Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 11 June, 2011

रामदेव बाबा आयसीयूमधून बाहेर उपोषण मात्र अजूनही जारीच

देहराडून, दि. १० : बेमुदत उपोषणाच्या आजच्या सातव्या दिवशी योगगुरू बाबा रामदेव यांची प्रकृती अधिकच बिघडल्याने त्यांना उत्तराखंड सरकारने नाईलाजाने हरिद्वार येथून देेहराडून येथील ‘हिमालयन’ या इस्पितळातील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. तथापि, रात्री उशिरा त्यांना तेथून बाहेर आणण्यात आले.
त्यांची प्रकृती आता थोडी ठीक असली तरी त्यांचे उपोषण जारीच असल्याचे सांगण्यात आले.
रामदेव बाबांच्या प्रकृतीसंदर्भात अधिक माहिती देताना हिमालयन हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक जॉली गँ्रट व डॉ. एस. एल. जेथानी यांनी सांगितले की, बाबांची प्रकृती स्थिर असून पल्स रेट ६० असून, ब्लडप्रेशर ११०/७८ आहे. त्यांची किडनी बरोबर काम करीत असून त्यांच्या लिव्हरवर मात्र थोेडा परिणाम झालेला आहे. त्यांच्या लघवीत संसर्ग आढळून आला आहे. असे असले तरी ते शुध्दीत असून त्यांना अतिदक्षता विभागात स्वतंत्र खोलीत ठेवण्यात आले आहे.
रामदेव बाबा यांना देहराडून येथे हलविण्याच्या निर्णयाला पतंजली आश्रमातील बाबांच्या पाठिराख्यांनी प्रारंभी विरोध दर्शविला होता. काहींचा तर पोलिसांबरोबर संघर्षही उडाला. परंतु आश्रमाच्याच काही अधिकार्‍यांनी मध्यस्थी केल्यानंतर स्थिती सुरळीत झाली.
दरम्यान ‘आर्ट ऑङ्ग लिव्हिंग’चे श्री श्री रविशंकरजी महाराज यांनी रामदेव बाबांची भेट घेतली व त्यांना उपोषण सोडण्याची विनंती केली. बाबांना आयसीयुत हलवीत असताना रविशंकरजी यांनी ही भेट घेतली. रविशंकरजी यांचे पितृछत्र अलीकडेच हरपल्याने वडिलांच्या अस्थी विसर्जनासाठी ते हरिद्वारला आले होते.
आज दुपारी २ च्या सुमारास बाबा रामदेव यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना देहराडून येथे हलविण्याचा निर्णय उत्तराखंडचे मुख्यमंत्री रमेश पोखरियाल यांनी घेेतला, असे पतंजली योगपीठाच्या प्रवक्त्याने सांगितले. आपली प्रकृती खालावत असून आपण आपले उपोषण मागे घ्यावे, अशी विनंती बाबांना करण्यात आल्यानंतरही बाबांनी आपले उपोषण जारी ठेवण्याचा निर्णय घेतला.

No comments: