Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday, 1 August 2009

खवळलेल्या कामगारांनी महापालिकेलाच ठोकले टाळे

- वेतनप्रश्नी पर्रीकरांची मध्यस्थी
- नगरसेवकांना "सक्तीची विश्रांती'
- महापालिकेत प्रचंड गदारोळ

पणजी, दि. ३१ (प्रतिनिधी)- सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारसीनुसार वेतन देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी पणजी महापालिका कामगारांना देऊनही पालिका मंडळाने ते देण्याचे नाकारले. त्यामुळे आज दुपारी संतप्त कामगारांनी पालिकेलाच टाळे ठोकले. त्यामुळे महापालिका कार्यालयात कमालीचा गोंधळ उडाला. त्यानंतर दुपारी विरोधी पक्षनेते तथा पणजीचे आमदार मनोहर पर्रीकर यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून तोडगा काढण्याचे आश्वासन कामगारांना देताच मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब संजीव गडकर यांना पालिका आयुक्तपदाचा ताबा देऊन उद्या सकाळपर्यंत सहाव्या शिफारशीनुसार वेतन देण्याचे आदेश दिले. हे आश्वासन मिळताच सायंकाळी ६.३० वाजता पालिकेचे मुख्य प्रवेशद्वार कामगारांनी खुले केले. आज दुपारी हे प्रकरण चिघळण्याला नगरसेवक ऍड. अविनाश भोसले जबाबदार असल्याचा ठपका कामगारांनी ठेवला असून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वेतन देण्यास अपयशी ठरलेल्या या मंडळाने त्वरित राजीनामा द्यावा, अशी जोरदार मागणी पालिका कामगार नेते केशव प्रभू यांनी केली आहे.
पालिकेच्या तिजोरीत खडखडाट असल्याने गेल्या पालिका मंडळाच्या बैठकीत कामगारांना सहाव्या वेतन आयोगानुसार वेतन देण्यास सत्ताधारी गटाने विरोध करून पाचव्या वेतनानुसार वेतन दिले जाणार असल्याचे जाहीर केले होते.
कामगारांच्या वेतनाच्या प्रश्नावर निर्णय घेण्यासाठी आज महापालिका मंडळाची खास बैठक बोलावण्यात आली होता. यावेळी पालिकेचे आयुक्त संजीत रॉड्रिक्स गेल्या सोमवार पासून रजेवर असल्याने कोणत्याही निर्णयाविना बैठक तहकूब करण्यात आली. यावेळी झालेल्या चर्चेत सत्ताधारी गटाने या कामगारांना सहाव्या शिफारशीनुसार वेतन देण्यास तीव्र विरोध केला. तसेच पाचव्या शिफारशीनुसारही आता वेतन देणे पालिकेला जमणार नसल्याचा मुद्दा काही जणांनी मांडला. यावेळी नगरसेवक ऍड. अविनाश भोसले यांनी कामगारविरोधी भूमिका घेतल्याने हे प्रकरण अधिक चिघळल्याचा आरोप पालिका कामगार संघटनेचे अध्यक्ष केशव प्रभू यांनी केला.
पालिका मंडळाची बैठक कोणत्याही निर्णयाविना तहकूब झाल्यानंतर पालिका कर्मचाऱ्यांनी पालिकेच्या मुख्य दरवाजाच बंद करून सत्ताधारी गटाचे आणि नगरसेवक ऍड. भोसले यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे बराच वेळ हे नगरसेवक आतच अडकून पडले होते. त्यांना बाहेर पडण्याची संधीच कामगारांनी दिली नाही. त्यानंतर मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या सरकारी निवासस्थानी झालेल्या बैठकीत, पालिका आयुक्त रॉड्रिक्स यांच्या रजेच्या काळात ताबा सांभाळणारे संजीव गडकर यांना बोलावून त्वरित कामगारांच्या वेतनाच्या धनादेशावर सही करण्याचे आदेश श्री. कामत यांनी दिले. यावेळी कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना बोलावून घेण्यात आले होते.
गेल्या वेळच्या पालिका बैठकीत झालेल्या निर्णयाला पालिकेच्या सत्ताधारी गटाने किंमतच दिली नसल्याचे श्री. प्रभू यांनी मुख्यमंत्र्याच्या निदर्शनास आणून दिले. त्यामुळे हा प्रश्न सोडवण्यासाठी पणजी, ताळगाव, सांताक्रुझ मतदारसंघांचे आमदार तसेच नगर नियोजन मंत्री ज्योकिम आलेमाव आणि कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्याची एकत्रित बैठक घेतली जावी, अशी मागणी श्री. प्रभू यांनी केली आहे. तसेच पालिका चालवणे शक्य नसेल आणि प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कामगारांना वेतन देण्याची हिंमत या पालिका मंडळाकडे नसल्यास त्यांनी ताबडतोब राजीनामा देऊन घरी बसावे, असेही यावेळी श्री. प्रभू यांनी निक्षून सांगितले.

आमदारांना दरमहा ९२ हजार मानधन!

पगारवाढ दुरुस्ती विधेयक सादर
पणजी, दि. ३१ (प्रतिनिधी) - राज्य विधानसभा सदस्यांच्या वेतनात व भत्त्यांत मोठी वाढ करण्यासाठी गोवा विधानसभा सदस्य वेतन,भत्ता आणि निवृत्ती दुरुस्ती विधेयक आज सभागृहासमोर सादर करण्यात आले.या विधेयकाला राज्यपाल एस.एस.सिद्धू यांची मान्यता मिळाली असून सभागृहाच्या मंजुरीसाठी हे विधेयक सादर करण्यात आले आहे.या विधेयकाअंतर्गत आमदारांच्या वेतन,भत्ता व निवृत्तिवेतन होणाऱ्या वाढीमुळे सरकारी तिजोरीवर वार्षिक ५ कोटी ८१ लाख रुपयांचा अतिरिक्त भार पडणार आहे.
इतर शेजारी राज्यांच्या तुलनेत गोव्यातील राहणीमानाचा दर्जा उच्च आहे.अलीकडे सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात सहाव्या वेतन आयोगामुळे भरमसाठ वाढ झाली आहे. मुख्य सचिवांचेच वेतन एक लाख रुपयांच्या घरात पोचल्याची माहितीही मुख्यमंत्री कामत यांनी दिली. आमदारांच्या कामाचा व्याप दिवसेंदिवस वाढत आहे. त्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ व निधीची गरज आहे व त्याअनुषंगानेच ही वाढ सुचवण्यात आल्याचे मुख्यमंत्री कामत म्हणाले.
सरकारने या कायद्यात केलेल्या दुरुस्तीनुसार आमदारांना यापूर्वी मिळणारा ७५० रुपयांचा अधिवेशन भत्ता १ हजार रुपये करण्यात आला आहे.आमदारांना घर, बंगला, किंवा फ्लॅट खरेदी करण्यासाठी यापूर्वी मिळणाऱ्या १२ लाख रुपयांच्या कर्जाऐवजी आता ३० लाख रुपये कर्ज मिळणार आहे व हे कर्ज दहा वर्षांत फेडता येईल,अशीही शिफारस करण्यात आली आहे. मतदारसंघ फिरती भत्ता आमदारांना यापूर्वी २६ हजार रुपये मिळत होता तो आता ५५ हजार रुपये करण्यात आला आहे. प्रत्येक आमदाराला चार खाजगी साहाय्यक नेमण्याचा अधिकार आहे व त्यासाठी १८ हजार प्रतिमहिना त्यांच्या वेतनासाठी मिळत होते आता ही रक्कम ३२ हजार रुपये प्रतिमहिना वाढवण्यात आली आहे. पेन्शनमध्ये करण्यात आलेल्या दुरुस्तीनुसार पहिल्या वर्षीच्या पेन्शनसाठी ५ हजार रुपयांवरून ही रक्कम ८ हजार रुपये केली आहे.वार्षिक पेन्शनवाढीत एक हजार रुपयांवरून १२५० रुपये करण्यात आली आहे. महिन्याला २७ हजारपर्यंत असलेली ही मर्यादा आता वाढवून ५० हजार रुपये करण्यात आली आहे.
---------------------------------------------

राज्यामध्ये गेल्या दोन वर्षांत दूध उत्पादनात २० टक्के घट

विरोधी सदस्य सहकार मंत्र्यांवर कडाडले
शेतकऱ्यांना दूधदर वाढवून देण्याची मागणी


पणजी, दि. ३१ (प्रतिनिधी) - राज्यात गेली दोन वर्षे दूध उत्पादनात लक्षणीय घट झाली असून सरकारची उदासिनताच त्याला कारणीभूत असल्याची टीका आज विरोधी सदस्यांनी केली. काणकोणचे आमदार विजय पै खोत यांनी प्रश्नोत्तराच्या तासाला एका तारांकित प्रश्नाद्वारे काणकोण तालुक्यातील दूध उत्पादनासंदर्भातील प्रश्न विचारून मिळालेल्या लेखी उत्तराच्या आधारे संपूर्ण राज्यात दूध उत्पादन घटले असल्याचे सहकार मंत्री रवी नाईक यांच्या निदर्शनास आणून दिले. प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर, रमेश तवडकर, मनोहर पर्रीकर आदींनी पै खोत यांच्या सुरात सूर मिसळताना, शेतकऱ्यांना चांगल्या जातीची जनावरे, गर्भरोपणासाठी चांगले बीज, दुभत्या जनावरांसाठी सकस खाद्य व शेतकऱ्यांना दुधाची चांगली किंमत मिळाल्यास या व्यवसायाला पुन्हा सुगीचे दिवस येऊ शकतील, असे सांगितले.
२००७ - ०७ साली तीन लाख लिटर, २००७ - ०८ साली २ लाख ८८ हजार लिटर व २००८ - ०९ साली २ लाख ४२ हजार दूध उत्पादन हे आकडे काय दर्शवतात, असा सवाल करून दूधाचे उत्पादन कमी होण्याची कारणे काय असावीत, असा सवाल श्री. खोत यांनी मंत्री नाईक यांना केला. त्यावर खाद्य वगैरे गोष्टी पुरेशा प्रमाणात मिळत नसतील तर त्यामुळे दूध उत्पादनात घट होणे शक्य असल्याचे रवी म्हणाले. महाराष्ट्रात दुधाचे दर वाढणार असल्याने गोव्यात त्याचे परिणाम होऊ शकतील. सरकारने त्यासंदर्भात काही विचार केला आहे का, या खोत यांच्या प्रश्नावर अद्याप तरी तसे झालेले नाही. गोवा डेअरीने त्यासाठी सरकारची अद्याप तरी परवानगी घेतलेली नाही, असेही रवी यांनी पुढे स्पष्ट केले. तथापि, दुग्ध उत्पादन वाढावे यासाठी "कामधेनू'सारख्या योजनेचा त्यांच्याकडून उल्लेख केला जातो. केवळ योजना चांगल्या असून चालत नाही. चांगल्या जातीची जनावरे, गर्भधारणेसाठी चांगले बीज उपलब्ध करण्यासाठी सरकारी पातळीवर आवश्यक प्रयत्न होण्याची गरज आहे. सिधी, गीर, साईवाला यासारख्या स्थानिक वातावरणात टिकाव धरू शकणाऱ्या देशी गायी शेतकऱ्यांना मिळतील याची दक्षता घ्या. वासरू जन्माला आल्यापासून पुढे गर्भधारणेपर्यंत सत्तावीस महिने त्याची काळजी घेण्याची योजनाही त्यासाठी सरकारला आखावी लागेल, असे श्री. खोत यांनी रवी यांना सुचवले.
राज्यात दूधाचा व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी दुधाचे दर वाढवून देण्याची जोरदार मागणीही श्री. खोत यांनी यावेळी केली. दूध सोसायट्यांना डेअरीकडून प्रतिलिटर १३ रुपये ८४ पैसे दिले जातात. मात्र डेअरींकडून शेतकऱ्यांना अवघे नऊ किंवा साडे नऊ रुपये दिले जातात. कष्ट शेतकरी करतात आणि मलई मात्र सोसायटीवाले ओरपतात, अशी संतप्त टीकाही खोत यांनी यावेळी केली. रमेश तवडकर यांनीही खोत यांच्या या मागणीला पाठिंबा देताना शेतकऱ्यांना वाढीव दर मिळणे आवश्यक असल्याचे ठासून सांगितले. तसेच पार्सेकर यांनी सरकारी धोरणावर टीका करताना शेजारील राज्यांमध्ये दुधाचे उत्पादन वाढत आहे आणि गोव्यात मात्र गेल्या दोन वर्षांत ते २० टक्क्यांनी घटले असल्याचे सांगितले. दुधाचे उत्पादन वाढवण्यासाठी सरकार ठोस प्रयत्न करणार आहे की नाही, असा सवालही त्यांनी केला. हा विषय सहजतेने घेता येणार नाही. राज्यात दूध उत्पादन का घटते आहे, याची कारणे शोधून काढा, गरज भासल्यास आपलीही मदत घ्या, असेही पार्सेकर यांनी यावेळी सुचवले. दरम्यान, कामधेनू योजनेअंतर्गत यापूर्वी दहा गुरे दिली जायची, आता ती २० दिली जाणार असून या योजनेतील प्रक्रियाही सुलभ करण्यात आल्याचे मंत्री रवी यांनी चर्चेदरम्यान सांगितले. तथापि, केवळ योजना जाहीर केल्याने दूध उत्पादन वाढणार नाही. ही योजना विचारपूर्वक राबवली तरच त्याचा फायदा होऊ शकेल, असे अनेक विरोधी सदस्यांनी मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.

संशयास्पद जहाजाचे गूढ अद्याप कायम

पणजी, दि. ३१ (प्रतिनिधी) ःभारतीय सागरी सीमेत रत्नागिरीजवळ आढळून आलेले संशयास्पद जहाज भारतीय तटरक्षक दलाचेच असल्याचे स्पष्ट झाले असून तशी माहिती रत्नागिरीचे पोलिस अधीक्षक फत्तेसिंग पाटील यांनी दिले असले तरी रात्री उशिरा रत्नागिरी पोलिसांकडून पुन्हा एकदा या गुढ जहाजासंबंधी सतर्कता बाळगण्याचा संदेश गोवा पोलिसांना देण्यात आला. रत्नागिरीजवळील अंबोगळगडच्या किनारपट्टीवर काल गुरुवारी दोन महिलांना हे संशयास्पद जहाज दिसले होते. हे जहाज दिसताच त्या दोन्ही महिलांनी ही माहिती तातडीने भारतीय तटरक्षक दलाला दिली होती. तटरक्षक दल आणि पोलिसांनी त्या जहाजाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु, कोणताही संपर्क होऊ न शकल्यामुळे संपूर्ण सुरक्षा यंत्रणा जागरुक झाली होती. दरम्यान, रात्री दीड वाजता हे जहाज रत्नागिरीकडून गोव्याकडे गेले असल्याची माहिती मिळल्यामुळे सर्वत्र शोधाशोध सुरू करण्यात आली होती. भारतीय नौसेना आणि तटरक्षक दलाच्या लोकांनी गस्त वाढविली होती. जहाज महाराष्ट्राकडून गोव्याकडे गेले असल्यामुळे महाराष्ट्र पोलिसांनी ही माहिती गोवा पोलिसांनाही दिली होती. गुरुवार-शुक्रवारच्या रात्रभर या जहाजाचा शोध घेण्याचे काम सुरू होते.

त्या मुलीवर निर्दयी अत्याचार करणाऱ्यांचा जामीन रद्द करा

सरकारी वकील पूनम भरणे यांचा जोरदार युक्तिवाद

पणजी, दि. ३१ (प्रतिनिधी) - आराडी पर्वरी येथील "पंचशील' या इमारतीत पेडणेकर दांपत्य आणि त्यांची मेहुणी यांच्याकडून फ्लॅटची दारे, खिडक्या पूर्णपणे झाकून आपल्यावर शारीरिक अत्याचार केले जात होते, अशी जबानी त्या मुलीने दिली आहे. "त्या' अल्पवयीन मुलीवर निर्दयी अत्याचार करून कातडी जळेपर्यंत चटके देण्यामागे पेडणेकर कुटुंबीयांचा उद्देश काय होता? तसेच तिला चटके देण्यासाठी उलतने (कायलाटा) वापरला होता की तापलेला तवाच तिच्या अंगावर ठेवण्यात आला होता, याची चौकशी होणे बाकी आहे. त्यामुळे या प्रकरणातील संशयित आरोपी औदुंबर ऊर्फ शुभम् पेडणेकर याचा जामीन रद्द करावा. तसेच त्याची पत्नी मीनाक्षी पेडणेकर व मेहुणी रेखा ऊर्फ टिना वाघेला यांचा अटकपूर्व जामीन फेटाळून लावावा, अशी जोरदार मागणी आज सरकारी वकील पूनम भरणे यांनी बाल न्यायालयात केली. त्यानंतर दोन्ही बाजूचा युक्तिवाद एकून यावरील पुढील सुनावणी उद्या (शनिवारी) सकाळी ठेवण्यात आली आहे.
जामीन अर्जाच्या सुनावणीवेळी दुसरी संशयित आरोपी सौ. मीनाक्षी पेडणेकर आपल्या दोन्ही जुळ्या मुलींना घेऊन न्यायालयात हजर राहिली होती. तिला पाहण्यासाठी न्यायालयाच्या आवारात एकच गर्दी उसळली होती.
या प्रकरणात संशयितांवर लावलेला ऍट्रॉसिटी कायदा पूर्णपणे चुकीचा असून "लमाणी' या जमातीचा अनुसूचित जातीच समावेशच नाही, असा मुद्दा ऍड. दामोदर धोंड यांनी आपल्या युक्तिवादात उपस्थित केला. हा युक्तिवाद खोडून काढताना ऍड. भरणे यांनी हा एका राज्याचा प्रश्न नसून अनुसूचित जातीबाबतची अधिसूचना केंद्र सरकारने जारी केली आहे, त्यामुळे ती सर्व राज्यांना लागू होते, असे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. यावेळी ऍड. भरणे यांनी तीन सदस्यीय डॉक्टरांच्या मंडळाने तयार केलेला नवा चाचणी अहवाल न्यायालयासमोर ठेवला. या अहवालनुसार त्या मुलीच्या शरीरावर डाग दिल्याच्या २३ जखमा असून त्यातील ८ जखमा या तीन आठवड्यांपूर्वीच्या आहेत. त्यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून तिच्यावर शारीरिक अत्याचार होत असल्याचे सिद्ध होते आहे. त्या मुलीवर कोणातेही मायेचे छत्र नाही. त्यामुळे तिची ४ हजार रुपयांत कोणी विक्री केली याचीही चौकशी करायची आहे. संशयिताला दुसऱ्या दिवशीच जामीन मिळाल्याने ही चौकशी करण्यास पोलिस तपास अधिकाऱ्यांना वेळ मिळालेला नाही. त्यामुळे न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज या नव्या वैद्यकीय अहवालाच्या आधारावर रद्द करावा, अशी मागणी यावेळी ऍड. भरणे यांनी केली.
या नव्या वैद्यकीय चाचणीत कोणताही बदल झालेला नाही. केवळ डॉक्टरांचे मत बदलले आहे. वेगवेगळ्या डॉक्टरांची मते ही भिन्न असू शकतात, त्यामुळे या अहवालावरून त्याचा जामीन रद्द होऊ शकत नाही, असा दावा यावेळी ऍड. धोंड यांनी केला. त्याचप्रमाणे पोलिसांनी उलतने आणि केबल वायरही जप्त केली आहे. तसेच उलतने हे घातक हत्यार नसून त्याद्वारे कोणाचा खुनही करता येत नाही, असे मुद्देही त्यांनी युक्तिवादात मांडले. या मुद्यांना जोरदार विरोध करून हे प्रकरण अत्यंत संवेदनशील असून तिला उलतन्याने चटके देण्यात आले होते की तापलेल्या लोखंडी तव्याने याचा तपास अजून व्हायचा आहे, असा युक्तिवाद यावेळी ऍड. भरणे यांनी केला.

Friday, 31 July 2009

"त्या' मुलीच्या छळाचे विधानसभेत तीव्र पडसाद

कठोर कारवाईची सभागृहाकडून मागणी
पणजी, दि. ३० (प्रतिनिधी) - पर्वरी येथील एका सुशिक्षित कुटुंबात मोलकरणीचे काम करणाऱ्या दहा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्यंत निर्दयीपणे केलेल्या छळाचे पडसाद आज थेट विधानसभेत उमटले आणि संपूर्ण सभागृहानेच त्या अघोरी कृत्याचा संतप्त शब्दांत धिक्कार केला. मुलीच्या अंगावर भाजल्याच्या गंभीर जखमा या साध्या स्वरूपाच्या असल्याचा अहवाल "गोमेकॉ'च्या डॉक्टरांनी दिल्यानंतर त्या कुटुंबातील पुरुषाला जरी न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला खरा ; पण आता "गोमेकॉ'च्याच डॉक्टरांच्या बोर्ड पॅनेलने या जखमा गंभीर स्वरूपाच्या असल्याचे नव्याने नमूद केल्यामुळे या प्रकरणाला खऱ्या अर्थाने गंभीर स्वरूप प्राप्त झाले आहे. परिणामी पेडणेकर कुटुंबातील किमान तिघांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते.
विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी शून्य प्रहरला सभापतींची विशेष परवानगी घेऊन या महत्वपूर्ण विषयाकडे सभागृहाचे लक्ष वेधले. ते म्हणाले, ज्या पद्धतीने त्या अल्पवयीन मुलीचा छळ करण्यात आला त्याचे वृत्त आणि छायाचित्रे वर्तमानपत्रांमध्ये पाहून आपणास स्वतः गोमंतकीय असल्याची शरम वाटली. तापलेल्या तव्याचे आणि चमच्यांचे चटके देऊन तिचे ठिकठिकाणी भाजलेले अंग पाहून आपले अंग शहारले. असे अत्याचार एका लहान मुलीवर ते कसे करू शकले, हाच प्रश्न आपल्याला पडला आहे. त्या मुलीला चटके तर देण्यात आलेले आहेतच; परंतु तिला लाथाबुक्क्यांनी वेळोवेळी मारहाणही झालेली आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे एवढे होऊनही आरोपींना जामीन मंजूर होते हा प्रकार अत्यंत गंभीर असा आहे. "गोमेकॉ'च्या डॉक्टरांनी दिलेल्या अहवालाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असल्याचेही त्यांनी सांगितले.
हा प्रकार सहन करण्यापलीकडील असून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची गरज असल्याचे पर्रीकर यांनी नमूद केले. "गोमेकॉ'च्या डॉक्टरांनी दिलेल्या वैद्यकीय अहवालामुळे संबंधितांना जामीन मिळाला हे तर त्यापेक्षा गंभीर आहे. आता मेडिकल बोर्डानेच पूर्वीचा अहवाल रद्दबातल ठरवून जखमा गंभीर स्वरूपाच्या असल्याचे नमूद केले असल्याने कारवाईचा मार्ग मोकळा झाल्याचे पर्रीकर यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. ती मुलगी अल्पवयीन तर आहेच; परंतु अनुसूचित जामातीपैकीही आहे, त्यामुळे या प्रकरणाची तीव्रता अधिक वाढली आहे. अशावेळी सरकारने कारवाईसाठी कठोर पावले उचलायलाच हवीत, किंबहुना संपूर्ण सभागृहाचीच तशी प्रखर भावना असल्याचेही पर्रीकर यांनी पुढे सांगितले.
सभापती प्रतापसिंग राणे यांनीही संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची सूचना यावेळी केली. आता "एनजीओ' (बिगरसरकारी संस्था) कोठे गेल्या, असा खोचक सवालही त्यांनी केला. आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनीही पर्रीकरांच्या म्हणण्याला दुजोरा देताना हे प्रकरण अत्यंत गंभीर स्वरूपाचे असल्याचे सांगितले. मेडिकल बोर्डाने आपला अहवाल सादर केला असून आता कारवाई करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. मंत्री आलेक्स सिकेरा यांनीही जामीन रद्द करण्यासाठी सरकारने पावले उचलण्याची गरज असल्याचे सांगितले. सभागृहातील जवळपास प्रत्येकाने कारवाईस संमती दर्शवली. मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी सभागृहाच्या या भावना लक्षात घेऊन, या प्रकरणी कठोर कारवाई केली जाणार असल्याचे स्पष्ट केले. आपण पोलिस प्रमुखांशी या संदर्भात चर्चा केली असून मूळ तक्रारीत काही गंभीर स्वरूपाची कलमे जोडण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणी मंजूर झालेला जामीन रद्द करण्यासाठी प्रयत्न केले जाणार असून दोन महिलांचे अटकपूर्व जामीनही न्यायालयाने फेटाळावे यासाठी सरकार पक्षाकडून भक्कमपणे बाजू मांडली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यानच्या काळात सभागृहाबाहेर असलेले गृमंत्री रवी नाईक यांनी घाईघाईत आत येत जामीन रद्द करण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करण्याच्या सूचना तसेच संबंधितांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आदेश आपण दिले असल्याचे सांगितले. एकूणच अल्पवयीन मुलीच्या छळाचे हे प्रकरण येणाऱ्या दिवसांत संबंधितांवर चांगलेच शेकण्याची दाट शक्यता आहे. "गोमेकॉ'च्या ज्या डॉक्टरने, त्या जखमा साध्या असल्याचा अहवाल दिला होता, तो डॉक्टरही या प्रकरणी गोत्यात येण्याचीही शक्यता निर्माण झाली आहे.

संशयितांवर ऍट्रॉसिटी कायदा

डॉक्टरही अडचणीत येणार
पणजी, दि. ३० (प्रतिनिधी) - घरकामासाठी ठेवलेल्या "त्या' अल्पवयीन मुलीवर गेल्या सात महिन्यांपासून शारीरिक अत्याचार होत असल्याचे तपासात उघड झाले असून तिच्या अंगावर २८ जखमा आढळून आल्याचे आज खास स्थापन केलेल्या वैद्यकीय मंडळाने आपल्या अहवालात नमूद केले आहे. २८ जखमांपैकी ८ ताज्या व गंभीर स्वरूपाच्या असल्याची माहिती पोलिस अधीक्षक आत्माराम देशपांडे यांनी दिली. या नव्या अहवालामुळे सुरुवातीला त्या मुलीच्या शरीरावर साध्या जखमा असल्याचा अहवाल देणारे डॉक्टर अडचणीत आले आहेत. या प्रकरणातील संशयित पेडणेकर दांपत्य तसेच मेहुणीवर "ऍट्रॉसिटी' कायदा कलम ३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते.
औदुंबर पेडणेकर याला या प्रकरणात जामीन मिळाला असून त्याची पत्नी मीनाक्षी आणि मेहुणी रेखा वाघेला फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. संशयित आरोपी पेडणेकर याला बाल न्यायालयाने जामीन मंजूर केल्याने त्याचा जामीन रद्द करण्यासाठी पोलिसांनी अर्ज केला आहे. आज हे प्रकरण सुनावणीसाठी आले असता आरोपींना पोलिसांनी नोटिसच दिलेली नसल्याचा मुद्दा उपस्थित केल्याने हे प्रकरण उद्या सुनावणीस ठेवण्यात आले. मात्र, संशयित आरोपींना पाठवण्यात आलेली नोटीस त्यांच्या वकिलाने स्वीकारली असून आरोपीच्या वतीने ही नोटीस स्वीकारत असल्याने त्या नोटिशीवर स्वीकारणाऱ्या व्यक्तीने सहीसुद्धा केलेली असल्याचे पोलिसांनी पत्रकारांच्या निदर्शनास आणून दिले. पोलिसांनी केलेल्या या आव्हान अर्जावर उद्या दुपारी सुनावणी होणार आहे. यावेळी न्यायालयाने नव्या नोटिसा बजावल्या आहेत.
सुरुवातीला या मुलीची तपासणी करून साध्या जखमा असल्याचा अहवाल देणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. ज्या दिवशी जखमी अवस्थेत सदर मुलगी पोलिसांना मिळाली त्यावेळी तिची वैद्यकीय चाचणी करण्यासाठी तिला पोलिस वाहनातून गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात आणले होते. यावेळी डॉ. गौतम कामत व डॉ. सर्फराज सय्यद यांनी त्या मुलीचा तपासणी करून हा अहवाल दिला होता, अशी माहिती मिळाली आहे. या अहवालाच्याच आधारावर संशयिताला जामीन मंजूर झाल्याचे उघड होताच त्याची गंभीर दखल घेऊन तिची नव्याने वैद्यकीय चाचणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते. नव्या अहवालात ती १० टक्के भाजली असल्याचे नमूद केले आहे तर, पूर्वीच्या अहवालात ती केवळ ५ टक्के भाजली असल्याचे म्हटले आहे.
बाल हक्कासाठी कार्यरत असलेल्या "स्कॅन' या स्वयंसेवी संघटनेने आज गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या डीनची भेट घेऊन डॉक्टरांना न्यायिक वैद्यकीय चाचणीचे ज्ञान कमी असल्याचे निदर्शनास आणून दिले. त्याचप्रमाणे इस्पितळातील सर्व डॉक्टरांना न्यायिक वैद्यकीय चाचणी शिक्षण देण्याची मागणी केली. याविषयीचे एक पत्रही त्यांनी डीनना सुपूर्द केले.

अज्ञात जहाज गोव्याच्या दिशेने...

पणजी, दि. ३० (प्रतिनिधी) - जैतापूर बंदरावरून एक अज्ञात जहाज कोकणमार्गे गोव्याच्या दिशेने येत असल्याची माहिती मालवणच्या काही मच्छीमारांनी महाराष्ट्र तटरक्षक दलाला दिल्यानंतर गोवा पोलिस दलाच्या सागरी विभागाला तसेच तटरक्षक दलाला सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. या माहितीला उत्तर गोवा पोलिस अधीक्षक बॉस्को जॉर्ज यांनी दुजोरा दिला असून पोलिस नियंत्रण कक्षाने ही माहिती तटरक्षक दलाला पुरवली असल्याचे त्यांनी सांगितले.
आज सायंकाळी एक अज्ञात जहाज कोकण मार्गे गोव्याच्या दिशेने जात असल्याचे काही मच्छीमारांनी पाहिले आणि त्वरित याची माहिती महाराष्ट्र तट रक्षक दलाला देण्यात आली. या जहाजात काय आहे, त्यात किती व्यक्ती आहेत, ते कुठून आले आहेत, याची माहिती अद्याप समजलेली नसल्याने गोवा पोलिसांना सतर्क राहण्याची सूचना करण्यात आली आहे. त्यानुसार सागरी पोलिस व तटरक्षक दलाला सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत.
गेल्या काही महिन्यांपूर्वी गोव्यात जहाजातून स्फोटके उतरवली जाणार असल्याची गुप्त माहिती केंद्रातून यापूर्वीच देण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर पोलिस या घटनेकडे गांभीर्याने पाहत आहेत.

वैश्विक आरोग्य योजना अमलात आणा - पर्रीकर

पणजी, दि.३०(प्रतिनिधी)ः वैश्विक आरोग्य योजनेची ताबडतोब अंमलबजावणी करून सामान्य जनतेला आरोग्य सेवेबाबत दिलासा द्या, असे आवाहन विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी केले. सरकारने हाती घेतलेल्या विविध प्रकल्पांना आर्थिक पाठबळ नसल्याने हे प्रकल्प अधांतरीच असल्याची टीकाही त्यांनी आज विधानसभेत केली.
आरोग्य, कृषी आदी खात्यांवरील पुरवणी मागण्यांच्या चर्चेवेळी ते बोलत होते.आरोग्य खात्यातर्फे सध्या १५० कोटी रुपयांचे प्रकल्प राबवण्यात आले आहेत तर अन्य २५० कोटी रुपयांचे प्रकल्प पूर्ण व्हायचे आहेत. हे सर्व प्रकल्प उभे राहिल्यानंतर या प्रकल्पांच्या देखरेखीसाठीच वर्षाकाठी किमान ५० कोटी रुपये खर्च येणार आहे. त्यामुळे सध्या खात्याने केलेली आर्थिक तरतूद खूपच कमी असल्याचेही पर्रीकर म्हणाले. राज्यात मलेरिया, चिकुनगुनीया आदी प्रकरणांत झपाट्याने वाढ होत आहे. कुष्ठरोग नष्ट झाल्याचे बोलले जाते पण तो अस्तित्वात असल्याची माहिती उघडकीस आली आहे. सांत इनेज येथील क्षयरोग इस्पितळाची परिस्थिती अत्यंत बिकट असून क्षयरोग रुग्णांच्या संख्येतही लक्षणीय वाढ झाल्याची भीतीही त्यांनी यावेळी व्यक्त केली. आरोग्य खात्याकडे सध्या १६८ डॉक्टरांची कमतरता असल्याने त्याचा परिणाम आरोग्य सेवेवर होत आहे. वैद्यकीय महाविद्यालयात २७ डॉक्टरांची कमतरता असल्याची माहितीही त्यांनी दिली. म्हापसा जिल्हा इस्पितळ सुरू झाल्यास त्याचा फायदा संपूर्ण उत्तर गोव्याला होणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. गोमेकॉतील सध्याच्या शंभर जागा वाढवून त्या दोनशे कराव्यात असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. मोफत औषधांच्या गैरवापरावर आळा घालावा,अशी मागणीही पर्रीकर यांनी केली.
शेतीव्यवसाय नफ्याचा बनवा
शेती व्यवसाय हा नफ्यात चालू शकतो, असा आत्मविश्वास शेतकऱ्यांमध्ये तयार करण्याची आवश्यकता आहे, असे पर्रीकर म्हणाले. फलोत्पादन महामंडळाला अधिक सक्रिय बनवण्याची गरज आहे. या महामंडळातर्फे केवळ इतर राज्यांतून भाजी, फळे आणण्यावर भर न देता स्थानिक शेतकऱ्यांच्या उत्पादनालाही प्रोत्साहन मिळावे, असेही ते म्हणाले.

"सीआरझेड'मधील घरे वाचवा

विरोधकांची सरकारला हाक
पणजी, दि. ३० (प्रतिनिधी) - किनारपट्टी अधिनियमन विभाग (सीआरझेड) कायद्याखाली समुद्र किनाऱ्यांवरील कथित बेकायदा घरांवर कारवाई करताना सरकारने केवळ न्यायालयाच्या आदेशाचे अंधानुकरण न करता प्रत्येक प्रकरणाचा स्वतंत्र विचार करूनच काय तो निर्णय घ्यावा, अशी एकमुखी मागणी आज अनेक सदस्यांनी सभागृहात केली. सीआरझेडअंतर्गत येणारी जवळपास ८ हजार घरे वाचवण्यासाठी प्रसंगी केंद्र सरकारची मदत घ्या, अशी सूचनाही यावेळी करण्यात आली.
म्हापशाचे आमदार फ्रान्सिस डिसोझा यांनी प्रश्नोत्तराच्या तासाला एका तारांकित प्रश्नाद्वारे किनारपट्टी भागातील नागरिकांच्या या समस्येकडे सभागृहाचे लक्ष वेधले. विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर, दयानंद मांद्रेकर, कळंगुटचे आमदार आग्नेल फर्नांडिस, विजय पै खोत, प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर अशा अनेक सदस्यांनी यावेळी घरे वाचवण्यासाठी प्रसंगी कायदा बदला अशी मागणी केली.
पार्सेकर म्हणाले, २५०० घरे ही संख्या फार मोठी आहे. त्यामुळे "फक्त' २५०० घरे असे म्हणणे चुकीचे आहे. केवळ एका मांद्रे गावातच ४०० जणांना पंचायतीकडून नोटीसा आलेल्या असून त्यापैकी २५८ जण एकाच गावातील आहेत. यातील ५८ घरे पाडण्याच्या नोटिसाही निघाल्या आहेत. खरेतर हे लोक मूळ त्याच गावातील असून विस्तारित कुटुंबाचा ती घरे भाग आहेत. अशावेळी केवळ न्यायालयाच्या भीतीपोटी सारासार विचार न करता, नोटीसा पाठवणे हे कितपत योग्य ठरते?
मांद्रेप्रमाणे मोरजी, तेरेखोल गावचीही तीच समस्या आहे. त्यापैकी मांद्रेत १५० जणांवर पंचायतींने नोटीसा बजावलेल्या आहेत तर तेरेखोलात ७६ जणांविरुद्ध नोटिसा जारी करण्यात आल्या आहेत. मुळातच किनापट्टी भागातील हे गाव असल्याने लोकांनी जायचे कोठे, असा सवालही त्यांनी केला.
सभापती प्रतापसिंग राणे यांनी सांगितले की, मच्छीमार, रेंदेरे अशांनाच तुम्ही दिलासा देऊ शकता. बायणासारख्या किनाऱ्यावर पूर्वी मोजक्याच लोकांची घरे होती, परंतु १९७२ नंतर अनेकांनी तेथे अतिक्रमण केले. खरेतर ती जगा रस्त्यासाठी राखून ठेवण्यात आली होती, त्यामुळे सवलत देताना कोणाला देता याचा विचार करा. दयानंद मांद्रेकर यांनी मात्र, शिवोलीसारख्या ठिकाणी केवळ मच्छीमार आणि रेंदेरच नव्हे तर अन्य लोकही अनेक वर्षे राहत आहेत. आजही वाढलेली घरे स्थानिकांचीच आहे. त्यामुळे ही घरे बेकायदा ठरवून ती मोडणे योग्य नाही, प्रसंगी कायदा बदला तरी चालेल असे सांगितले.
कोणकोणचे आमदार विजय पै खोत यांनी सीआरझेड कारवाई करताना, "ग्लोबल वॉर्मिंग'मुळे किनाऱ्याकडे सरकत जाणाऱ्या समुद्राचा आणि त्यामुळे बदलणाऱ्या भरती रेषेचाही विचार करा अशी सूचना केली. भरती रेषेमुळे अनेक ठिकाणी किनाऱ्यांची धूप होऊन पूर्वी समुद्रापासून दूर वाटणारी घरे आता पाण्याच्या अगदी जवळ पोचली आहेत, असे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. त्यावर पूर्वीच्या नकाशांनुसारच काय ती कारवाई होणार असल्याचे पर्यावरण मंत्री आलेक्स सिकेरा यांनी सांगितले.
गोव्यावर येऊ घातलेल्या या संकटावर तोडगा काढण्यासाठी यापूर्वी सर्वपक्षीय शिष्टमंडळ दिल्लीला नेण्याचे ठरले होते, परंतु दिल्लीत वन आणि पर्यावरण मंत्रालयाकडून भेटीची तारीख आणि वेळ ठरत नसल्याने ते शक्य झाले नाही. मध्यंतरी मुख्यमंत्री आणि आपण दिल्ली गेलो असता, पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांच्या भेटीचा अचानकपणे योग्य आला. त्यांच्यापुढे ही समस्या मांडण्यात आली असून इथल्या एकंदर स्थितीची स्वतः पाहणी करण्यासाठी जयराम रमेश येत्या चार - पाच दिवसांत गोव्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी यावेळी सांगितले.
किनारी राज्यांसाठी दुसरे संकट ठरू पाहणारा कोस्टल मॅनेजमेंट झोन (सीएमझेड) ची अधिसूचना आपोआप रद्दबातल ठरण्याची तरतूद झालेली आहे. सीएमझेडला सगळ्यांचाच विरोध असल्याने तो रद्द होणार, परंतु सीआर झेड अंतर्गत उद्भवलेली न्यायालयीन कारवाईची समस्या कशी काय सोडवता येईल याचा विचार करावा लागणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.
दरम्यान, सीआरझेड अंतर्गत सुमारे ८००० घरांना नोटिसा पाठविण्यात आल्या असल्या तरी त्यातील २५०० घरे भरती रेषेपासून २०० मीटर अंतरावर आहेत, ४५५३ घरे २०० मीटर ते ३०० मीटरवर आहे व बाकीची घरे ३०० ते ५०० मीटरवर असल्याचे मंत्री सिकेरा यांनी सांगितले.

Thursday, 30 July 2009

रवींनी राजीनामा द्यावा

मूर्तिभंजनप्रकरणी आक्रमक आंदोलकांची मागणी

पणजी, दि. २९ (प्रतिनिधी) - राज्यात होत असलेल्या मूर्तिभंजन प्रकरणांचा तपास लावण्यास शासनाला पूर्णपणे अपयश आल्याने याची नैतिक जबाबदारी स्वीकारून गृहमंत्री रवी नाईक यांनी त्वरित राजीनामा द्यावा, अशी जोरदार आज शेकडो हिंंदूंनी केली.
विधानसभेवर मोर्चा घेऊन जाणाऱ्या आंदोलनकर्त्यांना मांडवी पुलानजीक अडवल्याने पोलिस व आंदोलनकर्त्यात बराच तणाव निर्माण झाला. यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत काही महिला पोलिस रस्त्यावर पडल्या तर, मोर्चातील महिलांनाही दुखापत झाली. मात्र पोलिसांच्या विरोधाला न जुमानता "हर हर महादेव'ची घोषणा देत काही पोलिसांची मानवी साखळी तोडून आंदोलक महिला पुढे गेल्या.यावेळी त्यांच्यावर काबू मिळवण्यासाठी पोलिसांना "आयआरबी'च्या महिला पोलिसांची मदत घ्यावी लागली. यावेळी झालेल्या झटापटीनंतर जमावातील घनश्याम गावडे याला पोलिस अटक करून घेऊन गेल्याने तणाव अधिक भडकला. त्याला त्वरित सोडून देण्याची मागणी घेऊन जमावाने जुन्या मांडवी पुलावरील वाहतूक पूर्णपणे रोखली.त्यामुळे काही काळ वाहतुकीची बरीच कोंडी झाली.
मोर्चावर ताबा मिळवण्यासाठी उत्तर गोवा पोलिस अधीक्षक बॉस्को जॉर्ज, उपअधीक्षक गजानन प्रभुदेसाई, निरीक्षक संदेश चोडणकर, निरीक्षक फ्रान्सिस्को कॉर्त, उपनिरीक्षक तुषार लोटलीकर तसेच उपविभागीय न्यायदंडाधिकारी शाबाजी शेट्ये व अतिरिक्त मामलेदार सुधीर केरकर उपस्थित होते. अखेर आंदोलकातील पाच जणांच्या शिष्टमंडळाला निवेदन सादर करण्यास मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याची परवानगी देण्यात आली. या शिष्टमंडळाने रवी नाईक यांच्याकडून त्वरित गृहमंत्रिपद काढून घेण्याची मागणी करीत मूर्तिभंजन प्रकरणात यापूर्वी अटक करण्यात आलेले संशयित आरोपी रियाझ शेख व अल्ला बक्ष यांची नार्को चाचणी करण्याची मागणी केली.
दुपारी ४ वाजता पणजी बसस्थानकावरील मारुती मंदिराच्या समोर नारळ वाढवून मोर्चाला सुरुवात करण्यात आली. यावेळी भारतीय जनता पक्षाचे आमदार राजेश पाटणेकर व मिलिंद नाईक यांनी उपस्थिती लावून आपला पाठिंबा दर्शविला. मोर्चाच्या सुरुवातीला सरकारच्या विरोधात आणि हर हर महादेवच्या जोरदार घोषणा देऊन संपूर्ण परिसर दणाणून सोडला. त्यानंतर विधानसभेवर मोर्चा जात असताना सुरुवातीलाच बसस्थानकाच्या प्रवेशद्वारावरून मोर्चा अडवण्यात आला.यावेळी पोलिसांनी आंदोलकांना जुन्या मांडवी पुलावर जाण्यास सांगितले. आंदोलक त्याठिकाणी पोचताच त्यांच्यावर "वरुण' या पाण्याच्या बंबाने मारा करून जमाव पांगवण्याची तयारी पोलिसांनी ठेवली होती. परंतु, या बंबाने ऐनवेळी दगा दिल्याने जमावाला काबूत आणण्यासाठी पोलिसांना बरीच कसरत करावी लागली.
राज्यात होत असलेल्या मूर्तिभंजनांबद्दल गृहमंत्री अद्याप शांत असल्याने त्यांनी त्वरित राजीनामा द्यावा, अशी जोरदार मागणी आज हिंदू जनजागृती समितीने केली. १४ वर्षांपासून राज्यात २८ हिंदू देवतांच्या मूर्तीची मोडतोड झाली आहे. गेल्या दोन वर्षात या प्रकाराला ऊत आला असून मूर्तिभंजकांना पकडण्यास पोलिस असमर्थ ठरल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी गेलेल्या शिष्टमंडळात हिंदू जनजागृती समितीचे जयेश थळी, सनातन संस्थेच्या राजश्री गडेकर, हिंदू महासभेचे प्रसाद जोशी, दिव्य जागृती ट्रस्टचे निवृत्त कॅ. दत्ताराम सावंत व शिवसेनेचे नामदेव नाईक यांचा समावेश होता.

"वरुण' झाला फुस्स!
मोर्चावर काबू मिळवण्यासाठी जमावावर पाण्याचा मारा करून जमाव पांगवण्यासाठी त्याठिकाणी ठेवलेल्या "वरुण' या खास बंबाने ऐनवेळी दगा दिल्याने पोलिसांची बरीच धावपळ झाली. मोर्चा सुरू होण्यापूर्वी दुपारी २ वाजता या बंबाची पोलिसांनी चाचणी घेतली होती. त्यावेळी या बंबातून पाण्याचा मारा होत होता. मात्र ज्यावेळी आंदोलक पुलावर नियंत्रणाबाहेर गेले,त्यावेळी मात्र या बंबाने पोलिसांना दगा दिला.
बॉस्को जॉर्ज
या जमावावर लाठीमार करण्यात आला आहे का, असा प्रश्न उत्तर गोवा पोलिस अधीक्षक बॉस्को जॉर्ज यांना काही पत्रकारांनी विचारले असता, त्यांच्यावर लाठीहल्ला केला असता तर, सर्व श्रेय त्यांना गेले असते. मी याठिकाणी येणेही माझ्या प्रतिष्ठेला न शोभणारे आहे, असे उद्गार त्यांनी काढले.

नापीक जमिनीवर क्रीडानगरी उभारा

पेडणेवासीय तिखट स्वाभिमानी - पर्रीकर
पणजी, दि. २९ (प्रतिनिधी)- धारगळ येथे क्रीडानगरी साकारलेली सर्वांनाच हवी आहे; पण त्यासाठी येथील शेतकऱ्यांना वेठीला धरणे चुकीचे आहे. पेडणेवासीय हे तिखट स्वाभिमानी लोक आहेत व त्यांचा स्वाभिमान विकत घेता येणार नाही. शेतकऱ्यांची जमीन वगळून त्या बदल्यात आजूबाजूला असलेली नापीक जमीन घेणे शक्य आहे. क्रीडामंत्र्यांनी विनाकारण यावरून तेढ निर्माण न करता सामंजस्याने व चर्चेव्दारे हा विषय निकालात काढावा आणि सर्वांना विश्वासात घेऊन धारगळ मतदारसंघातच हा प्रकल्प उभारावा, असे आवाहन विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी केले.
आज विधानसभेत क्रीडा, पंचायत, वीज, पर्यावरण आदी खात्यांच्या पुरवणी मागण्यांवरील चर्चेवेळी ते बोलत होते.धारगळ येथे येणाऱ्या क्रीडानगरीत अडीच हजार प्रेक्षागृहाचे कन्व्हेंनशन सेंटर, चारशे व तीनशे खोल्यांची पंचतारांकित हॉटेल्स, पन्नास हजार लोकांची क्षमता असलेला बहुउद्देशीय स्टेडियम, शॉपिंग मॉल, मल्टिप्लेक्स आदी प्रकल्प उभे राहणार आहेत. मुळात या अतिरिक्त प्रकल्पांसाठी शेतजमीन हवीच कशाला? त्यासाठी जवळपास दुसरी जमीन घेता येणे शक्य आहे, असे पर्रीकर म्हणाले.
आर्थिकदृष्ट्या फायदेशीर नसलेल्या प्रकल्पाकरिता "पीपीपी' साठी कोणीही कंपनी पुढे येणे शक्य नाही. पेडणे येथे राष्ट्रीय महामार्गावर पर्यटन खात्यातर्फे यात्री निवास बांधले आहे. तेथे कुणी येत नाही. मग धारगळ गावात या प्रकल्पांचा कोण वापर करणार,अशी माहितीही पर्रीकर यांनी दिली. याप्रकरणी क्रीडामंत्र्यांनी विनाकारण प्रतिष्ठेचा विषय न करता त्यावर सामंजस्याने तोडगा काढावा,असा सल्लाही पर्रीकरांनी दिला.
वीजचोरीची प्रकरणे
आतापर्यंत १८४ वीजचोरीची प्रकरणे सरकारकडे दाखल झाली आहेत; पण एकाही व्यक्तीवर कारवाई करण्यात आली नाही, यावरून वीजचोरीचा गुन्हा पचतो,असाच संदेश लोकांपर्यंत पोहोचणार असल्याचे पर्रीकर म्हणाले.दक्षिण गोव्यात यंदा वीज खंडित होण्याचे प्रमाणे ६० टक्क्यांनी वाढले आहे. ५ लाख ७० हजार घरगुती वीजजोडण्या असताना केवळ ४५० वीज बिलविषयक कर्मचारी आहेत. त्यातील १०८ कर्मचाऱ्यांना इतर काम दिले आहे. वीजबिले वेळेत मिळत नसल्यानेच थकबाकी वाढत आहे,अशी टीकाही पर्रीकर यांनी केली. खात्यात निर्णय घेणारे सगळे अधिकारी सेवावाढ तत्त्वावरील असल्याने त्यांच्याकडून मुकाट्याने मंत्र्यांचे आदेश पाळले जातात व त्याव्दारेच काहीही अभ्यास न करता "सीएफएल' बल्ब खरेदी करण्यात आले,असा आरोप त्यांनी केला.
मोरजी येथे एका माफियाशी संबंध असलेल्या बिदेशी कंपनीकडून किनारी नियमन विभागाचे उल्लंघन करून बांधकाम सुरू असून त्यास राजकीय आश्रय मिळाल्याचा आरोप पर्रीकर यांनी केला."एमपीटी'कडून मनमानी कारभार सुरू असून त्यांच्याकडून सरकारला गृहीत धरले जाते. कोळसा वाहतुकीमुळे प्रदूषण वाढत असून पर्यावरण खाते मूग गिळून गप्प आहे. मुळात हे सरकार सध्या काहीच करीत नसून अप्रत्यक्षात न्यायालयच सरकार चालवते की काय,अशीच दारूण स्थिती निर्माण झाल्याचे पर्रीकर म्हणाले.
केंद्र सरकारने आदर्श पंचायत कायद्याचा आराखडा राज्य सरकारला पाठवला आहे, त्यामुळे पंचायत कायद्यात दुरुस्ती करण्याचा विचार सरकारने सोडून द्यावा,अशी माहितीही पर्रीकर यांनी दिली.पंचायत कर्मचाऱ्यांना सहावा वेतन आयोग लागू करण्याचे आश्वासन सरकारने दिले असून ते पूर्ण करावे,अशी मागणी पर्रीकरांनी केली.

"ती' साथ चिकुनगुनियाचीच - विश्वजीत

पणजी, दि. २९ (प्रतिनिधी) ः रिवण तसेच कावरेपिर्ल भागात उद्भवलेली आजाराची साथ ही चिकुनगुनियाचीच असल्याचे मान्य करून हा आजार अधिक फैलावू नये यासाठी सरकारी पातळीवर तातडीची उपाययोजना केली जात असल्याची माहिती आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी आज विधानसभेत दिली. सांग्याचे आमदार वासू मेंग गावकर यांनी शून्य प्रहराला या विषयाकडे सभागृहाचे लक्ष वेधले. हा गंभीर स्वरूपाचा आजार असून तो रोखण्यासाठी त्वरित उपाय न योजल्यास तो आसपासच्या परिसरातही फैलावण्याची भीती गावकर यांनी यावेळी व्यक्त केली. तथापि, तो चिकनगुनियाच असून खाण मजुरांमुळे त्याचा संसर्ग सुरू झाल्याचे आरोग्यमंत्री म्हणाले.
गोव्यात चिकुनगुनियाचा पहिला रूग्ण या वर्षी जानेवारी - फेब्रुवारी महिन्यात कांदोळी येथे आढळला होता. त्यानंतर आता सांगे - केपे परिसरात ही साथ आढळून आली. मात्र ही साथ रोखण्यासाठी वेळीच उपाय योजण्यात आले आहे. संशयितांचे रक्ताचे नमुने गोळा करणे, रुग्णांना औषधोपचार पुरवणे, विविध भागांचे सर्व्हेक्षण करणे, रुग्णांची यादी तयार करणे आदींचा त्यात समावेश असल्याचे आरोग्यमंत्री म्हणाले.

गोव्यात अजूनही १७९४३ घरे अंधारात


आमदार दामोदर नाईक यांची माहिती

पणजी, दि. २९ (प्रतिनिधी)- डिजिटल मीटर खरेदी प्रकरणात गौडबंगाल असून त्याची चौकशी व्हावी, अशी मागणी करताना फातोर्ड्याचे आमदार दामोदर नाईक यांनी राज्यात अजूनही १७९४३ घरे अजूनही काळोखात असल्याची माहिती दिली. या घरांना अजूनही वीज जोडणी मिळालेली नसल्याचे त्यांनी सांगितले.
आज विधानसभेत वीज खात्याच्या पुरवणी मागणीवरील चर्चेत बोलताना त्यांनी ही माहिती दिली. सरकारने १,२१,३२५ जणांना डिजिटल मीटर दिले आहेत व याप्रकरणी एकूण ४,१२८ तक्रारी दाखल झाल्या आहेत. सामान्य वीज ग्राहकांना दिलासा देण्याच्या निमित्ताने काढलेली एकरकमी योजना ही निव्वळ तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार असल्याची टीकाही श्री. नाईक यांनी केली. सामान्य लोकांवर कारवाईचे आदेश व वीजभक्षकांच्या वसुलीसाठी मात्र काहीही नाही, हा काय प्रकार आहे, असा सवालही यावेळी श्री. नाईक यांनी केला.
वीज खंडीत होण्याच्या प्रकारांत दिवसेंदिवस वाढ होत आहे, हे कशाचे संकेत आहेत? सोनसड्यावरील कचऱ्यामुळे भूजलप्रदूषणाची समस्या निर्माण झाली असून प्रदूषण नियंत्रण मंडळाने अद्याप त्याचा तपास केला नाही. कचऱ्याचा विषय गंभीर बनत चालला असून पर्यावरण खात्याने तात्काळ दखल घेण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले. किनारी भागातील घरांवरील किनारी नियमन विभाग कायद्याची टांगती तलवार हटवण्यासाठी एकत्रित प्रयत्न व्हायला हवेत, असे आमदार दयानंद मांद्रेकर म्हणाले. शिवोली मतदारसंघात विजेच्या लपंडावामुळे जनता हैराण झाली आहे. या मतदारसंघातील किनारी भागांत भूमिगत वाहिन्या टाकण्याचे काम कुठे पोहोचले, असा सवालही त्यांनी केला. रिलायन्स एनर्जी कंपनी आपला विस्तार करीत असून त्यांची महाग वीज यापुढे सरकारने विकत घेण्याची हमी देऊ नये, असे नार्वेकर म्हणाले. सुरळीत वीज पुरवण्यासाठी ५० टक्के वीज उपकरणे त्वरित बदलण्याची गरज आहे, असेही नार्वेकर म्हणाले. शिरोडा मतदारसंघात माणके, शिरशिरी, निरंकाल व बोरी भागांत लोकांना विजेच्या समस्येने ग्रासले आहे, असे आमदार महादेव नाईक म्हणाले. सरकारला हिंमत असेल तर त्यांनी उद्योगांसाठी असलेले विजेसाठीचे अनुदान रद्द करून दाखवावे, असे आव्हान उपसभापती मावीन गुदिन्हो यांनी केले. डिचोली येथील औद्योगिक वसाहतीत येथील उद्योगांना सक्तीने वीज कपात करण्याचे आदेश दिल्याचे आमदार राजेश पाटणेकर यांनी सांगितले. गणेश चतुर्थीचा सण जवळ येत असल्याने मंत्र्यांनी १५ दिवस अगोदरच विजेचे सामान द्यावे जेणेकरून ते वेळेत बसवणे शक्य होईल, अशी मागणी आमदार विजय पै खोत यांनी केली. याप्रसंगी व्हिक्टोरिया फर्नांडिस, दिलीप परूळेकर, वासुदेव मेंग गावकर, मिलिंद नाईक आदींनी चर्चेत भाग घेतला.

क्रीडा खात्यातील अनागोंदीवर तवडकर यांनी डागली तोफ

पणजी, दि.२९ (प्रतिनिधी) - क्रीडाखात्याच्या संचालिकेकडून सध्या मनमानी कारभार सुरू असून खात्याच्या व्यवहारांत अनेक भानगडी दडलेल्या आहेत. क्रीडामंत्र्यांनी या भानगडींची चौकशी करून संचालिकेवर कारवाई केली नाही तर अन्य कायदेशीर मार्गाने न्याय मिळवला जाईल,असा इशारा पैंगीणचे आमदार रमेश तवडकर यांनी दिला.
आज क्रीडाखात्याच्या पुरवणी मागण्यांवरील चर्चेत आमदार तवडकर यांनी क्रीडा खात्यातील अनागोंदी कारभारावर सडकून टीका केली. खात्याकडून विविध संस्थांना देण्यात येणाऱ्या सहाय्यनिधीच्या यादीत हिंदू संस्थांची नावेच नाहीत,अशी टीका करून क्रीडा संचालिका आपल्या मर्जीप्रमाणे लोकांना क्रीडायोजनांची खैरात करीत असल्याचा आरोपही यावेळी तवडकर यांनी केला. राष्ट्रकुल स्पर्धा अजून व्हायचाच आहेत पण त्यासाठी आत्ताच एक वाहन भाडेपट्टीवर घेण्यात आले आहे व त्या वाहनाचा वापर न करताच त्याला भाडे देण्यात येत आहे,असेही श्री.तवडकर यांनी उघडकीस आणले. शारीरिक शिक्षण पद्धतीकडे खात्याचे पूर्णपणे दुर्लक्ष होते आहे. काणकोणातील एक शारीरिक शिक्षक काहीही काम न करता सरकारी पगार घेत असल्याचा प्रकारही त्यांनी उघडकीस आणला. विविध ठिकाणी नेमण्यात आलेल्या "एपीओ' कडून वर्षाकाठी एक किंवा दोन पाहणी करण्यात येतात. क्रीडा खात्याच्या संचालिका सकाळी कधीच कार्यालयात उपस्थित राहत नाहीत,असा आरोपही त्यांनी केला. क्रीडा खात्याअंतर्गत अनुसूचित जमाती उपआराखड्यात तरतूद केलेल्या रकमेचाही वापर होत नसल्याने हा विषय मंत्र्यांनी गांभीर्याने न घेतल्यास अन्य मार्गाने न्याय मिळवण्याचा इशाराही यावेळी आमदार तवडकर यांनी दिला.
धारगळ येथील क्रीडानगरी प्रकरणी सभागृह समिती नेमून या समितीला १५ दिवसांच्या आत आपला अहवाल सादर करण्यास सांगण्याची विनंती आमदार लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी केली. क्रीडामंत्र्यांनी विनाकारण हा विषय प्रतिष्ठेचा न बनवता सामंजस्याने व चर्चेव्दारे त्यावर तोडगा काढावा,असा सल्लाही त्यांनी दिला. मागील पाच वर्षात जाहीर करूनही एकूण ७४३ खेळाडूंना अद्याप बक्षिसे दिलेली नाहीत,अशी माहिती आमदार फ्रान्सिस डिसोझा यांनी दिली. युवा पुरस्कार, जिवबादादा केरकर पुरस्कारांचे वितरण गेल्या पाच वर्षांपासून केलेच नाही,असेही ते म्हणाले. धारगळ येथील शेतीची जमीन वगळून क्रीडानगरी प्रकल्प अवश्य उभारावा,असेही ते म्हणाले. संतोष हरिजन या मुष्टियुद्धाला मदत देण्यास सरकारकडून हयगय केली जात असल्याचा आरोपही श्री.डिसोझा यांनी केला. कुंभारजुवे मतदारसंघात एक व्यायामशाळा व एका क्रीडामैदानाचे काम पूर्ण होऊन मंत्र्यांकडून अद्याप उद्घाटनाची तारीख मिळत नसल्याने येत्या १५ ऑगस्टपूर्वी तारीख मिळाली नाही तर जनतेला घेऊन त्याचे उद्घाटन केले जाईल,असा इशारा आमदार पांडुरंग मडकईकर यांनी दिला. आमदार दयानंद मांद्रेकर यांनी आसगाव क्रीडामैदानाचे काम तात्काळ मार्गी लावावे,अशी मागणी केली. सरकारने जाहीर केलेला समुद्री सेतू येईपर्यंत अजून वेळ आहे तोपर्यंत त्यासाठी तरतूद केलेली शंभर कोटींची रक्कम राज्यातील विविध क्रीडा पायाभूत सुविधा उभारण्यासाठी वापरावी,असे आमदार दयानंद नार्वेकर म्हणाले.क्रीडा धोरण तयार असताना मंत्रिमंडळाची त्याला अद्याप मान्यता का मिळत नाही हेच कळेनासे झाले आहे,असा टोलाही त्यांनी यावेळी हाणला.शिरोड्याचे क्रीडामैदान अन्य कुणाला देण्याचा प्रयत्न झाल्यास येथील लोक गप्प बसणार नाही,असा इशारा आमदार महादेव नाईक यांनी दिला. गेल्या २००१ साली विधानसभेत ठराव संमत करूनही युवा खेळाडू सिरील पाशेको याच्या नावाने पुरस्कार देण्याची घोषणा करूनही त्याची पूर्तता झाली नसल्याने उपसभापती मावीन गुदीन्हो यांनीही नाराजी व्यक्त केली. ओलीत क्षेत्र व शेतकऱ्यांची जागा वगळून हमखास क्रीडानगरी उभारा,असे आवाहन आमदार व्हिक्टोरिया फर्नांडिस यांनी केले.यावेळी आमदार श्याम सातार्डेकर,मिलिंद नाईक,दिलीप परूळेकर,प्रताप गांवस,विजय पै खोत,राजेश पाटणेकर,वासुदेव मेंग गावकर,बाबू कवळेकर,दामोदर नाईक आदींनी चर्चेत भाग घेतला.
कारवाई करणार - बाबू
क्रीडा संचालिकेवर तवडकर यांनी केलेले आरोप गंभीर स्वरुपाचे असून त्याची दखल घेऊन आपण योग्य की कारवाई करणार असल्याचे क्रीडामंत्री बाबू आजगावकर यांनी चर्चेला उत्तर देताना सांगितले.

Wednesday, 29 July 2009

झाडे आणि शेतजमिनीच्या हानीचे अद्याप सर्वेक्षण नाही

मंत्र्यांची कबुली
क्रीडानगरीप्रश्नी विधानसभेत खडाजंगी

पणजी, दि.२८ (प्रतिनिधी) - पेडणे तालुक्यात क्रीडानगरी होण्यास आपला विरोध नाही, तथापि शेतकऱ्यांच्या पोटावर पाय ठेवून धारगळ येथे सध्याच्या जागी कोणताही प्रकल्प उभारण्यास तीव्र विरोध करू, असा इशारा पेडणे तालुक्यातील आमदार दयानंद सोपटे आणि लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी आज या विषयावरील खास चर्चेवेळी विधानसभेत दिला. या प्रकल्पामुळे किती झाडे उद्ध्वस्त होतील अथवा किती सुपीक जमीन या प्रकल्पाखाली जाईल, याबद्दल कोणतेही सर्वेक्षण अद्याप करण्यात आलेले नाही, असे क्रीडामंत्री बाबू आजगावकर यांनी सांगितल्यामुळे विरोधकांनी तीव्र संताप व्यक्त केला.
चर्चेस सुरवात करताना प्रा. पार्सेकर यांनी नियोजित क्रीडानगरीतून १० लाख चौरस मीटर जागा वगळण्यात आली आहे, हे मुख्यमंत्रांनी काल केलेले निवेदन चुकीचे असल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. पहिल्यांदा १८,१९,५२० चौरस मीटर जागा ताब्यात घेण्याचे ठरले होते, संपादनावेळी प्रत्यक्षात १३,२६,८७५ चौरस मीटर जागा घेण्याचा इरादा सरकारने स्पष्ट केला आहे, त्यामुळे १० लाख जमीन वगळण्यात आल्याचा दावा खरा नाही, असे सांगून पार्सेकर यांनी आकडेवारीसह माहिती देताना, ३.९८ कोटी रुपये तिळारीच्या नाल्यावर खर्च झाले असून, ओलित क्षेत्राची ६० टक्के जागा या क्रीडानगरीखाली जाईल, असे स्पष्ट केले. म्हसकोंड, लाडाचा व्हाळ, कुंभारखण, कुळण आदी भाग क्रीडानगरीसाठी वापरला जाणार असून, या भागांच्या नावावरूनच तेथील जमीन सुपीक असल्याचे स्पष्ट होते, असे पार्सेकर म्हणाले. कुळण येथे तर दरवर्षी ५०० खंडी भाताचे पीक घेतले जाते,असे सांगून पार्सेकर यांनी हजारो काजू, आंबा व जंगली झाडांची कत्तल करून क्रीडानगरी उभारण्यास तीव्र विरोध केला.
पार्सेकर व सोपटे विनाकारण क्रीडानगरीस विरोध करीत आहेत, असा समज पसरवण्याचा बाबू आजगावकरांचा प्रयत्न निषेधार्ह आहे असे सांगून पेडण्याचे आमदार दयानंद सोपटे यांनी आपण दोघे पेडण्याचे सुपुत्र आहोत, असे आजगावकर यांना सुनावले.
झाडांचा बळी घेऊन क्रीडानगरी उभारण्याचे प्रयोजन काय, असा प्रश्न सोपटे यांनी उपस्थित केला. पेडण्यात अन्यत्र २० लाख चौरस मीटरपर्यंत जागा उपलब्ध होऊ शकते, मग धारगळचाच अट्टाहास का, असे विचारले. पेडण्यातील किती जणांना रोजगार देणार त्याची माहिती आजगावकरांनी द्यावी, असे आव्हान त्यांनी दिले. पार्सेकर व सोपटे बोलत असताना, बाबू आजगावकर यांनी मध्येच उठून हे दोघेही पेडणेविरोधी असल्याचा आरोप करून काही सांगण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी सभापतींनी त्यांना खाली बसण्याचा आदेश दिला. आपल्या मंत्र्यांना आवरा, असेही प्रतापसिंग राणे यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांना सांगितले.
पेडण्याचा विकास आपणच करीत असल्याचा दावा करून, गेली अनेक वर्षे दुर्लक्षित राहिलेल्या पेडण्याचा कायापालट करण्यासाठी क्रीडानगरी उभारण्याची गरज असल्याचा दावा बाबू आजगावकर यांनी चर्चेला उत्तर देताना केला. किती झाडे आणि शेतजमीन या प्रकल्पाखाली जाईल, याची माहिती सध्या आपल्याकडे उपलब्ध नाही, अशी कबुली आजगावकर यांनी दिली. पंधरा दिवसांत सर्वेक्षण करून ही आकडेवारी आपण देऊ, असे ते म्हणाले.
नेवरा आणि कालापूर येथे पुरेशी जमीन मिळाली नाही अथवा तेथे अनेक अडचणी आल्याने अखेर आपण धारगळची निवड केली असून, क्रीडासंचालकांसह या क्षेत्रातील अन्य तज्ज्ञांनी या जागेस मान्यता दिल्याचे आजगावकर यांनी सांगितले. जाईल तेथे अडचणी येत राहिल्याने जागा बदलण्याचे सत्र किती दिवस चालवायचे असे ते म्हणाले. क्रीडाप्रकल्पाद्वारे पर्यटनास चालना देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. आपण कोणत्या नोकऱ्या देणार आहोत, याची जंत्री आजगावकर यांनी वाचण्यास सुरवात केली, त्यावेळी सार्वजनिक खाजगी सहभाग ("पीपीपी') असताना नोकऱ्या देण्याचे सर्व अधिकार सरकारजवळ नसतील, असे विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिले. खाजगी क्षेत्रातील उद्योजकांना क्रीडानगरीत उपक्रम चालविण्यास देण्यात येणार असल्याने १३०० रोजगार देणार असल्याचा आजगावकरांचा दावा खोटा असल्याचे यावेळी मनोहर पर्रीकर यांनी सांगितले.

धावेत खाण नाही

राज्यात बेकायदा खाणींना थारा नाही - मुख्यमंत्री
पणजी, दि. २८ (प्रतिनिधी) - राज्यात बेकायदा खाणींना कोणत्याही प्रकारे थारा दिला जाणार नसल्याचे स्पष्ट करतानाच धावे तसेच पश्चिम घाट परिसरातील तत्सम भागात कोणत्याही स्थितीत खाणी सुरू करू दिल्या जाणार नाहीत, असा स्पष्ट निर्वाळा मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी आज विधानसभेत दिला. अनुदान मागण्यांच्या वेळी विरोधकांनी उपस्थित केलेल्या खाणविषयक मुद्यांना मुख्यमंत्री उत्तर देत होते. बेकायदा खाणींमुळे उद्भवणाऱ्या समस्या लक्षात घेऊन राज्याचे खाणविषयक धोरण निश्चित झाल्याशिवाय यापुढे कोणत्याही नव्या खाणीला परवानगी (लीज) दिली जाणार नसल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
खाण व्यवसायात उद्भवलेल्या बेकायदा वृत्तींसदर्भात बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, पूर्वी गोव्यातील कमी दर्जाचा खनिज माल कोठेही उचलला जात नव्हता. त्यामुळे नव्या लोकांना या व्यवसायाचे आकर्षण नव्हते. तथापि, गेल्या तीन चार वर्षापासून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत व प्रामुख्याने चीनच्या बाजारपेठेत कमी दर्जाच्या खनिजाला मागणी येऊ लागल्याने अनेक लोक या व्यवसायात घुसले आणि तेथे गैरप्रकार सुरू झाले. काही लोकांनी तर भलत्याच्याच खाणीतील खनिज बिनदिक्कत काढून ते विकण्याचाही उद्योग सुरू केला. त्यासंदर्भात मूळ खाण मालकांनी खाण खात्याकडे तक्रारीही दाखल केल्या आहे. या व्यवसायातील "ट्रेडिंग'मध्ये अनेक नवे लोक घुसले, त्यामुळे तिथले गैरप्रकार रोखण्यासाठी सरकारने प्रत्येक कंत्राटदाराला खाण खात्याकडे अधिकृत नोंदणी करण्याचे बंधन घातले आहे. एवढेच नव्हे तर माल कोठून आणला याची सविस्तर माहिती देण्याचे बंधनही त्या कंत्राटदारावर घालण्यात आले आहे. सध्या गोव्यात अशाप्रकारचे २६४ अधिकृत कंत्राटदार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. सरकारने बेकायदा खाण व्यवसाय रोखण्यासाठी खाण विषयक विशेष समितीही स्थापन केली आहे. या समितीने केलेल्या तपासणीअंतर्गत किमान चार - पाच खाणी पूर्ण बेकायदा असल्याचे आढळून आले आहे. सरकार त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाईही करत असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.
राज्याचे स्वतःचे खाण धोरण लवकरच अस्तित्वात येणार असल्याचे सांगून गोव्याच्या हितासाठी राज्याचे खाण धोरण असणे अत्यंत गरजेचे असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

बेकायदा खाणींचे गंभीर परिणाम - पर्रीकर

पणजी,दि.२८ (प्रतिनिधी)- धावे ब्रह्मकरमळी येथे खाण सुरू झाल्यास सत्तरी तालुक्याच्या नैसर्गिक संपत्तीची कायाच संपेल, अशी भीती विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी आज व्यक्त केली. सदर नियोजित जागा म्हादई अभयारण्य क्षेत्रातच येते व इथे वन खात्याची जमीनही आहे. खोटी कागदपत्रे गोळा करून या खाणीला विविध परवाने मिळवण्यासाठी सरकारच्या डोळ्यांत धूळफेक केली जात असल्याचा आरोपही पर्रीकर यांनी यावेळी केला.
आज विधानसभेत खाणींच्या विषयावरून पर्रीकर यांनी अभ्यासपूर्ण भाषण केले. पर्रीकर यांनी उपस्थित केलेल्या मुद्यांवरून राज्यात बेकायदा खाणींमुळे अनेक संकटे उभी राहिली आहेत व ती वेळीच आटोक्यात आणली नाही तर त्याचे गंभीर परिणाम राज्याला भोगावे लागणार आहेत. खाण सुरू करण्यासाठी केंद्र सरकारकडून देण्यात येणारा पर्यावरण परवाना देण्याच्या प्रक्रियेत अनेक भानगडी असल्याचे यावेळी पर्रीकर यांनी सांगितले. जलस्त्रोत्रमंत्री फिलीप नेरी रॉड्रिगीस हे आपण याप्रकरणी काहीच करू शकत नाही, असे सांगतात पण केंद्रीय पाटबंधारे कायद्याअंतर्गत नदीचे किंवा पाटाचे पाणी प्रदूषित करण्यांवर कारवाईची तरतूद आहे, हे त्यांना माहीत नाही, असेही पर्रीकर यांनी उघड केले.
२००४ साली राज्यात ७० खाणी होत्या. आता २००९ मध्ये हा आकडा ११५ वर पोहोचला असून त्यातील ५८ खाणी केवळ एका सांगे तालुक्यात कार्यरत आहेत, अशी माहितीही पर्रीकर यांनी दिली. खाण उद्योजकांकडून महसूल प्राप्तीचे अनेक प्रयत्न सरकारने केले पण ते अयशस्वी ठरले, असा टोलाही पर्रीकर यांनी हाणला. मुख्यमंत्र्यांनी यावेळी टाकाऊ खनिजावर ३० रुपये प्रतिटन कर आकारण्याची घोषणा केली खरी पण टाकाऊ खनिजालाही मोल असल्याने त्याची वसुली सरकार कशी करणार याबाबत मात्र शंका आहे, असे पर्रीकर म्हणाले.
गोव्यातील खाण उद्योगामुळे केंद्राला मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळते. मुळात या उद्योगामुळे गोव्याच्या संपत्तीचा नाश होत असल्याने या उद्योगाचा मोठा वाटा कायदेशीररीत्या राज्याला मिळण्यासाठी केंद्रावर दबाव टाकावा, असा सल्लाही पर्रीकर यांनी दिला. आंबेली येथे फोंडास्थित राजाराम नाईक यांच्याकडून बेकायदा खाण सुरू असून तिथे कारवाई करण्यास पोलिसही धजत नाहीत. या व्यक्तीला पूर्ण सरकारी आश्रय मिळाल्याचा आरोपही यावेळी पर्रीकर यांनी केला. अशा बेकायदा खाणींमुळे गोव्याचा खाण उद्योगच बदनाम झाल्याचे पर्रीकर म्हणाले. कला व संस्कृती खात्याने पैशांचा खर्च करताना काळजी घेण्याची गरज आहे, असे सांगून मडगावचे नगराध्यक्ष साव्हियो कुतिन्हो यांच्या एका संस्थेला अशीच मदत दिली असता त्याचा नियोजित कामासाठी वापर झाला नसल्याने एकाने न्यायालयात धाव घेतली. यावेळी न्यायालयाने उपस्थित केलेल्या मुद्यांनुसार या पैशांचा गैरवापर झाल्याने ती वसूल करण्याचे आदेशही दिल्याची माहिती त्यांनी दिली. सरकारने सेझ रद्द केले पण जमीन ताब्यात घेण्यासाठी मात्र काहीही प्रयत्न केले नाहीत. हस्तकला महामंडळाला हस्तकलेचाच विसर पडल्याचे पर्रीकर म्हणाले. पाटोची परिस्थिती अत्यंत दयनीय बनली असून ती सुधारण्याची गरज आहे, असेही पर्रीकर म्हणाले. गोवा पायाभूत सुविधा विकास महामंडळाकडून सुरू असलेल्या अनेक प्रकल्पांना आर्थिक तरतूदच नसल्याने हे प्रकल्प प्रत्यक्षात उतरणार कसे, असा सवालही त्यांनी केला. दोनापावला ते वास्को या समुद्री पुलाच्या प्रस्तावाचे स्वागत करून हा प्रकल्प आर्थिक दृष्ट्या सक्षम केल्यासच तो प्रत्यक्षात उतरू शकतो. हा पुल राष्ट्रीय महामार्गाला जोडल्यास मोठे कंटेनर व इतर वाहतूक यामार्गे वळवल्यास या पुलाला आर्थिक महत्त्व येईल व त्यामुळे तो बांधण्यासाठी कोणतीही खाजगी कंपनी पुढे येईल, असा सल्लाही पर्रीकर यांनी दिला.

मोपासाठी "कलम ६' लागू होणार

येत्या आठ दिवसांत विमानतळाच्या भूसंपादनाला वेग देणार - मुख्यमंत्री
पणजी, दि. २८ (प्रतिनिधी) - मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी येत्या सहा ते सात दिवसांत भूसंपादन अधिसूचना जारी करण्यात येणार असून त्यासाठी तातडीचे "कलम ६' लागू केले जाणार आहे अशी माहिती मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी आज विधानसभेत दिली. हळदोण्याचे आमदार दयानंद नार्वेकर यांनी प्रश्नोत्तराच्या तासाला विचारलेल्या एका तारांकित प्रश्नाला ते उत्तर देत होते. मांद्रेचे आमदार प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर तसेच विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी या चर्चेत भाग घेताना विमानतळासाठी नेमकी किती जमीन लागेल आणि ती कोणाची असेल हे सरकारने स्पष्ट करावे असा आग्रह धरला. या विमानतळाबाबत सरकारच्या धरसोडवृत्तीमुळे आतापर्यंत इतका कालावधी वाया गेला आहे की, आणखी विलंब झाल्यास हा विमानतळ गोव्याच्या हातून निसटण्याची भीती श्री. नार्वेकर यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्र सरकारने रत्नागिरी जिल्ह्याच्या पर्यटनविषयक विकासाठी ४५०० कोटींची पॅकेज जाहीर केली आहे. यात चिपळी येथे होऊ घातलेल्या विमानळाचाही समावेश आहे. त्यामुळे विमानतळाची सध्या सुरू असलेली संथ प्रक्रिया गोव्याच्या मुळावर येऊ शकते, असे श्री. नार्वेकर म्हणाले. तथापि, विमानतळ होणार हे आता निश्चित झाले आहे. "इंटरनॅशनल सिव्हिल एव्हिएशनने' दाबोळीबरोबरच मोपालाही हिरवा कंदील दाखवल्यामुळे आता विमानतळ उभारणी प्रक्रियेला वेग येईल. विद्यमान जमीन संपादन अधिसूचनेअंतर्गत प्रत्यक्ष विमानतळासाठी ७४९ हेक्टर जमीन संपादित करण्यात येणार आहे. ८४ हेक्टर जमीन जोडरस्त्यांसाठी ताब्यात घेतली जाणार असल्याचे मुख्यमंत्री कामत यांनी स्पष्ट केले. मोपाला कायम विरोध करणारे, चर्चिल आलेमाव यावेळी विरोधी भूमिका घेतील अशी अपेक्षा होती, परंतु त्यांनी मौन पाळले.
दक्षिण की उत्तर गोवा या वादात मोपा विमानतळासाठी भूसंपादनविषयक अधिसूचना दोन वर्षापूर्वी रद्दबातल ठरली. मात्र आता ही प्रक्रिया वेगाने पार पाडली जाणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. त्यावर, हा दक्षिण - उत्तर काय प्रकार आहे, या नार्वेकरांच्या खोचक प्रश्नाला मुख्यमंत्री उत्तर देऊ शकले नाहीत. संपूर्ण मोपा विमानतळ प्रकल्पासाठी एकूण किती जमीन लागेल आणि ती कोणकोणाची असेल या पार्सेकर व पर्रीकर यांनी वारंवार विचारलेल्या प्रश्नालाही ते ठोस उत्तर देऊ शकले नाहीत. त्यावर, सरकारी अधिकारीच मोपासंदर्भात अनभिज्ञ असल्याची टीका पर्रीकर यांनी केली.
मोपाबाबत एक सुकाणू समितीही नेमली जाणार आहे. या प्रकल्पाच्या उभारणीत स्थानिक पातळीवर ही समिती काम करेल. पेडण्यातील नागरिक, सरपंच तसेच स्थानिकांचा समावेश या समितीत असेल, असेही मुख्यमंत्र्यांनी उत्तरादरम्यान स्पष्ट केले.
या प्रश्नावर चर्चा सुरू असताना धारगळचे आमदार तथा क्रीडामंत्री बाबू आजगावकर व मांद्रेचे आमदार लक्ष्मीकांत पार्सेकर यांची नेहमीप्रमाणे जुंपली. मोपा सोडून सरकारला क्रीडा नगरीवरच लक्ष केंद्रित करायचे आहे का, असा खोचक सवाल पार्सेकर यांनी केला. त्यामुळे बाबू नेहमीप्रमाणे तावातावाने उठले. मात्र सभापती प्रतापसिंग राणे यांनी त्यांना खाली बसवले. बाबू म्हणाले, क्रीडा नगरी हवीच. राणे मग आवाज चढवून म्हणाले, हवी तर मग घेऊन जा. बिचारे बाबू, गुपचूप खाली बसण्यावाचून त्यांच्यापुढे पर्यायच उरला नाही.

वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी १५ हजार पोलिसांची गरज - रवी

पणजी, दि. २८ (प्रतिनिधी) - राज्यातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी राज्य पोलिस दलाची क्षमता ४५०० हजारांवरून किमान पंधरा हजार करावी लागेल, असे प्रतिपादन गृहमंत्री रवी नाईक यांनी आज विधानसभेत केले. स्थलांतरीतांच्या वाढत्या लोंढ्यांबरोबर येथे गुन्हेगारीही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिस दलाची विद्यमान ताकद कमी पडत असल्याचे ते यावेळी म्हणाले. फातोर्ड्याचे आमदार दामू नाईक यांनी प्रश्नोत्तराच्या तासाला विचारलेल्या एका तारांकित प्रश्नाला रवी नाईक उत्तर देत होते. तत्पूर्वी कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांच्या एका लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना बिगर गोमंतकीयांचे वाढते लोंढे येथे गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होण्यास जबाबदार ठरल्याचे श्री. नाईक यांनी मान्य केले.
राज्यात गेल्या तीन वर्षांत सर्वच प्रकारच्या गुन्ह्यांचे प्रमाण जवळपास ५० टक्क्यांनी वाढले असल्याचे लेखी उत्तरात स्पष्ट झाल्याचे दामू यांनी सांगितले. २००६ साली गोव्यात ४९५ चोऱ्या, १७ घरफोड्या, ६ दरोडे, २१ बलात्कार, ३८ खून, १४ खूनाचे प्रयत्न व १६ अपहरणाचे प्रकार घडले होते. २००७ साली पुन्हा ४९५ चोऱ्या, २२ घरफोड्या, ७ दरोडे, २० बलात्कार, ३३ खून, २३ खूनाचे प्रयत्न व १२ अपहरणे झाली. २००८ साली यात वाढ होऊन ६०१ चोऱ्या, २३ घरफोड्या, ३ दरोडे, ३० बलात्कार, ४९ खून, २४ खूनाचे प्रयत्न व ३६ अपहरणे झाली, अशी माहिती आज सभागृहात उपलब्ध करण्यात आली.
दामू यांनी या माहितीचाच आधार घेत गृहमंत्री रवी नाईक यांच्यावर प्रश्नांचा भडिमार केला. परंतु दरम्यानच्या काळात प्रश्नोत्तराचा तास संपल्याने "क्वेशन अवर इज ओव्हर' असे घड्याळाकडे पाहत म्हणत रवी नाईक यांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
प्रश्नोत्तराच्या तासानंतरच्या कामकाजात आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी एका लक्षवेधी सूचनेद्वारे राज्यातील वाढत्या गुन्हेगारीकडे सभागृहाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. विशेषतः चार दिवसांपूर्वी चिखली वास्को येथील तरुणाचे झालेले अपहरण आणि तत्पूर्वी म्हापशातील व्हॅन चालकाचा झालेल्या खुनाच्या घटनेचा त्यांनी उल्लेख केला. त्यावर गोव्यात स्थलांतरीतांचे वाढते लोंढे ही राज्याची समस्या असून त्यातून गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले लोकही येथे येऊ लागल्याचे त्यांनी सांगितले.
अनेक गुन्हेगारी प्रकरणांमध्ये बिगर गोमंतकीयांचा मोठ्या प्रमाणात समावेश असून अशा लोकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिस दलाचा आकार वाढवावाच लागेल असे श्री.नाईक म्हणाले. बीट पोलिसिंग वाढविणे, भाडेकरूंची सविस्तर यादी तयार करणे यासारख्या उपायांद्वारे गुन्हेगारांवर नियंत्रण ठेवता येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

अनुसूचित जमातींसाठी स्वतंत्र खाते - मुख्यमंत्री

पणजी, दि. २८ (प्रतिनिधी) - राज्यातील अनुसूचित जमातींच्या विकासासाठी यापुढे येथे स्वतंत्र असे अनुसूचित जमाती कल्याण खाते स्थापन करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी आज आज विधानसभेत केली. या जमातींसाठी असलेली अर्थसंकल्पीय तरतुदीचा योग्य पद्धतीने वापर होण्यासाठी हे स्वतंत्र खाते असणे काळाजी गरज आहे आणि सरकारने विनाविलंब ते निर्माण करावे या पैंगीणचे आमदार रमेश तवडकर यांनी केलेल्या मागणीला मुख्यमंत्री उत्तर देत होते.
साळगावचे आमदार दिलीप परूळेकर यांनी आज प्रश्नोत्तराच्या तासाला संबंधित प्रश्न उपस्थित करून, अनुसूचित जमातींच्या विकाससाठी असलेल्या विविध योजनांची माहिती सरकारकडे मागितली होती. त्या अनुषंगाने झालेल्या चर्चेच्या वेळी यंदाच्या अर्थसंकल्पात हा निधी कमी करण्यात आल्याबद्दल विरोधकांनी समाजकल्याणमंत्री सुदिन ढवळीकर यांच्यावर टीका केली. गतवर्षीच्या ९७ कोटींच्या तुलनेत यंदा हा आकडा ६२ कोटी असा खाली आल्याने विरोधकांनी संताप व्यक्त केला. ही घटनात्मक तरतूद असून त्यानुसार राज्याच्या एकूम अर्थसंकल्पापैकी ठरावीक टक्केवारी अनुसूचित जमातीसाठी राखीव ठेवावी लागते, असे विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यामुळे घटनेनुसार या गोष्टी न झाल्यास हक्कभंगाचे प्रकरण त्यातून उदभवू शकते, असेही पर्रीकर यांनी सांगितले. सभापती प्रतापसिंग राणे यांनीही या जमातींसाठी काहीतरी ठोस होणे आवश्यक असल्याचे यावेळी सांगितले. जे खातेप्रमुख या पैशांचा पूर्ण वापर करणार नाहीत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी श्री. तवडकर यांनी यावेळी केली. निवडणुकीच्या कारणामुळे विविध खात्यांना आपले नियोजन करणे शक्य झाले नाही, त्यामुळे प्रस्तावच न आल्याने निधीचा आकडा कमी झाल्याचे स्पष्टीकरण ढवळीकर यांनी यावेळी दिले, परंतु विविध खात्यांकडून योजनांचे प्रस्ताव घेण्याची जबाबदारी तुमची होती. निवडणुकीचा त्याच्याशी काहीच संबंध नाही असे सांगून राणे व पर्रीकर यांनी ढवळीकरांचा दावा फेटाळून लावला.

Tuesday, 28 July 2009

मांडवीतील कॅसिनोंचे व्यवहार बंद पाडणार - मिकी

पर्रीकरांकडून मिकींवर प्रश्नांची सरबत्ती
पणजी, दि. २७ (प्रतिनिधी) - परवाने संपूनही मांडवी नदीत ठाण मांडून बेकायदा व्यवसाय करणाऱ्या जहाज कॅसिनोंच्या कारवाया त्वरित थांबवण्याचे आश्वासन नदी परिवहन खात्याचे मंत्री मिकी पाशेको यांनी आज अखेर विधानसभेत दिले. विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी या बेकायदा कॅसिनोंवरून आज पुन्हा एकदा टीकेची झोड उठवताना, नदी परिवहन मंत्र्यांना ही घोषणा करण्यास अक्षरशः भाग पाडले. सदर कॅसिनोंवर यांना फुकट खेळायला दिले जात असावे व त्यामुळेच हे कारवाई करण्यास मागे पुढे पाहत असावे या पर्रीकरांच्या आरोपांमुळे डिवचलेल्या मिकी यांनी शेवटी रागारागातच ही घोषणा केली.
एम. व्ही. लीला. एम. व्ही कॅसिनो रॉयल यांचे परवाने २७ फेब्रुवारी रोजी संपल्याचे मिकी यांनी मान्य केले. त्यानंतर सदर कॅसिनोंना मांडवीच्या पात्रातून आग्वादच्या समुद्रात जाण्यासंदर्भात लेखी निर्देश देण्यात आले होते. परंतु नंतर न्यायालयीन प्रक्रियेमुळे कारवाई होऊ शकली नाही, अशा आशयाचे स्पष्टीकरण देण्याचा मिकी यांनी प्रयत्न केला. ऍडव्होकेट जनरल यांच्या नोटींगचाही त्यांनी उल्लेख केला. मांडवीतून कॅसिनो हटविणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले होते, नंतर न्यायालयात मात्र त्यांनी भूमिका बदलून आपला आग्रह सोडला. हे महाशय कारवाईही करू देत नाहीत आणि न्यायालयात सरकारची बाजूही धडपणे मांडत नाही, त्यामुळे तुमच्या खात्यांतर्गत असलेल्या अधिकारांचा वापर करून तुम्ही थेट कारवाई का करत नाही, असा सवाल करून बेकायदा कॅसिनो आणि न्यायालयीन प्रक्रिया या दोन भिन्न प्रक्रिया आहेत. कॅसिनोवर कारवाई करायला तुम्हाला कोणी अडवलेय? असा सवालही पर्रीकर यांनी केला.
सध्या मांडवीत ठाण मांडून व्यवसाय करणाऱ्या कॅसिनोंची मुदत संपलेली आहे, त्यामुळे ते बेकायदा ठरतात. या परिस्थितीत उद्या या कॅसिनो जहाजांना अपघात झाला आणि तिथल्या माणसांच्या जीवितास धोका झाला तर जबाबदार कोण? परवा कुंभारजुवे येथे एका बार्जने फेरीबोटीला धक्का दिल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. उद्या कॅसिनोंच्या बाबतीत हीच स्थिती निर्माण झाली तर जबाबदारी कोणाची, असा सवाल करून विरोधी पक्षनेत्यांनी मिकी यांना चांगलेच धारेवर धरले. त्यामुळे शेवटी नदीपरिवहनमंत्री मिकी यांना कॅसिनो बंद पाडण्याची घोषणा करावी लागली.

एजींची उपस्थिती असावी
ऍडव्होकेट जनरल यांचा विषय उपस्थित झाला तेव्हा गरज पडल्यास त्यांना येथे उपस्थित करता येईल. एजीसाठी सभागृहात खास आसनाची तरतूद करण्यात आलेली आहे असे सभापती राणे यांनी नमूद केले. काहीवेळा त्यांच्यासंदर्भात असलेल्या प्रश्नांची माहिती येथे स्पष्ट होत नाही. एजींच्या उपस्थितीमुळे ते शक्य होऊ शकेल असेही सभापती म्हणाले. होय, सभापतीमहाशय, आमची हरकत नाही, त्यांना आणाच,असे विरोधी पक्षनेते म्हणाले.

राज्यात गुन्हेगारी बोकाळली

पर्रीकरांकडून गृह खात्याची खरडपट्टी
पणजी, दि. २७ (प्रतिनिधी) - राज्यात मूर्तिभंजनाचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. गुन्हेगारांना ताब्यात घेण्यात पोलिसांना पूर्ण अपयश आले आहे. याप्रकरणी सरकारच्या बेपर्वा वृत्तीमुळे जनक्षोभ वाढत चालला आहे.हे प्रकार वेळीच थांबले नाहीत तर लोकभावनांचा भडका उडून त्याचे गंभीर परिणाम होण्याची शक्यता विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी वर्तवली.
राज्य विधानसभेत आज गृह खात्याच्या मागण्यांवरील चर्चेप्रसंगी पर्रीकर बोलत होते. विरोधी तथा सत्ताधारी पक्षातील आमदारांनी गृह खात्याची लक्तरेच वेशीवर टांगली.कायदा सुव्यवस्था पूर्ण ढासळली आहे.जनतेला संरक्षण देण्यात पोलिस खाते अपुरे पडत असल्याचा आरोपही अनेक सदस्यांनी केला. विधानसभेत प्रॉसिक्युशन, पोलिस, तुरुंग, गृह, गृहरक्षक व नागरी सुरक्षा,अग्निशमन व आपत्कालीन सेवा, महिला व बाल कल्याण,राज्य सैनिक मंडळ, पशुसंवर्धन व पशुचिकित्सा सेवा व सहकार आदी खात्यांच्या पुरवणी मागण्यांना मान्यता देण्यात आली.
यावेळी पर्रीकर यांनी गृह खात्याच्या अनागोंदी कारभाराचा पाढाच वाचून दाखवला.यापूर्वी अनेक आव्हानात्मक प्रकरणे गोवा पोलिसांनी हाताळली आहेत; पण आता नक्की काय झाले आहे, हेच कळेनासे झाले आहे,असेही पर्रीकर म्हणाले. तलवारीसाठा प्रकरण आरोपपत्र दाखल करण्याच्या परवानगीसाठी चार महिने सरकारकडे पडून आहे, त्याबाबत काहीही होत नाही, अशी माहिती पर्रीकर यांनी उघड केली. मटक्यावर कारवाई करण्याच्या निमित्ताने पोलिस या लोकांकडून पैसे उकळतात,असा आरोपही त्यांनी केला.
बनावट नोटांची प्रकरणी झाली तरी त्याबाबत अद्याप काहीही ठोस कारवाई होत नाही.भारतीय राखीव बटालियनच्या शिपायांकडून सगळ्या पद्धतीची सेवा करून घेतली जाते; परंतु त्यांना इतर पोलिसांप्रमाणे मोबदला मात्र मिळत नाही, असेही पर्रीकरांनी सरकारच्या नजरेस आणून दिले.
कॅसिनो प्रकरणी सरकारची भूमिकाच संशयास्पद आहे.कॅसिनोबाबत एकही मंत्रिमंडळ निर्णय योग्य पद्धतीने घेण्यात आला नाही. भू-कॅसिनोंचा समावेश पर्यटन व्यापार कायद्यात करण्याची गरज आहे.कॅसिनोंचे परवाने देताना आधी परवाना व मग शुल्क असेही प्रकार घडले.पर्वरी येथे एका हॉटेलाचा पंचतारांकित परवाना संपला असतानाही तेथे कॅसिनो सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.कॅसिनोंवर नियंत्रण ठेवण्यासाठी किंवा त्यांच्या व्यवहारांवर नजर ठेवण्यासाठी सरकारकडे कोणतीही यंत्रणा नाही,अशी तक्रारही पर्रीकर यांनी केली. गोमंतकीयांच्या कॅसिनो प्रवेशावर निर्बंध घालण्याची गरज आहे. त्यासाठी करदाता किंवा उत्पन्नाची अट घालता येणे शक्य आहे,अशी माहितीही पर्रीकर यांनी दि ली.बंदर कप्तानाकडे या जहाजांवर नियंत्रण ठेवण्यासाठी किंवा उद्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्यास मदतीला जाण्यासाठी काहीही यंत्रणा नाही,अशी तक्रारही पर्रीकरांनी केली. गोवा राज्य सहकारी बॅंकेच्या कारभाराबाबत रिझर्व्ह बॅंकेच्या हिशेब तपासनिसांकडून कडक ताशेरे ओढल्याची माहितीही पर्रीकर यांनी यावेळी दिली.अंगणवाडी सेविकांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत,असेही पर्रीकर म्हणाले.
यावेळी झालेल्या चर्चेत फ्रान्सिस डिसोझा, चंद्रकांत कवळेकर, लक्ष्मीकांत पार्सेकर, दामोदर नाईक, नीळकंठ हळर्णकर, फ्रान्सिस सिल्वेरा, मिलिंद नाईक, महादेव नाईक, माविन गुदिन्हो, व्हिक्टोरिया फर्नांडिस, श्याम सातार्डेकर, राजेश पाटणेकर आदी सदस्यांनी भाग घेतला.

अन्य एकाचा काटा काढण्याचा त्यांचा इरादा होता...!

वास्को, दि. २७ (प्रतिनिधी)- म्हापसा येथील सुदन दाभाळे याच्या खूनप्रकरणाची व वास्को येथील अय्याज सय्यद याच्या अपहरण प्रकरणाचा गुंता पोलिस सोडवीत असतानाच त्यांना या संशयित आरोपींकडून अन्य एकाचा काटा काढण्याचा इरादा होता,असे तपासाच्या वेळी उघड झाल्याने या प्रकरणाने पुन्हा एकदा नाट्यमय वळण घेतले आहे.
वास्को पोलिसांच्या कोठडीत असलेल्या श्रीनिवास याच्या प्रेयसीशी वास्कोतील विजय नामक एका युवकाचे संबंध असल्याने त्याचा खून करण्याचा मूळ हेतू पोलिसांच्या ताब्यात असलेल्या आरोपींचा (श्रीनिवासचे साथीदार) होता, मात्र तो त्यांना सापडला नसल्याने त्यांनी आपला निर्णय बदलून खंडणीसाठी शेवटी अय्याजचे अपहरण केल्याचे उघडकीस आले आहे.
चार दिवसांपूर्वी वास्कोतील अय्याज सय्यद या युवकाचे अपहरण झाल्याचे पोलिसांना समजताच त्यांनी थरारक कारवाई करून त्याची सुटका केली. तसेच पोलिसांनी या वेळी कारवाई करत पहिल्या दिवशी परिकेत हंडा या एका अपहरणकर्त्याला ताब्यात घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी श्रीनिवास व्यंकटेश व नंतर तिसऱ्या दिवशी सुरज झा व महम्मद अली अशा मिळून चार अपहरणकर्त्यांना ताब्यात घेऊन तपासणीला सुरवात केली असता गेल्या दहा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या म्हापसा येथील (त्यांच्या कडून मिळालेल्या वाहनामुळे) सुदन दाभाळे याचा खून करण्यात आल्याची माहिती उपलब्ध झाली. दाभाळे याचा अय्याज याच्या अपहरणामध्ये हात असलेल्या श्रीनिवास व्यंकटेश व महम्मद अली तसेच रविंद्र झा नामक अन्य एका इसमाने मिळून खून केल्याचे उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी काल उशिरा रात्री कोंन्सुवा वेर्णा येथून दाभाळे याचा झुडपातून कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह ताब्यात घेतला होता तसेच म्हापसा पोलिसांनी त्वरित कारवाईने दाभाळेच्या खून प्रकरणातील अन्य एक संशयित रविंद्रला काल रात्रीच ताब्यात घेऊन त्यास गजाआड केला आहे. आज त्यास न्यायालयात उभा केला असता १४ दिवसांच्या पोलिस कोठडीत घेण्याचा आदेश देण्यात आला आहे. दरम्यान , दाभाळे याच्या पोटावर, छातीवर मागून सुऱ्याने वार करुन नंतर त्याचा गळा चिरल्याने मृत्यू झाल्याचे शवचिकित्सक अहवालामध्ये उघडकीस झाल्याची माहिती पोलिसांनी दिली असून मयत दाभाळे याचे शव त्याच्या कुटुंबाच्या ताब्यात देण्यात आल्यानंतर शोककूल वातावरणात त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
दोन्ही प्रकरणामध्ये अजूनपर्यंत अटक करण्यात आलेल्या पाचही आरोपींकडे तपासणी करण्याच्या वेळी पोलिसांना धक्कादायक माहिती उपलब्ध झाली असून, दाभाळे याचा खून करुन त्याची गाडी हिसकावण्यामागे अय्याजचे अपहरण हे कारण नसून चिखली येथे राहणाऱ्या विजय नामक एका इसमाचा खून करण्याचा हेतू होता, मात्र त्यांनी दोन वेळा केलेला प्रयत्न अयशस्वी ठरल्याने शेवटी त्यांनी संशयित आरोपी श्रीनिवास याचा मित्र अय्याज याचे अपहरण करुन पैसे उकळण्याचे ठरविले. पोलिस सूत्रांच्या माहितीप्रमाणे श्रीनिवास हा विजय नामक इसमाचाच मित्र असून त्याच्या प्रेयसीशी त्याची मैत्री असल्याने त्याचा काटा काढण्याचे या संशयित आरोपींनी ठरविले होते. दाभाळे याचा खून करुन सुमारे दोन वेळा विजय याचा काटा काढण्याचा प्रयत्न केल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. हे प्रयत्न अयशस्वी ठरल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणामध्ये दिवसेंदिवस वेगवेगळ्या प्रकारचा गुंतागुंत निर्माण होत असल्याने खून व अपहरण प्रकरणात अटक करण्यात आलेल्या पाचही आरोपींकडे सध्या म्हापसा व वास्को पोलिस चौकशी करीत आहेत.

२००३ च्या मुंबई स्फोटप्रकरणी तिघे दोषी, ३ ऑगस्टला शिक्षा

सहा वर्षांनी लागला निकाल

मुंबई, दि. २७- मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया आणि झवेरी बाजार येथे २५ ऑगस्ट २००३ रोजी झालेल्या भीषण बॉम्बस्फोट प्रकरणी अखेर सहा वषार्र्ंंनंतर तिघांना दोषी ठरविण्यात आले. या तिघांना पुढील सोमवारी ३ ऑगस्ट रोजी शिक्षा सुनावली जाणार आहे.
अशरत अन्सारी (३२), सय्यद अनीस (४६) आणि त्याची पत्नी फहमिदा सय्यद (४३) अशी या तिघांची नावे आहेत. या तिघांवर "पोटा'अंतर्गत विशेष पोटा कोर्टात खटला चालविण्यात आला. लष्कर-ए-तोयबाचा या दुहेरी बॉम्बस्फोटात हात असल्याचे स्पष्ट झाले आहे. सोमवारी ३ ऑगस्ट रोजी या आरोपींना शिक्षा सुनावण्यात येईल. यात त्यांना कमीत कमी जन्मठेप किंवा फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी आपण करणार असल्याचे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सांगितले. अशा अतिरेकी कारवाईत एखाद्या दाम्पत्याला दोषी ठरविण्याची ही देशातील पहिलीच वेळ असावी.
संपूर्ण मुंबईला हादरविणाऱ्या या दुहेरी स्फोटात सुमारे ५२ जण ठार, तर शंभराहून अधिक जण जखमी झाले होते. मोहम्मद अन्सारी लड्डूवाला आणि मोहम्मद हसन बॅटरीवाला या दोघा आरोपींना "पोटा' आढावा समितीने गेल्या वर्षीच निर्दोष असल्याचा निर्वाळा दिला होता. त्यामुळे त्यांना कोर्टाने दोषमुक्त केले होते.
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी या खटल्यात १०३ साक्षीदार तपासले असून त्यापैकी गेट वेजवळ बॉम्ब ठेवलेल्या टॅक्सीचा चालक हा महत्त्वाचा साक्षीदार आहे. कटाचा मुख्य सूत्रधार नासीर अहमद हा शिवाजी पार्क येथे पोलिसांशी झालेल्या चकमकीत ठार झाला होता. मुख्य तपास अधिकारी सुरेश वलीशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा छडा पोलिस निरीक्षक सावदे, सहायक पोलिस निरीक्षक योगेशे चव्हाण, सूर्यकांत तळेकर यांनी केला.

श्रीदामोदर सप्ताह उत्साहाने सुरू

वास्को, दि. २७ (प्रतिनिधी)- " बोला पुंडलिकवरदे हरी विठ्ठल' च्या गजरात आज दुपारी वास्कोतील उद्योजक तथा ज्येष्ठ नागरिक श्री. वसंत (अण्णा) जोशी यांच्याहस्ते येथील ग्रामदैवत श्री देव दामोदराच्या चरणी श्रीफळ अर्पण केल्यावर २४ तासांच्या अखंड श्री दामोदर भजनी सप्ताहाला सुरुवात झाली. यंदा साजरा करण्यात येत असलेल्या १११ व्या दामोदर भजनी सप्ताहाच्या निमित्ताने देवाचे दर्शन घेण्यासाठी आज पहाटेपासून गोव्यातील वेगवेगळ्या भागांतून तसेच गोव्याबाहेरील हजारो भक्तांनी सुमारे एक किलोमीटर अशा लांब रांगेत उभे राहून देवाचे दर्शन घेतले.
आजपासून वास्कोतील ग्रामदैवत श्रीदामोदर याच्या भजनी सप्ताहाची सुरुवात होत असल्याने पहाटे ५ वाजल्यापासून मंदिरामध्ये देवाचे दर्शन घेण्यासाठी वास्को तसेच गोव्याच्या व गोव्याबाहेरील भाविकांनी मंदिराच्या आवारात लांब अशा रांगेत उभे राहून दर्शन घेण्यास सुरुवात केली. नंतर दुपारी १२.३० च्या सुमारास गेल्या अनेक वर्षांपासून चालत असलेल्या प्रथेनुसार वास्कोतील ज्येष्ठ नागरिक श्री वसंत (अण्णा) जोशी यांनी ग्रामदैवताच्या चरणी श्रीफळ अर्पण करून शेकडो वास्कोवासीयांच्या उपस्थितीत येथील पुरोहिताने प्रार्थना करून पुढचे २४ तास चालणाऱ्या अखंड श्री दामोदर भजनी सप्ताहाची सुरुवात केली. यानंतर संध्याकाळी वास्कोतील वेगवेगळ्या भागांच्या रस्त्यावरून दिंडीच्या तालात हिंदू सांस्कृतिक दर्शविणारे वेगवेगळ्या समाजाचे पार (चित्ररथ) मंदिराच्या आवारात येण्यास सुरुवात झाल्याने हजारोंच्या संख्येने वास्कोत आलेल्या भाविकांनी याचा मोठा उत्साहाने आनंद उठविला असून सप्ताहाच्या निमित्ताने परंपरेनुसार येथील चार ठिकाणी गायनाच्या कार्यक्रमासाठी उभारलेल्या मंडपात संगीताचा आनंद घेण्यासाठी शेकडोंच्या आकड्यात गर्दी झाल्याचे दिसून आले. सप्ताहाच्या निमित्ताने वास्कोतील स्वतंत्रपथ तसेच मंदिराच्या मागे असलेल्या रस्त्यावर घालण्यात आलेल्या फेरीमध्ये हजारोंच्या संख्येत लोक खरेदी करताना दिसून आले असून युवा पिढीबरोबरच इतर वयोगटाच्या लोकांनी पहाटे होईपर्यंत फेरीमध्ये फिरण्यास पसंत केले.
सप्ताहाच्या निमित्ताने गोव्यातील अनेक अतिमहनीय व्यक्तींनी देव दामोदराच्या मंदिरात भेट देऊन ग्राम दैवताचे दर्शन घेतले. उत्तर गोव्याचे खासदार श्रीपाद नाईक, गोव्याचे विरोधी पक्षनेते तथा माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, उद्योजक नाना बांदेकर तसेच इतरांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. याचप्रमाणे मुरगावचे नगराध्यक्ष तथा अल्पसंख्याक (कॉंग्रेस) चे अध्यक्ष श्री सैफुल्ला खान, मुरगावचे नगरसेवक कृष्णा (दाजी) साळकर, श्री राजेंद्र आर्लेकर, दक्षिण गोवा भाजप उपाध्यक्ष दिगंबर आमोणकर अशा काही वास्कोतील राजकीय नेत्यांनी दर्शन घेतले. मुरगावातील सरकारी अधिकाऱ्यांनीही मोठ्या संख्येने भाग घेतला. सप्ताहाच्या निमित्ताने वास्कोमध्ये येणाऱ्या भाविकांना कुठल्याच प्रकारचा त्रास होऊ नये, या हेतूने वास्को सप्ताह समितीच्या सदस्यांनी तसेच वाहतूक पोलिस व इतर सरकारी व्यवस्थापनांनी पूर्णपणे खबरदारी बाळगली होती. आज सुरू झालेला अखंड २४ तासांच्या भजनी सप्ताहाची सांगता उद्या दुपारी १२ वाजता "गोपाळ काल्या'ने होणार असली तरी येणाऱ्या आठवडाभर येथे उभारण्यात आलेली फेरी चालू असणार असून या काळातही भाविकांची मोठ्या प्रमाणात देवाच्या दर्शनासाठी मंदिरामध्ये गर्दी असणार आहे.
----------------------------------------
सप्ताहाच्या निमित्ताने वास्कोमध्ये सुरक्षेच्या बाबतीत कुठल्याच प्रकारे निष्काळजीपणा न व्हावी यासाठी येथे नजर ठेवण्यासाठी उभारण्यात आलेल्या "वॉच टॉवर'वर उशिरा संध्याकाळपर्यंत पोलिस शिपायांची अनुपस्थिती दिसून आल्याने तसेच येथे गेल्या अनेक वर्षांपासून (टॉवरवर) घालण्यात येणारे सी.सी.टीव्ही कॅमेरा बसवण्यात न आल्याने लोकांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत होती.
भाविकांच्या सुरक्षेबाबत अशा प्रकारे निष्काळजीपणा न करता सर्व "टॉवर'वर सतत पोलिस शिपाई व सी.सी.टीव्ही कॅमेरा बसवण्याची तजवीज करावी, अशी मागणी नगरसेवक कृष्णा (दाजी) साळकर यांनी गोवादूतच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केली आहे. मुरगावचे पोलिस उपअधीक्षक श्री. मामल यांना संपर्क केला असता त्यांनी एक पोलिस निरीक्षक, ९ पोलिस उपनिरीक्षक, १७ पोलिस हवालदार, ६८ पोलिस शिपाई, ८ महिला पोलीस व ४० जणांचे दोन पोलिस बटालियन गट येथे सप्ताहाच्या दरम्यान तैनात करण्यात आल्याचे सांगून सी.सी.टीव्ही कॅमेरा आज उशिरा रात्रीपर्यंत बसवण्यात येणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.

Monday, 27 July 2009

म्हापशाच्या ड्रायव्हरचा अमानुष खून

अपहरण प्रकरणातील आरोपींनी घेतला दाभाळेचा बळी

वास्को, दि. २६ (प्रतिनिधी)- दोन दिवसांपूर्वी वास्कोतील अय्याज सय्यद नामक युवकाचे अपहरण केलेल्या चार आरोपींपैकी फरारी असलेल्या दोघा जणांना आज वेर्णा पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर म्हापसा येथील सुधन दाभाळे या वाहनचालकाचा खून करण्यात आल्याचे उघडकीस आले. दाभाळे याची"मारुती व्हॅन' मिळविण्यासाठी त्याचा गळा चिरून खून करण्यात आल्याचे आज उघडकीस आले असून उशिरा रात्री पोलिसांनी कोंन्सुवा, वेर्णा येथील जंगली भागातून दाभाळे याचा पूर्णपणे कुजलेला मृतदेह ताब्यात घेतला.
चिखली, वास्को येथे राहणारा २३ वर्षीय अय्याज सय्यद याचे दोन दिवसांपूर्वी परिकेत हंडी, श्रीनिवास व्यंकटेश, सुरज झा व महम्मद अली या चौघांनी अपहरण करून त्याच्या कुटुंबीयांशी १५ लाखांच्या खंडणीची मागणी केल्यानंतर पोलिसांनी थरारक कारवाई करून अय्याजला सुखरूपपणे या अपहरणकर्त्यांच्या कचाट्यातून सोडविले व त्याचवेळी त्यांनी गेल्या दोन दिवसांमध्ये परिकेत व श्रीनिवास यांना शिताफीने ताब्यात घेऊन अटक केली होती. सदर अपहरणासाठी वापरण्यात आलेली "मारुती व्हॅन'बाबत वास्को पोलिसांनी माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला असता म्हापसा येथून गेल्या दहा दिवसांपासून आपल्या चारचाकीसोबत बेपत्ता (दि. १७) असलेल्या सुधन दाभाळे याची ही गाडी असल्याचे उघडकीस आल्याने त्यांनी याबाबत चौकशी करण्यास सुरुवात केली व त्यांना दाभाळे याचा खून करण्यात आल्याचा संशय आला. पिर्णी, वेर्णा येथील एका भाड्याच्या खोलीत सदर अपहरणकर्ते राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्याने गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्यावर नजर ठेवण्यात आली होती व आज सकाळी सुरज झा हा फरारी असलेला अपहरणकर्ता तेथे आपले सामान नेण्यासाठी आला असता पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन नंतर अटक केली. या नंतर शेवटचा फरारी आरोपी महम्मद अली वेर्णा भागामध्ये फिरत असल्याचे वेर्णा पोलिसांना समजताच त्यांनी सर्वत्र पहारा ठेवून े शेवटी डोंगरी भागातून पोलिसांनी त्याला गजाआड करण्यात यश मिळविले. आज दुपारपर्यंत चारही आरोपी पोलिसांच्या ताब्यात आल्यानंतर त्यांना म्हापसा येथून चारचाकी हिसकावण्याच्या हेतूने अपहरण केलेल्या दाभाळे याचा खून करण्यात आल्याची पूर्ण माहिती उपलब्ध झाली व वास्को पोलिस निरीक्षक सागर एकोस्कर तसेच म्हापसा पोलिस निरीक्षक मंजुनाथ देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सुधन दाभाळे याचा मृतदेह उशिरा रात्री कोन्सुवा येथील जंगली भागातील झुडपातून ताब्यात घेतली. अपहरण करण्यासाठी गाडीची गरज भासल्याने १७ रोजी महम्मद अली, श्रीनिवास व्यंकटेश व रवी झा (हा अपहरणाच्या गुन्ह्यात नाही) यांनी म्हापशाच्या दाभाळे याची गाडी भाडेपट्टीवर नेऊन त्याला कोंन्सुवा येथील जंगली भागात त्याच्यावर प्रथम सुऱ्याने वार करून व नंतर त्याचा गळा चिरून खून केल्याचे उघडकीस आले आहे. १७ रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास दाभाळे याचा खून केल्यानंतर त्यास सुमारे दोनशे मीटर अंतर पर्यंत जमिनीवरून ओढत नेते तेथील झुडपात टाकल्याचे उघडकीस आले आहे. दाभाळे यास येथे गाडीतून उतरवून नंतर त्याच्यावर प्रथम सुऱ्याने मागच्या बाजूने वार करून त्यास खाली टाकल्यानंतर त्याचा गळा चिरण्यात आल्याची माहिती वास्को पोलिसांनी दिली.
मृतदेह कुठे टाकला आहे याबाबत पोलिसांना आज अटक केलेल्या श्रीनिवास यांनी जागा दाखविल्यानंतर त्याचा मृतदेह येथून काढण्यात आला असता मयत दाभाळे याचा भाऊ व इतर काही नातेवाइकांनी त्याची ओळख पटविली.वेर्णा पोलिसांनी उशिरा रात्री कुजलेल्या अवस्थेत दाभाळे याचा मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर त्यास शवचिकित्सेसाठी बांबोळीच्या गो.मे.कॉ. इस्पितळात पाठविला आहे. वेर्णा पोलिसांनी अय्याज व श्रीनिवास यांची मैत्रीण असलेल्या त्या युवतीशी चौकशी केल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. खून प्रकरणात असलेला तिसरा संशयित आरोपी रवी याचा शोध चालू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. वास्को वेर्णा तसेच म्हापसा पोलीस सदर प्रकरणाबाबत पुढील तपास करीत आहे.
सारे घडले प्रेमप्रकरणातून
अय्याज याच्या अपहरण प्रकरणात व दाभाळे याच्या खून प्रकरणात पोलिसांनी ताब्यात घेतलेला श्रीनिवास हा अय्याज याचा ओळखीचा असल्याचे पोलिसी तपासणीच्या दरम्यान उघडकीस आले असून या दोघांच्या एका युवतीशी असलेल्या मैत्रीमुळेच श्रीनिवासने त्याच्या अपहरणाचा खेळ रचून त्याच्या कुटुंबीयांकडून पैसे मिळाल्यानंतर अय्याजचा खून करण्याचा कट रचला होता होता,अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली. याच प्रमाणे दाभाळे याच्या खुनातील मुख्य संशयित आरोपी महम्मद अली याने अन्य एकाचे अपहरण करण्याचे ठरविले होते,असे उघडकीस आल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली असून याच सर्व प्रकारासाठी त्यांना पाहिजे असलेल्या गाडीमुळेच त्यांनी निष्पाप दाभाळे याचा खून केल्याचे पोलिसांना तपासणीच्या वेळी लक्षात आले आहे.

ज्येष्ठ संगीतकार भास्कर चंदावरकर कालवश

पुणे, दि. २५ - आपल्या प्रयोगशील वृत्तीने संगीतविश्वाला एक वेगळे परिमाण देणारे ज्येष्ठ संगीतकार भास्कर चंदावरकर यांचे काल रात्री उशिरा दीर्घ आजाराने निधन झाले. ते ७३ वर्षांचे होते. शास्त्रीय संगीतात, एखादे नाटक संगीताने खुलवण्यात किंवा चित्रपटाला संगीतसाज चढवण्यात त्यांचा हातखंडा होता.
गेल्या दोन वर्षांपासून ते कर्करोगाने आजारी होते. दोन आठवड्यांपूर्वी हा आजार अधिकच बळावल्याने त्यांना पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली. आज पहाटे त्यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी शिक्षणतज्ज्ञ मीना चंदावरकर, चिरंजीव रोहित (आयबीएन ७ वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी) आहेत.
घाशिराम कोतवाल हे नाटक; सामना, सिंहासनसारखे चित्रपट अजरामर करण्यामध्ये भास्कर चंदावरकर यांच्या संगीताचा अविभाज्य वाटा आहे.
भास्कर चंदावरकरांचा जन्म १९३६ मध्ये पुण्यात झाला. सुरुवातीपासूनच संगीताकडे ओढा असल्याने त्यांनी पंडित रविशंकर आणि उमाशंकर मिश्रा यांच्याकडे सतारवादनाचा आणि शास्त्रीय गायनाचा अगदी शास्त्रशुद्ध अभ्यास केला. त्यानंतर, त्यांना पश्चिमेकडचे संगीत खुणावू लागले होते. त्यामुळे टॉन द ल्यू, जोसेफ अँटोन रिडल आणि डिटर बॅच यांच्याकडून त्यांनी जॅझचे धडेही गिरवले होते. फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्युटमध्ये त्यांनी १५ वर्षं संगीत प्रशिक्षक म्हणून काम केले. एकीकडे विद्यादानाचे काम सुरू असतानाच, १९७० पासून मराठी रंगभूमीवर वेगवेगळे प्रयोग करण्यासही त्यांनी सुरुवात केली होती. त्यापैकीच एक प्रयोग १९७२ मध्ये क्लिक झाला. विजय तेंडुलकरांच्या "घाशिराम कोतवाल' ला त्यांनी दिलेले संगीत मराठी नाट्यरसिकांना भावले आणि मग चंदावरकरांनी मागे वळून पाहिलेच नाही. आपोआपच चित्रपटांचा भव्य पडदा खुला झाल्याने चंदावरकर यांच्या प्रयोगशील वृत्तीला बहरच आला. मराठी, हिंदीसोबतच, पाश्चात्य चित्रपटांच्या पार्श्वसंगीताची जबाबदारीही त्यांनी उत्साहाने उचलली आणि ती यशस्वीपणे पेलली होती.

अनेक भारतीय भाषांमधले सुमारे ४० चित्रपट भास्कर चंदावरकरांनी आपल्या संगीतानं सजवले. मृणाल सेनचा "खंडहर",अपर्णा सेनचा "परोमा', अमोल पालेकरांचा"थोडासा रुमानी हो जाए', विजया मेहतांचा "रावसाहेब', जब्बार पटेलांचा"सामना', "सिंहासन' तसेच "आक्रित', "कैरी', "मातीमाय' हे त्यापैकी काही विशेष गाजलेले चित्रपट. श्वास या चित्रपटासाठी चंदावरकरांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता, तर संगीत नाटक अकादमी पुरस्कारानंही त्यांना गौरवण्यात आले होते. भास्कर चंदावरकर यांचे निधन संगीतप्रेमींच्या मनाला चटका लावून गेले आहे, तर सांस्कृतिक क्षेत्रातही दुःख व्यक्त होत आहे. रसिकांच्या मनाचा ठाव घेणाऱ्या संगीताने अनेक गाणी अजरामर करणारे भास्कर चंदावरकर आज आपल्यातून गेले असले तरी त्यांची गाणी आपल्या मनात सतत रुंजी घालत राहणार आहेत, अशी श्रद्धांजली संगीतप्रेमींनी वाहिली आहे.

भाषेची अडचण त्यांना कधीच जाणवली नाही - डॉ.वैद्य

पणजी, दि. २६ (प्रतिनिधी) - केवळ मराठी नाटकांना संगीत देण्याच्या प्रेमापोटी स्व. चंदावरकर यांनी जागतिक संगीत, भारतीय संगीत आणि नाट्यशास्त्राचा सखोल अभ्यास केला होता. त्यांचे इंग्रजी, हिंदी मराठी आणि कोकणी या भाषेवर प्रभुत्व होते. शास्त्रीय संगीताबद्दलची कोणतीही माहिती या भाषेतून ते स्पष्ट करीत असत. त्यांना कधीही भाषेची अडचण झाली नाही. अस्खलित इंग्रजीतून भारतीय संगीतावर बोलणारा असा संगीतकार एखादाच असावा, अशा शब्दांत नामवंत निवेदक व नेत्रतज्ज्ञ डॉ. अजय वैद्य यांनी ज्येष्ठ संगीत दिग्दर्शक आणि पार्श्व संगीतकार भास्कर चंदावरकर यांच्या आठवणींना उजाळा दिला.
ते पंचमहाभूतांत विलीन होण्याच्या काही तासांपूर्वी त्यांची विचारपूस करण्यासाठी पुणे येथे जाऊन आलेले डॉ. वैद्य यांनी त्यांच्याविषयी बोलताना सांगितले, की कोकणी भाषा त्यांना अत्यंत प्रिय. त्यामुळे ते नेहमी कोकणी संगीतावर काही ना काही प्रयोगादाखल करायचे, हा त्यांचा ध्यास होता. प्रत्येक राज्याचे संगीत असते, तसे कोकणी हे गोव्याचे संगीत आहे, असे ते ठासून सांगत असत. गोवा हिंदू असोसिएशनचे अध्यक्ष रामकृष्ण नायक यांच्यामुळे स्व. भास्कर चंदावरकर यांचा गोव्याशी संबंध आला. त्याचवेळी डॉ. वैद्य त्यांच्या संपर्कात आले आणि त्यांचे अत्यंत जवळचे मित्र बनले.
"चंदावरकर यांनी कधीच आम्हांला नवोदित कलाकार अशी वागणूक दिली नाही. ते नेहमीच आम्हाला आपल्याबरोबरचेच असे समजायचे आणि तशी वागणूक द्यायचे. त्यामुळे आम्हाला अधिक प्रोत्साहन मिळाले. संगीत विषयातील कोणतीही अडचण उद्भवल्याने बेधडक आम्ही चंदावरकर यांच्याशी संपर्क साधायचो. आता अशा समस्यांवेळी कोणाला संपर्क साधावा हाच मोठा प्रश्न उद्भवला आहे. त्यांच्या निधनामुळे माझे वैयक्तिक नुकसान झाले आहे' असे डॉ. वैद्य म्हणाले.

आण्विक पाणबुडी संरक्षण दलात

विशाखापट्टणम, दि. २६ - भारताच्या पहिल्या स्वदेशी बनावटीच्या आण्विक पाणबुडीचे उद्घाटन रविवारी पंतप्रधान मनमोहन सिंह आणि त्यांच्या पत्नी गुरुशरण कौर यांच्या हस्ते विशाखापट्टणम बंदरात झाले. "ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी व्हेसल' या सांकेतिक नावाने ओळखल्या जाणाऱ्या या पाणबुडीचे आएनएस अरिहांत असे नामकरण आले आहे.
उद्घाटनानंतर ही ११२ मीटर लांबीची, सात हजार टन क्षमतेची पाणबुडी बंगालच्या उपसागराकडे रवाना झाली आहे. उपसागरात आएनएस अरिहांतच्या विविध चाचण्या होणार आहेत. दोन वर्षात ही पाणबुडी सगळ्या चाचण्या पूर्ण करुन नौदलात संरक्षणाचे काम करण्यासाठी दाखल होईल.
रविवारी नारळ वाढवून गुरुशरण कौर यांनी औपचारिक उद्घाटन केले आणि पाणबुडीला आएनएस अरिहांत असे नाव देण्यात आले. यानंतर केलेल्या छोटेखानी भाषणात स्वरक्षणासाठी भारत सक्षम होत असून त्यासाठी टाकलेले हे एक दमदार पाऊल असल्याचे पंतप्रधान मनमोहन सिंह म्हणाले. कोणाला धमकावणे हा ही पाणबुडी तयार करण्याचा उद्देश नसल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, आण्विक पाणबुडीच्या उद्घाटनानंतर भारत आण्विक पाणबुडी तयार करणाऱ्या अमेरिका , रशिया , फ्रान्स आणि चीन या देशांच्या पंक्तीत जाऊन बसला आहे .

नेत्रावळी दूध संस्थेत साडेसात लाखांचा घोटाळा

सचिवाविरुद्ध पोलिस तक्रार दाखल

सांगे दि.२६ (प्रतिनिधी) - गोव्यात दूध उत्पादनात अग्रेसर असलेल्या नेत्रावळी दूध संस्थेत साडेसात लाखांचा घोटाळा उघडकीस आला असून संस्थेचे सचिव संतोष गवळी याने सदर रकमेची अफरातफर केल्याप्रकरणी विद्यमान मंडळाने त्याच्याविरुद्ध सांगे पोलिस स्थानकात तक्रार नोंद केली आहे.
आज सकाळी अध्यक्ष म्हाळगो गांवकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या सर्व दूध उत्पादकांच्या बैठकीत सदर प्रकरणाचा छडा लागेपर्यंत पाठपुरावा करण्याचा विद्यमान मंडळाला सर्व सभासदांनी एकमताने अधिकार देण्याचा ठराव घेण्यात आला तसेच सभासदांनी आपल्या कष्टाच्या पैशांचा गैरव्यवहार करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याबाबत विचारविनिमय करण्यात आला. यावेळी बोलताना अध्यक्ष गावकर म्हणाले की, पैशांचा गैरव्यवहार करणाऱ्यावर मंडळ कारवाई करण्यासाठी कटिबद्ध असून याकामी सर्व सभासदांनी एकसंध राहण्याची गरज आहे. आरोपीवर त्वरित कारवाई करण्यासाठी सांगे पोलिसांनी आरोपीला त्वरित अटक करावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
सदर अग्रणी संस्थेचे ३०९ सभासद असून संतोष गवळी (राहणार नेत्रावळी) हा सचिव म्हणून १९९५ सालापासून संस्थेत आहे. सध्या संस्थेची वार्षिक उलाढाल अंदाजे पंचेचाळीस लाखांवर आहे. पहिल्यांदा २००४ साली ऑडिटमध्ये सचिवाने दोन लाख दहा हजार रुपयांची तफावत केल्याचे नमूद केल्यावर आपण सदर रक्कम परत करू, असे लेखी स्वरूपाचे निवेदन रोटरीमार्फत गवळी यांनी त्यावेळी सादर केले परंतु आजपर्यंत अनेक वेळा आठवण करूनही संस्थेने दिलेल्या आदेशाचे पालन न करता पैसे भरले नसल्याचे पोलिसांत केलेल्या तक्रारीत नमूद केले आहे.त्याचप्रमाणे ऑडिट २००६-०७ मध्ये सुध्दा तफावत असल्याचा शेरा मारला आहे. दरम्यान, यंदाच्या २००९ सालच्या ऑडिटमध्ये आत्तापर्यंत अंदाजे साडेसात लाखांची अफरातफर आढळत असल्याने सदर सर्व रक्कम संतोष गवळीकडून भरून घ्यावी, असा शेरा मारला असून त्यानुसार दिनांक २३/०६/०९ रोजी संस्थेच्या सर्वसाधारण सभेत गवळी याच्याकडून तत्काळ साडेसात लाख रुपये जमा करून घ्यावे अन्यथा कायदेशीर कारवाई करण्याचे ठरले. पोलिस तक्रारीत नमूद केल्या नुसार सचिव गवळी दिनांक २८/०३/०८ पासून संस्थेला कोणतीही पूर्व कल्पना न देता व रजाही न घेता गैरहजर राहिला व तो आजपर्यंत कामावर रुजू झालेला नाही.या अनुषंगाने गवळी याने संस्थेला आर्थिकदृष्ट्या नुकसान पोचविल्याने त्यांच्यावर फौजदारी गुन्हा नोंद करण्याची मागणी करण्यात आली. संस्थेत चाललेल्या गैरव्यवहारामुळे गेली पाच वर्षे सभासदांना बोनस मिळाला नाही. दरम्यान, सांगे पोलिसांनी संतोष गवळीविरुध्द भा.द.संहितेच्या ४०८ ( पैशांचा गैरव्यवहार) प्रकरणी गुन्हा नोंद केला असून सांगेचे पोलिस निरीक्षक राजू राऊत देसाई पुढील तपास करीत आहेत.

Sunday, 26 July 2009

कुंभारजुवे कालव्यातील
बार्ज वाहतूक अडवली
अपघातामुळे नागरिक संतप्त

माशेल, दि.२५ (प्रतिनिधी)ः कुंभारजुवे येथील कालवा बार्ज वाहतुकीसाठी दिवसेंदिवस धोकादायक बनला असून आज सकाळी सांतइस्तेव्ह जुवे येथे धावजी - तोल्टो फेरीसेवा करणाऱ्या "बोगमाळो' फेरीबोटीला धक्क्यानजीक "एम. व्ही. पेट्रोन पीएनजे ३९१' या बार्जने धडक दिली. या घटनेमुळे खवळलेल्या सांतइस्तेव्ह व कुंभारजुवेच्या सुमारे १०० नागरिकांनी कुंभारजुवे येथे या कालव्यातून वाहतूक करणाऱ्या "एम. व्ही. पेट्रोन'सहीत सर्व बार्जेस अडविल्या.
सकाळी ९.३० च्या सुमारास ही घटना घडली. शनिवार असल्यामुळे फेरीबोटीत रोजच्यापेक्षा कमी प्रवासी होते. घाबरलेल्या प्रवाशांनी आरडाओरड करत मिळेल तेथून धक्क्यावर उड्या मारल्या. सुदैवाने कोणतीही अनुचित घटना घडली नाही. गेल्या महिन्यातही एका बार्जने कुंभारजुवे धक्क्याजवळ एका फेरीबोटीला धक्का दिला होता.
सांतइस्तेव्हच्या सरपंच वैजयंती तारी व कुंभारजुवेचे सरपंच सुरेंद्र नाईक यांच्या नेतृत्वाखाली बार्जेस अडविणाऱ्यांमध्ये दोन्ही पंचायतींचे उपसरपंच ओर्लान मिनेझीस व हरीष फडते तसेच पंच सदस्य नोलास्को मिनेझीस, अजय तारी, राजेंद्र मोरे, सीमा नाईक, भानुदास नार्वेकर व कुंभारजुवे पंचायतीचे सचिव चंद्रशेखर वळवईकर यांचा समावेश होता.
सदर सरपंचांनी या घटनेबद्दल स्थानिक आमदार पांडुरंग मडकईकर यांना माहिती देताच त्यांनी घटनास्थळी तसेच कुंभारजुवे येथे बार्जेस अडविलेल्या जागेला भेट देऊन पाहणी केली व आंदोलकांना शांत केले.
यावेळी बोलताना आमदार मडकईकर यांनी सांगितले की, या अरुंद कालव्यातून ७० मीटर पेक्षा कमी लांबीच्या बार्जेसना वाहतूक करण्याची परवानगी असताना, त्यापेक्षा जास्त लांबीच्या बार्जेस बंदर कप्तानचे सर्व नियम मोडून वाहतूक करतात. बंदर कप्तानाच्या नजरेस ही गोष्ट बऱ्याच वेळा आणून दिलेली असतानाही या वाहतूक करणाऱ्या बार्जेसवर कारवाई केली जात नाही. याबद्दल खंत व्यक्त करताना, सोमवारी शून्य तासाला ही घटना राज्य विधानसभेच्या नजरेस आपण आणून देणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी खवळलेल्या नागरिकांकडून कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून मडकईकरांनी ओल्ड गोवा पोलिस स्थानकातून पोलिस कुमक मागवून घेतली.
उप निरीक्षक विघ्नेश शिरोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार दिशा मापारी यांनी "एम. व्ही. पेट्रोन' बार्जची पाहणी केली असता, बार्ज चालविणारा अधिकृत मास्टर बार्जवर नसल्याचे आढळून आले. त्याऐवजी सुकाणूधारक रोहिदास डी. सावंत हा परवान्याशिवाय बार्ज चालवीत असल्याचे दिसून आले. तसेच बार्जमध्ये कोणतेही कागदपत्र नसल्याचे उघडकीस आल्याचे त्यांनी सांगितले. सांतइस्तेव्ह व कुंभारजुवे पंचायतीतर्फे ओल्ड गोवा पोलिस स्थानकावर या घटनेबद्दल तक्रार नोंदविण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
कुंभारजुवे फेरी धक्क्यानजीक जमलेल्या नागरिकांतर्फे यावेळी या अरुंद कालव्यातून नियमानुसार बार्जेसची वाहतूक करण्याची सक्ती बंदर कप्तान करणार नाही तोपर्यंत अडविलेल्या बार्जेस सोडल्या जाणार नाहीत असे सांगितले. ही बेभरवशाची वाहतूक लहान सहान होड्यांतून मच्छीमारी करणाऱ्या तसेच दोन्ही बाजूंच्या शेतात जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या जीवनाशी खेळत असल्याचे सांगितले. दरम्यान, आमदार मडकईकर यांनी ग्रामस्थांच्या या मागणीला आपला पाठिंबा व्यक्त केला असून, लवकरात लवकर पूल बांधण्याची गरज व्यक्त केली आहे.
हिंदू जनजागृतीचा२९ ला
विधानसभेवर भव्य मोर्चा
मूर्तिभंजन प्रकरणी सरकारच्या निष्क्रीयतेचा निषेध

पणजी, दि. २५ (प्रतिनिधी) ः- हिंदू देवतांच्या मूर्तिभंजनाची मालिका रोखण्यात विद्यमान सरकारला पूर्ण अपयश आल्याचा आरोप करून त्याच्या निषेधार्थ येत्या २९ रोजी हिंदू जनजागृती समितीने राज्य विधानसभेवर भव्य मोर्चा नेण्याचे ठरवले आहे.
मुख्यमंत्री दिगंबर कामत व गृहमंत्री रवी नाईक यांच्याकडूनही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली जात नाही. तसेच त्यांच्याकडून बेजबाबदार वक्तव्येही सुरू आहेत. गृह खात्याने स्थापन केलेले विशेष चौकशी पथकही निष्क्रिय ठरले आहे. अशावेळी सरकारला याप्रकरणी कृती करण्यास भाग पाडण्यासाठी हिंदू जनजागृती समितीने राज्यव्यापी चळवळ उभारण्याचा संकल्प सोडला आहे. त्याचाच शुभारंभ विधानसभेवर मोर्चा नेऊन केला जाईल, अशी घोषणा या समितीचे संघटक जयेश थळी यांनी केली.
आज येथे पत्रपरिषदेत श्री.थळी बोलत होते. यावेळी शिवसेनेचे उपराज्यप्रमुख नामदेव नाईक, हिंदू महासभेचे शिवप्रसाद जोशी, कॅप्टन दत्ताराम सावंत, केपे मंदिर सुरक्षा समितीचे समन्वयक आनंद प्रभुदेसाई, सनातन संस्थेच्या मीना कामत आदी पदाधिकारी हजर होते.या आंदोलनासाठी प. पू. श्री. ब्रह्मेशानंद स्वामींचे आशीर्वाद घेण्यात आले असून त्यांनी या चळवळीला आपला पूर्ण पाठिंबा दर्शवला आहे. सध्या गोव्यात असलेले श्री नरेंद्रचार्य स्वामींचेही आशीर्वाद याप्रकरणी घेतले जातील,असेही यावेळी सांगण्यात आले. २९ रोजी संध्याकाळी ४.३० वाजता समस्त हिंदू बांधव,भगिनींनी कदंब बसस्थानकाजवळील श्री मारुती मंदिराजवळ एकत्र व्हावे,असे आवाहन करण्यात आले आहे.सरकारकडून हिंदूंना गृहीत धरले जात आहे.गेल्या २००४ सालापासून राज्यात एकूण २८ घटना घडूनही कुणालाही पकडण्यात येत नाही, याचा अर्थ काय,असा खडा सवाल श्री.थळी यांनी केला.हिंदू बांधव हे शांतताप्रिय आहेत, पण याचा अर्थ ते कमकुवत आहेत असा समज कोणी करून घेतला असेल तर त्याला चोख उत्तर देण्याची क्षमता आमच्यात आहे. राज्यातील सर्व हिंदू धर्माभिमान्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सरकारला जागे करण्याची गरज आहे व त्यासाठी हिंदूंची एकी दाखवा,असेही आवाहन यावेळी श्री.थळी यांनी केले.
मूर्तिभंजन प्रकरणांवर विविध माध्यमांच्या साहाय्याने हिंदू लोकांकडून आंदोलने व जागृती सुरू आहे. याप्रकरणी रस्ता बंद,२० ऑक्टोबर २००८ रोजी झालेले ऐतिहासिक "गोवा बंद' आंदोलन,१० जानेवारी २००९ रोजी कांपाल पणजी येथे झालेले विराट "देवस्थान संरक्षण महासंमेलन' याव्दारे या घृणास्पद प्रकरणांचा निषेध करण्यात आला आहे. महासंमेलनानंतर मुख्यमंत्र्यांना कुणी विचारल्यानंतर ते ठराव आपल्याकडे पोहचलेलेच नाहीत,असे बेजबाबदार वक्तव्य त्यांनी केले तसेच गृहमंत्री रवी नाईक यांच्याकडूनही याप्रकरणी वेळकाढू धोरण अवलंबिले जात असल्याची टीका यावेळी करण्यात आली."" आम्ही गुन्हेगारांना पकडणार, महानंद नाईक याला पकडले नाही का'' असे म्हणणारे गृहमंत्री पुढील पंधरा वर्षे हिंदूंनी आपल्या देवतांची होत असलेली विटंबना मुकाट्याने सहन करावी अशी अपेक्षा करतात काय, असाही खडा सवाल यावेळी करण्यात आला. मूर्तिभंजन प्रकरणी गृह खात्याने स्थापन केलेल्या विशेष तपास पथकातील अधिकाऱ्यांना या प्रकरणांची चौकशी करण्यास वेळच नसून त्यांच्यावर अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे. मुळात सरकार या संपूर्ण प्रकरणांकडे अजिबात गांभीर्याने पाहत नाही. सरकारचा हा हिंदूव्देषाचा पवित्रा त्यांना महागात पडेल,असा इशाराही यावेळी देण्यात आला.
मूर्तिभंजन प्रकरणी पकडलेला संशयित कवेश गोसावी याची ब्रेन मॅपींग व पोलिग्राम चाचणी केली पण त्याचा अहवाल अजूनही मिळालेला नाही. केपे पाराडो येथे चालक परवाना मिळालेल्या रियाज शेख तसेच अल्लाबक्ष आदींचे पुढे काय झाले, तेदेखील पोलिसांनी उघड केले नाही.या एकूण प्रकारांवरून राज्यातील भोंगळ सुरक्षेची कल्पना येण्यास हरकत नाही,असेही यावेळी सांगण्यात आले.
पेडणे तपासनाक्यावर पकडलेला प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींचा ट्रक अचानक गायब होणे,मडगाव तलवार प्रकरणी दोषींवर कारवाई न होणे,"एनसीईआरटी' च्या इयत्ता सातवीच्या इतिहास पुस्तकातील वादग्रस्त धडे वगळणार असल्याचे गोवा शालान्त मंडळाने पोकळ आश्वासन देणे,राष्ट्रीय दिनी होणारा राष्ट्रध्वजाचा अवमान न रोखणे व २९ ऑगस्ट २००८ रोजी ओरिसा प्रकरणांवरून बेकायदा विद्यालये बंद ठेवणाऱ्यांवर कोणतीही कारवाई न करणे, यावरून सरकारची निष्क्रियता स्पष्ट होते,असेही श्री.थळी म्हणाले.
फोंडा अपहरणप्रकरणी
सात दिवस कोठडी

फोंडा, दि.२५ (प्रतिनिधी) - तिस्क फोंडा येथील टेरेर्स डायस (१८) या युवकाचे अपहरण आणि तीन लाख रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी फोंडा पोलिसांनी अटक केलेल्या दोघांना सात दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश येथील प्रथम श्रेणी न्यायालयाने आज (दि.२५) दिला आहे. दरम्यान, या प्रकरणातील दोघेजण फरारी असून त्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.
या अपहरण आणि खंडणी प्रकरणी फैजल खान (मडगाव) आणि स्पिरिट फर्नांडिस (मडगाव) या दोघांना फोंडा पोलिसांनी शुक्रवार २४ जुलै रोजी अटक केली होती. या प्रकरणाचा प्रमुख संशयित पुष्कर (मडगाव) आणि त्याचा साथीदार हा फरारी आहेत. शुक्रवार २४ जुलै ०९ रोजी सकाळी पावणे सातच्या सुमारास तिस्क फोंडा येथे हे अपहरण नाट्य घडले आहे. टेरेर्स डायस या युवकाचे अपहरण केल्यानंतर त्याच्याकडून मडगाव येथे काही बिलावर सही घेण्यात आली. तसेच एका नोटरीच्या समक्ष एका स्टॅम्प पेपरवर सही घेण्यात आली आहे. या प्रकरणाचा कसून तपास केला जात आहे. या अपहरण नाट्याच्या कारणाचा शोध घेण्याचे काम पोलिस करीत आहेत. या प्रकरणाचा प्रमुख सूत्रधार फरारी असल्याने अपहरणाचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. निरीक्षक सी. एल. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सचिन लोकरे तपास करीत आहेत.
तोरेसे येथे अपघातात
आंबोलीचा युवक ठार
चेसीसह चालकाला अटक
पेडणे, दि. २५ (प्रतिनिधी)ः तोरसे येथील राष्ट्रीय महामार्ग क्र. १७ वर एका चेसीने धडक दिल्याने आंबोली चौखूळ येथील बाबूराव शंकर गावडे (वय १५) हा युवक ठार झाला. आज सकाळी पावणे आठच्या दरम्यान ही घटना घडली.
मोहम्मद मुताप्पा जमीर नामक चालक नवीन वाहनाची चेसी घेऊन बॉडी बांधण्यासाठी तोरसेमार्गे महाराष्ट्रात जात होता. यावेळी चालकाचा चेसीवरील ताबा सुटल्याने तिची धडक रस्त्याच्या उजव्या बाजूने उभ्या राहिलेल्या बाबूरावला बसली. यानंतर बाजूला असलेल्या सत्यवान पांडुरंग धुरी यांच्या गॅरेजला चेसीची धडक बसल्याने बरेच नुकसान झाले. अपघातानंतर चालकाने चेसीसह पलायन केले व बांदामार्गे इन्सुली गाठली. इन्सुली चेकनाक्यावर सदर चेसी अडवण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच पेडणे पोलिसांनी इन्सुली येथे जाऊन गाडी ताब्यात घेतली, सध्या गाडी पेडणे पोलिस स्थानकावर ठेवण्यात आली आहे.
अपघातात गंभीर जखमी झालेल्या बाबूराव याला बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात येत असता त्याचे वाटेत निधन झाले. मृतदेहाची शवचिकित्सा झाल्यानंतर तो नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.
अपघाताला कारणीभूत ठरलेल्या मोहम्मद जमीर याला पेडणे पोलिसांनी अटक केली आहे. पेडणे पोलिस स्थानकाचे उपनिरीक्षक अजित उमर्ये अधिक तपास करत आहेत.
मयत बाबूराव तोरसे येथील मंगेश मोरे यांच्या घरी राहत होता. रविवार दि. २६ रोजी नागपंचमी असल्याने तो आज (२५ रोजी) संध्याकाळी आपल्या घरी जाणार होता. नागपंचमीला लागणारे साहित्य जमा करण्यात त्याच्या घरची मंडळी व्यस्त होती, या उत्सवाच्या पूर्वसंध्येलाच मिळालेल्या या दुःखद वृत्तामुळे गावडे कुटुंबीयांवर जणू आघात झाला आहे. बाबूराव मनमिळाऊ स्वभावाचा असल्याने त्याच्या अकाली मृत्यूमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
भास्करराव गद्रे
यांचे निधन

पुणे, दि.२५ (प्रतिनिधी) : गोवा १९६१ साली मुक्त झाल्यानंतर तेथील "बॅंको नासिओनाल अल्त्रामरिनो' ही पोर्तुगीज बॅंक ताब्यात घेण्यासाठी कस्टोडियन म्हणून काम केलेले भास्करराव रामचंद्र गद्रे यांच नुकतेच पुण्यामध्ये वार्धक्याने निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, दोन मुलगे, नातू व पणतवंडे असा परिवार आहे.
त्यांनी भारतीय बॅकिंग सेवेत अनेक जबाबदाऱ्या पार पाडल्या होत्या. निवृत्तीनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य करताना त्यांनी देशविदेशात त्यांनी महत्त्वाची पदे भूषवली होती. ते प्रामुख्याने स्टेट बॅंकेत होते. १९६१मध्ये गोवामुक्तीनंतर तेथील बॅंको नासिओनाल अल्त्रामरिनो ही पोर्तुगीज बॅंक ताब्यात घेण्यासाठी श्री. गद्रे यांची कस्टोडियन म्हणून नियुक्ती झाली होती. स्टेटबॅंकेच्या वतीने ते १९६३ ते ६५ या काळात कानपूरयेथील हिंदुस्थान कमर्शियल बॅंकचे जनरल मॅनेजर म्हणून नियुक्ती झाली होती. १९६५ मध्ये पाकिस्तान युद्धानंतर त्यांनी "डेप्युटी कंट्रोलर ऑफ एनिमी पॉपर्टी' म्हणून काम पाहिले. त्यासाठी त्यांचे कार्यालय मुंबईच्या हबीब बॅंकेत होते. त्याचबरोबर त्यांनी न्यूयॉर्क, लंडन व कोलंबो येथे स्टेट बॅंकेचे मुख्य अधिकारी म्हणून काम पाहिले. या त्यांच्या कामाच्या काळात त्या त्या देशाशी बॅंकिंगमधील अनेक नवे आर्थिक प्रकल्प विकसित झाले होते.
निवृत्तीनंतर ब्रिटनमधील त्यांनी केलेले हिंदू स्वयंसेवक संघ संघटनाचे काम सर्वांच्या सर्वांच्या लक्षात राहणारे होते. संघाच्या एका आंतरराष्ट्रीय मेळाव्यास ब्रिटनच्या माजी पंतप्रधान मार्गारेट थॅचर सर्ववेळ उपस्थित होत्या व संघ करीत असलेल्या कामाबद्दल त्यांनी गौरवोद्गार काढले होते. श्रीमती थॅचर यांना संघाच्या कामाच्या संपर्कात आणण्याचे श्रेय प्रामुख्याने भास्करराव गद्रे याना जाते. त्यांचे अजून सर्वांच्या लक्षात राहणारे काम म्हणजे ब्रिटिश संसदेत स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे तैलचित्र लावण्यात आले ते होय. त्यासाठी त्यंानी त्यांच्या ब्रिटनमधील कामाचा बराचसा वेळ खर्च केला. ब्रिटनमधील प्रत्येक संसदसदस्याला स्वा सावरकर यांचे मोठेपण पटवून देण्याचे काम त्यांनी अविश्रांतपणे केले होते.
त्यांच्या कार्यकालात त्यांना महात्मा गंाधी, जे कृष्णमूर्ती. राणी एलिझाबेथ आणि सोव्हिएत युनियनचे प्रमुख ख्रुश्र्चोव्ह यांच्याशी परिचय होण्याची संधी मिळाली होती. ते जे कृष्णमूर्ती यांच्या तत्वज्ञानाचे अभ्यासक होते. त्यांनी भारतात व परदेशातही मोठा लोकसंग्रह जमा केला होता.
अपहरण प्रकरणाला
नाट्यमय वळण

वास्को, दि. २५ (प्रतिनिधी- थरारक कारवाई करत पोलिसांनी खंडणीसाठी अपहरण केलेल्या वास्को येथील अय्याज सय्यद या युवकाला वाचवून, अपहरणासाठी वापरलेली गाडी (मारुती व्हॅन) ताब्यात घेतली आहे. त्यानंतर या प्रकरणाला नाट्यमय वळण लागले असून त्यान्वये, आठवड्यापूर्वी म्हापसा येथून मालकासह गायब झालेली हीच ती गाडी असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या गाडीचा बेपत्ता असलेला चालक सुदन दाभाळे कुठे आहे, असा यक्षप्रश्न निर्माण झाला असून त्याच्या जिवाचे बरेवाईट झाले असावे, असा संशय पोलिसांकडूनच वर्तवण्यात येत आहे.
दोन दिवसांपूर्वी चिखली, वास्को येथे राहणाऱ्या अय्याज सय्यद नामक २३ वर्षीय युवकाचे अपहरण करून त्याच्या परिवाराकडे १५ लाखांच्या खंडणीची मागणी करणाऱ्या टोळीच्या तावडीतून काल पोलिसांनी सय्यद याला सुखरूप सोडवले. या टोळीतील दोघा संशयितांना आत्तापर्यंत अटक करण्यात आली आहे. वास्को पोलिसांना अपहरणकर्त्यांनी सय्यद यास कुठे ठेवले आहे हे समजताच त्यांनी त्वरित कारवाई करत सय्यद याचा जीव वाचविला. या मोहिमेदरम्यान अपहरणकर्त्यांकडून तसेच पोलिसांकडून गोळीबार करण्यात आला होता. या गोळीबारादरम्यान पोलिसांना गोळी लागलेली नसल्याचा खुलासा आज करण्यात आला आहे.
पोलिसांनी काल केलेल्या कारवाईदरम्यान चार अपहरणकर्त्यांपैकी परीकित हंडी नामक एक अपहरणकर्त्याला ताब्यात घेतले होते. तसेच अपहरणासाठी वापरलेली "मारुती व्हॅन' वास्को पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर आज आणखी एका सनसनाटी घटनेवर प्रकाश पडला. त्यानुसार आठवड्यापूर्वी चालकासह गायब झालेली म्हापसा येथील हीच ती गाडी असल्याचे समजल्याने अजूनही बेपत्ता असलेला गाडीचालक सुदन दाभाळे कुठे गेला याबाबत पोलिसांचा गोंधळ उडाला आहे. काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याचा खून झाला असावा, असा संशय व्यक्त केला आहे.
दरम्यान याबाबत "गोवादूत' प्रतिनिधीने म्हापशाचे उपअधीक्षक सॅमी तावारीस यांना संपर्क केला असता त्यांनी सांगितले, उकसई म्हापसा येथील सुदन दाभाळे हा स्वतःच्या जीए ०१ आर ७९५४ क्रमांकाच्या मारुती व्हॅन गाडीत भाडे घेऊन गेला होता. तो पुन्हा परतला नसल्याची तक्रार नोंद केल्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी हे अपहरणाचे प्रकरण नोंद झाले. काल वास्को पोलिसांनी ताब्यात घेतलेली हीच ती गाडी असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. गाडी सापडली त्यावेळी अपहरणकर्त्यांनी गाडीच्या पुढच्या आणि मागच्या पट्टीवर वेगवेगळे बनावट क्रमांक लावले होते, अशी माहिती सूत्रांनी दिली.
दरम्यान, अपहरण करणारे संशयित पीर्णी वेर्णा येथे ते ३-४ महिन्यांपासून राहत होते अशी माहिती मिळाली असून संशयितांपैकी एक वास्कोत एका आस्थापनेत काम करत होता असेही उघडकीस आले आहे. दरम्यान काल अटक केलेल्या परीकित हंडी व आज सकाळी अटक केलेल्या श्रीनिवास व्यंकटेश ह्या दोन्ही अपहरणकर्त्यांविरुद्ध पोलिसांनी ३६३ (ए) व ५०६ (२) रेड विथ ३४ अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. वास्को पोलिसांनी त्यांना येथील प्रथम श्रेणी न्यायालयात उभे केले असता त्यांना ७ दिवसांच्या पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे. सूरज कुमार झा (बिहार) व इमिद अली (आसाम) अद्याप फरारी आहेत.