पणजी, दि. ३ (प्रतिनिधी)
वेर्ला - काणकाचे पंचसदस्य संतोष मोरजकर यांना आज मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने अपात्र घोषित केले. पत्नीने बांधकामासाठी मागितलेल्या ना हरकत दाखल्याला मंजुरी देण्याच्या बैठकीत स्वतः मोरजकर हेच उपस्थित असल्याचे न्यायालयाने नेमलेल्या आयुक्तांच्या अहवालात सिद्ध झाल्यानंतर आज त्यांना अपात्र ठरवल्याचा निवाडा खंडपीठाने दिला. या विषयीची याचिका मोहन दाबाळे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात दाखल केली होती.
संतोष मोरजकर यांची पत्नी श्वेता मोरजकर यांनी बांधकामासाठी ना हरकत दाखला मिळवण्यासाठी पंचायतीत अर्ज केला होता. या अर्जाला मंजुरी देण्यासाठी पंचायतीत घेण्यात आलेल्या बैठकीला संतोष मोरजकर उपस्थित होते, असा दावा करून मोहन दाबाळे यांनी खंडपीठात याचिका दाखल केली होती. सदर याचिका सुनावणीस आली असता खंडपीठाने याची चौकशी करण्यासाठी आयुक्तांची नेमणूक केली होती. तर, आयुक्तांना येणारा खर्चही अर्धा याचिकादार तसेच, अर्धा खर्च प्रतिवादीकडून घेण्यात आला होता. ही चौकशी सुरू असताना प्रतिवादी संतोष मोरजकर यांनी आपल्या वकिलाला कोणतीही कल्पना न देता वेर्ला काणका पंचायतीचे अन्य पंचसदस्य तसेच सरपंच कशी गैरकृत्ये करतात यासंबंधीचे एक पत्र न्यायाधीशांना पाठवले होते. सदर प्रकरणावर सुनावणी सुरू असताना आणि आपल्या वकिलाला विश्वासात न घेता थेट न्यायाधीशांना पत्र लिहिल्याची दखल घेत न्यायालयाने श्री. मोरजकर यांच्याविरुद्ध अवमान याचिका सादर केली होती. परंतु, यावेळी त्यांनी न्यायालयाची माफी मागितल्यानंतर सदर याचिका मागे घेण्यात आली होती. परंतु, आयुक्तांच्या चौकशीत ना हरकत दाखल्याला मंजुरी देणार्या बैठकीत ते स्वतः उपस्थित असल्याचे उघड झाल्यानंतर त्यांना अपात्र ठरवण्याचे आदेश खंडपीठाने दिले.
Wednesday, 4 May 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment