खाजगी कंपनीची मालकी कर्मचार्यांनी फेटाळली
म्हापसा, दि. १० (प्रतिनिधी): आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांचा ‘पीपीपी’ फॉर्म्यूला स्वतःलाच न समजलेल्या आरोग्य संचालिका डॉ. राजनंदा देसाई यांना आझिलो इस्पितळ कर्मचार्यांची समजूत काढण्यात अपयश आल्याने अखेर आक्रमक बनलेल्या कर्मचार्यांमुळे त्यांना इथून काढता पाय घेणे भाग पडले.
म्हापसा येथील आझिलो इस्पितळाचे स्थलांतर जिल्हा इस्पितळांत होणार आहे. जिल्हा इस्तितळ ‘पीपीपी’ धर्तीवर चालवण्यासाठी ‘रेडियंट लाइफ केअर प्रा. लि.’ या खाजगी कंपनीची निवड करण्यात आली आहे. आझिलो इस्पितळातील कर्मचार्यांना आता या खाजगी कंपनीच्या अखत्यारीत काम करावे लागणार असल्याचे पत्र आरोग्य खात्याने पाठवल्याने या कर्मचार्यांत तीव्र संताप पसरला आहे. या कर्मचार्यांनी या निर्णयाला नापसंती दर्शवल्याने त्यांची समजूत काढण्यासाठी आरोग्य संचालिका डॉ. राजनंदा देसाई म्हापसा येथे पोहोचल्या. डॉ. देसाई यांनाच ‘पीपीपी’ची व्याख्या पटवून देणे शक्य न झाल्याने उपस्थित कर्मचार्यांनी विचारलेल्या प्रश्नांपुढे त्यांच्यावर हतबल होण्याची वेळ ओढवली. सरकारच्या मालकीअंतर्गतच काम करण्याची इच्छा दर्शवून कोणत्याही परिस्थितीत खाजगी कंपनीला मालक म्हणून स्वीकारणार नाही, असा हेका उपस्थित कर्मचार्यांनी कायम ठेवला. आझिलो इस्पितळाची इमारत जुनी झाल्यानेच जिल्हा इस्पितळ उभारण्यात आले व त्यामुळे हे जुने इस्पितळ याठिकाणी स्थलांतर केल्यानंतर तिथे सुरळीत काम चालू शकते पण या इस्पितळाची मालकी खाजगी इस्पितळाला देण्याचा उद्देश काय, असा सवालही यावेळी उपस्थित परिचारिका प्रतिनिधींनी केला. यावेळी इस्पितळाचे आरोग्य अधीक्षक डॉ. दळवी हजर होते. आझिलो इस्पितळ कर्मचार्यांना खाजगी इस्पितळाअंतर्गत काम करावे लागेल, असे सांगण्यात आले खरे परंतु त्याबाबतचा तपशील व कायदेशीर बाबींची कोणतीच माहिती देण्यात आली नाही. सरकारने प्रत्येक कर्मचार्याला यासंबंधीची लेखी माहिती दिली जाणे गरजेचे आहे, असेही यावेळी कर्मचार्यांनी डॉ. देसाई यांना सांगितले.
‘सरकारने आमच्यावर जो निर्णय लादलेला आहे तो आम्हांला मान्य नाही. सुरुवातीपासूनच आम्ही येथे काम करीत आहोत. आणखी दोन तीन वर्षांनी येथील काहीजण निवृत्त होणार आहेत. उतारवयात आम्हांला खाजगी कंपनीच्या हवाली करण्याचा हा निर्णय अन्यायकारक आहे’ अशी प्रतिक्रिया येथील कर्मचार्यांनी व्यक्त केली.
डॉ. दळवी यांची तडकाफडकी बदली
म्हापसा आझिलो इस्पितळाचे आरोग्य अधीक्षक डॉ. संजय दळवी यांची तडकाफडकी बदली करून त्यांची रवानगी मडगाव येथील हॉस्पिसियो इस्पितळात करण्यात आली आहे. सकाळी डॉ. राजनंदा देसाई यांच्याबाबत घडलेल्या प्रकारानंतर संध्याकाळी तडकाफडकी हा आदेश जारी करण्यात आल्याची खबर मिळाली आहे. डॉ. दळवी हे आझिलो इस्पितळात अधीक्षक असल्याने त्यांनी कर्मचार्यांची समजूत काढणे अपेक्षित होते परंतु ज्याअर्थी कर्मचार्यांनी या निर्णयाला विरोध करून संचालिकांना लक्ष्य बनवले त्याअर्थी आरोग्य अधीक्षकांचीही त्यांना फुस असल्याच्या समजुतीनेच हा आदेश जारी करण्यात आल्याचे सांगण्यात येते.
Saturday, 11 June 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment