Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday, 1 May 2011

अण्णा हजारे ७ रोजी गोव्यात

भ्रष्टाचाराविरोधात आसूड उगारणार!
पणजी, दि. ३० (प्रतिनिधी): देश पातळीवर भ्रष्टाचाराविरोधात खणखणीत आवाज उठवलेले राळेगणसिद्धीचे ज्येष्ठ समाजसेवक आदरणीय अण्णा हजारे हे येत्या ७ मे रोजी गोव्यात येणार आहेत. त्याच दिवशी आझाद मैदानावर संध्याकाळी ५ वाजता त्यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी मॅगासेसे पुरस्कार विजेते सामाजिक कार्यकर्ते अरविंद केजरीवाल आणि स्वामी अग्निवेश यांचीही खास उपस्थिती असेल. या सभेचे आयोजन ‘इंडिया अगेन्स्ट करप्शन’ने केले आहे.
सदर जाहीर सभेत जन लोकपाल विधेयकाचे समर्थन, गोव्याच्या संदर्भात लोकायुक्त विधेयकाविषयक मार्गदर्शन आणि पंचायतराज व ग्रामसभांचे लोकशाहीत योगदान या विषयी प्रबोधन करण्यात येणार आहे. त्याचबरोबर ७ मे रोजी मडगाव, वास्को येथेही अशाच स्वरूपाचे कार्यक्रम होणार आहेत. त्यांचा तपशील नंतर जाहीर करण्यात येईल, असे सांगण्यात आले.
सध्या अण्णा हजारे गुडघेदुखीने त्रस्त आहेत. त्यांच्यावर पुण्यातील संचेती इस्पितळात उपचार सुरू आहेत. असे असूनही गोव्याला भेट देण्याचे त्यांनी मान्य केले आहे. त्यांच्या स्वागतासाठी गोवा सज्ज होत असून या भेटीत ते भ्रष्टाचारावर कसा आसूड उगारतात या विषयी प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यांच्या या जाहीर सभेला नागरिकांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
दिल्लीतील जंतरमंतर येथे भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून केंद्रातील संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारला अण्णांनी आपल्या उपोषणाच्या माध्यमातून धडकी भरवल्याची घटना ताजीच आहे. केवळ त्यांच्या या कृतीमुळेच आता लोकपाल विधेयकाचा मुद्दा तडीला लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. देशाच्या इतर भागांप्रमाणेच गोव्यातही सध्या भ्रष्टाचाराने प्रचंड थैमान घातले आहे. तो रोखण्यासाठी अण्णा हजारे कोणता संदेश देतात हे ऐकण्याची उत्सुकता गोमंतकीयांना लागून राहिली आहे.

No comments: