Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 11 April, 2011

बेशरम सरकार, निर्दयी आरोग्यमंत्री!

• चौथ्या दिवशीही मलेरिया सर्वेक्षकांकडे सरकारची पाठ
• आजपासून बायकामुलांसह उपोषण


पणजी, दि. १० (प्रतिनिधी)
गेले चार दिवस आरोग्य संचालनालयासमोर आमरण उपोषणाला बसलेल्या मलेरिया सर्वेक्षकांची विचारपूस करून त्यांच्या मागण्यांबाबत तोडगा काढण्यासाठी काहीच पुढाकार न घेतलेल्या सरकारच्या बेशरमपणाचा आज सर्व थरांतून जाहीर निषेध करण्यात आला. उपोषणकर्त्या दोन कर्मचार्‍यांची प्रकृती ढासळल्याने त्यांना तात्काळ ‘गोमेकॉ’त दाखल करण्यात आले आहे. उद्या ११ रोजीपासून या कर्मचार्‍यांच्या पत्नी व मुलेही या उपोषण आंदोलनात सहभागी होणार असल्याने हे आंदोलन सरकारला चांगलेच भोवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, या उपोषणकर्त्यांची विरोध पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी भेट घेऊन त्यांची विचारपूस केली.
हे कर्मचारी गेली पंधरा वर्षे अल्प वेतनावर आरोग्य खात्यात मलेरिया सर्वेक्षक म्हणून काम करत आहेत. सेवेत नियमित करण्याबाबत त्यांची मागणी रास्त आहे व यासाठी त्यांनी आत्तापर्यंत अनेकवेळा आंदोलनेही केली आहेत. मुख्यमंत्री दिगंबर कामत व आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी वेळोवेळी त्यांना दिलेली आश्‍वासने पोकळ ठरली आहेत व त्यामुळेच सरकार त्यांच्या आयुष्याशी खेळ करीत असल्याचा आरोप करून त्यांनी आता अखेरच्या न्यायासाठी आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे. ‘आम आदमी’चे गुणगान गाणारे व देवदर्शनात व्यस्त राहणारे मुख्यमंत्री एवढे बेशरम कसे काय असू शकतात, असा सवाल उपस्थित होत असून आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांचा निर्दयीपणाही यानिमित्ताने उघड झाला आहे, अशी टीकाही सर्व थरातून व्यक्त होत आहे. मुख्यमंत्री आपली खुर्ची सांभाळण्यात गर्क तर आरोग्यमंत्री नेहमीप्रमाणे ‘आउट ऑफ स्टेशन’ आहेत. अशावेळी त्यांनी जनतेला रस्त्यावरच सोडून दिले आहे काय, असा खणखणीत सवाल या कर्मचार्‍यांनी आज प्रसारमाध्यमाशी बोलताना केला आहे.
बायका, मुलेही उपोषणाला बसणार
सरकार गेली पंधरा वर्षे सातत्याने करीत असलेल्या अन्यायाला सामोरे जाताना जीव मेटाकुटीला आला आहे. आमरण उपोषणाच्या या आंदोलनात आता बायका व मुलांनाही सहभागी करून घेणार असल्याचे प्रेमदास गावकर यांनी सांगितले. सरकारच्या निष्ठुरपणाला व निर्दयीपणाला आता कोणत्या पद्धतीने तोंड देणार हाच प्रश्‍न आहे. गोव्यातील समस्त जनतेला या गरीब कर्मचार्‍यांच्या मदतीला धावून येण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. दैवाच्या बळावरच आपण मुख्यमंत्रिपदी विराजमान आहोत, असे सांगणार्‍या मुख्यमंत्र्यांनी प्रत्यक्ष देवालाही आपल्या बाजूनेच ओढले आहे अन्यथा निदान देवालातरी या कर्मचार्‍यांची दया आली असती, असा टोलाही यावेळी त्यांनी हाणला. आज चौथ्या दिवशी विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी या कर्मचार्‍यांची भेट घेतली व त्यांची विचारपूस केली. या कर्मचार्‍यांबाबत सरकारच्या बेपर्वाई व बेजबाबदारपणाचा निषेध करून त्यांनी याप्रकरणी सरकारला जाब विचारणार असल्याचेही सांगितले. आज विविध संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी या कर्मचार्‍यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दर्शवला.

No comments: