पंचायत मंडळालाच सभागृहात कोंडले
मडगाव, दि.१५ (प्रतिनिधी)
सां जुझे आरियालमधील ‘त्या’ वादग्रस्त मेगा प्रकल्पप्रकरणी तेथील रहिवाशांच्या सहनशक्तीचा आज अंत झाला. त्यांनी साळावलीच्या ओलितक्षेत्रात उभ्या राहिलेल्या त्या प्रकल्पाला दिलेला परवाना विनाविलंब मागे घ्यावा, अशी मागणी करून पंचायत बैठकीसाठी जमलेल्या संपूर्ण पंचायत मंडळालाच पंचायत घरात कोंडले. रात्री उशिरापर्यंत ही स्थिती तशीच होती.
गेल्या काही महिन्यांपासून या गृहप्रकल्पाविरुद्ध आरियालमध्ये असंतोष खदखदत आहे. कायद्यानुसार ओलितक्षेत्रात घरांच्या बांधकामांना परवाना देता येत नाही; पण आरियालमध्ये मेगा प्रकल्पाला परवाना देण्यात आला. त्यात पंचायतीपासून सर्व सरकारी खाती त्यात सामील झाल्याचा आरोप गावकरी करत आहेत. याच मुद्याला अनुसरून आधीच्या दोन तीन ग्रामसभा तंग वातावरणात तहकूब झाल्या आहेत.
आपला या प्रकल्पाच्या परवान्याशी संबंध नाही. आधीच्या मंडळाने तो दिला होता आणि तोही नगर नियोजन खात्याच्या शिफारशीवरून अशी भूमिका सध्याच्या पंचायत मंडळाने घेतली आहे. त्यामुळेे विचित्र कोंडी झालेली आहे. गावकर्यांनी त्यानंतर साळावली ओलितक्षेत्र प्राधिकरण, नगरनियोजन खाते याकडे संपर्क साधून परवाना मागे घेण्याची मागणी केली होती. मात्र कोणतीच कारवाई न झाल्याने त्यांनी आपला सगळा रोख पंचायतीपुरता मर्यादित ठेवला.
आज पंचायत मंडळाच्या बैठकीची संधी साधून नागरिक जमले. त्यांनी पंचायत घराजवळ येऊन सदर मेगा प्रकल्पाचा परवाना मागे घेण्याची मागणी केली. प्रभारी सरपंच व्हिन्सी मास्कारेन्हस त्यांना ठोस आश्वासन देऊ न शकल्याने पंचायत मंडळालाच कोंडून परवाना मागे घेईपर्यंत बाहेर सोडणार नाही, असा इशारा दिला. दुपारी ४ वाजता सुरू झालेल्या या आंदोलनामुळे सर्वत्र खळबळ माजली. मायणा कुडतरीचा पोलिस फौजफाटा तेथे धावून गेला; पण सरपंचांनी त्यांना कोणतीच कृती करू नये असे सांगितल्याने ते गप्प राहिले. रात्री उशिरापर्यंत तशीच स्थिती होती.
Saturday, 16 April 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment