मातृभाषाप्रेमी युवकांच्या मेळाव्यात विष्णू वाघांचा घणाघात
पणजी, दि. ४ (प्रतिनिधी): भाषा माध्यमप्रश्नी ‘फेसबूक’ या सामाजिक संकेतस्थळावरून युवा पिढीने चालवलेली चळवळ गोव्यातील एका नव्या क्रांतीची सुरुवात आहे. सरकारच्या चुकीच्या निर्णयाविरोधात पेटून उठलेली युवाशक्ती स्वार्थी राजकीय नेत्यांना राजकारणातून फेकून देण्यास सज्ज झाली आहे. चर्चिल आलेमाव यांच्यासारख्या स्वार्थी नेत्याच्या दबावाला बळी पडून दिगंबर कामत यांनी मातृभाषेचा गळा घोटण्याचे जे पाप केले आहे त्याला क्षमा नाही, असे उद्गार विष्णू सूर्या वाघ यांनी काढले.
‘दिगंबर कामत गेट वेल सून’ या नावाने ‘फेसबूक’ संकेतस्थळावर जोरदार जागृती मोहीम चालवलेल्या युवकांनी आज पणजी येथे स्वामी विवेकानंद सभागृहात मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यात उपस्थित युवकांनी दिगंबर कामत यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी व नारेबाजी करून सभागृह दणाणून सोडले.‘दिगंबरा दिगंबरा, आम आदमीला लासून मारा’ अशा पद्धतीच्या घोषणांनी विद्यमान कॉंग्रेस सरकारची लक्तरेच यावेळी वेशीवर टांगण्यात आली. सत्तेसाठी कुठपर्यंत तडजोड करावी याला काहीतरी मर्यादा असावी लागते. परंतु, दिगंबर कामत खुर्चीसाठी एवढे लाचार बनले आहेत की, त्यांनी गोमंतकाचे अस्तित्वच गहाण ठेवण्याचे कर्म या निर्णयाव्दारे केले आहे, अशी टीका यावेळी करण्यात आले.
विष्णू सूर्या वाघ यांचे घणाघाती भाषण या मेळाव्याचे आकर्षण ठरले. पुरस्कार परत करण्याचे कामत यांचे आव्हान आम्ही स्वीकारले व पुरस्कार परत केले. आता गोमंतकीय जनतेचे आव्हान दिगंबर कामत यांनी स्वीकारावे, असे आव्हान यावेळी श्री. वाघ यांनी दिले. चर्चिल आलेमाव यांनी या प्रश्नावरून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली आहे. आलेमाव यांनी गोमंतकीयांच्या स्वाभिमानाला डिवचण्याचा प्रयत्न केला तर नावेली व बाणावली या दोन्ही मतदारसंघांतून त्यांना हद्दपार करण्यासही जनता मागे राहणार नाही, असेही श्री. वाघ म्हणाले. याप्रसंगी युगांक नाईक, राजदीप नाईक आदींची भाषणे झाली.
या मेळाव्यानंतर युवकांनी पणजी शहरात निषेध फेरी काढली. त्यात विष्णू वाघ, देविदास आमोणकर, भावेश जांबावलीकर, आत्माराम बर्वे आदींची उपस्थिती होती. त्यानंतर पथनाट्याव्दारे सरकारच्या माध्यमप्रश्नी चुकीच्या निर्णयाची माहिती जनतेला देण्यात आली. या मेळाव्याला मोठ्या संख्येने युवकांची उपस्थिती लाभली.
Sunday, 5 June 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment