Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday, 8 January, 2011

अनुसूचित जमातीची पुन्हा घोर फसवणूक

‘उटा’चे नेते प्रकाश वेळीप खवळले
पणजी, दि. ८ (प्रतिनिधी)
‘एसटी’ आयोग व ‘एसटी’ कल्याण खाते ५ जानेवारी २०११पर्यंत कार्यन्वित करू, हे मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी ‘उटा’ संघटनेला दिलेले आश्‍वासन दुसरी मोठी थाप ठरली आहे. आपला शब्द पाळण्यात सपशेल अपयशी ठरलेल्या मुख्यमंत्र्यांनी एकार्थाने आपल्या कृतीतून ‘एसटी’ समाजाला डिवचण्याचाच प्रयत्न चालवला आहे. ‘एसटी’ समाजाला रस्त्यावर उतरल्याशिवाय कॉंग्रेस सरकारकडून न्याय मिळणार नसेल, तर त्यासाठीही भूमिपुत्र तयार आहेत व लवकरच त्याची प्रचिती देऊ, असा कडक इशारा ‘युनायटेड ट्रायबल अलायन्स असोेसिएशन’ (‘उटा’) चे निमंत्रक प्रकाश वेळीप यांनी दिला आहे.
‘उटा’ संघटनेतर्फे १६ डिसेंबर २००९ रोजी पणजीत विराट मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चावेळी सरकारकडून ताबडतोब ‘एसटी’ आयोग व ‘एसटी’ कल्याण खाते स्थापन करण्याचे लेखी आश्‍वासन दिले होते. या आश्‍वासनाच्या पार्श्‍वभूमीवर केवळ नाममात्र आदेश जारी करून या समाजाची बोळवण करण्यात आली. सरकारच्या या कृतीविरोधात नव्याने आंदोलनाची तयारी करून २९ डिसेंबर २०१० रोजी पणजीत मोर्चाचे आयोजन केले होते. या आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी ‘उटा’ संघटनेच्या पदाधिकार्‍यांना चर्चेसाठी आमंत्रित करून ५ जानेवारी २०११ पर्यंत ‘एसटी’ आयोग व ‘एसटी’ कल्याण खाते कार्यन्वित करण्याचे ठोस आश्‍वासन दिले होते. पूर्वीच्या आश्‍वासनाप्रमाणे आता हे आश्‍वासनही हवेत विरले आहे. या आश्‍वासनाबाबत अद्याप कोणतीच कार्यवाही झाली नसल्याने या समाजाचे नेते खवळले आहेत. ‘एसटी’ कल्याण खात्याचे कार्यालय सांतईनेज येथील सरकारी वसाहतीत स्थलांतर करण्यात आले आहे व ‘एसटी’ आयोगाबाबत कोणतीही पाऊले उचलण्यात आलेली नाहीत. समाजकल्याण संचालक एन.बी. नार्वेकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनीही याबाबत आपण अनभिज्ञ असल्याचे सांगितले.
‘एसटी’ समाजाच्या या मागण्यांबाबत राज्य सरकारकडून दाखवली जाणारी ही बेफिकिरी आता खरोखरच चिंतेचा विषय बनला आहे. खोटी आश्‍वासने देऊन सरकार या समाजाची मानहानीच करीत आहे, अशी टीका करून या सरकारला आंदोलनांची भाषा समजत असेल तर पुन्हा एकदा ‘एसटी’ समाजाला आपली ताकद दाखवणे भाग आहे. गोवा मुक्तीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षांत इथल्या भूमिपुत्रांवर ही परिस्थिती ओढवणे ही खरोखरच शरमेची गोष्ट आहे. भूमिपुत्र खवळला तर काय होईल याची प्रचिती लवकरच सरकारला येईल,असाही इशारा श्री. वेळीप यांनी दिला.

मच्छीमार व पारंपरिक बांधकामांना जीवदान!

किनारी नियमन क्षेत्र कायदा- २०११
अधिसूचना अखेर केंद्रकडून जारी

१९९१ नंतरच्या बेकायदा व्यापारी
बांधकामांवर ८ महिन्यांत कारवाई


पणजी, दि. ७ (प्रतिनिधी)
राज्यातील विविध किनारी भागांत १९९१ पूर्वीच्या २०० मीटर भरतीरेषेपर्यंत मच्छीमार व इतर पारंपरिक बांधकामांना खास सवलतीव्दारे संरक्षण देणारी तसेच १९९१ नंतर बेकायदा उभ्या राहिलेल्या व्यापारी बांधकामांवर आठ महिन्यांत कारवाई करण्याचे आदेश देणारी किनारी नियमन क्षेत्र कायदा- २०११ (सीआरझेड) अधिसूचना आज अखेर जारी करण्यात आली. केंद्रीय पर्यावरण व वनमंत्री जयराम रमेश यांनी जाहीर केलेल्या या अधिसूचनेचे स्वागत राज्याचे पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी केले.
आज सचिवालयातील परिषदगृहात बोलावण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत मंत्री सिक्वेरा यांनी ही माहिती दिली. याप्रसंगी पर्यावरण सचिव व्ही. के. झा व पर्यावरण खात्याचे संचालक मायकल डिसोझा हजर होते. ‘सीआरझेड’ अधिसूचना आजपासून संपूर्ण देशात लागू होणार आहे. गोव्याकडून सादर करण्यात आलेल्या बहुतांश मागण्या या अधिसूचनेत मान्य करण्यात आल्या आहेत.
‘सीआरझेड’-१९९१ च्या कायद्यानुसार किनारी भागांतील हजारो पारंपरिक लोकांच्या घरांवर गंडांतर आले होते. यासंबंधी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणीही सुरू आहे. ‘सीआरझेड’ २०११ च्या कायद्यानुसार दोनशे मीटरपर्यंतच्या पारंपरिक बांधकामांना संरक्षण मिळाले आहे, या बांधकामांच्या दुरुस्तीलाही मान्यता देण्यात आली आहे. ही सवलत फक्त मच्छीमार तथा इतर पारंपरिक लोकांना मिळेल असे स्पष्ट करताना बेकायदा व्यापारी बांधकामांची गय केली जाणार नाही, असेही या कायद्यात म्हटले आहे.
पर्यटन उद्योगानिमित्त उभारण्यात येणार्‍या शॅक्सना परवानगी देण्याची या कायद्यात विशेष सूट मिळाली आहे. मांद्रे, मोरजी, गालजीबाग व आगोंद हे किनारे कासव सवर्ंधन क्षेत्र म्हणून जाहीर झाले आहेत. त्यामुळे वन्यजीव संरक्षण कायदा, १९७२ नुसार या क्षेत्रात विकासात्मक कामांवर बंदी असेल. खाजन जमीन वापरासंबंधी व्यवस्थापन आराखडा तयार करून या जमिनीचे संरक्षण करावे, असेही या कायद्यात सुचवले आहे.
राज्य सरकारने मच्छीमार गावे अधिसूचित करावीत, जेणेकरून मच्छीमारसंबंधीत व्यवहारांना स्थानिक पंचायतीकडून परवाना देणे शक्य होईल,अशी सूचना या कायद्यात केली आहे. खाजन जमिनींचे मापन करण्यासह किनारी भागांतील खारफुटी वनस्पतीचेही संरक्षण करण्याचे बंधन या कायद्यात टाकण्यात आले आहे.
दरम्यान, या कायद्यात काही ठरावीक व जनहितार्थ प्रकल्पांना ‘सीआरझेड’ कायद्यात सूट देण्यात आली आहे. त्यासाठी स्थानिक किनारी नियमन क्षेत्र व्यवस्थापन तथा केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या विविध परवान्यांची अट लादण्यात आली आहे.

श्रीराम मंदिरासाठी लढा सुरूच राहणार - सिंघल

रामनाथी येथे ‘विंहिप’ची बैठक
फोंडा, दि.७ (प्रतिनिधी)
अयोध्येतील रामजन्मभूमीवर रामलल्ला मंदिरासाठी न्यायालयाच्या निकालानंतर मिळालेल्या लहान जागेत मंदिर होऊच शकत नाही. त्यामुळे तेथील संपूर्ण जमीन मंदिरासाठी मिळविण्यासाठी आंदोलन, संघर्ष करावा लागला तरी मागे हटणार नाही, अशी ग्वाही विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष अशोकजी सिंघल यांनी आज (दि.७) सकाळी रामनाथी येथे दिली आहे.
रामनाथी फोंडा येथील श्री रामनाथ देवस्थानचा आवारात आयोजित विश्‍व हिंदू परिषदेच्या केंद्रीय प्रन्यासी मंडळ व प्रबंध समितीच्या बैठकीचे समई प्रज्वलन करून उद्घाटन केल्यानंतर आंतरराष्ट्रीय अध्यक्ष श्री. सिंघल बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर आंतरराष्ट्रीय महामंत्री प्रवीण तोगाडिया, कार्याध्यक्ष वेदांतम्, संघटनमंत्री दिनेशजी, मधुभाई कुलकर्णी, कोषाध्यक्ष राघव रेड्डी, राजमाता चंद्रकांता देवी, आंतरराष्ट्रीय उपाध्यक्ष अशोक चौगुले, कोकण विभागाचे अध्यक्ष देवकीनंदन जिंदाल, राजेंद्र गायतोंडे, दिलीप गायतोंडे आदी मान्यवर उपस्थित होते.
श्री. सिंघल म्हणाले की, संपूर्ण जगात हिंदूचा अपमान होत आहे. हिंदूचे सन्मानपूर्वक जीवन जगणे कठीण होत चालले आहे. विदेश आणि देशातही काही हिंदूंना आपल्या घरादारावर पाणी सोडून सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा लागत आहे. हिंदू समाजामध्ये संघटन शक्तीच्या अभावामुळे हिंदूंना ही अपमानास्पद वागणूक मिळत आहे. हिंदूंकडे कुणाचीही बोट उचलून दाखविण्याची हिंमत होणार नाही. असा कणखर, बाणेदार हिंदू समाज निर्माण करण्याची नितांत गरज आहे. गुजरातमध्ये हिंदू समाज एकजूट व कणखर असल्याने त्यांच्याकडे बोट दाखविण्याची कुणाची हिंमत होत नाही.
न्यायालयाच्या निकालानंतर मंदिर निर्माण कार्याला पुन्हा गती प्राप्त झाली आहे. मात्र, छोट्या जागेत श्रीरामाचे मंदिर होऊ शकत नाही. देशभरात श्रीराम मंदिर निर्माणाच्या कार्याला गती मिळविण्यासाठी हनुमंत शक्ती जागरण अभियान सुरू करण्यात आले आहे. या अभियानाच्या माध्यमातून हिंदूंना एकजूट करण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. गावा गावातून अभियानाच्या माध्यमातून श्रीराम मंदिराबाबत जनजागृती केली जात आहे. श्री हनुमान जयंती, श्री राम नवमी कार्यक्रमाच्या माध्यमातून मंदिर निर्माण कार्याला गती देण्यासाठी उपक्रम होती घेतले जाणार आहेत, असेही श्री. सिंघल यांनी सांगितले.
हिंदू समाजात एकजूट, एकोपा निर्माण करण्यासाठी विश्व हिंदू परिषदेची स्थापना झालेली आहे. हिंदू समाजामध्ये मंत्र शक्तीच्या माध्यमातून आत्मविश्वासाचे वातावरण निर्माण केल्यास हिंदू समाज कणखर बनू शकतो. हिंदू समाज कणखर बनल्यास कोणत्याही शक्तीच्या विरोधात लढण्याची ताकद त्यांच्यात निर्माण होऊ शकते, असे ते म्हणाले.
राम मंदिर निर्माण आंदोलन हे फक्त मंदिर निर्माण करण्याचे आंदोलन नसून देशात एक कणखर हिंदू समाज निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. श्रीराम जन्मभूमीबाबतच्या न्यायालयाच्या निर्णयामुळे हिंदू समाजात आत्मविश्वास निर्माण झाला आहे. संपूर्ण हिंदू समाजाच्या एकजुटीतून मंदिर निर्माणाचे कार्य केले जाणार आहे, असेही श्री. सिंघल यांनी सांगितले.
कॉंग्रेसचे नेतेे मुस्लिमांची मते आणि सहानुभूती मिळविण्यासाठी हिंदू संघटनांवर खोटारडे आरोप करीत आहेत. हिंदूवर दबाव आणून त्यांना चिरडण्याचा कुटील डाव आहे, असा आरोप श्री. सिंघल यांनी केला.
परिषदेचा धर्म रक्षा निधी उभारण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. संघाच्या विविध योजना मार्गी लावण्यासाठी निधीची गरज भासते. तसेच स्थानिक विभाग स्वावलंबी बनल्यास संघाच्या योजना मार्गी लावण्यात अडचणी येणार नाहीत. तसेच २०१४ साली संघाला पन्नास वर्षे पूर्ण होत असल्याने सुवर्ण महोत्सवी वर्षातील उपक्रम, कार्यक्रमावर चर्चा केली जाणार आहे. या सुवर्ण महोत्सवानिमित्त विदेशात आयोजित कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. परिषदेच्या कार्यात नवीन होतकरू तरुणांचा सहभागावर विचार केला जाणार आहे, असेही श्री. सिंघल यांनी सांगितले.
विश्व हिंदू परिषदेच्या तीन मोठ्या बैठका गोव्यात घेण्यात आल्याने परिषदेच्या गोव्यातील कार्याला मोठ्या प्रमाणात चालना मिळाली. गोव्यात हिंदू संस्कृती व संघटनात्मक कार्य हाती घेण्यात आले आहे. गोवा भूमी ही परशुराम भूमी आहे, असे अशोक चौगुले यांनी सांगितले.
सेवा विभागातील मधुकर दीक्षित यांनी सेवाविभागाच्या कार्याचा आढावा घेतला. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत तसेच आशियाई क्रीडा स्पर्धेत पदक पटकावणारी कविता राऊन हिने परिषदेच्या आश्रमात राहून शिक्षण घेऊन देशाचे नाव उज्ज्वल केले आहे. विश्‍व हिंदू परिषदेतर्फे चालविण्यात येत असलेल्या गोव्यातील महिला आश्रमाला सामाजिक सेवा पुरस्कार हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्राप्त झाला आहे, असे श्री. दीक्षित यांनी सांगितले.
महिला आश्रमाचे कार्य सांभाळणार्‍या जगन्नाथ मणेरीकर यांचा अशोकजी सिंघल यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. वेदमंत्राच्या घोषात दीप प्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर गौरीश तळवलकर यांनी ओंकार स्वरूपा हा अभंग सादर केला. बैठक आयोजन समितीचे अध्यक्ष दिलीप गायतोंडे यांनी स्वागत केले. कोकण विभागाचे अध्यक्ष देवकीनंदन जिंदाल यांनी प्रास्ताविक केले. सेवा विभागाच्या डॉ. अनिता तिळवे यांनी मान्यवरांची ओळख केली. सूत्रसंचालन दीपक गायकवाड यांनी केले. उद्घाटन सोहळ्याचे आभार प्रदर्शन महेश बांदेकर यांनी केले. या बैठकीत देश आणि विदेशातील सुमारे २५० प्रतिनिधी सहभागी झाले आहेत.

एका दिवसाच्या बंदनंतर बेळगावची भाजी गोव्यात

पणजी, दि. ७ (प्रतिनिधी)
बेळगावहून गोव्यात येणार्‍या भाजीचा पुरवठा फक्त एक दिवस बंद केल्यानंतर बेळगावातील ठोक दरात भाजी विकणार्‍या व्यापार्‍यांनी आज दि. ७ रोजी गोव्यात भाजी पाठवली. त्यामुळे भाजीअभावी ओस पडलेली भाजीची दुकाने पुन्हा सुरू झाली आहेत. बेळगावातील भाजी गोव्यात दाखल झाल्यामुळे बेळगावच्या भाजीवर विसंबून असलेल्या गोव्यातील भाजीप्रेमींनी सुटकेचा सुस्कारा सोडला मात्र आज गोव्यात दाखल झालेली भाजी पूर्वीच्याच दरात म्हणजे महागच आहे. कांदे ६० रु. प्रति किलो तर टॉमाटो ३० रु. प्रति किलो दराने उपलब्ध आहेत. इतर भाज्यांच्या दरात मोठासा फरक नसून सर्व भाज्या महागच म्हणजेच ३५ ते ४० रु. प्रति किलो दराने विकण्यात येत आहेत.

नेपाळी कामगाराचा पणजीत निर्घृण खून

पणजी, दि. ७ (प्रतिनिधी)
येथील रमेश लालबहादूर डांगी (३१) या मुळच्या नेपाळी कामगाराच्या डोक्यावर दगड घालून त्याचा खून करण्यात आल्याची घटना घडली आहे. पणजी पोलिसांनी अज्ञाताविरोधात ३०२ कलमानुसार खुनाचा गुन्हा नोंद केला आहे. आज सकाळी ही घटना उघडकीस आली. पोलिस मुख्यालयापासून काही अंतरावर असलेल्या कॅफे उडपीच्या बाहेर रमेश याचा मृतदेह पडला होता. पोलिसांनी पंचनामा करून चिकित्सा करण्यासाठी तो बांबोळी येथे गोमेकॉत पाठवून दिला. यासंदर्भात दिवसभरात पणजी पोलिसांनी चौकशीसाठी दहा जणांना ताब्यात घेतलेे.
गेल्या आठ वर्षापासून रमेश हा गोव्यात राहत होते. काही महिन्यापूर्वी तो एका कॅसिनोतही नोकरीला होता. मात्र कॅसिनोवरील नोकरी सुटल्यानंतर तो हॉटेल कॅफे उडपीच्या बाहेरच झोपत होता. झोपण्यासाठी उशी म्हणून ज्या दगडाचा रमेश वापर करीत होता त्याच दगडाच्या साहाय्याने त्याचा खून करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी तो दगडही ताब्यात घेतला आहे.
काल रात्री दारूच्या नशेत असलेले काही तरुण त्याठिकाणी भांडण करीत होते. त्यातूनच हा खून रात्री २ ते ३ या दरम्यान झाला असावा असे पोलिसांनी सांगितले. मयत रमेश याचा भाऊ, आणि भावोजी गोव्यात राहत असून त्यांनी रमेशच्या मृतदेहावर दावा केला आहे. शवचिकित्सा उद्या केला जाणार आहे. याविषयीचा तपास पणजी पोलिस स्थानकाचे निरीक्षक संदेश चोडणकर करीत आहेत.

पेडणे नगरसेविका रेषा माशेलकर यांचे निधन

पेडणे, दि. ७
पेडण्याच्या माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेविका सौ. रेषा सुरेश माशेलकर यांचे आज (शुक्रवारी) संध्याकाळी उशिरा बांबोळीतील गोमेकॉ इस्पितळात उपचार सुरू असताना निधन झाले. त्यांच्या पश्‍चात पती, पुत्र व कन्या असा परिवार आहे. उद्या (शनिवारी) सौ. रेषा यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या अकाली निधनामुळे पेडणे परिसरावर शोककळा पसरली असून अनेकांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
पेडण्यातील विविध धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक तथा शैक्षणिक संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता. धडाकेबाज नेतृत्व असा लौकिक त्यांनी आपल्या कार्यशैलीद्वारे संपादन केला होता. त्यांनी उपनगराध्यक्ष हे पदही भूषवले होते. पेडण्याचे विद्यमान नगराध्यक्ष डॉ. वासुदेव देशप्रभू यांनी त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे.

भाजप कार्यकारिणी बैठक आजपासून

गुवाहाटी, दि. ७
अनेक मोठ्या घोटाळ्यांमध्ये अडकलेल्या केंद्रातील संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारची आणखी कोंडी करण्याची तयारी भाजपाने पूर्ण केली आहे. उद्या शनिवारपासून भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची दोन दिवसीय बैठक गुवाहाटी येथे प्रारंभ होत असून, भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून संपुआविरुद्ध प्रखर हल्ला चढविण्याची रणनिती या बैठकीत तयार करण्यात येणार आहे.
स्पेक्ट्रम घोटाळाच
झाला नसल्याचा दावा

नवी दिल्ली, दि. ७
२-जी स्पेक्ट्रमच्या वाटपामुळे देशाच्या तिजोरीला १.६७ लाख कोटी रुपयांचा ङ्गटका बसला असताना आणि या घोटाळ्याच्या चौकशीसाठी संयुक्त संसदीय समिती गठित करण्याची प्रभावी मागणी विरोधकांकडून होत असतानाच सरकारने आज अङ्गलातून भूमिका घेत स्पेक्ट्रमच्या वाटपात एका पैशाचाही घोटाळा झाला नसल्याचा दावा केला आणि नियंत्रक आणि महालेखाकार कार्यालयाने (कॅग) चुकीचा आकडा सादर केला असल्याची प्रखर टीकाही केली.

राजाविरूद्ध खटल्यास
न्यायालयाची संमती

नवी दिल्ली, दि. ७
२-जी स्पेक्ट्रम घोटाळ्यासंबंधी माजी केंद्रीय दळणवळणमंत्री ए. राजा यांच्यावर खटला चालविण्यासंबंधी जनता पक्षाचे अध्यक्ष डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी दाखल केलेली वैयक्तिक तक्रार दखलपात्र आहे, असा निर्वाळा दिल्ली न्यायालयाने आज दिला आहे.

आज चेतन देसाई यांची जबानी

म्हापसा, दि. ७ (प्रतिनिधी)
गणेशराज नार्वेकर बनावट दाखलाप्रकरणी म्हापसा पोलिस ठाण्यावर दाखल झालेल्या तक्रारीसंबंधात उद्या शनिवारी गोवा क्रिकेट असोसिएशनचे तत्कालिन सचिव चेतन देसाई हे म्हापसा पोलिस स्टेशनवर आपली जबानी देणार आहेत, अशी माहिती उपलब्ध झाली आहे. डॉ.शेखर साळकर यांनी यासंबंधातील तक्रार नुकतीच नोंदविली आहे. त्या अनुषंगाने देसाई यांची जबानी नोंदवून घेतली जाणार आहे.

Friday, 7 January, 2011

सांगे परिसर हादरला

जोरदार धक्क्यामागील कारणाचे गूढ कायम
कुडचडे, दि. ६ (प्रतिनिधी): सांगे तालुक्यातील उगे व आसपासच्या परिसरात आज (गुरुवारी) सकाळी सात वाजण्याच्या दरम्यान जोरदार धक्का बसल्याने लोकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. सुदैवाने या घटनेत कसल्याही स्वरूपाची वित्त अथवा जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र भूकंप की खाणीच्या ब्लास्टिंगमुळे हा धक्का बसला यामागचे गूढ अद्याप कायम आहे.
अधिकृतरीत्या याबाबत कोणतीच माहिती न मिळाल्याने स्ङ्गोट व त्यापाठोपाठ जाणवलेला धक्का नेमका कशामुळे झाला हे समजू शकले नाही.
उगे येथील सौ. स्वेता सत्यवान नाईक यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे त्या सकाळी स्वयंपाकघरात भाजी करत असताना मोठा आवाज होऊन जमीन हलू लागली, यापूर्वी ब्लास्टिंगमुळे घराच्या खिडक्यांची तावदानेच हादरत असत. सकाळी मात्र सारी जमीन हादरली.
सांगे येथील प्रिया मोरजकर या गृहिणी सकाळी घरात काम करत असताना घरातील भांडी, खुर्ची, पिशव्या जमिनीवर पडल्याने मुले घाबरून घराबाहेर गेल्याचे त्यांनी सांगितले.
बेकरीमध्ये पाव तयार करण्यासाठी एकावर एक रांगेत ठेवलेल्या स्टील प्लेट्स जमीन हादरल्याने खाली कोसळल्याची माहिती माजी नगराध्यक्षा श्रीमती आग्नेला डिकॉस्टा यांनी सांगितले.
कोयना धरणाप्रमाणेच साळावली धरणाजवळ भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याची चर्चा सांगे परिसरात सकाळपासून सुरू आहे. दिवसभर सांगे बाजारात लोकांमध्ये याविषयी उलटसुलट चर्चा सुरूच होती. साळावली धरणावर सुरक्षा कारणांमुळे लोकांना यापूर्वीच मनाई करण्यात आल्याने भूकंपामुळे धरणाच्या भिंतीला धोका निर्माण झालेला नाहीना याविषयी शंका व्यक्त केल्या जात होत्या.
गेल्या वर्षी वालकिणी भागात अशाच प्रकारचा स्फोट होऊन शाळा व घरांच्या भितींना भेगा पडल्या होत्या. त्यामुळे आज सकाळी पुन्हा तसाच धक्का बसल्याने लोकांची भीतीने गाळण उडाली. काही इमारतींना तडे गेले. अनेकजण त्यानंतर ‘भूकंप भूकंप’ असे जोरजोराने ओरडत घराबाहेर धावताना दिसत होते.
धरणाच्या पाणलोट क्षेत्रात छोटे मोठे धक्के सातत्याने बसत असतात. त्यात नवे काहीच नाही. मात्र सकाळचा धक्का जास्त काळ टिकल्यामुळे लोक धास्तावले आहेत. टी.व्ही. चॅनेल्स व पत्रकारांनी साळावली धरणाच्या जलस्त्रोत खात्याचे अभियंते रवींद्र यारागट्टी यांना भेटून धरणाला कोणताही धोका जाणवल्याचे विचारले असता यासंबंधी कोणतीही माहिती देण्याचे त्यांनी नाकारले आणि मुख्य अभियंत्याकडून लेखी परवानगी आणण्यास सांगितले. यानंतर धरण परिसरातील तपासणी करण्यासाठी अभियंत्यांसह इतर अधिकारी आत गेले असता पत्रकारांना गेटमधून प्रवेश नाकारण्यात आला. तसेच धरणाच्या सुरक्षेबद्दल कोणतीही माहिती देण्यास मनाई करण्यात आली. या ठिकाणी असलेल्या यंत्रणेद्वारे भूकंपाची माहिती मिळू शकली असती; पण अभियंत्याकडून यासंबंधी माहिती न मिळाल्याने लोकांना तर्कवितर्क करण्यावरच समाधान मानावे लागले.
-------------------------------------------------------------
कानठळ्या बसवणारा आवाज झाला आणि..
सांगे, उगे भाटी, विलीयण, तारीपांटो, मुगोळी, दांडो, शेळपे व इतर परिसरात मोठा आवाज झाल्यानंतर संपूर्ण जमीन सुमारे १५ सेंकदांपर्यंत हादरली यावेळी लोकांच्या घरांतील भांडी व चीजवस्तू खाली कोसळल्या. त्याचबरोबर लोकांनीही घरातून जिवाच्या आकांताने धूम ठोकली. स्थानिक पोलिसांनीही या धक्क्यासंदर्भात कोणतीही माहिती देण्यास असमर्थता व्यक्त केली.

तीन कोटींची मालमत्ता वेर्णातील आगीत खाक

‘ओमेगा फायबर’मध्ये सुदैवाने जीवितहानी नाही
वास्को, दि. ६ (प्रतिनिधी): वेर्णा औद्योगिक वसाहतीतील ‘ओमेगा फायबर फॅक्टरी’त
आज पहाटे ३.३० सुमारास आग लागून तेथील सामान व इतर साहित्य मिळून सुमारे तीन कोटींची मालमत्ता खाक झाली. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. अग्निशामक दलाच्या पाच बंबांनी सुमारे चार तास शर्थीची झुंज दिल्यानंतर आग विझवण्यात यश प्राप्त झाले. आगीचे नेमके कारण स्पष्ट झाले नसले तरी ‘शॉर्ट सर्किट’मुळे ती लागली असावी, असा प्राथमिक अंदाज अग्निशामक दलाने व्यक्त केला आहे.
या कारखान्यासमोरील ‘ऑप्टिक फायबर’ नावाच्या कारखान्यातील एका कर्मचार्‍याने ज्वालांचे तांडव पाहताच याची माहिती वेर्णा अग्निशामक दलाला दिली. त्यानंतर वेर्णा अग्निशामक दलाचा १, मडगाव अग्निशामक दलाचा २, पणजी अग्निशामक दलाचा १ व वास्को अग्निशामक दलाचा १ मिळून एकूण पाच बंब त्वरित घटनास्थळी दाखल झाले.
अग्निशामक दलाच्या जवानांनी त्वरित आगीवर नियंत्रण आणण्याच्या कार्यास सुरुवात केली. आगीची भीषण तीव्रता लक्षात घेता ९५ हजार लीटर पाणी ही आग विझवण्यासाठी वापरण्यात आले.
दलाच्या अधिकार्‍यांकडून मिळालेल्या माहितीनुसार ‘ओमेगा फायबर फॅक्टरी’त ‘फायबर ग्लास’ बनवण्यात येत असून पहाटे लागलेल्या आगीमुळे येथे असलेले सामान, यंत्रे व इतर गोष्टी पूर्ण खाक झाल्या. कारखान्याच्या भिंती भेगाळल्या. छपराचा बहुतेक भाग कोसळल्याचे सांगण्यात आले. आगीमुळे कारखान्याच्या मालकाला किती नुकसान सोसावे लागले याबाबत अजून पूर्ण माहिती उपलब्ध झाली नसल्याचे वेर्णा अग्निशामक दलाचे प्रमुख एस. व्ही. पाळणी यांनी सांगितले. कारखान्याचे मालक मंजितसिंग यांच्याशी संपर्क साधला असता, हानीचा आकडा तीन कोटींहून अधिक असू शकतो, असे त्यांनी सांगितले.
ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी असा अंदाज अग्निशामक दलाच्या अधिकार्‍यांनी व्यक्त केला. वीज खात्याला यासंदर्भात कारखान्याचे सर्वेक्षण करून आग लागण्यामागचे कारण शोधण्याबाबत कळवण्यात आल्याची माहिती देण्यात आली. सदर फॅक्टरी’ च्या बाजूला अन्य काही कारखाने असून आगीबाबत अग्निशामक दलाला ताबडतोब माहिती मिळाल्याने संभाव्य अनर्थ टळला. आग अन्यत्र फैलावली नाही. दुपारपर्यंत अग्निशामक दलाचे जवान येथे काही ठिकाणी छोट्या मोठ्या वस्तूंना लागलेली आग विझवत असल्याचे दिसून आले.
नितीन रायकर, एस. व्ही. पाळणी, जी. बी. शेट्ये, बॉस्को फेर्राव आदी अग्निशामक अधिकार्‍यांनी घटनास्थळी उपस्थित राहून जवानांना आग विझवण्याबाबत मार्गदर्शन केले.
वेर्णा पोलिसांना सदर घटनेची माहिती मिळताच त्यांनी त्वरित घटनास्थळी दाखल होऊन अग्निशामक दलाला मोठ्या प्रमाणात सहकार्य केले. पोलिसांनी आगीच्या घटनेचा पंचनामा केला. नववर्षाच्या सुरुवातीपासून मुरगाव तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी आग लागण्याच्या घटना घडल्या असून आजची घटना (मुरगाव तालुक्यात) सर्वांत भयंकर घटना असल्याचे अग्निशामक दलाच्या अधिकार्‍यांनी त्यांच्याशी संपर्क केला असता सांगितले.
आग विझवण्यात आल्यानंतर कारखान्यात काही पत्रकार गेले असता येथील सर्व वस्तू, सामुग्री, यंत्रे व इतर साहित्य खाक झाल्याचे त्यांना दिसून आले.
-----------------------------------------------------------
छपराचे पत्रे भेदून ज्वाळा उफाळल्या
आगीचे स्वरूप असे भयावह होते की, कारखान्याच्या छपराचे पत्रे भेदून ज्वाळा उफाळत होत्या. दाट धुक्यात लांबूनही आगीचे तांडव दिसत होते. पाच बंबांनी चार तास शर्थीची झुंज दिल्यानंतरच
ही भयंकर आग आटोक्यात आली.

पोलिस खात्याचीच नव्याने रचना करा

भाजपने काढले गृह खात्याचे वाभाडे
पणजी, दि. ६ (प्रतिनिधी): पोलिस अधिकारी व गुन्हेगार यांच्यातील साट्यालोट्याची मालिकाच उजेडात येत असताना गृहमंत्री रवी नाईक व वरिष्ठ पोलिस अधिकारी त्यांना ‘क्लीनचीट’ देत सुटले आहेत. अमली पदार्थविरोधी पथकाचे माजी पोलिस उपनिरीक्षक सुनील गुडलर यांच्याकडूनही विदेशी महिलांना ड्रग पुरवण्याचे कथित प्रकरण उघड झाल्याने आता गृह खात्याचे वस्त्रहरण झाले आहे. या सर्व घटनांच्या पार्श्‍वभूमीवर गृहमंत्र्यांसह संपूर्ण पोलिस खात्याचीच पुनर्रचना करा, अशी जोरदार मागणी भाजपचे प्रवक्ते राजेंद्र आर्लेकर यांनी आज येथे पत्रपरिषदेत केली.
श्री. आर्लेकर यांनी पोलिस खात्याचा कारभाराचे अक्षरशः वाभाडे काढले. यापूर्वी पोलिस व ड्रग माफिया यांचे साटेलोटे उघड केल्यानंतर आता उपनिरीक्षक गुडलर यांचेही कारनामे जनतेसमोर ठेवलेल्या मीडियाचे श्री. आर्लेकर यांनी अभिनंदन केले. पोलिस व ड्रग माफियासंबंधांची चौकशी करणारे गुडलर हेदेखील वादाच्या भोवर्‍यात अडकल्याचे स्पष्ट झाल्याने या प्रकरणाची चौकशी कोणत्या पद्धतीने होत असेल याचा विचार न केलेलाच बरा,असा टोलाही श्री.आर्लेकर यांनी हाणला.
ड्रगप्रकरणी चौकशीतून काहीही निष्पन्न झाले नसतानाच सदर प्रकरणाचा तपास करणारे गुन्हे विभागाचे उपअधीक्षक चंद्रकांत साळगावकर यांचा मुख्यमंत्री पदकाने गौरव केला जातो यावरून गृह खाते कुठल्या दिशेने भरकटत चालले आहे, याचा अंदाज येतो,असेही ते म्हणाले. गृह खात्यावरील आरोपांवरून विरोधक जनतेची दिशाभूल करतात असा दावा करणारे गृहमंत्री रवी नाईक यांनी आता नक्की कोण दिशाभूल करतो, याचा जनतेला जाब द्यावा, असे त्यांनी बजावले.
या सर्व प्रकारानंतर गृहमंत्री रवी नाईक यांचा पोलिस खात्यावरील ताबा पूर्णपणे सुटल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे त्यांच्याकडून गृह खाते काढून घेण्याबरोबर संपूर्ण खात्याची पुनर्रचना करा, अशी मागणी आर्लेकर यांनी केली. पोलिस खात्यात अनेक कर्तबगार व प्रामाणिक अधिकारी आहेत. त्यांच्याकडे महत्त्वाची पदे देण्यात यावीत. पोलिसच सामील असलेल्या या प्रकरणाची चौकशी स्वतंत्र संस्था किंवा ‘सीबीआय’ मार्फत करण्यात यावी, या मागणीशी भाजप ठाम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आरोग्यमंत्र्यांची चौकशी ‘सक्तवसुली’मार्फत व्हावी
आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांच्या कार्यालयांवर आयकर खात्याने छापे टाकल्याचे वृत्त सर्वत्र झळकले आहे. मुळात गेल्या काही काळात आरोग्यमंत्र्याच्या संशयास्पद व्यवहारांची यापूर्वीच चौकशी होण्याची गरज होती. विश्‍वजित राणे यांचे गैरकारभार उघड होण्यासाठी त्यांची व सत्तरी युवा मोर्चा संघटनेच्या व्यवहारांची सक्तवसुली विभागामार्फतच चौकशी व्हायला हवी, अशी मागणीही आर्लेकर यांनी केली. बांबोळी येथे ‘पीपीपी’ तत्त्वावर ‘सुपरस्पेशलिटी’ इस्पितळ उभारण्यासाठी एका इस्रायली कंपनीकडे केलेल्या कराराचाही सखोल तपास व्हावा. विश्‍वजित राणे यांना आपले सर्व व्यवहार स्वच्छ आहेत,असे वाटत असेल तर त्यांनी या चौकशीला सामोरे जावे आणि जनतेच्या मनातील संशय दूर करावा, असेही आर्लेकर म्हणाले.

भाजपचे राज्य सचिव मनोहर आडपईकर यांच्यावर हल्ला

फोंडा, दि.६ (प्रतिनिधी): येथील प्रसिद्ध वकील तथा भाजपचे राज्य सचिव अँड. मनोहर आडपईकर यांच्या कार्यालयात आज (दि.६) संध्याकाळी ६.३० च्या सुमारास एका युवकाने घुसून त्यांच्यावर जोरदार हल्ला करून त्यांना जखमी केले आहे.
श्री. आडपईकर तिस्क फोंडा येथील आपल्या कार्यालयात काम करीत असताना एक युवक त्यांच्या कार्यालयात घुसला. यावेळी श्री. आडपईकर कपाटातील एक पुस्तक शोधत असल्याने त्या युवकाने सुरुवातीला श्री. आडपईकर यांच्या पायावर हल्ला चढविला. नंतर त्यांनी प्रतिकाराचा प्रयत्न केला असता त्यांच्या तोंडावर जोरदार ठोसा मारल्याने श्री. आडपईकर जखमी होऊन जमिनीवर कोसळले. त्यामुळे संशयित युवकाने पलायन केले.
श्री. आडपईकर यांनी आरडाओरड केल्याने त्यांच्या कार्यालयाजवळील अँड. दत्ता तिळवे यांनी त्यांच्या कार्यालयाकडे धाव घेतली आणि जखमी आडपईकर यांना येथील सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचार केल्यानंतर आडपईकर यांना बांबोळी येथील सरकारी हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले.
श्री. आडपईकर यांच्या तोंडावर ठोसा मारल्याने त्यांना बोलणेे कठीण बनले आहे. त्यामुळे पोलीस उशिरापर्यंत त्यांची जबानी घेऊ शकले नाहीत. हल्लेखोराबाबत श्री. आडपईकर यांच्याकडून माहिती मिळविण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. सदर प्रकरणी संशयावरून एकाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आला आहे. या हल्ल्याचे कारण स्पष्ट झालेलेे नाही. याप्रकरणी निरीक्षक सी. एल. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संजय दळवी तपास करीत आहेत.

मंदिर महासंघाचे उद्या उद्घाटन

पणजी, दि. ६ (प्रतिनिधी): गोव्यात गेल्या काही वर्षात अनेक चोर्‍या व देवांच्या मूर्ती भंजनाचे प्रकार घडलेत. मात्र सरकार सदर प्रकारावर नियंत्रण आणू शकलेले नाही. त्यामुळे आता भाविकांनाच एकत्र येऊन आपल्या धार्मिक स्थळावरील होणारे आघात रोखण्याची गरज आहे. सरकारने याप्रकरणी आपले ठोस धोरण जाहीर करावे, अशी जोरदार मागणी हिंदू जनजागृती समितीचे प्रवक्ते रमेश शिंदे यांनी आज येथे केली.
येथील मनोशांती हॉटेलच्या सभागृहातील पत्रपरिषदेत श्री. शिंदे बोलत होते. यावेळी मंदिर आणि धार्मिक संस्था महासंघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष चंद्रकांत पंडित (म्हापसा), उपाध्यक्ष राजकुमार देसाई (पर्वरी), समन्वयक जयेश थळी (बार्देश), शिवप्रसाद जोशी ( पेडणे), महाबळेश्वर चिबडे (डिचोली) व अर्जुन नाईक (मडगाव) हे मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
श्री. शिंदे म्हणाले, मंदिरावरील व धार्मिक स्थळावर होणारे आघात रोखून सर्वांना एकत्र आणून देवस्थानांच्या सुरक्षेसंदर्भात उपाययोजना करण्यासाठी मंदिर महासंघाची गरज असून महाराष्ट्राप्रमाणे गोव्यातही महासंघ स्थापण्यात येत आहे ही आनंदाची गोष्ट आहे. हिंदूंच्या धार्मिक स्थळाकडे विद्यमान सरकार दुर्लक्ष करत आहे.
कायद्याची तथा पोलिसांची भीती चोरांना नसल्यानेच हे सर्व प्रकार घडत असून यावर सरकारने गंभीरपणे विचार करावा, असे सरकारला श्री शिंदे यांनी आवाहन केले.
सर्व मंदिरात समन्वय निर्माण व्हावा, भाविकांना योग्य सुविधा मिळून मंदिरातून समाजहितकारी कार्ये घडावीत यासाठी महासंघ स्थापन करण्यात येत असून जास्तीत जास्त मंदिर समिती सदस्यांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन जयेश थळी यांनी केले. महासंघाचे अध्यक्ष भाई पंडित यांनी भाविकांना धार्मिक सुरक्षा व मंदिर सुरक्षा यासाठी सर्व हिंदू बांधवांनी या महासंघात सहभागी व्हावे असे आवाहन केले. उपाध्यक्ष राजकुमार देसाई यांनी मंदिरे धार्मिक क्षेत्राबरोबरच सामाजिक केंद्रे बनावीत यासाठी महासंघ प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
-----------------------------------------------------
महासंघाचे उद्घाटन पर्वरीत
येत्या ८ तारखेला पर्वरी येथील संत गाडगे महाराज सभागृहात संध्याकाळी ४.०० वाजता ‘गोमंतक मंदिर आणि धार्मिक संस्था महासंघा’चे उद्घाटन होणार आहे. दि. ९ रोजी विश्‍व हिंदू परिषदेची जाहीर सभा असल्याने हा कार्यक्रम दि. ८ रोजी ठेवण्यात आल्याचे श्री. थळी यांनी स्पष्ट केले.
तेलंगणवरील समितीचा अहवाल जाहीर
नवी दिल्ली, दि. ६ : आंध्र प्रदेशचे विभाजन करून वेगळ्या तेलंगणा राज्याची निर्मिती करण्यात यावी, या मागणीवरून केंद्र सरकारने नेमलेल्या श्रीकृष्ण समितीचा अहवाल आज गृहमंत्रालयाने सार्वजनिक केला. या अहवालात समितीने सहा पर्याय सुचविले आहेत. मात्र, यातील पहिले तीन पर्याय अव्यवहार्य आहेत, असे श्रीकृष्ण समितीनेच सांगून ते ङ्गेटाळून लावले आहेत. ‘तेलंगणा राष्ट्र समिती’ने (टीआरएस) श्रीकृष्ण समितीचा अहवाल ङ्गेटाळून लावताना वेगळ्या तेलंगण राज्याची निर्मिती व्हायलाच पाहिजे, असा सूर कायम ठेवला आहे.
राष्ट्रकुलप्रकरणी सीबीआयचे छापे
नवी दिल्ली, दि. ६ : कोट्यवधी रुपयांच्या राष्ट्रकुल घोटाळा प्रकरणी राष्ट्रकुल आयोजन समितीचे प्रमुख सुरेश कलमाडी यांची बुधवारी तब्बल आठ तास कसून चौकशी केल्यानंतर सीबीआयने राजधानी दिल्लीत कलमाडींच्या निकटवर्तीयांच्या दहा ठिकाणांवर धाडसत्र राबविले. सीबीआयने या प्रकरणी आज चौथा एङ्गआयआर नोंदविला.
पाकने निर्यात रोखल्याने कांदे पुन्हा महागले
चंदीगड, दि. ६ : भारतातील कांद्याची दरवाढ दिसत असतानाही पाकिस्तानने वाघा-अटारी या जमीन मार्गाने कांद्याच्या निर्यातीवर बंदी आणली आहे. आज पाकिस्तानी प्रशासनाने पाकमधून कांदे घेऊन येणार्‍या एकाही ट्रकला भारतीय हद्दीत जाऊ दिले नाही. त्यामुळे कांद्याचे दर खाली आणण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न विफल ठरून कांद्याचे दर पुन्हा वाढलेय
आरुषी प्रकरणी आज निकाल
गाझियाबाद : आरुषी-हेमराज हत्याकांड प्रकरणाची चौकशी बंद करण्याच्या सीबीआयच्या अहवालावर उद्या विशेष न्यायालयात निर्णय घेतला जाणार आहे. विशेष न्यायाधीश प्रीतीसिंग यांच्या न्यायासनासमोर या अहवालावर सुनावणी होणार आहे. याच न्यायासनाने आरुषीच्या पालकांनी या खटल्याचा तपास बंद न करण्याची मागणी करणारी याचिका ङ्गेटाळली आहे.
कर्नाटक राज्यपालांचे अभिभाषण रोखले
बंगलोर : कर्नाटकात आज विरोधी पक्ष कॉंग्रेस आणि जनता दल सेक्युलरच्या आमदारांनी राज्यपाल हंसराज भारद्वाज यांना विधानसभेच्या संयुक्त सत्रात पारंपरिक संबोधनापासून रोखले. त्यांनी अभिभाषण वाचण्यास सुरुवात करताच विरोधी पक्षातील आमदार त्यांच्या पाया पडले आणि भाषण वाचू नका, अशी विनंती करू लागले. काही क्षण थांबल्यावर राज्यपाल तेथून निघून गेले. सत्ताधारी भाजपाविषयी राज्यपालांच्या नाराजीचे हे द्योतक असल्याचे बोलले जात आहे.

शिवराय, सावरकर यांच्यासारख्या नेतृत्वाची देशाला गरज : शरद पोंक्षे

पणजी, दि. ६ (प्रतिनिधी): छत्रपती शिवराय आणि स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर या विभूतींनी आपले सारे आयुष्य स्वधर्म व स्वदेशासाठी झिजवले. याच्या उलट सध्याच्या भ्रष्ट राज्यकर्त्यांमुळे देशाची अधोगती झाली आहे. गौरवर्णीय विदेशी जाऊन काळ्या कातडीचे स्वदेशी सामान्यांवर अत्याचार करत वर्षानुवर्षे सत्ता उपभोगत आहेत. त्यामुळेच या राष्ट्राला सद्यःस्थितीत छ. शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक यांच्यासारख्या देशप्रेमाने ओथंबलेल्या नेतृत्वाची गरज आहे असे प्रतिपादन
विख्यात अभिनेते शरद पोंक्षे यांनी आज पर्वरी येथे केले.
पर्वरी येथील विद्याप्रबोधिनी शिक्षण संकुलात भारत विकास परिषद व जनहित मंडळ पर्वरी यांनी सयुंक्तपणे आयोजिलेल्या शारदा व्याख्यानमालेत ‘नथुराम ते देवराम’ या विषयावर श्री. पोंक्षे बोलत होते.
श्री. पोंक्षे यांनी समई लावून व्याख्यानमालेचे उद्घाटन केले. यावेळी ‘गोवादूत’चे संचालक सागर अग्नी, भारत विकास परिषद - पर्वरीचे अध्यक्ष बिपीन नाटेकर, जनविकास मंडळ - पर्वरीचे अध्यक्ष डॉ. भिवा मळीक, व्याख्यानमालेचे संयोजक संतोष कामत व्यासपीठावर उपस्थित होते. मेघना देवारी यांनी सूत्रनिवेदन केले. सुकन्या मणेरीकर हिने ‘वंदे मातरम’ सादर केले. श्री. पोंक्षे यांच्या हस्ते साप्ताहिक ‘विवेकने’ पानिपत संग्रामावर काढलेल्या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी सन्माननीय अथिती म्हणून बोलताना सागर अग्नी यांनी वैचारिक प्रगल्भता वाढवून देशभक्तीचे स्फुल्लिंग चेतवणार्‍या कार्यक्रमांच्या आयोजनाची गरज प्रतिपादली.
श्री. पोंक्षे यांनी दोन तासांच्या व्याख्यानात हास्याचे कारंजे उडवत व अंतर्मुख करण्यास लावणारे विचार व्यक्त करत कॉंग्रेस संस्कृतीवर कोरडे ओढले. ‘नथुराम’ या नाटकातील नथुराम व वादळवाटा या मालिकेतील ‘देवराम’ या भूमिकांबद्दल विचार व्यक्त केले. तसेच ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ या नाटकाच्या सादरीकरणादरम्यान देशभरात आलेले विविध संघर्षात्मक व विनोदी किस्से सांगून त्यांनी प्रेक्षकांना मनमुराद हसवले.
चित्रपटापेक्षा नाटक ही जास्त प्रगल्भ कला आहे. देशात सत्तालोलूप नेत्यांचे पुतळे उभे राहतात. संसदेवर हल्ला करणारा अफझल गुरु, मुंबईवर हल्ला करणारा कसाब यांचा पुळका येणारी मंडळी खर्‍या देशभक्तांना मात्र खलनायक ठरवून त्यांचे शौर्य मातीमोल करत असल्याची खंत श्री. पोंक्षे यांनी व्यक्त केली.
मराठीतील थोर लेखकांच्या कविता, संवाद व स्वगत सादर करून श्री. पोंक्षे यांनी रसिकांकडून हसू आणि टाळ्या वसूल केल्या.सुंदर शब्दांमुळे जगण्याची ऊर्मी जागी होते असेही जीवनविषयक तत्त्वज्ञान ते गप्पांच्या ओघात सांगून गेले.
पसायदानाने या बहारदार आणि तेवढेच अंतर्मुख करणार्‍या व्याख्यानाची सांगता झाली.

Thursday, 6 January, 2011

विश्‍वजित राणेंच्या कार्यालयांवर छापे

बंगळूर आयकर पथकाची कारवाई

पणजी, दि. ५ (प्रतिनिधी)ः वाळपईचे आमदार तथा आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांच्या ‘कारापूर ऍग्रो केमिकल्स प्रा. ली’ या कंपनीच्या कार्यालयांवर व कारखान्यावर आयकर खात्याने आज छापा टाकल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली. मिरामार येथील कंपनीचे कार्यालय व साखळी कारापूर येथील कारखान्यावर हे छापे टाकण्यात आले. हे छापासत्र सुरू असताना आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे व मुख्यमंत्री दिगंबर कामत हे पणजीत एका हॉटेलात एकत्रित होते, अशीही माहिती प्राप्त झाली आहे.
आज सकाळीच बंगळूर येथून आलेल्या आयकर खात्याच्या पथकाने मिरामार येथील‘कारापूर ऍग्रो केमिकल्स प्रा.ली’या कंपनीच्या कार्यालयांवर छापा टाकला. यावेळी सदर पथकाकडून स्थानिक पोलिसांची सुरक्षेसाठी मदत घेण्यात आली होती. मिरामार व साखळी येथे एकाचवेळी छापे टाकण्यात आले होते. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत हे छापासत्र सुरू होते. या छाप्यात नेमकी कोणती माहिती मिळवण्यात आली किंवा कोणती कागदपत्रे जप्त करण्यात आली, याबाबत अत्यंत गुप्तता राखण्यात आली आहे. पणजी आयकर खाते व बंगळूर येथील मुख्यालयाकडे संपर्क साधला असता त्यांनी याबाबत काहीही बोलण्यास नकार दिला. दरम्यान, मिरामार येथील सदर कंपनीच्या कार्यालयात सकाळी घुसलेले पथकातील अधिकारी तब्बल संध्याकाळी पावणे सात वाजता बाहेर आले.

केंद्रीय अर्थमंत्र्यांचे निर्देश
महत्वाचे म्हणजे आजच केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी आयकर खात्याच्या अधिकार्‍यांना मोठ्या प्रमाणात कर वसूली करण्याचे निर्देश दिले होते. राष्ट्रीय राजधानीतून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगवर अधिकार्‍यांशी संपर्क साधून त्यांनी हा आदेश जारी करताच ही कारवाई झाल्यानेही या छाप्याला महत्व प्राप्त झाले आहे. दिल्ली येथील थेट कर विषयक केंद्रीय मंडळाचे अध्यक्ष सुधीर चंद्रा यांच्या कार्यालयातून आज अर्थमंत्र्यांनी आयकर खात्याचे मुख्य आयुक्त व देशाच्या अठ्ठेचाळीस शहरांतील आयकर खात्याच्या वरिष्ठ अधिकार्‍यांशी संपर्क साधून कर वसूलीबाबत कडक धोरण राबविण्याचे आवाहन त्यांनी केले होते. वित्त मंत्र्यांच्या या आवाहनानंतर लगेच हे छापे टाकले गेले आहेत. त्यामुळे आयकर खात्याने छाप्याआधी राणे यांच्या उद्योगाबाबत बरीच माहिती मिळविली होती हे स्पष्ट होत आहे. त्यातही बंगळूर येथून आलेल्या पथकाने ही कारवाई केल्यामुळे या छाप्यात घबाड सापडेल असा अंदाज आहे. कारण स्थानिक आयकर खात्याच्या अधिकार्‍यांना या छाप्यात समाविष्ट करण्यात आलेले नाही. तसेच स्थानिक आयकर खात्याच्या अधिकार्‍यांशी संपर्क साधल्यावेळी त्यांनी छाप्याबाबत दुजोरा न देता ‘नो कॉंमेटस्’ एवढेच सुरूवातीला उत्तर दिले. मात्र संध्याकाळी उशिरा या छाप्यांबाबत सूत्रांनी दुजोरा दिला.
दडपणासाठी राजकीय खेळी?
गेल्यावेळी बिगरकॉंग्रेस नेत्यांनी ‘जी-७’ गट तयार करून आपल्याच सरकारवर दबावतंत्र टाकण्याचे सत्र आरंभल्यानंतर आयकर खात्यातर्फे या नेत्यांवर असेच छापे टाकण्यात आले होते. बाबूश मोन्सेरात यांच्या बंगल्यावरही छापे टाकून त्यांच्यावर कॉंग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा दबाव टाकण्यात आला होता. आता बाबूश व विश्‍वजित राणे यांनी कॉंग्रेस पक्षात प्रवेश करूनही पुन्हा एकदा विश्‍वजित यांच्या आस्थापनांवर टाकण्यात आलेल्या या छाप्यांमुळे अनेक तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत. मिकी पाशेको यांच्या मंत्रिमंडळ फेरप्रवेशावरून उद्भवलेल्या राजकीय वादाबाबत विश्‍वजित राणे यांनी मौनव्रत धारण केले होते व त्याबाबत अनेकांना कुतूहल लागून राहिले होते. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्याकडून विश्‍वजित राणे यांच्यामार्फत मिकी पाशेको यांची मंत्रिमंडळात वर्णी लावण्याचे प्रयत्न होतील, या शक्यतेनेच कॉंग्रेसकडून हे छापासत्र सुरू झाल्याची शक्यताही राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.
वृत्त न देण्यासाठी
राजकीय दबाव
या छाप्यांचे वृत्त काही प्रसारमाध्यमांकडून मुद्दामहून दडपण्याचे प्रयत्न सुरू होते. छाप्यांचे वृत्त देऊ नये यासाठी सदर वृत्तपत्रे व इलेक्ट्रॉनिक मिडियावर राजकीय दबाव आणण्यात आला होता.

मोठे घबाड!
आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांच्या कार्यालयांवर टाकण्यात आलेल्या आयकर खात्याच्या छाप्यात अनेक महत्वाचे दस्तऐवज सापडल्याचे विश्‍वसनीय वृत्त असून त्यांची छाननी सध्या सुरू आहे. या कागदपत्रांच्या छाननीअंती खात्याच्या हाती भले मोठे घबाड लागण्याची खात्री आयकर खात्याच्या सूत्रांनी व्यक्त केल्यामुळे या छाप्यात खात्याच्या गळाला मोठा मासा लागण्याचे संकेत मिळत आहेत.

११ लाखांचा गुटखा पकडला

बेतोडा येथे बंगल्यावर छाप्यामुळे प्रचंड खळबळ
फोंडा, दि. ५ (प्रतिनिधी)
‘सपना पार्क’ बेतोडा येथील सुधाकर मटकर यांच्या बंगल्यावर आज (बुधवारी) संध्याकाळी ४ च्या सुमारास अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकार्‍यांनी छापा घालून अंदाजे १० लाख ९३ हजार १०० रुपयांचा गुटखा जप्त केला आहे.
गोव्यात गुटका विकण्यास बंदी असली तरी अनेक भागांत मोठ्या प्रमाणात गुटख्याची विक्री केली जात आहे. शेजारील राज्यातून हा गुटखा चोरट्या मार्गाने गोव्यात आणला जातो आणि त्याचे वितरण विविध भागांतील विक्रेत्यांना केले जाते. गोव्यातील गुटख्याचे काही प्रमुख एजंट कार्यरत आहेत. गोव्यातील गुटखा वितरणाचे फोंडा हे प्रमुख केंद्र बनले आहे. याच फोंड्यातून विविध भागात मोठ्या प्रमाणात गुटख्याची विक्री केली जात असल्याची खात्रीलायक माहिती अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकार्‍यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे ह्या विभागाच्या अधिकार्‍यांनी सपना पार्क बेतोडा येथील सुधाकर मटकर यांच्या बंगल्यावर छापा घातला. या छाप्यात आरडीएम गुटखा, कोल्हापुरी गुटखा, मधू गुटखा, सावित्री गुटखा, सोसायटी गुटखा आदी विविध प्रकारच्या गुटख्याची पाकिटे आढळून आली आहेत. जप्त करण्यात आलेल्या गुटख्याची किंमत सुमारे १० लाख ९३ हजार १०० रुपये एवढी आहे. वरिष्ठ अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न व औषध प्रशासनाचे निरीक्षक आबेल रॉड्रिगीस, शारदा खांडेपारकर यांनी ही कारवाई केली. फोंडा मार्केटमध्ये कार्यरत असलेल्या सुधाकर मटकर यांच्या बंगल्यावरील छाप्याचे वृत्त या भागात पसरताच एकच खळबळ उडाली असून उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. या छाप्यांबाबत फोंडा पोलिसांना काहीच माहिती नसल्याचे सूत्रांनी सांगितले. या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक झालेली नाही.

आजपासून बेळगावची भाजी गोव्यात नाहीच!

पणजी, दि. ५ (प्रतिनिधी)
गोव्यात स्वस्त दारात भाजी विक्री केली जात असल्याने बेळगाव येथील भाजी विक्री एजंटनी गोव्याला भाजी पुरवठा न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे उद्यापासून गोव्याला भाजी विक्री केली जाणार नाही, असे बेळगाव येथील भाजी विक्री एजंटनी निर्णय घेतला आहे.
गोव्यात फलोत्पादनाच्या स्वस्त भाजी विक्री केंद्रातून बाजार दरापेक्षा कमी दराने भाजी विक्री केली जात असल्याने हा पुरवठा बंद करण्याचा घेण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. या माहितीला फलोत्पादनाचे व्यवस्थापकीय संचालक ऑर्लांडो फर्नांडिस यांनी दुजोरा दिला. गेल्या काही दिवसापासून गोव्यातील भाजी विक्री एजंट व बेळगाव येथील एजंटमध्ये याबद्दल वाटाघाटी सुरू होत्या; मात्र त्यावर कोणताही तोडगा निघाला नसल्याने उद्या (गुरुवार)पासूनच हा पुरवठा बंद केला जाणार आहे.
फलोत्पादनाच्या स्वस्त भाजी विक्री केंद्रात आणि गोव्याच्या बाजारपेठेतील भाजीच्या दरात ८ ते १५ रुपयांपर्यंतचा फरक असतो. त्यामुळे येथील लोक केवळ त्या भाज्या विक्री करतात. ते ग्राहक आपल्याकडे खेचण्यासाठी गोव्यातील भाजी एजंटांनी कमी दरात भाजी मिळवण्यासाठी बेळगाव येथील एजंटांशी वाटाघाटी सुरू केल्या होत्या. त्यावर चर्चा सुरू असून अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही, असे सांगण्यात आले.

राष्ट्रपतींचा किनारी फेरफटका व छायापत्रकारांना पोलिसी झटका

मडगाव, दि. ५ (प्रतिनिधी) : चार दिवसांच्या विश्रांतीसाठी गोव्यात खासगी भेटीवर आलेल्या राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी काल बाणावली किनार्‍यावर मारलेला फेरफटका आज राष्ट्रीय पातळीवर खमंग चर्चेचा विषय ठरला; पण त्याचे परिणाम यासंदर्भातील छायाचित्रे टिपलेल्या स्थानिक छायापत्रकारांना भोगावे लागत आहेत. स्थानिक पत्रकार संघटनांनी या छायाचित्रांबाबत सुरू झालेल्या पोलिस चौकशीस जोरदार आक्षेप घेताना सदर चौकशी म्हणजे वृत्तपत्रस्वातंत्र्यावर अतिक्रमण असल्याचा दावा करून ती तशीच सुरू राहिली तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा दिला आहे .
राष्ट्रपतींनी काल आपल्या येथील मुक्कामांतील एक भाग म्हणून बाणावली येथील ताज एक्झॉटिका हॉटेलात कुटुंबीयांसमवेत दुपारच्या भोजनाचा कार्यक्रम आखला होता . त्यानुसार त्यांच्या वाहनंाचा ताफा कडेकोट सुरक्षा बंदोबस्तात हॉटेलात आला व नंतर त्या आणि काही मंडळी फेरफटका मारण्यासाठी हॉटेलजवळ असलेल्या किनार्‍यावर गेल्या.
त्यापूर्वी सकाळी १०-३० च्या सुमारास सुपरस्टार अमिताभ बच्चन आपल्या नातीला घेऊन जलक्रिडा करीत असल्याचा संदेश आल्याने काही छायापत्रकार तेथे गेले व त्यांनी सुपरस्टारची छायाचित्रे घेतली.ते परतण्याच्या तयारीत असताना अमिताभसमवेत असलेल्या ताजच्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना अभिषेक व ऐश्वर्या लगेच जलक्रीडेसाठी येणार असल्याचे सांगितल्याने ते तेथेच थांबले. तोपर्यंत ११-३० वाजले व संपूर्ण किनार्‍यावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. छायापत्रकारांना तेथे पाहून पोलिस उपअधीक्षक उमेश गावकर त्यांच्या जवळ आले व त्यांनी त्यांना राष्ट्रपती किनार्‍यावर येणार असल्याने संपूर्ण किनार्‍याची नाकेबंदी केली असल्याने सर्वांना २०० मीटर बाहेर जावे लागेल असे सांगितले. त्याप्रमाणे ते त्यांनी सांगितलेल्या अंतरावर जाऊन थांबले.
नंतर राष्ट्रपती किनार्‍यावर आल्या त्यावेळी त्यांच्याबरोबर त्यांचे नातेवाईक, कुटुंबीय होते. तसेच तेव्हा काही विदेशी पर्यटकही सभोवताली होते. काहीजण छायाचित्रेही घेत होते ते पाहून छायापत्रकारांनी त्याबाबत पोलिस उपअधीक्षकांकडे विचारणा केली असता तसेचराष्ट्रपतींच्या सुरक्षाधिकार्‍यांकडून त्यांनी पास घेतलेला असल्याचे सांगितले , पण त्यावेळी तसा पास मिळविणे शक्य नसल्याने छायापत्रकारांनी पोलिसांनी आखून दिलेल्या २०० मीटर अंतरावरूनच मिळतील तशी छायाचित्रे घेतली. ती आज प्रसिद्ध झाल्याने देशभर खळबळ माजली; शिवाय राष्ट्रपतींच्या सुरक्षा व्यवस्थेबाबतही सवाल खडा झाला. कारण एका राष्ट्रीय दैनिकात प्रसिद्ध झालेल्या छायाचित्रात राष्ट्रपतींच्या सभोवताली उघडयाबंब अवस्थेत विदेशी पर्यटक वावरत असल्याचे दृष्टीला पडले. राष्ट्रीय स्तरावर उमटलेल्या या प्रतिक्रियांमुळे सुरक्षा व्यवस्थेने आपणावरील जबाबदारी झटकण्याच्या प्रयत्नांत छायापत्रकारांना लक्ष्य केले व अरविंद टेंगसे, सोयरू कोमरपंत व गणादीप शेल्डेकर या संबंधित छायाचित्रकारांना पोलिस स्टेशनवर पाचारण करून त्यांच्या जबान्या नोंदवल्या. किनार्‍यावर गेलेल्यांत रामनाथ पै या छायापत्रकाराचाही समावेश होता; पण त्याचे छायाचित्र प्रसिध्द न झाल्याने त्याची जबानी नोंदवली गेली नाही.
छायाचित्रे कुठून घेतली गेली, कोणते कॅमेरे त्यासाठी वापरले, राष्ट्रपतींची भेट खासगी स्वरूपाची असताना ती का घेतली गेली, असे सवाल त्यांना करण्यात आले.
नंतर झालेल्या दक्षिण गोवा पत्रकार संघटनेच्या बैठकीत या पोलिसी चौकशीचा निषेध करून वृत्तपत्र स्वातंत्र्यावर तो हल्ला असल्याचे प्रतिपादून त्याचा निषेध करण्यात आला. नंतर पत्रकारांच्या एका शिष्टमंडळाने उमेश गावकर यांची भेट घेतली असता किनार्‍यापासून २०० मी. बाहेरील सुरक्षा व्यवस्था पोलिसांकडे असल्याने खबरदारीपोटी आपण या जबान्या नोंदविल्याचे सांगितले. मात्र त्यांच्या या भूमिकेला छायापत्रकारांनी जोरदार विरोध दर्शवला. तसेच आम्हाला पुन्हा बोलावून सतावण्याचा प्रकार झाला तर तो सहन केला जाणार नाही असा इशारा छायापत्रकारांनी दिला .
दरम्यान राष्ट्रपतींची ही खासगी भेट होती तर त्यांनी अशा प्रकारे जाहीर फेरफटका कसा मारला, त्यांची छायाचित्रे घेण्यास मनाई होती तर संबंधितांनी छायाचित्रकारांना अगोदरच तशी कल्पना का दिली गेली नाही, की राष्ट्रपतींच्या सुरक्षा पथकाकडून आपल्या त्रुटीवर पांघरुण घालण्याच्या प्रयत्नात छायापत्रकारांना सतावले जात आहेत, असे सवाल केले जात आहेत.
कालच्याप्रमाणे आजही नातवंडांना जलक्रीडेचा मनमुराद आनंद लुटू देण्यासाठी राष्ट्रपती पुन्हा बाणावलीला येणार होत्या; परंतु ‘त्या’ छायाचित्राचा असा काही जबरदस्त परिणाम झाला की त्यांनी आजची भेट रद्द केली. त्यामुळे काल दिवसभरात एक बटाटवडा व पाव या शिदोरीवर दिवसभर सुरक्षेसाठी तैनात केल्या गेलेल्या सुरक्षा रक्षकांनी सुटकेचा सुस्कारा सोडला. मात्र विश्रांतीसाठीचा राष्ट्रपतींचाहा गोवा मुक्काम एका अर्थी वादळीच ठरला!

जगनमोहन यांची ‘वायएसआर पार्टी’

नवी दिल्ली, दि. ५ -
माजी खासदार जगनमोहन यांनी राष्ट्रीय निवडणूक आयोगाला अर्ज सादर करून नव्या पक्षाची आज घोषणा केली. ‘वायएसआर पार्टी’असे पक्षाचे नाव असून, जगनमोहन यांचे काका वाय.व्ही.सुब्बारेड्डी यांनी आज त्यासंबंधातला अर्ज आयोगाला सादर केला. आपल्या कुटुंबाची उपेक्षा होत असल्याचे कारण देऊन जगनमोहन यांनी गेल्या महिन्यात कॉंग्रेस पक्ष सोडला होता.

केंद्रीय मंत्री अलगिरी
यांचा राजीनामा?
चेन्नई, दि. ५ ः २जी स्पेक्ट्रम प्रकरणात वादग्रस्त ठरलेले ए. राजा यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी करून, केंद्रीय रसायन व खत मंत्री एम.के.अलगिरी यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याच्या वृत्ताने तामिळनाडूत खळबळ माजली. अलगिरी यांनी द्रमुकचे सरचिटणीसपदही सोडल्याचे वृत्त पसरले. या दोन्ही बातम्या चुकीच्या असल्याचे द्रमूक सूत्रांनी स्पष्ट केले असले तरी, करूणानिधी यांच्या कुटुंबातच या मुद्यावरून फूट पडल्याचे स्पष्ट झाले आहे. अलगिरी हे करूणानिधी यांचे पुत्र आहेत.

भ्रष्टाचारावर
आज अध्यादेश?
नवी दिल्ली, द. ५
गेल्या वर्षभरात उघडकीस आलेल्या विविध मोठ्या घोटाळ्यांमुळे अडचणीत आलेल्या केंद्रातील संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने भ्रष्टाचार करणार्‍यांची चौङ्गेर नाकेबंदी करण्यासाठी अतिशय कठोर तरतुदी असलेला अध्यादेश जारी करण्याचा निर्णय घेतला आहे. हा अध्यादेश उद्या गुरुवारीच जारी करण्यात येणार आहे. या अंतर्गत ‘लोकपाल’ नियुक्त करण्यात येणार असून, या लोकपालाला भ्रष्टाचाराच्या आरोपांत अगदी पंतप्रधानांपासून तर सनदी अधिकार्‍यांपर्यंत कुणाचीही चौकशी करण्याचे अधिकार राहणार आहेत.

सीबीआयकडून
कलमाडींची चौकशी
नवी दिल्ली, दि. ५
राष्ट्रकुल क्रीडा घोटाळाप्रकरणी सीबीआयने आज राष्ट्रकुल आयोजन समितीचे अध्यक्ष सुरेश कलमाडी यांची कसून चौकशी केली. या स्पधर्ंेसंदर्भात काही विदेशी कंपन्यांना कंत्राट देण्याच्या मुद्यावरही सीबीआयने कलमाडी यांच्याकडून सविस्तर जाणून घेतले.
मंगळवारी सीबीआयने कलमाडी यांना तपास संस्थेच्या मुख्यालयात हजर होण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार, कलमाडी आज सकाळी दहा वाजता सीबीआय कार्यालयात पोहोचले. सुमारे अर्धा तास उशिरा सुरू झालेल्या या चौकशी प्रक्रियेत कलमाडी यांनी अनेक प्रश्‍नांची उत्तरे टाळण्याचाच प्रयत्न केला.


सुरेश वाडकर
यांना मातृशोक
मुंबई, दि. ५
सुप्रसिद्ध गायक आणि संगीतकार सुरेश वाडकर यांच्या मातोश्री चिंगूबाई ईश्‍वरा वाडकर यांचे आज सकाळी वृद्धापकाळाने सांताक्रुझ येथे राहत्या घरी निधन झाले. त्या ९२ वर्षांच्या होत्या. त्यांच्या मागे दोन मुले, चार मुली, जावई, नातवंड असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी सांताक्रुझ येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार पार पडले. चिंगूबाई मूळच्या कोल्हापूरच्या होत्या. त्यांना गाण्याची आवड होती. सुरेश वाडकर यांना गायक बनविण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. चिंगूबाई यांनी त्यांना प्रोत्साहन दिले होते. आज सकाळी त्यांची प्रकृती बिघडली आणि श्‍वास घेणे कठीण झाले. त्यातच त्यांचे निधन झाले. त्यांचे अंत्यदर्शन घेणार्‍यांमध्ये ज्येष्ठ संगीतकार अरुण पत्की, गायक स्वप्नील बांदोडकर, गायिका साधना सरगम, अभिनेता अजिंक्य देव आदींचा समावेश होता.

Wednesday, 5 January, 2011

कर्नाटकमध्ये भाजपचे वर्चस्व

जिल्हा पंचायत निवडणूक
-१२ जिल्हा पंचायतींवर भाजपचा झेंडा
-कॉंगे्रस, जद (से)कडे प्रत्येकी चार
-तालुका पंचायतींवर भाजपची मुसंडी


बंगलोर, दि. ४
कर्नाटकातील सत्तारूढ भाजपने आज राज्यातील ३० पैकी १२ जिल्हा पंचायतवर आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले. सोबतच ७० तालुका पंचायतींवरही भाजपने आपला झेंडा ङ्गडकविला आहे. कॉंगे्रस आणि सेक्युलर जनता दलाने प्रत्येकी चार जिल्हा पंचायत काबिज केल्या असून, दहा जिल्हा पंचायतींचे निकाल त्रिशंकू लागले आहेत.
राज्यातील ७० तालुका पंचायत जिंकून भाजपाने आगामी विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा आपलीच सत्ता येणार असल्याचे जणू संकेतच दिले आहेत. कॉंग्रेस आणि सेक्युलर जनता दलाने प्रत्येकी ३० तालुका पंचायत जिंकल्या असून, सुमारे ४० तालुका पंचायतचे निकाल त्रिशंकू लागले आहेत. यातही बहुतांश जागी भाजपचीच सत्ता येण्याची शक्यता आहे.
२००५ मध्ये केवळ एकच जिल्हा परिषद जिंकणार्‍या भाजपाने यावेळी राज्यातील किमान २० जिल्हा परिषदांवर आपली विजयी घोडदौड सुरू ठेवली आहे. भ्रष्टाचाराचे अनेक निराधार आरोप झाल्यानंतर भाजपाने लोकशाही मार्गाने विजय मिळवून या निराधार आरोपांना सडेतोड उत्तरच दिले आहे, असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष के. एस. ईश्‍वरप्पा यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. प्रदेश कॉंगे्रसने मात्र हे निकाल भाजपासाठी पिछेहाट ठरले असल्याचा दावा केला आहे.
ज्या जिल्हा आणि तालुका पंचायतचे तसेच जिल्हा परिषदचे निकाल त्रिशंकू लागले आहेत; तिथे कॉंगे्रस पक्ष सेक्युलर जनता दलाशी युती करून सत्ता स्थापन करण्याचे प्रयत्न करणार असून, या दिशेने आमची चर्चा सुरू असल्याचे कॉंगे्रसचे प्रदेशाध्यक्ष जी. परमेश्‍वर यांनी सांगितले.

ड्गविक्री करताना पोलिस उपनिरीक्षक कॅमेराबंद!

-वृत्तवाहिनीतर्फे स्टिंग ऑपरेशन
-माफिया-पोलिस साटेलोटे स्पष्ट


पणजी, दि. ४ (प्रतिनिधी) - नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात पोलिस खात्याला जबरदस्त धक्का बसला असून, अमली पदार्थविरोधी पथकात सेवा बजावलेल्या एक उपनिरीक्षक विदेशी पर्यटकाला अमली पदार्थ विक्री करीत असल्याचे कॅमेराने
टिपल्याने पोलिस खात्यात खळबळ माजली आहे. एका स्थानिक वृत्तवाहिनीने अमली पदार्थविरोधी पथकात असलेला आणि सध्या सुरक्षा विभागात सेवेत असलेला उपनिरीक्षक सुनील गुडलर हा एका विदेशी तरुणीला चरस विकत असल्याचे या ‘स्टिंग ऑपरेशन’मध्ये उघड केले आहे.
पोलिसच अमली पदार्थ विकत असल्याने आता पोलिस ड्रग माफिया साटेलोटे प्रकरणाला आणखी पुष्टी मिळाली आहे. मात्र, या प्रकारावर पोलिस खात्याचे प्रवक्ते तथा पोलिस अधीक्षक आत्माराम देशपांडे यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्याचे टाळले. आपण ते चित्रिकरण पाहिल्यानंतर बोलेन, असे श्री.देशपांडे यांनी सांगितले.
एका फ्लॅटमध्ये उपनिरीक्षक गुडलर हा स्पष्ट दिसत आहे. त्याच्या बाजूला बसलेली तरुणी त्याच्याकडे अमली पदार्थाची मागणी करते. यावेळी गुडलर आपल्या जीन्स पँटमधून काही तरी वस्तू काढतो आणि तिच्या हातात देतो. त्यानंतर दुसरी एक व्यक्ती गुडलर यांनी दिलेला चरस स्पष्टपणे त्या गुप्त ठेवण्यात आलेल्या त्या कॅमेर्‍यावर दाखवतो. मात्र, नेमकी कोणती वस्तू गुडलर यांनी आपल्या खिशातून काढली हे स्पष्ट दिसत नाही.
चरसचा तुकडा त्या विदेशी तरुणीच्या हातात पडल्यानंतर तो किती जुना असावा, अशा प्रश्‍न ती त्याला करते. त्यावेळी गुडलर एक दोन वर्षाचा असू शकतो, आपल्याला नेमकी माहिती नाही, असे उत्तर देतो. त्यानंतर समोर बसलेली तरुणी त्याला‘तुम्ही यात एकदम सराईत आहात’ असे म्हणते. यावर उपनिरीक्षक गुडलर खदखदून हसतो.
ड्रग पॅडलर ‘दुदू’ याला अटक केल्यानंतर उपनिरीक्षक सुनील गुडलर याचा पोलिस महासंचालकांंच्या हस्ते गौरव करण्यात आला होता, तसेच दुदू याला अटक केल्यानंतर अमली पदार्थ विरोधी पथकाचे निरीक्षक आशिष शिरोडकर यांच्यासह पाच पोलिसांचे ड्रग माफियांशी संबंध असल्याचे उघडकीस आले होते. तसेच, या सर्वांना अटक करण्यातही श्री. गुडलर याचा सहभाग होता.
‘दुदू’ या ड्रग माफियाची चौकशी ड्रग विक्री करताना उघडकीस आलेला गुडलर याने केली असून काही दिवसांपूर्वी दुदू याच्यावर आरोपपत्रही सादर करण्यात आले आहे. पोलिस अधीक्षक वेणू बंसल यांची गोव्यातून बदली होण्यापूर्वी श्री. गुडलर यांनी अमली पदार्थविरोधी पथकातून आपली बदली करून घेतली होती. सध्या तो सुरक्षा विभागाच्या सेवेत होता. गेल्या वर्षीही गुडलर आपल्याला अमली पदार्थाची विक्री करीत होता, असा दावा या विदेशी तरुणीने केला आहे.

१३ व १४ रोजी नव्याने परीक्षा

पेपर फूटल्याचे प्रकरण
पणजी, दि. ४ (प्रतिनिधी) - ‘एमबीबीएस’च्या शेवटच्या वर्षाचे पेपर फुटल्याचे गोवा विद्यापीठ समितीच्या चौकशीत उघड झाले आहे. मात्र, कशा पद्धतीने हे पेपर विद्यार्थ्यांपर्यंत पोचवण्यात आले, हे अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले. दरम्यान, पेपर फुटीनंतर पुढे ढकलण्यात आलेला जनरल मेडिसीन पेपर १ आणि २ हे येत्या दि. १३ आणि १४ जानेवारी रोजी सकाळी १० ते १ या वेळी घेण्यात येणार असल्याचे आज गोवा विद्यापीठाचे साहाय्यक कुलसचिव आर आर. भाटीकर यांनी सांगितले.
शेवटच्या वर्षाच्या पेपर फुटीमुळे एक प्राध्यापक ‘डायरेक्टर’ अडचणीत आला असून सध्या त्याच्यावर संशय व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे त्याला सेवेतून बडतर्फ करण्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे. प्राध्यापकांच्या दोन गटांत असलेल्या शत्रुत्वातून हे प्रकरण उघडकीस आले आहे, असेही सूत्रांनी सांगितले.
गेली चार वर्षे सतत वैद्यकीय महाविद्यालयाच्या परीक्षेत किंवा विद्यार्थ्यांच्या गुणात गौडबंगाल होत असल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. गेल्या वर्षी काही विद्यार्थ्यांचे गुण वाढवण्यात आले होते. यासंदर्भात खुद्द महाविद्यालयाच्या डीनवर आरोप झाला होता. त्यानंतर, परीक्षेत कॉपी करताना दोन विद्यार्थीनींना पकडण्यात आले होते. या दोन्ही मुली डॉक्टरांच्या असल्याचे नंतर उघड झाले होते. त्याचप्रमाणे, विद्यापीठातून गुणपत्रिका आल्यानंतर एका विद्यार्थ्याचे गुण वाढवण्यात आले होते. त्यामुळे पहिल्या क्रमांकावर असलेला विद्यार्थी मागे जाऊन त्याच्या जागी आपल्या मर्जीतल्या एका विद्यार्थ्यांना पुढे आणण्यात आले होते. त्याचप्रमाणे, दोन डॉक्टरांच्या मुलांनी उत्तर पत्रिकेवर प्रश्‍नपत्रिका तपासणार्‍या शिक्षकाला समजण्यासाठी विशेष चिन्ह करून ठेवल्याचे उघडकीस आले होते.
या सर्व प्रकारांमुळे गोवा वैद्यकीय महाविद्यालयात घेतल्या जात असलेल्या परीक्षा पद्धतीवरच प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. या वर्षापासून पदव्युत्तर प्रवेशासाठी समान प्रवेश प्रवेश परीक्षेचा निर्णय झाला होता. परंतु, काही डॉक्टरांचीच मुले या वर्षी असल्याने हा समान प्रवेश परीक्षेचा निर्णय रद्द करून पुढील वर्षापासून ही पद्धत लागू करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

हा तर बाबूशना उशिरा झालेला साक्षात्कार - अशोक नाईक

महापालिका स्वावलंबी करण्याचे लक्ष्य
पणजी, दि. ४ (प्रतिनिधी)
पणजी महापालिकेला वर्षभरात स्वावलंबी करण्याचे लक्ष्य शिक्षणमंत्री तथा ताळगावचे आमदार बाबूश मोन्सेरात यांनी आपल्यासमोर ठेवले असल्याचे वाचून संशयाचा मोठा संशय निर्माण झाला आहे. बाबूश यांचे पणजी मनपाच्या स्वावलंबनाबाबतचे वक्तव्य म्हणजे त्यांना उशिरा झालेला साक्षात्कार आहे, अशी तिखट प्रतिक्रिया पणजीचे पहिले महापौर अशोक नाईक यांनी व्यक्त केली आहे. काल बाबूश यांनी पणजी मनपाला स्वावलंबी बनवण्याची जोरदार घोषणा केली होती. या घोषणेची खिल्ली उडवताना अशोक नाईक म्हणाले, की बाबूश यांची राजकीय कारकीदर्र् काय आहे हे सर्वांना माहीत आहे. गेली अनेक वर्षे ते वजनदार मंत्री आहेत व त्यांच्याच गटाची सत्ता पणजी मनपावर आहे मग इतकी वर्षे बाबूश यांनी पणजी मनपाला स्वावलंबी का नाही बनवले, का निधीअभावी विकासकामे रखडली असे त्याचेच नगरसेवक सांगतात, असे प्रश्‍न उपस्थित करुण बाबूश व त्यांच्या सत्ताधारी गटाने पणजीसाठी काय केले हा संशोधनाचा विषय आहे, असे सांगून अशोक नाईक म्हणाले की हा तर निव्वळ खोटारडेपणा असून पणजीच्या जनतेला मूर्ख बनविण्याचा केविलवाणा प्रकार आहे, असे सांगून पणजी मनपात झालेल्या भ्रष्टाचाराचा, घोटाळ्यांचा बाबूश यांनी लोकांना हिशोब द्यावा, अशी जोरदार मागणी त्यांनी केली. आपल्याच मंडळावर ‘नासके ऍपल’ म्हणून टीका करणार्‍या बाबूश यांनी त्या भ्रष्टाचारी नगरसेवकांनाच पुन्हा एकदा आपल्या पॅनलमध्ये घेऊन आपण विश्‍वसनीय नसल्याचेे दाखवून दिले आहे, अशी टीका श्री. नाईक यांनी बाबूश यांच्यावर केली आहे. बाबूशना पणजी म्हणजे ताळगाव वाटत असेल तर त्यांचा तो भ्रम आहे. पणजीतील लोक सुज्ञ व विचारवंत आहेत, हे बाबूश यांनी ध्यानी ठेवावे असे श्री.नाईक यांनी बाबूश यांना सुनावले आहे.
भाजप नेते मनोहर पर्रीकर यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात पणजीचा विकास केला होता. म्हणूनच पणजीतील लोकांनी त्यांना सतत चार वेळा निवडून दिले आहे. एक बुद्धिवादी व चाणाक्ष राजकारणी म्हणून गोमंतकीय त्यांना मानतात व त्यांच्या नेतृत्वावर विश्‍वास व्यक्त करून यावेळी पणजी महापालिकेत नक्कीच सत्ताबदल घडेल, असे श्री. नाईक यांनी शेवटी म्हटले आहे.

वास्कोत दिवसाढवळ्या चोरी

पत्रकाराने पकडला चोर
वास्को, दि. ०४ (प्रतिनिधी)- शहरातील चोरी प्रकरणामुळे हैराण झालेल्या पोलिसांना आज पुन्हा धावपळ करण्याची वेळ आली होती, मात्र एका जागृत पत्रकारामुळे हे संकट टळले. आज दिवसाढवळ्या एका फ्लॅटमधून मालमत्ता लंपास केल्यानंतर फरार झालेल्या चोरट्याला सुरेंद्र मडकईकर या पत्रकाराने रस्त्यावर पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले, त्याच्याकडून चोरीला गेलेले काही सामान जप्त करण्यात आले. यापूर्वी वास्कोतील अन्य दोन पत्रकारांनी चोरीच्या प्रकारातील आरोपींना पोलिसांच्या ताब्यात दिले होते .
वास्कोच्या सेट ऍन्ड्रु चर्चसमोर असलेल्या‘सोनिया अपार्टमंट’ इमारतीतील तिसर्‍या मजल्यावर राहणारा बलवंत सैनी व त्याचे कुटुंब दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास जेवणासाठी बाहेर गेले. यानंतर तीन वाजण्याच्या सुमारास ते पुन्हा घरी परतले असता फ्लॅटच्या दरवाजाची तीनही कुलुपे तोडून अज्ञातांनी आत प्रवेश केल्याचे बलवंत व त्याच्या मुलाच्या बायकोला नजरेस आले आणि आत प्रवेश केल्यावर दोन अज्ञात इसम त्यांना घरात दिसले. घरात चोरांनी प्रवेश केल्याचे समजताच त्यांनी हालचाल करण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी या अज्ञात चोेरट्यांनी हत्यारांचा धाक दाखवून येथून पोबारा केला. सदर चोरट्यांनी पलायन केल्यानंतर बलवंत व त्याच्या मुलाच्या बायकोने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली असता, रस्त्यावरील काही लोकांनी या चोरट्यांचा पाठलाग केला, मात्र तोपर्यंत सदर चोरटे गायब झाले. मात्र ज्यावेळी सदर चोर पळत होते तेव्हा एका चोरट्यावर पत्रकार सुरेंद्र मडकईकर यांची नजर गेली व त्याने त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याक्षणी फायदा झाला नाही. काही वेळानंतर सुरेंद्र हा शहरात असलेल्या ‘चेझ’ इमारतीसमोरून जात असताना चोरीत असलेला एक चोर येथे मोबाईलवर बोलत असल्याचे त्याच्या नजरेस येताच त्यांनी त्याला पकडून वास्को पोलिसांना याबाबत माहिती दिली. वास्को पोलिसांंच्या माहितीनुसार आज फ्लॅटमध्ये सदर चोरी प्रकरणातील पकडण्यात आलेल्या या चोरट्याचे नाव प्रेमचंद रामसुरत मिश्रा (वय २७) असे असून तो राजस्थान येथील रहिवासी असल्याचे त्यांनी सांगितले. ह्या चोरी प्रकरणातील दुसरा चोरटा सापडलेला नसल्याचे पोलीसांनी सांगून लवकरच तो गजाआड होणार अशी खात्री त्यांनी व्यक्त केली. दरम्यान ह्या चोरट्यांनी सैंनी ह्या निवृत्त नौदलाच्या अधिकार्‍याच्या घरातून सुमारे ७७ हजाराची मालमत्ता लंपास केली होती अशी माहिती पोलीसांनी देऊन पकडण्यात आलेल्या चोरट्याकडून २५ हजाराची मालमत्ता ताब्यात घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. चोरीला गेलेले इतर सामान दुसर्‍या चोरट्याकडे असणार असा संशय वास्को पोलिसानी व्यक्त केला आहे. निरीक्षक ब्राज मिनेझीस यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास चालू आहे.

Tuesday, 4 January, 2011

गोव्यात सोन्याचे प्रचंड साठे

-पेडणे, तिसवाडी, सासष्टी सुवर्णभूमी
-डॉ. नंदकुमार कामत यांचे संशोधन


पणजी, दि.३ (प्रतिनिधी)- पेडणे ते तिसवाडी व सासष्टीच्या काही भागांत खोल भूगर्भात दुय्यम सुक्ष्मरूपी सुवर्णसाठे सापडल्याचा सनसनाटी दावा गोमंतकीय शास्त्रज्ञ डॉ. नंदकुमार कामत यांनी करून एकच खळबळ उडवली आहे. विशेषतः फक्त गोव्यात आढळणार्‍या ‘सावर्डे’ नामक खडकाच्या खाली हे साठे संशोधनाअंती आढळून आले आहेत. राज्याच्या एकूण भूभागाच्या १५ टक्के भागात हा खडक आढळतो. याबाबतीत व्यापक संशोधन करून खोदाई केल्यास किमान ६०० ते १२०० अब्ज किमतीचे सुवर्णसाठे सापडू शकतात, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला. उत्तर गोव्यात ६० मीटर खाली खोदाई करण्यास बंदी घालण्याची शिफारस करणारा गुप्त अहवाल मुख्यमंत्री तथा खाणमंत्री दिगंबर कामत यांना पाठवल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
गोवा विद्यापीठात वनस्पतिशास्त्र विभागाचे साहाय्यक प्राध्यापक व जैवतंत्रज्ञान प्रकल्पाचे मुख्य संशोधक म्हणून काम पाहणारे डॉ. नंदकुमार कामत यांनी आज येथे बोलावण्यात आलेल्या खास पत्रकार परिषदेत आपल्या १२ वर्षांच्या संशोधनाचा अहवाल खुला करून सर्वांनाच आश्‍चर्याचा धक्का दिला. राज्य सरकारने तात्काळ तज्ज्ञ तांत्रिक समिती स्थापन करून खोल भूगर्भ परिस्थितीचा अभ्यास करावा व नमुने गोळा करून संभावित सुवर्णसाठ्यांचा नकाशा तयार करावा, अशी शिफारस केल्याची माहितीही त्यांनी दिली. या संशोधनाच्या पार्श्‍वभूमीवर उत्तर गोव्यातील भूवापर वर्गीकरण निकष बदलावे लागतील व त्याबाबत निर्बंध लादणे गरजेचे आहे. या शोधामुळे खडकाळ जमिनीचे भाव वधारण्याची शक्यता वर्तवून जोपर्यंत यादृष्टीने सखोल अभ्यास केला जात नाही तोपर्यंत खाणींना परवाने देण्यात येऊ नयेत, असेही त्यांनी राज्य सरकारला सुचवले आहे. या संशोधनाचा व्यापक पाठपुरावा सुरू आहे. भूगर्भशास्त्रज्ञ डॉ.चचाडी, लघूजैवतंत्रज्ञ डॉ.अहमद यांच्या सहकार्याने व सूक्ष्म वनस्पतीरूपी सुवर्णसाठे विभागाचे ऑस्ट्रेलियस्थीत प्रसिद्ध संशोधक डॉ. फ्रँक रिथ यांच्या मार्गदर्शनाखाली या संशोधनाचा पाठपुरावा सुरू राहणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.दरम्यान, या संशोधन काळात सापडलेल्या सूक्ष्म सुवर्णसाठ्याचे ४२ व्हिडिओ व २५४ छायाचित्रे ‘यूट्यूब’ व ‘पिकासावेब’ संकेतस्थळावर टाकण्यात आलेले आहेत.
गोवा ही सुवर्णभूमी आहे असे आपण म्हणतो. गोवा मुक्तीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षांत या संशोधनामुळे हा दावा सत्यात उतरला आहे, असेही डॉ.कामत म्हणाले. हे संशोधन गोवा विद्यापीठाच्या वनस्पतिशास्त्र प्रयोगशाळेत करण्यात आले व या कामात तांत्रिक साहाय्यक नेयसा रॉड्रिगीस, प्रियांका शिरोडकर, इंदिरा तळावलीकर आदींचे सहकार्य लाभल्याची माहितीही त्यांनी दिली. या कामाला विद्यापीठ अनुदान आयोग व मेसर्स आर.एन.एस बांदेकर ऍण्ड ब्रदर्स यांची मदत मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
आशिया खंडातील पहिले संशोधन
सुक्ष्मजंतूरूपी सुवर्णसाठ्यांचा शोध घेणारे हे गोवा, भारत व एकूण आशियातील पहिले संशोधन ठरल्याचा दावा डॉ.कामत यांनी केला आहे. खडकाळ भूगर्भाखालील अशा पद्धतीचे सूक्ष्म सुवर्णसाठे सापडण्याची ही पहिलीच वेळ आहे.या संशोधनाचा अभ्यास करताना भूगर्भातील झिरकोनियम,हाफनियम,युरेनियम व थोरीयम साठ्यांचा शोध लागणार आहेच पण त्याचबरोबर हजारो वर्षांत घडलेल्या वातावरण बदलाचाही शोध लागणार आहे. प्रत्यक्ष समुद्र पातळीखाली हे सुक्ष्मरूपी सुवर्णसाठे विविध आकारात सापडले आहेत. कुणाही सर्वसामान्यांना हे साठे सापडणे शक्य नसल्याचे स्पष्टीकरण देताना भूगर्भाच्या ६५ मीटर व त्याखाली खोदाई करणे मोठे जिकिरीचे व खर्चिक काम असल्याचे ते म्हणाले. राज्य सरकारने याप्रकरणी गांभीर्याने लक्ष घालण्याची गरज आहे,असेही ते म्हणाले.

कायदा आयोग बनला पांढरा हत्ती!

- अध्यक्षांचा प्रवास खर्च २.५४ लाख
- अध्यक्षांसह कर्मचार्‍यांचे वेतन २७ लाख
- कार्यालयावर खर्च ६.६० लाख
- दोन सदस्यांचा खर्च ४.४१ लाख


पणजी, दि. ३ (प्रतिनिधी) - गोवा कायदा आयोगाचे अध्यक्ष ऍड. रमाकांत खलप यांना देण्यात आलेल्या सिटी होंडा जीए ०३ जी १९९९ या सरकारी गाडीने ३० एप्रिल २००९ ते २६ नोव्हेंबर २०१० या कालखंडात तब्बल ४२ हजार ६५२ किलोमीटर प्रवास केला आहे. या व्यतिरिक्त आणखीन एक सरकारी गाडी कायदा आयोगाच्या कार्यालयाला देण्यात आली आहे. ती गाडी ५ मे २००९ ते २६ नोव्हेंबर २०१० या कालखंडात १५ हजार ८१९ किलोमीटर चालली आहे. वरील सर्व तपशीलवार माहिती कायदा खात्याने ऍड. आयरिश रॉड्रिगीस यांना माहिती हक्क कायद्याखाली दिली आहे. इंधन तथा गाडीच्या दुरुस्तीसाठी म्हणून गोवा सरकारला २ लाख ५४ हजार ६९९ रुपये खर्च सोसावा लागला आहे.
सप्टेंबर २००९ ते जून २०१० या कालखंडात कायदा आयोगाचे अध्यक्ष रमाकांत खलप यांच्या गोव्याबाहेर दौर्‍यासाठी सरकारने १ लाख ४७ हजार ३८४ रुपये खर्ची घातले आहे. यात दिल्ली येथील चार वार्‍या, मुंबई येथील २ व पुणे येथील १ वारीचा समावेश आहे. दिल्ली येथील ४ वार्‍यापैकी २ वार्‍या मुंबईमार्गे करण्यात आल्या आहेत.
कायदा आयोगाच्या अध्यक्षांना कॅबिनेट दर्जा देण्यात आला असल्याने कायदा आयोगाच्या कार्यालयात एकूण ८ कर्मचार्‍यांची नेमणूक करण्यात आली आहे. कायदा आयोगाच्या अध्यक्षांसमवेत या कर्मचार्‍यांच्या वेतनापोटी करदात्यांना आजपावेतो २६ लाख ९९ हजार ५९६ रुपये भुर्दंड सोसावा लागला आहे.
या व्यतिरिक्त गोवा कायदा आयोगाच्या कार्यालयीन खर्चासाठी ६ लाख ६० हजार ३५० रुपये खर्ची घालण्यात आले असल्याची माहिती कायदा खात्याने माहिती हक्क कायद्याखाली दिली आहे. तसेच, कायदा आयोगाचे दोन सदस्य ऍड. क्लिओफित कुतिन्हो व ऍड. मारिओ पिंटो आल्मेदा यांना बैठकीच्या शुल्कापोटी ४ लाख ४१ हजार रुपयांची रक्कम फेडण्यात आली आहे.
रमाकांत खलप यांना चालवलेली ४२ हजार ६५२ किलोमीटर गाडी ही राजकीय कामासाठी किती वापरली व म्हापसा अर्बन कॉ-ऑफ. बँक ऑफ गोवा चेअरमन म्हणून किती वापरली याचा शोध घेण्याची गरज आहे, असे मत ऍड. रॉड्रिगीस यांनी व्यक्त केली आहे.
खलप यांनी दिल्ली व मुंबई येथे केलेल्या वारी व त्यावर करण्यात आलेला खर्च हा गोव्यात इंटरनॅशनल आर्बिट्रेशन सेंटर स्थापन करण्यासाठी निर्माण करण्यात येणार्‍या गोवा ऑर्गानायझेशन ऑफ लॉ फायनान्स ऍण्ड एज्युकेशन या खाजगी ट्रस्टच्या उभारणीसाठी तर करण्यात आला नाही ना? याची चाचपणी करण्याची गरज असल्याचेही मत ऍड. रोड्रिगीस यांनी व्यक्त केले आहे.
गोवा कायदा आयोगाच्या अधिकारक्षेत्राबाहेरील बाबींवर करण्यात आलेला खर्च व कायदा आयोगाच्या अजेंडावर नसलेल्या गोष्टींकरिता करण्यात आलेला खर्च गोवा सरकारने ऍड. खलप यांच्याकडून त्वरित वसूल करून घ्यावा अशी जोरदार मागणी ऍड. रॉड्रिगीस यांनी केली आहे.
कायदा आयोग सरकारी जागेत त्यांना भाडे फेडावे लागत नसल्याने कार्यालयीन कामकाजासाठी आलेला ६ लाख ६० हजार रुपयांचा खर्च ही फार मोठा असल्याचा आरोप ऍड. रोड्रिगीस यांनी केला आहे. गोवा कायदा आयोगाने एप्रिल २००९ ते नोव्हेंबर २०१० या कालखंडात खर्च केलेल्या ४२ लाख ३ हजार २९ रुपयांच्या एकूण खर्चाच्या सखोल चौकशी करणे गरजेचे असल्याचे मतही ऍड. रोड्रिगीस यांनी व्यक्त केले आहे.

अंतिम वैद्यकीय परीक्षेचे पेपर फुटल्याने खळबळ

- मागचे पेपरही रद्द
-चौकशी समिती नियुक्त

पणजी, दि. ३ (प्रतिनिधी) - गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या शेवटच्या वर्षाची प्रश्‍न पत्रिका फुटल्याची माहिती उघडकीस आल्याने खळबळ माजली आहे. आज सकाळी काही पत्रकारांनी फुटलेल्या प्रश्‍न पत्रिकेच्या प्रती घेऊन महाविद्यालय गाठल्याने महाविद्यालयाच्या डीननी सुरू असलेली परीक्षा तडकाफडकी रद्द केली. तसेच, याची कल्पना गोवा विद्यापीठाला देण्यात आली. गोवा विद्यापीठाने या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी तीन सदस्यीय समितीची स्थापना केली आहे. तर डॉ. केतन गोवेकर, काशिनाथ शेट्ये आणि ऍड. अतीश मांद्रेकर यांनी आगशी पोलिस स्थानकावर पेपरफुटीची सखोल चौकशी करण्याची मागणी करून तक्रार दाखल केली आहे. विद्यापीठाने स्थापन केलेली चौकशी समिती प्राथमिक अहवाल येत्या ४८ तासांत सादर करणार आहे.
विद्यापीठ समितीची चौकशी पूर्ण होईपर्यंत ‘जनरल मेडिसीन १ आणि २’ हे पेपर पुढे ढकलण्यात आले आहत, त्याचप्रमाणे १ जानेवारी रोजी लिहिलेला पेपर १ रद्द करण्यात आला आहे, अशी माहिती डीन डॉ. जिंदाल यांनी दिली. हा प्रकार अत्यंत गंभीर असल्याने झालेलीही परीक्षा रद्द करण्यात आली असल्याचे ते म्हणाले.
‘पेपर फुटणे हा प्रकार अत्यंत गंभीर मानला जातो. चौकशी समिती आपला प्राथमिक अहवाल येत्या ४८ तासांत सादर करणार आहे. मात्र पुढील सखोल चौकशी सुरू राहणार आहे’, असे गोवा विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. दिलीप देवबागकर यांनी सांगितले.
पेपर फुटल्याचे लक्षात येताच परीक्षा रद्द करण्याचेही आदेश देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या शेवटच्या वर्षाचे पेपर कालच रात्री काही पत्रकारांच्या हाती लागले होते. त्यांनी आज सकाळी या पेपरसह गोवा वैद्यकीय महाविद्यालय गाठले. विद्यार्थ्यांचा जो पेपर सुरू होता त्या पेपरची हस्तलिखित प्रत डीनना दाखवण्यात आली. तोवर मुलांची परीक्षा सुरू झाली होती. मुलांच्या हातात पडलेली प्रश्‍नपत्रिका आणि पत्रकारांनी दाखवलेली प्रत यातील २० पैकी १६ प्रश्‍न जशास तसे होते. हे पाहून धक्का बसलेल्या डीननी याची माहिती त्वरित गोवा विद्यापीठाला दिली. त्याचवेळी आजची परीक्षा रद्द झाल्याचे जाहीर करण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यामध्ये काही काळ तणाव निर्माण झाला.
परीक्षेपूर्वीच सुमारे ५० विद्यार्थांच्या हाती प्रश्‍नपत्रिका लागल्या होत्या, अशी माहिती उपलब्ध झाली आहे. दरम्यान, सदर प्रश्‍नपत्रिका कशी फुटली याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. प्रश्‍नपत्रिका काढण्याची पद्धतही अतिशय गुप्त असते. तीन प्राध्यापकांकडून प्रश्‍नपत्रिका हस्तलिखित तयार करून घेतले जाते. या तीनही प्रती गोवा विद्यापीठात आल्यानंतर कोणती प्रश्‍नपत्रिका परीक्षेच्या दिवशी मुलांना द्यावी, याचा निर्णय पेपर सुरू होण्याच्या काही मिनिटांपूर्वी घेतला जातो, असे प्रा. देवबागकर यांनी सांगितले. मात्र, या प्रकारामुळे आता ही पद्धतही पुन्हा तपासून पाहण्याची वेळ आल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

पाच जणांचा अपघाती मृत्यू

मडगाव, दि. ३ (प्रतिनिधी)
दक्षिण गोव्यात आज चार वेगवेगळ्या अपघातांत चौघांना मरण आले तर त्यात एक पर्यटक, एक शिक्षक व एका शेतकर्‍याचा समावेश आहे, त्याचप्रमाणे आज सकाळी वास्कोत भारती शिपयार्ड (पूर्वीचे पिंकी शिपयार्ड) मध्ये कामाला गेलेला २५ वर्षीय राजेश चव्हाण हा कंत्राटी कामगार दिनेश यादव या ‘क्रेन ऑपरेटर’च्या हलगर्जीपणामुळे क्रेनखाली चिरडून जागीच ठार झाला. उत्तर गोव्यात शरदोण उतरणीवर झेन कार १० मीटर खोल दरीत पडल्याने डॅरील फर्नांडिस या २० वर्षीय तरुणाचामृत्यू झाला. तर, चालक अर्जुन फर्नांडिस गंभीर जखमी झाला आहे.

आराखड्यातील संशयास्पद बाबींचे स्पष्टीकरण करा


गोवा बचाव अभियानची मागणी


पणजी, दि. ३ (प्रतिनिधी)- राज्य सरकारतर्फे अधिसूचित करण्यात आलेल्या प्रादेशिक आराखडा-२०२१ अंतर्गत ‘इको टूरीझम’ च्या नावाखाली काही बड्या ‘रिअल इस्टेट’ व हॉटेल उद्योजकांवर मेहरनजर केल्याचे उघड झाले आहे. पर्यटन, खाण धोरण तसेच सामाजिक साधनसुविधांचे अजिबात प्रतिबिंब या आराखड्यात नाही व काही गोष्टी जाणीवपूर्वक घुसडण्यात आल्याचा संशय बळावतो, अशा परिस्थितीत मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी वेळीच समाधानकारक स्पष्टीकरण द्यावे, अशी आग्रही मागणी गोवा बचाव अभियानाच्या निमंत्रक सॅबिना मार्टीन्स यांनी केली.
आज इथे बोलावण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. याप्रसंगी अभियानाच्या सचिव रोबीना शहा, मिंगेलिन ब्रागांझा व आनंद मडगावकर आदी हजर होते. प्रादेशिक आराखडा-२०२१ चा सखोल अभ्यास केल्याअंती काही संशयास्पद गोष्टींचा उकल झाला. याप्रश्‍नी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांची भेट मागितली असता त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळत नाही. आपण स्वतः मोबाईलवर संपर्क केला असता त्यांनी फोन उचलला नाही,असेही मार्टीन्स म्हणाल्या. पेडणे व काणकोण तालुक्यांच्या नकाशांचा आढावा घेतला असता काही ठरावीक रियल इस्टेट व हॉटेल उद्योजकांनी विकत घेतलेल्या जमिनी ‘इको-टूरिझम’ च्या नावाखाली निर्देशित केल्याचे दिसून येते.पूर्व आराखडा व अंतिम आराखड्यातही अनेक बदल आढळून आलेले आहेत. मांद्रे पंचायतीत सर्वे क्रमांक २१० ते २१५ ही जागा वसाहत क्षेत्र (सेटलमेंट झोन) दाखवण्यात आला आहे. ही जागा ‘महाशीर हॉटेल व रिझोर्ट प्रा.ली’ यांच्या मालकीची आहे. पालये गावात मूळ वसाहतीपासून अलिप्त अशा ठिकाणी भली मोठी जागा वसाहत क्षेत्रासाठी दाखवण्यात आली आहे. कासारवर्णेत भली मोठी जागा औद्योगिक वसाहतीसाठी तर कोरगावांत ‘सीआरझेड’ क्षेत्राअंतर्गत औद्योगिक वसाहतीसाठी जागा दाखवण्यात आली आहे. पार्से पंचायतक्षेत्रातील नकाशा व्हीपी-१ अंतर्गत अधिसूचित झाला आहे तर आराखड्यात ही पंचायत व्हीपी-२ दाखवण्यात आला आहे. खाजने,अमेरे - पोरस्कडे पंचायतीची नेमकी उलटी परिस्थिती आहे. विर्नोडा पंचायत क्षेत्रातील नकाशांत पेडणे पालिकेचा काही भाग दाखवण्यात आल्याने विर्नोडा व पेडणे पालिका सीमारेषांबाबत पुन्हा घोळ निर्माण झाला आहे. धारगळ क्रीडानगरी पूर्व आराखड्यात नसताना अंतिम आराखड्यात ती कशी काय आली,असा सवालही यावेळी करण्यात आला.
पूर्व आराखड्यात ८९ सक्रिय खाणी असल्याचे म्हटले होते तर अंतिम आराखड्यात हा आकडा १२९ वर पोहचला, याचेही स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी द्यावे. पूर्व आराखड्यात खाणींना उत्तेजन देणार नाही, असे ठरले असताना खोला पंचायत क्षेत्रात ‘बॉक्साइट’ खाणीसाठी जागा निश्‍चित केली आहे. खोतीगाव हे अभयारण्य क्षेत्र असताना २०२१ पर्यंतच्या लोकसंख्येचा आकडा फुगवून दाखवण्यात आलेला आहे व त्यामुळे हा सगळा जनतेच्या डोळ्यांना पाणी पुसण्याचा प्रकार तर नव्हे, असा संशय घेण्यास वाव असल्याचे मार्टिन्स म्हणाल्या.
प्रादेशिक आराखड्याच्या प्रारंभी पारदर्शकतेचा अवलंब करण्यात आला खरा परंतु कालांतराने ही पारदर्शकता लोप पावत गेली, अशी टीका यावेळी मार्टिन्स यांनी करून मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी त्वरित स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी केली आहे. विविध पंचायत क्षेत्रातील संशयास्पद गोष्टींबाबत संबंधित लोकांना जागृत केले जाईल, असेही त्या म्हणाल्या.

आगोंद ‘आराखडा’ वादात

काणकोण, दि. २ (प्रतिनिधी)
आगोंद प्रादेशिक आराखडा समितीतर्फे करण्यात आलेल्या सर्व सूचनांना फाटा देण्यात आल्याने काल सरपंच मिलाग्रीना फर्नांडिस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. शासनाने घोषित केलेल्या ‘काणकोण तालुका आराखडा २०२१’ला या बैठकीतविरोध करण्यात आला. घोषित प्रादेशिक आराखडा २०२१ ला सर्वानुमते विरोध करण्यासाठी या खास बैठकीत आगोंद नागरिक समिती व अन्य नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात सरपंच मिलाग्रीन फर्नांडिस यांनी हा घोषित प्रादेशिक आराखडा २०२१ लौकरच ग्रामसभेत सर्वांसाठी उपलब्ध करणार येणार असून, यानंतर सर्वांच्यामतानुसार निर्णय घेण्यात येणार आहे असे म्हटले आहे.
आगोंद ग्राम प्रादेशिक आराखड्यात समितीतर्फे सुचविण्यात आलेल्या सूचनांचा फाटा देऊन एक वेगळाच आगोंद ग्राम आराखडा प्रादेशिक आराखडा २०२१ च्या समितीतर्फे पंचायतीत पाठविल्याने आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे. सुधारित २०२१ आराखड्याची प्रत सरकारने कधीच आगोंद पंचायतीत पाठविली नाही , त्यामुळे येथील नागरिकांनाही त्याबद्दल माहिती उपलब्ध झाली नाही.

कॉंग्रेसच्या मानगुटीवर पुन्हा बोफोर्सचे भूत

-४१ कोटी जादा दिल्याचे उघड
-आयकर लवादाचा अहवाल


नवी दिल्ली, दि. ३
बोफोर्स गैरव्यवहार प्रकरणात कराराचे उल्लंघन करून सरकारने विन चढ्ढा व क्वात्रोचीला सुमारे ४१ कोटी रूपये अतिरिक्त लाटल्याचे आयकर लवादाला आढळून आल्यामुळे बोफोर्सचे भूत परत एकदा कॉंग्रेसच्या मानगुटीवर बसणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. विविध घोटाळ्यांच्या प्रकरणात अडकलेल्या कॉंग्रेस सरकारची लक्तरे या निर्णयामुळे देशाच्या वेशीवर टांगली गेली आहेत.
४१ कोटी रूपये स्वर्गीय विन चढ्ढा व इटलीचे व्यावसायिक ओटावियो क्वात्रोची यांना ‘होवित्झर’ बंदूक व्यवहाराअंतर्गत देण्यात आले होते व या उत्पन्नावरील कर त्यांनी भारतात भरणे आवश्यक होते, असे लवादाने म्हटले आहे.
याबाबतीत कोणतीच कारवाई न करता गप्प बसणे म्हणजे भारत हे सौम्य राष्ट्र आहे व येथे कोणीही दंड भरून कर कायद्याशी खेळू शकतो असा चुकीचा संदेश जाऊ शकतो, असे लवादाने आपल्या ९८ पानी अहवालात म्हटले आहे.
आयकर खात्याविरूध्द चढ्ढाच्या मुलाने लवादाकडे खात्याच्या ५२ कोटी रूपयांच्या आयकर दाव्याबाबत आव्हान याचिका सादर केली होती. खात्याने १९८७-८८ व १९८८-८९ या दोन सालांसाठी छड्डाकडून ८५ लाख कर येणे असल्याचाही दावा केला होता.
कंत्राटातील दरापेक्षा कमी कमिशन बोफोर्सने द्यायला हवे होते, असे नमूद करताना लवादाने त्याउलट सरकारलाच अतिरिक्त ४१ कोटी रूपये देणे भाग पाडल्याचे म्हटले असून हा निधी चढ्ढा व क्वात्रोचीला दिला गेल्याचेही म्हटले आहे.
क्वात्रोची हे गांधी घराण्यातील अत्यंत जवळचे मानले जात होते. लवादाचा हा निर्णय अशावेळी आला आहे की ज्यावेळी कॉंग्रेस व केंद्र सरकार विविध घोटाळ्यांच्या गर्तेत सापडले आहे. या निर्णयामुळे कॉंग्रेसची उरलीसुरली लक्तरेही दिल्लीच्या वेशीवर टांगली गेली आहेत. सीबीआयने क्वात्रोचीविरूध्द गुन्हा नोंदविलेला असतानाही त्याने १९९३ भारत देश सोडला होता.
मेसर्स स्वेंस्का इंक, पनामा या कंपनीच्या नावे ३२.६६ कोटी रूपयांचे कमिशन दिले गेले ते छड्डा याला पोचले व ते जीनिव्हाच्या स्विस बँक कॉर्पोरेशनमध्ये जमा झाल्याचे लवादाच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
त्याचप्रमाणे ए. ई सर्व्हीसेस लिमिटेड व्दारा मायो असोसिएटस, एसए, जीनिव्हा येथील कंपनीला ८.५७ कोटी रूपये देण्यात आले. महत्वाचे म्हणजे या कंपनीचे खाते तत्पूर्वी केवळ पंधरा दिवस आधीच म्हणजे २० ऑगष्ट १९८६ रोजी उघडण्यात आले होते.

Monday, 3 January, 2011

लष्करी व सनदी अधिकार्‍यांविरुद्ध सीबीआयला मिळाले ठोस पुरावे

आदर्श घोटाळ्याची चौकशी

नवी दिल्ली/मुंबई, दि. २ - आदर्श गृहनिर्माण सोसायटी घोटाळ्यात काही लष्करी अधिकारी आणि सनदी अधिकार्‍यांनी महत्त्वाच्या दस्तावेजांमध्ये ङ्गेरङ्गार करून कटकारस्थान रचल्याचे ठोस पुरावे आपल्याला मिळाले असल्याचा दावा सीबीआयने आज केला. या प्रकरणात लवकरच एङ्गआयआर दाखल करण्यात येणार असल्याची माहितीही सीबीआयने दिली.
देशभरातील धाडसत्रात सीबीआयच्या हातात अनेक महत्त्वाचे पुरावे लागले आहेत. आदर्श सोसायटीतील घरे ताब्यात घेण्यासाठी आणि नंतर आपले कृत्य लपविण्यासाठी काही लष्करी अधिकार्‍यांनी महाराष्ट्र सरकारमधील सनदी अधिकारी तसेच काही खाजगी लोकांशी कट रचून महत्त्वाच्या दस्तावेजांमध्ये ङ्गेरङ्गार केली असल्याचे या दस्तावेजांमधून स्पष्ट झाले असल्याचे सीबीआयच्या वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.
आता आमच्याजवळ अतिशय ठोस पुरावे आहेत. या प्रकरणात आमची बाजू भक्कम झालेली असल्याने आम्ही लवकरच या घोटाळाप्रकरणी एङ्गआयआर दाखल करणार आहोत. सीबीआयच्या विधी विभागाकडून एकदा मंजुरी मिळाल्यानंतर ही प्रक्रिया सुरू होईल, असे हा अधिकारी म्हणाला.
संरक्षण मंत्रालयातील वरिष्ठ अधिकार्‍यांचा या संवेदनशील घोटाळ्यात सहभाग असल्याचे सिद्ध झाल्यानंतर संरक्षण मंत्री ए. के. ऍण्टनी यांनी या घोटाळ्याच्या सीबीआय चौकशीचे आदेश दिले होते. या घोटाळ्यात माजी लष्कर प्रमुख जनरल दीपक कपूर आणि जनरल एन. सी. विज तसेच माजी नौदल प्रमुख ऍडमिरल माधवेंद्र सिंग यांचाही समावेश आहे.

कांदे नव्वदी गाठणार!

सरकारचे आश्‍वासन फोल

‘फलोत्पादना’चे कांदे कुजके व अपुरे

पणजी, दि. २ (प्रतिनिधी)
सरकारने कांदे स्वस्त करण्याची कितीही आश्‍वासने दिली तरी त्यांची आश्‍वासने इतर आश्‍वासनाप्रमाणे फोलच ठरत आहेत. कारण आज विविध बाजारपेठेत कांद्याचे भाव आणखीनच वाढले आहेत. त्यामुळे कांदे स्वस्त होणे शक्य नाही! हे सिद्ध झाले आहे. आज पणजी बाजारात कांदे ६५ ते ७० रुपयांपर्यंत प्रति किलो विकले जात होते. दोन दिवसांपूर्वी हा दर ५० रु.च्या आसपास होता. त्यामुळे पुढील काही दिवसांत कांदा सर्वसामान्यांचा वांदा करून नव्वदी गाठण्याची शक्यता आहे.
-सरकारचे आश्‍वासन फोलच
राज्य व केंद्र या दोन्हीकडे सत्तेवर असलेले कॉंग्रेसचे राज्य सरकार व केंद्र सरकार तसेच युवा कॉंग्रेसचे नेते गेल्या काही दिवसांत बेंबीच्या देठापासून ओरडून सांगत होते की भाजपाने एका दिवसासाठी कांदा स्वस्त दिला, आम्ही दररोज कांदा स्वस्त देऊ! पण कुठचे काय? फलोत्पादन केंद्रांमध्ये चार पाच दिवस कांदा उपलब्ध केला तोही कोंब आलेला व कुजका! आता या केंद्रांवर कांदाच दृष्टीला पडत नाही. या केंद्रमालकंाना विचारल्यास कांदे कमी पाठवतात, तसेच एका माणसाला एक किलोच देण्याचे आदेश आहेत, एवढे असूनही ते अपुरे कांदे एका तासातच संपतात, अशी माहिती दिली. त्यामुळे येत्या काही दिवसांत कांदे स्वस्त होतील,अशी आश्‍वासने केंद्र व राज्यात सत्तेवर असलेल्या कॉंग्रेसच्या मंत्र्यांपासून युवा नेते सुध्दा गेले अनेक दिवस देत होते, ती फोल ठरली असून कुजके व कोंब आलेले तेही अपुरे कांदे देण्याचे नाटक त्यांना फार दिवस वठवता आलेले नाही.

मंत्रिपदासाठीचा विरोध हा मिकींसाठी‘प्लस पॉंईट’!

कॉंग्रेस नेत्यांनी घेतला धसका

मडगाव, दि. २(प्रतिनिधी) : माजी मंत्री मिकी पाशेको यांच्या विरोधात गेला महिनाभर ज्या खटपटी लटपटी गोव्यातील सत्ताधारी कॉंग्रेसमधील तसेच राष्ट्रवादीतील त्यांच्या विरोेधकांनी केल्याने, त्याचा विपरीत परिणाम होण्याऐवजी माजी पर्यटनमंत्र्याचे बाणावली व नुवेमधील स्थान अधिकच बळकट झाल्याचे दिसत असून चर्चिल व कंपनीने मिकीविरुध्द केलेले प्रयत्न त्यांच्यावरच बूमरँग होणार असल्याची शक्यता वाढली आहे.
मिकी यांनी मावळत्या वर्षाच्या शेवटच्या महिन्यात बेताळभाटीमध्ये दिमाखात साजरा केलेला वाढदिवस, त्यासाठी जमलेली त्यांच्या समर्थकांची गर्दी तसेच राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी लावलेली उपस्थिती व त्या वाढदिवसाचे निमित्त करून मिकी यांनी आगामी निवडणुकीत कॉंग्रेसशी युती न करता सर्व चाळीसही जागा लढविण्यासाठी पक्ष नेतृत्वाला दिलेला सल्ला, यामुळे बाणावली व अन्य मतदारसंघांत आपल्या नातेवाईकांना उभे करण्याचा मनसुबा रचलेल्यांनी त्यांच्या या संकेताचा धसका घेतला व पुढच्या घडामोडी घडल्या, असे राजकीय निरीक्षक मानतात.
मिकी यांचे राजकीय बळ ओळखून, राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने त्यांना मंत्रिमंडळात सामील करण्याचा आपला निर्णय कॉंग्रेसला कळविला.मंत्रिपद नसतानाही त्या गुर्मीत व ताठ्यात वावरणार्‍या मिकींकडे मंत्रिपद आले तर काय होईल, या विचारानेच गलितगात्र झालेल्या दहा जणांनी मग मडगावात एकत्र येऊन त्यांच्या मंत्रिमंडळ समावेशास विरोध केला व त्यासाठी प्रसंगी सरकार पाडण्याचा इशारा दिला. त्यांच्या या निर्णयामागे नेमके कोण आहे त्याबाबत वेगवेगळे कयास व्यक्त केले जातात, परंतु साधारण गेला पंधरवडाभर चालू असलेल्या या राजकीय खेळाचा मागोवा घेतला तर मिकी यांचा मतदारसंघ असलेल्या बाणावलीतील स्थान त्यांनी आपण आगामी निवडणूक नुवेतून लढवणार असे जाहीर करूनही पूर्वीपेक्षाही बळकट झालेले दिसून येत आहे. ती बाब प्रत्यक्षात मिकीपेक्षा स्वतः च्या कन्येला बाणावलींतून उभे करण्याच्या प्रयत्नात असलेल्या चर्चिल यांना प्रतिकूल ठरत चालली आहे. कारण आज तेथे मिकींबाबत लोकांमध्ये कमालीची सहानुभूती व तितकीच चर्चिलविरोधी भावना झालेली दिसून येत आहे.
मिकी पाशेकोंवर गंभीर स्वरुपाचे आरोप आहेत व त्यातून ते पंधरवडाभर तुरुंगात राहूनही आलेले आहेत व सध्या जामिनावर आहेत पण तरीही त्यांच्या एका हाकेसरशी हजारांनी लोक धावून येताना असे पहायला मिळते. नादिया प्रकरणात त्यांचे जामिनाचे वा अन्य अर्ज सुनावणीस येत असताना, न्यायालयात त्यावरील सुनावणी ऐकण्यासाठी ज्या उत्सुकतेने त्यांचे समर्थक येत होते, पोलिस व गुन्हा अन्वेषणाच्या नावाने बोटे मोडत होते त्यांची तीच भावना अजून कायम दिसत आहे. नादिया प्रकरणात ते निरपराध आहेत, ती निव्वळ आत्महत्या असून मिकींचा राजकीय काटा काढण्यासाठी ज्या लोकांनी त्यावेळी धडपड केली होती तेच लोक आज वेगळ्या पध्दतीने त्यांचा मंत्रिमंडळ प्रवेश अडवीत आहेत असा आरोप त्यांचे समर्थक करीत असून त्यातून परत एकदा मिकीप्रती त्यांची सहानुभूती वाढली आहे.
सार्वजनिक बांधकाम खाते हाती असलेल्या राजकारण्यांनाही मिकी यांनी सर्व ४० ही मतदारसंघ लढविण्याची घोषणा करून अक्षरशः घाम काढला आहे तो हाती मंत्रिपद नसताना व गुन्हा अन्वेषणाने बँकखाती सील केलेली असताना. अशाच स्थितीत त्यांनी कर्नाटकात राजकीय संकट उद्भवलेले असताना तेथील सरकारच्या मदतीसाठी पुढाकार घेतला होता. मिकींना सध्या मंत्रिपद किंवा लाभाचे कोणतेच पद हाती नसताना बाणावली व नुवेतील त्यांची कामे व दारात आलेल्यांना मदत करण्याचे काम पूर्वीच्याच नेटाने चालू आहे व त्यामुळेच त्यांचा धसका घेऊन त्यांचे विरोधक त्यांच्या मंत्रिपदाला विरोध करीत असून त्यांचा हा विरोधच मिकींसाठी ‘प्लस पॉंईट’ ठरला आहे.

वारका येथे बिहारी मजुराचा ठेचून खून

सहकार्‍यांचाच हात

मडगाव, दि. २ (प्रतिनिधी)
चार दिवसांपूर्वीच गोव्यात कामासाठी आलेल्या समशेर अन्सारी(२५) या बिहारी कामगाराचा त्याच्या सहकार्‍यांनीच दंडुक्यांनी बदडून खून करण्याचा प्रकार घडला. कोलवा पोलिसांनी लगेच हालचाल करून एकास अटक केली आहे, तर अन्य तिघे फरारी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मयत हा बिहारमधील तर त्याचे अन्य साथीदार झारखंडमधील आहेत.पेडा चारवाडेा-वारका येथील एका बांधकाम जागेवर काम करण्यासाठी आले होते व तेथील फुर्तादो रिअल इस्टेटमध्ये एका निवार्‍यात रहात होते. आज पहाटे ५.३० च्या सुमारास त्यांच्यात भांडण झाले व त्यातून इतर चौघांनी समशेरला दंडुक्यांनी मारहाण केली. त्यात त्याच्या डोक्याला व डोळ्यांना जबर दुखापत होऊन तो जागींच मरण पावला. नंतर ते पळून गेले.
कोणीतरी ही माहिती पोलिसांना दिल्यावर ते तेथे धावून गेले, त्यांनी लगेच हालचाल केली व एकास अटक केली पण बाकीचे त्यांच्या हाती लागले नाहीत. या प्रकरणी निरीक्षक तुषार वेर्णेकर अधिक तपास करीत आहेत. त्यांनी पळालेले अन्य आरोपी सावध होतील या कारणास्तव त्याचे नाव सांगण्याचे टाळले. त्यांचे भांडण नेमके कोणत्या कारणावरून झाले ते कळू शकले नाही.

कारच्या धडकेने दुचाकीस्वार ठार

मडगाव, दि. २ (प्रतिनिधी)
मुरीडाग्रांज येथे आज संध्याकाळी झालेल्या एका अपघातात फातोर्डा येथील एक मोटारसायकलस्वार मृत्यू पावला. फातोर्डाहून पणजीकडे जाणार्‍या एका मारुती कारने धडक दिल्यामुळे हा अपघात झाला. त्यात रोहिदास नाईक हा फातोर्डा येथील दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. त्याला प्रथम हॉस्पिसियो इस्पितळात दाखल करण्यात आले व नंतर ‘गोमेकॉ’त हलविले. तेथे उपचार चालू असताना त्याला मृत्यू आला. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवागारात ठेवला आहे. या प्रकरणी मडगाव पोलिस अधिक तपास करत आहेत.

पंतप्रधानांनी ‘पॅक’पुढे येऊ नये

प्रणव मुखर्जींचा सल्ला
-कॉंगे्रसमध्ये विरोधाभासी सूर


कोलकाता, दि. २
२-जी स्पेक्ट्रम घोटाळ्याप्रकरणी लोकलेखा समितीपुढे (पॅक) हजर होण्याची इच्छा पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी स्वत:हून व्यक्त केली असतानादेखील कॉंगे्रसमधून आता विरोधी सूर निघू लागलेला आहे. अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी, पंतप्रधानांनी ‘पॅक’पुढे उपस्थित राहण्याची मुळीच गरज नाही; कारण, त्यांचे दायित्व केवळ संसदेप्रती आहे, कोणत्याही समितीप्रती नाही, असे स्पष्ट केले.
‘‘लोकलेखा समितीपुढे जाण्याचा निर्णय पंतप्रधानांनी आमच्यापैकी कुणाशीही चर्चा न करता स्वत:हून घेतलेला आहे. त्यांनी जर माझ्याशी या मुद्यावर चर्चा केली असती तर मी त्यांच्या या कल्पनेला तीव्र विरोधच केला असता,’’ असे मुखर्जी यांनी पश्‍चिम बंगाल कॉंगे्रस समितीच्या बैठकीला संबोधित करताना सांगितले.
घटनात्मकदृष्ट्या विचार केला तर पंतप्रधानांचे दायित्व केवळ संसदेप्रती आहे. कोणत्याही समितीशी ते बांधील नाहीत. पंतप्रधानांनी कोणत्याही समितीपुढे उपस्थित राहणे हे संसदेच्या कुठल्याच नियमात बसत नाही, असे सांगताना, ‘कोणताही मंत्री आजवर कोणत्याही संसदीय समितीपुढे का हजर झालेला नाही,’ असा सवाल त्यांनी केला. सोबतच त्यांनी या प्रश्‍नाचे उत्तरही दिले. ‘कोणताही मंत्री हा केवळ संसद किंवा विधिमंडळाशीच उत्तरदायी असतो,’ असे ते म्हणाले.
येथे तर पंतप्रधानांचा प्रश्‍न आहे. लोकसभेतील संयुक्त पुरोगामी आघाडीचा प्रत्येक सदस्य या प्रकरणी पंतप्रधानांच्या पाठीशी उभा आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
एखाद्या मंत्र्याने एखाद्या संसदीय समितीपुढे उपस्थित राहण्याचे या देशाच्या इतिहासातील केवळ एकमेव उदाहरण आहे आणि ते म्हणजे, डॉ. मनमोहनसिंग यांनी देशाचे अर्थमंत्री असताना,१९९२ मध्ये हर्षद मेहता याने केलेल्या कोट्यवधींच्या शेअर घोटाळ्याचा तपास करणार्‍या संयुक्त संसदीय समितीपुढे त्यांना हजर राहावे लागले होते, अशी आठवणही त्यांनी करून दिली.

Sunday, 2 January, 2011

कारच्या धडकेने दुचाकीस्वार ठार

मडगाव, दि. २ (प्रतिनिधी)
मुरीडाग्रांज येथे आज संध्याकाळी झालेल्या एका अपघातात फातोर्डा येथील एक मोटारसायकलस्वार मृत्यू पावला. फातोर्डाहून पणजीकडे जाणार्‍या एका मारुती कारने धडक दिल्यामुळे हा अपघात झाला. त्यात रोहिदास नाईक हा फातोर्डा येथील दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. त्याला प्रथम हॉस्पिसियो इस्पितळात दाखल करण्यात आले व नंतर ‘गोमेकॉ’त हलविले. तेथे उपचार चालू असताना त्याला मृत्यू आला. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवागारात ठेवला आहे. या प्रकरणी मडगाव पोलिस अधिक तपास करत आहेत.

गिरवडे येथे तरुणीचा बळी

म्हापसा, दि. १ (प्रतिनिधी): नववर्षाच्या पहाटे आज गिरवडे येथील रॉयल एंटरप्राईझेस शोरुमजवळ एका कारला मागाहून आलेल्या एका कारने जोरदार धडक दिल्याने पुढच्या कारमधील कीर्ती बाळकृष्ण चोडणकर (२१) ही तरुणी जागीच ठार झाली. आल्टो कार रस्त्याच्या बाजूला थांबण्यासाठी जात असतानाच मागून आलेल्या एक्सन्ट कारने दिलेली धडक एवढी जबरदस्त होती की, आल्टो कार कोलांट्या खात सुमारे १५ मीटर पुढे जाऊन उलटली. मागील सीटवर बसलेली कीर्ती ही तरुणी या अपघातात ठार झाली. या उमद्या व उद्योजक तरुणीच्या अकाली निधनाने रेवोडा परिसरात दुंःखाची छाया पसरली आहे.
कीर्ती ही तरुणी ताकवाडा, रेवोडा येथील असून, खोर्ली म्हापसा येथील एका वधुचा मेकअप करण्याचे कंत्राट तिने घेतले होते. त्यासाठी ती सकाळी ६.३० वाजता तेथे गेली. गिरवडे येथील आपली दुसरी सहकारी आली नसल्याचे कळल्यानंतर ती कल्पित नाडकर्णी (फोंडा) व अन्नपूर्णा खोलकर (खोर्ली) यांच्यासह आल्टो गाडीने (क्रमांक जीए-०६-ए-१०१७) गिरवड्याजवळ आली. आपली सहकारी समोरुन येताना दिसल्याने या तिघींनी आपली गाडी बाजूला घेतली असतानाच, मागून भरधाव वेगाने आलेल्या एक्सन्ट कारने (क्र. जीए-०१-ई-३९५७) धडक दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. या गाडीत चालक संजीत गुप्ता (म्हापसा), लेहर्ट ब्रागांझा (गावसावाडा-कळंगुट) व शौनक पै (शेट्येवाडा - म्हापसा) उपस्थित होते. याचवेळी बाजूस असलेल्या गोवा मुंबई बसलाही (क्र.एमएच-०७-सी-७०७७) या गाडीची धडक बसली. या अपघातात कीर्ती हिचा मृत्यू झाला तर दोन्ही कारचालक व अन्य तरुणी जखमी झाल्या. त्यांना आझिलोत उपचारार्थ नेण्यात आले. सर्व वाहनांची हानी झाली आहे.उपनिरीक्षक उदय गावडे, हवालदार कृष्णा गावस यांनी घटनास्थळी धाव घेऊन कीर्ती हिचा मृतदेह गाडीतून बाहेर काढून विच्छेदनासाठी बांबोळी येथे पाठविला. अपघातात कारणीभूत ठरल्याच्या कारणावरून एक्सन्टचा कारचालक संजीत गुप्ता (म्हापसा) याच्याविरुद्ध गुन्हा नोंद करून म्हापसा पोलिसांनी अटक केली.

भोम अपघातात तिघे ठार

फोंडा, दि.१ (प्रतिनिधी): नववर्ष २०११ च्या पहिल्याच दिवशी आज (दि.१) पहाटे पावणे पाचच्या सुमारास मुस्लिमवाडा भोम येथे रस्त्यावर उभा करून ठेवण्यात आलेल्या मालवाहू ट्रकला (क्र. केए-१६-ए-७४३६) पाठीमागून मोटरसायकलने (क्र.जीए-०७-डी-१३०९) जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात तिघे जागीच ठार झाले.
या अपघातात मृत झालेल्या दोघांची ओळख पटली असून तिसर्‍या मृताची अद्याप ओळख पटलेली नाही. सुराधिश शिवानंद नाटेकर (२४ वर्षे, रा. दिवाडी) आणि मनोहर गंगाधर पाटील (२९ वर्षे, ओल्ड गोवा) अशी दोघांची नावे आहेत. यासंबंधी मिळालेल्या माहितीनुसार, या अपघात मृत झालेले तिघेही एकाच मोटरसायकलवरून भोम येथे कालोत्सवाला आले होते. पहाटेच्या वेळी घरी परत जात असताना त्यांच्या मोटरसायकलची धडक मालवाहू ट्रकाला बसली. हा मालवाहू ट्रक चित्रदुर्ग कर्नाटक येथून आमोणा येथे जाण्यासाठी आला होता, चालकाने रात्रीच्या वेळी मुस्लिमवाडा भोम येथे रस्त्यावर उभा करून ठेवला होता. ट्रकचे पार्किंग सिग्नल सुद्धा चालत नव्हते. रस्त्यावर उभा करण्यात आलेला हा ट्रक मोटरसायकल चालकाच्या दृष्टीस न पडल्याने मोटर सायकलची ट्रकाच्या मागील बाजूला जोरदार धडक बसली. त्यामुळे तिघांचे जागीच निधन झाले. तिघांच्या डोक्याला तसेच अंगाला गंभीर जखमा झाल्या होत्या, असे पोलिस सूत्रांनी सांगितले. ह्या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर फोंडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. फोंडा पोलिसांनी ट्रक चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून ट्रक चालक के. एच. विजय हनुमंतप्पा (दावणगिरी) याला अटक केली आहे. निष्काळजीपणे ट्रक पार्क केल्याचा आरोप ट्रक चालकावर ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी निरीक्षक सी. एल. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक निखिल पालेकर तपास करीत आहेत.

क्रिकेटपटू बालंबाल बचावले

वास्को, दि. १ (प्रतिनिधी): नवीन वर्ष साजरे करून उशिरा रात्री घरी परतत असताना गाडीचे टायर ङ्गुटून झालेल्या अपघातात गोवा क्रिकेट संघटनेचे क्रिकेटपटू शेरबहादूर यादव (अलङ्गताह क्लब) व हेमंत शेटगावकर (सर्वोदया स्पोर्टस् अकादमी) किरकोळ जखमी झाले. कोलवा येथून वास्कोला येत असताना झुआरीनगर राष्ट्रीय महामार्गावर सँट्रो गाडी उलटून हा अपघात झाला. गोव्यात सुरू असलेल्या ‘जीपीएल ट्वेंटी ˆ २०’ स्पर्धेतील शेरबहादूर यादव हा सर्वांत महागडा खेळाडू असून उद्या २ रोजी तो उपांत्य फेरीत खेळणार आहे, हे उल्लेखनीय!
याविषयी मिळालेल्या माहितीनुसार हे दोन्ही खेळाडू जीए-०६-डी-०७२३ क्रमांकाच्या सँट्रो गाडीतून घरी परतत होते. झुआरीनगर येथील एमईएस कॉलेज जंक्शन जवळ गाडीचा टायर ङ्गुटल्याने गाडीने तीन कोलांट्या खाल्ल्या व पुन्हा उभी राहिली. यात गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
दरम्यान, शेरबहादूर याच्याशी संपर्क साधला असता, उद्या होणार्‍या सामन्यात आपण खेळणार असल्याचे त्याने स्पष्ट केले. तसेच, हेमंत शेटगावकर सुखरूप असल्याची माहिती त्याने दिली. शेरबहादूरने रणजी क्रिकेटमध्ये गोव्याचे प्रतिनिधित्व केले आहे तर हेमंतने विविध स्तरावर गोव्याचे प्रतिनिधित्व केले आहे.

भ्रष्ट कॉंग्रेस नेत्यांना घरी पाठवणारच: मिकी

पणजी, दि. १ (प्रतिनिधी)ः‘आपणावर विनाकारण नादिया तोरादोच्या मृत्यूचे बालंट घालून व इतरही खोटे आरोप करून मुळापासूनच उखडण्याचे षड्यंत्र राजकीय प्रतिस्पर्ध्यांनी रचले.‘मनी लॉडरिंग’च्या आरोपाखाली आपली सगळी बँक खाती गोठवून आपल्याला लक्ष्य बनवण्याचेही प्रयत्न झाले. एवढे करूनही मिकी पाशेको अजूनही ताठ मानेने उभा आहे, या भीतीपोटीच कॉंग्रेस पक्षातील तथाकथित मंडळींच्या पायाखालची वाळू घसरत चालली आहे’.
‘प्रुडंट मिडीया’ या स्थानिक वृत्तवाहिनीला दिलेल्या खास मुलाखतीत मिकी पाशेको यांनी कॉंग्रेस नेत्यांचा पोलखोल करून त्यांना चांगलेच फैलावर घेतले. आपणावरील आरोप अजूनही सिद्ध व्हायचे आहेत, पण यापूर्वी अनेक प्रकरणांत तुरुंगाची हवा खाऊन आलेले नेते आपल्यावर गुन्हेगारीचा आरोप करून आपली बदनामी करीत सुटले आहेत, त्यांना गोमंतकीय जनता चांगलीच ओळखून आहे, असा शेराही त्यांनी मारला. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा तथा केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार व प्रफुल्ल पटेल यांनी आपली मंत्रिमंडळात वर्णी लावण्याचा जो निर्णय घेतला आहे तो पूर्ण विचाराअंतीच घेतला आहे व त्याचा निकाल तेच लावतील,असा विश्‍वासही मिकी यांनी व्यक्त केला.
कॉंग्रेस नेत्यांकडून वारंवार ‘एकला चलो रे’ चा नारा देऊन राष्ट्रवादीची अवहेलना करण्याचा प्रकार यापूर्वी घडला आहे व त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने चाळीसही मतदारसंघात उमेदवार उतरवण्याची भाषा केली तर त्यात गैर काय,असा सवालही मिकी यांनी यावेळी केला. चाळीस मतदारसंघांपैकी किती मतदारसंघांत विजय मिळवणार,असा सवाल केला असता किमान दहा जागा राष्ट्रवादी कॉंग्रेस सहजपणे जिंकू शकेल, असा दावा करून उर्वरित तीस मतदारसंघांत कॉंग्रेसच्या भ्रष्ट नेत्यांना पाणी पाजू, अशी पुष्टी मिकी यांनी जोडली.गोव्यात राष्ट्रवादीचा प्रसार करण्यासाठी आपले नेतृत्व श्रेष्ठींनी मान्य केले आहे व आपल्याला श्रेष्ठींचा पूर्ण पाठिंबा आहे, असेही ते म्हणाले. पुढील विधानसभा निवडणुकीत गोमंतकीय जनतेला एक स्वच्छ, लोकाभिमुख व जनतेचे हित पाहणारे सरकार देण्याचा संकल्पच आपण सोडला आहे. पुढील विधानसभा निवडणूक ही आपल्यासाठी युद्धासमान असेल व या युद्धात स्वरक्षणापेक्षा विजयी होण्यासाठीच आपण उतरणार असल्याचे ते म्हणाले. आपले वैयक्तिक मत नुवे मतदारसंघात आहे व त्यामुळे आपण नुवे मतदारसंघातूनच निवडणूक लढवणार असल्याची घोषणाही मिकी यांनी या मुलाखतीत केली. नुवे मतदारसंघाकडे कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचा पुनर्उच्चारही त्यांनी केला. नुवे मतदारसंघ हा सध्या कॉंग्रेसकडे आहे हे जरी खरे असले तरी ज्याअर्थी कॉंग्रेस नेत्यांना स्वबळावर निवडणूक लढवण्याची खुमखुमी आली आहे, त्याअर्थी पुढील विधानसभा निवडणुकीत त्यांना आघाडीत रस नाही, हेच स्पष्ट होते व त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षानेही आपली सारी ताकद पणाला लावण्याचे ठरवले आहे,असेही ते म्हणाले.
जुझे फिलिप डिसोझा व नीळकंठ हळर्णकर यांचे मंत्रिपद का काढून घेतले जात आहे, असा सवाल केला असता हा आपल्या पक्षाचा वैयक्तिक निर्णय आहे व त्याबाबत आपले श्रेष्ठीच भाष्य करतील,असे ते म्हणाले. हा निर्णय श्रेष्ठींनी कोणत्या आधारावर घेतला याचा जाब त्यांना श्रेष्ठीच देतील,असेही ते म्हणाले.पुढील पाच वर्षांत गोव्याचे राजकारण कसे असेल याचे स्पष्ट चित्र आपल्या नजरेसमोर आहे व प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आपण सर्व काही पणाला लावू, असा निर्धारही यावेळी त्यांनी व्यक्त केला. सासष्टी तालुका म्हणजे आपली मिरासदारी आहे,अशा जोशात वावरणार्‍या नेत्यांची येत्या विधानसभा निवडणुकीत कशी हवा निघेल हे पाहत रहा,अशी पुष्टी त्यांनी जोडली.
---------------------------------------------------------------------------
हा तर मोठा विनोदच!
वारंवार कॉंग्रेसच्या पोटात सुरा खुपसून आपला वैयक्तिक स्वार्थ साधलेले चर्चिल आलेमाव कॉंग्रेसच्या धोरणांचा उदोउदो करतात हाच मुळी मोठा विनोद आहे, असा टोला मिकी पाशेको यांनी हाणला.

मडकईकर, करिशेट्टी ठरणार बाबूशसाठी डोकेदुखी

महापालिका विकास आघाडीत धुसफुस
पणजी, दि. १ (प्रतिनिधी): पणजी बाजार संकुलातील घोटाळ्याचे प्रमुख संशयित सूत्रधार उदय मडकईकर व पार्किंग घोटाळ्यात अडकलेले नागेश करिशेट्टी यांना ताळगावचे आमदार तथा शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी पणजी महानगरपालिका निवडणुकीसाठी जाहीर केलेल्या महापालिका विकास आघाडीत पुन्हा संधी दिल्याने निवडणुकीपूर्वीच आघाडीत धुसफुस सुरू झाली आहे. विविध प्रकरणांत उघडपणे आरोप झालेल्या या दोन्ही नगरसेवकांमुळे आघाडीच्या विरोधात प्रचार करण्यासाठी विरोधी भाजपला आयतीच संधी प्राप्त झाली आहे. यामुळे हे द्वयी बाबूश मोन्सेरात यांच्यासाठी मोठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
बाबूश मोन्सेरात यांनी घोषित केल्याप्रमाणे नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच पणजी महापालिकेसाठी आपल्या तीस उमेदवारांची महापालिका विकास आघाडी जाहीर केली आहे. या आघाडीत विद्यमान १३ नगरसेवकांची पुन्हा वर्णी लावण्यात आली आहे. दरम्यान, भ्रष्ट नगरसेवकांना पुन्हा संधी देणार नाही, अशी घोषणा काही काळापूर्वी बाबूश यांनी केली होती परंतु नागेश करिशेट्टी व उदय मडकईकर यांचा समावेश आघाडीत करण्यात आल्याने बाबूश तोंडघशी पडले आहेत, अशीच चर्चा सध्या सुरू आहे. पणजी बाजारसंकुलातील दुकाने वाटप प्रकरण येत्या हिवाळी अधिवेशनात गाजण्याची शक्यता असून विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांच्याकडून नगरविकासमंत्री ज्योकिम आलेमाव यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव दाखल होण्याचाही संभव आहे. या घोटाळ्यावरून मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात जनहित याचिकाही दाखल करण्यात आली आहे व त्यामुळे निवडणुकीला सामोरे जाताना बाबूश यांच्या आघाडीला हे विषय त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे.
पणजी मतदारसंघात मोठ्या प्रमाणात सुशिक्षित व सुज्ञ मतदार आहेत. यामुळे ताळगावप्रमाणे पणजीतील मतदारांवरही आपली मोहिनी घालण्याचे बाबूश यांचे प्रयत्न कितपत सफल होतात याकडे अनेकांचे लक्ष लागून आहे. पणजी मतदारसंघावर विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांचीच मर्जी चालते व कॉंग्रेसचे अस्तित्वही जाणवत नाही. अशा परिस्थितीत ताळगाव पाठोपाठ पणजी मतदारसंघावर आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याचा बाबूश यांचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी भाजप कार्यकर्ते सज्ज झाले आहेत.
राष्ट्रवादीचा कॉंग्रेसला कोलदांडा
पणजी महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षानेही आपले स्वतंत्र पॅनल उतरवण्याचा विचार चालवला आहे. अलीकडेच राष्ट्रवादीतर्फे पुढील विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा करण्यात आली होती. या घोषणेच्या अनुषंगाने पणजी महानगरपालिका निवडणूक घोषित झाल्याने इथूनच कॉंग्रेसला कोलदांडा घालण्याची व्यूहरचना पक्षातर्फे आखली जात आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते तथा पणजी महापालिकेचे विद्यमान नगरसेवक ऍड. अविनाश भोसले यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. मिकी पाशेको यांच्याकडे गोव्यातील पक्षाची धुरा सोपवण्याचे पक्षश्रेष्ठींनी ठरवले आहे. बाबूश मोन्सेरात यांनी अलीकडेच मिकी पाशेको यांच्याविरोधात उघड भूमिका घेतल्याने या निवडणुकीत उतरण्याचा पक्षाचा मार्ग मोकळा झाला आहे, असेही ते म्हणाले. दरम्यान, मागील निवडणुकीत ऍड. भोसले हे बाबूश पॅनलचे सदस्य होते. यंदा मात्र ऍड. भोसले यांच्यासह अन्य चार नगरसेवकांना बाबूश यांनी वगळले आहे.
भाजपची जय्यत तयारी सुरू
बाबूशच्या पाठोपाठ भारतीय जनता पक्षाचे पॅनल जाहीर होणार असून पणजी महापालिकेचे पहिले महापौर अशोक नाईक यांच्या नेतृत्वाखाली व मनोहर पर्रीकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे पॅनल निवडणुकीत उतरणार आहे. उमेदवारांची यादी अंतिम टप्प्यात असून लवकरच ती घोषित होईल, अशी माहिती अशोक नाईक यांनी दिली. बाबूश यांनी सर्वप्रथम आपले उमेदवार घोषित केल्याने भाजपला उमेदवार निवडताना फायदा होणार आहे. बाबूश पॅनलच्या प्रत्येक उमेदवाराची ताकद अजमावून त्याला जबरदस्त टक्कर देणारा तोलामोलाचा उमेदवार भाजपतर्फे उतरवण्यात येणार आहे.

राष्ट्रपती उद्या गोव्यात

पणजी, दि. १(प्रतिनिधी): राष्ट्रपती प्रतिभा पाटील तीन दिवसांच्या गोवा भेटीवर येणार आहेत. ३ रोजी दुपारी १२ वाजता त्यांचे आगमन होत असून तीनही दिवस त्यांचा मुक्काम राजभवनावर असेल. ६ रोजी त्या पुणे येथे जाणार आहेत, असे सरकारी सूत्रांनी सांगितले. सध्या दीव येथे भेटीवर असलेल्या राष्ट्रपती ३ रोजी गोव्यात दाखल होणार आहेत. त्यांच्या गोवा भेटी दरम्यान कोणत्याही कार्यक्रमांची घोषणा सरकारकडून झाली नसली तरी त्यांची ही गोवा भेट विश्रांतीसाठी असल्याचे सांगितले जाते. या काळात त्या गोव्यातील काही प्रसिद्ध समुद्र किनार्‍यांना भेट देणार असल्याचेही सांगितले जाते. नाताळ व नववर्षांच्या सुरक्षेत व्यस्त सुरक्षा यंत्रणा नुकतीच कुठे निःश्‍वास टाकत असतानाच आता राष्ट्रपतींच्या भेटीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने पुन्हा एकदा त्यांच्यावरील कामाचा बोजा वाढला आहे.

नव्या वर्षारंभी जोष!

तीन लाखांचे अमलीपदार्थ जप्त
पणजी, दि. १ (प्रतिनिधी): नववर्षाच्या पूर्वसंध्येला काल दि. ३१ रोजी गोवा अमली पदार्थ विरोधी पथकाने हणजूण येथे एका ऑस्ट्रियाच्या तरुणाला अमली पदार्थाची विक्री करताना ताब्यात घेतले.
राज्याचे गृहमंत्री जरी राज्यात अमली पदार्थाच्या व्यवहारावर नियंत्रण आणले असल्याचे सांगत असले तरी नववर्षाच्या पूर्वसंध्येला राज्याच्या विविध भागांत मोठ्याप्रमाणात अमलीपदार्थाचा व्यवहार झाला असल्याची शक्यता आहे.
काल दि. ३१ रोजी हणजूण येथील ग्रामपंचायत कार्यालयाजवळ अमली पदार्थ विरोधी पथकाने वॉलीवर पिन्झ या २५ वर्षीय ऑस्ट्रियाच्या तरुणाला अमली पदार्थाची विक्री करताना मुद्देमालासह ताब्यात घेतले. अमली पदार्थ विरोधी पथकाने रात्रौ ८.३० च्या सुमारास वॉलीवर पिन्झ याला ताब्यात घेतले तेव्हा त्याच्याजवळ ‘एलएससी’ या अमली पदार्थाच्या गोळ्या सापडल्या. या गोळ्यांची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत किंमत ३ लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. वॉलीवर पिन्झ याला आज प्रथम सत्र न्यायदंडाधिकार्‍यांसमोर उभे केले असता न्यायदंडाधिकार्‍यांनी त्याला ७ दिवसांची कोठडी फर्मावली.

बनावट वेतन दाखल्याच्या साह्याने बँकेला ७ लाखांना गंडा

मडगाव, दि. १ (प्रतिनिधी): गोवा सहकारी बँकेच्या मडगाव व आके येथील शाखांना एकच वेतन प्रमाणपत्र सादर करून सुमारे सात लाखांचे कर्ज घेतल्या प्रकरणी पोलिसांनी तिळामळ येथील हायरसेकंडरीत प्रयोगशाळा साहाय्यक म्हणून काम करणार्‍या सावर्डे येथील एका रहिवाशाविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. त्याने अशाच प्रकारे दाखले सादर करून अन्य बँकांकडूनही कर्ज घेतलेले आहे की काय, याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.
संशयिताने गोवा स्टेट को-ऑपरेटिव्हच्या आके शाखेतून कर्ज घेतले होते. नंतर काही दिवसांनी त्याने मडगाव शाखेतून कर्ज घेतले. दोन्ही कर्जे न फेडता ठेवल्याने वसुलीचे सोपस्कार सुरू झाले असता दोन्ही व्यक्ती एकच असल्याचे आढळून आले. यानंतर कर्जाची कागदपत्रे तपासली असता त्याने दोन्ही कर्जांसाठी सादर केलेले वेतन दाखले एकाच प्रकारचे असल्याचे आढळून आले. नियमानुसार कर्जासाठी एकदा दाखला घेतल्यावर परत तसा दाखला देताना पूर्वीच्या कर्जाचा त्यावर उल्लेख असायला हवा. परंतु, सदर संशयिताने सादर केलेले दाखले एकाच धर्तीचे आहेत व त्यामुळे त्यांच्या खरेपणाबद्दल संशय व्यक्त केला जात आहे. यापूर्वी पारोेडा येथील अशाच एका शालेय कर्मचार्‍याने बनावट कागदपत्रे सादर करून कर्ज घेतल्याचे प्रकरण उघडकीस आले होते. मडगाव पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.
दरम्यान, येथील उमेश केणी पेट्रोलपंपवर रोखपाल म्हणून काम करणार्‍या दत्तू गावकर याने सुमारे लाखभराची अफरातफर करून पळ काढल्याची तक्रार दीपक हेगडे यांनी पोलिसांत नोंदविली आहे. याप्रकरणी भा.दं.सं.च्या ३०८ कलमाखाली गुन्हा नोंदविण्यात आला आहे.