामिनावर झालेली सुटका, वरवर दाखवण्यापुरती तेथील घरांची केलेली तपासणी याबाबत लोकांनी तीव्र भावना व्यक्त केल्या. मोती डोंगरावर सापडलेल्या तलवारी आणण्यासाठी या लोकांना पैसा कोठून मिळाला, असा सवाल करतानाच मोठ्या प्रमाणात येणाऱ्या परप्रांतीयांवर बारीक नजर ठेवण्याची मागणी करण्यात आली.
परप्रांतीय मुस्लिमांची मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली संख्या, स्थानिक मुसलमानांनाही धमकावण्याचे त्यांच्याकडून होणारे प्रयत्न व या सर्व प्रकारांकडे सुरक्षा यंत्रणेकडून होणारे दुर्लक्ष यामुळेच स्थिती चिघळते, असे या निवेदनात म्हटले आहे. त्यासाठी संशयित असण्याची शक्यता असलेल्या ठिकाणी त्वरित छापे टाकावेत, मोती डोंगरावरील छापे सत्र चालूच राहावे, मोती डोंगरावरील सर्व बेकायदा झोपड्या पाडाव्यात व तेथे कोणाचीच गय केली जाऊ नये, अशा सूचना या निवेदनात करण्यात आल्या आहेत.
या शिष्टमंडळात शर्मद पै रायतूरकर, कमलिनी पैंगीणकर, कृष्णा पै आंगले, रवी बोरकर, अभय खवंटे, राजू शिरोडकर, जयेश नाईक, नेरुरकर यांचा समावेश होता.

सुरतेत सापडले १७ जिवंत बॉंब

- शहर दहशतीच्या सावटाखाली
- पोलिसांमुळे धोका टळला
- संशयिताचे रेखाचित्र जारी

सुरत, दि. २९ : अहमदाबाद स्फोटानंतर सलग तिसऱ्या दिवशी आज सुरतमध्ये १७ जिवंत बॉम्ब सापडल्याने खळबळ माजली. पण, लगेचच बॉम्बशोधक पथकाने ते निष्क्रिय करून टाकले. दरम्यान, गेल्या २४ तासात अहमदाबाद स्फोट मालिका प्रकरणी झालेल्या महत्त्वपूर्ण अटकसत्रानंतर या शोधकार्यात अधिक वेग आला आहे. आतापर्यंतच्या तपासानुसार, या हल्ल्यांचे धागेदोरे पश्चिम उत्तरप्रदेश आणि दिल्लीसह उत्तरेकडील राज्यांशी संबंधित असल्याचे लक्षात आले आहे. आज याच क्रमात मुंबईतील गुन्हे शाखेने तीन काश्मिरी युवकांना संशयित म्हणून अटक केल्याचेही वृत्त आहे.
लाभेश्वर परिसरातील पोलिस ठाण्यानजीक एकापाठोपाठ तीन जिवंत बॉम्ब सापडले. सुरतमधील वराछा रोड आणि लेडीज मार्केट येथून दोन बॉम्ब जप्त करण्यात आले. लगेचच याठिकाणी बॉम्ब शोधक पथकाला पाचारण करून त्यांनी ते निष्क्रिय केले. या पाचपैकी एक बॉम्ब परिसरातील झाडावर लटकलेला आढळून आला होता. दुसरा बॉम्ब संतोषनगर येथे आढळला. चार बॉम्ब शहरातील उड्डाण पुलाला लटकविलेल्या स्थितीत होते. अहमदाबाद येथे शनिवारी सलग १६ बॉम्बस्फोट झाले. त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून जवळपास रोज सुरतमध्ये स्फोटके आणि बॉम्ब सापडत आहेत. सुदैवाने काही घातपात होण्यापूर्वी त्याचा सुगावा लागल्याने असंख्य लोकांचे प्राण वाचले आहेत. शहरात सलग तीन दिवसपर्यंत इतक्या मोठ्या संख्येने बॉम्ब आढळल्याने लोकांमध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण असले तरी पोलिस लोकांना संयमाने राहण्याचा सल्ला देताहेत. दुसरीकडे, लोकही अतिशय जागरूक राहून वेळोवेळी संदिग्ध वस्तूविषयी पोलिसांना ताबडतोब माहिती पुरवित आहेत. लोकांची जागरूकता हेच आमचे यश असल्याचे पोलिस सांगताहेत.
रविवारी सुरतमध्ये स्फोटकांनी भरलेली एक कार सापडली होती. ही कार हीराबाग परिसरात ठेवणाऱ्या व्यक्तीचे रेखाचित्र काल पोलिसांनी जारी केले होते. या व्यक्तीचे रेखाचित्र एका वॉचमॅनने दिलेल्या माहितीच्या आधारे तयार करण्यात आले.
सर्व बॉम्ब एकाच प्रकारचे
आज सुरतमध्ये सापडलेले सर्व जिवंत बॉम्ब एकाच आकाराचे असल्याचे लक्षात आले आहे. यात वापरलेली स्फोटकेही एकाच प्रकारची आहेत. मुख्य म्हणजे, रविवारी जप्त करण्यात आलेल्या वॅगन आरमधील स्फोटके याच धाटणीची होती. हे सर्व धागे जुळविले असता सुरत शहर हे सध्या स्फोटकांच्या ढिगाऱ्यावर असल्याचे बोलले जात आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, या १७ पैकी कोणत्याही बॉम्बमध्ये टायमर वापरलेले आढळले नाही. टायमरशिवाय बॉम्बस्फोट घडवून आणणे शक्य नसते. त्यामुळे हे बॉम्ब केवळ दहशत पसरविण्यासाठी पेरण्यात आल्याचे बोलले जात आहे.

सव्वा लाखांचे दागिने काणकोणातून पळवले

काणकोण, दि. २९ (प्रतिनिधी): पोलिस चौकीपासून केवळ तीनशे मीटर अंतरावरील शेळेर येथील मधुकर कुडाळकर यांच्या घरात आज दिवसाढवळ्या अज्ञात चोरट्यांनी सुमारे सव्वा लाखांचे दागिने पळवून नेले. यात सोन्याच्या रिंगा, सोनसाखळी, हार, बांगड्या आदी ऐवजाचा समावेश आहे. कुडाळकर कुटुंबीयांचे दैव बलवत्तर म्हणून घरात असलेले अंदाजे पंधरा ते वीस हजार रुपये चोरांच्या हाती लागले नाहीत.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार घराच्या मुख्य दरवाजाला लावलेले कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला व हाती लागलेले दागिन्यांसह त्यांनी पळ काढला. सकाळी आठ ते दुपारी एकदरम्यान हा चोरीचा प्रकार घडला. कुडाळकर दांपत्य सरकारी सेवेत असल्याने घरात कोणीही नसल्याची संधी साधून चोरट्यांनी त्यांच्या घराला आपले लक्ष्य बनवले. पोलिसांनी ठसेतज्ज्ञांना पाचारण करून काही ठिकाणचे ठसे घेतले. तथापि, त्याचा फारसा उपयोग झाला नाही. निरीक्षक सूरज हळर्णकर तपास करत आहेत.
१ जुलै रोजी याच परिसरात राहणारे प्रदीप प्रभुदेसाई यांच्या घरात चोरी होऊन त्यांचे एक लाखाचे दागिने चोरण्यात आले होते. त्या चोरीचा छडा अजून लागलेला नाही. या भागात पुन्हा चोऱ्यांचे सत्र सुरू झाल्याने लोक भांबावले आहेत.

'खाना'वळीला मुजाहिद्दीनची धमकी

मुंबई, दि. २९ : बंगळूर आणि अहमदाबाद येथे झालेल्या साखळी स्फोटांची जबाबदारी स्वीकारणाऱ्या "इंडियन मुजाहिद्दीन' या दहशतवादी संघटनेने आणि "सिमी' या बंदी घातलेल्या संघटनेने आता आपले लक्ष्य बॉलिवूडमधील खान मंडळी असल्याचे "मेल'द्वारे स्पष्ट केल्याने बॉलिवूडमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
अमीर खान, इरफान खान, फरहा खान,सलमान खान,सैफ अली खान आणि शाहरूख खान यांच्यासह अनेक मुस्लिम कलाकारांना यापुढे चित्रपटात काम करू नये अन्यथा त्यांना त्यांच्या परिवारासह ठार मारण्याची धमकी मुजाहिद्दीनने एका खाजगी वृत्तवाहिनीला पाठवलेल्या ईमेलमध्ये दिली आहे. या धमकीकडे दुर्लक्ष न करता सुरक्षा व्यवस्था वाढवण्याची मागणी या कलाकारांनी पोलिस प्रशासनाकडे केली आहे. या खान मंडळींनी कशासाठी चित्रपटांत काम करू नये, याचे कोणतेही कारण देण्यात आलेले नाही.
या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी सर्व कलाकारांच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यास सुरूवात केली आहे. अहमदाबामधील स्फोटानंतर मुंबईतही "रेड अलर्ट' जाहीर करण्यात आला असून ठिकठिकाणी पोलिस तैनात करण्यात आले आहेत. एरवीही मुंबई शहर म्हणजे देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखले जात असल्याने अतिरेक्यांची नजर तेथील मोठी आस्थापने व अन्य वास्तूंवर असतेच. आता त्यात या चित्रपट ताऱ्यांची भर पडल्याने पोलिस आणखी दक्ष झाले आहेत.

पोलिसांच्या ताब्यातून अट्टल चोरटा पळाला

पणजी, दि. २९ (प्रतिनिधी): पणजी पोलिसांच्या ताब्यात असलेल्या युवराज माल्तेश वाल्मिकी (वय २०) या अट्टल चोराला शिर्सी कारवारचे पोलिस अन्य गुन्ह्यांच्या तपासासाठी कारवारला घेऊन जात असताना आज सकाळी त्याने पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पणजी कदंब बसस्थानकावरून पलायन केले.
दुचाकीवरून महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि सोनसाखळी चोरण्यात युवराज तरबेज असून याच प्रकरणात त्याला शिर्सी पोलिसांनी काही महिन्यापूर्वी कारवारमध्ये अटक केली होती. त्यानंतर त्याने काही सोनसाखळ्या आणि दुचाक्या गोव्यातही चोरल्याचे उघड केल्याने त्याला पणजी पोलिसांनी ताब्यात घेतले होते. काल सायंकाळी त्याला प्रथम वर्ग न्यादंडाधिकाऱ्यासमोर उभे केले असता, गोव्यातील गुन्हे शाबीत झाले नसल्याने त्या प्रकरणातून त्याची सुटका करण्यात आली होती. काल सायंकाळी ५.१५ वाजता या विषयीचा आदेश न्यायालयातून पोलिसांच्या हाती आला. त्याला शिर्सी येथे घेऊन जाण्यासाठी कारवारचे दोघे पोलिस गोव्यात आले होते. काल सायंकाळी उशीर झाल्याने ती रात्र त्याला पणजीत न्यायालयीन कोठडीतच ठेवण्याची परवानगी कारवार पोलिसांनी न्यायालयाकडून घेतली. त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवून रात्री हे दोन्ही पोलिस पणजी पोलिस स्थानकाच्या बराकीत झोपले होते. आज सकाळी ७ वाजता त्याला कारवारला घेऊन जाण्यासाठी हे दोन्ही पोलिस कदंब बसस्थानकावर पोहोचले असता, युवराजने शौचालयात जाण्याचे नाटक केले. त्यामुळे त्याच्या हातातील बेडी काढण्यात आली. तो शौचालयात गेला आणि काही वेळाने परत आला. त्यावेळी पुन्हा त्याच्या हातात बेडी घालण्याचा प्रयत्न करीत असताना एका पोलिसाला हिसडा देऊन त्याने पळ काढला व पाहता पाहता तो दिसेनासा झाला. ही माहिती संबंधित पोलिसानेच दिली.
याविषयाची पोलिस तक्रार कारवार पोलिसांनी पणजी पोलिस स्थानकात दाखल केली आहे. पणजी पोलिस सध्या या अट्टल चोराच्या शोधात आहेत. युवराज हा मूळ शांतीनगर पर्वरी पणजी येथे राहणारा आहे.
दोनदा पळून जाण्याच प्रयत्न
युवराज हा पोलिसांनी पकडून तुरुंगात डांबल्यावर तेथून पळून जाण्यासाठी निरनिराळ्या युक्त्या लढवत असतो. कारवार पोलिसांच्या ताब्यात असताना युवराजने तुरुंगाच्या भिंतीचे ओले सिमेंट काढून खाल्ले होते. तेव्हा डॉक्टरांकडे नेताना त्याने पळ काढण्याचा प्रयत्न केला होता. तथापि, लगेच कारवार पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले होते. त्यानंतर पणजी पोलिसांच्या ताब्यात असताना त्याने पणजी तुरुंगातील बल्ब खाल्ला होता. तेव्हादेखील पळून जाण्याचा त्याचा बेत फसला होता. मात्र आज त्याला त्यात यश आले.
याविषयीचा तपास पणजीचे उपनिरीक्षक तुषार लोटलीकर करीत आहेत.

Monday, 28 July, 2008

गोव्याच्या सुरक्षेबद्दल सरकारच बेफिकीर

'सिमी'च्या वावराकडे दुर्लक्ष नको : पर्रीकर
पणजी, दि. २८ (प्रतिनिधी): बंगलोर व अहमदाबाद येथे दहशतवाद्यांनी घडवून आणलेले बॉम्बस्फोट व गोव्यात "सिमी' या कट्टरवादी संघटनेच्या तथाकथित वावराबाबत मिळालेले ठोस पुरावे या पार्श्वभूमीवर गोव्याची सुरक्षितता धोक्यात असून विद्यमान दिगंबर कामत सरकार याबाबत बेफिकीर असल्याचा सनसनाटी आरोप विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी आज केला.
अमेरिका दौऱ्यावरून अलीकडेच परतलेल्या पर्रीकर यांनी राज्यातील अलीकडच्या काळात घडलेल्या अनेक प्रकरणावरून सरकारला चांगले वेठीस धरले. आज पक्षाच्या विधिमंडळ गटाची बैठक झाली व त्यात येत्या पावसाळी अधिवेशनात सरकारला कोंडीत पकडण्यासंबंधी व्यूहरचना आखण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. ही बैठक पुढील शुक्रवारी पुन्हा घेतली जाणार असून त्यानंतरच अंतिम रणनीती ठरवली जाणार असल्याचे ते म्हणाले.
मुख्यत्वे कायदा व सुव्यवस्थेच्या मुद्द्यांवरून मुख्यमंत्री व गृहमंत्री या दोघांनाही चांगलेच धोरवर धरण्याचे ठरले आहे. राज्यात नागरिकांसह खुद्द देवही असुरक्षित बनल्याचा आरोप करून वाढती मूर्ती तोडफोड प्रकरणे ही जाणीवपूर्वक हिंदू व मुस्लिमांत दंगल पेटवण्यासाठी केली जात असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. खुद्द मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात तलवारी सापडतात व त्यात त्यांच्या निकट वारणाऱ्यांचा जवळचा संबंध असल्याने मुख्यमंत्र्यांकडून त्यांना सांभाळण्याचे प्रयत्न केले जातात हे लाजिरवाणे असल्याची टीका पर्रीकरांनी केली.
मडगावात चोऱ्यांचा सुळसुळाट सुरू असून पोलिसांना कुणीही सापडत नाही हा काय प्रकार, असा खडा सवाल त्यांनी उपस्थित केला. या चोरांचा शोध लावण्यात असमर्थ ठरणारे पोलिस दहशतवाद्यांचा मुकाबला कसा करणार, असा सवाल त्यांनी केला. पोलिस चौकशीत झालेल्या गचाळपणामुळे बाटलू व दिपेश रायकर यांच्यासारखे लोक सुटले. मडगावात दंगल झाली असता इस्पितळाच्या आवारात पेट्रोल बॉम्ब फेकण्याची हिंमत संबंधितांनी दाखवली. त्यामुळे गोव्यात यापुढे दहशतवादी हल्ले होणार नाहीत, असा समज करून घेणे चुकीचे ठरेल,असे पर्रीकर म्हणाले.
विविध राज्यांत "सिमी'च्या कार्यकर्त्यांना पकडले गेले असता त्यांनी आपल्या जबानीत "सिमी'चा डेरा गोव्याकडे वळवल्याचे संकेत दिले आहेत. २००० साली वास्को येथे चर्चमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटातही "सिमी'वरच संशयाचे वलय असल्याने याप्रकरणी पोलिस यंत्रणेचे दुर्लक्ष गोवेकरांना महागात पडण्याची शक्यता असल्याची भीतीही पर्रीकर यांनी बोलून दाखवली. गुप्तचर यंत्रणेने दिलेल्या अहवाल फेटाळून गोव्यात "सिमी' नाहीच, असा घाईगडबडीत दावा मुख्यमंत्री कोणत्या आधारावर करतात, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. गेल्या डिसेंबर महिन्यात गोव्यात बॉम्बस्फोट घडवून आणण्याचे मनसुबे पक्के होते हे सदर दहशतवाद्याला पकडल्यानंतर उघड होऊनही सरकार कोणतीही दक्षता घेत नाही. राज्यातील काही झोपडपट्या व मडगावातील मोती डोंगर तसेच खारेबांध येथे कट्टरपंथीय लोक आसरा घेण्याची शक्यचा वर्तवून अशा ठिकाणांची एव्हानाच झडती झाली पाहिजे असेही त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री जर अशा लोकांना आश्रय देत असतील तर ते गोमंतकीयांच्या सुरक्षिततेशी खेळ करीत असल्याचा आरोपही पर्रीकर यांनी केला.

लोक आजही जातीयवाद व अंधश्रद्धेच्या जोखडात नंदकुमार कामत यांची खंत

पणजी, दि. २७ (प्रतिनिधी) ः नागरिकांची वाढती राज्यनिर्भरता आणि दैवनिर्भरता याच आजच्या खऱ्या समस्या आहेत. सरकार व दैवावर विसंबून राहाणारी माणसेच आज अधिक दिसतात. काही वर्षांपूर्वी माणूस अशिक्षित, जातीयवादी आणि संकुचित वृत्तीचा होता, आज आपण तो सुशिक्षित झाल्याचा दावा करतो. हे खरे असले तरी तो जातीयवाद, अंधश्रद्धा यापासून मात्र मुक्त झालेला नाही, ही आपली खरी खंत आहे, असे उद्गार लेखक व विचारवंत डॉ. नंदकुमार कामत यांनी आज येथे काढले.
डॉ. कामत यांच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त त्यांचे विचार ऐकून घेण्यासाठी कला अकादमीच्या ब्लॅक बॉक्समध्ये आयोजित स्नेहमेळाव्यात डॉ. कामत बोलत होते. यावेळी व्यासपीठावर न्या. सत्यरंजन धर्माधिकारी, लेखक दिलीप बोरकर व कला अकादमीचे सचिव डॉ. पांडुरंग फळदेसाई होते.
सध्या गोव्यात अमली पदार्थांचा मोठ्या प्रमाणात प्रसार झाला आहे, १९८० नंतर या राज्याची वाटचाल अधोगतीकडे चालली आहे. भ्रष्टाचाराचा सुकाळ झाला आहे. थिल्लर , सवंग संस्कृती वाढली आहे, असे सांगताना डॉ. कामत यांनी आत्तापर्यंतच्या घडामोडींचा आढावा घेतला. विविध भागांमध्ये वाढत चाललेल्या आत्महत्यांमागील कारणे शोधण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. १५ ते ४५ वर्षे वयोगटात अशी निराशा येण्यामागे समाजाचीही जबाबदारी असल्याचे सांगून त्यांचा विश्वास संपादण्यात, दुःखात वाटेकरी होण्यात आपण कमी पडतो, असे ते म्हणाले.
गोव्यात दहा हजार कोटींची पर्यायी अर्थव्यवस्था अस्तित्वात असल्याचे सांगून ते म्हणाले, कोणत्याही क्षेत्रासाठी निश्चित धोरण नसणे हीच खरी समस्या आहे. येथील योजना, प्रकल्प याबाबत विचार करताना स्थानिकांना विश्वासात घेण्याची, त्यांना सहभागी करून घेण्याची गरज आहे. या मातीची कोणतीही माहिती नसलेल्या सचिवांवर ही कामगिरी सोपविली जाते, ही नामुष्की असल्याचे त्यांनी सांगितले. जीवनाची गुणवत्ता आणि सुखाची उंची असे दोन निकष लावून सत्ताधाऱ्यांनी आपली वाटचाल ठरवावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
आजच्या स्थितीचे डॉ. कामत यांनी योग्य मूल्यमापन केले आहे. त्यांच्यासारख्या अस्वस्थ माणसाने निराश होऊ नये, कारण अशी माणसेच दुसऱ्यांच्या वेदनांवर फुंकर घालू शकतात, असे गौरवोद्गार न्या. धर्माधिकारी यानी काढले.
सूत्रसंचालन संदेश प्रभुदेसाई यांनी केले. उपस्थितांमध्ये आमदार व्हिक्टोरिया फर्नांडिस, सुरेंद्र सिरसाट, सुरेश वाळवे, सतीश सोनक आदींचा समावेश होता.
---------------------------------------------------------------------------------
'देशासाठी योगदान द्या'
आपली घटना ही आदर्श असून, त्यात अधिकारांप्रमाणेच कर्तव्यांचाही उल्लेख आहे. आपला उत्कर्ष साधताना देशाच्या संपत्तीचे रक्षण करा, देशाला गरज लागेल त्यावेळी योगदान द्या, असे आवाहन याप्रसंगी न्या. सत्यरंजन धर्माधिकारी यांनी केले.
--------------------------------------------------------------------------------

सायबरएज संगणकांचे आजपासून वितरण

विद्यार्थ्यांच्या एकजुटीचा विजय : दुर्गादास कामत
पणजी, दि. २८ (प्रतिनिधी): 'सायबरएज' योजनेपासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना उशिरा का होईना, पण अखेर न्याय मिळाला आहे. या योजनेअंतर्गत संगणकापासून वंचित राहिलेल्या सुमारे ४ हजार विद्यार्थ्यांना उद्या २९ जुलै पासून संगणक वितरणाचे काम सुरू होणार आहे. या विद्यार्थ्यांसाठी चांगली गोष्ट म्हणजे त्यांना "विप्रो- पी ४' या नव्या अद्ययावत तंत्रज्ञानयुक्त संगणकांचे वितरण होणार असून उच्च शिक्षण खात्याचे संचालक भास्कर नायक यांनी त्यासाठी खास प्रयत्न केल्याची माहिती देण्यात आली.
सायबरएज योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या संगणकांपासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना न्याय मिळवण्यासाठी सक्रियपणे काम केलेल्या अखिल गोवा विद्यार्थी मंचचे निमंत्रक दुर्गादास कामत यांनी ही माहिती दिली. या संघटनेचे अलीकडेच भारतीय जनता पक्ष विद्यार्थी विभागात विलीनीकरण करण्यात आले. मंचचे माजी निमंत्रक या नात्याने दुर्गादास कामत यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात विद्यार्थ्यांनी दिलेला लढा व या मागणीसाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा अखेर फळास आल्याचे म्हटले आहे. पणजी शहरात मोर्चा काढून आपल्या युवा शक्तीचे दर्शन घडवलेल्या व सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर पोलिसांचाही छळ सहन केलेल्या विद्यार्थ्यांना या मागणीची पूर्तता झाल्याने समाधान लाभणार आहे; विद्यार्थ्यांनी यापुढेही अशीच एकजूट दाखवावी,असे आवाहन कामत यांनी केले आहे.
अलीकडेच उच्च शिक्षण संचालकांची भेट घेऊन २९ जुलैपर्यंत संगणक पुरवण्याची मुदत भाजप विद्यार्थी विभागाने केली होती. या यशात उच्च शिक्षण संचालक भास्कर नायक यांचा वाटा महत्त्वाचा असल्याचे कामत यांनी म्हटले आहे. नायक यांनी हा प्रस्ताव सरकारी दरबारी सादर करून त्याचा नियमित पाठपुरावा केला. त्यात सध्या प्रचलित असलेल्या नव्या तंत्रज्ञानाच्या पेंटीयम-४ चे संगणक मिळवण्यासाठी त्यांनी व्हीप्रो कंपनीकडे प्रयत्न केले व त्यात यश मिळवले. एखाद्या सरकारी अधिकाऱ्याने मनाशी निर्धार केला तर त्यांनी हाती घेतलेले काम निश्चितच पूर्ण होऊ शकते याचे दर्शन भास्कर नायक यांच्या या कामावरून सिद्ध झाल्याचे कामत यांनी म्हटले आहे.
या संगणकांचे वितरण येत्या २५ दिवसांत पूर्ण केले जाणार आहे. खात्याकडून विविध शिक्षण संस्थांच्या यादीनुसार त्यांच्याकडे हे संगणक पोहोचते केले जाणार आहेत. नंतर ते विद्यार्थ्यांना मिळतील. या योजनेसाठी पात्र व सदर ४ हजार विद्यार्थ्यांत समावेश असलेल्या विद्यार्थ्यांनी याबाबत आपल्या कॉलेज व्यवस्थापनाकडे संपर्क साधावा,असे आवाहन कामत यांनी केले आहे.

रेमोच्या गाडीने उघड केल्या सुरक्षेतील त्रुटी

वास्को, दि. २८ (प्रतिनिधी): दाबोळी विमानतळावर "नो पार्किंग'जागेत उभ्या असलेल्या एका गाडीने आज (सोमवारी) गोवा पोलिस व औद्योगिक सुरक्षा दलाची झोप उडवली! त्याचबरोबर घटनेमुळे सुरक्षेतील गंभीर त्रुटी जनतेसमोर आल्या.
सकाळी ८.१५ च्या सुमारास "नो पार्किंग'विभागात एक गाडी (क्रमांक जीए०१-एस ८३६८) उभी असल्याचे औद्योगिक पोलिसांच्या लक्षात आले. या गाडीच्या मालकाबाबत त्यांनी तेथे चौकशी केली असता, कोणीच त्या गाडीवर दावा न केल्याने पोलिसांना संशय आला. गाडीत एक बॅग असल्याचे दिसल्यामुळे तर हा संशय आणखी बळावला. सुरक्षा दलाने गोवा पोलिसांशी संपर्क साधून "स्फोटक निकामी करणाऱ्या पथका'ची मागणी केली. हे पथक तब्बल दोन तासांनी तेथे आले. श्वानांच्या मदतीने गाडीची तपासणी करण्यात आली. गाडीत काय आहे, हे समजून घेण्यासाठी गाडी उघडणे आवश्यक होते, पण त्यासाठी लागणारी सामग्री पथकाकडे नसल्याचे दिसून आले. तेवढ्यात ही गाडी प्रसिद्ध गायक रेमो फर्नांडिस यांची असून ते आज सकाळी मुंबईला विमानाने रवाना झाल्याची माहिती मिळाली. या माहितीवर विसंबून तपासाचे काम अर्धवट टाकून खास पोलिस पथक परतले! राज्यात हाय ऍलर्ट असताना, सुरक्षा व्यवस्थेत किती गलथानपणा आहे, हेच यानिमित्ताने उघड झाल्याची प्रतिक्रिया उपस्थितांनी व्यक्त केली.

Sunday, 27 July, 2008

आक्रमक शिरदोनवासीयांची सरपंच व सचिवाला धक्काबुक्की

ग्रामसभेचा आठ तासांचा विक्रम
पणजी, दि.27 (प्रतिनिधी) - शिरदोन पंचायत क्षेत्रात उभ्या राहणाऱ्या मेगा प्रकल्पाबाबत ग्रामपंचायतीकडून दिशाभूल करण्याचा प्रयत्न होत असल्याच्या निषेधार्थ आज येथील ग्रामस्थांनी सरपंच व पंचायत सचिवांना चांगलाच इंगा दाखवला. सकाळी 10.30 वाजता सुरू झालेली ही ग्रामसभा तीन वेळा तहकूब करण्यात आली. ही सभा झालीच पाहिजे असा हेका धरून पोलिस बंदोबस्त व तिसवाडी तालुका मामलेदारांच्या उपस्थितीत संध्याकाळी 6.30 वाजेपर्यंत ग्रामसभा चालू ठेवण्याचा विक्रम शिरदोनवासीयांनी आज केला, परंतु आजच्या ग्रामसभेच्या कामकाजाचा एकही विषय चर्चेला न येता गेल्या ग्रामसभेच्या इतिवृत्ताला मान्यता देण्यातच ही सभा आटोपती घेण्याची वेळ पंचायत मंडळावर आली.
राज्यात सर्वांत प्रथम मेगा प्रकल्पांविरोधात आवाज काढणाऱ्या शिरदोनवासीयांनी आज खऱ्या अर्थाने लोकजागृती व लोकशक्तीचे दर्शन घडवले. शिरदोन पंचायत क्षेत्रात गेल्या तीन वर्षांपासून दोन मेगा प्रकल्पांचे काम सुरू आहे. हे प्रकल्प "सीआरझेड'कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप करून त्याची कोणतीही माहिती देण्यास पंचायत तयार नसल्याने ग्रामस्थांनी याविरोधात दंड थोपटले आहे. आज जेव्हा सकाळी 10.30 वाजता ग्रामसभेला सुरुवात झाली तेव्हा सुरुवातीस पंचायत सचिव रेन्सी जुलियो डायस यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचायला सुरुवात केली. ग्रामसभेत ग्रामस्थांनी घेतलेले निर्णय व प्रत्यक्षात सचिवांनी वाचलेले इतिवृत्त यात मोठ्या प्रमाणात तफावत जाणवल्याने वादाला सुरुवात झाली. सचिवांनी आपल्या मर्जीप्रमाणे ठराव लिहिल्याचा आरोप करून ग्रामस्थांनी सरपंच सुषमा काणकोणकर यांना चांगलेच धारेवर धरले. ग्रामसभेत सुमारे तीनशे ते साडेतीनशे लोकांना सामोरे जाण्याचे धारिष्ट्य नसलेल्या सरपंचांना बोलण्याचे व लोकांच्या रोषाला सामोरे जाण्याचे धाडस नसल्याने त्यांची पाचावर धारण बसली व एकच गोंधळ निर्माण झाला. यावेळी लोकांनी उपस्थित केलेल्या मुद्यांना सचिवांकडून उत्तरे देण्याचे प्रयत्न सुरू झाले असता या गोंधळाचे पर्यवसान ढकलाढकलीत झाले व त्यात सचिवांना काही प्रमाणात मारहाणही झाल्याची माहिती मिळाली आहे. पंचायत सचिवांना जमिनीवर पाडण्यात आल्याची माहिती येथील काही प्रत्यक्षदर्शी लोकांनी दिली. यावेळी सरपंच काणकोणकर यांनी ग्रामसभा तहकूब केली असता ग्रामस्थांनी जोरदार आक्षेप घेतला व गोंधळा अधिक वाढला. यावेळी पणजी पोलिस स्थानकातून पोलिसांची तुकडी तिथे तैनात करावी लागली. तिसवाडीचे गट विकास अधिकारी , पोलिस उपअधीक्षक बाणावलीकर व आगशी पोलिस स्थानकाचे निरीक्षक विश्वेष कर्पे यांनी ग्रामस्थांची समजूत काढून अखेर पुन्हा एकदा ग्रामसभेला सुरुवात केली. ग्रामसभेला पुन्हा एकदा सचिवांनी ठरावात केलेल्या फेरफारीचा विषय चर्चेला आला. यावेळी सरपंचांनी सांगितल्याप्रमाणे आपण ठराव लिहिल्याचे सचिवांनी उत्तर दिले व त्याचवेळी सरपंचांनी या विधानाला आक्षेप घेतल्याने पुन्हा एकदा सचिव ग्रामस्थांच्या टीकेचे लक्ष्य बनले. दोन्ही मेगा प्रकल्पांची पाहणी करून त्यांच्या परवान्याबाबत निर्णय घेण्याबाबतचा खुलासा लोकांनी सरपंचाकडे मागितला असता ती काहीही बोलण्यास तयार नसल्याने तिने पुन्हा एकदा ग्रामसभा तहकूब करण्यात आली. यावेळी सरकारी अधिकाऱ्यांनी ग्रामसभा अशी तहकूब करता येत नसल्याचे समजवल्यानंतर दुपारी पुन्हा एकदा ग्रामसभेला सुरुवात करण्यात आली. सरपंचांना जबाब देता येत नसेल तर त्यांनी त्वरित राजीनामा द्यावा,अशी मागणी काही लोकांनी केली. प्रत्येक वेळी सचिवांकडून आपली चूक झाल्याचे सांगितले जात असल्याने त्याला आक्षेप घेत या चुकीबाबत काय कारवाई करणार अशी विचारणा केली असता तरीही सरपंच काहीही बोलत नसल्याने ग्रामस्थ अधिकच बेजार झाले. यावेळी सचिवांकडून पुन्हा चूक झाल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचे आश्वासन सरपंचांना द्यावे लागले.
गेल्या ग्रामसभेचे संपूर्ण इतिवृत्त बदलावे लागण्याची पाळी सचिवांवर आली. दरम्यान, सत्ताधारी गटातील तीन व विरोधी गटातील तीन पंच सदस्य हजर होते परंतु सरपंच या नात्याने व ग्रामसभेचे अध्यक्ष या नात्याने सरपंचांनीच उत्तरे देण्याची गरज असल्याचा हेका ग्रामस्थांनी लावल्याने महिला सरपंचांची मात्र चांगलीच गोची झाली. दरम्यान, या ठिकाणी मेगा प्रकल्पांचे काम करणाऱ्या विकासकांना ग्रामसभेत बोलावून या प्रकल्पाची माहिती ग्रामस्थांना देण्याची मागणी करण्यात आली होती त्याबाबतही पंचायत काहीही करीत नाही. गेल्या तीन वर्षांपासून या प्रकल्पाचे काम सुरू असून पंचायतीला त्याबाबत काहीच माहीत नसणे हे दुर्दैव असून अशावेळी आता ग्रामस्थांनाच कडक भूमिका घेणे भाग पडल्याची माहिती उपस्थित काही ग्रामस्थांनी दिली. आमदार,खासदार किंवा मंत्री लोकांची दिशाभूल करतात हे मान्य परंतु गावाचे नेतृत्व करणारे प्रतिनिधीच जर अशा पद्धतीने वागू लागले तर मात्र लोकांना त्याविरोधात बंड पुकारणे गरजेचे असून जनतेचा धाक निर्माण झाल्याशिवाय ही परिस्थिती बदलणार नाही,असेही मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

स्फोटाचे धागेदोरे नव्या मुंबईत

अहमदाबाद बॉम्बस्फोट मालिकेचे तार नवी मुंबईशी जुळलेले दिसून आलेले आहेत. स्फोट होण्याच्या तीन मिनिटांपूर्वी ज्या ई-मेलवरून स्फोट होण्याची सूचना देण्यात आली होती तो ई-मेल सानपाडा परिसरातून पाठविण्यात आला असल्याचे चौकशीतून स्पष्ट झालेले आहे. "काही मिनिटांतच स्फोट होणार आहेत. हे स्फोट रोखायचे असतील तर रोखून दाखवा,'असे या ई-मेलमध्ये म्हटले होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि रिलायन्स उद्योग समूहाचे उद्योगपती मुकेश अंबानी या दोघांनाही या ई-मेलमध्ये धमकी देण्यात आली होती. स्फोटांनंतर हा ई-मेल काही मिनिटांतच विविध टीव्ही वाहिन्यांना तसेच वृत्तपत्रांच्या कार्यालयांना पाठविण्यात आला होता. याहूच्या वेबसाईटवर "अलअरबी गुजरात' या नावाने हा ई-मेल पाठविण्यात आला होता. "इंडियन मुजाहिदीन'च्या बॅनरखाली तयार करण्यात आलेल्या या ई-मेल अकाऊंटच्या चौकशीतून लक्षात येते की, या संघटनेला भारतात सक्रिय असलेल्या सिमी व लष्कर-ए-तोयबाची मदत मिळालेली आहे, असे सुरक्षा संस्थांनी म्हटलेले आहे. दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस)नवी मुंबईच्या सानपाडा येथील पाम बीच मार्गावरील एका अपार्टमेंटवर धाड घातली व एक कॉम्प्युटर जप्त केला. याच कॉम्प्युटरमधून हा ई-मेल पाठविण्यात आला होता.
""आम्ही गुनिया बिल्डींगमधील एका निवासस्थानावर धाड घातली. आम्ही ज्या व्यक्तीकडे धाड घातली त्याची वैयक्तिक चौकशी करीत आहोत. या धाडीत एक कॉम्प्युटर देखील जप्त केलेला आहे. देशात आणखी घातपाती कारवाया करण्याची धमकी देणारा ई-मेल याच कॉम्प्युटरमधून पाठविण्यात आला होता. खरेच हा ई-मेल या कॉम्प्युटरमधून पाठविला गेला काय की अतिरेक्यांनी तसे भासविले, याची शहानिशा केली जात आहे,''अशी माहिती एटीएसच्या एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने दिली.

सूरतमध्ये सापडल्या स्फोटकांच्या दोन कार

मृतांची संख्या 49

लष्कराचा "फ्लॅग मार्च'
दोन जिवंत बॉम्ब निष्क्रिय
स्फोटाचे तार नवी मुंबईकडे
सानपाडा परिसरातून पाठवला होता ई-मेल
पंतप्रधान आज अहमदाबादेत
अतिरेक्यांची आणखी घातपाताची धमकी
राजधानीतही आला धमकीचा ई-मेल
दिल्ली, मुंबईसह अनेक शहरांत सतर्कता वाढविली
बंगलोर-अहमदाबाद स्फोटांत अनेक साम्य
युरोपीय संघ, अमेरिकेकडून स्फोटांचा निषेध

अहमदाबाद/मुंबई, दि.27 - संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या अहमदाबादमधील बॉम्बस्फोट मालिकेतील मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या आता 49 वर पोहोचलेली आहे. जवळपास शंभर नागरिक या स्फोटांमध्ये जखमी झालेले आहेत. तब्बल 19 स्फोटांच्या या मालिकेमागे "लष्कर-ए-तोयबा', "सिमी' यासारख्या मुस्लिम दहशतवादी संघटनांचा हात असण्याची शक्यता वर्तविण्यात येत असतानाच "इंडियन मुजाहिदीन' नामक दहशतवादी संघटनेने या स्फोटांची जबाबदारी स्वीकारलेली आहे. संपूर्ण अहमदाबादमध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली असून लष्कराने आज "फ्लॅग मार्च' केला. या स्फोट मालिकेचे तार नवी मुंबईशी जुळलेले आढळले आहेत. स्फोट होण्याच्या अवघ्या तीन मिनिट आधी स्फोट होणार असल्याविषयीचा पाठविण्यात आलेला ई-मेल सानपाडा परिसरातून पाठविण्यात आला असल्याचे स्पष्ट झालेले आहे. पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी या स्फोटांवर तीव्र चिंता व्यक्त केली असून, या स्फोटांची माहिती घेण्यासाठी ते उद्या अहमदाबादला भेट देणार आहेत.
अतिरेक्यांनी देशभरात आणखी घातपात घडविण्याची धमकी दिलेली आहे व राजधानी दिल्लीतही घातपात घडविण्याच्या धमकीचा ई-मेल मिळाला असल्याने दिल्ली, आर्थिक राजधानी मुंबईसह अनेक शहरांमधील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली असून सतर्कतेचे आदेश देण्यात आलेले आहेत. दरम्यान, सूरत येथे स्फोटकांनी भरलेल्या दोन "व्हॅगन-आर' कार आढळून आल्याने आणखी मोठा घातपात घडविण्याच्या अतिरेक्यांच्या मनसुब्यांवर पाणी फेरले गेले आहे. सूरत व अहमदाबादमध्ये दोन जिवंत बॉम्ब सापडले असून ते निष्क्रिय करण्यात यश आलेले आहेत. बंगलोर व अहमदाबाद या दोन्ही ठिकाणच्या बॉम्बस्फोटांमध्ये समानता दिसून आलेली आहे.
लष्कराचा "फ्लॅग मार्च'
अहमदाबादमध्ये काल झालेल्या 19 बॉम्बस्फोटांनंतर पोलिसांनी आज एक जिवंत बॉम्ब निष्क्रीय केला. या स्फोटांच्या पार्श्वभूमीवर लष्कर तैनात करण्यात आले असून जातीय दंगलींची पार्श्वभूमी लक्षात घेता संवेदनशील असलेल्या या शहरात लष्कराने "फ्लॅग मार्च' केला.
अहमदाबादेत रात्रभर धाडी
बॉम्बस्फोट मालिकेनंतर पोलिसांनी अहमदाबाद शहरात अनेक ठिकाणी धाडी घातल्या. या कारवाईत अनेक जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यातन आले. मात्र, अद्यापपर्यंत कोणालाही अटक कऱ्णयात आलेली नाही, अशी माहिती गुन्हे अण्वेषन विभागाचे पोलिस सहायुक्त आशीष भाटिया यांनी दिली.
""आम्ही रात्रभर धाडसत्र चालविले. अनेकांना ताब्यात घेतले. मात्र, कोणाताही पुरावा हाती लागलेला नाही. काही अफवाही पसरलेल्या आहेत. स्फोट झाल्यानंतर अर्धवट धडाचा मृतदेह आढळून आलेला आहे. हा मृतदेह आत्मघाती हल्लेखोराचा असावा व सिटी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये स्फोट घडविण्यासाठी त्याचा वापर झाला, अशी अफवा आहे. मात्र, आमचा तसा संशय नाही. कारण त्याची ओळख अद्याप पटलेली नाही. मात्र, या बॉम्बस्फोट मालिकेत कुठेच आत्मघाती हल्लेखोर नसेल, असेही आम्ही म्हणणार नाही,''असेही भाटिया यांनी सांगितले.
स्फोटकांच्या दोन कार
सूरतच्या पुनागांव व वाराछा रोडवरून स्फोटकांनी भरलेल्या दोन "व्हॅगन-आर' कार आढळून आल्या आहेत. या दोन्ही कार एकाच मालिकेतील असून दोन्ही कारचा क्रमांक बनावट असल्याचे निदर्शनास आलेले आहे. या घटनांमुळे मोठी खळबळ उडाली आहे.
पुनागाव परिसरात सापडलेली "व्हॅगन-आर' काळ्या रंगाची आहे. या कारवर डॉक्टरचे स्टीकर लावण्यात आले होते. बेवारस स्थितीत ही कार उभी होती. या कारमधून बॉम्ब तयार करण्याचे साहित्यही हस्तगत करण्यात आलेले आहे. या कारमधून किती मोठ्या प्रमाणात स्फोटके सापडली, हे मात्र समजू शकले नाही. या स्फोटकांनी भरलेल्या कारची कसून तपासणी केली जात आहे. स्फोटकांनी भरलेली आणखी एक "व्हॅगन-आर' वाराछा रोडवर सापडली. लाल रंगाच्या या कारमध्ये स्फोटके, बॉम्ब व बॉम्ब साहित्य आढळून आले. यावरून हल्लेखोरांनी या घातपातांमध्ये सायकलींसोबतच "व्हॅगन-आर'चाही उपयोग केला असल्याचे स्पष्ट होते, असे पोलिसांनी सांगितले. अहमदाबादपाठोपाठ सूरतवरही अतिरेक्यांचा नेम होता, हेच यावरून दिसून येते, असेही पोलिसांनी म्हटले आहे.
जिवंत बॉम्ब सापडले
अहमदाबादमधील रामोल व सूरतमधील सिटी लाईट रोडवर जिवंत बॉम्ब आढळून आलेत. बॉम्बशोधक व नाशक पथकाच्या जवानांनी हे दोन्ही बॉम्ब निष्क्रिय केलेत. सूरतमध्ये सिटी लाईट रोडवर नुपूर हॉस्पिटलनजीक जिवंत बॉम्ब आढळून आला. लाकडी डब्यातील एका पिशवीत हा बॉम्ब ठेवला होता. या बॉम्बला नंतर निष्क्रिय करण्यात आले. या बॉम्बमधील पदार्थांची तपासणी करण्यात येत असून त्यासाठी न्यायसहायक प्रयोगशाळेची मदत घेतली जात आहे.
बळिसंख्या 49
काल झालेल्या 19 बॉम्बस्फोटांमध्ये बळींची संख्या आता 49 झालेली आहे, तर जखमींची संख्या 145 आहे. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे, अशी माहिती गुजरातचे आरोग्यमंत्री जयनारायण व्यास यांनी दिली. मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर त्यांनी ही माहिती दिली.
सूरतमध्ये सिनेमाचे खेळ रद्द
खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाने शहरातील सर्वच चित्रपटगृहांमधील सिनेमाचे खेळ रद्द केलेले आहे. नागरिकांनी शक्यतोवर घरातच राहावे, असे आवाहनही प्रशासनाने केलेले आहे.
वडोदरामध्ये "रेड अलर्ट'
अहमदाबादमध्ये काल झालेल्या 19 बॉम्बस्फोटांच्या पार्श्वभूमीवर वडोदरा शहरात रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे, अशी माहिती शहर पोलिस आयुक्त राकेश अस्थाना यांनी दिली.
शहरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आलेली आहे. विमानतळ, रेल्वेस्थानकांवरील सुरक्षेत वाढ करण्यात आलेली आहे. तपासचौक्यांवर अतिरिक्त सुरक्षा जवान तैनात करण्यात आलेले आहे. शहरातून बाहेर जाणाऱ्या सर्वच रस्त्यांवर वाहनांची कसून तपासणी केली जात आहे.
पंतप्रधान, सोनिया उद्या अहमदाबादेत
अहमदाबादमधील 19 बॉम्बस्फोटांच्या मालिकेमुळे व अतिरेक्यांनी आणखी घातपात घडविण्याच्या दिलेल्या धमकींमुळे पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी चिंता व्यक्त केली आहे. ते उद्या अहमदाबादला जाणार असून बॉम्बस्फोट झालेल्या घटनास्थळांवर जाऊन परिस्थितीचा आढावा ते घेणार आहेत. घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना ते धीर देणार आहेत व इस्पितळात जाऊन जखमींच्या प्रकृतीची चौकशी करणार आहेत. कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी या देखील अहमदाबादला भेट देणार आहेत.
अमेरिकेकडून निषेध
बंगलोर आणि अहमदाबाद येथे एकापाठोपाठ एक झालेल्या बॉम्बस्फोट मालिकांचा अमेरिकेने तीव्र शब्दांत निषेध केला आहे. "अतिरेक्यांनी केलेले हे अत्यंत घृणास्पद कृत्य आहे,'असे अमेरिकेने म्हटले आहे.
"बंगलोर व अहमदाबादमध्ये झालेल्या बॉम्बस्फोट मालिकांचा अमेरिका निषेध करते,' असे अमेरिकी दूतावासाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
युरोपीय संघाकडूनही निषेध
बंगलोर येथे शुक्रवारी व अहमदाबाद येथे शनिवारी झालेल्या बॉम्बस्फोट मालिकेचा युरोपीय संघानेही निषेध केलेला आहे.
""अनेक निरपरांधाचा प्राण घेणारे कृत्य अतिरेक्यांनी केलेले आहे. दहशतवादाविरुद्धच्या लढाईत आम्ही भारताच्या बाजूने राहू. या दोन्ही शहरांमधील दहशतवादी घटनांमध्ये बळी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना झालेल्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. या हल्ल्यांचे कदापिही समर्थन केले जाऊ शकणार नाही व भारताच्या एकात्मतेलाही धक्का बसणार नाही,''असे युरोपीय संघाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
बॉम्बस्फोटाच्या धमकीचा ई-मेल दिल्लीतही
बंगलोर व अहमदाबाद पाठोपाठ दिल्लीमध्येही बॉम्बस्फोट मालिका घडवून आणण्याची धमकी देण्यात आलेली आहे. एका खासगी वृत्तवाहिनीला हा धमकीचा ई-मेल मिळाला असून या ई-मेलची शहनिशा दिल्ली पोलिस करीत आहे. दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखा व विशेष पथकाने ई-मेलच्या कसून तपासणीला सुरुवात केलेली आहे. या धमकीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेस्थानके, विमानतळ, मेट्रो स्थानके, आयएसबीटी आदींची सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आलेली आहे.
बंगलोर-अहमदाबादच्या स्फोटांत अनेक साम्य
ंबंगलोर आणि अहमदाबाद या दोन्ही शहरांमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटांमध्ये अनेक समानता असल्याचे निदर्शनास आलेले आहे. दोन्ही ठिकाणी झालेल्या स्फोटांची तीव्रता कमी होती. शक्तिशाली, महासंहारक अशी स्फोटके अतिरेक्यांनी दोन्ही शहरांत वापरलेली नाहीत. स्फोटांसाठी दोन्ही शहरांतील वर्दळीची स्थाने अतिरेक्यांनी निवडली. बंगलोर कर्नाटकात, तर अहमदाबाद गुजरातमध्ये आहे व या दोन्ही राज्यांमध्ये भाजपाची सरकारे आहेत व भाजपाची दहशतवादाविरुद्धची भूमिका अतिशय कठोर, मार्मिक व रोखठोक आहे.

"कॉंग्रेसच्या राजवटीत देश असुरक्षित'

भाजपची निषेध सभा
पणजी, दि.27 (प्रतिनिधी)- आजपर्यंत केवळ खोटारडेपणा व पैशांच्या बळावर राजकारण करणाऱ्या कॉंग्रेसने संसदही विकत घेतली आहे. देशाचा स्वाभिमान अमेरिकेकडे गहाण ठेवणाऱ्या अणूकराराला मान्यता मिळवून देण्यासाठी कोट्यवधींची आमिषे दाखवून खासदारांना विकत घेणाऱ्या कॉंग्रेसच्या राजवटीत भारत देश नक्कीच सुरक्षित नाही, असे उद्गार भाजपचे राष्ट्रीय सचिव तथा अरुणाचल प्रदेशचे खासदार किरेन विजेजू यांनी काढले.
गेल्या 22 जुलै रोजी संसदेत विश्वासमत ठरावावेळी केंद्रातील संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने पैशांचा बाजार मांडून संसदेची शान व प्रतिष्ठा धुळीस मिळवल्याच्या निषेधार्थ प्रदेश भाजपतर्फे आज एका खास जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. पर्वरी आझाद भवन सभागृहात खचाखच भरलेल्या या सभेत खासदार विजेजू यांनी कॉंग्रेसकडून देशाची कशा पद्धतीने वाट लावणे सुरू आहे, याचे अनेक किस्सेच सादर केले. यावेळी प्रदेशाध्यक्ष श्रीपाद नाईक, उपाध्यक्ष केशव प्रभू, कुंदा चोडणकर इतर पदाधिकारी मंगलदास गांवस, मनोहर आडपईकर,सदानंद शेट तानावडे,राजेंद्र आर्लेकर, इब्राहिम मुसा, मुक्ता नाईक, नरेंद्र सावईकर आदी हजर होते. व्यासपीठावर भाजपचे आमदार फ्रान्सिस डिसोझा, दामोदर नाईक, लक्ष्मीकांत पार्सेकर, अनंत शेट, मिलिंद नाईक, दयानंद सोपटे, दिलीप परूळेकर, दयानंद मांद्रेकर हेही उपस्थित होते.
विजेजू यांनी आपल्या भाषणाला सुरुवातच करताना लोकसभेचा खासदार म्हणवून घेणे ही सुद्धा आता शरमेची गोष्ट बनल्याचे सांगितले. लोकशाहीचे पवित्र स्थान म्हणून ज्या संसदेची प्रतिष्ठा व मान होता तो कॉंग्रेसने आपल्या गलिच्छ राजकारणाने पूर्णपणे घालवल्याची टीका त्यांनी केली. पंतप्रधान डॉ.मनमोहनसिंग व कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी या अमेरिकेच्या दलाल बनल्याचा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला. 1980 साली गरिबी हटावचा नारा कॉंग्रेसने दिला व तेव्हापासून आत्तापर्यंत गरिबीचा आकडा वाढतच आहे. चीनकडून अरुणाचल प्रदेशावर आपला हक्क सांगितला जात असताना तेथील दूतावासाला साधी समज देण्याचे भानही कॉंग्रेस सरकारला राहिले नाही. उत्तरेत सीमाभागात राहणारे लोक आपला जीव मुठीत धरून दिवस काढीत आहेत. अटलबिहारी वाजपेयींसारखे खंबीर व देशाचा स्वाभिमान जागवणारे नेतृत्व त्यांना हवे आहे व ते पूर्ण करण्यासाठी विकसीत राज्यातील सुशिक्षित लोकांनी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.
गोवा हे साक्षरता व जीवनमानाच्या अनुषंगाने पुढारलेले राज्य आहे व इथे जागृतीचे प्रमाणही जास्त आहे असे असताना येथील मतदारांनी कॉंग्रेसच्या वाटेने दिलेला कौल हा त्यांच्या भ्रष्टाचाराला दिलेली मान्यता असल्याचे ते म्हणाले. गोवेकरांनी या पैशांच्या राजकारणाला जर थारा दिला तर गरीब व मागासलेल्या राज्यातील लोकांनी कुणाकडे आशेने पाहावे,अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. देशाच्या उत्तरी भागात मोठ्या प्रमाणात बंागलादेशींची घुसखोरी सुरू आहे. येत्या काही वर्षांत देशाचा हा पट्टा बंागलादेशचा भाग बनवण्याचा संकल्प बंागलादेशातील कट्टरवाद्यांनी सोडला आहे व त्यामुळे आपल्या लोकांची लोकसंख्या या भागात वाढवण्याचे नियोजित कारस्थान सुरू आहे. कॉंग्रेसने केवळ मतांचे राजकारण करून या लोकांना आश्रय देण्यास सुरुवात केल्याने या कटात बंागलादेशींचे स्वप्न पूर्ण करण्यास कॉंग्रेसचाही हात असल्याचे तेथील नेते सर्रासपणे सांगतात. देशहिताखातर या कॉंग्रेसचा नायनाट करणे हे आता देशवासीयांसमोरील मोठे आव्हान असून येत्या लोकसभा निवडणुकीत प्रत्येक नागरिकाने हा विडा उचलावा,असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. सुमारे 80 टक्के हिंदू लोक राहणाऱ्या या देशात राम मंदिर किंवा अमरनाथ यात्रेकरूंना जागा मिळत नसेल तर ती कुठे पाकिस्तानात मिळेल, असा सवाल विजेजू यांनी उपस्थित केला. केवळ निधर्मी व जातीयतेचे टुणटुणे वाजवून कॉंग्रेस आपली पोळी भाजून घेत असल्याचा आरोप त्यांनी केला. देशाचे नेतृत्व जोपर्यंत गांधी घराण्याच्या जोखडातून मुक्त होणार नाही तोपर्यंत हा देश सुधारणार नाही, असेही ते म्हणाले.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष श्रीपाद नाईक यांनीही यावेळी कॉंग्रेसवर घणाघाती टीका केली. अर्थसंकल्पात सुमारे 60 हजार कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर झाली असली तरी शेतकऱ्यांच्या आत्महत्या मात्र अजूनही सुरू आहेत. हा पैसा खरोखरच शेतकऱ्यांकडे पोहोचणार की पुढील लोकसभेसाठी वापरण्याची तरतूद सरकारने केली आहे, याचा शोध लावावा लागेल,असा संशय श्री.नाईक यांनी व्यक्त केला. राहुल गांधी विदर्भात गेले व तिथे त्यांनी एका शेतकऱ्याची विधवा पत्नी कलावती हिची भेट घेतली. तिच्या घरात वीज नसल्याचे कारण पुढे करून अणूकराराचे समर्थन करण्याचा बाळबोधपणा राहुलने केला. आपल्या पणजोबापासून ते वडिलांपर्यंत देशाचे नेतृत्व करणाऱ्यांनी एवढी वर्षे काय दिवे लावले याचा शोध त्यांनी सुरुवातीला लावावा,असा सल्ला श्रीपाद नाईक यांनी दिला. विदर्भातील कलावतीप्रमाणे इथे प्रत्येक ठिकाणी पिडीत लोक आहेत व त्यांच्या नावाने फुकाची भाषणे व घोषणा करून कॉंग्रेस या लोकांच्या टाळूवरील लोणी चाखण्यातच गुल्ल आहे, असा थेट आरोप श्री.नाईक यांनी केला. अणूकराराला भाजपचा विरोध नसला तरी या कराराव्दारे देशाचा स्वाभिमानच गहाण ठेवण्याची कृती निषेधार्ह असल्याचे श्रीपाद नाईक म्हणाले.इराककडे अण्वस्त्रे असल्याचे सांगून या देशात घुसून अमेरिकेने इराकची ज्या पद्धतीने राखरांगोळी केली तीच परिस्थिती भारतावर भविष्यात येऊ नये,अशी भिती त्यांनी व्यक्त केली.अणूकरारानंतर केवळ चार ते पाच टक्के वीज वृद्धी होणार असल्याने त्याचा बाऊ करून हजारो कोटींच्या व्यवहारांचा हा करार एक गुपित असल्याचा धोकाही त्यांनी दर्शवला. कर्नाटकातील बंगलोर व त्यानंतर गुजरात येथे झालेल्या बॉम्बस्फोटांनंतर कॉंग्रेसच्या हातात देश किती असुरक्षित आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. आपल्या सुरक्षेची मदार या सरकारवर न ठेवता आता प्रत्येक नागरिकाने देशाचा शिपाई व सरदार म्हणूनच काम करावे लागेल,असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
आजच्या या सभेत बॉम्बस्फोटांत मृत झालेल्या लोकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. स्वागत विजय चोडणकर यांनी केले. प्रास्ताविक नरेंद्र सावईकर यांनी केले. यावेळी राजेंद्र आर्लेकर,आमदार फ्रान्सिस डिसोझा,लक्ष्मीकांत पार्सेकर आदींनी भाषणे केली. आमदार दामोदर नाईक यांनी सूत्रसंचालन केले. पैंगिणचे आमदार रमेश तवडकर यांच्या वाढदिवसानिमित्त अर्धफोंड पैंगिण येथे श्री बलराम निवासी हायस्कूलच्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी गेल्याने विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर हे या सभेस अनुपस्थित होते.
बॉंबस्फोटांनी अहमदाबादही हादरले
२६ ठार, शंभरहून अधिक जखमी, सायकलींत लपवली स्फोटके

अहमदाबाद, दि. २६ - बंगलोरमध्ये काल शुक्रवारी झालेल्या बॉंबस्फोटांची मालिका ताजी असतानाच आज (शनिवारी) गुजरातच्या या राजधानीला सायकलमध्ये लपवण्यात आलेल्या अशाच साखळी बॉंबस्फोटांच्या मालिकेने हादरवले. त्यात किमान २६ जणांचा बळी गेला असून सुमारे शंभरहून अधिक जण जखमी झाले आहेत. एकूण १७ ठिकाणी स्फोट झाले. त्यातील काही स्फोटके बसमध्ये लपवण्यात आली होती, अशी माहिती अहमदाबादचे पोलिस आयुक्त जी. के. परमार यांनी दिली. या पार्श्वभूमीवर देशातील प्रमुख शहरांमध्ये सुरक्षाव्यवस्था अत्यंत कडक करण्यात आली आहे.
सायकलींवर लावलेल्या टिफिनमध्ये ही स्फोटके लपवण्यात आली होती. मणिनगर, इसमापूर, हटकेश्वर, बापूनगर, गोविंदवाडी, ठक्करनगर, जयादर चौक, सारंगनगर, साखेज, सारंगपूर ब्रिज, नरोल सर्कल, ओढाव, सारसपूर, चकला परिसर, राजेंद्र पार्क, कोयला मंदिर, सत्तार बाप्पा नगर, जोहापुरा आदी ठिकाणी हे स्फोट झाले. या परिसरात आणखीही जिवंत बॉंब असण्याची शक्यता असून ते शोधण्याची मोहीम रात्री उशिरापर्यंत सुरू होती. संध्याकाळी ६.४५ वाजता पहिला स्फोट झाला व त्यानंतर लागोपाठ हा सारा परिसर स्फोटांच्या मालिकेने हादरला. मणिनगर हा गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचाच मतदारसंघ आहे. जखमींना तातडीने विविध रुग्णांलयात दाखल करण्यात आले असून त्यांच्या उपचारासाठी खास व्यवस्था करण्यात आली आहे. विशेष म्हणजे दोन इस्पितळांच्या बाहेरही हे स्फोट घडवले गेले. स्फोट होताच मोबाईलचे नेटवर्क जॅम झाले. त्यामुळे लोकांना परस्परांशी संपर्क साधणे कठीण बनले होते. बंगलोरमध्ये स्फोट झाले तेव्हा असाच प्रकार घडला होता. या पार्श्वभूमीवर संपूर्ण गुजरातमधील सुरक्षा कडक करण्यात आली आहे. ही माहिती गुजरातचे गृहमंत्री अमित शहा यांनी दिली. या स्फोटांच्या संदर्भात पोलिसांनी एका सायबर कॅफेच्या मालकाला व त्याच्या मुलाला ताब्यात घेतले आहे. सूत्रांनी सांगितले की, हे स्फोट होण्यापूर्वी गुप्तचर विभागाला "इंडियन मुजाहिद्दीन'कडून "शक्य असेल तर आम्हाला रोखून दाखवा' अशा स्वरूपाचा मेल मिळाला होता. गेल्या वर्षी लखनौ (उत्तर प्रदेशची राजधानी) येथे घडवून आणलेल्या बॉंबस्फोटांसारखाच हा प्रकार असल्याचे सांगण्यात आले.
रक्ताचे सडे व आक्रोश
अहमदाबादेत दहा किलोमीटरच्या परिसरात एकापाठोपाठ एक असे स्फोट झाल्यानंतरचे दृश्य करुण दिसत होते. सर्वत्र रक्ताचा सडा पडला होता. जखमी झालेले लोक विव्हळत होते. तसेच मृतांचे अवयव ठिकठिकाणी विखुरले होते. मृत व जखमी झालेल्या व्यक्तींचे नातेवाइक आक्रोश करत होते.
स्फोटांचा तीव्र निषेध
राष्ट्रपती श्रीमती प्रतिभा पाटील, पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग, लोकसभेतील विरोधी पक्षनेते लालकृष्ण अडवाणी यांनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. "पोटा' कायदा रद्द करणे हा चुकीचा निर्णय होता, अशी प्रतिक्रिया अडवाणी यांनी व्यक्त केली.
नुकसान भरपाईची घोषणा
या बॉंबस्फोटांत मरण पावलेल्यांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपये तर जखमींच्या नातेवाइकांना पन्नास हजार रुपये भरपाई दिली जाईल, अशी घोषणा गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली आहे. त्यांनी विविध इस्पितळांत जाऊन जखमी लोकांची भेट घेतली व त्यांना दिलासा दिला.
गृह मंत्रालयाची आज बैठक
या स्फोटांनंतर दक्षिण भारतातील अनेक महत्त्वाच्या मंदिरांभोवती सुरक्षाव्यवस्था कडक करण्यात आली आहे. तसेच गुजरातमध्ये नॅशनल सिक्युरिटी गार्डचे कमांडोज दाखल झाले आहेत. लागोपाठ घडलेल्या या स्फोटांमुळे नवी दिल्लीत उद्या रविवारी गृह मंत्रालयाची खास बैठक सकाळी अकरा वाजता बोलावण्यात आली आहे.
"जयराम कॉम्प्लेक्स'
मलेरियाच्या विळख्यात
बिल्डरकडून कायदा धाब्यावर बसवल्याचा आरोप

पणजी, दि. २६ (प्रतिनिधी) - पणजी नेवगीनगर येथील "जयराम कॉम्लेक्स' वसाहत पूर्णपणे मलेरियाच्या विळख्यात सापडण्याची भीती निर्माण झाली आहे. या परिसरात नव्या इमारतीचे बांधकाम सुरू असून डासांच्या पैदाशीला पूरक असे वातावरण बनल्याने तेथे मलेरियाची साथ फैलावत चालले असल्याचे स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे. सध्या दोघा रहिवाशांना मलेरियाची लागण झाली असून त्यांना उपचारासाठी इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. मलेरियाच्या साथीमुळे या वसाहतीतील निवासी पूर्णपणे हादरले असून आरोग्य खातेही या गोष्टीकडे कानाडोळा करीत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.
पणजी मळा येथील नेवगी नगर भागात "जयराम कॉम्लेक्स' हे रहिवासी व व्यापारी संकुल "मेसर्स कुडतरकर रिअल इस्टेट प्रा. ली' यांच्या मालकीचे आहे. या परिसरात सुमारे १६० रहिवासी तथा व्यापारी विभाग असल्याने मोठ्या प्रमाणात लोकांची वर्दळ सुरू असते. दरम्यान, रहिवाशांना अंधारात ठेवून सध्या या बिल्डरने आणखी एका नव्या इमारतीचे बांधकाम चालवले असून तेथे स्वच्छतेच्या बाबतीत कोणतीच काळजी घेतली नसल्याने मोठ्या प्रमाणात डासांची पैदास सुरू असल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. तेथे कामगारही हलाख्याच्या परिस्थितीत राहत असून आरोग्याच्या दृष्टीने त्यांना कोणतीही सुविधा प्रदान करण्यात आल्या नसल्याने त्यांनाही मलेरियाची लागण होण्याची शक्यता असल्याचे त्या किाणी बोलावलेल्या वर्तमानपत्रांच्या प्रतिनिधींना त्यांनी सांगितले.
या एकूण परिस्थितीबाबत रहिवाशांनी संबंधित सरकारी यंत्रणांच्या पायऱ्या झिजवूनही त्यांचे म्हणणे कोणीच एकूण घेण्याच्या मनःस्थितीत नाही. सदर बिल्डरचे विद्यमान सरकारात बड्या राजकीय नेत्यांशी संबंध असल्याने सर्व कायदे धाब्यावर बसवून त्यांनी मनमानी कारभार चालवल्याचा आरोप येथील एक रहिवाशी डॉ. गोविंद कामत यांनी केला आहे. या परिसरातील अनेक लोक आपल्याकडे रक्त तपासणीसाठी येतात व त्यांना मलेरियाची लागण झाल्याचे चाचणीत स्पष्ट झाल्याचे मणिपाल इस्पितळाच्या पॅथॉलॉजी विभागाचे प्रमुख डॉ.सूद यांनी पत्रकारांना सांगितले. पत्रकारांनी स्वतः या परिसराची पाहणी केली असता तेथे केवळ मलेरियाच नव्हे तर चिकुनगुनिया व डेंग्यूगी पसरण्याची शक्यताही त्यांनी वर्तविली. आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी मलेरियाबाबत कडक धोरण अवलंबल्याची घोषणा केली असली तरी आता त्यांनी प्रत्यक्ष कृती करावी; अन्यथा ही परिस्थिती आटोक्यात येणे कठीण होणार असल्याचे ते म्हणाले.
आरोग्याच्या बाबतीत कोणत्याही बिल्डरकडून हयगय झाल्यास प्रसंगी त्यांचा परवाना रद्द करण्याचा इशारा आरोग्यमंत्र्यांनी दिला खरा; परंतु राजकीय गोतावळ्यात वावरणाऱ्या बिल्डरांवर कारवाई करण्याचे धाडस ते खरोखरच करतील काय, असा सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला. मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना याप्रकरणी अनेकवेळा कळवूनही त्यांनीही प्रतिसाद न दिल्यामुळे या आम्हाला कोणीच वाली राहिला नसल्याची खंत तेथील लोकांनी व्यक्त केली. गोव्यात इतर राज्यांप्रमाणे "फ्लॅट'मालक सुरक्षा कायदा अस्तित्वात नसल्याने तो त्वरित अमलात आणावा अशी मागणी सरकारकडे केली होती; परंतु हा कायदा बिल्डरांसाठी डोकेदुखी ठरणारा असल्याने त्यांचे हित पाहून सरकार जाणीवपूर्वक हा कायदा अमलात आणत नसल्याची टीकाही डॉ. कामत यांनी केली.
आपले सरकार वाचवण्यासाठी
"संपुआ'ने मोजले ६०० कोटी
भाजपचा सनसनाटी आरोप

नवी दिल्ली, दि. २६ - डाव्यांनी पाठिंबा काढल्यानंतर अल्पमतात आलेल्या संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारला आणखी सहा महिन्यांचे जीवनदान देण्यासाठी सत्तेच्या दलालांनी ६०० कोटी रुपये मोजले, असा आरोप भारतीय जनता पक्षाने आज येथे केला.
आपले हे ६०० कोटी रुपये वसूल करण्यासाठी हे सत्तेचे दलाल आता सरकारवर दबाव आणून आपल्या वैध आणि अवैध अशा दोन्ही मागण्या पूर्ण करीत आहेत आणि त्यांच्या उपकारापुढे दबलेले सरकारही त्यांच्या या मागण्या पूर्ण करीत आहेत, असे भाजपचे उपाध्यक्ष मुख्तार अब्बास नकवी यांनी पत्रकारांना सांगितले.
२२ जुलै रोजीच्या विश्वास मताने देशातील काळाबाजारी आणि संपुआ सरकार यांच्यातील संबंधाचा पर्दाफाश केला आहे. संपुआ सरकारच्या गैरकृत्याची मोठी किंमत देशाला मोजावी लागणार आहे, असे ते म्हणाले.
भाजपच्या खासदारांना खरेदी करण्यासाठी कॉंगे्रस आणि सपा नेत्यांनी दिलेल्या लाच प्रकरणाची लोकसभा सभापती सोमनाथ चॅटर्जी यांनी तातडीने चौकशी करावी आणि दोषींविरुद्ध कडक कारवाई करावी, अशी मागणी करताना ते म्हणाले, अल्पमतात आलेल्या संपुआ सरकारला खासदारांच्या खरेदी-विक्रीशिवाय बहुमत सिद्ध करणे शक्यच नव्हते.
गोव्याच्या सुरक्षेसाठी
केंद्रीय राखीव दलाच्या
तीन तुकड्या पाचारण

पणजी, दि. २६ (प्रतिनिधी) - बंगलोर येथे साखळी बॉंम्बस्फोट झाल्याच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी गोव्याच्या सुरक्षेविषयी आढावा घेण्यासाठी बोलावलेली बैठक सुरू असतानाचा सायंकाळी ६.४५ वाजता गुजरात येथील अहमदाबाद येथे साखळी बॉम्बस्फोट झाले. त्यामुळे गोव्यात २९ जुलै ०८ पर्यंत "रेड अलर्ट' कायम ठेवण्यात आला आहे. तसेच सप्टेंबरमध्ये येणाऱ्या चतुर्थीला खास सुरक्षा ठेवण्यासाठी केंद्रीय राखीव दलाच्या तीन तुकड्या मागवण्यात आल्या आहेत. गोव्यातील सर्व समुद्र किनाऱ्यावर व चेक नाक्यांवर कडक सुरक्षा ठेवून सर्व वाहनांची कसून चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या दोन्ही साखळी बॉंम्बस्फोटांच्या पार्श्वभूमीवर गोव्यात कडक सुरक्षा ठेवण्यात येणार असल्याचे कामत यांनी सांगितले. या बैठकीत मुख्यमंत्र्यांबरोबर गृहमंत्री रवी नाईक, मुख्य सचिव जे. पी. सिंग, पोलिस महासंचालक बी. एस. ब्रार व पोलिस महानिरीक्षक किशन कुमार उपस्थित होते.
गोव्याच्या सुरक्षेबाबत सर्वतोपरी दक्षता घेतली जाणार असल्याचे पोलिस महानिरीक्षक कुमार यांनी सांगितले. त्याचप्रमाणे राज्यातील प्रमुख शहरांत आणि धार्मिक स्थळांच्या ठिकाणी पोलिस गस्त वाढवली जाणार असल्याचे ते म्हणाले.

कळंगुटमध्येही दुकान फोडले १.९५ लाखांच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू चोरल्या

म्हापसा, दि. २६ (प्रतिनिधी)- मडगावात चोऱ्यांची मालिका सुरू असतानाच कळंगुट नायकावाडा येथे "फोकस वर्ल्ड' या इलेक्ट्रॉनिक आस्थापनातील १ लाख ९५ हजार रुपयांचे साहित्य काल रात्री अज्ञातांनी लंपास केले. आस्थापनातील हॅन्डीकॅम्प, डिजिटल कॅमेरा, व्हिडिओ शूटिंग कॅमेरा अशा अत्याधुनिक व महागड्या वस्तू चोरट्यांनी लांबवल्या.
आज सकाळी दुकान उघडले असता आतील बऱ्याच वस्तू चोरीला गेल्याचे आढळून आले. नंतर सुशीलकुमार भालजी यांनी कळंगुट पोलिसांत तक्रार नोंदविली. कळंगुट पोलिस उपनिरीक्षक गौतम साळुंखे यांनी श्वानपथक व ठसेतज्ज्ञांना पणजीहून पाचारण केले. तथापि, त्याचा काहीच उपयोग झाला नाही. रात्री पावसाचा जोर वाढत असल्याने चोरीचे प्रकारही वाढत आहेत.
मृतदेह सापडला
दरम्यान, हणजूणे येथे एका खाणीत अज्ञात महिलेचा मृतदेह आढळला आहे. तिचे वय ३० ते ४५ दरम्यान असावे, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. साहाय्यक उपनिरीक्षक श्याम नाईक यांनी मृतदेहाचा पंचनामा केला असून उत्तरीय तपासणीसाठी तो "गोमेकॉ'त पाठविला आहे.