Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 10 April, 2011

डोंगराचा भाग कोसळून दवर्लीत कामगार ठार

मडगाव, दि. १० (प्रतिनिधी): झरीवाडा - दवर्ली येथे बंगल्याच्या कामासाठी डोंगरकापणी सुरू असताना तो अचानक कोसळल्याने त्या खाली दोन कामगार गाडले गेले. त्यात महम्मद ताजुद्दीन (३५) हा जागच्या जागीच ठार झाला तर अग्निशामक दलाने महम्मद शकील (२७) याला वाचविण्यात यश मिळविले. त्याला उपचारासाठी हॉस्पिसियोमध्ये दाखल करण्यात आले आहे. ही घटना आज सकाळी ९.३० वा. घडली. बंगल्याचे मालक व ठेकेदार यांच्या निष्काळजीपणामुळे प्राणहानी होण्याची ही घटना घडली असून मायणा - कुडतरी पोलिसांनी मालकासहित आणखी दोघांना अटक केली आहे.
आज सकाळी गौस बी जाफर सय्यद यांच्या बंगल्याच्या कामासाठी जमीन सपाट करण्याचे काम जेसीबीच्या साहाय्याने चालू होते. तो भाग डोंगराळ असल्याने व त्यातही ती माती भुसभुशीत असल्याने डोंगर कापताना वरचा कडा कोसळला व त्याखाली महम्मद शकील व महम्मद ताजुद्दीन हे गाडले गेले. तरीही त्यावर आणखी माती कोसळू लागली. तात्काळ मडगावच्या अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. त्यांनी जेसीबी व इतर वस्तूंनी गाडलेल्यांना माती दूर सारून काढण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत श्‍वास कोंडून महम्मद ताजुद्दीन ठार झाला होता तर महम्मद शकील अखेरचा श्‍वास घेत होता. तात्काळ उपाययोजना झाल्याने त्याला सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळाले. त्यानंतर त्यांना हॉस्पिसियोमध्ये उपचारासाठी दाखल केले.
हे वृत्त मायणा - कुडतरी पोलिसांना समजताच पोलिस निरीक्षक सिद्धांत शिरोडकर यांनी पोलिस पथकासह घटनास्थळी धाव घेतली व जखमीला उपचारासाठी रवाना केले. तर दुसर्‍याचा मृतदेह हॉस्पिसियोत नेला. बंगल्याचे मालक गौस बी जाफर सय्यद यांनी डोंगर कापताना तो कोसळू नये म्हणून कोणतीच काळजी घेतली नव्हती व त्याचे दोन ठेकेदार शेख महम्मद मन्सूर व अब्दुल सुबान शेख यांनी निष्काळजीपणा केला व या निष्काळजीपणामुळे गरीब कामगाराचे प्राण गेले. त्यासाठी तिघांनाही अटक करण्यात आली आहे. डोंगर कापण्याचा परवाना होता की नाही हे समजू शकले नाही. पोलिस तपास करीत आहेत.

No comments: