पणजी, दि. ४ (प्रतिनिधी)
महाराष्ट्राला जोडून असलेली गोव्याची किनारपट्टी किती सुरक्षित आहे हे पाहण्यासाठी आज सकाळपासून ‘ऑपरेशन सागर कवच’ या ‘मॉकड्रिल’ला सुरुवात झाली आहे. यावेळी जुने गोवे येथील बॅसेलिका बॉर्न जीझस चर्चमध्ये बनावट दहशतवाद्याला ताब्यात घेण्यात आले. चर्चच्या पहिल्या गेटमधून सदर व्यक्ती आतमध्ये जाण्यास यशस्वी ठरली. मात्र, प्रत्यक्ष झडती असलेल्या ठिकाणी त्याला ताब्यात घेण्यास पोलिसांना यश आले. मडगाव येथेही अशाच प्रकारच्या एका बनावट दहशतवाद्याला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
आज सकाळपासूनच संपूर्ण राज्यात विविध ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. या ठिकाणी संशयास्पद वाटणार्या वाहनांना अडवून त्यांचीही चौकशी केली जात होती. या ‘मॉकड्रिल’मध्ये भारतीय नौदल, तटरक्षक दल, गोवा पोलिस, किनारपट्टी पोलिस, अग्निशमन दल, जकात खाते, एमपीटी, मच्छीमार खाते व ‘सीएसएफआय’ तुकडी आदी सहभागी झाले आहेत. आपत्कालीन परिस्थितीत या सर्व यंत्रणांमध्ये कशा प्रकारे समन्वय साधला जातो, हे पाहण्यासाठी अशा प्रकारची कसोटी घेतली जाते, अशी माहिती उत्तर गोवा पोलिस अधीक्षक अरविंद गावस यांनी दिली. या मॉकड्रिलमध्ये कोणत्या यंत्रणेने कशा प्रकारे कामगिरी बजावली किंवा कोणत्या त्रुटी राहिल्या याचा संपूर्ण अहवाल केंद्रीय गृहखात्याला पाठवून दिला जाणार असल्याचीही माहिती मिळाली आहे.
आज सकाळी सहा वाजल्यापासून सुरू झालेले हे मॉकड्रिल उद्या सायंकाळपर्यंत सुरू राहणार आहे. यात संपूर्ण पोलिस खाते सहभागी झाले आहे. यावेळी राज्यातील पोलिस स्थानके, पोलिस नियंत्रण कक्ष आणि गस्तीवर असलेले पोलिस यांच्यात कशा पद्धतीने समन्वय साधला जातो, हेही पाहिले जाणार असल्याचे श्री. गावस यांनी सांगितले.
दरम्यान, नाकाबंदीमुळे अनेक ठिकाणी वाहनांची कोंडी झाली होती. काय चालले आहे, याची माहिती मिळाली नसल्याने काही ठिकाणी लोकांनी पोलिसांशी वादही घातला. तर, अनेकांनी अल कायदा या दहशतवादी संघटनेचा मुख्य सूत्रधार ओसामा बिन लादेन याला मारल्याने सुरक्षा वाढवण्यात आली आहे, असा कयास लावला.
Thursday, 5 May 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment