वास्को, दि. १२(प्रतिनिधी)
येथील दाबोळी विमानतळाच्या धावपट्टीचे दुरुस्ती काम सुरू असल्याने प्रामुख्याने दुपारी ३ ते संध्याकाळी ५.३० या वेळेत काही ‘नेव्हिगेशनल लाईटस्’ बंद ठेवले जात आहे. त्यामुळे आगामी दोन महिन्यांपर्यंत दररोज सुमारे १९ विमानांना आपली वाहतुकीची वेळ बदलणे अनिवार्य बनले असून एक प्रकारे ही वेगळीच ‘हवाई कसरत’ ठरली आहे.
५ एप्रिलपासून सुरू झालेल्या या कामानंतर दुरुस्तीच्या वेळेत सदर ‘लाइटस्’ बंद असतानाही काही वैमानिक आपल्या अनुभवाच्या बळावर विमाने दाबोळीच्या धावपट्टीवर उतरवत असल्याचे नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाच्या लक्षात आले. त्यामुळे या गंभीर प्रकाराची त्यांनी कडक दखल घेतली. त्यानंतर आजपासून सकाळी ८.३० ते दुपारी १ व दुपारी ३ ते संध्याकाळी ५.३० या वेळेत तेथे विमान उतरवण्याचे बंद करण्यात आल्याची माहिती दाबोळी विमानतळ सूत्रांनी दिली. यासंदर्भात चार विमान कंपन्यांवर नोटिसाही बजावण्यात आल्या आहेत. दाबोळी विमानतळावरील तसेच नौदल सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ५ एप्रिल पासून येथील धावपट्टीच्या ‘डोंबेल’ भागाच्या दुरुस्तीचे काम हातात घेण्यात आले आहे. ५ जूनपर्यंत सदर काम पूर्ण होणार आहे. हे काम ‘मिलिटरी इंजिनीअरींग सर्व्हिसेस यांना देण्यात आले आहे. सकाळी ८.३० ते दुपारी १ व दुपारी ३ ते संध्याकाळी ५.३० अशी या दुरुस्ती कामाची वेळ आहे. यादरम्यान उड्डाणपट्टीवर असलेले काही नेव्हिगेशनल लाईटस् बंद ठेवावे लागत आहेत. साहजिकच या काळात दाबोळीवर विमान उतरवणे खूपच कठीण असल्याचे सूत्रांनी सांगितले. दाबोळी विमानतळावरील धावपट्टी सकाळी ८.३० ते १ वाजेपर्यंत विमाने उतरवण्यासाठी बंद असल्याने सदर वेळेत तेथे कुठलाच त्रास होत नाही. मात्र दुपारी ३ ते संध्याकाळी ५.३० हा वेळ घाईगडबडीचा असल्याने गेल्या काही दिवसांत याचा त्रास दिसून आला असल्याचे सूत्रांनी सांगितले.
दुपारी ३ ते ५.३० या दुरुस्तीच्या वेळेत खर्या अर्थाने बदल करण्याची गरज असल्याचे सांगितले जात असले तरी नौदल सूत्रांच्या माहितीनुसार तांत्रिक कारणामुळे सदर वेळेत बदल करणे कठीण आहे. या स्थितीतही काही वैमानिकांनी आपल्या अनुभवाच्या जोरावर दाबोळीवर विमाने उतरवली असली तरी एखाद्या मानवी चुकीने जर दुर्घटना घडली असती तर त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न सध्या चर्चिला जात आहे.
दुर्घटना घडली तर...
दाबोळी विमानतळाच्या धावपट्टीचे दुरुस्तीकाम सुरू असतानाही आपल्या अनुभवाच्या जोरावर काही वैमानिकांनी तेथे विमाने उतरवल्याचे दिसून आले आहे. मात्र हे प्रकार म्हणजे दुर्घटनेला खुले आमंत्रण ठरू शकतात. त्यामुळे जर एखादी गंभीर अपघात घडला तर त्याची जबाबदारी कोणाची, असा प्रश्न निर्माण झाला आहे. तथापि, नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने या प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment