वाळपई, दि. ३ (प्रतिनिधी)
देऊळवाडा - मोर्ले येथील तुषार तुळशीदास गावकर या नऊ वर्षीय मुलाचा ठाणे - सत्तरी येथे नदीत बुडाल्याने दुर्दैवी अंत झाला.
तिसरीत शिकणारा तुषार सुट्टीत आठ दिवसांपूर्वी ठाणे येथे आपल्या मावशीकडे आला होता. त्याचे आजोळही तिथेच आहे. तो आपल्या मावसभावांसोबत देसाईवाडा ठाणे येथे नदीवर आंघोळीसाठी गेला असता तिथे बुडाला. त्या दोघांनी प्रथम त्याची शोधाशोध केली व नंतर आरडाओरड करून घर गाठले. आसपासच्या मजुरांनी तुषारला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत फार उशीर झाला होता. घटनेची माहिती मिळताच उपनिरीक्षक चंद्रकांत नाईक यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व मृतदेह शवचिकित्सेसाठी पाठवून दिला.
तुषारचे आईवडील डोंगर भागात काजू गोळा करायला गेले असल्याने त्यांच्याशी त्वरित संपर्क होऊ शकला नाही. मिळालेल्या माहितीनुसार, तुळशीदास यांना दोन मुली व तुषार हा एकुलता एक मुलगा होता. काळाने त्याच्यावरच घाला घातल्याने या कुटुंबावर आभाळच कोसळले आहे.
विचित्र अपघातात
वेळगेत महिला ठार
डिचोली, दि. ३ (प्रतिनिधी)
वेळगे येथे काल २ रोजी तीन वाहनांच्या झालेल्या विचित्र अपघातात दिपाली बंड्या नाईक (२२) ही मूळ बैलूर व सध्या वेळगे येथे राहत असलेली विवाहित महिला जागीच ठार झाली तर तिचा एका वर्षाचा अर्जुन हा मुलगा जखमी झाला.
सविस्तर माहितीनुसार, जीए ०४ टी २७५० व जीए ०१ व्ही ३०२३ या बसेस फोंड्याहून डिचोलीच्या दिशेने येत होत्या. याच वेळी जीए ०५ टी ३७९९ हा ट्रक सुर्लाहून फोंड्याला जात असताना त्याची पुढील बसला त्याची धडक बसली. त्या धडकेने ती बस जाऊन दुसर्या बसला जाऊन आपटली. यात पुढील बसमध्ये चढत असलेली दिपाली त्याच बसच्या चाकाखाली सापडली व जागीच ठार झाला. तिच्या काखेत असलेला तिचा एक वर्षीय मुलगा दूर फेकला गेला. तो जखमी झाल्याने त्याला बांबोळीला उपचारांसाठी नेण्यात आले असून त्याची प्रकृती ठीक असल्याचे समजते. उपनिरीक्षक तुकाराम वाळके यांनी पंचनामा केला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या हवाली करण्यात आला.
Wednesday, 4 May 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment