Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 30 August, 2008

खासदार लाच प्रकरणाची कल्पना पंतप्रधान व सोनियांना होती : अडवाणी

नवी दिल्ली, दि. ३० : खासदार लाच प्रकरणाची तुलना होऊच शकत नाही, कारण हे प्रकरण बोफोर्सपेक्षाही मोठे व चीड आणणारे आहे आणि या प्रकरणाची कल्पना पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग आणि कॉंग्रेसाध्यक्षा सोनिया गांधी यांना होती, असा आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते लालकृष्ण अडवाणी यांनी केला आहे.
कॉंग्रेसचे नेतृत्व आणि सरकार यांच्या संमतीशिवाय लाचप्रकरण घडूच शकले नसते आणि म्हणूनच पंतप्रधान डॉ.मनमोहनसिंग आणि सोनिया गांधी यांनी याप्रकणी मौन सोडावे अशी संपूर्ण देशाला अपेक्षा आहे, असे अडवाणी यांनी आज येथे एका कार्यक्रमात बोलताना सांगितले.
याप्रकरणी चौकशी करणारी संसदीय समिती सत्य उजेडात आणेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. मात्र, बोफोर्स प्रकरणी चौकशी करणाऱ्या संयुक्त संंसदीय समितीने ज्याप्रमाणे सत्य दडपण्याचा प्रयत्न केला, तसा प्रयत्न यावेळी झाल्यास देशातील जनता तो खपवून घेणार नाही, असा इशाराही अडवाणी यांनी कॉंग्रेस नेते आणि सरकारला दिला आहे.
खासदार लाच प्रकरण घडल्यानंतर एका वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेल्या स्तंभाचा हवाला देत अडवाणी म्हणाले की, एक प्रामाणिक व्यक्ती या पंतप्रधानांच्या प्रतिमेला धक्का बसला असून, आता त्यांच्या प्रतिमेला कलंक लागला आहे.
१९९९ साली भाजपाच्या नेतृत्वातील रालोआचे सरकार अवघ्या एका मताने कोसळले होते. त्यावेळी घोडेबाजार करण्याऐवजी आमच्या सरकारने पराभव स्वीकारला होता. त्यामुळे आमचे टीकाकारही आमच्यावर घोडेबाजार केल्याचा आरोप करू शकत नाहीत, असे अडवाणी म्हणाले.
राजकारणात नैतिकतेचे पालन करण्यास आणि देशातील जनतेला स्वच्छ प्रशासन देण्यास भाजपा कटिबद्ध असल्याचे अडवाणी यांनी स्पष्ट केले.

महिलेवरील हल्ला प्रकरणी दोघे पोलिसांच्या ताब्यात, वाहन जप्त, अन्य दोघांचा शोध सुरू

पणजी, दि. २९ (प्रतिनिधी): येथील नाईके शोरूमच्या मालक श्रीमती हबीबे करमली यांना काल कांपाल येथे मारहाण करून त्यांच्याकडील सुमारे ८० हजारांची रोकड, मोबाईल आणि गळ्यातील सोनसाखळी तसेच दुकान व लॉकरच्या चाव्या पळवल्याप्रकरणी पणजी पोलिसांनी चिंबल इंदिरा नगर येथील दोघा संशयितांना ताब्यात घेतले आहे.
मेहबूब मुल्ला (३१) व इफ्तकीर अब्दुल्ला हुसेन (२३) अशी या दोघांची नावे असून त्यांची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची आहे,असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.. त्यांना सध्या सहा दिवस पोलिस कोठडीत ठेवण्यात आले असून त्यांची कसून चौकशी सुरू असल्याची माहिती उत्तर गोव्याचे अधीक्षक बॉस्को जॉर्ज व निरीक्षक फ्रान्सिस कोर्त यांनी दिली. त्यांच्याकडून एक वाहनही ताब्यात घेण्यात आले असून काल रात्री हेच वाहन त्यांनी गुन्ह्यासाठी वापरले असावे,असा दाट संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
कांपाल पणजी येथील आपले दुकान बंद करून श्रीमती हबीब करमली मोटारीने घरी येत असता करिमाबाद हौसिंग सोसायटीपासून जवळच त्यांची मारुती मोटार रोखण्यात आली होती. एका वाहनातून दोघे बुरखाधारी हातात लोखंडी रॉड घेऊन खाली उतरले. करमली यांनी आपल्या मोटारीच्या काचा बंद केल्या असता या दोघांही बुरखाधाऱ्यांनी हातातील रॉडद्वारे मोटारीच्या काचा फोडल्या व करमली यांना मारहाण केली. त्यांच्या गळ्यातून सोनसाखळी हिसकावण्यात आली व रोकड, शोरूम व दुकानाच्या चाव्या धमकावून लांबवल्या. यावेळी अन्य दोघे बुरखाधारी गाडीतच बसून होते अशी माहिती करमली यांनी दिल्याने त्यांचाही शोध सुरू आहे. पोलिसांना याप्रकरणी महत्त्वाचे दुवे सापडले असून त्यांनी या टोळीचा पर्दाफाश केला जाईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.

आंदोलकांना अटक करून दाखवाच शिरदोनवासीयांचेही मेगा प्रकल्पाविरोधात रणशिंग

पणजी, दि.३० (प्रतिनिधी) : शिरदोन येथील वादग्रस्त मेगा प्रकल्पाला विरोध करणाऱ्या स्थानिकांवर पणजी पोलिस स्थानकांत खोटी पोलिस तक्रार दाखल करून त्यांची सतावणूक सुरू असल्याच्या निषेधार्थ आज शिरदोन बचाव समितीतर्फे आझाद मैदानावर निदर्शने करण्यात आली.
शिरदोन येथील मेगा प्रकल्पाला स्थगिती देण्याबाबत पंचायत संचालनालयात दाखल केलेली याचिका फेटाळण्यात आली आहे. या याचिकेबाबत विचारणा करण्यासाठी शिरदोन येथील काही महिला पंचायत संचालनालय कार्यालयात गेल्या होत्या. यावेळी पंचायत संचालकांनी सदर आदेशाची मूळ प्रतही शिरदोनवासीयांना दिली होती. ही घटना २२ ऑगस्ट रोजी घडली. त्यानंतर तब्बल सहा दिवसांनी पंचायत खात्याच्या अतिरिक्त संचालकांनी, शिरदोनवासीयांनी खात्याच्या कार्यालयात गोंधळ माजवून तेथील सरकारी मालमत्तेची हानी केल्याची तक्रार पणजी पोलिस स्थानकात नोंदवून सर्वांना धक्काच दिला. या तक्रारीत आठ लोकांची नावे नोंद करण्यात आली असून प्रत्यक्षात हे लोक त्या दिवशी हजरच नव्हते,असा दावा ऍड. जतीन नाईक यांनी केला आहे. सहा दिवसांनंतर या लोकांवर तक्रार करून त्यांना अटक करण्याची तयारी पोलिसांनी दाखवण्याची कृती म्हणजे पोलिसांनी बिल्डरांच्या सांगण्यावरून आता स्थानिक लोकांना धमकावण्याची कृती सुरू केली असून याविरोधात राष्ट्रीय मानवाधिकाराकडे तक्रार केली जाईल,असेही ऍड.नाईक म्हणाले.
या बड्या प्रकल्पामुळे तेथील स्थानिक जनतेवर संकट ओढवणार असल्याने त्यांनी सांगितले. या प्रकल्पाविरोधात दंड थोपटले असता त्यांचे आंदोलन मोडून काढण्यासाठी हा पोलिसी धाक दाखवला जात असल्याचा आरोपही करण्यात आला. सरकार अशा या बड्या बिल्डर लॉबीच्या पूर्णपणे आहारी गेले असून सामान्यांचे आंदोलन मोडून काढण्यासाठी सरकारी यंत्रणेचा वापर केला जाणे दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आला. दरम्यान, पोलिसांनी खोट्या तक्रारी आधारे एका आंदोलकाला अटक केली तर सारा शिरदोन गावच रस्त्यावर उतरेल असा इशारा यावेळी देण्यात आला.

मेरशी येथील अपघातात दोन तरुण जागीच ठार

पणजी,दि.३०(प्रतिनिधी): मेरशी येथील हॉटेल "आलुआ'जवळील रस्त्यावर दुचाकी व क्वालीस गाडी यांंच्यात झालेल्या भीषण अपघातात आज साल्वादोर द मुन्द येथील दोघा तरुणांचा मृत्यू झाला.
सेबॅस्त्यॅव परेरा (३४) व व्हीन्सेंट सिक्वेरा अशा या तरुणांची नावे आहेत. ते दोघेही साल्वादोर दी मुन्द येथील रहिवासी आहेत. आज दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास ते मेरशी येथील हॉटेल अलुआसमोरील रस्त्यावरून जीए-०१-टी-७५२९ या क्रमांकाच्या दुचाकीनेे मेरशी येथे जात असता समोरून येणाऱ्या जीए-०१-टी-५३११ या क्रमांकाच्या क्वालीस गाडीशी त्यांची टक्कर झाली. ही टक्कर एवढी जबर होती की, दोघेही तरूण रस्त्यावर फेकले गेले. क्वालिस गाडी चालकाने तात्काळ त्या दोघांनाही आपल्या गाडीत घालून बांबोळी येथे गोवा मेडिकल कॉलेजच्या हॉस्पिटलमध्ये नेले. तथापि, तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
दरम्यान,याप्रकरणी जुनेगोवे पोलिसांनी पंचनामा केला असून सदर वाहन चालकाने या घटनेची माहिती पोलिसांना दिल्याचे यावेळी सांगण्यात आले. याप्रकरणी जुनेगोवे पोलिस पुढील तपास करीत आहेत.

संभवामि युगे युगे...एक स्वरकलश : रमेश सप्रे

पणजी, दि. ३०: केरी फोंडा येथील श्री विजयदुर्ग सांस्कृतिक मंडळाची निर्मिती असलेली "संभवामि युगे युगे' ही ध्वनिफित म्हणजे जणू भगवान श्रीकृष्णाचा सप्तरंगी जीवनपटच. देखणे वेष्टण! मेघश्यामातले मेघ नि निळ्या कृष्णाची असीम निळाई डोळ्यांत ठसणारी. यशोदाकृष्णाचे चैत्यन्यमय हास्यमुद्रेतील चित्र मनाला भावते. मंद रंगातले मोरपीस अन् त्याच्या पार्श्वभूमीला नटखट कन्हैयाची दहिहंडी नकळत कृष्णप्रतीकातून कृष्णचरित्रात घेऊन जातात. श्रेयनामावलीबरोबर असलेला संगीतकार अशोक पत्की व गायक कलाकार अजय पोहनकर,देवकी पंडित, रवींद्र साठे यांच्या प्रतिमा ध्वनिफितीच्या अंतरंगाविषयीचे कुतूहल जागे करतात.
एका थरारक अनुभवाला आपण सामोरे जातो.. शांतपणे अवधानपूर्वक कानात मन आणून ऐकायला मात्र हवे. मंगलध्वनी ॐकार... त्यातून प्रकटतो को"रस'...शांताकारं भुजगशयनमं पद्मनाभं सुरेशं.. एक उदात्त रस या एकाच श्लोकातून निर्माण होतो आणि उलगडू लागतो श्रीकृष्ण जीवनाचा सप्तरंगी वर्णपट.. प्रथितयश निवेदक राहुल सोलापुरकर यांच्या धीरगंभीर चित्रदर्शी स्वरांतून...भगवंताची आश्वस्त करणारी आशिर्वचने देणारी वाणी सांगून जाते... संभवावी युगे युगे.....मग प्रवाहित होते कृष्णकथा "आकाशवाणी' पासून जिचा अर्थ नारद कंसाला समजावून देतात. काही पात्रांचे संवाद आणि कृष्णचरितामृताचा अनुभव देणारी विविध शैलीतली गीतं.... कर्णमधुर संगीत....त्यातला भाव- ताल- लय सारे मोहरून टाकते अंतर्मनाला.
बालगीते, समूहगीते, लोकगीते, कृतिगीते, आलापगीते आणि विलापगीतेसुद्धा...
कृष्ण गोकुळ सोडून मथुरेला जातो त्याप्रसंगी राधेचे विरही अनुतापगीत आणी बासरीचे स्वगत गद्यगीत काळजाचा ठाव घेते. शास्त्रीय, ललित, सुगम अशा सर्व गान शैलीतली गीते डोळे मिटून ऐकली तर "दृकश्राव्य' अनुभव येतो. शब्दांच्या पलीकडे असलेली ही अनुभूती अतीव आनंद देऊन जाते. तानपुऱ्याच्या छेडलेल्या तारांतून झंकारणाऱ्या अनाहत गंधारासारखी ! दिव्यत्वाचा स्पर्श करून देणारी ही कृष्णजीवनावरची ध्वनिफीत एका महाप्रकल्पाचा पहिला पडाव आहे.
"संभवावी युगे युगे' ....या गोमंतकात, आपल्या देवकीकृष्णाच्या भूमीत, साकारणाऱ्या श्रीकृष्णजीवनावरील महानाट्याचा पहिला पाडावच जर इतका रोमहर्षक असेल तर संपूर्ण प्रवास किती रोमांचकारी असेल ! अन मुक्काम ? या महाप्रकल्पाशी संबंधित सर्व कल्पक मंडळीना विनंती की या पुढचे पडाव असेच प्रत्ययकारी असूदेत. मुख्य म्हणजे ते लवकर होऊदेत. मुक्कामाला पोहोचण्याची आर्त उत्कटता आहेच. या स्वरकलशाचा नि सु"र'दर्शनाचा कळसबिंदू आहे अर्थातच भैरवीच्या बाजात.. सुर बासरीचे नि शब्द " संभवावी युगे युगे........' हेच! आता या सूर दर्शनातून हा अनुभव घेऊया नंतर पुढे क्रमाक्रमाने पूर्णदर्शन आहेच "संभवामि युगे युगे...' म्हणणाऱ्या युगंधर श्रीकृष्णाचे.या ध्वनिफितीचे मूल्य आहे ८८ रुपये. तथापि, एकूण निर्मितीमूल्ये लक्षात घेतली तर ही किंमत वाजवी वाटावी अशीच आहे.

नगर नियोजन कायद्यातील दुरूस्ती अखेर अधिसूचित राजाश्रयाने अनेक प्रकल्प उभे राहण्याचा धोका

पणजी, दि.३० (प्रतिनिधी): राज्यातील विविध संघटनांकडून कडाडून विरोध होऊनही गोवा सरकारने नगर व नियोजन कायद्यातील कलम १६ व १६(अ) अशा दुरुस्ती विधेयकाला मंजुरी दिली. ही दुरुस्ती रद्द व्हावी अशी जोरदार मागणी विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी खाजगी विधेयकाव्दारे केली होती. तथापि, ती फेटाळल्यानंतर काल तात्काळ त्यासंबंधीची अधिसूचना जारी करण्यात आली.
सरकारच्या या दुरुस्तीला राज्यातील विविध संघटनांकडून आक्षेप घेण्यात आला आहे. प्रादेशिक आराखड्यातील अटी व नियम जर एखाद्या प्रकल्पाला लागू न होण्याची मोकळीक दिली तर त्याचा गैरवापर होण्याचा धोका असून सरकारी आश्रयाने अनेक प्रकल्प उभे राहण्याचा धोका त्यांनी व्यक्त केला आहे. सरकारने मात्र आपल्या निर्णयाशी ठाम राहण्याचे ठरवले आहे.
या प्रकरणी प्राप्त माहितीनुसार गोवा नगर व नियोजन(सार्वजनिक प्रकल्प योजना व सरकारी विकास कामे) नियम २००८ अंतर्गत ही अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या नियमानुसार सार्वजनिक प्रकल्प योजना किंवा सरकारी विकासकामे हाती घेताना राज्य किंवा केंद्र सरकारला जमीन ताब्यात घेण्यासाठी सुरुवातीस प्रस्ताव नगर व ग्रामविकास नियोजन खात्याकडे "ना हरकत' दाखल्यासाठी पाठवावा लागेल. सरकारचा हा प्रस्ताव या खात्याकडून पूर्णपणे तपासला जाणार असून तो प्रादेशिक आराखड्यानुसार आहे की नाही, याची पडताळणी करण्यात येणार आहे.
संबंधित प्रस्ताव जर प्रादेशिक आराखड्याअंतर्गत येत नसेल तर त्यासंबंधी नगर व नियोजन खाते आवश्यक बदल सुचवेल. सरकारला जर या प्रस्तावाचा पाठपुरावाच करायचा असेल तर हा प्रस्ताव खास समितीसमोर ठेवण्याची मुभा या नवीन दुरूस्तीव्दारे ठेवण्यात आली आहे. ही समिती या प्रस्तावाचा सविस्तर अभ्यास करेल. या प्रस्तावाचा अभ्यास करून सदर प्रस्तावाला बदल सुचवून तो स्वीकारावा कि रद्द करावा याबाबतचा निर्णय घेऊन तो अंतिम निर्णयासाठी मंडळाकडे पाठवला जाईल व मंडळ या प्रस्तावावर अंतिम निर्णय घेईल,असे या अधिसूचनेत म्हटले आहे.

सावंतवाडीचे डॉ. खानविलकर व मुलगा सौरभ अपघातात ठार

पेडणे- पोरस्कडे येथील दुर्घटना
मोरजी, दि. २९ (वार्ताहर) - पोरस्कडे पेडणे येथे आज दुपारी साडेतीनच्या सुमारास बस व मारुती मोटार यांच्यातील अपघातात सावंतवाडीचे प्रसिद्ध डॉ. कमलाकांत खानविलकर (वय ८०) व त्यांचा मुलगा सौरभ (२३) ठार झाले. अपघातानंतर बसच्या चालकाने तेथून तातडीने पळ काढला.
राष्ट्रीय महामार्ग क्र. १७ वर पोरस्कडे येथे माऊली मंदिराजवळ गजांतलक्ष्मी नावाची बस (जीए ०१ झेड ८९५५) व मारुती मोटार (जीए ०१ आर ११५५) यांची समोरासमोर टक्कर झाली. ही टक्कर एवढी भीषण होती की त्यात मोटारीचा चेंदामेंदा झाला. बस पत्रादेवीला जात होती तर मोटार विरुद्ध दिशेने जात होती. धोकादायक वळणावर हा अपघात घडला.
अपघातानंतर रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने जीपमधूनच जखमींना उपचारासाठी प्रथम तुये येथील सरकारी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र प्रकृती चिंताजनक बनल्याने त्यांना म्हापशातील आझिलो इस्पितळात हलवण्यात आले. तेथेच डॉ. खानविलकर यांची प्राणज्योत मालवली. सौरभ खानविलकर यांना बांबोळी येथे "गोमेकॉ' इस्पितळात नेण्यात आले. तेथे त्यांचा मृत्यू झाला. मोटारीत असलेल्या डॉक्टरांच्या पत्नी सौ. शीला खानविलकर किरकोळ जखमी झाल्या. डॉक्टरांचा अपघातात मृत्यू झाल्याची माहिती समजताच बांदा व सावंतवाडी भागात शोककळा पसरली. पेडण्याचे पोलिस निरीक्षक नेल्सन आल्बुकर्क यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सचिन नार्वेकर यांनी पंचनामा केला. पेडणे पोलिसांत अपघाताची नोंद झाली आहे.

लेखानुदानास विधानसभेत मंजुरी

मुख्यमंत्र्यांनी सोडला सुटकेचा निःश्वास
पणजी, दि. २९ (प्रतिनिधी) - विद्यमान कॉंग्रेस आघाडी सरकारात असलेल्या अंतर्गत अस्वस्थतेच्या पार्श्वभूमीवर आज अखेर लेखानुदानाला मंजुरी मिळवण्यात मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी यश मिळवल्याने सरकारच्या अस्थिरतेबाबत निर्माण झालेल्या परिस्थितीवर पडदा पडला आहे.
आज विधानसभा अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी वित्तमंत्री या नात्याने लेखानुदान मागण्या सभागृहात सादर केल्या. या मागण्यांवर आज माजी वित्तमंत्री दयानंद नार्वेकर यांनी विचार मांडताना आपल्याच सरकारवर हल्ला चढवला. वित्तमंत्री या नात्याने आपण अर्थसंकल्प सादर केला होता. त्या अर्थसंकल्पात महसूल गोळा करण्याच्या दृष्टीने आखलेल्या काही गोष्टी साध्य करण्यात सरकारला अपयश आल्याचा ठपका त्यांनी ठेवला. सहाव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी करायचे झाल्यास त्यासाठी अतिरिक्त ३०० कोटी रुपयांची गरज असताना त्याचीही तरतूद सरकारने केली नाही,असे ते म्हणाले. लोकांसाठी आखलेल्या विविध योजनांची पूर्तता करण्यातही सरकारला अपयश आले,असेही ते म्हणाले. दरम्यान,यावेळी नार्वेकर यांनी वित्त खात्याबाबत सांगताना अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वीच आपले खाते काढून घेण्याचे ठरले होते. केवळ राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्यामुळे आपल्याला अर्थसंकल्प सादर करण्याची संधी मिळाली,असा खुलासाही त्यांनी यावेळी केला. विधानसभा कामकाजाचा अवधी कमी केल्याने नार्वेकर यांनीही नाराजी व्यक्त केली.
दरम्यान, मुख्यमंत्री कामत यांनी या आरोपांचे खंडन करून अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या अनेक योजना या पूर्णपणे नव्या होत्या व त्याची कागदोपत्री तयारी करण्यासाठी काही काळ गेल्याने त्या लांबल्याचे सांगितले. अर्थसंकल्पातील जनतेसाठी तरतूद केलेला पैसा हा त्यांच्यापर्यंत पोहचवला जाईल व सरकारने निश्चित केलेली कामे पूर्ण करण्यासाठी आपले सरकार कटिबद्ध असल्याचे आश्वासनही त्यांनी दिले. यावेळी त्यांनी सादर केलेल्या लेखानुदानाला बहुमताने मंजुरी देण्यात आली.

"गोवादूतची अन्नपूर्णा' शीतल रामा सावळ

स्पर्धेसाठी आल्या २०८ पाककृती
पणजी, दि. २९ (प्रतिनिधी) - भरघोस प्रतिसाद लाभलेल्या "गोवादूत'तर्फे आयोजित "अन्नपूर्णा'स्पर्धेत डिचोली येथील शीतल रामा सावळ यांना प्रथम क्रमांक मिळाला. दुसरे बक्षीस वाळपई येथील प्रज्वलिता गाडगीळ यांना तर तिसरे माणिक शिरोडकर, म्हापसा यांना मिळाले आहे. उत्तेजनार्थ बक्षीस वर्षा राजाध्यक्ष-फोंडा, फरिदा शेख-म्हापसा तर परीक्षकांची खास बक्षिसे प्रज्ञा रिवणकर-हेडलॅंड, सडा व अनुजा आनंद जोग-फोंडा यांना मिळाली आहेत.
गोव्याच्या कानाकोपऱ्यातून महिला स्पर्धकांनी शुक्रवारी सकाळपासून येथील "मनोशांती हॉटेल'मध्ये एकच गर्दी केली. आपल्यासोबत आणलेल्या पाककृतींची मांडणी करण्यासाठी सातव्या मजल्यावर सकाळी ९.३० ते १२.३० पर्यंत वेळ निश्चित करण्यात आली होती. या कालावधीत महिलांनी २०८ पाककृती मांडल्या.अतिशय शिस्तबद्धपणे आणि ठरवून दिलेल्या जागेवर या पाककृती ठेवण्यात आल्यानंतर दुपारी १ ते ४ वाजेपर्यंत त्यांचे परीक्षण करण्यात आले. नामवंत आहारतज्ज्ञ अरुण मडकईकर, गोवा कॅटरिंग कॉलेजचे विभाग प्रमुख संजीव कडकडे आणि कार्मेल कॉलेजच्या प्राध्यापिका तथा फोंड्याच्या नगरसेविका राधिका नाईक यांनी तब्बल तीन तास या पदार्थांची चव घेत त्यामधून सात पदार्थ निवडले. या स्पर्धेसाठी पाच बक्षिसे ठेवण्यात आली होती, तथापि परीक्षकांच्या सूचनेनुसार आणखी दोन पाककृतींना खास बक्षिसे देण्यात आली.
संध्याकाळी ४ वाजल्यापासून अनेक मान्यवरांनी व हितचिंतकांनी स्पर्धेच्या ठिकाणी मेळाव्यास उपस्थिती लावली व आपला "गोवादूत'वरील लोभ व्यक्त केला. माहिती संचालक निखिल देसाई, पोलिस महानिरीक्षक किशनकुमार, माजी मुख्यमंत्री शशिकला काकोडकर, कला व संस्कृती संचालक प्रसाद लोलयेकर, माजी मंत्री निर्मला सावंत, रमाकांत खलप, संजीव देसाई, शंभू भाऊ बांदेकर, सुरेश वाळवे तसेच जॉन आगियार, भिवा सातार्डेकर, नगरसेविका ज्योती मसुरकर, सौ. व श्री. राजेंद्र भोबे, सौ. व श्री. संतोष केंकरे, न्या. डेस्मंड डिकॉस्ता, न्या.अनुजा प्रभुदेसाई, सरिता सीताराम नाईक, प्रचला आमोणकर, शंकुतला भरणे, अनंत चोडणकर, सौ.आरती चोडणकर, सौ. व श्री. अजयकुमार, सौ. व श्री. सुभाष फळदेसाई, सतीश नाईक, सुभाष जाण, डॉ.केदार पडते, डॉ. महेंद्र व अनुपमा कुडचडकर, सौ. शिल्पा डोळे, प्रतिमा धोंड, माधवी धोंड, सौ. व श्री. अनिल पवार, विलास दळवी, सीया दळवी, ज्योती कुंकळकर, शशांक कामत आदी हितचिंतकांनी मेळाव्यास येऊन पाककृतींचा आस्वाद घेतला."गोवादूत'चे संपादक राजेंद्र देसाई, संचालक ज्योती धोंड, सागर अग्नी, संगीता दळवी व अन्य कर्मचाऱ्यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.

भ्रष्टाचार हाच शिष्टाचार

कामत सरकारवर पर्रीकरांची खरपूस टीका
पणजी, दि. २९ (प्रतिनिधी) - सरकारच्या नाकर्तेपणामुळे विविध सरकारी खात्यात सुरू असलेल्या भ्रष्टाचाराची घाण सामान्य नागरिकांना सतावत असल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी केली.
आज पंचायत,नदी परिवहन,समाजकल्याण, महिला व बालकल्याण आदी खात्यांच्या पुरवण्या मागण्यांवर बोलताना त्यांनी प्रशासकीय कारभारातील भ्रष्टाचार व गैरप्रकारांचा पाढाच सादर केला. समाज कल्याण खात्यातर्फे राबवण्यात येणाऱ्या दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेअंतर्गत सुमारे २५ हजार लाभार्थी गैरफायदा घेत असल्याचे सांगून त्यांना हुडकून न काढल्यास ही योजना राबवणे अशक्य बनणार असल्याचा धोकाही त्यांनी वर्तवला. पंचायतमंत्री बाबू आजगावकर यांच्याकडून खात्याचा अधिकतर पैसा हा केवळ धारगळ मतदारसंघासाठी खर्च करण्यात आला, तर नगरविकास मंत्र्यांनी "सुडा'चा ("स्टेट अर्बन डेव्हलपमेंट एजन्सी'चा) पैसा स्वतःच्या कुंकळ्ळी मतदारसंघात नेला असा टोमणाही पर्रीकर यांनी हाणला. अंगणवाडी सेविकांनी सादर केलेल्या मागण्यांवर गांभीर्याने विचार व्हावा,अशी विनंतीही पर्रीकर यांनी केली. अनेक पंचायतीत नियुक्त करण्यात आलेले सचिव पूर्णपणे राजकीय वरदहस्ताने काम करीत असून ते पंचायत मंडळाला योग्य सहकार्य करीत नसल्याची टीका पर्रीकर यांनी केली. राज्यात बाल हक्क कायदा संमत झाला असताना राज्यात अत्याचारीत मुलांना न्याय मिळत नसल्याचा आरोप पर्रीकर यांनी केला. या ठिकाणी एका अल्पवयीन मुलीला एका विदेशी कुटुंबाला बेकायदा दत्तक दिल्याचा प्रकारही पर्रीकर यांनी उघड केला. विविध नगरपालिकांना उद्योग खात्याकडून व पालिका प्रशासनाकडून मिळणारा हक्काचा पैसा अजूनही मिळत नसल्याचेही त्यांनी सांगितले.पणजी पोटो येथील कचरा विल्हेवाट प्रकल्पाची वाट लागली असून त्यामुळे या भागांत दुर्गंधी पसरल्याचे पर्रीकर यांनी सांगितले. आज विरोधी तथा सत्ताधारी पक्षातर्फे अनेक आमदारांनी चर्चेत भाग घेतला. ही चर्चा सुमारे रात्री साडेआठ पर्यंत चालली व त्यानंतर मंत्र्यांचा खुलासा सुरू झाला.

पेट्रोलपंप मालकास लुटण्याचा प्रयत्न

सुकूर येथे झटापट
तलवारीने हल्ला
दिनेश कुंदे जखमी

पणजी, दि. २९ (प्रतिनिधी) - मालपे पेडणे येथे पेट्रोलपंप लुटल्याची घटना ताजी असतानाच काल रात्री पर्वरी येथील पेट्रोलपंप बंद करून घरी परतत असताना पंपचे मालक दिनेश कुंदे यांचे वाहन अडवून सुकूर पंचायतीजवळ लुटण्याचा प्रयत्न झाला. समोरचे दृश्य पाहून तेथे उपस्थित असलेल्या सुरक्षारक्षकाने वेळीच आरडाओरड केल्याने लुटारू पळून गेले. मात्र जाताना त्यांनी दिनेश कुंदे यांच्या वाहनाची मागील काच फोडून एक बॅग पळवली. यावेळी पायाजवळ ठेवलेली मोठी रक्कम सुदैवाने बचावली. याविषयीची तक्रार कुंदे यांनी पर्वरी पोलिस स्थानकावर दाखल केली आहे.
काल रात्री १०.३० च्या सुमारास कुंदे हे पर्वरी चारखांब येथील आपला पेट्रोल पंप बंद करून आपल्या पुतण्यासह सुकूर येथे घरी निघाले होते. सुकूर पंचायतीजवळ पोचले असता एक आल्तो मोटार कुंदे यांच्या गाडीसमोर लावण्यात आली. मोटारीतून दोन धिप्पाड व्यक्ती तलवारी घेऊन खाली उतरल्या व त्यांनी कुंदे यांच्याकडे पैशाची मागणी केली. तसेच त्यांना धक्काबुक्कीही केली. या झटापटीत कुंडे यांच्या हाताला तलवार लागून जखम झाली. हे दृश्य पाहून तेथे उपस्थित एका सुरक्षारक्षकाने आरडाओरड केली. त्यामुळे त्या दोघा तरुणांनी वाहनाच्या मागच्या दरवाजाची काच फोडून सीटवरील एक बॅग पळवली. त्यात एक घड्याळ व तीनशे रुपये होते, असे तक्रारीत म्हटले आहे.
दोन्ही लुटारू कोकणीतून बोलत होते. एकूण चौघे लुटारू मोटारीत होते. दोघे वाहनातच बसून होते. गेल्या दोन दिवसांपासून एक वाहन आपला पाठलाग करीत असल्याचा संशय कुंदे यांना आला होता. रात्री लुटारू घेऊन आलेले वाहन कुंदे हे पेट्रोल पंपवरून निघण्यापूर्वी पंपाजवळच उभे होते. तसेच दोन दिवसांपासून एक वॅगनर वाहन त्यांच्या मागावर होते, असा संशय आहे. कुंदे यांना लुटण्यासाठी त्यांनी सापळा रचला असावा, असे दावा पोलिसांनी केला आहे. अधिक तपास पर्वरी पोलिस स्थानकाचे निरीक्षक देवेंद्र गाड करत आहेत.

गोव्याला खास दर्जाच्या मागणीचा ठराव संमत

मौल्यवान जमिनी वाचवण्यासाठी खास उपाययोजना
पणजी, दि. २९ (प्रतिनिधी) - गोव्याचा वेगळेपणा टिकवून ठेवण्यासाठी या राज्याला विशेष दर्जा मिळावा अशी मागणी केंद्र सरकारकडे करणारा एकमुखी ठराव आज विधानसभेत संमत करण्यात आला. भाजपचे आमदार फ्रान्सिस डिसोझा व कॉंग्रेसचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांनी मांडलेल्या या संयुक्त ठरावाला आज सभागृहातील सर्व सदस्यांनी एकमुखाने संमती दिली.
भारतीय घटनेच्या ३७१ व्या कलमानुसार गोव्याला विशेष राज्याचा दर्जा मिळण्याची गरज आहे,अशी मागणी भाजप विधिमंडळ गटाचे उपनेते फ्रान्सिस डिसोझा यांनी केली. गोवा हे लहान राज्य असल्याने येथे अनेक गोष्टी मर्यादित आहेत. प्रामुख्याने येथे केवळ ४०० चौरस किलोमीटर भूभाग बाकी राहिल्याने तो भावी पिढीसाठी शाबूत ठेवणे ही आपली जबाबदारी असल्याचे ते म्हणाले. गोव्यात सध्या भूखंडांना जी मागणी आहे ती पाहता येथे स्थानिक लोकांसाठी भविष्यात जमीन राहणार नाही,अशी परिस्थिती उद्भवण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली. गोव्यातील कित्येक मूळ गोमंतकीय विदेशातून परत आपल्या भूमीत स्थायिक होण्यास इच्छुक असून त्यांना प्राधान्य मिळण्याची आवश्यकता आहे, असेही डिसोझा म्हणाले.
विशेषतः येथील जमिनींचे रक्षण करण्यासाठी बिगरगोमंतकीय व विदेशी लोकांना जमीन खरेदी करण्यावर निर्बंध घालण्याची आवश्यकता असल्याची माहिती त्यांनी दिली. आलेक्स रेजिनाल्ड यांनी गोव्याच्या अस्तित्वाबाबत असलेल्या या प्रस्तावाला सर्वांनी मतभेद विसरून एकत्र येण्याची गरज असल्याचे सांगितले. विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी याप्रकरणी बोलताना उत्तरेतील काही राज्यांना घटनेत असा दर्जा देण्यात आला आहे. गोव्यालाही हा दर्जा मिळावा जेणेकरून या राज्याचे वेगळे अस्तित्व टिकवून ठेवणे शक्य होणार असल्याचे ते म्हणाले.
मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी या प्रस्तावाला सहमती दर्शवली व या ठरावाला दुरुस्ती सुचवून तो संमत करण्यात आला. या प्रस्तावावर लक्ष्मीकांत पार्सेकर,दयानंद नार्वेकर,व्हिक्टोरिया फर्नांडिस,दयानंद मांद्रेकर आदींनी विचार मांडले.

Thursday 28 August, 2008

दे 'धक्का'

सभागृहात आज वीजमंत्री सिक्वेरांना एकावर एक धक्के (विजेचे? छे! विरोधकांचे) बसले. सारे प्रश्न वीज खात्याचेच. विरोधकही त्यांना अडचणीत आणण्याच्या तयारीनेच विधानसभेत दाखल झालेले. सुरूवातीलाच मुरगावच्या मिलिंद नाईकांचा बिलांच्या थकीत रकमेचा प्रश्न. अनेक प्रकरणे न्यायालयात पडून आहेत.मनोहर पर्रीकरांनी त्यांना जोड दिली. वारंवार वकील बदलता. त्यातून समझोता लवकर होतो की काय? पर्रीकरांनी उपरोधिकपणे संशय व्यक्त केला. वकील बदलले माहीत नाही. धक्क्यातून सावरत वीजमंत्र्यांचा खुलासा. न्यायालयातील खटले कायदा खाते सांभाळते. वीजमंत्र्यांनी स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली. ते ठिक आहे, परंतु त्यांनी तुमचे मत विचारात घ्यायला हवे. वकील कोण हेच जर तुम्हाला माहीत नाही, तर थकलेली रक्कम वसूल होणार कशी? पर्रीकरांनी आता तोफ डागली. घरगुती वापरासाठी लाखांची बिले कशी येतात? थकीत रक्कम लाखाच्या घरात जाईपर्यंत तुमचे अभियंते काय करतात? पर्रीकरांच्या मुलुखमैदान तोफेतून धडाधड गोळे वीजमंत्र्यावर आदळत होते. त्यासाठीच बिल निवारण समिती स्थापलीय. ही प्रकरणे त्यांच्यामार्फत सोडवू. वीजमंत्र्यांचा बचावात्मक पवित्रा. कितीतरी रुपये या खटल्यात अडलेत. गोमंतकीय जनतेचे पैसे आहेत ते. त्यात लक्ष घाला. आता तर सभापतींनीच सुनावले. खात्यात अपुरे कर्मचारी व वाहने आहेत. त्याचा फटका ग्राहकांना बसतोय. तुमच्या चुकीचा फटका त्यांनी का सोसावा? लोकांचे टीव्ही, फ्रिज जळून खाक होतात. कुडतरीच्या आलेक्स रेजिनाल्डनी (आम आदमीची) कैफियत मांडली. माझाही टीव्ही जळालाय. काणकोणच्या विजय पै खोत यांची (विजयी मुद्रेत) तक्रार. वीजमंत्री होताच माझाही टीव्ही जळून खाक - सिकेरा. सभागृहात हास्याची हलकी लकेर. खासगी कंत्राटदार मठ्ठ झालाय. वाहने पाठवत नाही. पाठविलीच, तर चालक नाही आणि चालक पाठवला तर डिझेल पुरवत नाही. कंत्राट करताना ही जबाबदारी त्याची होती. कंत्राट रद्द करण्याची तरतूदच त्यात नाही, म्हणून घोडे अडलेय. तरी आता नवी वाहने भाडेपट्टीवर घेऊ. पुढच्या ४५ दिवसांत वाहने घेतो. कर्मचारी भरतीसाठी थोडा अवधी लागेल. वीजमंत्र्यांचा खुलासा. अहो, हे सगळे करण्यासाठीच तर मंत्री असतो. तुमचे खाते बाबूंकडे द्या. ते खाते कसे हलवून सोडतात बघा! पर्रीकरांच्या कोटीमुळे सभागृहात हास्याचा धबधबा. तुमच्या आधी मंत्री होते त्यांनी हे काही केले नाही? सिकेरांच्या खांद्यावर बंदूक ठेवून पर्रीकरंनी मुख्यमंत्र्यांवर गोळा डागला व वीजमंत्री खळाळून हसले. "जोर का झटका धीरेसे' म्हणत वीजमंत्री विरोधकांचे धक्के पचवत होते. तेवढ्यात पेडण्यातील दयानंद सोपटेंची तोफ कडाडली. काय झाले कळलेच नाही. वीजमंत्र्यांना मात्र या तोफेचा धक्का ४५० व्हॉल्टचा वाटला. त्याला कारणही "४५०' चेच होते. सगळे विरोधक एकवटले. आमदारांना दिवे पुरवताना भेदभाव का? सत्ताधाऱ्यांच्या मतदारसंघात ४५० ट्यूबलाईटस ८५ सोडीयम व्हेपरचे दिवे. विरोधकांच्या मतदारसंघात मात्र अनुक्रमे दीडशे व पंधरा. हे काय? विरोधकांच्या मतदारसंघांत अंधार नाही की आम आदमी नाही? विरोधकांचा संतप्त सवाल. हा धक्का पचवणे वीजमंत्र्यांना कठीण होत होते. सभापतींनाही त्यांची दया आली. मुख्यमंत्रीही मदतीला येत नव्हते. अखेरीस सभापतीच त्यांना पावले. सगळे बसा. उभे राहून त्यांनी विरोधकांना सुनावले. हा मासळी बाजार नाही. विरोधकांना त्यांनी समजावले. एकेकजण बोला. वीजमंत्र्यांना हायसे वाटले. चतुर्थी पाच दिवसांवर आली आहे. दिव्यांचा काही मागमूस नाही. पार्सेकरांच्या प्रश्नाला वीजमंत्र्यांचे सोमवारपर्यंत देतो हे उत्तर. सगळ्या मतदारसंघाना समान न्याय द्या. भेदभाव करू नका. विरोधकांनी सूचना वीजमंत्र्यांनी तात्काळ मान्य केली. धक्के पचवणे असह्य होताच मागणी मान्य करून वीजमंत्री विरोधकांच्या तावडीतून निसटले. कोंडीत सापडताच हाच उत्तम मार्ग असतो हेच खरे. पैंगीणच्या रमेश तवडकरांनी जलसंधारण मंत्री फिलिप नेरी रॉड्रीगीज यांची रेवडीच उडवली. बोअरवेलचा प्रश्न विचारताना त्यांनी बोअरवेल ऐवजी "कूपनलिका' शब्द उच्चारून मंत्र्यांवर बाऊन्सर टाकला. तो टोलवताना ते गोंधळले. "स्पीकर सर, हें कूपन--लीका म्हाका कांय समजों ना'. फिलिप यांच्या निवेदनाने सभागृहात प्रचंड हशा पिकला. त्यांनाही सभापतींनींच सावरले. कूपनलिका म्हणजेच बोअरवेल. त्यांनी फिलिपना समजावले. हां. बोरवेल. ओके, ओके म्हणत, मंत्री पुढचे बाऊन्सर झेलण्यास फ्रंटफूटवर तयार. बेकायदा कूपनलिका किती आहेत? मागच्या वेळचे व आताच्या उत्तरात सभापती महाशय तफावत आहे. विरोधकांनी तक्रार केली. त्यात पर्रीकर, तवडकर आघाडीवर. भूजल स्त्रोतासंबंधी खाते कार्यक्षम नाही. कूपनलिकांना परवाने देताना कायद्याचे काटेकोर पालन करा. पर्रीकरांची सूचना. तीन महिन्यांत अभ्यास करू . पर्रीकरांच्या तावडीत सापडण्याआधीच फिलिप यांची आश्वासन देत (चर्चेच्या) रणागंणातून माघार. गृहमंत्री रवी नाईकांना बिहारचा भलताच धसका. का तर त्यांच्या बिहारवरील एका निवदेनाने खळबळ माजलेली. बिहारात त्यांच्याविरोधात कोणी रामसंदेश सिंगनी तक्रार केलीय. त्यामुळे तेथील न्यादंडाधिकाऱ्यांचे रवींना सुनावणीसाठी बोलावणे. शून्य प्रहराला त्यांनी सभागृहात माहिती दिली. सभागृहातील माझे निवेदन न्यायालयीन कार्यकक्षेत येत नाही. सभापतींकडे त्यांचे आर्जव व निर्णय देण्याची विनंती. घटनेतील तरतुदीनुसार सभापतींनी सुरक्षा कवच पुरवले, तसा रवींनी सुटकेचा श्वास घेतला. सभागृहातील आपल्या एका हक्कभंग नोटीशीला न्यायालयाकडून अवमानप्रकरणी समन्स आल्याची पर्रीकरांची माहिती. गोवा कर्नाटकचाच एक भाग या कर्नाटक सरकारच्या एका प्रतिज्ञापत्रावरून विधानसभेत दामू नाईक यांची लक्षवेधी सूचना. उद्या गोवा गेला तर म्हादईही त्यांचीच. काहीतरी करा. त्यांची कळकळीची विनंती. अधिकृत प्रत मागवून मगच काय ते ठरवू. मुख्यमंत्र्यांच्या या आश्वासनाने अखेर विरोधकांना शांत केले.

मोरजीतील युवा वकिलाचा पुण्याजवळ अपघाती मृत्यू

मोरजी, दि. २८ (वार्ताहर) : भाटीवाडा मोरजी येथील वकील पंकज सुभाष सडविलकर (२४) यांचा पुण्यापाशी खेड येथे अपघातात २७ ऑगस्ट रोजी रात्री साडेआठच्या सुमारास मृत्यू झाला. त्यामुळे मोरजी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. आज (गुरुवारी) संध्याकाळी साडेसातच्या सुमारास त्यांच्यावर शोकाकूल वातावरणात शेकडो जणांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
पुण्यातील न्यायालयात पंकज हे मारुती स्विफ्ट (जीए ०३ ३०३८) मोटार घेऊन एका महत्त्वाच्या कामासाठी ऍड. गजानन कोरगावकर (विर्नोडा) या आपल्या मामासोबत निघाले होते. त्यावेळी खेड येथे समोरून येणाऱ्या टॅंकरला गाडीची जोरदार धडक बसून त्यात पंकज जागीच ठार झाले. ते चालकाच्या बाजूलाच बसले होते. या अपघातात ऍड. कोरगावकर हेही गंभीर जखमी झाले आहेत.
पंकज यांच्या अपघाती मृत्यूचे वृत्त मोरजी भागात येऊन थडकताच गावावर शोककळा पसरली. त्यांच्या कुटुंबीयांवर तर दुःखाचा डोंगरच कोसळला. मोरजी भाटीवाडा येथे त्यांच्या घराकडे चाहत्यांची रांगच लागली होती.
पंकज यांच्या पश्चात आई, वडील, एक विवाहित व एक विवाहित अशा दोन बहिणी चुलत भाऊ, काका काकी, असा मोठा परिवार आहे. आपल्या मनमिळाऊ स्वभावामुळे पंकज लोकप्रिय होते. मांद्रे येथे साळगावकर लॉ कॉलेजतर्फे चालवल्या जाणाऱ्या मोफत कायदा सेवा केंद्राचे ते प्रमुख होते. त्यांच्या मृत्युमुळे आपला सच्चा मित्र व एक हाडाचा कार्यकर्ता हरपला, अशी प्रतिक्रिया ऍड. प्रसाद शहापूरकर यांनी व्यक्त केली. गणेश चतुर्थी तोंडावर आलेली असताना काळाने पंकज यांच्यावर झडप घातल्याबद्दल मोरजी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनीही तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
-----------------------------------------------------------
बहिणीने हंबरडा फोडला
ऍड. पंकज यांच्या अकाली मृत्यूचे वृत्त येऊन थडकताच त्यांच्या बहिणीने हंबरडा फोडला. तिला दुःखावेग सहन होत नव्हता. पुण्याला जाण्यापूर्वी पंकज यांची तब्येत ठीक नव्हती. त्यामुळे घरच्या मंडळींनी त्यांना तूर्त पुण्याला जाण्याचा बेत रद्द करण्याचा सल्ला दिला होता. तथापि, काळच त्यांच्या मागावर होता. "अजातशत्रू' म्हणून या भागात परिचित असलेले पंकज मोटारीत बसले ते अखेरचेच.

बिहारला एक हजार कोटींची मदत जाहीर सव्वा लाख टन धान्यही देणार

पाटणा, दि. २८ : बिहारमध्ये कोसी नदीने दिशा बदलविल्याने निर्माण झालेली पूरस्थिती अधिकच गंभीर झाली असताना आज पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी कॉंग्रेसाध्यक्ष सोनिया गांधी यांच्यासह या प्रदेशाचा दौरा करून संपूर्ण स्थितीची पाहणी केली. येथील परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत त्यांनी बिहारमधील पूर ही राष्ट्रीय आपत्ती असल्याचे जाहीर केले आणि राज्याला सर्वतोपरी मदतीचे आश्वासन देऊन एक हजार कोटींचे पॅकेज दिले आहे.
मधेपुरा, सुपौल,अररिया आणि पूर्णिया जिल्ह्यातील अनेक नव्या परिसरात आज पुराचे पाणी शिरले. आज पुरामुळे सुमारे १० जण दगावल्याचे वृत्त आहे. मदत कार्यासाठी लष्कराला पाचारण करण्यात आले आहे. मधेपुरा जिल्ह्यातील १० तालुक्यातील १२६ पंचायत क्षेत्रातील सुमारे २५६ गावे पुराच्या तडाख्यात सापडली आहेत. पुरामुळे येथील सुमारे १ लाख ३० हजार हेक्टर क्षेत्रातील पिके नष्ट झाली आहेत. या परिसरात पुरात अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी ८६ नावा आणि ११ मोटरबोट्स कार्यरत आहेत. पुराचे पाणी कुमारखंड, ग्वालपाडा, मुरलीगंज, मधेपुरा, सिंहेश्वर, बिहारीगंज, उदाकिशुनगंज, शंकरपूर, आलमनगर, पुरैनी आदी ठिकाणी शिरले आहे.

पंतप्रधानांचा दौरा
बिहारमधील पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी पूरग्रस्त भागाची हवाई पाहणी केली. तसेच मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासह वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती जाणून घेतली. पूरस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पंतप्रधानांनी याला राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषित केले आणि बिहारसाठी १ हजार कोटींचे मदतीचे पॅकेज दिले. याशिवाय, वेळोवेळी लागणारी सर्व मदत करण्याचे आश्वासनही दिले. या दौऱ्यादरम्यान सोनिया गांधीही त्यांच्या सोबत होत्या. त्यांनी कोसीमुळे प्रभावित झालेल्या सुपौल, सहरसा, अररिया आणि मधेपुरा जिल्ह्यांचे सर्वेक्षण केले.

सव्वा लाख टन धान्यही देणार
बिहारमधील पूरग्रस्तांसाठी पंतप्रधानांनी कोट्यवधींच्या पॅकेजसह सुमारे सव्वा लाख टन धान्यही देण्याचे जाहीर केले आहे. कोसीचा प्रकोप पाहून पंतप्रधान हेलावले. आतापर्यंत या पुरामुळे शेकडो लोक मृत्यूमुखी पडले आहेत. पण, शासकीय स्तरावर हा आकडा अधिकृतरित्या सांगण्यात आलेला नाही. पंतप्रधानांच्या आजच्या दौऱ्यात गृहमंत्री शिवराज पाटील, लालूप्रसाद यादव, रामविलास पासवान हेही सहभागी होते.

मदत शिबिरांमध्ये झुंबड
बिहारचे चार मोठे जिल्हे पुराच्या तडाख्यात सापडले आहेत. येथील सुमारे लाखो लोक बेघर झाले आहेत. त्यांना मदत शिबिरांमध्ये आश्रय घ्यावा लागत आहे. या शिबिरांमध्येही आता लोकांची झुंबड उडाली असून तेथे पुरेशी मदत सामुग्री पोहोचविताना प्रशासकीय अधिकाऱ्यांची दमछाक होत आहे. पुरामुळे सर्वत्र पाणीच-पाणी असताना पिण्याचे पाणी मिळणे मात्र दुरापास्त झाले आहे. असंख्य पशुही मदतीअभावी दगावले आहेत. प्रशासनाने पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ४४ चिकित्सा शिबिरे तसेच २२ पशू शिबिरे उघडली आहेत. या सर्व ठिकाणी योग्य ती मदत वेळेत पोहोचविण्यासाठी लष्कराची मदत घेतली जात आहे.

Wednesday 27 August, 2008

बडतर्फ न्यायाधीश पुन्हा पदांवर नियुक्त

लाहोर, दि. २७ - माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांनी बडतर्फ केलेल्या ६० पैकी ८ न्यायाधीशांना नव्या सरकारने पुन्हा त्यांच्या जागा बहाल केल्या आहेत. मात्र माजी सरन्यायाधीश इफ्तिकार चौधरी यांच्याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. सिंधच्या गव्हर्नरांनी आपल्या निवासस्थानी या आठ न्यायाधीशांना शपथ दिली. कालच असिफ अली झरदारी यांनी समन्वयाचा सूर लावताना, नवाझ शरीफ यांनी पुन्हा आघाडीत परतावे असे म्हटले होते. त्या पार्श्वभूमीवर हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

जम्मूत हिंसेमुळे रॅली लांबणीवर

अमरनाथ संघर्ष समिती
जम्मू, दि.२७ - जम्मू येथे अतिरेक्यांनी केलेल्या पाच जणांच्या हत्येच्या घटनेमुळे अमरनाथ बोर्डाची जमीन परत मिळविण्यासाठी आंदोलन करीत असलेल्या संघर्ष समितीने आपली आजची रॅली रद्द केली.
याबाबत माहिती देताना श्री अमरनाथ यात्रा संघर्ष समितीचे नेते नरेश पाधा यांनी सांगितले की, जम्मू क्षेत्रात सातत्याने कालपासून मोठ्या प्रमाणावर घुसखोरी सुरू आहे. त्यातूनच अतिरेक्यांनी पाच जणांना ठार केल्याने या क्षेत्रातील स्थिती अतिशय संवेदनशील झाली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनानेही आम्हाला आजची रॅली रद्द करण्याची विनंती केली होती. एकंदर सामाजिक स्थिती लक्षात घेऊन समितीने परेड ग्राऊंडवरील रॅली पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, अद्याप पुढील रॅलीची तारीख ठरलेली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

विरोधकांच्या दणक्यामुळे दुरुस्ती सूचना बारगळली

विषय गोवा सहकार कायद्याचा
पणजी,दि.२७ (प्रतिनिधी)- गोवा सहकार कायद्याला सुचवलेल्या दुरुस्ती विधेयकाला जोरदार आक्षेप घेत या दुरुस्ती सूचना सहकार चळवळीलाच बाधक ठरण्याची भीती विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी व्यक्त केली. पर्रीकर यांनी घेतलेल्या जोरदार आक्षेपामुळे अखेर सरकारने याप्रकरणी सहकारमंत्री रवी नाईक यांच्या अध्यक्षतेखाली निवड समितीची नेमणूक करून या दुरुस्ती विधेयकांबाबत फेरविचार करण्याची घोषणा सभागृहात केली.
सहकारमंत्री रवी नाईक यांनी आज गोवा सहकार कायदा दुरुस्ती विधेयक सभागृहासमोर संमतीसाठी सादर केले. त्यास पर्रीकर यांनी तीव्र आक्षेप घेतला. लोकप्रतिनिधींनी लोकोपयोगी कायदे तयार करून चांगले प्रशासन द्यायचे असते. तथापि, सध्या हेच काम दुय्यम स्वरूपाचे बनले आहे. एखादा कायदा तयार करताना त्याचा साधकबाधक विचार व अभ्यास होण्याची गरज आहे. एकदा कायदा तयार करून त्यानंतर प्रत्यक्ष लोकांना त्रास जाणवल्यानंतर त्यात दुरुस्ती करण्याची मानसिकता योग्य नसल्याचे पर्रीकर म्हणाले.
गोवा सहकार कायदा हा राज्यातील संपूर्ण सहकार चळवळीशी संबंधित आहे. या कायद्याचा अभ्यास करण्याची वेळच न देता घाईघाईने तो संमत करणे चुकीचे आहे असे त्यांनी आग्रहपूर्वक नमूद केले. काही गोष्टीत सहकार निबंधकांचे अधिकार इतरांच्या हाती देण्यात आल्याने त्याचा गैरवापर झाल्यास सहकार संस्था उघड्यावर पडण्याची शक्यता आहे. सहकार संस्थांवर खात्याचा वचक असणे गरजेचे आहे. मात्र खात्यातील लोकांकडूनच जर अधिकारांचा गैरवापर करण्यात आला तर त्याला तारणार कोण,असा सवालही निर्माण होत असल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणी आमदार फ्रान्सिस डिसोझा यांनी म्हापसा येथील कालिका सहकारी संस्थेचे उदाहरण देत खात्यातर्फे नेमण्यात आलेल्या प्रशासकांनीच तिथे गैरकारभार केल्याचे सांगितले.
दरम्यान, विरोधकांनी उपस्थित केलेल्या सुचनांशी सभापती प्रतापसिंग राणे यांनीही सहमती दर्शवली. सहकारमंत्री रवी नाईक यांनी मात्र विरोधकांचा दावा फेटाळून लावण्याचा प्रयत्न केला. मात्र सत्ताधारी गटातील सदस्यांनाही पर्रीकरांच्या म्हणण्यात तथ्य आढळल्याने अखेर यासंदर्भात निवड समिती नेमण्यात आली. या समितीत आमदार नीळकंठ हळर्णकर,आलेक्स रेजिनाल्ड,दीपक ढवळीकर,लक्ष्मीकांत पार्सेकर,फ्रान्सिस डिसोझा यांचा समावेश आहे. ही समिती याबाबत अभ्यास करून त्यात आवश्यक सूचना करणार आहे. विधेयक येत्या शुक्रवारी संमत करण्यात येणार आहे.

"गोवादूत'अल्पावधीतच बनला अग्रदूत - पु.शि. नार्वेकर

"गोवादूत'च्या गणेश विशेषांकाचे थाटात प्रकाशन
पणजी, दि.२७ (प्रतिनिधी) - "गोवादूत'च्या रुपाने गोव्याला एक परिपूर्ण आणि विश्वासार्ह दैनिक मिळाले असून, हे वृत्तपत्र अल्पावधीत अग्रदूत ठरले आहे, असे प्रशंसोद्गार ज्येष्ठ साहित्यिक पु.शि. नार्वेकर यांनी आज येथे काढले. "गोवादूत'च्या गणेश विशेषांकाचे प्रकाशन श्री. नार्वेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी उपसभापती शंभू भाऊ बांदेकर उपस्थित होते.
"गोवादूत'चा आपण पहिल्या अंकापासून वाचक असून, या दैनिकांत विविध प्रकारची माहितीही मिळते. निःपक्षपातीपणा आणि विश्वासार्हता हे दैनिकाचे वैशिष्ट्य ठरले आहे. "गोवादूत'ची रविवारची पुरवणी तर सर्वसमावेशक आणि विचाराला चालना देणारी असते, असे श्री. नार्वेकर यांनी पुढे सांगितले.
ताज्या विषयावरील लेख ही "गोवादूत'ची जमेची बाजू असून, सर्वांगसुंदर व दर्जेदार विशेषांक प्रसिद्ध करण्यात तर या दैनिकाने आघाडीच घेतली आहे, असे शंभू भाऊ बांदेकर यांनी सांगितले.
अशोक नाईक तुयेकर उर्फ "पुष्पाग्रज' यांनी या अंकाचे संपादन केले असून त्यांनीच प्रास्ताविक केले. सरव्यवस्थापक ज्योती धोंड यांनी स्वागत केले. संपादक राजेंद्र देसाई यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. सौ. नीतू कलगुटकर यांनी पुष्पगुच्छ दिले. संचालकसागर अग्नी यांनी आभार मानले. यावेळी "गोवादूत'चे कार्मिक (पर्सोनेल) व्यवस्थापक विलास कामत, सहसंपादक गंगाराम म्हांबरे, वृत्तसंपादक सुनील डोळे, अनंत गुरव, निगम ढवळीकर, बन्सीलाल शिरोडकर, सौ. वर्षा भैरेली, स्वाती कुबल, कालिदास काणेकर, गणपत गवस आदी कर्मचारी व हितचिंतक उपस्थित होते.

महापालिका घोटाळ्यांमुळे सरकारची जबरदस्त कोंडी

विरोधक आक्रमक; कठोर कारवाईचे आश्वासन
पणजी, दि. २७ (प्रतिनिधी) ः राजधानी पणजीत उघडकीस आलेला पे पार्किंग घोटाळा व मांडवी नदीतील कॅसिनोच्या प्रश्नावरून विधानसभेत आज विरोधकांनी नगरविकासमंत्री जोकिम आलेमाव यांची जबर कोंडी केली. पार्किंग घोटाळा प्रकरणात "घरचा भेदी' असल्याशिवाय हा महाघोटाळा होणे अशक्य आहे. त्याची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली. विरोधकांच्या या आक्रमक भूमिकेनंतर नगरविकासमंत्र्यांनी या संपूर्ण प्रकरणात कोणाचीही गय न करता दोषींविरूध्द सरकार कठोर कारवाई करेल, असे आश्वासन दिले.
दयानंद सोपटे यांनी पणजीतील बेकायदा पार्किंग शुल्काचा प्रश्न उपस्थित केला होता. पालिका आधिकाऱ्यांना ५ मार्च २००८ रोजी या घोटाळ्याची माहिती होती हे त्यांच्या नोंदीवरून दिसून येते. प्रत्यक्षात त्यांनी कोणतीच कारवाई का केली नाही. केवळ नगरसेवकांनी तब्बल तीन महिन्यानंतर तक्रार केल्यावर याबाबत चौकशी चालू झाली. माहिती असतानाही कारवाई न करणारे पालिका अधिकारी कोणाला पाठीशी घालत होते, असा सवाल करून पालिकेतीलच काही मंडळींचा या भानगडबाजांशी संबंध असावा, असा संशय विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी व्यक्त केला.
या घोटाळ्याबाबत पोलिसांकडे प्रथम दर्शनी अहवाल दाखल केला असून त्याचा तपास सुरू आहे. आठ नगरसेवकांनी याबाबत तक्रार दिली होती. पोलिस तपास पूर्ण होताच दोषींवर कारवाई करू, अशी ग्वाही आलेमाव यांनी दिली.
दरम्यान, शिवोलीचे आमदार दयानंद मांद्रेकर यांनी कॅसिनोबाबत विचारलेल्या एका प्रश्नावरही आलेमाव यांची प्रचंड कोंडी झाली. सरकारने आपल्या जेटीच्या हद्दीत काही कॅसिनोंना परवाने दिले आहेत काय, असा त्यांचा प्रश्न होता. त्यावर २००२ साली अडवाणी प्लेजर क्रुझ कंपनीला पणजी महापालिकेने परवाना दिला होता, अशी माहिती मंत्र्यांनी दिली. हा परवाना केव्हा दिला त्याची तारीख सांगा, असा आग्रह मांद्रेकरांनी धरला. त्यावेळी तुम्ही तुमच्या प्रश्नात ही माहिती विचारलेली नाही असे सांगून मंत्र्यांनी वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला.
सभागृहात मूळ प्रश्नावर पुरवणी प्रश्न विचारण्याचा आम्हाला अधिकार आहे. त्यामुळे त्यासाठी वेगळा प्रश्न विचारण्याची गरज नाही असे मांद्रेकर यांनी स्पष्ट केले. पर्रीकर यांनीही यावेळी नगरविकासमंत्र्यांना धारेवर धरत पालिकेतील सुरू असलेल्या गोंधळाची त्यांना माहिती करून दिली.
पालिकेतील विविध टिपणेही बदलली जात असल्याचा आरोप पर्रीकर यांनी केला. बदलीवरील पालिका अधिकारी १० जून २००८ रोजी रूजू झालेला असतानाही त्याने ९ जून २००८ रोजीच्या एका आदेशावर सही केल्याचे त्यांनी मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. तुमच्या खात्यात काय चालले ते पाहा. अधिकारी काहीही करू लागले आहेत. त्यांना जरा आवर घाला असे सांगून पर्रीकरांनी पणजी पालिकेतील अधिकाऱ्यांचा भोंगळ कारभाराची कागदपत्रे सभागृहासमोर ठेवली. त्यावर, त्वरित कारवाईचे आश्वासन मंत्री आलेमाव यांनी दिले.
हा गंभीर प्रकार ः पर्रीकर
मुळातच पालिकेच्या नावावर पावत्या छापणे हे गंभीर आहे. अलीकडेच एका वाहतूक पोलिसाने बनावट चलन पुस्तिकेची छपाई केली होती. हे प्रकार अशा घोटाळ्यापेक्षाही गंभीर आहेत. उद्या विविध परवाने, दाखलेही छापले जातील, अशी भीती विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी व्यक्त केली. "घरचा भेदी' त्यात गुंतल्याखेरीज हे कसे शक्य आहे, असा सवाल त्यांनी केला. त्याचबरोबर या प्रकरणाची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.

सरकारच्या धरसोड वृत्तीने उद्योग क्षेत्राची परवड

औद्योगिक संघटनांची खरमरीत टीका
पणजी, दि. २६ - गोव्यात ठिकठिकाणी खाजगी व सरकारी प्रकल्पांना होत असलेल्या विरोधामुळे राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून, सरकार अशा बाबतीत बचावात्मक धोरण अवलंबत असल्याने उद्योग क्षेत्र अडचणीत आल्याची टीका गोव्यातील प्रमुख व्यावसायिक संस्थांच्या एका शिष्टमंडळाने मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना सादर केलेल्या निवेदनात केली आहे. सरकारच्या धरसोड वृत्तीमुळे पायाभूत सुविधांचा विस्तार रेंगाळल्याची टीकाही या निवेदनात करण्यात आली आहे.
गोवा चेंबर ऑफ कॉमर्स ऍन्ड इंडस्ट्री, गोवा राज्य औद्योगिक संस्था व इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीयर्स-गोवा शाखा यांच्या प्रतिनिधींनी हे निवेदन श्री. कामत यांना दिले आहे. नीतिन कुंकळकर, अर्नस्ट मोनीझ, ट्युलियो डिसौझा, दत्ता नाईक, ब्रियान सुआरीस, अतुल नाईक, गौतम राव व फ्रान्सिस ब्रागांझा या पदाधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या शिष्टमंडळाने श्री. कामत यांची भेट घेऊन हे निवेदन सादर केले.
राज्यात अनेक भागांमध्ये खाजगी व सरकारी उद्योगांना विरोध करण्याचे सत्र काही गट व बिगरसरकारी संस्थांनी सुरू केल्याने विकासाचे प्रकल्प रखडल्याचे या निवेदनात म्हटले आहे. पायाभूत सुविधांअभावी औद्योगिक, पर्यटन व गृहबांधणी क्षेत्रातील प्रकल्प स्थगित ठेवण्याच्या वृत्तीवरही निवेदनात टीका करण्यात आली आहे.
पुरेशा संधी नसल्याने गोव्यातील ८५ टक्के अभियंते नोकरीसाठी राज्याबाहेर गेले आहेत, सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावून राज्यातील बुद्धिमान व कुशल मनुष्यबळाला संधी देण्यासाठी कोणत्या प्रकारचे उद्योग या राज्यात सुरू करता येतील याचा ठोस निर्णय घ्यावा,असे निवेदनात म्हटले आहे.
खाजगी अथवा सार्वजनिक क्षेत्रातील कोणत्याही प्रकल्पास होणाऱ्या विरोधाबाबत सरकार नेहमीच बचावात्मक पवित्रा घेत असल्याबद्दल निवेदनात खंत व्यक्त करण्यात आली आहे. सत्तारूढ पक्षासह सर्वच राजकीय पक्ष आपले हित पाहात असून, उद्योजकांच्या व्यथा आणि समस्यांकडे दुर्लक्ष करीत आहेत, अशी टीका या निवेदनात करण्यात आली आहे.
पर्यावरण व निसर्ग संवर्धनाबाबत होत असलेली जागृती प्रशंसनीय असली तरी मूलभूत सुविधांच्या वाढीकडे यापूर्वी दुर्लक्ष झाल्याने उद्योगांना पोषक असे वातावरण नाही. सुकूर ग्रामसभेने तर गृहबांधणी क्षेत्रात गोमंतकीय उद्योजकांनाच संमती देण्याचे ठरविले आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यात पोलिस अपयशी ठरले आहेत. महिला संरपंचांनाही धक्काबुक्की केली जात असताना पोलिस केवळ बघ्याची भूमिका घेत आहेत. ग्रामसभा पंचायतींवर दडपण आणून दाखले स्थगित ठेवायला भाग पाडतात. मेगा प्रकल्पाची व्याख्या समजून न घेता विरोध वाढत चालला आहे. ग्रामसभांच्या अधिकाराबाबत कायदेशीर सल्ला घेऊन जनतेला माहिती द्यावी असेही निवेदनात सुचविण्यात आले आहे. आराखडा २०११ च्या अंतिम स्वरूपाला मान्यता देण्याबाबत सरकारी पातळीवर हालचाल व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

५० हजारांचा चरस जप्त

डच पर्यटकाला अटक
पणजी, दि. २६ (प्रतिनिधी) - केरी हरमल येथे स्टीफन हॅर्चबगर (३२) याला अटक करून त्याच्याकडून अमलीपदार्थ विरोधी पथकाने ५०० ग्रॅम चरस जप्त केला. आंतराराष्ट्रीय बाजारात या चरसची किंमत ५० हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पर्यटन हंगामाच्या सुरवातीलाच हा छापा टाकल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहे. केरी हरमल येथे भाड्याच्या खोलीत राहणारा स्टीफन अमलीपदार्थाची तस्करी करीत असल्याची माहिती या पथकला मिळाली होती. त्यानुसार त्याच्यावर नजर ठेवण्यात आली होती. सकाळी ११.३० वाजता छापा टाकला असता त्याच्याकडे ५०० ग्रॅम चरस सापडला.

पाच जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल

"सिमी'चे संशयित अतिरेकी
बेळगाव, दि. २६ (प्रतिनिधी) - बेळगावात विधानसभा निवडणुकीवेळी दहशत निर्माण करण्यासाठी बॉम्बस्फोटांचा कट रचणाऱ्या दहा संशयित सिमी अतिरेक्यांपैकी पाच जणांवर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्री. नाईक यांच्या न्यायालयात "एपीएमसी' पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले आहे. अन्य पाच जणांवर आरोपपत्र दाखल करण्यासाठी आणखी कालवधी लागणार आहे. त्यासाठी पोलिसांनी न्यायालयकडे वेळ मागितला आहे.
लियाकत अली सय्यद, नदीम सय्यद, इम्तियाज दालायन, नसीर पटेल, इजाज गुलाम हुसेन, तनवीर मुल्ला आणि इकबाल जकाती हे सात संशयित आरोपी पोलिस कोठडीत आहेत. या सातही जणांवर बंगळूरच्या प्रयोगशाळेत नार्को चाचणी करण्यात येत आहे. डॉ. मुनरोज आणि डॉ. असिफ सीओडी पोलिसांच्या ताब्यात आहेत. तसेच संशयित "सिमी' अतिरेकी सादिक मुल्ला फरारी आहे.

बसची ठोकर बसून शाळकरी मुलगी ठार

तिस्क उसगाव, दि.२६ (प्रतिनिधी) - खांडेपार येथील पंचायत कार्यालयाजवळ शाळा सुटून घरी परतणारी १० वर्षीय शाळकरी मुलगी मंजू बी. राजपूत ही कर्नाटक एस.टी.बसची ठोकर आज दुपारी बसून जागीच ठार झाली. या अपघातामुळे ग्रामस्थ संतप्त झाले. त्यांनी बस चालकाला भरपूर चोप दिला. त्यानंतर त्याला फोंडा पोलिसांनी ताब्यात घेतले.
गावठण खांडेपार येथील सरकारी प्राथमिक विद्यालयात तिसरीत शिकणारी मंजू शाळा सुटल्यावर दुपारी १ च्या सुमारास बाजार खांडेपार येथील आपल्या घरी परत येत होती. खांडेपार पंचायत कार्यालयाजवळ त्याच वेळी पणजीहून (बेळगाव, कोल्हापूर, जमखंडी विजापूरमार्गे) गुलबर्गा सेडामकडे जाणाऱ्या कर्नाटक एस.टी. बसची (केए ३२ एफ १२४८) तिला जोरदार ठोकर बसली. त्यामुळे मंजू जागीच गतप्राण झाली. सोबत तिचा छोटा भाऊ होता. तो सुखरूप बचावला.अपघाताचे वृत्त समजताच ग्रामस्थांचा मोठा जमाव तिथे जमला.त्यांनी बस चालकाला झोडपून काढले. मंजूला पोलिसांच्या वाहनातून फोंडा आय.डी. इस्पितळात नेण्यात आले व ती मरण पावल्याचे तेथील डॉक्टरांनी घोषित केले.बसची ठोकर ठोकर जबरदस्त असल्याने डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होऊन मंजू जागीच मरण पावली.

सदर रजपूत कुंटुंबीय केवळ १५ दिवसांपूर्वी बाजार खांडेपार येथे भाड्याच्या खोलीत राहायला आले होते. पूर्वी ते नळाकडे केरयान खांडेपार येथे राहात होते. त्या बालिकेच्या वडिलांचा मिठाई व्यवसाय आहे.नेहमीप्रमाणे शाळा सुटल्यावर आपल्या छोट्या भावाला घेऊन मंजू घरी निघाली होती. खांडेपार पंचायत कार्यालयाजवळील धोकादायक वळण व अरुंद रस्ता असलेल्या ठिकाणी तिचा बळी गेला. तिथे रस्त्याच्या कडेने चालत जाण्यासाठी जागा नाही. सदर एस.टी. बस लांब असल्याने रस्त्याच्या अगदी कडेने चालणारी बालिका बस वाहकाला दिसली नाही. बसची मागची बाजू त्या बालिकेला आपटली.अपघात स्थळापासून ५० मीटरावर जाऊन एस.टी. बस थांबली.
या अपघाताचे वृत्त समजताच फोंडा पोलीस त्वरित घटनास्थळी धावले.फोंडा गेटस् ताबडतोब घटनास्थळी गेली.फोंडा पोलीस व्ह्रन मधून त्या बालिकेला बेशुद्ध अवस्थेत फोंडा आय.डी. इस्पितळात आणण्यात आले.तिथे बालिका मृत पावल्याचे डॉक्टरने जाहीर केले.
सदर कर्नाटक एस. टी.बसचा चालक हंबाराय पीराप्पा उटवेटी (वय ४२ वर्षे, रा. गुलबर्गा, युनिव्हर्सिटीजवळ) याला फोंडा पोलिसांनी ताब्यात घेतले.
या अपघाताचा पंचनामा उपनिरीक्षक संजय दळवी व पोलीस हवालदार शिवाजी मेरवा यांनी केला.पुढील तपास सुरू आहे.
अपघातस्थळी करुण दृश्य
जेथे हा अपघात तेथे बाजूलाच मंजूचे दफ्तर पडले होते. रस्तावर रक्ताचे डाग पडले होते आणि हे दृश्य पाहून लोक हळहळत होते. मंजूचा धाकटा भाऊ या अपघाताने घाबरला होता. तिला बसची ठोकर बसल्याने संतापलेल्या जमावाने बसचालकाला झोडपून काढले. ओपा खांडेपार बस थांबा ते खांडेपार ग्रामपंचायत हा रस्ता वळणाचा व कमालीचा अरुंद आहे. तेथे आजपर्यत अनेक अपघात होऊन कित्येक जणांचे बळी गेलेले आहेत. संतापजनक गोष्ट म्हणजे अजूनदेखील या रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आलेले नाही.

Tuesday 26 August, 2008

मालपे - पेडणे येथे पेट्रोलपंपवर दरोडा

नव्वद हजार व दोन मोबाईल संच लुटले
मोरजी, दि. २६ (वार्ताहर) - "पेट्रोल टाकी फूल करायची आहे,' अशी बतावणी करत आलेल्या चौघा बुरखाधारी दरोडेखोरांनी काल रात्री अडीचच्या सुमारास मालपे पेडणे येथील पेट्रोलपंपवर दरोडा घालून रोख नव्वद हजार व दोन मोबाईल संच लुटून नेले. भारत पेट्रोलियमचा हा राष्ट्रीय महामार्गावरील पंप अवधूत स्वार यांच्या मालकीचा आहे.
काल रात्री अडीचच्या सुमारास एक मारुती मोटार या पंपावर दाखल झाली. मोटारीच्या नंबर प्लेटवर एक कागद डकवण्यात आला होता. त्यावर जीए ०६ १८६१ असा क्रमांक लिहिण्यात आला होता. मोटारीत चौघे बुरखाधारी होते. त्यांनी तेथील कर्मचाऱ्यांना मोटारीची टाकी फूल करण्यात सांगितले. त्यानंतर पैसे देण्याच्या बहाण्याने आतील चौघे हातात सुरे व तलवारी घेऊन बाहेर आले. तेथील कर्मचाऱ्यांना धाक दाखवून त्यांनी रोख नव्वद हजार रुपये व दोन मोबाईल संच लुटून नेले. विलक्षण वेगाने घडलेल्या या घटनेमुळे तेथील कर्मचारी गांगरले. दरोडा घालून त्याच गाडीत बसून या दरोडेखोरांनी म्हापशाच्या दिशेने पलायन केले. चौघेही कोकणीतून बोलत होते. त्यामुळे ते सीमाभागातील असावेत व एकंदर परिस्थितीचा अंदाज घेऊनच त्यांनी हा दरोडा घातला असावा, असा पोलिसांचा कयास आहे.
आज (२६ रोजी) सकाळी पावणेबाराच्या सुमारास पंपचे व्यवस्थापक सुभाष मांद्रेकर यांनी पेडणे पोलिसांत तक्रार नोंदवली. दरोडा घातल्यानंतर तक्रार नोंदवून पुढील सोपस्कार होईपर्यंत बराच काळ गेल्याने पोलिसांना नाकाबंदी करता आली नाही. हा पंप २४ तास सुरू असतो. मात्र तेथे सुरक्षा रक्षक तैनात केलेले नसतात. दरोडा पडला तेव्हा तेथे उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांच्या जबान्या पोलिसांनी नोंदवल्या आहेत. या पंपापासून पोलिस स्थानक दोन किलोमीटर अंतरावर आहे. दरम्यान दरोडा पडल्याची माहिती मिळताच म्हापशाचे उपअधीक्षक सुभाष गोलतेकर घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पोलिसांना महत्त्वाच्या सूचना केल्या. याप्रकरणी पेडण्याचे पोलिस निरीक्षक नेल्सन आल्बुकर्क तपास करत आहेत.

Monday 25 August, 2008

हातातील रोख रक्कम पळवणाऱ्याला पणजीत लोकांकडून अटक

पणजी, दि. २५ (प्रतिनिधी): पणजी शहरातील बॅंक ऑफ इंडियामध्ये पैसे काढण्यासाठी आलेल्या भगवान पांडे या ७० वर्षीय वृद्धाच्या हातातील ४० हजार रुपये घेऊन पळून जाणाऱ्या संशयिताला अन्य ग्राहकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. पैसे मोजून देतो असे सांगून या वृद्धाला लुटण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्याने पैसे मोजण्यासाठी न दिल्याने त्याच्या हातातील रक्कम हिसकावून पळून जात असतानाच भगवान यांनी आरडाओरड केल्याने संशयित सलीक जाफर याला ताब्यात घेण्यात आले. चतुर्थीच्या तोंडावर बॅंकेत येणाऱ्या व्यक्तींना लुटण्याचा प्रयत्न झाल्याने लोकांना दक्ष राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
आज सकाळी सुमारे ९ वाजता मंगेशी म्हार्दोळ येथील श्री. पांडे हे पणजीतील बॅक ऑफ इंडियामध्ये पैसे काढण्यासाठी आले होते. आपल्याकडील धनादेश वठवून तेथील सोफ्यावर पैसे मोजण्यासाठी बसले. यावेळी त्यांच्याजवळ दोघांनी येऊन पैसे आपण मोजून देतो असे सांगितले. यावेळी पांडे यांनी त्याला नकार दर्शविल्याने त्यांच्या हातातील पैसे काढून घेण्यात आले. त्याबरोबर पांडे याने आरडाओरड केल्याने पळून जाणारा सलीक याला पकडण्यास यश आले.
सलीक याला पणजी पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आले असून तो आजच सकाळी सांगली महाराष्ट्र येथून सकाळी ६ वाजता गोव्यात आल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. यावेळी त्याच्याबरोबर त्याचे अन्य साथीदार आल्याची शक्यता आहे.
सलीक जाफर याच्या विरुद्ध भा.दं.सं. ३५६, ३८९ व ५११ नुसार गुन्हा दाखल केला असून याविषयीचा अधिक तपास उपनिरीक्षक योगेश पेडणेकर करीत आहे.

भाषावाद कायमस्वरूपी निकालात काढणार

पर्रीकरांच्या सूचनेला सरकारची मान्यता
पणजी,दि.२५ (प्रतिनिधी): गेली कित्येक वर्षे शीतपेटीत पडलेल्या राजभाषेच्या मुद्यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा हा विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांचा प्रस्ताव आज सरकारकडून उचलून धरण्यात आला. मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी या विधानसभा अधिवेशनानंतर कोकणी, रोमी व मराठी राजभाषेसाठी आंदोलनाच्या पवित्र्यात असलेल्या सर्वांना बोलावून, संबंधितांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर या विषयी सर्व आमदारांना विश्वासात घेऊन हा वाद निकालात काढण्याचे आश्वासन विधानसभेत दिले. या चर्चेदरम्यान सभापती प्रतापसिंग राणे यांनीही पर्रीकरांच्या विचारांशी सहमती दर्शवून हा विषय निकालात काढण्यासाठी फक्त आमदारांसाठी खास अधिवेशन बोलावण्याचा प्रस्ताव पुढे केला.
आज विधानसभेत गृह,सर्वसाधारण प्रशासन,दक्षता व राजभाषा संचालनालय आदी खात्यांच्या पुरवण्या मागण्यांवर चर्चा करताना भाषावादाचा मुद्दा प्रामुख्याने चर्चेस आला. या संदर्भात विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी महत्त्वाची सूचना केली. भाषावादाचा मुद्दा अजूनही धुमसणे हे गोव्याच्या दृष्टीने अत्यंत घातक असल्याचे ते म्हणाले.
सध्याच्या परिस्थितीत येथील सामाजिक सलोखा शाबूत ठेवण्याची गरज असताना भाषावादावरून समाजात फूट पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रोमी कोकणी लिपीचा गोव्यात मोठ्याप्रमाणात वापर सुरू होता व आहे ही गोष्ट अजिबात अमान्य करता येणार नाही. खुद्द शणै गोंयबाब यांची सुरुवातीची १२ पुस्तके ही रोमी लिपीतून प्रसिद्ध झाली होती. "बायबल'चे ग्रंथ हे देखील रोमी लिपीतूनच प्रसिद्ध झाले आहेत. दुसरीकडे अधिकतर हिंदू कोकणी बोलत असले तरी व्यवहार व वाचनासाठी ते मराठीचा वापर करतात. बहुतांश लोकांचे शिक्षणही मराठीतून झाले आहे. भाषा हे संवादाचे साधन आहे. त्यामुळे या विषयाचा बाऊ करून त्यास वेगळे वळण देणे योग्य नाही. यासंबंधी सखोल चर्चा करून तसेच या विविध मुद्यांवर आंदोलनाचा पवित्रा घेतलेल्यांशी चर्चा करून हा विषय निकालात काढावा,असे पर्रीकर म्हणाले.
याप्रकरणी उपसभापती माविन गुदिन्हो, कळंगुटचे आमदार आग्नेल फर्नांडिस,कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड, सांताक्रुझच्या आमदार व्हिक्टोरिया फर्नांडिस आदींनीही स्पष्ट विचार मांडून रोमी लिपीचे समर्थन केले.
यासंदर्भात स्पष्टीकरण देताना मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी मात्र काहीशी सावध भूमिका घेतली. खास अधिवेशन न बोलवता राज्यातील भाषावादाच्या आंदोलनात असलेल्या लोकांना बोलावून त्यांचे विचार एकूण घेतल्यानंतर सर्व आमदारांनी एकत्रित बसून या विषयी तोडगा काढण्याचे मान्य केले. येत्या अधिवेशनानंतर लगेच ही बैठक बोलावली जाईल,असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, भाषावादासंदर्भात पर्रीकर यांच्याकडून एक खाजगी ठराव मांडण्यात येणार आहे. त्या ठरावाला मान्यता मिळाल्यास हा प्रश्न आपोआपच निकालात निघेल, असेही यावेळी सांगण्यात आले.

जुन्या शाळांची बाजू ऐकूनच यापुढे नव्या शाळांना अनुमती

पणजी, दि. २५ (प्रतिनिधी): शेजारील जुन्या शाळांची बाजू न ऐकताच जिथे नव्या शाळांना परवाने दिले गेले आहेत त्याची चौकशी करण्याची ग्वाही देत यापुढे नव्या शाळांना परवाने देताना शेजारील शाळांची बाजू ऐकून घेण्याचे आश्वासन शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी आज सभागृहात दिले.
मुरगावचे आमदार मिलिंद नाईक यांनी विचारलेल्या एका प्रश्नावर उत्तर देताना ते बोलत होते. शिरोड्याचे आमदार महादेव नाईक यांनी शिरोड्यात आधी नव्या शाळेला परवानगी दिल्यानंतर जुन्या शाळांना सुनावणीचे पत्रे पाठविल्याचा प्रकार मंत्र्यांच्या नजरेस आणून दिला. डिचोलीचे आमदार राजेश पाटणेकर यांनी, डिचोलीत शेजारील शाळांची बाजू ऐकून घेतल्यानंतर त्यांना नव्या शाळेला परवानगी नाकारण्यात आल्याची पत्रे पाठविली, तर नंतर पंधराच दिवसांनी पुन्हा त्या शाळांना नव्या शाळेला परवानगी दिल्याचे पत्रे पाठून कळविणे, हा काय प्रकार आहे अशी विचारणाा केली. त्यावर आपण त्याबाबत आवश्यक ती माहिती मिळवून योग्य ती कारवाई करू असे आश्वासन शिक्षणमंत्र्यांनी दिले.

'सॅग'मध्ये कर्मचाऱ्यांची भरती म्हणजे घोटाळाच

विरोधकांच्या आरोपामुळे क्रीडामंत्री हैराण
पणजी, दि. २५ (विशेष प्रतिनिधी) : गोवा क्रीडा प्राधिकरण ("सॅग') अनेक गैरप्रकारांत गुंतले असून कर्मचाऱ्यांची भरती हा घोटाळाच असल्याचा आरोप विरोधकांनी करून क्रीडामंत्री मनोहर आजगावकर यांना भंडावून सोडले. आमदार दिलीप परुळेकर यांनी याबाबत मूळ प्रश्न विचारला होता.
"सॅग'चा बहुतेक निधी हा तेथील ६०० कर्मचाऱ्यांच्या वेतनावर खर्च होत असून खेळांसाठी पैसा कसा शिल्लक राहणार, असा सवाल विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी केला. नोकरभरतीचे नियम निश्चित करण्याची जोरदार मागणी भाजप आमदारांनी यावेळी केली.
प्रकल्प सहाय्यक अधिकारी म्हणून स्टेफी कार्दोझ हिची नियुक्ती तिच्याच वडिलांनी केल्याचे निदर्शनास आणून देऊन विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी असा प्रकार कसा घडू शकतो, वडिलच मुलीची नियुक्ती कशी करू शकतात, असा मुद्दा उपस्थित केला. गेल्या वर्षभरात भाजपने, क्रीडा प्राधिकरणातील नोकरभरतीसाठी नियम निश्चित करण्याची सूचना तीन वेळा केल्याची आठवण विरोधकांनी करून दिली. निवड समितीच्या अध्यक्षपदी असलेल्या यू. जी.कार्दोझ यांनी आपल्या मुलीचीच नियुक्ती केल्याचे पर्रीकर यांनी सांगितले. त्याबाबतचे नियम न ठरवण्यात आल्याने क्रीडा प्राधिकरणचे संचालक मनमानी करीत असल्याची टीका त्यांनी केली. "सॅग'च्या गैरकारभारावर होणाऱ्या टीकेपासून आपली कातडी बचावण्यासाठी, माजी क्रीडामंत्र्यांनी आपले कार्यकर्ते नोकरीस लावल्याचे सांगत आजगावकर यांनी नोकरभरतीचे नियम तयार करण्यात येत असल्याचे स्पष्ट केले.
आपल्या मर्जीप्रमाणे नोकरभरती केल्यानंतर आता नियम बनविले जात असल्याबद्दल पर्रीकर यांनी आश्चर्य व्यक्त केले. स्टेफी हिच्या नियुक्तीला माझा आक्षेप नाही, पण "साग'च्या कार्यपद्धतीत आणि नोकरभरतीत नियमितपणा यायलाच हवा, असे त्यांनी ठासून सांगितले.

मुख्यमंत्रिपदी शिबू सोरेन

रांची, दि. २५ : झारखंड मुक्ती मोर्चाचे प्रमुख शिबू सोरेन झारखंडचे मुख्यमंत्री बनले असून त्यांचा शपथविधी आज (सोमवारी) रात्री पार पडला. त्यांना राज्यपाल सईद सिब्ते रझी यांनी पद व गुप्ततेची शपथ दिली.
आधीचे मुख्यमंत्री मधू कोडा, अपक्ष आमदार स्टीफन मरांडी व राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख तथा रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांनी सोरेन यांना पाठिंबा देण्याचे मान्य केले आहे. सोरेन हे अशा प्रकारे या राज्याचे मुख्यमंत्री दुसऱ्यांदा बनले आहेत. २२ जुलै रोजी केंद्रातील संयुक्त पुरोगामी आघाडीच्या सरकारला विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी सोरेन यांनी पाठिंबा दिला होता. त्यावेळी त्यांना झारखंडचे मुख्यमंत्रिपद बहाल करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. येत्या १ सप्टेंबरपूर्वी बहुमत सिद्ध करण्याची मुदत त्यांना राज्यपालांनी दिली आहे. आपल्याला ४२ आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा सोरेन यांनी केला आहे.

सत्तारूढ आघाडीला शरीफ यांचा रामराम

पाकिस्तानातील सरकार डळमळीत
इस्लामाबाद, दि, २५ : एका वेगवान राजकीय घडामोडीअंतर्गत माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या मुस्लिम लीग पक्षाने सत्तारुढ पाकिस्तान पीपल्स पार्टी सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याने निवडणुकीनंतर जनरल मुशर्रफ यांच्या विरोधात सत्तेवर आलेल्या आघाडीत फूट पडली आहे. भरगच्च पत्रकार परिषदेत नवाझ शरीफ यांनी पाठिंबा मागे घेत असल्याची घोषणा केली. तसेच येत्या ६ रोजी होणाऱ्या राष्ट्राध्यक्षाच्या निवडणुकीत माजी सरन्यायाधीश सईद झमन सिद्दीकी हे आपल्या पक्षाचे उमेदवार असतील, असेही शरीफ यांनी जाहीर केले आहे.
मुस्लिम लीगचे नेते नवाझ शरीफ आणि पाकिस्तान पीपल्स पार्टीचे (पीपीपी) नेते असीफ अली झरदारी यांच्यात निर्माण झालेल्या मतभेदानंतर आज पत्रकार परिषदेत बोलताना, शरीफ यांनी सरकार आपल्याला दिलेली आश्वासने पाळत नसल्याचा आरोप केला. "पीपीपी'च्या धोरणामुळे आम्ही सरकारचा पाठिंबा मागे घेत असून विरोधात बसून विधायक भूमिका बजावणार असल्याचे शरीफ यांनी सांगितले.
आणीबाणीच्या काळात तत्कालीन अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांनी बडतर्फ केलेल्या न्यायाधीशांची फेरनियुक्ती करण्यास सत्ताधारी पाकिस्तान पीपल्स पार्टीचे सहअध्यक्ष आसिफ अली झरदारी यांनी सहमती दर्शविली होती, मात्र, ही फेरनियुक्ती कधी केली जाणार याबाबत त्यांनी निश्चितपणे काहीही सांगितलेले नव्हते.
बडतर्फ न्यायाधीशांची पुनर्बहाली केली जावी, अशी मागणी नवाझ शरीफ यांनी केली होती. ही मागणी मान्य केली नाही तर पाकिस्तान मुस्लीम लीग (नवाझ गट) सरकारमधून बाहेर पडेल, असा इशाराही त्यांनी दिला होता. फेरनियुक्तीसाठी सरकारला सोमवारपर्यंतची मुदत देण्यात आली होती. त्यानुसार नवाझ शरीफ आणि झरदारी यांच्यात चर्चा होऊन न्यायाधीशांच्या बहालीवर झरदारी यांनी सहमती दर्शविली होती असे आधीच्या वृत्तात म्हटले होते.

Sunday 24 August, 2008

अलविदा बीजिंग

2012 चे यजमानपद भूषविणाऱ्या लंडनकडे ध्वज सोपविला
बीजिंग, दि. 24 - मनमोहक व संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेणाऱ्या उद्घाटन सोहळ्याप्रमाणेच बीजिंग ऑलिम्पिकचा समारोपही बर्ड नेस्ट नॅशनल स्टेडियमवर अत्यंत दिमाखदार, रंजक आणि नेत्रदीपक समारंभाने झाला. या समारंभाच्या भव्यतेने स्टेडियमवर उपस्थित एक लाख प्रेक्षकांसह विविध देशांचे 15 हजार ऍथलीट आणि टीव्हीवरील प्रेक्षकांना भुरळ घातली. फटाक्यांची आतषबाजी ही या समारंभाचेही विशेष आकर्षण ठरली. "बाय बाय बीजिंग', "सी यू इन लंडन' अशा शब्दात साश्रू नयनांनी खेळाडू एकमेकांचा निरोप घेत होते. ऑलिम्पिक ध्वज खाली उतरविताना गाणाऱ्या मुलींच्या डोळ्यातही पाणी तरळले. अशाप्रकारे सर्वांचा निरोप घेत ऑलिम्पिक ज्योतही मंदावली.
29 व्या बीजिंग ऑलिम्पिक स्पर्धेत 203 सुवर्णपदकांसाठी विविध देशांचे खेळाडू झुंजले. या क्रीडा महाकुंभाच्या निमित्ताने 51 सुवर्ण, 21 रौप्य व 28 कांस्य अशी एकूण 100 पदके जिंकणाऱ्या चीनचा जागतिक क्रीडा क्षेत्रातील नव्या महाशक्तीच्या रूपात उदय झाला असून पराभूत अमेरिकेला 36 सुवर्ण, 38 रौप्य आणि 36 कांस्य अशा एकूण 110 पदकांसह पदक तालिकेत दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले आहे. 23 सुवर्ण, 21 रौप्य तसेच 28 कांस्य अशी एकूण 72 पदके पटकावणाऱ्या रशियाने तिसरे स्थान पटकावले. हे ऑलिम्पिक भारतासाठी सर्वांत भाग्याचे ठरले.
(सविस्तर वृत्त पान 12 वर)

अखेर त्यांच्या पदरी निराशाच!

मोरजी, दि. 24 (प्रतिनिधी)- माता ममता सुखदाता ट्रस्टतर्फे पेडणे तालुक्यात मोफत खत, शिशू केंद्रे, रुग्णवाहिका आदी सुविधा पुरविलेले सावर्डेचे आमदार अनिल साळगावकर यांच्याकडून गणेश चतुर्थी सणानिमित्त भेटवस्तू मिळणार अशी अपेक्षा असलेल्या अनेकांचा अपेक्षाभंग झाल्याने आगारवाडा-चोपडे पंचायत सभागृहातील जमलेल्या लोकांनी एकच हलकल्लोळ माजवून आमदारांशी हुज्जत घातली. आपल्याला या ठिकाणी भेटवस्तू वाटण्यात येणार आहेत, असे आश्वासन आयोजकांनी दिले होते, असा दावा त्या ठिकाणी जमलेल्या लोकांनी केला.
केरी, हरमल, पालये, मांद्रे, मोरजी, आगरवाडा-चोपडे, पार्से, तुये या मांद्रे मतदारसंघातील हजार-बाराशे लोक या ठिकाणी जमले होते. सकाळी 10.30 ची कार्यक्रमाची वेळ असूनही लोक मात्र सकाळी 8 वाजल्यापासून एकत्रित येत होते. 11.30 वाजता साळगावकर आल्यानंतर त्यांनी प्रथम समस्या ऐकून घेतल्या. पार्सेचे सरपंच चंद्रशेखर पोळजी, केरीचे अरूण वस्त आणि सौ. प्राजक्ता कान्नाईक व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी काही स्वयंसहाय्य गटांशी संबंधित महिलांनी आर्थिक सहाय्याची मागणी केली, त्यावेळी तुये येथील सौ. मोहिनी तळकर यांनी ध्वनिक्षेपकावरून असभ्य शब्द वापरले, असे उपस्थित महिलांनी सांगितले. गदारोळ झाल्याने आमदार साळगावकर हे निघून जाऊ लागले, त्यावेळी त्यांची गाडी अडविण्याचा प्रयत्न काही जणांनी केला, मात्र काही जणांनी सामंजस्याने हस्तक्षेप करून त्यांची वाट मोकळी केली. कोणाच्या पदरी काहीही पडले नाही, मात्र बसगाड्यांची प्रतीक्षा करीत दुपारी 2 वाजेपर्यंत लोक तिष्ठत बस थांब्यावर उभे असलेले दिसत होते.

सासष्टीतील चार ग्रामसभांमध्ये मेगा प्रकल्पांविरोधात ठराव

मडगाव, दि.24 (प्रतिनिधी) - सासष्टीतील मेगा प्रकल्पविरोधी चळवळीला आज आणखीन बळकटी मिळाली ती येथील चार ग्रामपंचायतींत झालेल्या ग्रामसभांनी मेगा प्रकल्पाविरोधात घेतलेल्या ठाम भूमिकांमुळे. राय, कोलवा, तळावली व कुडतरी या पंचायतींच्या ग्रामसभांत लोकांनी घेतलेला सक्रिय सहभाग त्यासाठी उल्लेखनीय ठरला.
कुडतरी व राय या ग्रामपंचायती प्रथमच या चळवळीत उतरलेल्या असून आजच्या ग्रामसभेत त्याचे प्रत्यंतर आले. रायच्या सरपंच नाझारेथ गोम्स यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या ग्रामसभेने मेगा प्रकल्पाला तसेच तेथील नियोजित जलक्रीडा पार्कला परवाना न देण्याचा निर्णय घेतला.
साळगावकर उद्योगातर्फे तेथे जो केटरिंग कॉलेजचा प्रस्ताव आला त्यालाही विरोध झाला. ते निवासी कॉलेज राहणार असल्याने तेथे निर्माण होणारा कचरा व अन्य समस्या व रोजगार संधी यावर चर्चा करण्यासाठी 14 सप्टेंबर रोजी विशेष ग्रामसभा बोलविण्याचा निर्णय घेऊन आजचे कामकाज तेवढ्यावरच थांबविण्यात आले.
कुडतरी पंचायतीच्या ग्रामसभेतही एकंदर वातावरण मेगा प्रकल्पाविरोधात राहिले . पण सरपंच वीणा कार्दोज यांनी कामकाज चांगल्याप्रकारे हाताळले व त्यामुळे तणाव निर्माण होऊ शकला नाही.ग्रामसभेने पंचायतीकडे आलेल्या तिन्ही मेगा प्रकल्पांच्या फायली फेटाळल्या. त्यातील एक फाईल बायोटेकचा 150 फ्लॅटांची, दुसरी तालक यांची तर तिसरी रो घरांची आहे. या तिघांही पंचायतीने त्यांचे प्रस्ताव मंजूर होण्यासारखे नसल्याचे व म्हणून फायली परतच नेण्यास सांगूनही त्या नेल्या गेल्या नसल्याचे सरपंचांनी ग्रामसभेत सांगितले. पैकी बायोटेक हा बिल्डर कोर्टात गेलेला आहे.
नावेलीमधील तळावली ग्रामपंचायतीनेही आपल्या ग्रामसभेत मेगाप्रकल्पांना विरोध दर्शवून सासष्टीतील अन्य पंचायतींबरोबर आपण असल्याचे दाखवून दिले. पंचायतीने अजून एकाही अशा प्रकल्पाला परवाना दिलेला नसल्याचे सरपंचांनी ग्रामसभेत स्पष्ट केले.
कोलवा ग्रामसभेने मात्र पंचायत मंडळाने घेतलेल्या निर्णयाविरुद्ध भूमिका घेताना चर्चसमोरील 30 हजार चौ. मी. जमिनीत फुटबॉल मैदान बांधण्याचा प्रस्ताव संमत केला. या मैदानाच्या नावाने तेथे गैरप्रकारांना वाव मिळेल अशी भिती व्यक्त करून यापूर्वी मैदानाविरुध्द ठराव संमत झाला होता तो आजच्या ग्रामसभेने फिरविला तसेच किनारी व्यवस्थापन समितीच्या प्रस्तावाला विरोध करून पूर्वीचेच किनारी नियमन प्राधिकरणाचे नियमच लागू ठेवावेत अशी मागणी करणारा ठराव संमत करण्यात आला. सीआरएममुळे किनारी भाग शिल्लक राहणार नाहीत अशी भिती ग्रामसभेने व्यक्त केली.

अनिश्चित काळासाठी काश्मिरात "कर्फ्यू'

श्रीनगर, दि.24 - श्रीनगरसह काश्मीर खोऱ्यातील सर्वच भागांत आज सकाळी अनिश्चित काळासाठी संचारबंदी लागू करण्यात आली असून प्रशासनाच्या या निर्णयाने हुरियतचे नेते जाम संतापले आहेत. या संचारबंदीच्या विरोधात हुरियतसह अन्य फुटीरवाद्यांनी सोमवारचे आपले आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
काश्मीर मुद्यावर समाधानकारक तोडगा काढण्यात अपयशी ठरलेल्या केंद्र सरकारच्या विरोधात हुरियतसह खोऱ्यातील फुटीरवादी पक्षांनी सोमवारी एका रॅलीचे आयोजन केले आहे. या रॅलीच्या एक दिवस आधीच प्रशासनाने संचारबंदीचा निर्णय घेतल्याने हुरियत नेते प्रचंड संतापले आहेत. सरकारी प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, केवळ दक्षतेचा उपाय म्हणून श्रीनगर आणि उर्वरित काश्मिरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. सोमवारी लाल चौक येथे होणाऱ्या रॅलीदरम्यान काही लोक उमर फारूख, सय्यद अली शाह गिलानी आणि यासीन मलिक या नेत्यांना लक्ष्य बनविणार असल्याची माहिती राज्य प्रशासनाला मिळाली होती. या नेत्यांच्या जीवाला धोका होऊ नये आणि राज्यातील स्थिती आणखी स्फोटक बनू नये, यासाठी दक्षता म्हणून संचारबंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. लोकांनी या संचारबंदीच्या काळात शांतता आणि सौहार्द कायम राखून प्रशासनाला कायदा तसेच सुव्यवस्था राखण्यास मदत करावी, असे आवाहनही राज्य सरकारतर्फे करण्यात आले आहे.
दरम्यान, आज पोलिस आणि निमलष्करी दलाने शहरातील विविध भागात छापा मारून गिलानींच्या नेतृत्वातील हुरियतचे प्रवक्ते अयाज अकबर यांच्यासह अनेकांना ताब्यात घेतले आहे. शहरात ठिकठिकाणी पोलिस आणि निमलष्करी दलाचे जवान पहारा देत आहेत. सरकारी वाहनांवर लागलेल्या ध्वनीक्षेपकाच्या माध्यमातून नागरिकांना संचारबंदीच्या काळात आवश्यक सूचना दिल्या जात आहेत. कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी लष्कराला सज्ज राहण्यास सांगितले आहे.
दरम्यान, आज संचारबंदीला न जुमानता हजारो लोक रस्त्यावर उतरले. त्यांनी सरकारच्या विरोधात नारेबाजी सुरू केली. जमावाने पोलिसांवर दगडफेकही केली. या जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना लाठीमाराचा वापर करावा लागला. त्यात बरेच लोक जखमी झाले. आंदोलनकर्त्यांनी केलेल्या दगडफेकीत काही पोलिसही जखमी झाल्याचे वृत्त आहे.

हुरियतचा निर्धार : आंदोलन करणारच
काश्मीर खोऱ्यात संचारंबदी लागू करण्याच्या सरकारच्या निर्णयावर नाराजी जाहीर करतानाच हुरियत कॉन्फरन्सने सोमवारी लाल चौकात आंदोलन करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
हुरियतचे अध्यक्ष मीरवैज उमर फारूख यांनी सांगितले की, काश्मीर खोऱ्यातील सर्व आंदोलने शांततेत सुरू असताना सरकारने संचारंबदी लागू करण्याचे काहीच कारण नव्हते. सरकारने अनिश्चित काळासाठी संचारबंदी लागू करणे म्हणजे विनाकारण घेतलेला निर्णय आहे. शांततापूर्ण आंदोलन सुरू असतानाही नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना पकडणे, हेही अयोग्य आहे.
अशा स्थितीत आम्ही सर्व फुटीरवादी पक्षांच्या समन्वय समितीशी संपर्क करण्याच्या प्रयत्नात आहोत. काश्मीर प्रकरणी तोडगा काढण्यात केंद्र सरकार पूर्णत: अपयशी ठरल्याचे सिद्धच झाले आहे. याचा विरोध करण्यासाठीच आम्ही सोमवारी आंदोलन करणार होतो. आता या आंदोलनात संचारबंदीच्या निर्णयाचा विरोधही सामील होणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

खास दर्जाच्या भाजपच्या मागणीला सरकारही अनुकूल

दिल्लीला सर्वपक्षीय शिष्टमंडळ नेणार - मुख्यमंत्री
मडगाव, दि. 24 (प्रतिनिधी) - गोव्याला खास राज्याचा दर्जा मिळाला तर अनेक प्रश्र्न सुटणार असल्याचे आता सरकारलाही पटलेले आहे व म्हणून लवकरच एक सर्वपक्षीय शिष्टमंडळ घेऊन दिल्लीला जाऊन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्याशी चर्चा करण्याचा संकेत मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी आज येथे दिला व एक प्रकारे भाजप नेत्यांनी केलेल्या मागणीला टेकू दिला.
वारका येथे अ. भा. चार्टर्ड अकांऊटंट संघटनेतर्फे आयोजित परिषदेच्या समारोपानंतर मुख्यमंत्री पत्रकारांशी बोलत होते. ते पुढे म्हणाले, पंतप्रधान गोव्याची मागणी उचलून धरतील अशी आपली खात्री आहे कारण ती मागणी न्याय्य अशीच आहे.
हिमाचल व उत्तरांचल या राज्यांना असा खास दर्जा दिला गेल्यावर तेथील अनेकविध सवलतींमुळे गोव्यातील अनेक उद्योग तेथे वळले आहेत व तसाच दर्जा गोव्याला मिळावा ही आमची मागणी राहील. त्यामुळे तशा सवलती गोव्यालाही देता येतील. कृषी जमीन बाहेरील लोकांना विकण्यापासून रोखता येईल. गोव्याचे अनेक प्रश्र्न या दर्जामुळे सुटतील असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले ,राज्याला आज नितांत गरज आहे ती पैशाची व खास दर्जामुळे ती सुटेल, ते म्हणाले.
अ. भा. चार्टर्ड संघटनेने गोव्यात प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यासाठी जी जमिनीची मागणी केली आहे त्याबाबत विचारता मुख्यमंत्री उत्तरले ,की मागणीचा पुरता अभ्यास करूनच त्यासंबंधी निर्णय घेतला जाईल.
तत्पूर्वी या चार दिवसीय परिषदेच्या समारोप कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्र्यांनी विकासासाठी विविध संस्थांची गरज असल्याचे प्रतिपादले. या संस्थेने सरकारला महसूल वाढविण्यास मदत करावी कारण आर्थिक दृष्ट्या राज्ये बळकट झाली तर आपोआपच राष्ट्र बळकट होणार असा सल्ला दिला. संघटना राजकारणमुक्त असल्याने तिला ते सहज शक्य आहे असेही ते म्हणाले. आपण काल इंजिनियरींग संघटनेच्या अशाच एका कार्यक्रमात बोलताना अभियंत्यांना आमआदमीसाठी 100 चौ. मी. बांधता येतील असा घराचा आराखडा तयार करण्याचा सल्ला दिल्याचे ते म्हणाले.
या मेगा परिषदेच्या समारोप समारंभात प्रथम गौतम वेर्लेकर यांनी स्वागत केले , प्रीती महात्मे यांनी पाहुण्यांना पुष्प गुच्छ दिले , आशिष वेर्लेकर यांनी ओळख करून दिली तर परिमल कुलकर्णी यांनी आभार मानले.

पर्वरी कृष्णवड भागात तणाव

दोन स्थानिक कुटुंबांकडून पूजेला विरोध
पर्वरी, दि. 23 (प्रतिनिधी) - गोकुळाष्टमीच्या निमित्ताने साईनगर पर्वरी येथे आज सकाळी कृष्णवड परिसरात पूजा करण्यासाठी आलेल्या भाविकांना दोन स्थानिक कुटुबांनी केलेला विरोध व भगवान श्रीकृष्णाला उद्देशून अपशब्द वापरल्याने दोन गटात वाद निर्माण होऊन तणावाची स्थिती निर्माण झाली. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पर्वरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेताच परिस्थिती नियंत्रणात आली असली तरी दोन दिवस गोकुळाष्टमीच्या निमित्ताने होणाऱ्या कार्यक्रमाच्या ठिकाणच्या परिसराला पोलिस छावणीचे स्वरूप आले आहे. यासंदर्भात दोन्ही गटांनी परस्परांविरोधात पोलिस तक्रारी दाखल केल्या आहेत.
कृष्णवड, साईनगर पर्वरी येथे श्रीकृष्ण जन्मोत्सव मंडळातर्फे आज व उद्या असे दोन दिवस धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. गेल्या अनेक वर्षांपासून याठिकाणी जन्माष्टमी, वटपौर्णिमा यासारखे उत्सव भाविक साजरे करत आहेत. तथापि पारंपरिक कार्यक्रमाला या वर्षी तेथील दोन कुटुंबांनी केलेल्या विरोधाने भाविक खवळले. तथातच विरोध करणाऱ्या एका ख्रिश्चन कुटुंबीय महिलेने श्रीकृष्णाला उद्देशून अपशब्द उच्चारताच भाविकांचा पारा आणखी चढला. त्यामुळे दोन्ही गटात जोरदार शाब्दिक बाचाबाची झाली.
वर्षपध्दतीप्रमाणे भाविक याठिकाणी कृष्णपूजेसाठी आले असता त्यांना तेथे तारेचे कुंपण घातल्याचे दिसून आले. तसेच कोणीतरी त्याठिकाणी साईनगर उद्यान, खुली जागा अशा आशयाचा फलक लावल्याचे व आतमध्ये कवाथेही लावल्याचे आढळले. मात्र भाविकांनी त्याकडे दुर्लक्ष केले व कृष्णपूजेसाठी आत प्रवेश करताच तेथील दोन स्थानिक कुटंबांनी त्यांना अडथळा निर्माण केला. विरोध करणाऱ्यापैकी एक ख्रिश्चन तर दुसरे बिगर गोमंतकीय कुटुंब होते.
सदर परिसर हा भूखंड विक्री करताना जमीन मालकाने मोकळी जागा उद्यानासाठी ठेवल्याचा विरोध करणाऱ्यांचा दावा होता तर गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही येथे धार्मिक उत्सव साजरे करत असल्याचा भाविकांचा दावा होता. आज त्याठिकाणी धार्मिक उत्सवास विरोध होताच महिला व पुरूष मिळून सुमारे तीनशे भाविक एकत्र आले. याठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून हे कार्यक्रम होत असताना त्यांना अडथळा आणण्याचे कारणच नाही. श्रीकृष्ण पूजेला विरोध करणाऱ्यांनी आम्हाला आव्हान दिले असून ते आम्ही स्वीकारल्याचे मंदिर सुरक्षा समितीचे राजेंद्र वेलिंगकर यांनी सांगितले.
या एकंदर घटनेनंतर भाविकांनी त्याठिकाणी श्रीकृष्ण पूजनाचा कार्यक्रम सुरू केला. महिलांनी गोविंद बोला हरी गोपाल बोलो, राधारमण हरी गोविंद बोलोचा गजर सुरू केला. आज दिवसभर त्यानंतर भाविकांनी सर्व धार्मिक कार्यक्रम उरकले. मात्र दिवसभर तेथे पोलिसांचा कडक पहारा होता. उद्या रविवारीही तेथे पूजा आरती, बालोपासना, प्रसाद, गोपाळकाला आदी कार्यक्रम होणार आहेत.
मंदिर सुरक्षा समितीचे विनायक च्यारी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सुभाष वेलिंगकर, राजकुमार देसाई, समाज कार्यकर्ते किशोर अस्नोडकर, आदी त्याठीकाणी हजर होते.
या एकंदर घटनेबाबत दोन्ही गटांनी पोलिसांत परस्परविरोधी तक्रारी दाखल केल्या असून विरोध करणाऱ्यांपैकी एकाने भाविक महिलांवर हात टाकल्याचा आरोपही भाविकांनी केला. तसेच दोन गटात झालेल्या शाब्दिक बाचाबाचीवेळी विरोध करणाऱ्या एका सदस्याने एका भाविक महिलेच्या हाताचा चावा घेतल्याने त्या महिलेला वैद्यकीय चाचणीसाठी इस्पितळात पाठविण्यात आले होते.

कारागृहात रचला गेला बॉम्बस्फोटांचा कट

नवी दिल्ली, दि. 23 - स्टुडंट इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडिया (सिमी)चे कार्य अद्यापही अपूर्ण आहे. गुजरामधील दंगली व आपले नेता सफदर नागौरी यांच्या अटकेचा बदला तर सिमीने घेतला आहे; परंतु अद्याप अयोध्या व मेरठ दंगलींचा हिशोब चुकता करावयाचा आहे. तालिबानचा नेता मुल्ला उमरला आपला कर्ताधर्ता मानणाऱ्या या संघटनेचे लक्ष आता श्रीकृष्ण आयोगाने आपल्या अहवालात ज्या लोकांकडे संकेत केले आहेत त्या लोकांवरही आहे. मध्य प्रदेशचे पोलिस व गुप्तचर संस्थांनी अटक केलेल्या "सिमी'च्या कार्यकर्त्यांची जी चौकशी केली आहे त्यातून उपरोक्त बाबी समोर आल्या आहेत.
रिवा कारागृहात बंदिस्त असलेला सिमीचा प्रमुख सफदर हुसैन नागौरी उर्फ बडे भैयाला गुजरात पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतले आहे. म. प्र. पोलिस व गुप्तचर संस्थांनी केलेेल्या चौकशीत प्राप्त झालेेेल्या माहितीनुसार अबु बशीरने अहमदाबाद स्फोट व सुरत शहरात काही ठिकाणी कारमध्ये स्फोटके ठेवण्याच्या कामाला बाहेरून रूप दिले तर बडे भैयाने कारागृहात या स्फोटांचा कट रचला व तो कसा अमलात आणावयाचा हे निश्चित केले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सिमीच्या उज्जैन येथे झालेल्या बैठकीत गुजरात दंगलीचा बदला घेण्याबरोबरच बाबरी मशीद विद्ध्वंस व मेरठ दंगलीतील दोषींना धडा शिकविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मुंबई दंगलीची चौकशी करणाऱ्या श्रीकृष्ण आयोगाच्या अहवालात ज्यांच्यासंदर्भात संकेत दिले आहेत त्यांनाही लक्ष्य करण्याचे या योजनेत ठरले.
कर्नाटकमध्ये कॅसलरॉक हुबळीजवळ सिमीपासून दूर झालेल्या सफदर गटाची बैठक झाली. या बैठकीत अल कायदाचे मुल्ला उमर यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर नेता मानण्यात आले तसेच त्यांच्याशी संपर्क स्थापित करण्याचे यावेळी ठरविण्यात आले. याच बैठकीत संघटनेचा विस्तार करण्याचाही निर्णय घेण्यात आला. सरचिटणीसाचे पद समाप्त करून तीन सचिव नियुक्त करण्यात आले व विभागवार सक्रिय असलेल्या वेगवेगळ्या संस्थांना सोबत घेऊन योजनांना अंतिम रूप देणे व त्यासाठी प्रशिक्षण शिबिर घेेण्याचे निश्चित करण्यात आले.

कोण आहे सफदर हुसैन नागौरी ?
सफदर हुसैन नागौरी अनेक नावांनी ओळखला जातो. जसे हुसैन उर्फ इकबाल उर्फ बडे भैया उर्फ लियाकत भाई उर्फ मुजा भाई. नागौरी हा एका पोलिस इन्स्पेक्टरचा मुलगा असून तो व्यवसायाने मेकॅनिकल इंजिनिअर आहे. तो उज्जैनचा रहिवासी असून दिल्लीतही तो सक्रिय राहिलेला आहे.

आता गोमंतकीयांनाही नेत्रदानाची संधी

रोटरी क्लबच्या नेत्रपेढीचे लवकरच उद्घाटन
पणजी, दि.23 (प्रतिनिधी) - गोव्यातील पहिल्यावहिल्या नेत्रपेढीचे स्वप्न अखेर पणजी रोटरी क्लबने प्रत्यक्षात उतरवले आहे. बांबोळी येथे गोवा मेडिकल कॉलेजमध्ये ही नेत्रपेढी सुरू करण्यास राज्य सरकारकडून थंडा प्रतिसाद मिळाल्याने काहीशा हिरमुसलेल्या रोटरी क्लबला डॉ. दिगंबर नाईक यांनी मदतीचा हात दिला आहे. म्हापसा येथील प्रसिद्ध वृंदावन हॉस्पिटलमध्ये ही नेत्रपेढी उभारण्यात येणार असून थोड्याच दिवसांत या नेत्रपेढीचे रीतसर उद्घाटन होईल,अशी घोषणा करण्यात आली.
पणजी रोटरी क्लबतर्फे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत यासंबंधीची माहिती डॉ. अविनाश भोसले यांनी दिली. यावेळी पणजी रोटरीचे अध्यक्ष गौरीश धोंड, अनिल सरदेसाई, डॉ. रघुनाथ गावस व डॉ. शशांक महात्मे उपस्थित होते. नेत्रपेढीची संकल्पना सरकारच्या सहकार्याने राबवण्याचा संकल्प रोटरी क्लबने सोडला होता. यासंबंधी तत्कालीन आरोग्यमंत्री,आरोग्य सचिव,गोवा मेडिकल कॉलेजचे डीन व नेत्रचिकित्सा विभाग प्रमुख यांच्याबरोबर बैठक झाली. त्यानंतर 9 ऑक्टोबर 2006 रोजी आरोग्य सचिवांनी या प्रस्तावाबाबत असमर्थता दर्शवली व 20 नोव्हेंबर 2006 रोजी तसे पत्रही संस्थेला पाठवले. ही निराशा पदरात पडूनही संस्थेने जिद्द सोडली नाही. हा प्रकल्प खाजगी इस्पितळांच्या सहकार्याने पुढे नेण्याचे ठरवले. याच काळात 16 ऑक्टोबर 2006 रोजी वृन्दावन हॉस्पिटलचे डॉ.दिगंबर नाईक यांनी ही नेत्रपेढी आपल्या म्हापसा येथील वृन्दावन हॉस्पिटलात सुरू करण्याची तयारी दर्शवली व या प्रयत्नांना अखेर यश आले,असे डॉ.भोसले यांनी सांगितले.
गोव्यातील हा पहिलाच प्रकल्प राबवण्यासाठी पणजी रोटरी क्लब नेत्रपेढी विश्वस्त मंडळ स्थापन करण्यात आले आहे. या मंडळावर संस्थेचे सात लोक व त्याचबरोबर डॉ. अजय वैद्य,डॉ. दिगंबर नाईक, डॉ. कल्पना महात्मे, डॉ. शुभलक्ष्मी नाईक आदींचा समावेश आहे. या नेत्रपेढीसाठी लागणारी सर्व उपकरणे खरेदी करण्यात आली आहेत. आरोग्य खात्याअंतर्गत "मानवी इंद्रिय आरोपण कायदा" व अखिल भारतीय नेत्रपेढी संघटना यांची मान्यता घेण्यात आली आहे.सुप्रसिद्ध नेत्रचिकीत्सातजंज्ञ डॉ.विक्टर फर्नांडिस हे या नेत्रपेढीसाठी नेत्ररोपण करणार आहेत.सध्या संस्थेकडे दोनशे नेत्र दात्यांची नोंदणी झाली असून या महानदानासाठी नागरिकांनी स्वखुषीने पुढे येण्याची गरज असल्याचे आवाहन डॉ. भोसले यांनी केले.
या अनोख्या प्रकल्पासंबंधी जनजागृती करण्यासाठी 25 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर या दरम्यान अनेक ठिकाणी रॅली,जागृती बैठका व जाहिरात फलक प्रसिद्ध केले जातील. विविध व्यावसायिक आस्थापने, तसे कार्यालयांत यासंबंधी माहिती देण्यासाठी संस्थेचे पदाधिकारी लोकांशी संपर्क साधणार आहेत.


नेत्रदान कसे करावे
एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर सहा तासांच्या आत त्याच्या देहातील नेत्रांचे दान करता येईल. नेत्रदान म्हणजे डोळे काढले जातात हा गैरसमज असून केवळ डोळ्यांतील काळ्या रंगाचा महत्त्वाचा पडदा(कॉरनीया) काढला जातो व त्याठिकाणी त्याच भागाची बनावट आकृती बसवली जाते. या ठिकाणी महत्वाची गोष्ट म्हणजे एखाद्या नेत्रदात्याने आपले नाव नेत्रदानासाठी नोंद केले असेल तर याची माहिती नेत्रपेढीला देण्याची जबाबदारी त्याच्या कुटुंबीयांची असते त्यामुळे या महान कार्याला संपूर्ण कुटुंबाकडून मान्यता मिळणे आवश्यक आहे. नेत्रदान ही आपल्या कुटुंबाची एक पवित्र परंपराच बनवण्याची वेळ आली आहे. नेत्रदानाची सर्व प्रक्रिया नेत्रपेढीकडून मोफत केली जाणार असून त्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाहीत तसेच त्यासाठी चोवीस तास यंत्रणा सज्ज असेल,अशी माहितीही यावेळी देण्यात आली. आपण मृत पावल्यानंतर आपले डोळे एखाद्या दृष्टीहीनाला या जगाची ओळख करून देऊ शकतात ही संकल्पनाच किती पवित्र असून त्यासाठी प्रत्येकाने समोर पुढे यावे,असे आवाहन यावेळी करण्यात आले. गोव्यात किमान दहा हजार नेत्रहिन आहेत व त्यात जादाकडून लहान मुलांचा समावेश आहे. या पवित्र दानाबाबत समाजात जागृती होण्याची गरज आहे. समाजात पसरलेल्या रूढी,परंपरा,गैरसमज व अंधश्रद्धेला बळी ठरून अनेक लोक नेत्रदानासाठी पुढे येण्यास धजत नाहीत. ही अंधश्रध्दा दूर होण्याची गरज असून नेत्रदान हे मानवतावादाच्या दृष्टिकोनातून एक अत्यंत पवित्र व पुण्यकर्म असून हा प्रयत्न जरूर यशस्वी होणार असा आत्मविश्वास यावेळी संघटनेने व्यक्त केला.

कुठ्ठाळी - मडकई फेरी चिखलात रुतली

मरिन पोलिसांनी प्रवाशांना धक्क्यावर आणले
वास्को, दि. 23 (प्रतिनिधी) - कुठ्ठाळीहून मडकईला आज रवाना होणारी शेवटची फेरीबोट ओहटीमुळे मडकई धक्क्यापासून सुमारे दोनशे मीटरवर चिखलात रुतल्याने अंदाजे 100 प्रवासी दोन तास अडकून पडले. नंतर मरिन पोलिसांच्या अथक परीश्रमानंतर त्यांना धक्क्यावर आणण्यात आले.
आज सायंकाळी 7.30 च्या सुमारास कुठ्ठाळी येथून मडकईला जाण्यासाठी सुटलेली फेरीबोट मडकई धक्क्यापासून सुमारे 200 मीटर अंतरावर पोहोचली असता तेथील चिखलात रुतून बसली. यावेळी फेरीमध्ये सुमारे 100 प्रवासी असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. त्यानंतर मरिन पोलिसांशी संपर्क साधल्यानंतर रात्री 9.30 च्या सुमारास मरिन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि त्यांच्या बोटीद्वारे प्रवाशांना धक्क्यावर पोहोचवले. यात कोणत्याच प्रकारची हानी झाली नाही.
ओहोटीमुळे चिखलात रुतलेल्या या फेरी बोटीत सुमारे 15-20 दुचाकी वाहने व काही चार चाकी वाहने असल्याची माहिती सूत्रांनी दिली. भरतीच्या वेळी फेरी बोट पुन्हा धक्क्यावर आणण्यात येणार असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. सदर फेरीबोटीवरील चालक नवीन असल्याने तसेच रात्री मार्ग चुकल्याने सदर घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

मयेकरांनी सामान्य माणसाला समर्थ केले - अशोक कामत

ज्ञानेश्वरीवरील सीडीचे अनावरण
पणजी, दि. 23 (सांस्कृतिक प्रतिनिधी- रसाळ भाषेत ज्ञानेश्वरीवर व्याख्याने देऊन सामान्य माणसाला समर्थ करण्याचे काम प्राचार्य गोपाळराव मयेकर यांनी ताकदीने केले; म्हणूनच त्यांना समाजमान्यता लाभली, असे प्रतिपादन संत साहित्य आणि वाङ्मयाचे गाढे अभ्यासक डॉ. अशोक कामत यांनी आज येथे केले.
अध्यात्माच्या माध्यमातून प्राचार्य मयेकर यांनी केलेले अफाट कार्य लक्षात घेता त्यांना पद्मश्री देऊन गौरवले पाहिजे, अशी सूचनाही डॉ. कामत यांनी केली.
गोकुळाष्टमी आणि ज्ञानेश्वर जयंतीनिमित्त येथील कला अकादमीमध्ये आयोजित "मोगरा फुलला' या कार्यक्रमात "युग संजीवक अमृततीर्थ परब्रह्म ज्ञानेश्वर' या सीडीचे अनावरण आणि प्राचार्य मयेकरांच्या गौरव कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते.
प्रा. मयेकरांनी ज्ञानेश्वरीवर व्याख्याने देताना भगवद्गीतेचा कधीही विसर पडू दिला नाही, असे गौरवोद्गार त्यांनी काढले. यावेळी व्यासपीठावर प्रा. मयेकर, सौ. उषा मयेकर, डॉ, अजय वैद्य, रवींद्र प्रभू, सत्यवान जामखंडिकर आदी मान्यवर उपस्थित होते.
ज्ञानेश्वर व श्रीकृष्णाच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून तसेच दीप प्रज्वलन करून व श्रीकृष्ण वंदनाने कार्यक्रमास आरंभ झाला. नंतर मान्यवरांच्या हस्ते सीडीचे अनावरण करण्यात आले. मग शाल, श्रीफळ व श्रीकृष्णाची मूर्ती देऊन प्रा. मयेकर यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी संजय हरमलकर, सुरेंद्र शेट्ये व उल्हास धुरी यांनी त्यांना पुष्पगुच्छ व भेटवस्तू प्रदान केल्या.
सत्यवान जामखंडिकर, डॉ, अजय वैद्य, रवींद्र प्रभू, यांनीही आपले विचार व्यक्त केले. विद्यार्थी प्रमोद जोशी यांनी कविता सादर केली. गोव्याची नामवंत गायिका समीक्षा भोबे व प्रसिद्ध गायक प्रवीण गावकर यांच्या गायनाने कार्यक्रमाला रंग चढला.
प्रस्ताविक व स्वागत प्रा. अनिल सामंत यांनी केले. निवेदन संगीता चितळेकर यांनी केले. कार्यक्रमाला रमाकांत खलप तसेच इतर महनीय व्यक्ती, विद्यार्थी उपस्थित होते.