Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 9 October, 2010

येडियुरप्पा सरकारवरचे संकट टळल्यात जमा

गोवा भाजपची यशस्वी शिष्टाई
कॉंग्रेस नेते रणांगणातून गायब

मडगाव, दि. ८ (प्रतिनिधी): गोव्यातील भाजप नेत्यांच्या यशस्वी शिष्टाईनंतर कर्नाटकातील भाजप सरकारातील गेले चार दिवस सुरू असलेली बंडाळी शमल्यातच जमा आहे. उरलेले किरकोळ मतभेद संपुष्टात आणण्यासाठी रात्री उशिरापर्यंत संबंधितांशी चर्चा सुरू होती. दुसरीकडे डाव आपल्या हातातून निसटल्याचे स्पष्ट झाल्यानंतर काल रात्री उशिरा हॉटेलातून निघून गेलेले गोव्यातील तिन्ही मंत्री व कॉंग्रेस नेते आज दिवसभरात पुन्हा हॉटेलकडे फिरकलेच नाहीत. आमदारांसाठी भलीमोठी प्रलोभने घेऊन आलेले निधर्मी जनता दलाचे नेते कुमारस्वामी यांनी आज सायंकाळी हॉटेल सोडले व त्यामुळे येडियुरप्पा सरकारवरील संकट टळल्याचे चिन्ह स्पष्ट झाले.
बाणावली येथील "ताज एक्झॉटिका' हे पंचतारांकित हॉटेल कर्नाटकांतील राजकीय हालचालींचे आज केंद्र बनून राहिले. काल सायंकाळी येथे दाखल झालेले भाजपचे ९ व ५ अपक्ष आमदार येथे मुक्काम ठोकून असल्याने साऱ्या देशाचे लक्ष येथे केंद्रित झालेले आहे. गोवा भाजप नेते मनोहर पर्रीकर व खासदार श्रीपाद नाईक कालपासून या आमदारांबरोबर बसून त्यांची मनधरणी करीत होते. आज त्यांच्या जोडीला आमदार तथा प्रदेश भाजप अध्यक्ष प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर हेही आले. माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी सदर आमदारांसाठी प्रलोभने घेऊन आले असल्याची चर्चा होती पण स्थानिक भाजप नेत्यांच्या दक्षतेमुळे ते त्या आमदारांपर्यंत पोचूच शकले नाहीत.
कुमारस्वामी आज सकाळी आपण बंगलोरला जात असल्याचे सांगून हॉटेलातून बाहेर पडले; पण दुपारी परत आले व हॉटेलात राहिले. त्यामुळे भाजपच्या गोटात चिंतेचे वातावरण पसरले होते. सायंकाळी ६ पर्यंत ते हॉटेलात होते. दरम्यानच्या काळात भाजपचे युवा नेते रुपेश महात्मे हे आतून बाहेर आले व त्यांनी आमदारांसोबत बैठका सुरू असून त्यांचे मतपरिवर्तन केले जात असल्याचे सांगितले आणि पत्रकारांना वस्तुस्थितीची कल्पना आली. त्यांनंतर ७ वा. च्या सुमारास कुमारस्वामी पुन्हा बाहेर आले व आपण बंगलोरला रवाना होत असल्याचे त्यांनी सांगितले. राजकीय घडामोडींबाबत विचारता विश्र्वास ठराव सोमवारी असल्याने तोपर्यंत "थांबा व प्रतीक्षा करा,' असे ते म्हणाले. कॉंग्रेस व निजद ठरावाविरुद्ध मतदान करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
हॉटेलात कर्नाटकचे पर्यटनमंत्री जनार्दन रेड्डी, कृषीमंत्री श्री. कत्ती व राज्यसभेचे खासदार प्रभाकर कोरे असून तेही राजकीय संकट टाळण्याच्या प्रयत्नांत महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. स्थानिक भाजपा सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्नाटकातील विवाद यापूर्वीच शमलेला आहे व आता उरले आहेत ते कौटुंबिक वाद व रुसवे - फुगवे. ते सोडविण्यासाठी प्रत्येकाशी वेगवेगळी चर्चा सुरू आहे. ती गरज पडल्यास उद्याही सुरू राहील. दरम्यान पर्रीकर व अन्य नेत्यांनी चौदाही आमदारांशी एकत्रितपणे चर्चा करण्याबरोबरच प्रत्येकाशी किमान चर्चेच्या पाच फेऱ्या पूर्ण केल्याचे पक्षाचे राज्य प्रवक्ते राजेंद्र आर्लेकर यांनी "गोवादूत'शी बोलताना सांगितले.
कुमारस्वामी बरोबर हॉटेलांतून बाहेर आलेले गोव्याचे माजी मंत्री संजय बांदेकर यांनी आपण आपले जावई आनंद अस्नेाटीकर यांना भेटण्यासाठी हॉटेलात आल्याचे व त्यात कोणतेच राजकीय कारण नसल्याचे सांगितले. आज कर्नाटकातील अनेक भाजप नेते बाणावलीत दाखल झाले. त्यांतील मोजक्यांनाच आत सोडण्यात आले. बहुतेकांनी राज्यातील भाजप सरकारला कोणताच धोका पोचणार नाही, अशी आशा व्यक्त केली. त्यात कोलारमधील राज्यसभा खासदार डी. एस. वीरय्या यांचाही समावेश होता.
आज सकाळी साधारण साडेदहा वाजता पर्रीकर यांनी हॉटेलबाहेर मुख्य फाटकापाशी येऊन पत्रकारांशी संवाद साधला व सांगितले की कर्नाटकांतील राजकीय पेंचप्रसंग संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. निजद नेते तथा माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी राजकीय सौदेबाजी करण्याचा भरपूर प्रयत्न केला पण तो यशस्वी होऊ शकला नाही. आपण व खासदार श्रीपाद नाईक हे येथे मुक्काम ठोकून गैरसमज झालेल्या भाजप व अपक्ष आमदारांची समजूत घालत असून त्यात ५५ ते ६० टक्के यश आलेले आहे. आपण भाजपच्या राष्ट्रीय सुशासन समितीचा अध्यक्ष या नात्याने राष्ट्रीय नेत्यांच्या सूचनेवरून लक्ष घातल्याचे त्यांनी सांगितले. हे प्रकरण संपुष्टात येईपर्यंत या लोकांबरोबर आपण असेन असेही त्यांनी स्पष्ट केले.
कॉंग्रेसची झाली कुचंबणा
काल रात्री पर्रीकर यांनी हॉटेलमधून बाहेर पडून मडगावात जाऊन जेवण घेतले. नंतर ते हॉटेलात परतले. त्यांच्या व श्रीपाद नाईक यांच्या असंतुष्टांबरोबर चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या. त्या आजही पुढे चालू राहिल्या. त्यापूर्वी काल सायंकाळी हॉटेलात डेरेदाखल झालेले गृहमंत्री रवी नाईक, त्यापूर्वी वीजमंत्री आलेक्स सिकेरा हे एकेक करून हॉटेलातून बाहेर पडले ते परत न फिरकण्यासाठीच. त्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम मंत्री चर्चिल आलेमाव हे एका विवाह समारंभाचे निमित्त करून बाहेर पडले.पाठेापाठ प्रदेश कॉंग्रेसचे सरचिटणीस विजय सरदेसाई हेही गेले होते. तेदेखील परत फिरकले नाहीत. त्यामुळे कर्नाटकातील या राजकीय खेळीतून कॉंग्रेसने अंग काढून घेतल्याचे स्पष्ट झाले.
कॉंग्रेसकडून गंभीर दखल
गोव्यात मुक्काम ठोकलेल्या कर्नाटकातील आमदारांबरोबर गोव्यातील मंत्री असल्याच्या वृत्ताची गंभीर दखल कॉंग्रेस हायकमांडने घेतली. हरिप्रसाद यांनी त्याबाबत गृहमंत्री रवी नाईक व इतरांना जाब विचारल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. कर्नाटकातील या संघर्षात कॉंग्रेसची कोणतीही भूमिका नाही, असे हरिप्रसाद यांनी स्पष्ट केल्याने रवी व अन्य मंत्र्यांनी बाणावलीतून काढता पाय घेतला. या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गोव्यातील एका मंत्र्याशी जवळीक असलेल्या एका नेत्याने हे आमदार गोव्यात येत असून त्यांच्या निवासाची व्यवस्था करा, असे कळविले होते. या मंत्र्याने आपल्या पक्षनिष्ठेची खात्री पटवण्यासाठी त्यांना विमानतळावरून बाहेर काढून हॉटेलापर्यंत नेले. खरे तर हे काम त्याने खास मित्र असलेल्या भाजपच्या एका नेत्याच्या विनंतीवरून केले होते. कॉंग्रेस पक्षाचा किंवा अन्य कोणाचाही त्याच्याशी संबंध नव्हता मात्र. कॉंग्रेसच्या एक मंत्री भाजपच्या आमदारांना हॉटेलमध्ये घेऊन जातो म्हणजेच हायकमांडच्या आदेशावरूनच ते असेल असे समजून कॉंग्रेसचे अन्य मंत्रीही तेथे धावत गेले व तेथील बंदोबस्ताची व्यवस्था केली. परंतु विरोधी पक्षनेते तसेच कर्नाटकांतील भाजपा खासदाराने या प्रकरणात गोवा सरकारच्या भूमिकेचा राष्ट्रीय प्रसारमाध्यमांतून भांडाफोड केल्याने कॉंग्रेसला बचावात्मक पवित्र्यात घ्यावा लागला. स्थानिक नेत्यांना त्यासंदर्भात जाब विचारला गेल्यामुळे एकेक करून मंत्र्यांनी तेथून काढता पाय घेतला. तेथेच कॉंग्रेसच्या हातातून डाव निसटला.
भाजप कार्यकर्ते आक्रमक
कर्नाटकातील येडीयुरप्पा सरकार अस्थिर करण्यामागे कॉंग्रेसचाच हात असल्याचा आरोप करून स्थानिक भाजप कार्यकर्ते काल सायंकाळपासून या हॉटेलच्या मुख्य प्रवेशव्दारालगत ठाण मांडून बसले आहेत. कोणीही भाजप नेता कर्नाटकातील आमदारांची भेट घेण्यासाठी आला असता ते भाजपचा जयजयकार करून वातावरण दणाणून सोडतात. त्याचबरोबर कॉंग्रेसची निर्भत्सना करताना दिसतात. आज गोवा भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार लक्ष्मीकांत पार्सेकर हॉटेलात जाण्यासाठी आले असता त्यांनी अशाच प्रकारे घोषणा देऊन वातावरण दणाणून सोडले. नंतर त्यांना गाडीतून आत सोडण्यास पोलिसांना भाग पडले. मिळालेल्या माहितीनुसार गोवा भाजपाच्या या आक्रमक पवित्र्यामुळेच ताज एक्झॉटिका हे दक्षिण गोव्यातील हॉटेल कर्नाटकातील आमदारांवर प्रभाव पाडण्यासाठी निवडण्याचा कॉंग्रेसचा डाव फसला. स्थानिक भाजप कार्यकर्त्यांनी घेतलेल्या या आक्रमक भूमिकेचे आज सर्वत्र कौतुकच होताना दिसून आले. रुपेश महात्मे, नवीन रायकर, मडगाव भाजप गटाध्यक्ष चंदन नायक, देवबाला भिसे व त्यांच्या सहकारी आज बाणावलीत तळ ठोकून होत्या.
पोलिस छावणीचे स्वरूप
बाणावलीतील या पंचतारांकित हॉटेलला काल सायंकाळपासून पोलिस छावणीचे स्वरूप आले आहे. पोलिस उपअधीक्षक उमेश गावकर व निरीक्षक संतोष देसाई यांच्या नेतृत्वाखाली किमान डझनभर पोलिस उपनिरिक्षक व सहाय्यक उपनिरिक्षक येथे तळ ठोकून आहेत. शिवाय संपूर्ण हॉटेललाच पोलिसांनी गराडा घातलेला आहे. बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांत महिला कर्मचारीही आहेत. मात्र नेमका हा बंदोबस्त कशासाठी व कोणाच्या सांगण्यावरून ठेवण्यात आला हे पोलिस अधिकारी सांगू शकले नाहीत. गुरुवारी दुपारनंतर या आमदारांना येथे आणण्यात आल्यापासून तेथे पोलिस बंदोबस्त असून त्यानंतर त्यांची पाळी आज सकाळी बदलली गेली; तर सकाळी ड्युटीवर आलेल्यांना सायंकाळी जाऊ देण्यात आले. या बंदोबस्ताला आता पोलिसही कंटाळल्याचे दिसले. कोणतीही कामगिरी नसताना त्यांना उन्हात उभे राहावे लागत आहे. हॉटेलच्या मुख्य फाटकाबाहेर तर दोन्ही बाजूंना या खाकीधारींचीच गर्दी दिसते. या आमदारांना काणकोणमधील इंटर कॉन्टिनेंटल या सप्ततारांकित हॉटेलात ठेवण्याचा बेत होता; पण स्थानिक कॉंग्रेस नेत्यांनी काणकोणच्या फेऱ्या टाळण्याच्या प्रयत्नांत त्यांना ताज एक्झॉटिकामध्ये ठेवले. त्यामुळे सदर हॉटेल या राजकीय घडामोडींचे प्रमुख केंद्र केंद्र बनले आहे.
वृत्त वाहिन्यांनी टाकला तळ
ताज एक्झॉटिका हॉटेलबाहेर काल रात्रीपासूनच प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी डेरा टाकला आहे. आज (शुक्रवारी) सकाळी तर कर्नाटकांतील कन्नड वाहिन्यांची पथके आपल्या साधनसामुग्रीसह येऊन दाखल झाल्याने हॉटेलबाहेर जत्रेचे स्वरूप आले. एनडीटीव्हीबरोबरच गोव्यातील वृत्तवाहिन्यांची मंडळी व अन्य प्रसारमाध्यमांनी हॉटेलच्या फाटकाबाहेर तळ ठाकला आहे. एका बाजूने पोलिस व दुसऱ्या बाजूने ही मंडळी यांमुळे हॉटेलमध्ये जाणारे पर्यटकही बिचकताना दिसत आहेत.
हॉटेल कर्मचाऱ्यांची व्यथा
कर्नाटकातील या राजकीय घडामोडींमुळे ताज एक्झॉटिका जरी सध्या राष्ट्रीय प्रसिद्धी माध्यमांचे केंद्र बनलेले असले तरी या घडामोडींमुळे तेथे पोलिसांनी उभारलेले कडे व सुरक्षाव्यवस्थेमुळे हॉटेलमधील पर्यटक स्थलांतर करू लागल्याचे सांगण्यात येते. अशावेळी तेथील कर्मचाऱ्यांची मिळकतही बंद झालेली आहे. कधी एकदा हे नाट्य संपते अशी त्यांची अवस्था झाली आहे.

'पोर्तुगिजांच्या भाटांना धडा शिकवणार'

अशोकस्तंभाच्या उपेक्षेमुळे राष्ट्रप्रेमी संघटना खवळल्या
पणजी, दि. ८ (प्रतिनिधी): पणजी महापालिका उद्यानातील अशोकस्तंभाची झालेली दारुण उपेक्षा आणि या उद्यानाचे केलेले पोर्तुगीज नामकरण या मुद्यांवरून राष्ट्रप्रेमी संघटना खवळल्या असून त्यांनी जोरदार आंदोलनाची तयारी सुरू केली आहे. विविध घटकांतून यासंदर्भात अत्यंत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
"गार्सिया द ऑर्त' हा पोर्तुगाली वनस्पती शास्त्रज्ञ. त्याचे नाव या उद्यानाला पणजी महापालिकेने दिले आहे. शिवाय हे करताना तेथे असलेल्या भव्य अशोकस्तंभाचे साधे सुशोभीकरणही करण्यात आलेले नाही. त्यामुळे तो कमालीच्या संतापाचा विषय ठरला आहे. विशेषतः गोवा मुक्तिसंग्रामात असीम त्याग केलेल्या स्वातंत्र्यसैनिकांचे रक्त या घटनेमुळे सळसळले आहे.
हा गार्सिया द ऑर्त जर कुणाचा "पूर्वज' लागत असेल तर त्यांनी त्याचे नाव आपल्या स्वतःच्या घराला किंवा दिवाणखान्याला देण्यात कुणाची हरकत नसावी. मात्र गोव्यातील राजधानीसारख्या प्रमुख शहरातील एका भागाला साम्राज्यवादी पोर्तुगिजांची हुजरेगिरी करणाऱ्या एका तद्दन पोर्तुगीजाचे नाव देण्याचे कारस्थान ही सामान्य घटना नाही. हा जाणूनबुजून केलेला भारतीय स्वातंत्र्याचा आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाचा धडधडीत अपमान आहे. तो कदापिही सहन केला जाणार नाही. त्याविरोधात आंदोलनाचे रणशिंग फुंकले जाईल, असा जळजळीत इशारा आज देशप्रेमी नागरिक समितीचे गोवा राज्य निमंत्रक प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी दिला.
"गोवादूत'ने काही दिवसांपूर्वी पणजी महापालिकेच्या उद्यानाला पोर्तुगीज व्यक्तीचे नाव दिल्याची आणि या उद्यानात असलेल्या अशोकस्तंभाची हेळसांड करण्यात आलेल्या घटनेची माहिती उघडकीस आणली होती. यानंतर विविध स्तरांतून गार्सिया द ऑर्त' हा पोर्तुगीज व्यक्तीच्या नावाला विरोध व्हायला लागला असून गोमंतकीयांनी आणि स्वातंत्र्यसैनिकांनी या नावाला तीव्र विरोध दर्शवला आहे. तसेच त्यांनी महापालिकेच्या या हिणकस कृतीचा निषेध केला आहे.
पोर्तुगीज साम्राज्यवादाच्या भाटांना त्यांची जागा दाखविण्यासाठी आंदोलन करणे क्रमप्राप्त असल्याचे श्री. वेलिंगकर यांनी सांगितले.
एका बाजूने गार्सिया द ऑर्त चा उदोउदो करतानाच दुसरीकडे अशोकस्तंभाचा सुशोभन कार्यात समावेश करण्यासही ही पोर्तुगिजांची पिलावळ सोयीस्करपणे विसरलेली आहे. या सर्व विकृत मनोवृत्तीचा गोमंतकीय जनता तीव्र धिक्कार करीत आहे. या विकृतीला कृतीने उत्तर देण्याचे काम गोमंतकीय पुढच्या आठवड्यात करतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

भारताचा 'गरबा' सुरूच; दिवसभरात ६ सुवर्ण

यजमानांच्या खात्यात तब्बल ४५ पदके जमा
नवी दिल्ली, दि. ८ : एकोणीसाव्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत यजमान भारताने सुवर्णपदकांची "लूट' सुरूच ठेवताना आज पुन्हा तब्बल अर्धा डझन सोन्याच्या पदकांवर आपला हक्क सांगितला. त्यामुळे यजमानांच्या खात्यात आता २० सुवर्ण , १४ रौप्य आणि १२ ब्रॉंझ अशी एकूण ४५ पदकेजमा झाली आहेत.
आजच्या दिवसाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे नाशिकच्या कविता राऊतने १० हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत पटकावलेले ब्रॉन्झ पदक. तिने अभिमानास्पद कामगिरी बजावली. या स्पर्धेत केनियाच्या स्पर्धकांनी पहिले आणि दुसरे स्थान संपादले.
१० हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत अशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू आहे. राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये ओमकार सिंगने तिसरे सुवर्ण पदक मिळवले. त्यामुळे भारताच्या खात्यात २० वे सुवर्णपदक जमा झाले आहे. ओमकारने १० मीटर पिस्तुल प्रकारात सुवर्ण कामगिरी केली आहे. यापूर्वी ओमकार सिंगने गगन नारंग आणि गुरप्रीतसिंग सोबत दोन सुवर्ण पदक पटकावली आहेत. ओमकारने तीन सुवर्णपदक मिळवत आता गगन नारंगशी बरोबरी केली आहे. राष्ट्रकुलमध्ये भारताचा नवरात्र उत्सव दणक्यात साजरा होतोय. भारताच्या दोन रणरागिनींनी कुस्तीमध्ये सुवर्ण पटकावून दसऱ्यापूर्वीच सोने लुटले आहे. अलका तोमरने ५९ किलो वजनी गटात आणि अनिताने ६७ किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले आहे. महिला कुस्तीगिरांच्या कामगिरीमुळे महिला कुस्तीत भारताला आतापर्यंत ३ सुवर्णपदके मिळाली; तर एकूणच कुस्ती प्रकारात भारताला ७ सुवर्णपदके मिळाली आहेत. त्यात पुरुषांना ग्रीक रोमन प्रकारात चार सुवर्णपदक जिंकली आहेत. दरम्यान जिमनॅस्टिकमध्ये अखिलकुमारने वॉल्ट प्रकारात रौप्यपदक पटकावले. २५ मीटर रॅपिड फायर पिस्तुल ( वैयक्तिक) पुरुष वर्गात विजयकुमारने सुवर्णपदक पटकावले तर गुरुप्रीतसिंहने ब्रॉंझ जिंकले. आज ( शुक्रवारी) सकाळी तिरंदाजीत महिला संघाने व त्यापाठोपाठ ५० मीटर थ्री पोझिशन्स रायफल प्रकारात गगन नारंग आणि इम्रान हसन खानने सुवर्णपदक जिंकले.

तीन खून प्रकरणांतून दोषमुक्त झाल्यावर

महानंदला बलात्कारप्रकरणी
७ वर्षे कारावास आणि दंड

पणजी, दि. ८ (प्रतिनिधी)>: सीरियल किलर महानंद नाईक याला बलात्कार प्रकरणात आज जिल्हा व सत्र न्यायालयाने ७ वर्षे कारावास आणि २५ हजार रु. दंड अशी शिक्षा ठोठावली. दंड न भरल्यास त्याला आणखी दोन महिने अतिरिक्त शिक्षा भोगावी लागेल. जर दंडाची रक्कम त्याने भरली तर ती सदर पीडित तरुणीला दिली जावी, असा आदेश आज न्यायाधीश नूतन सरदेसाई यांनी दिला. महानंदला भारतीय दंड संहितेच्या ३७५ व ३७६ कलमांखाली दोषी धरण्यात आले.
दुपट्ट्याच्या साहाय्याने १६ तरुणींचा खून केल्याचा आरोप असलेल्या महानंद नाईक याला पहिल्यांदाच शिक्षा झाली आहे. यापूर्वी तीन खून प्रकरणात सबळ पुराव्याअभावी तो दोषमुक्त झाला आहे.
पत्नीच्या मैत्रिणीवर सतत पाच वर्षे बलात्कार केल्याप्रकरणी महानंद याला ५ ऑक्टोबर रोजी दोषी ठरवण्यात आले होते. आज सकाळी न्यायालयात हे प्रकरण सुनावणीस आले असता त्याला शिक्षा ठोठावण्यात आली. महानंद हा समाजासाठी घातक असून त्याला त्या दृष्टिकोनातून शिक्षा दिली जावी, अशी जोरदार मागणी सरकारी वकिलांनी केली होती.
योगिता नाईक बेपत्ता प्रकरणातून हे बलात्कार प्रकरण उघडकीस आले होते. ज्या तरुणींवर महानंद सतत पाच वर्षे बलात्कार करीत होता तिने त्याच्या या त्रासाला कंटाळून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. या तरुणीच्या नावावर असलेले मोबाईल सिमकार्ड महानंद वापरत होता. फोंडा येथून बेपत्ता झालेली योगिता नाईक हिच्या मोबाईलवर या क्रमांकावरून अनेक दूरध्वनी आल्याचे उघड झाल्यानंतर त्या तरुणीला चौकशीसाठी पोलिस स्थानकावर बोलावण्यात आले होते.
यावेळी त्या तरुणीची चौकशी सुरू असताना हा मोबाईल क्रमांक महानंद वापरत असल्याचे तिने पोलिसांना सांगितले. त्यावेळी पोलिसांनी महानंदला पोलिस स्थानकावर बोलावले असता, गेल्या पाच वर्षांपासून महानंद धमकावून आपल्यावर शारीरिक अत्याचार करीत असल्याची माहिती संबंधित तरुणीने पोलिसांना दिली. त्यामुळे पहिल्यांदा पोलिसांनी त्याला बलात्कार प्रकरणात अटक केली. यानंतर सोळा जणांचे गळा आवळून खून केल्याची घटना उघडकीस आल्या होत्या.

चीनच्या कारागृहात असणारे ली झियाबो यांना शांततेचा नोबेल

चिनी सरकार मात्र अशांत
ओस्लो, दि. ८ : चीनच्या कारागृहात बंदिस्त असणारे मानवाधिकार क्षेत्रातील लढवय्ये नेते ली झियाबो यांना २०१० या वर्षासाठीचा सर्वोच्च मानाचा नोबेल शांतता पुरस्कार जाहीर झाला आहे. चीनमध्ये मानवाधिकाराच्या रक्षणासाठी त्यांनी दीर्घकाळपासून अहिंसेच्या मार्गाने आपला लढा कायम ठेवला आहे. या निर्णयाने चिनी सरकार मात्र नाराज होण्याची चिन्हे दिसत आहेत.
नोबेल पुरस्कार समितीचे अध्यक्ष जॅगलण्ड यांनी या पुरस्काराची घोषणा केली. ते म्हणाले की, चीन हे आर्थिक आणि राजकीय दृष्ट्या महासत्ता म्हणून जगासमोर आले आहे. पण, अशा महासत्तेला नेहमीच काही बाबतीत टीकेचा सामना करावा लागतो. तसा चीनला मानवाधिकाराबाबत जागतिक समुदायाचा टीकेचा मारा सहन करावा लागला आहे. तेथील मानवाधिकारासाठी ली झियाबो यांनी अहिंसेचा मार्गाने दिलेला लढा अतिशय उल्लेखनीय आहे.
५४ वर्षीय ली यांनी नेहमीच चीनमध्ये लोकशाही व्यवस्थेचा पुरस्कार केला आहे. शांततेच्या मार्गाने राजकीय आणि सामाजिक बदल व्हावेत, असेच त्यांचे मत राहिले आहे. त्यासाठी त्यांनी एक स्वाक्षरी मोहीमही राबविली होती. चीनमध्ये नागरिकांना अधिकाधिक स्वातंत्र्य मिळावे आणि कम्युनिस्ट पक्षाचे राजकीय वर्चस्व संपुष्टात यावे, यासाठी त्यांनी "चार्टर ०८' या दस्तावेजाचे लिखाण केले. चीनमध्ये आता लोकशाहीचा अस्वीकार फार काळपर्यंत लांबविता येणार नाही, असा या दस्तावेजातील मजकूर होता. हजारो चिनी नागरिकांनी यावर स्वाक्षरीही केली होती. चीनमधील प्रस्थापितांच्या दृष्टीने मात्र हे थेट आव्हान होते. त्यामुळे त्यांनी "चार्टर ०८' हे ८ डिसेंबर २००८ रोजी जारी होण्यापूर्वीच ली यांना अटक केली. तेव्हापासून ते कारागृहातच आहेत.
चीन सरकारचा विरोध
शांततेचे नोबेल हा जगातील सर्वोच्च पुरस्कार मानला जातो. या पुरस्काराच्या शर्यतीत ली यांचे नाव येताच चीन सरकारने त्यांना हा पुरस्कार देऊ नये, असे म्हटले होते. पण, आता चीनची पर्वा न करता नोबेल समितीने ली झियाबो यांची निवड केली आहे. त्यामुळे सहाजिकच चीन सरकारची नाराजी ओढवली आहे.

धारबांदोडा अपघातात दुचाकीस्वार मृत्युमुखी

फोंडा, दि.८ (प्रतिनिधी): प्रतापनगर धारबांदोडा येथे आज सकाळी पावणे सहाच्या सुमारास मोटर सायकलला (जीए ०९ एफ ३१२५) झालेल्या अपघातात दुचाकीस्वार प्रसाद प्रकाश पावसकर (१९ वर्षे, रा.दयानंदनगर) मरण पावला.
सकाळी प्रसाद पावसकर दुचाकीवरून दयानंद धारबांदोडा येथून तिस्क उसगाव येथे व्यायामशाळेत जात असताना वाटेत प्रतापनगर येथे खराब रस्त्यामुळे त्याच्या दुचाकीला अपघात झाला. वाहनावरून घसरून पडल्यामुळे त्यात तो गंभीर जखमी झाला होता. त्याला तात्काळ १०८ रुग्णवाहिकेतून बांबोळी येथील सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात असता तेथे उपचार सुरू असताना तो सकाळी ११.३० च्या सुमारास मरण पावला. प्रसाद पावसकर कुटुंबीयांचा एकुलता एक मुलगा होता. त्याच्या अपघाती निधनामुळे पावसकर कुटुंबीयांना जबर धक्का बसला आहे. निरीक्षक सी. एल. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दीपक पेडणेकर, हवालदार किशोर नाईक यांनी पंचनामा केला.

Friday 8 October, 2010

आरक्षणाचे निकष कोणते?

सविस्तर माहिती द्या; खंडपीठाकडून सरकारला आदेश
पणजी, दि. ७ (प्रतिनिधी): पालिका निवडणुकांसाठी जाहीर केलेल्या आरक्षणाला विरोध करणारी याचिका आज मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात सुनावणीस आली असता निवडणूक आयोग आणि राज्य सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश खंडपीठाने दिले. यावेळी याचिकादाराने आरक्षणाला अंतरिम स्थगिती देण्यासाठी केलेली विनंती न्यायालयाने मान्य न करता सदर आरक्षण कोणत्या आधारावर केले आहे, याची सविस्तर माहिती देण्याचे आदेश दिले. याविषयीची पुढील सुनावणी येत्या सोमवारी ठेवण्यात आली आहे.
पालिका प्रशासन संचालकांनी मडगाव नगरपालिकेसाठी जाहीर केलेल्या आरक्षणाला लॉरेल आब्रांचिस व अन्य दोघांनी खंडपीठात आव्हान दिले आहे. मडगाव पालिकेसंदर्भात अधिसूचित केलेली निवडणूक व निवडणूक कार्यक्रम बेकायदा, अन्यायकारक असल्याचा दावा करून हा अध्यादेश रद्दबातल करावा अशी जोरदार मागणी आज याचिकादारातर्फे खंडपीठात करण्यात आली. कोणत्याही प्रकारचे निकष निश्र्चित न करता वाटेल तसे आरक्षण केल्याने नगरपालिका कायदा कलम १० चे उल्लंघन झाल्याचा दावाही यावेळी करण्यात आला. तसेच वर्गीकृत जाती व जमातीतील महिलांसाठी प्रभाग निश्र्चिती करताना तेथील लोकांची संख्या विचारात घेण्यात आली नाही याकडेही न्यायालयाचे लक्ष वेधण्यात आले.
त्यामुळे कोणत्या निकषावर हे आरक्षण ठरवण्यात आले आहे, असा प्रश्न न्यायालयाने केला. तसेच, या आरक्षणाचा आराखडा कधी तयार केला आणि लोकांसाठी तो कधी उपलब्ध करून ठेवला होता, याचीही माहिती दिली जावी, असेही न्यायालयाने निवडणूक आयोगाला सांगितले आहे. निवडणूक कार्यक्रम अधिसूचित करण्यास व नियम ४ अन्वये आदेश जारी करण्यास हेतुपुरस्सर विलंब लावला गेला व त्यासाठी काही राजकारण्यांनी फूस दिली. स्वतःच्या पसंतीचे उमेदवार पालिकेवर निवडून आणून त्यावर नियंत्रण मिळविणे हा हेतू त्यामागे आहे, असा युक्तिवाद याचिकादाराने केला.
प्रभाकर पेंढारकर यांचे निधन
पुणे, दि. ७ : ज्येष्ठ दिग्दर्शक प्रभाकर पेंढारकर यांचे आज पुण्यात निधन झाले. प्रभाकर पेंढारकरांची "रारंगढांग' ही कादंबरी गाजली होती. ते भालजी पेंढारकरांचे सुपुत्र असलेल्या प्रभाकररावांनी अनेक दर्जदार चित्रपटांची निर्मिती केली.
प्रभाकर पेंढारकर यांनी १९५२ ते १९५९ पर्यंत भालजी आणि व्ही. शांतराम यांच्या हाताखाली सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले. १९६१ पासून त्यांनी फिल्म डिव्हिजन सोबत काम केले. त्यांना सर्वोत्तम शैक्षणिक चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांनी १९६१ मध्ये "भाव तिथं देव', १९८१ मध्ये "बाल शिवाजी', १९८६मध्ये "शाब्बास सुनबाई' हे चित्रपट काढले होते. त्यांच्या निधनाने मराठी चित्रसृष्टीतील अनेक मान्यवरांनी तीव्र दुःख व्यक्त केले.

मारिओ लोसा यांना साहित्याचे 'नोबेल'
स्टॉकहोम, दि. ७ : स्पॅनिश भाषेतील आघाडीचे कादंबरीकार मारिओ वर्गास लोसा यांना २०१० सालचे साहित्याचे नोबेल पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे. लोसा हे ख-या अर्थाने वैश्विक नागरिक असून ते सामाजिक परिवर्तनाचे शिलेदार असल्याचा उल्लेख स्वीडीश अकादमीने केला आहे.
जुलुमी राजवटीच्या विरोधात व्यक्तीच्या प्रतिकाराचे , बंडखोरीचे आणि पराजयाचे प्रत्ययकारी चित्रण आपल्या साहित्यातून रेखाटल्याने त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात येत असल्याचे स्वीडीश अकॅडमीने म्हटले आहे.
पेरुच्या वर्गास ललोसा यांनी आजवर ३० कादंबऱ्या , नाटके असे लेखन केले आहे. त्यात प्रामुख्याने कॉन्व्हरसेशन इन द कॅथडरल आणि द ग्रीन हाऊस या कादंबऱ्यांचा समावेश आहे.
लोसा यांना १९९५ साली सरवॅटेस पुरस्काराने गौरवण्यात आले होते. स्पॅनिश जगतातील साहित्य क्षेत्रातला हा सर्वोच्च बहुमान मानला जातो. लोसा यांनी १९६० साली लिहिलेल्या द टाइम ऑफ हिरो या कादंबरीने त्यांना जगमान्यता मिळवून दिली.

भारताच्या खात्यात आणखी तीन सुवर्ण
नवी दिल्ली, दि. ७ : राष्ट्रकुल स्पर्धेत आज (गुरुवार) चौथ्या दिवशीही सुवर्णपदकांची लूट कायम ठेवली. कुस्तीमध्ये महिलांच्या ५५ किलो वजनी गटात फ्री स्टाईल प्रकारात गीताने, तर नेमबाजीत दहा मीटर पेअर पिस्तुल प्रकारात ओंकार सिंह आणि गुरप्रीत सिंग आणि २५ मीटर पिस्तुल पेअर प्रकारात गुरप्रीत सिंग आणि विजय कुमारने अशी तीन सुवर्णपदकांची कमाई भारताने आज केली.
महिला कुस्तीत गीताने भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले. राष्ट्रकुलमध्ये भारताने आतापर्यंत १४ सुवर्णपदके, ११ रौप्य व ८ कास्यपदके जिंकून पदकतालिकेत दुसरा क्रमांक मिळवला आहे. महिला कुस्तीत ६३ किलो वजनी गटात सुमन कुंदा हिने ब्रॉंझ पदक जिंकले. तर, नेमबाजीत रंजन सोधी यानेडबल ट्रॅपमध्ये रौप्य पदक पटकाविले. सकाळी तिरंदाजी स्पर्धेत भारताच्या महिला गटाने मलेशियाला मागे टाकत ब्रॉंझ पदक जिंकले.

'हुजी'च्या दोघा दहशतवाद्यांनी गोव्यात तळ ठोकल्याचे उघड

मुंबईच्या दिशेने दोघांचेही पलायन
कॉईनबॉक्सवरून आला होता दूरध्वनी

पणजी, दि. ७ (प्रतिनिधी): हरकत-ऊल-जिहाद-अल-इस्लाम (हुजी) या दहशतवादी संघटनेचे दोघे दहशतवादी गोव्यातून मुंबईला गेल्याची माहिती गोवा पोलिसांनी मुंबई पोलिसांना दिली असून गोव्याबरोबर मुंबईतही खळबळ माजली आहे. एका "कॉईन बॉक्स'वरून, "हुजी' दहशतवादी संघटनेचे दहशतवादी गोव्याहून मुंबईला गेल्याची माहिती देणारा दूरध्वनी गोवा पोलिसांना आला होता. हा "कॉईन बॉक्स' पर्वरी बाजारात असल्याची माहिती आज गोवा पोलिस खात्याचे प्रवक्ते तथा पोलिस अधीक्षक आत्माराम देशपांडे यांनी देतानाच गोव्याला कसलाही धोका नसल्याचा दावा त्यांनी केला; तर गोव्यात येणारे पर्यटक पळवण्यासाठी गोव्याबाहेरील हॉटेल "लॉबी' अशा प्रकारच्या युक्त्या लढवत असावी, अशी शक्यता राज्याचे गृहमंत्री रवी नाईक यांनी व्यक्त केली आहे.
""दोघा दहशतवाद्यांपैकी एक दहशतवादी रेल्वेमार्गे मुंबईला रवाना झाला असल्याची माहिती आम्हाला गोवा पोलिसांनी दिली आहे. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी रेल्वेत सुरक्षेत वाढ केली आहे'' अशी माहिती रेल्वेचे अतिरिक्त सरव्यवस्थापक राज खिलनानी यांनी दिली.
पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार गोव्यातून रवाना झालेला दहशतवादी मुंबई येथील दादर रेल्वे स्थानकावर एका व्यक्तीला भेटणार आहेत. दुसरा दहशतवादी गोव्यात आहे की नाही, याबद्दल अद्याप कोणतेही माहिती नसल्याचे पोलिसांनी सांगितले. या दोन्ही दहशतवाद्यांची नावे कलिमुद्दीन खान उर्फ रामेश्वर पांडे (२८) व हाफीज खिजीर उल्ला सरिफ (२५) अशी असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली आहे. गेल्या महिन्यात मुंबई पोलिसांनी चतुर्थीच्या काळा मुंबई दोन दहशतवादी घुसले असल्याचा दावा करून या दोन्ही दहशतवाद्यांची छायाचित्रे आणि त्यांची नावे जाहीर केली होती.

मुख्यमंत्र्यांविरोधातच 'मुस्लिमांचो एकवट'

मडगावात कॉंग्रेसचे धाबे दणाणले
मडगाव, दि. ७ (प्रतिनिधी): पालिका निवडणुकांचा प्रश्र्न ज्वलंत बनलेला असताना आज मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या मतदारसंघात झालेल्या एका आकस्मिक घडामोडीत मडगावातील तमाम मुसलमानांनी एकत्र येऊन मडगाव पालिका निवडणुकीसाठी आपले स्वतंत्र पॅनेल उभा करण्याचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे सत्ताधारी कॉंग्रेस बचावाच्या पवित्र्यात आली. आमचा हा निर्णय फक्त पालिका निवडणुकीपुरता मर्यादित नसून आगामी विधानसभा निवडणुकीची ही पूर्वतयारी असल्याचे संकेतही त्यामुळे मिळाले आहेत.
शहरातील विविध मुस्लिम नेत्यांनी आज मालभाट येथे जामा मशिदीच्या सभागृहात घेतलेल्या एका पत्रपरिषदेत ही घोषणा केली. यावेळी शेख इफ्तिकार, शेख महंमद उस्मान, महंमद नझीर, कासीमखान, जामासाब बेपारी, हाजी इब्राहिम, अब्दुल मतीन कारोल व अब्दुल्ला कादर गली यावेळी उपस्थित होते. त्यांनी सांगितले की, किमान सात जागांवर मुस्लिम उमेदवार उभे केले जाणार असून त्यांची नावेही पक्की करण्यात आली आहेत. पॅनेलचे नावही ठरलेले आहे. मडगाव पालिका निवडणुकीसंदर्भात सध्या उच्च न्यायालयात असलेल्या याचिकेवर काय निवाडा होतो ते पाहून बहुधा उद्याच त्याची घोषणा केली जाईल.
मुस्लिमांच्यागठ्ठा मतांमुळेच गोव्यात कॉंग्रेसला सत्ता उपभोगता आली ही वस्तुस्थिती आहे; कॉंग्रेसकडून मुसलमानांचा वापर "टिश्यू पेपर' सारखा केला जात आहे. या समाजाला मागासलाच ठेवून केवळ निवडणुकांवेळी भरमसाठ आश्र्वासने द्यावयाची व निवडणुका आटोपताच त्याकडे दुर्लक्ष करायचे हीच आज कॉंग्रेसची कार्यपद्धती बनली आहे. कामत यांच्या कार्यकाळांत त्याला जास्त बळकटी आली, असा आरोप त्यांनी केला.
कॉंग्रेसने धर्मनिरपेक्षतेच्या नावाने मुसलमानांचा केवळ वापर केला असे सांगताना मडगावच्या कब्रस्तानचे त्यांनी उदाहरण दिले. गेली ३० वर्षे त्याच्या नावाने फक्त सत्ता उपभोगण्याचे कारस्थान चालले आहे. गोव्यात कॉंग्रेस फक्त मुसलमानांमुळे सत्तेवर आहे असे सांगून कॉंग्रेसचे सहा ते सात आमदार केवळ मुसलमानांमुळे निवडून येतात हे त्यांनी लक्षात ठेवावे असेही बजावले. सरकारने या समाजाच्या कोणत्याही समस्या सोडवण्याकडे लक्ष दिले नाही. संपूर्ण गोव्यात या लोकांचे समाजगृह नाही, स्वतः च्या शाळा इमारती नाहीत; परंतु हे सगळे विषय बाजूला ठेवून समाजाला सध्या कब्रस्तानचा मुद्दा घेऊन बसावे लागले आहे, असे ते म्हणाले.
मुख्यमंत्र्यांवर त्यांनी मुसलमानांना झुलवत ठेवत असल्याचा आरोप केला. ते मुसलमानांमुळेच मुख्यमंत्री होऊ शकले याचे भान त्यांनी ठेवायला हवे. "सर्वांना नेहमीच मूर्ख बनविता येत नाही,' अशी जी म्हण आहे ती त्यांना तंतोतंत लागू पडते, असे सांगून कब्रस्तानचा प्रश्र्न असाच भिजत राहण्यास तेच जबाबदार असल्याचा संतप्त आरोपही या नेत्यांनी यावेळी केला.
आज विधानसभेत व नगरपालिकेतही मुस्लिम प्रतिनिधी नाही. त्याचमुळे त्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केले जात असावे याच विचारातून मडगावातील तमाम मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन हा निर्णय घेतला आहे. या मुद्यावर सर्व मुस्लिम एकत्र आहेत. मडगावातील काही प्रभागात मुस्लिमांचे प्राबल्य असताना ते प्रभाग अन्य जाती वा वर्गांसाठी राखीव ठेवण्याचे घाणेरडे राजकारण मुख्यमंत्री खेळले आहेत व हे आरक्षण, प्रभाग आखणी यासारखी कामे करताना पुरेसा कालावधीही न ठेवता सर्वांवर अन्याय करण्यात आल्याचे ते म्हणाले.
कॉंग्रेसने आता काही ठिकाणी उमेदवारी दिली तर भूमिका काय असेल, असे विचारता मुस्लिम बहुसंख्याक प्रभाग इतरांसाठी राखीव केल्यावर आता प्रतिनिधित्व देण्याचा प्रश्र्नच उद्भवत नाही तसेच झरीना शहा सारख्या मुस्लिम समाजात स्थान नसलेल्यांना उमेदवारी दिल्यानेही समस्या सुटणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले. पॅनलबाबत आज रात्री अंतिम निर्णय होऊन उद्या शुक्रवारी नावे जाहीर केली जातील, अशी माहिती त्यांनी दिली.

Thursday 7 October, 2010

भारताचा 'सुवर्ण धडाका' सुरूच

तिसऱ्या दिवशी तब्बल अर्धा डझन सुवर्णपदकांची कमाई
नवी दिल्ली, दि. ६ : दिल्ली राष्ट्रकुल स्पर्धेचे यजमान असलेल्या भारताने अप्रतिम कामगिरी करत तीन दिवसांत अकरा सुवर्ण, सात रौप्य आणि दोन ब्रॉंझ अशी एकूण वीस पदकांची लयलूट केली आहे. भारताच्या रवी कुमारने ६९ वजनी गटात ३२१ किलो वजन उचलून नवा राष्ट्रकुल विक्रम नोंदवला. तसेच नेमबाजांनीही लाजवाब कामगिरी बजावली आणि वेटलिफ्टिंगमध्ये ५८ किलो वजनी गटात रेणू बाला चानू हिने सुवर्णपदक जिंकून त्यावर कळस चढवला. साहजिकच या पदक विजेत्या भारतीय क्रीडापटूंवर देशभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
रवीकुमारने स्नॅच प्रकारात १४६ किलो वजन उचलले तर क्लीन अँड जर्क प्रकारात १७५ किलो वजन उचलले. या दोन्ही प्रकारांची बेरीज केल्यावर एकूण ३२१ किलो वजन उचलून रवी कुमारने नवा राष्ट्रकुल विक्रम प्रस्थापित केला. भारताच्या राजेंदर कुमार याने ५५ किलो वजनी गटात पाकिस्तानच्या कुस्तीगिराला अंतिम सामन्यात आसमान दाखवताना २-० अशा गुणफरकाने पराभूत केले.
मंगळवारी भारताने पाच सुवर्ण, पाच रौप्य आणि दोन ब्रॉंझ पदके जिंकली होती. आज (बुधवार) त्यात आणखी पाच सुवर्ण आणि दोन रौप्य पदकांची भर पडली आहे.
बुधवारचा दिवस नेमबाजांनी गाजवला. पन्नास मीटर पिस्तुल शूटिंगमध्ये पुरुष गटात ओंकार सिंहला सुवर्ण पदक मिळाले, तर २५ मीटर पिस्तुल शूटिंगमध्ये महिला गटात अनिसा सय्यदला सुवर्ण आणि राही सरनौबतला रौप्यपदक मिळाले.
याआधी आज (बुधवारी) सकाळी दहा मीटर एअर रायफल शूटिंग स्पर्धेत गगन नारंगने (७०३.६) सुवर्ण आणि अभिनव बिंद्राने (६९८) रौप्य पदक जिंकले. डबल ट्रॅप शूटिंग संयुक्त स्पर्धेमध्ये रजन सोढी आणि अशेर नोरिया या जोडीने रौप्यपदक जिंकले. फक्त एका गुणाच्या फरकाने डबल ट्रॅपमध्ये इंग्लडच्या जोडीने सुवर्ण पदक जिंकले. आता दिल्ली राष्ट्रकुलच्या पदक तक्त्यात ऑस्ट्रेलिया पहिल्या आणि भारत दुस-या स्थानवर पोहोचले आहेत.

वाळपईत भाजप कार्यालयाचे उद्घाटन

वाळपई, दि. ६ (प्रतिनिधी): वाळपई मतदारसंघात होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी येथील भाजप प्रचार कार्यालयाचे उद्घाटन आज संध्याकाळी ६ वाजता खासदार श्रीपाद नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाजप उमेदवार संतोष हळदणकर, माजी आमदार नरहरी हळदणकर, माजी आमदार विनय तेंडुलकर, उल्हास अस्नोडकर, गोविंद पर्वतकर, राजेंद्र आर्लेकर, सदानंद तानावडे, वासुदेव परब तसेच देमू गावकर, मंडळ अध्यक्ष नारायण गावस आदी प्रमुख कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
प्रथम दीपप्रज्वलनाने श्रीपाद नाईक यांच्या हस्ते कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलताना खासदार नाईक म्हणाले की, वाळपईवासीयांवर विनाकारण ही निवडणूक लादण्यात आलेली आहे. मतदारांना या ठिकाणी पुन्हा एकदा कमळ फुलविण्याची संधी प्राप्त झाली आहे.
यावेळी संतोष हळदणकर यांनी सत्तरीच्या उज्ज्वल भवितव्यासाठी भाजपलाच मत देण्याचे आवाहन केले. यावेळी उल्हास अस्नोडकर यांनी आपले विचार व्यक्त केले. सूत्रनिवेदन अध्यक्ष नारायण गावस तर आभार देमू गावकर यांनी मानले.

म्हापशात कार फोडून पाच लाख पळविले

म्हापसा, दि. ६ (प्रतिनिधी): आंगडवाडा म्हापसा येथे मिल्टन बार अँड रेस्टॉरंटसमोर पार्क करून ठेवलेल्या जीए ०४ सी ७४४४ या क्रमांकाच्या मारुती स्विफ्टची काच फोडून आत ठेवलेले पाच लाख रुपये अज्ञात चोरट्याने हातोहात लांबवले. त्यामुळे म्हापसा परिसरात खळबळ माजली आहे.
याप्रकरणी म्हापसा पोलिस स्थानकाचे उपनिरीक्षक राजेशकुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज दुपारी दोनच्या सुमारास अभिजीत पिळर्णकर यांनी आपली स्विफ्ट मोटार मिल्टन बारसमोर पार्क करून ठेवली. नंतर ते जेवण्यासाठी सदर बारमध्ये गेले. जेवण झाल्यावर ते ब्रागांझा बिल्डिंगमधील आपल्या कार्यालयात गेले. नंतर घरी जाण्यासाठी दुपारी चारच्या सुमारास ते कार्यालयातून बाहेर पडले असता त्यांना आपल्या मोटारीच्या पुढील भागाची काच फोडल्याचे दिसून आले. तसेच पुढच्या सीटखाली ठेवलेली प्लास्टिकची पिशवी गायब झाल्याचे आढळून आले. त्यामुळे त्यांना जबर धक्का बसला. त्यांनी ताबडतोब म्हापसा पोलिस स्थानकात धाव घेऊन तेथे तक्रार नोंदवली.
म्हापसा पोलिसांनी यासंदर्भात गुन्हा नोंदवला असून सदर मोटार ताब्यात घेतली आहे. दिवसाढवळ्या अशा स्वरूपाच्या चोऱ्या म्हापसा भागात होऊ लागल्याने लोकांत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या चोऱ्यांना पायबंद घालण्यासाठी पोलिसांनी गस्त घालण्याच्या कामात अजिबात चालढकल करू नये, अशी मागणी केली जात आहे. दरम्यान या पाच लाखांच्या चोरीप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

फर्डे यांच्या घरावरही 'सीबीआय'चा छापा

रोकड व मालमत्तेची कागदपत्रे जप्त
पाच दिवसांची पोलिस कोठडी

पणजी, दि. ६ (प्रतिनिधी): लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलेले भविष्य निर्वाह निधी खात्याचे साहाय्यक आयुक्त एम के. फर्डे यांना आज सीबीआयच्या विशेष न्यायालयात हजर करून पाच दिवसांची पोलिस कोठडी मिळवण्यात आली. फर्डे यांना अटक करताच मुंबईतील त्यांच्या घरावर छापा टाकण्यात आला. यावेळी ४७ हजार रोख रक्कम तसेच मालमत्तेची कागदपत्रे सीबीआयने जप्त केली. रात्री दोनपर्यंत त्यांच्या मुंबई येथील घरात सीबीआयचे झडतीसत्र सुरू होते, अशी माहिती सूत्रांनी दिली.
काल दुपारी सीबीआयने फर्डे यांना २५ हजार रुपयांची लाच घेताना अटक केली होती. त्यांनी कामगार भरती करणारी एक खाजगी कंपनी स्थापन केली होती, अशी माहिती उघडकीस आली आहे. एका कंपनीवर लावण्यात आलेले आरोप शिथिल करण्यासाठी सीबीआयच्या ताब्यात असलेल्या श्री. फर्डे यांनी एक लाख रुपयांची लाच मागितली होती. या पहिला हप्ता स्वीकारताना सीबीआयने सापळा रचून फर्डे यांना ताब्यात घेऊन नंतर रात्री उशिरा त्यांना अटक करण्यात आली होती.
राज्यभरातील कामगारांच्या कष्टाचे पैसे जेथे जमा होतात तेथेच अधिकारी अशा प्रकारच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात गुंतल्याचे उघड झाल्याने खळबळ माजली आहे. दरम्यान, याठिकाणी तसेच अन्य कोणत्याही केंद्र सरकारी जर कोणी लाच मागत असल्यास त्याची सीबीआयकडे तक्रार करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. तक्रार करणाऱ्या व्यक्तीचे नाव गुप्त ठेवण्याचीही खात्री सीबीआयच्या अधिकारी दिली आहे.

'अटाला'वर इस्त्रायलमध्येही १६ गुन्हे नोंद असल्याचे उघड

पणजी, दि. ६ (प्रतिनिधी): जामिनाच्या अटींचे उल्लंघन करून इस्रायलला पळालेल्या यानीव बेनाईम ऊर्फ "अटाला' याच्यावर खुद्द इस्रायलमध्येच १६ गुन्हे नोंद असल्याची माहिती उघडकीस आली आहे. गोव्यात आपल्या जीविताला धोका असल्याचा दावा करून पलायन केलेल्या अटालावर अमली पदार्थांची तस्करी, चोरी, फसवणूक व मारहाणीचे गुन्हे नोंद असल्याची माहिती पोलिस - ड्रग माफिया साटेलोटे प्रकरणाचे तपास अधिकारी पोलिस उपअधीक्षक चंद्रकांत साळगावकर यांनी दिली. तर, केंद्रीय गृहमंत्रालयाच्या मदतीने अटाला याला ताब्यात घेण्यासाठी गोवा पोलिसांनी प्रयत्न सुरू केले असल्याची माहिती एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली.
इस्त्रायलमध्येच त्याच्यावर अनेक गुन्हे नोंद असल्याचे इंटरपोलने आम्हाला पाठवलेल्या एका पत्रात म्हटले आहे. तो इस्रायली पोलिसांच्या तावडीतून वाचण्यासाठीच गोव्यात पळून आला होता. सुमारे पंधरा प्रकरणांत त्याला शिक्षाही झाली असल्याचे साळगावकर यांनी सांगितले.
इंटरपोलच्या अहवालानुसार अटाला इस्रायली कायद्याचे उल्लंघन करून पळाला होता. तेथील पोलिसही त्याच्या मागावर आहेत. त्यामुळे तो इस्त्रायलमध्ये पळाला असला तरी तेथेसुद्धा त्याला मुक्त संचार करता येणार नाही. इस्रायली पोलिस त्याच्यावर योग्य ती कारवाई करणार आहेत. त्याला आमच्या ताब्यात द्या, अशी विनंती गोवा पोलिसांनी यापूर्वीच इस्त्रायली पोलिसांना केल्याचे साळगावकर म्हणाले.
केवळ दोनच दिवसांपूर्वी अटालाच्या बहिणीने एका आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत गोव्यात त्याच्या जीविताला धोका निर्माण झाल्यानेच तो तेथून पळाला, असा दावा केला होता. तसेच, इस्रायलमध्ये त्याला कोणताही धोका नसून तेथे तो सुखरूप असल्याचेही सांगितले होते. तेथे त्याला कोणीच शोधत नसल्याचाही दावा तिने केला होता.

कला अकादमीचा कारभार अनधिकृत?

नोंदणीचे नूतनीकरणच केले नाही
पणजी, दि. ६ (सांस्कृतिक प्रतिनिधी): कला अकादमी ही गोमंतकीय कला क्षेत्रातील शिखर संस्था. मात्र जिल्हा प्रबंधक कार्यालयातून मिळालेल्या एका दस्तऐवजानुसार संस्था नोंदणी कायद्याखाली नोंदणीकृत संस्थानी दर पाच वर्षांनी करावयाच्या नोंदणीकरणाचे नूतनीकरण कला अकादमीने न केल्याने सध्या ही संस्था "अनोंदणीकृत' ठरल्याचे उघड झाले आहे.यामुळे या काळातील कला अकादमीने केलेले सर्व व्यवहार अधिकृत म्हणायचे की अनधिकृत, असा मूलभूत प्रश्न उपस्थित झाला आहे.
आज कला अकादमीच्या "अ' नाट्य स्पर्धेच्या स्वरूपात चर्चा करण्याच्या उद्देशाने अकादमीच्या ब्लॅकबॉक्समध्ये गोमंतकातील विविध संस्थांचे प्रातिनिधी आणि अकादमी अशी बैठक बोलवण्यात आली होती. बैठकीला अकादमीचे उपाध्यक्ष परेश जोशी, पुंडलिक नायक, विष्णू सूर्या वाघ, श्रीधर कामत बांबोळकर, अकादमीचे सदस्य सचिव डॉ. पांडुरंग फळदेसाई, डॉ. गोविंद काळे, व विविध संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. सुरुवातीपासूनच सदर बैठक विविध मुद्यावरून गरमागरम होणार असल्याचे चित्र दिसताना उपाध्यक्ष जोशी यांनी पत्रकारांना या बैठकीत बसण्याची परवानगी नसल्याचे सांगितले.वास्तविक या बैठकीस पत्रकारांना काही प्रतिनिधींनीच बोलावले होते.
विधानसभेतील कारभार पारदर्शक व्हावा म्हणून विद्यमान सभापतींनी विधानसभेचे चित्रीकरण करण्यास परवानगी दिली असताना या बैठकीतून पत्रकारांना बाहेर जाण्यास सांगण्याचे नक्की कारण कोणते हे कळले नाही. सदर बैठकीत नोंदणीकरणाचा विषय निघाला असता उपाध्यक्षांनी त्यास बगल देऊन
हा मुद्दा लक्षात आणून दिल्याबद्दल संबंधितांना धन्यवाद देण्याचा पवित्रा घेतला.
यासंदर्भात बैठक संपल्यानंतर पत्रकारांनी विचारले असता पत्रकारांनाही उत्तर देण्याबाबत त्यांनी टाळाटाळ केली. आपण यासंदर्भात कनिष्ठांकडे चौकशी करून नंतर उत्तर देऊ असे ते म्हणाले.
सदर बैठकीत संस्था प्रतिनिधींनी मांडलेल्या ठरावांना मंजुरी देण्यात आली. कोकणी नाट्य स्पर्धेसाठी पाच हजार रुपयांनी वाढवलेली अनामत रकमेला प्रतिनिधींनी विरोध केला असल्याने "अ' गट मराठी नाट्यस्पर्धेसाठी अनामत रक्कम रुपये एक हजार अनामत करण्यात आली. प्रयोग सादर करणाऱ्या संस्थेला वीस स्पॉट व दहा पारकॅन्स मोफत देण्यात येतील, असे ठरवण्यात आले. तसेच संघांना प्रयोग सादर करण्यासाठी दोन वाजल्यापासून देण्यात येणारा रंगमंच या खेपेस एक वाजल्यापासून देण्याचा ठराव संमत करण्यात आला.
प्रतिनिधींनी पूर्ण दिवस रंगमंच देण्याच्या केलेल्या मागणीवर कला अकादमी विचार करेल असेही सांगण्यात आले. स्पर्धेत सादर होणाऱ्या नाटकाचे चित्रीकरण करण्यासाठी परवानगी देणाऱ्या ठरावाला मंजुरी देण्यात आली. कला अकादमीच्या आवारात नाट्यसंस्थांना सहा वाजल्यानंतर तालीम करण्याची मुभा असावी असा मुद्दा पुंडलिक नाईक यांनी ठासून मांडला होता. त्यासही मान्यता देण्यात आली.
आता उपाध्यक्ष आपल्या कनिष्ठांना विचारून, कला अकादमीचा कारभार अनधिकृत की अधिकृत याची चौकशी करून कोणते उत्तर देतात याकडे तमाम गोमंतकीयांचे लक्ष लागले आहे.

आव्हान याचिकेवर आज सुनावणी

पणजी, दि. ६ (प्रतिनिधी): राज्यातील पालिका निवडणुकांसाठी जाहीर केलेल्या आरक्षणात अनेक त्रुटी असल्याचा दावा करून त्यास आव्हान देणारी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात दाखल करण्यात आलेली याचिका उद्या गुरुवारी सकाळी सुनावणी येणार आहे. लॉरेल आब्रांचिस व अन्य दोघांनी ही गोवा खंडपीठात ही याचिका सादर केली आहे. आजच सकाळी या याचिकेची प्रत ऍडव्होकेट जनरल यांच्या हाती पडल्याने त्यावर उद्या सुनावणी घेण्याचा निर्णय घेण्यात आला. आज उशिरापर्यंत त्या आव्हान याचिकेवर सरकारचे उत्तर काय असेल यावर अभ्यास सुरू होता, अशी माहिती मिळाली आहे.
मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या मतदारसंघाबरोबर पेडणे आणि कुडचडे नगरपालिकेतही प्रभाग राखीवतेवर गोंधळ माजला आहे. हे आरक्षण अन्यायकारक व चुकीचे आहे. त्यामुळे पालिका निवडणुकांसाठी काढलेला अध्यादेश रद्दबातल करावा; तसेच गोवा नगरपालिका कायदा १९६८ व गोवा नगरपालिका (निवडणूक) नियम १९६९ ची पूर्णतः अंमलबजावणी करून नगरपालिकेच्या निवडणुका घेण्याची विनंती या याचिकेत करण्यात आली आहे.
कोणत्याही प्रकारचे निकष निश्र्चित न करता हवे तसे आरक्षण केल्याने पालिका कायदा कलम १० चे उल्लंघन झाल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे. तसेच वर्गीकृत जाती व जमातींतील महिलांसाठी प्रभाग निश्र्चिती करताना तेथील लोकांची संख्या विचारात घेण्यात आली नाही. ज्या वॉर्डमध्ये ज्या जमातीचा एकही मतदार नाही त्या जमातीसाठी तो प्रभाग राखीव ठेवण्यात आला असल्याकडेही याचिकेत लक्ष वेधण्यात आले आहे.

Wednesday 6 October, 2010

पंचवीस हजारांची लाच घेताना साहाय्यक आयुक्ताला पकडले

प्रॉव्हिडंड फंड कार्यालयात सीबीआयची कारवाई
पणजी, दि. ५ (प्रतिनिधी): पाटो पणजी येथील कामगार भविष्य निर्वाह निधी खात्याचे साहाय्यक आयुक्त एम. के. फर्डे यांना आज २५ हजार रुपयांची लाच घेताना केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभागाने (सीबीआयने) छापा टाकून रंगेहाथ ताब्यात घेतले. तसेच, त्यांच्या कार्यालयातील काही महत्त्वाच्या फायलीही सीबीआयने जप्त केल्या. सायंकाळी उशिरा त्यांच्या घरावरही छापा टाकण्यात आल्याची माहिती "सीबीआय'च्या सूत्रांनी दिली. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर पाळत ठेवण्यात आली होती. "मॅनपावर मॅनेजमेंट फर्म' या कंपनीकडून आलेल्या तक्रारीवरून फर्डे यांच्यावर ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती गोवा विभाग सीबीआयचे अधीक्षक श्री. गवळी यांनी दिली.
"आपल्याला नाहक या प्रकरणात गुंतवण्यात आले आहे,' असा दावा फर्डे यांनी सीबीआयचे अधिकारी त्यांना ताब्यात घेऊन जात असताना त्यांच्या कार्यालयाबाहेर उपस्थित पत्रकारांशी बोलताना केला. आज दुपारी ३.३०च्या दरम्यान ही कारवाई करण्यात आली. अधिक माहितीनुसार, "मॅनपावर मॅनेजमेंट' ही कंपनी त्यांच्या कामगारांचा भविष्य निर्वाह निधी व्यवस्थित भरत नसल्याने त्यांच्यावर सदर खात्याने आरोपपत्र दाखल केले होते. त्यातील आरोप शिथिल करण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून या कंपनीचे अधिकारी प्रयत्नशील होते. यावेळी त्यांनी या खात्याचे साहाय्यक आयुक्त फर्डे यांच्याशी चर्चा केली होती. हे आरोप शिथिल करण्यासाठी फर्डे यांनी त्यांच्याकडे एका लाख रुपयांची मागणी केली. या मागणीनंतर या कंपनीचे अधिकारी श्री. राय यांनी "सीबीआय'कडे तक्रार दाखल केली. त्यावरून गेल्या काही दिवसापासून फर्डे यांच्यावर सीबीआयने पाळत ठेवली होती. तसेच, त्याच्या दूरध्वनीवरील संभाषण ध्वनिमुद्रित केले होते. एक लाख रुपयांच्या रकमेतील पहिला हप्ता म्हणून आज २५ हजार रुपये देण्याचे ठरले होते. ही रक्कम "सीबीआय'ने उपलब्ध करून दिली होती. तसेच सदर रक्कम स्वीकारताना तक्रारदार राय यांच्याबरोबर एक "सीबीआय'चा अधिकारी हजर होता. ज्यावेळी श्री. फर्डे यांनी २५ हजार रुपये स्वीकारले त्याचवेळी राय यांच्याबरोबर गेलेल्या त्या सीबीआयच्या अधिकाऱ्याने फर्डे यांना रंगेहाथ ताब्यात घेतले.
दरम्यान, बांबोळी येथील सीबीआयच्या कार्यालयात रात्री उशिरापर्यंत फर्डे यांची कसून चौकशी सुरू होती. त्यांच्या घरावर घातलेल्या छाप्यातही काही महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

वाळपई पोटनिवडणूक प्रक्रियेतून सत्तरीतील कर्मचाऱ्यांना वगळणार

नारायण गाड, तृप्ती राणे व शिवराम वायंगणकर यांची बदली !
पणजी, दि.५ (प्रतिनिधी): वाळपई पोटनिवडणुकीत सत्तरी तालुक्यातील अधिकाऱ्यांना निवडणुकीच्या प्रक्रियेपासून दूर ठेवण्याची भाजपकडून करण्यात आलेली मागणी निवडणूक आयोगाने गंभीरपणे घेतली आहे. त्यानुसार वाळपईचे उपजिल्हाधिकारी नारायण गाड, संयुक्त मामलेदार तृप्ती राणे व वाळपईचे पोलिस निरीक्षक शिवराम वायंगणकर यांची इतरत्र बदली करण्याचे निश्चित झाले असल्याची माहिती संयुक्त निवडणूक अधिकारी नारायण नावती यांनी दिली. आरोग्य, कारागिर प्रशिक्षण तथा कृषी खात्यातील कर्मचाऱ्यांची निवडणूक कामासाठी नेमणूक न करण्याचे आदेश देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. याच विषयावरून विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. हे अधिकारी व कर्मचारी कायम राहिल्यास निवडणूक प्रक्रियेच्या कामात हस्तक्षेप होण्याची आणि बाधा येण्याची शक्यता व्यक्त केली होती.
सदर पोटनिवडणूक शांततेत व पारदर्शक पद्धतीने होण्यासाठी निवडणूक आयोगाकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळेच अद्याप एकही अधिकृत तक्रार निवडणूक अधिकाऱ्यांकडे पोहोचलेली नाही, अशी माहिती यावेळी श्री. नावती यांनी दिली. राजीव गावस यांची निवडणूक अधिकारीपदावरून केलेली बदलीचे समर्पक उत्तर श्री. पर्रीकर यांना देण्यात आले आहे व त्यांनाही ते पटल्याचा दावा नावती यांनी केला.
गावस यांना निवडणुकीचा कोणताच अनुभव नाही व त्यांनी अधिक काळ सचिवालयातच घालवल्याने त्यांनी स्वतः या पदावर न राहण्याची इच्छा व्यक्त केली होती. डिचोलीच्या नगराध्यक्षांनीही गावस यांना मुख्याधिकारीपदावरून हटवण्यास हरकत घेणारे पत्र निवडणूक अधिकाऱ्यांना पाठवले होते.डिचोलीच्या मुख्याधिकाऱ्यांची वाळपईच्या निवडणूक अधिकारीपदी नेमणूक होऊन त्या नियमाप्रमाणेच ते तिथे राहिले. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया व अंतिम उमेदवार यादी जाहीर करण्याची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच तिथे नव्या निवडणूक अधिकारीपदी जयंत तारी यांनी ताबा घेतल्याचे स्पष्टीकरण यावेळी नावती यांनी केले.साहाय्यक निवडणूक अधिकारिपदी गौरीश कुट्टीकर यांची नेमणूक झाली आहे. त्यांना निवडणुकीचा दीर्घ अनुभव आहे. निवडणुकीसाठी कर्मचारी नेमणुकीचे अधिकार हे जिल्हाधिकारी व निरीक्षकांकडे असतात. त्यानुसार जिल्हाधिकारी मिहीर वर्धन यांच्या आदेशावरून सत्तरी तालुक्याव्यतिरिक्त अन्य कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यास मान्यता मिळाल्याची माहितीही त्यांनी दिली.
निमलष्करी दलाला पाचारण
वाळपई पोटनिवडणुकीसाठी निमलष्करी दलाच्या दोन तुकड्या मागवण्यात आल्याचे नावती यांनी सांगितले. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत तशी शिफारस करण्यात आली आहे, अशी माहितीही देण्यात आली.
मोठ्या प्रमाणात धान्याची खरेदी
दरम्यान, वाळपई मतदारसंघात निवडणूक प्रचारकाळात मोठ्या प्रमाणात धान्य वाटप करण्याच्या इराद्याने धान्य खरेदी करण्यात आल्याचा सुगावा निवडणूक आयोगाला लागला आहे. त्याची चौकशी सुरू असल्याची माहिती नावती यांनी दिली. ५० हजार रुपयांपेक्षा जास्त धान्य खरेदी केलेल्या व्यवहारांचा तपशील मागवण्यात येतो व या धान्याचे वाटप मतदारांना भुलवण्यासाठी होते का, याची चौकशी केली जाते,असेही ते म्हणाले.

पालिका निवडणुकांसाठी ४८ उमेदवारी अर्ज दाखल

पणजी, दि. ५ (प्रतिनिधी): पालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आजच्या दुसऱ्या दिवशी एकूण ३७ उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले. दोन दिवसांत एकूण उमेदवारांची संख्या ४८ वर पोहचली आहे. आरक्षणावरून नाराज बनलेल्या नागरिकांकडून राज्य सरकारला शिव्याशाप देण्याचे काम सुरू असतानाच दुसरीकडे निवडणुकीसाठी जय्यत तयारी करण्यात लोक व्यस्त बनले आहेत. अकरा नगरपालिकांसाठी उमेदवारी अर्जांची संख्या तीनशेवर पोहचण्याची शक्यता राज्य निवडणूक आयोगाने वर्तविली आहे.
आज राज्यातील विविध नगरपालिकांसाठी एकूण ३७ उमेदवारांनी ३९ अर्ज दाखल केले. उमेदवारांची एकूण संख्या आता ४८ वर पोहचली आहे. आज सर्वांत जास्त दहा अर्ज कुडचडे-काकोडा, सहा अर्ज मुरगाव तर पाच अर्ज पेडणे नगरपालिकेसाठी दाखल करण्यात आले.
आज अर्ज दाखल केलेल्यांत (पेडणे नगरपालिका) प्रभाग-२, विनोदीनी विष्णू किनळकर, विष्णू गोपाळ किनळकर, प्रभाग-५, विषाखा विश्राम गडेकर, विश्राम शिवाजी गडेकर, प्रभाग-८, प्रकाश मधुकर सातार्डेकर, (म्हापसा नगरपालिका) प्रभाग-१,किरण देसाई, श्रीमती अल्पा आनंद भाईडकर, प्रभाग-१४,आशा गजानन माशेलकर,(डिचोली नगरपालिका) प्रभाग-१, रक्षदा रोहीदास पळ, प्रभाग-२, आनंद शिवपुत्र नागवेकर, प्रभाग-९, मनोहर पांडुरंग शिरोडकर, (मडगाव नगरपालिका) प्रभाग-१, आर्थुर डिसील्वा, प्रभाग-९, कामिलो बर्रेटो,(कुंकळ्ळी नगरपालिका), प्रभाग-१, निकुला फर्नांडिस, प्रभाग-२, जयंत ऊर्फ जयवंत गावकर, प्रभाग-६, एडगर लॉरेन्सो, प्रभाग-७, श्रीमती पोलिटा कार्नेरो (मुरगाव नगरपालिका) प्रभाग-१, विश्वजितकुमार देसाई, प्रभाग-२, रोहीणी परब, प्रभाग-८, जेरी फर्नांडिस, झियो रॉड्रिगीस, प्रभाग-१३, हेन्रीक डायस, प्रभाग-१७, शांताराम मसूरकर (केपे नगरपालिका) प्रभाग-३, फेलिसीन कार्वालो (कुडचडे-काकोडा नगरपालिका) प्रभाग-३, दिनराज प्रभूदेसाई, पुष्कर सावंत, संजय शिरोडकर, विक्रम अनय सावंत, प्रभाग-५, अपर्णा प्रभूदेसाई, सुनील सावंत, विठोबा प्रभूदेसाई, प्रभाग-९, ग्रेगोरीया पॅरेरा, प्रभाग-१२, बादल गावकर (सांगे नगरपालिका) प्रभाग-६, शाह मोहम्मद, शेख मोहम्मद इकबाल, (काणकोण नगरपालिका) प्रभाग-२, दिलीप केंकरे, प्रभाग-९, ऍना मारीया अफोन्सो यांचा समावेश आहे.

पालिका उद्यानात अशोकस्तंभ दीनवाणा

अजूनही 'त्यांना' पोर्तुगीज प्रेमाचा पान्हा

पणजी, दि. ५ (शैलेश तिवरेकर): पणजी महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून राजधानीत मध्यवर्ती ठिकाणी उभारलेल्या उद्यानात राष्ट्राप्रति आत्यंतिक स्वाभिमानाचा आणि अभिमानाचा मानला जाणारा अशोकस्तंभ अखेर दीनवाणाच उरल्याने देशप्रेमी नागरिकांतून त्याबद्दल तीव्र प्रतिक्रिया व्यक्त झाल्या.
एखाद्या लावण्यवतीप्रमाणे भरजरी शालू नेसलेल्या या उद्यानाचे आज दि. ५ रोजी संध्याकाळी ६ च्या सुमारास मान्यवरांच्या हस्ते थाटात उद्घाटन झाले. उपस्थित मान्यवरही ऐटीत वावरत होते; परंतु समारंभाच्या ठिकाणीच असलेला अशोकस्तंभ एखाद्या गरीब मुलासारखा अंगावर मळ आणि जुनाट वस्त्रे परिधान करून असल्यासारखा दिसत होता. एकीकडे पोर्तुगिजांच्या प्रेमाचा पान्हा पालिकेला फुटला होता; तर दुसरीकडे अशोकस्तंभ ढसाढसा रडत होता...
पोर्तुगिजांना गोव्यातून हाकलून लावण्यात आले त्या घटनेला जवळपास ५० वर्षे पूर्ण होत आली तरी आजसुद्धा गोमंतकातील काही अतिउत्साही मंडळींना त्यांची भाषा, संस्कृती आणि त्यांच्या नावांचा चांगलाच पुळका असल्याचे या उद्यानाकडे पाहिल्यावर सामान्य माणसाला जाणवल्यावाचून राहिले नाही.
गोव्याने अनेक महान कलाकार जगाला दिले. गोवा मुक्तिसंग्रामात अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी समर्पणाच्या वेदीवर आपल्या सर्वस्वाचा होम पेटवला. ती मंडळी सर्वार्थाने अमर झाली. देशातही अनेक अद्वितीय व्यक्तिमत्त्वे होऊन गेली. मात्र त्यांपैकी कोणाचेही नाव या उद्यानाला देण्याची सुबुद्धी महापालिकेला सुचली नाही. तसे न करता "गार्सिया द ऑर्ता' असे पोर्तुगीज नाव या उद्यानाला देण्यात आले. मुळात या नावाच अर्थ सामान्य लोकांना कितपत कळतो हाच गहन प्रश्न आहे.पोर्तुगीज गेले पण त्यांचे भूत अजूनही स्वतःला गोमंतकीय म्हणवणाऱ्या काही जणांच्या मानगुटीवर बसून घिरट्या घालत असल्याचे जिवंत उदाहरणच यानिमित्ताने पाहायला मिळाले.
गोव्यासाठी आपल्या संसारावर तुळशीपत्र ठेवलेल्या स्वातंत्र्यसैनिकांचे कार्यालय या उद्यानाच्या जवळच आहे. तथापि, त्यांच्या नाकावर टिच्चून या उद्यानाचे पोर्तुगीज नामकरण करण्यात आले.
ताठ कण्याच्या गोमंतकीयांचे लक्ष या समारंभाऐवजी अशोकस्तंभाकडेच वारंवार जात होते. याचे मुख्य कारण म्हणजे आपल्या स्वाभिमानाचे आपणच काढलेले धिंडवडे. अतिमहनीय आणि स्वतःला राजकीय क्षेत्रातील दिग्गज मानणाऱ्या व्यक्तीदेखील या समारंभात अशोकस्तंभाची दुर्दशा दुरूनच पाहात होत्या.
उद्यानासाठी पालिकेने कोट्यवधी रुपये खर्च केले. मात्र अशोकस्तंभाची जी दारुण उपेक्षा करण्यात आली आहे ती पाहून कोणाचेही माथे भडकल्याशिवाय राहणार नाही.
एखाद्या पुरातन वास्तूचे नूतनीकरण केल्याने त्याचे ऐतिहासिक मूल्य गमावण्याची भीती असते; परंतु त्याचे सुशोभीकरण केले असते तर काय बिघडणार होते? या सर्व गोष्टी राहिल्या दूरच; उलट त्यावर पावसामुळे आलेले गवत काढण्याची अक्कलही कुणाला नसावी यापेक्षा गोमंतकीयांचे दुर्भाग्य ते कोणते?
गोवा पर्यटनासाठी जगप्रसिद्ध आहे. म्हणूनच दरवर्षी येथे लाखो पर्यटक येतात. त्यासाठीच सदर उद्यान पणजी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी बांधण्यात आले आहे.पर्यायाने येथे आलेल्या पर्यटकांना अशोकस्ंतभाचे असे करुण दर्शन झाल्यास गोव्याची इतिहासाचे कसे आकलन होईल? मुलाखतीला येणाऱ्या उमेदवाराचा दर्जा त्याच्या अर्जावरून ठरत असतो त्याचप्रमाणे पर्यटकांच्या दृष्टीने अशोकस्तंभावरून इतिहासाचा दर्जा ठरणार नाही काय?
या संदर्भात स्वातंत्र्यसैनिक नागेश करमली यांना विचारले असता ते म्हणाले की, पणजी पालिकेने विविध ४० ठिकाणांची नावे बदलावीत, अशी मागणी आम्ही गेल्या कित्येक वर्षांपासून करत आहोत; पण पालिका मात्र वेळकाढू धोरण अवलंबत आहे. शिवाय लोकांचेही अपेक्षित सहकार्य मिळत नाही. या संदर्भातही आम्हाला योग्य सहकार्य मिळाल्यास आम्ही नाव बदलण्याची मागणी करणार आहोत. काही असले तरी सध्या गोव्याच्या राजधानीतील या उद्यानाला पोर्तुगिजांच्या हुजरेगिरीचा वास येतोय यात शंका नाही.

विद्यापीठ विद्यार्थी मंडळ निवडणूक

भाजपच्या विद्यार्थी विभागाचा बहिष्कार
पणजी, दि. ५ (प्रतिनिधी): गोवा विद्यापीठ विद्यार्थी मंडळाची उद्या होणाऱ्या निवडणुकीवर भारतीय जनता पक्षाच्या विद्यार्थी विभागाने बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, गोवा विद्यापीठ कॉंग्रेसला निवडून आणण्याचा अत्यंत केविलवाणा प्रयत्न करीत असल्याचा आरोप विद्यार्थी विभागाचे उपाध्यक्ष सिद्धेश नाईक यांनी केला आहे.
विद्यापीठाचे कुलगुरू, कुलसचिव, निवडणूक अधिकारी व कार्यकारी मंडळ यांना या कुकर्मांबद्दल विद्यापीठातील समस्त विद्यार्थीवर्गाची जाहीर माफी मागण्यास विद्यापीठाच्या या अधिकाऱ्यांना भाग पाडणार असल्याचा इशाराही श्री. नाईक यांनी दिला आहे.
विद्यार्थी उमेदवारांच्या अर्जांच्या छाननी प्रक्रियेत गोंधळ झाल्यानंतर दि. ३० सप्टेंबर रोजी होणारी ही निवडणूक स्थगित करून ती उद्या दि. ६ ऑक्टोबर रोजी ठेवण्यात आली होती. विद्यापीठाच्या प्रशासनात अनागोंदी सुरू असून सत्ताधारी पक्षाच्या मर्जीतील व्यक्ती बनण्यासाठी सदर अधिकाऱ्यांमध्ये चढाओढ लागली आहे. विद्यापीठाच्या कामाचे योग्य नियोजन करण्याचे सोडून सदर उच्चपदस्थ व्यक्ती राजकारण करण्याच्या शर्यतीत सामील झाली आहे. काहीही झाले तरी एकप्रकारे कॉंग्रेसला मदत करायची असा निंदनीय प्रकार विद्यापीठात सुरू असल्याची तिखट टीका श्री. नाईक यांनी केली आहे.
अर्जांची छाननी करण्यात गंभीर चुका झाल्याचे मान्य करूनसुद्धा सदर विद्यार्थ्यांचे अर्ज ग्राह्य न धरताच निवडणूक पुढे रेटण्याचा विद्यापीठाचा निर्णय अत्यंत धक्कादायक आहे. सत्ताधारी कॉंग्रेस व त्याचे "हितचिंतक' युवा वर्गासमोर लोकशाहीचा "चांगलाच' नमुना सादर करीत आहेत. या एकंदर प्रकाराचा भाजप विद्यार्थी विभागाने निषेध केला आहे.

'जखमी' वाघाने केली ऑस्ट्रेलियाची शिकार!

पुन्हा एकदा व्हेरी व्हेरी स्पेशल
भारताचा रोमांचकारी विजय

मोहाली, दि. ५ : आपण खरोखरच "व्हेरी व्हेरी स्पेशल' आहोत याची प्रचिती आणून देत हैदराबादच्या व्ही. व्ही. एस. लक्ष्मण या क्रिकेटमधील कसबी कलाकाराने आज पाहुण्या कांगारूंची शिकार केलीच. त्याच्या या मखमली खेळीमुळेच दोन सामन्यांच्या या कसोटी मालिकेतील पहिल्या लढतीत केवळ एक गडी राखून रोमांचकारी विजय संपादून यजमानांनी पाहुण्यांवर १-० अशी आघाडी घेतली. त्यामुळे तमाम भारतीय क्रिकेटप्रेमींनी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या या धुरंधरांना लवून मुजरा केला. धोनीनेही "व्हेरी व्हेरी स्पेशल लक्ष्मण' आणि "असामान्य फलंदाज' अशी स्तुतिसुमने त्याच्यावर उधळली तेव्हा मोहालीतील पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या प्रेक्षकांनी टाळ्यांचा अभूतपूर्व गजर केला.
कांगारूंविरुद्धच्या सामन्यात लक्ष्मणची बॅट तळपली नाही असे कधीच होत नाही. आपल्या कारकिर्दीतील सोळा शतकांपैकी तब्बल सहा शतके या पठ्ठ्याने कांगारूंच्या विरोधातच ठोकली आहेत. जगातील अव्वल गोलंदाजांवर वर्चस्व गाजवताना त्याने आज कमालच केली. चिकाटी, समर्पण आणि एकाग्रता अशा त्रिवेणी संगमाने नटलेली त्याची ७३ धावांची खेळी रसिकांना अपूर्व आनंद देऊन गेली. केवळ त्याच्या धीरोदात्त खेळीनेच आज भारताला ऑस्ट्रेलियावर एका गड्याने चित्तथरारक विजय मिळवून दिला. आपल्या ७९ चेंडूतील ७३ धावांच्या नाबाद खेळीमध्ये कुठेही दुखऱ्या पाठीचा व्यत्यय आणू न देता लक्ष्मणने ईशांत शर्मा (३१) याला साथीला घेत अत्यंत मोक्याच्या क्षणी थंड डोक्याने खेळ केला. या ईशांतचेही कौतुक करावे तेवढे थोडेच. ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात त्याने तीन गडी मटकावल्यावर फलंदाजीतही या जिगरबाज खेळाडूने लक्ष्मणला मोलाची साध दिली. तो टिच्चून खेळला. त्यामुळे भारताला भारतात नमवण्याचे कांगारूंचा कर्णधार रिकी पॉंटिंग याचे स्वप्न अखेर अधुरेच उरले.
गोव्यातही आनंदाला उधाण
हा थरारक सामना संपला आणि गोव्यातही आनंदाला उधाण आले. क्रिकेटप्रेमींनी परस्परांना शुभेच्छा देऊन हा ऐतिहासिक विजय साजरा केला. घराघरांत राष्ट्रकुलपेक्षाही चर्चा रंगली होती ती लक्ष्मणच्या बहारदार खेळीचीच. मंगळवारची संध्याकाळ जणू लक्ष्मणमय होऊन गेली होती.

भारताचे 'सुवर्णपंचम'

यजमानांनी घेतली द्वितीयस्थानी झेप
नवी दिल्ली, दि. ५ : मोहाली कसोटीतील रोमांचकारी विजयापाठोपाठ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये आजचा मंगळवार भारतासाठी अक्षरशः ' गोल्डन'वार ठरला. भारतीय नेमबाजांनी दोन सुवर्णपदकांनी बोहनी केल्यानंतर, तिघा कुस्तीपटूंनी सुवर्णपदकांची हॅटट्रिक साधत अनोखा ' सुवर्णपंचम ' योग साधला. त्याशिवाय आणखी दोन रौप्य पदकांची लयलूट करत, भारताने पदकतालिकेत द्वितीय स्थानी झेप घेतली.
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचे यजमानपद भूषवणाऱ्या भारतातील क्रीडाचाहत्यांना भारतीय खेळाडूंनी आपल्या कामगिरीने खूष करून टाकले. ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता अभिनव बिंदा व विश्वविजेता गगन नारंग यांनी १० मीटर एअर रायफल प्रकारात ११९३ गुणांसह सुवर्णपदकावर नाव कोरले. त्यापाठोपाठ अनिसा सय्यद व राही सरनोबत यांनी महिलांच्या २५ मीटर स्पोर्टस् पिस्तुल प्रकारात भारताला दुसरे सुवर्ण जिंकून दिले.
नेमबाजीतील प्रमुख आशास्थान असलेल्या तेजस्विनी सावंतला मात्र रौप्यपदकावर समाधान मानावे लागले . ५० मीटर थ्री पोझिशन प्रकारात ती आणि लज्जा गोस्वामी यांनी ११४३ गुणांसह रौप्य जिंकले . सुवर्णपदकापासून त्या केवळ सहा गुण पिछाडीवर होत्या . पुरुषांत दीपक शर्मा व ओंकार सिंग यांना ५० मीटर पिस्तुल प्रकारात रौप्यपदकावर समाधान मानावे लागले .
नेमबाजांनी सुवर्णपदकांचे खाते उघडल्यानंतर कुस्तीपटूंनीही सोनेरी कामगिरी केली. रवींदर सिंगने ६० किलो वजनी गटात, संजय सिंगने ७४ किलो वजनी गटात तर ९६ किलो वजनी गटात अनिल कुमार यांनी सुवर्णपदक पटकावत हॅटट्रिक साधली. त्यामुळे भारताने आज दिवसभरात ५ सुवर्ण पदकांची कमाई केली. या कामगिरीमुळे काल सातव्या स्थानावर असलेला भारत पदकतालिकेत थेट दुस-या क्रमांकावर पोहोचला. एकूण काय तर आजचा दिवस भारताच्या क्रीडा इतिहासात खरोखरच सुवर्णाक्षरांनी आणि पदकांनी कोरला गेला.

Tuesday 5 October, 2010

राज्यातील पालिका निवडणुकांचा घोळ

पहिल्या दिवशी एकूण ११ अर्ज दाखल
उमेदवारांना अंधारात
ठेवून अधिसूचना जारी

पणजी, दि. ४ (प्रतिनिधी): पालिका निवडणूक आरक्षणाच्या घोळामुळे राज्यात संतापाची लाट पसरल्यानंतर आता प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रमाची माहिती जनतेपासून लपवण्यापर्यंत कॉंग्रेस आघाडी सरकारने मजल मारली आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तारखेची कोणतीही अधिकृत पूर्वकल्पना राज्य निवडणूक आयुक्त डॉ. एम. मुदास्सीर यांनी दिली नाही व आज अचानक त्यासंबंधीची अधिसूचना जारी केली. पालिका निवडणुकीचा कार्यक्रम जनतेच्या माहितीसाठी घोषित झाली नाही व डॉ. मुदास्सीर हे जनतेसाठीही कार्यालयात उपलब्ध नाहीत, अशी नाराजी सर्वत्र पसरली आहे. आरक्षणाविरोधात न्यायालयात जाण्याचा इशाराही हवेतच विरल्याचे आज स्पष्ट झाले. दरम्यान, आज पहिल्या दिवशी विविध पालिकांत एकूण ११ अर्ज दाखल झाले.
राज्यातील अकरा पालिकांची निवडणूक ३१ ऑक्टोबर २०१० रोजी होणार आहे. सर्व पालिकांचा ताबा आपल्याकडे राहावा या उद्देशाने कॉंग्रेस आघाडी सरकारने संपूर्ण निवडणूकच "हायजॅक' करण्याचा प्रयत्न चालवला असून त्यामुळे लोकशाही पद्धतीची जाहीर थट्टाच सुरू असल्याचे आरोप या पार्श्वभूमीवर होऊ लागले आहेत. आरक्षणाची अधिसूचना व त्यानंतर लगेच उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू झाली. न्यायालयात आव्हान देण्याची संधी कुणालाही मिळू नये याचीही "योग्य दक्षता' यावेळी घेण्यात आली, असा आरोप भाजपकडून केला जात आहे. निवडणूक प्रक्रियेतील या घोळामुळे लोक कॉंग्रेस आघाडीला योग्य तो धडा शिकवतील, असा विश्वासही भाजपने व्यक्त केला आहे.
बाबू आजगावकर यांची उघड नाराजी
पेडणे पालिकेत "एसटी' समाजाच्या लोकांचे वास्तव्य नसताना यावेळी प्रभाग क्रमांक ९ या समाजासाठी राखीव ठेवण्यात आला आहे. या प्रभागात मोठ्या प्रमाणात "एससी' समाजाचे लोक आहेत पण त्यांना एकही राखीव प्रभाग मिळाला नाही. राज्यातील एकमेव "एससी' राखीव मतदारसंघात पालिकेसाठी एकही प्रभाग या समाजासाठी राखीव नसणे ही थट्टाच नव्हे काय, असा सवाल आरक्षण विरोधी मंचचे अध्यक्ष संतोष मांद्रेकर यांनी केला आहे. याप्रकरणी बाबू आजगावकर यांच्याशी संपर्क साधला असता आपणही याबाबतीत असाहाय्य असल्याचे ते म्हणाले. याप्रकरणी मुख्यमंत्री दिगंबर कामत व पालिकामंत्री ज्योकिम आलेमाव यांच्याशी आपले बोलणे झाले. हे आरक्षण संपूर्ण राज्यातील विविध समाजाच्या लोकसंख्येवर आधारित तयार करण्यात आले आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. पेडणे पालिकेत "एसटी' लोकसंख्या नसली तरीही त्यांना कुठून तरी आणून उमेदवार उभा करावा लागेल, असेही आपल्याला सांगण्यात आले, असे बाबू "गोवादूत' शी बोलताना म्हणाले. पेडण्यातील प्रभाग ९ प्रमाणेच मडगावात राजेंद्र आर्लेकर यांचा प्रभाग क्रमांक १३ "एससी' बाहुल्य आहे; पण हा प्रभागही महिलांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. यावेळी श्री.आजगावकर यांनी उघडपणे आरक्षण धोरणाबाबत आपली नाराजी व्यक्त केली.
पेडण्याचे आमदार दयानंद सोपटे यांनीदेखील या आरक्षण धोरणाचा निषेध करून "एससी'समाजावर हा अन्याय असल्याचे म्हटले आहे. बाबू आजगावकर हे राज्यातील एकमेव "एससी'साठी राखीव असलेल्या धारगळ मतदारसंघाचे आमदार आहेत व त्यात ते सरकारात पंचायत तथा क्रीडामंत्री असूनही आपल्या समाजाला न्याय देण्यास ते या आरक्षण धोरणामुळे असमर्थ बनले आहेत.
पहिल्याच दिवशी ११ अर्ज दाखल
आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी विविध पालिकांत एकूण ११ अर्ज दाखल झाले. सर्वाधिक ४ अर्ज मुरगाव नगरपालिकेसाठी दाखल झाले आहेत. आज दाखल करण्यात आलेले अर्ज खालीलप्रमाणे ः
पेडणे- प्रभाग-५- प्रदीप देशप्रभू
डिचोली-प्रभाग-१०-मानसी शिरोडकर
सांगे-प्रभाग-६- शेख इम्तियाज
कुडचडे-काकोडा-प्रभाग-१०- मारीया फर्नांडिस व ग्रेसी गावडे
मुरगाव- प्रभाग-४- स्पर्शा चोडणकर, प्रभाग-११-जॉन डिसोझा, प्रभाग-१३- संगीत राऊत, प्रभाग-१७-रामण्णा जग्गल
काणकोण- प्रभाग-२- रमाकांत गावकर, प्रभाग-८-गणबा गावकर

राजू गावस यांची बदली कशासाठी?

पर्रीकरांचा निवडणूक अधिकाऱ्यास खडा सवाल
वाळपईची पोटनिवडणूक
पणजी, दि. ४ (प्रतिनिधी): वाळपई पोटनिवडणुकीसाठी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू असताना व आज अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असताना अचानकपणे निवडणूक अधिकारी राजू गावस यांची बदली करण्यात आल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. निवडणूक प्रक्रिया सुरू असताना अशा पद्धतीने कोणतेही कारण नसताना निवडणूक अधिकारीच बदलण्याचा हा प्रकार, तसेच निवडणुकीसंबंधी इतर महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यासाठी विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर व भाजप सरचिटणीस गोविंद पर्वतकर यांनी आज मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाला भेट देऊन यासंदर्भात तीव्र नाराजी व्यक्त केली.
मुख्य निवडणूक अधिकारी गणेश कोयू हे रजेवर गेल्याने यावेळी निवडणूक अधिकारी नारायण नावती यांची भेट घेतली. वाळपई पोटनिवडणुकीसाठी नेमण्यात आलेले निवडणूक अधिकारी राजू गावस यांना निवडणुकीचा अनुभव नाही, असे या बदलीमागचे कारण सांगितले जाते. मुळात सुरुवातीलाच निवडणूक अधिकाऱ्यांची निवड करताना त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले व आत्ताच असा कोणता साक्षात्कार निवडणूक आयोगाला झाला, असा खडा सवाल पर्रीकरांनी यावेळी केला. मात्र राजू गावस यांच्या बदलीबाबत समर्पक उत्तर श्री. नावती यांना देता आले नाही.
वाळपईतील विद्यमान दोन्ही मामलेदार हे खुद्द सत्तरीचेच असल्याने त्यांची निवडणूक काळात बदली करण्यात यावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. वाळपई पोटनिवडणुकीसाठी वाळपई किंवा सत्तरीतील सरकारी कर्मचारी तसेच विश्वजित राणे यांच्याकडे असलेल्या खात्यांतील कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यासही भाजपने तीव्र आक्षेप घेतला आहे. निवडणूक अधिकाऱ्यांनी यासंबंधी योग्य ती खबरदारी घेण्याचे ठोस आश्वासन भाजपला दिले.
-----------------------------------------------------
दीपाजी राणे यांची माघार
वाळपई, दि. ४ (प्रतिनिधी): या पोटनिवडणुकीसाठी अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केलेले दीपाजी राणे यांनी आज (सोमवारी) निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली. त्यामुळे आता भाजप विरुद्ध कॉंग्रेस अशी दुरंगी लढत या मतदारसंघात रंगणार आहे. हा सामना अटीतटीचा होईल यात शंकाच नाही. भाजपने वाळपई भाग पिंजून काढण्यावरच प्रामुख्याने भर दिला आहे.

सचिव पातळीवर मोठा खातेपालट

वित्त सचिवपदी कुमारस्वामी तर
बालकृष्णन मुख्यमंत्र्यांचे सचिव

पणजी, दि. ४ (प्रतिनिधी): पर्वरी सचिवालयातील सर्व "आयएएस' अधिकाऱ्यांच्या खाते बदलाचा आदेश राज्यपाल डॉ. एस. एस.सिद्धू यांनी जारी केला आहे. गेली सहा ते सात वर्षे गोव्यात "सरकारी जावई' बनून राहिलेले व मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या खास मर्जीतले सनदी अधिकारी म्हणून गणले जाणारे राजीव यदुवंशी यांना गोवा सेवेतून मुक्त करण्यात आले. त्यांच्याकडील वित्त सचिवपदाचा ताबा एस. कुमारस्वामी यांना देण्यात आला आहे. टी. एम. बाळकृष्णन हे मुख्यमंत्र्यांचे सचिव असतील, असेही या आदेशात म्हटले आहे.
दरम्यान, राजीव यदुवंशी यांच्याकडे गेली कित्येक वर्षे असलेली खाण, वन, नगर नियोजन, जलसंसाधन आदी विविध खाती सर्वांना विभागून देण्यात आली आहेत. डॉ. मुदास्सीर यांच्याकडील शिक्षण खाते ए.के.आचार्य यांच्याकडे दिले आहे.सार्वजनिक बांधकाम खाते सांभाळणारे श्री.त्रिपाठी यांना दोन जादा खाती बहाल करण्यात आली आहेत.
कार्मिक खात्याचे अवर सचिव एन. पी. सिग्नापूरकर यांच्या सहीने राज्यपालांच्या नावे हा आदेश जारी करण्यात आला. नव्या आदेशाप्रमाणे विविध खात्यांचे सचिवपद खालीलप्रमाणे "आयएएस' अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. या यादीत कायदा सचिव प्रमोद कामत यांची निवड राज्य सरकारने केली आहे.व्ही.के.झा हे आरोग्याच्या कारणावरून रजेवर असल्याने त्यांचा ताबा मुख्य सचिव संजय श्रीवास्तव यांच्याकडे असेल, असेही या आदेशात कळवले आहे.

१ संजय श्रीवास्तव - मुख्य सचिव, गृह, कार्मिक,प्रशासकीय सुधारणा,मुख्य दक्षता अधिकारी,नागरी विमान वाहतूक,प्रधान निवासी आयुक्त व वन
२ नरेंद्र कुमार - परिवहन,माहिती व प्रसिद्धी, पुरातन व पुराभिलेख,राजपत्र
३ एस.कुमारस्वामी - वित्त,नियोजन,खाण,कन्वेंशन सेंटर,पीपीपी,सर्वसाधारण प्रशासन, वीज, राजशिष्टाचार
४ गोणेश कोयू - मुख्य निवडणूक अधिकारी,निवडणूक,मच्छीमार, अनिवासी भारतीय व्यवहार
५ राजीव वर्मा - महसूल,माहिती तंत्रज्ञान,समाज कल्याण, विशेष गृह सचिव
६ ए.के.आचार्य - शिक्षण, उच्च शिक्षण व तांत्रिक शिक्षण, नगर विकास, जलसंसाधन
७ डॉ.एम.मुदास्सीर - पर्यटन,बंदर,क्रीडा व युवा व्यवहार
८ व्ही.के.झा - पंचायतीराज, विज्ञान व तंत्रज्ञान,कारखान व बाष्पक, पर्यावरण,दक्षता, कार्मिक(विशेष सचिव), प्रशासकीय सुधारणा(विशेष सचिव)
९ डी.सी.साहू - कामगार व रोजगार, नागरी पुरवठा व सहकार
१० टी.एम.बालकृष्णन - मुख्यमंत्र्यांचे सचिव,नगर व नियोजन, उद्योग व व्यापार(एसईझेड), अपारंपरिक ऊर्जा,कला व संस्कृती,राजभाषा व सार्वजनिक गाऱ्हाणी
११ सी.पी.त्रिपाठी - सार्वजनिक बांधकाम खाते, गृहनिर्माण,कॅटरींग व्यवस्थापन,कृषी व कारागीर प्रशिक्षण
१२ तेहंग तग्गु - ग्रामीण विकास,प्रोव्हेदोरीया,वजन मापे,नदी परिवहन व अंतर्गत जल वाहतूक, छपाई व मुद्रणालय
१३ व्ही.पी.राव - आरोग्य, महिला व बाल कल्याण, वस्तुसंग्रहालय, पशुपालन व पशुचिकित्सा
१४ प्रमोद कामत - कायदा, न्याय व विधानसभा व्यवहार

रेल्वेखाली सापडून वास्कोत एक ठार

वास्को, दि. ४ (प्रतिनिधी): वास्को रेल्वेस्थानकावरून आज दुपारी ३.१० च्या सुमारास दिल्लीला जाण्यासाठी निघालेल्या "गोवा एक्सप्रेस'च्या स्लीपर कोचमध्ये चढण्याच्या प्रयत्नात असलेल्या ३५ वर्षीय अज्ञाताचा हात सुटून तो रेल्वेखाली सापडला आणि जागीच ठार झाला.
मृताची ओळख रात्री उशिरापर्यंत ओळख पटली नव्हती. वास्को रेल्वे पोलिस सदर प्रकरणाचा तपास करीत आहेत.
रेल्वे पोलिसांना अपघाताची माहिती मिळताच त्यांनी त्वरित घटनास्थळी जाऊन अपघाताचा व मृतदेहाचा पंचनामा केला. मृतदेह चिकित्सेसाठी मडगावच्या हॉस्पिसियू इस्पितळात पाठवण्यात आला आहे. ओळख पटवता येईल असे कोणतेही कागदपत्र मृताच्या खिशात सापडले नाहीत. मयताची उंची सुमारे पाच फूट अकरा इंच आहे. उपनिरीक्षक अमरनाथ पासी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

पुरेसा पाऊस होऊनही पर्वरीत पाणीटंचाई का?

खंडपीठाने काढले सरकारचे वाभाडे
पणजी, दि. ४ (प्रतिनिधी): गोव्यात १२० इंचाहून अधिक पावसाची नोंद होऊनही राज्यात पाणीटंचाई का भासते, असा प्रश्न करून मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने राज्य सरकारचे वाभाडेच काढले. महाराष्ट्रात काही ठिकाणी १० इंच पाऊस पडूनही तेथे सर्वांना पाणीपुरवठा करण्याचे व्यवस्थापन केले जाते. मग, गोव्यात मुबलक पाणी उपलब्ध असताना तसे का होत नाही, असा प्रश्न खंडपीठाने केला. प्रामुख्याने पर्वरी भागात पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्याबद्दल न्यायालयाने आज सरकारला खडसावले.
पर्वरी भागात पाणी पुरवठा होत नसल्याने न्यायालयात सादर झालेल्या याचिका जनहित याचिका म्हणून नोंद करून घेतली आहे. त्यावर गेल्या काही महिन्यापासून सुनावणी सुरू आहे. यादरम्यान राज्य सरकारने अनेक निर्देश देण्यात आले आहे. मात्र, त्याची पूर्तता होत नसल्याचे न्यायालयात उघड झाले आहे. त्याची योग्य कारणेही सरकारकडून न्यायालयाला मिळत नसल्याने दिसून येत आहे.
न्यायालयाच्या आदेशानुसार याठिकाणी वेळापत्रक लावले जाते. परंतु, प्रत्यक्षात लोकांच्या घरातील नळांना पाणीच येत नाही, अशी माहिती या प्रकरणातील एमेक्युस क्युरी ऍड. नॉर्मा आल्वारीस यांनी खंडपीठाला दिली. उदाहरणात आज दुपारी किंवा सायंकाळी अमुक वेळी पाणी सोडले जाणार असल्याचे वेळापत्रक लावले जाते. प्रत्यक्षात १२ ते १५ दिवस पाण्याचा पत्ता नसतो, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
यापूर्वी न्यायालयाने राज्य सरकारला आदेश देऊन पाणी कधी सोडले जाणार याचे भव्य वेळापत्रक लोकांना कळेल आणि दिसेल अशा ठिकाणी लावण्यास सांगितले होते. वेळापत्रक लावूनही त्याचे पालन केले जात नसल्याचे लक्षात आल्याने याठिकाणी केवळ हे काम पाहण्यासाठी एक अधिकारी का नेमू नये, असा प्रश्न आजच्या सुनावणीप्रसंगी न्यायालयाने केला. त्याचप्रमाणे आतापर्यंत सरकारने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार किती पाणी सोडले याचा अहवालही देण्यास सरकारला बजावण्यात आले आहे.

जिवाच्या भीतीनेच अटाला पळाला..

बहिणीनेच केला गौप्यस्फोट
पणजी, दि. ४ (प्रतिनिधी): गोव्यात सर्व घटना राजकीय बळाच्या जोरावरच घडतात, असे सांगून "अटाला' हा जिवाच्या भीतीनेच गोव्यातून पळाला, असा गौप्यस्फोट त्याच्या बहिणीने एका आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिनीला दूरध्वनीवरून दिलेल्या मुलाखतीत केला आहे. हे वृत्त ""टाइम्स नाऊ'' या वृत्तवाहिनीने प्रसारित केले आहे. त्यामुळे या प्रकरणाला पुन्हा एकदा नवे वळण लागले आहे.
"अटाला' याला कोणाकडून भीती संभवते, हा मूलभूत प्रश्न उभा ठाकला आहे. पोलिस ड्रग माफिया साटेलोटे प्रकरणात अत्यंत महत्त्वाचा साक्षीदार असलेला "अटाला' गेल्या दोन महिन्यांपासून बेपत्ता झाला असून सध्या तो इस्राईलमध्ये असल्याची पुष्टी झाली आहे. जामिनावर सुटलेला "अटाला' नेपाळमार्गे इस्त्रायमध्ये पळाल्याची चर्चा आहे. मात्र, त्याला पुन्हा ताब्यात घेण्यासाठी गोवा पोलिसांकडून कोणतेही ठोस कारवाई केली जात नसल्याने लोकांत संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.
त्याचप्रमाणे, या प्रकरणातील आणखी एक साक्षीदार लकी फार्महाऊस हिची जबानी घेण्यास पोलिस चालढकलपणा करत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
अटालाच्या बहिणीने दिलेल्या या वृत्तवाहिनीला दिलेल्या माहितीनुसार, " तो भारतातच राहणार होता. तथापि, त्याच्या जीवाला धोका निर्माण झाल्यानेच सुरक्षित ठिकाणी तो गेला आहे. अटालाच्या बहिणीचे नाव गुप्त ठेवण्यात आले आहे. सध्या अटाला हा इस्रायलमधे रिशोन लेटझीओन या ठिकाणी असल्याची माहिती उघड झाली आहे. "सध्या सुरू असलेला गोंधळ त्याला अपेक्षित नव्हता. त्याला कोणच शोधत नाही. सर्वांना माहिती आहे तो तिथे आहे. त्याला इस्रायलमध्ये कसलीच भीती नाही. आम्ही त्याची खात्री केली आहे. जर त्याने इस्रायल सोडले तर, समस्या निर्माण होऊ शकते,' असे तिने या वृत्त वाहिनीला सांगितले आहे.
न्यायालयाने त्याला सबळ पुराव्याअभावी जामीन मंजूर केला आहे. याच वृत्त वाहिनीने "अटाला' याला अमलीपदार्थ पुरवणारा त्याचा मित्रही दाखवला आहे. त्याला हशिश, कोकेन, एलएसडी, एक्सटसी हे पदार्थ पाहिजे त्या ठिकाणी पुरवले जात होते. तुम्ही त्याच्याविषयी माझ्याकडे का चौकशी करता? तो माझा मित्र आहे, असेही त्याने म्हटले आहे.

गोवा एक्सप्रेसचे इंजिन घसरले

अहमदनगर, दि. ४ : दिल्लीहून गोव्याकडे निघालेल्या गोवा एक्सप्रेसचे इंजिन आज दुपारी नगर स्थानकात रूळावरून घसरले. सुदैवाने या अपघातात जीवितहानीचे वृत्त नाही.या रेल्वेस्थानकात सध्या रूळांच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. दुपारी १ वाजताच्या सुमारास ही गाडी स्थानकात प्रवेश करीत असताना तिच्या इंजिनाची पुढील दोन चाके रूळावरून घसरली. रेल्वे कर्मचाऱ्यांनी तातडीने मदतकार्य सुरू केले आहे. इंजिन पुन्हा रूळावर घेण्यासाठी दौंड येथून क्रेन मागविण्यात आली. तोवर येथील वाहतूक खोळंबली होती. याचा परिणाम इतर गाड्यांच्या वेळापत्रकावरही झाला.

रॉबर्ट एडवर्डस् यांना औषधीशास्त्रासाठी नोबेल

स्टॉकहोम, दि. ४ : अपत्याविना तळमळणाऱ्या असंख्य जोडप्यांना टेस्ट ट्यूब बेबीच्या रूपाने पालकत्वाचे वरदान देणाऱ्या रॉबर्ट एडवर्डस् यांना २०१० या वर्षासाठीचा औषधी क्षेत्रातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे.
८५ वर्षीय एडवर्डस हे केंब्रीज विद्यापीठात प्राध्यापक होते. १९५० च्या दशकात आयव्हीएफवर संशोधन सुरू केले. मानवी शरीराबाहेर बीजांड फलित करण्याचे तंत्र त्यांनी विकसित केले. प्रसूतीतज्ज्ञ पॅट्रीक स्टेप्टोई यांच्यासोबत एडवर्डस् यांनी हे मोलाचे संशोधन केले. या तंत्राला टेस्ट ट्यूब असे नाव मिळाले. या तंत्राद्वारे २५ जुलै १९७८ मध्ये ब्रिटनमध्ये लौसी ब्राऊन ही जगातील पहिली टेस्ट ट्यूब बेबी जन्माला आली. या तंत्राने प्रसूतीशास्त्रात प्रचंड मोठी क्रांतीच घडवून आणली.
आतापर्यंत या तंत्राने जगात सुमारे ४० लाख लोकांचा जन्म झाला आहे. अपत्यप्राप्तीच्या बाबतीत निराश झालेल्या जगातील असंख्य जोडप्यांना एडवर्डस् यांनी आशेचा नवा किरण दाखविला. त्यांच्या या अतुलनीय कामगिरीसाठी त्यांना यंदाचा नोबेल जाहीर झाला आहे.
यंदाच्या नोबेलमधील हा पहिलाच पुरस्कार आहे. त्यापाठोपाठ उद्या भौतिकशास्त्र, बुधवारी रसायनशास्त्र, गुरुवारी साहित्य, शुक्रवारी शांततेसाठी आणि ११ ऑक्टोबर रोजी अर्थशास्त्रातील नोबेल जाहीर केले जाणार आहे.

Monday 4 October, 2010

डोळे दीपवणारा उद्घाटन सोहळा..

नयनरम्य आतषबाजी, दिलखेचक नृत्ये; ढोलकीच्या तालावर राष्ट्रकुलची मोहीम "फत्ते'


नवी दिल्ली, दि. २ - आधुनिक पद्धतीने सजवलेले नेहरू स्टेडियम, शोभेच्या दारूकामाची नयनरम्य आतषबाजी, दिलखेचक नृत्ये, अद्भुत प्रकाशयोजना, संपन्न भारतीय संस्कृतीचे मनोहारी दर्शन, देशोदेशीच्या बड्या मंडळींची उपस्थिती, विविध देशांच्या खेळाडूंनी केलेले देखणे संचलन अशा भारलेल्या वातावरणात आज येथे १९ व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेला शानदार आरंभ झाला आणि महाराष्ट्रातील ढोलकीच्या थराराने त्यावर जणू कळसच चढवला. ढोलकीच्या तालावर दिल्लीवासीय एवढे मंत्रमुग्ध झाले होते की, जेव्हा हा निनाद थांबला तेव्हाच ते भानावर आले...
अठ्ठावीस वर्षांपूर्वी नवव्या आशियाई क्रीडा स्पर्धेनंतर आज २८ वर्षांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने इतिहासाची पुनरावृत्ती करताना राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या उद्टनाच्या सोहळ्याद्वारे भारताचे कला, क्रीडा, सांस्कृतिक नव्हे तर आधुनिक, सामाजिक, तांत्रिक प्रगतीचे दर्शन घडले. भारत जगातील महानशक्ती असल्याचे दर्शन करोडो लोकांना यानिमित्ताने झाले. या अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या स्पर्धेचे उद्घाटन राष्ट्रपती प्रतिभा पाटील आणि ब्रिटनचे प्रिन्स चार्ल्स यांनी केले तेव्हा उपस्थित प्रेक्षकांनी प्रचंड जल्लोषात या अभूतपूर्व घटनेचे स्वागत केले. याप्रसंगी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग, दिल्लीच्या मुख्यमंत्री श्रीमती शीला दीक्षित आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.
साठ हजार प्रेक्षकांची क्षमता असलेल्या नेहरू स्टेडियममध्ये शेकडो विद्युत दिव्यांच्या झोतात रंगीबेरंगी वेश परिधान केलेले सहा हजार कलाकार सहभागी झाले होते. या कार्यक्रमाची सात टप्प्यांत विभागणी करण्यात आली होती. त्यामध्ये ऱ्हिदम्स ऑफ इंडिया या कार्यक्रमात तबला, ढोल, छैना, पोंग छोलोम, बांगला, कोया, ढोलु कोनिठा, ड्रम, नगारा, गजढोल, ढोलपुरी आदी भारतीय वाद्यांचा समावेश होता.
सेलिब्रेट इंडिया या कार्यक्रमात भारताच्या विविध राज्यातील संस्कृतीच्या लोकनृत्याद्वारे दर्शन घडवण्यात आले. योगा, बॉडी माईंड व सोल हा कार्यक्रम पांतजलीतर्फे सादर करण्यात आला. द ग्रेट इंडियन जर्नी हा कार्यक्रमही रंगतदार ठरला. ट्री ऑफ नॉलेज हा शास्त्रीय नृत्याचा कार्यक्रम बिरजू महाराज, मानसिंग, शिवराज, वैदनाथन, सोनल मानसिंह यांचे शिष्य आदी नामांकित कलाकारांनी सादर केला व त्यास दमदार प्रतिसाद लाभला.
वीस हजार कि.मी.चा प्रवास करून आलेली क्वीन्स बॅटन रिलेची अखेरची मैदानातील फेरी सायना नेहवाल, समशेर सिंग, सुशीलकुमार व अभिनव बिंद्रा या भारताच्या क्रीडा क्षेत्रातील दिग्गजांनी मारली. मग आणखी दोन कार्यक्रम पार पडले. खेळाडूचे संचलन, शपथविधी, ब्रिटनच्या महाराणींच्या संदेशाचे वाचन ध्वजारोहण हे अन्य कार्यक्रम "संपन्न' झाले.

कोर्टात जाण्याचा इशारा प्रत्यक्षात उतरणार काय?

उत्सुकता शिगेला; पालिका निवडणूक आरक्षणाचा घोळ

पणजी, दि. ३ (प्रतिनिधी) - राज्यातील अकरा नगरपालिकांच्या निवडणुकांसाठी राज्य सरकारतर्फे जाहीर करण्यात आलेल्या आरक्षण धोरणाच्या अधिसूचनेला वैयक्तिक तथा विविध समित्यांमार्फत उद्या ४ रोजी न्यायालयात आव्हान दिले जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. सरकारने मात्र सकाळी लवकर या निवडणुकीसाठी अधिसूचना जारी करून आचारसंहिता लागू करण्याची तयारी केली आहे. अशा परिस्थितीत आरक्षण विरोधातील याचिका न्यायालयात कितपत तग धरतील हेच पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.
राज्य सरकारच्या पालिका प्रशासनातर्फे शुक्रवार १ रोजी संध्याकाळी आरक्षणासंबंधीची अधिसूचना जारी करण्यात आली. या आरक्षण धोरणांवर अनेकांनी जबर टिका केली आहे. कॉंग्रेसकडून आपला राजकीय स्वार्थ साधण्यासाठीच हे आरक्षण तयार केले आहे व त्यात स्थानिक पातळीवरील परिस्थितीचा अजिबात आढावा घेण्यात आला नाही, अशी टीका बहुतांश भागांतून करण्यात आली आहे. पेडण्याच्या बाबतीत तर सरकारचा अविचारीपणाचे ढळढळीत दर्शन घडले आहे. पेडणे पालिका क्षेत्रात "एसटी' समाजातील लोकांचा समावेश नसताना या समाजासाठी ९ क्रमांकाचा प्रभाग राखीव ठेवण्यात आला आहे. या भागांत "एससी' अर्थात अनुसूचित जात बांधवांची संख्या मोठ्या प्रमाणात असूनही त्यांनाएकही जागा राखीव ठेवलेली नाही.अखिल गोवा नगरसेवक मंचचे अध्यक्ष कार्लुस आल्मेदा यांनीही या आरक्षणाबाबत नाराजी व्यक्त करून न्यायालयात जाण्याची तयारी केली आहे. पेडण्याचे माजी नगराध्यक्ष इजिदोर फर्नांडिस यांनीही आरक्षण राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोप करून न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याची घोषणा केली आहे. आता यापैकी कितीजण न्यायालयात जातात याकडेच सरकारचे लक्ष लागून राहिले आहे. एकदा अधिसूचना जारी झाली की या आरक्षण आव्हानाला न्यायालयात कितपत थारा मिळतो हेही पाहावे लागेल. त्यामुळे उद्या ४ रोजीचा दिवस यासंदर्भात निर्णायक ठरणार आहे.

कोलवा अपघातात वास्कोचा तरुण ठार

मडगाव, दि. ३ (प्रतिनिधी) : आज सकाळी कोलवा-बेताळभाटी रस्त्यावर झालेल्या एका अपघातात नायजेल कॅजिटन फोन्सेका (२३) हा बायणा-वास्केा येथील तरुण जागीच ठार झाला. तो बुलेटवरून भरधाव जात असताना समोरून जाणाऱ्या बसला त्याने मागून धडक दिली. ती इतकी जबरदस्त होती की तो उसळून खाली जमिनीवर आपटला व त्याचे डोके फुटून त्याला जागीच मृत्यू आला. कोलवा पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला आहे.
तो दुबईला जाणार होता...!
वास्को (प्रतिनिधी) ः गोव्यातील एक उत्कृष्ट नृत्यक म्हणून परिचित असलेला फोन्सेका या युवकाचे आज सकाळी अपघाती निधन झाल्याने त्याच्या परिवाराला तसेच मित्रमंडळीला धक्काच बसला. एका वर्षापूर्वी त्याच्या आईचे निधन झाल्यानंतर तो आपले निवृत्त वडील तसेच आपल्या तीन लहान भावांचा सांभाळ करीत होता. काळाने त्यालाच नेल्याने त्याच्या परिवारावर सध्या दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
गोव्यातील वास्कोस्थित "आय.सी.जे' व नंतर "डान्स इल्युजन' अशा दोन नृत्य पथकांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आपली कला सादर करून लहान वयातच लोकांचे मन जिंकून घेतलेला फोन्सेका सर्वांना सोडून गेला,असे वास्को शहरात समजताच संगीतप्रेमी तसेच त्याच्या चाहत्यांवर शोककळा पसरली. फोन्सेकाला दुबई येथे काम मिळाले होते व तो या महिन्याच्या अखेरीस दुबईला जाणार होता, अशी माहिती त्याच्या काही मित्रांनी दिली.
दरम्यान, उद्या संध्याकाळी चार वाजता फोन्सेकाचा मृतदेह त्याच्या निवासस्थानावरून बायणा येथील "अवर लेडी ऑफ कंदेलारिया' चर्चमध्ये नेण्यात येणार असून येथील दफनभूमीत त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.

श्रीपाद नाईक यांचा आज वाढदिवस

पणजी, दि. ३ - भाजपचे उत्तर गोवा खासदार श्रीपाद नाईक यांचा उद्या सोमवार ४ ऑक्टोबर रोजी ५८ वा वाढदिवस त्यांच्या सांपेद्र येथील "विजयश्री' निवासस्थानी विविध कार्यक्रमांनिशी साजरा करण्यात येणार आहे. खासदार नाईक हे सकाळी ९ वाजल्यापासून आपल्या निवासस्थानी पूर्ण दिवस उपलब्ध राहणार आहेत. संध्या. ५.३० ते रात्री ९.३० या वेळेत क्रिएटिव्ह क्रिएशन प्रस्तुत मुग्धा गावकर, बिंदिया वस्त, राजेश माणगावकर, अजय नाईक व विष्णू शिरोडकर यांचा "स्वरसंध्या' हा संगीत कार्यक्रम आयोजित केला आहे. यावेळी सर्व भाजप कार्यकर्ते, हितचिंतक, पदाधिकारी यांनी उपस्थित रहावे,असे आवाहन करण्यात आले आहे.

म्हापशातील त्या दुकानांचे भवितव्य अधांतरीच

आदेशाच्या कार्यवाहीची टांगती तलवार कायम
म्हापसा, दि.३ (प्रतिनिधी) - म्हापसा बाजारकर समितीच्या सर्वसाधारण बैठकीत "ओडीपी'तील प्रस्तावित रस्त्यावर येणारी दुकाने पाडू देणार नाही, असा एकमुखी ठराव संमत केला आहे, तर गोवा खंडपीठाने तीन महिन्यांत "कॉसमॉस सेंटर' ला रस्ता मोकळा करून देण्याचे निर्देश दिले आहेत. या एकूण प्रकरणी म्हापसा पालिका बुचकळ्यात सापडली आहे. सध्या पालिकेतील सर्व नगरसेवक निवडणुकीच्या धामधुमीत व्यस्त आहेत व तूर्त याविषयाला विराम मिळाला आहे; परंतु न्यायालयीन निवाड्याच्या कार्यवाहीची टांगती तलवार मात्र पालिकेवर लटकत राहणार आहे.
म्हापसा बाजारकर समितीने घेतलेल्या ठरावाबाबत "कॉसमॉस सेंटर रहिवासी सोसायटी' च्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी आपले दुकानदारांशी कसलेच वैर नाही, अशी भूमिका व्यक्त केली. सोसायटीतर्फे न्यायालयात केलेल्या याचिकेत फक्त पालिकेने या संकुलासाठी आराखड्यात दाखवलेला रस्ता मोकळा करून देण्याची विनंती केली होती. ही विनंती न्यायालयाने मान्य केली आहे किंबहुना म्हापसा पालिकेनेच तसे प्रतिज्ञापत्र न्यायालयाला सादर केले आहे. आता हा प्रस्तावित रस्ता मोकळा करून सोसायटीची झालेली गैरसोय दूर झाली की प्रश्न मिटला,अशी माहिती एका पदाधिकाऱ्याने दिली. पालिकेकडून तीन महिन्यांच्या आत न्यायालयाच्या निवाड्याची पूर्तता झाली नाही तर मात्र पालिकेविरोधात अवमान याचिका दाखल करणे सोसायटीला भाग पडेल, असेही यावेळी त्यांनी सूचित केले. सध्या तीन महिने सोसायटी याविषयावर काहीही बोलणार किंवा कृती करणार नाही, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.
दरम्यान, यावेळी सदर प्रस्तावित रस्त्याचा नकाशाही "गोवादूत'ला उपलब्ध झाला आहे. सदर नकाशावर दाखवण्यात आलेल्या काळ्या रंगातील २० मीटरचा हा रस्ता भर म्हापसा बाजारातून थेट "कॉसमॉस सेंटर' मागे गांधी चौक ते एनएच-४ या प्रस्तावित २५ मीटर रस्त्याला जोडला गेल्याचे दिसून येते. या रस्त्याच्या मधोमध दिसणारी काळी पट्टी म्हणजे बाजारातून जाणारा नाला आहे. हा प्रस्तावित रस्ता पाहिला तर बाजारातील दुकानांवर गंडांतर येणे अटळ असल्याचे जाणवते.
म्हापसा "ओडीपी' वरील कथित प्रस्तावित रस्ता रद्द करणे कायदेशीरदृष्ट्या कठीण असल्याची माहिती उत्तर गोवा नियोजन विकास प्राधिकरणातील (एनजीपीडीए) एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली."ओडीपी'तील त्रुटी दूर करण्याची भाषा करणारे म्हापशातील व्यापारी एवढे दिवस कुठे झोपले होते, असा टोलाही सदर अधिकाऱ्याने हाणला. म्हापसा "ओडीपी' निश्चित करण्यापूर्वी जनतेच्या सूचना व मतांसाठी खुला ठेवण्यात आला होता. यावेळी पालिका किंवा व्यापाऱ्यांनी हा विषय का उपस्थित केला नाही, असा सवालही त्यांनी केला. अखिल गोवा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष नारायण कारेकर यांना "ओडीपी' पणजी कार्यालयात बसून तयार केला, असा आरोप करण्याचा अधिकार नाही. त्यांनी "ओडीपी' साठी आपल्या वैयक्तिक हरकती दाखल करताना बाजारातील या प्रस्तावित रस्त्याचा विषय का उपस्थित केला नाही, असेही सदर अधिकाऱ्याचे म्हणणे आहे.

मनोज श्रीवास्तव यांच्या आरोपांना निखिल देसाई यांचेही चोख उत्तर

फुल्ल "मनोरंजन' !

पणजी, दि.३ (प्रतिनिधी)ः गोवा मनोरंजन संस्थेचे (ईएसजी) मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज श्रीवास्तव यांनी आपणाविरोधात आर्थिक घोटाळ्यांचे आरोप करून मुख्य सचिवांकडे तक्रार दाखल करणे हा निव्वळ दिशाभूल करण्याचा प्रकार आहे. याप्रकरणी कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास आपण तयार आहोत, पण त्याचबरोबर मनोज श्रीवास्तव यांनीही चौकशीच्या अग्निपरीक्षेला सामोरे जावे, असे थेट आव्हान तत्कालीन सरव्यवस्थापक निखिल देसाई यांनी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना पाठवलेल्या पत्रात दिल्याने येत्या काळात लोकांचे मात्र बरेच "मनोरंजन' होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
"ईएसजी' चे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज श्रीवास्तव यांनी मुख्य सचिव संजय श्रीवास्तव यांच्याकडे निखिल देसाई यांच्यावर २००६-०८ या काळात ३७.६७ लाख रुपयांचा आर्थिक घोटाळा केल्याची तक्रार दाखल करून बरीच खळबळ उडवली आहे. याप्रकरणी निखिल देसाई यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपणावरील आरोपांचे खंडन करणारे पत्र मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना पाठवल्याची माहिती दिली. मनोज श्रीवास्तव यांनी एका पत्रकाराला हाताशी धरून आपली बदनामी करण्याचा जो घाट घातला आहे, त्याला समर्थपणे तोंड देण्याची आपली धमक आहेच, परंतु त्यांनी सरकारी शुचितेचा भंग केल्याचे श्री.देसाई म्हणाले. आता "इफ्फी' आयोजनातील व्यवहारांची चौकशी दक्षता खात्यातर्फे होणार आहेच, तेव्हा सत्य काय ते लवकरच उघड होईल, असे संकेतही श्री.देसाई यांनी दिले. "ईएसजी'चा कारभार हाताळण्यास सपशेल अपयशी ठरलेले श्रीवास्तव हे वैफल्यग्रस्त बनले आहेत व त्यामुळेच इतरांना बळीचा बकरा करून आपल्या गैरकृत्यांवर पांघरूण घालण्याचाच हा त्यांचा प्रयत्न आहे,असा टोला यावेळी श्री.देसाई यांनी हाणला.
सन २००८ साली"ब्ल्यू ओशीयन' या कंपनीला "ईएसजी'तर्फे कोणतेही कंत्राट दिले नाही. या काळात कार्यकारी समितीने "एबीएसएल' या कंपनीला इव्हेंट मॅनेजमेंटचे कंत्राट दिले होते. मनोज श्रीवास्तव यांनी मात्र चित्रपट महोत्सव संपूनही या कंपनीला लाखो रुपयांची कंत्राटे दिली व त्यामुळेच संस्थेचे कोट्यवधी रुपयांचे प्रकरण दोन वर्षांपासून न्यायप्रविष्ट बनले आहे, असा ठपका श्री.देसाई यांनी ठेवला. संस्थेच्या छपाई कामाचे कंत्राट नियमांची पूर्तता करून कार्यकारी समितीने कमी बोलीची निविदा सादर केलेल्या आस्थापनाला दिले होते व या कंत्राटाचा अंतिम निर्णय हा स्वतः मनोज श्रीवास्तव यांनी घेतला होता, याची आठवणही या पत्रांत श्री.देसाई यांनी करून दिली आहे. आपल्या विरुद्धच्या तक्रारीत "रिट्झा वाईन्स' या पुरस्कर्त्यांच्या धनादेशासंबंधी स्पष्टीकरण देताना निखिल देसाई यांनी सदर पुरस्कर्ता "इफ्फी'२००६ च्या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीने आणला होता. या पुरस्कर्त्यांची रक्कम यापूर्वीच संस्थेच्या खात्यात जमा झाली आहे व या कंपनीच्या व्यवहारास कार्यकारी समितीची मान्यता मिळाल्याचाही खुलासा केला आहे.
संस्थेच्या अंतर्गत व्यवहारांबाबत हिशेबतपासनीसांकडून कुठलाही आक्षेप घेतला नसताना व याप्रकरणी कार्यकारी समितीलाही थांगपत्ता न लावता मनोज श्रीवास्तव यांनी थेट मुख्य सचिवांकडे तक्रार करण्याचा एकूण प्रकारच संशयास्पद आहे. मनोज श्रीवास्तव यांनी सुरू केलेले लघू चित्रपट केंद्र हे कायमस्वरूपी वादात सापडले आहे. कार्यकारी समितीकडून ३५ लाख रुपयांची संमती मिळवून प्रत्यक्षात मात्र ७५ लाख रुपयांचा खर्च कसा केला, याची चौकशी व्हायलाच हवी. ऐन चित्रपट महोत्सवात संस्थेची गाडी भल्या पहाटे एका विजेच्या खांबाला ठोकून लाखो रुपयांचे नुकसान कुणी केले, याचाही खुलासा व्हावा, अशी मागणीही श्री.देसाई यांनी केली.अभिनेत्री खतिरा युसुफी तसेच निर्माता राहुल रवेल यांची प्रकरणे अजूनही लोकांच्या मनात तेवढीच ताजी आहेत, अशी मल्लिनाथी श्री.देसाई यांनी केली आहे. खाजगी विदेश दौऱ्यांवर असताना हजारो रुपयांची फोनची बिले संस्थेच्या खात्यातून कुणी फेडली, याचाही खुलासा व्हावा. मनोज श्रीवास्तव यांची एकतर्फी कार्यपद्धती व अनेक कारनामे उघड होतील, या भीतीनेच त्यांनी सर्वांचे लक्ष विचलित करण्यासाठी आपल्यावर विनाकारण आगपाखड चालवल्याचेही श्री. देसाई यांनी म्हटले आहे. एका पत्रकाराला हाताशी धरून आपल्याबाबत बदनामीकारक माहिती पसरवून लोकांत संभ्रम निर्माण करण्याचाच प्रकार घडल्याने आपल्याला याबाबत खुलासा करणे भाग पडले, अशी भूमिकाही यावेळी श्री.देसाई यांनी आपल्या पत्रांत घेतली आहे.

Sunday 3 October, 2010

मुलायमसिंग यांना मुस्लिमांनीच फटकारले

लखनौ, दि. २ : 'अयोध्या निकालामुळे आपली फसवणूक झाल्याची भावना मुस्लिम समुदायात निर्माण झाली आहे.' असा जावईशोध मुस्लिम बांधवांचे वकिलपत्र घेतल्यागत काल मुल्लायमसिंग यांनी लावला होता. "मजहब नहीं सिखाता' म्हणत, आज त्यावर मुस्लिम समाजामध्ये तीव्र पडसाद उमटले.
लखनौ खंडपीठाच्या निर्णयानंतर हिंदू-मुस्लिम दोन्ही समुदायाच्या नेत्यांनी, राजकीय नेत्यांनी आणि प्रसार माध्यमांनी दाखवलेल्या परिपक्वतेमुळे एकूणच राष्ट्रीय स्तरावर सकारात्मक वातावरण तयार झाले आहे. मात्र, अशा परिस्थितीत राजकीय स्वार्थ डोळ्यासमोर ठेवून कुठलेही वक्तव्य करणे उचित ठरणार नाही. अशा वक्तव्यांमुळे वातावरण कलुषित होऊन तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे, असे इदगाहचे नायब इमाम आणि मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे सदस्य मौलान खलीद रशीद फिरंगीमहाली यांनी म्हटले आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर संघ परिवारासह कुणीही अपरिपक्वतेची जाणीव करून दिलेली नाही ही अतिशय आनंदाची बाब आहे. त्यामुळेच यानंतर कट्टरवादी शक्ती पुन्हा डोके वर काढू नये याची काळजी घेण्याची गरज आहे, असेही त्यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.
लखनौ खंडपीठाच्या निर्णयामुळे मुस्लिम समुदायात थोडे निराशेचे वातावरण असले तरी देशहित आणि सामाजिक सलोखा कायम ठेवण्याच्या दृष्टीने संयम बाळगण्याची नितांत गरज आहे, असेही ते म्हणाले. दारूल मुसीन्नफीन या इस्लामी संशोधन संस्थेचे नेते मौलाना मोहम्मद उमर यांनीदेखील फिरंगीमहाली यांच्या वक्तव्याला पाठिंबा दर्शवला आहे. मुलायमसिंग यादव यांनी मुस्लिम समुदायाची भावना व्यक्त केली असली तरी त्यासाठी ही वेळ योग्य नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. शिया पर्सनल लॉ बोर्डाचे सदस्य मौलाना मोहम्मद मिर्झा अथर यांनीदेखील मुलायमसिंग यांच्या वक्तव्यावर तीव्र आक्षेप घेतला आहे. निकालानंतर देशात शांतता आणि सलोखा कायम ठेवण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्नशील असताना मुलायमसिंग यांच्यासारख्या वरिष्ठ नेत्याने अशाप्रकारची विधाने करणे योग्य नाही. न्यायालयाच्या निर्णयामुळे एका पक्षाला आनंद आणि दुसरा पक्ष नाराज होणे साहजिक आहे आणि या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याचा किंवा चर्चेच्या माध्यमातून सामोपचाराने तोडगा काढण्याचा पर्यायदेखील खुला आहे. त्यामुळेच याप्रसंगी अशाप्रकारच्या विधानांची काहीएक गरज नाही, असेही अथर यांनी सांगितले.
अयोध्येबाबतचा निवाडा म्हणजे
गांधीजींचा आशीर्वाद : नरेंद्र मोदी
पोरबंदर : अयोध्येतील रामजन्मभूमीच्या मालकी हक्काबाबत अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने दिलेला निर्णय म्हणचे महात्मा गांधीचा आशीर्वादच असून, रामराज्याचे गांधीजींचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हा एक शुभसंकेत आहे, असे प्रतिपादन गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केले आहे.
महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त नरेंद्र मोदी यांनी आज गांधीजींचे जन्मस्थान असलेल्या कीर्ती मंदिर येथे जाऊन महात्मा गांधी यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण केली. या मंदिराला भेट देण्यासाठी येणाऱ्यांची प्रतिक्रिया नोंदविण्यासाठी ठेवण्यात आलेल्या पुस्तिकेत नरेंद्र मोदी आपले हे मत व्यक्त केले आहे. महात्मा गांधी यांनी आपल्या तरुण वयापासून ते मरणापर्यंत रामाचेच नाव घेतले होते. देशाला समृद्ध करण्यासाठी रामराज्याची कल्पनाही गांधीजींनीच मांडली होती. त्यामुळे महात्मा गांधींचे आजच्या परिस्थितीतही प्रेरणादायी आहेत, असे नरेंद्र मोदी यांनी नंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.
गांधीजयंतीच्या दोन दिवस आधी अयोध्या प्रकरणाचा निकाल आला ही अतिशय चांगली गोष्ट आहे आणि गेल्या ६० वर्षांपासून न्यायालयीन प्रक्रियेत अडकलेला हा वाद अखेर न्यायालयाने सोडवला, असेही मोदी पुढे म्हणाले. गांधीजयंतीनिमित्त कीर्ती मंदिर येथे आयोजित धार्मिक कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर नरेंद्र मोदी लगेच येथून ३० किमी अंतरावर असणाऱ्या शनिदेव मंदिराकडे रवाना झाले.

दोडामार्ग येथे ढगफुटी

दोघे वाहून गेल्याची भीती; पंधरा लाखांची हानी
सावंतवाडी, दि. २ (प्रतिनिधी): दोडामार्ग तालुक्यातील भेकुर्ली फुकेरी या भागामध्ये प्रचंड ढगफुटी झाल्याने अचानक नदी नाल्यांना महापूर आला. या महापुरात दोघे जण वाहून गेल्याची भीती व्यक्त होत असून झोळंबे ते भिडेवाडी दरम्यानचा कॉजवे वाहून गेला. अचानक पुराचे पाणी भातशेतीत घुसल्याने शेती पूर्णपणे वाहून गेली. त्यामुळे शेतकऱ्यांना जबर फटका बसला आहे. गोव्यातच नव्हे तर महाराष्ट्रातही आतापर्यंत अशी घटना घडल्याचे ऐकिवात नाही. साहजिकच ढगफुटीने दोडामार्गवासीयही अचंबित झाले आहेत.
फुकेरीत झालेल्या ढगफुटीचे पाणी झोळंबे ते कळणेच्या नदीपर्यंत आले. कळण्यात मात्र पाऊस पडला नाही तर नदीच्या वाटे पाणी भातशेती व माड बागायतीमध्ये घुसले. माड आणि केळी बागायती यामुळे आडव्या झाल्या. या ढगफुटीमुळे १५ लाखांहून अधिक नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. दरम्यान, या ढगफुटीमुळे आलेल्या पुराच्या पाण्यात दोन व्यक्ती वाहून गेल्याची भीती व्यक्त होत आहे. साहजिकच दोडामार्ग भागातील लोक कमालीचे धास्तावले आहेत. "दुष्काळात तेरावा महिना' या उक्तीनुसार आज सार्वजनिक सुट्टी असल्यामुळे सरकारी यंत्रणेकडून तातडीची मदत मिळण्याचीही शक्यता अंधूक बनली. आपत्कालीन विभागाकडे चौकशी केली असता सदर विभाग रात्री उशिरापर्यंत बंद असल्याने अधिक माहिती मिळू शकली नाही.

'साळावली'ची 'हायड्रॉलिक' चाचणी होणार

धरणातील खनिज गाळ उपसण्यासाठी तयारी
पणजी, दि.२ (प्रतिनिधी): दक्षिण गोव्यातील पाणीपुरवठ्याचे मुख्य स्त्रोत असलेल्या साळावली धरणात मोठ्या प्रमाणात खनिज गाळ साचल्याने या धरणाची "हायड्रॉलिक चाचणी' करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याकामी पुण्यातील "केंद्रीय जल व ऊर्जा संशोधन केंद्र' यांची मदत घेतली जाणार आहे. जलसंसाधन खात्यातील अधिकाऱ्यांचे पथक पुढील आठवड्यात पुण्याला भेट देऊन ते यासंबंधी अभ्यास करणार आहे.
सांगे तालुक्यातील साळावली या राज्यातील सर्वांत मोठ्या धरणातून संपूर्ण दक्षिण गोव्याला पाणीपुरवठा केला जातो. या धरणाचे पाणी सिंचनासाठीही वापरले जाते. गेल्या काही वर्षांत साळावली धरणाच्या सभोवताली क्षेत्रात खाण व्यवसायाचा जोर वाढल्याने त्याचा थेट परिणाम धरणावरही होऊ लागला आहे. साळावली धरणाला पाणी पुरवणारे साठे व स्त्रोत्र खाण उद्योगामुळे धोक्यात आले आहेत. मोठ्या प्रमाणात खनिज माती धरणाच्या पात्रात वाहून येत असल्याने धरणाची खोलीदेखील कमी होत चालली आहे. विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी या गंभीर विषयाकडे सभागृहाचे लक्ष वेधून सरकारला सावध केले होते. साळावली धरणातील पाण्यात लोहखनिजाचे प्रमाण वाढत चालले आहे. ही परिस्थिती अशीच कायम राहिली तर भविष्यात हे पाणी पिण्यासाठीही धोकादायक बनू शकते,अशी भीतीही व्यक्त करण्यात आली होती.
दरम्यान, साळावली धरण प्रभावित क्षेत्रात एकूण १४ सक्रिय खाणी आहेत. येत्या दोन ते तीन वर्षांत टप्प्याटप्प्याने या खाणी बंद करू, असे आश्वासन मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी मार्चमध्ये झालेल्या अधिवेशनात दिले होते. प्रादेशिक आराखड्यातही साळावली धरणाच्या नजीक खाण उद्योगाला मान्यता न देण्याचे सूचित केल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली होती. केंद्रीय जल व ऊर्जा संशोधन केंद्र "सीडब्लूपीआरएस' ही खास केंद्र सरकार मान्यताप्राप्त राष्ट्रीय संस्था आहे. जल व ऊर्जा संसाधन क्षेत्रात संशोधन व विकासाचे काम या संस्थेतर्फे हाती घेण्यात येते. हायड्रॉलॉजी व जल संसाधन अभ्यास हे या संस्थेचे प्रमुख काम असून देशातील अनेक बड्या धरण तथा जलसिंचन प्रकल्पांचा अभ्यास या संस्थेतर्फे करण्यात आला आहे. धरणांच्या दुरुस्तीपूर्व अभ्यासाचे कामही या संस्थेकडून केले जाते.
साळावली धरणातील गाळ साफ करण्यासाठी या सर्व गोष्टींचा विचार केला जाणार आहे. एखाद्या नदीत साचलेला गाळ साफ करण्यासाठी जे तंत्र वापरले जाते ते तंत्र धरणांसाठी वापरता येणे शक्य नाही व त्यामुळेच तज्ज्ञ संस्थेचा तांत्रिक सल्ला घेऊनच व नियोजनबद्ध कार्यक्रम हाती घेऊनच हे काम हाती घ्यावे लागते, अशी माहिती जलसंसाधन खात्याचे अधीक्षक अभियंता अरविंद सालेलकर यांनी दिली.

श्रीवास्तव यांची देसाईंविरुद्ध तक्रार

'इफ्फी' कथित घोटाळ्याचा वाद रंगणार
पणजी, दि.२ (प्रतिनिधी): गोवा मनोरंजन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज श्रीवास्तव यांनी "इफ्फी' २००६-०८ या काळात ३७. ६७ लाख रुपयांचा घोटाळा झाल्याची तक्रार मुख्य सचिव संजय श्रीवास्तव यांच्याकडे केल्याने आत्तापर्यंत संस्थेच्या कारभारावर होणाऱ्या टीकेला पुस्तीच मिळाली आहे. मनोज श्रीवास्तव यांनी हा प्रकार संस्थेच्या कार्यकारी मंडळासमोर न ठेवता थेट मुख्य सचिवांपर्यंत नेण्याचे नेमके कारण काय, तसेच या घोटाळ्यासाठी तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक निखिल देसाई यांच्यावर संशय घेताना "इफ्फी' काळात खर्च करण्याचे पूर्ण अधिकार श्री. देसाई यांनाच बहाल केले होते काय, असाही सवाल केला जात असून येत्या काळात हा विषय बराच गाजण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
गोवा मनोरंजन संस्थेच्या कारभारावरून यापूर्वीच अनेकांकडून टीका होत असताना आता खुद्द संस्थेचे कार्यकारी अधिकारी मनोज श्रीवास्तव यांनी केलेल्या लेखी तक्रारीमुळे "इफ्फी' आयोजनाच्या अनेक भानगडी उघड होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कार्यकारी तसेच इतर समितीवरील सदस्यच प्रत्यक्ष विविध कंत्राटांत लाभार्थी असल्याचीही चर्चा सुरू आहे. "इफ्फी'२००६-८ या काळात निखिल देसाई यांनी कंत्राटे देताना आपल्या मर्जीतील लोकांना सहकार्य केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. या तक्रारीत सुमारे ३७,६७,१४१ रुपयांचा घोटाळा झाल्याचेही श्रीवास्तव यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. आपल्या नातेवाईक व मित्रमंडळींच्या नावे बोगस संस्था स्थापन करून त्यांच्या नावे कंत्राटे देण्यात आली, असा ठपका ठेवण्यात आल्याने त्याची चौकशी दक्षता खात्याकडून सुरू आहे.
दरम्यान, "इफ्फी' काळात आर्थिक व्यवहारांचे पूर्ण अधिकार केवळ निखिल देसाई यांना काही देण्यात आले नव्हते. खर्चासंबंधीचे तसेच विविध कंत्राटांसाठी निविदा उघडण्याचे काम हे कार्यकारी समितीपुढेच होत होते व त्यामुळे याप्रकरणी केवळ निखिल देसाई यांनाच नव्हे तर संपूर्ण कार्यकारी समितीलाच जबाबदार धरण्याची गरज आहे, असे मत समितीच्याच एका सदस्याने व्यक्त केले. मनोज श्रीवास्तव यांनी केलेल्या तक्रारीवरून निखिल देसाई यांनी एकतर्फीच निर्णय घेतल्याचे ते भासवत असून संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी या नात्याने ते स्वतः व कार्यकारी समितीला याची काहीच माहिती नव्हती काय, असाही प्रश्न यानिमित्ताने पुढे आला आहे.
२००५ ते २००९ पर्यंतच्या सर्व "इफ्फी' आयोजनाच्या कारभाराची "सीबीआय' चौकशी व्हावी, अशीही मागणी होत आहे. विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांच्यावर "इफ्फी' प्रकरणी "सीबीआय' तक्रार करणाऱ्या कॉंग्रेस सरकारला उर्वरित "इफ्फी' आयोजनाच्या चौकशीला सामोरे जाण्याची हिंमत आहे काय, असाही सवाल आता केला जात आहे.

दुकाने पाडू देणार नाही

प्रसंगी न्यायालयात जाणार
म्हापसा बाजारकर समितीच्या
सर्वसाधारण बैठकीत ठराव

म्हापसा, दि.२ (प्रतिनिधी)>: येथील "कॉसमॉस सेंटर रहिवासी सोसायटी' च्या याचिकेवरील मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दिलेला निवाडा हा म्हापसा "ओडीपी' च्या आधारावरच देण्यात आला आहे व त्यामुळे या निवाड्यापासून दुकानदारांचे हित जपण्यासाठी "ओडीपी' तील त्रृटी दूर कराव्या लागतील. या निवाड्यामुळे गंडांतर येण्याची शक्यता असलेल्या दुकानांना सर्वतोपरी संरक्षण मिळवून देण्यासाठी प्रसंगी न्यायालयात जाऊन स्थगिती मिळवण्यात येईल, असा एकमुखी ठराव आज म्हापसा बाजारकर समितीच्या सर्वसाधारण बैठकीत घेण्यात आला.
म्हापसा "कॉसमॉस सेंटर' च्या प्रास्ताविक रस्त्याच्या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दिलेल्या निवाड्याचे वृत्त "गोवादूत' ने प्रसिद्ध केल्यानंतर म्हापसा बाजारात एकच खळबळ उडाली. या निवाड्यात न्यायालयाने प्रस्तावित मार्गावरील अतिक्रमणे तीन महिन्यांच्या आत हटवण्याचे निर्देश पालिकेला दिले आहेत व खुद्द पालिकेने तसे प्रतिज्ञापत्र न्यायालयाला सुपूर्द केले आहे. मुळात पालिकेने केवळ कॉसमॉस सेंटरच्या आवारातील २० मीटर रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्याचे प्रतिज्ञापत्र दिले असले तरी हा रस्ता भर बाजारपेठेतूनच जात असल्याने पालिकेकडूनच बांधण्यात आलेल्या दुकानांवरही या निवाड्यामुळे गंडांतर येण्याचा धोका निर्माण झाला आहे. याप्रकरणी बाजारपेठेतील या दुकानदारांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहण्याचा निर्धार या बैठकीत घेण्यात आला. म्हापसा "ओडीपी' त सद्य परिस्थितीकडे दुर्लक्ष करण्यात आल्यानेच ही समस्या निर्माण झाली आहे व त्यामुळे "ओडीपी' तील त्रृटी दूर करण्याची गरज यावेळी अनेकांनी बोलून दाखवली. खुद्द पालिकेनेच परवाने दिले असताना पालिकेकडूनच ही दुकाने हटवण्याचे प्रयत्न होणे हा निव्वळ दुकानदारांचा छळ असल्याची टिका यावेळी उदय वेंगुर्लेकर यांनी केली. अखिल गोवा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष नारायण कारेकर यांनी बोलताना म्हापसा "ओडीपी' पणजी कार्यालयात बसून तयार केला व त्यामुळे प्रत्यक्ष काय स्थिती आहे याची त्यांना अजिबात जाणीव नाही. "कॉसमॉस सेंटर' च्या इमारतीच मुळी शेत जमिनीत उभारण्यात आलेल्या आहेत. तिथे रस्ता किंवा गटार व्यवस्थेची कोणतीच सोय केली नाही,असेही ते म्हणाले. या प्रास्ताविक रस्त्यामुळे म्हापसा बझार ग्राहक सोसायटीवरही संकट ओढवले आहे. ही संस्था म्हापसावासियांची आहे व त्यामुळे या संस्थेची वादात सापडलेली वास्तू वाचवण्यासाठी प्रयत्न केले जातील,असे मत या संस्थेचे उपाध्यक्ष किशोर कोलगे यांनी व्यक्त केले.
दरम्यान,"कॉसमॉस सेंटर' च्या रहिवाशांना केवळ रस्त्याशी मतलब असून त्यांना बाजारातील दुकानदारांशी काहीही देणेघेणे नाही, असे स्पष्टीकरण चंद्रमोहन नास्नोडकर यांनी केले. केवळ पालिकेने या इमारतींसाठी रस्ता तयार करून देण्याची मागणी न्यायालयाकडे केली होती. त्या अनुषंगानेच न्यायालयाने हा निवाडा दिला आहे,असेही ते पुढे म्हणाले. याप्रसंगी आमदार फ्रान्सिस डिसोझा यांची भेट घेऊन त्यांना याविषयी कल्पना देण्याचे ठरले. याप्रसंगी रामा राऊळ, प्रकाश डांगी, संतोष बेळेकर, उदय वेंगुर्लेकर, किरण शिरोडकर, डॉ. मोरजकर आदींनी आपले विचार मांडले. समितीचे अध्यक्ष यशवंत गवंडळकर यांनी प्रास्ताविक केले.

राष्ट्रकुलचा पडदा आज उघडणार..!

नवी दिल्ली, दि. २ : भ्रष्टाचाराचे मोहोळ, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी, रखडलेली आणि कोसळलेली बांधकामे, विविध देशांतील नामवंत खेळाडूंनी घेतलेली माघार अशा पार्श्वभूमीवर एकोणीव्या राष्ट्रकुल स्पर्धेचा रंगमंच उद्या ३ ऑक्टोबर रोजी देशाच्या राजधानीत उघडणार आहे. त्यासाठी नवी दिल्लीत अभूतपूर्व व कडक सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. हेलिकॉप्टर्सपासून ते मानवरहित विमानांच्या मदतीने प्रत्येक हालचालीवर करडी नजर ठेवण्यात येणार आहे. राष्ट्रपती प्रतिभा पाटील आणि ब्रिटनचे युवराज प्रिन्स चार्ल्स यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे.
राष्ट्रकुल स्पर्धेच्या उत्साहावर कुठलेही विरजण पडू नये यासाठी बंदूकधारी कमांडोंसह दहा हजारांपेक्षा जास्त जवान संपूर्ण राजधानीत तैनात करण्यात आले आहेत. राष्ट्रकुलसाठी ठेवण्यात आलेली सुरक्षा व्यवस्था अतिशय उच्च दर्जाची असून यामुळे मलाही खेलग्राममध्ये प्रवेश करताना थोडी अडचण निर्माण झाली होती, असे मत ऑस्ट्रेलियाचे क्रीडामंत्री मार्क अरबिब यांनी व्यक्त केले आहे. नेहरू स्टेडियममध्ये होणाऱ्या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभासाठी प्रिन्स चार्ल्स यांचे आज भारतात आगमन झाले. आयोजन समितीचे अध्यक्ष सुरेश कलमाडी यांनी शाही जोडप्याचे स्वागत केले.
'बिग बॉस' आजपासून
मुंबई, दि. २ : भारतभर लोकप्रियतेचा कळस गाठलेल्या "बिग बॉस' या "रिऍलिटी शो'च्या चौथ्या आवृत्तीला उद्या रविवारपासून रात्री नऊ वाजता "कलर्स' वाहिनीवरून सुरुवात होत असून यावेळी "बिग बॉस'च्या भूमिकेत "दबांग' फेम अभिनेता सलमान खान वावरणार आहे. नव्याने कात टाकलेल्या या "शो'मध्ये सहभागी होणाऱ्या मंडळींना त्याच्या आदेशांचे पालन करावे लागणार आहे. शिवाय यानिमित्ताने "बिग बॉस'च्या चाहत्यांनाही नवे "खाद्य' मिळणार आहे.
वादग्रस्त अभिनेता शायनी आहुजा, "कबूतर जा जा' फेम भाग्यश्री पटवर्धन, स्नेहा उल्लाल, छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध कलाकार श्वेता तिवारी, अभिनेता चंकी पांडे, अभिनेत्री सारा खान, बालिका वधू फेम अविका गोर, विख्यात गायक शान, पूर्वाश्रमीची प्रसिद्ध बार डान्सर तरन्नुम, देवेंद्र सिंग व सायमन सिंग आदी तेरा कलाकार या शोमध्ये सहभागी होणार आहेत. ही मंडळी "बिग बॉस'च्या घरात यावेळी तब्बल ९६ दिवस वास्तव्य करणार आहेत. गेल्या वेळी हाच कालावधी ८४ दिवसांचा होता. आता त्यात आणखी बारा दिवसांची वाढ करण्यात आली आहे.
नियमानुसार दर आठवड्याला या शोमधून एका कलाकाराला गाशा गुंडाळावा लागतो. मग अंतिम स्पर्धा रंगते ती तिघा कलाकारांमध्ये. त्यात सर्वश्रेष्ठ ठरणारा कलाकार विजेता म्हणून घोषित केला जातो आणि अर्थातच, लक्ष्मीही त्याच्या घरी पाणी भरू लागते हे नव्याने सांगायला नकोच. यावेळी विजेता कोण ठरणार याची चर्चा आतापासूनच रसिकांमध्ये सुरू झाली आहे. अनेक मुलांनाही या "बिग बॉस'ने लळा लावला आहे. आपल्या पालकांसोबत ही मुले त्याचा आनंद लुटतात. एवढेच नव्हे तर "रात्री नऊची वेळ विसरू नका,' असेसुद्धा ही मुले आपल्या पालकांना बजावतात.
"खतरोंके खिलाडी' ही कलर्सवरील मालिका संपत आल्याने आता तिची जागा "बिग बॉस' घेणार आहे. त्यासाठी "व्होडाफोन' आणि अन्य आठ समूहांचा पुरस्कार लाभला आहे. राखी सावंत, रवी किसन, मोनिका बेदी, संभावना सेठ, काश्मीरा शहा, पायल रोहटगी, बख्तियार व तनाझ इराणी हे यापूर्वी बिग बॉसमध्ये चमकून गेलेले सितारे नव्याने सहभागी होणाऱ्या कलाकारांचे स्वागत करणार आहेत. राखी सावंत अशाच रिऍलिटी शोमधून पुढे आली आणि आज ती देशातील अव्वल क्रमांकाची टीव्ही स्टार बनली आहे.