तेरेखोल प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीची मागणी
पणजी, दि. ६ (प्रतिनिधी)
तेरेखोल गावाचे अस्तित्वच संपवू पाहणार्या ‘लीडिंग हॉटेल्स’च्या कथित गोल्फ कोर्स प्रकल्पामागचे खरे सूत्रधार पेडणेचे युवा उद्योजक म्हणवून घेणारे व अलीकडे विविध उपक्रमांचा धडाका लावलेले माजी मंत्री संगीता परब यांचे पुत्र सचिन परब हेच आहेत, असा सनसनाटी आरोप तेरेखोलवासीयांनी केला आहे. तेरेखोलात हॉटेल प्रकल्प उभा राहणार असल्याचे सांगून आता हळूच ‘गोल्फ कोर्स’ प्रकल्प पुढे रेटला जात असल्याने या गौडबंगालाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, अशी मागणी सेंट अँथनी कूळ व मुंडकार संघटनेतर्फे करण्यात आली आहे.
तेरेखोल गावच्या कथित जमीन व्यवहारांतील एकेका प्रकरणाचा पडदा आता बाजूला होत असून त्यामुळे या प्रकरणातील एकूणच गोलमाल समोर यायला लागला आहे. मुळातच तेरेखोलातील जमीनमालकाने सदर कंपनीकडे केलेला जमीन विक्री व्यवहार हा कूळ व मुंडकार कायद्याची उघडपणे पायमल्ली करणारा ठरला आहे. तेरेखोल गावातील अनेक कुटुंबीयांना कूळ व मुंडकारी अधिकार प्राप्त झाले आहेत. असे असताना ही जमिनीची परस्पर विक्री कशी काय करण्यात आली, असा सवाल उपस्थित झाला आहे. या गावातील अनेक लोकांना कूळ व मुंडकार कायद्याखाली सनदा प्राप्त झालेल्या आहेत. एकचौदाच्या उतार्यावर त्यांची नावे तेवढी येणे बाकी आहे. एकूण ४० प्रकरणी कुळांना अधिकार देण्याबाबतच्या ‘फॉर्म-२’ अंतर्गत नोटिसाही जमीनदाराला पाठवण्यात आलेल्या आहेत. १९९४ साली याबाबतची सुनावणी घेऊन या लोकांना अधिकार बहाल करण्यात आले होते. आता ही जमीन कूळ व मुंडकारांच्या हातात येण्याची वेळ आली असतानाच या गरीब लोकांच्या अज्ञानाचा लाभ उठवून हा जमीन विक्रीचा व्यवहार करण्यात आला, असाही आरोप या लोकांनी केला आहे. कुळांचे अधिकार देण्याच्या सुनावणीवेळी तिथे न फिरकलेले जमीनदार आता अचानक मामलेदारांनी दिलेल्या आदेशांना आव्हान देतात, यावरूनच कुठे तरी पाणी मुरत असल्याचे दिसून येत आहे.
या प्रकरणातील मुख्य गोम अशी की, या गावातील अनेक कुटुंबे ही मुंबई किंवा इतर ठिकाणी स्थायिक झालेली आहेत व अशा लोकांना हाताशी धरून त्यांच्याकडून जमिनी विकत घेण्यात आल्या आहेत. या गावात वास्तव्य करणार्या लोकांनी मात्र आपल्या जमिनी देण्यास स्पष्ट नकार दिल्यानेच हे घोडे अडले आहे. कधीकाळी कूळ व मुंडकार असल्याचा दावा करणार्या काही लोकांनी स्वतःहून आपला या जमिनीशी काहीही संबंध नसल्याची प्रतिज्ञापत्रे सादर केली आहेत व या जमिनीचा ताबा ‘लीडिंग हॉटेल्स’ कडे दिला आहे, असेही आता उघड झाले आहे.
तेरेखोल गावाचा समावेश केरी पंचायतीत होतो. तेरेखोलवासीयांचा या प्रकल्पाला विरोध होत असल्याने सचिन परब यांनी केरी गावातील काही लोकांना हाताशी धरून या हॉटेल प्रकल्पाला पाठिंबा मिळवून देण्याचेही बरेच ‘उद्योग’ यापूर्वी केले आहेत. या हॉटेल प्रकल्पाबाबत आराखडा सादर करण्याची वारंवार मागणी करूनही त्याबाबत लोकांना काहीही माहिती देण्यात आली नाही, असेही आता येथील लोक उघडपणे बोलू लागले आहेत. काही पत्रकारांना हाताशी धरून व त्यांच्यासाठी पंचतारांकित हॉटेलांत मेजवान्या आयोजित करून तेरेखोलवासीयांचा विरोध मोडून काढण्याचेही बरेच प्रयत्न झाल्याची माहिती आता समोर आली आहे.
महसूल खात्यावरही संशयाचे सुई
महसूल खाते हे सध्या राष्ट्रवादीचे नेते जुझे फिलिप डिसोझा यांच्याकडे आहे. संगीता परब या राष्ट्रवादीच्या नेत्या असल्याने या हॉटेलच्या जमीन व्यवहारात महसूल खात्याचा वापर करण्यात आल्याचा संशयही आता बळावला आहे. गेली कित्येक वर्षे पेडणेचे मामलेदार व उपजिल्हाधिकारी कार्यालयांत अनेक कूळ व मुंडकार प्रकरणे प्रलंबित आहेत. अशा वेळी तेरेखोलातील प्रकरणे मात्र तात्काळ निकालात काढण्यात येतात यामागचे नेमके गुपित काय, असाही प्रश्न आता लोक उपस्थित करीत आहेत.
डॉ. विलींचाही खटाटोप
राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष डॉ. विल्फ्रेड डिसोझा यांनीही तेरेखोलात ख्रिस्ती धर्मगुरूंना हाताशी धरून तेथील लोकांनी आपल्या जमिनी या हॉटेलसाठी द्याव्यात म्हणून प्रयत्न चालवला होता, असाही एक प्रकार समोर आला आहे. तेरेखोलवासीयांनी मात्र त्यांचा हा प्रस्ताव फेटाळून लावल्याने त्यांनी हळूच या प्रकरणातून आपली सुटका करून घेतल्याचे सांगण्यात येते. या एकूण व्यवहारांत राजकीय स्तरापासून वरिष्ठ प्रशासकीय अधिकार्यांची एक मतलबी मालिकाच गुंफली गेली आहे व त्यामुळे या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी व्हावी, अशी मागणी संघटनेतर्फे करण्यात आली आहे.
Saturday, 7 May 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment