प्रकल्पासाठी कंपनीची निवड
पणजी,द. ३० (प्रतिनिधी): गोवा मुक्त होऊन पन्नास वर्षे उलटली तरीही विकासापासून पूर्णपणे दुर्लक्षित राहिलेल्या पेडणे तालुक्यातील तेरेखोल गावाचा चेहरामोहराच बदलण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. पर्यटन उद्योगाच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणारा गोल्फ कोर्स प्रकल्प या गावात उभारला जाणार असून त्यासाठी ‘लीडिंग हॉटेल्स प्रा. ली.’ कंपनीची निवड करण्यात आली आहे.
पर्यटन खात्याचे संचालक स्वप्निल नाईक यांनी ही माहिती दिली. या नियोजित गोल्फ कोर्ससाठी काही दिवसांपूर्वी खात्यातर्फे जागतिक इच्छा प्रस्ताव मागवण्यात आले होते. हे प्रस्ताव खोलण्यात आले असून त्यात लीडिंग हॉटेल्स प्रा.लि. कंपनीची निवड करण्यात आली. या स्पर्धेत डीएलएफ व ऑक्सफर्ड प्रॉपर्टीज कंपन्यांचाही समावेश होता. निवड झालेल्या कंपनीला विस्तृत प्रस्ताव सादर करण्यास सांगितल्याचेही ते म्हणाले. हा प्रकल्प आंतरराष्ट्रीय दर्जाचा असेल व त्याचे व्यवस्थापन या क्षेत्रातील एका नामांकित समूहाच्या मदतीने केले जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
तेरेखोल हा गाव गोव्याचाच एक भाग असूनही तो तेरेखोल नदीमुळे पैलतीरी वसलेला आहे. केरी व पालये येथून फेरीबोटीच्या मदतीने या गावात जाण्याची सोय आहे. बहुतांश ख्रिस्ती बांधव वास्तव्य करीत असलेल्या या गावाला वीज महाराष्ट्र राज्यातून देण्यात आली आहे. गोवा मुक्ती लढ्याचा साक्षीदार असलेला तेरेखोल किल्लाही या गावात असल्याने पर्यटनाच्या दृष्टीने या गावाचा विकास करण्यास मोठा वाव आहे. हा गाव खर्या अर्थाने गोव्याला जोडण्यासाठी इथे पुलाची गरज असल्याची मागणी मांद्रेचे आमदार लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी सातत्याने लावून धरली होती. यंदा अर्थसंकल्पीय अधिवेशनात ही मागणी सरकारने मान्यही केली आहे. या गावात एक मोठा हॉटेल प्रकल्प उभारला जात असून त्यावरून गेल्या काही काळापासून हा गाव बराच चर्चेत आहे. या संपूर्ण गावाचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास करण्याचे सरकारने ठरवले आहे. पेडणेच्या प्रादेशिक आराखड्यात तेरेखोल येथे नियोजित गोल्फ कोर्ससाठीची जागा दाखवण्यात आली आहे. एकूण १५० एकर जमिनीत हा गोल्फ कोर्स उभारण्यात येणार असून उर्वरित ५० एकर जागा संबंधित सुविधांसाठी वापरण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी राज्य सरकारला एकही पैसा खर्च करण्याची गरज नसून तो ‘पीपीपी’ तत्त्वावर राबवण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय पर्यटक गोव्याकडे वळतील, असा विश्वासही पर्यटन खात्याने व्यक्त केला आहे.
Sunday, 1 May 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment