कॉंग्रेसमधील दबावगट आक्रमक
पणजी, दि. ३ (प्रतिनिधी)
राज्यात प्राथमिक माध्यमावरून निर्माण झालेल्या स्फोटक परिस्थितीवर तात्काळ तोडगा निघावा, अशी कॉंग्रेस श्रेष्ठींची इच्छा आहे. याबाबत सर्वांना विश्वासात घेऊन व भारतीय घटना तसेच निधर्मीवादाला कुठेच बाधा पोहोचणार नाही याची काळजी घेऊनच अंतिम निर्णय घेऊ, अशी माहिती कॉंग्रेसचे प्रभारी जगमितसिंग ब्रार यांनी दिली.उद्या ४ रोजी श्री. ब्रार यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली असून त्यावेळी ते याबाबत भाष्य करणार असल्याचे कॉंग्रेस सूत्रांनी सांगितले.
मातृभाषेतून प्राथमिक शिक्षण देणार्या संस्थांनाच सरकारी अनुदान देण्याचे सरकारी धोरण असताना त्यात बदल करून इंग्रजी माध्यमाच्या संस्थांनाही हे अनुदान लागू करावे या मागणीसाठी कॉंग्रेस पक्षातील नेत्यांनी आपला दबावगट तयार केला आहे. गेल्या विधानसभेत सरकारने ही मागणी फेटाळून लावली होती. आता सार्वजनिक बांधकाममंत्री चर्चिल आलेमाव यांच्या नेतृत्वाखाली इंग्रजीप्रेमी मंत्री व आमदारांनी स्वतंत्र गट तयार करून श्रेष्ठींवर दबाव घालण्याचे जोरदार प्रयत्न चालवले आहेत. या पार्श्वभूमीवर श्री. ब्रार गोव्यात दाखल झाले आहेत. यासंबंधी चर्चा करण्यासाठी कॉंग्रेसचे निरीक्षक सुधाकर रेड्डी यांचेही आगमन होणार असल्याची माहिती कॉंग्रेसच्या सूत्रांनी दिली. आज दोनापावला येथील एका पंचतारांकित हॉटेलात श्री. ब्रार यांनी यासंबंधी विविध नेत्यांची भेट घेऊन त्यांची मते अजमावून घेतली. चर्चिल यांनी काल २ रोजी आपल्या सरकारी बंगल्यावर बैठक बोलावली होती व या बैठकीला उपस्थित १२ नेत्यांपैकी ८ नेत्यांनी सही केलेले निवेदन आज श्री. ब्रार यांना सादर करण्यात आले. सध्याच्या स्पर्धात्मक युगात इंग्रजी भाषेचे ज्ञान अपरिहार्य आहे व त्यामुळे बहुतांश पालकांना इंग्रजी भाषेतून आपल्या मुलांना प्राथमिक शिक्षण देण्याची इच्छा आहे. अशावेळी इंग्रजी माध्यमाच्या संस्थांना अनुदानापासून परावृत्त करणे योग्य नाही, अशी भूमिका या नेत्यांनी श्री. ब्रार यांच्यासमोर सादर केली आहे. दरम्यान, या विषयावरून काही नेत्यांनी बंड करण्याचीही अप्रत्यक्ष धमकी श्रेष्ठींना दिल्याचीही माहिती प्राप्त झाली आहे. इंग्रजीसाठी या नेत्यांकडून सरकारवर दबाव टाकला जात असतानाच भारतीय भाषा सुरक्षा मंचतर्फे या निर्णयाला कडाडून विरोध करण्यात आला आहे.
आज सकाळी सर्वांत प्रथम मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी श्री. ब्रार यांची भेट घेऊन त्यांच्याशी सुमारे अर्धा तास चर्चा केली. या चर्चेत त्यांनी या प्रश्नाबाबत श्री. ब्रार यांना अवगत केल्याचे कळते. मुख्यमंत्र्यांनंतर कॉंग्रेसच्या विविध आमदार तथा पदाधिकार्यांनीही श्री. ब्रार यांची भेट घेऊन आपले मत त्यांच्यासमोर प्रकट केले. श्री. ब्रार यांची भेट घेतलेल्यांत चर्चिल आलेमाव, ज्योकीम आलेमाव, माविन गुदिन्हो, व्हिक्टोरिया फर्नांडिस, आग्नेल फर्नांडिस, पांडुरंग मडकईकर आदींचा समावेश आहे. राज्य नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. विल्फ्रेड डिसोझा व राज्य कायदा आयोगाचे अध्यक्ष ऍड. रमाकांत खलप यांनीही श्री. ब्रार यांची भेट घेतली. दरम्यान, इंग्रजीच्या मागणीसाठी सक्रिय बनलेल्या ‘फोर्स’ संघटनेचे सचिव सावियो लोपीस यांनीही श्री. ब्रार यांची भेट घेऊन त्यांना याबाबतचे निवेदन सादर केले.
चर्चिलवर आयकर छाप्याची चर्चा
दरम्यान, आज संध्याकाळी सार्वजनिक बांधकाममंत्री चर्चिल आलेमाव यांच्या निवासस्थानावर आयकर खात्याचा छापा पडल्याची वार्ता सर्वत्र पसरल्याने एकच गोंधळ निर्माण झाला. या चर्चेबाबत माहिती जाणून घेण्यासाठी प्रयत्न केला असता ही केवळ अफवा असल्याचे कळले. चर्चिल यांच्या विरोधकांनी जाणीवपूर्वक ही अफवा पसरवल्याचे यावेळी सांगण्यात आले.
Wednesday, 4 May 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment