Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday, 17 May 2008

'आता सरकारने हस्तक्षेप करावा'

मराठी अकादमीच्या कारभारावर शशिकलाताई कडाडल्या
पणजी, दि. १६ (प्रतिनिधी): गोमंतक मराठी अकादमीत सध्या मनमानी व भोंगळ कारभार सुरू असून मराठी भाषेच्या उद्धारासाठी ही धोक्याची सूचना आहे. केवळ ६० सदस्यांपुरती मर्यादित असलेल्या मराठी भाषेच्या या शिखर संस्थेला व्यापक स्वरूप प्राप्त करून देण्यासाठी अकादमीच्या घटनेत आवश्यक दुरुस्ती करून सदस्यता खुली करावी, अशी जोरदार मागणी माजी मुख्यमंत्री तथा मराठी भवन निर्माण समितीच्या कार्याध्यक्ष शशिकला काकोडकर यांनी केली आहे.
आज पणजी येथे बोलावण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत श्रीमती काकोडकर यांनी पहिल्यांदाच अकादमीतील कारभाराबाबत उघडपणे मतप्रदर्शन केले. यावेळी ऍड. गोपाळ तांबा,ज्येष्ठ पत्रकार सीताराम टेंगसे व गोमंतक साहित्य सेवक मंडळाचे अध्यक्ष सुरेश नाईक हजर होते. गेल्या ३० मार्च २००८ रोजी मराठीप्रेमींनी घेतलेल्या बैठकीत घटना दुरुस्ती करून सदस्यता खुली करण्याबाबत घेतलेला ठराव अकादमीला पाठवण्यात आला असला तरी त्यावर अकादमीचे पदाधिकारी मात्र मूग गिळून गप्प बसल्याचा ठपका श्रीमती काकोडकर यांनी ठेवला. यासंदर्भात सरकारने हस्तक्षेप करावा, अशी मागणी करण्यात येणार असून कायदामंत्री व मुख्यमंत्र्यांची लवकरच भेट घेतली जाणार आहे. प्रसंगी कायदेशीर मार्गाचाही अवलंब केला जाईल असेही श्रीमती काकोडकर म्हणाल्या.
गेल्या तीन ते चार वर्षांपासून अकादमीचा कारभार पूर्णपणे ढासळत चालला असून राज्यातील मराठीप्रेमींत कमालीची अनास्था व उदासीनता पसरल्याची टीका त्यांनी केली. खऱ्या अर्थाने मराठीसाठी झटणाऱ्या लोकांना बाजूला सारून आपल्या गोतावळ्यातील लोकांची वर्णी लावण्याचे नवे राजकारण या संस्थेत सुरू आहे. अकादमीच्या विविध गटवार पदांवर निवडून आलेल्या लोकांची नामावली पाहिल्यास ही गोष्ट लगेच लक्षात येईल, असेही शशिकलाताई म्हणाल्या. मराठी अकादमीच्या गचाळ कारभाराबाबत नुकतेच कुठे वातावरण तयार होते आहे. या परिस्थितीत गेले काही दिवस ठरावीक वृत्तपत्रांतून दिशाभूल करणारी वक्तव्ये तसेच जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करणारे वृत्त प्रसिद्ध होत असल्याने आता याबाबत तोंड उघडणे व सत्य परिस्थितीची माहिती देणे भाग पडल्याचे त्या म्हणाल्या. मराठी अकादमीचे विद्यमान अध्यक्ष नरेंद्र आजगावकर यांनी अकादमीवर सध्या आपल्या सग्यासोयऱ्यांची फौज जमवल्याचा आरोप श्रीमती काकोडकर यांनी केला. इथे त्यांची मर्जी असलेले लोकच निवडून येऊ शकतात अशी तजवीज त्यांनी केल्याने इच्छा व पात्रता असूनही अन्य मराठीप्रेमी कार्यकारिणीवर निवडून येऊ शकत नाही, अशी माहिती त्यांनी दिली. मराठी अकादमी स्थापन करण्यासाठी किंवा मराठीसाठी प्राणपणाने झटलेले लोक आपोआपच या गटबाजीच्या राजकारणामुळे बाहेर पडले आहेत. अकादमीतर्फे घेण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांना आमसभेचे सदस्यच भाग घेतात व विविध स्पर्धांसाठी अकादमीचे सदस्यच परीक्षक म्हणून काम पाहतात अशी टीका करून मराठीच्या नावाने सरळ मस्करीच सुरू असल्याचे त्या म्हणाल्या. मराठी अकादमीचा संपूर्ण कारभार हा केवळ ६० सदस्यांपुरता मर्यादित ठेवण्यात आला आहे. मराठी अकादमीला व्यापक स्वरूप व मराठी भाषेचा खऱ्या अर्थाने विकास व उद्धार व्हायचा असेल तर हरएक इच्छुक मराठीप्रेमीला कायदेशीरपणे अकादमीचा सदस्य होण्याचा हक्क मिळायलाच हवा,असे ताई म्हणाल्या. अकादमीची नोंदणी सोसायटी नोंदणी कायद्यानुसार केली असली तरी सदस्यता नोंदणी संदर्भात मात्र २००० साली ही अट लादण्यात आल्याचे यावेळी उघड करण्यात आले.
मराठी भवन निर्माण समितीचा विसर
मराठी भवन निर्माण समितीने सुमारे दीड कोटी रुपये खर्च करून ही वास्तू उभारली असली तरी ती अद्याप अपूर्ण आहे. अकादमीचे कार्यालय या ठिकाणी खुले केल्यानंतर जी काही कामे हाती घेण्यात आली त्याबाबत भवन निर्माण समितीला अजिबात विश्वासात घेतले नसल्याचे श्रीमती काकोडकर यांनी सांगितले. मराठी भवनाचा मागील भाग भाडेपट्टीवर देण्याबाबत सुरुवातीस मान्य करण्यात आले असले तरी सध्या विद्यमान वास्तूतील एक भाग सरकारी संस्थेला भाड्यासाठी देण्याचे प्रयत्न सुरू असून हे योग्य नसल्याचे ताई म्हणाल्या. खासदार श्रीपाद नाईक यांनी खासदार निधीमार्फत बांधण्यात आलेल्या कुंपणाच्या उद्घाटन सोहळ्याला भवन निर्माण समितीला आमंत्रण देण्यात आले नाही. भवन समिती व कार्यकारिणीची संयुक्त बैठक बोलावण्याची अनेकवेळा विनंती करूनही त्याबाबत कानाडोळा केला जात असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. मराठी भवनाचे अर्धवट असलेले काम पूर्ण करण्यासाठी अकादमीकडून कोणतीही ठोस पावले किंवा भवन निर्माण समितीला विश्वासात घेऊन कार्यक्रम आखण्यासाठी कोणतेच प्रयत्न होत नसल्याची टीका श्रीमती काकोडकर यांनी केली.
उपाध्यक्षांनी मिळवले सर्व हक्क
माजी अध्यक्ष गुरूदास सावळ यांच्या कार्यकाळावेळी उपाध्यक्ष नरेंद्र आजगावकर यांनी अध्यक्षांसाठी असलेले बहुतेक हक्क उपाध्यक्षांना मिळवून घेतले. आता गुरूदास सावळ यांनी श्री.आजगावकर यांच्याशी झालेल्या मतभेदांमुळे राजीनामा दिल्याने उपाध्यक्षांकडे अध्यक्षपदाचा ताबा आला. गेल्यावेळी निवडणुकीचा फार्स करून उपाध्यक्ष नरेंद्र आजगावकर अध्यक्ष बनले. आता अकादमीला उपाध्यक्ष नाही,अशी माहिती यावेळी देण्यात आली. अध्यक्षांच्या अनुपस्थितीत अकादमीचा कार्यभार कोण संभाळतो,असा सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला. अकादमीला सरकारकडून आर्थिक साहाय्य देण्यात येते त्यामुळे अकादमीच्या कारभारावर सरकारचे नियंत्रण असणे गरजेचे आहे. सरकारने अकादमीच्या कारभाराकडे त्वरित लक्ष देण्याची गरज असून अकादमीच्या सदस्यपदाचा हक्क प्रत्येक मराठीप्रेमीला मिळवून देण्याची सोय करावी,असेही ताई यांनी यावेळी सांगितले.

सभागृह समितीला डावलल्याने सरकारची बेफिकिरी उघड

कचराप्रश्नी दामोदर नाईक यांची टीका
पणजी, दि. १६ (प्रतिनिधी): राज्यातील कचऱ्याच्या गंभीर विषयावर सरकार अजूनही बेफिकीर असून ही समस्या दिवसेंदिवस उग्र बनत चालली आहे. गेल्या अधिवेशनात कचरा समस्येवर तोडगा काढण्यासाठी सभागृह समिती नेमण्यात आली असताना समितीच्या सदस्यांना विश्वासात न घेता सरकार हा विषय अजूनही प्रामाणिकपणे हाताळत नसल्याचा आरोप भाजप विधिमंडळ प्रवक्ते आमदार दामोदर नाईक यांनी केला.
आज पणजी येथे भाजप मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.यावेळी विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर हजर होते. कचऱ्याची विल्हेवाट व त्यासाठी जागेची निवड हे विषय हाताळण्यासाठी गेल्या विधानसभा अधिवेशनात सभागृह समिती नेमण्यात आली होती. या समितीकडून घेण्यात येणारा निर्णय सरकारला मान्य होणार असल्याच्या अटीवर ही समिती नेमण्यात आल्याचे श्री.नाईक म्हणाले. या समितीची पहिली बैठक ४ एप्रिल २००८ रोजी झाली. यावेळी विरोधी भाजप सदस्यांनी या विषयावरून सरकारला पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले होते. या बैठकीनंतर १५ दिवसांनी पुन्हा एकदा बैठक घेऊन कचरा प्रकल्पासाठीची जागा निश्चित करण्याबाबत चर्चा करण्याचे ठरले. आता महिना उलटला तरी ही बैठक बोलावण्यात आली नाही. मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी अलीकडेच गुजरात येथील राजकोटस्थीत एका कंपनीकडून राज्य सरकारला प्रस्ताव सादर झाल्याचे वक्तव्य करून लवकरच पर्यावरणमंत्री इतर आमदार व काही पंचायत सदस्य या ठिकाणाची भेट घेणार असल्याचेही विधान केले होते. हा विषय दोन महिन्यांत सोडवण्यासाठी सभागृह समितीची नेमणूक करून सरकार समितीला विश्वासात न घेता हा विषय अशा पद्धतीने हाताळत असेल तर समितीची गरजच काय होती. कचरा समस्येवरून सरकार चुकीच्या पद्धतीने वावरत असून ही परिस्थिती अशीच राहिल्यास ही समस्या भविष्यात जटिल बनणार असल्याचा धोका श्री. नाईक यांनी बोलून दाखवला.
सोनसोडोः"सीबीआय' चौकशी करा
सोनसोडो येथील नियोजित "हायक्वीप' कंपनीला प्रकल्प उभारण्याचे काम दिल्याप्रकरणी मोठा भ्रष्टाचार झाला असून याही प्रकरणाची "सीबीआय' चौकशी करा, अशी मागणी आमदार दामोदर नाईक यांनी केली. या कंपनीला निविदा देण्यापासून ते काम सुरू होण्यापूर्वीच १० टक्के रक्कम देण्यापर्यंत सर्वच गोष्टी संशयास्पद असून आत्तापर्यंत हे काम सुरू झाले नसल्याने हा एक महाघोटाळाच असल्याची टीका त्यांनी यावेळी केली. सरकारातील मंत्री फक्त विदेश दौरे करण्यात मग्न असून जनतेच्या समस्या व अडचणींकडे लक्ष देण्यास त्यांना मुळीच सवड नाही,असा टोलाही दामोदर नाईक यांनी शेवटी हाणला.

कॅसिनोविरोधात भाजप तीव्र आंदोलन छेडणार

पावसाळी अधिवेशनात कायदा दुरुस्ती विधेयक
पणजी, दि. १६ (प्रतिनिधी): गोव्यात "कॅसिनो' विरोधात प्रखर आंदोलन उभारण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. गोवा जुगार प्रतिबंध व नियंत्रण कायद्यात माजी मुख्यमंत्री प्रतापसिंग राणे यांनी १९९६ साली समुद्री "कॅसिनो' जहाजांना परवानगी देण्यास सुचवलेली तरतूद रद्द करून "कॅसिनो' जहाजांना परवानगी नाकारणारे खाजगी विधेयक येत्या पावसाळी अधिवेशनात सभागृहात सादर केले जाणार आहे.
आज पणजीत भाजप मुख्यालयात बोलावण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी ही माहिती दिली. भाजप विधिमंडळ गटाची बैठक झाली असता त्यात हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कॅसिनो जुगाराला विरोध करणाऱ्या काही बिगरसरकारी संस्थांनी भाजपशी संपर्क साधल्याचेही पर्रीकर यांनी यावेळी सांगितले. भाजपतर्फे सादर करण्यात येणाऱ्या या विधेयकाला पाठिंबा देण्यासाठी चाळीसही आमदारांना विनंती करणारी पत्रे तथा त्यांची प्रत्यक्ष भेट घेण्याचे या संस्थांनी सांगितल्याची माहिती पर्रीकर यांनी यावेळी दिली.
पणजीतील 'कॅसिनो' विरोधात धडक
पणजी भाजप युवा मोर्चा तथा मंडळ समितीतर्फे मांडवी तीरावरील कॅसिनोविरोधात येत्या दोन आठवड्यात धडक देणार असल्याची माहिती पर्रीकर यांनी यावेळी दिली. पणजीत कॅसिनो अजिबात खपवून न घेण्याचा पवित्रा भाजपने घेतला असून या कॅसिनो जुगाराचे दुष्परिणाम आता प्रकर्षाने जाणवू लागल्याची अनेक उदाहरणे असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. पणजीतील हे आंदोलन अभिनव गांधीगिरी पद्धतीने राबवले जाणार असून येत्या काही दिवसांत त्यांचे स्वरूप स्पष्ट केले जाईल,अशी माहितीही त्यांनी दिली.
बेती जेटीलाही विरोध
बेती-वेरे येथे कॅसिनो जहाजांसाठी खास जेटी बांधण्याच्या हालचाली सुरू असल्याने येथील नागरिकांनी या प्रकल्पाला विरोध करण्याचे ठरवले आहे. स्थानिक लोकांच्या या आंदोलनाला भाजपचा पूर्ण पाठिंबा असल्याची घोषणा पर्रीकर यांनी यावेळी केली. येथील स्थानिक लोकांनी उद्या १७ रोजी या भागात जागृती फेरी तथा विरोध फेरी काढण्याचा निर्णय घेतला असून या लोकांच्या आंदोलनात भाजपही सहभागी होणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

ब्रह्मानंदाचार्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज तपोभूमीवर विविध कार्यक्रम

पणजी, दि. १६ (प्रतिनिधी) : पद्मनाभ संप्रदायाचे प.पू. ब्रह्मानंदाचार्य स्वामी यांचा सहावा पुण्यतिथी महोत्सव शनिवार दि. १७ रोजी कुंडई येथील तपोभूमीवर विविध कार्यक्रमांनिशी साजरा केला जाणार आहे.
शनिवारी सकाळच्या सत्रात धार्मिक कार्यक्रम होणार असून गुरुचरित्र पारायण, यज्ञाची पूर्णाहुती, आशीर्वचन, आरती व दुपारी महाप्रसाद होणार आहे. दुपारी ३.३० ते ४.३० या वेळेत ब्रह्मानंद संगीत विद्यालयातर्फे भजन सादर केले जाईल. त्यानंतर ४.३० वाजल्यापासून प्रकट कार्यक्रम होणार असून, त्यावेळी पीठाधीश ब्रह्मेशानंदाचार्य स्वामींच्या उपस्थितीत "घरच्या घरी सोमयज्ञ' या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. यावेळी होणाऱ्या सत्कार सोहळ्यात मुख्यमंत्री दिगंबर कामत, विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर, गृहमंत्री रवी नाईक, वाहतूक मंत्री सुदिन ढवळीकर व आमदार नीळकंठ हळर्णकर आपले मनोगत व्यक्त करतील. त्यानंतर स्वामींचे आशीर्वचन होणार आहे. आरती, पसायदान, दर्शन सोहळा व महाप्रसाद होऊन महोत्सवाची सांगता होईल. यावेळी मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Friday, 16 May 2008

'हा'अधिकार ग्रामस्थांना हवाच : पर्रीकर

पणजी, दि. १७ (प्रतिनिधी) : एखाद्या महाप्रकल्पाला मान्यता देण्याचा अथवा विरोध करण्याचा पूर्ण हक्क स्थानिक जनतेला मिळायलाच हवा, असे मत विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी व्यक्त केले. कायदेशीर मान्यता मिळवलेल्या प्रकल्पांना ग्रामसभांनी विरोध करू नये, या मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या वक्तव्याला पर्रीकर यांनी जोरदार आक्षेप घेतला आहे.
आज येथे पत्रकारांशी बोलताना पर्रीकर यांनी गोव्यातील अलीकडे स्थानिक लोक महाप्रकल्पांच्या विरोधात आंदोलनाच्या पवित्र्यात का उठतात, याबाबत स्पष्टीकरण केले. नगरनियोजन खात्याकडून परवानगी देताना स्थानिक पंचायतीला कळवण्याचा किंवा पंचायत मंडळाकडून स्थानिक पातळीवरील परवानगी देताना ग्रामसभेत यासंबंधी ठराव घेण्याचे बंधन नसल्याने हा घोळ निर्माण होत असल्याचे पर्रीकर म्हणाले. पंचायत किंवा नगरनियोजन कायद्यात दुरुस्ती करून अशा महाप्रकल्पांना प्रत्यक्षात कामाला सुरुवात करण्यापूर्वीच नगरनियोजन खाते व ग्रामसभेची मान्यता मिळवण्याची व्यवस्था केल्यास त्याचा मोठा फायदा होणार असल्याचे त्यांनी सांगितले. ग्रामसभेत एखाद्या प्रकल्पाला बहुमताने मान्यता दिल्यानंतर जर त्यानंतर त्याला विरोध होत असेल तर मात्र सरकार हा विरोध डावलू शकते असेही पर्रीकर यांनी यावेळी सुचवले.
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी घटनेत ७३ व ७४ दुरुस्ती करणारी विधेयके मांडून ग्रामसभांना अधिकार प्राप्त करून दिले आहेत याचा विसर दिगंबर कामत यांना पडला की काय,असा सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला. एखाद्या प्रकल्पाला सर्व परवाने व मान्यता मिळाल्यानंतर ते मागे घेणे ही पद्धत योग्य नसून ती दूर करण्यासाठी संबंधित पंचायत किंवा पालिका मंडळाची प्रतिक्रिया प्रकल्पाबाबत मागवून घेण्याची तरतूद कायद्यात करावी,अशीही सूचना त्यांनी यावेळी दिली.
कृती दलाचा आराखडा पंचायतींना पाठवा
कृती दलाकडून अलीकडेच सादर करण्यात आलेल्या प्रगती अहवाल राज्यातील प्रत्येक पंचायत व पालिकांना पाठवून त्याबाबत त्यांचे मत मागवण्यात यावे, अशी मागणी पर्रीकर यांनी केली. प्रादेशिक आराखडा २०२१ तयार करण्यापूर्वी तालुका नकाशा व इतर मसुदा प्रत्येक पंचायतीकडे पाठवून त्यांची प्रतिक्रिया व मते जाणून घेण्यात यावीत अशी सूचना पर्रीकर यांनी यावेळी केली.

५० थकबाकीदारांना महापालिकेच्या नोटिसा, २२ मे पासून टाळे ठोकणार

पणजी, दि. १५ (प्रतिनिधी): पणजी महापालिकेतर्फे आता थकबाकीदारांविरोधात जोरदार मोहीम उघडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आत्तापर्यंत घरपट्टी व महापालिका भाडे न भरलेल्या व सुमारे ५० हजार रुपयांहून जास्त देणे असलेल्या पन्नासहून जास्त थकबाकीदारांना अंतिम नोटीस जारी करण्यात आल्याची माहिती महापौर टोनी रॉड्रिगीस यांनी दिली. येत्या २२ मेपासून अशा आस्थापनांना टाळे ठोकण्याची जय्यत तयारीही महापालिकेने चालवली आहे.
पणजी महापालिकेला घरपट्टी, भाडे व इतर करांच्या रूपात सुमारे ४ कोटी रुपये येणे आहेत. काही लोकांची थकबाकी ५० हजार रुपयांहून जास्त असल्याने ती वसूल करण्यासाठी कडक पावले उचलण्यात आली आहेत. आत्तापर्यंत सुमारे ५० हून जास्त लोकांना नोटिसा पाठवण्यात आल्या असून येत्या दिवसांत हा आकडा आणखीन वाढणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त संजीव गडकर यांनी दिली. ही नोटीस स्वीकारल्यानंतर १५ दिवसांच्या आत थकबाकी जमा करायची आहे. ही मुदत संपल्यानंतर कोणत्याही क्षणी कारवाई होऊ शकते, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. थकबाकीदारांत जादा तर व्यापारी वर्गांचा समावेश असून त्यांनी ताबडतोब आपल्या थकबाकीचा भरणा करावा असे आवाहन आयुक्तांनी यावेळी केले.
संगणक विभागाचा कामचुकारपणा
ताळगावचा भाग वेगळा करून त्याचे रूपांतर २००२ साली पंचायतीत केले असले तरी येथील घरांची नोंदणी अद्याप पणजी महापालिकेकडे तशीच पडून असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. पणजी महापालिका क्षेत्रात सुमारे दहा हजार घरांची नोंद असली तरी त्यातील सुमारे चार हजार घरे ही ताळगाव पंचायत क्षेत्रातील आहेत. महापालिकेच्या थकबाकीचा मोठा हिस्सा हा ताळगावातील सदर घरांचा असल्याने या घरांची नोंद महापालिका नोंदणी अहवालातून वगळण्यासाठी संगणक विभागाला सक्त ताकीद देण्यात आल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे. याप्रकरणी महापालिका आयुक्त श्री.गडकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी वरील माहितीला पुष्टी दिली. हा गोंधळ सोडवण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्यात येत असल्याचे त्यांनी मान्य केले. ताळगाव पंचायत क्षेत्रात येणाऱ्या घरांचे सर्वेक्षण करून ही घरे पालिका नोंदणीतून वगळण्यासाठीचे काम सुरू केल्याची माहिती त्यांनी दिली. दरम्यान, या गोष्टीला आता पाच वर्षे उलटूनही ते पूर्ण केले जात नसल्याचे कारण विचारले असता त्यांनी आपण स्वतः लक्ष घालून ते पूर्ण करून घेणार असल्याचे सांगितले.

पणजी महापालिका आयुक्तांच्या तडकाफडकी बदलीने खळबळ

बेकायदा बांधकामावरील कारवाई नडली?
पणजी, दि. १५ (प्रतिनिधी): पणजी महापालिकेचे आयुक्त संजीव गडकर यांची बदली करण्याचे तडकाफडकी आदेश संध्याकाळी उशिरा जारी करण्यात आल्याने महापालिकेत खळबळ माजली आहे. मिरामार येथील बेकायदेशीर बांधकामांवर कारवाई करण्यावरून महापौर व आयुक्त यांच्यात निर्माण झालेले मतभेद तसेच काल यासंबंधीची "फाईल' गहाळ झाल्याने पालिकेतील एका कर्मचाऱ्याला निलंबित करण्याचे घडलेले नाट्य संजीव गडकर यांच्या तडकाफडकी बदलीस कारणीभूत ठरल्याची जोरदार चर्चा शहरात सुरू आहे.
पणजी महापालिका आयुक्त संजीव गडकर यांना कार्मिक खात्यात संपर्क साधण्याचे आदेश देत महापालिका आयुक्तांचा अतिरिक्त ताबा पालिका प्रशासनाचे संचालक दौलत हवालदार यांच्याकडे देण्याचा आदेश आज संध्याकाळी कार्मिक खात्याकडून जारी करण्यात आला. महापालिकेतील सत्ताधारी गटाकडून चालवण्यात येणाऱ्या अनेक बेकायदेशीर कृत्यांना थारा न देता प्रशासनावर आपला वचक ठेवण्यास नुकतीच सुरुवात केलेल्या श्री.गडकर यांना आपले राजकीय हितसंबंध वापरून सत्ताधारी गटातर्फेच बदली करण्यात आल्याचा आरोप विरोधी गटाने केला आहे.
दरम्यान, मिरामार येथील अग्निशमन दल मुख्यालयाच्यामागे बेकायदा बांधकामावर कारवाई करण्याचे आदेश पालिका लवादाने जारी केल्याने त्याची अंमलबजावणी करण्यासाठी श्री. गडकर यांनी पुढाकार घेतला होता. कालचा दिवस यासाठी निश्चित करण्यात आला होता व त्यासंबंधीची माहिती पोलिस, वीज खाते, अग्निशमन दल व इतर संबंधित खात्यांनाही देण्यात आली होती. याप्रकरणी आयुक्त श्री. गडकर कार्यालयाबाहेर पडण्याच्या तयारीत असताना यासंबंधीची "फाईल'च कार्यालयातून गहाळ झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. याप्रकरणी त्यांनी कार्यालयातील "फाईल्स' हाताळणाऱ्या एका रोजंदारी कर्मचाऱ्यावर कारवाई करून त्याला सेवेतून निलंबित करण्याचा आदेश जारी केल्यानेही वाद निर्माण झाला होता. एखादी महत्त्वाची "फाईल' कार्यालयातून अचानक गहाळ होणे ही गंभीर बाब असल्याने त्याबाबात कारवाई करणे हे आपले कर्तव्य असल्याचे सांगून श्री. गडकर यांनी आपल्या कारवाईचे समर्थन केले होते. दरम्यान, ही "फाईल' महापौर टोनी रॉड्रिगीस यांनी मागवून घेतली होती अशी माहिती त्यांना देण्यात आली व यासंबंधीच्या कारवाईबाबत विचारविनिमय करण्यासाठी बैठक घेण्याचा प्रस्तावही काही नगरसेवकांनी त्यांच्यासमोर ठेवला होता. महापालिका आयुक्त श्री. गडकर यांनी मात्र सदर कर्मचाऱ्याला निलंबित करण्याचे आदेश जारी केल्याने सत्ताधारी गट बराच नाराज बनला होता. सदर कर्मचारी रोजंदारी पद्धतीवर सेवेत असला तरी तो गेल्या सात ते आठ वर्षांपासून सेवेत असल्याची माहिती हाती मिळाली आहे.
सदर "फाईल' गहाळ झाल्याप्रकरणी संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई न करता आयुक्तांनी महापौर किंवा नगरसेवकांवर कारवाई करावी, असेही आव्हान त्यांना देण्यापर्यंत हे प्रकरण चिघळले होते. लोकप्रतिनिधींवर कारवाई करण्याचा अधिकार आयुक्तांना नसल्याने त्यांनी यासंबंधी पालिका कर्मचाऱ्यावर कारवाई केल्याने सत्ताधारी गट बराच नाराज बनला होता.
दरम्यान, सदर बेकायदा बांधकामांना नोटिसा जारी करून त्यांची सुनावणीही घेण्यात आली होती. काही लोकांनी या कारवाईला स्थगितीही मिळवण्याचा प्रयत्न केला होता. ही सगळी प्रक्रिया पूर्ण करूनच कारवाईचा निर्णय घेण्यात आल्याची भूमिका श्री.गडकर यांनी व्यक्त केली. हे लोक गेल्या वीस वर्षांपासून इथे राहत असल्याचे कारण पुढे करून काही नगरसेवकांनी या बांधकामावरील कारवाईस हरकत घेतली होती. यासंबंधीचा वाद अधिक चिघळणार असल्याने सत्ताधारी गटाने नगरविकासमंत्री ज्योकीम आलेमाव यांच्याकडे आर्जव करून श्री. गडकर यांची बदली करवून घेतल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

विर्डी धरणाची जागा महाराष्ट्राने बदलली,तेंब येथे प्रकल्प

पणजी, दि. १५ (पणजी): विर्डी धरणासाठीची नियोजित जागा बदलून धरणासंबंधीची संपूर्ण प्रक्रिया नव्याने सुरू करण्याची तयारी महाराष्ट्र सरकारने चालवली आहे.
महाराष्ट्र सरकारने विर्डी येथे नियोजित धरणाचे काम प्रारंभ केल्याने सत्तरी व डिचोली भागातील पुराचा धोका अधिक वाढण्याचा धोका अनेक पर्यावरणतज्ज्ञांनी व्यक्त केला होता. यासंबंधीची जागा बदलून महाराष्ट्र सरकारने भलतीकडेच काम सुरू केल्याने हा धोका अधिक संभवत असल्याची टीका झाल्याने गोवा सरकारने हस्तक्षेप करण्याचे मान्य केले होते. धरणाच्या जागेसंबंधी गोव्यात विरोध होत असल्याने महाराष्ट्र सरकारने आपणहूनच ही जागा बदलण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मिळाली आहे. आता हा प्रकल्प दोन डोंगराच्या मधोमध तेंब व ताडीच्या खालचो डोंगर या ठिकाणी उभारण्याचा निर्णय घेण्यात आल्याची खबर आहे. ६०० मीटर लांबी व ४८ मीटर उंची अशी या प्रकल्पाची व्याप्ती असून १०० हेक्टर जमीन पाण्याखाली येणार असून १३२० हेक्टर जमीन या प्रकल्पामुळे ओलीताखाली आणली जाणार आहे. एकूण ४८ कोटी रुपये अंदाजित खर्च या प्रकल्पासाठी नियोजित करण्यात आला असून सावईवाडा येथील केवळ ८ कुटुंबांचे स्थलांतर करावे लागणार असल्याचीही माहिती महाराष्ट्र सरकारच्या सूत्रांकडून मिळाली आहे.
दरम्यान, महाराष्ट्र सरकारने यासंबंधी आपल्या हालचाली तेज केल्या असताना गोवा सरकार मात्र अद्याप गंभीर नसल्याचेच चित्र आहे. मुख्यमंत्री व मुख्य सचिव जे.पी.सिंग यांनी महाराष्ट्र सरकारला पत्र पाठवून या प्रकल्पाबाबत हरकत घेतल्याचे जलस्त्रोत्रमंत्री फिलीप नेरी रॉड्रिगीस यांनी मान्य केले आहे. यासंबंधी पुढाकार घेऊन चौकशी करण्याचे तसेच प्रत्यक्षात या जागेची पाहणी करण्याबाबत मात्र अद्याप काहीच हालचाली झाल्या नसल्याची माहिती मिळाली आहे. सदर प्रकल्पाबाबतचा तपशील महाराष्ट्र सरकारकडे मागवण्यात आला असून त्यानंतरच यासंबंधी विचार करणार असल्याची भूमिका गोवा सरकारने घेतली आहे.
जलसुरक्षाः विद्यमान परिस्थिती व भविष्यातील आव्हाने
म्हादई बचाव आंदोलन संस्थेतर्फे येत्या शनिवार १७ मे रोजी सकाळी १० ते संध्याकाळी ७ वाजता "जलसुरक्षाः विद्यमान परिस्थिती व भविष्यातील आव्हाने' या विषयावर एकदिवसीय शिबिराचे आयोजन केले आहे.
जुने गोवे येथील कुंकळ्ळीकर उच्च माध्यमिक विद्यालयात हे शिबिर भरणार आहे. फादर मेवरीक फर्नांडिस यांच्याहस्ते या शिबिराचे उद्घाटन होणार आहे. पिसफुल सोसायटी ऑफ गोवाचे सचिव कलानंद मणी हे अध्यक्षस्थानी असतील. कवी विष्णू सूर्या वाघ हे "पाणी' या विषयावर कविता सादर करणार आहेत.
म्हादई व विर्डी धरणासंबंधी सद्यःस्थिती, तेरेखोल, शापोरा,बागा,जुवारी,साळ, तळपण, गालजीबाग आदी नद्यांबाबतची माहिती व आव्हानांवर यावेळी चर्चे केली जाणार आहे. जलसुरक्षा हे गोव्यासमोरील मोठे आव्हान असून त्यासंबंधी घेण्यात येणारी काळजी व कृती आराखडा तयार करण्यासंबंधीही यावेळी चर्चा केली जाणार आहे. यावेळी अनेक तज्ज्ञ व पर्यावरणाचा अभ्यास असलेली मंडळी उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. त्यात डॉ.नंदकुमार कामत, निर्मल कुलकर्णी, प्रा. राजेंद्र केरकर, प्रकाश पर्येकर, डॉ.एडवीन डिसा, राजेश केंकरे, रामदास केळकर,अरुण नाईक,विठोबा बगळी, महेंद्र फळदेसाई, परेश परब, विशांत वझे, शुभदा च्यारी, एम.के.पाटील व इतर अनेक मंडळी सहभागी होणार आहेत. यासंबंधी या शिबिरात भाग घेऊ इच्छिणाऱ्यांनी संस्थेच्या निमंत्रक माजीमंत्री निर्मला सावंत यांच्याशी ९२२१०१३६० या मोबाईलवर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

ऍमवे इंडिया ४० मुलांचा खर्च उचलणार

१०व्या वर्धापनदिनानिमित्त घोषणा
पणजी, दि. १५ (प्रतिनिधी): `ऍमवे इंडिया'च्या दहाव्या वर्धापनदिनानिमित्त पणजी येथील दिशा चॅरिटेबल ट्रस्टतर्फे चालवण्यात येणाऱ्या विद्यालयातील ४० पेक्षा जास्त मुलांचा शिक्षण आणि उपचारांचा खर्च तीन वर्षासाठी उचलणार आहे. आज गोवा विभागाचे व्यवस्थापक रजत बॅनर्जी यांनी आज पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केले. यावेळी त्यांच्याबरोबर प्रसिद्धिप्रमुख जिग्नेश मेहता उपस्थित होते.
भारतातील आघाडीची थेट विक्री व्यवस्थेतील एमएफसीजी कंपनी ऍमवे इंडियाने मोठ्या बाजारपेठेसाठी विशेष उत्पादन बाजारात उपलब्ध करणार असल्याची घोषणा यावेळी केली. या उत्पादनांच्या किंमती १९ ते ७५ रुपयांच्या दरम्यान असतील. या उत्पादनाच्या साखळीत तेल, आवळा केशतेल, शेव्हिंग क्रीम, केशक्रीम आणि वापरून फेकून देण्याच्या रेझरचा समावेश असणार आहे.
श्री. बॅनर्जी पुढे म्हणाले की, या आर्थिक वर्षाची सांगता ८०० कोटी रुपयांच्या उलाढालीने केली आणि त्यात ९ टक्क्यांची वृद्धी गतवर्षीच्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत नोंदवली गेली. सध्या ५० नवीन कार्यालये सुरू करण्यासाठी आमच्या पायाभूत सुविधांमध्येही भव्य विस्तार केला. सध्या वेगवेगळ्या शहरात १२० कार्यालये असून त्यात ५० कार्यालयांची आणखी भर पडणार आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
ऍमवे इंडिया ही अमेरिकेतील ऍमवे कॉर्पोरेशनची संपूर्ण मालकीची कंपनी आहे. ही मूळ अमेरिकेतील कंपनी असून भारत सरकारकडून सर्व संमती आणि परवानगी मिळाल्यानंतर कंपनीने येथील आपला व्यवसाय १९९८ साली सुरू केला आहे.

Wednesday, 14 May 2008

जयपूर अजूनही दहशतीच्या छायेत चौकशीसाठी आठ जण ताब्यात

भीती आणि सन्नाटा...
महिलेचा हात असल्याची चर्चा
अमेरिकेची मदतीसाठी तयारी
बिहारमध्ये अतिदक्षतेचा आदेश

जयपूर, दि. १४ : मंगळवारी बॉम्बस्फोट मालिकेने हादरलेले जयपूर शहर अजूनही दहशतीच्या छायेखाली असून, स्फोटांच्या चौकशीसाठी आठ संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान, या शहरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
या स्फोटांतील प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना पाच लाख रुपये व जखमीच्या नातेवाईकांना एक लाख रुपये राजस्थान सरकारतर्फे देण्यात येणार आहेत. मंगळवारी सायंकाळी बॉम्बस्फोट झाल्यानंतर संपूर्ण जयपूर शहरासह देशभरात खळबळ उडाली. सलग ९ स्फोटांनी नागरिक हादरून गेले. राजस्थान सरकारने राज्यात राजकीय दुखवटा जाहीर केला आहे. स्फोटांमुळे हादरलेल्या जयपूरच्या नागरिकांमध्ये अजूनही भीतीचे वातावरण आहे. जयपूरमधील १५ पोलिस ठाण्यांच्या क्षेत्रात दक्षतेचा उपाय म्हणून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. ही संचारबंदी सकाळी ९ पासून सायंकाळी ६ पर्यंत लागू राहणार आहे. लाल कोठी, आदर्श नगर, ट्रान्सपोर्ट नगर, मानक चौक, सुभाष चौक यासह १५ ठिकाणी ही संचारबंदी लावण्यात आली आहे. बॉम्बस्फोट आणि अन्य कारणांनी दगावलेल्यांच्या अंत्यसंस्काराला फक्त यातून सूट दिली गेली आहे.
आठ जणांची चौकशी
दरम्यान, कालच्या बॉम्बस्फोट प्रकरणी चौकशीसाठी पोलिसांनी आठ जणांना ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे.
याबाबत माहिती देताना वरिष्ठ पोलिस अधिकारीअमरज्योत सिंह गिल यांनी सांगितले की, ज्या आठ जणांना आम्ही ताब्यात घेतले आहे त्यांची नावे गुप्त ठेवण्यात आली आहेत. यात महिलेचा समावेश असल्याची चर्चा आहे. मात्र नेमकी कोणाला अटक करण्यात आली आणि यात कोणावर संशय आहे, या सर्व बाबी चौकशीच्या टप्प्यात आहेत. त्याविषयी कोणतीही माहिती जाहीर करण्यात आलेली नाही.
स्फोटामागे पाकचा हात
जयपूरमधील स्फोटांमागे थेट पाकचाच हात असल्याची शक्यता गुप्तहेर संघटनांच्या अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे.
याबाबत माहिती देताना पोलिस महासंचालक कुलदीप खोडा यांनी सांगितले की, काश्मिरातील नव्याने सुरू झालेली घुसखोरी आता पाक पुन्हा अतिरेकी हल्ले वाढवित असल्याचेच द्योतक आहे. दोन दिवसांपूर्वी सीमेवरील सांबा क्षेत्रात अतिरेक्यांनी हैदोस घातला. तेथे अतिरेक्यांनी निरपराध नागरिक आणि सुरक्षा जवानांना ठार केले. आता त्यांनी जयपूरमध्ये स्फोट घडवून आणले आहेत. या सर्व प्रकारांतून पाकचे मनसुबे फारच घातक दिसत आहेत.
मंगळवारी झालेल्या स्फोटातील मृतांची संख्या १०० च्या वर गेली आहे. शिवाय, शेकडो लोक जखमी अवस्थेत सध्या जयपूरमधील विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. त्यातील काहींची प्रकृती गंभीर आहे. राजस्थानचे गृहमंत्री गुलाबचंद कटारिया यांनी आज सर्व रुग्णालयांमध्ये जाऊन जखमींची विचारपूस केली आणि मृतांच्या नातेवाईकांचे सांत्वन केले. पण, एकंदर जखमींची स्थिती पाहता मृतांचा आकडा वाढू शकतो असे त्यांनी सांगितले आहे.
जयपूरमधील बॉम्बस्फोट मालिकेच्या पार्श्वभूमीवर आज बिहार सरकारने राज्यात "रेड अलर्ट' जारी केला आहे.
अमेरिकेची मदतीची तयारी
या संदर्भात तपासाच्या मदतीसाठी अमेरिकेने हात पुढे केला आहे. तसेच बॉंबस्फोटांच्या मालिकेचा ब्रिटन, फ्रान्स, इस्रायल, कॅनडा आदी अनेक देशांनी निषेध केला आहे.
--------------------------------------------------------------------
स्फोटांसाठी सायकलींचा वापर
या स्फोटांसाठी अमोनियम नायट्रेट आणि एकाच ब्रॅंडच्या रेसर सायकलींचा वापर करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. अशाच प्रकारे उत्तर प्रदेशातील न्यायालयाच्या परिसरात व हैदराबादमध्ये मशिदीत स्फोट घडवून आणण्यात आले होते. त्यामुळे आता जयपूर शहर आणि आसपासच्या भागातील सायकल विक्रेत्यांकडे पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.

मराठी चित्रपटांचा खजिना गोमंतकीयांच्या भेटीला...

पणजी, दि. १४ (प्रतिनिधी): 'व्हिन्सन ग्राफिक्स'तर्फे गोव्यात ६ आणि ७ जून रोजी येथील 'मॅकेनिझ पॅलेस'मध्ये मराठी चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. अशा फक्त मराठी चित्रपटांचा सहभाग असलेल्या चित्रपट महोत्सवाचे गोव्यात प्रथमच आयोजन करण्यात आल्याने त्यांचा आनंद लुटण्याची संधी गोमंतकीय रसिकांना उपलब्ध झाली आहे.
या चित्रपट महोत्सवात "ध्यासपर्व, कैरी, वास्तुपुरुष, देवराई, एवढंसं आभाळ , नॉट ओन्ली मिसेस राऊत' आदी गाजलेल्या चित्रपटांचा समावेश करण्यात आला आहे. यातील काही चित्रपटांशी संबंधित कलाकार, दिग्दर्शक, अभिनेते यांच्याशी बातचीत करण्याची संधीही गोमंतकीयांना या महोत्सवाद्वारे मिळणार आहे.
या महोत्सवाच्या आयोजनासाठी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना करण्यात आली आहे. गोवा मनोरंजन सोसायटी व कला संस्कृती खात्याच्या संयुक्त विद्यमाने या चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सुदैवाने सध्या मराठी चित्रपटांना उर्जितावस्था प्राप्त झाली आहे. साडेमाडे तीन, टिंग्या, दे धक्का यासारख्या मराठी चित्रपटांचा बोलबाला झाला आहे. नवनवे प्रयोग आणि तांत्रिक अंगानेही हे चित्रपट सकस होत चालल्याचे दिसून येते. या पार्श्वभूमीवर या चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे लोकांमध्ये आगळी उत्सुकता निर्माण झाली आहे.

जूनच्या दुसऱ्या आठवड्यात गोव्यात मान्सूनचे आगमन!

पणजी, दि. १४ (प्रतिनिधी) : मान्सूनने निर्धारित वेळेच्या पाच दिवस आधीच दक्षिण अंदमान आणि बंगालच्या उपसागराला धडक दिल्याने जूनच्या दुसऱ्या आठवड्यात त्याचे गोव्यात आगमन होण्याची शक्यता पणजी वेधशाळेचे प्रमुख के. व्ही. सिंग व्यक्त केली आहे.
दक्षिण अंदमान आणि बंगालच्या उपसागराला वेळेपूर्वीच मान्सून धडकल्याने आठवडाभरातच मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची आशा यामुळे बळावली आहे. बंगालच्या उपसागरात कोणताही अडथळा निर्माण झाला नाही तर केरळात मान्सून पोहोचण्यासाठी सुमारे दहा ते बारा दिवस लागतात. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा वाढू लागला आहे. केरळमध्ये मान्सून पोहोचल्यावर आठवडाभरात तो गोव्यात दाखल होतो. यंदा तो वेळेपूर्वीच गोव्यात दाखल होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही श्री. सिंग यांनी सांगितले.
गेल्या काही दिवसांपासूनच अंदमान आणि निकोबारमध्ये मुसळधार पाऊस कोसळत असून वादळी वारेही वाहात आहेत. या भागात मान्सून वेळेपूर्वीच सक्रिय होण्यासाठी ही स्थिती पोषक असल्याने अपेक्षेनुसार आज तेथे मान्सूनचे ढग सक्रिय झाले.
आगामी दोन दिवसांतच अंदमान आणि बंगालचा उर्वरित भाग मान्सूनमुळे व्यापला जाईल. त्यानंतर एक-दोन दिवसांतच या संपूर्ण भागात धो-धो पाऊस होण्याची शक्यता आहे. अंदमानमध्ये वेळेपूर्वी मान्सून दाखल झाला असल्याने केरळातही तो २० मेपर्यंत दाखल होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी केरळात २६ मे रोजी मान्सूनचे आगमन झाले होते. एरवी केरळमध्ये मान्सूनचे आगमन १ जूनच्या आसपास होते. महागाईने त्रस्त झालेल्या सामान्य जनतेला आणि विशेषतः शेतकऱ्यांसाठी ही खूषखबरच म्हटली पाहिजे.

चीनमधील बळींची संख्या २० हजारांवर

बीजिंग, दि.१४ : चीनच्या दक्षिणपश्चिमेकडे असलेल्या सिचुआन प्रांतात आलेल्या भीषण भूकंपामुळे मोठ्या प्रमाणावर हानी झाली असून त्या क्षेत्रात सुरू असलेल्या मदत कार्यात वाढ करण्यात आली आहे. मदत पथके वाढविण्यात आली असून खाद्यान्नाचा पुरवठा करण्याची क्षमताही वाढविली आहे. मदत कार्याप्रमाणेच बेपत्ता लोकांचा व मृतकांचा शोध घेण्याचे कामही वेगाने सुरू असून आजपर्यंत मृतकांचा आकडा २० हजारापर्यंत गेला असल्याचे वृत्त आहे. अजूनही हजारो लोक गाडले गेले, फसले किंवा बेपत्ता असल्याची माहिती आहे.
मियानयांग शहरात मदत पथक पोहोचले असून त्यांना प्राप्त झालेल्या माहितीनुसार मृतकांचा आकडा ३६२९ वरून वाढून ५५४० एवढा झाला आहे. याशिवाय १८,४८६ पेक्षा जास्त लोक गाडले गेले आहेत, तर १३९६ बेपत्ता आहेत.
झिन्हुआ या सरकारी वृत्त संस्थेने दिलेल्या माहितीनुसार वेचुआन प्रदेशातील यिंग्रझियू गावातील लोकवस्ती दहा हजाराच्या जवळपास होती. त्यापैकी फक्त २३०० लोक मदत शिबिरात पोहोचले आहेत.
आधीच्या वृत्तानुसार या भूकंपातील मृतकांचा आकडा १२ हजार जाहीर करण्यात आला होता. मदत कार्यात जसजसा वेग येत आहे, तसतशी मृतकांची संख्या वाढत आहे. वेनचुआन प्रदेशात तर मृतकांची संख्या आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
भूकंपामुळे उद्ध्वस्त झालेल्या परिसरात सध्या २० हजार सैनिक मदत कार्यात गुंतले असून आणखी ३० हजार सैनिक विविध मार्गांनी पाठविण्यात आले आहेत. याशिवाय पीपल्स लिबरेशन आर्मीनेही आपल्या ३० हजार पेक्षा जास्त गटांना मदत कार्याचे आदेश दिले आहेत.

पाकिस्तानकडून सीमेवर गोळीबार

श्रीनगर, दि.१४ : पाकिस्तानने सलग दुसऱ्यांना युद्धबंदी कराराचे उल्लंघन करीत आज सीमेवर गोळीबार केला.
आज पहाटेच्या सुमारास आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानी लष्कराने गोळीबाराला सुरुवात केली. प्रत्युत्तरादाखल भारतीय लष्करानेही गोळीबार केला. यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, पाकने विनाकारणच आज सीमेवर गोळीबार केला. हे तर थेट युद्धबंदी कराराचे उल्लंघनच आहे. या प्रकरणी लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आज तातडीची बैठक बोलाविली आणि त्यात यावर चर्चा झाली. घुसखोरीविषयी पाकशी लवकरच चर्चा केली जाईल, असे वक्तव्य आज विदेश सचिवांनी दिल्याचे समजते.
एका आठवड्यात सलग दुसऱ्यांदा पाकिस्तानी लष्कराने युद्धबंदी कायद्याचे उल्लंघन केले आहे. यापूर्वी सांबा क्षेत्रातही पाकिस्तानी रेंजर्सनी विनाकारणच गोळीबार केला होता. त्याचवेळी अतिरेक्यांच्या एका मोठ्या जत्थ्याने भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, भारतीय लष्कराने हा प्रयत्न हाणून पाडला होता.

Tuesday, 13 May 2008

जयपुरात बॉंबस्फोट किमान 60 जण ठार, 150 जखमी

पाच ठिकाणी स्फोट
आरडीएक्सचा वापर
मोबाईल सेवा ठप्प
दिल्ली, मुंबईसह
देशभरात अतिदक्षता

जयपूर, (राजस्थान) दि. १३ : 'गुलाबी शहर' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जयपूर शहराला आज पहाटे वादळ व मुसळधार पावसाने झोडपून काढल्यावर त्यातून जयपूरवासी सावरत होते. त्याचवेळी संध्याकाळी १५ मिनिटांच्या काळात पाच बॉम्बस्फोटांनी हे शहर हादरले. या स्फोटांत आतापर्यंत अनधिकृत माहितीनुसार किमान ३५ लोक ठार झाले, तर अनेक लोक जखमी झाले. जयपुरात बॉम्बस्फोट मालिका होण्याची ही पहिली वेळ आहे. या पार्श्वभूमीवर नवी दिल्ल्ली व मुंबईसह देशातील अनेक शहरांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे.
शहराचा अतिशय गजबजलेला भाग असलेल्या मानक चौक, त्रिपोलिया, चांदपोल बाजार व येथून जवळ असलेेले हनुमान मंदिर, सुभाष चौक या भागात हे स्फोट झाले. शहरात असलेल्या जगप्रसिद्ध हवामहलला सुदैवाने हानी पोहोचली नाही.
मानक चौकात झालेला स्फोट एका कारमध्ये झाला. यात कारमधील सर्व लोक ठार झाले.चांदपोल बाजार येथे एका गॅससिलेंडरमध्ये स्फोट झाल्याची माहिती आहे. या स्फोटांची जबाबदारी अजून कोणत्याही दहशतवादी संघटने स्वीकारलेली नाही. शहरात जेथे हे स्फोट झाले तेथे मोठ्या प्रमाणात विदेशी पर्यटक फिरायला येतात. याच भागात मोठ्या प्रमाणावर व्यापारी उलाढाल होत असते.
अद्यापही तेथे गोंधळाचे वातावरण असून लोक घाबरले आहेत. या घटनेने पोलिस दक्ष झाले असून त्यांनी चौकशीला प्रारंभ केला आहे. आज मंगळावर असल्याने चांदपोल बाजाराजवळील हनुमान मंदिरात मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होती. या ठिकाणी झालेल्या स्फोटात किती लोक ठार वा जखमी झाले याची निश्चित माहिती मिळाली नाही. जखमींना इस्पितळांत दाखल करण्यात येत असून स्फोटांनंतर जयपूर शहरातील मोबाईल सेवा ठप्प झाली आहे.

चीनमध्ये मृतकांची संख्या 12 हजारांवर

पावसामुळे मदतकार्यात अडथळे
बीजिंग, दि. १३ : चीनच्या दक्षिण पश्चिम सिचुआन प्रांतात सोमवारी आलेल्या जबरदस्त भूकंपामुळे दगावणाऱ्यांची संख्या १२ हजारांवर पोहोचली आहे. भूकंपग्रस्तांच्या मदत कार्यात पावसामुळे बाधा निर्माण झाली असून असंख्य लोक अजूनही भूकंपाच्या दहशतीतून सावरलेले नाहीत.
चीनच्या सरकारी वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, सिचुआन प्रांताच्या मियांजू शहरातच कमीत-कमी दहा हजार लोक मलब्याखाली दबले आहेत. गेल्या तीन दशकातील हा चीनमधील सर्वात भीषण भूकंप असल्याचे सांगितले जात आहे. सोमवारी रात्रीपासूनच येथे मुसळधार पाऊस सुरू झाल्याने विविध रस्त्यांचा संपर्क तुटला आहे आणि त्यामुळे मदतकार्यात अडथळे निर्माण झाले आहेत. प्रशासनाला भूकंपग्रस्तांपर्यंत पोहोचणे कठीण होऊन बसले आहे.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन चीन सरकारने मोठ्या प्रमाणावर मदत कार्य हाती घेतले आहे. भूकंपप्रभावित क्षेत्रात लष्कराला पाचारण करण्यात आले आहे. पंतप्रधान जिआबाओ यांनी या घटनेबाबत तीव्र दु:ख व्यक्त केले असून नागरिकांनी शांतता, संयम आणि आत्मविश्वासाने या संकटाचा सामना करावा, असे आवाहन केले आहे. वाहतूक सुरळीत होण्यासाठी ठिकठिकाणी पडलेला मलबा हटविण्याचे आदेश जारी करणयत आले आहे. आज सकाळी पंतप्रधानांनी भूकंपाच्या अनुषंगाने एक तातडीची बैठक बोलाविली आणि येणारा प्रत्येक क्षण मदतकार्याच्या दृष्टीने अतिशय मौल्यवान असल्याचे सांगून परस्पर सहकार्याने काम करण्याचे मंत्रिमंडळ तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
भूकंपामुळे असंख्य शाळा, कारखाने, घरे आणि रुग्णालयांच्या इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. भूकंपाचे सर्वात भीषण दृश्य दुजियांगयान शहरात पाहायला मिळाले. येथे एका शाळेची तीन मजली इमारत कोसळून मलब्याखाली ९०० मुले दबली आहेत. स्थानिक नागरिकांनी बहुतांश मुलांना वाचविले. पण, अजूनही नेमकी किती बालके दगावली, याची आकडेवारी समजू शकलेली नाही. बेइचुआन या गावातील तर ८० टक्क्यांहून अधिक घरे ध्वस्त झाली आहेत. एकट्या या प्रांतात सात हजार लोक दगावल्याचे वृत्त आहे. प्रशासनाने भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी तातडीने चिकित्सा पथक रवाना केले आहे.
१५ ब्रिटिश पर्यटक बेपत्ता
सोमवारी चीनमध्ये आलेल्या भूकंपात १५ ब्रिटिश पर्यटक बेपत्ता झाल्याचे वृत्त आहे. हे पर्यटक सिचुआन प्रांतातील वोलोंग येथे वास्तव्यास होते. दरम्यान, या भूकंपाच्या घटनेमुळे येथील ऑलिम्पिक आयोजनाबाबतची चिंता वाढली आहे. पण, चिनी प्रशासनाने ऑलिम्पिक स्थळ पूर्णत: सुरक्षित असल्याचे म्हटले आहे. ऑलिम्पिकची सर्व ३१ आयोजनस्थळे सुरक्षित आहेत. कारण ते भूकंपनिरोधक तंत्राने तयार करण्यात आले आहेत. असे असले तरी भूकंपामुळे एका स्टेडियमचे नुकसान झाल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले.
भूकंपामुळे चीनमध्ये असंख्य समस्या निर्माण झाल्या आहेत. भूकंपप्रभावित क्षेत्रातच नव्हे, तर आसपासही वीजव्यवस्था कोलमडली असून दूरसंचार केंद्रेही ठप्प झाली आहेत. या भूकंपाची तीव्रता इतकी भयंकर होती की, त्याचे धक्के पाकिस्तान, इंडोनेशिया, थायलण्ड आणि व्हिएतनामपर्यंत जाणविले. यापूर्वी चीनमध्ये १९७६ साली तंग्शान प्रांतात प्रचंड विनाशकारी भूकंप आला होता. त्यावेळी अडीच लाख लोक दगावले होते.
दलाई लामा यांना दु:ख
चीनमधील विनाशकारी भूकंपात दगावलेल्या नागरिकांबाबत तिबेटी धर्मगुरू दलाई लामा यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे.
त्यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे की, चीनमधील या दु:खद आपत्तीने मला धक्काच बसला. या भूकंपामुळे प्रभावित झालेल्या सर्व कुटुंबांविषयी माझ्या संवेदना हळव्या झाल्या आहेत. या भूकंपाच्या धक्क्यात सर्वस्व गमावून बसलेल्यांसाठी मी प्रार्थना करीत असल्याचेही ते म्हणाले.

आईवडिलांचे ऋण फेडणे अशक्यः अमिताभ

पणजी, दि. १३ (प्रतिनिधी): माणसाच्या जीवनात आईवडिलांचे स्थान हे सर्वोच्च आहे. आईवडील आमच्यासाठी जे काही करतात ते अजोड असते. ते ऋण आम्ही कदापि फेडू शकत नाही. मोठ्या मनाने केवळ त्यांचे स्मरण करणे एवढेच आमच्या हाती असते. आम्ही आज जे काही आहोत ते आमच्या आईवडिलांच्या पुण्याईमुळेच आहोत. राजने आपल्या आईवडिलांच्या आठवणीसाठी आज पुस्तक रूपाने व्यक्त केलेले ऋण माझ्या ह्रदयाला भावले. या मनस्वी कृतीमुळे मी सद्गदित झालो. या कृतीतून राजच्या जडणघडणीची झलक दिसून येते, अशा शब्दांत महानायक अमिताभ बच्चन यांनी गोव्यातील आघाडीचे उद्योजक दत्तराज साळगावकर यांचे कौतुक केले. श्री. साळगावकर यांनी प्रकाशित केलेल्या "अपरांत - लॅंड बियॉंड दी एन्ड' या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून अमिताभ बोलत होते. सभापती प्रतापसिंग राणे याप्रसंगी सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते.
मोजक्याच उपस्थितांच्या या छोटेखानी समारंभात हॉटेल मेरियॉटच्या लॉन्सवर गोव्याची प्रतिमा आणि अस्मिता आपल्या कार्यातून ज्यांनी जपली व राखली अशा काही मान्यवरांचा सन्मान या प्रसंगी करण्यात आला. या मान्यवरांमध्ये रवींद्र केळेकर, मारियो मिरांडा, विसूबाब पाणंदीकर, चंद्रकांत केणी, रेमो फर्नांडिस, इव्हाना फुर्तादो, तियात्र कलाकार प्रिन्स जेकब व उंबेर्तो यांचा समावेश होता. या प्रसंगी बोलताना अमिताभ म्हणाले, माझे आणि गोव्याचे नाते हे खूप जुने. ख्वाजा अहमद अब्बास यांनी गोव्याच्या मुक्तीलढ्यावर आधारीत काढलेल्या सात हिंदुस्थानी या चित्रपटाद्वारे माझी गोव्याशी ओळख करून दिली. अब्बास हे समाजवादी होते, या चित्रपटाच्या निमित्ताने त्यांनी आम्हा कलाकारांना समाजवाद्यांसारखेच जगण्याचे धडे दिले. शुटिंगच्या निमित्ताने आम्ही गोव्याच्या कानाकोपऱ्यात फिरलो. गोव्यातील अनेक जंगलांची मला चांगलीच ओळख आहे. गोव्यातील अनेक सरकारी विश्रामगृहे जेथे ना धड पाणी ना धड वीज अशी ठिकाणेही माझ्या परिचयाची आहेत. अनेक रात्री आम्ही केवळ साध्या जमिनीवर झोपून काढल्या. त्या अथक एका महिन्याच्या धावपळीनंतर जेव्हा मी पणजीत पाऊल ठेवले तो क्षण खूपच सुखद होता. ते दिवस खूपच सुंदर होते कारण तेव्हा गोवा अधिक सुंदर, खूप शांत आणि कमी गजबजलेला होता. त्यानंतर अमजद खान यांना झालेल्या जीवघेण्या अपघाताच्या निमित्तानेही गोव्याच्या लोकांशी माझा जवळचा संबंध आला. गोवेकर हे खूप प्रेमळ, विशाल ह्रदयी असल्याचा अनुभव मी त्यावेळीही घेतला. दत्तराज व त्यांच्या कुटुंबाशी माझे खूप जवळचे नाते आहे. आई वडिलांचे आशीर्वाद असेच राजच्या पाठीशी राहतील आणि त्याला याहूनही मोठा करतील.
अमिताभ यांच्या आगमनाने कार्यक्रमाच्या ठिकाणी सगळे वातावरणच चैतन्यदायी बनले. बॉलिवूडच्या या बादशहाने एका कोपऱ्यात बसलेल्या पॉपसिंगर रेमो याला पाहिले, तेव्हा स्वतः होऊन ते रेमोच्या जवळ गेले व त्याला प्रेमपूर्वक आलिंगन दिले. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे अमिताभ वेळेच्या काही मिनिटे आधीच कार्यक्रमाच्या ठिकाणी पोचले.
दत्तराज यांनी या प्रसंगी सर्वांचे स्वागत करताना, माझ्या वडिलांची ही ब्याणव्वावी जयंती असे सांगून, अशा कुटुंबात जन्म झाला हे मी माझे भाग्य समजतो. वयाच्या दहाव्या वर्षी माझे आजोबा वारले. केवळ स्वकष्टावर वडिलांनी पुढे हा लौकिक मिळवला. माझी आई एक उत्तम गृहिणी व कुटुंब वत्सल होती. तिने आमची चांगली जडणघडण केली. जनमत कौलावेळी गोव्याचे वेगळे अस्तित्व राखण्यासाठी तसेच कोकणीसाठी माझ्या खूप महत्त्वाची भूमिका बजावली. अशा आईवडिलांच्या स्मरणार्थ मी हे पुस्तक त्यांना अर्पण करत असल्याचे सांगितले. या पुस्तकात एकूण एक्कावन लेखकांनी गोव्याशी संबंधित विविध विषयांवर लेखन केले आहे. पां. पु. शिरोडकर, मारिया आवरोरा कुतो, रेमो फर्नांडिस, वेंडल रॉड्रीक्स, मारियो काब्राल ई सा आदींचा त्यात समावेश आहे. प्रख्यात पत्रकार आणि अमेरिकास्थित गोमंतकीय लेखक व्हिक्टर रेंजल रिबेरो यांनी या पुस्तकाचे संपादन केले आहे. सभापती राणे यांनी काही जुन्या आठवणींना उजाळा देताना व्ही. एम. व आपले जवळचे नाते होते व गोव्याच्या आर्थिक विकासात त्यांचा मोठा सहभाग असल्याचे नमूद केले. सौ. दीप्ती साळगावकर यांनी उपस्थितांची ओळख करून दिली. दत्तराज यांनी आभार मानले.

सरकार परस्कृत स्वस्ताईची घोषणा

२१ मेपासून प्रत्येक गावात मिळणार जीवनावश्यक वस्तू
पणजी, दि. १३ (प्रतिनिधी): महागाईवर कशा पद्धतीने नियंत्रण मिळवता येथे याचे उदाहरण भारतीय जनता पक्षाने दाखवून दिल्यानंतर राज्य सरकारला आता जाग आली आहे. म्हणूनच बाजारापेक्षा पाच रुपये कमी दराने काही कडधान्ये, भाज्या, तेल आणि नारळ महिन्यातून एकदा राज्यातील प्रत्येक गावात उपलब्ध करण्याचे सरकारने ठरवले आहे. ही योजना २१ मेपासून सुरू होण्याची शक्यता असून किमान सहा महिने ती राबवली जाईल. त्यामुळे सरकारी तिजोरीवर सुमारे ७५ लाख रुपयांचा भार पडणार आहे.
ही माहिती सचिवालयात झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री दिगंबर कामत आणि वित्तमंत्री दयानंद नार्वेकर यांनी दिली. आज पर्वरीत झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. पत्रकार परिषदेला गृहमंत्री रवी नाईक व पंचायत मंत्री बाबू आजगावकर उपस्थित होते.
दरमहा रेशन कार्डावर दोन किलो तूरडाळ, दोन लीटर पाम तेल, दोन किलो वाटाणे, दोन किलो मूग, दोन किलो आटा व सहा नारळ दिले जातील. सध्या बाजारात तूरडाळ ४० रुपये किलो असून ती ३५ रुपये किलो विकली जाणार आहे. तसेच पाम तेल ५० रु., वाटाणे २२ रु., मूग ३० रु., आटा २३ रु., तर ६.५० रुपयांना एक नारळ विकला जाणार आहे. महागाई गगनाला भिडल्याने सामान्य माणसाचे कंबरडे मोडले आहे. त्यावर काही प्रमाणात मलमपट्टी करण्यासाठी सरकारने अखेर आज ही योजना जाहीर केली.
रेशन कार्डावर रास्त दरात गरजेच्या वस्तू उपलब्ध करण्यासाठी राज्यातील १० बागायदार, ८ मार्केटिंग फेडरेशनची केंद्रे, ५५ कृषी केंद्र, ६७ विविध कार्यकारी सोसायट्या व ४० ग्राहक सोसायटी या केंद्रांद्वारे ही योजना राबवली जाणार आहे. तसेच राज्यातील ग्रामीण भागातील नागरीकांना या योजना लाभ देण्यासाठी १८९ पंचायतीपर्यंत जाणार असल्याचे नार्वेकर यांनी सांगितले.
त्याचप्रमाणे सुमारे ८ वाहनांतून प्रत्येक गावात टोमॅटो, बटाटे, कांदे व अन्य भाज्यांची घाऊक विक्री केली जाणार आहे. सरकारने ठरवलेल्या या प्रत्येक वस्तूवर किमान पाच रुपये कमी करण्यात आले असल्याने त्याचा सुमारे दरमहा ७० ते ७५ लाख रुपये भार सरकारी तिजोरीवर पडणार असल्याचे नार्वेकर यांनी सांगितले.

सार्दिन खोटारडे : डॉ. विली

'सरकार कधीही कोसळू शकते'
पणजी, दि. १३ (प्रतिनिधी): वित्तमंत्री दयानंद नार्वेकर यांचे खाते काढून घेण्याची मागणीच झाली नाही असे सांगणारे कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष फ्रान्सिस सार्दिन खोटे बोलत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष डॉ. विल्फ्रेड डिसोझा यांनी आज येथे केला. सध्याचे सरकार अद्याप स्थिर नसून कर्नाटकात निवडणुका होताच कधीही ते गडगडू शकते असे राजकीय भाकीतही त्यांनी वर्तवले.
मडगाव येथील "हयात' हॉटेलमध्ये दोन्ही पक्षाच्या समन्वय समितीच्या बैठकीत राष्ट्रवादीचे राष्ट्रीय नेते प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत पक्षाने ऍड. नार्वेकर यांचे वित्तखाते काढून घेण्याची मागणी केली होती. आणि त्यावेळी फ्रान्सिको सार्दीन त्यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
काल कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष सार्दीन यांनी ऍड. दयानंद नार्वेकर आणि रवी नाईक यांचे खाते काढून घेण्यासाठी कोणीच मागणी केली नव्हती आणि तशी कोणती चर्चाही समन्वय समिती बैठकीत झाली नव्हती, असा दावा केला होता. मात्र, दोन्ही मंत्र्यांची खाती काढून घेण्याची मागणी झाल्याचे पुरावा म्हणून डॉ. डिसोझा यांनी समन्वय बैठकीनंतर काही वृत्तपत्रांवर तशा बातम्या प्रसिद्ध झालेल्याचे कात्रण सादर केले आणि श्री. सार्दीन हे खोटे बोलत असल्याचा आरोप केला.
गेल्या १५ फेब्रुवारी महिन्यात केलेल्या या मागणीचा ऐवढ्यात कॉंग्रेस पक्षाला विसर पडला का, अशा प्रश्न त्यांनी करून ती मागणी राष्ट्रवादीचे अद्याप कायम असल्याचा दावा केला. डॉ. डिसोझा आज पक्ष कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांच्याबरोबर सुरेंद्र फुर्तादो उपस्थित होते.
मुख्यमंत्री दिगंबर कामत यांचे सरकार अद्याप स्थिर नसून समन्वय समितीच्या बैठकीत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी. राष्ट्रवादी बरोबर मगोचेही आमदार दीपक ढवळीकर यांना दिलेल्या आश्वासनाचे अजुनी पूर्तता करण्यात आली नसल्याचे ते यावेळी म्हणाले.
जानेवारी महिन्यात मालपे पेडणे येथे भीषण अपघात झाला नसता तर, त्याचवेळी विधानसभा अधिवेशनात सरकार पडले असते. त्यावेळी अनेकांनी तशी तयारी ठेवली होती आणि अजुनीही ती आहे, असा गौप्यस्फोट डॉ. डिसोझा यांनी केला. वित्तमंत्र्यांनी अधिवेशनात अर्थसंकल्प मांडल्यानंतर त्याचे खाते काढून घेऊ, असे आश्वासन मुख्यमंत्री कामत यांनी आपल्याला त्यावेळी दिले होते, असे डॉ. डिसोझा यांनी यावेळी बोलताना पत्रकार परिषदेत सांगितले.

कर्नाटक निवडणुकीनंतरच बाबूश होणार मंत्री

पणजी, दि. १२ (प्रतिनिधी): कर्नाटक राज्याची निवडणूक होताच ताळगावचे आमदार बाबूश मोन्सेरात यांना दिगंबर कामत मंत्रिमंडळात सामावून घेतले जाण्याची शक्यता असून पक्षश्रेष्ठींनी त्यास मान्यता दिल्याचे कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार फ्रान्सिको सार्दीन यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले. त्यामुळे एका मंत्र्याला पायउतार व्हावे लागणार असून आता कोणाचे मंत्रिपद जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
गेल्या वेळी झालेल्या समन्वय समितीच्या बैठकीत कॉंग्रेस श्रेष्ठींनी बाबूश यांना मंत्रिमंडळात सामावून घेण्याचे आश्वासन दिले होते. कॉंग्रेसने दिलेल्या शब्दाची पूर्तता केली जात असल्याने बाबूशसाठी मंत्रिमंडळातील एकाला जागा खाली करणे भाग आहे. त्यासाठी कोणाचे मंत्रिपद काढावे, हा निर्णय पूर्णतः दिल्लीत घेतला जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
कॉंग्रेसच्या विरोधात निवडणूक लढवून विजयी झालेल्या उमेदवारांना मंत्रिपद बहाल करण्यासाठी निष्ठावंतांना डच्चू देण्याचे प्रकार वाढल्याने कॉंग्रेसअंतर्गत वादळ उठण्याची शक्यता निर्माण झाली आहे. श्रेष्ठींच्या या भूमिकेमुळे अनेक निष्ठावंत हिरमुसले आहेत. म.गो.च्या तिकिटावर निवडून आलेल्या सुदिन ढवळीकर यांना सरकारात घेण्यासाठी डच्चू दिलेल्या कुभांरजुव्याचे आमदार पांडुरंग मडकईकर यांचा अद्याप विचारच झालेला नाही. मडकईकरांचे वाहतूक मंत्रिपद गेल्यानंतर दिल्लीत जाऊन त्यांनी श्रीमती सोनिया गांधी यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांचे राजकीय पुनर्वसन करण्याचे आश्वासन त्यांना देण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर निष्ठावंतांनी एकत्र येऊन बंडाचे रणशिंग फुंकण्याची तयारी चालवल्याची माहिती मिळाली आहे.

'त्या' ८७ कामगारांची परवड अजूनही सुरूच

रस्त्यावर उतरण्याचा इशारा
पणजी, दि. १२ (प्रतिनिधी) : आरोग्य खात्यातील "त्या" ८७ रोजंदारी कामगारांना सेवेत कायम करण्याची सर्व प्रक्रिया पूर्ण होऊनही त्यांना डावलण्यासाठी एका मंत्र्यांकडून जोरदार प्रयत्न होत असल्याचे त्याविरोधात रस्त्यावर उतरण्याचा इशारा या कर्मचाऱ्यांनी दिला आहे. मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी या प्रकरणात त्वरित लक्ष घालून आपल्याला न्याय द्यावा, अशी जोरदार मागणी त्यांनी केली आहे.
शैक्षणिक पात्रतेच्या आधारे सरकारी सेवेत कायम करण्याचे आश्वासन राज्याचे ऍडव्होकेट जनरल ऍड. सुबोध कंटक यांनी काही दिवसांपूर्वी उच्च न्यायालयाला दिले होते. मात्र त्यानंतर एका मंत्र्याने पुढाकार घेऊन सरकारतर्फे या निवड प्रक्रियेत नवे बदल करण्यावरून याचिका दाखल करण्यात आल्याने या कर्मचाऱ्यांचे भवितव्य पुन्हा धोक्यात आले आहे. या प्रकरणात विरोधी पक्ष नेते मनोहर पर्रिकर यांनी लक्ष घालावे, अशी मागणी या कर्मचाऱ्यांनी केली आहे.
गेल्यावेळी या कर्मचाऱ्यांनी पर्वरी येथे मुख्यमंत्री कामत यांची भेट घेतली होती. त्यावेळी यासंदर्भात आपण अभ्यास करून येत्या आठ दिवसांत पुढील निर्णयाची माहिती देऊ, असे आश्वासन त्यांनी देण्यात आले होते. तथापि, त्यानंतर अद्याप कोणताच निर्णय झालेला नाही.
या पदासाठी आठवी उत्तीर्ण ही शैक्षणिक पात्रता आहे. या कर्मचाऱ्यांत त्याहीपेक्षा कमी शिक्षण घेतलेले कामगार असल्याने या योजनेचा लाभ त्यांना देणे कठीण होणार आहे. आरोग्य खात्यात मलेरिया व फायलेरीया स्वच्छता मोहिमेअंतर्गत १९९९ साली कंत्राटी पद्धतीवर ६३ जागा जाहीर करून एकूण ७७ कामगारांना कंत्राटी पद्धतीवर घेण्यात आले होते. आरोग्य खात्यातील याच रोजंदारी कामगारांना सरकारी सेवेत कायम करण्यासाठी कॉंग्रेस पक्षाकरता देणगी घेतल्याचा वाद रंगला होता. तेव्हाचे आरोग्यमंत्री दयानंद नार्वेकर यांनी याप्रकरणी उत्तर गोवा कॉंग्रेसचे खजिनदार शिरीष नाईक यांनी हे पैसे घेतल्याचे सांगून खळबळ माजवली होती. शिरीष नाईक यांनी हे पैसे कॉंग्रेसच्या तत्कालीन प्रभारी मार्गारेट आल्वा यांच्याकडे पोहोचवल्याचे सांगून या वादात अधिकच रंग भरला होता. ३६ लाख रुपयांचे हे लाच प्रकरण विरोधी भाजपनेही चांगलेच गाजवले होते.

ब्रह्मानंदाचार्य स्वामी यांची सहावी पुण्यतिथी शनिवारी

कुंडई, ता. १२ : जनकल्याणासाठी जे चंदनाप्रमाणे झिजले व हजारो लोकांच्या संसारात ज्यांनी सुखाचा परिमळ पसरवला त्या परमपूज्य ब्रह्मानंद स्वामी यांचा षष्ठम पुण्यतिथी महोत्सव येत्या शनिवारी (१७ मे रोजी) विद्यमान पीठाधीश ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी यांच्या मुख्य उपस्थितीत तपोभूमी कुंडई येथे साजरा करण्यात येणार आहे.
त्यानिमित्त गुरुवार १५ मेपासून गुरुचरित्राचे पारायण केले जाणार असून ते शुक्रवार व शनिवार असे एकूण तीन दिवस सुरू राहणार आहे. एकूण तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात भरगच्च धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पहाटे पाच वाजता प्रातःस्मरण, त्यानंतर काकड आरती, परमपूज्य ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी यांचे आशीर्वचन, आरती, दर्शन सोहळा आणि महाप्रसादाने कार्यक्रमांची सांगता होईल. दुपारी ३.३० ते ४.३० या कालावधीत भजन होईल. त्यानंतर ४.३० वाजता प्रगट कार्यक्रम होणार आहे. तसेच शुक्रवारपासून यज्ञ सुरू होणार असून तो शनिवारपर्यंच चालणार आहे.
शनिवारी दुपारी चार वाजता पद्मनाभ संप्रदायाचे प्रचारक पुरोहित महेश आरोंदेकर, ज्येष्ठ पुरोहित महादेव बाणावलीकर, बुधाजी बाणावलीकर, उमाकांत नार्वकर तसेच संप्रदायाचे ज्येष्ठ गुरूबंधू ज्ञानेश्वर साळगावकर व रामदास बाणावलीकर यांना गौरवण्यात येणार आहे. याप्रसंगी मुख्यमंत्री दिगंबर कामत, गृहमंत्री रवी नाईक, वाहतूकमंत्री सुदिन ढवळीकर, विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर व आमदार नीळकंठ हळर्णकर उपस्थित राहणार आहेत.

'मेगा' प्रकल्पांविरुद्ध खास संघटना स्थापन

मडगाव,दि. १२ (प्रतिनिधी) : गोव्याच्या किनारपट्टीभागावर बिल्डरांचे होऊ घातलेले आक्रमण हाणून पाडण्याच्या प्रयत्नात आज विविध किनारी भागातून बाणावली येथे एकत्र आलेल्या प्रतिनिधींनी "गाव घर राखण मंच'ची स्थापना करतानाच ग्रामीण भागात येऊ घातलेल्या सर्व महाकाय गृह प्रकल्पाची छाननी ग्रामसभेनेच करण्याची सक्ती करावी, अशी मागणी येथे आयोजित विराट सभेत संमत ठरावाव्दारे करण्यात आली.
या सभेत गोव्याच्या कानाकोपऱ्यातून विविध बिगर सरकारी संघटनांचे प्रतिनिधी तसेच केळशी.करमणे, ओडली, वार्का, बाणावली, कोलवा,बेताळभाटी, माजोर्डा व अन्य भागातील लोक मोठ्या संख्येने हजर होते.
या सभेत एकूण ६ महत्त्वाचे ठराव संमत करण्यात आले. गोव्याचे स्वत्व व वेगळेपण टिकवून ठेवण्याची गरज त्यातून प्रतिबिंबित होताना दिसली. सर्व मेगा प्रकल्पांची छाननी व अभ्यास करण्याची मोकळीक ग्रामसभांना द्यावी,ग्राम पंचायती व सर्व सरकारी संस्थांनी गरजेनुरुप ग्रामविकास आराखडा तयार करावा व तो करताना गावकऱ्यांना त्यात सामावून घ्यावे, पाणी, वीज व अन्य आवश्यक गरजा प्राधान्य तत्त्वावर प्रथम पूर्ण कराव्यात, सर्व नव्या इमारत प्रकल्पांना पावसाचे पाणी जतन करून ठेवण्याची , कचऱ्याची विल्हेवाट , सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प व वृक्षलागवड यांची सक्ती करावी, असे ठराव संमत करण्यात आले.
सर्व ग्रामीण चळवळींना एका छताखाली आणून घटनेच्या ७३ व्या दुरुस्तीतील अधिकारांचा वापर करण्याचा निर्धारही यावेळी केला गेला.तसेच क्षेत्रीय आराखडा हा ग्रामविकास आराखड्यावर आधारून तयार केला जावा व तोपर्यंत कोणत्याही मेगा प्रकल्पाला परवाना देऊं नये असा ठरावही सभेने संमत केला.
या सभेत आवडा, एल्वीश गोम्स, जासिंत फुर्ताद. आर्नाल्ड रॉड्रीगीस, आल्वितो, जेराल्दीन फर्नांडिस, सेराफिन कॉता या स्थानिकाशिवाय रमेश गावस, सबिना मार्टिन, रामा वेळीप, मिंगेल ब्रागांज, फादर मेवरीक फर्नांडिस, प्रवीण सबनीस यांची भाषणे झाली.
स्थानिक प्रतिनिधींनी आपल्या भाषणात मेगा प्रकल्पामुळे स्थानिक लोकांना कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागेल याची माहिती दिली व हे सर्व प्रकल्प पंचायतीने रद्द करावेत अशी मागणी केली.
रमेश गावस यांनी आपले विचार मांडताना किनारपट्टी भागात मेगा प्रकल्प व दुसऱ्या बाजूने खाणींमुळे गोवेकरासमेार भयानक संकट उभे ठाकल्याचा इशारा दिला व संघटीतपणे त्यविरुध्द लढा देण्याची गरज प्रतिपादली.गावच्या लोकांनी ग्रामसभेत मोठ्या संख्येने उपस्थित राहून अशा प्रकल्पांना विरोध करावा. मेगा प्रकल्पाव्दारे मुंबई, दिल्ली व हैद्राबाद येथील मोठाले बिल्डर येथील जमीन गिळंकृत करीत आहेत असा आरोप करून जनमत कौलाप्रंाणे गोव्याच्या रक्षणासाठी लढा देण्याचीन हांक त्यांनी दिली.
सबिना यांनी सरकारने लोकांना हवे तेच दिले पाहिजे असे ठासून सांगताना ग्रामीण भागांचा विकास कसा करावा ते गावचे लोक ठरवतील, बिल्डर नाहीत असे बजावले. पर्यटनाच्या नावाने जुगार,अंमली पदार्थ व वेश्या व्यवसाय फोफावल्याचा आरोप करताना नेमके कोणते पर्यटन आम्हांला हवे ते आम्ही ठरविले पाहिजे असे सांगितले.
फादर मेवरीक यांनी गोवा गोवेकरांचाच राहील हे दाखवून देण्यासाठी हा प्रचंड जनसमुदाय येथे जमल्याचे सांगताना प्रत्येकाला घर असावे व माणसा प्रमाणे रहायला मिळावे असे वाटते ४०ते ५० लाखांची घरे आम्हांला नकेात, मेगा प्रकल्प व सेज या नावाने गोवा विकल्यास भावी पिढी आम हांला कदापि माफ करणार नाही असे बजावले.
प्रवीण सबनीस यांनी संपूर्ण ताकदीने मेगा प्रकल्प रद्द करून घेऊया असे आवाहन केले. मागच्या दरवाजाने गोव्याच्या हिताविरुध्द जमिनी विकू पहाणारे वा त्यांना पाठिंबा देणारे राजकारणीच खरे गोव्याचे खरे शत्रू आहेत असा आरोप त्यांनी केला. सरकारी प्रकल्पासाठी जमीन संपादन करणे सोपे व्हावे म्हणून सरकारने नगर विकास व नियोजन कायद्यात बदल केला आहे व त्याला प्रादेशिक आराखड्यातून वगळले आहे, ते रद्द करण्याची मागणी त्यांनी केली.

मडगाव, फातोर्डातील प्रवेश प्रक्रियाच रहीत

शिक्षण खात्याची घोषणा
मडगाव, दि.१२ (प्रतिनिधी) : मडगाव आणि फातोर्डातील प्राथमिक व माध्यमिक शाळांतील प्रवेशाचा घोळ दूर करण्यासाठी आज आयोजित बैठकीत शिक्षण खात्याच्या संचालकांच्या आडमुठेपणा नडला. त्यामुळे पुढील आदेशापर्यंत प्रवेश प्रक्रिया रहीत करण्याची पाळी शिक्षण खात्यावर आली. दुसरीकडे यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठी आतापर्यंतचे सर्वच प्रवेश रद्द घोषित करून नव्याने केवळ गुणवत्तेच्या निकषावर प्रवेश देण्याची मागणी फातोर्डा नागरिक कल्याण समितीने केली आहे.
गेल्या गुरुवारच्या बैठकीत आज सकाळी ११ वाजता दक्षिण शिक्षण विभागात संयुक्त बैठक घेण्याचे ठरले होते. त्यानुसार फातोर्डा कल्याण समितीचे अध्यक्ष सावियो डायस, संजीव रायतूरकर , शिवराम रायतूरकर व अन्य ३० ते ५० लोक सकाळी ११ वाजता शिक्षण विभाग कार्यालयात आले. तथापि, ठरलेली वेळ उलटून गेली तरी शिक्षण संचालिका सेल्सा पिंटो आल्या नाहीत . नंतर खात्याचे प्रशासन उपसंचालक सावंत यांना पाठवल्याचा निरोप आला व ते १२ च्या सुमारास दाखल झाले . मात्र प्रशासान विभागातील अधिकाऱ्याशी आपण बोलणी करणार नाही व फक्त संचालिका आल्या तरच बोलणी करू, असा पवित्रा समितीने घेतला. त्यांनी तेथेच बसकरण मारली. वेळ जाऊ लागला तसे वातावरण तापू लागले. अखेर पोलिसांना पाचारण करण्यात आले पोलिस निरीक्षक राजेंद्र प्रभुदेसाई पोलिस कुमक घेऊन दाखल झाले.
अखेर दुपारी तब्बल ३ वाजता संचालिका सेल्सा पिंटो दाखल झाल्या .त्यांनी केलेल्या विलंबामुळे त्या करीत असलेली सारवासारव ऐकून घेण्याची कोणाचीच तयारी दिसली नाही. त्यांनी देणग्याबाबत स्पष्ट तक्रार पालक करीत नाहीत, ही पूर्वापार पध्दत आहे, तिला कायद्याने बंदी घालता येणार नाही वगैरे सांगून सारवासारव करण्याचा प्रयत्न केला, पण समिती आपल्या पवित्र्यावर ठाम राहिल्याने साडेचारच्या सुमारास समितीने केलेल्या देणग्याविषयक तक्रारीच्या अनुषंगाने पहिली ते दहावी पर्यंतच्या प्रवेशाची प्रक्रिया रहीत ठेवण्याची व ७ मे रोजी सादर केलेल्या अहवालावर केलेली कारवाई १० दिवसात कळविण्याचे आश्र्वासन समितीला देण्यात आले. शिक्षण उपसंचालक बी. जी. नाईक यांनी तसे लेखी पत्र समितीला दिले. मात्र समितीने यंदा दिले गेलेले सर्वच प्रवेश रद्द घोषित करण्याचे व गुणवत्तेवर आधारूनच ते देण्याची मागणी केली असून तीवरून शिक्षण खाते अडचणीत येण्याची चिन्हे दिसत आहे.
दुसरीकडे मडगावातील एक प्रमुख संस्था असलेल्या भाटीकर मॉडेलने खात्याकडून प्रवेशासाठी होणाऱ्या शिफारसींमुळेच देणग्या वगैरे प्रकारांना वाव मिळत असल्याचा आरोप केला आहे.
प्रवेशासाठी मोठ्या प्रमाणात देणग्या घेतल्या जात असल्याच्या फातोर्डा नागरी कल्याण समितीने येथील विभागीय साहाय्यक शिक्षण संचालकांकडे केलेल्या तक्रारीची गंभीर दखल शिक्षण खात्याने घेऊन शिक्षण संचालकांनी दक्षिण गोव्यातील सर्व शाळांतील प्रवेश प्रक्रियेला गेल्या गुरुवारी स्थगिती दिली हेाती. यासंदर्भात आज समितीची बैठक दक्षिण गोवा साहाय्यक शिक्षण संचालकांच्या दालनात संचालकांशी ठरली हेाती.
दक्षिण गोवा शिक्षण विभागाने मडगावातील एकूण सहा प्रमुख शाळांतील प्रवेश प्रक्रियेचा तपशील आपला खास प्रतिनिधी पाठवून गोळा केला असता बऱ्याच शाळांतील पद्धतीत विसंगती आढळली. काहींनी प्राथमिक वर्गासाठी फी आकारताना निर्धारीत पद्धत अवलंबली नसल्याचे तर काहींनी वर्गांचे गट पाडताना नियमांचे उल्लंघन केल्याचे दिसून आले. एका नामवंत संस्थेने विद्यार्थ्यांकडून प्रचंड रक्कम गोळा केल्याचे अधिकाऱ्यांना तसेच व्यवस्थापनाने खात्याची परवानगी घेतली नाही की हिशेबही सादर केला नसल्याचे आढळून आले होते.

सनी, रवीच्या कौतुकाने थरारलो... : स्वप्निल अस्नोडकर

पंकज शेट्ये
वास्को, ता. १२ : सुनील गावस्कर व रवी शास्त्री यांच्यासारख्या दिग्गजांकडून माझ्या पाठीवर कौतुकाची थाप पडली अन् त्यामुळे अक्षरशः थरारून गेलो, असे गोव्याचा "लिटल मॅन' स्वप्निल अस्नोडकर याने आज सांगितले. दुपारी दीडच्या सुमारास किंगफिशर एअरलाईन्सच्या विमानाने स्वप्निलचे गोमंतभूमीत आगमन झाले. इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळणारा हा गुणी गोमंतकीय क्रिकेटपटू देश पातळीवर चमकता सितारा बनला आहे. या प्रतिनिधीशी त्याने दाबोळी विमानतळावर पाऊल ठेवल्यावर दिलखुलास गप्पा मारल्या. गोव्यात सुटी घालवण्यासाठी शेन, वॉर्न, शेन वॉटसन, ग्रॅमी स्मिथ, आदित्य आंगले, रवींद्र जडेजा आदी बडे खेळाडूदेखील दाखल झाले आहेत. त्यांना पाहून विमानतळावरील गर्दीत वाढ होत गेली. ही मंडळी आणखी चार दिवस हॉटेल फोर्ट आग्वादमध्ये गोव्याचा पाहुणचार झोडणार आहेत. नंतर ते जयपूर येथे बंगळूरच्या रॉयल चॅलेंजर्सविरुद्धच्या लढतीसाठी रवाना होतील. सध्या आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स संघाने आपला जबर दबदबा निर्माण केला आहे. त्यातही स्वप्निलची बॅट तेजाने तळपू लागली आहे. त्यामुळे त्याच्याभोवती आगळे वलय निर्माण होत चालले आहे.
"ही सगळी देवाचीच कृपा म्हटली पाहिजे. मात्र खरे सांगतो, माझे पाय अजून जमिनीवरच आहेत व भविष्यातही ते तसेच राहतील. बंगळूरच्या रॉयल चॅलेंजर्स संघात आधी माझे नाव होते. तथापि, नंतर राजस्थान रॉयल्सकडून खेळण्याची संधी मिळाली. जे होते ते बऱ्यासाठीच. माझ्या संघाने या स्पर्धेत जोमदार प्रगती केली आहे. लिटल चॅंपियन सचिन तेंडुलकर यानेही माझ्या खेळाबद्दल गौरवोद्गार काढले तेव्हा तर मला स्वर्ग दोन बोटे उरल्याचा भास झाला...' हसतमुख चेहऱ्याने स्वप्निल सांगत होता. कधी एकदा आपल्या कुटुंबीयांना भेटतो आहे असे त्याची देहबोली सांगत होती. तरीसुद्धा वेळात वेळ काढून त्याने "गोवादूत'शी वार्तालाप केला.

पंटेमळ कुडचडे येथे दीड लाखांची चोरी

कुडचडे, दि.१२ (प्रतिनिधी): पटेमळ कुडचडे येथील "मौरानी प्लाझा' इमारतीत आज दुपारी चारच्या सुमारास दुसऱ्या मजल्यावरील संजीव त्यागी यांच्या फ्लॅटच्या दरवाजाची कडी तोडून दीड लाखांचा ऐवज चोरट्यांनी पळवला. मुख्य रस्त्याच्या बाजूलाच ही इमारत आहे. त्यागी हे संध्याकाळी पाचच्या सुमारास घरी परतल्यावर त्यांच्या निदर्शनास हा प्रकार आला. त्यांनी त्वरित पोलिसांत तक्रार केली. चोरट्यांनी कपाटात असलेले रोख तीस हजार रुपये, सोन्याच्या दोन साखळ्या, चार कर्णफुले तसेच इतर मिळून सुमारे १४ ते १५ तोळे दागिने लंपास केल्याचे त्यागी यांनी सांगितले. पोलिसांनी ठसे तज्ज्ञांना पाचारण केले. मात्र कोणतेही धागेदोरे सापडू शकले नाहीत. यापूर्वी याच इमारतीच्या बाजूस असलेल्या इमारतीत असे चोरीचे प्रकार घडले होते. मात्र त्यांचा तपास अजून लागलेला नाही.

Monday, 12 May 2008

'त्या' प्रकल्पांच्या तपासणीचा निर्णय

बाणावलीची ग्रामसभा तुलनेने शांततेत
प्रकल्पांचे परवाने मागे
घेण्याची जोरदार मागणी
सरपंचांवर प्रश्नांचा मारा...
स्वतंत्र आरोग्य केंद्र हवे...
रविवारी पुन्हा ग्रामसभा...

मडगाव, दि.11 (प्रतिनिधी): बाणावलीतील "त्या' तिन्ही वादग्रस्त महाकाय गृहनिर्माण प्रकल्पांना दिलेले परवाने मागे घेण्याची व भविष्यात अशा प्रकल्पांना ग्रामसभेने मंजुरी दिल्याशिवाय ते विचारात देखील घेऊ नयेत, अशी जोरदार मागणी आज बोलावण्यात आलेल्या बाणावलीच्या खास ग्रामसभेत झाली. सरपंच मारिया फर्नांडिस यांनी लवकरच या प्रकल्पांची तपासणी करून नियमभंग झाल्याचे आढळून आल्यास पंचायत उपसंचालकांकडे लगेच तक्रार केली जाईल, असे स्पष्ट केले. त्यामुळे गेल्या वेळच्या तुलनेत आजची ग्रामसभा शांततेत पार पडली.
बाणावली नागरिक समितीने जंग जंग पछाडल्यामुळे पंचायत मंडळाला ही ग्रामसभा बोलावणे भाग पडले. सभेला अपेक्षेप्रमाणे प्रचंड उपस्थिती होती व तीत मुलांचे प्रमाण अधिक होते. सभेत कोणतीही गडबड माजू नये म्हणून मोठ्या संख्येने पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला होता.
ग्रामस्थांनी आरंभापासूनच महाकाय प्रकल्पांबाबत सरपंचांवर प्रश्नांचा मारा केला. कसलाही अभ्यास न करता व भविष्यकालीन समस्यांचा विचार न करता परवाने दिल्याचे आरोप झाले. त्यातून प्रकरण चिघळत चालल्याचे पाहून सरपंचांनी त्या तिन्ही प्रकल्यांच्या जागेची पाहणी करण्याचा प्रस्ताव मांडला व तो पुढील रविवारी पुन्हा ग्रामसभा बोलावून सभेसमोर ठेवण्याच्या अटीवर मंजूर झाला.
पंचायतीसाठी नव्या स्वतंत्र आरोग्य केंद्राची मागणीही ग्रामसभेने केली. सध्या या क्षेत्रासाठी असलेले आरोग्य केंद्र कासावली येथे आहे. ते पुष्कळच दूर व वाहतुकीच्या दृष्टीने गैरसोयीचे असल्याने या भागासाठी स्वतंत्र आरोग्य केंद्राची मागणी करण्यात आली.
दांडो येथील क्रीडा मैदान प्रकरणीही सरपंचांची कोंडी केली गेली. तथापि, या प्रश्नाबाबत आपल्याला माहिती नसल्याची कबुली सरपंचांनी दिली. त्यानंतर आगामी ग्रामसभेत ही सर्व सविस्तर माहिती ठेवली जाईल असे आश्र्वासन त्यांनी दिले.
या ग्रामसभेला गटविकास कार्यालयाचे प्रतिनिधी तसेच आरोग्य खात्याचे अधिकारी हजर होते.
वासुवाडो, बाणावली व सोनिया या तिन्हीकडील महाकाय प्रकल्पांना दिलेले बांधकाम परवाने मागे घ्यावेत, नगरनियोजन खात्यातून या बांधकामाबाबतची सर्व कागदपत्रे मागून घ्यावीत व ती या ग्रामसभेसमोर ठेवावीत व ग्रामसभा घेईल तो निर्णय अंतिम ठरवला जावा अशी अट नागरिक समितीने गेल्या मंगळवारच्या घेरावावेळी घालून तिन्ही प्रकल्पांचे काम बंद ठेेवावे, असे बजावले होते.
मात्र त्या बैठकीत मंत्री मिकी पाशेको तसेच पंचांना उपस्थितांनी विचारलेल्या एकाही प्रश्नांचे समाधानकारक उत्तर देता आले नव्हते. त्यामुळे त्या सभेत एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचे प्रकार घडले होते. त्या तुलनेत आजची ग्रामसभा शांततेत पार पडली.

सेवेत कायम न केल्यास जूनपासून तीव्र आंदोलन

अंगणवाडी सेविकांचा इशारा
पणजी, दि. 11 (प्रतिनिधी) : अंगणवाडी सेविकांना येत्या 30 मे पर्यंत सरकारी सेवत कायम न केल्यास व वेतनश्रेणी न लावल्यास जूनपासून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा अखिल गोवा राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेने दिला आहे. तसेच में महिन्याच्या अखेरीस पर्यंत निवृत्ती वेतनाचा फायदा लागू केल्याचे परिपत्रक काढण्यांचीही जोरदार मागणी करण्यात आली आहे.
10 मे रोजी सर्व केंद्रीय समित्या आणि तालुका समित्यांच्या बैठकीत हा निर्णय झाला. ही माहिती संघटनेच्या अध्यक्षा सौ. मुक्ता प्र. नाईक यांनी दिली.
महिला व बालविकास खात्याने अंगणवाडी सेविका व मदतनीस म्हणून अपंग उमेदवार घेताना योग्य ती काळजी घ्यावी. त्याचा परिणाम अंगणवाडीतील मुलांच्या शारीरिक व मानसिक विकासावर होऊ शकतो, असे मत या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

पोलिसांच्या नोटिशीला 'मसाला'कडून आव्हान

पणजी, दि. 11 (प्रतिनिधी) : स्कार्लेट खून प्रकरणातील मुख्य साक्षीदार मिचल ऍन्थनी मॅनियन ऊर्फ "मसाला' या विदेशीने गोवा पोलिसांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. काही महिन्यांपूर्वी, पोलिसांनी मसाला याने भारत सोडू नये, अशी नोटीस जारी केली होती. पोलिसांच्या त्या नोटिशीला आव्हान देण्याचा इशारा मसाला याने दिला आहे.
आपली साक्ष पूर्ण झाली असताना, मला आपल्या देशात का जाऊ दिले जात नाही, असा प्रश्न मसालाने पोलिसांना पाठवलेल्या नोटिशीत केला आहे. पोलिसांनी जारी केलेली नोटीस मागे न घेतल्यास त्याविरोधात उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा त्याने दिला आहे. स्कार्लेट प्रकरण "सीबीआय'कडे सोपवण्यात आल्याने "सीबीआय'च्या तपासकामात त्याची गरज भासणार आहे. त्यामुळे त्याला अद्याप भारत न सोडण्याची परवानगी देण्यात आली नाही, अशी माहिती एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली.
स्कार्लेटला अमली पदार्थांचा तीव्र डोस देऊन नंतर तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची साक्ष "मसाला' याने गोवा पोलिसांना शरण आल्यानंतर दिली होती. 17 मार्च रोजी तो गोवा पोलिसांना शरण आला होता. 18 फेब्रुवारी रोजी स्कार्लेटचा खून झाल्यावर 23 फेब्रुवारीला तो गोवा सोडून गेला होता.

दहशतवादी आणि सैन्यांमध्ये चकमकीत पाच जण ठार

जम्मू, दि. 11 : जम्मू-काश्मीरमधील सांबा जिल्ह्यामध्ये काली मंडी क्षेत्रात आज सुरक्षा दल आणि अतिरेक्यांमध्ये सुरु असलेल्या चकमकीत आतापर्यंत एक छायाचित्रण करणारा पत्रकार तसेच सैन्याच्या एका जवानासह पाच लोक मारले गेले आणि इतर चार जण जखमी झाले आहेत.
या चकमकीने सीमा सुरक्षा दलाच्या (बी.एस.एफ.) त्या दाव्यांवर प्रश्न निर्माण केले आहे, ज्यामध्ये त्यांनी गेल्या गुरुवारी रात्री आंतरराष्ट्रीय सीमेजवळ घुसखोरी करण्याच्या एका मोठया प्रयत्नाला अयशस्वी केल्याचे सांगितले होते. सूत्रांनी सांगितले की कालीमंडीजवळ राख अंब ताली गावात इंडियन डेमोक्रेटिक पार्टीचे नेते होशियार सिंह यांच्या घरी सकाळी दोन-तीन अतिरेकी घुसलेे आणि त्यांनी कुटुंबातील लोकांवर गोळीबार करण्यात सुरू केले होते. या घटनेमध्ये होशियार सिंह आणि त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला असून अन्य दोन कुटुंबियांना गंभीर परिस्थितीत सरकारी मेडिकल कॉलेज रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गावातील लोकांचे म्हणणे आहे की हे अतिरेकी सैनिकांच्या गणवेशात होते आणि त्यांच्या जवळ अत्याधुनिक शस्त्रेही होेती आणि मोठ-मोठ्या पिशव्याही होत्या. अतिरेक्यांच्या या गोळीबारामुळे या भागात हिंसाचार पसरला आणि ग्रामीणांनी त्याला उत्तर देण्यासाठी आपले लायसन्स असलेली शस्त्रे बाहेर काढली. याच दरम्यान अतिरेकी जवळील दुसऱ्या घरात शिरले. घटनेची माहिती मिळताच सुरक्षा दलाने लगेच संपूर्ण क्षेत्राला घेरून शोध मोहिम सुरु केली आणि नंतर त्या घराला चारही बाजूने घेरले.
या दरम्यान या चकमकीत अतिरेक्यांनी ओलीस धरलेल्या एका महिलेचा मृत्यू झाल्याच्या वृत्तास दुजोरा देण्यात आला आहे. या क्षेत्रात घुसखोरी केलेल्या तीन अतिरेक्यांनी दोन महिलांना एका घरामध्ये बंदी बनवले होते. त्यामधील एका महिलेचा मृत्यू झाल्याचे सुरक्षा दलाने पुष्टि केली आहे. सेनेकडून येणाऱ्या वृत्तांमध्ये सांगितले जात आहे की शुक्रवारी सीमेवरील घुसखोरी थांबवण्यासाठी केलेल्या गोळीबारानंतर जवळजवळ 10 अतिरेक्यांनी पाकिस्तानातून भारतात घुसखोरी केली आहे. अतिरेक्यांबरोबर सैन्याची चकमक अजून सुरु असून शेवटचे वृत्त समजेपर्यंत अतिरेक्यांनी ओलीस धरलेल्या पाच लोकांची सुरक्षा दलाने सुटका केली आहे. सुरक्षा दल अतिरेक्यांविरोधात शेवटच्या हल्ल्याची तयारी करत आहेत. हा निवासी भाग असल्यामुळे आणि अतिरेक्यांकडे अधिक प्रमाणात दारू-गोळा असल्यामुळे आतापर्यंत ते संयमित कारवाई करीत आहेत.