Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday, 14 May 2011

लोकायुक्तासाठी कंबर कसा!

जाहीर सभेत नेत्यांचे आवाहन
पणजी, दि. १३ (प्रतिनिधी): राजकारण्यांची बेईमानी ही स्वतःचा अपमान मानलात तरच तुम्हाला भ्रष्टाचाराची चीड येईल. गोव्यात सध्या निवडणुकीचे वातावरण आहे. त्यामुळे येत्या २०१२ पर्यंत लोकायुक्त स्थापन करून घेण्यासाठी कंबर कसा आणि त्याला विरोध करणार्‍या पक्षाला व आमदाराला घरची वाट दाखवा, असा सूर ‘इंडिया अगेन्स्ट करप्शन’ आंदोलनाच्या नेत्यांनी व्यक्त केला.
आज आझाद मैदानावर भ्रष्टाचार विरोधी सभेत किरण बेदी, स्वामी अग्निवेश, मॅगसेसे पुरस्कार विजेते अरविंद केजरीवाल यांनी भ्रष्टाचारावर कडाडून कोरडे ओढले. यावेळी ऍड. सतीश सोनकही व्यासपीठावर उपस्थित होते. प्रकृती अस्वास्थ्यास्तव अण्णा हजारे हे मात्र या सभेला उपस्थित राहू शकले नाहीत.
भ्रष्ट उमेदवाराला थारा नको: किरण बेदी
केंद्रात जनलोकपाल येणार तसेच गोव्यातही लोकायुक्त आलेच पाहिजे. त्याला लागणारा मसुदा तयार करण्याची जबाबदारी ही गोमंतकीयांची आहे. त्या कामाला आत्तापासूनच लागा. भ्रष्टाचाराला थारा देणार नाही अशाच उमेदवाराला मतदान करा. भ्रष्टाचार नसता तर अमेरिकेपेक्षा भारत अधिक शक्तिशाली झाला असता. पैसे नाहीत म्हणूनच गोव्यात एकच विद्यापीठ आहे. एकही ‘आयआयटी’ नाही, ‘आयआयएम’ नाही, असे किरण बेदी यावेळी म्हणाल्या. सामाजिक कार्य केल्याशिवाय राजकारणात येण्याची स्वप्ने तरुणांनी पाहू नयेत, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.
जनलोकपाल वरदान ठरेल: केजरीवाल
अरविंद केजरीवाल यांनी आपल्या भाषणात जनलोकपाल कसा असेल याची माहिती उपस्थितांना करून देताना हे एक वरदानच ठरणार असल्याचे मत नोंदवले. जनलोकपाल समितीवर असणारेच भ्रष्टाचारात अडकल्यास त्यांच्याविरुद्धही कठोर कारवाई करण्याची तरतूद या मसुद्यात आहे. सध्या भ्रष्टाचार करणार्‍या व्यक्तीला शिक्षा झाली तरी त्याच्याकडून लुटली गेलेली रक्कम वसूल करून घेतली जात नाही. परंतु, या कायद्याद्वारे ती रक्कम वसूल केली जाणार आहे. उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश भ्रष्टाचार प्रकरणात अडकल्यास त्यांच्यावरही कारवाई करण्याची तरतूद या जनलोकपालमध्ये आहे तसेच, ‘सीबीआय’, ‘सीव्हीसी’, ‘एसीबी’ यांना जनलोकपालमध्ये विलीन करण्याचाही प्रस्तावही यात आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
भारत मुक्त नाहीच: स्वामी अग्निवेश
पोर्तुगीज आणि ब्रिटिशांपासून स्वतंत्र मिळवण्यास जेवढा संघर्ष करावा लागला नाही तेवढा हिंदुस्थानाला भ्रष्टाचारी राजकारण्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी करावा लागत आहे, असे मत स्वामी अग्निवेश यांनी यावेळी व्यक्त केले. गोर्‍या कातडीच्या व्यक्तीला लांबून ओळखता येते. पण, बेईमान आणि भ्रष्ट व्यक्तीला ओळखणे कठीण आहे. भारत अजूनही त्यांच्यापासून मुक्त झालेला नाही, असे ते म्हणाले.
------------------------------------------------------
‘‘भ्रष्टाचारी लोकांना ओळखूनही त्यांचे काहीच वाकडे होत नाही, कारण त्या व्यक्तींचे राजकारण्यांशी घनिष्ठ संबंध असतात. दिगंबर आणि अवधूतचे साटेलोटे असल्यानेच बेकायदा हॉटेल पाडले जात नाही’’ - स्वामी अग्निवेश

नीलेशवर हल्ला करणार्‍यांना चोवीस तासांत अटक करा

पणजी, दि. १३ (प्रतिनिधी): कावरे खाणी विरुद्ध लढा देणार्‍या नीलेश गावकर याच्यावर प्राणघातक हल्ला करणार्‍या हल्लेखोरांना आणि संबंधित खाण मालकाला येत्या चोवीस तासात अटक करण्याची मागणी आज स्वामी अग्निवेश, किरण बेदी आणि अरविंद केजरीवाल यांनी केली. तसेच, या विषयीचे एक पत्रही पोलिस महासंचालक डॉ. आदित्य आर्य यांना लिहिण्यात आले असून आरोपीला पकडून पोलिसांनी आपली कर्तबगारी सिद्ध करावी, असे आव्हानही पोलिस खात्याला देण्यात आले आहे.
नीलेश गावकरवरील हल्ला हा संपूर्ण गोमंतकीयांवर झालेला हल्ला आहे. खाण माफिया कोण आहेत हे सर्वांना माहिती आहे. परंतु, त्यांना अटक केली जात नाही. कावरे खाण केवळ कागदोपत्री बंद केली गेली आहे; प्रत्यक्षात ती सुरूच आहे. येत्या २४ तासांत ती खाण बंद केली जावी, अशा इशारा यावेळी श्री. केजरीवाल यांनी दिला.
धनवान व्यक्ती गरिबावर हल्ला करते तेव्हा तो गुन्हा ‘अज्ञात व्यक्तीवर’ नोंद होतो. नीलेश गावकर हा अण्णा हजारे यांचा सच्चा शिपाई आहे, असेही केजरीवाल म्हणाले. सध्या नीलेश याच्यावर हॉस्पिसियो इस्पितळात उपचार सुरू असून आज दुपारी स्वामी अग्निवेश व अरविंद केजरीवाल यांनी त्याची इस्पितळात जाऊन भेट घेतली.
-------------------------------------------------------
नीलेश गावकरवर हल्ला करणार्‍यांना त्वरित अटक करण्याच्या निवेदनावर जाहीर सभा सुरू असताना आयआयटीचे माजी प्राध्यापक डॉ. प्रमोद पाठक यांनी केवळ अर्ध्या तासात पाचशे जणांच्या सह्या घेतल्या. या निवेदनावर माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी यांनीही सही केली.

बंगालात ममता, तामिळनाडूत जयललिता!

डाव्यांचा किल्ला ढासळला - करुणानिधी भुईसपाट
नवी दिल्ली, दि. १३ : पश्‍चिम बंगालमध्ये गेल्या ३४ वर्षांपासून निर्विवादपणे सत्ता उपभोगत आलेली माकपप्रणित डावी आघाडी ममता बॅनर्जी यांच्या सुनामी लाटेत पार वाहून गेली. इकडे तामिळनाडूत जयललिता यांनी जोरदार मुसंडी मारत करुणानिधी यांच्या द्रमुक पक्षाला घरी बसविले. पुदुचेरीत अद्रमुकच्या नेतृत्वाखालील आघाडीने सत्ता काबीज केली. केरळात गेल्या १५ वर्षांपासून चालत आलेली माकपप्रणित डाव्या आघाडीची सत्ता मोडीत काढून कॉंगे्रसप्रणित संयुक्त लोकशाही आघाडीने सत्ता पटकाविली. तर आसाममध्ये तरुण गोगोेईंनी सत्तेची ‘हॅट्ट्रिक’ पूर्ण केली.
पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले. केरळ वगळता सर्वच राज्यांमधील निकाल अपेक्षेनुसारच लागले. या निवडणुकीने तीन राज्यांमध्ये प्रस्थापितांना जोरदार झटका दिला आहे. इतकेच नव्हे तर; सत्तेच्या नशेत मनमानी करणार्‍यांना पराभवाचा स्वादही चाखवला आहे.
पश्‍चिम बंगाल, तामिळनाडू या दोन राज्यांमधील निकालांकडे संपूर्ण देशाचेच लक्ष लागले होते. आज सकाळी मतमोजणी सुरू झाल्यानंतर निवडणुकीचे कल जसजसे बाहेर येत होते, तसतशी सत्तेची दिशा स्पष्ट होत होती. मतमोजणी सुरू झाल्यानंतर काही तासांतच पश्‍चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या निवासस्थानी आणि तामिळनाडूत जयललिता यांच्या निवासस्थानी एकच जल्लोष सुरू झाला होता.
बंगालात डाव्यांची धुळधाण
२९४ सदस्यीय पश्‍चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल कॉंगे्रसच्या नेतृत्वाखालील आघाडीने २२४ जागा मिळविल्या असल्या तरी, एकट्या तृणमूल मिळालेल्या जागांची संख्या १८३ असल्याने ममता बॅनर्जी यांनी स्वबळावरच पश्‍चिम बंगालमधील सत्ता खेचून आणली आहे. तृणमूल आघाडीतील घटक पक्ष असलेल्या कॉंगे्रसला ४१ जागा मिळाल्या असून, अन्य एक घटक पक्ष असलेल्या एसयुसीआयला भोपळाही ङ्गोडता आला नाही.
या राज्यात गेल्या ३४ वर्षांपासून सत्तेचे सुख भोगत आलेल्या माकपप्रणित डाव्या आघाडीला केवळ ६४ जागांवर समाधान मानावे लागले आहेत. यात सर्वाधिक ४१ जागा माकपला मिळाल्या असून, डाव्या आघाडीतील अन्य घटक पक्ष असलेल्या भाकपला ४, ङ्गॉरवर्ड ब्लॉकला १० आणि आरएसपीला ७ जागा मिळाल्या आहेत. इतर पक्ष व अपक्षांना केवळ सहा जागा मिळाल्या आहेत.
बुद्धदेव पराभूत
मावळते मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य हे स्वत: जादवपूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक हरले. राज्याचे माजी मुख्य सचिव आणि तृणमूल कॉंगे्रसचे उमेदवार मनीष गुप्ता यांनी त्यांचा १६,७७७ मतांनी पराभव केला.
१८ मे रोजी शपथविधी
सध्या केंद्रात रेल्वे मंत्री असलेल्या ममता बॅनर्जी याच पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री होणार असून, त्या १८ मे रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. आज त्यांनी राज्यपालांची भेट घेऊन सत्तेचा आपला दावा सादर केला. राज्याला स्वच्छ आणि पारदर्शक प्रशासन देण्यास आपले प्राधान्य राहील, जनतेवर आजपर्यंत जो अन्याय झाला तो दूर करण्यासाठी आपण सर्व ते प्रयत्न करू, असे ममता बॅनर्जी यांनी निवडणूक निकालानंतर सांगितले.
तामिळनाडूत अम्मांची लाट
तामिळनाडू विधानसभेच्या २३४ जागांपैकी १९७ जागा जिंकून जयललिता यांच्या अद्रमुक आघाडीने स्पष्ट बहुमत मिळविले आहे. अम्मा म्हणून ओळखल्या जाणार्‍या जयललिता यांनी द्रमुकच्या बालेकिल्ल्यांमध्ये जोरदार हादरे दिले आहेत. गेल्या पाच वर्षांपासून सत्तेवर असलेल्या द्रमुकच्या वाट्याला केवळ ३५ जागा आल्या आहेत.
अद्रमुक आघाडीला मिळालेल्या १९७ जागांपैकी अद्रमुक पक्षाला १५२ जागा, डीएमपीकेला २७ आणि माकपला १० जागा मिळालेल्या आहेत. तर, तिथेच २-जी स्पेक्ट्रम घोटाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर तामिळनाडूत सत्तेवर येण्याच्या लालसेने आणि केंद्रातील सत्ता वाचविण्याच्या उद्देशाने द्रमुकशी युती करणार्‍या कॉंगे्रसला मोठा धक्का बसला आहे. द्रमुक आघाडीला मिळालेल्या एकूण ३५ पैकी द्रमुकला केवळ २३ जागा मिळाल्या असून, कॉंगे्रसला ९ जागांवर समाधान मानावे लागले आहे. या आघाडीतील अन्य एक घटक असलेल्या पीएमकेला ३ जागा मिळाल्या आहेत.
जयललिता तिसर्‍यांदा होणार मुख्यमंत्री
जयललिता यांच्या पक्षाने स्पष्ट बहुमत मिळविले असल्याने राज्याच्या मुख्यमंत्रिपदी तिसर्‍यांदा विराजमान होण्यासाठी त्या सज्ज झालेल्या आहेत. आपल्या पक्षाने मित्र पक्षांसोबत निवडणूक लढविली असली तरी, सत्तेत आपण कोणत्याही मित्रपक्षाला स्थान देणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
पुदुचेरीत कॉंगे्रसला धक्का
तामिळनाडूत द्रमुकला धक्का देणार्‍या जयललिता यांच्या अद्रमुकप्रणित आघाडीने पुदुचेरीत कॉंगे्रसला धक्का दिला आहे. ३० सदस्यीय पुदुचेरी विधानसभेत अद्रमुक आघाडीने २० जागांवर विजय मिळविला आहे. कॉंगे्रस आघाडी केवळ १० जागाच जिंकू शकली. अपक्ष व इतर पक्षांना भोपळाही ङ्गोडता आला नाही. कॉंगे्रसमधून अलीकडेच बाहेर पडलेले आणि स्वत:चा राजकीय पक्ष स्थापन करणारे राज्याचे माजी मुख्यमंत्री एन. रंगास्वामी यांनी दोन्ही जागांवर विजय मिळविला आहे. तामिळनाडूप्रमाणेच येथेही कॉंगे्रस आणि द्रमुक यांनी युती केली होती. पण, जयललिता यांच्या अद्रमुक आघाडीने दोन्ही राज्यांत या युतीला धूळ चारली.
केरळातही डावे पराभूत
केरळात अतिशय अटीतटीच्या ठरलेल्या सत्ता संघर्षात कॉंगे्रसप्रणित संयुक्त लोकशाही आघाडीने आज माकपच्या नेतृत्वाखालील डाव्या लोकशाही आघाडीचा पराभव करीत गेल्या तीन दशकांपासून चालत आलेल्या डाव्यांच्या सत्तेला सुरुंग लावला. १४० सदस्यीय विधानसभेत सत्ता प्राप्त करण्यासाठी ७१ जागांची आवश्यकता असताना कॉंगे्रस आघाडीने एक जागा जास्त मिळवून साधे बहुमत प्राप्त केले. डाव्या आघाडीला ६८ जागा मिळाल्या.
दरम्यान, डाव्या आघाडीचा पराभव झाला असला तरी, या आघाडीतील प्रमुख पक्ष असलेला माकप ४५ जागांसह सर्वांत मोठा राजकीय पक्ष म्हणून राज्यात उदयास आलेला आहे. तिथेच, सत्तेवर आलेल्या संयुक्त लोकशाही आघाडीतील प्रमुख पक्ष असलेला कॉंगे्रस ८२ जागा लढवूनही केवळ ३८ जागांवर विजय मिळवू शकली आहे.
माकपाचे ज्येष्ठ नेते आणि मावळते मुख्यमंत्री व्ही. एस. अच्युतानंदन यांनी सलग तिसर्‍यांदा आपल्या मालामपुझा या पारंपरिक मतदार संघातून २३ हजार मतांनी विजय प्राप्त केला आहे. त्यांच्या मावळत्या मंत्रिमंडळातील बहुतांश सदस्यही विजयी झाले आहेत.
तरुण गोगोई पुन्हा मुख्यमंत्री
विकास आणि शांतता या दोन आश्‍वासनांच्या लाटेवर स्वार झालेल्या कॉंगे्रसने आसाममध्ये आज सत्तेची ‘हॅट्ट्रिक’ केली. १२६ सदस्यीय विधानसभेत कॉंगे्रस आघाडीने ७६ जागा जिंकल्या आहेत. आसाम गण परिषदेला केवळ १० जागांवर समाधान मानावे लागले असून, भाजपने ६ जागांवर विजय प्राप्त केला आहे. गेल्या निवडणुकीत २४ जागा जिंकणार्‍या आसाम गण परिषदेला यावेळी केवळ १० जागाच मिळू शकल्या. तर, गेल्या निवडणुकीत दहा जागा जिंकणार्‍या भाजपला यावेळी केवळ सहा जागा मिळाल्या आहेत.
-----------------------------------------------------------------
ममता बॅनर्जी: हा मॉं, माटी, मानुष यांचा विजय आहे. मी उद्योगांच्या विरोधात नसल्याने औद्योगिक आणि कृषी दोन्ही क्षेत्रांना लाभदायक ठरणारे नवे धोरण तयार करणार.
जयललिता : हा विजय लोकांचा आणि लोकशाहीचा आहे. द्रमुकच्या भ्रष्ट राजवटीविरोधात जनतेने मतदानातून संताप व्यक्त केला. कायदा व सुव्यवस्था हे आपले प्रथम प्राधान्य राहणार.

बाबूशकडून ७ लाखांची ‘सक्तवसुली’

पणजी, दि. १३ (प्रतिनिधी): करोडो रुपयांचे विदेशी चलन घेऊन दुबईला जाताना मुंबई विमानतळावर ताब्यात घेण्यात आलेले गोव्याचे शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात यांना महाराष्ट्र जकात खात्याने ५ लाख रुपयांचा दंड ठोठावला असून २ लाख रुपयांच्या सक्त वसुलीचा आदेश दिला आहे.
गेल्या २ फेब्रुवारी २०११ रोजी विदेशात जाताना बाबूश मोन्सेरात व त्यांच्या अन्य एका साथीदाराला मुंबई विमानतळावर ताब्यात घेण्यात आले होते. त्यावेळी त्यांच्याकडे करोडो रुपयांचे बेहिशेबी भारतीय तसेच विदेशी चलन सापडले होते. सूत्रांनुसार बाबूश मोन्सेरात यांना गोव्यात विदेशी चलन उपलब्ध करून देणार्‍या सराफी व्यावसायिकाचीही सक्त वसुली संचालनालयामार्फत चौकशी केली जाणार आहे. बाबूश यांना बेकायदेशीररीत्या त्या व्यक्तीने हे चलन उपलब्ध करून दिले असून त्याच्याविरुद्धही गुन्हा नोंद केला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. बाबूश यांच्याकडे १ कोटी रुपयांचे विदेशी चलन आणि २५ लाख रुपयांचे भारतीय चलन आढळून आले होते.

बेकायदा रेती उपसा प्रकरण बड्या अधिकार्‍यांवर गुन्हा नोंद

पणजी, दि. १३ (प्रतिनिधी): तेरेखोल - केरी आणि मांडवी नदीतील रेतीचा बेकायदा उपसा केल्याप्रकरणी संबंधितांवर गुन्हा नोंद करण्याचे आदेश आज पेडणे सत्र न्यायालयाने देताच पेडणे पोलिसांनी पेडणे मामलेदारांसह कॅप्टन ऑफ पोर्टस्, खाण संचालनालय, मच्छीमार खाते, विज्ञान व तंत्रज्ञान खाते तसेच वाहतूक खात्याच्या संचालकांविरुद्ध भ्रष्टाचार आणि फसवणुकीचा गुन्हा नोंद केला. गेल्या चोेवीस तासांत खाण संचालनालय आणि वाहतूक खात्याच्या संचालकांवर भ्रष्टाचार आणि फसवणुकीचा हा दुसरा गुन्हा नोंद झाला आहे.
गेल्या २४ फेब्रुवारी २०११ रोजी तेरेखोल केरी येथे बेकायदा रेती उपसा केल्याच्या प्रकरणाची पेडणे पोलिस स्थानकात तक्रार सादर करण्यात आली होती. त्याची कोणतीही दखल पोलिसांनी घेतली नसल्याने न्यायालयात अर्ज केला असता आज न्यायालयाने दोषी अधिकार्‍यांवर गुन्हा नोंद करण्याचे आदेश दिले. तसेच, २४ तासांत गुन्हा नोंदवून त्याची एक प्रत तक्रारदाराला देण्याची सूचना करीत येत्या पंधरा दिवसांत या प्रकरणाचा काय तपास केला याचा अहवालही न्यायालयात सादर करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत. पेडणे सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश विजयालक्ष्मी शिवोलकर यांनी हा निवाडा दिला.
सदर आदेशाची प्रत मिळताच म्हापसा उपविभागीय पोलिस उपअधीक्षक सॅमी तावारीस यांनी त्वरित पेडणे पोलिस स्थानकाचे निरीक्षक उत्तम राऊत देसाई यांच्या गैरहजेरीत तक्रार नोंद करून घेतली. सीआरझेड नियमांचे उल्लंघन होऊन आणि सरकारी तिजोरीला करोडो रुपयांचा फटका बसूनही कोणत्याही यंत्रणेने त्याची दखल घेतली नसल्याचे या प्रकरणातून उघडकीस आले आहे.

बारावीचा निकाल १८ मे रोजी

पणजी, दि. १३ (प्रतिनिधी): गोवा राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या बारावीच्या परीक्षांचा निकाल बुधवार दि. १८ मे रोजी जाहीर करण्यात येणार आहे. पहिल्यांदाच ‘ग्रेडींग’ पद्धतीचा वापर केला गेलेला हा निकाल दुपारी ३ वाजता जाहीर होणार आहे. राज्यातील विविध उच्चमाध्यमिक विद्यालयांतून यंदा बारावीच्या परीक्षेसाठी १३,७६५ विद्यार्थी बसले असून यात ६,५९३ मुलगे व ७,१७२ मुलींचा समावेश आहे. दरम्यान, दहावीच्या निकालाची तारीख मात्र अद्याप ठरलेली नसून येत्या काही दिवसांत ती नक्की करण्यात येईल, अशी माहिती पर्वरी येथील शिक्षण मंडळाच्या कार्यालयातून देण्यात आली.

Wednesday, 11 May 2011

मोपातील शेतकर्‍यांचा रुद्रावतार!

भूसंपादन अधिकार्‍यांना पिटाळले - पुन्हा पाय न ठेवण्याची तंबी
पणजी, दि. ११ (प्रतिनिधी): शेतकर्‍यांचा कडाडून होणारा विरोध डावलून मोपा येथील प्रस्तावित विमानतळासाठीच्या जमिनीतील झाडांवर क्रमांक घालण्यास आलेल्या भूसंपादन अधिकार्‍यांना व कर्मचार्‍यांना आज दि. ११ रोजी येथील शेतकर्‍यांचा रुद्रावतार पाहावयास मिळाला. या अधिकार्‍यांना येथील शेतकर्‍यांनी घेराव घालून अक्षरशः पिटाळून लावले.
सविस्तर वृत्तानुसार, मोपा येथील प्रस्तावित विमानतळाला तेथील शेतकर्‍यांनी प्रखर विरोध केला आहे. मात्र, भूमिपुत्रांच्या विरोधाची दखल न घेता सरकार तेथे भूसंपादन करू पाहते आहे. याचाच एक भाग म्हणून आज दि. ११ रोजी मोपा विमानतळाचे भूसंपादन अधिकारी मनोहर वस्त यांच्या सूचनेवरून दोन अभियंते, एक वनखात्याचा शिपाई व सहा कर्मचारी मिळून नऊजण मोपात दाखल झाले व तेथील काजूच्या झाडांची साल काढून त्यावर रंगाने क्रमांक टाकू लागले. या प्रकाराची कुणकुण स्थानिक शेतकर्‍यांना लागताच अल्पावधीतच तेथे सुमारे ७० शेतकरी जमा झाले व त्यांनी अधिकारी व कर्मचार्‍यांना घेराव घालून त्यांच्यावर प्रश्‍नांचा भडिमार केला. कवडीमोल दराने येथील जमीन संपादित करून शेतकर्‍यांच्या पोटावर लाथ मारण्याचा प्रकार कदापि खपवून घेतला जाणार नाही; पुन्हा या ठिकाणी पाय ठेवाल तर खबरदार.. अशी तंबी यावेळी अधिकार्‍यांना देण्यात आली. लोकांनी धारण केलेला हा रुद्रावतार पाहून क्रमांक घालण्यासाठी आलेले अधिकारी गर्भगळीत झाले. गयावया करून त्यांनी संतप्त शेतकर्‍यांच्या तावडीतून सुटका करून घेतली व आपल्या वाहनांतून तेथून अक्षरशः काढता पाय घेतला.
दरम्यान, या प्रकाराबाबत मोपा अन्यायग्रस्त समितीचे सचिव संदीप कांबळी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, मोपात विमानतळ होणार आहे याची नोंद केंद्रात नाही की राज्यातही नाही. सरकारने सदर विमानतळ खाजगी कंपनी उभारणार आहे, असे निवेदन न्यायालयात केले आहे. हा सगळा बनाव असून येथील गरीब शेतकर्‍यांच्या जमिनी ताब्यात घेऊन त्यात बॉक्साइट खाणी सुरू करण्याची योजना राज्यातील खाण माफियांनी आखली आहे. सत्ताधार्‍यांचे या खाण माफियांशी साटेलोटे असून जाफर ऍण्ड कंपनीला यासाठी तयार करण्यात आले आहे, असा आरोपही श्री. कांबळी यांनी केला.

माध्यमप्रश्‍नी १८ रोजी तोडगा?

उभय प्रतिनिधींना दिल्लीत घेऊन जाणार
पणजी, दि. ११ (प्रतिनिधी): प्राथमिक शिक्षणाच्या माध्यम प्रश्‍नावर तोडगा काढण्यात स्थानिक नेत्यांना अपयश आल्याने आता कॉंग्रेस पक्षाने दोन्ही बाजूच्या प्रतिनिधींना घेऊन दिल्लीला कूच करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या १८ मे रोजी दिल्लीत एका खास बैठकीचे आयोजन करण्यात आले असून मानव संसाधन मंत्री कपील सिब्बल, अल्पसंख्याक मंत्री सलमान खुर्शीद, कॉंग्रेसचे केंद्रीय सचिव तथा राज्यसभा खासदार ऑस्कर फर्नांडिस यांच्या उपस्थितीत या प्रश्‍नावर तोडगा काढला जाणार असल्याची माहिती आज कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष सुभाष शिरोडकर यांनी पक्ष कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
कॉंग्रेस पक्ष माध्यम प्रश्‍न दिल्लीला नेऊन त्याचा राजकीय लाभ मिळवण्याचा प्रयत्न करीत असल्याची टीका सुरू झाली आहे. गोव्याचे प्रभारी जगमितसिंग ब्रार यांनी काही दिवसांपूर्वीच येत्या २० मेपर्यंत माध्यम प्रश्‍नावर तोडगा काढला जाणार असल्याची घोषणा केली होती. परंतु, भारतीय भाषा सुरक्षा मंचाचे ऍड. उदय भेंब्रे यांनी त्यावर जोरदार टीका करताना हा प्रश्‍न दिल्लीत सोडवला जाऊ शकत नाही, असा टोला हाणला होता. त्यामुळे दिल्लीतील या बैठकीला दोन्ही बाजूंचे प्रतिनिधी उपस्थित राहतील की नाही, या विषयी शंका उपस्थित केली जात आहे.
या प्रकरणी इंग्रजी भाषेची मागणी करणार्‍यांना आणि राष्ट्रीय भाषेच्या पुरस्कर्त्यांना आम्ही दिल्लीला येण्याचे आवाहन करणार आहोत, असे यावेळी श्री. शिरोडकर म्हणाले. मात्र, त्या बैठकीला जाणार्‍या लोकांच्या विमान तिकिटांचा खर्च कॉंग्रेस उचलणार का, या प्रश्‍नावर मात्र त्यांनी मौैन पाळले. राज्याचे शिक्षण मंत्री बाबूश मोन्सेरात यांना या बैठकीसाठी नेले जाणार आहे का, असा प्रश्‍न केला असता त्यांना नेण्याबाबत अद्याप निर्णय झाला नसल्याचे श्री. शिरोडकर म्हणाले.
कॉंग्रेसने दिशाभूल थांबवावी : वेलिंगकर
गोव्याचा माध्यम प्रश्‍न दिल्लीला नेऊन स्थानिक सरकारने आपली हतबलता सिद्ध केली आहे. आता दिल्लीत यावर योग्य तोडगा काढला जाईल असे सांगून लोकांची दिशाभूल करण्याचा चालवलेला प्रयत्न कॉंग्रेसने त्वरित थांबवावा, असा इशारा यावर प्रतिक्रिया देताना मंचाचे कृती योजना प्रमुख प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी दिला आहे. २० वर्षापूर्वी गोव्याच्या माजी मुख्यमंत्री शशिकला काकोडकर यांनी आपल्या हिमतीवर याप्रश्‍नी निर्णय घेतला होता. प्राथमिक शिक्षणाचे माध्यम मातृभाषाच असावी, हा सिद्धांत जागतिक पातळीवरही मान्य झाला आहे. मात्र, आता कॉंग्रेस हा प्रश्‍न राजकीय पातळीवर नेऊ पाहत आहे. या प्रश्‍नाला जातीय रंग देण्याचा प्रयत्नही सुरू आहे, अशी टीका त्यांनी केली. माध्यम प्रश्‍नाशी केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री सलमान खुर्शीद यांचा काय संबंध, असाही प्रश्‍न प्रा. वेलिंगकर यांनी उपस्थित केला. राज्य सरकारातील शिक्षणमंत्र्यांनीच हा प्रश्‍न उपस्थित केल्याने त्यांनी आपली कातडी वाचवण्याचा प्रयत्न जरूर करावा; परंतु, हे करताना दिल्लीकडे बोटे दाखवून लोकांची दिशाभूल करणे ताबडतोब थांबवावे असेही ते म्हणाले.

लईराईच्या कौलासाठी भाविकांची रीघ

आज शेवटचा दिवस
पणजी, दि. ११ (प्रतिनिधी): शिरगाव येथील श्री लईराई देवीचा कौलोत्सवाला भाविकांची प्रचंड गर्दी होत असून उद्या १२ मे हा कौल घेण्याचा शेवटचा दिवस आहे. देवीचा जत्रोत्सव ८ मे रोजी साजरा झाल्यानंतर सुरू झालेल्या या कौलोत्सवाला भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत.
जत्रेला होत असलेली मोठी गर्दी लक्षात घेऊन देवीचे अनेक भाविक त्यानंतर होणार्‍या कौलोत्सवाला येणे पसंत करतात. त्यामुळे दुसर्‍या दिवसापासून सुरू होणार्‍या कौलोत्सवाला भाविकांची मोठी गर्दी होते. शिरगावातील लोकांच्या घराघरांत फिरणार्‍या देवीच्या कलशाचे दर्शन तथा कौल घेण्यासाठी सध्या झुंबड उडत आहे. दरम्यान, उद्या १२ रोजी कौलोत्सवाचा अंतिम दिवस आहे. देवीचा कलश संध्याकाळी ५ वाजण्याच्या सुमारास पुन्हा मंदिरात जाणार आहे. त्यामुळे आज ११ रोजी रात्री उशिरापर्यंत भाविकांनी कौलोत्सवाच्या ठिकाणी गर्दी केली होती. गोवा तसेच गोव्याबाहेरून आलेल्या भाविकांच्या वाहनांमुळे होमकुंडस्थळी वाहतुकीची कोंडी झाली होती.
मोगरीच्या माळा स्वस्त
दरवर्षी देवीच्या कौलासाठी लागणार्‍या मोगर्‍यांच्या कळ्यांच्या माळा दहा ते वीस रुपयापर्यंत विकल्या जातात. यंदा मात्र मोगरीच्या कळ्यांचे विपुल पीक आल्यामुळे या माळांचे दर बरेच खाली आले आहेत. कौलोत्सवस्थळी हा दर पाच ते दहा रुपये प्रतिमाळ एवढा होता.

मी खात्री देत नाही...

कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षांची ‘रोखठोक’ मते
पणजी, दि. ११ (प्रतिनिधी): आगामी विधानसभा निवडणुकीत गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेल्या उमेदवारांना तिकीट मिळणारच नाही, याची आपण खात्री देऊ शकत नसल्याचे प्रतिपादन आज कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष सुभाष शिरोडकर यांनी केले.
आज पक्ष कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत श्री. शिरोडकरांना याविषयी प्रश्‍न केला असता त्यांनी वरील प्रतिक्रिया दिली. तिकीट देण्याचे काम केवळ आपण करीत नाही. त्यामुळे गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेल्यांना तिकीट मिळणारच नाही, याची खात्री देणे आपल्याला शक्य नाही. अशा उमेदवारांना तिकीट मिळण्याचे प्रमाण मात्र नक्की कमी केले जाणार असल्याचेही ते पुढे म्हणाले. राजकीय नेत्यांकडे शिक्षणातील पदवी असणे गरजेचे नाही. कारण पदवी घेतलेली प्रत्येक व्यक्ती हुशार असेलच असे नाही, असेही मत श्री. शिरोडकर यांनी यावेळी व्यक्त केले. सध्या कॉंग्रेस पक्षातील अनेक पदाधिकार्‍यांवर आणि सरकारमधील मंत्र्यांवर अनेक प्रकारच्या गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंद झाले असल्याने त्यावर कोणतेही स्पष्ट भाष्य करण्याचे श्री. शिरोडकर यांनी टाळले. परंतु, यूथ कॉंग्रेसमध्ये गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेल्या कोणत्याही तरुणाला सदस्य बनवू नका, असा स्पष्ट आदेश दिला असल्याचे मात्र ते यावेळी म्हणाले.
..तर वाघांवर कारवाई!
कॉंग्रेस पक्षात तिकीट मिळवण्यासाठी पैशांच्या बॅगांची गरज नाही, असे त्यांनी विष्णू वाघ यांनी काणकोण येथे केलेल्या विधानावर स्पष्टीकरण देताना सांगितले. श्री. वाघ यांनी नेमके काय विधान केले आहे याची माहिती आपल्याला अद्याप मिळालेली नाही. त्यांनी खरेच तसे विधान केले असेल तर त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, असेही ते यावेळी म्हणाले.

कोरगाव खाण प्रकरणातील पुरावे नष्ट करण्याचे प्रयत्न

अजूनही पंचनामा नाही
पणजी, दि. ११ (प्रतिनिधी): बेकायदा खनिज उत्खनन प्रकरणी जितेंद्र देशप्रभू यांच्यावर अखेर गुन्हा नोंद झाला खरा; मात्र आता या प्रकरणाचे पुरावे नष्ट करण्याचे जोरदार प्रयत्न सुरू झाल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणात अनेक बडे अधिकारीही गोवले जाण्याची शक्यता असल्याने या प्रकरणातील महत्त्वाचे पुरावे नष्ट केले जात आहेत. गुन्हा नोंद करूनही घटनास्थळाचा पंचनामा करण्यात गुन्हा अन्वेषण विभाग वेळकाढू धोरण अवलंबत असल्याने या संशयाला पुष्टीच मिळाली आहे.
काल दि. १० रोजी सकाळी जितेंद्र देशप्रभू तसेच, खाण संचालक, वाहतूक संचालक, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष आणि स्थानिक सरपंच तथा सचिवांच्या विरोधात भ्रष्टाचार आणि फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्याचे पुरावे गोळा करण्यासाठी ज्या ठिकाणी हे बेकायदा खनिज उत्खनन करण्याचे आले त्याचा पंचनामा होणे अत्यंत गरजेचे आहे. या ठिकाणाहून ५० कोटी रुपयांचे खनिज काढण्यात आल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास गुन्हा अन्वेषण विभागाचे उपअधीक्षक चंद्रकांत साळगावकर करीत आहेत.

सर्वणमधील ‘त्या’ खाणीला काम थांबवण्याचे आदेश

डिचोली, दि. ११ (प्रतिनिधी): सर्वण येथील टी. सी. क्र. २८/१९५३ मधील खाण कंपनीच्या व्यवस्थापनास या परिसरातील खाणीचे काम त्वरित थांबवावे, अशा आशयाची नोटीस गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने बजावली असून कलम २१ अंतर्गत कोणत्याही प्रकारचे काम हाती घेतल्यास कारवाई करणार असल्याचे म्हटले आहे.
सदर खाण कंपनीला या बाबतची सर्व कागदपत्रे सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत व खाणीचा परवाना रद्द का करू नये यासंबंधी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. सदर नोटिशीनुसार, कंपनी व्यवस्थापनाने १ फेब्रुवारी २०११ रोजी सुनावणी ठेवण्याची मागणी केली होती. सदर मागणीला अनुसरून प्रदूषण नियंत्रण मंडळाने ८ मार्च रोजी सुनावणी ठेवली होती. यावेळी खाण व्यवस्थापनाने सर्वण भागात कसल्याच प्रकारचे काम हाती घेण्यात आले नसल्याचे स्पष्टपणे सांगितले होते. परंतु, १४ मार्च २०११ रोजी रमेश गावस यांनी सदर भागात खाणीचे काम हाती घेण्यात आल्याची तक्रार मंडळाकडे नोंदविली होती. यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाने तसेच तिळारी धरण प्रकल्प अधिकार्‍यांनी एकत्रितपणे २३ मार्च २०११ रोजी सदर भागाची पाहणी केली असता त्या ठिकाणी पूल उभारणीसाठी कॉंक्रीट तयार करण्याचे काम करण्यात येत असल्याचे आढळून आले.
या भेटीवेळी कायद्याचे उल्लंघन करून खाण व्यवस्थापनाने बेकायदा काम चालू ठेवल्याचा ठपका ठेवून सदर खाणीचे काम त्वरित बंद करण्याचा आदेश देण्यात आले आहेत. सदर कंपनीने नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल कंपनीला कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली आहे. या नोटिशीला उत्तर न दिल्यास कंपनीचे परवाने रद्द करण्यात येतील असेही बजावण्यात आले आहे.

अमली पदार्थाचे जाळे मिळून उध्वस्त करू : डॉ. आर्य

पोलिस महासंचालकपदाचा ताबा स्वीकारला
पणजी, दि. ११ (प्रतिनिधी): गोव्यातील अमली पदार्थाचा प्रश्‍न केवळ पोलिस सोडवू शकत नाहीत. हे जाळे नष्ट करण्यासाठी गोव्यातील जनतेने बेधडक बाहेर येऊन पोलिसांना मदत करण्याचे आवाहन नवनियुक्त पोलिस महासंचालक डॉ. आदित्य आर्य यांनी केले. भीमसेन बस्सी यांच्याकडून आज सायंकाळी ताबा स्वीकारल्यानंतर ते पोलिस मुख्यालयात पत्रकारांशी बोलत होते.
‘‘गोवा ही माझी कर्मभूमी आहे. त्यामुळे येथील बरेच प्रश्‍न मला ठाऊक आहेत. गोव्यात १९८४ मध्ये पणजीत एका उच्चभ्रू घरातील तरुण ड्रग्जच्या आहारी गेल्याचे उदाहरण आपण पाहिलेले आहे. त्यावेळी मी पणजी उपविभागीय पोलिस अधीक्षक होतो’’, अशी माहिती डॉ. आर्य यांनी यावेळी दिली.
राजकीय नेत्यांवर ‘एफआयआर’ नोंदवण्यास उशीर होतो. प्रत्येक वेळी गुन्हा नोंद करण्यासाठी न्यायालयाच्या आदेशाची वाट पाहिली जाते, याकडे त्यांचे लक्ष वेधले असता, पोलिस फौजदारी कलम १५४ नुसार कोणत्याही तक्रारीवर गुन्हा नोंद केला पाहिजे, असे सांगून यापुढे ‘एफआयआर’ त्वरित नोंद केला जाईल, असे आश्‍वासनही त्यांनी यावेळी दिले. यावेळी त्यांच्यासोबत पोलिस उपमहानिरीक्षक रवींद्र यादव उपस्थित होते.

भारताकडून पाकिस्तानमधील ५० 'मोस्ट वॉन्टेड'ची यादी जाहीर

नवी दिल्ली, दि. ११ : अमेरिकेने 'ऑपरेशन ओसामा' यशस्वी केल्यानंतर भारतानेही पाकिस्तानात लपलेल्या अतिरेक्यांचा मागोवा घेण्यासाठी त्यांना हुडकून काढण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्यासाठी पहिले पाऊल म्हणून पाकमध्ये आश्रय घेतलेल्या ५० 'मोस्ट वॉन्टेड' गुन्हेगारांची यादी आज भारताने जाहीर केली.
या यादीत कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम, मुंबई हल्ल्याचा सूत्रधार आणि लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाङ्गीज सईद आणि अतिरेकी झकी उर रहमान लखवी यांचा समावेश आहे. मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्याला जबाबदार हाङ्गीज सईदचे नाव या यादीत आघाडीवर आहे. हाङ्गीजसह २००१ साली संसदेवर झालेल्या हल्ल्याला जबाबदार जैश ए मोहम्मद या अतिरेकी संघटनेचा नेता मौलाना मसूद अजहर याचा यादीत समावेश आहे. कंदहार विमान अपहरण प्रकरणी ओलिसांच्या बदल्यात अजहरची सुटका करण्यात आली होती.
या यादीतील अतिरेक्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत. हाङ्गीज मोहम्मद सईद, साजिद माजीद, सय्यद हाशीम अब्दुर रहमान पाशा, मेजर इक्बाल, इलियास काश्मिरी, राशीद अब्दुल्ला, मेजर समीर अली, दाऊद इब्राहिम, मेमन इब्राहिम, छोटा शकील, मेमन अब्दुल रज्जाक, अनिस इब्राहिम, अन्वर अहमद हाजी जमाल, मोहम्मद डोसा, जावेद चिकना, सलीम अब्दुल गाझी, रियाज खत्री, मुनाङ्ग हलरी, मोहम्मद सलीम मुजाहिद, खान बशीर अहमद, याकूब येडा खान, मोहम्मद मेमन, इरङ्गान चौगुले, ङ्गिरोझ रशीद खान, अली मुसा, सगीर अली शेख, आङ्गताब बत्की, मौलाना मोहम्मद मसूद अजहर, सलालुद्दीन, अझम चीमा, सय्यद झबीउद्दीन जाबी, इब्राहिम अथर, जावेद पटेल, अझर युसुङ्ग, झहूर इब्राहिम मिस्त्री, अख्तर सय्यद, मोहम्मद शकीर, रौङ्ग अब्दुल, अमानुल्ला खान, सुङ्गियान मुफ्ती, नाचन अकमल, पठाण याकूब खान, कम बशीर, लखबीर सिंग रोडे, परमजीतसिंग पामा, रणजीत सिंग, वाधवा सिंग, अबू हमजा, झकी उर रहमान लखवी, अमीर रझा खान.

अखेर देशप्रभूंवर ‘एफआयआर’ नोंद!

अनेक अधिकारी गोत्यात येणार
कोरगाव बेकायदा खाण प्रकरण
पणजी, दि. १० (प्रतिनिधी): कोरगाव पेडणे येथे सुमारे ५० कोटी रुपयांचे बेकायदा खनिज उत्खनन केल्याप्रकरणी अखेर आज राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे केंद्रीय सचिव जितेंद्र देशप्रभू यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार आणि फसवणुकीच्या कारणांवरून ‘एफआयआर’ नोंद करण्यात आला. त्याचप्रमाणे, खाण संचालक अरविंद लोलयेकर, वाहतूक खात्याचे संचालक अरुण देसाई, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सायमन डिसोझा, मुख्य वनपाल शशिकुमार, कोरगाव पंचायतीचे सरपंच व सचिवांच्या विरोधातही ‘एफआयआर’ नोंद करण्यात आला आहे.
भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा २१७, २१८, ४०५, ४०९, ४२०, ४६८, १२०(ब) तसेच अन्य कायद्यानुसार हा ‘एफआयआर’ नोंदवण्यात आला आहे. हे प्रकरण गुन्हा अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) सोपवण्यात आले असून याची चौकशी उपअधीक्षक चंद्रकांत साळगावकर करणार असल्याची माहिती मिळाली आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर आज सकाळी ‘सीआयडी’ विभागाने ‘एफआयआर’ नोंद केल्याने या विविध खात्यांतील कर्मचार्‍यांचेही धाबे दणाणले आहेत. बेकायदा खनिज उत्खनन सुरू असताना वरीलपैकी एकाही खात्याच्या अधिकार्‍यांनी यावर कारवाई का केली नाही, याची उत्तरे या अधिकार्‍यांना द्यावी लागणार आहे. तसेच, त्यांच्यावर लावण्यात आलेली काही कलमे दखलपात्र असल्याने त्यांना अटकही होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार खाण व वाहतूक खात्याच्या काही कर्मचार्‍यांनी वकिलांच्या भेटी घेण्यासही सुरुवात केली आहे.
कोणतेही परवाने न घेता संशयित गुन्हेगार जितेंद्र देशप्रभू यांनी खनिज उत्खनन केले आहे. त्यामुळे सरकारी तिजोरीला करोडो रुपयांचा फटका बसल्याचे या प्रकरणी केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. कोरगाव येथील सर्वे क्रमांक २९९/० मध्ये हे उत्खनन करण्यात आले आहे. तसेच, खनिजाची बेकायदा वाहतूकही करण्यात आली आहे. काशिनाथ शेटये, प्रदीप काकोडकर आणि डॉ. केतन गोवेकर यांनी केलेल्या तक्रारीवरून वरील संशयितांवर ‘एफआयआर’ नोंद झाला आहे.

मडकईकरांसाठी मुख्यमंत्र्यांची धडपड?

‘एचएसआरपी’ घोटाळ्याची फाईल पुन्हा ‘एजीं’कडे
पणजी, दि. १० (प्रतिनिधी): उच्च सुरक्षा क्रमांकपट्टी (एचएसआरपी) कंत्राटात झालेल्या कथित गैरव्यवहार प्रकरणी संबंधितांवर तात्काळ ‘एफआयआर’ नोंदवण्याच्या कायदा खात्याने शिफारस केली होती. मात्र, हे घोडे पुन्हा एकदा अडले आहे. कायदा खात्याच्या शिफारशीची ‘फाईल’ मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी ऍडव्होकेट जनरल सुबोध कंटक यांच्याकडे पाठवून तत्कालीन वाहतूकमंत्री पांडुरंग मडकईकर यांची या प्रकरणांतून सहीसलामत सुटका करून घेण्यासाठी धडपड चालवल्याची खात्रीलायक माहिती प्राप्त झाली आहे.
गत विधानसभा अधिवेशनात विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी ‘एचएसआरपी’ चा विषय उपस्थित करून सरकारला धारेवर धरल्यानंतर वाहतूकमंत्री सुदिन ढवळीकर यांनी कायदा खात्याचा सल्ला मागवून तात्काळ पुढील कारवाई करण्याचे आश्‍वासन सभागृहाला दिले होते. त्यानुसार ही फाईल कायदा खात्याकडे पाठवण्यात आली असता कायदा खात्याने चौकशी अहवालात नोंद झालेल्या गैरव्यवहार प्रकरणी ‘एफआयआर’ नोंदवून चौकशी करण्याची शिफारस केली होती.
दरम्यान, सदर कंत्राट प्रकरणातील निविदा चिकित्सा समितीचे अध्यक्षपद हे खुद्द तत्कालीन वाहतूकमंत्री पांडुरंग मडकईकर यांच्याकडेच होते व त्यामुळे कायदा खात्याच्या शिफारशीवरून पोलिसांना श्री. मडकईकर यांच्याविरोधात ‘एफआयआर’ नोंदवणे भाग पडणार होते. कायदा खात्याच्या शिफारशीची ही ‘फाईल’ मुख्य सचिवांकडे पोहोचली असता त्यांनी ती मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्याकडे अंतिम निर्णयासाठी पाठवली होती. श्री. मडकईकर यांनी मुख्यमंत्री कामत यांना आर्जव करून आपल्याला या प्रकरणातून सुटका करून घेण्याचा तगादा लावल्याने आता ही ‘फाईल’ ऍडव्होकेट जनरल सुबोध कंटक यांच्याकडे पाठवण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणी सुरू असलेल्या वेळकाढू धोरणाचा अंदाज घेता सरकार ‘एफआयआर’ नोंदवण्यास इच्छुक नसल्याचेच स्पष्ट झाले आहे. दरम्यान, सरकार या प्रकरणी कारवाई करण्यास चालढकल करीत असेल तर आपण फौजदारी खटला दाखल करू, असा इशारा विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी दिल्याने आता या प्रकरणी श्री. मडकईकर आपली सुटका कशी काय करून घेतात याकडे अनेकांचे लक्ष लागून आहे.
--------------------------------------------------------
‘फाईल’ मिळाल्यावर कारवाई करू : सुदिन
‘एचएसआरपी’ प्रकरणाची सदर ‘फाईल’ वाहतूक खात्याकडे आल्यानंतरच त्यात केलेल्या शिफारशीनुसार कारवाई करू, अशी माहिती वाहतूकमंत्री सुदिन ढवळीकर यांनी ‘गोवादूत’शी बोलताना दिली. ही ‘फाईल’ सध्या ऍडव्होकेट जनरलांकडे सल्ल्यासाठी पाठवण्यात आल्याचे आपल्याला समजले असून त्यात नेमकी कोणती शिफारस करण्यात येते, यावरूनच पुढील कारवाईची दिशा ठरणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

ममता ते जयललिता... नव्या सत्ताबदलांचे संकेत!

पाच राज्यांतील निवडणुका - निकालपूर्व सर्वेक्षणातील निष्कर्ष
नवी दिल्ली, दि. १० : पाच राज्यांतील मतदान आज पूर्ण होताक्षणीच निकालांचे अंदाज वर्तविणार्‍या सर्वेक्षणांचा अक्षरश: महापूर आला. विविध वृत्तवाहिन्या आणि संस्थांनी केलेल्या सर्वेक्षणाने पश्‍चिम बंगाल आणि केरळसारख्या राज्यात सत्ताबदलाचे स्पष्ट संकेत दिले असून ममता आणि जयललिता यांच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाल्याचे विशेषत्वाने नमूद केले आहे.
बंगालात, केरळात ‘लाल’ किल्ल्याला सुरुंग?
पश्‍चिम बंगालमध्ये गेल्या ३४ वर्षांपासून डाव्यांचे सरकार आपला एकछत्री अंमल ठेवून होते. आता मात्र त्यांच्या या मजबूत ‘लाल’ किल्ल्याला ममता बॅनर्जी नावाच्या तोङ्गेने सुरुंग लावला असून निकालपूर्व सर्वेक्षणांचे जवळपास सर्व निष्कर्ष ममतांच्याच बाजूने जाताना दिसत आहेत. स्टार न्यूज-निल्सन यांच्या सर्वेक्षणानुसार पश्‍चिम बंगालमधील एकूण २९४ जागांपैकी कॉंग्रेस-तृणमूल आघाडीला २२१ तर डाव्यांना ६२ जागा मिळण्याची शक्यता आहे. यावेळी भाजपदेखील बंगालमध्ये खाते उघडण्यात यशस्वी ठरण्याची शक्यता असून त्यांना किमान २ जागा मिळू शकतात. इतर पक्षांना ९ जागा मिळण्याची शक्यता आहे.
आजतक-ओआरजीच्या सर्वेक्षणानुसार, कॉंग्रेस-तृणमूल आघाडीला २१० ते २२०, डाव्यांना ६५ ते ७० जागा मिळू शकतात. यावेळी ममता बॅनजींंना ४८ टक्के पसंतीची मते मिळण्याचा अंदाज या सर्वेक्षणाने वर्तविला आहे. न्यूज २४-चाणक्य यांनीही ममता बॅनर्जी २३० जागा मिळवून दोन तृतीयांश बहुमत अगदी सहज मिळवतील, असा अंदाज वर्तविला आहे.
दरम्यान, केरळमध्ये युडीएङ्गचे पारडे यावेळी जड दिसत असून त्यांना निर्विवाद सत्ता मिळणारच, असे सांगितले जात आहे.
स्टार निल्सनने युडीएङ्गला ८८ तर एलडीएङ्गला ४९ जागा मिळणार असल्याचे म्हटले आहे. आजतक-ओआरजीने युडीएङ्गला ८५ ते ९२, एलडीएङ्गला ४५ ते ५२ जागा मिळणार असा अंदाज वर्तविला आहे. हेडलाईन्स टूडे यांनी युडीएङ्गला ९३ तर एलडीएङ्गला ४४ जागा मिळणार असे म्हटले आहे.
तामिळनाडूत जयललितांचा डंका?
तामिळनाडू या राज्याविषयीचे निष्कर्ष संमिश्र स्वरूपाचे आहेत. या ठिकाणी द्रमुक आणि अण्णाद्रमुक अशी थेट लढत होती. त्यात कुठे द्रमुकचे तर कुठे अण्णाद्रमुकचे पारडे जड दिसत आहे.
या राज्यात एकूण २३४ जागांसाठी मतदान घेण्यात आले. स्टार-निल्सनच्या सर्वेक्षणाने जयललितांना सर्वाधिक पसंतीची मते मिळण्याची शक्यता व्यक्त करीत एकूण १०५ च्या आसपास जागा मिळणार, असे म्हटले आहे. याउलट, सत्ताधारी द्रमुक-कॉंग्रेस आघाडीला ७० जागांवर समाधान मानावे लागले. इतर पक्ष ५९ जागा पटकावतील.
आजतक-ओआरजीने मात्र द्रमुकच्या बाजूने कौल दिला असून त्यांना ११५ ते १३० जागा मिळण्याचा अंदाज वर्तविला आहे. अण्णाद्रमुकला १०५ ते १२० जागा मिळण्याची शक्यता आहे. हेडलाईन्स टूडे यांच्या सर्वेक्षणानुसार, तामिळनाडूमध्ये पुन्हा द्रमुकच सत्तेवर येण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यांच्या मते टूजी स्पेक्ट्रम, कानिमोझीचे त्यात अडकणे याचा कोणताही परिणाम निकालांवर दिसणार नाही.
आसाममध्ये त्रिशंकू अवस्था!
आसाममध्ये मात्र जनता अजूनही संभ्रमात असून तेथे त्रिशंकू विधानसभेची चिन्हे दिसत आहेत. त्या ठिकाणी गोगोई लोकप्रिय असले तरी यावेळी त्यांच्या लोकप्रियतेसोबतच सत्ताधारी कॉंग्रेसला इतर पक्षांची सरकार स्थापनेसाठी मदत घ्यावी लागते की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे.
न्यूज २४-चाणक्य यांनी आसाममध्ये कॉंग्रेसला १२६ पैकी ६०, आसाम गण परिषदेला (आगप) २० तर भाजपला ८ जागा मिळण्याची शक्यता वर्तविली आहे. आाजतक - ओआरजीने कॉंग्रेसला ४१ ते ४७ तर अगगपला ३१ ते ३५ जागा मिळण्याची शक्यता व्यक्त केली आहे. हेडलाईन्स टूडेने कॉंग्रेसला ४४, भाजपला १७ तर आगपला ३३ जागा मिळण्याचा अंदाज वर्तविला आहे. पुडुचेरी या राज्याविषयीचे सर्वेक्षणाचे निष्कर्ष मात्र उपलब्ध झाले नव्हते.

आग्नेल फर्नांडिस विरोधी तपासाची ‘फाईल’ बंद!

आश्‍वे भूखंड घोटाळा प्रकरण
पणजी, दि. १० (प्रतिनिधी): आश्‍वे भूखंड घोटाळा प्रकरणी निलंबित झालेले उपजिल्हाधिकारी आग्नेल फर्नांडिस यांच्याविरुद्ध सुरू असलेल्या तपासाची ‘फाईल’ बंद करण्यात आली आहे. राज्यपालांच्या शिफारशीनंतर त्यांच्यावर झालेले आरोप मागे घेण्यात आले असून यापुढे अशी पुन्हा चूक करू नये, अशीही तंबी त्यांना देण्यात आल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
गत लोकसभा निवडणुकांदरम्यान झालेल्या बदल्यांच्या वेळी घाईगडबडीत २ लाख २५ हजार ४३४ चौरस मीटर सरकारी जागा एका खाजगी व्यक्तीच्या नावावर करण्याचा निवाडा दिल्याने सरकारने या प्रकरणाची दखल घेऊन २००९ मध्ये श्री. फर्नांडिस यांना सेवेतून निलंबित केले होते. त्यानंतर त्यांच्याविरुद्ध खात्याअंतर्गत करण्यात आलेल्या चौकशीत यात गैरप्रकारही आढळून आला होता. तरीही, त्यांच्याविरुद्ध सुरू असलेल्या चौकशीची ‘फाईल’ बंद करण्यात आल्याने आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
----------------------------------------------------------------
घोळात घोळ...!
दरम्यान, आपण दिलेला निवाडा योग्य असल्याचे प्रशासकीय न्यायालयाने दिलेल्या आदेशातही म्हटले आहे असा दावा करून श्री. फर्नांडिस यांनी सरकारच्या निलंबनाला आव्हान दिले होते. मात्र, प्रशासकीय लवादाच्या त्या निवाड्यालाही सरकारने आता आव्हान दिल्याची माहिती सूत्रांकडून उपलब्ध झाली आहे. एका बाजूने सरकारकडून ही फाईल बंद केली जाते आणि दुसर्‍या बाजूने लवादाच्या निवाड्याला आव्हान दिले जाते, हा सर्व काय घोळ आहे याचा उलगडा अनेकांना झालेला नाही.

अण्णा हजारे शुक्रवारी गोव्यात संध्याकाळी आझाद मैदानावर सभा

किरण बेदी, अग्निवेश, केजरीवाल,
मनीष सिसोदिया यांचाही सहभाग

पणजी, दि. १० (प्रतिनिधी): भ्रष्टाचार विरोधी चळवळीतील ज्येष्ठ नेते अण्णा हजारे यांचे १३ मे रोजीचे गोव्यातील आगमन निश्‍चित झाले असून त्यांच्या आगमनाच्या बातमीमुळे कार्यकर्त्यांमधील उत्साह द्विगुणित झाला आहे. अण्णांचे आगमन १३ रोजी दुपारी होणार असून त्याच दिवशी सायंकाळी ५ वाजता पणजीतील आझाद मैदानावर त्यांची विराट सभा होणार आहे. ‘इंडिया अगेन्स्ट करप्शन’चे कार्यकर्ते ऍड. सतीश सोनक यांनी ही माहिती दिली. पणजी व मडगाव येथे या आंदोलनाच्या सभाहोणार आहेत.
गोव्यातील १३ मे रोजी होणार्‍या पणजी येथील जाहीर सभेत भाग घेण्यासाठी अण्णांसोबत अरविंद केजरीवाल, स्वामी अग्निवेश, श्रीमती किरण बेदी व मनीष सिसोदिया हे नेतेही येणार आहेत. याच दिवशी सकाळी १०.३० वाजता मडगाव येथील रवींद्र भवन येथे होणार्‍या जाहीर सभेत स्वामी अग्निवेश, तसेच अरविंद केजरीवाल हे प्रमुख वक्ते असतील. दुपारी ३ वाजता नवेवाडे, वास्को येथील संतोषी मातेच्या मंदिरात होणार्‍या सभेत किरण बेदी व मनीष सिसोदिया हे भाग घेतील. ‘इंडिया अगेन्स्ट करप्शन’ या मोहिमेअंतर्गत या सभांचे आयोजन करण्यात आले आहे.
जनलोकपाल विधेयकास पाठिंबा, गोव्यात तात्काळ लोकायुक्त नेमण्याची गरज आणि भ्रष्टाचारास कडाडून विरोध या मुद्द्यांवर सभांमध्ये सामान्यांचा आवाज बुलंद होणार आहे. या सभांना गोव्यातील विविध समाजसेवी संघटना, संस्था, कार्यकर्ते यांचा सक्रिय पाठिंबा आहे. ही चळवळ कोणत्याही विशिष्ट राजकीय पक्षाशी संबंधित नसून राष्ट्रीय प्रश्‍नांवर नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने दिलेले योगदान, असे या कार्यक्रमाचे स्वरूप आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून हा उपक्रम यशस्वी करावा व गोव्याला भ्रष्टाचारविरोधी चळवळीच्या मुख्य प्रवाहात आणावे, असे आयोजकांनी आवाहनकेले आहे.

शिक्षणखात्याच्या निर्णयावर कार्यवाही करणे कठीण

मुख्याध्यापक संघटनेची नाराजी
पणजी, दि. १० (प्रतिनिधी): पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचे परिपत्रक शिक्षण खात्याने अत्यंत घिसाडघाईने जारी केले आहे. या परिपत्रकात या निर्णयाची कार्यवाही करण्याबाबतचे कोणतेच ठोस निकष किंवा नियमावली देण्यात आली नसल्याने त्याची कार्यवाही करणे कठीण बनल्याचे अखिल गोवा मुख्याध्यापक संघटनेतर्फे सांगण्यात आले.
अखिल गोवा मुख्याध्यापक संघटनेची आज तातडीची बैठक पणजी येथे बोलावण्यात आली. नव्या शिक्षण हक्क कायद्यानुसार अलीकडेच शिक्षण खात्यातर्फे एक परिपत्रक जारी करण्यात आले. या परिपत्रकांत शिक्षण हक्क कायद्याच्या कलम १६ नुसार पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यात यावे, असे म्हटले आहे. आता निकाल जाहीर होऊन प्रवेशप्रक्रिया सुरू झाली असताना अचानक हे परिपत्रक जारी करून सरकारने शैक्षणिक संस्थांना बुचकळ्यात टाकले आहे, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष संजीव सावंत यांनी दिली. संघटनेतर्फे येत्या १३ मे रोजी कार्यकारिणी बैठक व १६ मे रोजी संघटनेची सर्वसाधारण बैठक बोलावली असून त्यात या विषयावर सखोल चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी घोषित केले.
नव्या शिक्षण हक्क कायद्याची अंमलबजावणी करण्यास संघटनेची हरकत नाही. परंतु, सरकार ज्या पद्धतीने त्याची अंमलबजावणी करू पाहत आहे ती पद्धतच मुळी चुकीची व घिसाडघाईची असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करा, असे परिपत्रकात म्हटले आहे खरे; पण नापास विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने उत्तीर्ण करावे हे मात्र या परिपत्रकात सांगण्यात आलेले नाही. यापूर्वी संघटनेची बैठक १५ एप्रिल २०११ रोजी झाली होती व त्यात सरकारला याबाबतीत २३ एप्रिल २०११ पर्यंत निर्णय घेण्याची मुदत दिली होती. पण सरकारकडून त्यावेळी कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. फोंडा शाळा समूहाचे अध्यक्ष दामोदर फडते यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी शिक्षण खात्याला पत्र पाठवून एप्रिल ५ पर्यंत भूमिका स्पष्ट करण्यास सांगितले होते, पण त्याचे काहीच उत्तर आले नाही. सरकारच्या या भूमिकेमुळे नियमित पद्धतीप्रमाणे शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर केले. नियोजनाअभावी ऐनवेळी परिपत्रक जारी करून या निर्णयाची अंमलबजावणी करा, असे सांगण्याची शिक्षण खात्याची पद्धतच मुळी चुकीची असल्याचा ठपकाही या बैठकीत ठेवण्यात आला.

मडगावात ७ लाखांची चोरी, मोलकरणींना अटक

मडगाव, दि. १० (प्रतिनिधी): कोंबवाडा येथील सुदिन नायक यांच्या घरातून सात लाखांचे दागिने चोरीस गेले असून या प्रकरणी त्यांनी दोघा मोलकरणींवर संशय व्यक्त केला आहे. त्यांनी नोंदविलेल्या तक्रारीनुसार ६ ते ८ मे दरम्यान ही चोरी झालेली आहे. मंगला बोले व मोनिका फर्नांडिस अशी सदर मोलकरणींची नावे असून पोलिसांनी त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदविला आहे. रात्री उशिरा मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी त्यांना अटकही केली आहे. ७ हिरे असलेली कर्णफुले (रु. ५ लाख) व दोन हार (रु. २ लाख) असे दागिने चोरीस गेले आहेत. पोलिस तपास चालू आहे.
दरम्यान चांदर येथील अडीच लाखांच्या चोरी प्रकरणी मायणा - कुडतरी पोलिसांनी इम्तियाज शेख याला अटक केली आहे.

राज्यातील पारा चढतोच आहे...

७ जूनपर्यंत वरुणराजाचे आगमन
पणजी, दि. १० (प्रतिनिधी): राज्यात उष्णतेचा पारा चढत चालला असून येत्या ३१ मे पर्यंत लोकांच्या जिवाची काहिली होणार आहे, असा अंदाज गोवा हवामान प्रयोगशाळेचे प्रमुख के. व्ही. सिंग यांनी व्यक्त केला आहे. गेल्या दहा दिवसांत हा पारा ३४.८ अंशापर्यंत चढला असून तो अजूनही वर जाणार असल्याचे श्री. सिंग यांनी सांगितले. दरम्यान, सध्या तरी पावसाची कोणतीही लक्षणे दिसत नसून येत्या २० मे नंतरच मान्सूनचे चित्र स्पष्ट होणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
गोव्याच्या काही भागांत उष्म्यामुळे लोक हैराण झाले आहेत. शहरी भागातील नागरिक शरीराला आराम पडावा म्हणून आइस्क्रीम पार्लर, कोल्डड्रिंक पार्लरचा आधार घेताना दिसत आहेत. पर्यटन हंगाम संपल्यातच जमा असल्याने समुद्रकिनार्‍यांवर आता पाण्यात डुंबण्यासाठी स्थानिक लोकांची गर्दी दिसू लागली आहे. लहान मुले व तरुणाई आपापल्या भागातील नद्यांत मनसोक्त जलविहार करताना दृष्टीस पडते आहे.
श्री. सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या २० मे पर्यंत अंदमान समुद्रात मान्सूनचे ढग एकत्र येणार आहे. त्यानंतर मान्सून केरळ किनारपट्टीत येतो. केरळ ते गोवा असा प्रवास करण्यासाठी मान्सूनला किमान सहा दिवसांचा कालावधी लागतो. दरम्यान, आत्तापर्यंतच्या अंदाजानुसार ६ ते ७ जून पर्यंत मान्सूनचे गोव्यात आगमन होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. मात्र, ३१ मे पर्यंत मान्सूनपूर्व पाऊस सुरू होणार असल्याचेही ते म्हणाले. गेल्या वर्षी ३१ मे पर्यंत मान्सूनपूर्व पावसाचे आगमन झाले होते.

Tuesday, 10 May 2011

अयोध्येत पुन्हा ‘जैसे थे’

हायकोर्टाच्या आदेशाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती
नवी दिल्ली, द. ९ : अयोध्येतील रामजन्मभूमी-बाबरी मशीद जागेच्या त्रिभाजनाची मागणी कोणीच केली नसतानाही या जागेचे त्रिभाजन करण्याचा अलाहाबाद उच्च न्यायालयाचा आदेश निराशा करणारा आणि आश्‍चर्यकारक असाच आहे, असा निर्वाळा देत, अयोध्येत १९९३ प्रमाणेच ‘जैसे थे’ स्थिती कायम राखण्यात यावी, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने आज दिला. सोबतच, हायकोर्टाच्या गेल्या वर्षीच्या ३० सप्टेंबर रोजीच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगितीही दिली.
न्यायमूर्ती आङ्गताब आलम आणि न्या. आर. एम. लोधा यांच्या खंडपीठाने, हायकोर्टाचा आदेश आश्‍चर्यकारक असून, काही प्रमाणात गोंधळ निर्माण करणाराही आहे, असे स्पष्ट करीत, या वादाशी संबंधित कोणत्याही पक्षकाराने मागणी केली नसतानाही हायकोर्टाने मात्र या जागेचे त्रिभाजन करून टाकले, यावर नाराजी व्यक्त केली.
त्या ६७ एकर जागेवर पुढील आदेशापर्यंत कुठलेही धार्मिक कार्य होणार नाही, असे निर्देश देतानाच १९९३ प्रमाणेच ‘जैसे थे’चे आदेश येथे पुन्हा एकदा कायम राखण्यात यावे, असा आदेश न्यायालयाने दिला. तथापि, या जागेत श्रीरामाचे जे तात्पुरते मंदिर आहे, तिथे हायकोर्टाच्या आदेशानुसार पूजा करण्याची परवानगी राहील, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.
अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने गेल्या वर्षी ३० सप्टेंबर रोजी अयोध्येतील या जागेचे मुस्लिम, हिंदू आणि निर्मोही आखाडा यांच्यात तीन भागात विभाजन करण्याचे आदेश दिले होते.
या तिघांपैकी कोणीही जागेचे त्रिभाजन करण्याची मागणी केली नव्हती. तरी सुद्धा हायकोर्टाने स्वत:च्याच इच्छेने त्रिभाजनाचा अङ्गलातून आदेश दिला. हा आदेश गोंधळाची स्थिती निर्माण करणारा असल्याने तो कार्यान्वित करता येणे शक्य नाही. आम्ही यावर स्थगिती देत आहोत, असे न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे.
हायकोर्टाच्या आदेशात आता अतिशय बिकट स्थिती निर्माण झालेली आहे. या जागेशी संबंधित तिन्ही पक्षकारांनी वादग्रस्त जागेच्या केवळ २.७७ एकर जागेसाठीच याचिका दाखल केली असली तरी, आम्ही संपूर्ण ६७ एकर जागेसाठी ‘जैसे थे’चे आदेश देत आहोत.
अलाहाबाद हायकोर्टाच्या आदेशाला निर्मोही आखाडा, अखिल भारतीय हिंदू महासभा, जमात अलामा-ए-हिंद आणि सुन्नी वक्ङ्ग बोर्ड तसेच भगवान राम विराजमान आदी संघटनांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. हायकोर्टाचा निकाल केवळ श्रद्धेवर आधारित होता, पुराव्यांचा त्यात अभाव होता. त्यामुळे हा आदेश रद्द करण्यात यावा, अशी विनंती या संघटनांनी केली होती.
--------------------------------------------------------
सर्व पक्षांकडून निकालाचे स्वागत
अयोध्येतील रामजन्मभूमी-बाबरी मशीद जागेच्या त्रिभाजनाचा अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशावर स्थगिती देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे अयोध्या वादाशी संबंधित सर्वच पक्षांनी स्वागत केले. न्यायालयाचा निकाल समाधानकारक असल्याचे या पक्षांनी म्हटले आहे.

एफआयआर नोंदवण्यास विलंब का?

जितेंद्र देशप्रभू प्रकरणी आर्लेकरांचा सवाल
पणजी, दि. ९ (प्रतिनिधी): पेडणे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकार्‍यांनी आदेश देऊनही पोलिसांकडून बेकायदा खाण प्रकरणी माजी आमदार जितेंद्र देशप्रभू तसेच अन्य सरकारी अधिकारी व कंत्राटदाराविरोधात ‘एफआयआर’ नोंदवण्यास चालढकलपणा का केला जातो आहे? यात कुणाचे हितसंबंध गुंतलेले आहेत, असे सवाल भाजप प्रवक्ते राजेंद्र आर्लेकर यांनी उपस्थित केले. या सरकारला न्यायालयाचीही कदर नसल्याचेच या कृतीवरून स्पष्ट होते, असा टोलाही त्यांनी यावेळी हाणला.
आज इथे बोलावण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत श्री. आर्लेकर बोलत होते. राज्यात कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती अत्यंत बिकट बनली आहे. सामान्य लोकांना बारीकसारीक गोष्टींसाठी न्यायालयाचे दरवाजे ठोठावावे लागतात. एखाद्या बेकायदा प्रकरणी पोलिसांकडून ‘एफआयआर’ नोंदवून घेण्यासही नकार दर्शवला जात असल्याने राज्यात अराजकच माजले आहे की काय, असा सवालही त्यांनी केला. दरम्यान, पेडणेचे आमदार दयानंद सोपटे यांनी या प्रकरणी चौकशी केली असता पेडणेचे पोलिस निरीक्षक रजेवर गेल्याची माहिती मिळाल्याचे श्री. आर्लेकर म्हणाले. या पोलिस स्थानकावरील अन्य पोलिस साहाय्यक निरीक्षक शिरगाव जत्रोत्सवासाठी गेले आहेत तर अन्य पोलिस साहाय्यक निरीक्षक मुख्यमंत्र्यांच्या लग्नाच्या बंदोबस्तासाठी गेल्याचीही माहिती मिळाल्याचे ते म्हणाले.
कोरगाव येथील बेकायदा खाण व्यवसायात माजी आमदार तथा राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सचिव जितेंद्र देशप्रभू हे गुंतले आहेत. यापूर्वी खाण खात्याकडून त्यांना १.७२ कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे व या दंडाच्या वसुलीची माहितीही देण्यास सरकार राजी नाही. या बेकायदा खनिज वाहतुकीचे कंत्राट गृहमंत्र्यांच्या एका नातेवाइकाला देण्यात आल्याचीही चर्चा आहे. याच कारणामुळे पोलिसांकडून ‘एफआयआर’ नोंद करून घेण्यास नकार दर्शवला जातो आहे की काय, असा प्रश्‍नही त्यांनी विचारला.
कोरगावात सुरू असलेली खाण बेकायदा असल्याचे सरकारने मान्य करूनही याठिकाणी खनिज उत्खनन सुरू आहे. या परिसरात खनिज व्यवसायाला लागणारी यंत्रसामग्रीही ठेवण्यात आल्याची माहिती असून ती ताबडतोब जप्त करण्याची मागणीही यावेळी श्री. आर्लेकर यांनी केली. श्री. देशप्रभू यांची कायद्यालाही न जुमानणारी ही प्रवृत्ती वरिष्ठ नेत्यांच्या कृपाशीर्वादाशिवाय असू शकत नाही, असेही श्री. आर्लेकर म्हणाले. हा एकूण प्रकार म्हणजे राज्यातील कायदा सुव्यवस्थेची झालेली दयनीय अवस्थाच दर्शवते, असा टोलाही यावेळी श्री. आर्लेकर यांनी हाणला.

खाणप्रश्‍नी सरकार गंभीर पेचात

पीएसीच्या निर्देशांची पूर्तता कशी करावी?
पणजी, दि. ९ (प्रतिनिधी): लोक लेखा समिती (पीएसी)ने बेकायदा खाण व बेदरकार खनिज वाहतुकीबाबत दिलेल्या निर्देशांची पूर्तता कशी करावी या गंभीर विवंचनेत सरकार सापडले आहे. उद्या १० मे पासून या निर्देशांची कार्यवाही करण्याचे स्पष्ट आदेश ‘पीएसी’ने दिले असले तरी खाण कंपनी व खनिज वाहतूकदारांकडून अजिबात प्रतिसाद मिळत नसल्याने ही कारवाई रखडण्याचीच शक्यता आहे.
‘पीएसी’ च्या निर्देशांबाबत चर्चा करण्यासाठी आज पर्वरी सचिवालयात उच्चस्तरीय बैठक झाली. या निर्देशांची कार्यवाही करण्याची जबाबदारी मुख्य सचिव संजय श्रीवास्तव यांनी आपल्या खांद्यावर घेतल्याने त्यांनी ही बैठक बोलावली होती. या बैठकीला खाण खात्याचे संचालक अरविंद लोलयेकर, वाहतूक संचालक अरुण देसाई, प्रधान वनपाल शशीकुमार, जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक तसेच खाण कंपनीचे प्रतिनिधी हजर होते. दरम्यान, खाण खात्याने जारी केलेल्या आदेशांची पहिल्या टप्प्यात सांगे व केपे तालुक्यांत कार्यवाही करण्याचे ठरले आहे. कावरे भागांत सध्या तीन खाणी सुरू आहेत. खनिज वाहतुकीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रत्येक खाण कंपनीला आठवड्यातील दोन दिवस खनिज वाहतूक करण्याची परवानगी देण्याचे ठरले आहे. या आदेशानुसार प्रत्येक दिवशी किमान ६०० खनिज ट्रक वाहतूक करू शकतील. खनिज ट्रकांना यापूर्वीच गती व इतर आवश्यक अटी घालून दिल्याने वाहतुकीची कोंडी आटोक्यात येणे शक्य आहे, असे मत या बैठकीत व्यक्त करण्यात आले. या प्रस्तावाबाबत खाण कंपनीने आपली भूमिका कळवण्यासाठी १२ मेपर्यंतची मुदत मागितली आहे. खनिज वाहतूकदारांनीही या निर्णयाबाबत आपली संमती दर्शवली नसल्याचीही खबर आहे. दरम्यान, खाण खात्याने तयार केलेल्या आराखड्यानुसार ही पद्धत लागू झाल्यास प्रत्येक ट्रकाला आठवड्यात किमान तीन फेर्‍या मिळतील, असेही यावेळी सांगण्यात आले. कोळंब ते तिळामळ या भागांत सध्या ११ खाणी सुरू आहेत तर मायणा - कावरे ते सावर्डे या भागांत ३ खाणी सुरू आहेत.
खनिज ट्रकांची खाण खात्याकडे नोंदणी करण्याबाबतचा निर्णय सध्या लांबणीवर टाकण्यात आल्याचीही खबर आहे. खनिज ट्रकांसाठी पासेस तयार करण्यात आले आहेत व ते वितरित करण्यासंबंधीची प्रक्रियाही तयार करण्यात आली आहे.
सरकारी यंत्रणांचे वेळकाढू धोरण
दरम्यान, मान्सूनच्या आगमनामुळे खनिज निर्यातीवर निर्बंध येणार असल्याने मे अखेरपर्यंत जास्तीत जास्त माल निर्यात करण्याची स्पर्धा सध्या सुरू आहे. प्राप्त माहितीनुसार, २२ मे पासून खनिज वाहतुकीवर निर्बंध घालण्याचा निर्णय बंदर कप्तान खात्याने निश्‍चित केल्याने ‘पीएसी’ च्या निर्देशांच्या कार्यवाहीबाबत सरकारकडून वेळकाढू धोरण अवलंबिले जात असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे. पुढील महिन्यापासून खनिज वाहतूक बंद होणार असल्याने केवळ वेळ मारून उर्वरित दिवसांत जास्तीत जास्त खनिज वाहतूक करण्याचाच खाण कंपन्यांचा बेत असल्याची माहितीही समोर आली आहे.
----------------------------------------------------------------------
सीआयडी ‘एफआयआर’ नोंदवणार
दरम्यान, रात्री उशिरा मिळालेल्या माहितीनुसार, जितेंद्र देशप्रभू यांच्यावर ‘एफआयआर’ नोंद करण्याचे आदेश गुन्हा अन्वेषण विभाग (सीआयडी)ला देण्यात आले आहेत. श्री. देशप्रभू यांच्यासह खाण खात्याच्या आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांवर दक्षता विभाग, सीआयडी व पोलिस विभाग यांपैकी कोणी ‘एफआयआर’ नोंद करावा याविषयी आज उशिरापर्यंत चर्चा सुरू होती. अखेर सीआयडीने या प्रकरणाचा तपास करावा, असा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. उद्या दि. १० रोजी सकाळपर्यंत त्यांच्याविरुद्ध ‘एफआयआर’ नोंदवला जाणार आहे.
न्यायालयाच्या आदेशाची प्रत हाती येताच २४ तासांत गुन्हा नोंद करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. तसेच, गुन्हा नोंद केल्यानंतर पंधरा दिवसांच्या कालावधीत तपासाचा अहवाल न्यायालयात सादर करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.

लईराई जत्रोत्सव उत्साहात

कौलोत्सवास प्रारंभ - भाविकांची अलोट गर्दी
पणजी, दि. ९ (प्रतिनिधी): शिरगाव येथील प्रसिद्ध श्री लईराई देवीचा वार्षिक जत्रोत्सव काल दि. ८ मे रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी व्रतस्थ भक्तांबरोबरच (धोंड) भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती.
काल पहाटे ५ वाजल्यापासून आज उशिरापर्यंत लाखो भाविकांनी रांगेत उभे राहून देवीचे दर्शन घेतले. आज पहाटे होमकुंडातून अग्निदिव्य केल्यानंतर धोंडांनी आपले एका महिन्याचे व्रत सोडले. दरम्यान, जत्रोत्सवाच्या सांगतेबरोबरच आजपासून देवीच्या कौलोत्सवाला प्रारंभ झाला. देवीचा कळस येत्या चार दिवसांत शिरगावात घरोघरी फिरणार असून भाविकांना देवीचा कौल मिळणार आहे. त्यासाठी आज भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती. कौलोत्सवात मोगर्‍याच्या फुलांपासून बनविलेल्या माळांना बरीच मागणी असल्याने अस्नोडा व शिरगाव येथे शेकडो विक्रेते रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून या फुलांची विक्री करीत आहेत. कौलोत्सवाची सांगता १२ मे रोजी होणार आहे.

माहिती हक्क कायद्याचा नगर नियोजनाला दणका

कुचराई केल्यामुळे दहा हजारांचा दंड
पणजी, दि. ९ (प्रतिनिधी): आपल्याच कार्यालयातील कर्मचार्‍यांनी मागितलेली माहिती देण्यास नकार देणार्‍या नगर नियोजन खात्याला १० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. माहिती आयुक्त मोतीलाल केणी यांनी या विषयीचा आदेश दिला आहे. हा दंड केवळ १९ पैकी दोन कर्मचार्‍यांच्या अर्जावर दिला असून याप्रमाणे सुमारे ९५ हजार रुपयांचा दंड नगर नियोजन खात्याला भरावा लागण्याची शक्यता आहे. तसेच, माहिती देण्यात कुचराई करणार्‍या अधिकार्‍याचा शोध लावून या दंडाची रक्कम त्याच्याकडूनच वसूल करण्यात यावी, अशी सूचनाही मुख्य नगर नियोजकाला करण्यात आली आहे.
एका वर्षापूर्वी नगर नियोजन खात्यात नोकरी करणार्‍या सुमारे १९ ‘ड्राफ्टमन’नी या खात्यात किती पदे रिक्त आहेत, खात्याअंतर्गत बढती देणार्‍या समितीने कोणत्या शिफारशी केलेल्या आहेत, आदी अनेक विषयांची माहिती माहिती हक्क कायद्यानुसार आपल्याच कार्यालयाकडून मागवली होती. त्यावेळी नगर नियोजन खात्यात माहिती अधिकारी म्हणून सुभाष निलगणी यांच्याकडे जबाबदारी होती. त्यांनी वेगवेगळी कारणे देऊन ही माहिती देण्यात चालढकल केली. त्यामुळे सदर कर्मचार्‍यांनी पहिल्या अधिकारिणीकडे याला आव्हान दिले. अधिकारिणीतर्फे या कर्मचार्‍यांना माहिती देण्याची सूचना सदर अधिकार्‍याला करण्यात आली. तरीही त्यांना ती उपलब्ध करून दिली गेली नाही. त्यामुळे या १९ कर्मचार्‍यांनी माहिती आयुक्तालयात याचिका सादर करून माहिती मागितली. त्याला अनुसरून, एक वर्ष उलटूनही माहिती देण्यात कुचराई केल्यामुळे आयुक्तांनी या खात्याला दंड ठोठावला आहे. प्रत्येक याचिकादाराच्या याचिकेवर पाच हजार रुपये दंड याप्रमाणे हा दंड ठोठावण्यात आला असून या हिशेबाने नगर नियोजन खात्याला ९५ हजारांपर्यंत दंड भरावा लागू शकतो. तसे झाल्यास आत्तापर्यंतचा हा सर्वांत मोठा दंड ठरणार आहे. शिवाय दंडाची ही रक्कम कुचराई करणार्‍या अधिकार्‍याकडून वसूल करून घेतली जाण्याचीही शक्यता आहे.

भूसंपादनात जमीनमालकांना योग्य दर द्या!

कायदा आयोगाची सरकारला शिफारस
अंमलबजावणीचे औचित्य सरकार दाखवेल काय?

पणजी, दि.९ (प्रतिनिधी): राज्यात एखाद्या सरकारी प्रकल्पासाठी भूसंपादन करताना संबंधित जमीनमालकांना बाजार भावाप्रमाणे रक्कम दिली जावी, एखाद्या प्रकल्पासाठी त्याची शेती गेल्यास त्याच प्रकारची शेती त्याला इतरत्र उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जावा, घर जात असल्यास दुसर्‍या घरासाठी योग्य ती जागा देण्यात यावी; त्याचप्रमाणे जमीन, घर किंवा शेती गेलेल्यांना सरकारी नोकरीत सामावून घेण्यात यावे, अशा प्रकारच्या अनेक महत्त्वपूर्ण शिफारशी असलेला अहवाल गोवा कायदा आयोगाने राज्य सरकारला सादर केला आहे.
कायदा आयोगाचे अध्यक्ष ऍड. रमाकांत खलप यांनी ही माहिती आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी या अहवाल समितीचे इतर दोन सदस्य ऍड. क्लिओफात कुतिन्हो व ऍड. मारीयो पिंटो आल्मेदा उपस्थित होते. या तीन सदस्यीय समितीने हरयाणा राज्याच्या भूसंपादन कायद्याचा अभ्यास करून हा अहवाल तयार केला असून गोव्यातील विविध भागांतील जमिनींचे दरही या समितीने निर्धारित केले आहेत. मात्र ज्या वेळी प्रत्यक्ष जमीन ताब्यात घेतली जाईल तेव्हा त्या परिसरातील जमिनींचा जो बाजार भाव असेल तोच संबंधित जमीनमालकाला मिळावा, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे, असे यावेळी ऍड. खलप म्हणाले.
दरम्यान, यापूर्वीही कायदा आयोगाने सरकारला अनेक शिफारशी केल्या होत्या. परंतु, त्यांतील सर्वच सरकारने मान्य केल्या नाहीत. यासंबंधी ऍड. खलप यांना विचारले असता, समितीने आपले काम केले आहे; आता या शिफारशींची अंमलबजावणी करणे हे सरकारच्या हातात आहे, असे उत्तर त्यांनी दिले. तिळारी धरणग्रस्तांच्या मागण्या रास्तच आहेत. जर त्यांना नोकर्‍या देणे शक्य नाही, तर त्याऐवजी दुसरा पर्याय गोवा सरकारने शोधावा, असेही ते याबाबतच्या प्रश्‍नाला उत्तर देताना म्हणाले.

वेर्णातील अपघातात एक ठार, एक गंभीर

वास्को, दि. ९(प्रतिनिधी): कामावर रुजू होण्याच्या पहिल्याच दिवशी आज वेर्णा येथे मृत्यूने एका युवकावर घाला घातला. दुचाकीवर मागे बसून जात असताना वेर्णा औद्योगिक वसाहतीच्या रस्त्यावर मागून मिनिबसने धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात अनंत रवींद्र देवरे (२३) हा युवक ठार झाला तर कैलाशचंद्र राऊत (२५) हा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर बांबोळीच्या गोमेकॉ इस्पितळात उपचार सुरू आहेत.
वेर्णा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी ८.२०च्या सुमारास सदर अपघात घडला. काही दिवसापूर्वीच गोव्यात आलेला मूळ ओरिसा येथील अनंत हा युवक कैलाशचंद्र याच्याबरोबर त्याच्या दुचाकीवरून (क्रः जीए ०२ एल ४६९७) पहिल्याच दिवशी कामावर रुजू होण्यासाठी निघाला. ते वेर्णा औद्योगिक वसाहतीच्या रस्त्यावर पोहोचले असता मागून येणार्‍या मिनिबस (क्रः जीए ०२ टी ४५१२)ने त्यांना जबर धडक दिली. या अपघातात
कैलाश व अनंत रस्त्यावर फेकले जाऊन गंभीर जखमी झाले. त्यांना त्वरित गोमेकॉत दाखल करण्यात आले. मात्र तिथे अनंतला मृत घोषित करण्यात आले. उपचार घेत असलेला कैलाश हा वेर्णा औद्योगिक वसाहतीत कामगार पुरवणारा कंत्राटदार असून मयत अनंतला तो कामावर नेत होता अशी माहिती पोलिसांनी दिली.
वेर्णा पोलिसांनी पंचनामा करून मिनिबस चालक धूळप्पा याच्याविरुद्ध भा.दं.सं. २७९, ३३७ व ३०४(ए) कलमाखाली गुन्हा नोंद करून त्यास अटक केली व नंतर त्याची जामिनावर मुक्तता करण्यात आली.

Monday, 9 May 2011

चाळीसही मतदारसंघ लढविणार!

मिकी यांच्या घोषणेमुळे कॉंग्रेस पक्षात खळबळ
मडगाव, दि.८ (प्रतिनिधी)
आगामी विधानसभा निवडणुकीत सर्व चाळीसही मतदारसंघांत आपले उमेदवार उभे करणार या आमदार मिकी पाशेको यांच्या घोषणेमुळे राष्ट्रवादी कॉंगे्रसबरोबरच सत्ताधारी कॉंग्रेसमधील अनेक नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. साहजिकच त्यांची ही घोषणा थट्टेवारी नेण्यासारखी नाही, अशी या नेत्यांची आपसात कुजबूज सुरू झाली आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत बहुतेक पदाधिकार्‍यांनी मिकी यांच्यामुळे पक्षाची बदनामी होत असल्याचा दावा केला होता. तथापि, त्यास न जुमानता आगामी निवडणुकीत सर्व म्हणजे चाळीसही मतदारसंघांतून उमेदवार उभे करण्याची घोषणा करून मिकी यांनी राष्ट्रवादीसह कॉंग्रेसलाही गोंधळात टाकल्याचे मानले जात आहे.
आपण राष्ट्रवादी पक्षाला सोडचिठ्ठी देऊ, पण आपणास हवी तेव्हा. त्यापूर्वी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची एकदा भेट घेऊन वस्तुस्थिती त्यांच्या कानावर घालण्याचा आपला विचार आहे हे त्यांचे निवेदन राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांना आपण काडीचीही किंमत देत नसल्याचे निदर्शक ठरले आहे.
यापूर्वी नादिया तोरादो प्रकरणात सर्व शक्ती त्यांच्याविरोधात एकवटलेल्या होत्या. मात्र त्याची अजिबात पर्वा त्यांनी केली नाही. आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने मिकी यांनी बेताळभाटीत स्वतःच्या चाहत्यांचा महामेळावा आयोजित करून त्यात सर्व मतदारसंघांतून उमेदवार उभे करण्याची गर्जना केली होती. तथापि, तेव्हा त्यांनी हे उमेदवार राष्ट्रवादीचे असतील असे म्हटले होते. मात्र कालच्या त्यांच्या घोषणेत पक्षाचा उल्लेख नाही व आपण हे उमेदवार उभे करणार असल्याचे म्हटले आहे. त्यावरून गोव्यात कॉंग्रेसला पर्याय उभा करण्यासाठी ज्या पडद्यामागून हालचाली सुरू झाल्या आहेत, त्यांचा संबंध आता मिकी यांच्या या घोषणेशी जोडला जात आहे.
संपूर्ण गोव्यात व विशेषतः विशिष्ट वर्गातील मतदारांचे प्राबल्य असलेल्या सासष्टीत सध्या कॉंग्रेसविरोधी वातावरण आहे. त्या मतदारांना स्वतःकडे वळवण्याची ही युक्ती असावी, असा कयासही राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे. मिकी यांना पैशाची अडचण नाही. तसेच राजकीय डावपेचातही ते हार जाणारे नाहीत. यापूर्वीच्या निवडणुकीत कॉंग्रेसच्या तिकिटावर लढलेल्या चर्चिल आलेमाव यांना बाणावलीत आसमान दाखवून मिकी यांनी आपली क्षमता सिद्ध केली आहे.
या बाबी पाहिल्या तर मिकी यांचा सर्व ठिकाणी उमेदवार उभे करण्याचा पवित्रा सत्ताधारी कॉंग्रेसला निश्‍चितच मारक ठरण्याची चिन्हे दिसत आहेत. निवडणुकीची तारीख जवळ येईल त्यानुसार राजकीय शक्तींच्या ध्रुवीकरणास वेग येईल. कॉंग्रेसचा पाडाव करण्याच्या इराद्याने एकत्र आलेल्या मंडळींसोबत मिकी हे जागांबाबत समझोता करण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसे झाले तर सासष्टींतील अनेक मतदारसंघांत नवी राजकीय समीकरणे उदयाला येतील, असे मानले जात आहेत.
काही राजकीय निरीक्षकांच्या मते मिकी हे राष्ट्रवादीतून जितक्या लवकर बाहेर पडून नवा पक्षाची स्थापना करतील तेवढ्या लवकर या हालचालींना वेग येईल. मिकी यांनी यापूर्वीच आपण स्वतः आगामी निवडणूक बाणावलीऐवजी नुवे या नव्या मतदारसंघातून लढविण्याची घोषणा केली आहे. त्यादृष्टीने त्यांनी तेथे तयारीही आरंभली आहे. कुठ्ठाळीत त्यांनी आपली दुसरी पत्नी व्हियोला यांच्या नावे तेथील लोकांना ईस्टरच्या शुभेच्छा देऊन आपला राजकीय पाया व्यापक करण्यास सुरुवात केली आहे. कुडतरी, बाणावली, मुरगाव, वेळ्ळी, नावेली हे तर त्यांच्या ‘हिटलिस्ट’वरील मतदारसंघ. तेथील त्यांच्या उमेदवारांची नावेही तयार आहेत. मडगाव व नावेलीत ते अन्य पक्षांशी समझोता करण्याची शक्यता आहे. तथापि, मिकी यांनी अजून आपले नेमके पत्ते खुले केलेले नसल्यामुळेे कॉंग्रेसमधील त्यांचे प्रतिस्पर्धी सध्या कमालीचे गोंधळले आहेत.

संभाव्य उमेदवारही निश्‍चित

पणजी, दि. ८ (प्रतिनिधी)
आपल्या संभाव्य उमेदवारांच्या यादीतील अनेकांची निवड झालेली आहे, योग्यवेळी त्यांची नावे उघड करू, असा गौप्यस्फोट आज बाणावलीचे आमदार मिकी पाशेको यांनी ‘गोवादूत’शी बोलताना केला.
आगामी विधानसभा निवडणुकीत आपण चाळीसही मतदारसंघांत उमेदवार उतरवणार असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, हे उमेदवार राष्ट्रवादी कॉंग्रेसचे असतील की आपल्या स्वतःच्या पक्षाचे यावर स्पष्टीकरण देण्याचे त्यांनी नाकारले. त्यामुळे नवा पक्ष स्थापन करण्याच्या घोषणेवर मिकी यांनी आता ‘थांबा आणि पाहा’ अशी भूमिका घेतली आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते ट्रोझन डिमेलो यांच्यावर जोरदार प्रतिहल्ला करीत ‘राजीनामे काय मागता, हिंमत असेल तर पक्षातून काढून टाका. आपण राजीनामा देण्यापेक्षा ते तुम्हांला सोपे होईल,’ असे प्रतिआव्हानबाणावलीचे आमदार मिकी पाशेको यांनी दिले आहे. राष्ट्रवादीचे केंद्रीय अध्यक्ष आपल्याला सांगत नाही तोवर आपण राजीनामा देण्याचा प्रश्‍नच येत नाही, असेही पाशेको म्हणाले. त्यामुळे राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यकारिणीला जोरदार चपराक बसली आहे.
माध्यमप्रश्‍न, नवा पक्ष काढण्याची घोषणा आणि पक्षविरोधी भूमिका घेतल्याबद्दल आमदारकीचा आणि पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा द्या, असे मिकी यांना सांगण्यात आले होते. त्यावर बोलताना मिकी यांनी पक्षाचे प्रवक्ते डिमेलो यांच्यावर जोरदार शाब्दिक प्रतिहल्ला चढवला.
‘मी अजूनही राष्ट्रवादीच आहे. वेळ आल्यावर योग्य ती भूमिका घेईन. माझी भूमिका मी आताच उघड केल्यास ही माणसे माझ्यामागे नव्याने हात धुऊन लागतील.
आपण आमदारकी आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामाद्यावा असा ठराव झालेला नाही. कोणी तो संमत केला असेल तर त्याची प्रत आपल्यापर्यंत पोचलेली नाही, असे मिकी यांनी स्पष्ट केले.

जितेंद्र देशप्रभूंविरोधात अजून ‘एफआयआर’ची नोंद नाही

पणजी, दि. ८ (प्रतिनिधी)
न्यायालयाच्या आदेशाची प्रत मिळाली नसल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे केंद्रीय सचिव जितेंद्र देशप्रभू यांच्यावर अद्याप ‘एफआयआर’ची नोंद करण्यात आलेली नाही, अशी माहिती पेडणे पोलिसांनी दिली. बेकायदा खाण व्यवसाय केल्याप्रकरणी देशप्रभू यांच्यावर २४ तासांत ‘एफआयआर’ नोंद करण्याचा आदेश काल पेडणे प्रथमवर्ग न्यादंडाधिकार्‍यांनी दिला होता. तथापि, त्या आदेशाची प्रत हाती आली नसल्याचे उत्तर आज पेडणे पोलिसांनी दिले.
जितेंद्र देशप्रभू यांच्यासह खाण खात्यातील सरकारी अधिकारी तसेच, कॉंगे्रसच्या एका ज्येष्ठ नेत्याच्या मुलाविरोधात ही तक्रार नोंद होण्याची शक्यता आहे. देशप्रभू यांच्याबरोबर कॉंग्रेस नेत्याच्या त्या मुलानेही बेकायदा खनिज उत्खनन केले असा दावा करून काशिनाथ शेट्ये यांनी पेडणे पोलिस स्थानकात तक्रार सादर केली होती.
त्या तक्रारीची पेडणे पोलिसांनी कोणतेही दखल घेतली नसल्याने आता न्यायालयाने या तक्रारीची नोंद करून चौकशी सुरू करण्याचे आदेश दिलेे. त्यामुळे कॉंग्रेस नेत्याचा तो मुलगा कोण याबाबतची माहिती बाहेर येण्याची शक्यता आहे.
दरम्यान, देशप्रभू यांनी बेकायदा उत्खनन केल्याप्रकरणी त्यांना यापूर्वीच खाण खात्यामार्फत १.७२ कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. ती रक्कम त्यांनी अजून सरकारजमा केलेली नाही. त्यामुळे सदर रक्कम वसूल करण्याचे आदेश पेडणे मामलेदारांना देण्यात आल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

श्रीलईराई मातेच्या जयघोषाने शिरगाव नगरी दुमदुमली...

-हजारो भाविकांची उपस्थिती
-आजपासून कौलोत्सव

पणजी, दि. ८ (प्रतिनिधी)
लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या शिरगाव येथील श्री लईराई देवीचा जत्रोत्सव आज दि. ८ पासून हजारो भाविकांच्या उपस्थितीत सुरू झाला. आज दिवसभर या जत्रोत्सवात भाग घेऊन देवीच्या कृपेचा लाभ घेण्यासाठी देवींच्या धोंडासह (व्रतस्थ भक्त) हजारो भाविकांच्या झुंडीच्या झुंडी शिरगावकडे येत होत्या. देवी लईराईचा जयजयकार करत, हातात देवीचे रंगीबेरंगी ‘बेत’ घेऊन आलेल्या हजारो धोंडामुळे शिरगाव, अस्नोडा व मये परिसराला एक वेगळेच भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. शिरगावाच्या पवित्र असा स्थळाला आज वार्षिक जत्रोत्सवामुळे व हजारो भक्तांच्या जथ्यामुळे भक्तांचा महापूर आला होता. एरवी खाणीमुळे लाल होणारे रस्ते आज भक्तांच्या पावलांच्या पायधुळीने लालेलाल झाले होते. सकाळी ११ वाजेपर्यंत शिरगावात वाहनांना प्रवेश देण्यात आला. त्यानंतर अस्नोडा येथेच वाहने अडवण्यात आली. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे अस्नोडा ते शिरगाव हे अंतर भक्तांना पायीच चालत जावे लागले. सकाळी ११ पासूनच भली मोठी रांग देवीच्या दर्शनासाठी लागली होती. शिरगाव ते अस्नोडा दरम्यान शेकडो दुकाने थाटण्यात आली आहेत. विद्युत रोषणाईमुळे संध्याकाळनंतर या परिसराला वेगळीच शोभा येत आहे. मध्यरात्री होमकुंड पेटवण्यात आले. मंगलमय वातावरणात साजरा होणार्‍या या जत्रोत्सवाचा आज पहिला व महत्त्वाचा दिवस होता. रात्री उशिरापर्यंत भक्तांची येण्याची प्रक्रिया सुरूच होती. पहाटे २.३० च्या सुमारास होमखंडातून पार जाऊन अग्निदिव्य केल्यानंतर धोंड आपला उपवास सोडणार आहेत. देवस्थान मंडळी व पोलिस जत्रोत्सव व्यवस्थित पार पडावा म्हणून अथक परिश्रम करताना दसत आहेत. रात्री उशिरापर्यंत बससेवा सुरु होती. त्यामुळे भाविकांची संख्या वाढत होती. उद्या दि. ९ पासून दि. १२ पर्यंत देवीचा कौलोत्सव साजरा होणार आहे.

नोएडातील हिंसेचेलोण आगर्‍यापर्यंत पोहोचले

आग्रा/ग्रेटर नोएडा, दि. ८
जमीन अधिग्रहणाच्या मुद्यावरून शेतकरी आणि पोलिस यांच्यात शनिवारी झालेल्या संघर्षात दोन शेतकर्‍यांसह चार जणांचा बळी गेल्यानंतर आज या संघर्षाचे लोण आगर्‍यापर्यंत पोहोचले असून, आज पोलिस आणि शेतकर्‍यांमध्ये झालेल्या संघर्षात अनेक वाहनांची जाळपोळ करण्यात आली.
नोएडा येथे शनिवारी झालेल्या संघर्षात शेतकर्‍यांना चिथावणी देणार्‍या नेत्याच्या अटकेसाठी उत्तरप्रदेश सरकारने ५० हजारांचे बक्षीस जाहीर केले आहे. आज संतप्त शेतकर्‍यांनी मथुरा आणि अलिगढ येथे आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी वेळीच कारवाई करत परिस्थिती नियंत्रणात आणली, असे उत्तरप्रदेशचे पोलिस महासंचालक कर्मवीर सिंग यांनी सांगितले.
आगर्‍याजवळील छोगान गावात शेतकर्‍यांनी केलेल्या हिंसक आंदोलनात चार पोलिस कर्मचारी जखमी झाले. संतप्त शेतकर्‍यांनी अनेक वाहने आणि बांधकामस्थळी लावण्यात आलेले मंडप जाळण्याचा प्रयत्न केला. यमुना एक्सप्रेस वेसाठी अधिग्रहित करण्यात आलेल्या जमिनीचा जास्त मोबदला मिळावा यासाठी शेतकर्‍यांनी हे आंदोलन केले, असे कायदा व सुव्यवस्था विभागाचे विशेष पोलिस महासंचालक ब्रिजलाल यांनी लखनौ येेथे सांगितले.

‘रमेश तवडकर यांचे कार्य गौरवास्पद’

प्रचंड जनसमुदायाच्या उपस्थितीत भावपूर्ण सत्कार

काणकोण, दि. ८ (प्रतिनिधी)
माणसांतील माणुसकी जपतो तो गाव. शहरांत हे नाते असतेच असे नाही. रमेश तवडकर हा साधाभोळा आमदार आपुलकी जपणारा. नेकीने आणि निष्ठेने पक्षकार्य करणारा. त्यांनी राबवलेली आदर्श ग्राम संकल्पना गावागावांत जोपासली गेली पाहिजे. तसे झाले तर गोव्याचे अस्तिव अबाधित राहील, असे कौतुकोद्गार साहित्यिक विष्णू सूर्या वाघ यांनी आज येथे काढले.
आमदार रमेश तवडकर कार्यगौरव व अखिल गोवा सोहळा समितीतर्फे आयोजित कार्यक्रमात श्री. वाघ बोलत होते. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ समाजसेवक गिरीश प्रभुणे, सत्कारमूर्ती रमेश तवडकर, सौ. सविता तवडकर, खास अतिथी खासदार श्रीपाद नाईक, आमदार विजय पै खोत, नगराध्यक्ष रत्नाकर धुरी, आयोजन समितीचे अध्यक्ष प्रा. राजेंद्र केरकर, स्वागताध्यक्ष दिलीप गायतोंडे, कार्यध्यक्ष कमलाकर म्हाळशी, समिती सचिव विशांत गावकर आदी मान्यवर उपस्थित होते. आरंभी आरती ओवाळून मान्यवरांचे आगमन घोडेमोडणी पथकासह मंडपात झाले. नंतर जयराम काळे यांच्या मार्गदर्शनाखाली गानवृंदाने स्वागतगीत सादर केले.
दिलीप गायतोंडे यांनी आमदार तवडकर यांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे सांगितले आणि सर्वांनी त्यांच्या कामाचा आदर्श समोर ठेवावा, असे आवाहन केले. नंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. कमलाकर म्हाळशी यांनी प्रास्ताविक केले. गोविंद गावडे यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. डॉ. पुष्पा अय्या, अश्मा पागी, कविंद्र फळदेसाई, संजय कोमरपंत, जयराम काळे यांनी पाहुण्यांना पुष्पगुच्छ प्रदान केले.
श्रीपाद नाईक यांनी गौरव पुस्तिकेचे प्रकाशन केले आणि रमेश तवडकर हे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असल्याचे प्रतिपादन केले. सामाजिक बांधीलकी जोपासताना त्यांनी केलेले कार्य अफलातून असल्याचे श्री. नाईक यांनी सांगताच मंडपात टाळ्यांचा प्रचंड गजर झाला. नंतर श्री. प्रभुणे यांच्या हस्ते तवडकर यांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, मानचिन्ह, मानपत्र आणि गोव्याची पारंपरिक समई देऊन गौरवण्यात आले. यावेळी पुन्हा टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. डॉ. पुष्पा अय्या यांनी सौ. तवडकर यांची खणानारळाने ओटी भरली. मानपत्राचे वाचन दीपक अमोणकर यांनी केले. याप्रसंगी आमदार पै खोत, नगराध्यक्ष धुरी यांची तवडकर यांचा गौरव करणारी भाषणे झाली.
सत्काराला उत्तर देताना आपण केवळ निमित्तमात्र आहोत, हा सत्कार माझ्या कार्यकर्त्यांचा, हितचिंतकांचा आणि तमाम मतदार बंधूभगिनींचा असल्याची कृतज्ञता तवडकर यांनी व्यक्त केली. गौरव सीडीचे प्रकाशन पै खोत यांच्या हस्ते झाले. प्रा. केरकर यांनी या भूमीचा विकास करणार्‍या तवडकर यांचा गौरव म्हणजे एक दुर्मीळ योग असल्याचे उद्गार काढले. काही मंडळी जरी गोव्याच्या भूमीचे लचके तोडायला निघाली असली तरी चांगल्या कामाची दखल समाजाकडून घेतली जाते व तवडकर हे याचे आदर्श उदाहरण असल्याचेही प्रा. केरकर यांनी आवर्जून सांगितले. विशांत गावकर यांनी आभार मानले व अनंत अग्नी यांनी सूत्रनिवेदन केले. या कार्यक्रमाला प्रचंड संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.

कॉंग्रेसची अवस्था ‘बॅगा द्या, तिकीट घ्या’
पैंगीणच्या मतदारांनी ‘काळ्या आई’ची मनःपूर्वक सेवा करणार्‍या म्हणजेच शेतीला महत्त्व देणार्‍या रमेश तवडकर यांच्यासारख्या प्रामाणिक नेत्याची निवड केली हे कौतुकास्पद आहे. आपल्याला गोव्याचा होत असलेला विद्ध्वंस पाहवत नाही. त्यामुळे चांगल्या कामाची चाड असलेले प्रतिनिधी निवडण्याची गरज आहे. कॉंग्रेसमध्ये ‘बॅगा’ द्या व तिकीट घ्या असे ट्रेंड आला आहे. मात्र भाजपमध्ये अहवाल द्या आणि तिकीट घ्या, असे चित्र दिसून येते. ही चांगली बाब आहे. सध्या पैसेवालेच आमदार होऊ लागले आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा दहा ते बारा घराण्यांत विभागली गेल्यास आश्‍चर्य वाटू नये, असे रोखठोक विचार विष्णू सूर्या वाघ यांनी बोलून दाखवले. त्यांना प्रेक्षकांतून जोरदार प्रतिसाद मिळाला.

अंबिका सोनींची रवींद्र भवनास भेट

दर्जा उंचावण्याच्या प्रस्तावाचे सादरीकरण
मडगाव, दि. ८ (प्रतिनिधी)
केंद्रीय माहिती आणि नभोवाणी मंत्री श्रीमती अंबिका सोनी यांनी आज येथील रवींद्र भवनाला आकस्मिक भेट दिली व यंदाच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी (‘इफ्फी’साठी) या संकुलात साकारणार्‍या विविध सुविधांची माहिती करवून घेतली. त्यांचा कल पाहता यंदांच्या ‘इफ्फी’चा उद्घाटन वा समारोप सोहळा मठग्राम नगरीत होण्याची शक्यता बळावली आहे.
श्रीमती सोनी या मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या पुत्राच्या विवाह सोहळ्यात सहभागी होण्यासाठी आज सकाळीच गोव्यात दाखल झाल्या. येथील व्यस्त मुक्कामातून वेळ काढून त्या मडगावी दाखल झाल्या व रवींद्र भवनात त्यांनी तासभर विविध सुविधांची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत गोवा मनोरंजन सोसायटीचे कार्यकारी अधिकारी मनोज श्रीवास्तव व सार्वजनिक बांधकाम खात्याचे प्रधान मुख्य अभियंता श्री. रेगो होते.
रवींद्र भवनाच्या परिषदगृहात रेगो यांनी, या भवनाचा दर्जा उंचावण्यासाठी तयार केलेल्या योजनेचे त्यांच्यासमोर सादरीकरण केले. या योजनेनुसार रवींद्र भवनात दोन स्क्रीनची तरतूद केली जाईल. त्या प्रत्येक कक्षाची क्षमता २०० प्रेक्षक बसू शकतील इतकी असेल. तथापि, ते मल्टिफ्लेक्स नसेल. सार्‍या रवींद्र भवनाच्या परिसरात लँडस्केपिंग करून तो सुशोभित करण्याची तसेच तेथील प्रसाधनकक्ष आंतरराष्ट्रीय दर्जाचे करण्याची तरतूदही या योजनेत आहे.
या भवनामागील मोकळ्या जागेचा ‘हॅपनिंग प्लाझा’ म्हणून विकास करण्याचा समावेशही त्यात आहे. जुन्या बाजारांतील कोलवा जंक्शन ते तरणतलावापर्यंतच्या परिसराचे लँडस्केपिंगव्दारा सौंदर्यीकरण केले जाणार आहे. या सर्व तरतुदींचे सादरीकरण पाहून श्रीमती सोनी यांनी समाधान व्यक्त केले. त्यांनी हा परिसर फिरून माहिती करवून घेतली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या संपूर्ण प्रकल्पावर २८ कोटी खर्च होतील. त्यापैकी तीन १० कोटी केवळ दोन स्क्रीनसाठीच्या कक्षांवरच खर्च होणार आहेत. हा सर्व निधी केंद्राकडून मिळणार आहे. त्यास मंजुरी मिळताच कामाला सुरुवात होईल. ऑक्टोबरपर्यंत ते काम पूर्ण केले जाईल अशी खात्री सूत्रांनी व्यक्त केली. या सुविधेनंतर रवींद्र भवनाची आसनक्षमता ११०० होणार आहे.

बगदाद कारागृहात संघर्ष, १८ ठार

बगदाद , दि. ८
गेल्या वर्षीच्या ऑक्टोबरमध्ये बगदादच्या चर्चमध्ये लोकांना ओलिस ठेवून गोळीबार करणार्‍या गुन्ह्यासाठी कैदेत असलेल्या अतिरेक्याने कोठडीतील चौकशीदरम्यान पोलिस अधिकार्‍याची बंदूक हिसकावून घेतली. त्यानंतर तिथे झालेल्या संघर्षात एका पोलिस अधिकार्‍यासह आठ पोलिस कर्मचारी व दहा कैद्यांचा मृत्यू झाला. या घटनेमागे इराकमध्ये अतिरेकी कारवाया वाढविण्याचा उद्देश असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मुंबईत महिलेची
आत्महत्या

मुंबई, दि. ८
घटस्ङ्गोट घेतल्यानंतर आपल्या प्रियकराशी लग्न करूनही आईकडे राहणार्‍या हुस्नजान मन्सारी या महिलेने मानसिक अस्वस्थतेतून विषारी पदार्थ घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. प्रियकर मोहम्मद मन्सारी व हुस्नजान लग्न करूनही बांद्रा या उपनगरातील नवपाडा भागात वेगवेगळे राहत होते. एकत्र राहण्याच्या हुस्नजान हिच्या मागणीला तिच्या नवर्‍याने गंभीरपणे न घेतल्यामुळे आलेल्या अस्वस्थतेतून तिने आत्महत्या केली.

मध्य प्रदेशात दोन
न्यायाधीश निलंबित

जबलपूर, दि. ८
मध्य प्रदेशातील दोन न्यायाधीशांना त्यांच्या बेकायदेशीर वर्तवणुकीबद्दल निलंबित करण्यात आले आहे. सिद्धी येथील विशेष न्यायाधीश ओ. पी. सुनारिया यांना बलात्कार प्रकरणातील आरोपीला सात वर्षांची कोठडीची शिक्षा न देता तीन महिन्यांची अल्पशी कोठडीची शिक्षा सुनावल्यामुळे निलंबित करण्यात आले आहे. सागर जिल्ह्यातील राहेलीचे न्यायाधीश एस. एस. परमार यांचे नाव गुन्हेगारांच्या यादीत असल्यामुळे त्यांना देखील निलंबित करण्यात आले आहे.

पाण्याची टाकी कोसळून
दोन मुलांचा मृत्यू

उदयपूर, दि. ८
येथील बडगाव भागात पाण्याची टाकी कोसळल्यामुळे दोन लहान मुलांचा मृत्यू झाला आहे. अंबामाता पोलिस स्थानक परिसरात उंचावर असलेली पाण्याची टाकी अचानक खाली आली व तिच्याखाली पाच जण गाडले गेले. यात दिपा व रॉबिन ही दोन मुले घटनास्थळी मरण पावली तर तीन जण जखमी झाले आहेत. जखमींवर स्थानिक सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Sunday, 8 May 2011

जितेंद्र देशप्रभूंविरोधात ‘एफआयआर’ नोंदवा

न्यायदंडाधिकार्‍यांचे आदेश - खाण संचालकांवरही ठपका

पणजी, दि. ७ (प्रतिनिधी)
पेडणेचे माजी आमदार तथा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे केंद्रीय सचिव जितेंद्र देशप्रभू यांच्याविरुद्ध बेकायदा खाण व्यवसायात गुंतल्याप्रकरणी प्रथम चौकशी अहवाल (एफआयआर) नोंद करण्याचे आदेश पेडणे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकार्‍यांनी पोलिसांना दिले आहेत. या संपूर्ण बेकायदा व्यवहाराची सखोल चौकशी व्हावी, असेही या आदेशात म्हटले आहे.
भाईडवाडा - कोरगाव येथे बेकायदा खाण उद्योगाव्दारे जितेंद्र देशप्रभू यांनी सरकारी तिजोरीला सुमारे ५० कोटी रुपयांचा गंडा घातल्याची तक्रार माहिती हक्क कायदा कार्यकर्ते काशिनाथ शेटये व इतरांनी केली होती. याप्रकरणी देशप्रभू यांच्यासह खाण खात्याचे संचालक व इतरांवरही ठपका ठेवण्यात आला आहे.
जितेंद्र देशप्रभू यांना या बेकायदा खाण प्रकरणी खाण खात्यातर्फे १.७२ कोटी रुपयांचा यापूर्वीच दंड ठोठावण्यात आला आहे. खुद्द सरकारने याची माहिती विधानसभा अधिवेशनातही दिली आहे. या प्रकरणी पोलिसांकडे केलेल्या तक्रारीची दखल घेण्यात आली नसल्याने तक्रारदारांनी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकार्‍यांकडे दाद मागितली होती. या याचिकेवरील सुनावणी पूर्ण केल्यानंतर पेडणेच्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी विजयालक्ष्मी शिवोलकर यांनी हा आदेश जारी केला आहे.

लादेननंतरअमेरिकेचे लक्ष्य ‘आयएसआय’

निवडक अधिकार्‍यांना पकडणार

वॉशिंग्टन, दि. ७
पाकमध्ये घुसून कमांडो कारवाईत लादेनचा खातमा केल्यानंतर मारल्यानंतर आता अमेरिकेचे लक्ष्य आहे ते पाकिस्तानची ‘आयएसआय’ (इंटर सर्व्हिसेस इण्टेलिजन्स)ही गुप्तहेर संघटना. दहशतवाद्यांचा आधारस्तंभ असलेल्या आयएसआयच्या निवडक अधिकार्‍यांना पकडण्याची तयारी अमेरिकेने सुरू केली आहे.
आयएसआयची कोंडी केल्याशिवाय दहशतवादाला लगाम घालता येणार नाही याची पुरती जाणीव अमेरिकेला झाली आहे आणि त्यामुळेच अमेरिकेने पाकवरचा दबाव वाढवला आहे. लादेनच्या अल कायदा या दहशतवादी संघटनेशी विशेष जवळीक राखून असलेल्या आयएसआय एजंटांची यादीच त्यासाठी अमेरिकेने तयार केली आहे. या अधिकार्‍यांना चौकशीसाठी ताब्यात देण्याची मागणीही अमेरिकेने पाकिस्तान सरकारकडे केली आहे. ही मागणी कळल्यापासून पाकिस्तान आणि अमेरिका यांच्यातील तणाव वाढला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेला हव्या असलेल्या आयएसआयच्या अधिकार्‍यांमध्ये काही अतिशय वरिष्ठ पदावरचे अधिकारी आहेत. अशा अधिकार्‍यांना अमेरिकेच्या ताब्यात दिल्यास पाकिस्तानच्या बुरख्यामागील चेहरा सर्वांसमोर येणार आहे. त्यामुळे नामुष्की टाळण्यासाठी काय करावे, याबाबत पाकिस्तान सरकार गांभीर्याने विचार करत आहे.
लादेन पाकिस्तानमध्येच मुक्काम ठोकून असल्याची माहिती पाकचे लष्करप्रमुख जनरल अश्ङ्गाक परवेझ कयानी आणि आयएसआय प्रमुख लेफ्टनंट जनरल अहमद शुजा पाशा यांना होती. तो नेमका कुठे आणि कशा परिस्थितीत आहे यासंदर्भात त्यांना वेळोवेळी माहिती पुरवली जात होती. लादेनला आवश्यक ते सहकार्य करण्यासाठी निवडक मंडळी कार्यरत होती. त्यांच्या बाबतही जनरल कयानी आणि लेफ्टनंट जनरल अहमद शुजा पाशा यांना माहीत होते. पण अमेरिकेपासून लपवून ठेवण्यासाठीच लादेनबाबत खोटी माहिती पसरवली जात होती, असे गुप्तहेरांनी केलेल्या तपासातून अमेरिकेला समजले आहे. ही माहिती मिळाल्यापासून अमेरिकेने आयएसआयला धडा शिकवण्याची तयारी सुरू केली आहे.

तेरेखोल जमीन विक्रीत महसूल खाते भागीदार

अनेक बड्या धेंडांचाही सहभाग

पणजी, दि. ७ (प्रतिनिधी)
तेरेखोल गावच्या जमीन विक्री व्यवहारात येथील स्थानिक युवा उद्योजक सचिन परब हे केवळ हिमनगाचे एक टोक आहे. या व्यवहारात अनेक बडी धेंडेही सामील असल्याची टीका सेंट ऍँथनी कूळ व मुंडकार संघटनेतर्फे करण्यात आली आहे. पेडणेचे मामलेदार व उपजिल्हाधिकारी यांना हाताशी धरून हा व्यवहार सुरू आहे व त्याला महसूल खात्याचाही वरदहस्त लाभल्याने आता उच्च न्यायालयात धाव घेण्यावाचून तरणोपाय नाही, असा निर्धारही या संघटनेने व्यक्त केला.
तेरेखोल गावचा ताबा मिळवण्यासाठी ‘लीडिंग हॉटेल्स’कडून सुरू असलेल्या प्रयत्नांमुळे येथील स्थानिक लोक पेटून उठले आहेत. आता पर्यटन खात्यातर्फे या गावात ‘गोल्फ कोर्स’ उभारण्याची योजनाही जाहीर करण्यात आल्याने स्थानिकांना देशोधडीला लावून हा गावच पर्यटन व्यवसायाच्या नावाने कंपनीच्या घशात घालण्याचा डाव आखण्यात आल्याचे या आंदोलनाचे नेतृत्व करणारे फ्रान्सिस रॉड्रिगीस यांनी म्हटले आहे. या संपूर्ण व्यवहाराची इत्थंभूत माहिती आपण स्वतः महसूलमंत्री जुझे फिलिप डिसोझा यांच्या कानावर घातल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या व्यवहारात गौडबंगाल झाल्याची कागदपत्रेच त्यांच्यासमोर ठेवण्यात आली. परंतु, त्यांच्याकडून योग्य प्रतिसाद मिळाला नाही, अशी नाराजी त्यांनी बोलून दाखवली.
‘लीडिंग हॉटेल्स’ कंपनीकडून सत्ताधारी नेत्यांना हाताशी धरूनच हा जमिनी खरेदी करण्याचा व्यवहार सुरू आहे व त्यामुळे स्थानिकांचा विरोध मोडून काढण्याचेही षड्यंत्र रचले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. एका मर्यादित जागेत एखादा प्रकल्प उभा राहत असेल तर गोष्ट अलाहिदा; परंतु संपूर्ण गावच आपल्या ताब्यात घेऊन हजारो वर्षांपासून इथे वास्तव्य करणार्‍या लोकांना देशोधडीला पाठवण्याचे प्रकार घडावेत ही माणुसकीला कलंक लावण्याचीच कृती आहे, असा घणाघाती टोलाही त्यांनी लगावला आहे.
पेडणेचे मामलेदार व उपजिल्हाधिकारी हे या हॉटेल कंपनीचे ‘एजंट’ म्हणूनच वावरत आहेत व त्यांच्याकडून ज्या पद्धतीने येथील लोकांची सतावणूक सुरू आहे त्याविरोधात लवकरच उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याची माहिती श्री. रॉड्रिगीस यांनी दिली. मुळात ‘लीडिंग हॉटेल्स’ कंपनीकडून खलप बंधूंकडे करण्यात आलेला जमीन विक्री व्यवहारच बेकायदा असून हे विक्रीपत्र रद्द करण्यात यावे, यासाठीही वेगळी याचिका आपण दाखल करू, असेही ते म्हणाले.

आज देवी लईराईचा जत्रोत्सव

शिरगावात पवित्र वातावरण - लाखभर भाविकांची उपस्थिती राहणार
पणजी, दि. ७ (प्रतिनिधी)
गोवा तसेच अन्य राज्यांतील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिरगाव येथील श्री लईराई देवीचा वार्षिक जत्रोत्सव उद्या रविवार दि. ८ रोजी साजरा होत आहे. एकूण पाच दिवस चालणार्‍या या जत्रोत्सवात लाखो भाविक श्री देवी लईराईचा आशीर्वाद घेण्यासाठी शिरगावात उपस्थिती लावणार आहेत.
अन्य भाविकांबरोबरच महिनाभर व्रतस्थ राहून देवीची भक्ती करणारे धोंड उद्या पहाटेपासून शिरगावात दाखल होणार आहेत. परवा दि. ९ रोजी पहाटे २.३० ते ४ या दरम्यान होमकुंडातील निखार्‍यांवरून चालून अग्निदिव्य करूनच ते घरी परतणार आहेत. जत्रोत्सवानिमित्त या परिसरात अत्यंत चैतन्यमयी असे वातावरण निर्माण झाले असून शिरगाव, अस्नोड्यातील स्थानिकांचे सगे सोयरेही दाखल होऊ लागले आहेत. उद्याचा जत्रोत्सव व परवा पहाटे होणार्‍या अग्निदिव्यानंतर देवीच्या कौलोत्सवाला सुरुवात होणार असून हा कौलोत्सव दि. १२ मे पर्यंत चालणार आहे.

राष्ट्रकुल घोटाळ्याचीच पुनरावृत्ती!

किशोर नाईक गांवकर
पणजी, दि. ७
राष्ट्रीय क्रीडास्पर्धांबाबत सरकार अजिबात गंभीर नाही व क्रीडामंत्री बाबू आजगांवकर हे क्रीडास्पर्धांपेक्षा ‘पीपीपी’साठीच अधिक उत्सुक आहेत. गोव्याला राष्ट्रीय स्पर्धा भरवण्याची मान्यता २००५ साली मिळाली व आता सहा वर्षे उलटली तरीही प्राथमिक पायाभूत सुविधा उभारण्यात सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. शेवटच्या क्षणापर्यंत थांबून कोट्यवधी रुपयांच्या निधीवर डल्ला मारण्याचीच ही योजना आहे व त्यामुळे या क्रीडास्पर्धा म्हणजे राष्ट्रकुल घोटाळ्याची पुनरावृत्ती ठरण्याचाच संभव आहे, असे मत म्हापशाचे आमदार फ्रान्सिस डिसोझा यांनी व्यक्त केले.
क्रीडामंत्री बाबू आजगांवकर यांच्याकडून विधानसभेत या स्पर्धा २०११ साली घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. आता या स्पर्धा २०१४ साली होणार असे सांगण्यात येते. त्यामुळे या स्पर्धा कधी होतील याची शाश्‍वती सरकारलाच नाही. पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी या स्पर्धांसाठी ५०० कोटी रुपये देण्याचे आश्‍वासन दिले होते. त्यांपैकी किती पैसा पोहोचला आहे, असा सवालही त्यांनी यावेळी केला. फक्त १५ दिवसांच्या या स्पर्धेसाठी राज्यातील विविध क्रीडांसंबंधी पायाभूत सुविधा उभारण्याचे सोडून बड्या पंचतारांकित प्रकल्पांकडेच सरकारचे लक्ष आहे की काय, असा प्रश्‍नही त्यांनी केला. राज्यात कितीतरीच तारांकित हॉटेल्स आहेत; त्यामुळे शेतकर्‍यांच्या जमिनी कवडीमोल दरांत घेऊन ही हॉटेल्स स्थापण्यामागचा हेतू काय, असेही ते म्हणाले. ‘पीपीपी’ नावाने सरकार या बड्या उद्योजकांना स्वस्थ दरांत जमिनी देतील व हे लोक कोट्यवधींची गुंतवणूक करून दुप्पट नफा मिळवतील. शेतकर्‍यांच्या जमिनी ओलीत क्षेत्राखाली आणण्यासाठी तिळारी प्रकल्पावर कोट्यवधींचा खर्च केला असताना आता याच जमिनी बड्या प्रकल्पांसाठी लाटण्याचा अट्टहास नेमका कुणाच्या फायद्यासाठी असा जाबही त्यांनी विचारला आहे. इथे उभारण्यात येणार्‍या क्रीडासुविधांच्या देखरेखीवर किती खर्च येईल. ‘पीपीपी’च्या माध्यमाने सरकारला किती प्रमाणात पैसा मिळेल. स्थानिकांना रोजगार देण्याच्या बाता मारल्या जात असल्या तरी अशा प्रकल्पांत काम करण्यासाठी कुशल मनुष्यबळाची गरज आहे, त्यासाठी स्थानिकांना प्रशिक्षण देण्याची सरकारकडे काही योजना आहे काय, असे अनेक प्रश्‍न या निमित्ताने उपस्थित होतात. मुळात क्रीडामंत्री बाबू आजगांवकर हे क्रीडाखाते सांभाळण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहेत व त्यामुळे या क्रीडास्पर्धा खरोखरच प्रत्यक्षात उतरणार काय, याबाबत साशंकता असल्याची टोलाही आमदार डिसोझा यांनी हाणला.
राष्ट्रीय क्रीडास्पर्धा भरवण्याची संधी गोव्याला प्राप्त झाल्याने त्या निमित्ताने बाराही तालुक्यांत क्रीडा सुविधा उभारण्याची संधीही सरकारला साधता आली असती. मात्र असे असताना केवळ काही ठरावीक भागांवरच लक्ष केंद्रित करण्यात आल्याचा ठपकाही त्यांनी ठेवला आहे. म्हापसा पेडे येथे भव्य क्रीडासंकुल आहे; पण त्याचा उपयोग करून घेण्यास व तिथे पायाभूत सुविधा उभ्या करण्यातही सरकार अपयशी ठरले आहे. आमदार महादेव नाईक यांच्या तारांकित प्रश्‍न १(ब) यावर दिलेल्या माहितीत या एकूण प्रकल्पावर १६२९ कोटी रुपये खर्चाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यांपैकी २२१.९९ कोटी केंद्र सरकार, १३९.३८ कोटी राज्य सरकार व उर्वरित १६२८.३७ कोटी रुपये ‘पीपीपी’ व्दारे गुंतवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
दिल्लीत राष्ट्रकुल स्पर्धेतील कोट्यवधींचा घोटाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर गोव्यात राष्ट्रीय क्रीडास्पर्धांबाबत सुरू असलेला घोळ पाहता हा प्रकारही तशाच प्रकारच्या घोटाळ्याची पुनरावृत्ती तर ठरणार नाही ना, असा सवाल आमदार डिसोझा यांनी केला आहे.