Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday, 5 March, 2011

भ्रष्टाचारी कॉंग्रेसला गाडून टाकू!

गोव्याच्या मुक्तीसाठी एकत्र येण्याचे गोपीनाथ मुंडे यांचे आवाहन
भाजपच्या ‘कलंकित सरकार’ पुस्तिकेचे प्रकाशन

पणजी, दि. ३ (प्रतिनिधी): गोव्यात सर्व क्षेत्रांत माफियांचाच सुळसुळाट झाला असून या माफियांपासून गोव्याला मुक्त करण्यासाठी भाजप सर्व गोवेकरांना बरोबर घेऊन रण माजवणार आहे, असे प्रतिपादन भाजपचे लोकसभा उपनेते तथा गोव्याचे राष्ट्रीय निवडणूक प्रभारी गोपीनाथ मुंडे यांनी केले. गोव्यात राजकीय परिवर्तन घडवून आणण्याची नितांत गरज असून त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन भ्रष्टाचारी कॉंग्रेस आघाडी सरकारला गाडून टाकण्यासाठी हातभार लावावा, असे आवाहनही त्यांनी या प्रसंगी केले.
राज्यातील कॉंग्रेस आघाडी सरकारच्या भ्रष्ट कृत्यांचा पर्दाफाश करणार्‍या ‘कलंकित सरकार’ या पुस्तिकेचे प्रकाशन आज गोमंतक मराठा समाज सभागृहात आयोजित केलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात करण्यात आले. याप्रसंगी भाजप प्रदेशाध्यक्ष प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर, खासदार श्रीपाद नाईक, विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर तसेच पक्षाचे आमदार तथा प्रदेश भाजप पदाधिकारी हजर होते. या मेळाव्याला संबोधताना खासदार मुंडे यांनी केंद्र सरकारच्या भ्रष्ट कारभारावर चौफेर हल्लाबोल केला.
गोव्यातील विविध घोटाळ्यांवरून केंद्र सरकारला धारेवर का धरत नाही, असा सवाल काही पत्रकार करतात; पण मुळात कॉंग्रेसचे केंद्र सरकारच महाकाय अशा भ्रष्टाचारांत आकंठ बुडालेले असताना त्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा ठेवता येईल काय, असा प्रतिप्रश्‍न श्री. मुंडे यांनी उपस्थित केला. राज्यात ड्रग्ज माफियांबरोबरच बेकायदा खाण, वन, सुरक्षा आदी क्षेत्रांतही माफियांचा उच्छाद सुरू आहे. ‘तुम्ही खा, मीही खातो’ अशा पद्धतीचे तंत्रच इथे कॉंग्रेसने अवलंबिले आहे. ‘सत्तेव्दारे संपत्ती व संपत्तीतून पुन्हा सत्ता’ ही कॉंग्रेसची नीती आहे. महात्मा गांधींच्या कॉंग्रेसमधील नैतिकता सोनिया गांधींच्या कॉंग्रेसमध्ये नाही. ए. राजाचा १ लाख ८६ हजार कोटींच्या घोटाळा ‘कॅग’ कडून उघडकीस आणला गेला, भाजपने विरोध केला असतानाही केंद्रीय दक्षता आयुक्तपदी पंतप्रधानांनी भ्रष्ट अशा व्यक्तीचीच निवड केली, ही नियुक्ती सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवली. पंतप्रधानांवर ओढवलेली देशाच्या इतिहासातील ही पहिलीच नामुष्कीजनक घटना ठरली आहे. ‘क्लीन पीएम’ अशी ख्याती असलेल्या पंतप्रधानांच्या कार्यालयाकडून मान्यता मिळवलेल्या या घोटाळ्यांचा त्यांना कोणताच थांगपत्ता लागत नाही याचा अर्थ काय, असा परखड सवाल यावेळी खासदार मुंडे यांनी उपस्थित केला. विदेशी बँकांत असलेला काळा पैसा आणण्यासाठी ज्या अर्थी कॉंग्रेस काहीच प्रयत्न करीत नाही, त्याअर्थी हा पैसा कॉंग्रेस नेत्यांचाच असावा, या शक्यतेला बळकटी मळते. केंद्रात भाजपचे सरकार आल्यास हा सारा पैसा स्वदेशात आणू, असे आश्‍वासनही यावेळी त्यांनी दिले.
केंद्रात भ्रष्टाचार प्रकरणांवरून एकामागोमाग एक मंत्र्यांची गच्छंती होते आहे; गोव्यातील भ्रष्ट नेत्यांनाही घरी पाठवण्यासाठी गोमंतकीयांना तीव्र लढा उभारावा लागेल. गोव्याचे राष्ट्रीय निवडणूक प्रभारी या नात्याने संपूर्ण राज्याचा दौरा करून गोव्यातील दशमुखी भ्रष्टाचारी रावणाला गाडून टाकण्याचे आवाहन आपण गोमंतकीयांना करणार आहोत, असे जाहीर करतानाच या परिवर्तनाची सुरुवात पणजी महापालिका निवडणुकीपासूनच होऊ द्यात, असे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले.
बाबूश यांनी पणजीतून निवडणूक लढवावीच ः पर्रीकर
ताळगावचे आमदार बाबूश मोन्सेरात यांनी पणजी मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. ते पणजीतून निवडणूक लढवत असतील तर या भ्रष्ट जरासंधाचा वध करण्याची पुण्याई पणजीवासीयांना लाभणार आहे, असा जबर ठोसा विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी यावेळी बोलताना लगावला. आठवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या बाबूश यांच्याकडे शिक्षण खात्याची सूत्रे बहाल करणे यावरूनच सरकारचे नेमके तंत्र जनतेसमोर उभे राहते. महापालिकेसाठी लोकांना टीव्ही वाटले जातात, पण याच टीव्हीवर कॉंग्रेसच्या भ्रष्टाचाराचे वाभाडे पाहण्याची संधी लोकांना प्राप्त होत आहे. पणजीतील लोकांनी महापालिका निवडणुकीसाठी भ्रष्टाचाराचा अंत करण्याच्या निर्धारानेच बाहेर पडावे, असे आवाहनही त्यांनी केले. पैसा कमावण्याची संधी शिक्षण खात्यात मिळत नाही आणि त्यामुळे पणजी महापालिकेच्या निमित्ताने पुन्हा लूट करण्याचाच हा प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही पर्रीकर यांनी केला. गृहमंत्री रवी नाईक यांचे पुत्र रॉय नाईक हे ड्रग्ज प्रकरणांत सहभागी असल्याचा आरोप होतो; पण हाच रॉय बेकायदा खाण व्यवसायातही सामील आहे, असा आरोपही पर्रीकर यांनी केला. खोटारडेपणा व भानगडी यांचा सुंदर मिलाफ रवी नाईक यांच्यात दिसतो. उच्च न्यायालयाने दोन लाख रुपयांचा दंड ठोठावलेले व आयकर खात्याने छापा टाकलेले विश्‍वजित राणे तरीही फारच गुर्मीने वागत आहेत. म्हापसा जिल्हा इस्पितळ सुरू झाले नाही, पण भरती मात्र झाली. म्हापशात एका रुग्णवाहिकेमागे १८ चालकांची नेमणूक झाली आहे. आयकर छापा पडल्यानंतर वारंवार विश्‍वजित बंगळूरला का धावतात, हे त्यांनी जनतेला सांगावे. आता यापुढे जनतेलाच या भ्रष्ट नेत्यांकडे सत्ता द्यावी की नाही यावर अंतिम निर्णय घ्यावयाचा आहे, असे पर्रीकर म्हणाले.
पुस्तिका नव्हे ग्रंथच हवा : प्रा. पार्सेकर
राज्यातील कॉंग्रेस आघाडी सरकारचे घोटाळे बाहेर काढण्यासाठी छोटीशी पुस्तिका पुरणार नाही तर त्यावर एक भला मोठा ग्रंथच काढावा लागेल, असा टोला प्रदेशाध्यक्ष लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी हाणला. मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी आपला पक्ष, कार्यकर्ते, जुने मित्र तथा इतर अनेक गोष्टी बदलल्या; पण गेली अकरा वर्षे त्यांनी खाण खाते मात्र अजिबात बदललेले नाही. शिक्षण कमी असले म्हणून चर्चिल आलेमाव ‘पर्सेंटेज’ च्या बाबतीत मात्र फारच हुशार आहेत. आरोग्य खात्याचे ‘पीपीपी’करण हे दलाली मिळवण्यासाठीच सुरू आहे, असा आरोप प्रा. पार्सेकर यांनी केला. भाजप कार्यकर्त्यांनी ‘कलंकित सरकार’ची लफडी घरोघरी पोचवावीत असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
अल्पसंख्याकांना केवळ मतांसाठी कुरवाळले : फ्रान्सिस डिसोझा
निधर्मीवादाचे ढोल बडवून कॉंग्रेसने आत्तापर्यंत अल्पसंख्याकांचा केवळ मतांसाठी वापर केला, असा ठपका भाजप विधिमंडळ उपनेते फ्रान्सिस डिसोझा यांनी ठेवला. सुमारे ३५ टक्के अल्पसंख्याक असलेल्या राज्यात केवळ ९ टक्के रोजगार या घटकाला मिळतो, यावरून कॉंग्रेसच्या निधर्मीवादाचा बुरखा टराटर फाटला आहे, असे ते म्हणाले. मुस्लिमांची कब्रस्तानाची मागणी अजूनही पूर्ण होत नाही याचा अर्थ काय, असा सवाल करून भ्रष्टाचार विरोधातील सुरू झालेल्या लढ्याला पणजी महापालिका निवडणुकीतूनच सुरुवात व्हावी, असे आवाहनही त्यांनी केले.
अन्यथा कॉंग्रेसने देशच विकला असता : श्रीपाद नाईक
देशात न्यायव्यवस्था नसती तर एव्हाना कॉंग्रेसने हा देशही विकून टाकला असता, असा सडेतोड आरोप खासदार श्रीपाद नाईक यांनी केला. देशात व राज्यातील परिस्थितीवरून भीषण चिंता करण्यासारखीच परिस्थिती बनली आहे. समस्त गोमंतकीयांना आता एक मिशन म्हणूनच ही भ्रष्ट राजवट उलथून लावावी लागेल, असेही ते म्हणाले.
चर्चिलकडून सरकारी तिजोरीची लूट : दामोदर नाईक
सा. बां. खात्याचे मंत्री चर्चिल आलेमाव यांनी विकासकामांच्या नावे ‘पर्सेंटेज’च्या माध्यमाने सरकारी तिजोरीची लूट चालवली आहे, असा घणाघाती आरोप आमदार दामोदर नाईक यांनी केला. खुद्द मुख्यमंत्री व खात्याचे अभियंते त्यांच्यासमोर लाचार बनले आहेत. पाण्याच्या टाक्यांचा घोटाळा काढला म्हणून भाजपवर गरीब विरोधी असल्याचा आरोप करणार्‍या कॉंग्रेसला सरकारी तिजोरी म्हणजे आपल्या बापाची मिरासदारी वाटते काय, असा खडा सवालही त्यांनी केला. एखादी योजना राबवायचीच असेल तर त्यासाठी कायदेशीर मान्यता घ्या. आपल्या मर्जीनुसार सामान्य जनतेचा पैसा वापरण्याचा सरकारला कोणताच अधिकार नाही, असेही ते म्हणाले.
महिलांनो सावध राहा : कुंदा चोडणकर
भ्रष्ट मार्गाने मिळवलेल्या पैशांतून महिला स्वयंसाहाय्य गटांना पैसा पुरवणार्‍या सत्ताधारी नेत्यांपासून सावध राहा, असे आवाहन भाजप महिला मोर्चा अध्यक्ष कुंदा चोडणकर यांनी केले. कॉंग्रेसकडून महिलांना लाचार बनवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. भाजप महिलांनी कॉंग्रेसच्या या कटाला बळी पडण्यापासून महिलांना रोखावे, असेही त्या म्हणाल्या. सणासुदीला घरोघरी ‘पार्सल’ पाठवण्याची नवी पद्धत सुरू झाली आहे व त्याला कठोरपणे धुडकावून लावण्याची गरज आहे, असेही त्या म्हणाल्या.
भाजप सरचिटणीस गोविंद पर्वतकर यांनी संघटनात्मक कार्याचा आढावा घेतला. सूत्रसंचालन ऍड. नरेंद्र सावईकर यांनी केले.

न्यायालयासमोर ट्रकमालकांचे नमते

ट्रकांच्या हौदाची पट्टी जाणार
अखेर ट्रकमालकांना अटी मान्य - १०.५ टनच खनिज भरणार

पणजी, दि. ४ (प्रतिनिधी): ट्रकांच्या मागील हौदाला बसवण्यात येणारी लाकडी पट्टी काढण्याचे आणि १०.५ टनापेक्षा जास्त खनिज माल ट्रकात न भरण्याचे दक्षिण गोवा खनिज ट्रक वाहतूक कृती समितीने मान्य केले असल्याची माहिती आज वाहतूक खात्याचे संचालक अरुण देसाई यांनी दिली. वाहतूक खात्याने सुरू केलेली कारवाई थांबवण्यासाठी संपूर्ण गोव्यातील वाहतूक बंद करण्याची धमकी दिल्यानंतर आज खास बोलावण्यात आलेल्या बैठकीत ट्रक मालकांनी या अटी मान्य केल्याचे ते म्हणाले.
या बैठकीत मुख्यमंत्री दिगंबर कामत, वाहतूकमंत्री सुदिन ढवळीकर, मुख्य सचिव संजय श्रीवास्तव, ऍडव्होकेट जनरल सुबोध कंटक, संचालक अरुण देसाई, कायदा सचिव, खाण सचिव व कृती समितीचे सुभाष फळदेसाई आणि अन्य सदस्य उपस्थित होते.
वाहतूक खाते न्यायालयाने दिलेल्या आदेशाचेच पालन करते आहे. या आदेशाचे पालन करणे सरकाराला तसेच ट्रक वाहतूक करणार्‍यांनाही बंधनकारक असल्याचे यावेळी ऍड. कंटक यांनी त्यांना सांगितले. तसेच, याचे पालन न झाल्यास न्यायालयाकडून कारवाई होऊ शकते, याकडेही ट्रकमालकांचे लक्ष वेधण्यात आले. त्यामुळे शेवटी न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन करण्याचे या ट्रक मालकांनी मान्य केले असल्याचे श्री. देसाई यांनी सांगितले.
अतिरिक्त खनिज नेण्यासाठी अनेक ट्रक मालकांनी ट्रकाच्या हौदाला ९ सेंमी.ची लाकडी पट्टी बसवली आहे. ही पट्टीवरून गेल्या काही दिवसांपासून वाहतूक खात्याने जोरदार कारवाई सुरू केली होती. केवळ सतावणूक करण्यासाठी ही कारवाई केली जात असल्याचा दावा करून ट्रकमालकांनी गुरुवारी कुडचडे येथे मुख्यमंत्र्यांना घेरावही घातला होता. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी यावर चर्चा करून तोडगा काढण्याचे आश्‍वासन या आंदोलनकर्त्यांना दिले होते.

उप कारागृहाच्या सा. अधीक्षकांना कैद्यांकडून जिवे मारण्याची धमकी

सुरक्षा तोडून कक्षातच घुसले
वास्को, दि. ४ (प्रतिनिधी): सडा उप कारागृहाचे साहाय्यक अधीक्षक भानुदास पेडणेकर यांच्या कक्षात घुसून येथील चार कैद्यांनी त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली असून या प्रकरणी मुरगाव पोलिस स्थानकात तक्रार नोंदवण्यात आली आहे. खुद्द उप कारागृहाची सुरक्षा तोडून हे कैदी पेडणेकर यांच्या कक्षात घुसल्याने कारागृहाच्या सुरक्षेवरच भले मोठे प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.
सडा येथे असलेले हे उप कारागृह गेल्या काही काळापासून कैद्यांच्या पलायनामुळे तसेच अन्य बाबींमुळे चर्चेत असतानाच आता या प्रकरणामुळे पुन्हा एकदा चर्चेला ऊत आला आहे. मुरगाव पोलिसांच्या माहितीनुसार, काल संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास सदर घटना घडली. भानुदास पेडणेकर सडा उप कारागृहातील आपल्या कक्षात व्यस्त असताना अचानक तिथे बालेश देसाई, कृष्णा देसाई, अमोघ नाईक व अमय नाईक हे चार खटले सुरू असलेले कैदी आत घुसले. त्यांनी बालेशची येथून दुसर्‍या उप कारागृहात बदली मागण्यात आली आहे काय, याबाबत पेडणेकर यांना प्रश्‍न विचारण्यास सुरुवात केली. तसे झाल्यास पेडणेकर यांना जिवे मारण्यात येईल, अशी धमकी त्यांनी यावेळी दिली. पोलिसांच्या माहितीनुसार, बालेश याने पेडणेकरांच्या कुटुंबीयांनाही ठार मारण्याची धमकी दिली आहे.
दरम्यान, हा प्रकार घडल्यानंतर आज दुपारी श्री. पेडणेकर यांनी मुरगाव पोलिसांत तक्रार दाखल केली असून सदर कैद्यांविरुद्ध भा. दं. सं ३५३, ५०६ (२) आर | डब्ल्यू ३४ कलमाखाली पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. पोलिस सूत्रांनुसार या चौघाही कैद्यांना खून प्रकरणात या कारागृहात ठेवण्यात आले असून त्यांच्यावरील खटला सुरू आहे. मुरगाव पोलिस पुढील तपास करीत आहेत.

मुरगावात दोन अपघातांत दोघे सायकलस्वार ठार

वास्को, दि. ४ (प्रतिनिधी): गेल्या २४ तासांत मुरगाव तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातांत दोघे सायकलस्वार ठार झाले. आज सकाळी वेर्णा औद्योगिक वसाहतीत सायकलवरून जात असताना मागून ‘पावलू ट्रॅव्हल्स’च्या बसने नुवे येथील रेमेडीयस रॉड्रिगीस (४७) याला धडक देऊन त्यास फरफटत नेल्याने तो ठार झाला तर काल रात्री दाबोळी महामार्गावर सायकल घेऊन रस्ता ओलांडण्याच्या प्रयत्नात असताना समोरून दुचाकीने धडक दिल्याने बोगदा येथील रामबहादूर दांगी (५२) यास आज सकाळी उपचार घेत असता मरण आले.
वेर्णा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी नुवे येथील रेमेडीयस रॉड्रिगीस आपल्या सायकलवरून वेर्णा औद्योगिक वसाहतीत जात असताना याच बाजूने मागून येणार्‍या ‘पावलू ट्रॅव्हल्स’च्या बसने (क्र. एमएच ०७ सी ७८७८) त्यास जबर धडक दिली व काही अंतरावर फरफटत नेले. यात त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली. उपचारार्थ त्यांना मडगावच्या हॉस्पिसियो इस्पितळात नेत असतानाच त्यांना मृत्यू आला. पोलिसांनी या प्रकरणी बसचालक नरेश कुडास्कर (वय ३३, महाराष्ट्र) याच्या विरुद्ध गुन्हा नोंद करून त्याला अटक केली व नंतर त्याची जामिनावर सुटका करण्यात आली.
दरम्यान, काल संध्याकाळी ७.४० च्या सुमारास बोगदा येथील रामबहादूर दांगी हा इसम सायकलवरून दाबोळी येथील महामार्ग ओलांडत असताना समोरून येणार्‍या दुचाकीने त्याला जबर धडक दिली व त्यात तो गंभीर जखमी झाला. उपचारासाठी त्याला गोमेकॉत दाखल केले असता आज पहाटे त्याचे तिथे निधन झाले. वास्को पोलिसांच्या माहितीनुसार, बिर्ला येथील सिथसेन विश्‍वकर्मा या २३ वर्षीय युवकाच्या दुचाकीची दांगी याला धडक बसली. शवचिकित्सेनंतर पोलिसांनी दांगी याचा मृतदेह त्याच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन केला असून ते पुढील तपास करत आहेत.

रेती निर्यातीवर बंदी!

पणजी, दि. ४ (प्रतिनिधी): गोव्यातील रेती गोव्याबाहेर नेण्यास राज्य सरकारने बंदी घातली आहे. याबाबत खाण संचालनालयातर्फे आज दि. ४ रोजी जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार खाण विकास कायदा ५७ अन्वये शुक्रवार दि. ४ पासून गोव्याच्या कोणत्याही भागात काढण्यात येणारी रेती गोव्याबाहेर नेता येणार नाही. तसा प्रयत्न करणार्‍यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. गोव्यात काढण्यात येणारी रेती फक्त गोव्यासाठीच असावी, असे या आदेशात म्हटले आहे.
दरम्यान राज्यात अनेक ठिकाणी बेकायदा रेती उपसा होत असून सदर रेतीची मोठ्या प्रमाणात गोव्याबाहेर निर्यात केली जाते. या प्रकाराविरुद्ध जागोजागी स्थानिक लोक आवाज उठवू लागल्यामुळे हादरलेल्या राज्य सरकारने लोकांना चुचकारण्यासाठी हे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, केरी- पेडणे येथील नारायण सोपटे केरकर यांनी कालच केरी येथील बेकायदा रेती उत्खननाच्या विरोधात दि. ७ मार्चपासून खाण संचालनालयासमोर आमरण उपोषणाचा निर्धार जाहीर केला आहे.

सुरक्षारक्षकाचा खून करून चोरी

मडगावातील शिक्षण संस्थेतील प्रकार
मडगाव, दि. ४ (प्रतिनिधी): येथील एका नामांकित शिक्षण संस्थेच्या इमारतीतील सुरक्षा रक्षकाचा खून करून चोरट्यांनी रोख दहा हजार व एक लॅपटॉप पळविला व त्यामुळे शहरात आज एकच खळबळ माजली. इतके दिवस भरदिवसा घरे फोडून चोर्‍या होत होत्या; पण आता सुरक्षा रक्षकाचा खून करून चोर्‍या करण्याइतपत चोरट्यांची मजल गेल्याने कायदा व सुव्यवस्था साफ कोलमडलेल्या या राज्यात खुद्द मुख्यमंत्र्यांचा मतदारसंघही सुरक्षित राहिलेला नाही यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
पेडा येथील सदर विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय असलेल्या ठिकाणी हा प्रकार पहाटे २ ते ३.३०च्या दरम्यान घडला. चोरट्यांनी गणपत जोशी या नेपाळी सुरक्षा रक्षकावर दंडुक्याने हल्ला केला व त्याच्या वर्मावरच प्रहार झाल्याने त्यात तो जागीच ठार झाला. शाळेशेजारी राहणार्‍यांना चोरांशी गुरख्याचा चाललेला वाद ऐकून जाग आली. त्यांनी बाहेर येऊन पाहिले असता चोर पसार झाले होते व रक्षकाचा पत्ता नव्हता. नंतर त्यांनी शाळेच्या आवारात त्याचा शोध घेतला असता तो इमारतीच्या दुसर्‍या मजल्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. लगेच हॉस्पिसियोत नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
पोलिसांच्या कयासानुसार रक्षकाच्या नकळत चोरटे इमारतीत घुसले असावेत व त्यांनी तळमजल्यावरील व्यवस्थापकांची कचेरी फोडली व तेथील कपाटे व टेबलाचे खण तोडले. त्यानंतर त्यांनी शेजारची मुख्याध्यापकांची कचेरी फोडून कपाटातील रोख १० हजार पळविले. पुस्तके, महत्त्वाची कागदपत्रे अस्ताव्यस्त फेकून नंतर ते पहिल्या मजल्यावरील प्राचार्यांच्या कचेरीत कुलूप तोडून शिरले व तेथे त्यांनी दोन कपाटे फोडली, टेबलाचे खण तोडले व प्राचार्याचा लॅपटॉप घेऊन ते पळाले. कदाचित त्यावेळी दुसर्‍या मजल्यावर असलेल्या सुरक्षा रक्षकाला त्यांची चाहूल लागून तो त्यांना पकडण्यासाठी गेला असता त्यांच्यात भांडण झाले व चोरांनी स्टूल वा लाकडी दंडुक्याने त्याच्या डोक्यावर प्रहार केला व त्यात तो मरण पावला असावा.
शेजार्‍यांनी पोलिसांना माहिती देताच निरीक्षक संतोष देसाई घटनास्थळी आले व त्यांनी संस्थेच्या व्यवस्थापनाला माहिती दिली. त्यानंतर त्यांनीही घटनास्थळी धाव घेतली. एकंदर प्रकारावरून चोर एकटा नसून तीन किंवा चार जण असावेत असा अंदाज आहे. पोलिसांनी सकाळी श्‍वानपथक आणून तपासणी केली व ठसेही घेतले. नंतर त्या ठिकाणी दोन मनगटी घड्याळे मिळाली. त्यातील एक सुरक्षा रक्षकाचे तर दुसरे हल्लेखोरांपैकी एकाचे असावे. त्यांनी प्राचार्यांचा नेलेला लॅपटॉप नंतर इमारतीतच अडगळीच्या जागी सापडला. अधिक तपास चालू आहे.

हणजुणात दीड लाखांचे ड्रग्ज जप्त; दोघे ताब्यात

पणजी, दि. ४ (प्रतिनिधी): अमली पदार्थ विरोधी पथकाने काल रात्री हणजुण येथे केलेल्या कारवाईत दोघा तरुणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील १ लाख ४२ हजार रुपयांचा अमली पदार्थ जप्त केला.
सोर्नाटोवाडो - हणजूण येथे असलेल्या वंडर बार अँड रेस्टॉरंटच्या समोर ही कारवाई करण्यात आली. यात मूळ नेपाळी असलेला जयबहादूर रामबहादूर तितूंग (२७) याच्याकडे १ किलो १४५ ग्राम चरस तर कृष्णा भीमबहादूर चित्रे (३४, आसाम) याच्याकडे २७५ ग्राम चरस आढळून आला आहे. या दोघांना रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले. गेल्या काही महिन्यांपासून जयबहादूर हा एका रेस्टॉरंटमध्ये स्वयंपाकी व कृष्णा हा वेटर म्हणून नोकरी करीत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.
अधिक माहितीनुसार, दोन्ही संशयित रेस्टॉरंटवर येणार्‍या विदेशी तसेच देशी पर्यटकांशी जवळीक साधून अमली पदार्थाची विक्री करीत होते. याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला लागली होती. तेव्हापासून त्यांच्यावर पोलिसांनी पाळत ठेवली होती. काल रात्री या दोघांकडे अमली पदार्थाची मागणी करून त्यांना विशिष्ट स्थळी बोलावण्यात आले होते. यावेळी पोलिसांनी आधीच सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले. यावेळी घेतलेल्या झडतीत त्यांच्याकडे अमली पदार्थ असल्याची खात्री झाल्यानंतर त्या दोघांनाही अटक करण्यात आली. सदर छापा या विभागाचे पोलिस उपअधीक्षक नरेश म्हामल यांच्या मार्गदर्शनाखाली महिला उपनिरीक्षक मीरा डिसिल्वा यांनी टाकला. यात पोलिस शिपाई ईर्षाद वाटांगे, महाबळेश्‍वर सावंत, जीतेंद्र कांबळी, समीर वारखंडकर आणि प्रकाश पोळेकर यांनी सहभाग घेतला.

डिचोलीतील खुनाला अखेर वाचा फुटली

अनैतिक संबंधातूनच घडलेला प्रकार
डिचोली, दि. ४ (प्रतिनिधी): वाठादेव (धाटवाडा) डिचोली येथे गेल्या २५ फेब्रुवारी रोजी बाबी विठो मोटे (५२) याच्या झालेल्या खुनाला अखेरीस वाचा फुटली असून रजनी ऊर्फ कल्याणी ऊर्फ बबिता रघू गावडे (५०) या देऊळवाडा - नार्वे येथील महिलेस पोलिसांनी ३०२ कलमाखाली याप्रकरणी अटक केली आहे. सदर खून आपणच केल्याची कबुली तिने दिली असल्याची माहिती डिचोली पोलिसांनी दिली.
बाबी मोटे हा वाठादेव येथील एका घरात ‘केअरटेकर’ म्हणून काम करायचा व रजनीशी त्याचे चार वर्षांपासून अनैतिक संबंध होते. बाबी याची बायको त्याला सोडून गेली होती तर रजनी हिच्या नवर्‍याची ती तिसरी बायको होती. मात्र बाबी व रजनी या दोघांनाही एकमेकांवर संशय होता. या संशयातूनच तिने बाबी याचा खून केला असल्याचे उघडकीस आले आहे.
सविस्तर माहितीनुसार, बाबी २५ रोजी रात्री साडेआठच्या सुमारास दारू पिऊन घरी आला तेव्हा रजनी त्याच्या घरातच होती व ती जमिनीवर झोपली होती. बाबी तिच्याजवळ झोपला असता तिने हातातील कोयतीने त्याच्या मानेवर व डोक्यावर घाव घातले व त्यातच तो ठार झाला.
असा लागला छडा
रजनी २२ रोजी डिचोली येथील प्राथमिक इस्पितळात आजारी असल्याने दाखल झाली होती. तिला २४ रोजी घरी पाठवण्यात आले. तिने २५ रोजी बाबी याचा खून केला व ती पुन्हा डिचोली इस्पितळात उपचारांसाठी दाखल झाली. पोलिसांना या दोघांचे अनैतिक संबंध असल्याचा पत्ता लागला होता व त्यांची भांडणेही होत असल्याचे समजले होते. मात्र खुनानंतर रजनी पुन्हा इस्पितळात दाखल झाल्याने पोलिस बुचकळ्यात पडले होते. आज ती बाबी याच्या घराजवळ पोलिसांना घुटमळताना दिसली. तिला संशयावरून ताब्यात घेतले असता बाबी याचा आपणच कोयतीच्या साह्याने खून केल्याची कबुली तिने दिली. उपअधीक्षक बोसेर सिल्वा, निरीक्षक हरीष मडकईकर व त्यांच्या सहकार्‍यांनी या खुनाला वाचा फोडण्यात यश मिळवले.

वर्ल्डकपच्या धुमश्‍चक्रीत बारावीची परीक्षा

सोमवारी पहिला पेपर - दहावीची परीक्षा ३० मार्चपासून
पणजी, दि. ४ (प्रतिनिधी): भारतीय उपखंडात आयोजित केलेली व संपूर्ण देशावर जबरदस्त मोहिनी घातलेली विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धा ऐन जोशात येत असतानाच राज्यातील दहावी - बारावीच्या विद्यार्थ्यांना मात्र दूरदर्शन संच बंद करून अभ्यासावरच लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. कारण सोमवार दि. ७ मार्चपासून बारावीची परीक्षा सुरू होत आहे तर ३० मार्चपासून दहावीच्या मुलांची ‘कसोटी’ लागणार आहे.
गोवा शालान्त व उच्च माध्यमिक मंडळातर्फे घेण्यात येणार्‍या दहावी व बारावीच्या परीक्षांच्या तारखांची घोषणा झाली असून नियोजित कार्यक्रमानुसार बारावीच्या परीक्षा सोमवार दि. ७ मार्चपासून सुरू होत असून १३ केंद्रांतून घेतल्या जाणार्‍या या परीक्षेला राज्यातील एकूण १३,७६५ विद्यार्थी बसणार आहेत. तर, ३० मार्चपासून २४ केंद्रांतून घेण्यात येणार्‍या दहावीच्या परीक्षेला १६,७७५ विद्यार्थी आपले शैक्षणिक कौशल्य पणाला लावणार आहेत, अशी माहिती गोवा शालान्त व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सूत्रांनी दिली आहे.
विश्‍वचषकाचा परीक्षांवर परिणाम शक्य
दरम्यान, एका बाजूला आबालवृद्धांचा आवडता खेळ असलेल्या क्रिकेटची महास्पर्धा तर दुसर्‍या बाजूला शैक्षणिक कारकिर्दीतील महत्त्वपूर्ण परीक्षा यामुळे विद्यार्थ्यांच्या मनाची बरीच घालमेल होणार असून पुस्तकात तोंड खुपसून बसलेले असतानाही कोण जिंकले आणि कोण हरले याचा विचार त्यांचा सारखा पिच्छा पुरवणार आहे. परीक्षेच्या धामधुमीतच विश्‍वचषक स्पर्धेतील महत्त्वाचे सामने खेळले जाणार असल्याने त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Friday, 4 March, 2011

थॉमस पायउतार!

केंद्र सरकारला सणसणीत चपराक

नियुक्ती अवैध असल्याचा
सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा

नवी दिल्ली, ३ मार्च
केंद्रीय दक्षता आयुक्तपदी पी. जे. थॉमस यांची केंद्र सरकारने हेकेखोरपणे केलेली नियुक्ती सर्वोच्च न्यायालयाने आज अवैध ठरविली. ‘थॉमस यांची केंद्रीय दक्षता आयुक्तपदी नेमणूक करण्याच्या शिङ्गारशी करताना पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या नेतृत्वातील उच्चाधिकार समितीने संबंधित माहिती विचारात घेतली नाही. त्यांनी केलेल्या शिङ्गारशी कायद्याला अनुरूप नाहीत,’ अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारवर ताशेरे ओढताना थॉमस यांची नियुक्ती रद्द ठरविली. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर पी. जे. थॉमस यांनी लगेचच आपल्या पदाचा राजीनामा दिला.
दरम्यान, थॉमस यांच्या नियुक्तीचे प्रकरण भाजपने संसदेत उपस्थित करताना ‘या मुद्यावर केंद्र सरकारने संसदेत स्पष्टोक्ती द्यायलाच हवी,’ अशी मागणी उचलून धरली आहे, तर पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा सन्मान राखला जाईल, असे म्हटले आहे.
६० वर्षीय पी. जे. थॉमस यांची केंद्रीय दक्षता आयुक्तपदी नियुक्ती करण्यापूर्वी त्यांच्याविरुद्ध पामोलिन तेल आयात घोटाळा प्रकरणी केरळमधील न्यायालयात सुनावणी सुरू आहे. घोटाळ्यात त्यांचे नाव असताना सुद्धा भ्रष्टाचारावर पाळत ठेवणारी सर्वोच्च संस्था म्हणून ख्यात असलेल्या दक्षता आयोगाच्या प्रमुखपदी थॉमस यांची नियुक्ती करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाने त्यांची नियुक्ती अवैध ठरविल्यानंतरच थॉमस यांचे डोळे उघडले व त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. माजी नोकरशहा असलेल्या पी. जे. थॉमस यांची सहा महिन्यांपूर्वी देशाचे १४ वे केंद्रीय दक्षता आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
‘‘थॉमस यांनी केंद्रीय दक्षता आयुक्त पदाचा राजीनामा दिलेला आहे. सर्वोच्च न्यायालयानेही त्यांची या पदावरील नियुक्ती बेकायदेशीर ठरविल्यानंतर त्यांनी पद सोडलेले आहे,’’ अशी माहिती केंद्रीय कायदामंत्री वीरप्पा मोईली यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
‘‘उच्चाधिकार समितीने केलेल्या शिङ्गारशी या कायद्याच्या चौकटीत बसत नाहीत. याचाच अर्थ असा की, ३ सप्टेेंबर २०१० रोजी उच्चाधिकार समितीने केलेेल्या शिङ्गारशी कायद्याशी सुसंगत नाहीत, त्या कायद्याच्या चौकटीत बसत नसल्याने थॉमस यांची केलेली नियुक्ती अवैध आहे. ही नियुक्ती बेकायदेशीर झालेली आहे, असे आम्ही जाहीर करतो,’’ असा निर्णय सरन्यायाधीश एस. एच. कपाडिया, न्या. के. एस. राधाकृष्णन् आणि न्या. स्वतंत्रकुमार यांच्या खंडपीठाने दिला.
पी. जे. थॉमस यांच्याविरुद्ध पामोलिन तेल आयात प्रकरणी गुन्हेगारी स्वरूपाचे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे. असे असताना सुद्धा संबंधित सामग्रीकडे दुर्लक्ष करीत पंतप्रधानांच्या नेतृत्वातील उच्चाधिकार समितीने थॉमस यांची नियुक्ती केंद्रीय दक्षता आयुक्तपदी केली. कार्मिक आणि प्रशिक्षण विभागानेही २०००-२००४ या कालावधीत थॉमस यांच्याविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची शिङ्गारस केली होती. मात्र, या सर्वांकडे कानाडोळा करण्यात आला.
‘‘केंद्रीय दक्षता आयुक्त यासारख्या प्रतिष्ठेच्या पदाची प्रतिमा प्रभावित होऊ शकेल, अशा व्यक्तीचे नाव न सुचविण्याची खबरदारी पंतप्रधानांच्या नेतृत्वातील उच्चाधिकार समितीने घ्यायला हवी होती. केंद्रीय दक्षता आयुक्त पदावर बसविण्यात येणार्‍या व्यक्तीची स्वत:ची प्रामाणिक प्रतिमा आणि या संस्थेची प्रामाणिकता हे केंद्रीय दक्षता आयोगाच्या अधिनियमाअंतर्गत या कार्यालयाची कसोटी आहे. उच्चाधिकार समितीने संबंधित माहिती विचारात घेतली नाही. त्यांचे संपूर्ण लक्ष थॉमस यांच्या ‘बायोडाटा’वरच केंद्रित राहिले,’’ अशा शब्दात सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढले.

निर्णयाचा आदर : पंतप्रधान
केंद्रीय दक्षता आयुक्तपदी पी. जे. थॉमस यांची केलेली नियुक्ती रद्दबातल ठरविण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा मी आदर राखतो, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी व्यक्त केली. या प्रकरणी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये सरकारच्या वतीने हेच वक्तव्य केले जाणार आहे, अशी माहिती संसदेच्या सूत्रांनी दिली.

पंतप्रधानांची नैतिक जबाबदारी ः भाजप
गेल्या ६० वर्षांच्या इतिहासात प्रथमच खुद्द पंतप्रधानांनी केलेली नियुक्ती सुप्रीम कोर्टाने बेकायदा ठरवली आहे. त्यामुळे या निकालाची नैतिक जबाबदारी मनमोहन सिंग आणि सोनिया गांधी यांचीच आहे, अशी टिप्पणी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी केली. सुप्रीम कोर्टाचा निकाल म्हणजे केंद्र सरकारला सणसणीत चपराक असल्याचा टोला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी लगावला आहे. सुषमा स्वराज यांनी हा मुद्दा आधीच उपस्थित केला होता, पण त्याकडे सरकारने दुर्लक्ष केले, असेही त्यांनी नमूद केले.
गृहमंत्री पी. चिदंबरम् यांनी या प्रकाराची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी संयुक्त जनता दलाचे नेते शरद यादव यांनी केली आहे. माकप आणि भाकपनेही या विषयावर सरकारकडून खुलासा मागवला आहे.

कुडचडेत ट्रकमालकांचा भव्य मोर्चा

मुख्यमंत्र्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी

- आज मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक
- खनिज मालवाहतूक सुरू करणार
- ‘तालांव’ दिल्यास महामार्ग रोखणार

कुडचडे, दि. ३ (प्रतिनिधी)
खनिज मालवाहतूक करणार्‍या ट्रकमालकांना सतावण्याचे सत्र सरकारने सुरू केल्याचा दावा करून संतप्त झालेल्या ट्रकमालकांनी आज कुडचड्यात आलेल्या मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत भव्य मोर्चा काढला. कुडचडेचे आमदार श्याम सातार्डेकर यांच्या वाढदिवसानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात उपस्थिती लावण्यासाठी मुख्यमंत्री कामत आले असता गेले चार दिवस खनिज मालवाहतूक बंद ठेवलेल्या ट्रकमालकांनी आपला रोष अतिशय जळजळीत पद्धतीने व्यक्त करताना सरकारी धोरणांवर सडकून टीका केली.
ट्रकांच्या हौदाला बसवण्यात येणारी ९ सें.मी.च्या पट्टीचे निमित्त करून वाहतूक खात्याने ‘तालांव’ देण्याची मोहीम आखून ट्रकमालकांच्या पोटावरच पाय देण्याचे धोरण अवलंबले आहे. ते त्वरित थांबवले नाही तर तमाम खनिज ट्रक नेऊन गोव्यातील महामार्गांवर ठेवले जातील असा कडक इशाराही यावेळी ट्रकमालकांनी दिला. नव्यानेच स्थापण्यात आलेल्या ट्रकमालक कृती समितीचे अध्यक्ष सुभाष फळदेसाई यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले.
यावेळी दीड हजारांपेक्षा अधिक संख्येने उपस्थित असलेल्या ट्रकमालकांनी मुख्यमंत्री कामत यांची हुर्यो उडवली. मुख्यमंत्री दिगंबर कामत हे सरकार चालवण्यास असमर्थ असल्याची जोरदार घोषणाबाजी यावेळी करण्यात आली. कुडचडेच्या साग मैदानावर आमदार यांच्या वाढदिवसानिमित्ताने आयोजित भव्य कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री मत, गृहमंत्री रवी नाईक, आमदार आलेक्स सिक्वेरा व अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.
दरम्यान, सदर मोर्चा ‘साग’ मैदानाजवळ पोहोचला असता केपे उपअधीक्षक रोहिदास पत्रे, निरीक्षक भानुदास देसाई, सुदेश नार्वेकर, सागर एकोस्कर यांच्यासह उपस्थित असलेल्या पोलिस फौजफाट्याने तो रोखला. मात्र ट्रकमालकांनी मुख्यमंत्र्यांची भेट होईपर्यंत माघारी न वळण्याचा निर्णय घेतला. शेवटी ट्रकमालकांचा रेटा पाहून मुख्यमंत्र्यांनी कृती समितीचे अध्यक्ष सुभाष फळदेसाई यांची भेट घेतली व उद्या शुक्रवारी एक खास बैठक घेऊन यावर तोडगा काढण्याचे आश्‍वासन दिल्यानंतरच मोर्चा माघारी वळला.
दरम्यान, ट्रकमालकांनी उद्यापासून मागची फळी न काढता मालवाहतूक करण्याचा निर्णय घेतला असून वाहतूक खात्याने तरीही सतावणूक सुरूच ठेवल्यास गोव्यातील सर्व महामार्ग बंद करण्याचा इशारा दिला आहे.

कलंकित सरकारविरुद्ध आज भाजपचे रणशिंग

गोपीनाथ मुंडे करणार कार्यकर्त्यांना मार्गदर्शन

पणजी, दि. ३ (प्रतिनिधी)
भाजपचे लोकसभेचे उपनेते तथा गोव्याचे निवडणूक प्रभारी खासदार गोपीनाथ मुंडे यांच्या उपस्थितीत उद्या ४ रोजी गोवा प्रदेश भाजपतर्फे राज्यातील कॉंग्रेस आघाडी सरकारविरोधात रणशिंग फुंकले जाणार आहे. कॉंग्रेस सरकारच्या असंख्य भानगडींचा उलगडा करणारी ‘कलंकित सरकार’ ही पुस्तिका प्रकाशित करून ती राज्यातील तळागाळातील लोकांपर्यंत पोचवून या सरकारला उघडे पाडण्याचा संकल्पच भाजपने सोडला आहे.
उद्या गोपीनाथ मुंडे यांचे गोव्यात आगमन होणार असून संध्याकाळी ४ वाजता पणजी येथील गोमंतक मराठा समाज सभागृहात प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा भरणार आहे. सुमारे ७०० प्रमुख कार्यकर्त्यांच्या या मेळाव्यात गोपीनाथ मुंडे मार्गदर्शन करणार आहेत. दिल्लीत विविध भ्रष्टाचार प्रकरणांमुळे आधीच बदनाम झालेल्या कॉंग्रेसला नामोहरम करण्यासाठी भ्रष्टाचाराची प्रकरणे सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचवण्याचा संकल्पच भाजपने सोडला असून कॉंग्रेसकडून कशा पद्धतीने देशाची लूट सुरू आहे याची माहितीच या देशव्यापी आंदोलनातून दिली जाणार आहे. गोवा भाजपकडून राज्यातील कॉंग्रेस आघाडी सरकारचे कारनामे प्रसिद्ध करण्यात आले आहेत व इथे कशा पद्धतीने सरकारी तिजोरीवर डल्ला मारला जातो याची इत्थंभूत माहिती ‘कलंकित सरकार’ या पुस्तिकेतून दिली जाणार आहे. राज्यात विधानसभा निवडणुकांना अद्याप एका वर्षांचा काळ शिल्लक असला तरी निवडणुकीची तयारी एव्हानाच सुरू करून कॉंग्रेसची पूर्णपणे कोंडी करण्याची व्यूहरचना भाजपने आखली आहे. उद्याच्या या मेळाव्याला भाजपचे सर्व आमदार, प्रदेश भाजप पदाधिकारी तथा प्रमुख कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

निष्क्रीय व्यक्तीने आम्हांला शहाणपणा शिकवू नये

विश्‍वजितचा नार्वेकरांना टोला

पणजी, दि. ३ (प्रतिनिधी)
गेली अनेक वर्षे राजकारणात असल्याचा टेंभा मिरवणार्‍या, आरोग्यमंत्री पदाबरोबरच अनेक खात्याची मंत्रिपदे भोगलेल्या आणि या मंत्रिपदाच्या कार्यकालात कोणतेही भरीव काम न केलेल्यांनी आता आम्हांला शहाणपणा शिकवू नये, असा सणसणीत टोला दयानंद नार्वेकर यांचे नाव न घेता आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी लगावला.
आज (गुरुवारी) आरोग्य संचालनालयात एका कार्यशाळेचे उद्घाटन केल्यानंतर पत्रकारांनी त्यांना आमदार तथा माजी मंत्री ऍड. दयानंद नार्वेकर यांनी सुरू केलेल्या ‘पीपीपी’विरोधी सभांबद्दल विचारले असता विश्‍वजित यांनी वरील प्रतिपादन केले. स्वतः आरोग्यमंत्री असताना हळदोण्यासारख्या आपल्या मतदारसंघात एक दर्जात्मक आरोग्यकेंद्रही उभे न करू शकलेल्या आमदाराने आपल्यावर टीका करावी हेच मुळी हास्यास्पद आहे. अशी टीका करण्याआधी त्यांनी गेल्या चार वर्षात आपण राबवलेल्या आरोग्यविषयक धोरणांचा व निर्माण केलेल्या सुविधांचा अभ्यास करावा व मगच तोंडाची वाफ दवडावी, असा खोचक सल्लाही विश्‍वजित यांनी ऍड. नार्वेकरांना दिला.
‘पीपीपी’ होणारच
म्हापसा जिल्हा इस्पितळ हे खाजगी तत्त्वावरच (पीपीपी) चालू होणार आहे. गुजरात, मध्यप्रदेश आदी राज्यांत ‘पीपीपी’वरच अनेक प्रकल्प चालू आहेत, असे या वेळी आरोग्यमंत्र्यांनी पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्‍नाला उत्तर देताना सांगितले. कुणीही कितीही विरोध केला तरी सदर प्रकरणी सरकार अजिबात माघार घेणार नाही हा पवित्रा त्यांनी यावेळीही ठाम ठेवला. ‘पीपीपी’ धर्तीवर सदर इस्पितळ सुरू करण्याचे सर्व सोपस्कार सुरू असल्याची माहितीही श्री. राणे यांनी यावेळी दिली.

मेरशी अपघातात दुचाकीस्वार ठार

पणजी, दि. ३ (प्रतिनिधी)
मेरशी - कुंभारवाडा येथे आज सायंकाळी झालेल्या तीन वाहनांच्या विचित्र अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. उपचारासाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मयत व्यक्तीचे नाव मस्तान जहांगीर असल्याची माहिती जुने गोवे पोलिसांनी दिली. जहांगीर हा दुचाकीने भाडी मारण्याचे काम करीत होता. या अपघाताला कारणीभूत ठरलेली सर्व वाहने पोलिसांनी जप्त केली आहेत.
अधिक माहितीनुसार, सायंकाळी सुमारे ५.३० वाजता हा अपघात झाला. मेरशी येथे रेती वाहतूक करणार्‍या जीए ०७ एफ ०९१४ क्रमांकाच्या ट्रकाला जीए ०७ ई ४९२९ क्रमांकाच्या व्हॅनने जोरदार धडक दिली. त्यानंतर व्हॅनने समोरून येणार्‍या टीव्हीएस दुचाकीला (क्रमांक जीए ०१ टी ६४०८) ठोकरले. यावेळी व्हॅनच्या चाकाखाली आलेला मस्तान सुमारे दहा मीटर लांब फरफटत गेला. त्यानंतर सदर व्हॅनने रस्त्याच्या कडेला असलेल्या कुंपणाला धडक दिली. घटनास्थळी जमलेल्या लोकांनी १०८ क्रमांकावर दूरध्वनी करून अपघाताची माहिती दिली. जुने गोवेहून मेरशीला पोहोचण्यास १०८ रुग्णवाहिका तब्बल ४५ मिनिटांचा अवधी लागला असल्याची माहिती उपस्थितांनी दिली.
यानंतर त्या ठिकाणी असलेल्या पोलिसांनी पंचनामा करून वाहने ताब्यात घेतली. या विषयीचा अधिक तपास उपनिरीक्षक हंसकूटी करीत आहेत.

सरकारचे घोटाळे उघड करण्यासाठी ‘कलंकित सरकार’

भाजपच्या पुस्तिकेचे उद्या होणार प्रकाशन
पणजी, दि. २ (प्रतिनिधी): गोव्यातील कॉंग्रेस आघाडी सरकार असंख्य घोटाळ्यांनी बरबटलेले आहे. या सरकारच्या घोटाळ्यांची जंत्रीच ‘कलंकित सरकार’ या माहिती पुस्तिकेच्या माध्यमाने सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचवण्याचा संकल्प भाजपने सोडला आहे. येत्या ४ रोजी पणजीत गोमंतक मराठा समाज सभागृहात प्रमुख कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात भाजपचे लोकसभेचे उपनेते तथा गोव्याचे राष्ट्रीय निवडणूक प्रभारी गोपीनाथ मुंडे यांच्या हस्ते या पुस्तिकेचे प्रकाशन होईल, अशी घोषणा आज गोवा प्रदेश भाजपाध्यक्ष प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी केली.
आज भाजप मुख्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या प्रसंगी प्रा. पार्सेकर यांच्यासोबत केशव प्रभू व कुंदा चोडणकर उपस्थित होत्या. गेल्या हिवाळी अधिवेशनात भाजपतर्फे सरकारला शेकडो प्रश्‍न विचारण्यात आले होते. अधिवेशनाचा कार्यकाळ अत्यंत कमी होता व त्यामुळे हे सर्वच प्रश्‍न चर्चेसाठी येऊ शकले नाहीत. विधानसभा कामकाजाच्या थेट प्रक्षेपणातही अनेकांनी विघ्ने आणून विविध ठिकाणी केबल तोडण्याचे प्रकार केले व त्यामुळे जनतेला हे थेट कामकाज पाहता आले नाही. भाजपकडून विचारण्यात आलेल्या असंख्य प्रश्‍नांवर सरकारने दिलेल्या माहितीत विविध घोटाळ्यांचा पर्दाफाशच झाला आहे. ‘कलंकित सरकार’ या माहिती पुस्तिकेत सरकारच्या या कुकर्मांची माहिती संग्रहित करण्यात आली आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांमार्फत ही माहिती सर्व लोकांपर्यंत पोचवण्यात येईल, असे प्रा. पार्सेकर म्हणाले.
मराठी व इंग्रजी भाषेत मिळून या पुस्तिकेच्या एक लाख प्रती छापण्यात आलेल्या आहेत. पणजीतील मेळाव्यात या पुस्तिका सर्व प्रमुख कार्यकर्त्यांना सोपवण्यात येणार असून त्यामुळे सरकारच्या विविध भानगडी चव्हाट्यावर येणार आहेत, असेही ते म्हणाले.
ड्रग्ज प्रकरण, अबकारी घोटाळा, सा. बां. खात्यातील दलाली, केरोसीनचा काळाबाजार, कॅसिनो, बेकायदा खाण, धूळ प्रदूषण, आरोग्य खात्याचे ‘पीपीपी’करण, कचरा समस्या, हायक्वीप कंत्राट घोटाळा, पाण्याच्या टाक्यांचे प्रकरण आदी एकापेक्षा एक असंख्य घोटाळ्यांची विस्तृत माहितीच या पुस्तिकेत दिली आहे. गोव्यातील १८९ पंचायती, १४ पालिका व एक महापालिका अशा सर्व ठिकाणच्या प्रमुख कार्यकर्त्यांची या पुस्तिका वितरणासाठी निवड करण्यात आली आहे. ५ ते २० मार्च या दरम्यान, ही पुस्तिका प्रत्येकाच्या घराघरांत पोहोचेल. या पुस्तिकेतील माहिती ही सरकारकडूनच मिळाल्याने त्याची संपूर्ण जबाबदारी भाजपवर राहील, अशी हमीही प्रा. पार्सेकर यांनी दिली. यापुढे भाजपतर्फे या सरकारचा उल्लेख ‘कलंकित सरकार’ असाच केला जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

अस्तित्वाच्या लढाईसाठी सांगे वासीयांनी सज्ज व्हावे

आमदार वासुदेव मेंग गावकर यांचे आवाहन

तालुक्यात ६७ खाणी सुरू तर
तब्बल १४४ खाणींना परवाने

पणजी, दि. ३(प्रतिनिधी)
राज्यातील सर्वांत मोठ्या सांगे तालुक्यावर खाण उद्योजकांची वक्रदृष्टी पडली आहे. अमर्याद खाण उद्योगामुळे हा तालुका सध्या अखेरच्या घटका मोजतो आहे. सांगे तालुक्यातील नैसर्गिक संपत्ती ओरबाडून खाण उद्योजक कोट्यवधी रुपये कमवत असताना येथील भूमिपुत्रांवर मात्र विस्थापित होण्याचे संकट ओढवले आहे. सरकारकडूनच प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार एका सांगे तालुक्यात सध्या ६७ खाणी सुरू आहेत व या व्यतिरिक्त १४४ अतिरिक्त खाण परवाने या तालुक्यात देण्यात आले आहेत.
ही परिस्थिती अशीच सुरू राहिली तर सांगेवासीयांना आपले व आपल्या गावांचे अस्तित्व टिकवण्यासाठी शस्त्र हाती घेऊनच लढा उभारावा लागेल, असा स्पष्ट इशारा सांगेचे आमदार वासुदेव मेंग गावकर यांनी दिला आहे.
सांगे तालुक्याच्या र्‍हासाची हृदयद्रावक कथाच आमदार वासुदेव गावकर यांनी सादर केली. नैसर्गिक संपत्तीचा वरदहस्त लाभलेल्या या तालुक्याचा र्‍हास सुरू आहेच; परंतु प्रदूषण, पाण्याचे स्रोत नष्ट होणे व बेदरकार खनिज वाहतूक यामुळे स्थानिक लोकांत तीव्र असंतोष खदखदत आहे. खाण उद्योजक मूठभर स्थानिक लोकांना हाताशी धरून आपला व्यवसाय चालवतात, पण येथील बहुतांश लोक अजूनही आपला उदरनिर्वाह कृषी व्यवसायावर चालवतात व त्यांच्यासमोर या उद्योगामुळे उपासमारीचे भीषण संकट उभे ठाकले आहे. या परिस्थितीची करुण कहाणी विधानसभेत मांडून त्याची दखल घेण्यास सरकारकडून कुचराई केली जाते, हे लोकशाहीचेच दुर्दैव असल्याचे श्री. गावकर म्हणाले.
भारतातील सर्वांत मोठ्या धबधब्यांत सांगेतील दुधसागरचा पाचवा क्रमांक लागतो. भगवान महावीर व नेत्रावळी अभयारण्येही याच तालुक्यात येतात. कदंबकालीन तांबडी सुर्ल येथील पुरातन मंदिरही याच तालुक्यात आहे. संपूर्ण दक्षिण गोव्याला पाणीपुरवठा करणारा साळावली धरण प्रकल्प हा देखील याच तालुक्यात येतो. पण हे सारे वैभवच सध्या खाणींमुळे धोक्यात आले आहे. या तालुक्यात बहुतांश अनुसूचित जमातीचे लोक वास्तव्य करतात. कृषी व्यवसायावर अवलंबून असलेल्या या कष्टकरी भूमिपुत्रांवर घोर अन्याय होत आहे. राज्याच्या तिजोरीत कोट्यवधी रुपयांचा महसूल टाकणार्‍या या तालुक्यातील लोकांवर उपासमारीची व आपले अस्तित्व टिकवण्याची वेळ ओढवल्यामुळे येथील जनतेत असंतोष धुमसतो आहे. या भागांतील अनेक लोक अजूनही प्राथमिक गरजांपासून वंचित आहेत. साळावळी धरणग्रस्तांचा विषय अजूनही खितपत पडला आहे व तो सोडवण्यासाठी सरकार अजिबात पुढाकार घेत नाही, अशी खंत आमदार वासुदेव मेंग गावकर यांनी व्यक्त केली.
सरकारतर्फे दिलेल्या माहितीत सांगे तालुक्यातील ६७ खाणी अभयारण्य क्षेत्रापासून फक्त ५ किलोमीटर अंतरात कार्यरत आहेत. काही खाणींनी अभयारण्य क्षेत्रातच अतिक्रमण करून पर्यावरण व वन कायद्यांना वाकुल्या दाखवल्या आहेत. गेली दहा वर्षे खाण खात्याचा ताबा सांभाळणारे मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्याकडे राज्याचे नेतृत्व आले तेव्हा त्यांच्याकडून अपेक्षा बाळगून असलेल्या सांगेवासीयांची घोर निराशाच झाली आहे. कोडली, शिगांव, कुर्पे, रिवण, कोळंब आदी भाग खाण व्यवसायाने व्यापून गेले आहेत. विविध सामाजिक संघटनांकडूनही सांगेतील या परिस्थितीबाबत अपेक्षित आवाज उठवला जात नाही व त्यामुळे सांगेवासीयांना कुणी वालीच नसल्याची परिस्थिती आहे. विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांच्याकडून खाण व्यवसायाच्या विदारक परिस्थितीची माहिती देताना सांगे तालुक्याचा खास उल्लेख केला जातो. आता सांगेवासीयांवर अस्तित्वासाठी व्यापक लढा उभारण्याची वेळ आल्याने त्यासाठी सज्ज होण्याचे आवाहन करताना सरकारने सांगेवासीयांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये, असा इशाराच वासुदेव मेंग गावकर यांनी दिला आहे.

Thursday, 3 March, 2011

बाबूश समर्थक उमेदवारांवर अपात्रतेची टांगती तलवार!

वस्तू वाटप प्रकरणांची निवडणूक आयोगाकडून गंभीर दखल
पणजी, दि. २ (प्रतिनिधी): पणजी महापालिका निवडणुकीसाठी लागू असलेल्या आचारसंहितेचा भंग केल्याची अनेक प्रकरणे बाबूश मोन्सेरात समर्थक पॅनलच्या विरोधात दाखल झाल्याने त्याची गंभीर दखल राज्य निवडणूक आयोगाने घेतली आहे. या सर्व प्रकरणांची चौकशी सुरू असून सबळ पुरावे आढळल्यास या पॅनलच्या उमेदवारांवर अपात्रतेची कारवाईही होऊ शकते, असे स्पष्ट संकेत राज्य निवडणूक आयुक्त डॉ. एम. मुदास्सीर यांनी दिले.
पणजी महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने काही उमेदवारांकडून मतदारांना आमिषे दाखवण्यात येत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहे. काही वृत्तपत्रे तसेच वृत्तवाहिन्यांवरून तर प्रत्यक्षात मतदारांना विविध वस्तूंचे वाटप होत असल्याचे प्रकारही उघडकीस आले आहेत. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन उत्तर गोवा जिल्हाधिकारी मिहीर वर्धन यांना अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले असून त्यांचा अहवाल मिळाल्यानंतर कारवाईचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती डॉ. मुदास्सीर यांनी दिली. काही प्रभागांत गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींकडून मतदारांवर दबाव आणण्याचे प्रयत्नही सुरू असल्याच्या तक्रारी आयोगाकडे दाखल झाल्या आहेत. ही निवडणूक खुल्या व मोकळ्या वातावरणात पार पाडण्यासाठी आयोग पूर्णपणे दक्ष असून त्यासाठी निवडणूक निरीक्षकांना व्हीडीओग्राफरांचीही सोय करून देण्यात आल्याचे ते म्हणाले. मंत्री किंवा आमदार यांच्याकडून उमेदवाराच्या प्रचारासाठी जाहीर सभा बोलावणे किंवा प्रचारास उघडपणे फिरणे आचारसंहितेचा भंग ठरतो व त्याचीही दखल आयोगाने घेतली आहे, असे त्यांनी सांगितले. महापालिकेसाठी यावेळी मतदानकेंद्रे दुपटीने वाढवली आहेत व या निवडणुकीसाठी मतदानयंत्रांचा वापर होणार असल्याने १३ रोजी मतदानानंतर मतमोजणी घेणे सहज शक्य होणार आहे, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.
हातच्या कंकणाला आरसा कशाला ः पर्रीकर
‘हातच्या कंकणाला आरसा कशाला’, अशी प्रतिक्रिया नोंदवत बाबूश मोन्सेरात यांच्याकडून आपल्या उमेदवारांच्या प्रचारावेळी मतदारांना राजरोसपणे वस्तूंचे वाटप करण्यात येत असल्याचे वृत्त फोटोसहित प्रसिद्ध झाल्याने राज्य निवडणूक आयोगाला वेगळे पुरावे कशाला हवेत, असा सवाल विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी केला. या प्रकरणी आपण निवडणूक आयोगाकडे यापूर्वीच तक्रार नोंदवली आहे. मुळात हे प्रकार घडत असताना आयोगाने पोलिस व निरीक्षकांकरवी तात्काळ कारवाई करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. ऍड. आयरिश रॉड्रिगीस यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ला प्रकरणातील एक संशयित सध्या काही प्रभागांतील लोकांना धमक्या देत फिरतो आहे. मतदारांवर दबाव आणून त्यांच्यावर ठरावीक उमेदवारांनाच मतदान करण्याची सक्ती करण्यात येत असून हा प्रकार अजिबात खपवून घेतला जाणार नाही, असेही यावेळी पर्रीकर म्हणाले. ‘मनी अँड मसल पॉवर’चा वापर करून मतदारांवर दबाव घालण्याचा हा प्रकार सर्रासपणे सुरू असताना निवडणूक आयोग नेमके काय करतो आहे, असा प्रश्‍नही त्यांनी केला.
‘पॅन्जीमाईट्स’तर्फे उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे व त्यात बाबूश समर्थक एकाही उमेदवाराचा समावेश नाही, यावरून जनतेने आता विचार करण्याची गरज आहे. बाबूश समर्थक गटांत काही चांगले लोक असण्याची शक्यता आहे; पण त्यांनी आपले शहाणपण गहाण ठेवल्याने त्यांना वैयक्तिकरीत्या स्वीकारणे जनतेला परवडणारे नाही, असा टोलाही पर्रीकर यांनी लगावला. लोकप्रतिनिधींना आपल्या उमेदवारांच्या प्रचारात भाग घेण्यापासून कुणीही रोखू शकत नाही; केवळ सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग होता कामा नये व त्याकडेच आयोगाने लक्ष देण्याची गरज असल्याचेही पर्रीकर शेवटी म्हणाले.

गोव्यातील ड्रग्ज व्यवसायाला आवरा

खा. श्रीपाद नाईक यांची लोकसभेत मागणी
पणजी, दि. २ : गोवा हे देशातील एक लहान व सुख-शांतीमय राज्य असून आज हेच राज्य ड्रग्ज माफियांमुळे एक अशांत प्रदेश बनत चालला आहे. येथे दर दिवशी किलोकिलोभर गांजा, चरस तसेच अन्य अमली पदार्थ पकडले जात आहेत. या वाढलेल्या ड्रग्ज व्यवसायामुळे गोव्यात येणार्‍या पर्यटकांवर त्याचा विपरीत परिणाम होतो आहे, असे प्रतिपादन करून या ड्रग्ज व्यवहारांना त्वरित आवर घालण्याची मागणी उत्तर गोवा खासदार श्रीपाद नाईक यांनी आज लोकसभेत केंद्रीय गृहमंत्र्यांकडे केली.
गोव्यात वाढलेल्या या अमली पदार्थ व्यवहारांमुळे गोव्याच्या पर्यटनाला मोठा फटका बसत असून या व्यवहारांतून पर्यटकांच्या हत्याही होण्याचे प्रकार सुरू आहेत. त्यामुळे या व्यवहारांना वेळीच आवर घातला नाही तर सुंदर राज्य म्हणून ओळखला जाणारा गोवा येणार्‍या काळात बरबाद होऊन जाईल, अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली. या अमली पदार्थांमुळे येथील युवा पिढी बरबादीच्या उंबरठ्यावर उभी ठाकली आहे. त्यातच खेदाची गोष्ट म्हणजे ज्यांनी या प्रकारांना आळा घालायला हवा ते पोलिसच ड्रग्ज व्यवहारांत गुंतल्याची प्रकरणे पुढे येत आहेत. या प्रकरणांवरून काही पोलिस बडतर्फही झाले आहेत. त्यामुळे गोव्यात फोफावत चाललेल्या या अनिष्ट व्यवहाराची पाळेमुळे खणून काढण्यासाठी कडक पावले उचलण्याची गरज असल्याचे मत यावेळी श्रीपाद नाईक यांनी मांडले.

बेपत्ता इम्तियाझचा मृतदेह जुवारी नदीत सापडला

फोंडा, दि. २ (प्रतिनिधी): दवर्ली हाऊसिंग बोर्ड, मडगाव येथून बेपत्ता असलेल्या इम्तियाझ मलिक (३८) या युवकाचा मृतदेह गोणपाटात गुंडाळलेल्या स्थितीत बोरी येथे जुवारी नदीच्या पात्रात आज संध्याकाळी फोंडा पोलिसांना आढळून आला.
यासंबंधी मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २६ फेब्रुवारीपासून इम्तियाझ मलिक हा युवक बेपत्ता असून यासंबंधी मायणा - कुडतरी पोलिस स्थानकावर तक्रार दाखल करण्यात आली आहे. बोरी येथे जुवारी नदीच्या पात्रात आढळून आलेल्या मृतदेहाची ओळख मयत इम्तियाझ याच्या भावाने पटविली आहे. बोरी येथील जुवारी नदीच्या पात्रात अनोळखी मृतदेह असल्याची माहिती फोंडा पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेऊन नदीच्या पात्रात चिखलात रुतलेला मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदन करण्यासाठी बांबोळी येथील सरकारी इस्पितळात पाठविला आहे. मृतदेह गोणपाटात गुंडाळलेल्या स्थितीत असल्याने खुनाचा संशय व्यक्त केला जात असून त्याच दिशेने तपासकाम सुरू करण्यात आले आहे. मयत इम्तियाझ याचे अपहरण करून त्यानंतर त्याचा खून करून मृतदेह नदीच्या पात्रात फेकून देण्यात आल्याचा कयास व्यक्त केला जात आहे. या प्रकरणासंबंधी मयताच्या कुंटुंबीयांकडून अधिक माहिती मिळवून घेण्यास पोलिसांनी प्रारंभ केला आहे. सदर मृतदेह नदीच्या पात्रातून बाहेर काढण्यासाठी पोलिसांना बरेच परिश्रम घ्यावे लागले. निरीक्षक सी. एल. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दीपक पेडणेकर, सचिन लोकरे यांनी पंचनामा केला.

तरुणाची भररस्त्यावर आग लावून आत्महत्या

पणजी, दि. २ (प्रतिनिधी): जुने गोवे येथे एका बारमध्ये दारू पिण्यासाठी बसलेल्या मित्रांमध्ये भांडण झाल्यानंतर नरेंद्र कुमार या २३ वर्षीय तरुणाने काल रात्री भररस्त्यावर आग लावून घेतली. त्यात गंभीरपणे होरपळलेल्या सदर तरुणाला उपचारासाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात दाखल केले असता बुधवारी पहाटे त्याचे निधन झाल्याची माहिती जुने गोवे पोलिसांनी दिली. मात्र, त्याने स्वतःला जाळून घेण्यामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
अधिक माहितीनुसार, मयत नरेंद्र हा मूळ दिल्ली येथील रहिवासी असून तो जुने गोवे येथील आराडीबांध येथे आपल्या मित्रांसोबत राहत होता. काल सायंकाळी हे सर्व मित्र दारू पिण्यासाठी एका बारमध्ये गेले होते. यावेळी त्यांच्यात बाचाबाची झाल्यानंतर नरेंद्र याने रस्त्यावर येऊन स्वतःला आग लावून घेतली. या विषयीची अधिक माहिती मिळवण्यासाठी या प्रकरणाचे तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक हंसकूटी यांच्या मोबाईलवर अनेकवेळा संपर्क साधला असता त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. तसेच, जुने गोवे पोलिस स्थानकावर उपस्थित असलेले पोलिस हवालदार धुरी यांनी आपल्याला या विषयीची कोणतीही माहिती नसल्याचे सांगितले.

कावरे खाणमालकाविरुद्ध केपे पोलिसांत तक्रार

सरकारी अधिकार्‍यांचाही हात असल्याचा दावा
पणजी, दि. २ (प्रतिनिधी): कावरेपिर्ल - केपे येथे बेकायदा खाण चालवणारे शेख सलीम यांच्या विरोधात केपे पोलिस स्थानकात तक्रार सादर करण्यात आली आहे. काल या भागातील नागरिकांनी आंदोलन करून सदर खाण बंद पाडली होती.
गेल्या अनेक वर्षापासून ही खाण बेकायदा पद्धतीने सुरू असल्याने राज्य सरकारला जबरदस्त फटका बसला असून करोडो रुपयांचा महसूलही बुडाला आहे. या प्रकरणात खाणमालक आणि सरकारी अधिकार्‍यांनी संगनमताने सुमारे ३० कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा दावा करून मुख्तार मिनरल्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या विरुद्ध तसेच ही बेकायदा खाण सुरू ठेवण्यात मदत करणार्‍या सरकारी अधिकार्‍यांच्या विरुद्ध भ्रष्टाचाराचा आणि फसवणुकीचा गुन्हा नोंद करावा, अशी विनंती या तक्रारीत करण्यात आली आहे. सदर तक्रार मडगाव येथील महेश कामत, काशिनाथ शेटये व ऍड. आतीश मांद्रेकर यांनी केली आहे.
या खाणीतून आत्तापर्यंत ५० हजार टन खनिजाचे उत्खनन करण्यात आले आहे. त्यासाठी मर्यादेपेक्षा जास्त खोदकाम केले गेले आहे. तरीही संबंधित खात्याने या खाणीला एकही कारणे दाखवा नोटीस बजावलेली नाही. राज्य सरकारचे खाण संचालनालय अशा बेकायदा खाणींना प्रोत्साहनच देते आहे. तसेच, यात मंत्रिमंडळातील अनेक मंत्रीही यात सहभागी आहेत, असेही या तक्रारीत म्हटले आहे. त्यामुळे गंभीर दखल घेऊन खाणमालक शेख सलीम, खाण संचालनालयाचे संचालक आणि अधिकारी, वाहतूक खात्याचे संचालक आणि अधिकारी, राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष, वनखात्याचे मुख्यवनपाल, कावरे पंचायतीचे सरपंच आणि सचिव यांच्या विरुद्ध भ्रष्टाचार निर्मूलन कायदा ७, ८, ९, १०, ११, १२ व १३ तसेच, २१७, २१८, ४०५, ४०९, ४२०, ४६८, ४७१ आणि १२०(ब) कलमानुसार गुन्हा नोंद करून चौकशी करावी, अशी विनंती करण्यात आली आहे.
सदर तक्रारीची नोंद येत्या चोवीस तासांत न घेतल्यास त्यांच्या विरुद्ध न्यायालयात धाव घेतली जाणार असल्याचेही शेवटी म्हटले आहे.

गोवा ‘मनो(ज)रंजन’ संस्थेचे तीनतेरा!

स्थानिक कर्मचार्‍यांना गळती, दिल्लीकरांची भरती?
पणजी, दि. २ (प्रतिनिधी): आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी गोवा हे कायमस्वरूपी केंद्र असेल, असे ठोस आश्‍वासन मिळाल्याने राज्यात चित्रपट संस्कृती वृद्धिंगत व्हावी व गोव्यातील युवकांच्या प्रतिभेला प्रोत्साहन व त्यांना प्रशिक्षण मिळावे या उद्देशाने माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी गोवा मनोरंजन संस्थेची स्थापना केली होती. विद्यमान कॉंग्रेस आघाडी सरकारच्या कार्यकाळात या संस्थेचे तीन तेरा वाजले असून या ठिकाणी सध्या सर्वत्र ‘मनोज’रंजन कारभार सुरू आहे, असा बोलबाला पसरला आहे.
गोवा मनोरंजन संस्था (ईएसजी) तर्फे आज विविध पदांची भरती करण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. या जाहिरातीत ‘फिल्म प्रोग्रामर’ या पदासाठी कोकणी व मराठी भाषेच्या ज्ञानाची अट शिथिल ठेवण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. एकीकडे या पदासाठी १५ वर्षे गोव्यातील वास्तव्य सक्तीचे आहे व दुसरीकडे कोकणी व मराठी भाषेच्या ज्ञानाची अट नाही, याचे नेमके प्रयोजन काय, असा सवाल अनेकांनी उपस्थित केला आहे. संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज श्रीवास्तव यांच्या मनमानी कारभाराच्या ‘सुरस व चमत्कारिक’ कथा यापूर्वीच मुख्यमंत्री व मुख्य सचिवांपर्यंत पोचवण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे दिल्लीतील आपल्या मर्जीतील लोकांची खोगीरभरती करण्याचाच हा डाव तर नाही ना, असा संशयही काही चित्रपट निर्मात्यांनी व्यक्त केला आहे. ‘इफ्फी’ २००९ साली मनोज श्रीवास्तव यांनी मोनिका भसीन नामक एका लघू चित्रपट निर्मात्याची निवड भारतीय पॅनोरमा विभाग प्रमुखपदी केली होती. या विभागात निवड झालेल्या चित्रपटांची माहिती अनधिकृतपणे ईमेलव्दारे पोचवण्यात आल्याने सदर अधिकारी बरीच चर्चेतही आली होती. अनेकांकडून या प्रकरणी हरकत घेण्यात आल्याने सदर अधिकारी हे काम अर्ध्यावरच सोडून राजीनामा देऊन गेल्याचीही अजून अनेकांना आठवण आहे. हा प्रकार घडूनही २०१० साली मोनिका भसीन यांची कंत्राटी पद्धतीवर ‘फिल्म प्रोग्रामर’ म्हणून निवड झाली व महोत्सव संपल्यानंतर त्या परत दिल्लीला गेल्या. आता या पदाची घोषणा करून त्यात कोकणी व मराठीची अट शिथिल करण्यामागे पुन्हा एकदा मोनिका भसीन यांचीच वर्णी लावण्याचा घाट तर नाही ना, असाही संशय या लोकांनी उपस्थित केला आहे.
मनोहर पर्रीकर यांनी २००४ साली या संस्थेची स्थापना केली त्यावेळी प्रशासनातील काही कार्यक्षम युवा अधिकार्‍यांची या ठिकाणी नेमणूक केली होती. या अधिकार्‍यांत साईश गांधी, प्रजेश मणेरकर, श्रीनेत कोठावळे, डॉम्निक फर्नांडिस, निखिल देसाई आदींचा समावेश होता. या अधिकार्‍यांना अनुभव मिळाल्यानंतर त्यांना या संस्थेतच सामावून घेण्याचे त्यांचे प्रयोजन होते. भाजप सरकार गेल्यानंतर या संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारिपदी मनोज श्रीवास्तव यांची नेमणूक झाली आणि एकापाठोपाठ एक करून हे सर्व अधिकारी आपल्या पूर्वपदांवर रुजू झाले. इतर विभागांत कर्मचार्‍यांना कंत्राटी पद्धतीवर नेमून त्यांना योग्य प्रशिक्षण दिल्यानंतर सेवेत कायमस्वरूपी सामावून घेण्याचे प्रयोजनही अयशस्वी ठरले. संस्थेच्या नोकरभरतीचे नियमच अद्याप तयार होत नसल्याने या कर्मचार्‍यांनी आपल्या भवितव्याची शाश्‍वती नसल्यानेच राजीनामा देण्यास सुरुवात केल्याची खबर आहे.
दरम्यान, श्रीवास्तव यांच्या मनमानी व एकतर्फी कारभारामुळेच कर्मचार्‍यांत नाराजी पसरली असून त्यामुळे संस्थेचे संपूर्ण प्रशासनच ठप्प पडल्याचीही वार्ता पसरली आहे. मुख्यमंत्री कामत यांनी तात्काळ संस्थेच्या कारभारात लक्ष घालावे, अशी मागणी करीत अन्यथा ‘मनोज’रंजनामुळे सरकारचेच हसे होण्याची वेळ ओढवेल, असा टोलाही काही सूत्रांनी हाणला आहे.

Wednesday, 2 March, 2011

कावरेपिर्लावासीयांचे ‘जय हो!’

अखेर भूमिपुत्रांपुढे सरकार नमले - खाण परवाना रद्द होणार
पणजी, दि. १ (प्रतिनिधी): कावरेपिर्ला गावातील भूमिपुत्रांनी तेथील लोकांचे श्रद्धास्थान व त्या भागातील लोकांच्या उदरनिर्वाहाचा सारा भार वाहणार्‍या देवपान, देवडोंगरावरील बेकायदा खाण बंद पाडण्यासाठी खाण खात्यावर आज मंगळवारी जबर धडक दिली. जोपर्यंत या बेकायदा खाणींवरील व्यवहार बंद होत नाहीत व हा खाण परवाना रद्द होत नाही तोपर्यंत माघार घेणार नाही, असा पवित्रा घेत प्रसंगी प्राणांचीही आहुती देण्यास पुढे सरसावलेल्या या आक्रमक भूमिपुत्रांसमोर अखेर खाण खात्याला सपशेल शरणागती पत्करणे भाग पडले. उद्या २ रोजी या बेकायदा खाणींवरील सर्व यंत्रे हटवण्यात येतील तसेच तीन दिवसांच्या आत या खाणीचा परवाना रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे लेखी आश्‍वासन खाण खात्याचे संचालक अरविंद लोलयेकर यांनी आंदोलकांना दिले तेव्हाच कुठे हे आंदोलन मागे घेण्यात आले.
देवपान, देवडोंगर या नावाने प्रसिद्ध असलेल्या कावरेपिर्लातील या प्रसिद्ध डोंगरावर शेख महम्मद इसाक यांचे वारसदार शेख सलीम यांच्याकडून ही बेकायदा खाण सुरू होती. या खाणीविरोधात गेली दोन वर्षे येथील स्थानिक लोक जिवाची बाजी लावून लढा देत आहेत. या ठिकाणच्या गरीब व अनुसूचित जमातीच्या या लोकांची दिशाभूल करून व सरकारी यंत्रणेशी हातमिळवणी करून ही बेकायदा खाण सुरू करण्याचा घाट सुरू झाल्याने संतप्त बनलेल्या या लोकांनी आज मात्र या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावण्यासाठीच बाहेर पडण्याचा निर्धार केला. या भागाचे स्थानिक आमदार बाबू कवळेकर, नगरसेवक अमोल काणेकर, जितेंद्र गांवकर देसाई आदींचा या खाणीला पाठिंबा असल्याचा आरोपही या लोकांनी केला. या भागांतील लोकांचे जीवनच मुळी या डोंगरावर अवलंबून आहे. इथल्या लोकांच्या उदरनिर्वाहाचे मुख्य स्रोत असलेला हा डोंगर खाणीसाठी वापरल्यास हा संपूर्ण गावच उध्वस्त होईल व त्यामुळेच हा डोंगर वाचवण्यासाठी प्राणाची बाजी लावण्यापलीकडे कोणताच उपाय नव्हता, अशी प्रतिक्रिया कावरे आदिवासी बचाव समितीचे अध्यक्ष नीलेश गांवकर यांनी दिली.
सरकारी टोलवाटोलवी
आज सकाळी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या मडगाव येथील निवासस्थानावर मोर्चा नेल्यानंतर त्यांनी या लोकांना राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे चौकशी करण्यास पाठवले. राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने आपल्या नेहमीच्या सवयीप्रमाणे खाण खात्याकडे अंगुलिनिर्देश केला. खाण खात्याचे संचालक अरविंद लोलयेकर यांनी खाण परवाना रद्द करण्याचा आपल्याला अधिकार नाही व त्यासाठी दिल्लीत जावे लागणार असे उत्तर दिल्याने हे लोक अधिकच आक्रमक बनले. जोपर्यंत या खाणीवरील व्यवहार ताबडतोब बंद होत नाहीत व या खाणीचा परवाना ताबडतोब रद्द होत नाही तोपर्यंत अजिबात मागे हटणार नाही, असा निर्धारच या लोकांनी करून खाण खात्याच्या मुख्यालयात ठिय्याच मांडल्याने खाण खात्याच्या अधिकार्‍यांची पाचावरच धारण बसली. दुपारी साडेबारा वाजता आलेल्या या लोकांनी रात्री ९ वाजेपर्यंत तिथे ठिय्या मांडल्याने व त्यांची समजूत काढण्याचे सगळेच प्रयत्न व्यर्थ ठरल्याने अखेर सरकारला या लोकांसमोर शरणागती पत्करणे भाग पडले.
एनजीओही पुढे सरसावले
दरम्यान, कावरेपिर्लातील लोकांच्या या धाडसाची वार्ता संपूर्ण राज्यभरात पसरल्यानंतर विविध सामाजिक व बिगर सरकारी संघटनांच्या पदाधिकार्‍यांनीही या लोकांच्या आंदोलनाला पाठिंबा दिल्याने हे आंदोलन अधिकच चिघळले. कावरे आदिवासी बचाव समितीच्या पदाधिकार्‍यांनी तोंडी आश्‍वासनावर अजिबात मागे हटणार नसून प्राण गेला तरी आंदोलन मागे न घेण्याचा इशारा दिल्याने अखेर खाण खात्याचे संचालक अरविंद लोलयेकर यांना लेखी आश्‍वासन देणे भाग पडले.
महिला व शाळकरी मुलांचाही समावेश
कावरेपिर्लाहून दोन बसगाड्या करून आलेल्या या आंदोलकांत मोठ्या प्रमाणात गरीब महिला व शाळकरी मुलांचा समावेश होता. या भागातील बहुतांश लोक हे अनुसूचित जमातीचे घटक आहेत. वेळीप व गांवकर समाजाच्या या लोकांनी पत्रकारांसमोर मांडलेली व्यथा मन हेलावणारीच होती. या खाणीमुळे संपूर्ण गावच उध्वस्त होत असेल तर मग जगून तरी काय उपयोग; नपेक्षा या गावासाठी प्राणांची आहुती देणेच योग्य, अशी प्रतिक्रिया येथील युवकांनी व्यक्त करून आपल्या भूमीप्रति असलेली भावनाच प्रकट केली. या ठिकाणी गोवा फाउंडेशनचे ऍड. क्लॉड आल्वारीस, ऍड. सतीश सोनक, ऍड. यतीश नाईक तसेच इतर अनेक सामाजिक संघटनांच्या नेत्यांनी उपस्थिती लावून या लोकांना पाठिंबा दिला.
... अन्यथा कायदा हातात घेऊ
मडगाव, दि. १ (प्रतिनिधी): कावरे येथे सुरू असलेल्या बेकायदा खाणीविरुद्ध तेथील रहिवाशांनी आज मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या येथील निवासस्थानावर मोर्चा आणून या खाणीवर कारवाई का केली जात नाही त्याबाबत जाब विचारला व दोन दिवसांत ती बंद केली गेली नाही तर कायदा हातात घेऊन ती बंद केली जाईल व त्यातून उद्भवणार्‍या परिणामांना सरकारच जबाबदार राहील असा इशारा दिला. सुमारे शंभर जणांचा या मोर्चात समावेश होता.
बेकायदेशीर व बेदरकारपणे चालू असलेल्या या खाणीमुळे परिसरातील शेतीबागायतींची पार धुळधाण उडालेली आहे व विहिरी व तळी निरुपयोगी बनली आहेत व त्याबाबत केलेल्या तक्रारींची कोणीही अधिकारी दखल घेत नाहीत ही बाब निदर्शकांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यांनी निदर्शकांचे म्हणणे सहानुभूतीपूर्वक ऐकून घेतले व त्यांच्या समक्ष प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अध्यक्षांशी संपर्क साधून सदर खाणीवर कारवाई करण्याची सूचना केली.
यावेळी काही निदर्शकांनी सरकार खाणमालकांच्या कह्यात जाऊन गोव्याचा विध्वंस करण्यास उत्तेजन देत असल्याचा आरोप केला. सदर खाणीविरुद्ध यापूर्वीही मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली असता त्यांनी अशाच प्रकारे संबंधितांना सूचना दिल्या होत्या; पण कार्यवाही झाली नव्हती म्हणून हा प्रश्‍न धसास लावण्यासाठी ती मंडळी पणजीकडे रवाना झाली.

११ दोषींना ‘सजा-ए-मौत’

गोध्रा जळितकांड प्रकरणी
२० दोषींना जन्मठेप - साबरमती विशेष न्यायालयाचा निर्णय
अहमदाबाद, द. १ : साबरमती एक्सप्रेसमधील ५९ कारसेवकांचे बळी घेणार्‍या २००२ मधील गोध्रा जळितकांड प्रकरणाचा बहुप्रतीक्षित फैसला साबरमती विशेष न्यायालयाने आज सुनावला. या प्रकरणी ३१ पैकी ११ दोषींना न्यायालयाने ‘सजा-ए-मौत’ अर्थात फाशीची, तर उर्वरित २० आरोपींना जन्मठेपेची शिक्षा आज ठोठावली. गोध्रा येथील जळितकांड हे संपूर्ण देशाला हादरवून टाकणार्‍या गुजरातमधील जातीय दंगलींची ठिणगी ठरली होती. या प्रकरणातील ६३ आरोपींची न्यायालयाने यापूर्वीच पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केलेली आहे.
‘‘हे जळितकांड दुर्मिळातले दुर्मीळ असेच आहे. या जळितकांडातील ११ आरोपी ङ्गाशीच्याच शिक्षेसाठी पात्र आहेत. तर, उर्वरित आरोपींना आपले न्यायालय जन्मठेपेची शिक्षा ठोठावत आहे,’’ असे विशेष न्यायाधीश पी. आर. पटेल यांनी साबरमती कारागृहात स्थापन करण्यात आलेल्या विशेष न्यायालयात आपला निकाल जाहीर करताना म्हटले. हा निकाल ऐकण्यासाठी लोकांनी न्यायालयात प्रचंड गर्दी केली होती.
‘‘कारसेवकांचे हत्याकांड घडविण्यासाठीच दोषींनी हे भीषण षडयंत्र रचले. गोध्राजवळ या दोषींनी साबरमती एक्सप्रेसच्या एस-६ या डब्याला आग लावली आणि ५९ कारसेवकांचे बळी घेतले. या हत्याकांडात सक्रिय सहभागी असलेल्या दोषींना न्यायालयाने मृत्युदंडाची शिक्षा ठोठावली आहे,’’ अशी माहिती निकाल जाहीर झाल्यानंतर विशेष सरकारी वकील जे. एम. पांचाल यांनी दिली.
ङ्गाशीची शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपींना न्यायालयाने विविध कलमांखाली जन्मठेपेचीही शिक्षा ठोठावली आहे. ‘‘हे हत्याकांड अतिशय भीषण आणि नृशंस असल्याने सर्व ३१ दोषींना मृत्युदंडाची शिक्षा ठोठावण्यात यावी,’ अशी जोरदार मागणी सरकारी पक्षाने केली होती.
गोध्रा जळितकांडामागे मोठे षडयंत्र असल्याचा सरकारी पक्षाचा युक्तिवाद मान्य करून न्यायालयाने गेल्या २२ ङ्गेबु्रवारी रोजी ३१ आरोपींना या प्रकरणात दोषी ठरविले होते आणि पुराव्यांअभावी ६३ आरोपींची निर्दोष मुक्तता केली होती. दोषी आरोपींविरुद्ध भादंविच्या विविध कलमांतर्गत विविध स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, ११ आरोपींना ङ्गाशीची शिक्षा आणि २० आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावतानाच न्यायालयाने या निकालाविरोधात वरच्या न्यायालयात जाण्याची मुभाही आरोपींना दिली आहे.
ङ्गाशीची शिक्षा झालेले दोषी
रज्जाक कुरकुर, सलमान जर्दा, इरङ्गान कलंदर, इरङ्गान पातडियाला, सिराज बेहला, हाजी बिलाल, मेहबूब लतिका, रमजानी बेहराला, जाबिर बेहराला, सिराज बालाला, मेहबूब चांदा.
----------------------------------------------------------------
‘‘हे जळितकांड दुर्मिळातले दुर्मीळ असेच आहे. या जळितकांडातील ११ आरोपी ङ्गाशीच्याच शिक्षेसाठी पात्र आहेत. तर, उर्वरित आरोपींना आपले न्यायालय जन्मठेपेची शिक्षा ठोठावत आहे,’’- न्या. पी. आर. पटेल

पडोसे पाणी प्रकल्पातील कामगारांचे आंदोलन मागे

* भाजप युवा मोर्चाचा पुढाकार
* तांत्रिक साहाय्यक महिन्यासाठी निलंबित
* ७०० कामगारांना सुविधांचा लाभ मिळणार

डिचोली, दि. १ (प्रतिनिधी): भाजप युवा मोर्चाने घेतलेल्या पुढाकारामुळे पडोसे पाणी प्रकल्पात कंत्राटी पद्धतीवर काम करणार्‍या ३५ कामगारांबरोबरच राज्यातील इतर ७०० कंत्राटी कामगारांची समस्या सुटली आहे. या कामगारांनी आज आपले धरणे आंदोलन मागे घेतले. मात्र, डिचोली शहरातील पाण्याच्या टंचाईची समस्या सलग सहाव्या दिवशीही सुटलेली नाही. दरम्यान, या प्रकल्पातील तांत्रिक साहाय्यक संभाजी राणे यांनी जलशुद्धीकरण प्रकल्पाची योग्य निगा न राखल्याने सार्वजनिक बांधकाममंत्री चर्चिल आलेमाव यांनी त्यांना एक महिन्यासाठी निलंबित केले आहे. कामगारांनाही त्यांनी सक्त ताकीद दिली.
आज सकाळी मंत्री श्री. आलेमाव यांनी पडोसे पाणी प्रकल्पाला भेट दिली. कामगार कंत्राटी पद्धतीवर असल्याने त्यांना संपावर जाता येत नाही. यापुढे त्यांच्याकडून असे वर्तन घडल्यास त्यांना कामावरून काढून टाकण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला. पाळीचे आमदार प्रताप गावस यांनी कामगारांची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष डॉ. प्रमोद सावंत यांनी भगवान हरमलकर व भालचंद्र नार्वेकर यांच्यासह घटनास्थळी धाव घेतली व कार्यकारी अभियंते श्री. कमलादिनी यांच्याशी बोलणी करण्याची मागणी केली. परंतु, त्यांनी मागणी धुडकावून लावताच या शिष्टमंडळाने विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांची भेट घेतली. तद्नंतर श्री. पर्रीकर यांनी अभियंते श्री. रेगो यांची भेट घेऊन कामगारांवर होणार्‍या अन्यायाला वाचा फोडली व निवेदन सादर केले. त्याची दखल घेऊन कंत्राटी कामगारांना २०११ पासून वेतनाची वाढीव थकबाकी, पी. एफ., ईएसआय आदी सुविधा पुरविण्यात येणार आहेत. राज्यातील ७०० कामगारांनाही या सुविधांचा लाभ मिळणार आहे. परिणामी कर्मचार्‍यांनी आपले धरणे आंदोलन मागे घेतले.
दरम्यान, उत्तर गोव्यात गेल्या काही दिवसांपासून निर्माण झालेल्या पाणीटंचाईला सरकारच पूर्णपणे जबाबदार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा पुष्पाग्रजांना साहित्य पुरस्कार

- जगदीश खेबूडकरांना जीवनगौरव
- १२ मार्च रोजी पुण्यात वितरण

पणजी, दि. १ (सांस्कृतिक प्रतिनिधी): पुणे येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी देण्यात येणार्‍या प्रतिष्ठेच्या साहित्य पुरस्कारामध्ये यंदा गोमंतकीय कवी अशोक नाईक तुयेकर ऊर्फ पुष्पाग्रज यांच्या ‘शांती अवेदना’ या कवितासंग्रहाची निवड करण्यात आली आहे. मुंबईच्या ‘ग्रंथाली’ प्रकाशनाने हा संग्रह प्रकाशित केला असून कविवर्य वसंत डहाके यांच्या हस्ते या संग्रहाचे पणजीत प्रकाशन झाले होते.
१२ मार्च हा कै. यशवंतराव चव्हाण यांचा जन्मदिवस. या दिवशी पुण्यातील टिळक स्मारक मंदिर प्रांगणात आयोजित होणार्‍या या समारंभात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार ज्येष्ठ कवी तथा गीतकार जगदीश खेबूडकर यांना जीवनगौरव तर कवी पुष्पाग्रज यांना साहित्य पुरस्कार प्रदान करतील, अशी माहिती प्रतिष्ठानचे विश्‍वस्त कविवर्य रामदास फुटाणे यांनी दिली. दर वर्षी १२ मार्च रोजी आयोजित होणार्‍या या पुरस्कार वितरण समारंभाला तसेच भव्य अशा कविसंमेलनास हजारोंच्या संख्येने रसिक उपस्थिती लावतात असेही श्री. फुटाणे यांनी सांगितले.
कवी पुष्पाग्रज यांना आत्तापर्यंत कै. बाबूराव ठाकूर साहित्य पुरस्कार - बेळगाव, गोवा शासनाचा राज्य पुरस्कार, पुण्याच्या नाथ पडवळ प्रतिष्ठानचा कैफी आझमी पुरस्कार, पुण्याच्या बलराज साहनी फाउंडेशनचा साहीर लुधियानवी पुरस्कार, द गोवा हिंदु असोसिएशनचा बा. भ. बोरकर पुरस्कार आदी पुरस्कार प्राप्त झाले आहेत. कॅलिडोस्कोप, नन्रुख, शांती अवेदना (सर्व कवितासंग्रह) सूर्यकोटी समप्रभ (नाटक), हंसोळी (विनोदी लेखसंग्रह), मनःपूत (कादंबरी) अशी ग्रंथसंपदा त्यांच्या नावावर आहे. गेली २६ वर्षे गोव्याच्या पत्रकारितेत सक्रिय असलेले अशोक नाईक तुयेकर ऊर्फ पुष्पाग्रज हे सध्या ‘दै. गोवादूत’चे पुरवणी संपादक म्हणून काम पाहत आहेत.

बाबूश समर्थक गटाला अद्दल घडवा

‘पँन्जीमाइट्स्’तर्फे २९ उमेदवारांची यादी जाहीर
पणजी, दि. १ (प्रतिनिधी): गोव्याची राजधानी असलेल्या पणजी शहराला भ्रष्ट राजवटीतून मुक्त करण्यासाठी आता सर्वांनी एकत्र येण्याची नितांत गरज आहे. गेल्या पाच वर्षांत बाबूश मोन्सेरात समर्थक गटाकडून या शहराची ज्या पद्धतीने विटंबना सुरू आहे त्याचा वचपा काढण्यासाठी पणजीतील समस्त लोकांनी एकत्रित येण्याचे आवाहन डॉ. ऑस्कर रिबेलो व अरविंद भाटीकर यांनी केले. भाजप समर्थक ‘पणजी फर्स्ट’, राष्ट्रवादी कॉंग्रेस समर्थक गट व अपक्ष यांपैकी २९ निवडक, प्रामाणिक व स्वच्छ उमेदवारांची यादी जाहीर करून या लोकांना निवडून आणण्याचा संकल्प आज ‘पॅन्जीमाइट्स् इनिशीएटीव्ह फॉर चेन्ज’ या गटाने सोडला.
आज इथे बोलावण्यात आलेल्या खास पत्रकार परिषदेत डॉ. ऑस्कर रिबेलो व अरविंद भाटीकर यांनी ही माहिती दिली.
लोकांना सहजरीत्या विकत घेता येते अशा आविर्भावात वागणार्‍या नेत्यांना आता अद्दल घडवण्याची गरज आहे. पणजी महापालिकेच्या निमित्ताने हा अभिनव प्रयोग करण्यात येत आहे व पणजीतील समस्त लोकांनी या प्रयोगाला सहकार्य करून तो यशस्वी करावा, असे आवाहन यावेळी डॉ. ऑस्कर रिबेलो यांनी केले. दरम्यान, या यादीला पणजीतील अनेक प्रतिष्ठित मंडळींनी आपली संमती दिली आहे. हे सर्व लोक आपापल्या व्यवसायात व्यस्त असतात व त्यामुळे त्यांना या राजकीय नेत्यांप्रमाणे वारंवार रस्त्यावर उतरणे शक्य नाही. या लोकांना प्रत्यक्ष तळागाळातील लोकांशी संपर्क ठेवणेही शक्य होत नाही. परंतु, निदान सर्वसामान्य लोकांना योग्य मार्गदर्शन करून त्यांच्यासमोर भ्रष्ट राज्यकर्त्यांचा पर्दाफाश करून पणजी महापालिकेवर चांगल्या लोकांची निवड होण्यासाठी ही संघटना प्रयत्न करणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली. सुशिक्षित समाज हा नेहमीच मतदानापासून दूर राहतो व त्यामुळेच या भ्रष्ट लोकांचे फावते. यावेळी मात्र सर्वांनी मतदानासाठी घराबाहेर पडावे व एक नवी क्रांती पणजीत घडवण्यासाठी सहकार्य करावे, अशी विनंतीही यावेळी डॉ. ऑस्कर रिबेलो यांनी केली.
या संघटनेतर्फे जाहीर करण्यात आलेल्या उमेदवारांत प्रभाग ः १-किरण जांबावलीकर, प्रभाग ः२- एव्हरीस्टो फर्नांडिस, प्रभाग ः३- बार्रेटो सॅबिस्टीयन, प्रभाग ः४-प्रभाकर डोंगरीकर, प्रभाग ः५-शीतल नाईक, प्रभाग ः६-आलेक्स फेलिझादो, प्रभाग ः७-श्‍वेता लोटलीकर, प्रभाग ः८-तुकाराम चिन्नावर, प्रभाग ः९-सुरेंद्र फुर्तादो, प्रभाग ः१०- रूथ फुर्तादो, प्रभाग ः११-ऍश्‍ली रोझारीयो, प्रभाग ः१२-वैदेही नाईक, प्रभाग ः१३-सीमा पेडणेकर, प्रभाग ः१४-अशोक नाईक, प्रभाग ः१५-शेखर डेगवेकर, प्रभाग ः१६-नीना सिलीमखान, प्रभाग ः१७-नीलेश खांडेपारकर, प्रभाग ः१८-समीर च्यारी, प्रभाग ः१९-दियोदिता डिक्रुझ, प्रभाग ः२०-अविनाश भोसले, प्रभाग ः२१-महेश चांदेकर, प्रभाग ः२२- माया तळकर, प्रभाग ः२३-शैलेश उगाडेकर, प्रभाग ः२४-दीक्षा माईणकर, प्रभाग ः२५-शुभदा धोंड, प्रभाग ः२६-ऑस्कर कुन्हा, प्रभाग ः२७-शुभम चोडणकर, प्रभाग ः२८-निवेदिता चोपडेकर, प्रभाग ः२९ (कुणीही नाही), प्रभाग ः३०-आयरिश रॉड्रिगीस यांचा समावेश आहे.
या यादीला मान्यता दिलेल्यांत डॉ. बॉस्युएट आल्फोन्सो, जे. सी. आल्मेदा(निवृत्त आयएएस), प्रा. फ्रँक आंताव, प्रा. रामोला आंताव, डॉ. श्याम भंडारी, डॉ. दीप भंडारी, अरविंद भाटीकर (निवृत्त आयएएस), स्नेहलता भाटीकर, हेन्री ब्रीटो, ऍड. अरुण ब्राझ डिसा, डॉ. प्रमोद दुकळो, चिकुटो उर्सुला डिसोझा, सिल्वेस्टर डिसोझा, डॉ. अजॉय एस्टाबिरो, आंतोनिया इनास फ्रोएस, मनोज जोशी, ऍड. राजेंद्र कामत, डॉ. गोविंद कामत, प्रा. गोविंद खंवटे, नागेश करमली (स्वातंत्र्य सैनिक ), सुरेश कुडचडकर, डॉ. महेंद्र कुडचडकर, डॉ. साईदत्त कुवेलकर, बर्नाडेट लोबो, ऍड. अमरदीप मडकईकर, फ्रान्सिस मिनेझिस, ऍड. जतीन नाईक, तारा नारायण, अँजेलो पाईस, गुरूदास पै, ए. एक्स. गोम्स परेरा, कमला रत्नम, ओरीया एस. रेगो, डॉ. ऑस्कर रिबेलो, मानू रिबेलो, प्रजल साखरदांडे, ए. व्यकंटरत्नम (निवृत्त आयएएस) आदींचा समावेश आहे.

पणजीत कारमधून आठ लाख पळवले

पणजी, दि. १ (प्रतिनिधी): पणजीतील कला अकादमीसमोर पार्क करून ठेवलेल्या कारमधून ८ लाख रुपये लंपास करण्याची घटना आज घडली. या प्रकरणी पणजी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून अज्ञातांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
बोगमळा येथील रहिवासी विशांत नाईक हे आज कार क्रमांक केए-१९-एमएन-००१९ ही कला अकादमीसमोर पार्क करून काही कामानिमित्ताने गेले होते. परत आल्यानंतर आपल्या कारचा आरसा फोडून गाडीतील ८ लाख रुपयांची रोख रक्कम पळवण्यात आल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी लगेच या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली. पणजी पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला असून ते या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

Tuesday, 1 March, 2011

महागाई व बेरोजगारीला फाटा

केंद्रीय अंदाजपत्रक सादर
करमर्यादा सवलत १.८० लाखांपर्यंत

नवी दिल्ली, दि. २८ : ‘आम आदमी’चे ‘बजेट’ बिघडविणारी बेसुमार वाढलेली महागाई, तरुणाईच्या उज्ज्वल भविष्याच्या आड येत असलेली प्रचंड बेरोजगारी, ‘आदर्श, राष्ट्रकुल, २-जी स्पेक्ट्रम, एस. बॅण्ड स्पेक्ट्रम यासारख्या घोटाळ्यांच्या मालिकेमुळे ऐरणीवर आलेला भ्रष्टाचार, विदेशात दडलेला काळा पैसा मायदेशी आणण्याची मागणी, आदी सर्व प्रमुख समस्यांवर केंद्रीय अंदाजपत्रकात केंद्रीय अर्थमंत्री रामबाण इलाज करतील, या तमाम भारतवासीयांच्या अपेक्षांवर केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी पाणी ङ्गेरत आपला सलग तिसरे अर्थहीन अंदाजपत्रक सादर केले. बेरोजगारी, महागाई, काळा पैसा, यावर ठोस उपाययोजना करायचे सोडून अर्थमंत्र्यांनी केवळ चिंताच व्यक्त करून एकप्रकारे मोठी चेष्टाच केली आहे. ममता बॅनर्जी यांनी सादर केलेल्या रेल्वे अंदाजपत्रकाप्रमाणेच प्रणवबाबूंनी देखील पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीवर डोळा ठेवत पश्‍चिम बंगाल आणि केरळच्या पदरात भरभरून टाकले आहे. या अंदाजपत्रकात शेती आणि उद्योग या दोन्हींसाठी दिलासादायक कोणत्याही ठोस तरतुदी केल्या नसल्याने संकटात असलेल्या शेतकर्‍यांसह उद्योगजगताचीही घोर निराशा झाली आहे.
..................................
‘अर्थव्यवस्थेत चांगली सुधारणा झाली, सरकारी खर्चांना लगाम लावण्याचे सरकारचे लक्ष्य आहे, गावांमध्ये मोठी प्रगती झाली आहे, महागाई, भ्रष्टाचार, काळा पैसा हे सरकारच्या चिंतेचे विषय आहेत,’ असे अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी आपल्या बजेट भाषणात प्रारंभीलाच सांगून सुरुवात झकास केली. करमर्यादेची सवलत १.६० लाखांवरून १.८० लाखांपर्यंत वाढवून, ८० वर्षीय लोकांसाठी अतिवरिष्ठ ही नवीन श्रेणी करून त्यांना ५ लाखांपर्यंतची सूट देऊन तसेच वरिष्ठ नागरिकांची वयोमर्यादा ६५ वरून ६० वर्षे करीत त्यांना करात २.५० लाखांपर्यंत सूट देऊन प्रणवदांनी सर्वसामान्य नागरिकांना, ज्येष्ठांना व नोकरदारांना थोडा दिलासा दिला. मात्र, महिलांच्या उत्पन्नात १० हजारांची कपात करीत त्यांनी कररचनेत महिला व पुरुषांना समानतेत आणले आहे. महिलांसाठी करसवलतीची मर्यादा १.९० लाखांवरून १.८० लाखांवर करण्यात आलेली आहे. या कररचनेमुळे आयकरात २०६० हजार रुपयांपर्यंतची बचत होणार आहे. विशेष म्हणजे, या नवीन कररचनेमुळे सर्वांना महिन्याकाठी आयकरात ङ्गक्त १७१ रुपयांचीच सूट मिळणार आहे. कंपन्यांवरील अधिभार ७.५ टक्क्यांवरून आता ५ टक्के करण्यात आला आहे.
या अंदाजपत्रकात सेवाकरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही; तसेच केंद्रीय उत्पादन शुल्क देखील १० टक्केच कायम ठेवण्यात आले आहे. १३० उत्पादनांवर उत्पादन शुल्क लावण्याची व १ टक्का लेव्ही लावण्याची घोषणाही त्यांनी केली.
अर्थमंत्री प्रणवदांनी गृह कर्जावरील सवलतीची घोषणा करताना, २५ लाखांपर्यंतचे घर खरेदी केल्यास १५ लाख रुपयांपर्यंतच्या गृहकर्जावरील व्याजात १ टक्क्याची सूट मिळेल, असे स्पष्ट केले. शेतकर्‍यांना ४ टक्के दराने कर्ज द्या, या विरोधी पक्षांनी लावून धरलेल्या मागणीचा प्रणवदांनी विचार केला खरा; परंतु थेट दिलासा न देता त्यांनी शेतकर्‍यांना ७ टक्के व्याजदरानेच कर्ज दिले जाईल व मुदतीच्या आत कर्ज ङ्गेडणार्‍यांना ३ टक्के सवलत दिली जाईल, असे जाहीर केले. शेतकर्‍यांच्या कर्जासाठी ४ लाख ७५ हजार कोटींची तरतूद त्यांनी केली. खाद्य सुरक्षा विधेयक याच वर्षी आणले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
अंगणवाडी कर्मचार्‍यांच्या पगारात दुपटीने वाढ करण्याची घोषणा त्यांनी केली. या घोषणेनुसार, १५०० रुपये वेतन असणार्‍या अंगणवाडी कर्मचार्‍यांचा पगार आता ३००० रुपये राहील, तर हेल्परांचे वेतन ७५० वरून आता १५०० रुपये होणार आहे. नववी-दहावीच्या ४० लाख एससी-एसटी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचीही घोषणा त्यांनी केली. गरीब महिलांसाठी असलेल्या इंदिरा गांधी पेन्शनमध्ये २०० रुपयांवरून ५०० रुपयांची वाढ करण्यात आली आहे व या पेन्शन योजनेसाठी वयोमर्यादा ६५ वरून ६० वर्षे करण्यात आली आहे. कंपनीतून टॅक्स कापल्यानंतर रिटर्न भरण्याची आवश्यकता नाही. अतिरिक्त मिळकत जर नसेल तर रिटर्न भरण्याची गरज नाही, अतिरिक्त मिळकत असेल तरच रिटर्न भरावा लागेल, असे प्रणवबाबूंनी जाहीर केले.
टीडीएस भरण्यासाठी अनेक केंद्रे उभारणार, इसीएसमार्ङ्गत कर भरण्याची सुविधा संपूर्ण देशात लागू करणार, १ ऑक्टोबरपासून रोज १० लाख ‘युनिक आयडी’ देणार आदी काही महत्त्वांच्या घोषणाही अर्थमंत्र्यांनी केल्या.
हवाई सङ्गरीवर सेवा कर (सर्व्हिस टॅक्स) वाढविण्यात आल्याने विमान प्रवास महाग होणार आहे. देशांतर्गत विमान प्रवासावर ५० रुपयांची, तर विदेशातील विमान प्रवासात २५० रुपयांची वाढ यामुळे होणार आहे. अर्थमंत्र्यांनी जीवन विम्याच्या काही सेवाही सेवाकराच्या कार्यकक्षेत आणलेल्या आहेत. महागडे इस्पितळे सेवा कराच्या कार्यकक्षेत आणल्याने मोठ्या इस्पितळांमधील वैद्यकीय उपचारही आता महाग झालेला आहे. उद्योग जगताला कंपनी कराविषयी दिलासा मिळण्याची अपेक्षा होती. मात्र, अर्थमंत्र्यांनी ही अपेक्षा ङ्गोल ठरविली. परदेशी गुंतवणूकदारांना म्युचुअल ङ्गंडाद्वारे शेअर बाजाराची दारे अर्थमंत्र्यांनी खुली करून दिली आहेत.

कारवाई त्वरित थांबवा

खनिज ट्रकमालकांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
पणजी, दि. २८ (प्रतिनिधी): उच्च न्यायालयाच्या आदेशाचा आधार घेऊन वाहतूक खात्याने गोव्यातील खनिज ट्रक मालकांची जी सतावणूक चालवली आहे ती त्वरित बंद करावी, अशा आशयाची मागणी आज २८ रोजी कुडचडे - केपे, सावर्डे परिसरातील खनिज ट्रकमालकांनी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना केली. दक्षिण गोवा खनिज ट्रकमालक संघटनेचे अध्यक्ष प्रकाश राऊत देसाई व सुभाष फळदेसाई यांच्या नेतृत्वाखालील या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट पर्वरी मंत्रालयात घेतली.यावेळी या मागण्यांवर योग्य तो निर्णय घेण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी दिले, अशी माहिती श्री. फळदेसाई यांनी दिली.
बेदरकार व नियमांचे खुलेआम उल्लंघन करणार्‍या खनिज वाहतुकीविरोधात वाहतूक खात्याने जोरदार कारवाईची मोहीम उघडल्याने सावर्डे, कुडचडे व केपे भागातील सुमारे १५० ट्रकमालकांनी आज मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या सरकारी बंगल्यावर धडक दिली. मुख्यमंत्री कामत हे बंगल्यावर हजर नसल्याने अखेर त्यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधला असता या ट्रकमालकांच्या शिष्टमंडळाला पर्वरी मंत्रालयात बोलावण्यात आले.
वाहतूक खात्याने खनिज ट्रकांना मागील बाजूच्या फळ्या काढण्याची सक्ती केली आहे व अशा फळ्या असलेल्या ट्रकांना दंड ठोठावला जात आहे. या आदेशाला तात्काळ स्थगिती देण्यात यावी, वाहतुकीचा वेळ पूर्ण दिवस सकाळी ८ ते संध्या. ६ असाच असावा व खनिज वाहतुकीसाठी वेगळ्या बगलमार्गांची उभारणी व्हावी, अशा मागण्या यावेळी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आल्या. दरम्यान, खनिज वाहतुकीमुळे उद्भवणार्‍या समस्यांचे कारण पुढे करून सरकार केवळ ट्रकमालकांना वेठीस धरीत आहेत. मुळात सरकारने ट्रक नोंदणी करून घेतले ते काय मालकांनी शोभेसाठी दारांत उभे करून ठेवावे असे सरकारला वाटते काय, असाही सवाल यावेळी करण्यात आला. मुळात ही परिस्थिती ओढवण्यास सरकारच जबाबदार आहे. रस्ते रुंद करण्यात सरकार अपयशी ठरले आहे. लोकांना रोजगार देण्यास सरकारला शक्य होत नाही व खनिज वाहतुकीच्या वाढत्या मागणीमुळे कर्ज काढून ट्रक घेतलेल्यांना व्यवसाय करण्यासही सरकार देत नाही. असे असताना सामान्य लोकांनी जगायचे कसे, असाही सवाल यावेळी काही ट्रकमालकांनी पत्रकारांशी बोलताना केला. ट्रकमालकांच्या तांत्रिक अडचणींचाही सहानुभूतीपूर्वक विचार होण्याची गरज आहे. या सर्व प्रकाराला केवळ खनिज ट्रक वाहतूकदारच कारणीभूत असल्याचा जो आभास निर्माण केला जात आहे तो पूर्णपणे चुकीचा आहे. या एकूण प्रकरणाला सरकारही तेवढेच जबाबदार असून याचा साधकबाधक विचार करूनच त्यातून योग्य तो मार्ग काढावा लागेल, असेही मत यावेळी त्यांनी व्यक्त केले. कारवाई करायला फक्त खनिज वाहतूकदारच दिसतात काय? राज्यात मटका, जुगार तसेच इतर अनेक बेकायदा व्यवहार चालतात त्यांच्यावर अशी व्यापक कारवाई का केली जात नाही, असाही सवाल यावेळी काही ट्रकमालक करीत होते.
वाहतूक खात्याची कारवाई कायद्यानुसारच : अरुण देसाई
वाहतूक खात्याची कारवाई कुणाच्या सतावणुकीसाठी अजिबात नाही तर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसारच आहे, अशी प्रतिक्रिया वाहतूक खात्याचे संचालक अरुण देसाई यांनी दिली. खनिज ट्रक व्यावसायिकांनी न्यायालयाच्या आदेशांचा सन्मान करावा व वाहतूक खात्याला खनिज वाहतुकीत शिस्त आणण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले. दक्षिण गोवा ट्रक व्यवसायिकांच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली असता त्यांनाही हीच गोष्ट समजावून सांगितल्याचे श्री. देसाई म्हणाले.
------------------------------------------------------
कॉंग्रेसी ‘चमच्यां’ची घुसखोरी
दरम्यान, आज मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या सरकारी बंगल्यावर धडक दिलेल्या ट्रकमालकांच्या गर्दीत काही कॉंग्रेसी ‘चमच्यां’नी घुसखोरी करून उपस्थित ट्रकमालकांना भाजप विरोधात चिथावण्याचे काम चालवल्याचे आढळून आले. वाहतूक खात्याच्या या कारवाईला ‘पीएसी’ समितीचे अध्यक्ष तथा विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर हेच जबाबदार आहेत, असा उघड प्रचार हे लोक करताना दिसत होते. मनोहर पर्रीकरांनी खनिज वाहतुकीवरून संबंधित अधिकार्‍यांना धारेवर धरल्यानेच ही कारवाई करणे सरकारला भाग पडले, असेही हे लोक उपस्थितांना सांगत होते. या गटातील हे लोक या प्रकरणी काही कॉंग्रेस नेत्यांशी चर्चा केल्याचा दावा करून या कारवाईत सरकारला काहीही रस नाही तर केवळ पर्रीकरांनी ‘पीएसी’ व्दारे ही कारवाई करण्याचा तगादा लावल्यानेच सरकारचा नाइलाज झाल्याचे सांगून उपस्थित ट्रकवाल्यांचे कान फुंकण्याचे काम जोरात करताना दिसत होते.

मेरशी खून प्रकरणाला अखेर वाचा फुटली...

पणजी, दि. २८ (प्रतिनिधी): मेरशी येथे झालेल्या खून प्रकरणाला अखेर वाचा फुटली असून तेथील अमिताभ बोरकर या १९ वर्षीय युवकाची हत्या त्याच्याच मित्रमंडळातील एक सदस्य असलेला हैदर अली बडीगर (२१) याने केल्याचे पोलिस चौकशीतून उघड झाले आहे. अमिताभ याने गेल्या महिन्यात हैदरला पणजी बसस्थानकावर मारहाण केली होती. या मारहाणीचा सूड उगवण्यासाठीच त्याने अमिताभची निर्घृणपणे हत्या केली, असे जुने गोवे पोलिसांच्या चौकशीत आढळून आले आहे. हैदर अली बडीगर हा इंदिरानगर - चिंबल येथील रहिवासी आहे.
जुने गोवे पोलिस स्थानकाचे निरीक्षक फ्रान्सिस कॉर्त यांनी दिलेल्या माहितीनुसार, अमिताभ बोरकर हत्याप्रकरणी त्यांनी संशयावरून हैदर अली बडीगर याला २५ फेब्रुवारी २०११ रोजी इंदिरानगर येथील त्याच्या घरातून रात्री ११.३० वाजता अटक केली होती. या अटकेनंतर त्याची कसून चौकशी करण्यात आली. हैदर अली याने आपल्या जबानीतून पोलिसांची दिशाभूल करण्याचा बराच प्रयत्न केला. परंतु, त्याच्या मोबाईलवरील माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याला चांगलेच कचाट्यात पकडल्याने अखेर त्याने अमिताभची हत्या केल्याचा गुन्हा कबूल केला, असे निरीक्षक कॉर्त म्हणाले. याप्रकरणी अन्य एक संशयित अनिल नीलाप्पा नवार याला अटक करून न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले असले तरी त्याचा या हत्येशी काहीही संबंध नसल्याचे आढळून आल्याचेही सांगण्यात आले. हैदर अली याला १४ दिवसांचा रिमांड घेण्यात आला आहे.
किल्लवाडा मेरशी येथील अमिताभ अरुण बोरकर या तरुणाची गेल्या ७ फेब्रुवारी रोजी रात्री निर्घृणपणे हत्या केल्याचे आढळून आले होते. अमिताभ याच्या चेहर्‍यावर आणि मानेवर चाकूने असंख्य वार करण्यात आल्याचे शवचिकित्सेत आढळून आले होते. या हत्येचा तपास लावण्याचे मोठे आव्हान जुने गोवे पोलिसांवर होते व अखेर या प्रकरणाचा तपास लावण्यात त्यांनी यश मिळवले.

कुंकळ्ळी अपघातात युवक जागीच ठार

कुंकळ्ळी, दि. २८ (प्रतिनिधी): कुंकळ्ळी बाजारात आज (सोमवारी) संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास झालेल्या अपघातात देमानी - कुंकळ्ळी येथील रत्नकांत च्यारी (२६) हा युवक जागीच ठार झाला.
याबाबत कुंकळ्ळी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रत्नकांत आपल्या मित्रासमवेत जीए ०९ पी ४२०८ या दुचाकीने कुंकळ्ळी बाजारात काही कामानिमित्ताने येत असताना रस्त्यावरच बसलेल्या गुरांना त्याची धडक बसली. याच वेळी समोरून मडगावहून काणकोणच्या दिशेने बेबी चेल्सिया ही जीए ०२ टी ४७०७ या क्रमांकाची बस जात होती. गुरांना धडकल्यानंतर रत्नकांतची सरळ या बसला धडक बसली. त्याची स्कूटर सरळ बसखाली गेली व तो रस्त्यावर फेकला जाऊन त्याच्या डोक्याला गंभीर इजा झाली. त्यातच त्याचे प्राणोत्क्रमण झाले. कुंकळ्ळी पोलिसांनी सदर बसचा चालक उदय नाईक याला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

Monday, 28 February, 2011

आज केंद्रीयअर्थसंकल्प

पगारदार वर्ग व शेतकर्‍यांना दिलासा मिळण्याची शक्यता
नवी दिल्ली, दि.२७ : केेंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी उद्या संसदेत २०११-१२ साठी अर्थसंकल्प सादर करणार असून त्यात ते पगारदार वर्गाला तसेच शेतकर्‍यांना दिलासा देण्याची शक्यता आहे. वाढती महागाई व आगामी काळात पाच राज्यांत होणार्‍या विधानसभा निवडणुकी लक्षात घेऊन अर्थमंत्री अर्थसंकल्पात लोकांवर ङ्गार काही बोजा टाकण्याची शक्यता नाही.
उद्याच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री पगारदार वर्गाची आयकराची मर्यादा सध्याच्या वार्षिक १.६० लाखावरून १ लाख ८० हजारापर्यंत नेण्याची दाट शक्यता आहे. एप्रिल २०१२ पासून अंमलबजावणीत आणावयाच्या ‘डायरेक्ट टॅक्स कोड’त (डीटीसी) अर्थमंत्रालयाने याआधीच ही मर्यादा २ लाखापर्यंत वाढविण्यास होकार दर्शविलेला आहे.
निधीची आवश्यकता असणार्‍या क्षेत्राला अधिकाधिक निधी उपलब्ध करून देण्यासाठी मूलभूत सोईसुविधांसाठीच्या करमुक्त बॉण्डमध्ये गुंतवणूक करणार्‍यांसाठी मर्यादा वाढवून देण्यावर मुखर्जी विचार करण्याची शक्यता आहे. मूलभूत सोईसुविधांसाठीच्या बॉण्डमध्ये गुंतवणूक करण्याची सध्याची मर्यादा २० हजार रुपये आहे.
आर्थिक तूट ४.५ टक्क्यांवर येण्याची शक्यता वर्तविली जात असल्यानेच अर्थमंत्री उपरोक्त सूट देण्याची शक्यता आहे. संसदेत २०१०-२०११चे आर्थिक सर्वेक्षण सादर करण्यात आले त्यात आर्थिक तूट ४.५ टक्के एवढी दाखविण्यात आली आहे. आसाम, तामिळनाडू, पॉण्डेचरी, केरळ व प. बंगाल या राज्यांत विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. या निवडणुकांकडे बघता सरकारकडून देण्यात आलेल्या सवलती पूर्णपणे मागे घेतल्या जाणार नाहीत. एवढेच नाही तर सरकारचा महसूल वाढविण्यासाठी तसेच अंदाजपत्रकातील आर्थिक तूट भरून काढण्यासाठी काही कठोर निर्णय घेण्याचीही शक्यता अर्थतज्ञांनी व्यक्त केली आहे.
देशातील कृषी क्षेत्राला करण्यात येणार्‍या कर्ज पुरवठ्यात अर्थमंत्री वाढ करण्याची शक्यता आहे. मुखर्जी लागोपाठ तिसर्‍यांदा अर्थसंकल्प मांडणार आहेत. वाढत्या महागाईचा मुकाबला करण्यासाठी ज्या काही सवलती देण्यात येत आहेत त्या अर्थमंत्री मागे घेतील, अशी भीती उद्योग क्षेत्राने व्यक्त केली आहे. आर्थिक सर्वेक्षणात अर्थव्यवस्था वेगाने सुधारत असून २०११-१२ पर्यंत विकास दर ९ टक्के राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

रोमांचकारी टाय..

इंग्लंडने काढला भारताचा घामटा!
बंगलोर, दि. २७ : कधी आशा तर कधी निराशा, चिन्नास्वामी स्टेडियममध्ये एकवेळ तर असे चित्र दिसत होते की, आता इंग्लंडचा विजय केवळ औपचारिकताच ठरणार. मात्र महेंद्रसिंग धोनीच्या धुरंधरांनी शेवटपर्यंत चिवट इच्छाशक्ती दाखवली आणि विजयाची आस सोडली नाही. मात्र नियतीच्या मनात काही वेगळेच होते. विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धेच्या ‘ब’ गटातील साखळी लढतीत अखेर दोन्ही संघांच्या बाजूने दान पडले आणि हा सामना अखेर ‘टाय’ झाला. बरोबरीत सुटलेल्या या लढतीत उभय संघांना प्रत्येकी एक गुण मिळाला.
अंगावर रोमांच उमटणे म्हणजे काय याचा थरारक अनुभव जगभरातील क्रिकेटप्रेमींनी या लढतीद्वारे घेतला.
पहिल्यांदा फलंदाजी करताना या लढतीत भारताने ४९.५ षटकांत ३३८ धावा झोडल्या. त्यात सचिन तेंडुलकर याने झळकावलेल्या शानदार शतकाचा उल्लेख प्रामुख्याने केलाच पाहिजे. मात्र या सामन्याला सर्वार्थाने कलाटणी दिली होती ती झहीर खान याने. तथापि, जिगरबाज इंग्लंडने हा सामना बरोबरीत सोडवून भारताला विजयाचे समाधान मिळू दिले नाही. खेळपट्टीत धावा ठासून भरल्याचे सुरुवातीपासूनच जाणवत होते. तो अंदाज भारताने खरा ठरवला. दाद द्यावी लागेल ती जिगरबाज इंग्लंडला. त्यांनीसुद्धा खचून न जाता भारताला तेवढेच जोरकस उत्तर दिले. सामना रंगला असे म्हटले जाते त्याचा जिवंत पुरावा म्हणजे चिन्नास्वामी स्टेडियमवरील क्रिकेटमय युद्ध! (सविस्तर वृत्त पान १० वर)

आरोग्यमंत्री गोव्याचे की सत्तरीचे?

आमोण्यातील सभेत नार्वेकरांचा सवाल
आमोणे, दि. २७ (वार्ताहर): गोव्याचे आरोग्यमंत्री आपल्या कार्यकाळात २२०० बेरोजगारांना नोकरीला लावल्याचे सांगतात. मात्र त्यातील पाळी व डिचोली मतदारसंघातील केवळ ३० जण आहेत उर्वरित सर्वजण हे सत्तरी मतदारसंघातील आहेत. त्यामुळे हे आरोग्यमंत्री गोव्याचे आहेत की केवळ सत्तरीचे आहेत असा सवाल हळदोण्याचे आमदार ऍड. दयानंद नार्वेकर यांनी केला आहे. आमोणे येथील महालक्ष्मी रवळनाथ मंदिराच्या पटांगणावर आयोजित केलेल्या जाहीर सभेत ऍड. नार्वेकर बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत व्यासपीठावर व्यासपीठावर प्रमुख वक्ते प्रकाश फडते, माजी आमदार ऍड. विष्णू नाईक, सरपंच शंकर नाईक, खेमलो सावंत, वेळग्याचे दिनेश सहस्त्रबुद्धे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी ऍड. नार्वेकर यांनी सरकारच्या पीपीपी तत्त्वावर कडाडून टीका केली. ऍड. नार्वेकर म्हणाले की, सरकारने डिचोली मतदारसंघातील मये तलाव हा एका बड्या हॉटेल मालकाला पीपीपी तत्त्वावर देण्याचा डाव आखला आहे. त्याचप्रमाणे कळंगुट बागा येथील ५२ हजार स्क्वे. मी. जागा पीपीपी तत्त्वावर देण्याचा घाट रचला आहे. यासाठी वीस वर्षांचा करार केला असून वीस वर्षानंतर सदर जागा ही त्याच मालकाकडे जाणार आहे. त्याचप्रमाणे साकवाळ वास्को येथील नैसर्गिक झरा २८०० स्क्वे. मी. जागाही पीपीपी तत्त्वावर बड्या उद्योजकाकडे देण्याचा घाट आहे. सरकारी मालमत्ता पीपीपी तत्त्वावर देऊन नंतर ती विकण्याचा कुटील डाव गोमंतकीयांनी हाणून पाडला पाहिजे. असे आवाहन यावेळी श्री. नार्वेकर यांनी केले.
पुढे बोलताना ऍड. नार्वेकर म्हणाले की, मी कॉंग्रेसचा आमदार व सक्रिय कार्यकर्ता असलो तरी या चार वर्षात सरकारने ‘पीपीपी’ उद्योग सुरू केला आहे. त्यामुळे मी अस्वस्थ आहे. माझ्या तीस वर्षांच्या कारकिर्दीला काळिमा फासणारे हे कृत्य असल्याने मी या विरुद्ध आवाज उठवला आहे. मागील दाराने येणार्‍या कॉंग्रेस सत्ताधारींना धडा शिकवण्यासाठी हा उपक्रम मी राबवीत आहे.
यावेळी त्यांनी खाण वाहतुकीविरोधातही आवाज उठवताना गोव्यात आज खाण कंपन्यांत कुरघोडी करत असून त्यामुळे लोकांच्या जीवन मरणाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे तो खपवून घेतला जाणार नाही असा इशारा दिला. पुढे श्री. नार्वेकर म्हणाले की, सर्वसामान्य जनतेला चिरडून टाकण्याचा हा घाला परतवून लावण्यास नागरिक सज्ज आहेत. या भागातील प्रदूषणामुळे क्षयरोगी रुग्णांत वाढ झालेली आहे. तसेच आमोणे, खांडोळा, बेतकी, माशेलमधील मुले जन्मतःच अस्थमा घेऊन येत आहेत. त्यामुळे त्याविरुद्ध आवाज उठवला पाहिजे असे आवाहन करताना आपल्या पुढील सभा काणकोण व मडगाव येथे आयोजित केल्याचे सांगितले.
प्रमुख वक्ते प्रकाश फडते यांनी नार्वेकर यांनी सुरू केलेल्या उपक्रमास पाठिंबा असल्याचे सांगितले तर ऍड. विष्णू नाईक यांनी उच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतरच कोणत्याही प्रकरणावर कारवाई होते. मग सरकार कशासाठी असा सवाल केला. यावेळी सरपंच शंकर नाईक व श्री. सहस्त्रबुद्धे यांनीही आपले विचार मांडले.
खेमलो सावंत यांनी प्रास्ताविक केले. व नंतर आभार मानले.

बाबूशकडून मतदारांना आमिषे

विरोधकांचा जोरदार आरोप
पणजी, दि. २७ (प्रतिनिधी): पणजी महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने ताळगावचे आमदार तथा शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात यांच्याकडून मतदारांना विविध वस्तूंचे आमिष दाखवण्यात येत असल्याचा आरोप त्यांच्या विरोधकांनी केला आहे. विविध भागांत फ्रीज, टीव्ही, ‘एलसीडी’ मोबाईल तसेच सायकलींचे वितरण जोरात सुरू आहे. काही लोकांच्या घरांचे दुरुस्ती कामही सुरू करण्यात आले असून भाटले तसेच इतर काही भागांतील लोकवस्तीत असलेले भले मोठे वृक्षही कापून साफ करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
कोणत्याही परिस्थितीत पणजी महापालिकेवर आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी बाबूश मोन्सेरात यांनी सध्या बराच जोर लावला आहे. आपल्या पॅनलच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी ते घरोघरी भेटी देत आहेत. या भेटीत अनेकांना विविध वस्तूंचे वाटप केले जात असल्याचा आरोप त्यांचे विरोधक करीत आहेत. विविध भागांत शालेय मुलांना सायकलींचे वाटप करण्यात आले आहे तसेच विविध वस्तूंचेही निर्धास्तपणे वाटप सुरू असून निवडणूक यंत्रणा याकडे दुर्लक्ष करीत असल्याची टीकाही त्यांनी केली आहे. दरम्यान, घराशेजारील धोकादायक वृक्ष कापण्यासाठी सामान्य लोकांना सरकारी खात्यांत खेपा माराव्या लागण्याचे अनेक प्रकार ताजे असताना महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने भाटले तथा इतर भागांतील भलेमोठे वृक्ष कापण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. हे वृक्ष वन खात्याची परवानगी न घेताच कापण्यात आले असले तरी त्याचे काहीही सोयरसुतक वन खात्यालाही पडून गेलेले नाही. बाबूश यांच्याकडून सरकारी यंत्रणेचाच गैरवापर होतो आहे, अशी टीकाही त्यांच्यावर केली जात आहे.
गेली पाच वर्षे पणजी महापालिकेवर बाबूश समर्थक गटाचीच सत्ता असताना सामान्य जनतेच्या समस्यांची आठवण त्यांना आत्ताच कशी काय झाली, असा सवालही उपस्थित केला जात आहे. दरम्यान, याप्रकरणी एका पणजीकराने दिलेली प्रतिक्रिया मात्र इथे महत्त्वाची ठरली आहे. ‘देणार्‍याने देत राहावे, घेणार्‍याने घेत राहावे, पणजीसाठी मत देताना मात्र मतदाराने सजग राहावे’.

कॅसिनो, विद्यार्थी व ‘गोवादूत’

पणजीतील साळगावकर कायदा महाविद्यालयाच्या विद्यार्थी मंडळाने ‘गोवादूत’ला पाठवलेल्या स्पष्टीकरणात आपण आयोजित केलेल्या ‘तत्व २०११’ या कार्यक्रमासाठी काही बिगरसरकारी व सरकारी संस्थांबरोबरच, ‘कॅसिनो रॉयल्स’कडून प्रायोजक म्हणून आर्थिक मदत घेतल्याचे नमूद केले आहे. दोन दिवसांचा हा कार्यक्रम कसा शिस्तबद्ध होता, सांस्कृतिक ऐक्य दाखवणारा होता आणि त्याचा लाभ गोव्यातील दहा महाविद्यालयांतील मुलांनी कसा घेतला हेही नमूद केले आहे. विद्यार्थी मंडळातर्फे प्राची सावंत यांनी हा खुलासा पाठवला आहे.
‘गोवादूत’ने या कार्यक्रमाला कोणताही आक्षेप घेतलेला नाही किंवा त्या कार्यक्रमाच्या स्वरूपावरही टीका केलेली नाही. केवळ ‘कॅसिनो’कडून विद्यार्थ्यांनी मदत स्वीकारावी का आणि या मार्गाने कॅसिनो युवावर्गापर्यंत कशी घुसखोरी करीत आहेत, त्याचे दुष्परिणाम काय यावरच बातमी व अग्रलेखात भर दिला होता. कॅसिनो ही गोव्याला लागलेली कीड आहे आणि त्यामुळेच अशा अनिष्ट गोष्टींचा शिरकाव युवावर्गात होऊ नये, असे ‘गोवादूत’ला आजही वाटते. समाजातील धुरिणांनी आणि संघटनांनीही या विषयावर सडेतोड प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेतच. ठरलेल्या भेटीवेळी विद्यार्थी न आल्याने हे सर्व प्रत्यक्षात सांगता आले नाही.
-संपादक

शून्यातून विश्‍व निर्माण करणार्‍या‘राजबी’

पणजी, दि. २७ (शैलेश तिवरेकर): जीवन म्हणजे एक नाटकच आहे. आम्ही माणसे म्हणजे या नाटकातील कलाकार असून त्याचा निर्माता दिग्दर्शक साक्षात परमेश्‍वर आहे. प्रत्येक माणसाच्या वाट्याला जो अभिनय येईल तो त्याने व्यवस्थित पार पाडून रंगमंच सोडावा ही तर जीवनाची रीतच आहे. या रंगमंचावरील प्रत्येकाचे अनुभव मात्र वेगवेगळे असतात. काहींच्या नशिबात पावलागणिक सुख तर काहींच्या नशिबात दुःखाचे डोंगर असतात. परंतु हिमतीने आणि चिकाटीने काम करून उशिरा का असेना परंतु या दुःखाच्या डोंगरातून सोईस्करपणे आर्थिक आणि मानसिक दृष्टिकोनातून सुखाचा मार्ग शोधणारी अनेक माणसे आहेत. त्यातीलच एक म्हणजे ‘राजबी’.
विवाह झाल्यापासून त्यांच्या पाचवीला केवळ दुःखच पुजलेले आहे. परंतु त्यांनी कधीही जीवनाच्या या नाटकात हार मानली नाही. जे काही समोर येईल त्याला खंबीरपणे सामोरे जाणे आणि आपले नसले तरी आपल्या मुलांचे चांगले भविष्य घडविणे हे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून त्यांनी प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाकले आणि आज २५ वर्षानंतर ज्या गोष्टीची त्या वाट पाहत होत्या त्या त्या गोष्टी त्यांच्या पायाशी लोळत आहेत. आज राजबींचा स्वतःचा फ्लॅट आहे. दोन मुलगे आणि एक कन्या अशी त्यांना अपत्ये असून कन्येला त्यांनी आपल्या परिवारातील योग्य असा नवरा मुलगा पाहून योग्यरितीने विवाह करून कन्येला सासरी पाठवण्यात आले आहे. तर मोठ्या मुलाचे लग्न करून आपल्या नातवंडासहित त्या मजेत वेळ काढत आहेत. मात्र या सगळ्या गोष्टींसोबतच राजबींनी आपल्या व्यवसायात अजूनही काहीच कमी केलेले नसून उलट दिवसेंदिवस त्याचा विस्तार वाढवत आहेत.
मूळ बेळगाव येथील असलेल्या ‘राजबी’ आपली जीवन कथा सांगताना त्यांचा ऊर अगदी भरून यायचा. परंतु सगळ्या गोष्टी त्यांनी अगदी मनमोकळेपणाने सांगितल्या. आपल्या कर्तृत्वाचा अभिमान बाळगावा असा त्यांचा हा जीवनपट आहे पण आजही त्यांना त्याचा कोणताच अभिमान वा गर्व नाही. उलट त्या म्हणतात. जे आपल्या वाट्याला आले त्याचा आपण आनंदाने स्वीकार केला. त्याचे यश आज आपल्या पदरी पडले आहे. त्याचाही आपण आनंदाने स्वीकार करत आहे.
जीवन हे असेच आहे, जे आहे ते चांगले आहे म्हणून स्वीकारावे यालाच जीवन म्हणतात. शून्यातून विश्‍व निर्माण करणार्‍या राजबी अगदी निर्विवाद आणि मोकळेपणाने बोलत होत्या. पतीच्या आणि सासुरवाडीच्या छळणुकीला आणि पतीच्या माराला कंटाळून स्वतःकडचे घड्याळ केवळ ५० रुपयाला गहाण ठेवून अवघे ५० रुपये आणि सोबत तीन चिमुकल्या मुलांना घेऊन राजबी गोव्यात आल्या. सुरुवातीला त्यांनी मडगाव येथे काय मिळेल ते काम केले. त्यानंतर देवगड सावंतवाडी या भागात गटार खोदण्याचे काम करून मिळेल त्या आसर्‍याला राहत होत्या. काही काळा नंतर त्या पुन्हा गोव्यात आल्या. सोबत मुले होतीच. त्यांच्यासाठीच तर त्या जिवाचे रान करत जगत होत्या. गोव्यात आल्यावर त्यांनी बाबा टाइल्स कंपनीत काम करून एका झोपडीत आपल्या मुलांचे संगोपन करू लागल्या. बाबा टाइल्स कंपनीत काम करतानाच काहीतरी जास्त काम करून जास्त कमावणे आवश्यक आहे याची त्यांना जाणीव होऊ लागली. कारण आता मुले मोठी होत होती आणि त्यांच्या गरजाही वाढत होत्या. म्हणूनच त्यांनी पर्वरी भागात छोट्या प्रमाणात भाजीची टोपली घेऊन घरोघरी फिरणे सुरू केले. सकाळी म्हापसा बाजारातून भाजी आणून ती विकणे आणि नंतर कामावर जाणे असा त्यांचा नित्यक्रम ठरला होता. नंतर त्यांच्या लक्षात आले की भाजीविक्रीच्या व्यवसायात चांगला जम बसत आहे. म्हणून त्यांनी आपल्या व्यवसायाचा विस्तार केला. गोड वाणी आणि व्यवसायातील सत्यता, चिकाटी या गुणांच्या जोरावर त्यांनी आपल्या व्यवसायात चांगलाच जम बसवला. नंतर टोपली घेऊन फिरणे शक्य होत नसल्याने त्या रिक्षा चालवायला शिकल्या आणि कंपनीतून मिळालेला भविष्य निर्वाहनिधी व भाजी व्यवसायातील पैशांतून वापरलेली रिक्षा विकत घेतली व रिक्षेतून दारोदारी फिरून भाजी विकणे सुरू केले. आज या भाजी विक्री व्यवसायाच्या जोरावर त्यांच्या सार्‍या कुटुंबाचा चांगलाच जम बसला असून शून्यातून स्वबळावर निर्माण केलेल्या विश्‍वात त्या अगदी सुखात आहे. आज त्यांच्याकडून रोज भाजी खरेदी करणारे त्यांचे ग्राहकही त्यांची अगदी आतुरतेने वाट पाहत राहतात. याचे कारण म्हणजे त्यांनी आपल्या ग्राहकांच्या मनात निर्माण केलेला विश्‍वास होय. म्हणूनच कुठल्याही व्यवसायात चिकाटी आणि ग्राहकाचा विश्‍वास संपादन करणे आवश्यक आहे.

लिबियातील भारतीयांच्या थरारक आठवणी...!

नवी दिल्ली, दि. २७ : लिबियातील भारतीय सुरक्षितपणे मायदेशी परतल्यानंतर त्यांच्या चेहर्‍यावर तणावरहित आनंद दिसून येत होता. गेल्या दोन आठवड्यांत लिबियात चाललेल्या सरकारविरोधी हिंसाचाराच्या थरारक आठवणी अजूनही ताज्या असल्याचे त्यांच्या प्रतिक्रियांमधून दिसून येत होते. या घटनांबद्दलची भीती त्यांच्या चेहर्‍यावर स्पष्टपणे दिसून येत होती. तेथील लूट, हिंसाचार आपल्या डोळ्यांनी बघितलेले अनेकजण लिबियातील ङ्गा थरारक आठवणींना इंदिरा गांधी विमानतळावर गोळा झालेल्या वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधीसमोर उजाळा देत होते.
केरळमधील कोची येथील रहिवासी असणारे मुहम्मद सली गेल्या ३१ वर्षांपासून लिबियात राहत होते. ते या घटनेविषयी सांगतात की, लिबियातील परिस्थिती भडकल्यानंतर लोक कित्येक दिवस अन्न-पाण्याशिवाय जगत होते. ज्यावेळी लिबियातील हिंसाचार पराकोटीला पोहोचला तेव्हा लोक जगण्यासाठी घाबरत होते. मी आणि माझ्याबरोबर काही भारतीय दोन दिवस एका कॅम्पमध्ये राहिलो आणि काही लोकांनी आमच्या लॅपटॉप व मोबाईलसारख्या वस्तू लुटल्या. इंजीनिअर असलेल्या सली यांनी सांगितले की, लिबियात कोणताही कायदा चालत नाही. त्रिपोली येथील अनेक पोलिस स्टेशन हिंसाचारादरम्यान जाळण्यात आले होते. स्थानिकांनी खूप लूट केली.
एका बांधकाम कंपनीतील सुताराचे काम करणारा करमवीर सांगत होता की, लिबियातील परिस्थिती शांत झाली तरी तो पुन्हा परत जाऊ इच्छित नाही. तिथली परिस्थिती अतिशय वाईट होती. लोक लुटालूट करत होते. वेळ पडली तर ते हत्या करायलादेखील सरसावत होते. पोलिस नाही व संरक्षणही नाही, अशी स्थिती होती.
डॉ. नवबीर या काही वर्षांपासून लिबियात एकट्याच राहत होत्या. त्या आपले अनुभव सांगताना म्हणतात, हिंसाचार चालू होण्याअगोदर मी परदेशात असल्याची भावना कधीच निर्माण झाली नाही. मला त्या देशात कधीच असुरक्षित वाटले नाही. मी भारतात परतत असताना अनेकांनी मला थांबविले. त्या म्हणाल्या की, त्रिपोली विमानतळावर पोहचण्यासाठी लोक १० तास रांगेत उभे होते. विमानतळावर लांबचलांब रांगा होत्या आणि प्रवेशद्वारापासून चेक काऊन्टरपर्यंत पोहचण्यासाठी १५ तास लागले.
उत्तर प्रदेशातील बीजनोरचे रहिवाशी असणार्‍या मोबीन कुरेशी यांची कहाणी काही वेगळीच आहे. ते राहत होते तिथे एकही घर वाचले नव्हते. सर्व घरे जळून गेली होती. अन्नपाण्यावाचून त्यांना बरेच दिवस राहावे लागले. त्यांचे पैसे, मोबाईल व इतर मौल्यवान वस्तू चोरून नेण्यात आल्या.
परंतु, त्रिपोलीजवळ असणार्‍या गावातील हॉस्पिटलमध्ये काम करणार्‍या हैदराबादच्या सज्जनलाला यांनी मात्र लिबियन नेता गडाङ्गी हा एक चांगला माणूस असल्याचे सांगितले. लिबियात कामकरी व मजूर म्हणून काम करणार्‍या काही भारतीयांनी सांगितले की, तेथील पोलिसांनी आम्हाला सुरक्षा तर दिली नाहीच पण आमच्या जवळचे मोबाईल, पैसे आदी वस्तू हिसकावून घेतल्या.
राजस्थानच्या सिकर जिल्ह्यातील काही मजूर लिबियात काम करण्यासाठी गेले होते. आपली व्यथा सांगताना त्यातील काही मजुरांनी सांगितले की, एजन्टने त्यांना काम करण्याविषयीचा व्हिसा न देता दोन महिन्यांचा पर्यटन व्हिसा दिला. तिथे गेल्यावर त्यांच्याजवळ काम करण्याचा अधिकृत व्हिसा नसल्यामुळे त्यांना तिथे योग्य काम मिळाले नाही. ज्या कंपनीद्वारे ते काम करण्यासाठी गेले होते त्यांनी या मजुरांना खाण्याचे पदार्थ किंवा कोणतीही आरोग्य सुविधा पुरविली नाही. या मजुरांपैकी एका मजुराला हिंसाचाराच्या घटनेत डोक्याला मार लागला. परंतु, तरीही कंपनीने कोणत्याही प्रकारची आरोग्य सुविधा पुरविली नाही.
असे अनेक चित्तथरारक व भयानक अनुभव घेऊन परतलेल्या लिबियातील भारतीयांना मायदेशी आणण्याची व्यवस्था केल्याबद्दल सर्वांनी भारत सरकारचे आभार मानले आहेत.
-----------------------------------------------------------------
५३० भारतीय परतले
लिबियातील हिंसक बंडाकडे बघता तेथे अडकून पडलेल्या भारतीयांना तेथून बाहेर काढण्यासाठी भारत सरकारने प्रयत्न सुरू केले असून काल एअर इंडियाची दोन विमाने कैरोकडे रवाना केली होती त्यापैकी एक विमान काल उशिरा रात्री दिल्लीला आले. यातून २९१ भारतात आले तर आज भल्या पहाटे आलेल्या दुसर्‍या विमानातून २३५ भारतीय परतले. अशाप्रकारे या दोन विमानांमधून एकूण ५२६ भारतीय मायदेशी परतले आहेत. लिबिया सरकारने भारताला १० मार्चपर्यंत दररोज दोन विमानांच्या उड्डाणांची परवानगी दिली आहे. ८८ भारतीयांनी ट्युनिशियात आश्रय घेतला आहे. लिबियात जवळपास १८ हजार भारतीय असावेत, असा अंदाज आहे.

Sunday, 27 February, 2011

बेशिस्त खनिज वाहतुकीविरोधात कारवाई सुरू

- २२० ट्रकांना दंड, २० ट्रक जप्त
- उसगावात तिघांवर गुन्हा दाखल
- वाहतूक अधिकार्‍यांना धमक्या

पणजी, दि. २६ (प्रतिनिधी): राज्यात बेदरकार खनज वाहतूक विरोधातील जनतेच्या उद्रेकाची गंभीर दखल लोक लेखा समितीने (पीएसी) घेऊन सरकारी यंत्रणेला चांगलेच फैलावर घेतल्यानंतर आज (शनिवारी) या विरोधात जोरदार प्रत्यक्ष कारवाईची मोहीम सुरू करण्यात आली. राज्यातील विविध खाण प्रभावित भागात वाहतूक खात्याने सकाळपासूनच खनिज वाहतुकीविरोधात कारवाईला प्रारंभ केला. दिवसभरात एकूण २२० ट्रकांना कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी दंड ठोठावण्यात आला, तर सुमारे २० ट्रक जप्त करण्यात आले. काही ठिकाणी ट्रकवाल्यांकडून कारवाईत अडथळे आणण्याचे प्रयत्न झाल्याचीही खबर असून त्याविरोधात पोलिस तक्रार दाखल झाल्याचे वृत्त आहे.
राज्यात खनिज वाहतुकीवर कोणतेच नियंत्रण राहिले नसल्याने स्थानिक जनता आक्रमक बनली आहे. या प्रकरणाचे तीव्र पडसाद ‘पीएसी’ बैठकीत उमटले. विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांच्या अध्यक्षतेखालील ‘पीएसी’ समितीकडून वाहतूक, पोलिस, खाण व जिल्हाधिकार्‍यांना कायद्याचे काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश देण्यात आल्याने सरकारी यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. खनिज वाहतुकीसाठी वाहतूक खात्याने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन व्हावे या उद्देशाने ही कारवाई राबवण्यात येत आहे. आज सकाळपासूनच विविध ठिकाणी वाहतूक अधिकार्‍यांनी सुरू केलेल्या कारवाईमुळे खनिजमालवाहू ट्रक व्यावसायिकांत एकच खळबळ उडाली. आज दिवसभरात सुमारे २२० ट्रकांना दंड ठोठावण्यात आला तर वीस ट्रक जप्त करण्यात आले.
रिवण भागात जोरदार कारवाई
आमच्या सावर्डे प्रतिनिधीने दिलेल्या माहितीनुसार या भागात न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून क्षमतेपेक्षा जास्त खनिजमाल वाहून नेणार्‍या सुमारे ५० हून जास्त ट्रकांना रिवण येथे चलन देण्यात आले. जोपर्यंत खनिज वाहतुकीला शिस्त येत नाही तोपर्यंत ही कारवाई सुरूच राहणार अशी माहिती फोंडा वाहतूक खात्याचे साहाय्यक संचालक नंदकुमार आरोलकर यांनी दिली. एका ट्रकामध्ये जास्तीत जास्त १० टन खनिजमाल भरण्याचा न्यायालयाचा आदेश आहे, तरीही १५ ते १७ टन माल भरला जात असल्याचे या मोहिमेत आढळून आले. दरम्यान, दक्षिण गोवा ट्रकमालक संघटनेचे अध्यक्ष प्रकाश देसाई यांनी सरकारने लवकरात लवकर बगल रस्त्याची मागणी पूर्ण करावी असे सांगितले. दिवसाला फक्त एक खेप मारून ट्रकमालक आणि ट्रकचालकांनाही परवडणारे नाही व अशाने या व्यावसायिकांवर आत्महत्येची वेळ ओढवेल असा इशारा त्यांनी दिला.
फोंडा भागात कारवाईला अडथळे
आमच्या फोंडा प्रतिनिधीने दिलेल्या माहितीनुसार आज धारबांदोडा, तिस्क, उसगाव आदी भागांत वाहतूक खात्याकडून जोरदार कारवाई सुरू केल्याने ट्रकचालक व मालकांचे धाबे दणाणले आहे. आज सकाळी ९.४५ च्या सुमारास उसगाव बगल रस्त्यावर खनिजमालवाहू ट्रकांची तपासणी सुरू करताच काही लोकांनी या कारवाईत व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी वाहतूक खात्याचे साहाय्यक संचालक प्रल्हाद देसाई यांनी फोंडा पोलिस स्थानकावर तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी नीलेश शिलकर, उल्हास पालकर आणि अर्जुन (नाव पूर्ण नाही) या तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमुळे या भागात खनिज वाहतूक ट्रकांची कशी दादागिरी चालते याचा अनुभव वाहतूक अधिकार्‍यांनाही पाहायला मिळाला. वाहतूक खात्याच्या अधिकार्‍यांनी काही ट्रक ताब्यात घेतल्याने तणाव निर्माण झाला. त्यामुळे काही ट्रकमालकांनी हितसंबंधी लोकांना सोबत घेऊन वाहतूक खात्याच्या अधिकार्‍यांच्या गाडीला घेराव घालून त्यांच्याशी हुज्जत घालण्याचाही प्रयत्न केला. वाहतूक अधिकार्‍यांना कारवाई न करता ताबडतोब परत जाण्याची धमकीही देण्यात आली. यावेळी एका इसमाने वाहतूक खात्याच्या जीप गाडीची नासधूस करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी पोलिस निरीक्षक सी. एल. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक निखिल पालेकर तपास करीत आहेत.

अनैतिक संबंधातून इसमाचा निर्घृण खून?

डिचोली, दि. २६ (प्रतिनिधी): वाठादेव - डिचोली येथे एका इसमाचा तीक्ष्ण हत्याराने वार करून निर्घृण खून करण्याची घटना आज घडली. त्यामुळे डिचोली परिसरात एकच खळबळ माजली असून अनैतिक संबंधातून हा खून झाल्याची चर्चा आहे. या प्रकरणी पोलिसांनी कसून तपास सुरू केला आहे.
डिचोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बाबी विठो मोटे (५२) या इसमाचा अज्ञातांनी खून केला आहे. त्याच्या अंगावर व मानेवर तीन ठिकाणी जखमा होत्या. अंगात फाटलेला बनियन तर कंबरेखाली कसलेच वस्त्र नव्हते. घटनास्थळी पोलिसांना धारदार शस्त्र आढळून आले असून महिलेचे केसही आढळून आले आहेत.
बाबी मोटे हा गेली अनेक वर्षे वाठादेव (धाट) येथील बेग यांच्या घरात ‘केअर टेकर’ म्हणून राहत होता. तो एकटाच या घरात राहायचा व मोलमजुरी करायचा. आज दुपारी घराचे मालक बेग यांनी बाबीला बोलाविण्यासाठी दोन इसमांना पाठविले होते. त्यानुसार ते ‘त्या’ घरात गेले असता बाबी रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत आढळून आला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन ठसेतज्ज्ञ व श्‍वानपथकास पाचारण केले. श्‍वानपथक अर्धा किलोमीटर अंतरावर जाऊन पुन्हा माघारी परतले. घटनास्थळी सांडलेल्या रक्तावर अज्ञाताच्या पायांचे ठसे मिळाले आहेत. पोलिसांना घटनास्थळी ‘कोयती’ सादृश्य हत्यार सापडले असून महिलेचे केसही आढळून आले आहेत. त्यामुळे प्रकरणाला वेगळी गती मिळाली आहे. सदर इसम विवाहित आहे, मात्र गेल्या अनेक वर्षांपासून तो एकटाच राहत होता. बायकोला त्याने सोडले होते. त्याचे एका महिलेशी अनैतिक संबंध असल्याची चर्चा असून त्या दिशेने पोलिसांनी तपास सुरू केला आहे. काल रात्री ८.३० नंतर ही घटना घडली असावी असा अंदाज आहे. पोलिस निरीक्षक हरीश मडकईकर यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे.

आता ऍड. नार्वेकरांचे थेट विश्‍वजित यांनाच आव्हान!

‘गोवा लोकशाही मंच’तर्फे आज आमोण्यात जाहीर सभा
पणजी, दि. २६ (प्रतिनिधी): हळदोण्याचे आमदार तथा माजी वित्तमंत्री ऍड. दयानंद नार्वेकर यांनी आता आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांच्या बालेकिल्ल्यात जाऊन त्यांना थेट आव्हान देण्याचे ठरवले आहे. त्यानुसार ‘गोवा लोकशाही मंच’तर्फे उद्या २७ रोजी आमोणा येथील श्री महालक्ष्मी देवस्थानजवळ एका जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेत सरकारी इस्पितळांचे ‘पीपीपी’द्वारे खाजगीकरण व बेकायदा खाण व्यवसायाविरोधात जोरदार दंड थोपटण्यात येणार आहेत.
ऍड. नार्वेकर यांनी सध्या ‘गोवा लोकशाही मंच’च्या माध्यमातून आपल्याच सरकारविरोधात जोरदार मोहीम सुरू केली आहे. म्हापसा, कळंगुट येथील जाहीर सभांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यानंतर आता त्यांनी आपला मोर्चा पाळी मतदारसंघाकडे वळविला आहे. पाळी मतदारसंघावर विश्‍वजित राणे आपले वर्चस्व असल्याचा दावा करतात. पाळीचे आमदार प्रताप गावस यांना विश्‍वजित यांनीच निवडून आणल्याचे बोलले जाते. आता ऍड. नार्वेकर यांनी पाळी मतदारसंघात जाहीर सभेचे आयोजन करून सरकारी इस्पितळांचे खाजगीकरण व बेकायदा खाणींविरोधात दंड थोपटण्याचे ठरवले आहे. या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात खाणउद्योग चालतो. त्यामुळे उद्भवणार्‍या समस्यांना तेथील लोक रोज तोंड देत आले आहेत. पाळीतील खाणप्रभावित लोकांचे प्रश्‍न विधानसभेत मांडण्यास आमदार प्रताप गावस यांना अपयश आल्याचा दावा त्यांचे विरोधक करीत आहेत. सध्या आमोणे येथील ‘सेझा गोवा’च्या पीग आयर्न प्रकल्पाच्या विस्तारीकरणावरून वातावरण बरेच तापले आहे. या विस्तारीकरणामुळे आमोणे भागातील लोकांना प्रदूषणाचा मोठा त्रास होईल अशी भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे या प्रकल्पाच्या विरोधात तेथील लोक बंड पुकारण्याच्या तयारीत आहेत. विशेष म्हणजे राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून २८ रोजी जाहीर जनसुनावणीचे आयोजन केले आहे. या जनसुनावणीच्या पूर्वसंध्येलाच ही बैठक होत असल्याने त्याला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे.
‘गोवा लोकशाही मंच’च्या या सभेला माजी आमदार प्रकाश फडते, कॉंग्रेस पक्षाचे आघाडीचे कार्यकर्ते खेमलो सावंत हजर राहणार आहेत. पाळी मतदारसंघातील लोकांनी मोठ्या संख्येने या सभेला हजेरी लावून सरकारच्या झुंडशाहीविरोधात एकत्रित यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

इफ्फी २०१० खर्च कॅगच्या कचाट्यात सापडण्याची शक्यता

मोठाच घोटाळा झाल्याची चर्चा
पणजी, दि. २५ (विशेष प्रतिनिधी): कोणतीही तपशीलवार माहिती उपलब्ध नसताना त्याकडेसाफदुर्लक्ष करून, गोवा मनोरंजन संस्थेच्या नुकत्याच झालेल्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत गत वर्षीच्या इफ्फीच्या अवाढव्य खर्चाला मंजुरी देण्याचा प्रकार घडला आहे. त्यामुळे या खर्चाबाबत संशयाची पाल चुकचुकली असून २०१० च्या ‘इफ्फी’त मोठा घोटाळा झाला असण्याचा संशय बळावला आहे. तसेच या खर्चाला दिलेली मंजुरी ही महालेखापाल व ऑडिटच्या (‘कॅग’) कचाट्यात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
खर्चाचा सविस्तर तपशील नसतानाही त्याला दिलेल्या मंजुरीवरून आता २०१०च्या इफ्फीबाबत वादाचे मोहोळ उठण्याचे संकेत मिळत आहेत. आधीच विविध कारनाम्यांनी वादात सापडलेला २०१०चा इफ्फी आता अधिकच वादग्रस्त ठरण्याची शक्यता स्पष्टपणे दिसू लागली आहे.
सार्वजनिक निधीचे योग्य नियोजन होऊन त्याची माहिती जनतेला मिळणे आवश्यक ठरते. मात्र नुकत्याच झालेल्या संस्थेच्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत खर्चाबाबतची फारशी तपशीलवार माहिती नसली तरी खर्चाला मान्यता देण्याआधी ती मागवण्याचे कोणतेही पाऊल उचलण्यात आलेले नाही. त्यामुळेच हा खर्च वादाच्या भोवर्‍यात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
आश्‍चर्याची बाब म्हणजे या खर्चाची वर्गवारी करताना प्रवास तसेच निवास खर्च तब्बल दोन ठिकाणी वेगवेगळा दाखवण्यात आला असून इफ्फीच्या किरकोळ खर्चावर ८६ लाख ९० हजार ५१४ रुपये उधळण्यात आले आहेत. संस्थेच्या कार्यकारी समितीने मांडलेली खर्चाची आकडेवारी लक्षात घेता त्यात घोळ असण्याचीच प्रथमदर्शनी शक्यता दिसत आहे. गोवा विधानसभेत विचारलेल्या एका प्रश्‍नाच्या उत्तरावर सरकारने दिलेली माहिती विचारात घेता या इफ्फीच्या खर्चात कोणताही ताळमेळ नसल्याचेच दिसून येत आहे.
इफ्फीत कार्यक्रम सादर करणारे कलाकारांचे मानधन, निवास व प्रवासावर २१ लाख रुपयांचा खर्च दाखविण्यात आला आहे. २०१०च्या इफ्फीत आयोजन समितीने सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जाणार नाहीत असे स्पष्ट केले होते. त्याऐवजी चित्रपट कार्यशाळा व तत्संबंधी उपक्रम राबविण्यात येतील असे सांगण्यात आले होते. मात्र असे असतानाही खर्चाच्या वर्गवारीत आता कलाकार मानधन, प्रवास व निवासावर २१ लाखांचा खर्च दाखविण्यात आल्यामुळे त्याचेही स्पष्टीकरण संस्थेला द्यावे लागणार आहे. हा २१ लाखांचा खर्च का व कोठे केला त्याबाबत सविस्तर माहिती बाहेर आल्याशिवाय खर्चाचा संशयकल्लोळ दूर होणे अशक्य आहे.
विशेष म्हणजे जाहिरात खर्चापोटी केवळ ३ लाख ९६ हजार रुपयांचा खर्च दाखविण्यात आला आहे. छपाई व स्टेशनरीवर अठ्ठावन्न हजारांचा खर्च दाखवण्यात आला आहे. संस्थेच्या कार्यकारी समितीवरील सदस्य वेगवेगळ्या संस्था व उद्योगाशी संबंधित असून इफ्फीची कंत्राटे ही सदस्यांच्या त्या उद्योग व संस्थांना मिळालेली आहेत. त्यामुळेच इफ्फीच्या खर्चाबाबत घोटाळ्याचा प्रथमदर्शनी संशय दिसत आहे.
महत्त्वाचे म्हणजे केंद्रीय दक्षता आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार समितीचा एखादा सदस्य एखाद्या संस्थेशी वा उद्योगाशी संबंधित असल्यास त्याला कामाचे कंत्राट देऊ नये अशी तरतूद आहे. तथापि, त्या नियमाला तिलांजली देत संस्थेच्या कार्यकारिणीवरील काही सदस्यांनाच इफ्फीची कंत्राटे लाटली गेल्याने एकंदर खर्चात घोटाळ्याच्या शक्यतेला पुष्टी मिळत आहे. यात काही हॉटेल व्यावसायिक, वृत्तपत्र सृष्टीशी संबंधित यांचा समावेश असून अनेक वादग्रस्त निर्णयामुळे दरवर्षी इफ्फीच्या चर्चेत राहणारे संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना या सदस्यांचा त्यासाठी छुपा पाठिंबा मिळत असल्याची सध्या चर्चा आहे.
हल्लीच पुनर्गठीत केलेल्या कार्यकारी समितीत हॉटेल व्यावसायिक व वृत्तपत्रसृष्टीशी संबंधित दोन तीन सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार गत इफ्फीत ‘यंग ज्युरी ऍवार्ड’ स्पर्धा घेण्यात आली होती. ही स्पर्धा संस्थेने जाहीर केली नव्हती. तथापि त्याचा बक्षीस वितरणाचा व इतर खर्च संस्थेकडून उकळण्याचा खटाटोप सध्या सुरू असून मागील कार्यकारी समितीच्या बैठकीत त्याला मंजुरी मिळविण्याचा प्रयत्न झाल्याचीही माहिती मिळाली आहे. तथापि त्याला मान्यता मिळाली की काय याबाबत निश्‍चित माहिती मिळाली नाही.
लघु चित्रपट केंद्रावर संस्था लाखो रुपयांचा खर्च करत असून त्याचा लाभ संस्थेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांच्या मर्जीतील लोकांनाच मिळत असल्याने हे केंद्र कायमचे बंद करण्याची मागणी स्थानिक चित्रपट निर्मात्यांनी केली होती. गत इफ्फीत या केंद्रावर १८ लाखांचा खर्च अपेक्षित धरण्यात आला होता. तथापि माहिती अधिकाराखाली मागविलेल्या माहितीत तो ३४ लाखांवर पोचल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे चित्रपट निर्मात्यांची मागणीही रास्त असल्याचे त्यातून स्पष्ट होत चालले आहे.

गोव्याचा सांभाळ करण्यास सज्ज व्हा!

* ‘गोंयच्या राखणदारांचोे आवाज’ संघटनेचे आवाहन
* १५ रोजी आझाद मैदानावर जाहीर सभेचे आयोजन
* इजिप्तप्रमाणेच उठाव करण्याचा निर्धार

पणजी, दि. २६ (प्रतिनिधी): गोव्यात सर्वत्र अराजकता माजली आहे. राज्याच्या भवितव्याचा सौदा करून आमचे राजकीय नेते गोमंतकीयांना देशोधडीला लावण्यास पुढे सरसावले आहेत. प्रशासन निर्ढावलेले व असंवेदनशील बनले असून भ्रष्टाचाराने कळस गाठला आहे. या अराजक परिस्थितीत गोव्याचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी इजिप्तप्रमाणेच उठाव करण्याची वेळ आली आहे. ‘गोंयच्या राखणदारांचो आवाज’ संघटनेच्या झेंड्याखाली राज्यातील सर्व सामाजिक संघटनांनी एकत्रितरीत्या ही चळवळ उभी करण्याचा संकल्प सोडला आहे. येत्या १५ मार्च रोजी आझाद मैदानावर जाहीर सभेचे आयोजन करून या क्रांतीचा शंख फुंकला जाईल, अशी माहिती ऍड. यतीश नाईक यांनी दिली.
आज येथे बोलावण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ऍड. नाईक बोलत होते. यावेळी विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. गोव्याची अस्मिता व वेगळेपण सांभाळून ठेवायचे असेल तर हीच शेवटची संधी आहे व त्यासाठी राज्यातील युवकांनी मोठ्या संख्येने या चळवळीत सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. पर्यटन, खाण व बांधकाम व्यवसायावर सरकारचे कोणतेच नियंत्रण राहिलेले नाही. एकीकडे गरीब जनतेला पैशांचे आमिष दाखवून त्यांच्या जमिनी खरेदी केल्या जात आहेत तर दुसरीकडे याच जमिनी अव्वाच्या सव्वा दरांत विकून काही लोक आपले उखळ पांढरे करून घेत आहेत. आपल्याच भूमीत परकीय बनण्याची नामुष्कीच गोमंतकीयांवर ओढवली आहे. ही परिस्थिती अशीच राहिली तर गोव्यात गोमंतकीय फक्त नावापुरताच राहील, अशी भीती ऍड. नाईक यांनी व्यक्त केली.
१५ मार्च रोजी आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत विविध विषय हाताळले जाणार आहेत. त्यामध्ये पोलिस- ड्रग माफिया - राजकारणी साटेलोटे, प्रादेशिक आराखडा - २०२१, बेकायदा खाणी व खनिज वाहतूक, मोपा भूसंपादन, भारतीय नौसेना भूसंपादन, कचरा समस्या, पर्यावरणाचा र्‍हास, मेगा प्रकल्प, कोमुनिदाद जमिनींची विक्री, सेझ आदी विषयांचा समावेश असेल. शिवाय या सभेत काही महत्त्वाचे ठरावही घेण्यात येणार आहेत. त्यात गोव्यातील जमीन पुढील पिढीसाठी राखून ठेवण्याकरिता राज्याला विशेष दर्जा मिळवून देण्याचा ठराव राज्य विधानसभेत मंजूर करावा, लोकायुक्त विधेयक मंजूर करण्यात यावे, मतदार यादी तयार करताना खबरदारी घेणे आदींचा समावेश असेल.
पुढील पिढीसाठी गोवा सुरक्षित राहावा यासाठी राज्यातील बहुतांश सामाजिक संघटना झटत आहेत. पण युवा पिढी मात्र अशा चळवळींपासून अद्याप दूर राहणेच पसंत करते. जोपर्यंत या क्रांतीची मशाल युवा पिढी आपल्या हातात घेत नाही, तोपर्यंत ही क्रांती यशस्वी होणे शक्य नाही. त्यामुळे १५ मार्च रोजी होणार्‍या जाहीर सभेत युवा पिढीने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे व गोव्याच्या संरक्षणाची धुरा आपल्या हातात घ्यावी, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.