संपत्तीचे विवरण जाहीर
हरिद्वार, दि. ९ : काळा पैसा आणि भ्रष्टाचाराविरोधात बेमुदत आंदोलन छेडणारे योगगुरू बाबा रामदेव यांनी आज आपल्या विविध ट्रस्टकडे असलेली संपत्ती जाहीर केली. यानुसार, त्यांच्या सर्व ट्रस्टची आर्थिक उलाढाल ११०० कोटी रुपयांची असून, ही संपत्ती कुठून आली, याचा तपशील आपल्याकडे उपलब्ध असल्याचा दावाही यावेळी करण्यात आला.
बाबांनी आज आपल्या उपोषणाच्या सहाव्या दिवशी पत्रपरिषदेला संबोधित करताना आपल्या संपत्तीची माहिती जाहीर केली. यावेळी त्यांचे निकटचे अनुयायी बालकृष्ण म्हणाले की, बाबा चालवित असलेल्या चार ट्रस्टकडे असलेली एकूण संपत्ती ४२६.१९ कोटी रुपयांची असून, या ट्रस्टवर करण्यात येणारा खर्च ७५१.०२ कोटी रुपयांचा आहे.
दिव्य योग मंदिर ट्रस्टकडे २४९.६३ कोटींची संपत्ती असून, पतंजली योगपीठाकडे १६४.८० कोटींची संपत्ती आहे. ‘भारत स्वाभिमान ट्रस्ट’कडे ९.९७ कोटी आणि आचार्यकूल शिक्षा संस्थानकडे १.७९ कोटींची संपत्ती आहे. ही सर्व संपत्ती ४२६.१९ कोटींची आहे.
ट्रस्टचे काम आणि आर्थिक व्यवहार यात पारदर्शकता असावी, असे आम्हाला स्पष्टपणे वाटते. आमच्या सर्व ट्रस्ट आणि कंपन्यांचे नियमानुसार नियमितपणे अंकेक्षण करण्यात येते. आमचा सर्व व्यवहार पारदर्शक असल्याची खात्री झाल्यानंतरच सरकार प्रत्येक दोन वर्षांनंतर आमच्या सर्व ट्रस्टच्या परवान्यांचे नूतनीकरण करीत असते. ट्रस्टकडे काय संपत्ती आली, कोणते खर्च केले, कोणी देणगी दिली आणि ती देणगी कोणत्या कामासाठी खर्च करण्यात आली, हा संपूर्ण लेखाजोगा आम्ही तयार केलेला आहे, असे त्यांनी सांगितले.
बाबा रामदेव यांच्या ट्रस्टने गेल्या पाच वर्षांच्या काळात किती संपत्ती जमा केली, त्याचे स्रोत कोणते याबाबत सखोल चौकशी करण्याची मागणी करीत कॉंगे्रसचे सरचिटणीस दिग्विजयसिंग आणि अन्य नेत्यांनी बाबांच्या संपत्तीस्रोतांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. याच अनुषंगाने बाबांनी आज आपल्या सर्व ट्रस्टची संपत्ती जाहीर केली. तथापि, बालकृष्ण यांनी बाबांशी संलग्न असलेल्या कंपन्यांची माहिती यात दिली नाही. माहिती अधिकार कायद्यांतर्गत कंपनी रजिस्ट्रारकडून ती प्राप्त केली जाऊ शकते, असे त्यांनी सांगितले.
सरकारी नियमानुसारच आम्ही कर भरत असतो, टीडीएसचीही कपात होत असते. सरकारच्या सर्व नियमांचे आम्ही काटेकोर पालन करीत असतो. आमच्या अन्य संलग्न कंपन्यांच्या मालमत्तेची माहिती कंपनी रजिस्ट्रारकडून प्राप्त केली जाऊ शकते, असे बालकृष्ण म्हणाले.
Friday, 10 June 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment