Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday, 13 April 2011

‘अपरांत’ कामगारांचा अखेर विजय, संप मागे

कुडचडे, दि. १२ (प्रतिनिधी)
कष्टी येथील अपरांत आयर्न स्टील कंपनीमधील कंत्राटदारांच्या कामगारांचा विजय झाला असून कंपनी व कंत्राटदारांनी अखेर या कामगारांपुढे शरणागती पत्करली आहे. मागणीनुसार, त्यांना आता प्रतिदिनी २०० रुपये पगार देण्याचे कंपनी व कंत्राटदारांनी मान्य करत अन्य मागण्यांवर महिन्याभरात तोडगा काढण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले आहे.
आज कामगार लवादासमक्ष या संदर्भात करार झाल्यानंतर गेल्या कित्येक दिवसापासून सुरू असलेला हा संप मागे घेण्यात आल्याची घोषणा करण्यात आली. यावेळी कामगारांनी फटाक्यांची आतषबाजी करत आपला आनंद व्यक्त केला.
गेल्या काही काळापासून २४ तास कंपनीच्या गेटबाहेर ठाण मांडून कोणत्याही दडपणाला न जुमानता या कामगारांनी संप सुरूच ठेवला होता. देण्यात येणार्‍या १३५ रुपयांच्या मानधनात वाढ करावी, सुट्टी, ‘ओ.टी.’, कपड्यांचा पुरवठा, ८ तास काम व अन्य काही मागण्या कामगारांनी कंपनी व कंत्राटदारांसमोर ठेवल्या होत्या. यातील वाढीव पगाराची मागणी मान्य झाल्याने महागाईच्या काळात थोडा दिलासा मिळणार असल्याची प्रतिक्रिया संघटनेचे अध्यक्ष बाबू शिंगाडी यांनी सांगितले. सदर संप तात्पुरता थांबविण्यात आला असून कामगारांच्या इतर मागण्या पूर्ण करण्यासाठी संबंधितांना एका महिन्याचा अवधी देण्यात आला आहे. राहिलेल्या मागण्या पूर्ण न केल्यास पुन्हा कामगार संपावर जाणार असल्याचे संघटनेचे पदाधिकारी आनंद बेतकीकर यांनी यावेळी सांगितले.
‘गोवादूत’चे अभिनंदन
दरम्यान, कामगारांनी संप सुरू केल्यापासून ते संप मिटेपर्यंत यासंबंधी सतत बातम्या प्रसिद्ध करून सरकार व कंपनी व्यवस्थापनाला जाग आणल्याबद्दल आणि कोणत्याही दडपशाहीला न जुमानता केवळ कामगारवर्गाच्या बाजूने उभा राहिला याबद्दल या कामगारांनी ‘दै. गोवादूत’चे खास अभिनंदन केले आहे.

No comments: