Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday, 10 July 2010

रॉय नाईक प्रकरणाची 'सीबीआय' चौकशीच व्हावी

भाजप आमदारांच्या शिष्टमंडळाची राज्यपालांकडे मागणी
पणजी, दि. ९ (प्रतिनिधी): पोलिस व ड्रग माफिया यांचे साटेलोटे उघड करणाऱ्या लकी फार्महाऊस हिने आता या प्रकरणात राज्याचे गृहमंत्री रवी नाईक यांचे पुत्र रॉय नाईक यांचेही नाव उघड केल्याने त्याची चौकशी "सीबीआय' मार्फतच व्हावी, अशी मागणी भाजप विधिमंडळ गटाच्या शिष्टमंडळाने राज्यपाल डॉ.एस. एस. सिद्धू यांच्याकडे केली आहे. या प्रकरणाच्या पोलिस तपासासंबंधी न्यायालयाने ओढलेले ताशेरे पाहता गृहमंत्री रवी नाईक यांच्याकडून गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचे प्रयत्न होत असल्याचेही उघड होते व त्यामुळे रवी नाईक यांचे गृहमंत्रिपद तात्काळ काढून घेण्यात यावे,अशीही मागणी या शिष्टमंडळाने केली.
आज पर्वरी येथे विरोधी पक्ष नेत्यांच्या दालनात बोलावण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत भाजप विधिमंडळ गटाचे प्रवक्ते आमदार दामोदर नाईक यांनी ही माहिती दिली. याप्रसंगी विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर व विधिमंडळ उपनेते आमदार ऍड. फ्रान्सिस डिसोझा हजर होते. भाजप विधिमंडळ गटाची बैठक आज पर्वरी येथे पार पडली व त्यानंतर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखाली भाजप आमदारांच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेतली. राज्यात सद्या नेमकी काय परिस्थिती ओढवली आहे, याची सखोल माहिती या शिष्टमंडळाने राज्यपालांसमोर ठेवली. ड्रग प्रकरणांत पोलिस व खुद्द गृहमंत्र्यांचा पुत्र रॉय नाईक यांचा सहभाग आहे, या वृत्तामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर गोव्याची फार मोठी बदनामी झाली आहे. ड्रग प्रकरणांत अटक करण्यात आलेले संशयित पोलिस व अटाला यांना जामीन मंजूर करताना उच्च न्यायालयाने पोलिस तपासातील ढिलाई उघडी पाडली आहे. पोलिस व ड्रग माफियांच्या साटेलोट्यांवर शिक्कामोर्तब करून हा व्यवहार राजकीय आश्रयानेच सुरू असल्याचा ठपकाही न्यायालयाने ठेवला आहे. या प्रकरणाची निःपक्षपाती चौकशी केवळ "सीबीआय' मार्फतच होऊ शकेल, असेही दामू नाईक म्हणाले. अटाला इथे बेकायदा वास्तव्य करून होता. त्याला विदेशात पाठवण्याचा आदेश २००६ साली जारी झाला पण तो अद्याप गोव्यातच कसा काय, असा सवालही न्यायालयाने या निवाड्यात केला आहे. दरम्यान, एखाद्या गुन्हा प्रकरणांत स्थानिक पोलिसांचा सहभाग असल्यास त्याची चौकशी स्वतंत्र यंत्रणेमार्फत करणेच योग्य असे स्पष्ट निर्देश सर्वोच्च न्यायालयाने रमेश कुमारी विरुद्ध राज्य, शहाबुद्दीन विरुद्ध गुजरात आदी प्रकरणांत दिले आहे, याची माहितीही राज्यपालांना यावेळी करून देण्यात आली.
गुन्हा विभागाचीच चौकशी कराः पर्रीकर
ड्रग व पोलिस साटेलोटे प्रकरणी राजकीय नेत्याच्या मुलाचा सहभाग असल्याचा सुरुवातीला आरोप झाला तेव्हा दुसऱ्याच दिवशी या विभागाचे उपअधीक्षक चंद्रकांत साळगावकर यांनी ही शक्यता फेटाळून लावली होती, त्यांनी हा आरोप कोणत्या आधारावर फेटाळला,असा सवाल करून या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे "फिक्सिंग'झाल्याने गुन्हा विभागाचीच खरी चौकशी होणे गरजेचे आहे,असा टोला पर्रीकर यांनी हाणला. गुन्हा विभागाच्या यशस्वी तपासाची टक्केवारी घसरत चालली आहे, असेही ते म्हणाले. या प्रकरणातील संशयित पोलिस शिपाई संजय परब याला कुठल्या राजकीय नेत्याने आश्रय दिला होता,असा सवाल करून हे प्रकरण मिटवण्याचा सौदा झाल्यानंतरच तो पोलिसांना शरण आला, असा संशयही यावेळी पर्रीकर यांनी व्यक्त केला. मिकी पाशेको व रवी नाईक यांना कावीळ झाल्याची चर्चा आहे. या सरकारच्या बाराही मंत्र्यांना कावीळ झाली, तरीही त्यात आश्चर्य नसेल, असा टोमणाही पर्रीकर यांनी हाणला. राज्य सरकारला जर खरोखरच या प्रकरणात तथ्य नसल्याचा ठाम विश्वास आहे तर त्यांना "सीबीआय' चौकशीची भिती वाटण्याचे कारणच काय, केंद्रात कॉंग्रेसचेच सरकार असल्याने "सीबीआय' चौकशीत फेरफार होण्याचा संभव नाही व त्यामुळे "सीबीआय' चौकशीला कचरणे याचाच अर्थ या प्रकरणांत काहीतरी काळेबेरे आहे, हे सिद्ध होते,असेही पर्रीकर यावेळी म्हणाले.
अधिवेशनात अडीच हजार प्रश्न
येत्या पावसाळी अधिवेशनात भाजप आमदारांकडून सुमारे अडीच हजार प्रश्नांची सरबत्तीच सरकारला सादर करण्यात आल्याची माहिती यावेळी दामोदर नाईक यांनी दिली. सरकारला सर्वंच पातळीवर नामोहरम करण्याची व्यूहरचना भाजपने आखली आहे,असेही ते म्हणाले. गृहमंत्री या नात्याने रवी नाईक पूर्णपणे निष्क्रिय ठरल्याने कायदा सुव्यवस्थेचे विदारक चित्रच सभागृहासमोर ठेवण्यात येईल. बेकायदा खाण, अबकारी घोटाळा, कॅसिनो,लकी फार्महाऊस, अटाला, दूदू आदी प्रकरणांवरून सरकारचे वस्त्रहरणच केले जाईल, असेही संकेत यावेळी त्यांनी दिले.

चौकशी 'सीबीआय'कडे द्या

'एनएसयूआय'नेही दंड थोपटले
पणजी, दि. ९ (प्रतिनिधी): पोलिस ड्रग माफिया प्रकरणात राज्याचे गृहमंत्री रवी नाईक यांचे सुपुत्र रॉय नाईक यांचे नाव लकीच्या मुलाखतीत उघड होताच भारतीय जनता पक्षाबरोबरच आता कॉंग्रेस पक्षाचा विद्यार्थी विभाग "एनएसयूआय'नेही दंड थोपटले असून या संपूर्ण प्रकरणाची "राष्ट्रीय तपास संस्था' किंवा "सीबीआय' मार्फत चौकशी करण्याची मागणी सुनील कवठणकर यांनी आज पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली. तसेच यासंबंधीचे एक निवेदन राज्याचे मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना देण्यात आले आहे. या प्रकरणात कोणत्याही राजकीय व्यक्तीचे या त्याच्या संबंधित असलेल्या व्यक्तीचे नाव आल्यास त्याचीही सखोल तपास केला जावा, कारण कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही, असे यावेळी कवठणकर म्हणाले.
या प्रकरणात काही पोलिस गुंतलेले असून हे प्रकरण काही व्यक्ती दाबण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे कॉंग्रेस पक्षाची प्रतिमा मलिन होत असल्याची टीका श्री. कवठणकर यांनी केली. या प्रकरणाची माहिती पक्षाध्यक्ष सोनिया गांधी व युवा नेते राहुल गांधी यांच्यापर्यंत पोचवली जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. त्यासाठी आजपासून सह्यांची मोहीम हाती घेण्यात आली असून प्रत्येक महाविद्यालय, उच्च माध्यमिक विद्यालय, राजकीय पक्षाचे सदस्यांच्याही सह्या घेतल्या जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
ड्रग माफियापेक्षा या व्यवसायात गुंतलेले पोलिस हे महाभयंकर असून त्यांच्यापासून गोव्याला अधिक धोका असल्याची टीका यावेळी "एनएसयूआय'ने केली. ड्रग माफियांना शोधून काढता येते. मात्र आमच्या सुरक्षेच्या व्यवस्थेत राहून ड्रग व्यवसायात गुंतलेल्या या पोलिस अधिकाऱ्यांना शोधून काढणे कठीण आहे. गोव्यात सुरू असलेल्या या ड्रग व्यवसायाच्या विरोधात आम्ही युद्ध पुकारले असून शेवटपर्यंत लढा देणार असल्याचे ते म्हणाले.
ड्रग व्यवहारातून कमवला जाणारा पैसा हा भारताच्या विरोधात युद्ध करण्यासाठी वापरला जात आहे. हा अमली पदार्थ पाकिस्तान आणि अफगाणिस्तान येथून भारतात आणला जातो. या पैशांतून भारताच्या सीमांवर असलेल्या जवानांना मारण्यासाठी गोळ्या तयार केल्या जातात. त्यामुळे गोव्यात हा व्यवसाय करणाऱ्याची कोणत्याही प्रकारे गय करू नये, अशी मागणी त्यांनी केली.
पोलिस ड्रग माफिया प्रकरणाचा तपास काम करणारे पोलिस अधिकारी उपअधीक्षक चंद्रकांत साळगावकर यांनी या प्रकरणाचा बट्ट्याबोळ केला असून हे प्रकरण कोणत्याही स्वतंत्र तपास यंत्रणेकडे सोपवणे गरजेचे आहे. तसेच या प्रकरणाच्या तपासकामात त्रुटी ठेवून संशयितांना मोकळे सोडण्याची सूट देणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याला त्वरित राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली अटक केली जावी, तसेच त्यांच्या बेनामी मालमत्तेचीही चौकशी केली जावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
गोव्याच्या महाविद्यालयातही या ड्रग माफियांनी आपले लक्ष केंद्रित केले असून म्हापसा येथील एका महाविद्यालयात ड्रग विकण्याचा प्रकार उघडकीस आला असल्याचे ते म्हणाले. यापूर्वी याच महाविद्यालयाच्या एका सुरक्षा रक्षकाला अमली पदार्थ विक्री करताना रंगेहाथ पकडण्यात आले होते. आता तोच सुरक्षा रक्षक जामिनावर सुटला असून पुन्हा त्याने या महाविद्यालयात ये जा सुरू केली असल्याची माहिती त्यांनी दिली.

मिकींना ७ दिवसांची पोलिस कोठडी

जामिनासाठी अर्ज : सोमवारी सत्र न्यायालयात सुनावणी
मडगाव, दि. ९ (प्रतिनिधी): नादिया तोरादो मृत्युप्रकरणी काल गुन्हा अन्वेषण विभागाने अटक केलेल्या आमदार मिकी पाशेको यांना आज येथील प्रथम श्रेणी न्यायालयात उभे केले असता न्या. केरकर यांनी त्यांची ७ दिवसांच्या कोठडीत रिमांडवर रवानगी केली. त्यानंतर त्यांचे वकील अमित पालेकर यांनी त्यांची जामिनावर सुटका व्हावी म्हणून अर्ज सादर केला, त्यावर येत्या सोमवारी दुपारी अतिरिक्त सत्र न्यायाधीश बी.पी. देशपांडे यांच्यासमोर सुनावणी होणार आहे.
काल संपूर्णतः खचलेल्या मानसिक अवस्थेतून नेलेल्या मिकी यांना आज सकाळी कडेकोट पोलिस बंदोबस्तात येथील न्यायालयात आणले असता जुन्या बाजारातील न्यायालयीन परिसर त्यांच्या समर्थकांनी भरून गेला होता.
सरकारी वकील गावडे व मिकीतर्फे ऍड. पालेकर यांनी यावेळी युक्तिवाद केले. सरकारी वकिलांनी अजून या मृत्यू प्रकरणाचा तपास पूर्ण व्हावयाचा आहे, त्याशिवाय अनेक वस्तूंची त्यांच्याकडून माहिती मिळविणे आवश्यक असल्याने त्यांना १४ दिवसांच्या पोलिस कोठडीतील रिमांड द्यावा अशी मागणी केली. कोठडीतील चौकशीशिवाय ही माहिती मिळविणे शक्य नसल्याचे त्यांनी न्यायाधीशांना पटवून देण्याचा प्रयत्न केला.
मिकीचे वकील अमित पालेकर यांनी आपल्या युक्तिवादात त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्यावरच जास्त भर दिला व आरोग्य ठीक नसताना त्यांना कोठडीत पाठविणे उचित होणार नाही असे सांगून गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील अनुभवी व ज्येष्ठ डॉक्टरांकडून त्यांची पुन्हा तपासणी करावी व त्यांनी अहवाल दिल्यास पोलिस कोठडीतील रिमांड द्यावा असे प्रतिपादन केले.
न्यायमूर्ती केरकर यांच्या न्यायालयात दुपारी १ पर्यंत हे युक्तिवाद चालले. त्यावेळी सरकारी वकिलांनी हे प्रकरण अत्यंत गंभीर असून दोन मोबाईल, संगणक व पासपोर्ट गुन्हा अन्वेषण विभागाला हवा आहे. त्याशिवाय उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण गंभीर असल्याने त्यांना पोलिस कोठडीत ठेवून चौकशी करण्याच्या आवश्यकतेवर जो भर दिला आहे, त्याकडे अंगुलिनिर्देश करून गुन्हा अन्वेषण विभाग दर ४८ तासांनी गोवा वैद्यकीय इस्पितळात नेऊन त्यांची वैद्यकीत तपासणी करील अशी हमी दिली व आज सकाळी त्यांची अशी वैद्यकीय तपासणी केल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
त्यावर ऍड. पालेकर यांनी गुन्हा अन्वेषण विभागाने याआधी त्यांची जबानी घेतलेली आहे व आणखी जबानी घेण्यासाठी १४ दिवसांच्या कोठडीची गरज नसून त्यांची ढासळलेली प्रकृती पाहता अवघ्या काही दिवसांसाठी वाटल्यास पोलिस कोठडी द्यावी पण ती देण्यापूर्वी तज्ज्ञ डॉक्टरांकडून त्यांची तपासणी करावी अशी विनंती केली. आज जी तपासणी झालेली आहे ती कनिष्ठ डॉक्टरांकडून, त्याचा अहवाल अजून मिळालेला नाही. त्यांच्या यकृताला सूज आल्याचा हॉस्पिसियो डॉक्टरांचा अहवाल आहे व ते आज न्यायालयात उपस्थित असून त्यांचा चेहरा पाहिल्यासही कोणाला त्यांच्या आजारपणाची कल्पना येईल असे सांगून गुन्हा अन्वेषण विभाग त्यांच्या वैद्यकीय तपासणीला का विरोध करतो, असा सवाल त्यांनी केला. यदाकदाचित कोठडीत त्यांची प्रकृती ढासळली तर गुन्हा अन्वेषण विभाग व न्यायालयावर त्याचा ठपका येईल असे त्यांनी सांगितले.
त्यांच्या युक्तिवादानंतर सायंकाळी ४ वाजता निवाडा देण्याचे न्यायाधीशांनी जाहीर केले. निवाडा मिळाल्यानंतर त्याची प्रत घेऊन जामिनासाठी अर्ज करणार असल्याचे मिकींचे वकील अमित पालेकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले होते व नंतर त्यांनी लगेच तसा अर्ज दाखलही केला.
पालेकर यांनी मिकींच्या यकृताला सूज आल्याचा हॉस्पिसियो इस्पितळाच्या डॉक्टरांनी दिलेला अहवाल पत्रकारांना दाखविला. गोवा वैद्यकीय इस्पितळातील अहवाल आपणास मिळाला नसल्याचे त्यांनी सांगितले. न्यायालयात सुनावणीसाठी मिकी पाशेको यांना पोलिस बंदोबस्तात आणण्यात आले, तेव्हा शेकडो समर्थक कोर्टाबाहेर उभे होते व सर्वत्र पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
दुपारच्या कोर्टाच्या सुट्टीवेळी मिकींना मडगाव पोलिस स्टेशनवर आणून ठेवण्यात आले होते व त्यांना त्या स्थितीत पाहून पोलिस कर्मचाऱ्यांत खालच्या स्वरांत त्यांचीच चर्चा चालू होेती.
-------------------------------------------------------------
जैसी करनी वैसी...
मडगावः करावे तसे भरावे अशी म्हण आहे व काल मिकी पाशेको यांच्याबाबतीत तो प्रत्यय आला. काल त्यांना हॉस्पिसियोतून डिस्चार्ज मिळाल्यावर अटक करून नेणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांत कपील देसाई या तरुण पोलिस उपनिरीक्षकाचा समावेश आहे. योगायोग म्हणजे याच अधिकाऱ्यावर मिकी यांनी कोलवा पोलिस स्टेशनात टेलिफोन उचलून फेकून मारला होता. तर आणखी एकावर खुर्ची फेकून मारली होती. काल त्याला जेरबंद करून नेताना अशा अधिकाऱ्यांना पूर्वीचे हे किस्से आठवून मनातल्या मनात हसू फुटल्याशिवाय राहणार नाही, अशीच चर्चा पोलिस वर्तुळात चालू होती.
मिकीचे वर्तन सुरुवातीपासूनच वादग्रस्त ठरलेले आहे. मंत्रिपदावर असताना त्यांनी आपणाला बाजू देत नाही म्हणून एका कदंब चालकाला भररस्त्यात अडवून मारहाण केली होती तर एका वीज अभियंत्याला कार्यालयात बोलावून झोडपले होते. मूड गेला की क्षणार्धात भडकणारी व आकाशपाताळ एक करणारीही व्यक्ती आता मात्र गोगलगाय बनून गुन्हा अन्वेषणासमोर बसल्याचे पाहून अशा लोकांच्या मनात वरील म्हण आल्याशिवाय राहणार नाही.

नक्षली व्हायला भाग पाडू नका

'मोप' अन्यायग्रस्तांचा सरकारलाइशारा
पणजी, दि. ९ (प्रतिनिधी): अनंत काळापासून आमच्या पूर्वजांनी रक्ताचे पाणी करून कसलेल्या आमच्या सुपीक जमिनी हेच आमच्या जगण्याचे साधन आहे आणि सरकारने दबाव आणून व अन्याय करून आमच्या पूर्वापार जमिनी आमच्यापासून हिरावून घेण्याचा प्रयत्न केल्यास
नक्षली बनून आमच्या भूमातेचे रक्षण करण्याचा विचार करावा लागेल. सरकारने आमच्यावर अन्याय करून आम्हाला नक्षली बनण्यास भाग पाडू नये, असा कडक इशारा मोपा विमानतळ पीडित शेतकरी समितीचे सचिव संदीप कांबळी यांनी पणजी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिला.
मोप-तांबोशे, उगवे, पोरस्कडे, वारखंड, हसापूर व चांदेल या पेडणे तालुक्यातील सहा पंचायत क्षेत्राच्या कार्यकक्षेत होणाऱ्या मोपा विमानतळामुळे ज्या शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी जाणार आहेत अशा
अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी गोमंतक साहित्य सेवक संघाच्या कार्यालयात पत्रपरिषद आयोजिली होती. त्यात श्री. कांबळी बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत जी.एफ.ई.चे अध्यक्ष दिलीप हेगडे, दिगंबर तुळसकर व नागरिक हजर होते.
श्री. कांबळी म्हणाले, जे लोक मोपा विमानतळासाठी आपल्या सुपीक जमिनी देत नाहीत त्यांच्यावर भूसंपादन अधिकाऱ्यांकडून दबाव टाकला जात आहे. त्यांच्या नावाच्या नोटिसा व धनादेश शेजाऱ्यांना देणे, भलत्याच व्यक्तीच्या नावे धनादेश काढण्याचे प्रकार होत आहेत. चुपचाप मान्यता घ्या न पेक्षा जबरदस्तीने जमिनी काढून घेऊ, तुम्हाला कायद्याच्या कचाट्यात अडकवू अशा धमक्या आम्हाला दिल्या जात आहेत. ज्या लोकांनी न्यायालयात धाव घेतली आहे त्यांनासुद्धा नोटिसा काढून भूसंपादन अधिकाऱ्यांनी न्यायालयाचा अवमान केला आहे.
आम्ही केंद्र सरकारकडे कैफियत मांडली असता केंद्राने मुख्यमंत्र्यांना याबाबत लक्ष घालण्याचे निर्देश दिले होते. मात्र मुख्यमंत्री क्रीडामंत्र्यांच्या दबावामुळे गप्प आहेत. आमच्या सुपीक जमिनी स्वस्तात (रु. ६ ते १२ प्रति चौ. मी.) घेऊन बिल्डर व जमीन माफियांना विकण्याचे काम सत्ताधारी करत असून विमानतळ झाल्यास पेडणेवासीयांना पेडणे सोडावे लागेल. भूमिपुत्रांच्या जागी बिगरगोमंतकीयांचे तांडे येथे येतील व पेडण्याची अवस्था वास्कोसारखी होईल, असेही ते म्हणाले.
गोवा शेतकी समितीचे अध्यक्ष दिलीप हेगडे यांनी छोट्याशा गोव्यात जागेची कमतरता असताना दोन विमानतळाची गरजच काय, असा प्रश्न केला. दाबोळीचा विस्तार होणार म्हणताना सुपीक जमिनीवर मोपा कशासाठी, असे ते म्हणाले.
पेडणे तालुक्याला पर्यावरणाची देणगी लाभली आहे. मोपामुळे पर्यावरणाची हानी होणार आहे. सत्ता आहे म्हणून अन्याय करू नका; नपेक्षा महागात पडेल असे सांगून आमच्या लढ्याला तमाम गोवेकरांनी पाठिंबा द्यावा, असे आवाहन केले.

अबकारी घोटाळाचौकशी ठरणार केवळ फार्स!

अनेक बाबींसंदर्भात यदुवंशी अनभिज्ञ
पणजी, दि. ९ (प्रतिनिधी): अबकारी घोटाळ्याची चौकशी करणारे माजी वित्त सचिव उदीप्त रे यांनी या चौकशीसंबंधीच्या प्रगतीची कोणतीही कल्पना किंवा माहिती विद्यमान वित्त सचिव राजीव यदुवंशी यांच्याकडे सोपवली नाही, अशी खात्रीलायक माहिती उघड झाली आहे. अबकारी आयुक्त पी. एस. रेड्डी यांनी वास्को अबकारी कार्यालयात छापा टाकून या घोटाळ्यासंबंधी जप्त केलेले दस्तऐवज, संगणक व इतर महत्त्वाच्या कागदपत्रांबाबतही श्री. यदुवंशी यांना काहीच माहिती नाही, असेही त्यांनी मान्य केल्याने या घोटाळ्याच्या चौकशीचा सरकारदरबारी केवळ फार्स सुरू असल्याचे उघड झाले आहे.
वित्त सचिव राजीव यदुवंशी यांच्याकडे आज अबकारी घोटाळ्याच्या चौकशीची प्रगती जाणून घेण्यासाठी भेट घेतली असता त्यांनी ही माहिती दिली. श्री. यदुवंशी यांच्याकडे यासंबंधी चर्चा करताना अबकारी घोटाळ्याबाबत त्यांनी अद्याप लक्षही दिले नसल्याचे प्रकर्षाने जाणवले. अबकारी घोटाळ्याचा चौकशी अहवाल पावसाळी अधिवेशनात सभागृहासमोर ठेवणार काय, असा सवाल त्यांना केला असता त्यांनी ते मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्यावर अवलंबून असल्याचे सांगितले. मुख्यमंत्री यासंबंधी आणखी काही काळ मुदत मागू शकतात, असे म्हणून त्यांनी जवळजवळ ही चौकशी रखडण्याचेच संकेत दिले. दरम्यान, अबकारी आयुक्त पी. एस. रेड्डी यांनी वास्को अबकारी कार्यालयात टाकलेला छापा व तिथे सापडलेले संशयास्पद दस्तऐवज यामुळे खऱ्या अर्थाने या चौकशीला गती प्राप्त होणे अपेक्षित होते, पण या छाप्याचा थांगपत्ताही राजीव यदुवंशी यांना नसल्याचे आज त्यांच्याशी चर्चा करताना जाणवले. आपण श्री. रेड्डी यांच्याकडून हे दस्तऐवज मिळवू अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
दरम्यान, राजीव यदुवंशी हे खुद्द मुख्यमंत्री दिगंबर कामत यांचेही सचिव आहेत. केवळ राजकीय वरदहस्तामुळे गेली कित्येक वर्षे श्री. यदुवंशी गोव्यातच ठाण मांडून बसले आहेत. खाण, वन, नगर नियोजन आदी महत्त्वाच्या खात्यांचे सचिवही तेच असल्याने कामत यांच्या खास मर्जीतील प्रशासकीय अधिकारी म्हणूनही त्यांची ओळख आहे. अबकारी घोटाळ्याची त्यांच्याकरवी चौकशी हा केवळ फार्स असल्याची यापूर्वीच भाजपने टीका केली होती. आता या घटनेवरून ही टीका खरीच ठरली आहे. विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी पर्दाफाश केलेल्या कोट्यवधी रुपयांचा अबकारी घोटाळा पचवण्याचेच संकेत या घटनाक्रमावरून स्पष्टपणे जाणवू लागले आहेत.

केरळ सत्यशोधन समितीवर मिस्किता

पणजी, दि. ९ : केरळमधील काही धर्मवेड्या घटकांनी नुकताच धुमाकूळ घातला, त्यावेळी एका शिक्षकाचा हातही तोडण्याचा प्रकार झाला. या असहिष्णुतेबद्दल भाजपने सत्यशोधन समिती नियुक्त केली असून, गोवा भाजपचे उपाध्यक्ष डॉ. विल्फ्रेड मिस्किता यांचा या समितीत समावेश आहे. माजी मंत्री व खासदार हरिन पाठक यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील पिंकी आनंद, ऍड. बालसुब्रह्मण्यम कामारासू हे अन्य सदस्य आहेत. ही समिती ९ व १० रोजी केरळला भेट देत असून लवकरच पक्षाध्यक्षांना आपला अहवाल देईल.

Friday, 9 July 2010

अखेर मिकी पाशेको गजाआड

इस्पितळातून डिस्चार्ज होताच पोलिसांची कारवाई

मडगाव, दि. ८ (प्रतिनिधी) : नादिया तोरादो मृत्युप्रकरणी ५ जूनपासून गुन्हा अन्वेषण विभागाच्या चौकशीचा ससेमिरा चुकविणारे माजी पर्यटनमंत्री मिकी पाशेको यांना आज दुपारी अखेर पोलिसांनी गलितगात्र अवस्थेत ताब्यात घेतले व नंतर गुन्हा अन्वेषण विभागाच्या स्वाधीन केल्यामुळे २९ मे रोजी चेन्नई इस्पितळात नादियाला मृत्यू आल्यापासून सुरू झालेल्या घटनाचक्रातील एक वर्तूळ पूर्ण झाले आहे.
गेल्या शनिवारी येथील सत्र न्यायालयात शरण आलेल्या व न्यायालयीन कोठडीतून प्रकृती अस्वास्थ्यामुळे हॉस्पिसियोमध्ये दाखल केलेल्या माजी मंत्र्यांचा जामीन अर्ज काल फेटाळून लावताना न्यायाधीशांनी आपल्या निकालपत्रात त्यांची वैद्यकीय चिकित्सा करण्याचा व इस्पितळातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर गुन्हा अन्वेषण विभागाने त्यांना ताब्यात घेण्याबाबत हालचाल करावी असा जो अभिप्राय दिला होता, त्याच्या अनुषंगाने आज एकंदर हालचाली झालेल्या दिसून आल्या.
मिकी पाशेको यांना आज सकाळी ११-३० वाजता हॉस्पिसियोच्या रुग्णवाहिकेतून गोमेकॉत तपासणीसाठी नेले गेले व तेथे डॉ. अनार खांडेपारकर यांनी त्यांच्या सर्व प्रकारच्या चाचण्या घेतल्या तसेच त्यांचा रक्तदाब, नाडीचे ठोके आदींचीही तपासणी केली गेली व त्यांना सायंकाळी साधारण चारच्या सुमारास गोमेकॉच्या रुग्णवाहिकेतून परत आणण्यात आले. गोमेकॉतील वैद्यकीय अहवाल चांगला आलेला असल्याने मडगावात परत आणल्यावर त्यांची पुन्हा एकदा तपासणी केली गेली व त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. तेथेच पोलिस निरीक्षक संतोष देसाई यांनी त्यांना ताब्यात घेतले व गुन्हा अन्वेषण विभागाच्या स्वाधीन करण्यासाठी ते दोनापॉलकडे रवाना झाले.
इकडे त्यांना गोमेकॉत नेल्याचे कळल्यावर त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने हॉस्पिसियोकडे जमले पण तेथे कडक बंदोबस्त ठेवलेला असल्याने ते निमूट राहिले. सायंकाळी ४ च्या सुमारास त्याला परत आणल्यावर समर्थकही भराभर गोळा झाले. पण संतोष देसाई बरोबर बाहेर आलेले मिकी पाशेको साफ खचलेले दिसून आले व त्यांना त्या अवस्थेत पाहून त्यांच्या समर्थकांचेही अवसान गळाले, त्यांनी त्यांचा जयजयकार केला व तुम्ही भिऊ नका , आपण तुमच्याबरोबर आहोत, असा गिल्ला केलेला खरा पण त्यात पूर्वींचा आवेश दिसून आला नाही.
आज इस्पितळाबाहेर पोलिस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात केला होता. त्यात महिला पोलिसांबरोबरच ईगल फोर्सचे कमांडोही होते. आज मिकी यांना गुन्हा अन्वेषणाकडे स्वाधीन केल्यामुळे येथील पोलिस अधिकाऱ्यांनी मात्र सुटकेचा सुस्कारा सोडला आहे. मिकी गेल्या शनिवारी सत्र न्यायालयात शरण आल्यापासून तब्बल सहा दिवस पोलिसांची धावपळ चालू होती. सोमवारपासून त्यांच्या जामीन अर्जावर न्यायालयात सुनावणी सुरु झाल्यापासून त्याच्या समर्थकांनी न्यायालयासमोर सुरु केलेल्या गर्दीमुळे तेथे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्र्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिस अधिकाऱ्यांची धावपळ चालू झाली होती, ती आज संपल्यासारखी झाली आहे.
काल सत्र न्यायालयाने आपल्या निकालपत्रात हॉस्पिसियोतील डॉक्टरांवर जे ताशेरे झोडले होते, त्याची मात्रा आज अचूक लागू पडली व त्यातूनच मिकींना गोमेकॉत तपासणीसाठी पाठविण्यात आले, असे सांगितले जाते.

कामगार आयुक्तांवर फसवणुकीचा गुन्हा

आयरिश बनावट सहीप्रकरण

पणजी, दि. ८ (प्रतिनिधी) - राज्य कामगार आयोगाच्या नवनियुक्त आयुक्त फातिमा रॉड्रिगीस यांच्या विरोधात लबाडी व फसवणूक केल्याचा गुन्हा नोंद झाला असून आयुक्तपदाचा ताबा स्वीकारल्यानंतर काही दिवसांतच त्यांच्यावर निलंबित होण्याची पाळी आली आहे. कोणत्याही क्षणी त्यांचा निलंबनाचा आदेश येण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, या प्रकरणात अटक चुकवण्यासाठी कामगार आयुक्त रॉड्रिगीस यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करण्याची तयारी चालवली आहे. समाजकार्यकर्ते ऍड. आयरिश रॉड्रिगीस यांच्या लेटरहेडचा वापर करून सहीची नक्कल करून मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना निवेदन सादर केल्याची कुणकुण ऍड. रॉड्रिगीस यांना लागताच या प्रकरणाचा भांडाफोड झाला. आयुक्त रायकर यांना हटवून त्यांच्या जागी आपली वर्णी लावण्यासाठीच श्रीमती फातिमा रॉड्रिगीस यांनी हा प्रकार केल्याचे प्राथमिक माहिती मिळाली असल्याचे सूत्रांनी सांगितले.
याविषयी ऍड. रॉड्रिगीस यांनी पणजी पोलिस स्थानकात सादर केलेल्या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी कामगार आयुक्त फातिमा रॉड्रिगीस यांच्यावर भा.दं.सं. ४१९, ४२०, ४६८, व ४७१ कलमानुसार त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. १० जून रोजी ऍड. आयरिश रॉड्रिगीस यांच्या बनावट लेटरहेड तयार करून त्यावर त्यांची खोटी सही करून राज्य कामगार आयुक्त व्ही. बी. एन. रायकर यांना नोकरीत एक वर्ष सेवावाढ दिल्याच्या प्रस्तावाविरोधात मुख्यमंत्री कामत यांना निवेदन सादर करण्यात आले होते. याची माहिती मिळताच ऍड. रॉड्रिगीस यांनी गुप्तपणे त्या व्यक्तीचा शोध लावून याबद्दल तक्रार केली होती.
कामगार आयोगावर आयुक्त म्हणून नियुक्त होणारी श्रीमती रॉड्रिगीस यांनी आयरिश रॉड्रिगीस यांच्या नावाने केलेल्या केलेल्या बनावटगिरीमुळे त्याच्यावर निलंबन होण्याची पाळी आली आहे. तसेच या प्रकरणात अटक होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले. याविषयीचा अधिक तपास पणजी पोलिस स्थानकाचे निरीक्षक संदेश चोडणकर करीत आहे.

अन् मिकी ढसढसा रडले

मडगावः एरवी निबर- बेडर गणल्या जाणाऱ्या मिकी पाशेकोंना आज हॉस्पिसियोतून पोलिसांनी बाहेर आणले व वास्तवाची जाणीव होऊन त्यांच्या डोळ्यांतून घळघळा अश्रू ओघळले. "कधीच कोणाची पर्वा न करणाऱ्या, बेफिकीरपणे जीवन जगणाऱ्या या माणसाला " आपण निरपराध आहोत, आपण कधीच कोणाचे वाईट केले नाही, नादिया प्रकरणात आपला कोणताच हात नाही हो' असे पत्रकारांसमोर हात जोडून सांगण्याची पाळी आली व हे दृश्य पाहणारेही क्षणभर गहिवरले. पोलिस निरीक्षक संतोष देसाई यांनी पांढऱ्या वेशांतील त्यांना इस्पितळातून बाहेर आणले तेव्हा मिकींच्या चेहऱ्यावर नेहमीचा घमेंडखोरपणा व बेफिकीरपणाही नव्हता तर ते संपूर्णतः खचलेले जाणवले. ते म्हणाले, की कोणताही हात नसताना राजकारण्यांनी आपणाला या भानगडीत गुंतविलेले आहे व त्यामुळे आपण निश्र्चितपणे त्यातून सहीसलामत बाहेर येईन, हे एक मोठे षड्यंत्र आहे व त्याचा उलगडा लवकरच झाल्याशिवाय राहणार नाही.

आज न्यायालयात कोठडीची मागणी

पणजी, दि. ८ (प्रतिनिधी) - मिकी यांचा ताबा पोलिसांकडे आल्याने आता या प्रकरणातील सत्य काय आहे ते बाहेर येणार आहे. तसेच, तपासकामाला उपयुक्त असलेला नादियाचा लॅपटॉप आणि अन्य वस्तूही जप्त करता येणार असल्याचे पोलिस खात्याचे प्रवक्ते तथा पोलिस अधीक्षक आत्माराम देशपांडे यांनी येथे सांगितले. नादियाचा जवळचे मित्र हे मिकी पाशेको होते. हे त्यांनीही मान्य केले आहे. त्यामुळे या आत्महत्येमागे नेमके सत्य काय आहे, हे जाणून घेऱ्यासाठीच त्यांची पोलिस कोठडी पोलिसांना हवी होती, असेही श्री. देशपांडे म्हणाले. पोलिस कोठडी मिळविण्यासाठी मिकी यांना उद्या न्यायालयात हजर करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.

राज्य मंत्रिमंडळाची १४ जुलैला बैठक

पणजी, दि. ८ (प्रतिनिधी) - राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक १४ जुलै रोजी संध्याकाळी ३ वाजता मंत्रालयातील परिषदगृहात होणार आहे.
विधानसभेचे पावसाळी अधिवेशन १९ जुलैपासून सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर या बैठकीत विरोधकांना सामोरे जाण्याची व्यूहरचना आखली जाईल, अशी शक्यता आहे. गोवा विधानसभेचे पावसाळी अधिवेशन १९ जुलै ते ६ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. विरोधी भाजपकडून यावेळी आक्रमक पवित्रा घेण्याचे संकेत मिळाल्याने सत्ताधारी गोटात काहीशी चिंतेचे वातावरण पसरले आहे. खुद्द मुख्यमंत्री दिगंबर कामत हेच अबकारी खात्यातील घोटाळ्यामुळे टीकेचे लक्ष्य बनले आहेत. आता गृहमंत्री रवी नाईक हेदेखील आपले पुत्र रॉय नाईक यांच्या कथित ड्रग प्रकरणातील सहभागाच्या आरोपांमुळेही अडचणीत येण्याची शक्यता आहे. वाळपईत लवकरच पोटनिवडणूक होणार असल्याने आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्यावरही शरसंधान करण्याची योजना भाजपने तयार आखल्याने हे अधिवेशन वादळी ठरण्याचीच शक्यता आहे.
विरोधकांच्या या अस्त्रांना कसे तोंड द्यावे, त्यांच्या टीकेची धार बोथट कशी करावी याबाबत या बैठकीत खल होणार असल्याचीही माहिती मिळाली आहे. या बैठकीला सर्व मंत्र्यांनी हजर राहावे,असेही आदेश जारी करण्यात आल्याची खात्रीलायक माहिती प्राप्त झाली आहे.

बस तिकीट दरवाढीवर तोडगा

-१५ पैसे प्रतिकिलोमीटर वाढ
-बेमुदत संपाचा निर्णय रद्द


पणजी, दि. ८ (प्रतिनिधी) - वाहतूक खात्याने राज्यातील खाजगी बस व्यावसायिकांना अखेर १५ पैसे वाढ देण्याचे मान्य करून तिकीटदरवाढीच्या विषयावर तोडगा काढण्यात यश मिळवले. खात्याने तिकीटदरवाढीबाबत घाईगडबडीत जारी केलेल्या अधिसूचनेत "सिटी' बस व्यावसायिकांना काहीही लाभ मिळत नाही, हे आज खाजगी बस मालक संघटनेतर्फे वाहतूक संचालक अरुण देसाई यांना पटवून देण्यात आले. संघटनेच्या म्हणण्यात तथ्य असल्याचे जाणवल्यानंतर १० ऐवजी १५ पैशांची वाढ देण्यास वाहतूक खात्याने सहमती दर्शवली व यामुळे आता "सिटी' बस व्यावसायिकांना किमान १ रुपया वाढ मिळणार आहे. या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर १२ जुलैपासून घोषित केलेला बेमुदत संप मागे घेण्यात आल्याची घोषणा संघटनेचे सरचिटणीस सुदीप ताम्हणकर यांनी केली.
अखिल गोवा खाजगी बस मालक संघटनेला आज वाहतूक संचालक अरुण देसाई यांनी चर्चेसाठी पाचारण केले होते. वाहतूक खात्याने तिकीट दरवाढीबाबत जारी केलेल्या अधिसूचनेतील त्रृटी यावेळी संघटनेतर्फे त्यांच्यासमोर ठेवण्यात आल्या."सिटी' बसगाड्यांचे अंतर हे एक ते दहा किलोमीटरपर्यंतचे असते व त्यामुळे वाहतूक खात्याने सुचवलेली वाढ त्यांना फायदेशीर नाही, हे यावेळी पटवून देण्यात आले.अखेर १० पैशांऐवजी १५ पैशांच्या वाढीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. दरम्यान, सरकारने या अधिसूचनेत दुरुस्ती करून विविध भागांत प्रवासी वाहतूक करणाऱ्या आणि "सिटी' बसेसनी १ ते ३ कि.मी.पर्यंत ५ रु. भाडे आकारायचे आहे व त्यानंतरच्या प्रत्येक कि.मी.साठी ५५ पैसे भाडे असेल, असे सुचवले आहे.
संघटनेतर्फे ठेवण्यात आलेल्या इतर मागण्यांवरही येत्या काळात संघटनेबरोबर चर्चा करून तोडगा काढण्याचे आश्वासन अरुण देसाई यांनी दिल्याचे श्री.ताम्हणकर म्हणाले. वाहतूक खात्यातील भ्रष्टाचार निपटून काढण्यासाठी ठोस उपाययोजना आखण्याची तयारी सुरू केल्याचेही त्यांनी सांगितले. प्रत्येक कदंब बसस्थानकावर खाजगी बस व्यावसायिकांना कार्यालयासाठी जागा उपलब्ध करून दिली जाईल. खाजगी बस मालकांची सोसायटी स्थापन करून त्यानंतर समाज कल्याण खाते तथा इतर सरकारी खात्यामार्फत या व्यावसायिकांच्या कल्याणासाठी विविध योजना राबवण्याचाही सरकारचा विचार असल्याचे देसाई यांनी सांगितले,असेही श्री.ताम्हणकर म्हणाले. खाजगी बस व्यावसायिकांना नव्या बसगाड्या खरेदी करण्यासाठी सरकारने तयार केलेल्या अनुदान योजना समितीवर संघटनेच्या एका सदस्याची निवड करण्यासही संचालकांनी तयारी दर्शवल्याचेही यावेळी सांगण्यात आले. याप्रकरणी लवकरच संघटनेची बैठक बोलावण्यात येणार असून त्यावेळी या सर्व विषयांवर सखोल चर्चा करण्यात येणार असल्याचेही श्री.ताम्हणकर यांनी सांगितले.

लकीची मुलाखत हा इंटरनेटचा खेळ

मुख्यमंत्र्यांकडून सारवासारव

पणजी, दि. ८ (प्रतिनिधी) - इंटरनेटचा उपयोग करून आजकाल कोणीही एखाद्याची बदनामी करू शकतो. स्वीडिश मॉडेल लकी फार्महाऊस हिची कथित मुलाखत व त्यात गृहमंत्री रवी नाईक यांचे पुत्र रॉय नाईक यांचे घेतलेले नाव ही घटना याच सदरात मोडणारी आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी देत गृहमंत्री रवी नाईक यांच्या राजीनाम्याची मागणी फेटाळून लावली.
लकीने एका इस्रायली दैनिकास दिलेल्या मुलाखतीत इस्रायली ड्रग व्यवहारांत गृहमंत्री रवी नाईक यांचे पुत्र रॉय नाईक सामील असल्याचा सनसनाटी आरोप केला होता. एका स्वीडिश दैनिकातही लकीची मुलाखत प्रसिद्ध झाली आहे. त्यात गोव्यातील आपल्या वास्तव्याची माहिती तिने दिली आहे. पोलिस व ड्रग माफिया "अटाला' यांचे साटेलोटे व त्यांच्यातील ड्रग व्यवहारांवरही तिने उघडपणे माहिती दिली आहे. भाजपकडून कालच यासंबंधी गृहमंत्री रवी नाईक यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे. काही पत्रकारांनी आज मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना यासंदर्भात विचारले असता त्यांनी हा प्रकार म्हणजे "इंटरनेट' माध्यमाशी केलेला खेळ असल्याचेच अप्रत्यक्षरीत्या सांगितले. एखाद्याची बदनामी करावयाची झाल्यास त्यासाठी "इंटरनेट' हे सोपे माध्यम बनले आहे. त्यामुळे गृहमंत्री रवी नाईक यांना बदनाम करण्याचाच हा प्रकार असल्याचेही त्यांनी सूचित केले.
गृहमंत्री सध्या इस्पितळात दाखल झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. काही पत्रकारांनी लकीच्या आरोपांबाबत त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी इस्पितळात भेट दिली असता त्यांना गृहमंत्र्यांना भेटण्यास मज्जाव करण्यात आला. त्यामुळे आता या प्रकरणामागील सत्य समोर येण्यासाठी या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लागणे महत्त्वाचे बनले आहे.
भाजपची तीव्र प्रतिक्रिया
मुख्यमंत्र्यांच्या प्रतिक्रियेमुळे भाजपच्या गोटात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. लकीने सुरुवातीला "यूट्यूब' च्या साहाय्याने पोलिस व ड्रग माफिया साटेलोटे प्रकरणाचा पर्दाफाश केला. या "यूट्यूब'मुळेच अमलीपदार्थ विरोधी पथकातील पोलिसांना निलंबित करण्यात आले व त्यांना अटकही झाली. या "यूट्यूब'मुळेच दुडू व अटाला हे प्रमुख ड्रग माफिया पोलिसांच्या हाती सापडले. आता तीच लकी जेव्हा रॉय नाईक यांचे नाव घेते तेव्हा हा "इंटरनेट'चा गैरवापर कसा ठरतो,असा सवाल भाजपने केला आहे. "इंटरनेट'च्या माध्यमाने राज्य सरकारच्या गृहमंत्र्यांची बदनामी सुरू आहे, असे जर मुख्यमंत्र्यांना वाटत असेल तर ती देखील गंभीर गोष्ट आहे. त्यामुळे त्यांनी याबाबत "सीबीआय' चौकशीची मागणी करावी, अशी प्रतिक्रिया भाजपने व्यक्त केली आहे.

Thursday, 8 July 2010

लकीच्या खुलाशात रॉय नाईक यांचे नाव!

रवी नाईक यांच्या राजीनाम्याची भाजपकडून जोरदार मागणी
पणजी, दि. ७ (प्रतिनिधी) - राज्यात मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या इस्रायली ड्रग व्यवहारांत गृहमंत्री रवी नाईक यांचे पुत्र रॉय रवी नाईक गुंतले आहेत, असा सनसनाटी खुलासा लकी फार्महाऊस या स्वीडिश मॉडेलने एका इस्रायली दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत केला आहे. या गंभीर आरोपाची सखोल व निष्पक्षपाती चौकशी व्हावी यासाठी रवी नाईक यांनी गृहखात्याचा तात्काळ राजीनामा द्यावा व या चौकशीला सामोरे जाऊन आपल्या मुलाचे निर्दोषत्व सिद्ध करावे, अशी जोरदार मागणी आज भाजपकडून करण्यात आली.
आज इथे बोलावण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत भाजपचे प्रवक्ते राजेंद्र आर्लेकर यांनी ही मागणी केली. भाजपचे सरचिटणीस प्रा. गोविंद पर्वतकर यावेळी हजर होते. या गंभीर प्रकरणाच्या चौकशीबाबत ज्या पद्धतीने चालढकल सुरू आहे ते पाहता निश्चितच या चौकशीत राजकीय दबाव येत असल्याची जनतेची भावना बनली आहे. पोलिसांनी या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केल्यास भाजप रस्त्यावर उतरेल, असा कडक इशाराही श्री. आर्लेकर यांनी यावेळी दिला.
कथित ड्रग माफिया अटाला याची माजी प्रेयसी लकी फार्महाऊस हिनेच काही काळापूर्वी "यू ट्यूब' च्या माध्यमातून गोवा पोलिस व ड्रग माफियांच्या साटेलोटे प्रकरणाचा पर्दाफाश करून खळबळ उडवून दिली होती. या "यू ट्यूब' मुळेच सहा पोलिसांवर निलंबनाची कारवाई झाली होती व नंतर त्यांना अटकही करण्यात आली होती. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या अटाला याची प्रेयसी लकी फार्महाऊस हिने यापूर्वीच या प्रकरणात एका राजकीय नेत्याच्या पुत्राचा सहभाग असल्याचे सुतोवाच केले होते. आता तिने एका अग्रेसर इस्रायली दैनिकाला दिलेल्या सनसनाटी मुलाखतीत या राजकीय नेत्याच्या पुत्राचे नावच उघड केले असून तो गृहमंत्री रवी नाईक यांचा पुत्र रॉय नाईक असल्याचे म्हटले आहे.
राज्याच्या गृहमंत्र्यांवरच एवढा गंभीर आरोप होत असताना सरकारने त्याबाबत मौन धारण करणे म्हणजे संशयाला बळकटी प्राप्त होण्यासारखे होईल. या आरोपांमागील सत्य उघड होणे गरजेचे आहे व त्यासाठी रवी नाईक यांनी गृहखात्याचा तात्काळ राजीनामा देणेच उचित ठरेल, असेही श्री. आर्लेकर म्हणाले. रवी नाईक हे राजीनामा देण्यास टाळाटाळ करीत असतील तर मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी त्यांचे गृहखाते काढून घ्यावे, अशी मागणीही त्यांनी केली. या ड्रग प्रकरणाची "सीबीआय' चौकशी व्हावी ही भाजपची मागणी कायम आहे, याचा पुनरुच्चारही त्यांनी यावेळी केला.
एका जबाबदार मंत्र्याच्या पुत्रावर अशा पद्धतीचे गंभीर आरोप होणे ही राज्याची बदनामीच आहे व त्यामुळे या आरोपांची तात्काळ चौकशी करून सत्य जनतेसमोर येणे अत्यावश्यक आहे. रवी नाईक यांच्याकडेच गृहखाते असल्याने त्यांच्या दबावासमोर पोलिस या प्रकरणाची चौकशी निःपक्षपातीपणे करू शकणार नाहीत व त्यामुळे त्यांनी गृहखात्याचा त्याग करून या चौकशीस पोलिसांना मोकळीक देणेच योग्य ठरेल, असेही श्री. आर्लेकर पुढे म्हणाले. लकी फार्महाऊस हिने केलेले आरोप खोटे ठरल्यास तिच्यावरही कारवाई झाली पाहिजे. या प्रकरणाची चौकशी ज्या पद्धतीने रखडत आहे व सर्व संशयितांना जामीनही मंजूर झाल्याने एकूण चौकशीवरच संशय निर्माण झाला आहे. उच्च न्यायालयाकडूनही पोलिसांच्या चौकशीवर ताशेरे ओढले गेल्याने कुठे तरी पोलिसांवर दबाव वाढत असल्याचेच सूचित होते, असा टोलाही त्यांनी याप्रसंगी हाणला.

विद्यार्थी विभागानेही दंड थोपटले

इस्रायली ड्रग माफियांशी गृहमंत्री रवी नाईक यांचा पुत्र रॉय नाईक याचे नाव जोडले गेल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या विद्यार्थी विभागाची पक्षाच्या मुख्यालयात आज खास बैठक होऊन त्यात रवी नाईक यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी करण्यात आली.
राज्याच्या गृहमंत्र्यांकडून राज्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवून नागरिकांना मुक्त वातावरण निर्माण करून देण्याची अपेक्षा असते; मात्र ज्यावेळी गृहमंत्र्यांच्याच पुत्राचे नाव या प्रकरणात गोवले जाते त्यावेळी ती अतिशय गंभीर बाब बनते, असा सूर या बैठकीत व्यक्त केला गेला.
ज्यावेळी संपूर्ण विश्व मादक पदार्थांच्या विरोधात एकवटते त्यावेळी एका राज्याचा लोकप्रतिनिधी मात्र अकार्यक्षमता दाखवतो आहे. या मादक पदार्थामुळे हजारो युवकांचे जीवनच धोक्यात आलेले आहे. पोलिस अधिकाऱ्यांचे ड्रग माफियांशी असलेले साटेलोटे, तुरुंगात असलेल्या ड्रग माफिया करत असलेला मोबाईलचा वापर व आता खुद्द राज्याच्या गृहमंत्र्यांच्या मुलाचे पुढे आलेले नाव या घटनांमुळे या सरकारचे खरे रूप जनतेसमोर आलेले आहे, असे भाजप विद्यार्थी विभागाने म्हटले आहे.
विभागाने याप्रकरणी सरकारने धारण केलेल्या मौनाचा तीव्र निषेध केला. हा गंभीर विषय राज्याच्या कानाकोपऱ्यात नेला जाईल व हे सरकार युवकांच्या जिवाशी कसा खेळ मांडत आहे याचा पर्दाफाश केला जाईल, असेही यावेळी सांगण्यात आले. याविषयी पुढील धोरण निश्चित करण्यासाठी सर्व विद्यार्थी प्रतिनिधींची एक बैठक दि. १० जुलै रोजी भाजपच्या कार्यालयात बोलाविण्यात आली आहे, असेही सांगण्यात आले.

"टीबी' इस्पितळाचा आजार बळावला!

कुठे आहे आरोग्यमंत्र्यांचा करिष्मा?

शैलेश तिवरेकर

पणजी, दि. ७ (प्रतिनिधी) - सांतइनेज - पणजी येथील क्षयरोग इस्पितळाची अवस्था सध्या अखेरची घटका मोजणाऱ्या क्षयग्रस्त रुग्णासारखीच बनलेली आहे. आरोग्यमंत्री विश्वजित राणे हे राज्यातील आरोग्यसेवेबाबत केलेल्या सुधारणा व विकासाचा दावा वेळोवेळी करतात; मात्र तांबडी माती येथे असलेल्या या महत्त्वाच्या क्षयरोग इस्पितळाची बिकट अवस्था पाहिली तर आरोग्यमंत्र्यांचा हा दावा म्हणजे निव्वळ तोंडाच्या बाता असल्याचेच उघड होते.
या इस्पितळात उपचार घेणारे रुग्ण व तिथे काम करणारे कर्मचारी कोणत्या परिस्थितीत येथे दिवस काढतात हे पाहिले तर आरोग्य सेवेबाबत आपले राज्य अग्रेसर असल्याचा टेंभा मिरवणाऱ्या सरकारला आपली मान शरमेने खाली घालावीच लागेल, अशीच परिस्थिती आहे. संपूर्ण राज्यात क्षयरोगाने बाधित झालेल्या रुग्णांवर या इस्पितळांत उपचार करण्यात येतात. क्षयरोग हा संसर्गजन्य रोग असल्याने या इस्पितळात स्वच्छतेवर सर्वाधिक भर देणे गरजेचे आहे. पण राज्यातील या क्षयरोग इस्पितळाकडे लक्ष द्यायला कुणाकडेही वेळ नाही व त्यामुळे आरोग्यसेवेच्या बाबतीत अग्रेसर असलेल्या गोव्यासाठी ही लांच्छनास्पद गोष्ट ठरली आहे.
या इस्पितळात सुमारे २५ कर्मचारी काम करतात. या कर्मचाऱ्यांच्या असंख्य अडचणी व तक्रारी आहेत. पण त्यांचे म्हणणे ऐकून घेण्याची आरोग्य खात्याची तयारी नाही. या इस्पितळातील साधन सुविधांचा पूर्णपणे बोजवारा उडालेला असून केवळ नोकरी करण्यावाचून पर्याय नाही, या एकाच गोष्टीसाठी या इस्पितळात हे कर्मचारी काम करताना दिसतात. या इस्पितळाला भेट देणाऱ्या प्रत्येकाला आरोग्यमंत्र्यांनी या खात्यात नेमकी काय सुधारणा केली आहे त्याचे दर्शन होईल, अशी टीकाही येथे येणारे लोक करतात.

इस्पितळ इमारतच रुग्णशय्येवर

राज्यात सध्या असलेल्या इस्पितळांची परिस्थिती कशीही असो, पण आरोग्यमंत्री मात्र ठिकाठिकाणी नव्या इस्पितळांच्या इमारतींची उभारणी करीतच सुटले आहेत. सांतइनेज येथील क्षयरोग इस्पितळाची इमारतच खुद्द रुग्णशय्येवर असल्यागत बनली आहे. रुग्णांसाठी व येथील कर्मचाऱ्यांसाठीही ही इमारत धोकादायक बनली आहे. या रया गेलेल्या इमारतीत एखादा रुग्ण बरा होणे शक्यच नाही, असे येथील डॉक्टरही खाजगीत बोलतात. इमारतीची एवढ्या प्रमाणात दुर्दशा झाली आहे की, बोलायची सोयच राहिली नाही. या इमारतीची लिफ्ट गेली कित्येक वर्षे बंद आहे व त्यामुळे क्षयरोगाने पीडित झालेल्यांना थेट तिसऱ्या मजल्यापर्यंत पायऱ्यांवरून चालत जावे लागते. एवढेच नव्हे तर चालण्याचे त्राणही नसलेल्या रुग्णांना "स्ट्रेचर'च्या साहाय्याने पायऱ्या चढून नेणे भाग पडत आहे. बहुतांश क्षयरुग्ण हे दम्यानेही बाधित असतात व त्यामुळे त्यांना पायऱ्यांवरून चालायला लावणे म्हणजे मृत्यूच्या छायेत ढकलण्यासारखेच असल्याचा आरोपही होत आहे. तिसऱ्या मजल्यावर चढण्यासाठी किमान चाळीस पायऱ्या चढाव्या लागतात. कित्येकवेळा भलेमोठे "ऑक्सिजन सिलिंडर' घेऊन कर्मचाऱ्यांना हे मजले सर करावे लागतात. विविध वॉर्डांत पावसाचे पाणी झिरपत असल्याने रुग्णांच्या खाटा वारंवार हालवाव्या लागतात. बाहेर पाऊस पडत असल्यास एक सफाई कामगार कायमस्वरूपी पाणी साफ करण्यासाठीही ठेवावा लागतो. महिला वॉर्डांचीही तीच परिस्थिती बनली आहे. येथील शौचालयांची अवस्था विचारण्याच्या पलीकडे गेली आहे. केवळ गोव्यातूनच नव्हे तर गोव्याबाहेरूनही मोठ्या प्रमाणात या इस्पितळात रुग्ण उपचारासाठी येत असतात. मात्र इथे जो रुग्ण येतो त्याची अवस्था येथे राहण्यापेक्षा मरण परवडले अशी होत नसली तरच नवल, अशी परिस्थिती आहे.

इस्पितळातील साधनांचा बोजवारा

इस्पितळाच्या इमारतीप्रमाणेच येथील सोयीसुविधांची स्थिती बनली आहे. रुग्णांचे कपडे धुण्यासाठीचे मशीन गेली कित्येक वर्षे बंद पडले आहे व त्यामुळे हे कपडे बांबोळी येथे पाठवले जातात. या कपड्यांसाठीच आता काही कर्मचाऱ्यांना दिवसागणिक बांबोळी ते पणजी असा प्रवास करावा लागतो. विजेच्या सामानाची एवढी दुर्दशा झाली आहे की कधी कुणाला विजेचा झटका येईल व अपघात घडेल हे सांगता येत नाही. आरोग्यमंत्र्यांना वाईट वाटेल या भावनेने या सर्व दुखण्यांबाबत चकार शब्दही काढायला येथील कर्मचारी तयार नाहीत व ते मुकाट्याने हा प्रकार सहन करीत आहेत. लोकांकडूनही केवळ नाराजी व्यक्त केली जाते व इथे उपचारांसाठी येण्याची वेळ ओढवली याला आपले नशीबच जबाबदार असल्याचे म्हणून ते गप्प राहतात. या इस्पितळाला आरोग्यमंत्री विश्वजित राणे व मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी एकदा भेट द्यावी व नंतरच राज्याच्या आरोग्य सेवेच्या बाता माराव्यात, असे आवाहन इथे उपचार घेणारे रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांनी केले आहे.

रिअल ऍडमिरल जामवाल अपघाती गोळीबारात मृत्युमुखी

आत्महत्या की अपघात याबाबत कमालीचे गूढ

कोची, दि. ७ - नौदलाच्या दक्षिण विभागाचे प्रमुख रिअर ऍडमिरल सत्येंद्रसिंग जामवाल (वय ५१) यांचा कोची येथील प्रशिक्षण केंद्रामध्ये गोळीबारात आज अपघाती मृत्यू झाला. देशभरात विलक्षण खळबळ माजवलेल्या या घटनेच्या चौकशीचे आदेश नौदलाने दिले आहेत.
कोची येथे उभारण्यात आलेल्या "आयएनएस द्रोणाचार्य' या छोटेखानी शस्त्र गोळीबार प्रशिक्षण रेंजमध्ये सकाळी साडेदहाच्या सुमारास गोळीबार सुरू असताना एस. एस. जामवाल यांना अपघाताने गोळी लागली व त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश नौदलाने दिल्याची माहिती नौदल प्रवक्त्याने नवी दिल्ली येथे दिली.
मात्र, ही घटना कशी घडली? जामवाल यांना अपघाताने गोळी कशी लागली? या प्रश्नांविषयी नौदलाने मौनच बाळगले आहे. जामवाल यांचे पार्थिव इस्पितळात हलविण्यात आले आहे. जामवाल यांनी आपल्या पिस्तुलमधून स्वतःवर गोळी झाडून घेतल्याचे वृत्त काही वाहिन्यांनी प्रसारित केले होते; तथापि त्यास अधिकृत दुजोरा मिळाला नाही.
जामवाल यांची १जुलै १९८० रोजी भारतीय नौदलाच्या कार्यकारी शाखेत "सरफेस वॉरफेअर ऑफिसर' म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. सनवार येथील लॉरेन्स स्कूल, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए), तत्कालीन सोव्हिएट महासंघातील ग्रेचको नेव्हल वॉर कॉलेज, वेलिंग्टनमधील डीफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज आणि महू येथील आर्मी वॉर कॉलेजमधून त्यांनी शिक्षण घेतले होते. काही काळ ते गोव्यातील नौदल अकादमीतही उच्चाधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांच्या मृत्यूबद्दल विलक्षण गूढ निर्माण झाले आहे. मात्र चौकशी पूर्ण झाल्यानंतरच त्यातून नेमके चित्र स्पष्ट होणार आहे. त्यामुळे या घडीला नौदलाने या विषयी अधिक तपशीलवार माहिती दिलेली नाही. फायरिंग रेंजच्या टप्प्यात येऊन एवढ्या उच्च पदावरील अधिकारी मृत्युमुखी पडल्याची घटना जवळपास घडतच नाही. म्हणूनच हे असे कशामुळे घडले, असा मूलभूत प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाला आहे.

मिकींना पोलिस कोठडी अटळ

जामिनासाठीचा अर्ज फेटाळला
मडगाव, दि. ७ (प्रतिनिधी) : नादिया तोरादो मृत्युप्रकरणी संशयित आरोपी असलेले माजी पर्यटनमंत्री तथा बाणावलीचे आमदार मिकी पाशेको यांनी जामिनासाठी केलेला अर्ज येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश प्रमोद कामत यांनी आज फेटाळून लावला व हॉस्पिसियोत उपचार घेत असलेल्या मिकींना डॉक्टरांनी घरी जाण्याची अनुमती दिल्यानंतर गुन्हा व अन्वेषण विभागाने ताब्यात घेण्यासाठी फौजदारी कायद्याच्या कलम १६७ अन्वये पावले टाकावीत असे निर्देश दिले.
संशयिताच्या आजारपणाबद्दल व्यक्त केलेल्या संशयासंदर्भात गोवा वैद्यकीय इस्पितळातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाकडून तपासणी करावी हा अर्ज गुन्हा अन्वेषणाने प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांकडे सादर करावा अशीही सूचना त्यांनी केली.
न्या. कामत यांनी आज दुपारी १२ वा. हा निवाडा तुडुंब भरलेल्या न्यायालयात दिला; पण त्याची अधिकृत प्रत सायंकाळी ५.३० वा. निघाली व त्यामुळे महिनाभराच्या जोरदार घडामोडींनंतर गेल्या ३ जुलै रोजी आपल्या वकिलासमवेत मिकी पाशेको हे जिल्हा व सत्र न्यायालयात शरण आल्यापासून जी उत्सुकता लागून राहिली होती तिला आज दुपारी विराम मिळाला.
गेले दोन दिवस या अर्जावर प्रदीर्घ युक्तिवाद झाल्यावर न्यायाधीशांनी आज सकाळी निवाड्याची वेळ मुक्रर केली होती. त्यामुळे सकाळी नियोजित वेळेअगोदरच कोर्टरूम भरून गेले होते. पण समोर असलेली प्रकरणे निकालात काढल्यानंतर न्या. कामत यांनी या जामीन अर्जावरील निवाडा दुपारी १२ वा. घोषित केला जाईल असे सांगितले व त्यामुळे उपस्थितांची उत्सुकता आणखीनच ताणली गेली.
न्या. कामत यांनी आपल्या १४ पानी निवाड्यात दक्षिण गोवा सत्र न्यायालय, उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालय यांनी यापूर्वी दिलेला "गुन्हा भयंकर स्वरूपाचा आहे व त्यासाठी आरोपीच्या कोठडीतील तपासाची आवश्यकता आहे' असा जो आदेश दिला होता तो उचलून धरताना जामिनासाठीचा अर्ज फेटाळून लावला. त्यांनी आरोपीच्या आरोग्याबाबत त्यांच्या वकिलांनी विविध न्यायालयीन निवाड्यांचा जो संदर्भ दिला आहे तो या प्रकरणात लागू होत नसल्याचे स्पष्ट करताना आरोपीस जामीन मंजूर करावा इतका त्याचा आजार गंभीर नाही, असे स्पष्ट केले. आरोपीने कलम ४३९खाली सादर केलेला जामीन अर्ज म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने मंजूर केलेला आदेश टाळण्यासाठी केलेला दुसरा प्रयत्न आहे व असा अर्ज विचारात घेणे म्हणजे ते कायदा प्रक्रियेचा दुरुपयोग ठरण्यासारखे आहे, असे म्हटले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने आरोपीचा अर्ज आज दि. १ जुलै रोजी फेटाळून लावल्यापासून आजपर्यंत या प्रकरणात हस्तक्षेप करावा अशी कोणतीही घटना घडलेली नाही की आरोपीस अनुकूल स्थिती निर्माण झालेली नाही. आरोपीच्या वकिलांनी जरी सर्वोच्च न्यायालयाने स्वतंत्रपणे निवाडा घेण्याची मोकळीक दिलेली आहे असे प्रतिपादिलेले असले तरी आपल्या मते पोलिसांनी कोठडीतील चौकशीसाठी अटक केल्यावरच नियमित जामिनासाठीच्या अर्जावर विचार करणे उचित ठरेल. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या सुस्पष्ट आदेशानंतरही आरोपी कोठडीतील चौकशीसाठी हजर झाला नाही व उलट जामीनअर्ज सादर करता झाला; अशा स्थितीत त्यावर विचार करणे सर्वथा अनुचित आहे, असा निष्कर्ष न्यायाधीशांनी काढला आहे.
आरोपीच्या आरोग्य स्थितीबाबतही न्यायाधीशांनी ऊहापोह करताना हॉस्पिसियोतील डॉक्टरांवर ताशेरे ओढले आहेत व प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोपीच्या आरोग्य स्थितीबाबतचे दाखले जारी करताना खबरदारी घ्यायला हवी होती, असे मतप्रदर्शन केले आहे.
आज जामीनअर्ज फेटाळतानाच न्या. कामत यांनी ३ जुलै रोजी गुन्हा अन्वेषणाच्या सुनिता सावंत यांनी आरोपीच्या कोठडीतील चौकशीसाठी विनंती करणारा अर्ज दाखल करून घेतला असून त्याला इस्पितळातून मुक्त करताच त्याचा ताबा घेण्यास त्या मोकळ्या असतील; मात्र ते करताना त्यांनी फौजदारी दंड संहितेच्या कलम १६७ चे पालन करावे असे निवाड्यात नमूद केले आहे.
शनिवारी शरण आल्यानंतर लगेच मिकी यांनी अंतरिम दिलासा मिळविण्यासाठी एक व जामिनासाठी दुसरा अर्ज केला होता पण अंतरिम दिलाशासाठीचा अर्ज फेटाळून न्यायाधीशांनी त्यांना दोन दिवसांसाठी न्यायालयीन कोठडी फर्मावली होती. पण नंतर लगेच ते छातीत दुखत असल्याचे कारण सांगून हॉस्पिसियोत दाखल झाले होते व आज जामीनअर्ज फेटाळला गेल्यानंतरही ते तेथील अतिदक्षता विभागातच होते.
मडगाव न्यायालयीन कोठडीतील जेलरने त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी पाठविले असता हॉस्पिसियो इस्पितळातील डॉक्टरांनी त्यांचा रक्तदाब वाढल्याचा अहवाल देऊन अतिदक्षता विभागात उपचारार्थ दाखल करून घेतले होते व अजूनही ते तेथेच आहेत. परवा व काल सरकारी वकील सरोजिनी सार्दिन व मिकीचे वकील सुरेंद्र देसाई यांनी युक्तिवाद केला होता. आज ऍड. अमित पालेकर मिकीतर्फे कोर्टात उपस्थित होते. निवाडा दिल्यानंतर अमित पालेकर यांनी निवाड्याची प्रत मागविण्यासाठी अर्ज सादर केला असून ती मिळाल्यानंतर उच्च न्यायालयात जायचे की नाही यावर विचार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मिकी पाशेकोंचे हे प्रकरण प्रथम श्रेणी न्यायालयात चालणार आहे. गुन्हा अन्वेषण विभागाच्या निरीक्षक सुनिता सावंत त्यांना ताब्यात घेण्याच्या प्रयत्नात आहेत. आजही त्या उपस्थित होत्या. निकालानंतर सरकारी वकील सरोजिनी सार्दिन यांनी मिकीच्या वैद्यकीय प्रमाणपत्राबाबत संशय व्यक्त करून तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने चौकशी करावी अशी विनंती करणारा अर्ज सादर केला असता तो प्रथम श्रेणी न्यायालयात सादर करण्यास न्यायाधीशांनी त्यांना सांगितले.

कोलवाळ अपघातात पीर्ण येथील इसम ठार

म्हापसा, दि. ७ (प्रतिनिधी) - बिनानी - कोलवाळ येथील वळणावर आज संध्या. ७.४५ एका टिपर ट्रकच्या चाकाखाली आल्याने पीर्ण येथील गोविंद सातार्डेकर (४५) हा इसम जागीच ठार झाला.
याप्रकरणी म्हापसा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उमलवाडा - पीर्ण येथील गोविंद सातार्डेकर हा इसम आपल्या जीए - ०३ - एम - १२७४ या क्रमांकाच्या बजाज स्कूटरने पीर्ण येथे जात होता. त्याचवेळी जीए - ०३ - टी - ६६९० या टिपर ट्रकही स्कूटरच्या पाठोपाठ जात होता. बिनानी कोलवाळ येथील वळणावर ते पोहोचले असता मागून येणाऱ्या ट्रकची स्कूटरला जोरदार धडक बसली. यात स्कूटरचालक गोविंद सातार्डेकर रस्त्यावर फेकला गेला व ट्रकच्या पुढच्या चाकाखाली आल्याने चिरडून त्याचा जागीच मृत्यू झाला.
म्हापसा पोलिसांना अपघाताची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन सदर इसमाला आझिलो इस्पितळात दाखल केले. तेथे त्याला मृत म्हणून घोषित करण्यात आले. मृतदेह शवचिकित्सेसाठी बांबोळीला पाठवण्यात आला आहे. ट्रकचा चालक आणि वाहन फरारी असल्याचे सांगण्यात आले.

..तर गोवा स्वर्गाहूनही सुंदर होईल!

नासीर अ. दिवेकर
आकें - मडगाव


कामानिमित्त महाराष्ट्रातून माझे गोव्यात येणे झाले. महान महाराष्ट्राप्रमाणेच गोव्यातील लोकही शांत व प्रेमळ आहेत. महाराष्ट्राप्रमाणेच गोवा राज्य देखील एक स्वर्गच आहे. आज जगातील एक अप्रतिम पर्यटन स्थळ म्हणून गोवा राज्याची सर्वत्र कीर्ती पसरली आहे. जगभरातील लोक फिरण्यासाठी गोव्यात येतात. त्यामुळे राज्याची आर्थिक बाजू भक्कम झाली आहे. राज्याचा आर्थिक कणा पर्यटनावरच अवलंबून आहे. या पर्यटनाला अधिकाधिक चालना मिळावी म्हणून राज्य सरकार विविध कार्यक्रम राबवीत असते. परंतु, हे करत असताना संबंधितांनी खालील गोष्टींवर विशेष लक्ष देणे गरजेचे आहे, असे आवर्जून सांगावेसे वाटते.
मडगावचाच विचार करावयाचा झाल्यास, मडगाव मार्केट फिरून झाल्यावर किंवा अन्य कोठूनही पांडव कपेलकडून रेल्वे पकडण्यासाठी किंवा रेल्वेचे तिकीट काढण्यासाठी येथे फार मोठा वळसा घालून मुख्य गेटकडे दुसऱ्या बाजूला जावे लागते. त्यामुळे पर्यटकांना, विशेषतः मुलांना, महिलांना व वृद्धांना फार त्रास होतो. कारण पूल चढून उतरावा लागतो. पूल उतरल्यावर लगेच दुचाकींसाठी पार्किंग व्यवस्था आहे. त्यामुळे आणखीनच त्रास वाढतो व कधीकधी त्यामुळे गाडी देखील चुकते. तरी मागील गेटवर जर तिकीट काढण्याची व गाडी पकडण्याची सोय झाली तर ते सर्वांनाच सोयीचे ठरणार आहे.
पर्यटनासाठी येथे असलेली दुसरी मोठी समस्या कचरा कुंड्या, बेवारस कुत्री व होणारे अपघात! रस्त्यावरून चालणारे तर सोडाच परंतु, दुचाकीवरून किंवा चारचाकीने भरधाव वेगाने जाणारेही वाहनाची गती अजिबात कमी न करता गाडीतूनच कचरा कुंडीत फेकतात. बऱ्याचदा हा कचरा कुंडीत न पडता आजूबाजूला फेकला जातो. तसे झाल्याने इथे मोकाट फिरणाऱ्या बेवारस कुत्र्यांची चांगलीच चंगळ होते. सदर कचऱ्याच्या पिशव्या ओढून, फाडून हे कुत्रे सर्व कचरा रस्त्यावर पसरतात. त्यामुळे येथील बऱ्याच भागांत असह्य दुर्गंधी तर पसरतेच शिवाय रोगराईही पसरण्याची भीती असते. या दुर्गंधीमुळे व गलिच्छतेमुळे पर्यटकांची गोव्याविषयीचे मत दूषित होते व त्यामुळे त्यांची संख्याही रोडावते. सभ्य लोकांनी मनावर घेतले तर या समस्येचे त्वरित निराकरण होणे कठीण आहे का?
भटक्या कुत्र्यांचा उल्लेख वर आलेलाच आहे. ही कुत्री म्हणजे वाटसरूंसाठी मोठा धोका ठरतो आहे. विशेषतः रात्री ८ वाजल्यानंतर रस्त्यावर चालावे म्हटले तरी जीव मुठीत धरून चालावे लागते. कारण नाक्यानाक्यावर जेथे कचरा पेटी आहे तेथे १५- २० कुत्री असतातच असतात; अन्य ठिकाणीही असतात. ती भुंकून अंगावर येतात व वाहनांच्या मागे धावतात, त्यामुळे अपघात झाल्याचेही वेळोवेळी दृष्टीस पडते. संबंधितांनी या गंभीर बाबीकडे लक्ष पुरवले तर लोकांना होणारा उपद्रव टाळता येऊ शकेल.
जाता जाता उल्लेख करावयाचा आहे तो हल्ली या शांत व स्वर्गीय स्थळी घडणाऱ्या काही अप्रिय घटनांचा! अशा घटनांचे प्रमाण गोव्यात अलीकडे विलक्षण वाढलेले आहे. गोवा हे जागतिक पर्यटन स्थळ असल्यामुळे अशा गोष्टींचा गाजावाजाही त्याच प्रमाणात होतो. त्यामुळे या राज्याची सुंदर, सहनशील, आदरातिथ्यात अग्रेसर अशी जी जागतिक प्रतिमा आहे ती खराब होते. त्यामुळे अशा अप्रिय गोष्टी या शांत व नयनरम्य राज्यात घडू नयेत म्हणूनही संबंधितांनी कंबर कसण्याची आवश्यकता आहे. हे स्थळ म्हणजे स्वर्गच आहे; परंतु, आपण मनावर घेतले तर ते स्वर्गाहूनही सुंदर होऊ शकेल. तसेच होवो अशी प्रार्थना करूया व राज्याबरोबरच देशाचेही नावही उज्ज्वल करूया.

Wednesday, 7 July 2010

'त्या' मंत्रीपुत्राचे नाव उघड!

इस्रायली दैनिकात लकी फार्महाऊसने केला पर्दाफाश
पणजी, दि. ६ (प्रतिनिधी)ः गोव्यात कार्यरत असलेल्या कथित इस्रायली ड्रग माफिया व्यवहारांत गोव्यातील एका बड्या मंत्रीपुत्राचा नामोल्लेख इस्राईलच्या एका अग्रेसर दैनिकात लकी फार्महाऊस हिने दिलेल्या खळबळजनक मुलाखतीत केल्याने पोलिस खात्याची झोप पार उडाली आहे. पोलिस व ड्रग माफिया साटेलोटे प्रकरणी अटाला याची प्रेयसी लकी फार्महाऊस हिने यापूर्वीच एका नेत्याच्या पुत्राचा या प्रकरणी सहभाग असल्याचा गौप्यस्फोट केला होता. इस्राईलच्या "मारीव' नामक एका अग्रेसर दैनिकांत दिलेल्या मुलाखतीत तिने थेट "त्या' मंत्रीपुत्राचे नावच जाहीर केल्याने या प्रकरणावर पडदा टाकण्यासाठी आटोकाट प्रयत्न करीत असलेल्या पोलिसांना जबरदस्त हादरा बसला आहे.
इस्राईलच्या "मारीव' या दुसऱ्या क्रमांकाच्या अग्रगण्य "टॅब्लॉइड' दैनिकांत २४ मे २०१० रोजी लकी फार्महाऊस हिची खळबळजनक मुलाखत प्रसिद्ध झाली आहे. या दैनिकाचे शोध पत्रकार गाली गिनात यांनी तिची सविस्तर मुलाखतच प्रसिद्ध करून गोव्यातील इस्रायली ड्रग माफियांच्या व्यवहारांवर लखलखीत प्रकाश टाकला आहे. लकी फार्महाऊस ही इस्रायली ड्रग माफिया अटाला याची प्रेयसी आहे व तिनेच इंटरनेटवर "यूट्यूब'व्दारे या ड्रग प्रकरणाचा पर्दाफाश केला होता. अलीकडेच अटाला याची जामिनावर सुटका करण्यात आली होती. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने पोलिस चौकशीबाबत ओढलेले ताशेरे पाहता पोलिस जाणीवपूर्वक या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न करीत असल्याची येथील लोकांची भावना बनली आहे. मुळात पोलिसांचाच सहभाग असलेले हे प्रकरण स्वतंत्र चौकशी यंत्रणेकडे देण्याची गरज असतानाही याबाबत टाळाटाळ केली जात असल्याने संशयाला वाट मोकळी मिळाली होतीच; आता लकी फार्महाऊस हिने सदर मंत्रीपुत्राचे नावच उघड केल्याने या संशयाला अधिकच बळकटी मिळाली आहे.
लकी अमोरी फार्महाऊस हिने आपल्या या मुलाखतीत सांगितल्याप्रमाणे, सदर मत्रीपुत्र अटाला याच्या हणजूण येथील घरी वारंवार भेट देत होता. तिने प्रसिद्ध केलेल्या "यूट्यूबवर' अटाला याच्या हातात चिलीम देताना एक हात दिसतो व हा हात सदर मंत्रीपुत्राचा असल्याचा दावाही तिने केला आहे. दरम्यान, लकी फार्महाऊस हिने आपण याप्रकरणी जबानी द्यायला तयार असल्याचे सांगूनही पोलिस अजूनही तिच्यापर्यंत पोहोचले नाहीत. ती शुटींगसाठी मुंबईत आली असतानाही पोलिस तिची जबानी घेण्यासाठी गेले नसल्याने तिनेही आश्चर्य व्यक्त केले होते.
दरम्यान, पोलिस व ड्रग माफियांचे घनिष्ठ संबंध असल्याचेही लकी हिने या मुलाखतीत म्हटले आहे. सदर मंत्रीपुत्राचा या प्रकरणात सहभाग असल्यानेच पोलिस या प्रकरणाच्या तळाशी जात नसल्याचा आरोपही तिने केला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी पोलिस महासंचालक भीमसेन बस्सी यांना या प्रकरणावरून पत्रकारांनी छेडले असता, लकी फार्महाऊस हिची जबानी नोंदवण्यासाठी स्वीडनला पोलिस पथक पाठवले जाईल, असे त्यांनी घोषित केले होते. दरम्यान, पोलिस व ड्रग माफिया साटेलोटे प्रकरणाची चौकशी "सीबीआय' मार्फत करावी, अशी मागणी माजी पर्यटनमंत्री मिकी पाशेको यांनी केली होती. या मागणीमुळेच आपल्याला नादिया तोरादो मृत्यू प्रकरणी गोवण्याचे प्रयत्न सुरू असल्याची तक्रारही त्यांनी केली होती. लकी फार्महाऊस हिने उघड केलेल्या मंत्रीपुत्राचा सहभाग खरोखरच ड्रग प्रकरणात असेल तर मिकी पाशेको यांच्या मागणीबाबत फेरविचार करण्याची वेळ ओढवण्याचीही शक्यता निर्माण झाल्याने या प्रकरणावरून राज्यात येत्या काही दिवसांत राजकीय भूकंप होण्याचीच दाट शक्यता निर्माण झाली आहे.
सगळेच चिडिचूप ?
दरम्यान, लकी फार्महाऊस हिच्या खळबळजनक मुलाखतीबाबत प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा काही पत्रकारांनी प्रयत्न केला असता एकाही अधिकाऱ्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. गृहमंत्री रवी नाईक यांच्याशीही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण तो देखील वाया गेल्याचे कळते. पोलिस महासंचालक भीमसेन बस्सी, पोलिस उपमहानिरीक्षक रवींद्र यादव यांनी तर मोबाईल उचलण्याचेच टाळले. या प्रकरणाच्या बाबतीत सगळ्यांची दातखिळी एकदम बसल्याने लकी फार्महाऊस हिने मुलाखतीतून केलेल्या गौप्यस्फोटाला एका अर्थाने बळकटीच मिळाली असल्याचे बोलले जाते आहे.

पणजीत नेहमीच उडतो वाहतुकीचा फज्जा!

पणजी, दि. ६ (प्रतिनिधी): गोव्याची राजधानी असलेले पणजी शहर हे विविध समस्यांचे आगार बनत चालले असून वाहतुकीच्या समस्येने तर पणजीकरांना जेरीस आणले आहे. येथील वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस जटिल बनत चालली असून वाहतूक कोंडी होण्याचे प्रकार विलक्षण वाढले आहेत. आज दिवसभरात येथे ठिकठिकाणची वाहतूक ठप्प झाल्याने वाहन चालकांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.
रस्त्यालगत जमेल तशी उभी (पार्क) करून ठेवण्यात येणारी वाहने हेच या मागचे प्रमुख कारण असून ही परिस्थिती वाहतूक पोलिसांच्या हाताबाहेर गेल्याने राजधानीत वाहतुकीचा बोजवारा आता नित्याचाच झाला आहे.
पणजी शहरातील या वाहतुकीच्या समस्येबाबत महापालिकेकडून कोणतीही उपाययोजना आखली जात नसल्याने राजधानीत सध्या वाहतुकीचा अभूतपूर्व गोंधळ माजला आहे. महापालिका व वाहतूक पोलिस यांच्यात अजिबात समन्वय नसल्यामुळे ठिकठिकाणी वाहतुकीची कोंडी निर्माण होऊन वाहन चालकांना तासनतास ताटकळत उभे राहावे लागल्याचे दृश्य आता रोजचेच झाले आहे. आज १८ जून रस्ता, पणजी पोलिस स्थानकासमोर, दयानंद बांदोडकर मार्ग आदी विविध ठिकाणी सकाळपासूनच वाहतुकीची कोंडी निर्माण झाल्याने बराच गोंधळ उडाला. रस्त्यालगत पार्किंगसाठी जागा निश्चित केली गेलेली असली तरी अनेक वाहन चालक अतिशय बेशिस्तपणे आपली वाहने पार्क करून ठेवत असल्यामुळे ही कोंडी झाल्याचे दिसून आले. एखादे वाहन वाकडे उभे करून ठेवल्यानंतर दोन वाहनांची जागा त्या एकाच वाहनामुळे अडून राहते व त्यामुळे पार्किंगचाही बोजवारा उडतो, ही बाब यावेळी प्रकर्षाने जाणवली.
काही दिवसांपूर्वी महापालिकेकडून रस्त्यालगतची गटारे साफ करण्यात आली व त्यावर लाद्याही टाकण्यात आल्या. मात्र येथील मूळ रस्त्याची उंची गटारावरील लाद्यांपेक्षा जास्त असल्याने दुचाकी वाहने पार्क करणे हे मोठे कठीण काम बनते. अशावेळी अनेक ठिकाणी दुचाकी वाहने रस्त्यावरच पार्क करून ठेवली जातात. नवा पाटो पुल ते पणजी बाजार इथपर्यंतचा रस्ता हा अलीकडच्या काळात नेहमीच गजबजलेला असतो व त्यामुळे पणजी बसस्थानकावरून बाजारात पोहोचेपर्यंत किमान पंधरा ते वीस मिनिटे लागतात.
येथील जुन्ता हाऊससमोरही वाहतुकीची कोंडी नित्याचीच झाली आहे. जुन्ता हाऊससमोर सरकारी वाहनांसाठी पार्किंगची सोय आहे; पण ही वाहने काही कामानिमित्ताने बाहेर गेली असता खाजगी वाहन चालकांना ही जागा पार्किंगसाठी उपलब्ध होते. काही काळानंतर सरकारी वाहने तिथे आल्यानंतर प्रत्यक्ष पार्क करण्याची जागाच उरत नसल्याने ही वाहने भर रस्त्यावरच उभी करून ठेवण्याची वेळ त्यांच्यावर ओढवते. मात्र, पणजीकरांची विलक्षण कोंडी करणाऱ्या या समस्येवर उपाययोजना आखण्यासाठी महापालिकेकडून कोणताच पुढाकार घेतला जात नसल्याने येथील नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

मला न्याय हवा...

मृत प्रकाश गाडगीळ यांच्या पत्नीची मागणी
वाळपई पोलिसांच्या इच्छाशक्तीवरच प्रश्नचिन्ह

पणजी, दि. ६ (प्रतिनिधी): नादिया आत्महत्या प्रकरणाचा पर्दाफाश करण्याच्या इराद्याने जंगजंग पछाडणारे गोवा पोलिस वाळपई येथील प्रकाश गाडगीळ यांचे आत्महत्या प्रकरण मात्र दडपण्याचा प्रयत्न करीत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. "त्या तरुणीला शिक्षा करून मला न्याय मिळवून द्या', अशी मागणी मृत प्रकाश गाडगीळ यांच्या पत्नीने केली आहे.
आत्महत्या केलेल्या आपल्या पतीने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत एका तरुणीच्या नावाचा उल्लेख करून तिनेच आपल्याला जीवन संपवण्यास प्रवृत्त केल्याचे म्हटले आहे. मात्र, पोलिसांनी याप्रकरणी गुन्ह्याची नोंद करून पुढे कोणतीच कारवाई करण्याचे औचित्य दाखवले नाही, असा आरोप प्रकाश गाडगीळ यांच्या पत्नीने केला आहे. याविषयी वाळपई पोलिस स्थानकाचे निरीक्षक शिवराम वायंगणकर यांच्याशी विचारणा केली असता, मृत्यूपूर्वी प्रकाश गाडगीळ यांनी लिहिलेल्या त्या पत्रातील हस्ताक्षराची चाचणी केली जाणार असून त्यासाठी त्यांच्या मराठी लिखाणाचे नमुने मागितले आहे, असे सांगितले.
या प्रकरणात एक राजकीय व्यक्ती त्या संशयित तरुणीला संरक्षण देत असल्याचीही माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. ती तरुणी अनेक महिन्यांपासून प्रकाश गाडगीळ यांना धमकावत होती. तसेच त्यांच्याकडे गाडी घेण्यासाठी वारंवार मोठ्या रकमेची मागणीही करत होती. मृत्यूच्या काही महिन्यांपूर्वी तिने प्रकाश गाडगीळ यांच्याकडून १ लाख ५० हजार रुपये उकळले होते. हे पैसे त्या तरुणीच्या बॅंक खात्यावरही जमा झाले आहेत, अशी माहिती मिळाली आहे. मात्र हे पैसे तिने प्रकाश यांच्याकडून का घेतले होते, याचे कोणतेही स्पष्टीकरण पोलिसांकडे नाही. त्यामुळे वाळपई पोलिसांच्या एकूण इच्छाशक्तीवरच भले मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दरम्यान, त्या तरुणींशी येथील काही स्थानिकांचेही संगनमत असून त्या सर्वांनी मिळूनच आपल्या पतीला संपवण्याचा कट रचला होता, असा आरोप गाडगीळ यांच्या पत्नीने केला आहे. ही तरुणी "ब्लॅकमेल' करून आपल्या पतीकडून पैसे उकळत होती. विनयभंग केल्याप्रकरणी पोलिस तक्रार दाखल करणार, अशी गाडगीळ यांना धमकी देऊन त्यांच्याकडे दर महिन्याला हजारो रुपयांची मागणी ती तरुणी करीत असल्याचीही माहिती मिळाली आहे. याची सर्व माहिती वाळपई पोलिसांना असूनही पोलिस मूग गिळून गप्प बसले आहेत, असा सवाल प्रकाश गाडगीळ यांच्या पत्नीने केला आहे.
ती तरुणी कशा पद्धतीने आपल्याला "ब्लॅकमेल' करीत होती, याची संपूर्ण माहिती आपल्या पतीने मृत्युपूर्व पत्रात दिली आहे, त्याचप्रमाणे आपल्या मृत्यूला त्या तरुणीलाच जबाबदार धरावे, असेही त्यांनी त्यात म्हटले आहे, असेही त्यांनी सांगितले.

आज मिकींचा फैसला!

जामीन अर्जावरील युक्तिवाद पूर्ण
नादियाच्या घरी त्या दिवशी मिकीला आणखी कोणाची साथ होती : अभियोगपक्ष

मडगाव, दि. ६ (प्रतिनिधी): नादिया तोरादो मृत्युप्रकरणी मुख्य संशयित असलेले माजी मंत्री मिकी पाशेको यांच्यावतीने सादर केलेल्या जामीन अर्जावरील युक्तिवाद आज येथील अतिरिक्त सत्र व जिल्हा न्यायालयात पूर्ण झाले. उद्या सकाळी १० वा. याप्रकरणी निवाडा देण्याचा संकेत न्या. प्रमोद कामत यांनी त्यानंतर दिला. त्यामुळे माजी मंत्र्यांना आणखी एका दिवसाची न्यायालयीन कोठडी मिळाली आहे.
आत्तापर्यंत पुढे आलेल्या माहितीवरून आरोपीविरुद्ध प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध झालेले असून त्यात त्यांच्यासोबत आणखी कोण कोण आहेत ते उघड करण्यासाठी त्यांची कोठडीतील चौकशी आवश्यक असल्याचे, आज सरकारच्या बाजूने युक्तिवाद करताना सरकारी वकील सरोजिनी सार्दिन यांनी प्रतिपादिले. आरोपीने कनिष्ठ न्यायालयापासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत अटक चुकविण्यासाठी केलेली धडपड वाया गेली व या सर्व न्यायालयांनाही त्यांची कोठडीतील चौकशी आवश्यक असल्याचे पटले हाच निष्कर्ष निघतो असे त्यांनी सांगितले. या प्रकरणाच्या गुणवत्तेचा प्रश्न प्रारंभिक टप्प्यात उपस्थित करण्याचे कारण नाही, गुणवत्ता काय आहे ते अंतिम टप्प्यात कळून येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. आरोपीवरील आरोपांत भरपूर प्रमाणात प्रथमदर्शनी तथ्य आहे व त्यासाठी कोठडीतील चौकशीसाठी त्यांचा जामीन अर्ज फेटाळला जावा, अशी विनंती त्यांनी केली. ती फेटाळली गेली नाही व अर्ज मंजूर केला तर तमाम न्यायालयीन निवाड्याचा तो पराभव ठरू शकतो याकडे त्यांनी लक्ष वेधले.
त्यांनी गुन्हा अन्वेषण विभागाने आरोपीस चौकशीसाठी पाचारण केले त्या वेळेचे उदाहरण दिले व तो निरपराध होता तर बेपत्ता का झाला; सर्व न्यायालयांत निराशा पदरी पडल्यानंतर शरण येणे ही गंभीर बाब आहे व त्या सर्वांमागे त्याचा हेतू शुद्ध नव्हता हे स्पष्ट होते असे सांगितले. तपास अधिकाऱ्यांकडे उपलब्ध असलेले पुरावे या टप्प्यात सादर करण्याची मुळीच गरज नाही, असे सांगून मिकींच्या व्हियोला या दुसऱ्या बायकोबाबतच्या जाहिरातीमुळे नादिया खचण्याचा प्रश्र्नच उद्भवत नाही. कारण सारा वेगळी राहायला गेल्यापासून ती त्यांच्या घरात राहत होती व तिला मुलेही झालेली असल्याने या तर्काला अर्थ राहत नाही, हे दाखवून दिले. मिकी व नादियामध्ये गहिरे संबंध होते, उभयता एकत्र देशविदेशांत फिरत होती हे वेळोवेळी दिसून आलेले आहे, असेही त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
ज्या दिवशी नादियाने रेटॉल घेतले त्याच्या आदल्या रात्री मिकी त्यांच्या घरी होते. त्यावेळी तेथे आणखी कोण कोण होते ते त्यांच्याकडूनच वदवून घ्यायला हवे. नंतर दुसऱ्या दिवशी अपोलो व्हिक्टर ते ज्युपिटर व नंतर चेन्नई हॉस्पितळापर्यंत ते सोबत होते, मुंबईत तिच्या घेतल्या गेलेल्या कथित मृत्युपूर्व जबानीवेळी त्या परिसरात ते होते, रेटॉलबाबत नादिया व तिच्या आईने दिलेल्या जबानीत मोठा फरक आहे, रेटॉलचा रिकामा ट्यूब कुठे गेला, नादियाच्या मृत्यूनंतर तिच्या पलंगावरील चादरी, उश्या व अन्य कपडे तात्काळ का नष्ट केले गेले, याचा संपूर्ण तपास आवश्यक असून त्यासाठी कोठडीतील चौकशी आवश्यक आहे, असे त्यांनी प्रतिपादिले. नादियाचा संपूर्ण शवचिकित्सा अहवाल उपलब्ध झालेला असून त्याने या संपूर्ण प्रकरणावर प्रकाशझोत पडत आहे. त्यानुसार तिच्या शरीरावरील जखमा या नंतर उमटलेल्या आहेत, यकृत निकामी होऊन मृत्यू आला तर अगोदरच्या माराच्या खुणा नंतर उमटतात असे त्यांनी सांगितले.
बिगर सरकारी संघटनांकडून तपास संस्थेकडे तक्रारी आलेल्या नाहीत म्हणून त्या तक्रारीनंतर खुनाचा गुन्हा नोंदविण्याचा प्रश्र्नच उद्भवत नसल्याचे त्यांनी सांगितले.
तत्पूर्वी, आपला कालचा युक्तिवाद पुढे सुरू करताना अर्जदाराचे वकील ऍड. सुरेंद्र देसाई यांनी अनेक निवाड्यांचे दाखले देत हे प्रकरण कसे जामिनासाठी योग्य आहे ते न्यायालयाला पटवून देण्याचा प्रयत्न केला. या अर्जावर निर्णय देताना उच्च वा सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्याचा प्रभाव येऊ देऊ नका अशी विनंती केली गेली. आपल्या अशिलाचा या एकंदर प्रकरणाशी कोणताच संबंध नाही असे सांगून हा निव्वळ आत्महत्येचा प्रकार असल्याचा त्यांनी पुनरुच्चार केला. चेन्नई येथे नादियाला मृत्यू आल्यानंतर तिचा मृतदेह गोव्यात आणून त्याचे दफन झाल्यावर तिच्या शरीरावर उमटलेल्या जखमांच्या खुणा या पंधरा दिवसांपूर्वीच्या जखमांच्या आहेत असे कोणत्या आधारावर सांगू शकतात असा सवाल त्यांनी केला. अपोलो व्हिक्टर व ज्युपिटर तसेच चेन्नई इस्पितळात दाखल करतेवेळी तिच्या शरीरावर नसलेल्या खुणा मृत्यूनंतर कशा उमटल्या, असा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. आपल्या अशिलाने आजवर तपासात सहकार्य केलेले आहे, मयताची आई, भाऊ व खुद्द पती तिने आत्महत्या केल्याचे सांगत आहेत व गुन्हा अन्वेषणाने तर त्यांची तब्बल नऊ तास चौकशी केलेली असताना आता आणखी चौकशी बाकी आहे अशी विचारणा करून त्यांना त्यांचा सुतरामही संबंध नसलेल्या प्रकरणात अडकावण्याचा हा डाव असल्याचे सांगितले व जामीनअर्ज मंजूर करण्याची विनंती केली.

किरकोळ वादातून वास्को येथे खून संशयित आरोपी फरारी

वास्को, दि. ६ (प्रतिनिधी): किरकोळ वादातून नंतर प्रकरण हमरीतुमरीवर येऊन त्यातून काटे बायणा, वास्को येथे राहणाऱ्या वीस वर्षीय अहमद शेख या युवकाने मेहबूबसाब मौलासाब कामटगी या ३२ वर्षीय विवाहिताचा खून केल्याची घटना आज दुपारी ३.४५ च्या सुमारास बायणा किनाऱ्यापाशी घडली. कूपनलिकेच्या हॅंडलने अहमद याने मेहबूबसाब याच्या डोक्यावर वार करून त्यास जागीच ठार केले.
मेहबूबसाब याच्या पश्चात पत्नी व सहा महिन्यांचे बालक असा परिवार आहे. आता त्यांचे पालनपोषण कोण करणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. रक्ताच्या थारोळ्यातील आपल्या पतीचा मृतदेह पाहून तिने हंबरडा फोडला. "आता आमचा त्राता कोण', असा काळजाला पिळ पाडणारा प्रश्न तिने केला तेव्हा तेथे उपस्थित असलेल्या सर्वांचेच डोळे भरून आले.
आज संध्याकाळी बायणा समुद्र किनाऱ्यापाशी घडलेल्या सदर खून प्रकरणातील संशयित आरोपी अहमदची पार्श्वभूमी गुन्हेगारीची असल्याचे उघड झाले असून तो फरारी आहे.
बायणा किनाऱ्यावर कमी प्रमाणात लोकांची वर्दळ असताना येथून जात असलेल्या मंगोरहील, वास्को येथील मेहबूबसाब व अहमद यांच्यात किरकोळ गोष्टीवरून वाद निर्माण झाला. त्यावेळी अहमद याने कूपनलिकेच्या हॅंडलचा वापर करून त्याच्या डोक्यावर मागून जबर वार केला. सदर वार एवढा जबर होता की मेहबूब जमिनीवर कोसळून तो जागीच ठार झाला. त्यानंतर अहमदने त्वरित घटनास्थळावरून पोबारा केला.
खुनाची माहिती वास्को पोलिसांना समजताच उपअधीक्षक महेश गावकर, निरीक्षक ब्राझ मिनेझीस, उपनिरीक्षक फिलोमीना कॉस्टा, उपनिरीक्षक वैभव नाईक व इतर पोलिस कर्मचाऱ्यांनी त्वरित घटनास्थळावर धाव घेऊन सदर प्रकरणाबाबत माहिती घेतली.
पोलिसांनी त्वरित अहमदचा शोध घेण्यास सुरुवात केली असून रात्री उशिरापर्यंत तो सापडला नसल्याचे पोलिसांनी सांगितले. खून घडण्याच्या काही वेळा पूर्वी येथे एक गट फुटबॉल खेळत होता व ते तेथून गेल्यानंतर काही क्षणांनी हा खून घडला. अन्यथा संशयित आरोपी पोलिसांच्या तावडीत सापडला असता.
उपअधीक्षक महेश गावकर यांनी मेहबूब व अहमद यांच्यात वाद निर्माण होऊन हा खून झाल्याचे सांगितले. अहमद यास
यापूर्वी पोलिसांनी विविध कारणांसाठी ताब्यात घेतले होते. तसेच त्याला ""अपना घरात'सुद्धा ठेवण्यात आले होते.
मयत मेहबूब याची पत्नी शबाना हिने आपल्या पतीची ओळख पटवली. या दांपत्याला सहा महिन्यांचा मुलगा आहे. मेहबूब हा पेंटर म्हणून काम करत होता व तो मंगोरहील येथे असलेल्या अंबाबाई मंदिरासमोर परिवारासह राहात होता.
वास्को पोलिसांनी खुनासाठी वापरण्यात आलेला कूपनलिकेचा हॅंडल जप्त केला आहे. मेहबूबच्या मृतदेहाचा पंचनामा करून तो चिकित्सेसाठी पाठवण्यात आला आहे. याप्रकरणी अहमदविरुद्ध ३०२ कलमाखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे. निरीक्षक ब्राझ मिनेझीस यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
------------------------------------------------------------------------
अहमद हा विविध व्यसनांच्या आहारी गेला होता. नशा केल्यानंतर लोकांशी तो विनाकारण वाद घालत असे. त्यामुळे अनेक लोक त्याच्या या कृत्यांनी हैराण झाले होते. सुमारे सात आठ दिवसांपूर्वी अहमदने मेहबूबशी वाद घातला होता अशी माहिती सूत्रांनी दिली. तेव्हा मेहबूबने त्यास धडा शिकवल्याने आज पुन्हा अहमदने वाद निर्माण करून हा खून केला असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

बालवाडीचे भाग्य कधी उजाडणार?

फोंडा तालुक्यात उसगाव गावात गुळेली आणि उसगाव (वडाकडे) यांच्यामध्ये नाणूस या वाड्यावर सरकारने साधारण १९८६ साली बालवाडी सुरू केली. त्यावेळी सरकारची आर्थिक परिस्थिती बेताचीच असली तरीही त्याच्या कारभाराला त्यावेळी माया व प्रेमाची किनार होती. त्या काळातील सरकारला हवी असायची ती माणसे, मते नव्हेत. म्हणून लोकांच्या मागणीनुसार तेव्हा ही बालवाडी सुरू झाली. त्यावेळी ती बालवाडी एका घरात भाड्याने एक खोली घेऊन चालवत असत. नंतर सरकारी सेंटर आणि बालवाडी एकेच ठिकाणी चालवायला घेतली.
साधारण दोन-चार वर्षापूर्वी सेंटर एकीकडे तर बालवाडी दुसरीकडे गेली आहे, एवढे खरे. इथे जी मुलांची खोली आहे, त्या ठिकाणी मार्च, एप्रिल, मे महिन्यांत अगदी राहवत नाही. बाई तरी बिचाऱ्या काय करणार? तसे पाहिले तर या नाणूस वाड्यावर सगळे काही आहेही आणि काहीही नाही, अशीच परिस्थिती आहे. कारण जेथे सेंटर आहे तिकडे घाण, केरकचरा साचलेला असतो. पावसाळ्यात तर तिथे डबकीच साचतात. कदाचित आरोग्य खात्याला आणि सरकारला हे माहीतही नसावे. नाही तर त्यांनी या परिस्थितीत थोडी तरी सुधारणा केली असती. आयुर्वेदात आपल्याला सांगितले आहे की, आपण जेवढी स्वच्छता राखाल तेवढेच रोग आपल्यापासून दूर जातील.
दोन वर्षांपूर्वी या बालवाडीची नवी इमारत उभी राहिली खरी, मात्र या बालवाडीला अद्याप मूर्त स्वरूप आलेले नाही. बालवाडीत साधारण ३० ते ३५ मुले असणार. एका सज्जन माणसाने बालवाडीकरिता जागा देऊन सुसज्ज अशी इमारत बांधली, रंगरंगोटी केली. संडासाचे बांधकाम करून विजेचीही सोय केली. मात्र हे सर्व असूनही ही इमारत बिचारी उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. तिला अद्याप कोणीही वाली भेटलेला नाही. सरकार याकडे कधी डोळे उघडून पाहणार आहे काय? सुसज्ज असलेल्या या इमारतीला दोन वर्षे उलटून गेली तरी तिचे उद्घाटन का नाही होत? यासंदर्भात आणखी एक महत्त्वाचा प्रश्न मनात येतो आहे. उसगाव हा गाव दोन मंत्र्यांच्या मतदारसंघांच्या मधोमध येतो. एका बाजूने गृहमंत्री तर दुसऱ्या बाजूने आरोग्यमंत्री. या दोघांमध्ये एकमत होत नसल्याने तर हे उद्घाटन अडले नसेल ना? या दोन मंत्र्यांच्या मध्ये बिचारे बालवाडीचे विद्यार्थी तर पडले नसतील ना? "उसा'ने भरलेला गाव आहे म्हणून तरी एक वेळ नजर टाका. १९८६ ते २०१०, म्हणजेच आजपर्यंत २४ वर्षे झाली. तरीही अजून येथील बालवाडी भाड्याच्याच घरात भरते आहे. आणि हे सरकार दररोज शंख करतेच आहे की, आजचे विद्यार्थी हे भारताचे उद्याचे आधारस्तंभ आहेत!
तेव्हा आता एवढेच सांगावयाचे आहे की, सरकारने लवकरात लवकर या बालवाडीच्या नव्या इमारतीचे उद्घाटन करून वाड्यावरील लोकांचा दुवा घ्यावा.
- सौ. सुरेखा देसाई
उसगाव - फोंडा-गोवा.
नाणूसवाडा.

Tuesday, 6 July 2010

देशभरात अभूतपूर्व 'बंद'

शंभर टक्के 'बंद'ने गोवाही ठप्प
पणजी, दि. ५ (प्रतिनिधी): केंद्रातील संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) सरकारच्या इंधन दरवाढीविरोधात भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील "एनडीए'च्या घटकांनी घोेषित केलेल्या आजच्या बंदला देशातील कानाकोपऱ्यांबरोबरच गोव्यातही अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. गोव्याच्या आजवरच्या इतिहासातील सर्वांत यशस्वी बंद म्हणून आजच्या या बंदचा उल्लेख करावा लागेल. पूर्णपणे शंभर टक्के यशस्वी ठरलेल्या या बंदच्या वेळी सोमवारी राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालये, बाजार, शहरे, व्यापारी आस्थापने, खाजगी आस्थापने इतकेच नव्हे तर बॅंका, पेट्रोलपंप, खाजगी प्रवासी बसवाहतूक, उपाहारगृहे, रिक्षा, टॅक्सी, मोटारसायकल पायलट, मासळी मार्केट, भाजी मार्केट असे सर्वच व्यवहार कडकडीत बंद ठेवण्यात आले होते. विशेष म्हणजे आजच्या बंदात नागरिक, विद्यार्थी, नोकरदार, व्यापारी, छोटे व्यापारी, व्यावसायिक असे सगळेच उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. त्यामुळे राज्यभरातील संपूर्ण व्यवहार आज कधी नव्हे इतके ठप्प झाले. राज्याच्या दैनंदिन जीवनावर त्याचा चांगलाच परिणाम दिसून आला.
बंदच्या काळात कोणतीही मोठी अनुचित घटना घडल्याची नोंद नसली तरी काही ठिकाणी बसगाड्यांवर दगडफेक होण्याचे तसेच रास्ता रोको करण्याचे एक दोन तुरळक प्रकार घडले आहेत. बंदच्या काळात संपूर्ण राज्यभरात एकूण दहा व्यक्तींना अटक झाल्याचीही नोंद आहे. या बंदमध्ये भाजपबरोबर शिवसेना, डावे पक्ष, कामगार संघटना तसेच रापणकार संघटना आदी सहभागी झाले होते.
आजचा दिवस उजाडला तोच बंदचा ताण घेऊनच. बंदमध्ये सहभागी होण्याचा नागरिकांनी आधीच निर्णय घेतला होता त्यामुळे अनेकांनी घरातच राहणे पसंत केले. इंधन दरवाढीचा फटका सामान्यांना अधिक बसला असल्याने त्यांनी बंदचे स्वागतच केले होते. त्यातच खाजगी बसमालकांनी तिकीट दरवाढीच्या मागणीसंदर्भात जाहीर केलेला बंद आणि एनडीए घटकांनी घोषित केलेला हा बंद असा हा योगायोग त्यामुळे चांगलाच जुळून आला. खाजगी बसमालकांनी आज संपावर जाऊ नये यासाठी वाहतूक खात्याने बसमालकांची २० पैसे प्रती किलोमीटर दर वाढीची मागणी १० पैशांवर आणून हा विषय मोकळा करण्याचा प्रयत्नही केला होता. तथापि बसमालक मात्र २० पैशांच्या मागणीवर ठाम राहिले. बस मालकांनी आजच्या बंदमध्ये सहभागी होऊ नये यासाठी एस्मा कायदा लावण्याबरोबरच काही बसमालकांचे हंगामी परवाने रद्द करण्याची धमकीही सरकारकडून देण्यात आली होती परंतु ही मंडळी बधली नाही. या उलट परवाने रद्द करून दाखवाच असे उलट खणखणीत आव्हान त्यांनी सरकारला दिले. परिणामी खाजगी बसमालकांनी आपल्या गाड्या रस्त्यावर आणल्या नाही तरी प्रवासी वाहतूक चालू राहावी या उद्देशाने कदंब महामंडळाने जवळपास ७० अतिरिक्त बसगाड्या रस्त्यावर उतरवण्याची तयारी ठेवली होती. वाहतूक खात्याने तशी जोरदार तयारीही केली होती. परंतु राज्यात शेकडो खाजगी बसगाड्या रस्त्यावर उतरल्याच नसल्याने आधीच निर्णय घेऊन टाकलेल्या नोकरदारांनी, शाळकरी तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी व विविध कामांसाठी शहरांकडे येणाऱ्यांनी चक्क सुट्टीच घेतली. अनेकांनी इंधन दरवाढीच्या निषेधार्थ बंदला पाठिंबा देण्याच्या उद्देशाने आदीच सुट्टी घेऊन टाकली होती. याचा परिणाम म्हणून बंदचे परिणाम भल्या सकाळीच दिसू लागले.
पणजी, म्हापसा, मडगाव, वास्को, फोंडा, डिचोली, कुडचडे, काणकोण, कुंकळ्ळी, पेडणे, वाळपई असा अनेक ठिकाणी बसस्थानके सकाळीच ओस पडली. विविध मार्गांवर सुटण्यासाठी उभ्या असलेल्या अवघ्याच कदंब बसगाड्या परंतु त्या भरण्यास प्रवासीच नाही. बसस्थानकांवर पोलिसांचा, आरटीओंचा फौजफाटा परंतु प्रवाशांचा पत्ताच नाही अशा अवस्थेमुळे बंद मोडून काढण्यासाठी हत्यारे परजून असलेल्या पोलिस यंत्रणेला केवळ हात चोळत बसण्यापलीकडे काहीच उद्योग राहिला नाही. विविध मार्गांवरील कदंबच्या गाड्या पोलिस संरक्षणात पाठवण्याची तयारी करण्यात आली होती परंतु बसमध्ये प्रवाशांऐवजी पोलिसच अधिक अशी स्थिती अनेक ठिकाणी पाहायला मिळाली. आजच्या बंदला सकाळी सकाळी मिळालेले हे अशा प्रकारचे यश होते.
पणजीसहित काही शहरांमध्ये अत्यल्प विद्यार्थ्यांच्या उपस्थितीतीत शाळा सुरू झाल्या खऱ्या परंतु शहरातील शंभर टक्के बंदच्या पार्श्वभूमीवर त्या अधिक वेळ चालू ठेवणे शाळा चालकांना शक्य झाले नाही. साडे नऊ होईपर्यंत यातील सगळ्याच शाळांना सुट्टी देण्यात आली. पणजी शहरातील सगळ्याच शाळा सकाळी सोडण्यात आल्या. बंदचा परिणाम शहरात त्यामुळे अधिक जाणवला. इतर शहरांमध्येही तीच परिस्थिती होती. व्यापारी आस्थापने, मासळी मार्केट, विविध कार्यालये, दुकाने उघडली गेलीच नाही. व्यापाऱ्यांनी तर स्वतः होऊनच या बंदला पाठिंबा दिला होता. भाजी, मासळी तसेच इतर मार्केटात अगदी शुकशुकाट होता. पणजी मार्केटात व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्त बंद पाळला होता. सगळ्याच घटकांचा त्यात समावेश होता. पणजी शहरातील एकूणएक दुकाने आणि आस्थापने व्यापाऱ्यांनी स्वतः होऊन बंद ठेवली होती. शहरात भाजपचे काही कार्यकर्ते परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी फिरताना दिसत होते. खुद्द विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर सुध्दा आपल्या मतदारसंघात कार्यकर्त्यांशी घोळक्यात चर्चा करताना दिसत होते. शंभर टक्के बंदबद्दल त्यांनी सर्वांनाच धन्यवाद दिले. केवळ पणजीतच नव्हे तर सांतिनेज, ताळगाव, सांताक्रूझ अशा उपभागांमधील बाजार आणि दुकाने उत्स्फूर्तपणे बंद ठेवण्यात आली होती. असा बंद यापूर्वी पणजी व गोवेकरांनी कधीही पाहिला किंवा अनुभवला नव्हता अशी चर्चा दरम्यानच्या काळात नागरिकांमध्ये ऐकायला मिळाली.
विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर हे आपल्या समर्थकांसह परिस्थितीवर नजर ठेवून होते. पर्रीकर यांच्या नेतृत्वाखाली भाजप कार्यकर्त्यांनी नव्या पाटो पुलानजीक रस्ता अडवला व महागाईविरोधात जोरजोरांनी घोषणा दिल्या. काही वेळात पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर हा रस्ता खुला करण्यात आला. विशेष म्हणजे मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या मडगाव मतदारसंघात बंदला जबरदस्त पाठिंबा मिळाला. मडगाववासीयांनी या बंदात सहभागी होऊन महागाईबद्दलची आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केली. वाळपईतील लोकांनीही या बंदात पूर्ण सहकार्य केले व महागाईसमोर कुणीही "बाबा' श्रेष्ठ नसल्याचेच अप्रत्यक्षरीत्या दाखवून दिले. दुपारी वाळपईचे पोलिस निरीक्षक पोलिस फौजफाट्यासह जबरदस्तीने काही व्यापाऱ्यांना दुकाने खोलण्याचे आवाहन करताना दिसत होते. येथील व्यापाऱ्यांनी मात्र हा डाव हाणून पाडला व कोणत्याही परिस्थितीत दुकाने न उघडण्याची भूमिका घेतल्याने पोलिसांची नाचक्कीच झाली. या भागातील एका राजकीय नेत्याच्या आदेशावरूनच पोलिसांनी हा प्रयत्न केला होता, अशीही खबर मिळाली आहे. खुद्द गृहमंत्री रवी नाईक यांच्या फोंडा मतदारसंघातही बंदाला चांगला प्रतिसाद मिळाला.

'युपीए' सरकारला जबरदस्त हादरा

नवी दिल्ली, दि. ५ : सामान्य माणसाचे कंबरडे मोडणारी इंधन दरवाढ करणाऱ्या युपीए सरकारच्या जनविरोधी धोरणांच्या निषेधार्थ आज भारतीय जनता पक्ष, शिवसेना, मनसे, समाजवादी पक्ष आणि डावे पक्ष यांनी संयुक्तपणे पुकारलेल्या देशव्यापी "बंद'ला केवळ भाजपची सत्ता असलेल्या राज्यांतच नव्हे तर संपूर्ण देशात अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. त्यामुळे पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या नेतृत्वाखालील "युपीए' सरकारला जबरदस्त हादरा बसला असून केंद्राने या जनतेच्या मनात खदखदत असलेल्या तीव्र संतापाची गंभीर दखल घेतली आहे.
या बंददरम्यान भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी, राजनाथ सिंग, अरुण जेटली, गोपीनाथ मुंडे, मुख्तार अब्बास नक्वी, जनता दल युनायटेडचे प्रमुख शरद यादव, मार्क्सवादी नेत्या सौ. वृंदा कारत, तेलगू देसमचे सर्वेसर्वा एन. चंद्राबाबू नायडू, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते ए. बी. वर्धन, उत्तर प्रदेशातील विरोधी पक्षनेते शिवपालसिंग यादव, अखिलेश यादव, रविशंकर प्रसाद, किरीट सोमय्या आदी नेत्यांना अटक करण्यात आली. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून विविध राज्यांमध्ये बंदच्या हजारो समर्थकांना ताब्यात घेण्यात आले. "या "बंद'ला सामान्य जनतेने दिलेला पाठिंबा कल्पनेच्याही पलीकडील होता', अशी प्रतिक्रिया भाजपचे राज्यसभेतील विरोधी पक्षनेते अरुण जेटली यांनी व्यक्त केली.
गुजरात, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, छत्तीसगड, उत्तराखंड व कर्नाटक या भाजपची सत्ता असलेल्या राज्यांमध्ये बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बिहारमध्येही बंदला जोरदार पाठिंबा व्यक्त करण्यात आला. यातील विशेष बाब म्हणजे तेथे महिलांनी बंदसाठी घेतलेला पुढाकार नजरेत भरण्यासारखा होता. महाराष्ट्र, दिल्ली, आंध्र प्रदेश, राजस्थान, केरळ, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, ओरिसा, उत्तर प्रदेश, ईशान्येकडील राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतही बंदला तुफानी पाठिंबा मिळाला. युपीए सरकारने केलेल्या जाचक दरवाढीविरोधात लोकांनी दिलेला हा कौलच ठरला. त्यामुळे विविध राज्यांमधील बाजार, शैक्षणिक संस्था, औद्योगिक वसाहती, दुकाने, आस्थापने, बॅंकांचे व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले होते. ठिकठिकाणी रेल्वे रोखण्यात आल्या, तर लांब पल्ल्याच्या ६० गाड्या रद्द कराव्या लागल्याची माहिती रेल्वे मंत्रालयाच्या सूत्रांनी दिली. बिहारमध्ये भाजप, जनता दल युनायटेड व डाव्या पक्षाच्या नेत्यांनी जोरदार आंदोलन करून पाटणा परिसर दणाणून सोडला. उत्तर प्रदेशात तर समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी रक्तबंबाळ होईपर्यंत मारझोड केली. अर्थात, असे काही मोजके अपवाद वगळता एकूण बंद शांततेत पार पडला.
...तर सत्ता सोडा!
"महागाई रोखणे, पेट्रोलियम पदार्थांची दरवाढ मागे घेणे शक्य नसेल, तर सत्तेची खुर्ची सोडा,'अशा शब्दांत रालोआ आणि डाव्या आघाडीने आज अभूतपूर्व अशा भारत बंदनंतर पंतप्रधानांना सुनावले आहे.
जीवनावश्यक वस्तूंसह खाद्यान्नाच्या किंमतींमध्ये झालेल्या प्रचंड दरवाढीमुळे सर्वसामान्य जनतेची होरपळ होत असल्याच्या निषेधार्थ "भारत बंद' एकत्रितपणे पुकारून तो शंभर टक्के यशस्वी करून दाखविणाऱ्या रालोआ आणि डाव्या आघाडीने आज केंद्रातील कॉंग्रेसप्रणीत संपुआ सरकारला चांगलेच धारेवर धरले.
संयुक्त जनता दल, शिरोमणी अकाली दल आणि शिवसेना या आपल्या सहकारी पक्षांसमवेत भाजपाने रस्त्यांवर उतरून पेट्रोलियम पदार्थांच्या भरमसाठ दरवाढीचा तसेच गगनाला भिडलेल्या खाद्यान्न महागाईचा जोरदार निषेध केला. देशभरातील विविध भागांमधील विविध शहरात आंदोलनादरम्यान भाजपासह सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांना अटक करण्यात आली. डाव्या पक्षांच्या नेत्यांनी समाजवादी पार्टीच्या नेत्यांसमवेत सहकार्य ठेवून आंदोलन केले. या दोन्ही पक्षांच्या नेत्यांनाही पोलिसांनी अटक केली.
"आज पुकारलेल्या "भारत बंद'ला सर्व विरोधी पक्षांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. पक्षाच्या चौकटीपलीकडे जाऊन विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्यांनी हा बंद पाळला. त्यामुळे हा बंद शंभर टक्के यशस्वी ठरला. पेट्रोलियम दरवाढ आणि खाद्यान्न महागाईविरुद्धचे आमचे हे आंदोलन आम्ही संसदेमध्येही कायम ठेवू. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला २६ जुलैपासून प्रारंभ होत आहे. या अधिवेशनातही महागाई आणि पेट्रोलियम दरवाढीच्या मुद्यावरून आम्ही सरकारचा पिच्छा पुरवू,''असा इशारा रालोआचे संयोजक आणि संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष शरद यादव यांनी दिला.
"केंद्रातील संपुआ सरकारने देशवासीयांना बाजारातील ताकदींच्या तसेच मान्सूनच्या दयेवर सोडलेले आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतींवर सरकारचे नियंत्रण राहिलेले नाही, त्यावर बाजारातील शक्तींचे नियंत्रण आहे. आपले पंतप्रधान मात्र मान्सूनकडे डोळे लावून बसलेले आहेत. चांगला पाऊस होईल व त्यामुळे चांगले पीकपाणी येऊन खाद्यान्नाच्या किमती कमी होतील, या आशेवर पंतप्रधान आहेत. जनतेला मान्सूनच्या भरवशावर सोडणाऱ्या पंतप्रधानांना आम्ही एवढेच सांगू इच्छितो की, त्यांनी महागाई रोखावी, पेट्रोलियम दरवाढ मागे घ्यावी; आणि असे करणे त्यांना शक्य होणार नसेल, तर त्यांनी सत्तेची खुर्ची सोडावी,'अशा शब्दांत शरद यादव यांनी ठणकावले. ते पत्रकारांशी बोलत होते.
"विरोधकांनी आज पुकारलेला "भारत बंद' हा खरोखर ऐतिहासिक आहे. सरकारबाहेर असलेल्या सर्व विरोधी पक्षांनी एकत्रित येऊन एवढा मोठा बंद यशस्वी करून दाखविण्याची ही पहिलीच घटना आहे. लोकइच्छेस्तवच विरोधी पक्षांच्या एकीचे विराट दर्शन आज घडले,'असेही यादव म्हणाले.
"महागाईचा मुद्दा हा कोणत्याही एका राजकीय पक्षापुरता मर्यादित नाही. कारण देशातील ५० टक्के लोकसंख्या ही दारिद्र्यरेषेखालील असून त्यांची मिळकत दिवसाकाठी २० रुपयांपेक्षाही कमी आहे. महागाई आज १५ टक्क्यांवर पोहोचलेली आहे. त्यामुळे महागाई वाढवून सरकारने जनतेचा घात केलेला आहे. पेट्रोलियम दरवाढ करून संपुआ सरकारने जनतेवर घोर अन्याय केला आहे,'असा हल्ला भाजपाध्यक्ष नितीन गडकरी यांनी चढविला.
"महागाई एवढी भडकलेली असताना व जनक्षोभाचा एवढा स्फोट झालेला असताना पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग आणि संपुआच्या अध्यक्ष सोनिया गांधी हे दोघेही एवढे मौन बाळगून कसे, याचे आश्चर्य वाटते,'असा टोलाही गडकरी यांनी लगावला.
कॉंग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी यांच्यावर टीका करताना गडकरी म्हणाले," राहुल गांधी गरिबांच्या झोपडीत जाऊन रात्र काढली, त्यांच्यासोबत जेवण केले. अन्यथा त्यांना गरिबी दिसूच शकली नसती. गरिबी पाहणारे राहुल गांधी महागाईच्या मुद्यावर गप्प का?'
सरकारवर टीकेची झोड उठविताना भाकपाचे नेते डी. राजा म्हणाले,""आज पुकारण्यात आलेल्या भारत बंदची सरकारने गंभीरपणे नोंद घ्यावी आणि पेट्रोलियम पदार्थांची मागे दरवाढ घेण्याविषयी विचार करावा."

हा जनतेने कॉंग्रेसला हाणलेला सणसणीत ठोसा : प्रा. पार्सेकर

पणजी, दि. ५ (प्रतिनिधी): भाजप व बिगरकॉंग्रेस पक्षांनी पुकारलेल्या "देशव्यापी बंद'चा भाग म्हणून गोवा "बंद'च्या हाकेला राज्यातून मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद म्हणजे गोमंतकीय जनतेने कॉंग्रेसच्या तोंडावर लगावलेला सणसणीत ठोसाच आहे, अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी आज येथे व्यक्त केली. कॉंग्रेसची सत्ता असूनही राज्यातील जनतेने गोवा "बंद'ला दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता
कॉंग्रेसची "भैरवी' सुरू झाल्याचा टोला विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर हाणला. इंधनदरवाढ व महागाईविरोधात संपूर्ण देशातून उमटलेली ही तीव्र प्रतिक्रिया पाहता सदर दरवाढ मागे घेणे केंद्रातील "युपीए' सरकारला अपरिहार्य ठरले आहे, असेही यावेळी सांगण्यात आले.
आज येथे आयोजित पत्रपरिषदेत प्रा. पार्सेकर बोलत होते. यावेळी विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर, खासदार श्रीपाद नाईक, भाजप विधिमंडळ उपनेते ऍड. फ्रान्सिस डिसोझा, सरचिटणीस गोविंद पर्वतकर व ऍड. नरेंद्र सावईकर हजर होते.
प्रा. पार्सेकर म्हणाले की, गोवा बंदला भाजपसह, भारतीय कम्युनिस्टपक्ष, खाजगी बस मालक, रिक्षा, टेंपो चालक, गोंयच्या रापणकारांचो एकवट, कामगार संघटना, व्यापारी संघटना आदींनी स्वतःहून पाठिंबा दिला व त्यामुळेच हा बंद संपूर्णतः यशस्वी झाला. महागाईच्या विषयावर जनता किती त्रस्त आहे हेच यावरून उघड झाले. गोवा बंदला दिलेल्या पाठिंब्याबद्दल त्यांनी सर्वांचे कृतज्ञतापूर्वक आभार मानले. सार्वजनिक जिव्हाळ्याच्या प्रत्येक विषयावर भाजप पूर्णतः जनतेच्या पाठीशी ठामपणे उभा राहील, असे वचनही प्रा.पार्सेकर यांनी दिले. या बंदच्या यशाचे संपूर्ण श्रेय गोमंतकीय जनतेला जाते,असेही त्यांनी घोषित केले.
मुख्यमंत्र्यांचाच मतदारसंघ ठप्प
मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या मडगाव मतदारसंघात गोवाबंद पूर्णपणे यशस्वी ठरतो,यावरून जनता कॉंग्रेस सरकारच्या राजवटीला कशी विटली आहे हेच दिसून येते, असे खासदार श्रीपाद नाईक म्हणाले. मडगाव बाजारपेठ बंद ठेवून तेथील व्यापाऱ्यांनी महागाईचे गांभीर्य दाखवून दिले आहे. फोंड्यातही या बंदला चांगला प्रतिसाद लाभला.राजकीय दबावाला बळी पडून काही जणांनी इच्छा नसतानाही आपली आस्थापने खुली ठेवली; पण जनतेने घेतलेल्या सक्रिय सहभागामुळे त्यांचीही नाचक्की झाल्याचेही ते म्हणाले.
गोवा सरकारने "व्हॅट' कमी करावाः पर्रीकर
इंधनदरवाढ मागे घेण्याबाबत केंद्र सरकार काहीही करो; पण राज्य सरकारने तात्काळ "व्हॅट'मध्ये कपात करून गोव्यातील जनतेला दिलासा द्यावा, असे आवाहन विरोधी पक्षनेते पर्रीकर यांनी केले. पेट्रोलजन्य पदार्थांवर केंद्र व राज्य सरकार अमर्याद कर आकारीत असल्यानेच इंधनाचे दर गगनाला भिडलेले आहेत. ही कर आकारणी पाहता हा जनतेला लुटण्याचा प्रकार असल्याची खिल्लीही त्यांनी उडवली. वाहतूकमंत्री सुदिन ढवळीकर हे बंदच्या पूर्वसंध्येला मोटरसायकल व टॅक्सी चालकांना १.५ कोटी रुपयांचे साहाय्य वितरित करण्याची घोषणा करतात. मुळात गेले चार महिने सरकार पेट्रोल व डिझेलवर प्रतिलीटर १.५ रुपये अतिरिक्त कर आकारला जात आहे. गरीब व्यावसायिकांकडून छुप्या पद्धतीने कर आकारायचा व तोच पैसा आर्थिक साहाय्याच्या रूपात त्यांना द्यायचा हीच या सरकारची नीती असल्याची टीका पर्रीकर यांनी केली.

...तर खाजगी बस मालक १२ पासून बेमुदत संपावर

पणजी, दि. ५ (प्रतिनिधी): गेल्या तीन महिन्यांत केंद्र सरकारने दोनदा डिझेल दरवाढ केल्याने खाजगी बस मालकांनी जनतेचे हित लक्षात घेऊन प्रतिकिलोमीटर केवळ वीस पैशांची तिकीट दरवाढ मागितली होती, सरकार मात्र दहा पैशांवर अडून राहिले आहे. त्यातून निर्माण झालेला तिढा सुटला नाही तर येत्या १२ जुलैपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा अखिल गोवा खाजगी बस मालक संघटनेतर्फे देण्यात आला आहे.
आज संघटनेची येथील टी.बी.कुन्हा सभागृहात बैठक झाली. व्यासपीठावर संघटनेचे अध्यक्ष शिवदास कांबळी, सरचिटणीस सुदीप ताम्हणकर, शेख फर्याझ, प्रसाद परब, मॅन्युएल रॉड्रिगीस आदी उपस्थित होते. खाजगी बस मालक संघटनेकडून पुकारण्यात आलेल्या बंदला राज्यातील सर्व खाजगी बस मालकांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल संघटनेतर्फे त्यांचे अभार मानण्यात आले. वाहतूकमंत्री सुदिन ढवळीकर यांनी बंदमध्ये सहभागी झालेल्या बस मालकांवर कारवाई करण्याची घोषणा केली आहे. आपल्या न्याय्य हक्कासाठी संघटना ही कृती करीत आहे. आता वाहतूकमंत्र्यांकडून खाजगी बस मालकांच्या वाट्याला जाण्याचा प्रकार घडला तर तो हाणून पाडला जाईल,असा इशारा यावेळी देण्यात आला.
खाजगी बस व्यावसायिकांच्या वाट्याला गेलेल्या प्रत्येक मंत्र्याला घरी बसावे लागले आहे, याची जाणीव श्री.ढवळीकरांनी ठेवावी,असा सल्लाही यावेळी देण्यात आला. १२ जुलैपासूनच्या बेमुदत संपाची नोटीस आज सादर करण्यात आल्याची माहिती सुदीप ताम्हणकर यांनी दिली. या नोटिशीत सरकारला एकूण सोळा मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले असून या सर्वच्या सर्व मागण्या पूर्ण व्हायलाच हव्यात,असाही इशारा देण्यात आला. सरकारने एकतर्फी निर्णय न घेता संघटनेला चर्चेसाठी पाचारण करावे जेणेकरून संघटना आपले म्हणणे व्यवस्थितपणे मांडता येणे शक्य होईल, अशी माहितीही यावेळी देण्यात आली.
खाजगी बसमालक फायद्यात आहेत व त्यांना तिकीट दरवाढीची गरज नाही, असे भासवण्याचा प्रयत्न वाहतूकमंत्र्यांकडून होतो आहे. मुळातच कर्जांच्या डोंगरामुळे खंगलेल्या बस मालकांना जेव्हा बसगाडी दुरुस्तीसाठी नेण्याची वेळ येते तेव्हा कधी कधी घरातील दागिने गहाण ठेवावे लागतात. रोज पहाटे ते रात्री उशिरापर्यंत जिवाचे पाणी करून बसमालकांना हा व्यवसाय करावा लागतो. हा व्यवसाय थेट जनतेच्या सेवेशी निगडित आहे; पण सरकारकडून खाजगी बस व्यावसायिकांना कोणताही लाभ मिळत नाही. वाहतूक व रस्ता परिवहन अधिकारी या ना त्या कारणाने बस मालकांना लुटत असतात, अशी कडक टीका श्री.ताम्हणकर यांनी केली.
कदंब महामंडळाकडून होणारी सतावणूक थांबवणे, खाजगी बसगाड्यांवर जाहिरात करण्यास मुभा देणे, प्रत्येक महिन्याला बस संघटनेशी विचारविनिमय करण्यासाठी बैठक बोलावणे, डिझेलवर अनुदान देणे आदी विविध मागण्या संघटनेतर्फे देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.
जनतेला भिकेला लावणारे सरकारः प्रा. पर्वतकर
अखिल गोवा खाजगी बस मालक संघटनेच्या बैठकीला भाजपचे सरचिटणीस गोविंद पर्वतकर यांनी खास उपस्थिती लावली व बंद यशस्वी केल्याबद्दल त्यांचे आभार मानले. गोवा बंद यशस्वी होण्याचे श्रेय हे जनतेचे आहे. यापुढेही जनतेच्या विषयांवरून भाजप नेहमीच अग्रेसर असेल, असेही ते म्हणाले.विद्यमान कॉंग्रेस सरकारने जनतेला भिकेलाच लावले आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केला.लमाण्यांकडूनही हप्ते गोळा केले जातात व त्याचा वाटा थेट नेत्यांना पोहोचवला जातो यावरून या सरकारची लायकी काय, हे कळून येते. महागाईने उच्चांक गाठला असताना इंधनदरवाढ करून सरकारने जनतेला वेठीस धरल्याचा आरोपही त्यांनी केला.

महाराष्ट्रातही शंभर टक्के!

* मुंडे, मुनगंटीवार, सोमय्या यांना मुंबईत अटक
* ७ खासदार, २९ आमदारांसह हजारोंना अटक
* खडसे, फुंडकर, तावडे, जोशी, सुभाष देसाई, नांदगावकर, अबु आझमी यांना ठिकठिकाणी अटक
* दोनशेवर बसेसची तोडफोड
* शासकीय कार्यालयातील उपस्थिती १५ टक्क्यांवर
* विमानांची ९२ उड्डाणे रद्द

मुंबई, दि. ५ (प्रतिनिधी): पेट्रोल, डिझेलच्या किमतीतली वाढ आणि एकूणच महागाईच्या विरुद्ध भारतीय जनता पक्षाने पुकारलेल्या आणि शिवसेना, मनसे, समाजवादी पक्ष, रिडालोस यांच्यासह अन्य विविध राजकीय पक्षांनी पाठिंबा दिलेल्या बंदला मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. बंददरम्यान मुंबईत भाजपानेते गोपीनाथ मुंडे, प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार, राष्ट्रीय महामंत्री किरीट सोमय्या, स्मृती इराणी, गोपाळ शेट्टी यांच्यासह शेकडो लोकांना अटक करण्यात आली.
हा बंद चिरडण्यासाठी सरकारने प्रचंड बळाचा वापर करूनही मुंबईत लोकांनी घराबाहेर निघणे टाळले. अनुपस्थित राहिल्यास कारवाई करू या सरकारच्या धमकीलाही "प्रतिसाद' मिळू शकला नाही. परिणामी बंदच्या दिवशी केवळ पंधरा टक्के कर्मचारीच शासकीय कार्यालयात हजर राहू शकलेत. शाळा, महाविद्यालये, व्यापारी प्रतिष्ठाने शंभर टक्के बंद होती. मात्र, औषधांची दुकाने आणि दवाखाने यांना आजच्या बंदमधून वगळण्यात आले होते.
या बंददरम्यान राज्यभरात ७ खासदार, २९ आमदारांसह हजारो लोकांना अटक करण्यात आली. मुंबईत बेस्टच्या १५५, तर राज्यभरात एसटीच्या ५५ बसेसची तोडफोड करण्यात आली. एकूण ५१ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. किमान १७ हजार लोकांना बंदपूर्वी नोटीसेस बजावण्यात आल्या होत्या. दगडफेकीच्या एकूण ३९ घटना राज्यभरात घडल्यात.
महागाई आणि इंधन दरवाढीविरुद्ध पुकारण्यात आलेल्या या बंददरम्यान, अंधेरीत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार, लोकसभेतील उपनेते गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्त्वात भाजपा कार्यकर्त्यांनी रेल रोको आंदोलन करण्यासाठी रेल्वे स्थानकावर धडक दिली. मात्र, तेथे उपस्थित प्रचंड पोलिस ताफ्याने या नेत्यांसह तेथे आलेल्या शेकडो कार्यकर्त्यांना अटक केली. मुंबई शहर अध्यक्ष गोपाळ शेट्टी, महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा स्मृती इराणी, खा. पीयुष गोयल, राजेश शर्मा, अतुल भातखळकर यांचा यात प्रामुख्याने समावेश होता. नागपुरात पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीहल्ल्यात भाजपाचे प्रा. संजय भेंडे आणि अरविंद शहापूरकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते जबर जखमी झालेत.
राज्य विधानसभेतील विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांना पुण्यात, युवा नेते विनोद तावडे व खा. प्रतापदादा सोनावणे यांना नाशकात, किरीट सोमय्या यांना मुंबईत, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते पांडुरंग फुंडकर यांना औरंगाबाद येथे, आ. संजय केळकर व एकनाथ शिंदे यांना ठाण्यात, शिवसेना नेते मनोहर जोशी यांना दादरमध्ये, गोरेगाव येथे सुभाष देसाई, आ. संभाजीराव पवार, आ. सुरेश खाडे यांना मिरजेत, गोपाळ शेट्टी व योगेश सागर यांना बोरिवलीत, नागपुरात आमदार देवेंद्र फडणवीस यांना, मुंबई महानगर पालिकेतील भाजपाचे गटनेते ऍड्. आशीष शेलार यांना बांद्रा येथे, अतुल भातखळकर यांना कांदिवलीत, जयवंतीबेन मेहता यांना सी. पी. टॅंक दरम्यान, भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्षा मनीषाताई चौधरी यांना डहाणूजवळ तर समाजवादी पार्टीचे अबु आझमी यांना शिवाजी नगरात अटक करण्यात आली. नवी मुंबईत सुरेश हावरे यांच्या नेतृत्त्वात बंद शंभर टक्के यशस्वी ठरला. रावसाहेब दानवे, पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, प्रमोद जठार यांच्या नेतृत्त्वात मराठवाडा, कोकणात आंदोलन झाले. जळगावात प्रदेश भाजपा सारचिटणीस गिरीश महाजन यांच्या नेतृत्त्वात रेल रोको आंदोलन करण्यात आले. दादर येथे मनसेचे नितीन सरदेसाई यांना, तर भोईवाड्यात बाळा नांदगावकर यांना अटक करण्यात आली.
भाजपा तसेच शिवसेनेसह अन्य विरोधी पक्षांनी पुकारलेल्या या बंदचे परिणाम विमानसेवेपासून तर लोकलपर्यंत सर्वत्र झाले आहेत. विविध विमान वाहतूक कंपन्यांच्या विमानांची एकूण ९२ उड्डाणे सोमवारी रद्द झाल्याचे वृत्त आहे. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. मुंबईत लोकल रद्द झाल्या नसल्या तरी त्यातील गर्दी मोठ्या प्रमाणात ओसरली होती. सोमवारी सकाळी वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर रास्ता रोको करण्याचा प्रयत्न शिवसेनेने केला होता. शिवसैनिकांना पांगविण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केला. मुंबईत काही ठिकाणी समाजवादीच्या कार्यकर्त्यांनी कॉंग्रेस नेत्यांचे पुतळे जाळले. अनेक ठिकाणी तर रस्ते निर्मनुष्य होते.

Monday, 5 July 2010

आजच्या "बंद'साठी गोवा सज्ज

-महागाईविरोधी निषेध व्यक्त होणार
-खाजगी बसवाहतूकही बंद राहणार


पणजी, दि. ४ (प्रतिनिधी) - देशातील प्रमुख विरोधी पक्ष भारतीय जनता पक्ष आणि अन्य विरोधी पक्षांनी देशातील सामान्य जनतेवर कॉंग्रेस सरकारने लादलेल्या महागाईच्या विरोधात उद्या पुकारण्यात आलेला बंद यशस्वी करण्यासाठी कंबर कसली असून त्यासाठी सर्व पक्षांनी जय्यत तयारी केली आहे. दरम्यान, खासगी बसमालक संघटनेनेही प्रवासी दरवाढीच्या मागणीसाठी वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याने राज्य सरकारपुढे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.
अनेक पक्षांच्या कार्यकर्त्यांनी प्रमुख शहरांतील दुकानदारांच्या भेटी घेऊन दुकाने आणि आस्थापने बंद ठेवण्याचे आवाहन केले. तर, या महागाईच्या आगीत होरपळणाऱ्या सामान्य जनतेनेही उद्याच्या बंदला उत्स्फूर्त पाठिंबा देण्याची तयारी चालवली आहे. मात्र, हा बंद मोडून काढण्यासाठी केंद्र तसेच राज्य सरकारनेही तयारी चालवली आहे. बंद यशस्वी झाल्यास कॉंग्रेस सरकारची नाचक्की होणार असल्याने पोलिसी बळ वापरून कोणत्याही प्रकारे हा बंद यशस्वी होणार नाही, याची काळजी घेण्यासाठी आज काही वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली आहे. उद्याच्या बंदला खाजगी प्रवासी बस मालक संघटना, प्रवासी रिक्षा वाहतूक संघटना, तसेच अन्य वाहतूकदारांनी या बंदला पाठिंबा जाहीर केला आहे.
महागाईच्या विरोधात पुकारलेल्या उद्याच्या बंदला विद्यालय, महाविद्यालय, औद्योगिक आस्थापने तसेच व्यापाऱ्यांनी बंद पाळून या आंदोलनाला पाठिंबा देण्याचे आवाहन फार्तोड्याचे आमदार दामू नाईक, भाजप युमोचे अध्यक्ष रुपेश महात्मे व सांस्कृतिक विभागाचे आणि कुडतरी विभागाचे प्रमुख सिद्धनाथ बुयांव यांनी केले आहे. अन्य सामाजिक संस्थांच्या कार्यकर्त्यांनीही या बंदमधे सहभागी व्हावे, असेही त्यांनी म्हटले आहे. पेट्रोल व डिझेलच्या वाढीव दरामुळेच संपूर्ण देशात महागाई वाढली असून कॉंग्रेसच्या मदतीने काळ्याबाजाराला उधाण आले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. काही महिन्यांपूर्वी पेट्रोलचे दरवाढ सहन केलेल्या जनतेच्या माथ्यावर लगेचच दुसरी दरवाढ थोपल्याने सामान्य जनतेला आणखी चेपण्याचा प्रयत्न कॉंग्रेस आघाडी सरकार करीत आहे. या कॉंग्रेस सरकार जनतेची लूट चालवली असून देशाचे पंतप्रधान वाढत्या महागाईवर अंकुश ठेवण्यात अपयशी ठरल्याची टीका दामू नाईक यांनी केली आहे. या बंदच्या काळात १०८ रुग्ण वाहिका सेवा, तसेच अन्य इस्पितळाच्या रुग्ण वाहिकांना वगळण्यात आले आहे.
पेट्रोल वाढीच्या विरोधात मोठ्या प्रमाणात गोव्यातील तरुणांनी उद्या बंदच्यावेळी रस्त्यावर उतरून आपली शक्ती दाखवावी, असे आवाहन यावेळी भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष रुपेश महात्मे यांनी केले आहे. तसेच, सर्व गाडेधारकांनीही यावेळी बंद पाळावे, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच, सिद्धनाथ बुयांव यांनीही गोव्याच्या जनतेला बंदला पाठिंबा देऊन या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

राज्य सरकारची उपाययोजना

देशातील विरोधी पक्षांनी महागाईच्या विरोधात पुकारलेला बंद मोडून काढण्यासाठी राज्य सरकारने पुरी कंबर कसली आहे. गोव्यातही हा बंद पाळला जाणार असून यावेळी दोन्ही जिल्ह्यांतील पोलिस प्रमुखांना आणि जिल्हा अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. रस्त्यावर सुरू असणाऱ्या वाहनांना पूर्ण संरक्षण दिले जाणार असल्याचा दावा दक्षिण गोवा जिल्हाधिकारी जी .पी. नाईक यांनी केला आहे. आज रात्रीपासूनच सर्व महामार्गावर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला असून संवेदनशील ठिकाणी व बसस्थानकांवर उपन्यायदंडाधिकाऱ्यांना तैनात केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. ग्रामीण भागात जाणाऱ्या कदंबच्या बसेस काढून त्या शहरातील रस्त्यावर धावण्यासाठी सज्ज केलेल्या आहेत, अशी माहिती कदंब महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक व्हिनांसियो फुर्तादो यांनी दिली आहे.

कितीही आंदोलने केली, तरी इंधन दरवाढ कायम

प्रणव मुखर्जींची दर्पोक्ती
कोलकाता, दि. ४ - महागाई आणि इंधन दरवाढीच्या विरोधात रालोआसह सर्व विरोधी पक्षांनी उद्या "बंद' चे आवाहन केले असतानाच केंद्र सरकारने मात्र आपला हेका कायम ठेवीत ही दरवाढ मागे घेण्यास स्पष्ट नकार दिला आहे.
अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी आज पत्रकारांशी बोलताना सरकारची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, कोणी कितीही आंदोलन केले, तरी ही दरवाढ मागे घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. सरकारने सर्व विचार करून सामान्य जनतेवर कमीत-कमी भार पडावा आणि कंपन्यांनाही तोटा होऊ नये, इतकी दरवाढ केली. आता ती मागे घेणे शक्य नाही. कारण यामुळे कंपन्यांना झेलावा लागणारा तोटा वाढेल आणि त्यामुळे आणखी वेगळेच संकट उभे ठाकेल.
यावर मतभेदाला वाव राहू नये यासाठी मंत्रिगटाची स्थापना करण्यात आली होती. त्यांनीच सर्व बाबींचा विचार करून हा निर्णय घेतला असल्याचे मुखर्जी यांनी सांगितले.

सरकारला जनतेची नव्हे, तेल कंपन्यांचीच काळजी

गडकरी यांची घणाघाती टीका

मुंबई, दि. ४ - केंद्रातील संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारला सामान्य नागरिकांपेक्षा तेल कंपन्यांचीच अधिक काळजी असल्याचे दिसते. पेट्रोल-डिझेल आणि इतर पेट्रोलियम पदार्थांच्या किमतीत सरकारने केलेल्या जबरवाढीचा निषेध करण्यासाठी सोमवारी (५ जुलै) पुकारण्यात आलेल्या 'भारत बंद'मध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी येथे संपूर्ण देशातील 'आम' जनतेला केले.
राष्ट्रीय राजधानीत आयोजित एका पत्रपरिषदेत गडकरी यांनी पाच जुलैचा बंद यशस्वी होईलच, असा विश्चास व्यक्त करताना वाढत्या महागाईसाठी केंद्रातील संपुआ सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. यावेळी त्यांनी संपुआच्या अध्यक्ष सोनिया गांधी, खासदार राहुल गांधी यांच्यासह केंद्रातील मंत्र्यांना चांगलेच धारेवर धरले. सरकारचे प्राधान्य तेल कंपन्यांना आहे, की सामान्य जनतेला, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. कॉंग्रेसवर टीका करताना गडकरी म्हणाले, की केंद्रातील सरकारने शंभर दिवसांत महागाईवर नियंत्रण मिळविण्याची भाषा केली होती; मात्र महागाई दिवसेंदिवस वाढतच आहे. चलन वाढीचा दर १३ टक्के असताना पेट्रोलचे दर वाढविणे सर्वथा चुकीचे आहे, असेही ते म्हणाले. पेट्रोलच्या वाढलेल्या दराचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केलेल्या समर्थनासाठी त्यांच्यावर टीका करताना गडकरी म्हणाले, की देशात जवळपास ५० टक्के लोक दारिद्र्‌यरेषेखालील असताना अर्थतज्ज्ञ असलेल्या पंतप्रधानांना केवळ तेल कंपन्यांचीच विपन्नावस्था दिसते; मात्र गरीब जनतेचे हाल त्यांना दिसत नाहीत. गव्हाचे अतिरिक्त उत्पादन होत असतानाही देशातील गव्हाच्या किमती वाढत आहेत, असाही आरोप यावेळी गडकरींनी केला.

मिकी अद्याप अतिदक्षता विभागात

आज जामीन अर्जावर निवाडा

मडगाव, दि. ४ (प्रतिनिधी) : काल न्यायालयाला शरण आलेले लोटली येथील नादिया तोरादो मृत्यु प्रकरणातील मुख्य संशयित असलेले माजी पर्यटनमंत्री मिकी पाशेको हे काल सायंकाळपासून येथील हॉस्पिसियो इस्पितळातील अतिदक्षता विभागात असून हॅस्पिसियोचे वरिष्ठ डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर नजर ठेवून आहेत. उद्या दुपारी अडीच वाजता येथील जिल्हा व सत्र न्यायालयात त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे.
काल आपल्या वकिलांसह ते येथील जिल्हा व सत्र न्यायालयात शरण आले होते व न्यायालयाने त्यांची दोन दिवसांच्या रिमांडवर न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती.
पण काही वेळाने त्यांनी छातीत दुखत असल्याची तक्रार केल्याने त्यांना हॉस्पिसियो इस्पितळातील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले हेाते. हॉस्पिसियोतील सूत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, त्यांचा रक्तदाब वाढलेला असून आज सायंकाळी त्याचे प्रमाण १५०ः११० होते. त्यांच्या प्रकृतीला कोणताही धोका नसला तरी ते डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली आहेत.
पण अंतर्गत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मिकीचे कडवे प्रतिस्पर्धी असलेले रशियन तरुणी बलात्कार प्रकरणातील संशयित जॉन फर्नांडीस हेही सध्या न्यायालयीन कोठडी असून ते तिथे मिकींची प्रतीक्षा करीत आहेत व कोठडीत पाठविले तर त्याच्यासमवेत रहावे लागेल या आशंकेतूनच त्यांनी छातीत दुखत असल्याचा बहाणा केला असे मानले जात आहे. रशियन तरुणी बलात्कार प्रकरणात आपणास नाहक गुंतविण्यात आलेले आहे व त्यात मिकींचाच हात आहे असा दावा जॉन रोजच करीत आहे. आता उद्या दुपारपर्यंत मिकी यांची तब्येत सुधारून त्यांना थेट न्यायालयात नेले जाईल अशी अपेक्षा आहे.
उद्या मिकींचा जामीन अर्ज फेटाळून तो आपल्या ताब्यात मिळेल असा विश्र्वास गुन्हा अन्वेषण विभाग बाळगून आहे व तसे झाले तर त्याला ताब्यात घेण्याची सारी सिध्दता पोलिस निरीक्षक सुनिता सावंत व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे. गुन्हा अन्वेषण विभाग आपला पिच्छा पुरवेल या भितीपोटीच माजी मंत्र्यांनी अटकपूर्व जामिनासाठी थेट सर्वोच्च न्यायालयापर्यर्ंंत धाव घेतली होती पण प्रत्येक ठिकाणी नकार मिळाल्यानंतर सर्व वाटा बंद झाल्याचे पाहून ते गुन्हा अन्वेषण विभागाला नव्हे तर न्यायालयाला शरण गेले व त्यामुळेच त्यांना सुरवातीचे दोन दिवस तरी न्यायालयीन कोठडी मिळाली .
उद्या दुपारी अडीच वाजता अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश प्रमोद कामत यांच्यासमोर त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होईल. ज्येष्ठ वकील सुरेंद्र देसाई मिकींच्या वतीने बाजू मांडतील. कालच्या प्रमाणे उद्याही न्यायालयाच्या आवारात मिकी समर्थकांची गर्दी अपेक्षित असून त्या दृष्टीने पोलिस बंदोबस्त वाढविला जाईल.

माही विवाहबद्ध

देहरादून, दि. ४ - अनेक तरुणींच्या दिल की धडकन असलेला माही अखेर विवाह बंधनात अडकला. टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी (माही) याचा आज बालमैत्रीण साक्षी रावत हिच्याशी देहरादून जवळच्या विश्रांती रिसॉर्टमध्ये विवाह पार पडला . क्रिकेटपटू रैना आणि नेहरा यांच्या नृत्याने या विवाह सोहळ्यात आणखी रंगत आणली. विवाह संपन्न झाल्याचे वृत्त येताच देहरादून आणि रांचीत धोनीच्या चाहत्यांनी मिठाई वाटून आणि फटाके फोडून आनंद व्यक्त केला.
याआधी आज (रविवारी) सकाळीच साक्षीच्या आजोबांच्या घरी हळद लावण्याचा आणि मेंदीचा कार्यक्रम झाला. धोनीचे अनेक नातेवाईक विमानाने विवाह सोहळ्यासाठी देहरादूनमध्ये दाखल झाले होते. सोहळ्याविषयी गुप्तता पाळण्यात येत असूनही विवाह रविवारी रात्री आठ दहा दरम्यान संपन्न होईल हे उघड झाले होते.

कोण आहे साक्षी रावत
माहीचे वडील आणि साक्षी सिंग रावतचे वडील मेकॉनमध्ये नोकरी करत होते . त्यामुळे एकमेकांच्या घरी येण्या-जाण्यातून लहानपणीच महेंद्रसिंग धोनी आणि साक्षी यांची मैत्री झाली. डीएव्ही विद्यालयात एकत्र शिकत असल्यामुळे मैत्रीचे बंध आणखी दृढ झाले. साक्षीचे वडील निवृत्तीनंतर कुटुंबासह देहरादून येथे स्थायिक झाले. त्यामुळे काही काळ माही आणि साक्षी एकमेकांपासून दूर होते. मात्र माही टीम इंडियाचा कर्णधार झाला आणि साक्षी शिक्षण घेण्याच्या निमित्ताने महाराष्ट्रात औरंगाबादमध्ये आली. या काळात धोनी दोन-चार वेळा औरंगाबादेत येऊन गेला होता.

Sunday, 4 July 2010

अर्जेंटिनाचेही पानिपत..!

जर्मनीकडून ४-० असा खुर्दा
केपटाऊन, दि. ३: बलाढ्य अर्जेंटिनाचा ४-० असा धुव्वा उडवून विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत आज जर्मनीने प्रचंड खळबळ उडवून दिली. संभाव्य विजेत्या अर्जेंटिनाचे त्यांनी न भूतो न भविष्यती असे पानिपत केले. त्यामुळे अर्जेंटिनाचे प्रशिक्षक व माजी जगप्रसिद्ध फुटबॉलपटू दिएगो मॅराडोना यांनाही अश्रू रोखणे कठीण बनले. त्याचबरोबर अर्जेंटिनाच्या जगभरातील चाहत्यांना या सनसनाटी पराभवाने जबर धक्का बसला. कालच संभाव्य विजेत्या ब्राझिलचे या स्पर्धेतील आव्हान आटोपले होते. पाठोपाठ अर्जेंटिनालाही घरचा रस्ता धरावा लागला आहे. उपांत्य फेरीत दिमाखदार प्रवेश केलेल्या जर्मनीच्या संघाने चाली आणि अचूक पास असा मनोहारी खेळ करत अर्जेंटिनाला निरुत्तर केले. सामन्याच्या तिसऱ्या मिनिटाला थॉमस मुल्लरने खाते उघडल्यावरही अर्जेंटिनाने चेंडूवर अधिक काळ ताबा ठेवून मुसंडी मारण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र, उत्तरार्धात आक्रमणाला अभेद्य बचावाची साथ देणाऱ्या जर्मनीने त्यांना डोके वर काढण्याची संधीच दिली नाही. अंतिम २२ मिनिटांच्या खेळात अर्जेंटिनाचे लागोपाठ तीन प्रयत्न अपयशी ठरले. त्यानंतर जर्मनीने आणखी तीन गोल डागले. उत्तरार्धात त्यांचा वंडरबॉय मिरोस्लाव क्लोजने दोन, तर अर्ने फ्रेड्रिचने एक गोल झळकावला. त्याचबरोबर जर्मनीच्या गोटात हर्षाला पारावर उरला नाही.

इंधन दरवाढ केलेल्या कॉंग्रेसचा नक्षा उतरवण्यासाठी 'बंद'मध्ये स्वयंस्फूर्तीने सहभागी व्हा

खासदार श्रीपाद नाईक यांचे जाहीर आवाहन
पणजी, दि. ३ (प्रतिनिधी): कॉंग्रेस पक्ष हा साठेबाज व काळाबाजारवाल्यांचा "डॉन' आहे. अमर्याद भ्रष्टाचार व प्रत्येक व्यवहारात "कमिशन'बाजी करूनच कॉंग्रेस नेत्यांनी संपत्ती जमा करताना सामान्य जनतेला मात्र भिकारी बनवले. नोटांच्या बळावर मस्तवाल झालेल्या कॉंग्रेसला जनतेच्या पोटाची कळ अजिबात समजणार नाही.
ही कळ दिल्लीतील कॉंग्रेस सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठीच ५ जुलै रोजी पुकारलेल्या "गोवा बंद' आंदोलनात प्रत्येकाने स्वयंस्फूर्तीने सहभागी व्हावे, असे जाहीर आवाहन खासदार श्रीपाद नाईक यांनी केले.
आज इथे बोलावलेल्या पत्रपरिषदेत ते बोलत होते. यावेळी प्रदेश पदाधिकारी उल्हास अस्नोडकर व नरहरी हळदणकर तसेच सत्तरीचे कार्यकर्ते राजेश गावकर हजर होते.
देशात महागाईचा आगडोंब उसळत असताना पेट्रोलजन्य पदार्थांच्या किमती वाढवून केंद्रातील कॉंग्रेसप्रणीत सरकार जनतेच्या उपाशी पोटावर लाथ मारण्याचेच पाप करीत असल्याचा आरोप श्रीपाद नाईक यांनी केला. जगातील एक नामवंत अर्थतज्ज्ञ अशी ख्याती असलेले पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग महागाई आटोक्यात आणण्यात सपशेल अपयशी ठरले. शंभर दिवसांत महागाई कमी करू ही अखेरपर्यंत वल्गनाच ठरली व आता महागाईचा चढता आलेख पाहता कॉंग्रेसने देशवासीयांना देशोधडीलाच लावण्याचा चंग बांधला आहे असे वाटण्याजोगी दारुण स्थिती निर्माण झाली आहे, असेही नाईक म्हणाले.
देशव्यापी बंदाला पाठिंबा देण्यासाठी "गोवा बंद'च्या आवाहनाला सर्वथरांतून पाठिंबा मिळत आहे. शिवसेना, भाकप, कामगार संघटना, खाजगी बस मालक आदींनी या बंदात सहभागी होण्याची घोषणा केली आहे. सामान्य जनतेचे भवितव्य उज्वल व्हावे या उद्देशानेच हा बंद आयोजित करण्यात आला आहे. या बंदवेळी आपत्कालीन सेवेला अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता लोकांनी घ्यावी. तसेच रुग्णालये, रुग्णवाहिका, लग्नाचे वऱ्हाड आदींना मोकळीक मिळेल याचीही काळजी घ्यावी अशी विनंतीही नाईक यांनी केली. तंत्रशिक्षण संचालनालयाकडून सोमवारी ठेवलेल्या मुलाखती मंगळवारी घेण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे त्यांनी केलेल्या सहकार्यामुळे नाईक यांनी त्यांचे आभार व्यक्त केले. फक्त एक दिवस कळ सोसून दिल्लीतील आणि स्थानिक सरकारलाही आपले बळ दाखवा, असे आवाहनही त्यांनी केले.
पुती यांनी विश्वासघात केला
भाजपची सदस्यता नोंदणी दर तीन वर्षांनी होत असते व त्यामुळे आपण भाजपचे सदस्यच नव्हतो,या पुती गावकर यांच्या दाव्यात काहीच दम नाही अशी प्रतिक्रिया खासदार श्रीपाद नाईक यांनी दिली. भाजपची उमेदवारी बहाल करून पक्षाने त्यांच्यावर विश्वास ठेवला; पण त्यांनी पक्षाचा विश्वासघातच केला आणि ते कॉंग्रेसवासी झाले. विश्वजित यांच्याविरोधात अपात्रता याचिका दाखल करून समझोता कुणी केला, असा सवालही त्यांनी यावेळी केला. भाजपने बहुजन समाजाचा केवळ वापर केला, या आरोपांत काहीच तथ्य नसून वाळपईचे दोन वेळा आमदार म्हणून निवडून आलेले नरहरी हळदणकर हे बहुजन समाजाचेच घटक होते. राजकारण हा धंदा असे समजणाऱ्यांना काय सांगावे, असा खोचक प्रश्न श्रीपाद नाईक यांनी केला. पर्ये मतदारसंघाप्रमाणे वाळपई मतदारसंघावरही एकाधिकारशाही गाजवू पाहणाऱ्यांना आगामी पोटनिवडणुकीत जनताच धडा शिकवेल, असेही नाईक म्हणाले.

'मी तर गोव्यातच होतो'

लिंडनच्या वक्तव्याने पोलिसांची नाचक्की
गुन्हा विभागाकडून जबानी नोंद

पणजी, दि. ३ (प्रतिनिधी): 'आपण गोव्याबाहेर गेलोच नाही. जामीन मिळवण्यासाठी शक्याशक्यतांची तयारी करण्यातच आपण व्यस्त होतो', असे म्हणत माजी पर्यटनमंत्री मिकी पाशेको यांचे माजी विशेष कार्याधिकारी लिंडन मोंतेरो हे आज गुन्हा अन्वेषण विभागासमोर हजर झाले. आपण निर्दोष आहोत व पोलिस चौकशीला पूर्ण सहकार्य करू असे म्हणत न्यायव्यवस्थेवर आपला पूर्ण विश्वास आहे, असा दावा त्यांनी केला.
सर्वोच्च न्यायालयाकडून परवा सशर्त जामीन मंजूर झाल्यानंतर मिकी पाशेको यांच्यासह "बेपत्ता' असलेले लिंडन मोंतेरो सकाळी सुमारे साडेदहा वाजता दोनापावला येथील गुन्हा विभागासमोर प्रकटले.यावेळी त्यांच्यासोबत मिकी पाशेको असतील, या भावनेने त्यांचे असंख्य कार्यकर्ते पोलिस स्थानकाबाहेर उभे होते.लिंडन गुन्हा विभागासमोर हजर होताच मिकी पाशेको दक्षिण गोवा सत्र न्यायालयात शरण आल्याचीही बातमी येऊन थडकली.
लिंडन यांनी थेट गुन्हा विभागात प्रवेश केल्यानंतर त्यांची जबानी नोंदवण्याचे काम सुरू झाले. सुरुवातीला निरीक्षक सुनिता सावंत यांनी त्यांची जबानी घेतली. नंतर वेगवेगळ्या अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर प्रश्नांचा भडिमार केल्याचीही खबर आहे. दुपारी त्यांना काही वेळ जेवणासाठी बाहेर पाठवले व संध्याकाळी सुमारे सात ते साडेसात या दरम्यान, त्यांना घरी पाठवून देण्यात आले. त्यांना पुन्हा चौकशीसाठी पाचारण करण्यात येईल,अशी माहिती सुनिता सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
नादिया तोरादो मृत्यप्रकरणी मिकी पाशेको यांच्यासह लिंडन मोंतेरो यांना संशयित सहआरोपी करण्यात आल्याने पोलिसांना ते चौकशीसाठी हवे होते.मिकी यांच्यासह लिंडनही बेपत्ता असल्याने पोलिस त्यांच्या शोधात होते. आपण गोव्यातच होतो, अशी माहिती लिंडन यांनी पत्रकारांशी बोलताना दिल्याने पोलिस आत्तापर्यंत त्यांचा शोध घेण्याचे नाटक तर करीत नव्हते ना, असा सवाल उपस्थित झाला आहे.विशेष म्हणजे लिंडन यांने पोलिसांसमोर हजेरी लावण्यापूर्वी एका स्थानिक वृत्तवाहीनीला मुलाखतही दिली व त्यात नादिया तोरादो मृत्यू प्रकरणी आपण निर्दोष असल्याचा दावा केला आहे.

खाजगी बसमालक 'बंद'वर ठाम

५ जुलै रोजी सकाळी पणजीत बैठक
पणजी, दि. ३ (प्रतिनिधी): सरकारने देऊ केलेला प्रतिकिलोमीटर १० पैसे तिकीट दरवाढीचा प्रस्ताव फेटाळून लावत किमान २० पैसे दरवाढ मिळायलाच हवी, अशी भूमिका अखिल गोवा खाजगी बस मालक संघटनेने घेतली आहे. संघटनेतर्फे पुकारण्यात आलेला "बंद' होणारच अशी घोषणा करून ५ जुलै रोजी सकाळी १० वाजता टी.बी.कुन्हा सभागृहात खाजगी बस मालकांची बैठक होईल व त्यात पुढील कृती निश्चित केली जाणार असल्याची माहिती सरचिटणीस सुदीप ताम्हणकर यांनी दिली.
खाजगी बस मालक संघटनेतर्फे सरकारला सादर केलेल्या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी संघटनेला विश्वासात घेतले गेले नाही. तिकीट दरवाढीबाबत निर्णय घेताना किमान संघटनेला चर्चेसाठी बोलावण्याची सरकारची जबाबदारी होती; पण हा निर्णय एकतर्फी घेण्यात आला व त्याची कोणतीही अधिकृत माहिती संघटनेला देण्यात आलेली नाही,अशी नाराजीही ताम्हणकर यांनी व्यक्त केली.
संघटनेकडून सरकारला सादर केलेल्या प्रस्तावात तिकीट दरवाढीसह इतरही अनेक मागण्या करण्यात आलेल्या आहेत व त्यासंबंधी सरकार व संघटना यांच्यात संवाद होण्याची गरज आहे. सरकार संघटनेशी चर्चा करण्यासच तयार नाही यावरून त्यांना संघटनेशी संवादच साधायचा नाही, हे उघड होते,असेही ताम्हणकर म्हणाले.
राज्यातील सर्व खाजगी बस मालकांनी ५ जुलै रोजी बोलावण्यात आलेल्या बैठकीला हजर राहावे. संघटनेतर्फे सोसायटी स्थापन करण्याच्या प्रस्तावाबाबत यावेळी चर्चा करण्यात येणार आहे. त्यामुळे या चर्चेत भाग घेऊन आपल्या सूचना व सल्ला देण्याचे आवाहन ताम्हणकर यांनी केले आहे.