- प्रवीण दवणे
प्रतिभावान गीतकार जगदीश खेबुडकर यांचे जाणे सार्यांसाठीच चटका लावणारे आहे. आधीच्या पिढीप्रमाणेच याही पिढीतील गीतकार, संगीतकार आणि रसिकांवर पुत्रवत प्रेम करणारी एक मोठी व्यक्ती गेल्याचे दु:ख आज होत आहे. त्यांच्या आणि माझ्या वेळोवेळी अनेक भेटी झाल्या होत्या. त्यावेळी ते माझ्या लेखन प्रवासाविषयी आवर्जून चौकशी करत. प्रयत्नांना दाद देत. हा मनाचा मोठेपणा सध्या कमी प्रमाणात पहायला मिळतो. माडगुळकरांच्या परंपरेतील समकालीन लिखाण करुनसुध्दा नव्या पिढीला आवडणारी अवीट गोडीची गाणीतितक्याच ताकदीने लिहिली. ‘आराम हराम आहे’ या चित्रपटात ग. दि. माडगुळकर आणि जगदीश खेबुडकर या दोघांचीही गाणी होती. त्यातील ‘आकाशी झेप घे रे पाखरा’ हे गाणे खेबुडकरांचे पण ते ऐकताना माडगुळकरांचे आहे असेच वाटत असे. त्यावेळी साहित्य क्षेत्राला माडगुळकरांसारख्या कल्पतरुची सावली होती. त्यांच्या तोडीचे लिखाण करणे ही वाटते तेवढी सोपी गोष्ट नव्हती.
खेबुडकरांच्या गीतांना अस्सल मराठी मातीचा सुंगध लाभला होता. कोल्हापूरचे असल्यामुळे तेथील रंगेलपणा, शृंगार या बाबी त्यांच्या काव्यातून प्रकट होत. त्यांनी गीतरचनेचे शिखर गाठले होते असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. त्यांची सर्वच गाणी अवीट गोडीची होती. पण त्यातल्या त्यात ‘पिंजरा’ या चित्रपटातील ‘तुम्हावर केली मी मर्जी बहाल’ हे गाणे मला सर्वाधिक आवडते. पेशाने शिक्षक असुनही खेबुडकरांनी लावणीतील शृंगाराचा तोल सांभाळला होता. तो कधी ढळू दिला नाही. खेबुडकरांनी मराठी चित्रसृष्टीचे वैभव जतन करण्याचा सतत प्रयत्न केला.
अगदी अलीकडे म्हणजे नुकत्याच पार पडलेल्या ठाण्यातील साहित्य संमेलनात खेबुडकरांची भेट झाली होती. त्यावेळी ते भरभरून बोलले होते. कमालीची विनम्रता हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणावे लागेल. अर्थात इतके विपुल लेखन करूनही आपल्याला कवितेच्या परंपरेतील मानले जात नाही याची त्यांना खंत होती. त्यांनी मराठी चित्रसृष्टीच्या वैभवात मोलाचीभर घातली. मात्र स्वत: वैभव उपभोगणे झालेच नाही. अखेरपर्यंत त्यांनी स्वभावातील आणि आणि वागण्याबोलण्यातील साधेपणा जपला होता. कोणालाही नकार देण्याचा त्यांचा स्वभाव नव्हता. त्यामुळे अगदी नौख्या संगीतकारांसाठीही त्यांनी गीत लेखन केले. सिध्दहस्त बाण्याचे गीतकार म्हणूनही खेबुडकरांचा उल्लेख करावा लागेल. कोरा कागद जणू त्यांच्या निमंत्रणाची वाटच पाहत असायचा. एकदा खेबुडकरांनी पेन उचलले की त्या कागदावर भराभर ओळी लिहिल्या जायच्या. त्यात थांबणे नव्हते. त्यांनी अनेक गीते एकाच बैठकीत लिहून पूर्ण केली. ङ्गक्त ते गीत लिहिण्यापूर्वी त्याचा आशय, चित्रपटातील प्रसंग आणि चित्रपटाची कथा याबाबी लक्षात घेत. काही क्षण विचार करत आणि मग लिहायला सुरूवात व्हायची.
जगदीश खेबुडकरांनी वयाची पंचाहत्तरी ओलांडली होती. पण त्यांच्या लेखणीला वयाचा स्पर्श कधीच झाला नाही. सध्या अलीकडेच त्यांनी अजय-अतुल या युवा संगीतकारासाठी ‘मोरया मोरया’ हे गाणे लिहिले. या गीत तरुण वर्गात किती लोकप्रिय झाले आहे याची सार्यांनाच कल्पना आहे. ‘नवरा माझा नवसाचा’ या चित्रपटातील ‘हिरवा निसर्ग हा भवतीने’ हे गीत सोनू निगमसाठी लिहिले. वय वाढले तरी सृजनशक्ती तरुण ठेवणे वाटते तेवढे सोपे काम नाही. अशा महनीय व्यक्तीचे आशिर्वाद आम्हा मंडळींच्या पाठीशी सदैव असणार आहेत. गीतलेखन क्षेत्रात इतकी भरीव कामगिरी केल्याबद्दल खेबुडकरांना पद्मभूषण किताब मिळायला हवा होता. अशी मोठी व्यक्ती गेल्यानंतर खूप कौतुक होते पण ते ‘याची देही याचि डोळा’ पाहण्यातील समाधान काही औरच असते. त्यामुळे खेबुडकर मोठ्या सन्मानापासून दूर राहिले याची खंत त्यांच्यावर प्रेम करणार्या सार्यांनाच वाटणे साहजिक आहे. मात्र, खेबुडकरांना रसिकांचे उदंड प्रेम मिळाले यात शंका नाही.
जगदीश खेबुडकर हे गीत लेखनाच्या कुटुंबाचे पितृछत्र होते. ते आज हरपले आहे. त्यांच्या गीतात जी विविधता होती तशा स्वरुपाची गीते ङ्गार थोड्यांनी लिहिली असतील. भावगीत असो वा भक्तीगीत, लावणी असो वा प्रेमगीत, त्या-त्या गीतांमधून भावना नेमक्या व्यक्त होत. सोपे आणि काळजाला भिडणारे शब्द हे सुध्दा खेबुडकरांच्या गीतांचे वैशिष्ट्य होते. त्यामुळे त्यांची गाणी खेड्या-पाड्यातूनही आवडीने गायली जात. अगदी अशिक्षित, अल्पशिक्षित लोकही त्यांच्या गाण्यात बेधुंद होत. त्यांच्या गाण्यातील शब्दरचना अतिशय प्रभावी होती. ‘देहाची तिजोरी, भक्तीचाच ठेवा’ या गीताचे शब्द तर सुभाषित ठरावेत असे आहेत. खेबुडकर एक सिध्दहस्त कवी होते. ते मला नेहमी ‘कवीराज’ या नावाने हाक मारायचे. एवढ्या मोठ्या व्यक्तीने अशा प्रकारे हाक मारणे हा अनुभवच वेगळा होता. ‘मी कसला गीतकार, मी तर सामान्य माणूस’ हे त्यांचे शब्द ऐकले की विनम्रतेची साक्षात प्रचिती यायची. सध्याच्या काळात अशी विनम्रता पहायला मिळणे कठीण आहे.
खेबुडकरांची जवळपास सारीच गाणी घराघरात आवडीने ऐकली आणि गायली जात आहेत. यापुढेही या गीतांची लोकप्रियता कायम राहणार आहे. या सर्जनशील गीतकाराला विनम्र आदरांजली.
Wednesday, 4 May 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment