पणजी, दि. ३० (प्रतिनिधी): राज्यसभेसाठी आपली निवड झाली तर आपल्याला ते निश्चितच आवडेल. परंतु, त्यासाठी कॉंग्रेस श्रेष्ठी व स्थानिक नेत्यांची पसंती मिळणे आवश्यक आहे, अशी प्रतिक्रिया राज्य कायदा आयोगाचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय कायदामंत्री ऍड. रमाकांत खलप यांनी व्यक्त केली. सर्वसंमतीने तसा प्रस्ताव सादर झाला तर आपण तो निश्चितच स्वीकारू, असेही ते म्हणाले.
गोव्यातील एकमेव राज्यसभा खासदारपदाची मुदत ३० जून २०११ रोजी संपत आहे. खासदार शांताराम नाईक यांच्याकडे असलेल्या या पदासाठी कॉंग्रेस पक्षातील अनेक नेते उत्सुक आहेत. पण अजून दोन महिन्यांचा अवधी असल्याने त्याबाबत कुणीही उघड भूमिका घेत नसल्याचेच दिसून येते. खासदार शांताराम नाईक हे आपली पुन्हा एकदा या पदासाठी वर्णी लागावी यासाठी प्रयत्नरत आहेत. सभापती प्रतापसिंग राणे यांनाही या पदाची ‘ऑफर’ कॉंग्रेस श्रेष्ठींकडून मिळण्याची शक्यता कॉंग्रेस सूत्रांकडून वर्तवली जाते. दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडूनही आपले महत्त्व वाढवले जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही. सध्या विधानसभेतील संख्याबळ कॉंग्रेस- २०, भाजप-१४, मगो-२ व अपक्ष-१ असे आहे. या परिस्थितीत कॉंग्रेससमोर आव्हान उभे करण्यासाठी भाजपकडून आघाडीतील इतर घटकांच्या सहकार्याने सामंजस्य उमेदवार पुढे केला जाण्याचाही संभव आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी राज्यसभेच्या जागेबाबत योग्य वेळी आपला पत्ता उघड करणार असल्याचे सांगितले.
Sunday, 1 May 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment