Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 8 June, 2011

दहावीचा विक्रमी ८६.५० टक्के निकाल

• ४१ विद्यालयांचा निकाल शंभर टक्के • आठ वर्षात सर्वाधिक टक्केवारी
पणजी, दि. २७ (प्रतिनिधी): गोवा शालान्त आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्च ते एप्रिल महिन्यात २४ केंद्रांतून घेतलेल्या दहावी परीक्षेचा निकाल यंदा ८६.०५ टक्के लागला असून गेल्या आठ वर्षाच्या तुलनेत ही सर्वांत जास्त टक्केवारी आहे. निकालात पहिले तिन्ही क्रमांक मुलींनी पटकावले असून या तिन्ही मुली मडगाव केंद्रातील आहेत. मडगावच्या फातिमा कॉन्वेंट हायस्कूलची दक्षा आतीश नायक ही ९५.८३ टक्के गुणांसह गोव्यात पहिली आली तर प्रेझेंटेशन कॉन्वेंट हायस्कूलची समृद्धी गजानन बांदोडकर (९५.१६) द्वितीय आणि भाटीकर मॉडेल इंग्लीश हायस्कूलच्या रिशा मिलिंद हेगडे (९५.०८) हिने तृतीय क्रमांक पटकावला.
परीक्षेला बसलेल्या १५ हजार ३२९ विद्यार्थ्यांपैकी १३ हजार १९१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यात मुलांनी बाजी मारली असून ८०.७५ टक्के विद्यार्थी तर, ७९.८७ टक्के विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत. तर, ४१ विद्यालयांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. पणजीतील डॉ. के. बी. हेडगेवार या विद्यालायने सतत पाचव्यांदा शंभर टक्के निकाल लावण्यात बाजी मारली आहे.
या वर्षापासून दहावीच्या विद्यार्थ्यांना श्रेणी पद्धती लागू करण्यात आली आहे. त्यामुळे ‘डिस्टिंक्शन’, ‘ङ्गर्स्ट क्लास’, ‘सेकंड क्लास’ असे वर्ग कोणालाही देण्यात आलेले नाहीत ‘ए’ ते ‘आय’पर्यंत ही श्रेणी असणार आहे. ‘ए’ ते ‘जी’पर्यंत श्रेणी मिळवणारे विद्यार्थीच उत्तीर्ण झाले आहेत. तर, उत्तीर्ण होण्यासाठी प्रत्येक विषयात ३० टक्के गुण मिळवणे गरजेचे आहे. यापूर्वी उत्तीर्ण होण्यासाठी ३५ टक्के गुण मिळणे महत्त्वाचे होते. त्यामुळे यावर्षी निकालाच्या टक्केवारीत वाढ झाली आहे. गुणपत्रीकेवर गुण आणि श्रेणीही असल्याने विद्यार्थ्यांचा गोंधळ होण्याची शक्यता आहे. पुढच्या वर्षी केवळ ‘ग्रेड’ पद्धतच असेल असे मंडळाचे अध्यक्ष मावरीन डिसोझा यांनी सांगितले.
२००४ साली ६३.५३ टक्के, २००५ मध्ये ५९ टक्के, २००६ साली ६९.५१ टक्के, २००७ मध्ये ७३.६३ टक्के, २००८ साली ६९.९४ टक्के तर, २००९ साली ७७.११, २०१० साली ८३.५० टक्के निकाल लागला होता. दोन विद्यालयांचा निकाल राखून ठेवण्यात आला आहे. या परीक्षेला १५,३३० विद्यार्थ्यांची नोंदणी झालेल्यांपैकी एकूण १५,३२९ विद्यार्थी बसले होते. त्यातील १३,१९१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
ङ्गेरपरीक्षेला बसलेल्या १ हजार ४१८ विद्यार्थ्यांपैकी २६० जण उत्तीर्ण झाले आहेत. ङ्गेरपरीक्षेचा निकाल १८.३४ टक्के लागला आहे.
ङ्गेरतपासणीसाठी लागणारा विनंती अर्ज शालान्त मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून विद्यार्थी तो तेथून डाऊनलोड करून घेऊ शकतात. मात्र तो अर्ज विद्यालयाच्या प्रमुखांच्या सहीसह पर्वरी येथील मंडळाच्या कार्यालयात द्यावा लागणार आहे, अशी माहिती श्री. डिसोझा यांनी दिली.
२४ केंद्रांमध्ये नावेली केंद्राने बाजी मारली. नावेली केंद्राचा ९२.७७ टक्के निकाल लागला आहे. तर, पर्वरी ८८.५३ टक्के, पणजी ८९.३७, मडगाव ८७.५१, म्हापसा ८६.९९, वास्को ८५.१९, डिचोली ८२.४२, काणकोण ८१.४१, कुंकळ्ळी ८३.४८, कुडचडे ८४.११, केपे ८०.३४, माशेल ८३.८९, मंगेशी ८८.०७, पेडणे ८३.८०, पिलार ८०.१०, सांगे ८९.३७, साखळी ८१.७३, शिरोडा ९०.४०, शिवोली ८९.४७, तिस्क धारबांदोडा ७१.३१, वाळपई ८३.९५, मांद्रे, ८४.२६ तर कळंगुट केंद्राचा ८३.६५ टक्के निकाल लागला. या वर्षी प्रथमच कळंगुट केंद्र करण्यात आले आहे.

पहिले तिन्ही मानकरी मडगावचे
मडगाव, (प्रतिनिधी) : गोवा शालांत शिक्षण मंडळाने मार्च २०११ मध्ये घेतलेल्या दहावीच्या परीक्षेतील पहिले तिन्ही मानकरी मडगावातील असून त्या तिघीही मुली आहेत. त्यामुळे बारावीप्रमाणेच दहावीतही मडगावने यंदा आपला वरचष्मा ठेवला आहे.
पहिली आलेल्या दक्षाचा इंजिनियर होण्याचा मानस आहे. तिने आपल्या यशाचे श्रेय आई-वडिलांचे आशीर्वाद, शिक्षकांचे मार्गदर्शन व आपले खडतर प्रयत्नांना दिले. तिचे वडिल आतीश हे विद्युतीय ठेकेदार तर आई प्रतिमा गृहिणी आहे. दक्षा दिवसातून ७ ते ८ तास सतत अभ्यास करीत होती. नियमित अभ्यास हेच आपल्या यशाचे गमक असून पहिल्या तिघांत आपण येईन असा विश्‍वास वाटत असल्याचे तिने सांगितले.
दुसरी आलेल्या समृद्धीला ९० टक्क्यांवर गुण पडतील याची खात्री होती. तिचे प्राथमिक शिक्षण कोकणीत झाले होते व त्याची आपल्या यशाच्या मार्गात कुठेच अडचण झाली नाही असे तिने सांगितले. तिचे वडिल हे गोवा कार्बनमध्ये दर्जा नियंत्रण अधिकारी तर आई शिक्षिका असून तिने आपल्या यशाचे श्रेय आई-वडिल व शिक्षकांना दिले. प्राध्यापक बनण्याची इच्छा आहे पण त्यात बदल होऊ शकतो असे ती म्हणाली.
भाटीकर मॉडेलची रिशा हेगडे गोव्यात तिसरी आली असून बारावीनंतर वैद्यकीय शिक्षणाकडे वळण्याचा विचार तिने बोलून दाखवला. तिनेही आपणास यशाची खात्री होती असे सांगितले व यशाचे श्रेय शिक्षक व आईवडिलांना दिले.
समृध्दी व रिशा यांनी प्राथमिक शिक्षण मातृभाषेतून होण्याच्या गरजेवर भर दिला. तसे झाले तरच मुलाचा सर्वांगीण विकास शक्य असल्याचे आपल्या अनुभवावरून सांगितले. श्री. हेगडेे यांनी सांगितले की, निरुपायास्तव आपणाला तिला इंग्रजी माध्यमात पाठवावे लागले पण घरी आपण तिला कोकणीतून प्रत्येक गोष्ट समजावून सांगण्यावर भर दिल्याचे सांगितले.
-------------------------------------------------------------
दोन विषयांसाठी पुरवणी परीक्षा
या वर्षीपासून पहिल्यांदाच दोन विषय घेऊन विद्यार्थ्यांना पुरवणी (सप्लिमेंटरी) परीक्षा देता येणार आहे. या परीक्षेचे वेळापत्रक येत्या काही दिवसांत जाहीर केले जाणार आहे. मात्र, ही परीक्षा सकाळ सायंकाळ अशी एकाच दिवशी घेतली जाणार असल्याचे श्री. डिसोझा यांनी यावेळी सांगितले.

क्रीडा धोरणाचा ४५८ विद्यार्थ्यांना लाभ
राज्य सरकारने लागू केलेल्या क्रीडा धोरणाचा ४५८ विद्यार्थ्यांना लाभ मिळाला असून यात २८७ विद्यार्थी तर १७१ विद्यार्थिनींचाही समावेश आहे.

सरकारी विद्यालयांची विशेष कामगिरी...
राज्यातील चक्क ९ सरकारी माध्यमिक विद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागला आहे. या वर्षी ग्रामीण भागातील विद्यालयांनी चांगली कामगिरी दाखवली आहे. पेडणे तालुक्यातील सात विद्यालयांचा निकाल शंभर टक्के लागला आहे.

No comments: