पणजी व म्हापसा, दि. ४ (प्रतिनिधी)
हणजूण समुद्रकिनार्यावरील प्रसिद्ध ‘पॅराडिसो’ नाइट क्लबचे बांधकाम न्यायालयाच्या आदेशानुसार अतिक्रमण विरोधी पथकाने जेसीबी मशीनच्या साह्याने आज सकाळी पाडले.
‘सीआरझेड’चे उल्लंघन करून नंदन कुडचडकर यांनी हणजूण समुद्रालगत असलेल्या टोकाला पॅराडिसो नाइट क्लबचे बांधकाम केले होते. सदर बांधकाम सीआरझेड नियमांचे उल्लंघन करून झाल्याचे उघडकीस आल्याने त्यांना या संदर्भात नोटीस पाठवून सदर बांधकाम पाडण्याची सूचनाही करण्यात आली होती. परंतु, त्या नोटिशीला श्री. कुडचडकर यांनी कोणताही दाद दिली नसल्याने त्याविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात पर्यटन खात्याने याचिका सादर केली होती.
या याचिकेच्या सुनावणीनंतर न्यायालयाने दि. १४ डिसेंबर २०१०मध्ये बेकायदेशीररीत्या उभारलेले सदर बांधकाम पाडण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आता तब्बल चार महिन्यानंतर आज किनारपट्टी नियमन प्राधिकरणाने कारवाई करून हे बांधकाम पाडले. हणजूण येथे सर्वे क्रमांक २१२/६ व २१२/७मध्ये या क्लबचे बांधकाम केले होते. न्यायालयाच्या आदेशानुसार उपजिल्हाधिकारी दशरथ रेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली मामलेदार गौरीश शंखवाळकर, सह मामलेदार अंजू केरकर, तलाठी गुरुदास मांद्रेकर व सचिव यावेळी उपस्थित होते.
Thursday, 5 May 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment