Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday, 13 February, 2010

स्फोटांबाबतचे गूढ कायम

सरकारी यंत्रणा सुस्त
काणकोण, दि. १२ (प्रतिनिधी)- काल दुपारी काणकोण भागात झालेल्या तीव्र स्वरूपाच्या स्फोटांनी शेजारील कर्नाटक राज्यातील काही भाग हादरला होता. परंतु, विस्फोट नेमका कुठे झाला याबद्दलची निश्चित माहिती अजूनही शासनातर्फे जाहीर झालेली नाही. विस्फोटानंतर २४ तास उलटूनही शासकीय यंत्रणेला घटनेमागचे गूढ उकलण्यात अपयश आल्याने या सुस्त कारभाराबद्दल स्थानिक आमदार विजय पै खोत व रमेश तवडकर यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
अतिशय तीव्र स्वरूपाचे एकामागून एक तीन विस्फोट व्हावे व राज्यातील सरकारी यंत्रणेला याबद्दल काहीही माहिती नसावी ही अतिशय गंभीर बाब आहे. यामुळे राज्य तसेच देशाच्या सुरक्षा यंत्रणेबद्दल साशंकता व्यक्त करण्यात येत आहे. मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेत्यांना आपण या बद्दल अवगत केले असून त्यांनी जनतेत निर्माण झालेला हा संभ्रम दूर करण्यास पुढाकार घ्यावा, असे आवाहन आमदार विजय पै खोत यांनी केले आहे. खुद्द मुख्यमंत्री व सरकारी यंत्रणेला माहिती नसल्यामुळे जनतेमध्ये तीव्र संताप पसरल्याचे आमदार खोत यांनी "गोवादूत'शी बोलताना सांगितले.
पैंगीणचे आमदार रमेश तवडकर यांनीही सरकारच्या सुस्त धोरणावर कडाडून टीका केली आहे. काणकोणमध्ये जोरदार अफवांना ऊत आला असून नैसर्गिक आपत्तीला सामोरे गेलेल्या जनतेला या घटनेच्या नेमक्या कारणाची माहिती देणे ही सरकारची जबाबदारी आहे. गोंधळाच्या वातावरणाला त्वरित पूर्णविराम द्यावा, अशी जोरदार मागणी त्यांनी केली आहे.
सदर प्रकार हा भूकंपाचा प्रकार असल्याचे वृत्त खोडून काढताना आमदार खोत यांनी सैन्यदल किंवा नौदलाच्या गुप्त कार्यक्रमाअंतर्गत विस्फोट होण्याची जास्त शक्यता असल्याचे मत व्यक्त केले. शासकीय यंत्रणेने सत्य जनतेसमोर मांडण्याची मागणी करताना हा देशाच्या सुरक्षिततेचा प्रश्न असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
काल रात्रौ उशिरा मिळालेल्या माहितीनुसार माजाळी-कारवार व पोळे दरम्यानच्या समुद्रकिनाऱ्यावर स्थानिक मच्छीमाराने एक लढाऊ विमान समुद्रावर घिरट्या घालताना असताना पाहिले होते. नंतर पाण्याच्या जवळ येऊन त्यांनी स्फोट घडविले व या स्फोटांचा प्रचंड आवाज झाला होता. यावेळी समुद्राचे पाणी २० ते २५ मीटर उंच उसळले होते, अशी माहिती प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी पत्रकारांना दिली. यामुळे काणकोण परिसर हादरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
तसेच, तळपण येथील काही मच्छीमारांची होडी स्फोटाच्या वेळी हादरली होती, अशी माहिती मिळाली आहे. पाण्यात क्षेपणास्त्राची चाचणी केल्याची शक्यता काही पोलिस कर्मचारी अनौपचारिकपणे व्यक्त करत होते.
या स्फोटामुळे काणकोण पोलिस व अग्निशमन दलाच्या जवानांनी संपूर्ण किनारी भागत कोंबिंग ऑपरेशन सुरू केले; परंतु विस्फोट कसा झाला त्याची निश्चित माहिती आज दुपारपर्यंत मिळालेली नसल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

न्या. प्रभुदेसाई निलंबनासंदर्भात १७ ला पणजीत वकिलांची सभा

पणजी, दि. १२ (प्रतिनिधी)- औद्योगिक तंटा लवादाच्या न्यायाधीश श्रीमती अनुजा प्रभुदेसाई यांच्या निलंबनाचे पडसाद राज्यात अधिक तीव्रपणे उमटत असून त्यांच्या या निलंबनाला विरोध करणाऱ्यांची संख्या वाढतच आहे. श्रीमती प्रभुदेसाई यांचे ज्या विषयावरून निलंबन झाले आहे त्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी दक्षिण गोवा वकील संघटनेने १५ रोजी बैठक बोलावली आहे, तर १७ रोजी पणजीतील मिनेझीस ब्रागांझा सभागृहात राज्यभरातील वकिलांच्या एका मध्यवर्ती सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेला मोठ्या संख्येने वकीलवर्ग उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
न्यायाधीश या नात्याने आपल्या १८ वर्षांच्या कारकिर्दीत एकदाही वादग्रस्त न ठरलेल्या, कोणत्याही वादात न सापडलेल्या श्रीमती प्रभुदेसाई २००३ व २००४ सालच्या जुन्या खटल्यांसंदर्भात निलंबित झाल्यानंतर राज्यातील वकीलवर्गात त्याच्या प्रतिक्रिया उमटल्या. अनेकांनी त्या उघडपणे व्यक्त करून श्रीमती प्रभुदेसाई यांच्याप्रति संवेदना आणि पाठिंबा व्यक्त केला. प्रतिक्रियांची ही मालिका आजही सुरू होती. दरम्यान, येथील एका क्रीडा संस्थेने आयोजित केलेल्या स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात प्रमुख पाहुणे या नात्याने आमंत्रित करून त्यांच्यावरचा विश्वास कायम असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केला.

पोंबुर्फा अपघातात महिला जागीच ठार

म्हापसा, दि. १२ (प्रतिनिधी)- पोंबुर्फा पर्वरी रस्त्यावरील गतिरोधकाजवळ एका ट्रकाने स्कूटरला मागून धडक दिल्याने मागे बसलेली ट्रीमा कुडणेकर (२४) या महिलेचे ट्रकखाली सापडून जागीच निधन झाले.
याविषयी मिळालेल्या माहितीनुसार सिद्धार्थ कुडणेकर व ट्रीमा कुडणेकर जीए ०७ एच १२२५ क्रमांच्या डिओ स्कूटरने पोंबुर्फा येथून पर्वरीच्या दिशेने जात होते. भक्तवाडा चोडण येथील गतिरोधकाजवळ मागून भरधाव वेगाने आलेल्या स्वराज माझडा (क्र. जीए ०२ यू ५८७९) ट्रकाची जोरदार धडक स्कूटरला बसली. यावेळी चालक सिद्धार्थ स्कूटरवरून दूरवर खाली फेकला गेला तर ट्रीमा ट्रकच्या खाली सापडली. यावेळी तिचे जागीच निधन झाले. म्हापसा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. पोलिसांनी ट्रकचालक शैलेश वळवईकर (३५) याला अटक केली आहे. या प्रकरणी पुढील तपास मिलिंद भुईंदर व हवालदार बाळू जाधव करत आहेत.

तर दफनभूमीचीच सोय करावी लागेल

पंचवाडीवासीयांची उपहासात्मक टीका

पणजी, दि. १२ (प्रतिनिधी)- पंचवाडीसाठी इस्पितळ, शैक्षणिक सुविधा, क्रीडा मैदान, व्यायामशाळा तसेच इथल्या पर्यावरणाचे रक्षण करण्याची भाषा करणाऱ्या सेझा गोवा खाण कंपनीने राज्यात इतरत्र ठिकाणी आपल्या खाणी असलेल्या गावांतील लोकांना अशा किती सुविधा पुरवल्या आहेत याची माहिती उघड करावी. नियोजित कोडली ते पंचवाडी खनिज रस्ता व विजर खाजन बंदर प्रकल्प हा पंचवाडीचा नाश करणाराच ठरेल, त्यामुळे पंचवाडीवासीयांना या सुविधा पुरवण्यापेक्षा इथे भली मोठी दफनभूमीचीच सोय करा, अशी उपहासात्मक टीका पंचवाडी बचाव समितीने केली आहे.
पंचवाडी बचाव समितीकडून उपसरपंच जॉन ब्रागांझा व पंचायत सचिव प्रदीप नाईक यांच्याविरोधात गटविकास अधिकारी व पंचायत संचालकांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. ग्रामसभेचा विरोध डावलून वादग्रस्त खाण प्रकल्पाचे समर्थन करणारा ठराव घाईगडबडीत संमत करून घेण्यात आला. ठराव संमत करून पंचायत कार्यालयातून पलायन करण्याची गोव्यातील ही पहिलीच घटना असावी, अशी खिल्लीही यावेळी समितीचे नेते क्रिस्टो डिकॉस्ता यांनी उडवली. पंचसदस्य लता नाईक, दिलीप गावकर यांनीही उपसरपंच जॉन ब्रागांझा यांना पाठिंबा दिला त्यामुळे या बेकायदा कृतीचे तेही वाटेकरी ठरतात, असाही आरोप यावेळी करण्यात आला.
या नियोजित खाण प्रकल्पाचे समर्थन करण्यासाठी गावातील सुमारे वीस ते पंचवीस लोकांना एकत्र करून फोंडा येथील एका बड्या हॉटेलात दोन वेळा पत्रकार परिषद घेण्यात आली व तिथे संपूर्ण पंचवाडी गावाचा या प्रकल्पाला पाठिंबा असल्याचे पत्रकारांसमोर भासवण्यात आले. पत्रकार पंचवाडी गावात आले तर या प्रकल्पाविरोधात येथील ग्रामस्थांत किती रोष आहे हे त्यांना कळेल. यामुळेच फोंडा येथे बड्या हॉटेलात पत्रकार परिषद आयोजित करून पत्रकारांची दिशाभूल करण्याचे प्रयत्न झाले, अशी टीकाही पंचवाडी बचाव समितीने केली आहे. या प्रकल्पाला पाठिंबा देणारे हे मोजकेच लोक आहेत व त्यांना या प्रकल्पातून पंचवाडीचे काय नुकसान होणार याच्याशी काहीही देणेघेणे नाही. हा प्रकल्प उभा राहिल्यास त्यांना मात्र वैयक्तिक फायदा आहे, म्हणूनच ते या प्रकल्पाला पाठिंबा देत आहेत, अशी टीकाही यावेळी समितीने केली आहे.
दरम्यान,राज्यात सर्वत्र खाणप्रभावीत गावांतील लोक खाण प्रकल्पांना विरोध करतात व इथे मात्र काही लोक आपल्या गावचे सोडून वैयक्तिक हित साधण्यासाठी या नियोजित खाण प्रकल्पाचे समर्थन करतात, असा आरोप क्रिस्टो यांनी केला. उपसरपंच जॉन ब्रागांझा, पंचसदस्य लीना नाईक व दिलीप गावकर यांनी खाण समर्थन ठरावाला आपला पाठिंबा दिला आहे. हा नियोजित प्रकल्प कसा असेल, गावच्या नैसर्गिक संपत्तीचे कसे नुकसान होणार नाही, ग्रामस्थांच्या काजू, नारळाच्या बागायती कशा नष्ट होणार नाहीत, शेती कशी टिकेल, धूळ प्रदूषण कसे होणार नाही याची माहिती ते ग्रामस्थांना पटवून देऊ शकतात काय,असा सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला. प्रत्यक्षात या प्रकल्पाची काहीही माहिती नसताना निव्वळ कोणाच्या तरी सांगण्यावरून लोकांना रोजगार मिळेल व गावचा विकास होईल, अशी पोकळ आश्वासने देऊन या प्रकल्पाला पाठिंबा देण्याची कृती म्हणजे पंचवाडी गावच्या भवितव्याकडे खेळ मांडण्याचा प्रकार असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.
"उटा'कडे मदतीची हाक
पंचवाडी गावात होऊ घातलेल्या खाण प्रकल्पामुळे सर्वांत जास्त फटका येथील अनुसूचित जमातीच्या लोकांना बसणार आहे. शेती, बागायती हे येथील लोकांचे प्रमुख उपजीविकेचे साधन आहे, त्यामुळे तुटपुंज्या पैशांचे आमिष दाखवून या लोकांना रोजगार व व्यवसायाचे गाजर पुढे करून फसवले जात आहे. पंचवाडीच्या रक्षणार्थ पुढे सरसावलेल्या या लोकांना राज्यातील सर्व अनुसूचित जमातीच्या बांधवांनी पाठिंबा द्यावा, असे आवाहन करून "उटा' संघटनेकडेही या लोकांनी मदतीसाठी हाक मागितली आहे. पंचवाडी गावचे फादर व येथील श्री देवी सातेरी देवस्थान समितीनेही पंचवाडी बचाव समितीला आपला पाठिंबा दिल्याने कोणत्याच पद्धतीत हा गाव सेझा गोवा खाण कंपनीकडे गहाण ठेवण्यास देणार नाही, असा निर्धार या लोकांनी केला आहे.

उत्तर गोवा अधीक्षकांवर चौकशीची जबाबदारी

जेम्स आल्मेदा मृत्यू प्रकरण
कुळे, दि. १२ (प्रतिनिधी) - येथील जेम्स आल्मेदा याच्या गूढ मृत्यूप्रकरणाच्या चौकशीची जबाबदारी आता जिल्हाधिकाऱ्यांनी उत्तर गोवा पोलिस अधीक्षकांवर सोपवली आहे.
कुळे नागरिक समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आज (शुक्रवारी) सकाळी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर त्यांनीच ही माहिती दिल्याचे समितीतर्फे सांगण्यात आले. जेम्सच्या मृत्यूनंतर काही लोकांनी केवळ चार तासांत त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली. ती करताना त्यांनी ज्या आडमार्गाचा वापर केला तो आक्षेपार्ह असल्याने कुळे नागरिक समितीने, या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी कुळे पोलिसांकडे केली होती. मात्र, कुळे पोलिसांनी घटनेच्या तळाशी न जाता कुळे नागरिक समिती आणि जेम्सच्या मृतदेहाची विल्हेवाट लावणारा त्याचा मालक यांच्यात वैरभाव असल्याचा भलताच मुद्दा उपस्थित केला. पोलिसांनी त्याद्वारे सदर प्रकरणाचा रोख भलतीकडे वळवण्याचा प्रयत्न केला. ते करताना त्यांनी वेळकाढू धोरण तर स्वीकारले आणि त्याचबरोबर चौकशीसाठी आलेल्या केपे विभागीय दंडाधिकाऱ्यांचीही दिशाभूल केली. त्यामुळे केप्याचे उपजिल्हाधिकारी असलेल्या दंडाधिकाऱ्यांनीही नागरिक समिती आणि खाण व्यवसायावरून बार मालकांच्या ताणलेल्या संबंधांवर भर देण्याचा प्रयत्न केला.
या स्थितीमुळे कुळे नागरिक समितीने एकाबाजूने न्यायालयाकडे धाव घेण्याची तयारी चालवली असतानाच त्या आधीची पायरी म्हणून गुरूवार दि. ११ रोजी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन सादर करून या प्रकरणाची योग्यरीतीने चौकशी व्हावी आणि जेम्सच्या मृत्यूमागचे गूढ उकलून गावात निर्माण झालेले संशयाचे ढग दूर करावे, अशी त्यांना विनंती केली होती. त्यानंतर शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांची व्यक्तीशः भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली असता सदर प्रकरण उत्तर गोवा पोलिस अधीक्षकांकडे सोपवण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याचे कुळे नागरिक समितीच्या पदाधिकाऱ्यांनी "गोवादूत' शी बोलताना सांगितले.

Friday, 12 February, 2010

निलंबित न्या. अनुजा प्रभुदेसाईंसाठी शेकडो वकिलांनी कंबर कसली

पणजी, दि. ११ (प्रतिनिधी): राज्यातील औद्योगिक तंटा लवाद न्यायालयाच्या न्यायाधीश श्रीमती अनुजा प्रभुदेसाई यांच्या उच्च न्यायालयाकडून करण्यात आलेल्या निलंबनाचे जोरदार पडसाद सध्या राज्यातील वकील आणि न्यायाधीशांमध्ये उमटले असून या निलंबनाला विरोध करण्यासाठी सध्या राज्यभरातील वकिलांनी कंबर कसली आहे. विशेष म्हणजे कनिष्ठ ते वरिष्ठ पातळीवरील बहुसंख्य न्यायाधीशांनीही श्रीमती प्रभुदेसाई यांना आपला बिनशर्त पाठिंबा व्यक्त केला आहे.
श्रीमती प्रभुदेसाई यांची न्यायाधीश या नात्याने गेल्या अठरा वर्षांची कारकीर्द अत्यंत स्वच्छ आणि निःस्पृह राहिली असल्याचे या वकील व न्यायाधीशांचे म्हणणे असून त्यांचे निलंबन करताना पुढे करण्यात आलेल्या कारणांमुळे आमचे अजिबात समाधान झालेले नाही, किंबहुना श्रीमती प्रभुदेसाई यांच्या निलंबनामुळे न्याय क्षेत्रातील प्रामाणिक लोकांना एक प्रकारचा धक्काच बसल्याची प्रतिक्रिया अनेक वकिलांनी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे श्रीमती अनुजा प्रभुदेसाई यांच्या निलंबनाला सर्व स्तरावरून जोरदार विरोध करण्याचा निर्णयही विविध वकील संघटनांनी घेतला आहे. विरोधाची ही तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून त्याचे उघड पडसाद लवकरच संपूर्ण राज्यभर उमटण्याची दाट शक्यता आहे.
श्रीमती प्रभुदेसाई यांनी कनिष्ठ न्यायालयापासून ते जिल्हा आणि सत्र न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश या नात्याने पदभार सांभाळला असून राज्यातील न्यायसंस्था, वकील, सहकारी यांच्यात एक शिस्तबद्ध आणि प्रामाणिक न्यायाधीश अशी त्यांची कायम प्रतिमा राहिली आहे. तथापि, २००४ मधील काही अपघातविषयक खटल्यांमध्ये न्यायाधीश या नात्याने त्यांनी आपद्ग्रस्तांना मंजूर केलेल्या नुकसानभरपाईला तसेच २००३ सालच्या एका भूसंपादन प्रक्रियेवरील निवाड्याच्या कार्यवाहीला आक्षेप घेऊन उच्च न्यायालयाच्या आढावा समितीने त्यांच्या निलंबनाची शिफारस केली. यातील महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे निलंबन अशा वेळी आले आहे की, त्यांच्या भावी कारकिर्दीवर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. येत्या जानेवारी २०११ मध्ये गोव्यातून मुंबई उच्च न्यायालयावर गेलेले न्यायमूर्ती नेल्सन ब्रिटो हे निवृत्त होत आहेत व त्यांची ही रिक्त जागा भरण्याची प्रक्रिया सहा महिने आधीपासूनच सुरू होणार आहे. गोव्याच्या न्यायपालिकेत श्रीमती प्रभुदेसाई या सर्वांत ज्येष्ठ न्यायाधीश असल्याने या पदासाठी त्या प्रमुख दावेदार होत्या. मात्र आता निलंबनामुळे त्यांना ही संधी मिळणार की नाही यावरून सध्या अनेक तर्कवितर्क केले जात आहेत. मागच्या प्रकरणांवरून निघालेले त्यांचे हे निलंबन अशा वेळी आल्याने वकील आणि न्यायाधीश वर्गात सध्या चांगलीच अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यातूनच त्यांच्या या निलंबनाच्या अनुषंगाने काही ज्येष्ठ वकिलांनी आपल्या तीव्र भावना आणि चिंता व्यक्त केली आहे.
राज्य कायदा आयोगाचे सदस्य मारियो पिंटो आल्मेदा यांनी या संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना, श्रीमती प्रभुदेसाई यांचे निलंबन ही एक अत्यंत दुर्दैवी घटना असल्याचे "गोवादूत'शी बोलताना सांगितले. श्रीमती प्रभुदेसाई या एक अत्यंत स्वच्छ प्रतिमा असलेल्या न्यायाधीश म्हणून समस्त वकील आणि न्यायालयीन वर्तुळात ओळखल्या जातात. न्यायाधीश या नात्याने इतक्या वर्षांच्या त्यांच्या कारकिर्दीत त्यांचे वर्तन नेहमीच निःस्पृह राहिले आहे. त्यांच्याविरुद्ध इतक्या वर्षात कधीही कोणत्याही प्रकारचे आरोप झाले नाहीत की त्या वादग्रस्तही ठरल्या नाहीत. त्यामुळे एका चांगल्या व्यक्तीला मिळालेली ही शिक्षा खूप मोठी आहे. इतकी वर्षे वकील म्हणून काम करताना श्रीमती प्रभुदेसाई यांच्याबद्दल आम्हा वकील मंडळींच्या मनात नेहमी आदराचीच भावना राहिली. त्यांच्या हातून कधीही कोणत्याही प्रकारचे गैरकृत्य होणार नाही याबद्दल कोणाच्याही मनात संदेह असणार नाही. त्यामुळे न्याय पालिकेनेही त्यांच्यावरील निलंबनाच्या कारवाईचा तात्काळ फेरविचार करावा अशी आपली मागणी असल्याचे ते म्हणाले.
येथील एक ज्येष्ठ वकील श्रीमती शुभलक्ष्मी नायक यांचीही प्रतिक्रिया याच सदरात मोडणारी होती. श्रीमती अनुजा प्रभुदेसाई यांच्या निलंबनाचे वृत्त वाचून आपणास धक्काच बसला. गेली अनेक वर्षे आपण त्यांना ओळखते. आपले काम नेहमीच सचोटीने करणारी एक अत्यंत प्रामाणिक न्यायाधीश हीच त्यांची ओळख आहे. त्यामुळे त्यांच्यासारख्या न्यायाधीशावर ही पाळी यावी याबद्दल आपणास अत्यंत वाईट वाटते आहेच परंतु त्याही पेक्षा या घटनेने आपणास जबर धक्का बसल्याचेही ऍड. शुभलक्ष्मी नायक यांनी सांगितले.
लेबर प्रॅक्टिशनर असोसिएशन (कामगार कज्जाविषयक वकील संघटना) चे अध्यक्ष ऍड. माधव बांदोडकर यांनीही श्रीमती अनुजा प्रभुदेसाई यांच्या निलंबनामुळे आपणास धक्का बसल्याचे सांगितले. श्रीमती प्रभुदेसाई यांच्या निलंबनामागच्या कारणांबाबत आपण भाष्य करणार नाही, परंतु एक प्रामाणिक न्यायाधीश म्हणूनच आम्ही वकील मंडळी त्यांना ओळखत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या निलंबनामुळे कामगार कज्जे विषयक कामकाजात अडथळे येणार असल्याचे ते म्हणाले. श्रीमती प्रभुदेसाई यांचे निलंबन दुःखदायी असल्याचे ते म्हणाले.
श्रीमती प्रभुदेसाई या अत्यंत कर्तव्यनिष्ठ आणि प्रामाणिक न्यायाधीश म्हणून सर्वत्र परिचित आहेत. त्यांच्या निलंबनाने आपणास धक्काच बसल्याचे येथील एक नामवंत वकील ऍड. शैलेश भोबे यांनी सांगितले.
राज्यातील एक आघाडीचे वकील सरेश लोटलीकर यांची प्रतिक्रिया तर अधिकच बोलकी होती. ते म्हणाले, मुळातच विविध घटनांमुळे न्यायप्रणाली बऱ्याचदा वादग्रस्त ठरत असताना, श्रीमती अनुजा प्रभुदेसाई यांच्यासारख्या प्रामाणिक न्यायाधीशाला प्रामाणिकपणाचे हेच फळ मिळत असेल तर नवीन चांगले लोक या क्षेत्रात यायलाच बघणार नाहीत. श्रीमती प्रभुदेसाई यांच्याविरुद्ध जारी करण्यात आलेले आरोपपत्र आपण स्वतः वाचलेले आहेत. या आरोपपत्रात त्यांच्यावर ठेवण्यात आलेले आरोप अत्यंत तकलादू आहेत. अपघातग्रस्तांना त्यांच्या मागणीपेक्षा अधिक नुकसानभरपाई देण्यात आली हे कारण तर कोणालाही न पटणारे आहे. किंबहुना या आरोपामुळे तर श्रीमती प्रभुदेसाई या खरोखरच प्रामाणिक आहेत हेच सिद्ध होते. श्रीमती प्रभुदेसाई यांच्या १८ वर्षांच्या कारकिर्दीत "नो नॉनसेन्स जज्ज' हीच त्यांची ओळख आहे. आज केवळ आपणच नव्हे तर संपूर्ण बार काउन्सील त्यांच्या पाठीशी उभे आहे. न्यायाधीश म्हटले की त्याच्या निवाड्यामुळे एकटा आनंदी होणे आणि दुसरा वकील नाराज होणे हे आलेच परंतु श्रीमती प्रभुदेसाई यांच्यावर कधीही कोणी तसा राग धरला नाही. त्यांचा निवाडा सगळ्यांनीच खुल्या दिलाने मान्य केला, अशी त्यांची निःस्पृहता आहे. उदाहरणच द्यायचे तर आज मी त्यांच्या पाठीशी राहिलो आणि उद्या त्या पुन्हा न्यायालयात रुजू झाल्या तर माझ्या एखाद्या खटल्यात निवाडा देताना मी त्यांच्या मागे राहिलो होतो हा विचारसुद्धा त्यांच्या मनात शिवणार नाही, इतक्या त्या प्रामाणिक आहेत. त्यामुळे आज त्यांच्या निलंबनाच्या वेळी त्यांना मिळणारा पाठिंबा हा उत्स्फूर्त असून आज सगळेच वकील आणि न्याय यंत्रणेशी संबंधित बहुसंख्य सगळेच त्यांच्या पाठीशी उभे असल्याचे ऍड. लोटलीकर पुढे म्हणाले.

काणकोण परिसर स्फोटांनी हादरला

घटनेबाबत तर्कवितर्क
काणकोण, दि. ११ (प्रतिनिधी): आज दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास झालेल्या तीन प्रचंड स्फोटांच्या आवाजाने काणकोण व परिसर हादरून गेला. समोरच जिलेटिन फुटावा, अशा स्वरूपाचा हा स्फोट नेमका कुठे झाला, याची माहिती संध्याकाळी उशिरापर्यंत सुरक्षा यंत्रणांना मिळाली नव्हती. या घटनेचे रहस्य उलगडलेले नसल्याने काणकोण भागात मोठ्या प्रमाणात तर्कवितर्क लढवले जात होते.
आज दुपारी समुद्राच्या दिशेने हा आवाज ऐकू आल्यानंतर नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण पसरले. या स्फोटाचा प्रभाव एवढा भयंकर होता की काणकोण भागातील घरांमधील अनेक वस्तू गडगडून खाली कोसळल्या, अशी माहिती कॅटरिना परेरा या स्थानिक महिलेने दिली. घराच्या खिडक्या व भिंती हादरून गेल्याचे काही स्थानिकांनी सांगितले. कृष्णा वेळीप यांनी आवाज ऐकून वरून काही तरी खाली कोसळत असल्याचा भास झाल्याचा अनुभव सांगितला.
घटनेनंतर पोलिस यंत्रणेचे कोंबिंग ऑपरेशन खोला, आगोंद, माशे, पाळोळे, पोळे, लोलये या भागात सुरू होते. परंतु, स्फोट कसा झाला याची निश्चित माहिती मिळालेली नसल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. काणकोण अग्निशामक दलाने निश्चित माहिती मिळालेली नसल्याचे सांगितले. दरम्यान, किनारा रक्षक दलातर्फे हवाई सर्वेक्षण करण्यात आल्याचे वृत्त आहे.
या स्फोटाचा आवाज सांगे-साळावली धरण प्रकल्पावर तैनात सुरक्षा रक्षकांना ऐकू आल्याची माहिती त्यांनी "गोवादूत'ला दिली. बाळ्ळी, केपे व कारवार येथेही या स्फोटाचा आवाज नागरिकांनी ऐकल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
येथील नौदलाच्या तळावर दैनंदिन प्रयोग करतेवेळी स्फोट झाल्याचा अंदाजही वर्तवण्यात येत होता.
-----------------------------------------------------------------
नौदलाचे स्पष्टीकरण
वास्को, दि. ११ (प्रतिनिधी): काणकोण येथील स्फोटप्रकरणी नौदलाचे प्रवक्ते महेशचंद्र जोशी यांच्याशी प्रतिनिधीने संपर्क साधून माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. प्रवक्ते श्री. जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार आवाज झाला त्यावेळी नौदलाच्या लढाऊ विमानाचा सराव नैऋत्य दिशेने सुरू होता. परंतु, यावेळी सदर विमानात कोणत्याच प्रकारचा दारूगोळा नव्हता. यामुळे या विमानामुळे स्फोट होण्याची शक्यता फेटाळून लावताना विमानाचा आवाजच लोकांनी अनुभवला असावा, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. विमानाचा आवाज तीन वेळा येण्याची शक्यता त्यांनी नाकारली. सदर विमान पूर्णपणे सुरक्षित असून नौदलाची कोणतीच कृती या स्फोटासाठी जबाबदार नसल्याचे अप्रत्यक्षरीत्या स्पष्ट केले.

दाभाळ येथे आगीत ४.५ लाखांचे नुकसान

फोंडा व कुडचडे, दि. ११ ( प्रतिनिधी): वयलोवाडो दाभाळ किर्लपाल येथील डॉ. सिद्धार्थ शिरोडकर यांच्या सुपारी, नारळ साठवून ठेवलेल्या गोदामाला आज संध्याकाळी ५ च्या सुमारास आग लागल्याने अंदाजे ४.५ लाख रुपयांची हानी झाली आहे. गोदामात साठवून ठेवलेली सुपारी, नारळ, सुपारी सोलण्याचे एक यंत्र, फर्निचर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. यात ४ रिकाम्या गॅस सिलिंडरांचा समावेश होता. फोंडा व कुडचडे येथील अग्निशामक दलाच्या जवानांनी आग विझवली. आग एवढी भयानक होती की ती विझवण्यासाठी तेथील ओहोळातून पाणी खेचण्यात आले. सुमारे १ तास पाणी खेचण्याचे काम सुरू होते. आगीचे कारण समजू शकले नसले तरी शॉर्ट सर्कीटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज अग्निशामक दलाने वर्तवला आहे.

पंचवाडी उपसरपंच आणि पंचायत सचिव अडचणीत

'ती' सही व अहवालांतील तफावत भोवणार!
पणजी, दि. ११ (प्रतिनिधी): पंचवाडी येथील वादग्रस्त नियोजित खनिज रस्ता व बंदर प्रकल्पासंदर्भात ७ फेब्रुवारी रोजी झालेल्या ग्रामसभेचा पंचायत सचिवांनी लिहिलेला अहवाल आणि सरकारी निरीक्षकांनी सादर केलेला अहवाल यात तफावत आढळून आल्याने पंचवाडीचे पंचायत सचिव अडचणीत आले आहेत, तर खाणसमर्थक ठरावावर सरपंच या नात्याने सही केल्याचे उघडकीस आल्याने उपसरपंच अडचणीत आले आहेत.
हे दोन्ही प्रकल्प पूर्णत्वाला जावेत यासाठी " सेझा गोवा' खाण कंपनीला कोणत्याही प्रकारे ग्रामसभेचा ठराव हवा आहे. उपसरपंचांनी गेल्या ७ रोजी झालेल्या ग्रामसभेत बहुतांश ग्रामस्थांचा या प्रकल्पांना असलेला तीव्र विरोध डावलून केवळ कंपनीचे हित साधण्यासाठी घिसाडघाईने ठराव संमत करून घेतला, असा जाहीर आरोप पंचवाडी बचाव समितीने केली आहे. या वादग्रस्त ठरावावर त्यांनी सरपंच या नात्याने सही केल्याचेही उघड झाल्याने त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी व त्यांना ताबडतोब अपात्र ठरवावे, अशी मागणीही समितीने केली आहे.
७ फेब्रुवारी रोजी झालेल्या ग्रामसभेचा अहवाल पंचायत सचिवांनी यांनी गटविकास अधिकारी संजय खुटकर यांच्याकडे सुपूर्द केला आहे. पंचायत सचिवांनी हा अहवाल नियोजित खनिज रस्ता प्रकल्पाच्या बाजूने तयार केल्याचे समितीचे म्हणणे आहे. या प्रकल्पास विरोध करणारे माजी सरपंच क्रिस्टो डिकॉस्टा, पंच लीना डिकॉस्टा यांचा यापूर्वी या प्रकल्पाला पाठिंबा होता व आता ते विरोध करीत असल्याचेही सूचित करण्यात आले आहे. मुळात सुरुवातीला राज्य सरकारने पंचवाडीवासीयांच्या हितासाठीच सदर प्रकल्प असल्याचे सांगून भूसंपादनाची प्रक्रिया सुरू केली होती. या प्रकल्पामुळे या भागाचा विकास होईल, रोजगार मिळेल, व्यवसाय मिळेल, तेथील जमिनीला दर प्राप्त होईल, असा आभास तयार करून लोकांना भुरळ पाडण्याचा प्रयत्न झाला होता. प्रत्यक्षात जेव्हा या प्रकल्पाबाबत सखोल अभ्यास करण्यात आला तेव्हा त्यातून पंचवाडीवासीय देशोधडीला लागणार असल्याचेच उघड झाले. जेव्हा सत्यस्थिती लक्षात आली तेव्हा पंचवाडीचे हित जपणे हे कर्तव्य समजूनच या प्रकल्पाला आपण विरोध केला, अशी माहिती क्रिस्टो डिकॉस्टा यांनी दिली. पूर्वी पाठिंबा देणारे आता या प्रकल्पाला विरोध का करतात, अशी दिशाभूल केली जात आहे. खाण प्रकल्पाचे समर्थकच यामागे आहेत.आपल्या प्रामाणिकपणाबद्दल लोकांत संभ्रमाचे वातावरण पसरवले जात आहे. मात्र जेव्हा पंचवाडीचे अस्तित्व जपण्याची वेळ येईल तेव्हा छाती पुढे करून प्राणाची बाजी लावण्यासाठी कोण पुढे येईल, ते समजेलच, असा टोला त्यांनी लगावला.
पंचायत सचिवांचा अहवाल खाण प्रकल्पाची तळी उचलून धरणारा आहे. त्यामुळे या अहवालाबाबत संशय निर्माण होण्यासारखीच स्थिती आहे. ग्रामसभेतील कामकाजाचे छायाचित्रीकरण करण्यात आले असून ते गटविकास अधिकाऱ्यांना सादर केले जाईल, त्यानंतर सचिवांच्या या कृतीचा पर्दाफाश होईल, अशी माहितीही देण्यात आली. ग्रामसभेसाठी उपस्थित असलेल्या सरकारी निरीक्षकांनी दिलेल्या अहवालात ठराव मतदानास घातला असता सर्वत्र गोंधळ निर्माण झाला व या घाईतच उपसरपंचांनी ठराव संमत झाल्याचे जाहीर केल्याचे स्पष्टपणे म्हटले आहे. या अहवालामुळे पंचायत सचिवांचा कुटील डावही उघड झाला आहे.
बनावट सहीची चौकशी करा
दरम्यान, सरपंच व्हिएन्ना रॉड्रिगीस या प्रकृतीच्या कारणास्तव रजेवर असल्याने ७ रोजी झालेली ग्रामसभा उपसरपंचांच्या अध्यक्षतेखाली झाली. ग्रामसभेपूर्वीच त्यांनी आपण खाणसमर्थक ठराव घेणार, असे आव्हान विरोधकांना दिले होते. शेवटी ग्रामसभेतील विरोध डावलून घाईने खाणप्रकल्पाचे समर्थन करणारा सदर ठराव घेऊन त्यांनी पलायनही केले,अशी तक्रार समितीने केली आहे. दरम्यान, उपसरपंचांनी या वादग्रस्त ठरावावर सरपंच या नात्याने सही केल्याची माहिती पंचवाडी बचाव समितीने उघड केली आहे. सरपंचपदाचा गैरवापर व ग्रामसभेचाही अवमान त्यांनी केल्याने त्यांच्यावर तात्काळ कारवाई व्हावी; तसेच त्यांना अपात्र ठरवावे,अशी जोरदार मागणी समितीने केली आहे.

तरुणाला जिवंत जाळले?

कुळे जंगलातील घटना
कुळे, दि. ११ (प्रतिनिधी): सिग्नलाकोंड कुळे येथे रेल्वे मार्गावर आज दुपारी एका तरुणाला जिवंत जाळल्याची घटना घडली असून हे कृत्य कोणी केले आणि मृत पावलेला तरुण कोण आहे, याची कोणतीच माहिती रात्रीपर्यंत मिळाली नव्हती. रात्री उशिरापर्यंत आजूबाजूच्या जंगलात काही पुरावे मिळवण्यासाठी स्थानिक पोलिस आणि रेल्वे पोलिसांनी शोधकार्य सुरू केले होते. दरम्यान, मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह शवचिकित्सेसाठी मडगाव येथे हॉस्पिसियो इस्पितळात पाठवून देण्यात आला आहे. या मृत्यूची नोंद पोलिसांनी अनैसर्गिक म्हणून केली आहे. या घटनेबाबत अधिक माहिती घेण्यासाठी कुळे पोलिस स्थानकावर रात्री संपर्क साधला असता ड्युटीवर असलेले हवालदार श्री. पाटील यांना याविषयीची कोणतीच माहिती नव्हती. अशी कोणती घटनाच घडली नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
उपलब्ध माहितीनुसार आज दुपारी काही स्थानिक महिला लाकडे गोळा करण्यासाठी जंगलात गेल्या असता त्यांना ""बचाव...बचाव...'' अशी आरोळी ऐकू आल्याने त्यांनी रेल्वे रुळाच्या दिशेने धाव घेतली. रेल्वे मार्गाच्याच बाजूला एक २५ ते ३० वयोगटातला तरुण जळत होता आणि तो मदतीची याचना करीत होता. सदर घटना रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर घडल्याने लगेच याची माहिती रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना देण्यात आली. याठिकाणी रेल्वे पोलिसांनी येऊन पाहणी केली असता सदर तरुणाला त्याठिकाणी जाळल्याची कोणतीही लक्षणे आढळून आली नाहीत, त्यामुळे त्याला अन्य ठिकाणी रेल्वेतून किंवा जंगलात जाळण्यात आल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आजूबाजूचा संपूर्ण परिसर पोलिसांनी पिंजून काढला. मात्र रात्री उशिरापर्यंत कोणतेच पुरावे पोलिसांच्या हाती लागले नव्हते. याविषयीचा अधिक तपास रेल्वे पोलिस आणि कुळे पोलिस करीत आहेत.

गोमेकॉ डॉक्टर आज संपावर

पणजी, दि. ११ (प्रतिनिधी): गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळाच्या निवासी डॉक्टरांच्या मागणीवर तोडगा काढण्यास आरोग्यमंत्र्यांना अपयश आल्याने अखेर उद्या एक दिवस संपावर जाण्याचा निर्णय निवासी डॉक्टरांनी घेतला आहे. सहाव्या वेतन आयोगाची थकबाकी देण्याची मागणी गेल्या काही दिवसांपासून या निवासी डॉक्टरांनी केली होती. त्याविषयी अनेक चर्चा आणि निवेदने सादर करण्यात आली होती. परंतु, त्यातून कोणताच तोडगा निघाला नसल्याने संपावर जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे सूत्रांनी सांगितले. उपचारासाठी येणाऱ्या रुग्णाला त्रास होऊ नये यासाठी इस्पितळाच्या प्रशासनाने कोणती काळजी घेतली आहे, याविषयी माहिती घेण्यासाठी इस्पितळाचे अधीक्षक डॉ. राजेंद्र कुंकळकर यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता ते उपलब्ध होऊ शकले नाही. त्यांच्या मोबाइलवरही संपर्क साधला असता त्यांनी त्याला प्रतिसाद दिला नाही.

दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांना कुळे नागरिक समितीचे निवेदन

कुळे दि. ११ (प्रतिनिधी): येथील जेम्स आल्मेदा मृत्युप्रकरणी पोलिस तसेच उपजिल्हाधिकाऱ्यांकडून चालढकल करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करतानाच कुळे नागरिक समितीने आज दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करून याप्रकरणी तात्काळ हस्तक्षेप करण्याची मागणी केली.
जेम्स याच्या २३ जानेवारी रोजी संशयास्पद मृत्यू झाला. त्याच दिवशी काहींनी अत्यंत घिसाडघाईत त्यावर अंत्यसंस्कार पार पाडले. तथापि, हा एकंदर प्रकार संशयास्पद असल्याचे नागरिकांमध्ये सर्रास बोलले जाऊ लागल्याने सदर प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची विनंती नागरिक समितीने कुळे पोलिस तसेच केपे न्यायदंडाधिकाऱ्यांना केली होती. ही मागणी करून आज अनेक दिवस उलटले तरी संबंधित यंत्रणांच्या सुस्त कारभारामुळे वेळ हातची निसटत चालली आहे.
जेम्सचा मृत्यू होऊन जवळपास १७ दिवस उलटले असल्याने चौकशी प्रक्रिया वेगाने व्हायला हवी होती. जेम्सचा मृत्यू नेमका कसा झाला, हे नागरिकांना जाणून घ्यायचे असल्याने त्यांनी नागरिक समितीकडे सातत्याने पाठपुरावा चालवला आहे. अशावेळी त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देताना समितीच्या नाकी नऊ येत असून आता यात जिल्हाधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करण्याची वेळ आली असल्याचे कुळे नागरिक समितीने सादर केलेल्या या निवेदनात म्हटले आहे.
या निवेदनासोबत समितीने पोलिस तसेच उपजिल्हाधिकाऱ्यांशी केलेला पत्रव्यवहार, वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्यांची कात्रणे सोबत जोडली आहेत. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा बाळगून असलेल्या नागरिक समितीच्या पदाधिकाऱ्यांनी, तसे न झाल्यास प्रसंगी कोणत्याही क्षणी न्यायालयात धाव घेण्याची तयारीही ठेवल्याचे 'गोवादूत'शी बोलताना सांगितले.

Thursday, 11 February, 2010

किरण बेदींसमोरच निष्क्रिय सरकारचे वाभाडे

पणजी, दि. १० (प्रतिनिधी): डी. डी. कोसंबी विचार महोत्सवात डॉ. किरण बेदी यांच्या स्फूर्तिदायक व्याख्यानातून प्रोत्साहित झालेल्या युवकांनी व नागरिकांनी आज व्याख्यानाच्या शेवटी प्रश्नोत्तरावेळी आपल्या सरकारच्या अकार्यक्षमतेची व पोलिस खात्याच्या निष्क्रियतेची जंत्रीच विविध प्रश्नांच्या निमित्ताने सादर केल्याने सरकारचे वाभाडेच निघाले. या प्रसंगी उपस्थित मुख्यमंत्री दिगंबर कामत, मुख्य सचिव संजय श्रीवास्तव, इतर प्रशासकीय अधिकारी व खास करून महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष डॉ. प्रमोद साळगावकर यांची मात्र बरीच नाचक्की झाली. सरकारचे वाभाडे काढणारे सवाल उपस्थित होत असताना मुख्यमंत्री केवळ हसतच होते, असे आढळल्याने मुख्यमंत्री फक्त हसतात पण उत्तरे देत नाहीत, असा टोलाही डॉ. किरण बेदी यांनी यावेळी हाणल्याने त्यांची भंबेरी उडाली.
डॉ. बेदी यांच्या सडेतोड भाषणामुळे प्रेरित झालेल्या एका विद्यार्थिनीने उभे राहून राज्यात महिलांवरील अत्याचारांच्या वाढत्या प्रकरणांबाबत नाराजी व्यक्त केली. आज विविध ठिकाणी महिलांची छेडछाड व छळ सुरू असल्याचे या विद्यार्थिनीने सांगितले. गोवा विद्यापीठातील एका माजी प्राध्यापकाकडून लैंगिक छळाची तक्रार नोंद करूनही अद्याप काहीही कारवाई होत नाही. अशा परिस्थितीत करावे तरी काय, असा खडा सवाल तिने उपस्थित केला. यावेळी डॉ. बेदी यांनी कथीत विशाखाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल व अशा प्रकरणी लैंगिक छळवणूक चौकशी समितीतर्फे चौकशी व्हावी, असे सांगितले. या प्रकरणाची चौकशी झाली पण कारवाई नाही. माहिती अधिकाराखाली अहवाल मागितला तर तो गोपनीय असल्याचे निमित्त पुढे करून टाळण्यात येतो, असेही सांगितले. या सभागृहात विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप देवबागकर, कुलसचिव डॉ. मोहन सांगोडकर आदी उपस्थित होते. त्यामुळे काहींनी त्यांना जाब विचारावा, अशीही मागणी केली. पण ही "आपकी कचेरी' मालिका नाही, असे म्हणून डॉ. बेदी यांना लोकांना शांत करणे भाग पडले. एका महिला व्याख्यातीने महिलांवरील अत्याचाराबाबत बोलताना पोलिसांकडून मिळणाऱ्या वागणुकीचा निषेध केला. विदेशी अल्पवयीन मुलांवरील लैंगिक छळ, महिलांवरील अत्याचारांची प्रकरणे वाढत आहेत पण ते हाताळण्यात पोलिस कमी पडत आहेत. पण हे नेमके का घडत आहे, असा सवाल तिने केला. सदर व्याख्यातीने कथन केलेल्या घटनांबाबत स्पष्टीकरण देणेही कठीण असल्याने अखेर राज्यात चांगले पोलिस प्रशासन हवे तर त्यासाठी चांगले राजकीय नेतृत्व हवे, असे म्हणताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. गोव्यात अशा घटना का होतात याचा अभ्यास करण्याची गरज आहे, त्यासाठी विद्यापीठाने पुढाकार घेतला पाहिजे. एकदा का या घटनेमागची कारणे स्पष्ट झाली व त्यावर उपाय लगेच काढता येतील व उपाय तयार असले की कारवाईही तेवढीच लवकर होईल, असे सांगून मुख्यमंत्री कामत यांनी याबाबत जरूर विचार करावा, असेही त्या म्हणाल्या. आपण गोव्यात सेवा बजावल्याने या घटनांमुळे आपल्यालाही खरोखरच दुखः होते, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. गोव्याचे नाव या घटनांमुळे बदनाम होत असल्याचे मान्य करून गोव्याच्या लोकप्रियतेवर हा काळा ठपका ठरत असल्याची जाणीवही त्यांनी करून दिली. या गोष्टींकडे "झिरो टोलरन्स'च्या नजरेतून पाहिल्यास व कायद्यासमोर कुणाचीच गय होत नसेल तर ही प्रकरणे तात्काळ आटोक्यात येणे शक्य असल्याचे त्यांनी सांगितले.
सेवा बजावत असताना राजकीय नेते किंवा इतर बड्यांशी दोन हात करताना भीती वाटली नाही काय, किंवा कुटुंबाचा विचार मनात आला नाही काय, असा सवाल एका विद्यार्थिनीने केला. प्रत्येक कृतीचा परिणाम हा असतोच. आपली सेवा बजावताना त्यातून निर्माण होणाऱ्या परिणामाला सामोरे जाण्याचे धाडस स्वीकारणार की भेकडपणाला कवटाळणार हा ज्याने त्याने विचार करावा, असा प्रतिप्रश्नच त्यांनी केला. एकात्मता व धाडस असेल तर कुठलेही नेतृत्व लोकाभिमुख होते. प्रत्यक्ष रस्त्यावर उतराल तेव्हाच जनतेचे खरे प्रश्न व समस्या समजतील. सरकारची लोकप्रियता जनता ठरवेल, आपण कितीही बढाया मारल्या तरी तो उपयोगाचा नाही, असा सल्लाही त्यांनी सरकारला दिला. राज्यात आदर्श ठेवण्यालायक एकही नेता कसा का नाही,असा सवाल एका नागरिकाने उपस्थित केला असता त्याचे उत्तर मुख्यमंत्री देतील, असे म्हणून त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे पाहिले. एकूणच डॉ. बेदी यांच्या व्याख्यानाला उपस्थित राहिलेले नेते, प्रशासकीय अधिकारी व पोलिस अधिकारी यांची मात्र जनतेने केलेल्या टीकेमुळे नाचक्कीच झाली.

कुंकळ्ळी, काणकोणमधील बस बंदचा प्रवाशांना फटका

कुंकळ्ळी, दि. १० (प्रतिनिधी): कुंकळ्ळी पोलिस स्थानकातील एका हवालदाराने विनाकारण मारहाण करून शारीरिक दुखापत केल्याच्या निषेधार्थ कुंकळ्ळी तसेच काणकोण भागातील खासगी बसवाहतूक कर्मचाऱ्यांनी अचानक आज सकाळी ६ वाजल्यापासून कामावर बहिष्कार घातला. यामुळे खड्डे, बार्से तसेच काणकोण, खोला, आगोंद ते मडगाव, बेतूल-सांगे मार्गावरून प्रवासी वाहतूक करणाऱ्या सुमारे सत्तर खासगी बसेस बंद असल्याने विद्यार्थी, महिला तसेच इतर प्रवाशांचे अतोनात हाल झाले. दुपारी मडगाव रस्ता विभाग साहाय्यक संचालकांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून सदर हवालदार दोषी आढळल्यास त्याच्यावर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
वाहतूक कर्मचाऱ्यांनी अचानक केलेल्या बहिष्काराच्या घोषणेची कुणालाही कल्पना नसल्याने नित्यनियमाने कामावर जाण्यासाठी आलेल्या महिला, विद्यार्थी व इतर प्रवासी वर्गाला सकाळी १० वाजेपर्यंत वाट पाहत राहावे लागले. यामुळे बाळ्ळी, देमानी, कुंकळ्ळी बसस्थानक, पांझरखण दांडोवाडा आदी बसथांब्यांवर प्रवासी ताटकळत उभे असल्याचे दिसून आले. काणकोण-मडगाव मार्गावरील प्रवाशांना याचा अधिक फटका बसला. कदंबनेही आपल्या नेहमीच्या फेऱ्यांत वाढ करून प्रवाशांना थोडाफार दिलासा देण्याचा प्रयत्न केला. खासगी गाड्या तसेच दुचाकीस्वारांकडे "लिफ्ट' मागून काहींनी आपले नियोजित स्थान गाठले.
आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार बेतूल सांगे मार्गावर प्रवासी वाहतूक करणाऱ्या बस क्र. जीए ०२ टी ४१४४ चे चालक सांतू वेळीप हे सकाळी १० वाजण्याच्या सुमारास बसथांब्यावर उभे असताना कुंकळ्ळी पोलिस स्थानकाच्या हवालदाराने कोणतीही विचारपूस न करता मुस्कटात हाणली. काणकोण - मडगाव मार्गावर वाहतूक करणाऱ्या बस क्र. जीए ०२ टी ४०३३ चे चालक पलेश देसाई यांनी सांगितले की, पंक्चर झालेला टायर उतरवत असताना आपल्याला केबिनमधून खाली ओढून कानफटीत मारण्यात आले. अशीच कैफियत मायकल फर्नांडिस, प्रसाद नाईक यांनी मांडली.
यावेळी शाबू देसाई ट्रान्सपोर्टचे मालक विशाल देसाई तसेच कुंकळ्ळी बस ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष शैलेंद्र फळदेसाई, काणकोण बस ओनर्स असोसिएशनचे श्री. परेरा यांनी आपल्याला या बंदची कोणतीच पूर्वकल्पना नसल्याचे सांगितले. सदर निर्णय सर्वस्वी बस कर्मचाऱ्यांनी असल्याचे सांगून आमच्या कर्मचाऱ्यांना झालेल्या मारहाणीची चौकशी झालीच पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
सदर घटनेची माहिती मिळताच सर्वप्रथम काणकोण विभागाच्या रस्ता वाहतूक खात्याचे अधिकारी संदीप देसाई यांनी त्वरित आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. आंदोलनकर्त्यांशी सविस्तर चर्चा करून समाधानकारक तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, आंदोलनकर्ते सदर हवालदारावर कारवाई करण्याच्या मागणीवर ठाम राहिले. यानंतर मडगाव रस्ता विभागाचे साहाय्यक संचालक प्रकाश आझावेदो यांनी कर्मचाऱ्यांशी चर्चा करून कुंकळ्ळी पोलिस स्थानकाचे निरीक्षक नेल्सन आल्बुकर्क यांच्याशी चर्चा केली. सदर हवालदार दोषी असल्यास त्याच्यावर कारवाई करण्याचे आश्वासन व नमूद बसथांबे वगळून इतर ठिकाणी न राहण्याची अट मान्य करून आंदोलनकर्त्यांनी आपले आंदोलन मागे घेतले. यानंतर दुपारी या सर्व मार्गांवरील वाहतूक सुरळीत झाली.

३००० कुडचडेवासीयांची बगलमार्गासाठी भव्य रॅली

कुडचडे, दि. १० (प्रतिनिधी): खाण व्यवसायावर नियंत्रण ठेवण्याची गरज असतानाही सत्ताधारी सरकारने १७०० हेक्टर जमीन वनक्षेत्र वळवून खाणीसाठी वापरण्यास परवानगी दिली आहे. मात्र, कुडचडेवासी मृत्यूच्या छायेत असूनसुद्धा बगलरस्त्यासाठी गरजेची असलेली वनक्षेत्रातील केवळ ७ हेक्टर जमीन मालवाहतुकीस वापरण्यासाठी परवानगी मिळवण्यासाठी सरकार सुस्तीचे धोरण वापरत असल्याची जोरदार टीका विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी आज कुडचडे येथे केला.
येथे "द पीपल्स मुव्हमेंट'च्या चळवळीतून येथील जनतेला भेडसावत असलेल्या खाण समस्येवर उपाय काढण्यासाठी सरकारने बगलरस्त्याच्या एकमेव पर्याय निवडण्याच्या मागणीसाठी आज भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीला उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना श्री. पर्रीकर यांनी सरकारच्या सुस्त कारभाराचा खरपूस समाचार घेतला.
सदर रॅलीमध्ये न्यू एज्युकेशनल इन्स्टिट्यूट, सर्वोदया, चंद्रभागा तुकोबा नाईक उच्च माध्यमिकच्या विद्यार्थ्यांसह सुमारे ३००० लोक सहभागी झाले होते. यात सर्व राजकीय पक्षांनी मतभेद बाजूला सारून आपला पाठिंबा व्यक्त केला होता. कुडचडे बाजारातील दुकानेही यानिमित्त बंद ठेवण्यात आली होती. रेल्वे स्टेशन, कामत हॉस्पिटल, आंबेडकर चौक या मार्गावरून रॅली काढण्यात आली होती. शेवटी सुडा मार्केटसमोरील खुल्या जागेत रॅलीचे रूपांतर सभेमध्ये करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर ऍड. नरेंद्र सावईकर, कुडचडेचे नगराध्यक्ष परेश भेंडे, नगरसेवक प्रदीप नाईक, मिशन बायपासचे प्रदीप काकोडकर, ट्रकमालक संघटनेचे रघुनाथ नाईक, बस संघटनेचे मान्युएल फर्नांडिस, कॉंग्रेसचे माजी गटाध्यक्ष मनोहर नाईक, शिवसेनेचे धनंजय नाईक, व्यापारी संघटनेचे हनुमंत वस्त व इतर मान्यवर उपस्थित होते. तर रॅलीमध्ये डॉ. शीतलकुमार काकोडकर, रायसू नाईक, माजी आमदार विनय तेंडुलकर, माजी नगराध्यक्ष अभय खांडेकर, नगरसेवक मारुती नाईक, देऊ सोनू नाईक, व्यापारी, बस व ट्रक मालक यांचा सहभाग होता.
ऍड. सावईकर यांनी यावेळी बोलताना सांगितले की, पर्रीकर सरकारने आपल्या कारकिर्दीत ओल्ड गोवा येथे केवळ चार महिन्यांत बगलरस्त्याचे काम पूर्ण केले होते. कॉंग्रेस सरकार मात्र जनतेची दिशाभूल करत असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रदीप काकोडकर यांनी कुडचडेचे आमदार श्याम सातार्डेकर यांच्या आंदोलनाला पाठिंबा न दर्शवण्याच्या कृतीचा निषेध केला. आमदाराकडून सरकारला ३१ मार्च पर्यंत देण्यात आलेली मुदत केवळ ७ हेक्टर जमिनीसाठी आहे, राहिलेल्या रस्त्याचे काय, असा सवाल त्यांनी केला. सरकारकडून ६ महिन्यांत एखादी फाईल पुढे पाठवण्याची क्षमता नसेल तर सरकारला सत्तेवर राहण्याचा कोणताच अधिकार नाही, असेही त्यांनी सांगितले.
डॉ. सतीश काकोडकर यांनी कुडचडेवासीयांवर हिरोशीमा व नागासाकीप्रमाणे खाणीचे अणुबॉंब टाकण्यात येत असल्याची टीका केली. यातून जनतेच्या आरोग्यावर भयंकर परिणाम होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
बगलरस्त्यासाठी एक खास पथक तयार करून केंद्र सरकारकडे पाठवण्याची गरज नगराध्यक्ष परेश भेंडे यांनी व्यक्त केली. एकेकाळी अग्रेसर असलेला कुडचड्याचा व्यापार आज आता बंद होत चालल्याची खंत व्यापारी संघटनेतर्फे हनुमंत वस्त यांनी व्यक्त केली.

दंडाधिकाऱ्यांकडूनही पुरेसे सहकार्य नाही

कुळे नागरिक समितीचा आरोप
कुळे दि. १० (प्रतिनिधी): येथील जेम्स आल्मेदा मृत्युप्रकरणी स्थानिक पोलिसांच्या कार्यपद्धतीबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असतानाच आता केपे येथील विभागीय दंडाधिकाऱ्यांकडूनही या प्रकरणाचा छडा लावण्यास पुरेसा प्रतिसाद मिळत नसल्याची कुळे नागरिक समितीची भावना झाली आहे. केपे विभागीय दंडाधिकाऱ्यांनी आज नागरिक समितीच्या पदाधिकाऱ्यांना आपल्या कार्यालयात पाचारण करून उपस्थित केलेले बरेच मुद्दे गैरवाजवी आणि असंबंद्ध असल्याचे समितीच्या पदाधिकाऱ्यांनी "गोवादूत'शी बोलताना सांगितले. जेम्सच्या मृतदेहाची बेकायदा विल्हेवाट लावणे हे उपदंडाधिकाऱ्यांनाही फारसे खटकले नसावे; कारण प्रत्यक्षात त्याची चौकशी करण्यापेक्षा जेम्स दारू कसा घेत होता, त्याच्या मालकाचे खाण व्यवसायावरून नागरिक समितीशी कसे खटके उडाले होते आणि त्यावरून समिती त्याला लक्ष्य करत असावी असेच निष्कर्ष दंडाधिकाऱ्यांनी काढले असावेत, असे त्यांच्या आजच्या बोलण्यावरून जाणवल्याचे समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
खरेतर जेम्सचा मृत्यू जानेवारी २३ रोजी झाल्यानंतर त्याच्या मालकाने ज्या पद्धतीने त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली ती पद्धत केवळ संशयास्पदच नव्हती तर पूर्णतः बेकायदाही होती. संपूर्ण कुळे गावात त्यावरून आजही उलट सुलट चर्चा आहे. त्यामुळे लोकांचे विविध प्रश्न हाती घेऊन आजवर अन्यायाविरोधात लढणाऱ्या कुळे नागरिक समितीने या प्रकरणाची चौकशी करून सत्य जनतेसमोर आणण्याची विनंती पोलिसांना केली होती. तथापि, कुळे पोलिसांकडून पुरेसे सहकार्य न मिळाल्याने उपजिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी या स्तरांवरही समितीने निवेदने दिली होती. जेम्स आल्मेदाचा मृत्यू हा घातपाताच विषय असू शकतोे, असे नागरिक समितीचे मत आहे. लोकांच्या मनातला हा संशय दूर करण्याऐवजी हे प्रकरण दडपण्याचाच प्रयत्न शासकीय पातळीवर सुरू आहेत की काय, अशी शंका येण्याजोगी सध्या परिस्थिती निर्माण झाली असल्याचे समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे, आज समितीच्या पदाधिकाऱ्यांना केपे उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात पाचारण केल्यानंतर उपजिल्हाधिकारी ज्या पद्धतीने प्रश्न विचारत होते ते पाहिल्यानंतर जेम्सच्या संशयास्पद मृत्यूसंदर्भात तक्रार करून नागरिक समितीनेच जणू गुन्हा केला आहे की काय असे उपजिल्हाधिकाऱ्यांचे वर्तन असल्याचे सांगण्यात आले.
जेम्सच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी नागरिक समितीने साक्षी आणि पुरावे द्यावेत अशी उपजिल्हाधिकाऱ्यांची अपेक्षा आहे. मात्र, ज्या लोकांनी खोटे दाखले देऊन आणि घेऊन जेम्सच्या मृतदेहाची घाईगडबडीत विल्हेवाट लावली, तो प्रकार म्हणजे कायद्याच्या दृष्टीने गुन्हा असूनही संबंधितांकडून चांगल्या हेतूनेच ते सगळे घडले असावे, अशी उघड भूमिका उपजिल्हाधिकाऱ्यांनी घेतल्याचे त्यांच्या वर्तनावरून दिसत असल्याची समितीच्या पदाधिकाऱ्यांची भावना बनली आहे. किंबहुना हा विषय लावून धरल्याबद्दल समितीच काहीतरी चूक करीत असावी असेच त्यांचे आजचे वर्तन होते, असे समितीचे म्हणणे आहे. परिणामी त्यांच्याकडून या प्रकरणी सादर केला जाणारा चौकशी अहवाल नेमका कसा असेल हे आता जवळपास निश्चित झाले आहे. अशा वेळी न्यायालयाचे दरवाजे ठोठावल्याशिवाय या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लागण्याची शक्यताच कठीण असल्याचेही समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

दूध दरवाढ आजपासून

फोंडा, दि.१० (प्रतिनिधी): कुर्टी फोंडा येथील गोवा राज्य दूध उत्पादक संघाच्या (गोवा डेअरी) दुधाच्या विक्री दरात गुरुवार ११ फेब्रुवारी २०१० पासून प्रति लीटर २ रुपये दरवाढ करण्यात आली आहे.
गोवा डेअरीच्या संचालक मंडळाच्या ४ फेब्रुवारी रोजी घेण्यात आलेल्या बैठकीत दूध दरवाढीसंबंधी निर्णय घेण्यात आलेला आहे. गोवा डेअरीच्या जादा फॅट दुधाचा दर आता ३२ रुपये प्रतिलीटर, स्टॅंडर्डाईझ्ड दुधाचा दर २८ रुपये प्रतिलीटर, होमोज्नाईझ्ड गाईच्या दुधाचा दर २६ रुपये प्रतिलीटर आणि टोन्ड दुधाचा दर २४ रुपये प्रतिलीटर असा करण्यात आला आहे. नवीन दराची पॉलिथिन फिल्म उपलब्ध होईपर्यंत जुन्या दराच्या पॉलिथिन फिल्ममधून दुधाचा पुरवठा करण्यात येईल, तरी ग्राहकांनी यांची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन गोवा डेअरीतर्फे करण्यात आले आहे.

पंच हल्ला प्रकरणातील मुख्य सूत्रधार फरारीच

पणजी, दि. १० (प्रतिनिधी): जुने गोवे पंचायतीचा पंच सदस्य विनायक फडते याच्यावर हल्ला करण्याची "सुपारी' देणारा संशयित आरोपी राजेश देसाई याने जामिनासाठी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर अर्ज सादर केला असून उद्या गुरुवारी सकाळी त्यावर सुनावणी होणार आहे. या अर्जाला विरोध करण्यासाठी जुने गोवे पोलिस उद्या आपले उत्तर न्यायालयात सादर करणार आहेत. या हल्ला प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी फरारी असून पोलिस त्याचा कसून शोध घेत आहेत. त्याला पोलिस कोठडीत घेताच या हल्ला प्रकरणी वापरण्यात आलेली हत्यारे हाती लागणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. विनायक फडते याच्यावर हल्ला करण्यासाठी वापरण्यात आलेली दुचाकी आणि हत्यारे ताब्यात घेणे महत्त्वाचे बनले आहे. दरम्यान, गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात उपचार घेत असलेल्या विनायक याची जबानी पोलिसांनी नोंद करून घेतली आहे. अधिक तपास जुने गोवे पोलिस स्थानकाचे उपनिरीक्षक रमेश शिरोडकर करीत आहेत.

जिल्हा पंचायतीसाठी २०५ उमेदवार रिंगणात

पणजी, दि.१० (प्रतिनिधी): जिल्हा पंचायतींच्या एकूण ५० जागांसाठी आता प्रत्यक्षात २०५ उमेदवार रिंगणात राहिलेले आहेत. उत्तर गोव्यात १२८ व दक्षिणेत ७७ उमेदवार रिंगणात आहेत. दक्षिणेत कोलवा मतदारसंघातून नेली रॉड्रिगीस या एकमेव महिला उमेदवार बिनविरोध निवडून आल्याची घोषणाही आज राज्य निवडणूक आयोगाने केली.
जिल्हा पंचायतीच्या निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी उत्तरेत ७० व दक्षिणेत ४८ अर्ज मागे घेण्यात आले, त्यामुळे दोन्ही जिल्ह्यांत मिळून एकूण २०५ उमेदवारी राहिलेले आहेत. येत्या ७ मार्च रोजी मतदान होणार आहे. आता उमेदवारांची अंतिम यादी निश्चित झाल्याने उमेदवारांच्या प्रचाराला जोर चढणार आहे.

नेतृत्व स्फूर्तिदायक असावे : डॉ. किरण बेदी

पणजी, दि. ११ (प्रतिनिधी): एखाद्याकडे नेतृत्वगुण असला की मग तो पुरुष असो की स्त्री, त्याच्या नेतृत्वासमोर लिंगभेदाचा विषय निव्वळ गौण ठरतो, असे उद्गार भारताच्या पहिल्या महिला "आयपीएस' अधिकारी डॉ. किरण बेदी यांनी काढले. खरे नेतृत्व हे इतरांसाठी स्फूर्तिदायक ठरणारे असावे. समाजासाठी वावरताना आपल्याला जे काही मिळते त्याच्या दुप्पट आपण समाजाला देणे लागतो व त्यासाठी समाजाप्रति संवेदनशील असणे हाच खरा मंत्र, असेही डॉ. बेदी म्हणाल्या.
डॉ. धर्मानंद कोसंबी विचार महोत्सवाच्या आज तिसऱ्या दिवशी डॉ. किरण बेदी यांच्या व्याख्यानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या व्याख्यानमालेचा आत्तापर्यंतचा इतिहास आज प्रेक्षकांच्या प्रचंड प्रतिसादामुळे मागे पडला. कला अकादमीच्या मास्टर दीनानाथ मंगेशकर सभागृहात प्रेक्षकांची झुंबड उडालीच पण काही महनीय लोकांनी सभागृहात खाली बसण्यासही कमीपणा मानला नाही. सभागृहाबाहेर "स्क्रीन'ची सोय करण्यात आली होती व तिथेही प्रेक्षकांची उसळलेली तुफान गर्दी डॉ. बेदी यांच्या सर्वत्र पसरलेल्या कीर्तीची स्पष्टपणे ओळख करून देत होती. विशेष करून युवा वर्गाची उपस्थिती उल्लेखनीय होती व त्यांना अपेक्षित स्फूर्तिदायक विचार मांडून डॉ. बेदी यांनी उपस्थितांची मने जिंकली. सडेतोड बाणा व क्रांतिकारक विचारांना कर्तृत्वाची झालर यामुळे डॉ. किरण बेदी यांनी आपल्या आयुष्यात वठवलेली प्रत्येक जबाबदारी प्रशंसनीय अशीच ठरली आहे.
गोव्यात १९८४ साली त्यांची विशेष वाहतूक अधीक्षकपदी नेमणूक करण्यात आली होती. या काळात गोव्यात राष्ट्रकुल प्रतिनिधींची परिषद (चोगम) आयोजित करण्यात आली होती व त्यानिमित्तानेच त्यांची इथे वर्णी लावली होती. त्यांनी त्या काळातील काही जुने फोटो व व्यंगचित्रांच्या साहाय्याने आपल्या गोव्यातील कारकिर्दीला उजाळा दिला. विशेष म्हणजे वाहतूक विभागात केवळ वीस पोलिस कर्मचारी असतानाही विविध विद्यालयीन विद्यार्थी व युवकांना बरोबर घेऊन त्यांनी वाहतूक व्यवस्थेची चोख व्यवस्था पार पाडली. या काळात त्यांनी राजकीय नेत्यांचे निर्भीडपणे वैर पत्करून आपल्या सेवेशी साधलेल्या प्रामाणिकपणाचेही किस्से सादर केले. सध्याच्या जुवारी पुलाचे उद्घाटन त्यांनी एका प्रसंगी वाहतुकीची कोंडी सोडवण्यासाठी केले होते. यामुळेच कदाचित या पुलाचे नाव जुवारीच राहिले,अन्यथा त्याला सुद्धा "गांधी'चे नाव लागले असते,असाही टोला त्यांनी लगावला.सेंट झेव्हियर्सच्या पहिल्या शव प्रदर्शनावेळी वाहतुकीच्या व्यवस्थेतून तत्कालीन मंत्रिमंडळातील एका मंत्र्यालाही मुभा दिली नाही, यावरून तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी केलेला राडा व माफी मागण्यास त्यांनी दिलेला स्पष्ट नकार हा किस्साही प्रेक्षकांच्या टाळ्या मिळवून गेला. आपण नेहमीच काहीतरी अतिरिक्त साध्य करणार या हेतूने काम करावे. इतरांवर ठपका ठेवण्यापेक्षा स्वतःचे लक्ष्य स्वतःच ठरवणे रास्त ठरेल,असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. इतरांत वेगळा अपवाद ठरण्यास आपल्याला कुणीच मज्जाव केलेला नाही, त्यामुळे लिंगभेद एका ठरावीक काळापर्यंतच विचारात असतो पण त्यापुढे आपली स्वतःची प्रतिमा ही आपल्या कुवतीनुसारच घडते. मानसिक, शारीरिक व आध्यात्मिकदृष्ट्या आपण कठोर असायला हवे, तेव्हाच आपण यश मिळवू शकतो, असे त्या म्हणाल्या.
नैसर्गिकदृष्ट्या रचनाकाराने पुरुषांपेक्षा स्त्रीची रचना वेगळ्या पद्धतीने केली आहे व निसर्गदत्त मातृत्व तिच्याकडे असते. एका बाळाला जन्म देणे व त्याचे संगोपन करून सर्व कुटुंबाला एका सूत्रात बांधणे ही स्त्रीकडील नैसर्गिक ताकद आहे. आपल्या गुणांच्या बळावर नेतृत्व करणाऱ्या स्त्रीसमोर या अतिरिक्त गुणांचा ठेवा असतो व त्यामुळे ती पुरुषांपेक्षा अधिक कणखर व निर्भीड असते,असेही त्या शेवटी म्हणाल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलिस अधीक्षक आत्माराम देशपांडे यांनी केले तर महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष डॉ.प्रमोद साळगावकर यांनी त्यांचा परिचय करून दिला. या प्रसंगी मुख्यमंत्री दिगंबर कामत तथा विविध प्रशासकीय अधिकारी आवर्जून हजर होते.

Wednesday, 10 February, 2010

'सीआरझेड' बांधकामप्रश्नी खंडपीठाचा कडक पवित्रा

--कांदोळी व कळंगुट पंचायतींना नोटिसा
--केंद्रीय पर्यावरण सचिवांनाही नोटिस
--कारवाईची माहिती देण्याचा आदेश

पणजी, दि. ९ (प्रतिनिधी): समुद्राच्या भरती रेषेपासून दोनशे ते पाचशे मीटरवर उभ्या राहिलेल्या बेकायदा बांधकामांवर कोणतीही कारवाई केली नसल्याने कांदोळी आणि कळंगुट पंचायतींवर जोरदार ताशेरे ओढत अवमान याचिका का दाखल करू नये, याची कारणे दाखवा नोटीस आज उच्च न्यायालयाने दोन्ही पंचायतींना बजावली. त्याचप्रमाणे, केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या सचिवांनाही कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. याविषयीचा आदेश आज मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दिला. किनारपट्टीवर कोणाच्या निष्काळजीपणामुळे बेकायदा बांधकामे उभी राहिली आहेत, ते पाहण्याची कोणाची जबाबदारी होती, याची माहिती देण्याचे आदेश २००६ मध्ये केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाला देण्यात आले होते. अद्याप या आदेशाचे पालन केले नसल्याने आज मंत्रालयाच्या सचिवांना नोटीस बजावून येत्या चार आठवड्यांत त्यावर उत्तर सादर करण्याचे आदेश देण्यात आले. कांदोळी आणि कळंगुट पंचायतींना उत्तर सादर करण्यासाठी एका आठवड्याची मुदत दिली आहे. त्याचप्रमाणे, अन्य किनारपट्टी क्षेत्रातील पंचायतींना यात प्रतिवादी करून घेण्यात आले आहे. त्यामुळे सर्व किनारपट्टी क्षेत्रातील पंचायतींना किनारपट्टी क्षेत्रातील बेकायदा बांधकामांवर कोणती कारवाई केली आहे याची माहिती द्यावी लागणार आहे. याविषयीची पुढील सुनावणी येत्या १८ फेब्रुवारी रोजी ठेवण्यात आली आहे. यापूर्वी राज्य सरकारने "सीआरझेड' नियमांचे उल्लंघन करून बांधकाम केलेल्या कामांची माहिती देण्यात आली होती. त्यानंतर त्या बांधकामांवर कारवाई करण्याचे आदेश पंचायतींना देण्यात आले होते.
गोव्याच्या किनारपट्टी क्षेत्रातील पंचायतींनी आत्तापर्यंत किती बेकायदा बांधकामे पाडली, किती जणांना कारणे दाखवा नोटिशी बजावल्या आणि कोणा कोणावर कारवाई केली, याचा संपूर्ण अहवाल सादर करण्यांचेही आदेश दिले होते. अन्यथा त्याचे गंभीर परिणाम भोगण्यासाठी तयार राहा, असाही इशारा किनारपट्टी क्षेत्रात येणाऱ्या पंचायतींना देण्यात आला होता.
आज हे प्रकरण न्यायालयात सुनावणीसाठी आले असता वरील दोन्ही पंचायतींनी काहीही केले नसल्याने खंडपीठाने या पंचायतींना बरेच धारेवर धरले. २००६ साली गोवा खंडपीठाने, किनाऱ्यांवर बेकायदा बांधकामे उभारल्याप्रकरणी "सुओमूटो' याचिका दाखल करून घेतली होती. त्यात सर्वच किनारपट्टी भागांतील पंचायतींना प्रतिवादी करून घेतले होते. यावेळी भरती रेषेपासून दोनशे मीटरवर किती बांधकामे उभी राहिले आहेत, याची कोणतीही माहिती सरकारकडे नसल्याचे दिसून आले होते. गेल्यावेळी न्यायालयाने गोव्याच्या किनारपट्टी क्षेत्रात किती बेकायदा बांधकामे उभी राहिली आहेत, त्यात १९९१ पूर्वीची आणि नंतरची किती, दोनशे मीटरवर आणि पाचशे मीटरवर किती, याचे सर्वेक्षण करून ते न्यायालयात सादर करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने सरकारला दिला होता.

...तर पंचवाडीवासीय विधानसभेवर धडकतील

मुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेत्यांची भेट घेणार
पणजी, दि. ९ (प्रतिनिधी): पंचवाडीवासीय आपल्या अस्तित्वासाठी लढा देत असताना जनतेचे कैवारी म्हणून मिरवणारे सरकार तोंडात बोळा घालून गप्प कसे काय बसले आहे, असा संतप्त सवाल पंचवाडी बचाव समितीने केला आहे. "आम आदमी' चे मुख्यमंत्री म्हणवणारे दिगंबर कामत हेच खाण खात्याचेही मंत्री आहेत, त्यामुळे आता पंचवाडीवासीयांना त्यांनाच याचा जाब विचारावा लागेल. पंचवाडीतील नियोजित खाण प्रकल्प रद्द करण्याचे ठोस आश्वासन मुख्यमंत्री कामत यांनी दिले नाही तर संपूर्ण पंचवाडी गाव पर्वरी विधानसभेवर धडकतील, असा गर्भित इशारा यावेळी समितीने दिला.
पंचवाडी बचाव समितीकडून नियोजित सेझा गोवा खाण कंपनीच्या प्रकल्पाला विरोध होत असल्याने सध्या त्यांना मोठ्या प्रमाणात धमक्यांचे फोन येत असल्याची खबर आहे. याप्रकरणी त्यांनी मुख्यमंत्री दिगंबर कामत व विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांना भेटण्याची तयारी दर्शवली असून हा प्रकल्प पंचवाडीसाठी कसा घातक ठरेल, याची विस्तृत माहितीच त्यांना करून देण्याचे समितीने ठरवले आहे. दरम्यान, राज्यातील जनतेला सरकारचा आधार आधार असतो पण पंचवाडीबाबत सध्या जो प्रकार सुरू आहे तो पाहता विद्यमान कॉंग्रेस आघाडी सरकारने पंचवाडी गावाला वाळीत टाकले आहे की काय, असा संशय निर्माण होतो,अशी प्रतिक्रिया माजी सरपंच तथा पंचवाडी बचाव समितीचे नेते क्रिस्टो डिकॉस्ता यांनी व्यक्त केली. पंचवाडी हा भाग अजूनही विकासापासून वंचित आहे व शेती,बागायती तसेच इतर कृषीसंबंधी व्यवसाय हाच येथील लोकांच्या उपजीविकेचे साधन आहे. सेझा गोवा खाण कंपनीच्या कोडली ते पंचवाडी येथील नियोजित खनिज रस्ता व विजर खाजन बंदर प्रकल्पामुळे या गावात विकासाची गंगा वाहेल व येथील कवडीमोल जमिनीला सोन्याचे दर प्राप्त होतील, असे म्हणून या प्रकल्पाचे समर्थन करणारे लोक किती स्वार्थी आहेत, हे लक्षात येते,असेही ते म्हणाले. या नियोजित प्रकल्पामुळे गावचा विकास सोडाच पण गाव भिकेला लागेल व उपजीविकेचे साधन नष्ट होणार असल्याने पंचवाडीवासीयांवर उपासमारीची वेळ ओढवेल,असा धोका श्री.डिकॉस्ता यांनी बोलून दाखवला. एकदा हा सेझाचा प्रकल्प इथे आला की या भागातील लोकांनी आपल्या जमिनी बिल्डरांना विकून अन्यत्र स्थलांतर करावे,असाच सरकारचा कट आहे की काय,असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. ट्रक व्यवसाय व इतर रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्याचे आमिष काही लोकांना कंपनी व सरकारकडून दाखवले जात असले तरी त्यामागे केवळ त्यांचा स्वार्थ असून हा प्रकल्प पंचवाडीवासियांना अजिबात परवडणारा नाही,असेही समितीचे म्हणणे आहे.

ध्वनी नियंत्रण परवान्यासाठी 'पाच हजार' रु.चा मीटर सुरू

पेडण्यातील वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याचा प्रताप
पणजी, दि. ९ (प्रतिनिधी): पेडणे तालुक्यातील विविध किनारी भागांत आयोजित होणाऱ्या पार्ट्यांना कायदेशीर ध्वनिप्रदूषण प्रतिबंधक कायद्याअंतर्गत परवाना देण्यासाठी तेथील एका वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्याकडून प्रत्येकी पाच हजार रुपये घेतले जातात, असा सनसनाटी आरोप या भागातील एका शॅक व्यावसायिकाने केला आहे. या व्यवसायात कोणताही अडथळा निर्माण होऊ नये व प्रशासकीय यंत्रणांकडून केली जाणारी सतावणूक टाळण्यासाठी मुकाट्याने हे पैसे दिले जातात,अशीही माहिती मिळाली आहे.
ध्वनिप्रदूषण नियंत्रण कायद्याअंतर्गत रात्री उशिरापर्यंत सुरू असणाऱ्या पार्ट्यांवर नियंत्रण ठेवण्याचे काम सरकारकडून केले जाते.या कायद्याअंतर्गत रात्री १० वाजेपर्यंत संगीत वाजवण्याची मोकळीक आहे, मात्र, त्यासाठी आवश्यक मान्यता घ्यावी लागते. ५५ डेसिबल क्षमतेने संगीत वाजवण्याच्या परवानगीसाठी १० रुपयांचा अर्ज भरून द्यावा लागतो. लगेच त्याला परवानगी मिळते. मात्र पेडण्यातील अधिकाऱ्याने या परवान्यासाठी पाच हजार रुपयांचा "मीटर'च सुरू केल्याची माहिती हाती आली आहे.
दरम्यान, अशा पद्धतीने ५ हजार रुपये देऊन परवाना मिळवलेल्या शॅक व्यावसायिकांकडून अनेकदा रात्री उशिरापर्यंत संगीत सुरू ठेवले जाते. याबाबत पुढील "कमाई'ची मोकळीक पोलिसांना देण्यात आली असून पुढील जादा वेळेसाठी ते पैसे घेतात व आयोजकांची पाठराखण करतात,असाही आरोप केला जात आहे. किनारी भागात शॅक्स व्यावसायिक आपापल्या ग्राहकांचा वाढदिवस, लग्नांचा वाढदिवस आदी साजरा करण्यासाठी "मिनी पार्टी' आयोजित करतात. या निमित्ताने संगीताचे कार्यक्रम होतात, त्यामुळे रात्री १० पर्यंतचा परवाना घेणे त्यांना भाग पडते. आतापर्यंत दिलेल्या परवान्यांचा आढावा घेतल्यास महिन्याला किमान २० पार्ट्यांचे आयोजन होते,असे सांगितले जाते.
कार्निव्हलच्या नावाने पार्ट्यांना ऊत!
राज्यात साजरा होणाऱ्या कार्निव्हल उत्सवानिमित्त येत्या १४ रोजी पेडण्यातील मोरजी,आश्वे व हरमल भागांत मोठ्या प्रमाणात संगीत रजनी पार्ट्यांचे आयोजन करण्यासाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. कार्निव्हल उत्सवानिमित्त मध्यरात्रीपर्यंत गाणेबजावण्याला मुभा देण्याचे सरकारने जाहीर केले आहे, त्यामुळे या भागात पार्ट्यांना पुन्हा एकदा ऊत येणार आहे.
कोरगावांत रंगली पार्टी
मानसीवाडा कोरगांव येथे ८ रोजी मध्यरात्री उशिरापर्यंत विदेशी पर्यटकांची एक पार्टी रंगली होती,अशी माहिती स्थानिक ग्रामस्थांनी "गोवादूत' शी संपर्क साधून दिली. ही पार्टी रात्री २.३० पर्यंत चालली. विशेष म्हणजे या पार्टीसाठी ध्वनिप्रदूषण नियंत्रण परवाना घेण्यात आला नव्हता. पेडणे पोलिसांना या पार्टीची माहिती होती; पण त्यांनीही आपल्या नियमित पद्धतीप्रमाणे या पार्टीला मोकळीक दिली,अशीही चर्चा सुरू आहे. दरम्यान, काल रात्री मोरजी येथे रेव्ह पार्टी आयोजित करण्याच्या हालचाली सुरू होत्या, तथापि, ध्वनिप्रदूषण समितीने हा डाव उधळून लावला. आश्वे- मांद्रे येथील पठारावर नव्यानेच बांधण्यात आलेल्या "इनडोअर व आऊटडोअर
रेस्टॉरंट' मध्ये पार्टी आयोजित करण्याचा आयोजकांचा डाव होता. तोही अखेर हाणून पाडण्यात आला. दरम्यान, आश्वे येथील शांती, स्कायबार , गुडइव्हीनिंग आदी रेस्टॉरंटमध्ये रात्री उशिरापर्यंत विदेशी पर्यटकांचा धिंगाणा सुरू असतो,अशी माहिती स्थानिकांनी दिली आहे. हरमल येथे लर्क क्लब, गॉडवीन रेस्टॉरंट तर मोरजीत फ्रेश क्लबमध्ये असाच प्रकार सुरू असतो. पोलिस मात्र काहीही करीत नाही. एकीकडे सदर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पाच हजार रुपयांचा मीटर सुरू केला असताना रात्री १० नंतरच्या पुढील कमाईचा मीटर पोलिसांना दिला आहे काय,असा उघड सवाल या भागातील स्थानिक करीत आहेत.

जुने गोवे पंच हल्लाप्रकरण कटाचे सूत्रधार आणि शस्त्रांचा शोध सुरूच

पणजी, दि. ९ (प्रतिनिधी): जुने गोवेचे पंच सदस्य विनायक फडते यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यासाठी सुपारी घेतलेला मुख्य आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती आला नसून त्याचा कसून शोध घेत असल्याचे आज जुने गोवे पोलिस स्थानकाचे निरीक्षक आशिष शिरोडकर यांनी सांगितले. त्याचप्रमाणे अजून काही संशयिताचा शोध सुरू असल्याचेही ते म्हणाले. तसेच या हल्ल्यासाठी वापरलेली शस्त्रेदेखील अजून पोलिसांच्या हाती लागलेली नाहीत.
घटना घडून गेल्यामुळे ते संशयित फरारी झाले असून ते वावरत असलेल्या अनेक ठिकाणी पोलिसांनी छापे टाकले. परंतु, त्यांच्या शोध लागलेला नाही. दरम्यान, कोणी आणि कशासाठी हा हल्ला घडवून आणला आहे, याची संपूर्ण माहिती गोवा वैद्यकीय इस्पितळात उपचार घेत असलेल्या फडते यांनी पोलिसांना पुरवलेली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार विनायक फडते याच्यावर हल्ला करण्याची सुपारी एका वर्षापूर्वी देण्यात आली होती. परंतु, ज्यांना ही सुपारी दिली तेच एका खून प्रकरणात तुरुंगात गेल्याने त्याची अंमलबजावणी होऊ शकली नव्हती. काही महिन्यांपूर्वी या "गॅंग'मधील गुन्हेगार आणि त्यांचा म्होरक्या जामिनावर सुटून बाहेर आल्यानंतर त्या "सुपारी'ची पूर्तता करण्यात आली. त्यासाठी त्यांना एक लाख रुपये मिळाले. सदर सुपारी दिलेल्या राजेश देसाई यांनी आपला गुन्हा कबूल केल्याचे पोलिसांनी सांगितले. पुढील तपास जुने गोवे पोलिस स्थानकाचे निरीक्षक आशिष शिरोडकर करीत आहेत.

'सीआरझेड'प्रश्नी राज्य सरकारने हात झटकले!

..आंदोलनाच्या धमकीची मुख्यमंत्र्यांकडून खिल्ली
पणजी, दि. ९ (प्रतिनिधी): किनारी भागातील मच्छीमार व इतरांची पारंपरिक घरे वाचवण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. किनारी नियमन विभाग हा केंद्रीय कायदा आहे, त्यामुळे राज्य सरकार याबाबतीत काहीच करू शकत नाही. आत्तापर्यंत या कायद्याअंतर्गत पाडण्यात आलेल्या बांधकामांत मच्छीमारांची घरे आहेत, असेही आपल्याला वाटत नाही, त्यामुळे रापणकारांचो एकवट संघटनेतर्फे देण्यात आलेल्या धमकीला काहीही अर्थ नाही, अशी खिल्ली मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी उडवली.
आज इथे एका पत्रकार परिषदेच्या निमित्ताने ते भेटले असता पत्रकारांनी त्यांना "सीआरझेड' संबंधी विचारले. रापणकारांचो एकवट संघटनेच्यावतीने माथानी साल्ढाणा यांनी सरकारला "सीआरझेड' प्रकरणी तोडगा काढण्यासाठी निर्वाणीचा इशारा दिला आहे. राज्य सरकारने मच्छीमार व इतरांची घरे वाचवली नाहीत तर राज्यभर हिंसक आंदोलन छेडण्याचा इशाराच त्यांनी दिला आहे. मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्यावर मात्र या इशाऱ्याचा कोणताही परिणाम जाणवला नाही. या इशाऱ्याला काहीही किंमत नाही, असे म्हणून त्यांनी खिल्ली उडवलीच पण त्याही पलीकडे जाऊन तोडगा काढण्याबाबत ठोस आश्वासन न देता राज्य सरकार याबाबतीत काहीही करू शकत नाही, असे म्हणून हा चेंडू केंद्राकडे टोलवला. या कायद्याअंतर्गत कारवाई सुरू झाली असली तरी त्यात अद्याप एकाही मच्छीमार कुटुंबाच्या घरांना हात लावण्यात आला नाही,असेही ते म्हणाले.
अंतर्गत सुरक्षेसाठी ५ कोटी रुपयांचा प्रस्ताव
अलीकडेच दिल्ली येथे महागाई व अंतर्गत सुरक्षेबाबत सर्व मुख्यमंत्र्यांशी एका खास बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी अंतर्गत सुरक्षेसंबंधी व्यापक चर्चा करण्यात आली. गोव्यासाठी पणजी येथे मुख्य नियंत्रण कक्ष स्थापन करून सध्याच्या २२ वरून अतिरिक्त ५० ते ६० "पीसीआर' वाहने खरेदी केली जातील व त्याव्दारे सर्वत्र टेहळणी सुरू होईल. किनारी सुरक्षेसाठी सध्याच्या ३ पोलिस स्थानकांसह अतिरिक्त ४ पोलिस स्थानकांचाही प्रस्ताव विचाराधीन आहे. राज्यात विभागीय फोरेन्सिक प्रयोगशाळाही उभारण्याचा विचार सुरू आहे,असे ते म्हणाले. राज्य सरकारने या सर्व गोष्टींसाठी ५ कोटी रुपयांचा प्रस्ताव पाठवल्याचीही माहिती त्यांनी दिली.
महागाई नियंत्रणासाठी सहकारी संस्थांची मदत घेणार
महागाई नियंत्रणासाठी राज्य सरकारने नागरी पुरवठा खाते, कृषी खाते व फलोत्पादन महामंडळाच्या सहकार्याने योजना सुरू केली असली तरी आता राज्यातील सहकारी संस्थांच्या मदतीने ही योजना अधिक लोकांपर्यंत पोहचवण्याचे प्रयत्न केले जातील,अशी माहिती त्यांनी दिली.सध्या १० वाहने एकूण १४२ केंद्रावर जाऊन कमी दरातील वस्तूंची विक्री करतात. ही केंद्रे वाढवण्यात येणार आहेत,अशीही माहिती त्यांनी दिली.केंद्र सरकार महागाईबाबत पूर्णपणे गंभीर असल्याचेही ते म्हणाले.

Tuesday, 9 February, 2010

...तर पंचवाडीत रक्ताचे पाट वाहतील!

खाण प्रकल्पाविरोधात पंचवाडीवासीयांचा मोर्चा
- उपसरपंचांना अपात्र ठरवा
- सचिवांवर कारवाई करा
- वादग्रस्त ठराव रद्द करा


फोंडा, दि.८ (प्रतिनिधी) - बहुसंख्य पंचवाडीवासीयांच्या मागणीची अवहेलना करून व आपल्या अधिकाराचा गैरवापर करून सेझा गोवा खाण कंपनीच्या नियोजित कोडली ते पंचवाडी खनिज रस्ता आणि विजर खाजन बंदर प्रकल्पाला पंचायतीने मान्यता दिली तर पंचवाडीच्या अस्तित्वासाठी जीवही पणाला लावण्यास आम्ही मागे राहणार नाही. हे सरकार जनतेची कदर करीत असेल तर त्यांनी तात्काळ हा प्रकल्प रद्द करावा; अन्यथा पंचवाडीत रक्ताचे पाट वाहतील, असा गर्भीत इशारा पंचवाडी बचाव समितीने दिला आहे.
पंचवाडी ग्रामपंचायतीच्या रविवार ७ फेब्रुवारी रोजी घेण्यात आलेल्या ग्रामसभेत घिसाडघाईत संमत झालेल्या खाणसमर्थन ठरावाच्या निषेधार्थ पंचवाडी बचाव समितीने आज (दि.८) दुपारी तिस्क फोंडा येथील गटविकास कार्यालयावर मोर्चा आणला. पंचवाडीचे प्रभारी सरपंच जॉन ब्रागांझा यांनी एकतर्फीपणे घेतलेला हा ठराव त्वरित रद्द करावा,अशी मागणी समितीने केली. पंचायत सचिव प्रदीप नाईक यांचाही या कटात सहभाग आहे, त्यामुळे त्यांचीही बदली करावी, अशी मागणी समितीने गटविकास अधिकारी अरविंद खुटकर यांच्याकडे निवेदन सादर करून केली. याप्रसंगी शिरोड्याचे आमदार महादेव नाईक यांनी समितीला आपला पूर्ण पाठिंबा दर्शवला. तसेच त्यांनी पंचवाडीवासीयांच्या मागे ठामपणे उभे राहण्याचे आश्वासन दिले.
पंचवाडीच्या पंच लीना डिकॉस्टा, पंच केशव नाईक, पंच अरुण गावकर, माजी सरपंच क्रिस्टो डिकॉस्टा आदी अनेकजण या मोर्चात सहभागी झाले होते. रविवार ७ फेब्रुवारी रोजी घेण्यात आलेल्या ग्रामसभेचे इतिवृत्त अपूर्णावस्थेत आहे. पंचायत सचिवांनी ग्रामसभेचे इतिवृत्त मंगळवार ९ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.३० वाजेपर्यंत गट विकास कार्यालयाला सादर करावे, अशी तोंडी सूचना गटविकास अधिकारी श्री. खुटकर यांनी पंचायत सचिवांना ग्रामस्थांसमोर केली. उपसरपंच जॉन ब्रागांझा यांनी यापूर्वीच हा ठराव सेझा गोवा खाण कंपनीच्या समर्थनार्थ घेण्यात येईल,अशी दर्पोक्ती केली होती. ग्रामसभेचा विरोध असतानाही एकतर्फीपणे त्यांनी घेतलेल्या ठरावाचे पुरावेच ग्रामस्थांनी गटविकास अधिकाऱ्यापुढे सादर केले. गटविकास कार्यालयातर्फे पाठवण्यात आलेल्या ग्रामसभा निरीक्षकांचा अहवाल आणि ग्रामस्थांनी सादर केलेले पुरावे यात बरेच साम्य असल्याचेही यावेळी श्री.खुटकर यांनी मान्य केले.
गटविकास अधिकाऱ्यांच्या समक्ष ग्रामस्थांनी उपस्थित पंचायत सचिवांवर प्रश्नांचा भडिमार केला. ग्रामसभेला पोलिस संरक्षण असताना ठरावाचे दस्तऐवज घेऊन ग्रामसभेतून पळ का काढला, असा थेट सवाल करून ग्रामस्थांनी सचिवांना चांगलेच फैलावर घेतले. वादग्रस्त ठराव समंत करून उपसरपंच श्री. ब्रागांझा व पंचायत सचिवांनी पंचायत कार्यालयातून पलायन केले यावरून त्यांनी आपला स्वार्थी हेतू स्पष्ट केला,असा ठपकाही ग्रामस्थांनी ठेवला. आपल्या वैयक्तीक स्वार्थासाठी पंचवाडी गावचा लिलावच करण्याचा हा प्रकार असल्याने त्याची गंभीर दखल घेण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी गट विकास अधिकाऱ्यांकडे केली. पंचवाडी ग्रामसभेत उपसरंपच व सचिवांनी लोकशाहीचा गळा कसा घोटला याचीही सखोल चौकशी व्हावी,असे निवेदनही ग्रामस्थांनी सादर केले.
आमदार महादेव नाईक यांनी सरकारने लोकांच्या भावनेशी खेळू नये असा इशारा देत या कटात पंचायत सचिव सहभागी असल्याने त्यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी केली. शिरोडा मतदारसंघातील चारही पंचायतींचे सचिव हे सध्या येथीलच एका राजकीय नेत्याच्या हातातले बाहुले बनलेले आहेत,अशी टीका केली. काही निवडक लोकांची कामे तात्काळ केली जातात तर उर्वरीत लोकांना विविध कामासाठी आपल्या कार्यालयात हेलपाटे घालायला लावतात, अशी तक्रारही त्यांनी केली.
पंचवाडीचा गळा घोटणाऱ्या सेझा कंपनीच्या खनिज प्रकल्पाला कदापि मान्यता दिली जाणार नाही, असा खणखणीत इशारा पंच सदस्य लीना डिकॉस्टा यांनी दिला. सेझाचा प्रकल्प नको अशा आशयाचा एक ठराव ग्रामस्थांनी यापूर्वीच संमत केला आहे याची आठवणही त्यांनी करून दिली.
यावेळी मोर्चेकरी ग्रामस्थांनी "आमची शेतां आमका जाय', "पंचायत सचिवाची हकालपट्टी करा', "सेझाचा खाण प्रकल्प हद्दपार करा' अशा घोषणा दिल्या.
तिस्क फोंडा येथील आगियार मैदानावरून मोर्चाला प्रारंभ झाला. येथील सरकारी इमारतीजवळ पोलिसांनी मोर्चा अडविला. त्यानंतर ग्रामस्थांच्या प्रतिनिधीशी गटविकास अधिकारी श्री. खुटकर यांनी चर्चा केली.
बस चालकाला धमकी
पंचवाडी येथील खाण प्रकल्पाला विरोध करणाऱ्या ग्रामस्थांना फोंड्याला मोर्चासाठी घेऊन आलेल्या खासगी बसच्या चालकाला अज्ञात व्यक्तीने चालकाच्या मोबाईलवर फोन करून जीवे मारण्याची, बसची नासधूस करण्याची आणि बसला आग लावण्याची धमकी दिली आहे. यासंबंधी बसचालक अल्लाउद्दीन शेख यांनी फोंडा पोलिस स्टेशनवर तक्रार दाखल केली आहे. फोंड्यात आलेल्या ग्रामस्थांना पंचवाडी येथे घेऊन जात असताना हा फोन आला. त्यामुळे ग्रामस्थांत संतापाची लाट उसळली आहे. पोलिसांनी, धमकी देणाऱ्याला त्वरित अटक करावी, अशी जोरदार मागणी संतप्त ग्रामस्थांनी केली आहे.

चौघाही संशयितांना १४ दिवसांची कोठडी

जुने गोवे पंच हल्ला प्रकरण

मुख्य सूत्रधाराचा
जामिनासाठी अर्ज

पणजी, दि. ८ (प्रतिनिधी) - जुने गोवे पंचायतीचे पंच सभासद विनायक फडते याच्यावर हल्ला करण्यासाठी वापरण्यात आलेल्या हत्यारांचा अद्याप छडा लागलेला नसून या प्रकरणातील चारही संशयितांना न्यायालयात हजर करून १४ दिवसांची पोलिस कोठडी मिळवण्यात आली आहे. दरम्यान, या हल्ल्यामागील मुख्य सूत्रधार राजेश देसाई याने जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला आहे. तसेच, बांबोळीतील "गोमेकॉ' इस्पितळात उपचार घेत असलेल्या विनायक याची प्रकृती सुधारत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
विनायकचा काटा काढण्यासाठी सुपारी घेतलेला मुख्य संशयित अद्याप फरार झाला असून त्याबाबत कोणतीही माहिती रात्री उशिरापर्यंत पोलिसांच्या हाती लागली नव्हती. मात्र प्रत्यक्ष हल्ला करणारे तिघे संशयित पोलिसांच्या ताब्यात आहेत. त्यांची सखोल चौकशी सुरू आहे. त्यातून अनेक महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागल्याचे सूत्रांनी सांगितले.
विनायकवर प्राणघातक हल्ला करण्यासाठी तलवार, सळया आणि पळून जाण्याकरता एक दुचाकी वापरण्यात आली होती. यातील कोणतीही हत्यारे पोलिसांच्या हाती लागलेली नाहीत. त्यामुळे आरोपींना कडक शिक्षा होण्यासाठी व ही बाब न्यायालयात सिद्ध करण्यासाठी सदर हत्यारे मिळवणे महत्त्वाचे बनले आहे. याविषयीचा अधिक तपास जुने गोवे पोलिस स्थानकाचे निरीक्षक आशिष शिरोडकर करीत आहेत.

पंचायत सचिव, पोलिस हेडकॉन्स्टेबल जेम्स मृत्यूप्रकरणी तितकेच जबाबदार

उभयतांवरही कठोर कारवाईची मागणी
कुळे, दि. ८ (प्रतिनिधी) - येथील जेम्स आल्मेदा मृत्युप्रकरणामुळे संपूर्ण गाव आणि परिसर ढवळून निघाला असताना जेम्स याच्या मृतदेहाची घिसाडघाईने विल्हेवाट लावण्यात इतरांसहीत ज्या दोन सरकारी कर्मचाऱ्यांचाही तितकाच सहभाग होता त्यांच्याविरूद्ध सरकार नेमकी कोणती कारवाई करते याकडे आता अनेकांचे लक्ष लागले आहे. कुळे पंचायतीचा सचिव व एक पोलिस हेडकॉन्स्टेबल जेम्सचे अंत्यविधी उरकण्यास बार मालकाइतकेच जबाबदार असल्याने त्यांच्यविरोधात फौजदारी स्वरूपाची कारवाई होईल तेव्हा होईल; परंतु त्या दोघांविरूद्ध प्रशासकीय कारवाई तात्काळ होणे गरजेचे आहे, अशी जोरदार मागणी कुळे नागरिक समितीने आज केली.
नागरिक समितीच्या म्हणण्यानुसार, ज्या कथित डॉक्टरचा दाखला यापूर्वी तो अधिकृत ठरत नसल्याच्या सबबीखाली स्थानिक पंचायतीने नाकारला होता, त्याच पंचायतीचा सचिव जेम्स मृत्यू प्रकरणी तो स्वीकारून त्याच्या आधारे जेम्सचे मृत्यू प्रमाणपत्र (डेथ सर्टिफिकेट) त्या बार मालकाला देते हे केवळ धक्कादायक होते. जेम्सचा मृत्यू नेमका कसा झाला याबद्दल नागरिकांमध्ये संशयाचे वातावरण कायम आहेच. मात्र, जेम्सच्या मृत्यूच्या नेमक्या कारणाचा मुद्दा क्षणभर बाजूला ठेवला तरी कोणताही अधिकार नसतानाही त्याचा मालक म्हणवणारी एक व्यक्ती जेम्सच्या मृतदेहाची तडकाफडकी विल्हेवाट लावते हे कायद्याच्या परिभाषेत गुन्हेगारी स्वरूपाचे कृत्य आहे. याकामी बार मालकाला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मदत केल्याबद्दल त्या सचिवावर कारवाई होणे क्रमप्राप्त ठरते. मात्र गेल्या काही दिवसांपासून हे प्रकरण सुरू असताना, पोलिसांनी सदर महत्त्वपूर्ण मुद्याकडे पूर्ण दुर्लक्ष केले असल्याने ते सचिवालाही पाठीशी घालू पाहात असल्याचा आरोप नागरिक समितीने केला आहे.
अत्यंत आक्षेपार्ह पध्दतीने मृतदेहाची विल्हेवाट लावण्याच्या या कामी एका हेड कॉन्स्टेबलचाही तितकाच सहभाग असल्याने खात्यांतर्गत चौकशी होऊन त्याच्यवर कठोर कारवाई करण्याची आवश्यकता असल्याचे समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आज सांगितले. एखाद्या बेवारशी भिकाऱ्याच्या मृतदेहाचीही शासनातर्फे विल्हेवाट लावली जाते तेव्हा अनेक प्रक्रियांना पोलिसांना सामोरे जावे लागते. या प्रक्रिया पूर्ण करण्यात अनेकदा अडचणी येत असल्याने काहींचे मृतदेह महिनोन्महिने "गोमेकॉ' तसेचे हॉस्पिसियोच्या शवागरात पडून असतात. मात्र जेम्सला कोणीच वाली नसल्याची सबब पुढे करून त्याचा मालक आणि अन्य काहीजण त्याच्या मृतदेहाची क्षणात वासलात लावतात, स्थानिक कुळे पोलिसांना, या प्रकरणी चौकशी करून गेलेल्या केपे दंडाधिकाऱ्यांनाही त्यावर विचार करण्यासाठी आठ दिवसांच्या कालावधीची गरज भासते याला काय म्हणायचे, असा सवालही कुळे नागरिक समितीने "गोवादूत'शी बोलताना आज केला.
या एकंदर प्रकरणातील सगळ्यात महत्वाची गोष अशी की, जेम्सचा मृतदेह मातीला लावून (अंत्यविधी) किमान पंधरा दिवसांचा कालावधी लोटला आहे. नागरिक समितीने या दफनविधी बाबत संशय व्यक्त करूनच जवळपास सहा सात दिवसांचा कालावधी उलटला आहे. जेम्सच्या मृत्यूचे खरे कारण जाणून घेण्यासाठी शक्य तितक्या लवकर या मृतदेहाचे विच्छेदन होणे आवश्यक होते, परंतु आधी कुळे पोलिसांनी चौकशीच्या नावाखाली विलंब लावला व आता केपे दंडाधिकाऱ्यांनी आठ दिवसात अहवाल सादर करण्याचे सूतोवाच करून याप्रकरणी जिल्हा प्रशासनही या प्रकरणाकडे किती सहजतेने पाहते, हेच दाखवून दिले आहे. या संदर्भात आता न्यायालयाखेरीज न्याय मिळणार नाही हेच जवळपास स्पष्ट झाले असल्याने नागरिक समितीची त्या दिशेने वाटचाल सुरू असल्याचेही समितीचे अध्यक्ष व अन्य पदाधिकाऱ्यांनी आज स्पष्ट केले.

खोतोडेतील खाणींमुळे पर्यावरणाची जबर हानी

वाळपई, दि. ८ (प्रतिनिधी) - सत्तरी तालुक्यातील वाळपई खोतोडे येथे सुरू असलेल्या खाणींमुळे पर्यावरणाची जबरदस्त हानी होत आहे. त्यामुळे तेथील पर्यावरणवादी आणि स्थानिकांत कमालीची अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्याचबरोबर बागायतींवर संकट कोसळले असून कुळागरे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.
या भागात सध्या क्षमतेपेक्षा जास्त माल भरून खनिज मालाची वाहतूक ट्रकांतून केली जात असून यावर संबंधित सरकारी यंत्रणेचे कोणतेच नियंत्रण नसल्याचे चित्र दिसत आहे. बेदरकारपणे होणाऱ्या खनिज वाहतुकीमुळे खोतोडे भागात प्रचंड धूळ प्रदूषण होत त्यामुळे येथील पर्यावरण, बागायती, कुळागरे व नागरिकांच्या आरोग्याला धोका उत्पन्न झाला आहे.
गुळेली भागातून होणाऱ्या खाण वाहतुकीमुळे तेथील नागरिक त्रस्त बनले असून या संदर्भात आपले गाऱ्हाणे संबंधित खात्याकडे नेण्याचे सुतोवाच त्यांनी केले आहे. या खनिज वाहतुकीमुळे बिंबल - फोंडा रस्त्याच्या बाजूला असलेल्या घरांवर धूळ साचते. तसेच रस्त्याच्या बाजूलाच असलेली कुळागरे व कुळागरांतील सुपारी, नारळ, केळी इत्यादी बागायती पिकांवरही धूळ साचत असल्यामुळे त्यांच्यावर विपरीत परिणाम होत आहे. या बागायतींचे उत्पन्न घटत असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले.
दरम्यान, आंबेलीतील बंद करण्यात आलेल्या बेकायदा खाणींचे माल वाहतूक करणारे ट्रक खोतोडेतील अन्य खाणींच्या ट्रकांबरोबर बेमालूमपणे घुसवले जात असल्याचीही खबर मिळाली आहे. त्यामुळे या भागात वाहतुकीची प्रचंड कोंडी होत आहे. मात्र संबंधित खाते राजकीय दबावामुळे या वाहतुकीवर कोणतीच कारवाई करत नसल्याचे चित्र दिसते आहे.
दरम्यान, वृत्तपत्रांतून सातत्याने खोतोडे खाणीसंदर्भात बातम्या प्रसारित होत असल्यामुळे या भागात प्रचंड खळबळ माजली असून, आता अनेक नागरिकांनी या खाणींच्या विरोधात भूमिका घ्यायला सुरुवात केली आहे. यामुळे सत्तरीतील राजकारणही ढवळून निघाले असून येत्या जिल्हा पंचायत निवडणुकीत हा एक मोठा मुद्दा बनणार असल्याची चर्चा वर्तविण्यात येते आहे.
खोतोडे पंचायत राजकीय दृष्ट्या महत्त्वाची असून खाणीसंदर्भात सदर पंचायतीने घेतलेल्या वादग्रस्त भूमिकेमुळे विरोधकांना आयतीच संधी प्राप्त झाली असून याचा विपरीत परिणाम सत्ताधारी गटावर होण्याची चिन्हे आहेत.
सत्तरीच्या पत्रकारांतर्फे "त्या' घटनेचा निषेध
सत्तरी तालुक्यातील आंबेली येथे ज्या खाणीला सील ठोकण्यात आले आहे त्या खाणीची छायाचित्रे घेण्यासाठी गेलेले "गोवादूत'चे प्रतिनिधी पद्माकर केळकर यांना तेथील एका खाण अधिकाऱ्याने अटकाव केल्याबद्दल सदर घटनेचा सत्तरी रिपोर्टर फोरमने कडक निषेध केला आहे. त्या अधिकाऱ्यावर सरकारने त्वरित कारवाई करावी, अशी मागणी फोरमचे अध्यक्ष दशरथ मांद्रेकर यांनी केली आहे.

बगलरस्त्यासाठी आता सर्वपक्षीय एकवटले.!

कुडचड्यात "पीपल्स मुव्हमेंट'ची स्थापना

कुडचडे, दि. ८ (प्रतिनिधी) : सर्व राजकीय मतभेद विसरून सांगे, केपे तालुक्यातील खनिज वाहतुकीसाठी अत्यंत गरजेच्या असलेल्या बगलरस्त्याची मागणी धसास लावण्यासाठी सर्व राजकीय पक्षांच्या कुडचडे मंडळांनी एकत्रितपणे "पीपल्स मुव्हमेंट' या बॅनरखाली सामूहिक लढा देण्याचे ठरविले आहे.
या लढ्याला दक्षिण गोवा बसमालक संघटना, दक्षिण गोवा ट्रक मालक संघटना, कुडचडे व्यापारी संघटना यांनाही आपला पाठिंबा जाहीर केल्याने लढ्यास वजन प्राप्त झाले आहे. लढ्याचा एक भाग म्हणून १० फेब्रुवारी रोजी गोवा सरकारचे लक्ष वेधण्यासाठी कुडचडे शहरात एक भव्य रॅलीचे आयोजन करून शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे.
यानिमित्ताने घेतलेल्या पत्रकार परिषदेत या लढ्यासंबंधी सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी सविस्तर माहिती देऊन मरेपर्यंत लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार केला. कुडचडे भाजप अध्यक्ष प्रदीप नाईक, प्रवक्ते आशिष करमली, कॉंग्रेसचे मनोहर नाईक, शिवसेनेचे धनराज नाईक, "मिशन बायपास'चे निमंत्रक प्रदीप काकोडकर, बस संघटनेचे मान्युएल फर्नांडिस, ट्रक संघटनेचे रघुनाथ नाईक, कुडचडे व्यापारी संघटनेचे दिवाकर वस्त आदींची याप्रसंगी उपस्थिती होती.
या भागातील लोकांच्या अस्तित्वाचा हा प्रश्न असल्याने सर्व राजकीय मतभेद विसरून आम्ही बगलरस्त्यासाठी आम्ही एका बॅनराखाली आलो आहोत, असे यावेळी भाजपचे प्रदीप नाईक यांनी सांगितले.
खनिज वाहतुकीमुळे याठिकाणी निर्माण झालेली भयंकर समस्या सर्वांना माहीत आहेच. त्यावर सातत्याने आवाज उठवूनही सरकारने आजपर्यंत या महत्त्वाच्या मागणीकडे गांभीर्याने पाहिले नाही, असा आरोप उपस्थितांनी केला.
नगरसेवक मारूती नाईक, तसेच कपिल सावंत, संध्या मोपकार हेही यावेळी उपस्थित होते. कुडचडे मंडळाचे अध्यक्ष दिगंबर नाईक यांनी या परिषदेला आमंत्रित केले होते. परंतु ते उपस्थित नसल्याचा उल्लेख प्रदीप काकोडकर यांनी केला. यासंबंधी श्री. नाईक यांच्याशी संपर्क साधला असता हा लढा भाजपने सुरू केला असून त्यांच्याबरोबर कॉंग्रेस पक्ष व्यासपीठावर येऊ शकत नसल्याचे त्यांनी सांगितले.

Monday, 8 February, 2010

खोतोडे - गवाणे खाणींवरून "त्या' मधू कोडाचे पितळ उघडे

वाळपई, दि. ७ (प्रतिनिधी) - विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी गेल्या विधानसभा अधिवेशनात गोव्यातील ज्या "मधू कोडाचा' उल्लेख केला होता तो मधू कोडा म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून विद्यमान सरकारमधील एक "बडा' मंत्रीच असल्याचे खोतोडे - गवाणे खाण प्रकरणामुळे सिद्ध झाल्याची चर्चा येथील भागांत गेले तीन दिवस जोरात सुरू आहे. सदर मंत्र्याने सरकारवर दबाव आणून या निसर्गसंपन्न भागांत मोठ्या प्रमाणात खनिज व्यवसाय सुरू करण्याचा घाट घातला असून स्वतः नामानिराळे राहण्याचे तंत्र त्याने आजपर्यंत मोठ्या खुबीने निभावल्याचे उघडपणे बोलले जात आहे. एखाद्या खनिज प्रकल्पाला नागरिकांनी विरोध केला की हा मंत्री सुरुवातीला नागरिकांच्या बाजूने उभे राहण्याचे ढोंग करतो व प्रकरण थोडे थंड झाले की मागील दाराने प्रकल्प विरोधकांना पैशांचे आमिष दाखवून किंवा अन्य प्रकारची प्रलोभने दाखवून त्यांची तोंडे बंद करतो असाच अनुभव आजपर्यंत आल्याने येथील नागरिक आता कमालीचे सावध झाले आहेत. या संदर्भात "गोवादूत'ने घेतलेल्या भूमिकेचे जोरदार स्वागत करण्यात आले आहे.
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, खाण व्यवसायाच्या विरोधात या मंत्र्याने आजपर्यंत एकदाही निर्णायक भूमिका घेतलेली नाही. खोतोडेतील खाण बंद करू, अशी पोकळ घोषणाही त्यांनी मागे केली होती. सदर खाणीला नागरिकांचा मोठ्या प्रमाणात विरोध होता. परंतु, या मंत्र्यांच्या हस्तक्षेपामुळे तो विरोध थंडावला. त्यानंतर ही खाण सुरू करण्याचा पुन्हा घाट घातला गेला व त्या माध्यमातून सदर मंत्र्याने रग्गड पैसा कमवल्याची चर्चाही या भागात जोरदारपणे सुरू आहे. या मंत्र्याने दबावतंत्र वापरून खुद्द मुख्यमंत्र्यांनाच जेरीस आणले असून मुख्यमंत्र्यांकडे असलेल्या खाण खात्यावरील नियंत्रण अप्रत्यक्षरीत्या या मंत्र्याकडेच असल्याचे सांगितले जाते.
खोतोडे पंचायतीची
वादग्रस्त भूमिका
दरम्यान, खोतोडेतील खाणीमुळे मुख्यमंत्र्यांनी गेल्या विधानसभेत दिलेले आश्वासन हवेतच विरल्याचे वृत्त "गोवादूत'मधून प्रसिद्ध होताच त्यात उल्लेख असलेल्या आंबेली येथील सर्व्हे क्र. ७।१ मधील खाणीला सील ठोकण्यात आले; परंतु या प्रकरणामुळे खोतोडे पंचायतीची भूमिका मात्र वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
सदर पंचायतीने सर्व्हे क्र. ७।१ मध्ये तळे खोदण्यासाठी म्हणून दि. १४।०९।२००७ रोजी परवाना दिला होता. या परवान्याच्या आडून सदर सर्व्हे क्रमांकाच्या जमिनीत बेकायदा खनिज उत्खनन सुरू झाले. येथील ग्रामस्थांनी या खाणी विरोधात आवाज उठवण्यासाठी दि. २३.४.२००६, १४.१०. २००७, २.१०.२००८, १५.८. २००९ व १९.९. २००९ या तारखांना झालेल्या ग्रामसभांत आवाज उठवून खाणविरोधी ठरावही संमत केला होता. मात्र, पंचायतीने या विरोधाची अजिबात दखल तर घेतली नाहीच; उलट बघ्याची भूमिका घेऊन सदर प्रकरण "जैसे थे' ठेवले. त्यामुळे पंचायतीची भूमिका वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. पंचायतीने हा परवाना कोणत्या आधारावर दिला याची दक्षता आयोगामार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.

खाणीचे फोटो घेण्यास
पत्रकाराला मज्जाव
दरम्यान, आज दि. ७ रोजी सकाळी १०.३० च्या सुमारास खोतोडे - गवाणे - आंबेली या भागांत "गोवादूत'च्या प्रतिनिधीने भेट देऊन सुरू असलेल्या खाणींचे फोटो घेण्याचा प्रयत्न केला असता तेथील एका अधिकाऱ्याने या प्रतिनिधीला मज्जाव केला. "आमच्या पाठीशी बडे राजकीय नेते व खुद्द मंत्रीच असल्याने तुम्ही आमचे काहीही बिघडवू शकणार नाही अशी वल्गनाही त्याने केली. सदर खाण कायदेशीर असल्याचा दावाही त्याने केला व ही खाण कुठल्याही स्थितीत बंद होणार नाही असा धमकीवजा इशाराही दिला. मात्र "गोवादूत'च्या प्रतिनिधीने या अधिकाऱ्याच्या दादागिरीला न जुमानता मोठ्या शिताफीने छायाचित्रे घेतलीच. या छायाचित्रांतून सदर खाणीमुळे येथील जलस्रोतांची व वनक्षेत्राची कशी हानी होत आहे हे स्पष्ट झाले असून वनखात्याची व प्रदूषण नियंत्रण मंडळाची विश्वासार्हताही संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
अधिक माहितीनुसार, खोतोड्यात सध्या सुरू असलेल्या खाणीमुळे येथील जंगल संपदेवर विपरीत परिणाम होणार आहे. सध्या या भागात सुरू असलेल्या खाणीमुळे म्हादई अभयारण्याला धोका निर्माण झाला आहे. २००७ साली आणखी एका खाणीला पर्यावरणविषयक दाखला देण्यात आला आहे. मात्र, तो दाखला वनसंरक्षण कायदा १९७२ च्या अंतर्गत संबंधित खाणीने परवानगी घेण्यावर तथा सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या एका खटल्याच्या निकालावर अवलंबून आहे. तसेच या खाणीची जवळपास १६,८९७२ हेक्टर जागा वनक्षेत्रात येत असल्याने या खाणीला अद्याप वन संरक्षण कायद्यानुसार परवानगी मिळाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सदर खाण व्यवसायाची कसून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.
गुड्डेमळ - वेळगेत
खाणीची शक्यता
दरम्यान, खोतोडे पंचायत क्षेत्रातील गुड्डेमळ - वेळगे येथे खाण सुरू करण्याचे राजकीय स्तरावर जोरदार प्रयत्न सुरू असल्याची माहिती हाती आली आहे. त्यासाठी काही लोकप्रतिनिधींना हाताशी धरून सरकारमधील एका मंत्र्याने जमिनीचे कागदोपत्री व्यवहार सुरू केले असल्याची खबर आहे. सदर खाण म्हादईच्या काठावरच सुरू करण्यात येणार असून तसे झाल्यास त्यामुळे या भागातील म्हादई नदीवर मोठे संकट कोसळणार आहे.

दंडाधिकाऱ्यांच्या अहवालानुसार कृती कार्यक्रम निश्चित करणार

कुळे, दि. ७ (प्रतिनिधी) - येथील जेम्स आल्मेदा मृत्यू प्रकरणी केपे विभागीय दंडाधिकाऱ्यांकडून अहवाल येईपर्यंत वाट पाहण्याचा निर्णय कुळे नागरिक समितीच्या आज झालेल्या बैठकीत घेतला. दंडाधिकाऱ्यांनी आपल्यापरीने या प्रकरणाची चौकशी केली असल्याने त्यांच्या अहवालानंतरच पुढील कृती ठरविली जाईल, असे आजच्या या बैठकीत ठरवण्यात आले.
या बैठकीला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. जेम्सच्या संशयास्पद मृत्युनंतर ज्या पद्धतीने काहींनी घाईघाईत त्याचे अंत्यसंस्कार उरकून घेतले त्याला आक्षेप घेऊन या संशयास्पद प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी कुळे नागरिक समितीने केली होती. गेले काही दिवस सातत्याने हा विषय लावून धरताना, पोलिसांपासून ते जिल्हाधिकारी स्तरापर्यंत त्यांनी लेखी आणि तोंडी अशा दोन्ही स्तरावर चौकशीची मागणी केली आहे.
कुळे पोलिसांकडून म्हणावा तसा प्रतिसाद न मिळाल्याने हे प्रकरण शेवटी जिल्हा प्रशासनाकडे नेण्यात आले. परिणामी, केपे येथील विभागीय दंडाधिकाऱ्यांनी शनिवारी कुळे येथे येऊन काही लोकांच्या जबान्या नोंदवून घेतल्या. त्यांचा अहवाल येणे अद्याप बाकी असल्याने तोपर्यंत शांत राहण्याचा निर्णय आज घेण्यात आल्याचे समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
जेम्स मृत्यू प्रकरण धसास लावताना नागरिकांनी एकजूट दाखविल्याबद्दल समितीच्या वतीने सगळ्यांचे अभिनंदन करण्यात आले. तसेच न्याय मिळेपर्यंत हा विषय लावून धरण्याचेही यावेळी एकमताने ठरविण्यात आले. जेम्सचा मृत्यू झाला त्यावेळी त्याच्याजवळ कोण होते, त्या रात्री गंभीर अवस्थेत असताना त्याच्या साथीला कोण होते याची कसून चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली. जी व्यक्ती जेम्ससोबत होती, तिच्याकडून सत्य वदवून घेणे अत्यंत गरजेचे असल्याचे मतही यावेळी नागरिकांनी व्यक्त केल्याचे समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
एखाद्या साध्या घटनेच्या वेळीही केवळ संशय व्यक्त केल्यानंतर पोलिस लोकांना सरळ उचलून पोलिस स्थानकात आणतात आणि येथे इतके मोठे गौडबंगाल झाल्यानंतरही पोलिस या प्रकरणातील संशयितांवर कोणतीच कारवाई करत नाहीत, किंवा गुन्हाही दाखल करीत नाहीत हा प्रकार गंभीर असल्याचेही अनेकांनी बैठकीत बोलून दाखवल्याचेही पदाधिकारी म्हणाले.
"गोवादूत'चे अभिनंदन..
जेम्स आल्मेदा याच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा करून याविषयाकडे केवळ पोलिसांचेच नव्हे तर जिल्हा प्रशासनाचेही लक्ष वेधल्याबद्दल कुळे नागरिक समितीने रविवारी झालेल्या बैठकीत "गोवादूत'चे खास अभिनंदन केले.

बहुसंख्यांचा विरोध डावलून मोजक्यांकडूनच ठराव संमत

ग्रामसभेचा विरोध; मात्र ठराव संमत

पंचवाडीच्या "लिलावा'चा असाही डाव

पंचायत कार्यालयाची नासधूस
पंचवाडी - शिरोडा रस्ता रोखला
संतप्त ग्रामस्थांचा आज
गटविकास कार्यालयावर मोर्चा
गटविकास अधिकाऱ्यांशी आज चर्चा

सावर्डे व पणजी, दि. ७ (प्रतिनिधी)- पंचवाडी गावात सेझा गोवा खाण कंपनीतर्फे उभारण्यात येणाऱ्या नियोजित कोडली ते पंचवाडी खनिज रस्ता व विजर खाजन बंदर प्रकल्पाला आज झालेल्या ग्रामसभेत बहुसंख्य ग्रामस्थांनी कडाडून विरोध दर्शवला. मात्र या ग्रामसभेचे नेतृत्व करणारे उपसरपंच जॉन ब्रागांझा यांनी मात्र यापूर्वीच जाहीर केल्याप्रमाणे काही मोजक्याच ग्रामस्थांना हाताशी धरून या प्रकल्पाला पाठिंबा दर्शवणारा ठराव आवाजी मतदानाने घाईगडबडीत संमत करून घेतला व विरोधकांच्या रोषाला सामोरे जावे लागणार या भीतीने प्रत्यक्ष घटनास्थळावरून पळ काढला.
शिरोडा मतदारसंघातील निसर्गसंपन्न अशा पंचवाडी गावावर सध्या खाण कंपनीची वक्रदृष्टी वळली आहे. सेझा गोवा खाण कंपनीला कोडली ते पंचवाडी असा खनिज रस्ता व विजर खाजन येथे बंदर प्रकल्प उभारण्यासाठी राज्य सरकारकडून सार्वजनिक हिताच्या नावाने भूसंपादनही करण्यात आले आहे. या प्रकल्पाला बहुसंख्य ग्रामस्थांचा विरोध असतानाही राज्य सरकारकडून या प्रकल्पाला अभय देण्यात येत आहे. आज या वादग्रस्त प्रकल्पावर चर्चा करण्यासाठी विशेष ग्रामसभेचे आयोजन केले होते. या ग्रामसभेला गावातील सुमारे सहाशेपेक्षा अधिक संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. सकाळी १०.३० वाजता ग्रामसभा सुरू झाल्यानंतर ग्रामस्थांच्या मागणीनुसार सुरुवातीला दुपारी एक वाजेपर्यंत उपस्थित सर्व ग्रामस्थांच्या सह्या नोंदवहीवर घेण्यात आल्या व नंतरच ग्रामसभेला सुरुवात झाली. पंचायतीचे सचिव प्रदीप नाईक यांनी सुरुवातीला मागील सभेचे इतिवृत्त वाचून दाखवले. या इतिवृत्तात अनेक ठरावांच्या बाबतीत चुकीची माहिती लिहिण्यात आल्याचे ग्रामस्थांनी निदर्शनास आणून दिले. आपली चूक मान्य करत त्यांनी या ठरावात दुरुस्ती करण्याचीही तयारी दर्शवली. यावेळी ग्रामस्थांनी दुरुस्ती केलेल्या ठरावांचे वाचन करूनच पुढील विषय हातात घेण्याची मागणी केली असता ती फेटाळण्यात आली.
यानंतर सेझा गोवा खाण कंपनीतर्फे उभारण्यात येणाऱ्या नियोजित कोडली ते पंचवाडी खनिज रस्ता व विजर खाजन बंदर प्रकल्पाचा विषय पुकारताच उपस्थित बहुसंख्य ग्रामस्थांनी या प्रकल्पाला कडाडून विरोध दर्शवला. पंचवाडी गावात खाण व्यवसायाला अजिबात थारा देता कामा नये; एकदा हा प्रकल्प इथे उभा झाला की पंचवाडी गावचा नायनाट अटळ आहे, अशा संतप्त भावना ग्रामस्थांनी व्यक्त केल्या. या प्रकल्पाचे समर्थन करणे म्हणजे पंचवाडी गावाची विक्रीच करण्यासारखे आहे, त्यामुळे हा प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत उभा होऊ देणार नाही, असा निर्धार माजी सरपंच क्रिस्टो डिकॉस्ता व इतर ग्रामस्थांनी व्यक्त केला. ग्रामसभेतील बहुसंख्य ग्रामस्थांकडून प्रकल्पाला विरोध होत असल्याचे पाहून या सभेचे नेतृत्व करणारे उपसरपंच जॉन ब्रागांझा यांनी हा ठराव आवाजी मतदानासाठी घालण्याचे जाहीर केले. मात्र विरोधकांनी या ठरावावर मतपत्रिकेद्वारे किंवा सह्यांद्वारे मतदान घेण्याची मागणी केली. त्यांची ही मागणी फेटाळण्यात आली आणि उपसरपंच जॉन ब्रागांझा यांनी आपल्या मर्जीनुसार हा ठराव ग्रामसभेसमोर ठेवला व या प्रकल्पाला समर्थन करणाऱ्यांनी हात उंचावावे असे आवाहन केले. यावेळी उपस्थितांतील यापूर्वीच ठरवून हजर असलेल्या काही मोजक्याच लोकांनी उभे राहून जोरदारपणे या ठरावाला पाठिंबा दर्शवला व त्यानंतर उपसरपंचांनी विरोधकांना संधी न देताच ठराव संमत झाल्याचे जाहीर केले. यामुळे ग्रामसभेत एकच गदारोळ माजला. मात्र आपण केलेल्या कृतीचा काय परिणाम होणार आहे हे पुरते ठाऊक असलेल्या उपसरपंच आणि त्यांच्या मोजक्याच साथीदारांनी ग्रामस्थांना हुलकावणी देऊन मागील दरवाजातून पळ काढल्याचीही माहिती मिळाली आहे.
या घटनेनंतर पंचायत कार्यालयातील सामानाची नासधूस करण्यात आली. संगणक व पंचायत कार्यालयाच्या खिडक्यांची तावदानेही तोडण्याचा प्रकार घडला. या ठरावाला पाठिंबा देणाऱ्यांनीच हे कृत्य केल्याचा आरोप विरोधी ग्रामस्थांनी केला आहे. या प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांवर खोटा आळ आणण्यासाठीच हा प्रयत्न केल्याची टीकाही त्यांनी केली. दरम्यान, पंचसदस्य केशव नाईक, लिना डिकॉस्ता व अरुण गांवकर यांनी पंचवाडी बचाव समितीच्या मागे ठामपणे उभे राहण्याचा निर्धार केला.
या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी पंचवाडी - शिरोडा रस्ता रोखला व त्यामुळे वाहतुकीचा बराच गोंधळ निर्माण झाला. फोंड्याचे निरीक्षक चेतन पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात पोलिस कुमक या ठिकाणी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आली होती. यावेळी संतप्त ग्रामस्थांना शांत करण्यासाठी अखेर फोंड्याचे गटविकास अधिकारी अरविंद खुटकर यांना पाचारण करण्यात आले. परंतु, त्यांच्या समजावण्यानंतरही खवळलेले ग्रामस्थ शांत होत नसल्याने अखेर आमदार महादेव नाईक यांना मध्यस्थी करावी लागली व या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी आपण ग्रामस्थांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार असल्याचे त्यांनी आश्वासन दिल्यानंतरच रास्ता रोको मागे घेण्यात आला.
गटविकास अधिकाऱ्यांनी या विषयावर चर्चा करण्यासाठी उद्या ८ रोजी दुपारी १२ वाजता बैठक बोलावली आहे. या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी मोर्चाच्या स्वरूपात जाण्यात येईल, अशी माहिती पंचवाडी बचाव समितीने दिली आहे. ग्रामसभेचा अवमान करणारे उपसरपंच व त्यांचे सहकारी पंचसदस्य यांना तात्काळ अपात्र करण्यात यावे, अशीही मागणी यावेळी करण्यात आली.
जॉन ब्रागांझा खाल्ल्या मिठाला जागले !
पंचवाडीच्या सरपंच विएना रॉड्रिगीस या सध्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे रजेवर आहेत, त्यामुळे पंचायतीचा ताबा उपसरपंच लता नाईक यांच्याकडे होता. नियोजित खाण प्रकल्पावर खास ग्रामसभा बोलावण्यात आल्याने व या प्रकल्पाला गावात वाढता विरोध होत असल्याने अखेर त्यांना आपल्या पदाचा राजीनामा देण्यास भाग पाडले गेले व जॉन ब्रागांझा यांची उपसरपंचपदी वर्णी लावण्यात आली. ग्रामसभा होण्यापूर्वीच जॉन ब्रागांझा यांच्याकडून या प्रकल्पाला पाठिंबा देणारा ठराव संमत करण्याचे आव्हान देण्याची भाषा केली जात होती. अखेर ते खाल्ल्या मिठाला जागले व ग्रामसभेत बहुसंख्य ग्रामस्थांचा विरोध असतानाही त्यांनी काही ठरावीक लोकांच्या मदतीने आवाजी मतदानाने ठराव संमत केला व ग्रामसभेतून पळ काढला. कंपनीच्या आमिषांना बळी पडून या विनाशकारी प्रकल्पाला पाठिंबा देणारे लोक अप्रत्यक्षरीत्या पंचवाडी गावाच्या विक्रीलाच मान्यता देत आहेत, त्यामुळे त्यांनी निदान आता तरी आपल्या कर्तव्याला जागून पंचवाडीचा बचाव करण्यासाठी आपला सहभाग द्यावा, असे आवाहन क्रिस्टो डिकॉस्ता यांनी केले आहे.

मित्रानेच दिली हल्ल्याची सुपारी!

- मुख्य सूत्रधारासह चौघांच्या
मुसक्या पोलिसांनी आवळल्या
- हल्लेखोरांची गॅंग कालापुरातील
- हल्ला झालेला पंच विनय फडते
याची प्रकृती चिंताजनक


पणजी, दि. ७ (प्रतिनिधी) - जुने गोवे पंचायतीचे पंच विनायक फडते यांच्यावर शुक्रवारी रात्री प्राणघातक हल्ला करून फरारी झालेल्या तिघा हल्लेखोरांना चोवीस तासांत अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. हा हल्ला करण्यासाठी कालापूर येथील एका "गॅंग'ला सुपारी दिल्याची माहिती पुढे आली असून पोलिसांनी या हल्ल्याची सुपारी देणारा मुख्य सूत्रधार राजेश कुशाली देसाई (३६ रा. जुने गोवे) याला अटक केली आहे.
सदर हल्ला अनेक कारणांसाठी झाला असावा अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. तपासाअंतीच त्यावर संपूर्ण प्रकाश पडेल, असा दावाही पोलिसांनी केला. या प्रकरणी हल्लेखोर महावीर नदाफ (२२ रा. दोना पावला), नेत्रासिंग (मुळचा आसामी) व यान जॉन (मुळचा रा. नागालॅंड) यांना भारतीय दंड संहितेच्या ३०७ आणि १२० (ब) कलमांनुसार अटक करण्यात आल्याचे पोलिस निरीक्षक आशिष शिरोडकर यांनी सांगितले.
दरम्यान, या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या विनायक फडते याची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे "गोमेकॉ'तील सूत्रांनी सांगितले. विनायक याच्यावर परवा रात्री त्याच्याच घराच्या शेजारी दबा धरून बसलेल्या दोघा हल्लेखोरांनी तलवार आणि सळ्यांनी वार करून गंभीर जखमी केले होते. यात त्याच्या डोक्यावर आणि हाताला गंभीर जखम झाली होती. उपचारासाठी रक्तबंबाळ स्थितीत त्याला गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात दाखल केले असता चेंदामेंदा झालेला त्याचा हात शस्त्रक्रिया करून कापावा लागला होता.
जुन्या मित्रानेच दिली सुपारी...
या हल्ल्याचा मुख्य सूत्रधार राजेश देसाई हा विनायक राहात असलेल्याच इमारतीत वरच्या फ्लॅटमध्ये राहत असून दोघांचीही गेल्या काही वर्षांपासून चांगली मैत्री होती. त्यामुळे अनेकदा राजेश याची विनायक फडते याच्या घरात ये-जा असायची. मात्र काही महिन्यांपूर्वी कौटुंबीक समस्या निर्माण झाल्याने त्यांच्यात तेढ निर्माण झाली होती. त्याचे पर्यवसान परस्परांनी एकमेकाच्या व्यवसायात अडथळे निर्माण करण्यात झाले होते. त्यामुळे विनायकचा काटा काढण्यासाठी कालापूर येथील एका "गॅंग'ला सुपारी देण्यात आली. ही सुपारी एका लाखाची होती, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली.
पूर्वनियोजित हल्ला...
कालापूर येथील या "गॅंग'च्या प्रमुखाने विनायकचा काटा काढण्याची जबाबदारी दोना पावला येथील "एनआयओ'च्या क्वाटर्समध्ये राहणाऱ्या महावीर नदाफ याला दिली होती. त्याने अन्य दोन साथीदार आपल्या बरोबर घेऊन विनायक याच्यावर पूर्वनियोजित हल्ला चढवला. त्यासाठी त्याने एका व्यक्तीकडून दुचाकी उपलब्ध केली तर, या गॅंगच्या प्रमुखाने त्यांना तलवार आणि सळया पुरवल्यात, अशी माहिती अटक केलेल्या दोघा संशयितांकडून पोलिसांना मिळाली आहे.
खून प्रकरणात जामिनावर असलेल्यानेच केली दुसरी गेम...
महावीर नदाफ आणि सुपारी घेतलेल्या गॅंगचा प्रमुख हे दोघे शिरदोण येथील दुहेरी खून प्रकरणात जामिनावर असून कायदा धाब्यावर बसवून त्यांनी दुसरा खुनी हल्ला चढवला आहे. त्यामुळे खून प्रकरणातील संशयितांची जामिनावर सुटका करायची की नाही, हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
चिंबल, कालापूर बनतोय
सुपारी घेणाऱ्यांचा गड..
चिंबल व कालापूर या दोन्ही भागांत सुपारी घेऊन काटा काढणाऱ्या टोळ्या उदयास येत असून याची माहिती राज्य प्रशासनाला आणि पोलिस खात्याला असूनही कोणतीच कारवाई करण्यात येत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. अनेकवेळा या भागात "कॉबिंग ऑपरेशन' करून अट्टल गुन्हेगारांना ताब्यात घेण्याची पोलिसांतर्फे तयारी केली जाते; परंतु, एनवेळी ही कारवाई स्थगित ठेवली जाते.
गेल्या काही वर्षात राज्यात झालेल्या अनेक खून, दरोडे आणि खंडणी प्रकरणात याच भागातील गुन्हेगारांना पोलिसांनी अटक केली आहे.
आगशी पोलिसांची कारवाई...
प्राणघातक हल्ला होताच खडबडून जागे झालेल्या पोलिसांनी सर्वत्र संशयिताचा शोध घेण्यास सुरुवात केली. यात आगशीचे पोलिस निरीक्षक विश्वेश कर्पे यांच्या पथकास संशयितांना त्याच रात्री ताब्यात घेण्यात यश आले. हल्लेखोर महावीर नदाफ याला पणजी शहरातून ताब्यात घेण्यात आले. निरीक्षक कर्पे याच्या पथकात पोलिस शिपाई दत्ता वेर्णेकर, विनय श्रीवास्तव, अशोक मेगरी व समीर फडते यांचा समावेश होता, अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली. याविषयीचा पुढील तपास जुने गोवे पोलिस स्थानकाचे निरीक्षक आशिष शिरोडकर करीत आहेत.

Sunday, 7 February, 2010

ग्रामसभेच्या पार्श्वभूमीवर पंचवाडी शिरोड्यात तणाव

खाण प्रकल्पास आज कडाडून विरोध

पणजी, दि. ६ (प्रतिनिधी) - पंचवाडी गाव "सेझा गोवा' खाण कंपनीच्या घशात घालण्यासाठी पुढे सरसावलेल्या राज्य सरकारला इंगा दाखवण्याची जय्यत तयारी येथील ग्रामस्थांनी केली आहे. उद्या ७ रोजी होणाऱ्या ग्रामसभेत सर्व शक्तीनिशी या नियोजित खनिज रस्ता व विजर खाजन बंदर प्रकल्पाला विरोध करून त्याविरोधात ठराव समंत करून घेण्यासाठी पंचवाडीवासीय आक्रमक बनल्याने ही ग्रामसभा वादळी ठरणार यात शंका उरलेली नाही.
शिरोडा मतदारसंघ हा आतापर्यंत खाणमुक्त म्हणून परिचित होता, पण खनिज वाहतुकीसाठी बगल रस्ता तयार करण्याचे निमित्त साधून या मतदारसंघातील पंचवाडी गावात सेझा गोवा खाण कंपनीला बंदर उभारण्यासाठी राज्य सरकारने सार्वजनिक हिताचे कारण पुढे करून भूसंपादनाची अनुमती दिल्याने ग्रामस्थ संतापले आहेत. एका खाजगी खाण कंपनीला आपल्या खनिजाची वाहतूक करण्यासाठी कोडली ते पंचवाडी असा खनिज वाहतूक रस्ता व विजर खाजन येथे खनिज हाताळणी बंदर उभारण्याचा हा डाव हाणून पाडण्यासाठी पंचवाडीवासीयांनी कंबरच कसली आहे. उद्या ७ रोजी याविषयावर विशेष ग्रामसभेचे आयोजन केले आहे. या ग्रामसभेला संपूर्ण पंचवाडी गावच लोटण्याची शक्यता असल्याने ग्रामसभा खुल्या जागेत घेण्याचा निर्णय पंचायतीने घेतला आहे.
दरम्यान, पंचवाडी बचाव समितीने ग्रामसभेसाठी सुरक्षेच्या कारणावरून पोलिस बंदोबस्त ठेवण्याचे निवेदन पोलिस उपमहासंचालक तथा फोडा पोलिस स्थानकाला दिले आहे. या ग्रामसभेला पोलिस संरक्षण पाठवण्यात येऊ नये यासाठीही काही लोक कार्यरत असल्याची माहिती मिळाली आहे.
पंचवाडीच्या सरपंच व्हिएना रॉड्रिगीस या प्रकृतीच्या कारणास्तव रजेवर आहेत. उपसरपंच लता नाईक यांना ग्रामसभा हाताळणे शक्य होणार नाही, यासाठी त्यांना राजीनामा देण्यास भाग पाडून जॉन ब्रागांझा यांची उपसरपंचपदावर वर्णी लावण्यात आली आहे. उद्याची ग्रामसभा जॉन ब्रागांझा यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. नियोजित प्रकल्पावर ग्रामसभेचा निर्णय व्हायचाच आहे, पण त्यापूर्वीच जॉन ब्रागांझा यांच्याकडून या प्रकल्पाला मान्यता देण्यात येणार असल्याची भाषा सुरू झाल्याने पंचवाडीतील ग्रामस्थ अधिकच डिवचले गेले आहेत. कंपनीकडूनही गावातील काही लोकांना व्यवसाय व रोजगाराची आमिषे दाखवून या प्रकल्पाला पाठिंबा देण्यासाठी फूस लावली जात असल्याचा आरोपही होत आहे. काही बड्या राजकीय नेत्यांकडूनही या प्रकल्पाचे समर्थन होत असल्याने या सर्व शक्तींना योग्य तो धडा उद्याच्या ग्रामसभेत घडवण्याचा चंगच पंचवाडीतील तिखट स्वाभिमानी ग्रामस्थांनी बांधला आहे.
पंचवाडीच्या सेंट ऍथनी चर्चच्या फादरांनी पंचवाडी बचाव समितीला आपला पूर्ण पाठिंबा दिला आहेच. शिवाय श्री देवी सातेरी देवस्थान समितीनेही या लढ्याला सहकार्य दिल्याने या प्रकल्पाच्या विरोधकांची ताकद अधिकच वाढली आहे.
दरम्यान,सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार कोडली ते पंचवाडी खनिज रस्त्यासाठी ५ लाख ५४ हजार चौरसमीटर जागा संपादन करण्याचे ठरवले होते. तथापि, भूसंपादनाच्या आदेशाप्रमाणे केवळ ३ लाख ९३ हजार ३११ चौरसमीटर जागा संपादन केली आहे. कोडली,म्हैसाळ व कामरकोंड येथील जागा संपादन करण्यात आली नाही, त्यामुळे सरकारच्या हेतूबाबतच आता संशय व्यक्त होऊ लागला आहे. एकदा का पंचवाडीत खनिज व्यवसायाला प्रवेश मिळाला की पुढे या गावाला धूळ प्रदूषण व बेदरकार खनिज वाहतुकीपासून कुणीही वाचवू शकणार नाही,अशी माहिती समितीचे निमंत्रक क्रिस्टो डिकॉस्ता यांनी दिली. राज्यातील खनिजग्रस्त भागातील लोकांनाही कंपनीने रोजगार व व्यवसाय दिला आहे; पण त्या भागातील लोकांची काय परिस्थिती झाली आहे याचा विचार करा,असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
निसर्गसंपन्न व शेतीप्रधान पंचवाडीसाठी खास म्हैसाळ धरणाची निर्मिती करण्यात आली व त्याव्दारे सुमारे २०० एकर जागा ओलित क्षेत्राखाली आणण्यात आली. आता खनिज प्रकल्पाला इथे आणून सरकार नेमके काय करू पाहत आहे, असेही ते म्हणाले.
प्राण गेला तरी बेहत्तर..
पंचवाडी बचाव समितीचे निमंत्रक माजी सरपंच क्रिस्टो डिकॉस्ता व नाझारेथ गुदिन्हो आदींना धमकीचे फोन येत असल्याची माहिती मिळाली आहे. उद्या ७ रोजीच्या ग्रामसभेत या प्रकल्पाला विरोध केल्यास हात, पाय मोडून टाकू,असे त्यांना धमकावले जात आहे. ग्रामसभेत पंचवाडीवासीय सामील होऊ नयेत यासाठी दहशत निर्माण केली जात असल्याचीही खबर आहे. दरम्यान, या धमक्यांना अजिबात भीक घालीत नाही, असा निर्धार करून पंचवाडीसाठी प्रसंगी जीवाची बाजी लावण्याची वेळ आली तरी मागे हटणार नाही,असा ठाम निर्धार क्रिस्टो डिकॉस्ता यांनी व्यक्त केला. गाव वाचला तरच आपले अस्तित्व टिकणार याची जाणीव प्रत्येक ग्रामस्थाने ठेवावी व हा लढा यशस्वी करावा,असे आवाहनही त्यांनी केले. ग्रामसभेत या प्रकल्पाविरोधात ठराव संमत केल्यानंतरच धमक्यांना प्रत्युत्तर देऊ,असा इशाराही त्यांनी दिला.

जेम्स मृत्यू प्रकरणी केपेदंडाधिकारी कुळेत

कुळे, दि. ६ (प्रतिनिधी)- जेम्स आल्मेदा मृत्यू प्रकरणी आज केप्याचे विभागीय दंडाधिकारी आग्नेल फर्नांडिस यांनी कुळे येथे जाऊन काही लोकांच्या जबानी नोंदवल्या. आजच्या चौकशीचा हा अहवाल आपण आठ दिवसात सरकारला सादर करणार असल्याचे रात्री उशिरा "गोवादूत'शी बोलताना त्यांनी सांगितले. महत्त्वाचे म्हणजे, "गोवादूत'ने अंदाज व्यक्त केल्यानुसार जेम्स हा दारूडा होता व आजारी होता असाच प्राथमिक निष्कर्ष आग्नेल फर्नांडिस यांनी काढला असून संबंधितांनी त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट कोणत्या अधिकारात लावली, या महत्त्वाच्या मुद्यावर मात्र त्यांनी केलेल्या चौकशीच्या वेळी विचार झाला की नाही हे कळू शकले नाही. दरम्यान, जेम्स याच्या संशयित मृत्यूप्रकरणी गरज पडल्यास न्यायालयाचे दरवाजेही ठोठावण्यात येतील, असा पुनरूच्चार कुळे नागरिक समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आज "गोवादूत'शी बोलताना केला.
२४ जानेवारी रोजी पहाटे जेम्सचा गूढ मृत्यू झाला होता व त्यानंतर काही लोकांनी शवविच्छेदनासारखी महत्त्वाची प्रक्रिया न करताच त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली होती. खरेतर जेम्स हा मद्यपि होता की नाही किंवा तो डायबेटिक होता की नाही यापेक्षा त्याच्या मृत्यूचे नेमके कारण काय होते ही बाब त्याच्या शवविच्छेदन अहवालानंतरतच स्पष्ट होऊ शकली असती. तथापि, नेमकी तीच प्रक्रिया न करता मृतदेहाची विल्हेवाट लावल्याने कुळे नागरिक समितीने त्याला तीव्र आक्षेप घेतला होता. मात्र पोलिस किंवा इतरांनी नेमके त्याच गोष्टीकडे दुर्लक्ष करून दारू व आजारामुळेच जेम्सचा मृत्यू झाला हे सिद्ध करण्याचा घाट घातला आहे. परिणामी, हे प्रकरण आज ना उद्या न्यायालयाच्या दारात पोचणार असे सद्यस्थितीवरून दिसत असल्याचे नागरिक समितीच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
दरम्यान, आज दिवसभरात आपण जेम्सचे शेजारी अर्थात बार मालकाचे शेजारी, जेम्सचे दोन मित्र, तो आधी काम करत असलेल्या ठिकाणचे मालक, स्थानिक बॅंकेचे अधिकारी, चर्चचे फादर तसेच अन्य काहीजण मिळून जवळपास दहा जणांच्या जबान्या घेतल्याचे दंडाधिकारी श्री. फर्नांडिस यांनी सांगितले. आपला अहवाल आपण आठ दिवसांत सरकारला सादर करून असेही त्यांनी पुढे सांगितले. फर्नांडिस हे सायंकाळी उशिरापर्यंत कुळ्यात होते. नागरिक समितीच्या पदाधिकाऱ्यांची मात्र त्यांनी जबानी नोंदवून घेतली नसल्याचे समजते. कुळे नागरिक समितीनेच जेम्सच्या संशयास्पद मृत्यूचा विषय लावून धरला असून त्याच्या मृत्यूच्या चौकशीची मागणी केली आहे. कदाचित उद्या पुन्हा ते कुळे येथे येण्याची शक्यता आहे.

दाभाळ गावावर खाणीचे संकट

१० फेब्रुवारी रोजी जाहीर सुनावणी

फोंडा, दि. ६ (प्रतिनिधी) - शेती, काजू आणि बागायतीने नटलेल्या निसर्गसंपन्न दाभाळ गावात खाण सुरू करण्यासाठी सरकारी पातळीवर पुन्हा जोरदार हालचाली सुरू झाल्याने स्थानिकांत प्रचंड खळबळ माजली आहे. विशेष म्हणजे या नियोजित खाणीसंदर्भात येत्या १० तारखेला दाभाळ येथे जाहीर सुनावणी ठेवण्यात आली आहे.
दाभाळ गावात खाण सुरू करण्यासाठी गेल्या वर्षापासून प्रयत्न सुरू आहेत. मात्र, स्थानिक नागरिकांच्या विरोधामुळे दाभाळ गावात आतापर्यंत खाण सुरू करण्यात संबंधितांना यश प्राप्त झालेले नाही. दाभाळ हा गाव "उन्नय' नदीच्या किनाऱ्यावर वसलेला असून ह्या नदीच्या पाण्यावर गावातील शेती, बागायती अवलंबून आहे. दाभाळ आणि कळसई या दोन्ही गावाच्या मध्यभागी असलेल्या जमिनीत खाण सुरू करण्यासाठी सरकारी पातळीवर हालचाली सुरू झाल्याने लोकांत खळबळ माजली आहे.
सदर जागा वन खाते आणि खासगी मालकीची आहे, अशी माहिती स्थानिकांनी दिली. "उन्नय' नदीवर बंधारे बांधून शेती, बागायतीसाठी पाणी आणले जाते. ह्या नदीवर एक पुरातन असा बंधारा आजही कायम आहे. कळसई गावातही शेती, बागायती आहे.
दाभाळ येथे खाण सुरू झाल्यास नदीच्या पाण्याच्या प्रवाहावर भयंकर परिणाम होण्याची भीती नागरिकांतून व्यक्त केली जात आहे. ज्या ठिकाणी खाण सुरू करण्याचा प्रस्ताव आहे तेथे काजूची झाडे आहेत. तसेच पावसाळ्यात काही भागात भात पिकाची लागवड केली जात आहे, असेही ग्रामस्थांनी सांगितले. दाभाळ गावात पुन्हा खाण सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू झाल्याने लोकांनीही सदर खाणीला विरोध करण्याचा वज्रनिर्धार केला आहे.
या खाणीच्या संदर्भात जाहीर सुनावणी दाभाळ येथे १० फेब्रुवारी २०१० रोजी घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी याविरोधात जोरदार कृती करण्याचा निर्णय घेतला. यापूर्वी खाण सुरू करण्यात येणाऱ्या जागेतील काजूच्या झाडांची कत्तल करण्यात आली होती. त्यावेळी स्थानिक लोकांनी खाणीला विरोध करून झाडे कापण्यासाठी आलेल्या कामगारांना हुसकावून लावले होते. तसेच त्यांच्या गाड्यांची नासधूस केली होती. सदर खाणीच्या सर्वेक्षणाच्या वेळी स्थानिक लोकांनी विरोध करून संबंधितांना हुसकावून लावले होते. आतादेखील लोकांनी आक्रमक भूमिका घेण्याचे ठरवले आहे. खाणीच्या नियोजित जागेच्या बाजूला सरकारी प्राथमिक विद्यालय आणि माध्यमिक विद्यालय आहे. या नियोजित खाणीच्या विरोधात सरकारला निवेदन देण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे.

मूकबधिर असल्याचे भासवून पर्यटकांना लुबाडण्याचे प्रकार

काणकोण भागांत लहानग्यांचा असाही वापर

काणकोण, दि. ६ (प्रतिनिधी)- काणकोण तालुक्यातील किनारी भागांत भिकाऱ्यांचा उच्छाद वाढल्याचे आमदार विजय पै खोत यांच्याकडून वारंवार सरकारच्या निदर्शनास आणून देण्यात आली आहे. भिकाऱ्यांच्या मागे पोलिस हात धुऊन लागतात हे हेरून आता या लोकांनी एक वेगळीच शक्कल लढवली आहे. प्रत्यक्ष भीक न मागता मूकबधिर अनाथाश्रमाच्या नावाने आर्थिक मदत करण्याची पत्रके हातात घेऊन अत्यंत शिस्तबद्धरीत्या पर्यटकांकडून पैसे उकळण्याचा प्रकार सध्या सर्रास सुरू आहे. १० ते १५ वयोगटातील परप्रांतीय मुलांचा याप्रकारासाठी मोठ्या प्रमाणात वापर सुरू असल्याने पोलिस तथा संबंधित यंत्रणांनी तात्काळ या प्रकाराची दखल घ्यावी, अशी जोरदार मागणी येथील नागरिकांनी केली आहे.
काणकोण भागांतील समुद्र किनाऱ्यांवर विदेशी पर्यटकांची वर्दळ अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ही संधी साधून काही बिगरगोमंतकीय लोकांनी भीक व इतर भावनिक आवाहनाद्वारे लहान मुलांचा वापर करून पैसे उकळण्याचा एक नवा धंदाच उघडला आहे. आधीच किनाऱ्यांवर लमाणी व भिकाऱ्यांचा उच्छाद सुरू असताना आता हा नवा प्रकार नागरिकांच्या निदर्शनास आला आहे.
१० ते १५ वयोगटातील अनेक मुले सध्या काणकोण भागातील समुद्र किनारे व बाजारपेठांत मूक बधिर असल्याचे सांगून पैसे मागताना दिसत आहेत. या मुलांच्या हातात मूकबधिर अनाथाश्रम विद्यालयाच्या नावाने काही पत्रके देण्यात आली आहेत. ती मुले आपण स्वतः मूकबधिर असल्याचे भासवतात. या आवाहनावर भारत सरकारच्या महिला कल्याण अनाथाश्रम, मूक, बधिर विद्यालय, बंगळूर असे लिहिण्यात आले आहे. या संस्थेचा प्रशासक या नात्याने के. एम. अँथोनी बंगळूर यांचा शिक्काही मारण्यात आला आहे. या आवाहनावर डॉ. जोझफ, एम. बी. बी. एस. थिरूविल्ला, पथानामथिता जिल्हा असा शिक्काही दिसून येतो.
गटागटाने फिरणारी ही मुले विदेशी पर्यटकांची पाठच सोडत नसल्याने त्यांच्यापासून सुटका करून घेण्यासाठी ते नको ती कटकट असा विचार करून या मुलांना पैसे देत असल्याची माहिती मिळाली आहे. काही पर्यटक तर भावनिकदृष्ट्या या मुलांकडे पाहून हेलावतात व पाचशे ते हजार रुपयांपर्यंतची मदतही त्यांना करतात, अशी माहिती एक प्रत्यक्षदर्शी सायबर सेंटरचे मालक विकास भगत यांनी "गोवादूत'ला दिली.
गोव्यात मोठ्या प्रमाणात विदेशी पर्यटक येतात ही वेळ साधून काही परप्रांतीय ठेकेदार कर्नाटक व इतर राज्यांतून या मुलांना आणतात. सकाळी त्यांना काही महत्त्वाच्या ठिकाणी उतरवले जाते. संध्याकाळी एका ठरावीक जागेवरून त्यांना पुन्हा उचलले जाते व त्यांनी जमवलेली रक्कम गोळा केली जाते. काही काळापूर्वी बालहक्क आयोगाने काही मोजक्याच ठिकाणी छापे टाकून बालकामगारांवर कारवाई करून काही मुलांना ताब्यातही घेतले होते. बालहक्क आयोगाच्या पथकाने काणकोण किंवा राज्यातील अन्य कोणत्याही किनाऱ्यांवर एक टेहळणी केल्यास त्यांना अशा पद्धतीची अनेक मुले दिसतील, अशी माहितीही देण्यात आली.
अलीकडच्या काळात विशेष करून काणकोण परिसरात भिकारी व अशा पद्धतीने आर्थिक मदत मागण्याच्या बहाण्याने महिला व लहान मुलांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे व त्यांच्यावर सरकारी यंत्रणांचे अजिबात लक्ष नसल्याचे आढळून आले आहे. पोलिसांनी तात्काळ या प्रकारावर आळा घालण्याची गरज आहे. या मुलांना ताब्यात घेऊन त्यांना अशा पद्धतीने भीक मागायला लावणाऱ्यांचा शोध घेणेही गरजेचे आहे. या प्रकरणी भीक किंवा इतर काही नैसर्गिक आपत्ती किंवा आरोग्याच्या विषयावरून आर्थिक मदतीसाठी आवाहन करणाऱ्या टोळ्याच राज्यात कार्यरत असल्याचा संशयही या भागातील नागरिकांनी व्यक्त केला आहे.

रामदेवबाबांनी नेत्यांना दिले योगाचे धडे!

गोवा पाठ्यक्रमात योगाच्या समावेशाचे संकेत

पणजी, दि. ६ (प्रतिनिधी)- गोव्यात शालेय पाठ्यक्रमात योग शिक्षणाचा समावेश करण्यासंबंधीचा प्रस्ताव राज्य सरकारला पाठवण्यात आला आहे. याप्रकरणी सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून येत्या काळात योग शिक्षण हा शालेय शिक्षणक्रमाचाच महत्त्वाचा भाग ठरेल, असा विश्वास स्वामी रामदेवबाबा यांनी व्यक्त केला.
पातंजली योग समिती व भारत स्वाभिमान यांनी गोवा विधिमंडळ मंचाच्या सहकार्याने आज गोवा विधानसभेत सर्व आजी, माजी आमदार, मंत्री व कर्मचारीवर्ग यांच्यासाठी मार्गदर्शनाचा खास कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाच्या निमित्ताने स्वामी रामदेवबाब यांनी जीवनातील योगसाधनेचे महत्त्व विषद करून तणावमुक्तीसाठीच्या महत्त्वाच्या टीप्स उपस्थितांना दिल्या. दिवसातून किमान पंधरा मिनिटे योगसाधना करा व निरोगी तथा तणावमुक्त जीवन जगा,असा कानमंत्रच त्यांनी यावेळी दिला.
व्यक्तिविकास हाच राष्ट्रविकास आहे,असे सांगून जेव्हा प्रत्येक भारतीय निरोगी व निर्भय बनेल तेव्हाच आपला देश शक्तिशाली व वैभवशाली बनू शकेल. याप्रसंगी त्यांनी अल्पकाळासाठी करण्यात येणारे काही योगाच्या प्रकारांचे प्रात्यक्षिकेही उपस्थितांकडून करून घेतली.
या कार्यक्रमानंतर विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांच्या दालनात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी भारत स्वाभिमान व पातंजली योग समितीच्या कार्याचा आढावा घेतला. गोव्यात सुरुवातीला २००५ साली केवळ ७ योग प्रशिक्षक होते.आता ही संख्या २४४४ पर्यंत पोहचली आहे.पातंजली योग समितीने आरंभलेल्या कार्याचे उद्दिष्ट गाठण्यात हे राज्य अग्रेसर असल्याचेही ते म्हणाले. गाव तिथे योग केंद्र ही मोहीम राबवली जात आहे. त्याअंतर्गत राज्यात १५७० योग केंद्रे सुरू करण्याचाही विचार आहे,अशी माहिती त्यांनी दिली.
विशेष म्हणजे ही सगळी निःशुल्क केंद्रे आहेत.निरोगी व समृद्ध गोवा निर्माण करण्यासाठी सर्वांनी भारत स्वाभिमान संघटनेत सहभागी व्हावे.योगाच्या माध्यमाने सर्व जात,पात,धर्म,भाषा,प्रांत आदी मतभेद दूर होतील व योग या एकमेव सूत्राने सारे भारतीय एकत्र बांधले जातील,असेही ते म्हणाले. पातंजली योग समितीच्या कार्यात मुस्लिम व ख्रिस्ती बांधवांचाही मोठा सहभाग असल्याची माहिती त्यांनी दिली.
योगसाधनेच्या माध्यमाने आंतरिक शक्तीत चैतन्य निर्माण होते व आपोआपच वाईट गुण नष्ट होतात. राजकीय भ्रष्टाचार व अस्थिरता दूर करण्यातही योग महत्त्वाची भूमिका वठवणार आहे. येत्या काळात भारत स्वाभिमान संघटना मजबूत होईल व चांगले लोक निवडून आणून त्यांच्याकडे लोकांचे प्रतिनिधित्व सोपवले जाईल; पण त्यासाठी संघटनेचा विस्तार होण्याची गरज आहे व त्यात थोडा अवधी जाईल,अशी माहिती त्यांनी दिली.
सत्य, राष्ट्रभक्ती व प्रामाणिकपणा जपणारे सगळे लोक आपल्याला प्रिय आहेत,असे सांगून आपण राजकीयभेदाभेद करत नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. हरीव्दार येथे पातंजली योग समितीतर्फे देशातील सर्वांत मोठा खाद्य प्रक्रिया प्रकल्प राबवण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. या प्रकल्पामुळे लाखो लोकांना फायदा होणार आहे. शेतकऱ्यांच्या उत्पादनाला योग्य भाव मिळायलाच हवा,असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. याप्रसंगी जयदीप आर्य व डॉ. सूरज काणेकर उपस्थित होते. सूत्रसंचालन माजी आमदार मोहन आमशेकर यांनी केले.