Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday, 23 January, 2010

होंड्यातील 'ती' झोपडी जुगाराचे मुख्यालयच!

पणजी, दि. २२ (प्रतिनिधी): पेडणे तालुक्यापाठोपाठ सत्तरी तालुक्यालाही जुगाराने वेढले आहे व या भागातही अनेक लोक या जुगाराच्या आमिषाला बळी पडत असल्याचे विविध किस्से समोर येत आहेत. सत्तरीत विविध ठिकाणी जत्रोत्सव व इतर धार्मिक उत्सवांना जुगार चालतोच पण त्याही पलीकडे या भागात काही कायमस्वरूपी जुगाराचे अड्डे उभे राहिले असून त्यात लोकांची वर्दळ सुरूच असते,अशीही माहिती प्राप्त झाली आहे.
होंडा सत्तरी येथील एका सरकारी विद्यालयामागील अंतर्गत रस्त्याच्या बाजूलाच एक खास झोपडी तयार करण्यात आली आहे. पोफळी व नारळाच्या झावळ्या व बांबूंच्या साहाय्याने बनविलेली ही झोपडी या भागातील जुगाराचे महत्त्वाचे केंद्र बनले असून तिथे बारमाही पत्त्यांच्या जुगाराचे डाव रंगतात, अशी खबर प्राप्त झाली आहे. विशेष म्हणजे या जुगाराच्या अड्ड्यापासून फक्त अंदाजे ३०० मीटरवर होंडा पोलिस स्थानक असून देखील इथे काहीच अवैध चालत नाही, अशा आविर्भावात पोलिस वावरत असल्याची टीका स्थानिकांनी केली आहे. या जुगारवाल्यांनी पोलिसांना पूर्णपणे मिंधे करून ठेवले आहे व प्रत्येक वेळी त्यांच्या खिशात "गांधी'नोट चढवून त्यांना लाचार बनवल्याची टीका या भागातील एका नागरिकाने केली.
याठिकाणी हा अवैध व्यवसाय चालवणाऱ्यांकडून लोकांना ताकीद दिली जाते व हा जुगार बंद करण्याची कुणातच बिशाद नाही व सगळ्यांना "सेटल' केल्याचेही सांगण्यात येते. विनाकारण जुगारवाल्यांशी पंगा घेऊ नका, अशी सरळ धमकी देण्यासही हे लोक मागेपुढे पाहत नाही. इथपर्यंत त्यांची मजल गेल्याची खबर काहींनी सांगितली. दरम्यान, "गोवादूत' ने जुगाराविरोधात चालवलेल्या जनचळवळीचे कौतुक करून या भागातील एका स्थानिकाने या संबंधित वृत्ताची खबर दिली. आपले नाव गुपित ठेवण्याच्या अटीवर या व्यक्तीने प्रत्यक्ष हे ठिकाणही दाखवले. सकाळीच इथे जुगाराचे डाव सुरू होतात व रात्री ८ च्या नंतर तर तोबा गर्दी उसळते. रात्री १ पर्यंत हा खेळ चालतो. सकाळपासून सायंकाळ पर्यंत "रमी' हा पत्त्यांचा खेळ इथे सुरूच असतो. दरम्यान, या गोष्टीची खातरजमा करण्यासाठी आज २२ रोजी आमच्या "प्रतिनिधी'ने सकाळी ११ वाजता याठिकाणी भेट दिली. सदर व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार कथीत झोपडीची शोधाशोध सुरू केली. येथील शालेय विद्यालयाकडून वाड्यावर जाणाऱ्या रस्त्याच्या दिशेने जात असतानाच रस्त्याच्या उजव्या बाजूला एक मोठी झोपडी व त्या पुढे आणखी एक झोपडी दिसली व तिथे जुगार खेळणे सुरू असल्याचे आढळले. साखळी हरवळे येथेही रस्त्याच्या कडेला उभारण्यात आलेल्या झोपडीत जुगार चालतो, असेही सांगण्यात आले.
यापूर्वी या भागातील लोकांनी या प्रकाराबाबत आपली नापसंती व्यक्त केली असता पोलिसांकडूनच लोकांना जरब दाखवण्याचेही प्रकार घडल्याची प्रकरणेही स्थानिकांनी पुढे केली. पणजीतील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी जुगाराचा नायनाट करण्याची घोषणा केली असता स्थानिक पोलिस अधिकारी मात्र या आदेशांना जुमानत नाही, हा काय प्रकार आहे, असा खडा सवालही केला जात आहे. एखाद्या गैरप्रकाराबाबत जनतेने उघडपणे पुढे येऊन तक्रार करायला हवी, असे आवाहन पोलिसांकडून केले जाते पण पोलिसच या जुगारवाल्यांचे खरे खबऱ्या म्हणून वावरत आहेत व कुणी गावांतून जर या जुगाराविरोधात तक्रार किंवा नाराजी व्यक्त केली की त्याची खबर लगेच या लोकांकडे पोचती केली जाते, अशीही खात्रीलायक माहिती मिळाली आहे.
------------------------------------------------------------
मांद्र्यातील जुगार उधळला!
मांद्रे मेस्तवाडा येथे उत्सवानिमित्त थाटण्यात आलेला जुगार पेडणे पोलिसांनी उधळून लावला. जुगार थाटण्यासाठी सर्वतोपरी तयारी केली असता अचानक पोलिसांनी धडक दिल्याने जुगाराचा पट मांडलेल्यांनी पळ काढला. दरम्यान, हा जुगार चालवण्यासाठी पोलिसांकडे अनेकांनी विनवणी केली पण वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हा विषय गंभीरपणे घेतल्याने कोणत्याही परिस्थितीत जुगार चालणार नाही, असे ठणकावून पोलिसांनी मध्यस्थी करणाऱ्यांना पिटाळून लावले. पोलिसांच्या या कारवाईचे स्थानिकांनी जोरदार स्वागत केले आहे.

राजीनामा देण्याचे डॉ. सांगोडकर यांचे आश्वासन

भाजयुमोच्या घेरावाने कुलसचिवांची भंबेरी
पणजी, दि. २२ (प्रतिनिधी): गोवा विद्यापीठाच्या आवारात कॉंग्रेस पक्षाच्या झालेल्या "राजकीय' कार्यक्रमाची जबाबदारी स्वीकारून कुलसचिव डॉ. मोहन सांगोडकर यांनी त्वरित राजीनामा देण्याची जोरदार मागणी करत भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाने आज कुलसचिवांच्या कार्यालयावर धडक दिली. युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी कुलसचिवांवर प्रश्नाचा भडिमार करून त्यांची भंबेरी उडवली. यावेळी त्या वादग्रस्त कार्यक्रमाला आणि त्यानंतर उठलेल्या वादंगाला पूर्णपणे मीच जबाबदार असून उद्या सकाळी राज्यपाल तथा विद्यापीठ कुलगुरूंची भेट घेऊन राजीनामा सादर केला जाणार, असे स्पष्ट आश्वासन कुलसचिव डॉ. सांगोडकर यांनी दिले. यानंतर घेराव मागे घेताना उद्यापर्यंत राजीनामा सादर न झाल्यास पुन्हा मोठ्या संख्येने विद्यापीठावर धडक दिली जाणार असल्याचा इशारा युवा मोर्चाचे अध्यक्ष रुपेश महात्मे यांनी दिला.
कुलसचिव हा कॉंग्रेस पक्षाचा एजंट असून त्यांना या पदावर राहण्याचा कोणताही अधिकार नसल्याचा दावा करून त्वरित त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. यावेळी मोर्चाच्या काही महिलांनी आपल्या हातातील बांगड्याही काढून डॉ. सांगोडकर यांच्या टेबलावर ठेवल्या. "यापुढे असे काहीच होणार नाही', असे उत्तर देऊन डॉ. सांगोडकर यांनी युवा मोर्चाला शांत करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यात त्यांना यश आले नाही. ताबडतोब उपकुलगुरूंना याठिकाणी बोलवण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. उपकुलगुरू विद्यापीठातच एका बैठकीत असल्याचे समजताच खुद्द कुलसचिव सर्वांना घेऊन बैठक सुरू असलेल्या ठिकाणी गेले. यावेळी संतप्त युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी कुलगुरूंना घेराव घालून डॉ. सांगोडकर यांना कुलसचिव पदावरून त्वरित हटवण्याची मागणी केली.
राहुल गांधी यांच्या कार्यक्रमाला गोवा विद्यापीठाने कोणतीही परवानगी दिली नव्हती. तसेच अशा प्रकारचा कार्यक्रम विद्यापीठाच्या आवारात होऊ शकत नसल्याचेही कुलगुरूची भेट घेऊन त्यांना कळवण्यात आले होते. त्यांनीही ते मान्य केले होते, अशी माहिती यावेळी उपकुलगुरू डॉ. दिलीप देवबागकर दिली. तसेच, कॉंग्रेस पक्षाच्या बैठका विद्यापीठाच्या सभागृहात होणार याचीही माहिती आम्हाला देण्यात आली नव्हती, असे त्यांनी सांगितले.
मडगाव येथील दोन नामवंत महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यास "एनएसएस'साठी १० अतिरिक्त गुण दिले जाणार असल्याचे सांगून या कार्यक्रमात आणण्यात आले होते. तसेच या सभेत सहभागी होण्यासाठी परिपत्रकही काढण्यात आल्याचे युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी उपकुलगुरूच्या निदर्शनास आणून दिलेत. यावेळी मोठ्या संख्येने युवा मोर्चाचे तरुण कार्यकर्ते उपस्थित होते.
----------------------------------------------------------------------
राहुल गांधी यांच्या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांना हजर राहण्यासाठी कोणकोणत्या महाविद्यालयात आणि कोणाच्या सहीने परिपत्रक काढले होते, याची संपूर्ण माहिती द्या, त्यांच्यावर विद्यापीठातर्फे कारवाई केली जाईल, असे आश्वासन आज उपकुलगुरू डॉ. दिलीप देवबागकर यांनी दिले.
----------------------------------------------------------------------
राहुल गांधी यांना गोवा विद्यापीठाने आमंत्रित केले नव्हते. त्यामुळे त्यांच्या कार्यक्रमाला परवानगी देण्याचा प्रश्नच येत नव्हता. या विषयावर राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलगुरू यांच्या भेटीनंतर विद्यापीठाचे केवळ मैदान वापरायला देण्याचे ठरले होते. परंतु, त्याठिकाणी पक्षाच्या बैठका होणार याची आम्हालाही कल्पना देण्यात आली नव्हती, अशी माहिती आज उपकुलगुरू डॉ. दिलीप देवबागकर यांनी दिली. विद्यापीठाला फसवून त्याठिकाणी पक्षाचा कार्यक्रम केल्याने पक्षावर आणि कॉंग्रेस पक्षाचे युवा नेते राहुल गांधी यांच्यावर अवमान याचिका दाखल करा, अशी मागणी युवा मोर्चाने केली आहे.
----------------------------------------------------------------------
भ्रष्ट अधिकाऱ्यांची खैर नाहीः रुपेश महात्मे
यापुढे भ्रष्ट आणि कॉंग्रेस पक्षाची चमचेगिरी करणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांची खैर नाही. येणाऱ्या काळात भ्रष्ट अधिकाऱ्यांना अशाच पद्धतीने घेराव घालून त्यांचे कारनामे उघडकीस आणले जातील, असा इशारा भाजयुमोचे अध्यक्ष रुपेश महात्मे यांनी दिला आहे. राज्यात कॉंग्रेस सरकार असले तरी, जो पर्यंत भारतीय जनता पार्टीचा युवा मोर्चा आहे तोवर राज्यात कॉंग्रेसच्या तालावर नाचणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांना मनमानी करायला देणार नसल्याचाही इशारा महात्मे यांनी दिला.

चौकशीची कराच: अभाविप

पणजी, दि. २२ (प्रतिनिधी): कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस राहुल गांधी यांची सभा घेण्यासाठी गोवा विद्यापीठाची विद्यादानाची सर्वश्रेष्ठ जागा वापरायला देण्यास कोण जबाबदार आहे, याची चौकशी करण्याची मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केली आहे. तसेच, शैक्षणिक क्षेत्रात उत्तम दर्जा निर्माण करण्याच्या बाबतीत अपयशी ठरलेल्या विद्यापीठाबद्दल गोव्यातील लोकांना अभिमान का वाटत नाही, याचाही अभ्यास करवा, अशी मागणी अभाविप प्रदेश मंत्री रोहित मयेकर यांनी केली आहे.
विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. मोहन सांगोडकर यांना विद्यापीठातील पदव्युत्तर विद्यार्थ्यांना कॉंग्रेस पक्षाच्या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचा आदेश काढण्यास कुणी भाग पाडले याचीही चौकशी करावी, अशीही विनंती विद्यापीठाच्या सिनेट सदस्यांना करण्यात आली आहे. सध्या एक पक्षीय राजवटीतून आणीबाणी वातावरणाकडे देशाला नेण्याचे प्रयत्न चालले आहेत, याकडेही प्रसिद्धीस दिलेल्या पत्रात लक्ष वेधण्यात आले आहे.

जुगाराचा नायनाट करू

उपमहानिरीक्षक कडाडले
पणजी, दि. २२ (प्रतिनिधी): राज्यात 'खुलेआम' सुरू असलेला जुगार बंद करण्याचा दावा पोलिस महासंचालक भीमसेन बस्सी यांनी करताच दोन दिवस काहीसा बंद झालेला जुगार पुन्हा सुरू झाल्याने पोलिस उपमहानिरीक्षक रवींद्र यादव यांनी आज दोन्ही जिल्ह्यांच्या पोलिस अधीक्षकांना आणि गुन्हा अन्वेषण विभागाच्या अधीक्षकांना जुगाऱ्यांना ताब्यात घेण्याचे आदेश दिले. त्याचप्रमाणे, जुगार हा अजामीनपात्र गुन्हा आणि त्यात अटक करण्यात येणाऱ्यांना कडक शिक्षा करण्यासाठी पोलिसातर्फे एक प्रस्तावही तयार करण्याचा आदेश देण्यात आला आहे. कोणत्याही परिस्थितीत जुगार खपवून घेतला जाणार नाही, त्याचा नायनाट करू, असेही उद्गार यावेळी श्री. यादव यांनी काढले.
जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात पोलिस महासंचालक बस्सी यांनी राज्यात सुरू असलेला जुगार बंद करू, असा दावा केला होता. यामुळे काही पोलिस अधिकाऱ्यांची धांदल उडाली होती. ताबडतोब मोबाईलवर संपर्क साधून जुगार बंद करण्याचा सूचना करण्यात आली होती. त्यानंतर अनेक ठिकाणी केवळ दोन दिवस जुगार बंद झाला. मात्र दोन दिवसानंतर पुन्हा एकदा ठिकठिकाणी "खुलेआम' जुगार खेळणारे टोळके दिले दिसू लागले आहेत. "गोवादूत'ने याविषयी विचारले असता आज दोन्ही जिल्ह्यांच्या आणि गुन्हा अन्वेषण विभागाच्या अधीक्षकांना जुगाऱ्यांना ताब्यात घेण्याचे आदेश देण्यात आले. त्यामुळे पुन्हा एकदा सर्वांचे धाबे दणाणले आहेत. जुगार खेळणाऱ्यांना कायद्याची कोणतीच भीती राहिलेली नसून खुद्द काही पोलिसच या जुगाराच्या आहारी गेले आहेत. याकडेही पोलिस खात्याने लक्ष पुरवण्याची मागणी केली जात आहे.
-----------------------------------------------------------------
अनेक ठिकाणी चक्क पोलिस स्थानकाच्या बॅरेकमध्ये जुगार खेळला जात असल्याची माहिती उघडकीस आली आहे. याकडे ज्येष्ठ पोलिस अधिकारी लक्ष देणार का, असा सवाल काही पोलिसांच्या कुटुंबीयांनी "गोवादूत'शी संपर्क साधून केला. अनेकांना या जुगाराचे एवढे वेढ लागले आहे की, महिन्याचे ८० टक्के वेतन या जुगारात संपवले जाते. अनेक तरुण पोलिसही या जुगाराला बळी पडू लागले आहेत. त्यामुळे "गोवादूत'ने जुगाऱ्यांच्या विरोधात उघडलेल्या या मोहिमेला जोरदार पाठिंबा मिळू लागला आहे.

आगोंदात युवकाकडून लाखाचा चरस जप्त

पणजी, दि. २२ (प्रतिनिधी): आगोंद काणकोण येथे अंमली पदार्थ विरोधी पथकाने छापा काटून १ लाख ८ हजार किमतीचा चरस जप्त केला आहे. यात हिमाचल प्रदेश येथील महेश कुमार शर्मा या २५ वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली असून त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी मिळवण्यात आली आहे. गेल्या एक महिन्यात या पथकाने चार छापे टाकून सुमारे १० लाख रुपयांचा अमली पदार्थ जप्त केला आहे. तर, काणकोण भागात २००६ नंतरचा आणि २०१० सालातला हा पहिला छापा आहे. गोव्याच्या दोन्ही जिल्ह्यांत अमली पदार्थाची तस्करी करणाऱ्यांची पाळेमुळे घट्ट झाल्याचे उघडकीस आली आहे.
दरम्यान, ताब्यात घेण्यात आलेला तरुण हा आगोंद येथील एका शॅकवर वेटर म्हणून नोकरीला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. गृहमंत्री रवी नाईक यांनी गोव्यात अंमली पदार्थ नसल्याचा दावा करताच अंमली पदार्थ विरोधी पथक आणि जिल्हा पोलिस यांच्यात जोरदार जुंपली आहे. अंमली पदार्थ विभागाचे उपअधीक्षक नरेश म्हामल यांच्या मार्गदर्शनाखाली विभागाचे निरीक्षक राजन निगळे, महिला उपनिरीक्षक मीरा डिसिल्वा, उपनिरीक्षक सोमनाथ माजिक, पोलिस शिपाई इर्शाद वाटांगी, श्रीनिवास पिडूगो, चिदानंद अर्दारोट्टी यांनी ही कारवाई केली.

विषबाधेपेक्षा उपास परवडेल

'त्या' मंडळाला "युवक संघा'चा विरोध
वास्को, दि. २२ (प्रतिनिधी): सरस्वती महिला मंडळाकडून माध्यान्ह आहार घेण्यापेक्षा आमचे विद्यार्थी उपाशी राहिलेले परवडेल, असा कडक पवित्रा सडा येथील युवक संघ विद्यालयाच्या पालक शिक्षक समितीने घेतला आहे. शिक्षण खात्याने अन्य कोणत्याही मंडळाकडून आहार पुरविल्यास तो मान्य केला जाईल, असे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
या विद्यालयाच्या १८ विद्यार्थ्यांना ८ ऑगस्ट २००९ रोजी माध्यान्ह आहारातून विषबाधा झाल्यानंतर शिक्षणमंत्र्यांनी सदर पुरवठादार मंडळाला "ब्लॅक लीस्ट' केल्याची घोषणा केली होती. काल पुन्हा त्याच संस्थेकडून आहार पुरवण्यात आल्यानंतर विद्यालयाने तो घेण्यास नकार दिला होता. याविषयी ठोस निर्णय घेण्यासाठी विद्यालयाच्या पालक शिक्षक संघाची आज बैठक बोलवली असता यावेळी सदर समितीचे अध्यक्ष सुरेश फटजी, विद्यालय मंडळाचे अध्यक्ष दत्ताराम धारगळकर, विद्यालयाचे मुख्याध्यापक डी. एम. आमाटी यांच्या सहीत सुमारे चाळीस पालक यावेळी उपस्थित होते. विषबाधेचा प्रकार घडल्यानंतर येथील विद्यार्थी पूर्णपण घाबरलेले असताना पुन्हा त्याच मंडळाकडून आहार घेण्यास बैठकीने विरोध दर्शविला. सरस्वती महिला मंडळाच्या प्रमुखांनी आमच्या विद्यालयावर विनाकारण आरोपही केल्याची आठवण यावेळी करून देण्यात आली. असा प्रकार पुन्हा घडल्यास त्याला कोण जबाबदार राहील असा प्रश्न उपस्थित करण्यात आला.
यावेळी येथील शिक्षण खात्याशी संपर्क साधला असता त्याच मंडळाला कंत्राट देण्याचे आदेश आल्याचे सांगण्यात आले. यानंतर, कोणत्याही परिस्थितीत सदर महिला मंडळाकडून माध्यान्ह आहार नको, असे स्पष्ट करण्यासाठी शिक्षण खात्याच्या संचालकांची लवकरच भेट घेण्याचा निर्णय समितीने घेतला. शिक्षण खात्याकडून प्रस्ताव मान्य न झाल्यास समिती आहार न घेण्याच्या निर्णयाशी ठाम राहणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Friday, 22 January, 2010

कुलसचिवांना पदावरून हटवा

भाजपची आग्रही मागणी

पणजी, दि. २१ (प्रतिनिधी)- शिक्षणाचे पवित्र स्थान असलेल्या गोवा विद्यापीठाला राजकीय आखाडा बनवून मुख्यमंत्री व कॉंग्रेसच्या नेत्यांनी विद्यापीठाची शान व प्रतिष्ठाच धुळीला मिळवली आहे. प्रत्यक्ष कुलगुरू व उपकुलगुरूंनी या राजकीय कार्यक्रमाला विरोध दर्शवला असताना कुलसचिवांनी दिलेली मान्यता आक्षेपार्ह आहे. त्यांनी हा कार्यक्रम अराजकीय ठरवण्याचा आभास तयार केला असला तरी प्रत्यक्ष राहुल गांधी यांनीच आपली भेट राजकीय असल्याचे स्पष्ट केल्याने ते तोंडघशीच पडले आहेत. हे पद सांभाळण्यास ते पूर्णपणे अपात्र असल्याने त्यांच्याकडील हंगामी तत्त्वावर सोपवलेली ही जबाबदारी तात्काळ काढून घेण्यात यावी, अशी आग्रही मागणी विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी केली.
आज इथे बोलावण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत पर्रीकर यांनी विद्यापीठ संकुलाच्या राजकीयीकरणाच्या विषयावरून कॉंग्रेसला चांगलेच फैलावर घेतले. या प्रसंगी भाजपचे उपनेते आमदार फ्रान्सिस डिसोझा व भाजप विधिमंडळ प्रवक्ते आमदार दामोदर नाईक उपस्थित होते. मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना ही कृती अजिबात शोभत नाही, असे ठणकावून सांगताना विद्यापीठाच्या इतिहासात एक चुकीचा पायंडाच कॉंग्रेसने घातल्याचा ठपकाही पर्रीकर यांनी ठेवला. विद्यमान सभापती प्रतापसिंह राणे यांनी काही काळापूर्वी अशाच एका राजकीय कार्यक्रमाला खुद्द आपल्याच पक्षाच्या पंतप्रधानांना कला अकादमीच्या सभागृहाची परवानगी नाकारून एक आदर्श घालून दिला होता; पण त्याच कॉंग्रेसने आता आपली नैतिकताच खुंटीला टांगल्याची खिल्ली पर्रीकरांनी उडवली. खुद्द उपकुलगुरूंनी राजकीय दबाव झुगारून या कार्यक्रमास मान्यता देण्यास नकार दिल्याचेही पर्रीकर म्हणाले. कुलसचिवांनी मात्र हा कार्यक्रम अराजकीय असल्याचे भासवून परवानगी दिली. या एकूण प्रकरणी संबंधित कागदपत्रे मागवण्यात आली आहेत व ती प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाईचा निर्णय घेऊ, असेही ते म्हणाले. इतर अनेक ठिकाणे असताना केवळ गोवा विद्यापीठाची निवड केवळ आयते विद्यार्थी मिळणार असल्यामुळेच केल्याची खिल्लीही पर्रीकर यांनी उडवली. राहुल गांधी यांच्याकडून राजकारणाच्या शुद्धीकरणाचे डोस कॉंग्रेसजनांना पाजले गेले खरे; पण हे करीत असताना त्यांच्या बाजूला व समोर अनेक लुटारूच बसले होते याची कल्पना त्यांना कदाचित नसावी, अशी टर पर्रीकर यांनी उडवली.
तर ज्येष्ठ नागरिकांचा
विधानसभेवर धडक मोर्चा
विद्यमान कॉंग्रेस आघाडी सरकार सत्तेवर आल्यापासून गेल्या अडीच वर्षांत दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांचा एकही अर्ज निकालात काढलेला नाही. सुमारे आठ ते नऊ हजार ज्येष्ठ नागरिक या आर्थिक साहाय्यासाठी तळमळत आहेत. येत्या फेब्रुवारीअखेरपर्यंत हे सर्व अर्ज निकालात काढले नाही तर भाजपतर्फे ज्येष्ठ नागरिकांना बरोबर घेऊन विधानसभेवर धडक मोर्चाच आणू, असा इशाराच पर्रीकर यांनी दिला.
भाजपच्या संघटनात्मक निवडणुकीच्या निमित्ताने राज्यातील कानाकोपऱ्यांत जनतेशी संवाद साधण्याचा योग प्राप्त झाला. यावेळी लोकांनी विविध तक्रारींचा पाढाच वाचून दाखवला. महागाई, पाणी व वीज टंचाई आदी नित्याच्या तक्रारी होत्याच पण अनेक ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांनी दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेचा लाभ मिळत नसल्याचे सांगितले. अबकारी, खाण खात्याकडून एकीकडे लूट सुरू असताना ज्येष्ठ नागरिकांनाही आर्थिक साहाय्य देण्याची ऐपत या सरकारची राहिलेली नाही. ही अत्यंत शरमेची व दुर्दैवी गोष्ट आहे, असा टोलाही पर्रीकर यांनी हाणला. ज्येष्ठ नागरिकांवरील हा अन्याय कदापि सहन करणार नाही, असे सांगून सरकारने हे सर्व अर्ज तात्काळ निकालात काढून त्यांना थकबाकीसह पूर्ण मदत देण्यात मिळण्याची सोय करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

६.६ लाखांच्या बनावट वस्तू कळंगुट येथे जप्त

पणजी, दि. २१ (प्रतिनिधी)- समुद्री किनाऱ्यावर भव्य दुकाने धाडून त्यातून बनावट वस्तूंची विक्री करणाऱ्या दोन दुकानावर काल दुपारी छापा टाकून सुमारे ६ लाख ६० हजार रुपयाचा माल जप्त करण्यात आला. मुंबई येथील खिलीज अस्कळकर यांनी तक्रार दाखल केल्यानंतर कळंगुट पोलिसांनी हा छापा टाकला. या "लेदर फार्म'चे मासीहुर रेहमान अब्दुल रेहमान (३५) व "ए वन स्टार' या शॉपचे अझरखान हाजी खान (१८) यांना पोलिसांनी अटक करून वैयक्तिक हमीवर सुटका केली. या दोन्ही दुकान मालकांच्या विरोधात कॉपी राइट कायदा १०३ व १०४ कलमानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार या दोन्ही दुकानावर बनावट चामड्याच्या वस्तू विक्री केली जात असल्याची तक्रार दिल्यानंतर हा छापा टाकण्यात आला. नाईकावाडो कळंगुट येथे ही दोन्ही दुकाने असून करोडो रुपयांचा माल या दुकानात भरून ठेवण्यात आला आहे. तसेच, यातील बऱ्याच वस्तू बनावट असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. लेदर फार्म या दुकानातून ८६ बनावट लेदरच्या वस्तू जप्त केल्या असून याची किंमत ५ लाख १६ हजार रुपये होते. तर, "ए नव स्टार' या दुकानात छापा टाकून रीडेले को. असा लोगो असलेल्या १ लाख ४४ हजार किमतीच्या वस्तू ताब्यात घेण्यात आल्या. याविषयीचा पुढील तपास कळंगुट पोलिस करीत आहेत.

पणजीत ३ फेब्रुवारी रोजी रा. स्व. संघातर्फे संचलन

सरसंघचालकांची विशेष उपस्थिती
पणजी, दि. २१ (प्रतिनिधी) - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मा. मोहनजी भागवत यांची या पदावर नियुक्ती झाल्यानंतर ते पहिल्यांदाच गोवा भेटीवर येत असल्याने गोव्यातील शाखेने सुमारे साडेतीन हजार कार्यकर्त्यांची दोन वेगळी संचलने एकाच वेळी आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. ही दोन्ही संचलने वेगवेगळ्या ठिकाणाहून सुरू होणार असून एकाचवेळी सांत इनेज येथील चौकात एकत्र येणार आहेत. या ठिकाणी सरसंघचालक मोहनजी भागवत संचलनाचे निरीक्षण करणार आहेत.
हा प्रयोग पहिल्यांदाच करण्यात येत असल्याने संघाचा शारीरिक विभाग त्यावर अथक मेहनत घेत आहे. उत्तर आणि दक्षिण गोवा अशी दोन वेगळी संचलने होणार आहेत. उत्तर गोव्याचे संचलन आझाद मैदानावरून तर, दक्षिण गोव्याचे संचलन कांपाल येथील परेड मैदानावरून सुरू होणार आहे.
दि. २ फेब्रुवारी रोजी सायंकाळी मा. भागवत यांचे गोव्यात आगमन होणार असून त्या दिवशी कोणत्याही कार्यक्रमाचे आयोजन नाही. दुसऱ्या दिवशी दि. ३ फेब्रुवारी रोजी सकाळी आझाद मैदानावर सरसंघचालकांकडून टी. बी. कुन्हा आणि हुतात्मा स्मारकाला आदरांजली वाहिली जाणार आहे. त्यानंतर, संचलनासाठी दुपारी ३.३० वाजता सर्व कार्यकर्ते ठरवलेल्या दोन्ही मैदानावर एकत्र येणार असून ४.१५ वाजता संचलन सुरू होणार आहे. दोन्ही संचलने सांत इनेज येथे एकत्र आल्यानंतर दयानंद बांदोडकर मैदानावर जाणार आहेत. यानंतर ६ वाजता सरसंघचालक प्रणाम झाल्यानंतर कार्यकर्त्यांना आणि अन्य नागरिकांना मार्गदर्शन करणार आहेत. हा कार्यक्रम ७.१५ वाजता समाप्त होणार आहे.
सरसंघचालकांना झेड सुरक्षा असल्याने व्यासपीठावर वावरणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला ओळखपत्र दिले जाणार आहे. त्यासाठी सुरक्षा यंत्रणेचे एक पथक कार्यक्रमाच्या दोन दिवस पूर्वी गोव्यात दाखल होणार आहे.

रेल्वेच्या बांधकामांवरही "सीआरझेड'मुळे गंडांतर

कोलव्यातील १७ बांधकामे पाडली
मडगाव, दि. २१ (प्रतिनिधी): उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने सीआरझेड क्षेत्रातील बांधकामांबाबत दिलेल्या आदेशाची कार्यवाही करताना येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील विशेष पथकाच्या मार्गदर्शनाखाली कोलवा पंचायत कक्षेतील एकूण १७ बांधकामे आज पाडण्यात आली तर अन्य १६ बांधकामे स्थगिती आणल्याने बचावली. विशेष म्हणजे यात भारतीय रेल्वेच्या काही बांधकामांचा समावेश होता.
उपजिल्हाधिकारी संजीव देसाई यांच्या नेतृत्वाखाली आज सकाळी कडक पोलिस बंदोबस्तात ही धडक कारवाई सुरू झाली. यावेळी बघ्यांची मोठी गर्दी तेथे जमा झाली होती तर काहींनी अकारण पृच्छा करून कारवाईत अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. तथापि, संबंधित अधिकाऱ्यांनी लेखी कागदपत्रे व पुरावा किंवा स्थगिती आदेश असेल तर तो आणा, असे सांगताच ते मागे हटले.
यावेळी सासष्टीचे गटविकास अधिकारी, कोलवा सरपंच, सचिव व मोठ्या संख्येने पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. बांधकामे हटविण्यासाठी आणलेले जेसीबी यंत्र किनाऱ्यावर नेतेवेळी तेथील पुलाची कमान मोडल्याचे यावेळी सांगण्यात आले.
स्थानिक पंचायतीने बेकायदा म्हणून सादर केलेल्या यादीनुसार आजची धडक कारवाई करण्यात आली. पंचायतीने एकूण ३३ बांधकामांची यादी सादर केली होती त्यांपैकी १५ जणांनी अतिरिक्त पंचायत संचालकांकडून तर एकाने दिवाणी न्यायालयाकडून कारवाईवर स्थगिती आणली. यात भारतीय रेल्वेच्या बांधकामांचाही समावेश आहे. यांपैकी निम्म्या बांधकामांवर कारवाई झाल्यानंतर स्थगिती आणल्याने कारवाई रहित करण्यात आल्याचे संजीव देसाई यांनी सांगितले. तिघांनी स्थगितीसाठी अर्ज करून आपली बांधकामे स्वतःहून हटविली होती. यानंतर त्यांच्या हाती स्थगिती आदेश पडला.
रेल्वे प्रमाणेच कृषी खात्याच्या बांधकामांचाही यादीत समावेश होता. पण त्यांनी अगोदरच स्थगिती घेतली होती. तर पर्यटन खात्याच्या बांधकामाची न्यायालयात सुनावणी सुरू असल्याने त्याचा या यादीत समावेश नव्हता. आज कारवाई झालेल्या बांधकामांत निवासी घरे नव्हती तर घरांचे विस्तारीत भाग, शेड यांचा समावेश होता.
आजच्या या कारवाईमुळे दक्षिण गोव्यातील सीआरझेड बाबतची कारवाई बहुतांशी पूर्ण होत आली आहे. खंडपीठाने दिलेली आठ आठवड्यांची मुदत संपण्यापूर्वी ती पूर्ण होईल असा अंदाज आहे. लोलये - पोळे, पैंगीण, काणकोण नगरपालिका, आगोंद, खोला, सांकवाळ येथील कारवाई पूर्ण झाली आहे व सर्व कारवाई पूर्ण होताच त्या बाबतचा अहवाल उच्च न्यायालयाला सादर केला जाईल, असे सांगण्यात आले.

डिचोलीतही जुगारी अड्डे "फुल्ल'!

पणजी, दि. २० (प्रतिनिधी)- सत्तरी पाठोपाठ आता डिचोली तालुक्याच्या कानाकोपऱ्यांतही राजरोसपणे जुगाराचे अड्डे सुरू असल्याची माहिती तेथील स्थानिकांनी दिली आहे. पोलिस या प्रकाराकडे कानाडोळा करतातच, वरून ते देखील यातील काही अड्ड्यांवर जुगार खेळण्यात दंग असतात, अशीही खात्रीलायक माहिती मिळाली आहे. दिवसभर कष्ट करून मिळवलेले चार पैसे घरी नेण्याचे सोडून काही पायलट मंडळी ही कमाई जुगारात उधळून टाकतात व कधी चुकून डाव लागला तर दारूवर खर्च करतात, असेही किस्से आता पुढे येत आहेत.
"गोवादूत'मधून सार्वजनिक ठिकाणी व जत्रोत्सव तथा इतर धार्मिक उत्सवांना चालणाऱ्या जुगाराविरोधात जनमत चळवळ उभारली जात असतानाच विविध ठिकाणी जुगाराचे आयोजन करणाऱ्यांकडून थेट आव्हान देण्याची भाषा केली जात असल्याची खबर आहे. प्रसिद्धी माध्यमाने कितीही गरळ ओकली तरी जुगार बंद होणार नाही, असे म्हणून संपूर्ण प्रशासकीय व पोलिस यंत्रणांनाही आव्हान देण्याची धमक ते दाखवत आहे. "गोवादूत'ने यासंबंधी घेतलेल्या पुढाकाराचे मात्र सर्वत्र स्वागत केले जात असून आता लोक आपोआपच पुढे येऊन आपल्या अवतीभोवती सुरू असलेल्या जुगाराबाबत सविस्तर माहिती देण्यास पुढे सरसावले आहेत. जुगार आयोजित करणाऱ्या या लोकांनी समाजात एक प्रकारचा दरारा निर्माण केला आहे तसेच पोलिसांनाही विकत घेतले जात असल्याचेही वातावरण पसरल्याने उघडपणे या प्रकाराविरोधात लोक आवाज काढीत नसले तरी हा प्रकार बंद व्हायलाच हवा, याबाबत मात्र सगळ्यांचे एकमत बनले आहे.
डिचोलीच्या बाबतीत प्राप्त झालेल्या माहितीनुसार टप्प्या टप्प्यात जुगाराचे अड्डे तयार होत आहेत. त्यात प्रामुख्याने उल्लेख करायचा झाल्यास डिचोली बसस्थानकामागे एक बराच मोठा अड्डा चालतो. त्याही पलीकडे डिचोली बगलरस्त्यालगत अशाच प्रकारचा अड्डा चालतो. वन म्हावळिंगे येथील बसथांब्याजवळही अशीच एक अडगळीतील जागा असून तिथेही दिवसभर लोक जुगार खेळण्यासाठी ठिय्या मारून बसलेले असतात. तेथील दोन नामांकित कंपन्यांजवळ एका झाडीत मोठ्या प्रमाणात जुगार चालतो व येथील कामगार आपला संपूर्ण पगार याठिकाणी डावाला लावत असतात, अशीही खबर मिळाली आहे. गोवा - दोडामार्ग सीमाभागात तर या प्रकाराला काही पारावारच राहिलेला नाही. या भागातील लोकवस्तीपासून काही अंतरावर असलेल्या पाटाजवळील खास उभारलेल्या झोपडीत दिवसरात्र जुगार चालतो. विशेषतः रविवार हा सुट्टीचा दिवस व त्यात दोडामार्ग (सकीरवाळ) येथील बाजाराचा दिवस असल्याने ही झोपडी भरून उतू पडते. दुचाक्यांच्या रांगाच रांगा इथे लागलेल्या असतात. साळ येथे जाण्यासाठी रस्त्याच्या डाव्या बाजूला पेट्रोलपंप आहे, त्याच्या जवळही एका झोपडीत जुगार चालतो. ही दोन्ही ठिकाणे पोलिस आउट पोस्टाच्या अत्यंत जवळ असूनही पोलिस थांगपत्ता नसल्याचा आव आणून कानावर हात ठेवून गप्प असतात. या व्यवसायातून दर महिन्याला किंवा आठवड्याला पोलिसांचा "मान' पोचवला जातो व त्यामुळेच पोलिसांचा या प्रकाराला छुपा पाठिंबा मिळतो. आता पोलिस महासंचालकांनीच जुगाराविरोधात दंड थोपटल्याने या पोलिसांचेही धाबे दणाणले आहेत व त्यामुळे त्यांच्याकडून सावधगिरी बाळगण्याचा सल्ला जुगारवाल्यांना देण्यात येत असल्याचीही खबर आहे.

Thursday, 21 January, 2010

बांद्यातील 'त्या' साठ्याचा संबंध मद्य घोटाळ्याशी?

सावंतवाडी व पणजी, दि. २० (प्रतिनिधी): राज्य अबकारी खात्यात बनावट दाखल्यांच्या जोरावर मोठ्या प्रमाणात मद्याची आयात होत असल्याचे प्रकरण विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी उघडकीस आणून कोट्यवधींच्या मद्य घोटाळ्याचा पर्दाफाश केला होता. आता गोव्यातून अवैध पद्धतीने मद्याचा साठा घेऊन कोल्हापूरमार्गे वाहतूक करणारा टेम्पो काल बांदा पोलिसांनी अत्यंत शिताफीने पकडल्याने या घोटाळ्याचे गांभीर्य अधिक वाढले आहे.
गोव्यात उत्पादित मद्यावर वेगवेगळ्या बड्या कंपन्यांचे लेबल लावून ते मद्य कर्नाटक व आंध्र प्रदेशात विकले जाते, असा संशय बांदा पोलिसांनी व्यक्त केला. पोलिसांनी हस्तगत केलेल्या मद्याच्या बाटल्यांवर "एस. विरा बिसलरी मिनरल लिमिटेड' या कंपनीचे लेबल लावले आहे. या कंपनीचे अधिकार "डिस्ट्रील ब्रॅंड वॉटर बार' हैदराबाद यांना बहाल असल्याचेही लिहिले आहे. प्रत्यक्षात हे मद्य गोव्यातच तयार होते व बड्या कंपन्यांच्या लेबलखाली बनावट पद्धतीने तयार होऊन ते जादा दराने इतर ठिकाणी विकले जाते, असा पोलिसांचा कयास आहे.
गोव्यातून शेजारील महाराष्ट्रापाठोपाठ आता कर्नाटकातही मद्याची बेकायदा वाहतूक करणारी टोळी सक्रिय झाली आहे व त्या दृष्टीने महाराष्ट्र पोलिसांनी कडक पवित्रा घेतला आहे. या टोळीचा पर्दाफाश करण्यासाठी महाराष्ट्र पोलिस प्रयत्न करीत असले तरी गोवा पोलिस व अबकारी खात्याकडून योग्य ते सहकार्य मिळत नसल्याची नाराजी त्यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, बांदा पोलिसांना चकवा देऊन मद्याचा टेम्पो पळवताना पोलिसांनी ताब्यात घेतलेला चालक दिनकर महालिंग पाटील याने न्यायालयात बांदा पोलिसांविरोधात जबर मारहाणीची तक्रार केली आहे, त्यामुळे त्याची वैद्यकीय तपासणी करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. दिनकर पाटील याला सध्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. बांदा पोलिस स्थानकाचे निरीक्षक दत्तात्रेय मुरादे यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा करताना टेम्पोचे मालक नसरूद्दीन शेख यांना गाठले. दरम्यान, नसरूद्दीन शेख यांनी हा टेम्पो यापूर्वीच २१ मार्च २००८ रोजी सांगली येथील संदीप अर्जुन आरगे याला विकल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्याचाही पिच्छा पुरवत अखेर टेम्पो मालक संदीप आरगे (रा. सांगली) यालाही ताब्यात घेतले. उद्या २२ रोजी त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात येईल. दरम्यान, गोव्यातून कायदेशीररीत्या आंध्र प्रदेश येथे मद्य पाठवले जात नाही, अशी माहिती मिळाली आहे. पण "बॅगपाइपर' ब्रॅंडचे हे बनावट मद्य आंध्र प्रदेशात पाठवले जाणार होते, असे त्या खोक्यांवर लिहिलेल्या माहितीवरून स्पष्ट होत असल्याचे बांदा पोलिसांनी सांगितले.
इन्सुली पोलिस तपासणी नाक्यावर परवा (ता. १८) रात्री थरारक पाठलागानंतर पोलिसांना दारूने भरलेल्या टेम्पोत सुमारे ६ लाख ३८ हजारांचे गोवा बनावटीचे मद्य सापडले होते. टेम्पोच्या मागच्या हौदात खास कप्पे बनवून त्यात "बॅगपाइपर' कंपनीचे लेबल असलेल्या दारूच्या बाटल्यांचे सुमारे १९० खोके ठेवले होते. तपासणी नाक्यावर तपासणीसाठी गाडी थांबविण्याचा प्रयत्न केला असता, पोलिसांना चकवत टेम्पोचालक दिनकर महालिंग पाटील याने गाडी वेगात पळविण्याचा प्रयत्न केला; मात्र पोलिसांनी पाठलाग करून त्याला इन्सुली घाटीत ताब्यात घेतले. यापूर्वी गोव्यातून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात दारूची वाहतूक होत असल्याचे उघड झाले आहेच पण आता मात्र या दारू वाहतूक करणाऱ्या टोळक्याने महाराष्ट्रमार्गे कर्नाटकातही आपले पाय पसरल्याचे या कारवाईतून पुढे आले आहे.

नोकरीसाठी गंडवणारे चौघे पोलिसांच्या ताब्यात

वास्को, दि. २० (प्रतिनिधी): अफगाणिस्तानात काम देण्याचे आश्वासन देऊन अनेकांना लाखो रुपयांना फसवल्याचा प्रकार उघडकीस येताच वेर्णा पोलिसांनी आज चार जणांना अटक करून त्यांच्याकडून ८५ पासपोर्ट जप्त केले. काम देण्याचे आमिष दाखवून प्रत्येकाकडून २२,५०० रुपयांची रक्कम घेण्यात येत असल्याचे उघडकीस यात शंभराहून अधिक लोकांना फसवल्याचा अंदाज वेर्णा पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
वेर्णा पोलिसांनी आज महम्मद रफिक चिगराली (२५, विद्यानगर - यल्लापूर, कर्नाटक), इम्तियाज अहमद काजी (२८, साखवाळ, गोवा), जेरोम फर्नांडिस (४८, मुंबई) व विल्फ्रेड डिसोझा (४८, मुंबई) अशा चौघांना अटक केली असून त्यांच्या कडून ८५ पासपोर्ट जप्त केले आहेत.
वेर्णा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार १८ जानेवारी रोजी मांगोर हिल, वास्को येथे राहणारा रोहन सातार्डेकर व अन्य १० जणांनी आपल्याला फसवल्याची तक्रार नोंद केल्यानंतर या दिशेने तपास सुरू करण्यात आला. नोव्हेंबर महिन्यात पिर्णी, नागोवा येथे "सिल्वर प्लेसमेंट' नावाचे आस्थापन उघडून अफगाणिस्तान येथे चारशे नोकऱ्या असल्याची अफवा पसरवली. यासाठी प्रत्येकाकडून २२,५०० रुपये घेण्यात आले. १ जानेवारी रोजी सर्वांना कामावर नेण्यात येणार असल्याचे आश्वासन मिळाल्याने अनेकांनी त्यांना पैसे दिले. मात्र, आश्वासनाची पूर्ती न झाल्याने लोकांनी सदर कार्यालयात येण्यास सुरुवात केली. १८ जानेवारी रोजी कार्यालयाला टाळे लावण्यात आल्याचे नजरेस आल्यानंतर याबाबत वेर्णा पोलिसांत तक्रार नोंदविण्यात आली.
वेर्णा पोलिसांनी कारवाई करत चौघा संशयितांना अटक केली असून इम्तियाज याचा भाऊ इलियास याचा शोध सुरू असल्याची माहिती उपनिरीक्षक अभिषेक गोम्स यांनी दिली.
अफगाणिस्तान येथे हॉटेल, पेट्रोल पंप आदी २० ठिकाणी काम देण्याचे आश्वासन देऊन फसवल्याबाबत अद्याप ११ जणांनी वेर्णा पोलिसांत तक्रार नोंदवली असून आणखी अनेक लोकांना फसवल्याचा अंदाज वेर्णा पोलिसांनी व्यक्त केला आहे. वेर्णा पोलिसांनी भा.दं.सं. ४२० कलमाखाली प्रकरण नोंद केले आहे.
दरम्यान "सिल्वर प्लेसमेंट'च्या कार्यालयाचे एक टाळे तोडण्यात आले असून आतील कागदपत्रे बाहेर फेकण्यात आली आहे. मात्र, हा प्रकार कोणी केला याबाबत कोणतीच माहिती मिळाली नसल्याचे त्यांनी सांगितले. वेर्णा पोलिस स्थानकाचे निरीक्षक राजन प्रभुदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अभिषेक गोम्स पुढील तपास करीत आहेत.

जॉन फर्नांडिसचा जामीन फेटाळला

मडगाव, दि. २० (प्रतिनिधी) : कोलवा येथील रशियन युवती बलात्कार प्रकरणी सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या जॉन फर्नांडिसने येथील सत्र न्यायालयात आपली जामिनावर सुटका व्हावी म्हणून केलेला अर्ज आज दक्षिण गोव्याचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. व्ही. सावईकर यांनी फेटाळून लावला.
संशयित आरोपीचे कृत्य अत्यंत गंभीर स्वरूपाचे आहे व संशयित ही प्रभावशाली व्यक्ती असल्याने तो साक्षीदारांवर दबाव आणण्याचा, पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करण्याची तसेच जामीन हुकवून पळून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच आपल्या राजकीय प्रभावाने तपासकामात व्यत्यय आणण्याची शक्यता असल्याने त्याचा जामीन अर्ज नामंजूर करण्यात येत असल्याचे न्यायाधीशांनी आपल्या निकालपत्रात म्हटले आहे. आरोपीच्या वतीने ऍड. राजीव गोमीश तर सरकारतर्फे ऍड. भानुदास गावकर यांनी बाजू मांडली.

जयेश नाईकांचे उपोषण मागे अन्यायाविरुद्ध लढण्याचे पर्रीकरांकडून आश्वासन

मडगाव, दि. २० (प्रतिनिधी): गेल्या दोन दिवसांपासून येथील पिंपळकट्ट्यापाशी आमरण उपोषणास बसलेले अवर लेडी ऑफ सुकोर (नागेवा) या शाळेतील शारीरिक शिक्षक जयेश नाईक यांनी विधानसभेतील विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांच्या विनंतीवरून आपले उपोषण आज मागे घेतले. पर्रीकर यांनी त्यांची भेट घेतली. श्री. नाईक यांनी या समस्येचा सामना कायदेशीर मार्गाने करावा; त्यांना याकामी आपणाकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे आश्वासन पर्रीकरांनी दिले.
शाळा व्यवस्थापनाकडून होत असलेल्या छळणुकीविरुद्ध जयेश यांनी हे उपोषण
पिंपळकट्ट्यावर आरंभले होते. आज सकाळी आपला त्यांनी आपला मुक्काम येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हलवला. त्यामुळे सर्वांचेच लक्ष त्याकडे लागले होते.
पर्रीकर यांनी दुपारी मडगावात येऊन जयेश यांची भेट घेतली व त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. सरकारवर अशा प्रकारच्या उपोषणाचा कोणताच परिणाम होणार नाही. त्यामुळे उपोषण अधिक न लांबवता ते मागे घेण्याची विनंती पर्रीकरांना त्यांना केली. या अन्यायाबाबत आपण स्वतः संबंधित खात्याशी संपर्क साधून प्रयत्न करू, असे आश्र्वासन पर्रीकरांनी त्यांना दिले. त्यानुसार जयेश यांनी त्यांच्याच हस्ते लिंबाचा रस घेऊन उपोषण सोडले.
नंतर पत्रकारांशी बोलताना पर्रीकर यांनी, जयेश यांच्याविरोधात पोलिसांतही जातीयवादाचा गुन्हा नोंदला गेलेला नसताना शाळा व्यवस्थापन त्यांच्यावर कारवाई कशी करू शकते, त्यांना हजेरीपटावर सही करण्यापासून प्रतिबंध कसे करू शकते, असे सवाल केले. अशी कोणतीही कारवाई करण्यापूर्वी व्यवस्थापनाला शिक्षण खात्याची परवानगी घेणे बंधनकारक आहे. ही सर्व प्रक्रिया या प्रकरणात डावलण्यात आली आहे.
तसेच जयेश यांची बाजू ऐकून घेण्याचे सौजन्यही दाखवण्यात आले नाही. या बाबी कायद्याच्या निकषावर टिकणार नाहीत, असे पर्रीकर म्हणाले.
गेली आठ वर्षे जयेश हे तेथे शिक्षक आहेत. या काळात त्यांना कोणत्याही कारणास्तव "मेमो' दिलेला नाही. मग आताच त्यांच्यावर निलंबनाची कारवाई का? व्यवस्थापन व शिक्षण खात्याला जी कारवाई करावयाची असेल ती सनदशीर मार्गाने करावी, असा इशारा पर्रीकरांनी दिला.
दरम्यान, जयेश यांचे चाहते व समर्थक यांनी आज नागोवा येथील शाळा व्यवस्थापनाची भेट घेऊन जयेश यांचे निलंबन अन्यायकारक असल्याचा दावा केला आणि ते ताबडतोब मागे घ्यावे, असे निवेदन सादर केले. असेच एक निवेदन त्यांनी दक्षिण गोवा शिक्षण उपसंचालकांची भेट घेऊन त्यांना सादर केले.

दीड लाखांचे चरस हरमल येथून जप्त

पेडणे, दि. २० (प्रतिनिधी): अंमलीपदार्थ तस्करीविरोधात सलग चौथी कारवाई करत पेडणे पोलिसांनी १९ रोजी रात्रौ उशिरा खालचावाडा हरमल येथून एका विदेशी नागरिकाकडून १ किलो ९० ग्रॅम किलो चरस जप्त केले. बाजारात याची दीड लाख रुपये एवढी आहे. पोलिसांनी या संदर्भात फक्री अबित हरमाल (३४) या पॅलेस्टिनच्या नागरिकाला अटक केली आहे.
पेडणे पोलिस निरीक्षक उत्तम राऊत देसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार हरमल खालचावाडा येथील एका देवस्थानच्या परिसरात रात्रौ १ ते ४ वाजण्याच्या सुमारास एक संशयित नागरिक चरस घेऊन येणार असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती. उपनिरीक्षक दत्ताराम राऊत यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी त्या ठिकाणी सापळा रचला. १९ रोजी रात्रौ २.१० वाजता एक विदेशी खांद्यावर बॅग घेऊन आला. पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे बॅगेत १ किलो ९० ग्राम चरस सापडले. पोलिस निरीक्षक उत्तम राऊत देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दत्ताराम राऊत, दीपक कुडव, शांबा राऊळ, जयराम म्हामल, लाडू शेट्ये आदींनी ही कारवाई केली. निरीक्षक उत्तम राऊत देसाई यांनी हे सत्र सुरूच राहणार असल्याचे सांगून नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले.

९६ हजारांचे अंमलीपदार्थ जप्त

म्हापसा, दि. २० (प्रतिनिधी): मधलावाडा येथे ग्राहकाची वाट पाहत असलेल्या युवकाकडून हणजूण पोलिसांनी सुमारे ९६ हजार किमतीचे अंमलीपदार्थ जप्त केले. यात १६ ग्रॅम एमडीएमए. ३.८८ ग्रॅम कोकेन व ०.५ ग्रॅम एमएलडीचा समावेश आहे.
पोलिसांना हणजूण येथील एका शॅकजवळ अजय पाटील नामक युवक ग्राहकाची वाट पाहत असल्याचा सुगावा लागल्यानंतर त्यांनी त्याची झडती घेतली. यावेळी त्याच्याजवळ अंमलीपदार्थ आढळले. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंद केला असून त्याला सात दिवसांच्या रिमांडवर घेण्यात आले आहे.

प्राध्यापकाची आत्महत्या

पणजी, दि. २० (प्रतिनिधी): आल्तिनो येथील एका नामवंत महाविद्यालयाचे प्राध्यापक गौरीश रामा पेडणेकर (२८) हे पणजीतील कार्दोज या इमारतीच्या एका खोलीत गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आले. त्याच खोलीत मयत पेडणेकर यांचे हस्ताक्षर असलेली एक चिठ्ठी मिळाली असून त्यांनी आत्महत्या केली असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. पंचनामा करून सदर मृतदेह शवचिकित्सेसाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात पाठवण्यात आला. सायंकाळी मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. अनैसर्गिक मृत्यू म्हणून पोलिसांनी नोंद केली असून सायंकाळी या महाविद्यालयाच्या काही प्राध्यापकांची जबानीही पोलिसांनी नोंद करून घेतली आहे. या आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसेल तरी, प्राध्यापकाच्या आत्महत्येमुळे मात्र महाविद्यालयात खळबळ माजली आहे.
अधिक माहितीनुसार, मयत पेडणेकर हे म्हापसा येथील डांगी कॉलनीत राहत असून आल्तिनो येथील महाविद्यालयात गणित हा विषय शिकवते होते. तर, कार्दोज इमारतीत सीईटी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना खाजगी शिकवणीही देत होते. काल रात्री ते अन्य एक प्राध्यापक मित्रासोबत रेस्टॉरंटमध्ये जेवण करून ९.४५ वाजता घरी जाण्यासाठी निघाले. परंतु, पेडणेकर हे घरी न जाता खाजगी शिकवणी देणाऱ्या खोलीवर आले. रात्री घरी पोचले नसल्याने पणजी पोलिसांना माहिती देण्यात आली होती. त्यानुसार पोलिसांनी त्यांच्या मोबाईलवरून ते कार्दोज इमारतीच्या खोलीत असल्याचे शोधून काढले. यावेळी खोलीचा दरवाजा उघडून प्रवेश केला असता त्यांनी नायलॉन दोरीच्या साहाय्याने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. तसेच त्याठिकाणी एक चिठ्ठीही आढळून आली. त्यात ""आपण ज्याच्यावर विश्वास ठेवला त्यांनी आपली तोंडे का फिरवली. मी एवढा वाईट नाही. माझ्या मृत्यूला कोणीही कारणीभूत नाही '' अशी वाक्ये लिहल्याची माहिती मिळाली आहे. तसेच, दोघा व्यक्तींचे पैसे देणे असल्याने त्यांच्या नावाचे धनादेशही ठेवण्यात आले आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली. याविषयीचा अधिक तपास पणजी पोलिस स्थानकाचे उपनिरीक्षक योगेश पेडणेकर करीत आहेत.

पाच वाहतूक पोलिस अधिकारी निलंबित

पणजी, दि. २० (प्रतिनिधी)ः लोटली वेर्णा येथे वाहने अडवून कोणतेही "चलन' न देता पैसे घेताना दक्षता खात्याने छापा टाकून कारवाई केलेल्या "त्या' पाचही वाहतूक पोलिसांना आज सायंकाळी सेवेतून निलंबित करण्यात आले. वाहतूक खात्याचे अधीक्षक अरविंद गावस यांनी उशिरा रात्री काढलेल्या आदेशानुसार साहाय्यक पोलिस उपनिरीक्षक शांबा देसाई, तुकाराम नार्वेकर, संजीव कुमार व संदीप कुन्हाळकर यांच्यासह अन्य एकाला निलंबित करण्यात आले आहे.
सप्टेंबर ०९ मध्ये हा छापा टाकण्यात आला होता. त्यानंतर त्याचा अहवाल आज सादर केल्याने ही कारवाई करण्यात आली. त्याचप्रमाणे त्या पाचही पोलिसांच्या विरोधात खात्याअंतर्गत चौकशी सुरू करण्याचेही आदेश पोलिस महासंचालकांनी दिले असल्याची माहिती श्री. गावस यांनी दिली.
सप्टेंबर ०९ मध्ये लोटली येथे इंटरसेप्टरद्वारे वाहने अडवून कारवाई करणाऱ्या वाहतूक पोलिस पथकावर दक्षता खात्याने छापा टाकला होता. यावेळी पोलिस कोणतेही चलन न देता वाहनचालकाकडून पैसे आकारत असल्याचे आढळून आले होते. तसेच, त्या पोलिसांची झडती घेतली असता त्यांच्याकडे अतिरिक्त पैसे आढळून आले होते. तसेच, झाडा झुडपात फेकून दिलेले काही पैसे दक्षता खात्याच्या अधिकाऱ्यांना सापडले होते. त्यानंतर याची त्वरित माहिती पोलिस खात्याला देण्यात आली होती. परंतु, त्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नव्हती. तसेच, याचा अहवाल सादर करण्याची सूचना दक्षता खात्याला करण्यात आली होती. त्यानुसार आज सदर अहवाल वाहतूक पोलिस विभागाला सादर केल्याने त्यात दोषी ठरवण्यात आलेल्या पोलिसांना निलंबित करण्यात आले.

Wednesday, 20 January, 2010

विद्यापीठ बनले राजकीय आखाडा!

राहुलनी आळवला 'राग' कॉंग्रेसचा
पणजी, दि. १९ (प्रतिनिधी): देशात कॉंग्रेसला पराजित करण्याची ताकद कोणत्याही पक्षात नाही. समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष किंवा भाजप कॉंग्रेसला पराजित करू शकत नाही तर केवळ कॉंग्रेस पक्षच कॉंग्रेसला पराजित करतो. ही परिस्थितीच बदलणे हेच खरे कॉंग्रेससमोरील मोठे आव्हान आहे, असे सांगत कॉंग्रेसचे महासचिव तथा युवा नेते राहुल गांधी यांनी आपल्या तथाकथित अराजकीय भेटीतही गोवा विद्यापीठाला थेट राजकीय व्यासपीठ बनवले. या थेट राजकीय भाषणामुळे राहुल गांधी यांची ही भेट बिगर राजकीय असल्याचे सांगत असलेल्या गोवा विद्यापीठाची मात्र पुरती फजिती झाली. कॉंग्रेस हा गोरगरिबांचा पक्ष आहे व त्यामुळे जास्तीत जास्त गरिबांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करा व कॉंग्रेसची विचारधारा लोकांपर्यंत पोचवा, असे आवेशपूर्ण आवाहनही त्यांनी यावेळी केले. परिणामी गोवा विद्यापीठ आता एका गंभीर राजकीय वादात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
राहुल गांधी यांची गोवा भेट ही निव्वळ गोंधळ व सुरक्षेवर करण्यात आलेल्या लाखो रुपयांचा चुराडाच ठरली. नियोजनातील बट्याबोळ व त्यात कॉंग्रेसप्रणीत "एनएसयुआय' या विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकीचा अजेंडा, यामुळे गोवा विद्यापीठ संकुलाचा वापर कॉंग्रेसकडून थेट राजकीय कारणासाठी करण्यात आला. शिक्षणाचे पवित्र स्थान म्हणून पाहिले जात असलेल्या गोवा विद्यापीठाला आज कॉंग्रेसच्या छावणीचेच स्वरूप प्राप्त झाले होते.
देशात प्रत्येक ठिकाणी भेट देऊन कोणत्या ना कोणत्या वादात सापडण्याची सवय जडलेल्या राहुल गांधी यांची गोवा भेटही वादग्रस्त ठरली आहे. कॉंग्रेसप्रणीत "एनएसयुआय' या विद्यार्थी संघटनेची निवड मतदानाद्वारे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे व त्यानिमित्ताने गोव्यात सध्या ही प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यानिमित्ताने राहुल गांधी यांनी गोवा विद्यापीठ तथा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याचा हा कार्यक्रम आयोजित केला होता. सुरुवातीला विद्यापीठातर्फे सर्व महाविद्यालयांना त्यासंबंधीचे अधिकृत पत्र पाठवून विद्यार्थ्यांना पाठवण्याचे आदेश जारी करण्यात आले होते; पण भाजप विद्यार्थी विभागाने आक्षेप घेत व विद्यापीठाचा वापर राजकीय हेतूसाठी करण्यास बंदी असल्याचे लक्षात आणून दिल्यावर हे परिपत्रकही मागे घेण्यात आले.
आज सुमारे दीड हजार विद्यार्थ्यांना या कार्यक्रमासाठी प्रवेश देण्यात आला. विद्यापीठाने पाठवलेल्या परिपत्रकानुसार राज्यातील सर्व महाविद्यालयांनी आपल्या विद्यार्थ्यांना खास बसेस करून इथे आणले होते पण त्यांना प्रवेश नाकारण्यात आल्याने त्यांना परत फिरावे लागले. या एकूण प्रकाराबद्दल शिक्षक तथा विद्यार्थ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. आमंत्रण देऊन अपमान करण्याचाच हा प्रकार असल्याचे या ठिकाणी संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी सांगितले. सुमारे तीस ते चाळीस बसेस राज्यभरातून आणण्यात आल्या होत्या व त्यामुळे दोन ते अडीच हजार विद्यार्थी हात हालवत परत गेले. विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याच्या या कार्यक्रमाला पत्रकारांनाही पूर्णपणे मज्जाव करण्यात आला. या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या काही विद्यार्थ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या संवादात्मक कार्यक्रमांत विद्यार्थ्यांनी राज्यातील कॉंग्रेस सरकारच्या बेशिस्त व बेफिकीरपणाचा पाढाच वाचल्याची माहिती मिळाली आहे. गुन्हे दाखल झालेले सरकारात मंत्री कसे काय, असा सवालही करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. या एका तासाच्या कार्यक्रमानंतर राहुल गांधी विद्यापीठ परिषदगृहात आले व तिथे त्यांनी प्रदेश युवा कॉंग्रेस कार्यकर्त्यांना निव्वळ पाच ते दहा मिनिटे मार्गदर्शन केले. तिथेही पत्रकारांना प्रवेश नाकारण्यात आला. तदनंतर पुन्हा विद्यापीठ मैदानावर प्रदेश कॉंग्रेस व युवा कॉंग्रेससाठी जाहीर कार्यक्रम ठेवण्यात आला व तिथेही पत्रकारांना प्रवेश दिला नाही.
--------------------------------------------------------------------
'एनएसयुआय' चे काम पाहण्यासाठीच आलो
गोवा विद्यापीठाकडून एकीकडे राहुल गांधी यांची भेट राजकीय नसल्याचे भासवण्याचा प्रयत्न सुरू होता पण आज खुद्द राहुल गांधी यांनी पत्रकारांशी केवळ एक मिनिटाचा संवाद साधून आपली भेट ही राजकीय हेतुपुरस्सर असल्याचे स्वतःच स्पष्ट केले. कॉंग्रेसप्रणीत "एनएसयुआय' संघटनेची मतदानाद्वारे निवड करण्याची पद्धत पहिल्यांदाच अवलंबण्यात आली आहे. गोव्यात निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे व त्याची पाहणी करण्यासाठीच आपण आलो होतो, असे सांगून त्यांनी तेथून काढता पाय घेतला.
--------------------------------------------------------------------
पणजी तंत्रनिकेतनचे राहुल प्रेम प्राचार्यांच्या उत्साहाला उधाण!
पणजी तंत्रनिकेतनचे प्राचार्य एल. आर. फर्नांडिस यांनी काल १८ रोजी आपल्या विद्यार्थ्यांना नोटीस जारी करून गोवा विद्यापीठात राहुल गांधी यांच्या संवादात्मक कार्यक्रमाला भेट देण्याचा आदेशच जारी केला. या कार्यक्रमासाठी खास चार बसेसची सोय करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. विद्यार्थ्यांनी आपली ओळखपत्रे सोबत न्यावी, असे आवाहन करून हा कार्यक्रम पूर्णपणे अराजकीय आहे व राहुल गांधी हे शिक्षण व रोजगार या विषयांवर संवाद साधणार आहेत, असा निर्वाळाही सदर प्राचार्यांनी देऊन टाकला. प्रत्यक्षात या बसेस तिथे दिसल्या नाहीत पण विद्यार्थ्यांच्या ओळखपत्राला त्याठिकाणी अजिबात किंमत नव्हती तर युवा कॉंग्रेसकडून काही ठरावीक विद्यार्थ्यांना "एनएसयुआय'चा पास व अर्ज दिला होता. त्या आधारावरच विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला. प्राचार्यांनी हा आदेश कोणत्या आधारावर जारी केला हे माहीत नाही, असे स्पष्टीकरण तांत्रिक शिक्षण संचालनालयाकडून देण्यात आले.

२.३० लाखांचे अंमली पदार्थ जप्त

एकास अटक
पणजी, दि. १९ (प्रतिनिधी): अमली पदार्थाच्या तस्करीत गुंतलेल्यांना गजाआड करण्याचा चंग अमली पदार्थ विरोधी पथकाने बांधलेला असून आज एका व्यक्तीला २.३० लाख किमतीच्या अमली पदार्थांसह ताब्यात घेण्यात आले. मात्र, आजही कळंगुट, बागा आणि हणजूण याठिकाणी असलेले पब व काही डिस्को बारमध्ये खुलेआम अमली पदार्थाची विक्री व केले जात असून अशा रेस्टॉरंटची माहिती पोलिसांना मिळाली तरी त्याकडे कानाडोळा केला जात आहे, अशी खात्रीलायक माहिती मिळाली आहे. गेल्या काही दिवसांत अनेक ठिकाणी छापा टाकून पोलिसांनी काहींना अटक केली आहे. परंतु, अमली पदार्थाची विक्री किंवा सेवन होत असलेल्या या पबमध्ये छापा टाकण्याचे धाडस या पथकाने अद्याप केलेले नाही.
दरम्यान, काल रात्री सातार्डे पुलाजवळ अमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आलेल्या महेश रामचंद्र भिंड (२७, रा. उत्तर प्रदेश) या तरुणाला अटक केली आहे. त्याच्याकडून २ किलो चरस तसेच ३ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. काल रात्री हा छापा टाकण्यात आला, अशी माहिती या पथकाचे निरीक्षक राजन निगळे यांनी दिली.
अधिक माहितीनुसार संशयित आरोपी महेश हा सातार्डे येथे रेती काढण्याचे काम करीत होता. तसेच उत्तर प्रदेश येथून अमली पदार्थ आणून येथे त्याची विक्रीही करीत होता. याची माहिती अमली पदार्थ विरोधा पथकाला मिळाली होती. त्यानुसार त्याला ताब्यात घेण्यासाठी काल रात्री सापळा रचण्यात आला होता. आज दुपारी त्याला "एनडीपीएस' न्यायालयात हजर करून पाच दिवसांची कोठडी मिळवण्यात आली आहे.

शिरसई कोमुनिदादप्रकरणी त्या तिघांना अटक करणार

गोवा पोलिसांची खंडपीठात माहिती
पणजी, दि. १९ (प्रतिनिधी): शिरसई कोमुनिदादमध्ये झालेल्या गैरप्रकारावरून आग्नेल डिसोझा, निशीकेत परब आणि पांडुरंग परब या तिघांविरुद्ध पुन्हा गुन्हा नोंद करून त्यांना अटक केली जाणार आहे. तसेच, त्यांची मालमत्ता जप्त करून त्यांची बॅंक खातीही गोठवली जाणार असल्याची माहिती आज गोवा पोलिसांनी प्रतिज्ञापत्रासह मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाला दिली. मात्र, या पुढे या तपासात पोलिसांकडून हलगर्जीपणा झाल्यास हे प्रकरण केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभागाकडे सोपवले जाईल, अशी थेट तंबीही आज गोवा खंडपीठाने दिली. यापूर्वी या तिन्ही व्यक्तींविरुद्ध गुन्हा नोंद करून घेताना आणि तपासात हलगर्जीपणा केल्याने या प्रकरणाचे म्हापसा पोलिस स्थानकाचे उपनिरीक्षक उदय गावडे यांच्याविरुद्ध खात्याअंतर्गत कारवाईही केली असल्याची माहिती उत्तर गोवा पोलिस अधीक्षक बॉस्को जॉर्ज यांनी खंडपीठाला दिली. त्यामुळे या पुढील तपास म्हापसा उपविभागीय पोलिस उपअधीक्षक सेमी तावारीस करणार असल्याचे त्यांनी प्रतिज्ञापत्राद्वारे न्यायालयाला कळवले आहे. यावेळी तिन्ही पोलिस अधिकारी न्यायालयात प्रत्यक्ष हजर होते.
शिरसई कोमुनिदादमध्ये केलेल्या आर्थिक घोटाळ्यातील संशयितांची योग्य पद्धतीने चौकशी करण्यात आलेली नाही. तसेच, त्याची बॅंक खातीही गोठवण्यात आलेली नाही. तक्रार करताना त्यांना लावण्यात येणारे कलम नमूद केले होते, ते पोलिसांनी लावले नाही. त्यामुळे त्यांना जामीन प्राप्त झाला. तसेच पोलिसांनी त्यांच्या जामीन अर्जालाही विरोध केला नाही, अशी माहिती याचिकादाराने खंडपीठाला दिली होती. त्याची दखल घेऊन न्यायालयाने पोलिस खात्याकडून या प्रकरणाचा संपूर्ण अहवाल मागितला होता. या अहवालात पोलिसांनी आता तक्रार दाराने दिलेले कलम लावले जाणार असल्याची माहिती दिली आहे.
वरील तिघा व्यक्तींनी सुमारे ५१४ कोमुनिदादचे भूखंड विकले अजून करोडो रुपयांचा घोटाळा केला असल्याचे आरोप करून याचिका दाखल करण्यात आली होती. या ५१४ भूखंडांपैकी कोमुनिदादच्या कार्यालयात केवळ १५ भूखंडाची माहिती उपलब्ध आहे. तर, ८ जणांनी आपले भूखंड नावावर करण्यासाठी अर्ज केले आहेत, अशी माहिती याचिकादाराने खंडपीठाला दिली.

केरी सत्तरीत चालतोय खास झोपडीत जुगार

पणजी, दि. १९ (प्रतिनिधी): राज्यात सर्रासपणे सुरू असलेल्या जुगाराची प्रकरणे "गोवादूत'ने उजेडात आणली असून केरी सत्तरी येथे खास बनवण्यात आलेल्या एका झोपडीत दिवसाढवळ्या जुगार चालत असल्याची माहिती एका महिलेकडून मिळाली आहे.
दोन माड बसस्थानकाजवळ एका देवस्थानकडे जाणाऱ्या रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेल्या केळी व उसाच्या मळ्यात खास बनवण्यात आलेल्या या झोपडीत दिवसरात्र जुगार चालत असतो. या ठिकाणी बरेच जण दुचाकी घेऊन येत असतात व यातील बहुतेक सरकारी कर्मचारी असल्याची माहिती मिळाली आहे. या दुचाक्या दिवसभर रस्त्याच्या बाजूला उभ्या केल्या जातात. झोपडीचा मालक जुगाऱ्यांकडून भाडे वसूल करतो व मोठ्या प्रमाणात कमाई करतो, अशी माहिती मिळाली आहे.
केरी परिसरात अनेक महिला मंडळे असून एकही महिला मंडळ या जुगाराविरुद्ध आवाज उठवत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. बहुतांश महिला मंडळे राजकारण्यांच्या जोरावर चालतात, त्यामुळे कोणीच आवाज उठवत नसल्याचे बोलले जात आहे. या ठिकाणी विद्यार्थ्यांचा वावर असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दरम्यान, या विषयी माहिती देताना एका महिलेने सांगितले की, केरीत दारूची अनेक दुकाने आहेत. काही ठिकाणी घरातूनही दारूची विक्री होत असते. दारू पिऊन जुगार खेळत बसणारे अनेक जण या भागात आहेत. सदर ठिकाणी गुटका व सिगरेटचा बाजार होतो. अनेक महिलांचे पती सोन्याचांदीचे दागिने व हंगामात काजूचे पैसे घेऊन जुगार खेळण्यासाठी जातात व घरी येऊन दंगामस्ती, शिवीगाळ करतात, अशी माहिती या महिलेकडून प्राप्त झाली.
केरी परिसरातील पोलिस यंत्रणाही कमकुवत बनल्याची प्रतिक्रिया येथून ऐकायला मिळत आहे. कारवाई केल्यास बदली होण्याच्या भीतीने पोलिस कचरत असल्याचे बोलले जात आहे. इतकेच नव्हे तर दुसऱ्या ठिकाणी कार्यरत असलेले पोलिस खात्यातील कर्मचारी या ठिकाणी जुगार खेळण्यासाठी येत असल्याचे आढळून येते.
सत्तरीच्या विकासासाठी कार्यरत असलेल्यांनी कशाचीही तमा न बाळगता चाललेला हा जुगार बंद पाडण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी येथून होत आहे.

शेल्डे सरकारी शाळेत तुळई कोसळली

सुदैवाने विद्यार्थी बचावले
सावर्डे, दि. १९ (प्रतिनिधी): शेल्डे सरकारी विद्यालयात इयत्ता आठवीचे वर्ग सुरू असलेल्या खोलीच्या छपराची तुळई (पाटी )आज सकाळी कोसळली. या घटनेतून वर्गात बसलेले सर्व २५ विद्यार्थी सुखरूप बचावले असले तरी त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
या बाबत मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार शेल्डे येथील सरकारी विद्यालयात चाचणी परीक्षा सुरू होती. इयत्ता आठवीच्या वर्गात एकूण २५ विद्यार्थी परीक्षा देत असता १० वाजण्याच्या सुमारास सदर वर्गाच्या छपराची तुळई खाली कोसळली. यावेळी विद्यार्थ्यांची एकच धावपळ उडाली. या अपघातात कोणत्याच विद्यार्थ्याला इजा झाली नसल्याची माहिती शाळेचे मुख्याध्यापक शंकर देसाई यांनी दिली. गेल्या चोवीस वर्षांपासून सदर विद्यालय सुरू असून शंकर देसाई गेली चार वर्षे मुख्याध्यापक म्हणून काम पाहत आहेत. शाळेच्या दुरुस्तीसाठी आपण शिक्षण खात्याकडे तक्रार केली होती, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
शेल्डेचे सरपंच सिद्धार्थ देसाई यांनी या घटनेची माहिती मिळाल्यानंतर विद्यालयाची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली.

सिद्धेश्वर मंदिरातून ८० हजार लांबवले

म्हापसा, दि. १९ (प्रतिनिधी): शापोरा कायसूव येथील श्री सिद्धेश्वर देवस्थानचे लोखंडी दार तोडून चोरट्यांनी मूर्तीवरील चांदीचा मुकुट व फंडपेटीतील रोकड मिळून सुमारे ८० हजारांचा ऐवज लंपास केला. या संदर्भात हणजूण पोलिसांत तक्रार नोंदवण्यात आली आहे.
चोरट्यांनी लोखंडी दरवाजा "घणा'चे वार करून तोडल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. श्री सिद्धेश्वर देवाच्या मूर्तीवरील सुमारे तीस हजारांचा मुकुट व फंडपेटीतील सुमारे ५० हजार रुपयांची रक्कम (चिल्लर वगळून) लांबवली. श्री सिद्धेश्वर देवस्थानच्या वास्तूचे काम सुरू असून देवळाच्या परिसरातच सदर कामगार झोपतात. यामुळे या मंदिरात चोरी होण्याची शक्यता कमी असल्याचे बोलले जात आहे. पोलिसांनी या ठिकाणी काम करणाऱ्या आठ कामगारांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असून निरीक्षक मंजुनाथ देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

'सीआरझेड'अंतर्गत दोन बांधकामे पाडली

म्हापसा, दि. १९ (प्रतिनिधी): सीआरझेड अंतर्गत येणारी बागा कळंगुट येथील बेकायदा बांधकामे पाडण्यासाठी गेलेल्या पथकाला बहुतेक बांधकाम मालकांनी न्यायालयाकडून मिळवलेली स्थगितीची कागदपत्रे दाखवल्याने त्यांना केवळ दोन बांधकामांवर कारवाई करून परतावे लागले.
हणजूण परिसरात २२६ बेकायदा बांधकामे असून यातील ५२ बांधकामे सीआरझेड अंतर्गत येत असल्याने ती पाडण्यासंबंधी नोटीस जारी करण्यात आली होती. या नोटिशीनुसार संबंधित अधिकारी पोलिस फौजफाट्यासह दाखल झाले असता संबंधित मालकांनी त्यांना न्यायालयाकडून मिळवण्यात आलेली स्थगितीची कागदपत्रे दाखवली. यामुळे संबंधितांना केवळ दोनच बांधकामांवर कारवाई करून परतावे लागले.
आज सकाळी ११ वाजता उपजिल्हाधिकारी दशरथ रेडकर, गटविकास अधिकारी शिवप्रकाश नाईक, मामलेदार शिवप्रसाद शंखवाळकर, सरपंच संदीप चिमुलकर, सचिव गोवेकर, निरीक्षक मंजुनाथ देसाई फौजफाट्यासह उपस्थित होते.

डिचोलीत २६ पासून खनिजवाहतूक रोखणार

डिचोली, दि. १९ (प्रतिनिधी): डिचोलीत चालणारी खनिज वाहतूक येत्या पाच दिवसांत बंद न केल्यास त्यानंतर स्थानिक जनताच ती बंद पाडेल,असे निवेदन २१ रोजी उपजिल्हाधिकाऱ्यांना देण्याचा निर्णय आज पालिका सभागृहात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. यावेळी आमदार राजेश पाटणेकर यांच्या नेतृत्त्वाखाली समिती स्थापन करण्यात आली.२६ जानेवारीपासून खनिज वाहतूक अडविण्याचे आंदोलन सुरू होईल,असे सांगण्यात आले.
गोवा व महाराष्ट्राच्या काही भागांतून खनिज दोडामार्ग, मुळगाव, डिचोली, साखळीमार्गे वागूस-कोठंबी येथे नेला जातो. यामुळे हजारो ट्रक या भागातून येजा करीत असतात. ही वाहतूक कायमचीच बंद करण्यासाठी आजच्या बैठकीत विचारविनिमय करण्यात आला.
आजच्या बैठकीला आमदार राजेश पाटणेकर, नगराध्यक्ष सतीश गावकर, नगरसेवक मनोहर शिरोडकर, कमलाकर तेली,अजीत बिर्जे, जयेंद्रनाथ गोवेकर, मुळगाव-नानोडा येथील पंचसदस्य तसेच मोठ्या संख्येने नागरिक हजर होते.श्री. पाटणेकर, गावकर त्याचप्रमाणे राजन कडकडे आदींनी यावेळी आपले विचार व्यक्त केले. लोकप्रतिनिधींसमवेत प्रसंगी तुरूंगातही जाण्याचा निर्धार यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला. सर्व नगरसेवक, रियाझ बेग, सागर फळारी, महादेव घाडी, दत्ता घाडी, विश्वास गावकर, प्रकाश वझरकर, रमेश कळंगुटकर, अच्च्युत गावस, विशाल गाड, विशाल राऊत, अरुण नाईक, भालचंद्र नार्वेकर, गोकुळदास हरमलकर, आनंद नार्वेकर, रामनाथ देसाई, राजन कडकडे, रमेश शिरगावकर, प्रमोद सावईकर, विकास गावकर, सदाशिव वालावलकर, सुरेश नेवगी, राजेश गावडे यांचा समावेश असलेली समिती यावेळी निवडण्यात आली.

दुर्भाट अपघातात स्कूटरस्वार ठार

फोंडा, दि.१९ (प्रतिनिधी): कासवाडा दुर्भाट येथे आज संध्याकाळी ४.३० च्या सुमारास दोन ऍक्टीव्हा स्कूटर आणि रिक्षा या तीन वाहनात झालेल्या एका अपघातात एक ठार तर एक जण जखमी झाला आहे.
नरहरी शेट (५९ वर्षे) असे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या ऍक्टीव्हा स्कूटर चालकाचे नाव आहे. तर दुसरा ऍक्टीव्हा स्कूटर चालक दिगंबर गोपी नाईक हा जखमी झाला आहे. यासंबंधी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कासवाडा तळावली येथील मुख्य रस्त्यावर रिक्षा उभी करून ठेवली होती. तर दोन्ही स्कूटर चालक वाहन घेऊन आपल्या नियोजित स्थळी जात असताना रिक्षाच्या जवळ त्यांना अपघात झाला. यात नरहरी शेट हे गंभीर जखमी झाल्याने त्यांचे निधन झाले. या अपघाताची माहिती मिळताच फोंडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. निरीक्षक सी. एल. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक लक्षी आमोणकर तपास करीत आहेत.

Tuesday, 19 January, 2010

राहुल गांधींची पहिलीच भेट वादाच्या भोवऱ्यात

भाजयुमोच्या घेरावानंतर विद्यापीठाचे परिपत्रक मागे
पणजी, दि. १८ (प्रतिनिधी): कॉंग्रेस पक्षाचे युवा नेते आणि सरचिटणीस राहुल गांधी यांचा गोवा विद्यापीठात आयोजित करण्यात आलेला कार्यक्रम वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. कॉंग्रेस पक्षाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना सहभागी होण्यासाठी विद्यापीठाच्या कुलसचिवाने लेखी आदेश काढल्याने आज भारतीय जनता पक्षाच्या विद्यार्थी विभागाने घेराव घालून सदर आदेश मागे घेण्यास भाग पाडले. यावेळी चुकीने व घाईगडबडीत हा आदेश काढल्याचे कुलसचिव डॉ. मोहन सांगोडकर यांनी मान्य करीत सदर आदेश मागे घेतला. दरम्यान, उद्या गोवा विद्यापीठाच्या फुटबॉल मैदानावर होणाऱ्या या राजकीय कार्यक्रमाला कॉंग्रेस पक्षाचा एकही फलक दिसता कामा नये, असा इशारा भाजपच्या विद्यार्थी विभागाने दिला आहे.
आज दुपारी भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष रुपेश महात्मे यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. सांगोडकर यांना घेराव घालण्यात आला. विद्यापीठाच्या आवारात कोणताही राजकीय कार्यक्रम करण्यास विद्यापीठाच्या संविधानात मज्जाव असताना विद्यापीठाने राहुल गांधी यांच्या कार्यक्रमासाठी कोणत्या आधारावर परवानगी दिली, असा थेट प्रश्न करून डॉ. सांगोडकर यांना भांबावून सोडले. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी विद्यार्थ्यांना सूचना करणारे हे परिपत्रक डॉ. सांगोडकर यांनी कोणाच्या आदेशावरून काढले होते, हा प्रश्न मात्र अद्याप अनुत्तरित राहिला आहे.
या वादग्रस्त परिपत्रकात विद्यापीठातील सर्व पदव्युत्तर विभागाच्या विद्यार्थ्यांना तसेच संबंधित महाविद्यालयातील विद्यालयांना राहुल गांधी यांच्या सभेत उपस्थित राहून त्यांच्याशी संवाद साधण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र भाजपच्या विद्यार्थी गटाने कुलसचिवांच्या कार्यालयाला घेराव घातल्याने सदर परिपत्रक चार तासांच्या आत मागे घेण्यात आले. या सभेदरम्यान गोवा विद्यापीठाच्या आवारात राजकीय झेंड्यांनाही मज्जाव करण्यात आल्याचे कुलसचिव डॉ. सांगोडकर यांनी यावेळी पत्रकारांना सांगितले. गोवा विद्यापीठाद्वारे राहुल गांधी यांच्या जाहीर सभेसाठी आवारात जागा उपलब्ध करून देण्यावरच मुळात वाद निर्माण झाला आहे. कारण भाजपच्या विद्यार्थी गटाने हा प्रकार म्हणजे कॉंग्रेसद्वारे गोवा विद्यापीठाचा वापर राजकीय स्वार्थासाठी करण्याप्रमाणे असल्याचे म्हटले आहे. विद्यापीठासारखे ठिकाण राजकारणापासून अलिप्त असायला हवे. या ठिकाणी कुठल्याही राजकीय पक्षाच्या नेत्याने विद्यार्थ्यांना संबोधणे उचित नसल्याचे भाजप विद्यार्थी गटाने स्पष्ट केले आहे. कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे पुत्र राहुल गांधी सध्या भारत दौऱ्यावर असून, खास करून देशातील युवावर्गाचे विचार समजून घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्याच अनुषंगाने त्यांची ही गोवा भेट असून, गोवा विद्यापीठाच्या फुटबॉल मैदानावर ते विद्यार्थ्यांशी संवाद साधतील. हा एका तासाचा कार्यक्रम असून, त्यानंतर ते गोवा प्रदेश कॉंग्रेस समिती आणि युवा कॉंग्रेसच्या सदस्यांशी संवाद साधणार आहेत.

मराठी शाळा बंद पाडण्याचा विचार नाही!

सरकारचे न्यायालयात स्पष्टीकरण
पणजी, दि. १८ (प्रतिनिधी): अपुऱ्या संख्येमुळे राज्यातील १७२ सरकारी मराठी शाळा बंद करण्याचा सरकारचा अद्याप तरी विचार नाही, अशी ग्वाही आज सरकारने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाला दिल्याने याविषयी सादर करण्यात आलेली जनहित याचिका निकालात काढण्यात आली. परंतु, येणाऱ्या काळात सरकारने या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतल्यास त्याला विरोध करण्यासाठी न्यायालयात दाद मागण्याची संपूर्ण मोकळीक याचिकादाराला देण्यात आली आहे.
राज्यातील सुमारे १७२ मराठी शाळा बंद करण्याचा निर्णय सरकार घेत असल्याने त्याच्या विरोधात दाद मागण्यासाठी पेडणे येथील उदय मांद्रेकर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात याचिका सादर केली आहे. सदर याचिका आज सुनावणीसाठी आली असता सरकारने आपली बाजू स्पष्ट केली.
दि. २२ जुलै २००९ रोजी एका वर्तमानपत्रात १५ पेक्षा कमी विद्यार्थी असलेल्या राज्यातील सुमारे १७२ शाळा बंद करण्यात येणार असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्याची नोंद घेऊन श्री. मांद्रेकर यांनी ही याचिका दाखल केली होती. आज त्यांनी स्वतः न्यायालयात उभे राहून आपली बाजू मांडली. राज्यातील १७२ शाळा बंद करण्याचा निर्णय सरकार घेत आहे. तसे वृत्त एका दैनिकात प्रसिद्ध झाले आहे, अशी माहिती न्यायालयाला देताच कुठे आहे ते वर्तमानपत्र, असा प्रश्न न्यायाधीशांनी करून स्वतः ते वृत्त वाचले. यावेळी त्यांनी सरकार पक्षाला आपली बाजू मांडण्यास सांगितले असता, सरकारने अद्याप असा कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही, असे यावेळी सांगण्यात आले. प्रत्येकाला शिक्षण उपलब्ध करून देणे ही सरकारची प्राथमिक जबाबदारी असल्याचे न्यायालयाने यावेळी सुनावले.
वय वर्षे ६ ते १४ पर्यंत मुलांना कोणतेही शुल्क न आकारता शिक्षण देणे हे सरकारचे कर्तव्य आहे. सरकारने या १७२ शाळा बंद केल्यास येथील विद्यार्थ्यांना ४ ते ५ किमी पायपीट करून दुसऱ्या शाळेत जावे लागणार आहे. बहुतांश प्राथमिक विद्यालये गावात असून तेथे योग्य वाहतूकही नाही. त्यामुळे ६ ते १० वयोगटातील या विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे अनेक विद्यार्थ्यांना शाळा सोडणे भाग पाडणार असल्याचे याचिकादाराने आपल्या याचिकेत म्हटले आहे.

तेरेखोलम किनाऱ्यावरील तीन बांधकामे पाडली

पेडणे, दि. १८ (प्रतिनिधी): केरी तेरेखोल समुद्रकिनारी भागातील सागरी नियमन कायद्याचे (सीआरझेड) उल्लंघन केलेल्या एकूण ५ बांधकामांपैकी तीन बांधकामे आज (१८ रोजी) पाडण्यात आली तर दोन बांधकामावर कारवाईस संबंधित बांधकाम मालकांनी स्थगिती मिळवली.
येथील एकूण पाच बांधकामांपैकी प्रेमानंद भिकाजी तळकर (एक खोली व एक सेफ्टी टॅंक) तसेच सच्चित सद्गुरू तळकर यांची एक खोली सीआरझेड कायद्यानुसार पाडण्यात आली. भालचंद्र तळकर यांनी आपल्या दोन खोल्यांच्या बांधकामांना अतिरिक्त संचालकांकडून स्थगिती मिळवली.
ही कारवाई पेडण्याचे मामलेदार भूषण सावईकर यांच्या उपस्थितीत करण्यात आली. यावेळी गटविकास कार्यालयाचे अधिकारी विकास देसाई, केरी-तेरेखोलचे उपसरपंच तातोबा तळकर, पंचायत सचिव रमेश मांद्रेकर तसेच पोलिस उपनिरीक्षक दत्ताराम राऊत पोलिस फौजफाट्यासह उपस्थित होते.

पेडण्यात दोघांकडून ५० ग्रॅम चरस जप्त

पेडणे, दि. १८ (प्रतिनिधी): राज्यात अंमली पदार्थांचा अजिबात वापर होत नसल्याचे गृहमंत्र्यांचे वक्तव्य पुन्हा एकदा खोटे ठरवत पेडणे पोलिसांनी १७ रोजी उशिरा रात्री छापा टाकून दोघा विदेशी नागरिकांकडून सुमारे ५० ग्रॅम चरस जप्त केला. छाप्यांचे हे सत्र सुरूच राहणार असल्याची माहिती पेडणे पोलिस निरीक्षक उत्तम राऊत देसाई यांनी दिली.
खालचावाडा हरमल येथे १७ रोजी रात्री दोन वेगवेगळ्या छाप्यांत इस्रायली नागरिक ओहाद युधा आस्केनाझी (वय २५) यांच्याकडून उपनिरीक्षक सचिन नार्वेकर यांनी २५ ग्रॅम चरस जप्त केला. उपनिरीक्षक अजित उमर्ये यांनी दुसऱ्या ठिकाणी छापा टाकून आंतोन कोलेद्रा या २५ वर्षीय रशियन नागरिकाकडून २५ ग्रॅम चरस जप्त केला. या दोन्ही संशयित आरोपींना पेडणे पोलिसांनी अटक केली आहे.
निरीक्षक उत्तम राऊत देसाई यांनी यावेळी मोरजी, आश्वे, मांद्रे, हरमल व केरी-तेरेखोल या किनारी भागात रेस्टॉरंटमध्ये एखादा संशयित विदेशी नागरिक अंमली पदार्थ सेवन करत असल्यास हॉटेल व्यावसायिकांनी त्याला थारा देऊ नये, त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन केले. पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात असा प्रकार उघडकीस आल्यास शॅक मालक किंवा हॉटेल व्यावसायिकावर कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
जनतेने व हॉटेल व्यावसायिकांनी पोलिसांना सहकार्य करून अशा व्यवहारांना आळा घालण्यास मदत करावी, असे आवाहन त्यांनी केले.

बॅंक फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न

म्हापशातील घटना
म्हापसा, दि. १८ (प्रतिनिधी): येथील स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या कृषी विभागात प्रवेश करून बॅंक लुटण्यात अज्ञात चोरट्यांना अपयश आल्याने त्यांना माघारी परतावे लागले. आज सकाळी हा प्रकार उघडकीस आला.
आज सकाळी म्हापसा पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आल्यावर त्यांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. श्वानपथकाच्या साह्याने चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला; परंतु कोणताच सुगावा लागला नाही. म्हापसा पोलिसांनी याबाबत दिलेल्या माहितीनुसार येथील नगरपालिकेच्या शेजारी असलेल्या स्टेट बॅंकेच्या कृषी विभागाच्या इमारतीच्या मागील बाजूने असलेल्या खिडकीचे गज तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. एक्स ओ ब्लेडच्या साह्याने दरवाजाला भोक पाडून आतील कडी तोडण्यात आली. चोरट्यांनी तिजोरी असलेल्या खोलीत प्रवेश करून ती फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. पक्कड, हातोडी आदी अस्त्रांचा वापर तिजोरी फोडण्यासाठी केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
यासंदर्भात बॅंकेच्या शाखा प्रबंधकांशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, शनिवार किंवा रविवारी हा प्रकार घडला असावा. चोरट्यांनी बाहेरील तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना यश आले नाही. चोरट्यांनी मुख्य तिजोरी असलेल्या खोलीत प्रवेश केला असता तर सायरन वाजला असता. बॅंकेत बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांत केवळ दोन टॉर्चांचा प्रकाश दिसत असल्याची माहिती त्यांनी दिली.

आता जुगारविरोधी चळवळीला पोलिसांच्या मार्गदर्शनाची गरज

पणजी, दि. १८ (प्रतिनिधी): जत्रोत्सव व इतर धार्मिक उत्सवादरम्यान आयोजित होणारा जुगार ही सामाजिक समस्या आहे व ती रोखण्यासाठी जनतेचे सहकार्य हवे, या पोलिस महासंचालक भीमसेन बस्सी व उत्तर गोवा अधीक्षक बॉस्को जॉर्ज यांच्या आवाहनाचे "मांद्रे सिटीझन फोरम'ने जाहीर स्वागत केले आहे. मांद्रे येथे लवकरच जुगारविरोधी जनमत चळवळीचा एक भाग म्हणून एका जाहीर सभेचे आयोजन करण्यात येईल व त्यात लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी पोलिस महासंचालक किंवा पोलिस अधीक्षकांना आमंत्रित करण्यात येईल, अशी माहिती मिळाली आहे.
सार्वजनिक ठिकाणी आयोजित होणाऱ्या जुगाराविरोधात सध्या पेडणे तालुक्यात "मांद्रे सिटीझन फोरम'तर्फे वैचारिक चळवळ सुरू करण्यात आली आहे. "फोरम'च्या वतीने तयार करण्यात आलेल्या निवेदनावर सध्या संपूर्ण तालुक्यात सह्यांची मोहीम उघडण्यात आली असून त्याला लोकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. "गोवादूत'ने सातत्याने हा विषय लावून धरल्याने या भागातील जनतेतही आता जाहीरपणे जुगारविरोधी चर्चा सुरू झाली आहे व त्यामुळेच या चळवळीला खऱ्या अर्थाने गती मिळाली आहे. जत्रोत्सव व इतर धार्मिक उत्सवात मांडण्यात येणाऱ्या जुगारात पोलिसांचाही हात असतो व त्यांचा या जुगारवाल्यांना पाठिंबा असतो, त्यामुळे जुगाराविरोधात पोलिसांना माहिती देणे म्हणजे जुगारवाल्यांच्या तोंडात सापडणे अशी येथील लोकांची भावना बनली आहे. हा अनिष्ट प्रकार रोखायचा असल्यास जनतेचे सहकार्य हवे, अशी जर पोलिस अपेक्षा करीत असतील तर त्यांनी पुढाकार घेऊन या जुगाराबाबतच्या चळवळीत भाग घ्यावा व जनतेच्या मनातील भीती दूर करण्यास मदत करावी, अशीही मागणी "फोरम'तर्फे करण्यात येईल.
पोलिसांना सहकार्य करावे म्हणजे जनतेने नक्की काय करावे, असा सवाल "फोरम'तर्फे करण्यात आला आहे. जुगारासंबंधी जर लोकांना माहिती द्यायची असेल तर त्यांनी कुणाकडे द्यावी? त्यांचे नाव गुपित ठेवून त्यांना संरक्षण देण्याची हमी पोलिस कसे देतील? याची खात्री लोकांना पटायला हवी, तेव्हाच लोक पुढे सरसावतील, असेही यावेळी सांगण्यात आले. पोलिस महासंचालक किंवा अधीक्षक खरोखरच प्रत्यक्ष इथे येऊन यासंबंधी लोकांना मार्गदर्शन करतील, तेव्हाच लोकांना पोलिसांबाबत विश्वास पटेल व खऱ्या अर्थाने लोक जुगाराविरोधात उघडपणे बाहेर येतील, अशी माहितीही "फोरम'तर्फे देण्यात आली आहे. येत्या आठवड्यात याबाबतचे अधिकृत पत्र पोलिस महासंचालक व पोलिस अधीक्षकांना सादर केले जाईल, असेही यावेळी सांगितले.

Monday, 18 January, 2010

ज्योती बसू कालवश

कोलकाता, दि. १७ - प्रदीर्घ काळ पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री राहिलेले ज्येष्ठ माकप नेते ज्योती बसू यांची प्राणज्योत रविवारी मालवली. ते ९५ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते कोलकाता येथील इस्तितळात मृत्यूशी झुंजत होते. आज सकाळी ११ वाजून ४७ मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
कोलकाता येथील एमएमआरआय हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेल्या बसूंची प्रकृती गेल्या दोन दिवसांपासून खूपच खालावली होती. ९५ वर्षांचे वय व ' मल्टीऑर्गन फेल्युअर ' पाहता कुणी चमत्काराची अपेक्षा ठेवू नये , असे डॉक्टरांनी आधीच सांगितले होते. एवढेच नव्हे तर बसू यांच्या कुटुंबीयांना आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलिट ब्युरो सदस्यांना डॉक्टरांनी इस्पितळात बोलावून घेतले होते. अखेर आज सकाळी ११ वाजून ४७ मिनिटांनी बसू यांनी या जगाचा निरोप घेतला.
सलग २३ वर्षे कम्युनिस्टांचा बालेकिल्ला असलेल्या पश्चिम बंगालचे मुख्यमंत्रिपद भूषवण्याचा विक्रम ज्योती बसू यांनी केला. १९७७ ते २००० या काळात ते प. बंगालचे मुख्यमंत्री होते. देशात सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहण्याचा बहुमान त्यांच्याच नावावर आहे. १९९६ मध्ये ज्योती बसू यांना देशाचे पंतप्रधानपद बनण्याची संधी चालून आली होती. परंतु सरकारमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय माकपने घेतल्याने बसू यांची पंतप्रधान बनण्याची संधी हुकली. २००८ साली सीपीएम पॉलिट ब्युरोमधून बसू यांना विश्रांती देण्यात आली होती. विशेष निमंत्रित म्हणून त्यांचा समावेश करण्यात आला होता.
राष्ट्रपती, उपराष्ट्रपतींकडून शोक व्यक्त
ज्योती बसू यांच्या निधनाने देशाने एक थोर राजकारणी नेता गमावला आहे, अशी संवेदना राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी व्यक्त केली आहे. बसू हे आपल्या राजकीय कौशल्य आणि कलागुणांमुळेच देशात सर्वाधिक काळ पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून कायम राहू शकले. आपल्या प्रदीर्घ अशा मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात त्यांनी जनतेचा खरा सेवक, कुशल प्रशासक आणि थोर राजकारणी नेते म्हणून आपली प्रतिमा निर्माण केली. मुख्यमंत्रिपद त्यागल्यानंतरही त्यांची प्रतिमा कायम होती. त्यांच्या निधनाने देशाने एक दिग्गज लोकनेता गमावला आहे, अशी संवेदना पाटील यांनी व्यक्त केली आहे.
उपराष्ट्रपती अन्सारी
बसू यांच्या निधनाने जी पोकळी निर्माण झाली आहे, ती भरून निघणे कठीण आहे, अशा शब्दात उपराष्ट्रपती हामीद अन्सारी यांनी संवेदना व्यक्त केली आहे. राष्ट्रीय आणि पश्चिम बंगालच्या विकासात बसू यांचे योगदान अविस्मरणीय राहील. बसू हे अनेकांचे मार्गदर्शक आणि प्रेरणास्थान होते, असे अन्सारी यांनी म्हटले आहे.
एक अध्याय संपला : पंतप्रधान
ज्योती बसू यांच्या निधनाने भारतीय राजकारणातील एक प्रदीर्घ अध्याय संपला, अशा शब्दात पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी आपली शोकसंवेदना व्यक्त केली आहे. बसू हे धर्मनिरपेक्ष मूल्यांची बांधिलकी जपणारे थोर नेते होते. राष्ट्रीय राजकारणात आपल्या प्रादेशिक अस्मितेचा बुलंद आवाज होते. अनेक विषयांवर मी त्यांचा सल्ला घेत असे आणि त्यांचा प्रतिसाद नेहमी सकारात्मक असायचा, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
बसू हे खरे जननायक : चटर्जी
ज्योती बसू यांच्या निधनाने मी दुसऱ्यांदा आपल्या वडिलांना गमावले आहे, अशा शब्दात लोकसभेचे माजी सभापती सोमनाथ चटर्जी यांनी आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत. बसू हे खरे जननायक होते. ते सतत म्हणायच, जनतेपासून दूर जाऊ नका. तुम्ही जर जनतेपासून दूर गेले तर मग राजकारणात काहीही शिल्लक उरणार नाही. आम्हाला आज त्याची जाणीव होत आहे. बसू यांना केवळ त्यांचाच पक्ष नव्हे तर समाजातील सर्व स्तरातील लोकांनी त्यांचा नेता म्हणून स्वीकार केला होता. त्यांची जागा कुणीही घेऊ शकणार नाही.
बसू हे महान सुपुत्र : चिदंबरम
ज्योती बसू हे भारताचे महान सुपुत्र होते, अशा शब्दात केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी आपली संवेदना व्यक्त केली आहे. ९६ वर्षीय बसू यांनी कित्येक दशकांपर्यंत आपल्या राजकारणाची छाप सोडली. ते एक महान योद्धा, लोकशाहीवादी आणि संसदपटू आणि देशासाठी प्रेरणास्थान होते. बसू यांनी तळागाळातील लोकांच्या कल्याणासाठी आयुष्य वेचले. आजचा दिवस आमच्यासाठी अतिशय दु:खद आहे. त्यांची स्मृती आमच्या मन:पटलावर सतत कायम राहील. मी त्यांच्या स्मृतीला अभिवादन करतो.
बसू हे महान नेते होते : अडवाणी
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे अध्वर्यू ज्योती बसू हे महान नेते होते, अशा शब्दात भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी आपली संवेदना व्यक्त केली आहे. ते दिग्गज होते. महान नेते होते. त्यांनी पश्चिम बंगालमध्ये प्रदीर्घ काळपर्यंत माकपाचा किल्ला अभेद्य राखला, असे अडवाणी यांनी म्हटले आहे. त्यांच्या निधनाने कम्युनिस्ट चळवळीला धक्का बसला आहे. बसू हे ई. एम. एस. नंबुद्रीपाद, भूपेश गुप्ता, इंद्रजीत गुप्ता यांच्या रांगेत बसणारे नेते होते. आमचे वैचारिक मतभेद असतील, पण त्यांच्या महानतेला मी वंदन करतो. मी स्वत: त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी जाणार आहे, असे अडवाणी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. भाजपानेत्या सुषमा स्वराज, अरूण जेटली यांनीही बसू यांच्या निधनाद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे.
नितीन गडकरी
ज्योती बसू यांच्या निधनाबद्दल भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी अतीव दु:ख व्यक्त केले आहे. ज्योती बसू हे आधुनिक भारतातील सर्वोच्च उंची गाठलेले एक दिग्गज नेते होते. समाजातील कमकुवत आणि तळागाळातील जनतेच्या कल्याणासाठी झटणे, हीच त्यांची बांधिलकी होती. ते आपली विचारधघर आणि मूल्यांवर अतिशय ठाम होते. आपली स्वच्छ प्रतिमा आणि विश्वासाच्या बळावरच त्यांनी प्रदीर्घ अशा राजकीय जीवनात आपल्या कार्याची छाप पाडली. कम्युनिस्ट पक्षाच्या या दिग्गज नेत्याच्या निधनाबद्दल भाजपा अतीव दु:ख व्यक्त करीत असल्याची संवेदना गडकरी यांनी व्यक्त केली आहे.
ममता बॅनर्जी
माकपाचे ज्येष्ठ नेते ज्याती बसू हे "डाव्या आघाडीच्या सरकारचे प्रथम आणि शेवटचा अध्याय होते' अशा शब्दात तृणमूल कॉंग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
माझे आणि बसू यांचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते. आम्हाला त्यांच्या निधनाने तीव्र दु:ख झाले आहे. बसू हे अतिशय थोर असे नेते होते. प. बंगालमध्ये डाव्या आघाडीचे सरकार स्थापण्याचे श्रेय फक्त त्यांनाच आहे. ते आणखी काही काळ जगले असते तर मला खूपच समाधान लाभले असते, असे ममता म्हणाल्या.
डाव्या आघाडीची मोठी हानी
ज्योती बसू यांच्या निधनामुळे डाव्या आघाडीची कधीही भरून न निाणारी हानी झाली आहे, आ शब्दात डाव्या आघाडीच्या नेत्यांनी आपली संवेदना व्यक्त केली आहे.
बसू हे सर्वोच्च उंची गाठलेले नेते होते, अशी संवेदना भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे महासचिव ए. बी. बर्धन यांनी म्हटले आहे. तळागाळातील जनतेच्या कल्याणासाठी झटणारा नेता आज आम्हाला सोडून गेला आहे. ते आयुष्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत झटले. त्यांचे जाणे आमच्यासाठी अतीव दु:खदायक आहे, असे बर्धन म्हणाले.
बसू यांच्या निधनामुळे डाव्या आघाडीची प्रचंड अशी कधीही भरून न निघणारी हानी झाली आहे, अशी संवेदना फॉरवर्ड ब्लॉकचे महासचिव देवव्रत बिस्वास यांनी व्यक्त केली आहे. आधुनिक बंगालचा शिल्पकार आणि देशात डाव्या आघाडीचया चळवळीला बळ देणारा महान नेता म्हणून देश त्यांची सतत आठवण करेल, असे बिस्वास यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. बसू यांच्या दूरदर्शी नेतृत्वामुळेच ग्रामीण बंगालचा चेहरामोहरा बदलला आणि औद्योगिक विकासाला चालना मिळाली, असे निवेदनात म्हटले आहे.
क्रीडा क्षेत्राचीही आदरांजली
माजी मुख्यमंत्री आणि क्रीडाप्रेमी ज्योती बसू यांच्या निधनाबद्दल कोलकात्यातील क्रीडा क्षेत्रानेही आदरांजली अर्पण केली आहे. कोलकाता शहरातील क्रीडा विकासाच्या योगदान बसू यांचे भरीव योगदान असल्याची प्रतिक्रिया भारतीय व बंगाल क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष जगमोहन दालमिया आणि माजी दिग्गज भारतीय फुटबॉलपटू पी. के. बॅनर्जी यांनी व्यक्त केली आहे.
ज्योतीदा सर्वत्र दिग्गज राजकारणी म्हणूनच ओळखले जात असले तरी त्यांचे खेळावरही भरपूर प्रेम होते. त्यामुळेच ते शहरातील खेळाच्या विकासासाठी वेळोवेळी मदतीचा हातही पुढे करीत होते, असेही या दोघांनी म्हटले आहे.
बंगाल टायगर म्हणून आपली ओळख निर्माण करणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने पत्नी डोनासोबत जाऊन ज्योती बसू यांचे अंत्यदर्शन घेतले व आपली श्रद्धांजली अर्पण केली.

संपर्क, संघटन व संघर्षाच्या जोरावर सत्ता मिळवू - पार्सेकर

भाजप प्रदेशाध्यक्षपदी लक्ष्मीकांत पार्सेकर बिनविरोध

पणजी, दि. १७ (प्रतिनिधी) - संपर्क, संघटन आणि संघर्ष या त्रिसूत्रीच्या आयोजनेनुसार पक्षाचे काम करीत सत्ता काबीज करुया, असा कानमंत्र आज भारतीय जनता पक्षाचे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना दिला. पक्षाच्या केंद्रीय महिला मोर्चाच्या अध्यक्ष किरण महेश्वरी यांनी त्यांची अधिकृतपणे तीन वर्षाच्या कालावधीसाठी पक्षाध्यक्षपदी घोषणा केल्यानंतर ते उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मावळते अध्यक्ष तथा उत्तर गोवा खासदार श्रीपाद नाईक, विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर, निवडणूक अधिकारी ऍड. नरेंद्र सावईकर, उत्तर गोवा जिल्हा अध्यक्ष उल्हास अस्नोडकर, दक्षिण गोवा जिल्हा अध्यक्ष तथा आमदार रमेश तवडकर, आमदार दामोदर नाईक, फ्रान्सिस डिसोझा, मिलिंद नाईक, महिला मोर्चाच्या अध्यक्ष , युवा मोर्चाचे अध्यक्ष रुपेश महात्मे तसेच अन्य नेते मंडळी उपस्थित होते.
"पक्षाच्या अध्यक्षपदी एकमताने निवड होणे हे चित्र भारतीय जनता पक्ष सोडल्यास अन्य कोणत्याच पक्षात पाहायला मिळत नाही. गोव्यासारख्या एवढ्या छोट्या राज्यातही कोणतेच रुसवेफुगवे न होता अध्यक्षपदाची निवड प्रक्रिया पार पडली हा आदर्श घेण्यासारखा असून याची नोंद दिल्लीपर्यंत पोचवली जाणार आहे,'असे यावेळी दिल्लीतून खास निरीक्षक म्हणून उपस्थित राहिलेल्या सौ. किरण महेश्वरी यांनी बोलताना सांगितले. आजही गोव्याच्या तसेच देशाच्या जनतेला गोव्यातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारची आठवण होते. यावर्षापासून प्रत्येक कार्यकर्त्याच्या आणि पदाधिकाऱ्याच्या कामाचे "ऑडिट' केले जाणार आहे. केवळ पद घेऊन शांत बसता येणार नाही. प्रत्येक कार्यकर्ता आपली जबाबदारी व्यवस्थित पार पाडतो तेव्हाच पक्ष पुढे जातो, असे सौ. महेश्वरी पुढे म्हणाल्या.

प्रवास तेथे निवास अशा पद्धतीने काम केले जाणार आहे. पक्षाला संघटनात्मक दृष्ट्या जास्तीजास्त सुदृढ करण्याची योजना आहे. भाजपचे जेथे आमदार नाहीत, तेथेही संपर्क करून सरकारच्या दुष्कृत्याच्या विरोधात संघर्ष उभा केला जाणार आहे, असे आश्वासन यावेळी श्री. पार्सेकर यांनी दिले. पैशाच्या जोरावर आम्ही कॉंग्रेसला लढा देऊ शकत नाही. त्याला सुदृढ संघटनेची गरज आहे. त्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याला काम आणि प्रत्येक कामाला कार्यकर्ता दिला जाणार आहे. या संघटनेच्या आधारावर येणारी निवडणूक लढवली जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
संपर्क वाढवला तरच चमत्कार होऊ शकतो. आमचा मार्ग गोव्याला चांगल्या दिशेने न्यायचा आहे. हा मार्ग कठीण असला तरी, तो निश्ंिचत आहे. कॉंग्रेस सरकारने जी कार्यपद्धती अवलंबली आहे ते पाहिल्यास भाजपचे सरकार येईल यात कोणताही किंतू वाटत नाही, असे मत यावेळी विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी व्यक्त केले. आताच्या राजकीय बजबजपुरीचा लाभ उठवत युती करून सरकार केले तरी ते कार्य करू शकणार नाही. आम्हाला सक्षम सरकार पाहिजे. सर्व सामान्यांसाठी काम करणारे सरकार पाहिजे. त्यासाठी सर्व शक्ती श्री. पार्सेकर यांच्या मागे लावून सक्षम सरकार स्थापन करुया, असे आवाहन श्री. पर्रीकर यांनी पुढे बोलताना केले.
प्रत्येक कार्यकर्त्याने तन मन , धन खर्ची घालून पक्षाचे काम केले आहे. या देशाचे राजकारण काही लोकांनीच घाण केले आहे. त्यामुळे चांगले लोक या राजकारणात आणले पाहिजेत, असे मत यावेळी मावळते अध्यक्ष तथा खासदार श्रीपाद नाईक यांनी व्यक्त केले. क्रिकेट सामन्यात २६ चेंडूत २६ धावा पाहिजे अशी स्थिती असते तशी काहीशी स्थिती आमची आहे. त्यामुळे थोडा जोर लावल्यास सरकार निश्चितपणे स्थापन करू, असा दावा यावेळी श्री. नाईक यांनी केला.
नुकतेच लागलेले ग्रहण हे कॉंग्रेस सरकारला वाईट जाणार आहे. पहिल्यावेळी श्री. पार्सेकर यांच्या अध्यक्षतेखालीच भाजपचे सरकार सत्तेवर आले होते. पक्ष परमवैभवापर्यंत न्यायचा असेल तर सर्वांचे रुसवेफुगवे दूर करावे लागणार असल्याचे दामू नाईक बोलताना म्हणाले, तर, गोव्याचा मुख्यमंत्री हा केवळ मनोहर पर्रीकर व्हावा, असे सर्व गोवेकरांना वाटते. राष्ट्रीय स्तरावरही त्यांना मान्यता मिळाली असल्याचे यावेळी फ्रान्सिस डिसोझा म्हणाले.
पणजी येथील मराठा समाज सभागृहात झालेल्या या सोहळ्यात मोठ्या संख्येने पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमांचे सूत्रसंचालन पक्षाचे संघटनमंत्री अविनाश कोळी यांनी केले तर, आभार उल्हास अस्नोडकर यांनी मानले. शेवटी सामूहिक वंदे मात्रम गायनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
मोडतोडीत भाजपला स्वारस्य नाही
"मोडतोड' करून सरकार करण्यात भारतीय जनता पक्षाला स्वारस्य नाही. आम्ही लोकशाही मार्गानेच सरकार स्थापन करू. तसेच पुढच्या निवडणुकीपर्यंत पक्षाचे १४ ही आमदार एकसंध राहतील याची पूर्ण खात्री असल्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष पार्सेकर यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. २५ मतदारसंघात आजी- माजी आमदार आहेत तर, ११ मतदारसंघांत भाजप दुसऱ्या क्रमांकावर आहे. आत्तापर्यंत या वर्षी ९० हजार सदस्यता झाली असून विश्वजित राणे आम्हाला आव्हान वाटत नाही, असेही त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना स्पष्ट केले. त्यांच्या मतदारसंघात भाजपने चक्क दोन हजार नवे सदस्य नोंदविल्याचे त्यांनी सांगितले.

विर्नोडा येथे दुकानाला आग लागून ३.८२ लाखांची हानी

पेडणे, दि. १७ (प्रतिनिधी) - विर्नोडा पंचायत क्षेत्रातील योेगेश मदन धारगळकर व सुगंधा आरोंदेकर यांच्या दुकानांना १६ रोजी रात्रौ १ वाजता आग लागून ३ लाख ८२ हजार रुपयांचे नुकसान झाले.
योगेश धारगळकर यांच्या दुकानातील ९८ हजार रोकड (पैसे) अर्धवट जळाली, सामानासह त्यांना सुमारे ३ लाख ६७ हजार रुपयांचे नुकसान झाले. आगीचे अजून नक्की कारण समजलेले नाही.
सविस्तर माहितीनुसार १६ रोजी रात्रौै एक वाजून दहा मिनिटांनी दुकानांना आग लागल्याचे शांताराम आरोंदेकर यांच्या लक्षात आल्याने त्यांनी धावाधाव करून आग विझवण्याचा प्रयत्न केला. अग्निशमन दलाने आग विझवण्याचा प्रयत्न करून आटोक्यात आणली. तोपर्यंत मात्र योगेश धारगळकर यांच्या दुकानातील ९८ हजार रोकड, फ्रीज, झेरॉक्स मशीन, संगणक, कॉईन टेलिफोन बॉक्स, शिलाई मशीन फॅन, व इतर स्टेशनरी जळून पूर्णपणे खाक झाली होती. ३ लाख ६७ हजार रुपये नुकसान झाले तर बाजूच्या सुगंधी आरोंदेकर यांच्या दुकानाच्या छप्पराला आग लागून जवळ जवळ १५ हजार रुपये नुकसान झाले. आगीचा एवढा भडका उडाला होता की धारगळकर यांच्या दुकानाचे छप्पर पूर्णपणे जळून खाक झाले.
घटनास्थळी पोलिस पोचले व घटनेचा पंचनामा केला. आग लागण्याचे कारण अजूनपर्यंत कळालेले नाही.
धारगळकर यांनी बॅंकेकडून कर्ज काढून दुकान थाटले होते. अचानक आग लागून तीन लाखांपेक्षा जास्ती हानी झाल्याने त्यांच्यावर संकट कोसळले आहे.
सरकारने योगेश धारगळकर व सुगंधा आरोंदेकर या नुकसानग्रस्त नागरिकांना लवकरात लवकर मदतीचा हात द्यावा, अशी मागणी येथील स्थानिक पंच सदस्य जगन्नाथ देसाई यांनी केली. त्यांनी भेट देऊन त्यांची विचारपूस केली.

पार्से जत्रोत्सवात जुगार थंडावला

जुगारविरोधी चळवळ फोफावली
पणजी, दि. १७ (प्रतिनिधी)- राज्यात जत्रोत्सवानिमित्त आयोजित होणाऱ्या जुगाराविरोधात सुरू झालेल्या चळवळीला आता सर्व थरांतून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. जत्रोत्सव व इतर धार्मिक उत्सवांना खुलेआम जुगाराचा बाजार भरवून धार्मिक पवित्रता बिघडवणारी ही अनिष्ट प्रथा दूर व्हावी, असे आता जनतेचे एकमत बनले आहे. पेडण्यातील पार्से येथे काल झालेल्या जत्रोत्सवातील जुगाराला मिळालेला थंडा प्रतिसाद ही जुगारविरोधी चळवळीला मिळणाऱ्या पाठिंब्याची प्रचिती ठरली आहे,अशी प्रतिक्रिया या भागातून उमटत आहे.
जत्रोत्सव व धार्मिक उत्सवांना जुगाराचे बाजार भरवण्याची नवी पद्धत रूढ बनल्याने राज्यातील विविध भागांत व विशेष करून पेडणे तालुक्यात मोठ्या प्रमाणात युवा पिढी या जुगाराकडे खेचली जात होती. या उत्सवांना जुगार आयोजित करून त्यांच्याकडून काही देवस्थान समित्या देणगी गोळा करतात.या संपूर्ण व्यवहारांत देवस्थानाला देणगीही मिळते असे कारण पुढे करून पाठीशी घातले जात असले तरी हा जुगार आयोजित करण्यामागे अनेकांची हित जपलेले असते.स्थानिक पंचायतीपासून, पोलिस व गावातील इतर काही लोक या व्यवहारातून आपले हात आले करून घेतात. पेडण्यात जुगार फोफावण्याचे मुख्य कारण म्हणजे शेजारील महाराष्ट्रात पोलिसांनी जुगारावर बंदी आणल्याने तिथून मोठ्या प्रमाणात लोक जुगार खेळण्यासाठी गोव्यात येतात. पेडणे हा भाग त्यांना जवळचा वाटत असल्याने अनेक जीपगाड्या घेऊन हे लोक प्रत्येक जत्रोत्सवाला हजर राहतात. खुल्या मैदानात होणाऱ्या या जुगारांत लाखो रुपयांची उलाढाल होते. पोलिसांना या जुगारातून बरीच कमाई आहे, त्यामुळे त्यांच्याकडून जुगारवाल्यांना पूर्ण संरक्षण मिळते. जुगार आयोजित करणारे हे स्थानिक लोक असल्याने त्यांच्याशी दोन हात करणे राजकीय नेत्यांना परवडणारे नाही, त्यामुळे ते देखील या अनिष्ट प्रकाराविरोधात तक्रार करीत नाहीत व त्यामुळे या प्रकाराला अधिकच बळकटी मिळाली आहे.
या जुगाराचे गंभीर परिणाम अलीकडच्या काळात उघड होत आहेत. जुगाराच्या निमित्ताने मद्यालयांना तेजी आली आहे. काही ठिकाणी छुप्या पद्धतीने वेश्या व्यवसायही चालतो, त्यामुळे हा जुगार एका सामाजिक समस्या बनला आहे. पेडणे तालुक्यातील "मांद्रे सिटीझन फोरम' तर्फे या जुगाराविरोधात जनमत बनवण्याचे काम सुरू झाले आहे. या फोरमच्या काही युवा कार्यकर्त्यांनी एक निवेदन तयार करून त्यावर गावागावांतून सह्या मिळवण्याचे काम सुरू केले आहे व त्याला उदंड प्रतिसाद मिळत आहे. खास करून तालुक्यातील महिला वर्गांसाठी हा जुगार डोकेदुखी बनत चालल्याने त्यांनी या चळवळीला पाठिंबा दिला आहे.या जुगाराविरोधात आता सर्व राजकीय पक्षांनी पाठिंबा द्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

आयटी हॅबिटेटसाठी युवक कॉंग्रेस आग्रही

बाबूशना शह देणार!
पणजी, दि. १७ (प्रतिनिधी)- कॉंग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा युवा कॉंग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांच्या गोवा भेटीचे औचित्य साधून गोवा प्रदेश युवा कॉंग्रेसने आपल्याच सरकारातील शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात यांना लक्ष्य बनवण्याचे ठरवले आहे. ताळगाव येथे बाबूश मोन्सेरात यांच्या समर्थकांनी युवा कॉंग्रेस कार्यकर्त्यांवर केलेल्या जीवघेण्या हल्ल्याचा वचपा काढताना दोनापावला येथील बंद पडलेल्या राजीव गांधी आयटी हॅबीटेट प्रकल्पाच्या कामाला चालना मिळवून देण्यासाठी श्री.गांधी यांना गळ घातली जाणार आहे.
आज कॉंग्रेस भवनात बोलावण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांच्या भेटीचा कार्यक्रम प्रदेश युवाध्यक्ष संकल्प आमोणकर यांनी पत्रकारांसमोर सादर केला. राहुल गांधी हे १९ रोजी गोव्यात दाखल होतील.आपल्या ४८ तासांच्या या भेटीत ते गोवा विद्यापीठात विद्यापीठ तथा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी सुमारे एक तास संवाद साधतील. गोवा प्रदेश कॉंग्रेस समिती व युवा कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनाही ते मार्गदर्शन करणार आहेत. युवा कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना काही महत्त्वाचे विषय त्यांच्याकडे उपस्थित करण्यात येणार आहेत. युवा कॉंग्रेसवर झालेला हल्ला व दोनापावला आयटी हॅबीटेटच्या विषयाला प्राधान्य देण्याचेही ठरवण्यात आल्याचे श्री.आमोणकर म्हणाले. राहुल गांधी हे थेट मध्यप्रदेशातून गोव्यात येणार आहेत.
दोनापावला येथील राजीव गांधी आयटी हॅबीटेट हा राज्य सरकारचा राज्यातील सुशिक्षित युवकांना रोजगार प्राप्त करून देण्यासाठीचा महत्त्वाचा प्रकल्प आहे व तो केवळ बाबूश मोन्सेरात यांच्या विरोधामुळे बंद आहे, हे राहुल गांधी यांना पटवून देण्यात येईल. या प्रकल्पाच्या समर्थनासाठी युवा कॉंग्रेसतर्फे शांततेत मोर्चा काढण्यात आला होता. त्यावेळी बाबूश मोन्सेरात यांच्या समर्थकांनी युवा कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांवर जीवघेणा हल्ला केला व त्यात अनेक युवा नेते गंभीर जखमी झाले होते,असेही यावेळी श्री.आमोणकर म्हणाले.याप्रकरणी पोलिस तक्रार करण्यात आली असली तरी त्याची चौकशी थंडावली आहे.मुख्यमंत्री तथा प्रदेशाध्यक्षांकडे अनेकवेळा विनवण्या करूनही ही चौकशी पुढे सरकत नाही, यामुळे आता राहुल गांधी यांनी हस्तक्षेप करून या एकूण प्रकरणाची निःपक्षपाती चौकशी करण्याचे आदेश सरकारला द्यावेत,अशी विनंती केली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
गरज सरो आणि वैद्य मरो!
"गरज सरो आणि वैद्य मरो' ही कॉंग्रेसची फार जुनी सवय राहिलेली आहे, अशी टीका अनेकजण करतात. बाबूश मोन्सेरात यांच्याबाबतीत सध्या याचीच प्रचिती येत आहे. राज्यात लोकांच्या विश्वासाला पूर्णपणे पात्र ठरलेले व सर्वत्र विकासकामांचा धडाका लावून लोकप्रिय ठरलेले माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखालचे भाजपचे सरकार खाली खेचण्यासाठी कॉंग्रेसने ताळगावचे आमदार बाबूश मोन्सेरात यांची मदत घेतली. बाबूश यांनीच पुढाकार घेऊन तत्कालीन भाजप सरकारातील काही आमदारांना आपल्या बाजूने खेचले व हे सरकार तत्कालीन राज्यपाल एस.सी.जमीर यांच्या मदतीने पाडले गेले. या घटनेला पुढील महिन्यात पाच वर्षे पूर्ण होत आहेत. या पाच वर्षांत बाबूश मोन्सेरात यांना वरचेवर चुचकारून कॉंग्रेसने आपली सत्ता टिकवली खरी पण या पाच वर्षांत त्यांना मिळालेली वागणूक मात्र अजूनही त्यांना सलत आहे. बाबूश समर्थकांनी पणजी पोलिस स्थानकावर केलेल्या हल्ल्याचा वचपा काढण्यासाठी सरकारातील आमदार असूनही बाबूश, त्यांची पत्नी जेनिफर मोन्सेरात, मुलगा व पणजीचे महापौर टोनी रॉड्रिगीस यांना पोलिसांनी बेदम मारहाण केली होती. हे प्रकरण बरेच गाजले व नंतर बाबूश यांच्या मागणीनुसारच त्याची चौकशी "सीबीआय' कडे सोपवण्यात आली. आता दिगंबर कामत यांच्याविरोधात सरकाराअंतर्गत सुरू असलेल्या धुसफुशीच्या पार्श्वभूमीवर बाबूश यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल करण्याची घटना घडली. आता युवा कॉंग्रेस हल्ला प्रकरण उरकून काढून त्यांना लक्ष्य बनवण्यात येत असल्याची चर्चा आहे. कॉंग्रेसच्या या सुडाच्या राजकारणाला बाबूश कशा पद्धतीने तोंड देतात हेच आता पाहावे लागणार आहे.

Sunday, 17 January, 2010

राजकीय 'ज्वालामुखी' अजूनही खदखदतोय

कॉंग्रेसश्रेष्ठींच्या दबावतंत्रामुळे बंडखोर दुखावले
पणजी, दि. १६ (प्रतिनिधी) : गोव्यातील कॉंग्रेस आघाडी सरकाराअंतर्गत निर्माण झालेला तिढा शमल्याचे वरवर दिसत असले तरी अंतर्गत सुंदोपसुंदी अजूनही सुरूच आहे. कॉंग्रेसश्रेष्ठींनी दबावतंत्र वापरून बंडखोरांना "शांत' करण्याचे अवलंबलेले तंत्र कितपत कामी येते हे लवकरच स्पष्ट होईल. मात्र मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्यासाठी पुढील काळ अत्यंत खडतर असण्याचे संकेत मिळू लागले आहेत.
आघाडीअंतर्गत मतभेद चव्हाट्यावर येत आहेत. आघाडीतील महत्त्वाचा घटक असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे तिन्ही आमदार सरकारच्या कार्यशैलीवर नाखूष आहेत. आपली गाऱ्हाणी ऐकून घेतली जात नाहीत, अशी राष्ट्रवादीच्या नेत्यांची भावना बनली असून ते ती जाहीरपणे व्यक्त करत आहेत. केंद्रातील संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारचा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष हादेखील घटक आहे. या स्थितीत स्थानिक पातळीवर राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून कॉंग्रेसविरोधात बंड करणे पक्षाला अजिबात परवडणारे नाही, त्यामुळे येथील स्थानिक नेत्यांना राष्ट्रवादीच्या श्रेष्ठींनीही खडसावल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे.
पर्यटनमंत्री मिकी पाशेको यांचा उपद्रव वाढत चालल्याने मुख्यमंत्र्यांसाठी ते डोकेदुखीच बनले आहेत. काही काळापूर्वी मिकी यांनी कॅसिनोत केलेले भांडण व त्यांवरून त्यांच्याविरोधात दाखल झालेली पोलिस तक्रार याचे निमित्त करून त्यांना हटवण्याचेही जोरदार प्रयत्न झाले. तथापि, मिकी पाशेको यांनी चर्चिल व ज्योकिम या आलेमाव बंधूंशी जवळीक साधून हा डाव हाणून पाडला. महसूलमंत्री जुझे फिलिप डिसोझा यांनाही सरकारकडून हवे तसे सहकार्य मिळत नाही; मात्र याबाबत ते जाहीर नाराजी व्यक्त करण्यास कचरत आहेत.
राष्ट्रवादीचे आमदार नीळकंठ हळर्णकर यांचे संसदीय सचिवपद गेल्यानंतर त्यांचेही पुनर्वसन न झाल्याने तेसुद्धा रुसले आहेत. राष्ट्रवादीच्या या नेत्यांना कॉंग्रेसपेक्षा उर्वरित कॉंग्रेसेतर नेते जवळचे वाटतात. शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात, आरोग्यमंत्री विश्वजित राणे, मगो नेते सुदिन व दीपक ढवळीकर यांचा आधार घेऊन ते आपल्या मागण्या पुढे रेटण्याचे प्रयत्न करीत आहेत. एरवी विश्वजित राणे यांचीच सरकारात मक्तेदारी सुरू आहे; पण असे असूनही ते सरकाराविरोधातील बंडात महत्त्वाची भूमिका बजावत असल्याने कॉंग्रेसच्या आमदारांत नाराजी पसरली आहे.
आमदार दयानंद नार्वेकर यांच्या ज्येष्ठतेला पक्षात अजिबात स्थान नाही. त्यातच क्रिकेट तिकीट घोटाळाप्रकरणी आरोपपत्र सादर झाल्याने त्यांचे मंत्रिपदही गेले. दिगंबर कामत यांच्याविरोधातील बंड यशस्वी होण्याचे संकेत मिळाल्यास तेदेखील या बंडाला पाठिंबा देण्याची शक्यता आहे, मात्र सद्यस्थितीत ते सगळ्यांना चुचकारून आहेत, अशी माहिती मिळते.
बाबूश मोन्सेरात यांना मंत्रिमंडळात जागा करून देण्यासाठीच ऍड. नार्वेकरांचे मंत्रिपद गेले अशी नार्वेकर समर्थकांची भावना बनली आहे. पणजी पोलिस स्थानकावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी बाबूश यांच्याविरोधातही आरोपपत्र दाखल झाल्याने ऍड. नार्वेकर यांना लागू केलेला नियम बाबूश यांनाही लागू होईल व त्यांचे मंत्रिपद काढून घेण्याची नामुष्की कामत यांच्यावर ओढवेल, अशी शक्यता आहे. कामत यांचा हा संभावित निर्णय बाबूश यांना कितपत रुचेल, हाच आता उत्सुकतेचा विषय बनला आहे. बाबूश यांचे मंत्रिपद गेल्यास त्याजागी मडकईकर यांची वर्णी लागेल व त्यांची नाराजी दूर होईल. तथापि, त्याचा सरकारच्या स्थिरतेवर भयावह परिणाम तर होणार नाही ना, याची चाचपणी सध्या सुरू आहे.
बाबूश मोन्सेरात यांनी "ग्रुप ऑफ सेव्हन' चा आधार घेतला असला तरी त्यांचे मंत्रिपद काढून घेण्याचे ठरवल्यास हा गट कितपत त्यांच्यामागे खंबीरपणे उभा राहतो, हेही पाहावे लागेल. बांधकाममंत्री चर्चिल आलेमाव, आमदार आलेक्स रेजिनाल्ड, आमदार आग्नेलो फर्नांडिस व आमदार पांडुरंग मडकईकर हे बाबूश यांचे समर्थक समजले जातात, त्यामुळे या निर्णयावर त्यांची प्रतिक्रिया कशी असेल, हाही महत्त्वाचा प्रश्न आहे. सद्यस्थितीत
बाबूश यांना एकाकी पाडून मुख्यमंत्री दिगंबर कामत विद्यमान स्थितीवर मात करण्यात कितपत यशस्वी ठरतील, यावरच पुढील भवितव्य अवलंबून आहे. त्यामुळे येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापर्यंत ही धुसफुस सुरूच राहण्याची जास्त शक्यता आहे.
दरम्यान, दिल्लीला गेलेले चर्चिल व पांडुरंग मडकईकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते उपलब्ध होऊ शकले नाहीत. प्राप्त माहितीनुसार त्यांना श्रेष्ठींकडून योग्य ती समज देण्यात आल्याचे कळते.
कॉंग्रेस पक्षातील बंडखोरांची आज महत्त्वाची बैठक होईल व त्यात अंतिम निर्णय घेतला जाईल,असे काल आमदार मडकईकर यांनी जाहीर केले असले तरी हा केवळ फुसका बारच ठरला आहे, असेही चर्चिले जात आहे.

भाजप प्रदेशाध्यक्षपदी प्रा. पार्सेकर निश्चित आज अधिकृत घोषणा

पणजी, दि. १६ : भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून या पदासाठी मांद्रेचे आमदार प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर यांचा एकमेव अर्ज आला आहे. छाननीनंतर तो ग्राह्य धरण्यात आला असल्याचे पक्षाचे निर्वाचन अधिकारी ऍड. नरेंद्र सावईकर यांनी सांगितले. पार्सेकर यांच्या निवडीची औपचारिक घोषणा उद्या रविवारी (१७ जानेवारी रोजी) दुपारी तीन वाजता गोमंतक मराठा समाज सभागृहामध्ये करण्यात येईल. याप्रसंगी पक्षाचे प्रदेश, मंडळ व स्थानिक पातळीवरील सदस्य तथा कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. भाजपच्या केंद्रीय निरीक्षक श्रीमती किरण माहेश्वरी, प्रदेशाध्यक्ष खासदार श्रीपाद नाईक व विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर तसेच अन्य पदाधिकारी यावेळी हजर राहणार असून भाजपच्या कार्यकर्त्यांनी यावेळी मोठ्या संख्येने हजर राहावे, असे आवाहन ऍड. सावईकर यांनी केले आहे.
प्रा. पार्सेकर हे गोव्यातील पहिल्या फळीचे भाजप कार्यकर्ते असून यापूर्वीही मे २००० ते २००३ या कालावधीत भाजप प्रदेशाध्यक्ष होते. याच काळात गोव्यामध्ये मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार कार्यरत होते व आजही त्या सरकारच्या धडाकेबाज कार्यपद्धतीचा हवाला दिला जातो.

बाबूश यांच्या मंत्रिपदाचे भवितव्य श्रेष्ठींच्या हाती

असंतुष्टांशी चर्चेची गरज नाही : मुख्यमंत्री
पणजी, दि. १६ (प्रतिनिधी): माजी वित्तमंत्री दयानंद नार्वेकर यांच्यावर क्रिकेट तिकीट घोटाळा प्रकरणी आरोपपत्र दाखल झाल्यानंतर त्यांचे मंत्रिपद काढून घेण्यात आले; तोच न्याय आता शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात यांना लावणार काय, या पत्रकारांच्या प्रश्नावर, तो निर्णय पक्षश्रेष्ठींनी घ्यायचा आहे, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी दिले. बाबूश हे कॉंग्रेसचे आमदार नाहीत व हे आघाडी सरकार असल्याने पक्षश्रेष्ठीच याप्रकरणी योग्य तो निर्णय घेतील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
कॉंग्रेस आघाडी सरकाराअंतर्गत नव्याने निर्माण झालेल्या वादानंतर आज पहिल्यांदाच मुख्यमंत्री पत्रकारांच्या फैरींना सामोरे गेले. कॉंग्रेस भवनात प्रदेश कॉंग्रेस समितीच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी ते आले होते. यावेळी पत्रकारांनी त्यांना गाठले. सध्याच्या घटनाक्रमाबाबत आपण निश्ंिचत आहोत. असंतुष्टांशी चर्चा करावी असे आपल्याला वाटत नसल्याचे त्यांनी स्पष्टपणे नमूद केले.
पांडुरंग मडकईकर व दयानंद नार्वेकर यांचे मंत्रिपद काढून घेण्याचा निर्णय आपण नव्हे तर पक्षश्रेष्ठींनी घेतला होता. मडकईकरांना परत मंत्रिपद देण्याचे आश्वासनही आपण कधीच दिले नव्हते. वित्त खात्याकडून आपली अडवणूक होत असल्याचा आरोप काही मंत्र्यांकडून केला जात असल्याबाबत मुख्यमंत्र्यांना छेडले असता त्यांनी हा आरोप फेटाळून लावला.
विविध सरकारी प्रकल्प व विकासकामांवर होणारा खर्च अर्थसंकल्पात निश्चित केलेला असतो. त्यानुसारच तो खर्च करावा लागतो. आर्थिक स्थितीचा अभ्यास न करता अनाठायी प्रकल्पांचे प्रस्ताव तयार केले म्हणून त्यांना मान्यता देता येईल का, असा प्रतिप्रश्न त्यांनी केला. नियोजन आयोगाकडून राज्याचा वार्षिक आर्थिक आराखडा तयार केल्यानंतरच नियोजित विकासकामांवरील खर्चाचे चित्र स्पष्ट होते. सरकारला कर्ज घेण्यावरही अनेक निर्बंध असतात. राज्याच्या कर्जफेडीची क्षमता ओळखूनच ही कर्जे घेतली जातात. सार्वजनिक बांधकाममंत्री चर्चिल आलेमाव यांनी मलनिस्सारण जोडणीचा सुमारे एक हजार कोटी रुपयांचा प्रस्ताव थेट संबंधित महामंडळाकडून तयार करून हुडकोला पाठवला. त्याबाबत सरकारला माहितीच नाही. या प्रस्तावाला हुडकोने कर्जपुरवठा करण्याची तयारी दर्शवली असली तरी त्यासाठी त्यांनी घातलेल्या अटींची पूर्तता होणे शक्य नाही, असेही स्पष्टीकरण कामत यांनी केले. या प्रस्तावाबाबत पुढील अर्थसंकल्पात विचार करू व नियोजन आयोगालाही विश्वासात घेऊ असे आपण त्यांना सांगितल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
दरम्यान, सरकारातील मंत्री व आमदार अशा पद्धतीने वागत असतील तर त्यांना कसे काय आवरणार,असे विचारले असता मुख्यमंत्र्यांनी नेहमीप्रमाणे मौन पाळले. सहाव्या वेतन आयोगामुळे सरकारी तिरोजीवर अतिरिक्त भार पडला. त्यामुळे राज्याची अर्थव्यवस्था बिघडली. त्यात महसूल प्राप्तीसाठी जाहीर केलेल्या योजनाही मार्गी लागल्या नाहीत. मात्र अशा बिकट स्थितीतही या पदावर आपण टिकून राहिलो ही देवाचीच कृपा असल्याचे त्यांनी मान्य केले.

बोरकरांच्या कविता काळजाला भिडणाऱ्या

मराठी साहित्य संमलेनातील परिसंवादातील सूर
पणजी, दि. १६ (सांस्कृतिक प्रतिनिधी): अध्यात्मात जीवनातील सर्व घटक सामावले आहेत. कविवर्य बा. भ. बोरकर हे अध्यात्मनिष्ठ होते. त्यामुळे त्यांनी आपल्या साहित्यिक जीवनात संतवांङ्मयाची वाट पकडली होती. म्हणूनच त्यांच्या कविता काळजाला भिडतात. कविता ही कवितच असते ती जुनी किंवा नवी नसते. कवितेचे स्वरूप कोणतेही असले तरी ती
ती काळजाला भिडणारी असावी, असा सूर कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे आयोजित
पहील्या अखिल भारतीय मराठी साहित्य संस्कृती संमेलनाच्या दुसऱ्या दिवसाच्या प्रथम सत्रात झालेल्या "आनंदयात्री बाभ बोरकर' या परिसंवादात व्यक्त झाला.
अध्यक्षस्थानी डॉ. यशवंत पाठक होते. प्रा.अनिल सामंत, डॉ. सुरेश जोशी, व डॉ.सोमनाथ कोमरपंत व्यासपीठावर उपस्थित होते. डॉ.कोमरपंत यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला आणि स्वागत केले.
बोरकरांची विरक्त कविता या विषयावर बोलताना डॉ. जोशी म्हणाले, बोरकरांच्या कविता प्रीतरसात ओथंबलेल्या आढळतात. संतशैलीत न्हालेल्या बोरकरांच्या विरक्त कविता
म्हणजे विरक्तीची आनंदगीते आहेत. त्यांना आपल्या संस्कृतीचा अभिमान होता; पण त्यांनी इतर संस्कृतींचा द्वेष केला नाही. त्याचे मुख्य वैशिष्ट्य हेच होते. त्यामुळे ते सर्वार्थाने
ज्ञानेश्र्वर, टागोर, बालकवी यांच्या पंगतीत शोभतात.
प्रा. सामंत म्हणाले, संत जसे दुःखातही आनंदा साजरा करीत जगले त्याचप्रमाणे जीवनाकडे समग्रपणे बघण्याची दृष्टी बोरकरांकडे होती. त्यांच्या साहित्यातील विचार भावनेचे पंख घेऊन येतात. बोरकरांनी कोकणी आणि मराठी अशा दोन्ही भाषांत साहित्यनिर्मिती केली.
आज भाषेवरून तंटे निर्माण होतात. माणसामाणसांत द्वेषाच्या भिंती तयार होत आहेत. म्हणूनच बोरकरांसारख्या साहित्यिकांची जन्मशताब्दी साजरी करणे गरजेच आहे. निदान त्यामुळे भाषावादाला तिलांजली मिळण्यासाठी आवश्यक वातावरणनिर्मिती होऊ शकेल.
डॉ.यशवंत पाठक म्हणाले, बोरकरांसारखे कवी आत्मशोधाच्या जाणिवेला सन्मुख होऊन जगले. त्यांचे स्मरण अशा संमेलनातून होणे गरजेचे आहे.
आयोजकांच्या वतीने याप्रसंगी उपस्थित मान्यवरांना मानचिन्हे प्रदान करण्यात आली.

ऑस्ट्रेलियात भारतीयांना आता बारमध्येही 'बंदी'

मेलबर्न, दि. १६ : अलीकडेच भारतीय विद्यार्थ्यांवर जीवघेणे हल्ले झाल्याचे उदाहरण ताजे असतानाच भारतीयांना आता ऑस्ट्रेलियात मद्यालयातही प्रवेशबंदी करण्यात आली असून याचे कारण "वंशवाद' हेच असल्याचे सांगितले जात आहे. यासंदर्भात सुजन पाठक याने सांगितले की, अभिषेक अग्रवाल हा आमचा सहकारी लवकरच भारतात परतणार आहे. त्याला मेजवानी द्यावी या हेतून आम्ही सहाजण मित्रमंडळी येथील लायन हॉटेल बारमध्ये गेल्या बुधवारी गेलो. मात्र तेथे आम्हाला चक्क प्रवेश नाकारण्यात आला. आमच्यासोबत आमचे तिघे नेपाळी मित्रदेखील होते. आम्ही त्याबाबतचे कारण विचारले तेव्हा आम्हाला कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आले नाही. यातील आणखी संतापजनक गोष्ट म्हणजे आम्ही मित्रांनी ताबडतोब जवळच्या पोलिसांशी संपर्क साधून त्यांच्याकडे आमची कैफियत मांडली. मात्र त्यांनीही काखा वर केल्या आणि कोणतीही मदत करण्यास असमर्थता दर्शवली. एवढेच नव्हे तर मेलबर्नमधील जवळपास सर्वच बारमध्ये कोणत्याही ग्राहकास कसलेच स्पष्टीकरण देण्याला आम्ही बांधिल नाही, अशा नोटिसा लावण्यात आल्या आहेत.
आम्ही अजिबात मद्यपान केले नव्हते. रांगमध्ये शिस्तीत उभे होतो. मात्र आमचा क्रमांक येताच ताबडतोब तेथील मंडळींनी आम्हाला बाहेरचा दरवाजा दाखवला. आमच्याकडे वयाचे दाखले व परदेशात लागणारी सगळी कागदपत्रे व्यवस्थित होती. तरीही आम्हाला अक्षरशः तेथून हुसकावून लावण्यात आले. अखेर आम्ही दहा मिनिटे वाट पाहिली आणि तेथून घरची वाट धरली. तुम्ही मंडळी बारमध्ये जाऊ शकत नाही, एवढेच आम्हाला सांगण्यात आले, अशी माहिती पाठक याने दिली. सध्या ऑस्ट्रेलियामध्ये भारतीयांना हेतूपूर्वक लक्ष्य केले जात असल्याची अनेक उदाहरणे समोर आली आहेत. वंशवाद हेच त्यामागील कारण असल्याचे सांगितले जात आहे. मात्र ऑस्ट्रेलियन सरकारने ती शक्यता फेटाळून लावली आहे. या पार्श्वभूमीवर या युवकांना बारमध्ये प्रवेश नाकारल्याच्या मुद्यावरून नव्याने वादाचे मोहोळ उठण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. ऑस्ट्रेलियाच्या या दादागिरीचा भारतात तीव्र निषेध केला जात असल्याने भारत सरकारनेदेखील या घटना गंभीरपणे घेतल्या असून त्याबद्दल ऑस्ट्रेलियन सरकारला कडक भाषेत अवगत केले आहे. दुर्दैवाने तेथील सरकार अजूनही या घटना गंभीरपणे घ्यायला तयार नाही हेच ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या भारतीयांचे दुःख आहे.

थिवी अपघातात स्कूटरस्वार ठार

खनिजवाहू ट्रकचा चालक व क्लीनरचे पलायन
म्हापसा, दि. १६ (प्रतिनिधी): थिवी येथे खनिजवाहू ट्रकने समोरून येणाऱ्या कारला धडक देऊन ट्रक रस्त्यावरच उलटला. त्यामुळे ट्रकातील मातीच्या ढिगाऱ्याखाली दोन दुचाकी वाहनचालक सापडून बिजू के. बी. हा मुळचा केरळीय व सध्या डिचोली येथे राहणारा ३० वर्षीय तरुणमरण पावला. तसेच यामाह चालक प्रकाश गुरुदास सावंत हा गंभीर जखमी झाला असून त्याला बांबोळी येथे गोमेकॉ इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. यातील संतापजनक बाब म्हणजे अपघातानंतर सदर खनिजवाहू ट्रकचा चालक आणि क्लीनर तेथून पळून गेले. त्यांचा शोध पोलिस घेत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आज संध्याकाळी जीए-०४-टी-३०३४ या क्रमांकाचा ट्रक खनिजमाती घेऊन करासवाडाहून डिचोलीच्या दिशेने निघाला होता. त्याचवेळी धुमस्कर हॉस्पिटलच्या जरा पुढे गेल्यानंतर समोरून येणाऱ्या जीए-०१०जे-९२४ या क्रमांकाच्या एस्टीम कारला सदर ट्रकने धडक दिली. कारला धडक दिल्यानंतर ट्रक लगेच रस्त्यावर आडवा होऊन आतील खनिजमाती रस्त्यावरच सांडली. तेथून तेव्हाच जीए-०१-एफ-३९१४ या क्रमांकाची यामह व जीए-०४-डी-०५२७ या क्रमांकाची डिओ स्कूटर घेऊन निघालेले चालक मातीच्या ढिगाऱ्यात घुसमटले. त्यापैकी डिओ स्कूटरचा चालक बिजू के.बी. याचा मृत्यू झाला. तसेच यामह मोटरसायकलचा चालक प्रकाश गुरूदास सावंत (३३) गंभीर जखमी झाला. त्याला बांबोळी येथे उपचारासाठी नेण्यात आले आहे. कारमधील के. बी. गांधी (७९) हे किरकोळ जखमी झाले. त्यांना म्हापशातील आझिलो इस्पितळात उपचार करून घरी पाठवण्यात आले.
दरम्यान, खनिजमालाचा ट्रकच आडवा झाल्याने सुमारे एक तासभर वाहतुकीत अडथळा निर्माण झाला होता. म्हापसा अग्निशामक दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आल्यानंतर अपघातग्रस्त वाहने ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आली. तसेच नंतर सदर खनिजमाती हटवण्यात आल्यावर वाहतूक पूर्ववत सुरू झाली.
याप्रकरणी म्हापशाचे पोलिस उपनिरीक्षक मोहन नाईक, तुळशीदास धावलकर, व पोलिस शिपाई सुशांत चोपडेकर तपास करीत आहेत.