Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday, 16 April 2011

बंद...बंद...बंद

बस आंदोलनाला संमिश्र प्रतिसाद

• सरकारची पर्यायी व्यवस्था नाही
• ग्रामीण भागातील प्रवाशांचे हाल
• अनेक विद्यार्थ्यांची ससेहोलपट

पणजी, दि.१५ (प्रतिनिधी)
अखिल गोवा खाजगी बस मालक संघटनेने आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी सरकार चालढकल करत असल्याच्या निषेधार्थ आज पुकारलेल्या बस बंद आंदोलनाला संपूर्ण गोव्यात संमिश्र प्रतिसाद लाभला. शहरी भागात काही बसेस चालू होत्या तर ग्रामीण भागातील बस सेवा बंद राहिल्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल झाले. अनेकांनी भाड्याच्या वाहनांनी घर गाठले मात्र विद्यार्थ्यांची बरीच ससेहोलपट झाली. संध्याकाळी मात्र बंद मागे घेण्यात आल्याने वाहतूक सुरळीत झाली. यावेळी प्रतिक्रिया देताना बस संघटनेचे सरचिटणीस सुदीप ताम्हणकर यांनी बंद पूर्णपणे यशस्वी झाला मात्र काही फुटीर बसमालकांनी बसेस चालू ठेवल्याचे सांगितले. तर वाहतूक संचालक अरुण देसाई यांनी बंद पूर्णपणे फसल्याचे सांगून गोव्यात सर्वत्र बसेस चालू होत्या व त्या चालू राहाव्यात यासाठी वाहतूक खात्याने पोलिसांच्या मदतीने नियोजन केल्याचे सांगितले.

शहरी बसेस चालू, ग्रामीण बंद
बसेस बंद ठेवल्यास एस्मा (अत्यावश्यक सेवा कायदा) लागू करण्याची व तात्पुरता परवाना घेतलेल्यांचा परवाना रद्द करण्याचा इशारा सरकारने दिल्याने शहरी भागातील काही बसेस चालू होत्या. यात तात्पुरता परवाना घेतलेल्या बसेसची संख्या जास्त होती. या बसेस चालू राहिल्याने पणजी, म्हापसा आदी शहरी बस स्थानकावर खाजगी व कदंब बसेस दिसत होत्या. मात्र एस्माचा परिणाम ग्रामीण भागातील बसेसवर दिसला नाही. ग्रामीण भागातील बहुतेक बसेस बंद होत्या. ज्या चालू होत्या त्या अर्ध्यावरून परतून गेल्या. वाळपईच्या बसेस साखळीपर्यत, कुंभारजुवेच्या माशेलपर्यंत येऊन पहिली फेरी मारून गेल्या. त्यामुळे ग्रामीण प्रवाशांचे दिवसभर अतोनात हाल झाले.

पर्यायी व्यवस्थेबाबत सरकार अपयशी
खाजगी बसेस बंद राहिल्यास पर्यायी व्यवस्था सरकार करेल. तसेच परराज्यातून बसेस आणू, अशी घोषणा वाहतूक खात्याने केली होती. मात्र या बंदला पर्यायी व्यवस्था सरकारकडून झालीच नसल्याने राज्यातील अनेक बस स्थानकावर प्रवासी अडकून पडले. दरम्यान, साखळी येथून माशेल बाणस्तारी येथे जाण्यासाठी जवळजवळ दीड तास बस नसल्याने साखळी आरोग्य केंद्राजवळ उभे राहून कंटाळलेल्या प्रवाशांनी या मार्गावरून पणजीला परतणार्‍या एका शववाहिकेतून प्रवास करत बाणस्तारी, पणजी गाठली.तर काही लोकांनी या मार्गावरून जाणार्‍या रेती ट्रकांच्या आधारे आमोणा माशेल भागात जाणे पसंत केले.

ठोस आश्‍वासन नसूनही बंद मागे
गेले चार दिवस वाहतूक खात्याच्या जुन्ता हाउस येथील कार्यालयासमोर आपल्या मागण्यांवर सरकारने गंभीरपणे विचार करावा म्हणून बस संघटनेचे सरचिटणीस सुदीप ताम्हणकर उपोषणाला बसले होते. त्यांना सदस्यांनी साखळी उपोषण करून साथ दिली होती. मात्र सरकारने त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे आज बस बंद आंदोलन पुकारण्यात आहे. त्यामुळे जागे झालेल्या वाहतूक खात्याने बसमालकांना आज दुपारी चर्चेला बोलावले व चर्चा केली. या चर्चेत वाहतूक संचालक अरुण देसाई, उपसंचालक प्रल्हाद देसाई, पोलिस उपअधीक्षक देऊ बाणावलीकर, बस संघटनेचे सल्लागार ऍड. सुभाष सावंत, अध्यक्ष विशाल देसाई, श्री. ताम्हणकर, उत्तर गोवा प्रमुख सुदेश कलंगुटकर आदींनी भाग घेतला. या वेळी बस मालकांच्या सर्व पंधराही मागण्यावर चर्चा करण्यात आली. यातील प्रवासी कर, बसेसवर जाहिराती आदी काही मागण्यांवर वाहतूक संचालकांनी विचार करण्याचे आश्‍वासन दिले. तर बस स्थानकावर जागा, ‘आरटीए’त संघटनेच्या सदस्यांची नेमणूक आदी काही मागण्या फेटाळून लावल्या. बसमालकांनी ‘सोसायटी’ करून मागण्या पुढे केल्यास त्या लवकर मान्य होतील अशी सूचना श्री. देसाई यांनी केली असता सोसायटी स्थापन करण्यात अडचण ठरणार्‍या गोष्टींची जाणीव श्री. ताम्हणकर यांनी संचालकांना करून दिली. या वेळी श्री. देसाई यांनी आपण बसमालकांच्या मागण्या सरकार दरबारी मांडण्याचे आश्‍वासन दिले.
या प्रसंगी मेरशी मार्गावरील तसेच फोंडा मार्गावरील काही मोजक्याच बसेसना वाहतूक खाते सांभाळून घेत संघटनेच्या सदस्यांना सापत्नभावाची वागणूक देत असल्याचा आरोप बसमालकांनी केला. यावेळी वातावरण बरेच तापले. मात्र श्री. देसाई यांनी काही बाबतीत तसे घडल्याचे कबूल केले. मात्र संघटनेच्या आरोपात तथ्य नसल्याचे सांगून चर्चा संपवली. या चर्चेनंतर बाहेर येऊन श्री. ताम्हणकर यांनी उपोषण मागे घेतल्याचे व उद्यापासून बसेस चालू होणार असल्याची घोषणा केली. या प्रसंगी सुमारे २०० च्या आसपास बसमालक उपस्थित होते.

कुंकळ्ळीत दोघांना अटक
मडगाव, (प्रतिनिधी)
खासगी बसमालकांनी पुकारलेल्या बस बंद आंदोलनाच्या दिवशी बसवाहतूक चालू ठेवलेल्या बसेस अडविल्याबद्दल कुंकळ्ळी पोलिसांनी आज भिवसा-कुंकळ्ळी येथे दोघांना अटक केली. त्यांची नावे नीलेश बाबुसो देसाई व हलेश पुरसो देसाई अशी आहेत. त्यांनी मडगावहून काब द राम येथेे निघालेली बस भिवसा येथे अडविली होती. त्यांच्याविरुद्ध भा.दं.स. कलम ३१ खाली गुन्हा नोंदविलेला आहे.

पेपर लांबणीवर
बस बंदमुळे पदवी व पदविका अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचा दि. १५ एप्रिलचा पेपर पुढे ढकलण्यात आला आहे. हा पेपर कधी घेतला जाईल याची माहिती येत्या काही दिवसांत संबंधित सर्व महाविद्यालयांना कळवली जाईल अशी माहिती आज गोवा विद्यापीठाचे कुलसचिव प्रा. व्ही. पी. कामत यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. तसेच, उद्या दि. १६ पासून असलेले सर्व पेपर ठरलेल्या दिवशी घेतले जाणार असल्याचेही विद्यापीठाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, बस मालकांच्या संपामुळे विद्यार्थ्यांच्या परीक्षेवर झालेल्या परिणामाचा एनएसयुआचे अध्यक्ष सुनील कवठणकर यांनी निषेध केला.

No comments: