• १८ महिला संघटना एकत्र
• सरकारला १० दिवसांची मुदत
पणजी, दि. १३ (प्रतिनिधी)
बेदरकार खनिज वाहतुकीविरोधात आत्तापर्यंत पुरुषांनी केलेल्या आंदोलनांची दखल घेण्यास सरकारी यंत्रणा निष्क्रिय ठरल्याने आता या आंदोलनाची सूत्रे महिलांनी आपल्या हातात घेण्याचे ठरवले आहे. एकवोट सोसायटीच्या झेंड्याखाली एकत्र आलेल्या दक्षिण गोव्यातील सुमारे १८ महिला संघटनांच्या रणरागिणींनी खनिज वाहतुकीचे नियमन करण्यासाठी सरकारला दहा दिवसांची मुदत देऊन एका नव्या आंदोलनाचे रणशिंग फुंकले आहे.
राज्य सरकारने दक्षिण गोव्यातील विविध खाण प्रभावित क्षेत्रातील खनिज वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी दहा दिवसांत ठोस उपाययोजना आखली नाही तर महिला संघटना रस्त्यावर उतरून खनिज वाहतूक रोखेल व त्यामुळे उद्भवणार्या परिणामांना सरकार जबाबदार राहील, असा इशारा संघटनेच्या नेत्या सुवर्णा तेंडुलकर यांनी दिला आहे. यासंबंधीचे निवेदन मुख्य सचिव, वाहतूक संचालक, पोलिस खाते व दाबाळ-किर्लपाल पंचायतीला देण्यात आले आहे. सांगे तालुक्यातील दाबाळ ते कापशे या भागातील परिसरातील लोकांना खनिज वाहतुकीमुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. खनिज ट्रकांमुळे वाहतुकीची कोंडी हा तर नित्याचाच प्रकार ठरला असून त्यामुळे येथील नागरिकांचे जगणे हैराण झाल्याचेही श्रीमती तेंडुलकर यांनी म्हटले आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सकाळी ८ ते दुपारी १ आणि दुपारी २ ते संध्याकाळी ६ या काळात खनिज वाहतूक करण्यास मान्यता आहे. या वेळेच्या नियोजनानुसार सकाळी ८ वाजता बेफामपणे खनिज वाहतूक केली जाते. खनिज ट्रकचालक एकमेकांना मागे टाकण्याच्या शर्यतीत जनतेच्या जिवाशीच खेळ करीत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. दुपारच्या वेळेला रस्त्याच्या दुतर्फा खनिज ट्रक पार्क करून ठेवले जातात व त्यामुळे इतर वाहतुकीलाही रस्त्यावरून प्रवास करणे कठीण बनते, असेही श्रीमती तेंडुलकर यांनी म्हटले आहे. या वाहतूक कोंडीचा परिणाम विद्यार्थी, रुग्ण, लग्नाची वर्हाडे आदींवर होतो. एखाद्याच्या अंत्ययात्रेच्या वेळीही रस्त्यावरून चालत जाणे शक्य होत नाही, अशीही खंत त्यांनी व्यक्त केली आहे.
Thursday, 14 April 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment