यावेळी जादा जागांवर दावा करणार
पणजी, दि. ३० (प्रतिनिधी): मगो पक्षाची संघटनात्मक फरफट सुरू असतानाच त्याचा लाभ उठवण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आता पुढे सरसावला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष प्रा. सुरेंद्र सिरसाट यांनी आपल्या वैयक्तिक राजकीय संबंधांचा उपयोग पक्षासाठी करून देण्याची व्यूहरचना आखली आहे. विविध ठिकाणी दुर्लक्षित राहिलेल्या मगो कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीकडे आकर्षित करून पक्षाचा विस्तार चाळीसही मतदारसंघांत करण्याचे जोरदार प्रयत्न सुरू असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने गेल्या वेळापेक्षा जादा जागांवर दावा करण्याचा विचार चालवला आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वाट्याला सहा जागा आल्या होत्या. यावेळी मात्र या जागा वाढवून घेण्यासाठी त्यांनी राज्यातील बिगर कॉंग्रेस मतदारसंघांकडे आपले लक्ष्य केंद्रित केले आहे. बिगर कॉंग्रेस मतदारसंघांत पक्ष प्रबळ उमेदवारांच्या शोधात असल्याचीही माहिती सूत्रांनी दिली. प्रा. सुरेंद्र सिरसाट यांच्याकडे संपर्क साधला असता त्यांनी सध्या सर्व मतदारसंघांत गट समित्या स्थापन करण्याचे काम जोरात सुरू असल्याचे सांगितले. उत्तर गोव्यातील बहुतांश गट समित्यांची स्थापना करण्यात आली असून दक्षिण गोव्याचे काम सुरू आहे. पुढील आठवड्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीसंबंधीचा आढावा घेण्यासाठी महत्त्वाची बैठक बोलावली जाईल, असेही प्रा. सिरसाट म्हणाले.
थिवी, बाणावली, वास्को, म्हापसा, शिवोली व साळगाव हे मतदारसंघ राष्ट्रवादीला देण्यात आले होते. उत्तर गोव्यात पर्वरी हा नवा मतदारसंघ तयार झाल्याने राष्ट्रवादी निश्चितच या मतदारसंघावर दावा करणार, असेही त्यांनी स्पष्ट केले. पक्षाचे आमदार मिकी पाशेको यांनी नुवे मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे यापूर्वीच जाहीर केले आहे. नुवे मतदारसंघासह बाणावली मतदारसंघाचा दावाही ते सोडणार नसल्याचे त्यांनी ठासून सांगितल्याने तो देखील कळीचा मुद्दा ठरणार आहे.
कॉंग्रेसकडून राष्ट्रवादी आमदारांची कोंडी
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष हा विद्यमान आघाडीचा महत्त्वाचा घटक असला तरी या पक्षाची ताकद वाढता कामा नये यासाठी कॉंग्रेसकडून राष्ट्रवादीच्या आमदारांची जबर कोंडी करण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. मिकी पाशेको यांच्यावर एकापाठोपाठ एक गुन्हेगारी प्रकरणे दाखल केली जात आहेत. महसूलमंत्री जुझे फिलिप डिसोझा यांची मुरगांव पालिकेच्या माध्यमाने दमछाक करण्याचा सपाटा लावला आहे. पर्यटनमंत्री नीळकंठ हळर्णकर यांच्या मागेही ससेमिरा लावण्याचे घाटत असल्याची खबर आहे. कांदोळी समुद्रकिनार्यावरील रिव्हर प्रिन्सेस जहाज हटविण्याचे काम सुरू झाले आहे. या जहाजाबाबतचे सर्व निर्णय राज्य आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरणाकडून घेतले जातात. परंतु या निर्णयांची कार्यवाही मात्र पर्यटन खात्यामार्फत केली जाते. खुद्द या प्राधिकरणावर पर्यटनमंत्र्यांना स्थान नाही. प्राधिकरणाने घेतलेल्या निर्णयांना मान्यता देण्याचे काम त्यांच्याकडून करवून घेत असल्याचेही कळते. रिव्हर प्रिन्सेसच्या भंगारावरून निर्माण झालेला वाद कळीचा मुद्दा बनल्याचीही खबर आहे. भंगारासाठी निविदेव्दारे प्रस्ताव मागवण्याच्या नीळकंठ हळर्णकर यांच्या मागणीला फाटा देऊन हे कंत्राट अरीहंत कंपनीलाच देण्याचा निर्णय आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरणाकडून घेण्यात आला. आता रिव्हर प्रिन्सेसच्या सर्व व्यवहारांना उत्तर देण्याचे उत्तरदायित्व मात्र पर्यटनमंत्री या नात्याने त्यांच्याकडे राहणार असल्याने ते काहीसे नाराज बनल्याचेही कळते.
Sunday, 1 May 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment