Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday, 10 June 2011

खुर्चीसाठी मुख्यमंत्र्यांकडून मातृभाषेचा बळी : दामू नाईक

फोंड्यात भाजपची धिक्कार दिन सभा
फोंडा, दि. ९ (प्रतिनिधी): मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या नेतृत्वाखाली आघाडी सरकार सर्वच पातळ्यांवर अपयशी ठरले आहे, अशी खरमरीत टीका फातोर्ड्याचे आमदार दामोदर नाईक यांनी फोंडा येथे आज आयोजित केलेल्या धिक्कार दिन सभेत केली. मुख्यमंत्री कामत यांनी आपली खुर्ची टिकवण्यासाठी मातृभाषेचाही बळी दिला आहे. मुख्यमंत्र्यांचे मंत्रिमंडळातील मंत्र्यांवर नियंत्रण नाही. त्यामुळे भ्रष्टाचाराच्या उद्योगाला मोठ्या प्रमाणात वाव मिळत आहे, असे श्री. नाईक यांनी सांगितले.
कामत सरकारने काल आपला चार वर्षांचा कार्यकाल पूर्ण केला आहे. त्यामुळे विरोधी पक्ष भाजपतर्फे कालचा दिवस धिक्कार दिन म्हणून साजरा करताना गोव्यात विविध ठिकाणी कालपासून निषेध सभांचे आयोजन केले आहे. यानिमित्ताने आज संधअयाकाळी फोंड्यातील इंदिरा मार्केट येथे ही निषेध सभा आयोजित केली होती. यावेळी व्यासपीठावर फातोर्ड्याचे आमदार दामोदर नाईक, शिरोड्याचे आमदार महादेव नाईक, राज्य सचिव मनोहर आडपईकर, सरचिटणीस ऍड. नरेंद्र सावईकर, सुनील देसाई उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार महादेव नाईक यांनी कामत सरकारवर चौफेर टीका करताना कामत सरकारच्या चार वर्षांच्या काळात राज्यभर झालेली आंदोलने ही आम आदमीबाबत सरकार किती निष्काळजी आहे याची साक्ष आहे. केंद्राप्रमाणेच राज्यातही सरकारविरोधी वातावरण तयार होत आहे. जनतेच्या विविध मागण्या पूर्ण झालेल्या नसून त्यांच्यावर महागाईचा वरवंटा फिरवण्याचे कार्य सरकार करत आहे. त्यामुळे आम आदमीला रस्त्यावर उतरणे भाग पडत असल्याचे श्री. नाईक यावेळी म्हणाले.
ऍड. सावईकर यांनी कॉंग्रेस सरकार जनतेला न्याय देऊ शकलेले नाही. त्यामुळे जनतेला रस्त्यावर उतरण्याची वेळ आलेली आहे. असे सांगत कामत सरकारने गोमंतकीयांवर केलेल्या अन्यायाचा पाढा वाचला. यावेळी श्री. आडपईकर, सुनील देसाई यांची भाषणे झाली.
दिगंबर देवारी यांनी सूत्रसंचालन केले. शांताराम कोलवेकर यांनी आभार मानले.

No comments: